१९.
मराठा काल
 


शिवछत्रपतींची स्वधर्मसाधना
 महाराष्ट्रसंस्कृतीचा इतिहास पाहताना येथवर आपण बहामनी कालातील संस्कृतीचे स्वरूप पाहिले. प्रथम बहामनी सुलतानाची सत्ता कशी होती ते आपण न्याहाळले. नंतर त्या काळचे नेते जे मराठा सरदार आणि शास्त्रीपंडित यांच्या नेतृत्वाचे आणि कर्तृत्वाचे परीक्षण केले आणि नंतर भागवतधर्माचे प्रणेते ज्ञानेश्वर, नामदेव- एकनाथ व तुकाराम हे संत आणि महाराष्ट्रधर्माचे प्रणेते समर्थ रामदास यांच्या कार्याचे विवेचन केले. आता मराठाकालाचे - या कालखंडातील संस्कृतीचे स्वरूप पहावयाचे आहे. इ. स. १६४५ ते इ. स. १८०० असा सुमारे दीडशे वर्षांचा हा काळ आहे. १६४५-४६ च्या सुमारास प्रथम श्री शिवछत्रपतींनी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले आणि या 'स्वराज्याचे पुढे मराठा साम्राज्य होणार आहे' अशा भावार्थाची प्रतिपच्चंद्ररेखेव वर्धिष्णू अशी मुद्राही त्यांनी करून घेतली. तेथपासून इ. स. १७९५ पर्यंत म्हणजे खर्ड्याच्या विजयापर्यंत हे साम्राज्य वर्धिष्णू होते. हा एवढा काल म्हणजे मराठा काल होय. या कालातल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आता समीक्षण करावयाचे आहे.

खग्रास
 शिवछत्रपतींनी स्वराज्याचा महासंकल्प केला आणि हजारो मावळ्यांसह स्वराज्याची शपथ घेतली त्या वेळी हिंदुस्थान हा देश चहू बाजूंनी शत्रूंनी ग्रासलेला होता. मुस्लिम हे या देशाचे पहिले शत्रू. साडेसहाशे वर्षे ते या देशावर आक्रमण करीत होते. आणि १५६५ साली विजयनगरचा पाडाव झाल्यानंतर त्या सत्तेचा प्रतिकार करील अशी एकही शक्ती भारतात राहिलेली नव्हती. मुस्लिमांनी केवळ हिंदूंची राजसत्ताच नष्ट केली होती, असे नव्हे; तर हिंदुधर्म, हिंदुसंस्कृती, हिंदुपरंपरा आणि समस्त हिंदुजीवनच त्यांनी उध्वस्त करीत आणले होते. हिंदू आणि मुस्लिम यांचे वैर अगदी मूलगामी होते. हिंदुस्थान हा देश निर्हिंदु करून टाकण्याची मुस्लिमांची प्रतिज्ञा होती आणि अफगाणिस्थान, सिंधप्रांत, बंगाल, पंजाब या देशांत त्यांनी ती बरीचशी सिद्धीस नेली होती. सहजीवन ही कल्पना इस्लामला सर्वथा नामंजूर होती. इस्लामेतर समाज, इस्लामेतर धर्म, संस्कृती याचा संपूर्ण नाश करून सर्व जग इस्लामच्या कक्षेत आणून सोडणे हाच खरा इस्लामचा विजय, अशी मुसलमानांची धारणा होती.
 अशा आकांक्षेने प्रेरित झालेला हा मुस्लिमसमाज तुलनेने पाहता त्या काळच्या हिंदुसमाजापेक्षा पुष्कळच बलशाली होता. मुस्लिम तेवढा एक ही निष्ठा त्यांच्यात तुलनेने खूपच जास्त प्रमाणात होती. त्यामुळे हा समाज लवकर संघटित होत असे. शिवाय व्यापार, धर्मप्रसार व साम्राज्य यासाठी मुस्लिम लोक सर्व जगभर फिरत असल्यामुळे त्यांचा आलोक हिंदूंच्यापेक्षा जास्त व्यापक होता. अरबस्तान, इराक, तुर्कस्थान, इराण, अफगणिस्थान, मध्य आशिया अशा लांबलांबच्या प्रदेशातून हजारो मुस्लिम हिंदुस्थानात दरसाल येत आणि देशभर राज्य करीत असलेल्या मुस्लिम सत्तांमध्ये वरिष्ठ, मानाची स्थाने मिळवून त्या त्या सत्तांचे बळ वाढवीत. मुस्लिमांचे दळणवळण युरोपशी नित्य चालू असल्यामुळे दारूगोळा, तोफा, बंदुका ही नवी शस्त्रास्त्रे त्यांच्या परिचयाची होती आणि ती त्यांनी हिंदुस्थानात आणल्यामुळे त्यांच्या लष्करी सामर्थ्यात सतत वाढ होत असे. अशा बहुविध बलांचा हिंदूंजवळ संपूर्ण अभाव होता. त्यामुळे आक्रमकांचा प्रतिकार करण्याची त्यांची शक्ती लुळीपांगळी होऊन गेली होती.

मूलगामी वैरे
 पोर्तुगीज हा हिंदूंचा दुसरा शत्रू मुसलमानांच्या तुलनेने पोर्तुगीज हा शत्रू लहान होता. त्याचे सामर्थ्य कमी होते. पण हिंदूंचे, निदान महाराष्ट्रीयांचे जीवन उध्वस्त करून टाकण्याच्या दृष्टीने त्यांच्या ठायी पुरेसे सामर्थ्य होते. १४९८ साली त्यांनी या देशात प्रवेश केला. १५१० साली गोवा घेतला आणि दहावीस वर्षात आपला पाय महाराष्ट्राच्या या नंदनवनात पक्का रोवला. पोर्तुगीज हे मुस्लिमांप्रमाणेच हिंदूंशी मूलगामी वैर करणारे लोक होते. केवळ राजकीय सत्तेवर त्यांची तहान भागत नव्हती. आपले राज्य निर्हिंदू करून टाकणे हे त्यांचे ध्येय होते. मुसलमानांप्रमाणेच ते धर्मपिसाट होते आणि धर्मप्रसारासाठी वाटेल ते क्रौर्य करण्यास, कत्तली, विध्वंस, संहार, अमानुष छळ करण्यास ते मागेपुढे पहात नसत. हिंदूंचा सर्वनाश हेच मुस्लिमांप्रमाणेच त्यांचेही ध्येय होते. शिवाय ते स्वतःच पाश्चात्य देशातून आल्यामुळे नौकानयन, दुर्गांची उभारणी, नवी शस्त्रास्त्रे या दृष्टीने ते मुसलमानांपेक्षाही वरचढ होते. युरोपात त्या वेळी प्रबोधन युग सुरू झाले होते. त्यातून सर्वत्र पसरलेली भौतिक विद्या पोर्तुगीजांना अवगत होती. व्यापार हा तर भारतात येणाऱ्या पाश्चात्य सत्तांचा आत्माच होता. पोर्तुगीज या वेळी तर व्यापारात आघाडीवर होते. अरबांचा व्यापार पाहता पाहता त्यांनी हस्तगत केला आणि कोकण भागात अनेक बंदरे आणि किल्ले बांधून आपली राजसत्ता, धर्मसत्ता व आर्थिक सत्ता यांचा पाया त्यांनी भक्कम करून टाकला.

इंग्रज - अलिप्तता
 इंग्रज हा हिंदूंचा आणि मराठ्यांचा तिसरा शत्रू. इंग्रज हे मुस्लिम किंवा पोर्तुगीज यांच्या इतके कडवे आणि मूलगामी वैरी नव्हते. पण जास्त धोरणी, जास्त राजनीति- निपुण, पाश्चात्य विद्येने जास्त संपन्न आणि म्हणूनच जास्त भयंकर असा हा शत्रू होता. प्रारंभी मराठी सत्तेशी त्यांनी उघड वैर केले नाही. पण हिंदुस्थानात मुस्लिम सत्ताच कायम राहावी, मराठी सत्तेचे निर्मूलन व्हावे, अशी त्यांची इच्छा व तसेच प्रयत्नही कायम चालू असत. आपण केवळ व्यापारी आहो, राजकारणापासून अलिप्त आहो, असे बाह्यतः ते सांगत आणि मराठ्यांना कधीही साह्य करीत नसत. पण त्यांचा शत्रू जो विजापूर किंवा मोगल याला मात्र ते अंतःस्थपणे विपुल साह्य करीत असत. इंग्रजांप्रमाणेच फ्रेंच आणि डच हेही मराठ्यांचे शत्रूच होते. पण ते फारसे प्रवळ कधीच झाले नाहीत. मराठ्यांशी त्यांचा सामना असा कधी झाला नाही. मात्र हिंदुस्थानात मुस्लिमांचे राज्यच असावे, मराठ्यांचा कधीही जय होऊ नये, ही त्यांचीही इंग्रजांप्रमाणेच वासना होती. शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेतून सुटत नाहीत, असे वृत्त जेव्हा सगळीकडे पसरले होते, तेव्हा 'शिवाजीपासून आता आपली मुक्तता झाली' असा आनंद मनोमन हे सर्व पाश्चात्य व्यापारी मानीत होते.

हाडवैरी
 शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला त्या वेळी सर्व हिंदुस्थान हिंदूच्या हाडवैऱ्यांनी असा ग्रासलेला होता. हे सर्व शत्रू हिंदूंना नामशेषही राहू देण्यास तयार नव्हते. मुरुस्लिमांनी इराण, अफगणिस्तान, बलुचिस्तान या देशांत तद्देशीयांच्या बाबतीत हे केलेच होते. पोर्तुगीज जेथे जेथे गेले तेथे तेथे- आफ्रिकेत, लॅटिन अमेरिकेत, गोव्यात- त्यांनी हेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवले होते. गेल्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत सर्व हिंदुस्थान लवकरच ख्रिश्चन होऊन जाईल, अशी इंग्रज पंडितांनाही आशा होती. अशा तऱ्हेने हिंदुस्थान सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत अगदी खग्रास झाला होता.

आमूलाग्र क्रांती
 शिवाजी राजे अकराव्या वर्षी बंगरुळहून महाराष्ट्रात आले आणि पुण्याच्या परिसरात राहून प्रथम दादोजी कोंडदेवांच्या हाताखाली आणि नंतर स्वतंत्रपणे आपल्या जहागिरीची व्यवस्था पाहू लागले. त्या वेळी भोवतालची परिस्थिती अशी होती : सगळीकडे अंधकार होता. खग्रास होता. आशेचा किरणही कोठे दिसत नव्हता. ते या परिस्थितीचे जेव्हा निरीक्षण करू लागले, अवलोकन करू लागले, आपले गुरुजी दादोजी कोंडदेव, शामराज नीलकंठ, सोनोपंत डबीर इ. इतर वडीलधारी माणसे, कंक, पासलकर, जेधे इ. सवंगडी यांच्याशी चर्चा विचारविनिमय करू लागले, महाभारत, रामायण, गीता यांचे श्रवण करू लागले, समर्थ रामदासस्वामी यांच्या कार्याची दिशा त्यांच्या ध्यानात येऊ लागली, त्या वेळी त्यांच्या बुद्धीचा एक निश्चय झाला की मराठी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आमूलाग्र क्रांती केल्यावाचून हिंदूंना उत्कर्षाची कसलीही आशा धरता येणार नाही. शिवछत्रपती हे काही ग्रंथकार तत्त्ववेत्ते म्हणून प्रसिद्ध नाहीत. त्यांनी स्वतः एकही ग्रंथ लिहिला नाही. पण त्यांनी जे प्रत्यक्ष कार्य केले त्यावरून, त्यांची जी काही पत्रे उपलब्ध आहेत त्यावरून शिवभारतकारांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे वर्णन केले आहे त्यावरून, समर्थांनी त्यांचा जो गौरव केला आहे त्यावरून, आणि तत्कालीन पत्रव्यवहार, बखरी इ. साधनांवरून पाहता असे निश्चित म्हणता येते की क्रांतीच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहता हा महापुरुप तत्ववेत्त्यांचाही तत्त्ववेत्ता होता. क्रांतीचे तत्त्वज्ञान, काही सिद्धान्त, प्रारंभीच निश्चित केल्यावाचून त्यांनी केलेले कार्य त्यांना करताच आले नसते. वर सांगितलेल्या साधनांच्या आधारे, ते तत्त्वज्ञान पाहत पाहत, त्याशी त्यांच्या कार्याची संगती लावीत लावीत, छत्रपतींच्या चरित्राचे विवेचन आपल्याला करावयाचे आहे.

धर्मक्रांती
 या दृष्टीने शिवछत्रपतींनी केलेल्या धर्मक्षेत्रातल्या क्रांतीचा प्रथम विचार करू. मनावर पुरातन काळापासून धर्माचीच सत्ता चालत आलेली आहे. आणि विज्ञानयुगानंतर आजही यात फारसा बदल झालेला नाही. समाजाचा उत्कर्ष करील तो धर्म, ज्याने धारण होते, संरक्षण होते तो धर्म, ज्याने लोकयात्रा संपन्न होते तो धर्म, अशा प्राचीनांनी धर्माच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्या पाहता आजही क्रांतिकारकांना प्रथम धार्मिक तत्त्वांचाच विचार करावा लागतो, असे दिसून येईल. मग छत्रपतींच्या काळी काय असेल हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच लोकांच्या मनातील धर्मकल्पना समूळ पालटल्यावाचून हिंदुसमाजाचा उत्कर्ष होणे शक्य नाही, अनसे ठरवू महाराजांनी तेथूनच प्रारंभ केला.

(१) शस्त्रेण रक्षिते राज्ये
 या क्षेत्रातला त्यांचा पहिला क्रांतिकारक सिद्धान्त म्हणजे स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद आहे हा होय. या सिद्धान्ताला क्रांतिकारक असे म्हणण्याचे वास्तविक काही कारण नाही. भारतातील प्राचीन तत्त्ववेत्त्यांनी शतवार हा सिद्धान्त वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण या ग्रंथांत सांगितलेला आहे. राजधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय, असा त्यांचा सिद्धान्त होता, हे मागे सांगितलेच आहे. महाभारतात आणखी त्या अर्थाची कितीतरी वचने आहेत. धर्मे तिष्ठन्ति भूतानि धर्मो राजनिष्ठति ॥ राष्ट्रस्य एतत् कृत्यतमं राज्ञ एवाभिषेजनम् ॥ राजाला अभिषेक करणे म्हणजेच राजसंस्था टिकवून धरणे हे राष्ट्राचे, लोकांचे, सर्वात महत्त्वाचे कार्य होय. सर्वे धर्माः राजधर्म प्रधानाः । सर्वो हि लोको नृपधर्भमूलः ॥ या वचनांचा तोच भावार्थ आहे. शिवाय, 'शस्त्रेण रक्षिते राज्ये, शास्त्रचिंता प्रवर्तते ।' हे व्यासवचन अगदी निर्णायक आहे. शस्त्रबलाने राज्याचे रक्षण केले तरच तेथे शास्त्रे, विद्या, संस्कृती यांचा उदय व संरक्षण होते. 'सर्वा विद्या राजधर्मेषु युक्ताः । सर्वे लोका राजधर्मप्रविष्टाः ।' या वचनाचा तोच अर्थ आहे. दुर्दैवाने या ऋषिवचनांचा भारतातील राजपुरुषांना विसर पडला होता. पृथ्वीराजानंतरचे रजपूत सरदार, बहामनी काळातले मराठे सरदार, विजयनगरनंतरचे दक्षिणेतले राजपुरुष या सर्वांना हिंदू धर्माचा अभिमान नव्हता असे नाही. पण स्वराज्य स्थापून त्या धर्माचे रक्षण करणे हे अभिमानाचे पहिले लक्षण आहे, असे त्यांना कधीच वाटले नाही. तीर्थयात्रा, व्रते वैकल्ये, मंदिरे बांधणे, त्यांना जमिनी लावून देणे, साधुसंतांकडून उपदेश घेणे यातच त्यांचा हिंदुधर्म होता आणि हे आचार एकदा पाळले म्हणजे मुस्लिमांच्या साम्राज्याचा विकास करणे, त्यासाठी हिंदू सत्ता नष्ट करणे, देवळे पाडणाऱ्या, मूर्तिभंजन करणाऱ्या, हिंदू स्त्रियांची विटंबना करणाऱ्या आणि हिंदू संस्कृती नष्टांश करून टाकण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या बादशहांची सेवा करणे, यात आपण हिंदुधर्माशी द्रोह करतो आहो, असे त्यांच्या स्वप्नातही कधी येत नसे. स्वराज्य व स्वधर्म यांचे अद्वैत आहे, हे धर्माचे पहिले तत्त्व त्यांच्या गावीही नसल्यामुळेच भारतात मुस्लिमांच्या राज्यांचा, साम्राज्यांचा व एकंदर मुस्लिम सत्तेचा विकास होऊ शकला.

मातुःश्रींची आज्ञा
 शिवछत्रपती हा सर्व प्रकार डोळ्यांनी पहात होते. पूर्वीच्या कथांवरून त्यांनी हेच जाणले होते; म्हणून स्वराज्याची स्थापना हे आपले धार्मिक कर्तव्य असा निश्चय त्यांनी केला. मातुःश्री जिजाबाई आणि समर्थ रामदासस्वामी यांनी आपल्याला हीच आज्ञा केली असे त्यांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे. इ. स. १६६४ साली बाजी घोरपडे यास त्यांनी ठार मारले. तशी मातुःश्रींची आज्ञाच होती. घोरपड्यांचा अपराध काय होता ? जिजामाता म्हणतात, 'त्यांनी स्वधर्मसाधनता सोडून यवन दुष्ट तुरुक यांचे कृत्यास ते अनुकूल झाले !' १६७८ साली समर्थांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती लिहितात, 'आपण मला आज्ञा केली की तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करून धर्मस्थापना करणे ! हे व्रत संपादून त्यात परमार्थ करावा.' अर्थ स्पष्ट आहे. धर्मरक्षणासाठी राज्यसाधना केली पाहिजे. राजाचा तोच परमार्थ, तोच मोक्ष, अशी समर्थांची आज्ञा होती.

व्यंकोजीस उपदेश
 छत्रपतींचे धाकटे भाऊ व्यंकोजी यांच्याशी त्यांचा जो पत्रव्यवहार झाला त्यावरूनही, धर्मरक्षणासाठी सर्वत्र स्वराज्याची स्थापना झाली पाहिजे, हा महाराजांचा सिद्धान्त स्पष्ट उमगून येतो. कर्नाटकच्या स्वारीवर जाण्यापूर्वी १६-६ साली त्यांनी व्यंकोजीला एक पत्र लिहिले होते. त्या आधी व्यंकोजीने तंजावरचे राज्य विजापूरकरांतर्फे जिंकून तेथे राजधानी केली होती. पण तंजावरास आधी राज्य होते ते विजयराघव या हिंदुराजाचे होते. मदुरेचा चोक्कनाथ नायक याचा व्यंकोजीने पराभव केला. हा राजाही हिंदूच होता आणि ही दोन्ही राज्ये व्यंकोजीने आदिलशाहीसाठी जिंकली होती. शिवछत्रपतींना यामुळे फार उद्वेग वाटला. म्हणून त्यांनी व्यंकोजीला पत्र लिहून उपदेश केला की चंदीला खवासखानाचा भाऊ नासिरखान आहे, त्याला मारून ते राज्य घ्यावे. विजापूरचा पठाण वजीर सरदार बहलोलखान याचा सेनापती शेरखान याचा पराभव करून बहलोलखानाचा तिकडचा मुलूख जिंकावा. त्याचप्रमाणे वेलोरचा किल्लाही जिंकावा. आणि असे करताना विजयनगरचे वारस असे तिकडचे नायक हिंदुराजे यांशी सख्य करावे.
 पण स्वराज्य हे ध्येयच व्यंकोजीच्या मनापुढे नसल्यामुळे त्याने यातले काहीच केले नाही. आणि पुढे महाराज दक्षिणेत गेल्यावर त्यांच्याशीच त्याने लढाई केली. तेव्हा महाराजांना त्याचा पाडाव करणे भाग पडले. त्यानंतर जो तह झाला त्यातही 'हिंदुद्वेषी यांस आपले राज्यात ठेवू नये, विजापूरकरांचा व आमचा तह ठरला त्यात विजापूरकरांची चाकरी एकोजी करणार नाही, प्रसंग पडेल तेव्हा इमाने इतबारे मदत करू, इतकेच ठरले आहे. तरी चाकरी करणे, असे समजू नये' असे कलम त्यांनी घातले. कर्नाटकातही स्वतंत्र हिंदुसत्ता स्थापन झाली पाहिजे हे त्यांचे उद्दिष्ट यावरून स्पष्ट होते.

लखम सावंत
 १६५८ साली कुडाळचा लखम सावंत याच्यावर विजापूरचा सरदार रुस्तुमजम चालून आला होता. त्या वेळी सावंताला साह्य करून शिवछत्रपतींनी त्याला वाचविले. त्या वेळी त्याच्याशी जो तह झाला त्यातले एक कलम असे आहे, 'स्वराज्यसाधनाच्या ठायी दक्ष राहून तुरूक लोकांचे साधन (साह्य) न करावे, तुरुकांना, मुस्लिमांना साह्य करणे हे पाप आहे. हा अधर्म आहे, हे तत्त्व महाराजांच्या मनात किती निश्चित होते, ते यावरून कळून येते.

जयसिंहास आवाहन
 जयसिंह मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्यासाटी चालून आला होता, त्या वेळी त्याला छत्रपतींनी जे पत्र लिहिले त्यावरून त्यांचे ध्येय, त्यांच्या मनातील क्रांतितत्त्व, त्यासाठी अनुसरावयाचा मार्ग याचे पूर्ण चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभे राहते. ते म्हणतात, 'जयसिंहा, तू आपणहून दक्षिण देश जिंकण्यासाठी आला असतास तर मोठी सेना घेऊन मी तुझ्या पाठीशी आलो असतो आणि सर्व भूमी तुला जिंकून दिली असती. पण तू औरंगजेबाचा सरदार म्हणून आला आहेस... हाच क्रम पुढे आणखी काही दिवस चालत राहील तर आम्हां हिंदू लोकांचे चिन्ह देखील पृथ्वीवर राहणार नाही. आम्ही लोकांनी या वेळी हिंदू, हिंदुस्थान व हिंदुधर्म यांच्या संरक्षणासाठी फार जोराचे प्रयत्न केले पाहिजेत. जर तू मारवाडचा राजा जसवंतसिंह व मेवाडचा राजा राजसिंह यांच्याशी ऐक्य करशील तर फार मोठे काम होईल. तुम्ही उत्तरेतून उठावणी केली तर मी विजापूर व गोवळकोंडा या दोन्ही बादशहांना जिंकीन आणि सर्व दक्षिण देशच्या पटावरून इस्लामचे नाव किंवा चिन्ह धुऊन टाकीन.' (सारार्थ).
 जयसिंहाला लिहिलेल्या पत्राचाही काही उपयोग झाला नाही हे उघडच आहे. हिंदुधर्माच्या रक्षणासाठी मुस्लिमांशी लढा केला पाहिजे, ही कल्पना त्याला कधी शिवलीही नाही.
 आणि शिवछत्रपतींच्या धर्मतत्त्वातील हा तर पहिला सिद्धान्त होता. मुस्लिम आक्रमकांचा उच्छेद करून हिंदुराज्य प्रस्थापित केल्यावाचून हिंदुधर्माचे रक्षण होणार नाही. स्वराज्य आणि स्वधर्म यांचा असा अविभाज्य संबंध असल्यामुळे त्यांनी स्वतः स्वराज्यस्थापनेचे प्रयत्न तर आरंभिले होतेच. पण मुस्लिमांविरुद्ध अखिल भारतात सर्व प्रदेशात उठाव व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे मुस्लिमांच्या अधिसत्तेखाली राहून त्यांची सेवा करणाऱ्या सर्व हिंदू सरदारांना ते तशी प्रेरणा देत होते. व्यंकोजी, लखम सावंत व जयसिंह यांना त्यांनी लिहिलेली पत्रे तेच दर्शवितात. त्यांचा काही उपयोग झाला नाही हे खरे. पण 'हिंदवी स्वराज्य' या ध्येयासाठी महाराज केवढा प्रयत्न करीत होते ते त्यावरून दिसून येईल.

छत्रसाल
 वरील सरदारांच्या बाबतीत त्यांना यश आले नाही. पण बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याला दिलेली प्रेरणा बरीच यशस्वी झाली. बुंदेलखंडातील महोबा हे एक छोटेसे स्वतंत्र राज्य होते. छत्रसालाचा पिता चंपतराय याने शहाजहानाशी लहून महोबाचे स्वातंत्र्य टिकविले होते. पुढे शहाजहानविरुद्ध औरंगजेब उठला, तेव्हा चंपतरायाचे साह्य त्याने मागितले व 'तुझे स्वातंत्र्य मी अबाधित राखीन,' असे त्या वेळी त्याने त्याला आश्वासनही दिले. पण सत्ता हाती आल्यावर त्याने महोबावर स्वारी केली. त्या वेळी चंपतराय रणांगणावर पडला. त्याचाच मुलगा छत्रसाल. तो औरंगजेबाचा नाइलाजाने मांडलिक झाला होता. पण त्याची स्वातंत्र्यलालसा मनात तशीच धगधगत होती. जयसिंहाने दक्षिणेवर स्वारी केली, तेव्हा दिलेरखानाच्या हाताखाली छत्रसाल आपले सैन्य घेऊन दाखल झाला होता. पुढील पाचसहा वर्षांत त्याने शिवाजी महाराजांचा पराक्रम डोळ्यांनी पाहिला आणि त्याची स्वातंत्र्यवृत्ती पुन्हा उफाळून आली. तेव्हा १६७१ साली गुप्तपणे तो महाराजांना येऊन भेटला आणि मला आपल्या सेवेत रुजू करून घ्या, अशी विनवणी त्याने केली. महाराजांना यामुळे फार आनंद झाला. पण त्यांनी छत्रसालला सांगितले की 'तू येथे माझ्या हाताखाली काम करण्यापेक्षा बुंदेलखंडात स्वतंत्रपणे उठाव कर. असा अनेक दिशांनी उठाव झाला तरच औरंगजेबाची सत्ता उलथून पडेल.' छत्रसालाला ते मानवले आणि बुंदेलखंडात परत जाऊन त्याने स्वतंत्रपणे हिंदुध्वज उभारला व बुंदेलखंडात स्वराज्याची स्थापना केली.

राजसिंह
 औरंगजेबाने १६७६ साली हिंदूंवर जिझियाकर लादला, तेव्हा त्याच्या निषेधार्थ महाराजांनी त्याला जे पत्र लिहिले त्यात त्यांनी म्हटले आहे की 'गरीब, अनाथ लोकांना छळण्यात काय पुरुषार्थ आहे ? हिंदू लोकास पीडा करण्यातच धर्म आहे, असे मनामध्ये आले असल्यास, आधी राजा राजसिंह (मेवाडचा राणा, याने स्वराज्यासाठीच उठाव केला होता) याजपासून जिझिया घ्यावा.' महाराजांची दृष्टी भारतभर कशी चौफेर फिरत होती आणि हिंदवी स्वराज्याची त्यांची कल्पना किती व्यापक होती ते यावरून ध्यानात येईल.

मादण्णा
 शिवछत्रपतींनी दक्षिणेवर स्वारी केली, त्यात व्यंकोजीला स्वातंत्र्याची प्रेरणा द्यावी हा तर हेतू होताच, पण आणखीही एक जास्त व्यापक हेतू होता. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाचा दिवाण मादण्णा हा हिंदुत्वाचा अभिमानी होता. आणि जुन्या हिंदवी तेलगू सिंहासनाचे पुनरुज्जीवन करावे, असा त्याचा प्रयत्न होता. शिवछत्रपती तेथे येण्यापूर्वीच त्याने स्थानिक ब्राह्मणांचे वर्चस्व वाढवून आणि मुसलमानी सरदारांची कुरघोडी थांबवून या गोष्टीचा पाया घातलाच होता. छत्रपती गोवळकोंड्यास आल्यावर मराठा सैन्याकडून तो मुलूख जिंकला जाईल आणि तेथे पुन्हा हिंदू राज्य प्रस्थापिता येईल, ही त्याला मोठी आशा होती. पुढे आठ वर्षांनी मोगलांची स्वारी गोवळकोंड्यावर झाली. त्या वेळी मोगलांच्या प्रोत्साहनाने, मादण्णाचा स्थानिक मुस्लिमांनी खून केला. त्याविषयी लिहिताना इंग्रज फ्रेंचादी परकी टीकाकार म्हणतात की 'त्याने गोवळकोंड्याच्या राज्यात सर्वत्र आपल्या जातीचाच कारभार सुरू केला होता.' त्र्यं.शं. शेजवलकरांच्या मते मादण्णाला हिंदुराज्यस्थापनेची ही प्रेरणा शिवछत्रपतींच्याकडूनच मिळाली होती (संकलित शिवचरित्राची प्रस्तावना, पृ. १७४, १७५).

पादशाही हिंदूंची
 औरंगजेबाला छत्रपतींनी जिझिया कराच्या निषेधार्थ पाठविलेल्या पत्राचा उल्लेख वर आलाच आहे. आग्र्याहून महाराज सुटून आले म्हणून तो आधीच पिसाळला होता. त्यानंतर पुढच्या दहाबारा वर्षात छत्रपतींची सारखी चढती कमानच होती. आणि आता दक्षिणेतही हिंदवी स्वराज्याचे लोण त्यांनी पोचविले होते. उत्तरेत शिखांनी चालवलेल्या प्रतिकारालाही कडवी धार येत होती. त्यामुळे भडकून जाऊन हिंदूंवर जिझिया कर लावून, देवळे पाडणे, मूर्ती फोडणे, हिंदूंच्या कत्तली करणे हा धर्मच्छळ त्याने नव्या जोमाने फिरून सुरू केला आणि स्वराज्यावाचून हिंदुधर्माचे रक्षण होणार नाही, हे पुन्हा एकदा हिंदूंना दाखवून दिले. आजपर्यंत मुस्लिम पादशहांनी हे अनेक वेळा दाखवून दिलेच होते. पण सर्व हिंदू राजे, सरदार हे मूढ व स्वत्वशून्य झालेले असल्यामुळे त्यांना कोणी उत्तर दिले नव्हते. पण आता परिस्थिस्ती पालटली होती. शिवछत्रपतींचा उदय झाला होता. त्यांनी औरंगजेबाला खरमरीत पत्र लिहून 'पादशाही पुरातन हिंदूंची आहे, तुमची नाही' असे बजावले आणि या वाक्यामागे हिंदूचे खड्ग उभे केले.
 आरंभापासून अखेरपर्यंत, हिंदूंची ती पुरातन पादशाही, ती हिंदूंची साम्राज्यसत्ता पुन्हा प्रस्थापित करणे आणि हिंदुधर्म, हिंदुसंस्कृती यांचे रक्षण करणे हाच महाराजांचा जीवनहेतू होता, हे यावरून स्पष्ट होईल. त्यातच त्यांची स्वधर्मसाधना होती, त्यातच त्यांचा मोक्ष होता.

(२) राजा - कालकारण
 प्राचीन काळी स्वराज्याची, आसमुद्र साम्राज्याची अशी महती ऋषींनी तत्ववेत्त्यांनी गायिलेली असताना, सर्व धर्म राजधर्मप्रधान आहेत, असे सांगितलेले असताना, हिंदू राजांना, शास्त्रीपंडितांना स्वराज्याचा एवढा विसर पडावा याचे कारण काय, असा प्रश्न मनात येतो. कलियुगाचे तत्त्वज्ञान हे त्याचे कारण आहे.

कलियुग
 कृत, त्रेता, द्वापार आणि कली अशी चार युगे आपल्याकडे मानलेली आहेत. त्यांतील कलियुग या शेवटच्या युगात धर्म लयास जाणार, मानवाची प्रज्ञा, बुद्धिमत्ता, कर्तृत्व यांचा पूर्ण ऱ्हास होणार, असा सिद्धान्त या भूमीत रूढ झालेला आहे. या तऱ्हेची कलियुगकल्पना, हे कलियुगाचे तत्त्वज्ञान, प्रामुख्याने पुराणांनी प्रतिपादिलेले आहे. वायू, गरुड, लिंग इ. पुराणांत कलियुगाची, म्हणजे त्या युगात होणाऱ्या अधःपाताची भयानक वर्णने आहेत. वेदांत किंवा उपनिषदांत कलियुगतत्त्व नाही. स्मृतींतही नाही. महाभारताला कलियुग मान्य नाही. मानव हा कालवश नसून आत्मवश आहे, असाच व्यासमुनींचा सिद्धांत आहे. 'राजा आपल्या पराक्रमाने कृतयुग निर्माण करू शकतो, काल हा राजाचे कारण नसून राजा हाच कालकारण आहे. राजा एव युगमुच्यते ।' अशी वचने महाभारतात आढळतात. धर्म आणि राज्य यांचा विवेक करून, 'राजाच युग निर्माण करतो' असे शुक्रनीतीही म्हणते. पण हळूहळू पुराणांचा पगडा हिंदू मनावर बसू लागला, त्यांतील कलियुग कल्पनेचे विष समाजाच्या अंगात भिनू लागले आणि दहाव्या अकराव्या शतकाच्या सुमारास त्याची जीवशक्ती अगदी क्षीण होऊन गेली. यापुढे हिंदू राजा होणारच नाही, राजा मुसलमानच असणार, असाच सिद्धांत हिंदू मानसात रुतून बसला आणि हा समाज हतवीर्य झाला. प्राचीन काळी ऋषिमुनी पुण्यशील होते. देवाची या भूमीवर कृपा होती. पण तो काळ निराळा. आता कलियुग आले. आता ऋषिमुनी येथून निघून जाणार आणि देवही हिंदूंना प्रतिकूलच होणार, अशी अत्यंत घातकी श्रद्धा पुराणकारांनी, शास्त्रीपंडितांनी, भटभिक्षुकांनी, बुबागोसाव्यांनी रुजवून टाकली. महाराष्ट्रातून हिंदू राज्ये नष्ट झाली, याविषयी महिकावतीची बखर लिहिणारा लेखक म्हणतो, 'कलियुगात असा प्रकार होणार अशी भाक (वचन) लक्ष्मीनारायणाने कलीस दिली होती. ती शके १२७० (इ. स. १२४८)त खरी ठरली. हरिहर गुप्त झाले, ऋषि बद्रिकाश्रमी गेले, वसिष्ठही गेले, सूर्यवंशी, चंद्रवंशी क्षत्रिय यांची शस्त्रविद्या लुप्त झाली.'
 विश्वाचे त्राते जे देव आणि ऋषिमुनी त्यांनीच आपल्याला कलीच्या स्वाधीन केले आहे, अशी श्रद्धा जो समाज जोपासतो त्याच्या हातून पराक्रम कसा होणार ? मुस्लिमांचे राज्य व्हावे, असे देवाच्या मनात असले, तर आपल्याला स्थापण्यात यश कसे येणार, अशी विपरीत बुद्धी ज्या लोकांची झाली त्यांच्या हातून परकीय आक्रमणाचा प्रतिकार कसा होणार ?

श्रींची इच्छा
 कलियुगाचा हा फास हिंदूंच्या मानेभोवती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांच्या हातून स्वराज्याचा उद्योग होणार नाही हे शिवछत्रपतींनी जाणले आणि तो तोडण्यासाठी त्यांनी जाहीर घोषणा केली, 'हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे'. दादाजी नरस प्रभू यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, 'श्री रोहिरेश्वर याणी आम्हांस यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ, हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे. '
 परमेश्वरच आपल्याला प्रतिकूल आहे, आपल्याविरुद्ध आहे हे कलियुगाचे तत्त्वज्ञान होते. त्याचा उच्छेद शिवछत्रपतींनी केला. 'हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींचीच इच्छा आहे' असा या रीतीने आत्मविश्वास त्यांनी मराठ्यांच्या ठायी निर्माण केला आणि त्यामुळेच मुस्लिम सत्तेचे निर्दालन करून मराठी साम्राज्य भारतात स्थापण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले. जावळीचे मोरे दिमाखाने म्हणत, 'आम्हांस पादशहाने, राजे किताब, मेहरबान होऊन दिधले.' महाराजांनी त्यांना बजावले की 'आम्हांस श्री शंभूने राज्य दिले आहे.'
 परमेश्वरच हिंदुराजांना प्रतिकूल आहे. त्यानेच कलीला, त्यांच्या शत्रूंना, आशीर्वाद दिला आहे, या दुष्ट कल्पनेचे महाराजांना निर्मूलन करावयाचे होते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी, तसे काही नसून तो आपल्या पाठीशी सतत उभा आहे, असे ते सांगत असत. व्यंकोजीला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, 'तुम्ही असा विचार करावा होता की श्री देवाची व श्रीची कृपा त्यावरी (आम्हांवरी) पूर्ण झाली आहे. दुष्ट तुर्काला ते मारतात. तेव्हा आपल्या (व्यंकोजीच्या) सैन्यातही तुरुक लोकच असता जय कैसा होतो आणि तुरुक लोक कैसे वाचो पाहातात ?'
 व्यंकोजीच्या ठायी शहाजी राजांच्या सारखाच काहीसा पराक्रम होता. पण विजापूरच्या पादशहाच्या कृपेने आपण राज्य मिळविले अशी त्याची श्रद्धा होती, स्वराज्याची उभारी त्याच्या मनाला पेलेचना. म्हणून 'स्वराज्यसाधनेला श्रीच अनुकूल आहेत. दुष्ट तुरुकांचा, देवच आमच्या हातून नाश करवीत आहेत' असा विचार छत्रपतींनी त्याला या पत्रात मुद्दाम सांगितला. पण दुर्दैवाने त्याचे मेलेले मन जिवंत झाले नाही.

पुरुष - प्रयत्न
 कलियुगाचे तत्त्वज्ञान हे अपरिहार्यपणेच दैववादी आहे. मानव हा कालवश आहे हाच तर त्याचा मुख्य सिद्धांत. तेव्हा प्रयत्नवादाला काही अर्थच राहात नाही आणि प्रयत्नवादावाचून कोणत्याही समाजाचा अभ्युदय होणे शक्य नाही. 'यत्न तो देव जाणावा', असे समर्थांनी सांगितले ते याच अर्थाने, आणि शिवछत्रपती तर मूर्तिमंत प्रयत्नवाद. हिंदवी स्वराज्याला श्री अनुकूल आहेत हे खरे असले तरी, 'न ऋते श्रांतस्य सख्याय देवाः'–कष्ट केल्यावाचून देव कोणावर प्रसन्न होत नाहीत- हे वेदवचन त्यांनी चांगले जाणले होते. त्यामुळेच कलियुग कल्पनेवरोवरोच दैववादाचाही त्यांनी निषेध केला. मल्हारराव रामराव चिटणीस यांनी आपल्या सप्तप्रकरणात्मक चरित्रात महाराजांचे हे विचार चांगले व्यक्त केले आहेत. महाराजांनी विचार केला, 'आपण हिंदू, सर्व दक्षण देश म्लेंच्छांनी ग्रासिला, धर्म बुडविला. हा रक्षणार्थ प्राणही वेचून धर्म रक्षू व आपले पराक्रमाने नवीन दौलत संपादू. नवे साधावे हे या कुलात जन्मल्याचे सार्थक. पुरुषप्रयत्न बलवत्तर, दैव पंगू आहे. यास्तव प्रयत्ने अलबल करावे, त्यास दैव जसजसे सहाय्य होईल तसतसे अधिक करीत जावे. देव परिणामास नेणार समर्थ आहे.'
 महाराजांच्या धर्मक्रांतीच्या तत्त्वज्ञानातील हा दुसरा सिद्धान्त होय. स्वराज्य आणि स्वधर्म यांचा अभेद हा पहिला आणि समाजाच्या उत्कर्षाचे काल हे कारण नसून राजा (मानव) हे कारण आहे, राजाच कृतयुग वा कलियुग निर्माण करतो हा दुसरा सिद्धनत होय.

(३) क्षत्रियकुलावतंस
दोनच वर्ण
 कलियुगात धर्म लयास जाणारच, मानवी कर्तृत्व लोपणारच, असे पुराणे सांगत होती. त्यामुळे हिंदूंचा आत्मविश्वास नष्ट झाला होता. या युगात मुस्लिमच राजा होणार, हिंदू सरदार राजपदी येऊ शकणारच नाही, असा समज रूढ झाला होता. या युगात सत्ता यवनांची, म्लेंच्छांची होणार हा विचार हिंदू लोकांनी अगतिक होऊन स्वीकारला होता. याच्या भरीला शास्त्रीपंडितांनी आणखी एक विषबिंदू त्यांच्या जीवनात कालवून ठेवला होता. 'कलावाद्यंतयोः स्थितिः ।' कलियुगात पहिला म्हणजे ब्राह्मण वर्ण आणि अंतीचा म्हणजे शुद्र वर्ण हे दोन वर्ण आहेत. क्षत्रिय आणि वैश्य हे दोन्ही वर्ण या युगात नष्ट झालेले आहेत हा तो विषबिंदू होय. विष्णु पुराण, मत्स्य- पुराण यांनी सांगून टाकले, 'नंदांतम् क्षत्रियकुलम्' - नंदवंशाबरोबरच क्षत्रियकुळे सर्व नष्ट झाली. या नंदवंशाचा महाराज चंद्रगुप्त मौर्य यांनी उच्छेद करून स्वतःचे साम्राज्य स्थापिले होते आणि पुराणांच्या मते त्याच वेळी भारतातले सर्व क्षत्रियवंश नाहीसे झाले. महाराज चंद्रगुप्तांनी साम्राज्य स्थापन केले, अखिल भारतभर त्याचा विस्तार केला. पण पुराणांच्या मते ते शूद्र होते. वास्तविक कलियुगात क्षत्रिय नाहीत, हे मत कोणत्याही स्मृतिकाराने मान्य केलेले नाही. ज्यांना पुराणांनी शूद्र ठरविले त्या मौर्य आणि सातवाहन वंशातील थोर सम्राटांनी अश्वमेध यज्ञही केले होते आणि त्या वेळच्या ब्राह्मणांनी त्यांचे पौरोहित्यही केले होते. पण पुराणलेखकांनी आपला दुराग्रह सोडला नाही आणि दुर्दैवाने सातव्या आठव्या शतकापासून पुराणमतांची पकड समाजमनावर जास्त जास्त दृढपणे बसू लागली. हिंदूंच्या अधःपाताला तेथूनच प्रारंभ झाला. पुराणानंतर स्मृतींवर भाष्य लिहिणारे जे निबंधकार त्यांनी पण 'कलावाद्यंतयोः स्थितिः ।' हाच सिद्धान्त उचलून धरला. वास्तविक या मधल्या काळात अनेक क्षत्रिय राजघराणी उदयास आली होती आणि त्यांनी महापराक्रम करून साम्राज्येही स्थापिली होती. पण परिस्थिती पाहून, इतिहास पाहून, स्वतः अवलोकन करून, धर्मतत्त्वांचा निश्चय करावा, ही प्राचीनांची परंपराच पुराणानंतर भारतातून नष्ट होत चालली आणि मूढ, अविवेकी शास्त्रीपंडित समाजाला अधःपातास नेईल, असाच धर्म सांगत राहिले. 'शूद्रकमलाकर' हा ग्रंथ लिहिणारा कमलाकर भट्ट, शुद्धितत्त्वकार रघुनंदन, 'व्रात्य- प्रायश्चित्तचिंतामणी' लिहिणारा नागेश भट्ट हे धर्मशास्त्रकार याच वर्गातले होते. श्रीकृष्ण, व्यास, भीष्म यांच्या धर्माच्या व्याख्या वर दिल्या आहेत. त्याअन्वये पाहता धर्म हा शब्द उच्चारण्याची सुद्धा त्यांची पात्रता नव्हती. पण विनाशकाले विपरीत बुद्धिः । अशी हिंदुसमाजाची अवस्था होऊन या समाजाने या मूढांचे धर्मशास्त्रच वंद्य मानले. आणि ते जवळजवळ सहाशे वर्षे !

ब्रह्मक्षत्र
 शिवछत्रपतींचे अलौकिकत्व हे की ते जसे महापराक्रमी होते तसेच, वर सांगितल्याप्रमाणे, तत्त्ववेत्तेही होते. म्हणून त्यांनी कलियुगात क्षत्रिय नाहीत या घातकी कल्पनेचा त्याग केला आणि स्वतःला 'क्षत्रियकुलावतंस' म्हणवून घेऊन राज्याभिषेकही करवून घेतला. त्यांनी केलेल्या धर्मक्रांतीतला हा तिसरा सिद्धान्त होय. 'हिंदुभूमीत या कालातही क्षत्रियवंश अखंड आहेत !' सुदैवाने गागाभट्टांसारखे थोर ब्राह्मण धर्मवेत्ते या विचाराला अनुकूल होते. त्यांनी महाराजांना साथ देऊन हे धर्मतत्त्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रकारे साह्य केले. महाभारतकारांच्या शब्दांत म्हणजे हा ब्रह्मक्षत्र योग होय.

(४) समुद्रगमन - आरमार
 'समुद्रगमननिषेध' हे शास्त्रीपंडितांनी प्रचलित केलेले आणखी एक घातकी धर्मतत्त्व होय. 'कलिवर्ज्यप्रकरण' म्हणून एक धर्मग्रंथ दहाव्या अकराव्या शतकाच्या सुमारास लिहिला गेला आणि त्याने कलियुगात 'समुद्रगमन' हे वर्ज्य आहे, असे सांगितले. द्विजस्य अब्धौ तु नौ यातुः शोधितस्य अपि असंग्रहः । नावेतून समुद्रगमन करणाऱ्या द्विजाचा, त्याने प्रायश्चित्त घेतले तरी, परत स्वीकार करू नये, असा निर्बंध त्याने घालून दिला. प्रथम तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तीन द्विजवर्णापुरता होता. पुढे रूढीने तो सर्व वर्गांना लावून टाकला आणि त्यामुळे हा देश सर्व बाजूंनी दरिद्री झाला. दहाव्या शतकाच्या आधी धर्मप्रसारासाठी, साम्राज्यविस्तारासाठी आणि व्यापारासाठी हिंदू लोक सर्व जगभर फिरत होते. आग्नेय आशियातील जावा, सुमात्रा, सयाम, अनाम या देशांत हिंदू साम्राज्ये त्यांनी स्थापन केली होती आणि रामायण- महाभारताच्या संस्कृतीचा प्रसारही केला होता. अरब देश, इजिप्त, ग्रीस, रोम या देशांशी व्यापार करून अगणित संपत्ती ते स्वदेशी आणीत असत. हे सर्व आता थांबले. कारण समुद्रगमन, परदेशगमन हे धर्मशास्त्राने हिंदूंना वर्ज्य केले आणि समाजाने हा दंडक मानला. शिवछत्रपतींनी हा दंडक मानला असता तर त्यांना मराठा आरमार निर्माण करताच आले नसते. पण 'समाजाचा उत्कर्ष ज्याने होईल तो धर्म,' त्यांचा असा बुद्धीनिश्रय असल्यामुळे त्यांनी शास्त्राचा हा आत्मघातकी निर्बंध मोडून काढला आणि कोकणात जलदुर्ग बांधून आरमाराची स्थापना केली. 'नवे करावे हे या कुलात जन्मल्याचे सार्थक,' अशी त्यांची धारणाच होती. त्यानी नुसते आरमार स्थापन केले एकढेच नव्हे, तर समुद्रगमनाचा पायंडा स्वतः घालून दिला. १६६५ साली ८५ शिवाडे व ३ गलबते घेऊन त्यांनी वेदनूरचे मुख्य बंदर जे बसरूर त्यावर जातीने स्वारी केली आणि सुरतेप्रमाणे तेथून अपार धन मिळविले. ही स्वारी करून समुद्रगमन, परदेशगमन हे हिंदुधर्मीयांना पूर्ण विहित आहे, असा सिद्धान्त पुन्हा नव्याने त्यांनी प्रस्थापित केला.

(५) पतितपरावर्तन
 शास्त्रीपंडितांनी रूढविलेल्या आत्मघातकी (अ) धर्मशास्त्राचे निर्मूलन करून, शिवछत्रपती धर्माच्या सर्व क्षेत्रांत कसे पुरोगामी धोरण अवलंबीत होते, ते आपण पाहत आहो. पतितपरावर्तन किंवा धर्मांतरितांची शुद्धी हे असेच क्षेत्र किंवा धर्माचे अंग होते. कलिवर्ज्य प्रकरणाने ज्याप्रमाणे समुद्रगमन निषिद्ध ठरविले आणि हिंदूंचा अःधपात घडविला त्याचप्रमाणे, शुद्धिबंदीचा दंडक घालून देऊन, हिंदुधर्माला व हिंदुसमाजाला कायमचा क्षय लावून ठेविला.

स्मृतिकार देवल
 इ. सनाच्या आठव्या शतकापूर्वी भारतावर अन्यधर्मीयांची आक्रमणे झाली नव्हती. शक, यवन, हूण, युएची इ. परकीयांची आक्रमणे झाली. पण एक तर त्यांना स्वतःच प्रगत विकसित असा धर्म नव्हता आणि दुसरे म्हणजे या सर्व आक्रमकांचे निर्दालन करून हिंदुधर्मीयांनी त्यांना हिंदुधर्माची दीक्षा दिली व पूर्णपणे आत्मसात करून टाकले. इ. स. ७११ मध्ये महंमद कासिमाने सिंध प्रांतावर स्वारी करून तो प्रदेश जिंकला व हजारों हिंदूंना बळाने वाढविले. तेव्हा पतितांच्या, बाटलेल्यांच्या शुद्धीचा, पतितपरावर्तनाचा प्रश्न येथे प्रथमच निर्माण झाला. पण त्या वेळी हिंदू धर्मशास्त्रज्ञ सावध होते. देवल ऋषींनी नव्या स्मृतीची रचना करून पतितांची शुद्धी करण्यास अनुकूल असे धर्मशास्त्र सांगितले आणि तशी शुद्धी अनेक ठिकाणी घडवूनही आणली. पण पुढे कलिवर्ज्याच्या कर्त्याने, वर सांगितल्याप्रमाणे, पतितपरावर्तन निषिद्ध मानले आणि बळाने धर्मांतरित झालेल्यांनाही हिंदुधर्माची द्वारे बंद करून टाकली. पुढे अनेक शतके धर्मक्रांती करण्याचे धैर्य व सामर्थ्य असलेला नेता हिंदुसमाजाला न मिळाल्यामुळे हिंदुसंख्येचा क्षय होतच राहिला. याने शेवटी या समाजाचा संपूर्ण विनाश ओढवेल हे जाणून महाराजांनी ते धर्मशास्त्र रद्द ठरवून पतितांना हिंदुधर्माची द्वारे पुन्हा मोकळी करून दिली.

शुद्धी
 फलटणच्या बजाजी निंबाळकरला आदिलशाहीने बळाने बाटविले होते. त्याला शुद्ध करून घेऊन त्याच्या मुलाला आपली कन्या देऊन छत्रपतींनी शुद्धिकृतांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न कायमचा सोडवून टाकला. नेताजी पालकराला औरंगजेबाने असेच सक्तीने बाटविले होते. त्यालाही महाराजांनी शुद्ध करून पुन्हा आपल्या ज्ञातीत समाविष्ट करून घेतले.

गोवेकर पाद्री
 पतितांच्या शुद्धीविषयी छत्रपतींचा किती कटाक्ष होता ते पोर्तुगीजांना त्यांनी जी दहशत बसविली तीवरून समजून येते. इंग्रजांच्या कागदपत्रात असे म्हटले आहे की शिवाजीचा व पोर्तुगीजांचा सदासर्वकाळ तंटा सुरू असतो, याचे मुख्य कारण हे की शिवाजीच्या ज्ञातीच्या पोरक्या मुलांना पोर्तुगीज बाटवून ख्रिस्ती करतात. त्या काळच्या गोव्याच्या व्हाइसरॉयने हिंदूंना बळाने बाटवून ख्रिश्चन करून टाकावे, असे घोषणापत्रकच काढले होते. महाराजांना त्यामुळे अतिशय संताप आला. आणि त्यांनी गोव्याजवळच्या बारदेश प्रदेशावर स्वारी करून तेथील चार पाद्रयांचा, त्यांनी बाटविलेल्या मराठा हिंदूंना परत देण्याचे नाकारल्याबद्दल, शिरच्छेद केला. यामुळे गोव्याचा व्हाइसरॉय इतका घाबरून गेला की त्याने तत्काळ आपले घोषणापत्र मागे घेतले.

शस्त्रेण रक्षिते राज्ये, शास्त्रचिंता प्रवर्तते ॥ हेच खरे !



अवतारकार्य
 शिवछत्रपतींनी जे क्रांतिकार्य केले त्यात धर्मक्रांतीला अग्रस्थान होते. त्यांचा अवतार धर्मरक्षणासाठी होता, हे येथवर केलेल्या विवेचनावरून ध्यानात येईल. त्यांचे समकालीन असे पंडित, कवी यांचाही अभिप्राय तसाच होता. अशा काही लोकांनी केलेला शिवगौरव पाहून हे प्रकरण संपवू. कवींद्र परमानंद याने आपल्या शिवभारतात शिवछत्रपती म्हणजे विष्णूचा अवतार असे म्हटले आहे. हा अवतार कशासाठी होता ? विष्णू म्हणतात, 'मी पृथ्वीवर येऊन यवनांचा उच्छेद करीन आणि शाश्वत धर्माची स्थापना करीन, देवांचे रक्षण करीन, यज्ञादी क्रिया पुन्हा सुरू करीन आणि गो-ब्राह्मणांचे पालन करीन.' महाराजांचा समकालीन हिंदी कवी भूषण याने म्हटले आहे, 'हे शिवाजी राजा, तुम्ही आपल्या खड्गाने हिंदुत्वाचे रक्षण केले आहे. पृथ्वीवर आपण धर्म राखला आहे. शिवाजी महाराज झाले नसते तर सर्व हिंदूंची सुनता झाली असती.'

रामेश्वर ते गोदावरी
 कलियुगात देव आणि ऋषिमुनी यांनी हिंदुसमाजाला कलीच्या स्वाधीन केले आणि स्वतः येथून ते निघून गेले असा जनमानसात रूढ समज होता. आता ते सर्व पालटले. आता मराठ्यांच्या राज्याला, स्वराज्याला परमेश्वराचा आशीर्वाद आहे, त्याचीच महाराजांच्यावर कृपा आहे, हे राज्य देवब्राह्मणांचे आहे, असे उद्गार सर्वत्र निघू लागले. रामचंद्रपंत आमात्य यांच्या आज्ञापत्रात, 'श्रीस राजाचा व स्वामींचा पूर्ण अभिमान', 'दिनप्रतिदिनी या राज्याची अभिवृद्धी व्हावी ही ईश्वरी इच्छा बलवत्तर', 'श्रीकृपाकटाक्षाने यवनांचे प्रयत्न निष्फळ झाले' अशी वचने ठायी ठायी आहेत. छत्रपती राजाराम आपल्या एका पत्रात म्हणतात, 'हे महाराष्ट्र राज्य म्हणजे देवाब्राह्मणांचे राज्य आहे.' शंकराजी नारायण सचिव म्हणतात, 'हे राज्य देवाब्राह्मणांचे आशीर्वादाचे आहे.' अनाजी जनार्दन सुभेदार-वाई यांनीही, 'हे मऱ्हाठे राज्य म्हणिजे देवाब्राह्मणांचे आहे,' असाच निर्वाळ दिला आहे. पेशव्यांच्या बखरीत, शंभर दीडशे वर्षांनीसुद्धा, हीच श्रद्धा दिसून येते. बखरकार म्हणतो, 'यवनांचे पारिपत्य करून हिंदुधर्म स्थापावा याजकरिता शिवाजी महाराज यांजवर श्रींचा कृपानुग्रह झाला. त्यांनी श्रीरामेश्वरापासून गोदावरीपर्यंत धर्मस्थापना केली.'
 समर्थांचे वचन तर प्रसिद्धच आहे. या भूमंडळाचे ठायी, धर्म रक्षी ऐसा नाही, महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हांकरिता ॥ हे वचन किती खरे होते ? औरंगजेबाने आदिलशहाला लिहिले होते की शिवाजीचे पारिपत्य झाले नाही तर मुसलमानी राज्ये बुडतील !

धर्म म्हणजे...
 शिवछत्रपतींनी धर्मक्रांती केली म्हणजे काय ते यावरून ध्यानात येईल. धर्म म्हणजे व्रतवैकल्ये, श्राद्धपक्ष, तीर्थयात्रा, भजनपूजन नव्हे, तर धर्म म्हणजे यवनांचे पारिपत्य म्लेंच्छांचा उच्छेद आणि स्वराज्याची स्थापना, धर्म म्हणजे समाजाच्या परंपरेचे, वैभवाचे रक्षण, लोकांचा उत्कर्ष-प्रभव. त्यासाठीच धर्माची स्थापना असते. धर्म म्हणजे मरगळलेल्या मनात चैतन्य निर्माण करणे, समाजाची आत्मश्रद्धा जागी करणे, आणि लोकांना पराक्रमाची, विश्वविजयाची प्रेरणा देणे. हे मानसिक परिवर्तन हीच खरी क्रांती होय. शिवछत्रपतींनी हे तिचे तत्त्वज्ञान मनाशी सिद्ध करून त्याला स्वतःच्या आचरणाने प्रत्यक्ष, मूर्त रूप दिले आणि या मराठ्यांच्या भूमीत जीवकळा निर्माण केली.
 धर्मक्रांती हे मानसिक परिवर्तन होय. त्यामुळे चैतन्य निर्माण होते, नवा उत्साह येतो व माणसे पराक्रमाच्या कोटी करतात. पण त्या पराक्रमातून प्रत्यक्ष जीवनात सुखाचा लाभ झाला नाही तर त्या क्रांतीला अर्थ राहात नाही. अर्थमूलो हि धर्मः । असे चाणक्याने म्हटले आहे ते याच अर्थाने. शिवछत्रपतींनी हे निश्चित जाणले होते. म्हणूनच धर्मक्रांतीबरोबर आर्थिक क्रांतीचाही उद्योग त्यांनी आरंभिला होता. त्याचे स्वरूप आता पाहू.