महाराष्ट्र संस्कृती/धार्मिक जीवन
८.
धार्मिक जीवन
महत्त्व
गेल्या दोन प्रकरणांत महाराष्ट्रातल्या राजशासनाचे अथवा दण्डनीतीचे विवेचन केल्यावर आता येथील धार्मिक जीवनाचा विचार करावयाचा आहे. प्राचीन काळी सर्व जगात, सर्व देशांत धर्म हा लोकांच्या संस्कृतीचा मूलाधार होता. राजशासना वाचून संस्कृती जगू शकत नाही, समर्थ राजसत्तेच्या अभावी देश परकी आक्रमणास बळी पडून त्याच्या अस्मिता व तिच्याबरोबरच त्याची संस्कृती लयास जाते, म्हणून संस्कृतीच्या इतिहासात राजशासनाचे महत्त्व अनन्यसाधारण असते हे खरे. पण संस्कृतीला खरा प्रारंभ धर्मविचारापासून होतो हे आपण विसरून चालणार नाही. प्राचीन काळचा इतिहास पाहता असे दिसते की काव्य, तत्त्वज्ञान, विद्या, कला यांचा जन्म धर्मप्रेरणेतूनच झाला आहे. यामुळे धर्माची सत्ता त्या काळी सर्वंकष होती, सर्वव्यापी होती. म्हणून संस्कृतीच्या इतिहासात धर्मविचाराला प्रथम स्थान दिलेच पाहिजे.
तीन अंगे
तत्त्वज्ञान, नीती आणि आचार ही धर्माची तीन अंगे होत. आत्मा, परमात्मा व जग किंवा जीव, शिव आणि सृष्टी यांच्या स्वरूपाविषयीचे जे सिद्धान्त ते तत्त्वज्ञान होय. सांख्य, योग, वेदान्त हे तत्त्वज्ञानाचे पंथ होत. नीतीमध्ये सत्य, अहिंसा, दया, परोपकार, सर्वभूतहित, इंद्रियनिग्रह, मातृपितृभक्ती यांचा समावेश होतो. आणि यज्ञ- याग, होमहवन, स्नानसंध्या, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, गंधभस्मलेपन, सोवळे-ओवळे, उपासतापास हा सर्व आचारधर्म होय. धर्माच्या या तीन अंगांवरून कोणत्याही समाजाचे धार्मिक जीवन कळून येते.
प्रवृत्ती निवृत्ती
पण या तीन अंगांचे केवळ वर्णन करून भागणार नाही. धर्म ही एक महाशक्ती आहे. समाजाचा उत्कर्षापकर्ष बव्हंशी धर्मावर अवलंबून असतो. तेव्हा या दृष्टीने वरील तीन अंगांचे स्वरूपवर्णन व मूल्यमापन करणे अवश्य असते. तसे करावयाचे तर देशातील धर्मप्रणेत्यांनी धर्माचे अंतिम उद्दिष्ट काय मानले आहे, हे प्रथम पाहावे लागते. मोक्ष, संसारातून मुक्ती हेच बहुतेक सर्व धर्माचे ध्येय असते. पण त्या अंतिम उद्दिष्टाची साधना करताना इहलोकाकडे, प्रपंचाकडे, संसाराकडे धर्मवेत्ते कोणत्या दृष्टीने पाहतात, यावर समाजाचे भवितव्य अवलंबून असते. निःश्रेयस म्हणजे मोक्ष व अभ्युदय म्हणजे ऐहिक उत्कर्ष. धर्माने या दोहोंची चिंता वाहिली तर समाज बलाढ्य होतो, ऐश्वर्यशाली होतो. पण मोक्ष व प्रपंच यात नित्य विरोध आहे असे मानून, मोक्षासाठी प्रपंचाचा त्याग केला पाहिजे असा धर्माने उपदेश केला, संसार, स्त्री-पुत्र, राज्य, धनवैभव, यांची निंदा करून, हे सर्व वमनासारखे आहे असे सांगितले तर राष्ट्रीय प्रपंचाची हानी होते व समाजाचा अधःपात होतो. तेव्हा समाजात निवृत्तीचे प्राबल्य आहे की प्रवृत्तीचे हे पाहणे धर्माच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.
बुद्धिप्रामाण्य
धर्मामध्ये पुरुषबुद्धीला म्हणजे विचारस्वातंत्र्याला अवसर आहे की शब्दप्रामाण्य, वचनप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य यांनी मानवी बुद्धीला श्रृंखलाबद्ध केले आहे, यावर समाजाची प्रगतिपरागती अवलंबून असते. बुद्धीला अवसर असला की समाजातले धर्मधुरीण देशकालपरिस्थिती पाहून धर्मनियम बदलतात, म्हणजेच धर्मसुधारणा करतात. अशा धर्मपरिवर्तनावरच समाजाचा उत्कर्ष अवलंबून असतो. पण बुद्धीला तसा अवसर नसेल तर अवश्य व योग्य ते धर्मपरिवर्तन घडून येत नाही व समाजाचा अपकर्ष होतो. म्हणून शब्दप्रामाण्य व बुद्धिप्रामाण्य यांचा धार्मिक जीवनात अभ्यास करणे आवश्यक असते.
सापेक्ष दृष्टी
नीती आणि आचार ही जी धर्माची दोन अंगे त्यांच्या दृष्टीने बुद्धिप्रामाण्याचे महत्त्व फारच आहे. सत्य, अहिंसा, भूतदया, क्षमाशीलता, आज्ञापालन ही नीतितत्त्वे सर्व धर्मात वंद्य पावलेली आहेत. पण यांचे मूल्य परिस्थितिसापेक्ष असते. गीतारहस्यातील 'कर्मजिज्ञासा' या प्रकरणात या तत्त्वांचा व्यवहारनिरपेक्ष विचार करणे कसे घातक ठरते ते लो. टिळकांनी उत्कृष्ट रीतीने दाखवून दिले आहे. पण अनेक समाजधुरीण सत्य-अहिंसादी नीतिमूल्ये निरपेक्ष मानतात. आचारधर्माविषयी असेच दोन पक्ष आहेत. नेहमीच असतात. धार्मिक आचार प्रथम रूढ केले जातात तेव्हा त्यांच्या मागे काही तत्त्व असते, कालांतराने ते तत्व लोप पावते व मग केवळ जड आचार म्हणजे कर्मकांड शिल्लक राहते. पण लोक त्यालाच धर्म मानीत असल्यामुळे त्याचा त्याग करण्यास तयार नसतात. आणि त्यामुळे धर्माला अत्यंत विकृत रूप येऊन समाजाचा ऱ्हास होतो. तेव्हा नीतितत्वे व आचार यांचा या दृष्टीने अभ्यास केल्यावाचून समाजाच्या धार्मिक जीवनाची खरी कल्पना येणार नाही.
पंथभेद
प्रत्येक धर्मात तत्वज्ञान, नीती, आचार, देवता, उपासनामार्ग यांविषयी मतमतांतरे निर्माण होऊन त्यावरून पंथभेद निर्माण होतात. असे पंथ वा संप्रदाय निर्माण होणे अटळच असते. अशा वेळी भिन्न पंथांतील समभूमी कोणती, समान अधिष्ठान कोणते, एकं सत् कोणते ते सांगून, भिन्न मतांचा समन्वय करून, त्या पंथांचे ऐक्य साधणारे पुरुष निर्माण झाले नाहीत तर समाज शतधा भंगून जातो. ख्रिस्ती धर्मातील कॅथॉलिक- प्रोटेस्टंट, इस्लाम धर्मातील शिया-सुनी या पंथांतील घनघोर संग्राम प्रसिद्धच आहेत. भारतातही वैदिक, बौद्ध, जैन, वैष्णव, शीख, लिंगायत असे पंथ निर्माण झाले होते व त्यांच्यांत तीव्र संघर्षही झाले होते. पण सहिष्णुवृत्तीची जोपासना करून या पंथांचा समन्वय करणारे धर्मधुरीणही येथे प्रत्येक युगात निर्माण झाले होते. त्यांच्या प्रयत्नांचे यशापयश धार्मिक जीवनाच्या अभ्यासकाने पाहिले पाहिजे. सातवाहन ते यादव या कालखंडाच्या दृष्टीने तर या पंथांच्या व संप्रदायांच्या अभ्यासाचे महत्व फार आहे. बौद्ध व जैन हे जे अवैदिक धर्मपंथ त्यांचा सातवाहनांच्या आधीच्या काळात फारच उत्कर्ष झाला होता. आणि भारताच्या उत्कर्षाचे वा अपकर्षाचे श्रेय कित्येक पंडित या पंथांनाच देतात. म्हणून त्यांचे मूल्यमापन करणे अवश्य आहे. शैव-वैष्णवांतील संवर्ष इतका नसला तरी जवळ जवळ तितकाच महत्वाचा आहे. समाजाच्या एकतेला त्यामुळे तडे गेले होते, असे इतिहासवेत्ते सांगतात. तेव्हा या सर्व पंथोपंथांचे कार्य व महत्व यांचा विचार संस्कृतीच्या दृष्टीने फार अवश्य ठरतो.
धार्मिक जीवनाच्या कक्षेत कोणकोणत्या विषयांचा अंतर्भाव होतो ते येथवर सांगितले. तत्वज्ञान, नीती व आचार ही धर्माची तीन अंगे आणि प्रवृत्ती, निवृत्ती, शब्दप्रामाण्य, बुद्धिप्रामाण्य, धर्माची परिवर्तनीयता, त्यातील तत्वांची सापेक्षता व निरपेक्षता म्हणजेच त्रिकालाबाधितत्व, धर्मामध्ये निर्माण होणारे भिन्नभिन्न पंथ वा संप्रदाय त्यांचे परस्परांतील संघर्ष, त्याविषयीची समाजातील सहिष्णुवृत्ती, सर्व धर्ममतांचा समन्वय साधण्याचे धोरण हे व या प्रकारचे अनेक घटक धर्मविचारात अंतर्भूत होतात. ते सर्व दृष्टीपुढे ठेवून सातवाहन ते यादव या कालखंडातील महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनाचा आता अभ्यास करावयाचा आहे.
वेद-परंपराभिमान
हा अभ्यास सुरू करताच पहिली गोष्ट आपणास दिसून येते ती ही की सातवाहनां पासून यादवांपर्यंत जी सहा राजघराणी दीड हजार वर्षेपर्यंत महाराष्ट्रावर राज्य करीत होती ती सर्व सनातन वैदिक धर्माची व परंपरेची पूर्ण अभिमानी होती. सातवाहनांचा पहिला मोठा सम्राट शातकर्णी याने दोनदा अश्वमेध यज्ञ केला व शिवाय पौडरिक, अन्वरंभणीय, दाशरात्र इ. सोळा यज्ञही केले. या सर्व यज्ञांत त्याने ब्राह्मणांना धेनू, भूमी, सुवर्ण यांचे विपुल दान दिले. या कुळातील शेवटचा मोठा राजा यज्ञश्री यानेही अश्वमेध यज्ञ केला होता. या कुळातील सर्वश्रेष्ठ सम्राट गौतमीपुत्र शातकर्णी हा चातुर्वर्ण्याचा व ब्राह्मणांचा अभिमानी म्हणवून घेण्यात भूषण मानीत असे. या राजांचे शिलालेखांत वर्णन करताना ते राम, कृष्ण, अर्जुन, भीम यांसारखे पराक्रमी होते, असे म्हटलेले आढळते. जनमेजय, सगर, ययाती, अंबरीष या परंपरेत त्यांना नेऊन बसविलेले दिसते. या सम्राटांची नावे पाहिली तरी ती कृष्ण, गौतमीपुत्र, वासिष्ठीपुत्र, कर्ण, लंबोदन, शिवश्री, यज्ञश्री अशी सनातन परंपरेतलीच आढळतात. ते स्वतःला ' आगमानां निलय:' असे म्हणवितात; यामुळे त्यांच्या सनातन वैदिक धर्माच्या परंपरेच्या अभिमानाविषयी कसलीच शंका राहात नाही.
जैन-बौद्ध प्रभाव ?
सातवाहनांच्या लगत आधी अशोकाचे साम्राज्य सर्व भारतावर - आणि अर्थात महाराष्ट्रावरही — पसरलेले होते. त्याने राजसत्तेच्या बलाने भारतात बौद्ध धर्माचा प्रसार केला होता. अशोक इ. स. पूर्व २३६ या साली मृत्यू पावला. आणि सातवाहनांच्या साम्राज्याची स्थापना त्याच वेळी झाली. असे असूनही त्यांच्या साम्राज्यात बौद्धांना सहिष्णुतेने वागवून त्यांच्या विहारांना उदार आश्रय देण्याखेरीज बौद्ध धर्माचा कसलाही प्रभाव दिसत नाही. बौद्धांनी व जैनांनी वेदाविषयीची पूज्य बुद्धी नष्ट केली होती, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व अमान्य केले होते, सनातन परंपरेतील थोर पुरुष आमच्याच परंपरेतील आहेत असा प्रचार केला होता. वेदांतील प्रथम राजर्षी ऋषभ हा आमचा पहिला तीर्थंकर आहे, असे जैन म्हणत होते. दाशरथी राम हा बुद्धाचा पूर्वजन्मीचा एक अवतार, असे बौद्ध प्रतिपादन करीत होते. श्रीकृष्णाविषयी त्यांना अत्यंत तिरस्कार होता. तो नरकात जाईल व जैन धर्माचा स्वीकार केल्यावर त्याचा उद्धार होईल, असे अरिष्टनेमी या जैन धर्मवेत्त्याने त्याला सांगितले होते. यज्ञयाग, चातुर्वर्ण्य यांची तर जैन, बौद्ध अतिरिक्त निंदा करीत. अहिंसेचे तर ते स्वतःला आद्य प्रणेते म्हणवीत ( महाभारतात - उपसंहार पृ. १८, १९ ). पण याचा कसलाही परिणाम महाराष्ट्रावर झालेला दिसत नाही. बौद्ध-जैनांनी निंदिलेली सर्व धर्मांगे व सर्व थोर पुरुष सातवाहनांनी शिरसावंद्य मानिली होती हे मागील वर्णनावरून ध्यानात येईल.
महाभारताचे कार्य
महाराष्ट्रात अशोकानंतर लगेच वैदिक धर्माचे हे पुनरुज्जीवन झाले, त्याच्या मागे महाभारत ही महाप्रेरणा असावी, असे पंडितांचे मत आहे. सनातन वैदिक धर्मावर आलेल्या त्या महान आपत्तीचे निवारण करण्यासाठीच महाभारताची रचना झाली, असे कुलगुरू चि. वि. वैद्य यांनी आपल्या ग्रंथाच्या प्रारंभीच सांगितले आहे. याच सुमारास शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य असे अनेक पंथ निर्माण होऊन त्यांच्या उपासकांत शत्रुभाव निर्माण झाला होता. सांख्य, वेदान्त हे तत्त्वज्ञानाचे जे पंथ त्यांच्यांतही संघर्ष होता. अशा वेळी या सर्व पंथांच्या मतांचा समन्वय साधून भारतीय समाजात ऐक्य प्रस्थापित करण्याचे कार्य महाभारताने केले. वैद्य म्हणतात, 'अशा वेळी सौतीने भारताला महाभारताचे प्रचंड स्वरूप देऊन सनातन धर्मातील अन्तःस्थ विरोध काढून टाकून, सर्व मतांचा एके ठिकाणी मेळ बसवून सर्व प्राचीन कथांचा एके ठिकाणी संग्रह करून, सनातन धर्माचे उदात्त रूप लोकांच्या मनावर ठसवून सनातनधर्मीयांना जोर आणण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली. ( उपसंहार, प्र. २२ ) महाभारताने आणखीही एक थोर कार्य केले आहे. ते म्हणजे कर्मयोगाच्या तत्त्वज्ञानाची प्रतिष्ठापना हे होय. वर सांगितलेच आहे की बौद्ध, जैन है वेदबाह्य पंथच नव्हे, तर वैदिक धर्मातील बहुतेक दर्शनेही निवृत्तिवादी असून संसारत्यागाचा उपदेश ती करीत असत. कर्मत्यागावाचून मोक्ष नाही, असा त्यांचा दृढ सिद्धान्त होता. या मताचा उच्छेद करून, श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश करून कर्मयोगाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. स्वधर्माने, न्यायाने निष्काम बुद्धीने म्हणजे फलत्यागबुद्धीने कर्म करणे हाही मोक्षाचा निश्चित मार्ग आहे, असा गीतेचा सिद्धान्त आहे. वैद्य म्हणतात, 'धर्मयुक्त निष्काम कर्माचरणाचा मार्ग नुसत्या भगवद्गीतेतच सांगितला आहे असे नाही, तर सबंध महाभारतात अथपासून इतिपर्यत उपदेशिला आहे. महाभारत व रामायण ही दोन्ही आर्ष महाकाव्ये याच उपदेशाकरिता अवतीर्ण झाली आहेत, कर्मयोगाचे महत्त्व मनावर ठसविण्याकरिताच या राष्ट्रीय ग्रंथांचा जन्म आहे.' ( उपसंहार, पृ. ७५४ )
ग्रामीण भागातही
गाथा सप्तशती हा सातवाहनकालीन ग्रंथ. त्यात त्या काळच्या ग्रामीण महाराष्ट्राचे वर्णन आहे. त्यावरून हा ग्रामीण समाज वैदिक परंपरेतच स्थिर झाला होता असे दिसते. शिवाला आरंभीच्या व शेवटच्या गाथेत वंदन आहे. अनेक गाथांतून हरी, कृष्ण, गणपती, सूर्य यांचे स्तवन वा निर्देश आहेत. राम, लक्ष्मण यांचाही उल्लेख एका ठिकाणी आहे. या देवतांच्या सध्या रूढ असलेल्या कथाही त्या काळी रूढ होत्या असे दिसते. यावरून वैदिक यज्ञधर्म जाऊन त्या जागी आलेला भागवत धर्म सगळ्या महाराष्ट्रात प्रसृत झाला होता असे दिसते. या ग्रंथात जैनांचा उल्लेख मुळीच नाही; व बौद्धांचाही क्वचितच येतो. तेव्हा सातवाहनांच्या काळातच महाराष्ट्र हा रामायण-महाभारताच्या संस्कृतीत स्थिरावला होता असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही.
वाकाटक शिवोपासक
सातवाहनानंतर आलेले वाकाटकांचे घराणे वैदिक परंपरेचेच अभिमानी होते. त्यांचा मूळ पुरुष गृहपती वाकाटक हा बौद्धमतानुयायी होता. पण पुढे त्याच्या वंशजांचे धर्मपरिवर्तन होऊन ते वैदिक व पौराणिक धर्माचे एकनिष्ठ अनुयायी बनले असे म. म. मिराशी म्हणतात. मूळ राज्य-संस्थापक विन्ध्यशक्ती याने अनेक यज्ञयाग केले होते. त्याचा पुत्र प्रवरसेन याने चार अश्वमेध व सातही सोमयाग केले. नंतरच्या वाकाटक नृपतींनी स्वतः श्रौत याग केल्याचा उल्लेख नाही. पण त्यांनी विज्ञान ब्राह्मणांना ते याग करण्यासाठी भरपूर दाने वारंवार दिल्याचे उल्लेख त्यांच्या ताम्रपटांत आहेत. पण यज्ञयाग हे या काळी नैमित्तिक होते. नित्याच्या जीवनात वर्चस्व पौराणिक धर्माचेच होते. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते. त्यांनी अनेक शिवमंदिरेही बांधली होती. द्वितीय रुद्रसेनाची महाराणी प्रभावती गुप्ता ही रामभक्त होती. रामगिरीवरील राममंदिरात ती नित्य दर्शनास जात असे. पवनार जवळ धाम नदीच्या तीरावर तिच्या पुत्राने आणखी एक राममंदिर बांधले होते. वाकाटकांच्या दानलेखांवरून त्यांनी अनेक दाने एकादशीच्या दिवशी दिल्याचे दिसते. तेव्हा एकादशीव्रताला त्या वेळीच महत्त्व आलेले होते असे दिसते. इ. स. २५० ते ५५० हा वाकाटकांचा जो काळ तोच पुराणांच्या रचनेचा काळ मानला जातो. तेव्हा पौराणिक धर्माचा - त्यातील शिवविष्णूंचे ऐक्य, व्रतमाहात्म्य यांचा- प्रभाव तेव्हा जनमनावर असावा हे साहजिकच आहे.
चालुक्य मंदिरे
चालुक्यराज मंगलीश याच्या एका शिलालेखात चालुक्य सम्राटांच्या धर्मनिष्ठेचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. 'या कुळातील पुरुषांनी अग्निष्टोम, वाजपेय, पौण्डरिक, अश्वमेध इ. यज्ञ केले होते. राजा मंगलीश याने बदामीच्या लेण्यात श्रीविष्णूचे अद्भुत मंदिर कोरविले आणि तेथे विष्णुप्रतिमेची स्थापना केली. त्याने निविम्न लिंगेश्वर नावाचा गाव नारायणबलीसाठी सोळा ब्राह्मणांना संन्याशांच्या भोजनाकरिता दान दिला. बदामी हे त्या वेळी विद्येचे आगर होते. तेथे चौदा विद्यांत निष्णात असे सहस्रावधी ब्राह्मण राहात असत. विष्णुमंदिराप्रमाणेच चालुक्यांनी शिवमंदिरेही बांधली होती. विक्रामादित्याच्या दोन राण्या लोकमहादेवी व त्रैलोक्यमहादेवी यांनी लोकेश्वर व त्रिलोकेश्वर यांची देवळे बांधली होती.
भागवत धर्म
राष्ट्रकूटांच्या काळी श्रौत यागांचे महत्त्व कमी झाले होते. एकाही राष्ट्रकूट सम्राटाने अश्वमेध केलेला नाही किंवा वाजपेय, पौंडरिक इ. इतर यागही केले नाहीत. पण वैदिक परंपरा उच्छिन्न झाली असा याचा अर्थ नाही. वर सांगितलेच आहे की उपनिषत्- काळापासून यज्ञयागांचे महत्व कमी झाले होते, आता या सुमाराला जवळ जवळ नाहीसे झाले. पण वैदिक धर्माचेच भागवत धर्मात रूपांतर झाले होते. महाभारत व गीता हे त्याचे मुख्य ग्रंथ होत. सातवाहनांच्या काळापासून महाराष्ट्रात हा अद्वैत- वेदान्तनिष्ठ कर्मप्रधान भागवत धर्म प्रसृत झाला होता. असे असूनही इतके दिवस श्रौत यागांची लोकप्रियता काही अंशी टिकून होती इतकेच. आता तीही नाहीशी झाली. पण याही काळात अग्निहोत्र घेऊन अग्निपूजा करणारे ब्राह्मण अनेक होते. तशी परंपरा पुढे हजार वर्षे चालू होती. राजघराण्यातील आणि एकंदर श्रौत यज्ञांचे माहात्म्य कमी झाले हे मात्र खरे. त्या जागी आता पुराणांनी आणखी पुष्ट केलेला गीताप्रणीत भागवत धर्म अधिराज्य करीत होता.
राष्ट्रकूटांचा मूळ संस्थापक दंतिदुर्ग हा सनातन धर्माचा कट्टा अभिमानी होता. माळव्यावरील स्वारीत उज्जयिनीस मुक्काम असताना त्याने हिरण्यगर्भ महादान केले. इ. स. ७५४ साली रथसप्तमीस त्याने आपली सुवर्णतुला केली व ते द्रव्य ब्राह्मणांस दान केले व मातेच्या आज्ञेवरून ब्राह्मणांना भूमिदानेही दिली. त्याचा चुलता कृष्णराज याने गादीवर आल्यावर वेरूळचे जगविख्यात कैलास लेणे कोरले आणि तेथील शिवलिंगाला सुवर्णालंकार व रत्नालंकार अर्पण केले. राजा अमोघवर्ष याचा जिवसेन नामक जैन साधू हा गुरू होता. पण तो लक्ष्मीचा भक्त होता. इतका की एकदा त्याने महालक्ष्मीला आपले बोट कापून वाहिले होते. धारवाड येथील सूर्य, महादेव या देवतांना त्याने जमिनी दान दिल्याचे लेखही सापडले आहेत. तिसरा इन्द्र नित्यवर्ष (इ. स. ९१४) हा उज्जयिनीच्या महाकाळेश्वराचा भक्त होता. गोविंद ४ था याने गोदातीरी कवठे या गावी सुवर्णतुला केली. ६०० गावे ब्राह्मणांना अग्रहार दिली व ८०० गावे देवालयांना दिली.
कल्याणीचे चालुक्य व देवगिरीचे यादव यांच्या काळी वैदिक परंपरेचा अभिमान उत्तरोत्तर वाढतच गेला. चालुक्य आहवमल्ल याने यज्ञयागही केले होते. आयुष्याच्या अखेरीस त्याला दोषी ताप आला. तेव्हा रघुराजांचा आदर्श पुढे ठेवून त्याने तुंगभद्रेत जलसमाधी घेतली. चालुक्य विक्रमादित्य ६ वा याने विजापूर जिल्ह्यातील आसिबिडी येथे विष्णुमंदिर बांधले व त्यासमोर एक तळेही खोदले. याज्ञवल्क्य स्मृतीचा प्रसिद्ध टीकाकार विज्ञानेश्वर हा त्याच्या दरबारी होता. 'विक्रमादित्यासारखा ऐश्वर्यसंपन्न राजा कधी ऐकलाही नव्हता व पाहिलाही नव्हता' असे विज्ञानेश्वराचे उद्गार राजाच्या सनातन धर्माभिमानाचे द्योतकच आहेत. यादव राजांची वैदिक धर्मनिष्ठा प्रसिद्धच आहे. त्यांचा एक मंत्री हेमाडी याने 'चतुर्वर्गचिंतामणी' या आपल्या ग्रंथात त्यांच्या वंशाची परंपरा देऊन त्यांचा हाच गौरव केला आहे. क्षीण झालेल्या धर्माला त्यांनी पुन्हा तरुणता प्राप्त करून दिली, असे तो म्हणतो. जैत्रपाळावर मुकुंदराजाने कृपा करून त्याला विवेकसिंधू ग्रंथ सांगितला ही कथा विश्रुतच आहे.
सहिष्णुता
महाराष्ट्राची सर्व राजघराणी ही सनातन वैदिक धर्माची अभिमानी होती हे जितके खरे तितकेच हेही खरे की बौद्ध व जैन हे जे अवैदिक धर्मपंथ त्यांच्याकडे ते अत्यंत सहिष्णू व उदार दृष्टीनेच पाहात असत. सहिष्णुता ही भारतीयांच्या पिंडातच आहे. आणि महाराष्ट्र याला अपवाद नव्हता. उत्तरेत व अगदी दक्षिणेत क्वचित प्रसंगी बौद्ध जैनांचा छळ झाला, कधी कत्तलही झाल्या. पण हे सर्व अपवाद होत. सहिष्णुता हाच सर्वत्र नियम होता. इस्लाम धर्म हा अत्यंत असहिष्णू होय. इस्लामेतरांच्या तरुण वृद्ध, स्त्री, बालके, सर्वांच्या कत्तली करणे, त्यांच्यावर पाशवी अत्याचार करणे, त्यांना सक्तीने बाटविणे यातच इस्लामियांना भूषण वाटते. ते त्यांच्या धर्माचेच एक कलम आहे असे ते मानतात. अशा इस्लामियांशीसुद्धा हिंदू सहिष्णुतेने वागतात. हे आत्मघातकीपणाचे आहे, हे ध्यानात येण्याची ऐपत हिंदूंमध्ये तेव्हाही नव्हती व आजही नाही. राष्ट्रकूटकालीन असल्या सहिष्णुतेविषयी लिहिताना डॉ. आळतेकर म्हणतात, 'महंमद कासीम व महंमद गझनी यांनी केलेल्या अत्याचारांची माहिती असूनही हिंदुराजे मुस्लिमांशी सहिष्णुतेने वागत. याचा अर्थ असा की त्या काळचे हिंदू हे अदूरदृष्टी व अंध असून त्यांना त्यातून कोसळणाऱ्या अनर्थपरंपरेचे आकलन करण्याची बुद्धीच नव्हती. तेव्हा असे हिंदू, बौद्ध व जैन पंथीयांशी असहिष्णुतेने वागतील हे शक्यच नव्हते. बौद्ध विहार, जैन मठ, देवळे यांना हिंदूंच्या मठदेवळांप्रमाणेच महाराष्ट्रीय राजघराण्यांनी व धनिकांनी मुक्तहस्तांनी देणग्या दिल्याचे व भूदान केल्याचे शेकडो कोरीव लेखांत उल्लेख आहेत. काही राजांनी स्वतःसुद्धा जैनांना मंदिरे बांधून दिली होती. पुराणांनी बुद्धाला, तो वेदविरोधी असूनही, विष्णूचा अवतार मानून सर्व धर्मांचे ऐक्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळेच अनेक भिन्न पंथ येथे असूनही हिंदुसमाज त्या काळी भंग पावला नाही. तो एकरूप राहिला.
बौद्ध जैन- स्वरूप
बौद्ध व जैन हे दोन वेदविरोधी नास्तिक पंथ इ. स. पूर्वी सहाव्या शतकात ईशान्य भारतातील बिहार प्रांतात प्रस्थापित झाले. त्यातील बौद्धधर्म इ. सनाच्या आठव्या नवव्या शतकात भारतातून अजिबात लोप पावला हे जरी खरे तरी अशोकाच्या काळापासून पुढे काही शतके त्याचा सर्व भारतात, इतकेच नव्हे, तर भारताबाहेरील चीन, जपान, सिलोन इ. देशांतही खूप प्रचार झाला होता. महाराष्ट्रात त्याचा खूपच प्रसार झाला असावा असे दिसते. एकंदर भारतात बौद्धांची ९०० लेणी आहेत. त्यांतील ८०० महाराष्ट्रात आहेत आणि ती कोकण, देश, मराठवाडा अशा सर्व विभागांत आहेत. बौद्धातील महायानपंथाचा धुरीण नागार्जुन हा मूळ विदर्भातलाच होय. शिवाय प्रत्यक्ष राजसत्ताधारी घराणी जरी येथे बौद्ध नसली तरी त्यांनी बौद्धांना उदार आश्रय दिला होता हे वर सांगितलेच आहे. यामुळे सरासरी एक हजार वर्षे तरी भारतात व महाराष्ट्रात बौद्धपंथाची चलती होती यात शंका नाही. जैनपंथाचा बौद्धपंथाप्रमाणे जगभर प्रसार झाला नाही. भारतातही त्या प्रमाणात त्याची भरभराट झाली नाही. पण त्याचा बौद्धपंथाप्रमाणेच भारतातून लोपही झाला नाही. त्याला अनुयायी थोडे मिळाले हे खरे. १९२१ साली भारतातील जैनांची संख्या सुमारे १२/१३ लाख होती. तेव्हा मागल्या काळी ती बरीच कमी असली पाहिजे. पण काही राजांचा व धनिक व्यापारी वर्गाचा त्याला मोठा पाठिंबा मिळाल्यामुळे आजही भारतात तो टिकून आहे. तेव्हा आपल्या आरंभीच्या कालखंडात महाराष्ट्रात या दोन पंथांचा कितपत प्रभाव पडला, हे पाहणे आवश्यक आहे.
हे दोन्ही पंथ मुळात आत्यंतिक निवृत्तिवादी आहेत. ते परमेश्वर मानीत नाहीत. आणि आत्माही मानीत नाहीत. पण जग हे क्षणभंगुर आहे, आणि संसार अत्यंत दुःखमय आहे, हे वेदान्ती मत त्यांना मान्य आहे, त्याचप्रमाणे कर्मवाद व पुनर्जन्म- सिद्धान्त हेही त्यांना मान्य आहेत. संसारातील सर्व दुःखे, तृष्णा, वासना यांमुळे निर्माण होतात व त्यामुळे तृष्णाक्षय हा त्यांच्या मते एकच मुक्तीचा मार्ग आहे. जन्ममरणाच्या फेऱ्यातून, नरकाच्या यातनांतून ज्यांना मुक्त व्हावयाचे असेल त्यांनी सत्य, अहिंसा, अपरिग्रह या तत्त्वांचा अवलंब करून तप केले पाहिजे व अंती संसारत्याग केला पाहिजे. संसारत्यागावाचून निर्वाण वा मोक्ष प्राप्त होणार नाही, अशी या दोन्ही पंथांची शिकवण आहे.
त्यांचा निवृत्तिवाद
जैन व बौद्ध यांचा निवृत्तिवाद व त्यांची अहिंसा यामुळे भारताची अतिशय हानी झाली, असे अनेक पंडितांचे मत आहे. सम्राट अशोक, हर्ष यांच्यावर याच कारणामुळे डॉ. देवदत्त भांडारकर, डॉ. कन्हय्यालाल मुनशी स्वा. सावरकर यांनी प्रखर टीका केली आहे. पण महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहता या दोन पंथांच्या निवृत्तिवादाचा किंवा त्यांच्या अहिंसेचा फारसा प्रभाव येथे पडला होता असे दिसत नाही. अशोकाच्या काळापासूनच या पंथांचे प्रचारक महाराष्ट्रात आपल्या तत्त्वांचा उपदेश करीत होते. येथे त्यांनी अनेक मठही स्थापन केले होते. दोन्ही पंथांना राजाश्रयही भरपूर मिळाला होता. पण महाराष्ट्रात या दोन्ही पंथांना कधी अनुयायी फारसे मिळाले नाहीत आणि त्यांच्या वरील तत्त्वांच्या प्रभावामुळे येथले कर्तृत्वही मरगळलेले दिसत नाही. रणविद्या, राजशासन, व्यापार, विद्या, कला या सर्व क्षेत्रांत नवव्या दहाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात कर्तृत्वाची जोपासना चांगली होत होती. त्या सुमारास बौद्ध धर्म एकंदर भारतातूनच लुप्त झाला. आणि जैन धर्माचे मोठे पुनरुत्थान झाले असे नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात या दोन पंथांनी काही वळण लावले असे म्हणता येईल असे दिसत नाही.
धर्मग्रंथ
सातवाहन ते यादव या कालखंडाचा धार्मिक इतिहास निश्चित करण्यास आधारभूत धर्मग्रंथ म्हणजे महाभारत, स्मृती व पुराणे हे होत. यांतील बहुतेक सर्व ग्रंथांची रचना या काळात झाल्याचे दिसत नाही. तरी आपण हे ध्यानात ठेविले पाहिजे की अखिल भारतावर त्या काळात या उत्तरेतील ग्रंथांचेच वर्चस्व होते. म्हणून भारतातल्या कोणत्याही प्रांतातील धार्मिक जीवनाचा अभ्यास करताना याच ग्रंथांकडे पाहावे लागते. याच्या जोडीला नाणी, शिलालेख व तत्कालीन इतर वाङ्मय यांवरून अर्वाचीन काळात या कालखंडाचा जो इतिहास पंडितांनी निश्चित केला आहे त्याचा आधार घेऊन, ग्रंथांतील तत्त्वे, सिद्धान्त, आज्ञा या व्यवहारात कितपत उतरत होत्या हे पाहून, महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनाचे स्वरूप वर्णिले पाहिजे. वर सांगितलेच आहे की महाभारताची रचना सातवाहनांच्या प्रारंभीच्या काळातच झालेली आहे. स्मृतींच्या रचनेचा प्रारंभ साधारण त्याच सुमारास झालेला आहे. मनुस्मृतीची रचना इ. पू. दुसऱ्या शतकात झाली असे बऱ्याच पंडितांचे मत आहे. यानंतर एक किंवा दोन शतकांच्या अंतराने याज्ञवल्क्य, नारद, बृहस्पती, पराशर, वसिष्ठ, देवल यांच्या स्मृती होत राहिल्या. आठव्या शतकाच्या अखेरीस नव्या स्मृती होण्याचे बंद झाले व तेथून निबंधांचा काळ सुरू झाला. अनेक पंडितांनी मनु याज्ञवल्क्यांच्या स्मृतीवर टीका लिहिल्या व इतर अनेकांनी निरनिराळ्या स्मृतींच्या व महाभारतासारख्या ग्रंथाच्या आधारे धर्मशास्त्रीय ग्रंथ तयार केले. या सर्व ग्रंथांना निबंध असे म्हणतात. विश्वरूप, मेधातिथी, विज्ञानेश्वर, अपरार्क, हेमाडी हे निबंधकार होत. यांतील शेवटचे तिघे महाराष्ट्रीय असल्यामुळे आपल्या दृष्टीने त्यांचे महत्त्व जरा जास्त आहे. इ. सनाच्या चौथ्या शतकापासून पुराणांच्या रचना होऊ लागल्या. वायू, ब्रह्मांड, विष्णू, मत्स्य, मार्कंडेय इ. पुराणांची रचना चौथ्या ते सहाव्या शतकापर्यंत झाली. विष्णुधर्मोत्तर पुराण, अग्निपुराण, गरुडपुराण ही त्यानंतरच्या काळातली होत. भागवत पुराण हे काहींच्या मते पाचव्या व इतरांच्या मते दहाव्या अकराव्या शतकातले आहे. हे सर्व काळ अंतर्गत पुराव्यावरून व इतरत्र त्यांचे जे उल्लेख येतात त्यावरून अनुमानाने ठरविलेले आहेत. त्यांच्या विषयी एकवाक्यता मुळीच नाही. तरी सातवाहन ते यादव या कालखंडातलेच हे सर्व धर्मग्रंथ आहेत, याविषयी वाद नाही. आणि त्यांच्याच आधारे भारतातील सर्व प्रांतांत धर्मनिश्चय केला जात होता, हेही निर्विवाद आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या धार्मिक जीवनास त्यांनीच वळण लावले होते यात शंका नाही.
परिवर्तने
हिंदूंचे धार्मिक जीवन पाहताना दुसरी एक महत्वाची गोष्ट ध्यानात ठेविली पाहिजे, ती ही की वेदकाळापासून आजपर्यंत हिंदुधर्मात अनेक परिवर्तने झाली असली तरी, आधीच्या काळातील धर्मसिद्धान्त, धर्मतत्त्वे किंवा धर्माचार संपूर्णपणे नष्ट होऊन पुढच्या काळात सर्वस्वी नवीन धर्म प्रवृत्त झाला, असे कधीही घडलेले नाही. वेदकाळचा धर्म यज्ञयागप्रधान होता, प्रवृत्तिप्रधान होता. ते लोक विजिगीपू असून भौतिक धन, स्वराज्य, साम्राज्य यांविषयी त्यांना मोठ्या आकांक्षा होत्या. पुढे ब्राह्मण काळात यज्ञधर्माला फारच जडरूप आले. तेव्हा ज्ञानप्रधान असा उपनिषद्धर्म उदयास आला. त्याने यज्ञप्रधान कर्मकांडाचा निषेध केला व मोक्षप्राप्ती हे ध्येय सांगून क्षणभंगुर मायामय संसाराचा त्यासाठी त्याग करणेच अवश्य आहे असा सिद्धान्त सांगितला. वेदांचा कर्ममार्ग मागे पडून अशा रीतीने ज्ञानमार्ग रूढ झाला. पण हा संन्यासप्रधान ज्ञानमार्ग राष्ट्रीय प्रपंचाला हानिकारक आहे आणि आचरावयास अवघड आहे, हे ध्यानी घेऊन श्रीकृष्णांनी भक्तिप्रधान कर्मयोग प्रस्थापित केला. महाभारताची सध्याच्या स्वरूपातील रचना जरी इ. पू. दुसऱ्या तिसऱ्या शतकात झाली असली तरी त्यातील इतिहास इ. पू. पंधराव्या चौदाव्या शतकात घडलेला आहे. त्याच काळात व्यास, नारद, वसिष्ठ इ ऋषींनी व विशेषकरून श्रीकृष्णांनी या भक्तिप्रधान कर्मयोगाची स्थापना केली असे लो. टिळकांचे मत आहे ( गीतारहस्य परिशिष्ट भाग ४ था ). यानंतरच्या काळात श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे हे वाङ्मय निर्माण करून पुन्हा यज्ञधर्माचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न वैदिकांनी केला. आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून बौद्ध व जैन हे धर्म उदयास आले. दोन तीन शतकांनी अशोकाच्या प्रयत्नाने सर्व भारतभर त्यांचा प्रसार होऊ लागला. तेव्हा प्रारंभी सांगितल्याप्रमाणे सौती नावाच्या पंडिताने महाभारताची रचना केली. आणि त्यानंतरच्या दहाबारा शतकांत वर सांगितल्याप्रमाणे स्मृती, पुराणे व निबंध या ग्रंथांची रचना झाली. या प्रदीर्घ कालखंडात वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण, षड्दर्शने, स्मृती, पुराणे, निबंध इ. जे धर्मग्रंथ झाले त्यांत अनेक तात्त्विक सिद्धांत, अनेक नीतितत्त्वे, अनेक समाजरचनेची तत्त्वे, अनेक धर्माचार अगदी परस्परविरुद्ध आहेत. त्यांच्यांतील विरोध अगदी मूलगामी असा आहे. तरीही पूर्वीच्या काळचे धर्मग्रंथ किंवा त्यांतील धर्मसिद्धान्त पुढील काळच्या धर्मशास्त्रज्ञांनी व जनतेने सर्वस्वी निंद्य मानून त्यांचा समूळ त्यागच केला पाहिजे, तो पूर्वधर्म उच्छिन्न झाला पाहिजे असा आग्रह कधीच धरला नाही. त्यामुळे वेद, उपनिषदे, गीता, स्मृती, पुराणे यांपैकी प्रत्येक धर्मग्रंथातील काही ना काही तत्त्व किंवा आचार प्रत्येक कालखंडातील रूढ धर्मात समाविष्ट झालेला आढळून येतोच. यज्ञयाग मागे पडून मूर्तिपूजा रूढ झाली तरी यज्ञसंस्था समूळ नष्ट झाली असे कधी घडले नाही. भक्तिमार्ग रूढ झाला म्हणून ज्ञानमार्ग पूर्ण विस्मृत झाला असे नाही. बौद्ध व जैन हे अगदी अवैदिक धर्मपंथ. पण त्यांच्या संस्थापकांचा व त्यांच्या धर्मतत्त्वांचाही समावेश वैदिक सनातन धर्मात करून घेण्याचीच पुराणकारांनी वृत्ती जोपासली. त्यामुळे कोणत्याही कालखंडातील धार्मिक जीवनाचा अभ्यास करताना त्याचे धागेदोरे मागल्या सर्व कालखंडांतील धार्मिक ग्रंथांत, संप्रदायांत व पंथांत गुंतलेले आहेत हे ध्यानात ठेवावे लागते.
तत्कालीन धर्मशास्त्राच्या व लोकांच्या या प्रवृत्ती ध्यानात घेऊन सातवाहन ते यादव या कालखंडातील महाराष्ट्रीय लोक कोणत्या धर्मशास्त्राचे अनुसरण करीत होते ते आता पाहावयाचे आहे. वर सांगितल्याप्रमाणे या कालखंडातले मुख्य धर्मशास्त्रीय ग्रंथ म्हणजे महाभारत, स्मृती व पुराणे हे होत. यांपैकी महाभारत व स्मृती यांतील धर्मशास्त्र प्रथम पाहू आणि नंतर पुराणांचा विचार करू. इ. स. पूर्व २५० ते इ. स. ३०० या काळात महाभारत, मनुस्मृती व याज्ञवल्क्यस्मृती यांचे सर्वत्र वर्चस्व होते. त्यानंतर तीन चार शतके स्मृतिरचना होत राहिली. पण त्या काळात पुराण-धर्माचा प्रभाव फार पडू लागला होता. म्हणून महाभारत व स्मृती यांचा प्रथम विचार करून नंतर पुराणांचा करणे युक्त टरेल.
ऐहिक उत्कर्ष
महाभारत व स्मृती यांचे धर्मशास्त्र समाजाचा ऐहिक उत्कर्ष दृष्टीपुढे ठेवून सांगितलेले आहे. धर्म हा केवळ मोक्षासाठी व परलोकासाठी असून त्याची फळे अदृष्ट असतात, त्याच्या यशापयशाची कसोटी इहलोकातील फळावरून ठरवावयाची नसते हा मीमांसा-पंथाचा सिद्धान्त या काळात प्रचलित झालेला नव्हता. धर्माचे आचरण का करावे हे सांगताना त्यापासून अर्थ व काम प्राप्त होतात म्हणून, असे व्यासांनी कारण दिले आहे. धर्मनियम हे लोकांच्या प्रभावासाठी, उत्कर्षासाठी केलेले असतात असे श्रीकृष्ण म्हणतात. ज्याच्या योगाने लोकांचे धारण होईल तो धर्म, असे भीष्म सांगतात. सत्याची व्याख्याही महाभारतात 'जे सर्वभूतांचे हित करते ने सत्य' अशीच दिली आहे. तेव्हा धर्म हे समाजाच्या उत्कर्षाचे साधन आहे, इहनिरपेक्ष अशी ती कल्पना नाही, याविषयी महाभारतातील धर्मवेत्यांना संदेह नव्हता. जे कृत्य, जो आचार अनेकांना घातक होतो तो धर्म नसून कुमार्ग होय, जे कृत्य समाजाशी, त्याच्या कल्याणाशी अविरोधी असेल तेच धर्म होऊ शकते, हा विचार महाभारतात ठायी ठायी आलेला आहे.
मनुयाज्ञवल्क्यांचेही हेच मत होते. जो धर्म असुखोदर्क व लोकविक्रुष्ट असेल, ज्यामुळे सुखलाभ होत नाही व जो लोकविरोधी आहे, तो त्याज्य मानावा, असे मनूने म्हटले आहे ( ४. १७६ ) आणि अस्वर्ग्य व लोकविद्विष्ट धर्माचे आचारण करू नये, असे याज्ञवल्क्यांचे मत आहे ( १. १५६ ).
तीन ऋणे
प्रवृत्तिपरतेच्या दृष्टीने पाहिले तरी हेच दिसेल. धर्मशास्त्र केवळ मोक्षैकनिष्ठ झाले. ते निवृत्तीचा, संन्यासाचा, संसारत्यागाचा उपदेश करू लागले की समाजाचा नाश होतो. महाभारत आणि स्मृती यांत तीन ऋणांची जी कल्पना आहे ती निवृत्तीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. जन्मास आलेल्या प्रत्येक मनुष्याने ऋषी, देव व पितर यांचे ऋण फेडलेच पाहिजे, असा या धर्मशास्त्राचा कटाक्ष होता. मुलांना व्यवसाय लावून दिल्यानंतर आणि मुलींना सुस्थळी दिल्यानंतर मगच गृहस्थाने संन्यासाचा विचार करावा, असे महाभारत सांगते; तर नातू झाला, अंगाला सुरकुत्या पडल्या म्हणजे मग अरण्याचा आश्रय करावा असे मनू म्हणतो ( ६. २ ) सूत्रवाङ्मय हे महाभारताच्या आधीचे. श्रौत यज्ञधर्माच्या पुनरुज्जीवनासाठी ते निर्माण झालेले. त्यात गृहस्थाश्रमाची महती गाऊन तीन ऋणे फेडली पाहिजेत हे तर आग्रहाने सांगितले आहेच, पण शिवाय ब्रह्मचर्य किंवा संन्यास यांची प्रशंसा करणारे लोक धुळीस मिळतात असेही म्हटले आहे (बौधायन २. ६. ११.३३ व ३४, आपस्तंब २. ९. २४.८ ). याज्ञवल्क्यानेही मनूप्रमाणेच गृहस्थाश्रमाची महती गायिली आहे. हारीतस्मृती, वृद्धात्रेयस्मृती, योग वासिष्ठ या ग्रंथांतही मनूने प्रतिपादिलेल्या वैदिक कर्मयोगाचीच महती गायिली आहे. यावरून हे स्पष्ट दिसेल की महाभारत व स्मृती हे ग्रंथ प्रवृत्तिधर्माचे, कर्मयोगाचे पुरस्कर्ते असून निवृत्ती ही समाजघातक आहे असे त्यांचे मत होते.
पुरुषबुद्धी
धर्मशास्त्रात पुरुषबुद्धीला अवसर असणे हे श्रेष्ठ, समाजोत्कर्षकारक धर्माचे तिसरे लक्षण होय. शब्दप्रामाण्य किंवा वचनप्रामाण्य एकदा धर्मशास्त्रात शिरले की समाज आंधळा होतो आणि त्याचा अधःपात अटळ होऊन बसतो. वरील ग्रंथांवरून या काळाचे धर्मशास्त्र वचनप्रामाण्यवादी नव्हते असे दिसून येईल. 'हे अर्जुना, म्हणून विद्वान पुरुषाने या जगात बुद्धीचा अवलंब करून धर्माधर्माचा निश्चय करावा व त्याप्रमाणे वागावे ' (शांति, १४१, १०२ ) 'परिस्थिती व बलावल पाहूनच कोणताही निर्णय करावा' ( वन, २८-३२ ) ' राजाने आपल्या बुद्धीच्या योगाने धर्माचे त्या त्या बाजूने संशोधन केले पाहिजे, केवळ शास्त्राने किंवा केवळ बुद्धीने धर्मनिर्णय शक्य नाही' (शांति, १४२, १७ ) अशी अनेक वचने महाभारतात सापडतात. 'प्रत्यक्ष, अनुमान व विविध शास्त्रग्रंथ यांची धर्मशुद्धीसाठी आवश्यकता असते' असे मनू म्हणतो ( १२. १०५). चाणक्य तथा कौटिल्य हा साधारणपणे महाभारताचा समकालीन होय. त्याने 'धर्मन्याय व लिखित शास्त्रवचन यांत विरोध आल्यास न्यायच प्रमाण मानावा, लिखित वचन बाजूस सारावे,' असा अभिप्राय दिला आहे. 'शास्त्र आहे म्हणून त्यातील प्रत्येक गोष्ट करावी असे ठरत नाही. शास्त्रनियम व्यापक तत्त्वावर आधारलेले असून आचरण मात्र त्या त्या परिस्थितीप्रमाणेच व्हावयाचे असते.' असे वात्स्यायनांचे मत आहे.
परिवर्तनीयता
धर्मात पुरुषबुद्धीला अवसर देणारे धर्माची परिवर्तनीयता ओघानेच मान्य करतात. परिस्थिती सारखी बदलत असते, नव्या समस्या निर्माण होत असतात, अपूर्व प्रसंग निर्माण होत असतात. अशा वेळी देशकाल पाहून नवे धर्मशास्त्र, नव्या स्मृती रचल्या नाहीत तर समाज जुन्या चाकोरीतून रहाटत राहून सामर्थ्यहीन, दुबळा होऊन जातो, त्याची जीवशक्ती क्षीण होते. म्हणूनच युगमानाप्रमाणे धर्म बदलला पाहिजे असे मनूने म्हटले आहे ( १.८५ ) एकच गोष्ट परिस्थितीप्रमाणे धर्म किंवा अधर्मही ठरते. म्हणून धर्म परिस्थितीप्रमाणे ठरवावा लागतो, असे भीष्मांनी सांगितले आहे (शांति, ३६.११ ) श्रीकृष्ण, व्यास यांसारख्या सर्व भारती धर्मवेत्त्यांनी धर्माविषयी असाच निश्चय सांगितला आहे. देशकाल, आपले बलाबल, द्रव्य, हे सर्व पाहून धर्मनिश्रय करावा असे बहुतेक सर्व स्मृती सांगतात. पुष्कळ वेळा स्मृतिकारांनी आधीच्या स्मृतिकारांची मते आपल्याला मान्य नाहीत, असे स्पष्टपणे सांगून आपले निराळे मत मांडल्याचे दिसून येते. द्विजातींनी शुद्रभार्या करावी हे मनूचे मत मला मान्य नाही, असे याज्ञवल्क्य म्हणतो (१.५६ ). नीतिविचार कालसापेक्ष कसा असतो, दरवेळी परिस्थिती पाहून तात्त्विक सिद्धान्ताला मुरड घालणे हेच श्रेयस्कर कसे असते, हे कर्मजिज्ञासा या गीतारहस्यातील प्रकरणात लो. टिळकांनी भीष्म, प्रल्हाद, नारद, मनू, याज्ञवल्क्य या प्राचीन धर्मशास्त्रज्ञांच्या वचनांच्या आधारे दाखवून दिले आहे.
इ. पू. २५० पासून पुढच्या पाचसहाशे वर्षांच्या कालात समाजात रूढ असलेल्या धर्मशास्त्राचे स्वरूप काय होते ते येथवर सांगितले. त्यानंतर आता पुढील पाचसहाशे वर्षांच्या काळातील पुराणप्रणीत धर्माचे स्वरूप पहावयाचे आहे. पण या धर्मग्रंथांतील धर्मशास्त्राची चिकित्सा करताना जी एक महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवावयास हवी ती आधी सांगतो.
काल अनिश्चित
महाभारत किंवा मनुयाज्ञवल्क्यादिकांच्या स्मृती यांचा काळ निश्चित ठरलेला नाही, ठरविता येत नाही. त्यांचा काळ सांगताना शतकांच्या भाषेत बोलावे लागते. आणि पुष्कळ वेळा भिन्न पंडितांच्या मतांत ४/५ शतकांचा फरक असतो. त्यामुळे अमुक परिस्थिती व अमके धर्मशास्त्र असे निश्चयाने कोणत्याच ग्रंथाबद्दल बोलता येत नाही व त्यातील कार्यकारणसंबंध निश्चित करता येत नाही. पण यापेक्षाही जास्त दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यांपैकी प्रत्येक ग्रंथात नंतरच्या पंडितांनी, धर्मशास्त्रवेत्यांनी वाटेल तसे प्रक्षेप केले आहेत. महाभारत, मनु याज्ञवल्क्यांच्या स्मृती, अष्टादश पुराणे यांत एकही ग्रंथ असा नाही की ज्यात लोकांनी मागून भर घातलेली नाही. त्यामुळे अमके मत मनूचे, अमके याज्ञवल्क्याचे, मत्स्यपुराण असे म्हणते व वायुपुराणात तसे सांगितले आहे, या म्हणण्याला फार थोडा अर्थ आहे. शिवाय मागून प्रक्षेप करणाऱ्यांनी चालू विषयाचा, पूर्वापर संदर्भाचा, ग्रंथातील विचारसूत्राचा कसलाही विचार न करता वाटेल त्या ठिकाणी वाटेल ती मते घुसडून दिली आहेत. त्यामुळे एकाच ग्रंथात अत्यंत परस्पर विरुद्ध अशी मते अनेक वेळा आढळतात. त्यामुळे एखाद्या धर्मशास्त्रज्ञाचा आधार घेणे पुष्कळ वेळा धोक्याचे होऊन बसते. यामुळे या प्राचीन काळच्या धार्मिक वा सामाजिक इतिहासाचा अभ्यास करताना, या काळात दोन भिन्न विचारप्रवाह होते, भिन्न पंडितांनी भिन्न विचारप्रणाली मांडल्या होत्या आणि त्या त्या कालखंडात ज्या विचारसरणीचा जोर जास्त असेल, प्रभाव जास्त पडेल तिच्याप्रमाणे समाजाचा उत्कर्षापकर्ष होत होता, एवढेच निश्चित करणे शक्य होते. अमके मत अमक्या धर्मवेत्याने मांडले व ते त्याने या काळात मांडले असे निश्चयाने सांगून त्याचे बरेवाईट परिणाम अमके झाले, असे सांगता येत नाही.
महाभारत आणि स्मृती यांनी सांगितलेल्या धर्मशास्त्राचे स्वरूप आपण वर पाहिले. आता पुराण-प्रतिपादित धर्मशास्त्र पाहू आणि मग ऐतिहासिक घटनांच्या आधारे या काळच्या सामाजिक उत्कर्षाची व त्याच्या अखेरीस - म्हणजे यादवांच्या अखेरीस - जो समाजाचा अपकर्ष झाला त्याची कारणमीमांसा करण्याचा यावच्छक्य प्रयत्न करू.
बौद्ध-जैनांचे देणे
जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट सांगून ठेवावी असे वाटते. बौद्ध धर्माने किंवा जैन धर्माने भारताचा नाश केला अशी सरसकट विधाने करणे युक्त नाही. प्रत्येक धर्मात काही थोर तत्त्वे असतात, तशा काही विकृतीही असतात. हिंदुधर्मही याला अपवाद नाही. त्यातील विकृतीमुळेच भारताचा अधःपात झाला, हे पुढे दाखविले आहे. असे असताना बौद्ध किंवा जैन धर्माने नाश केला, असे कसे म्हणता येईल ? या दोन्ही धर्मात महापराक्रमी राजे होऊन गेले. तेव्हा त्यांनी क्षात्रधर्माचा नाश केला असेही म्हणता येणार नाही. दोन्ही धर्मांची प्राचीन काळी विद्यापीठे होती. त्यांत पारमार्थिकाप्रमाणेच ऐहिकाचाही अभ्यास होत असे. कोरीव लेण्यांची कला तर बव्हंशी बौद्धांची आहे. जैनांनी भारतीय व्यापाराला जी प्रतिष्ठा मिळवून दिली तिला तोड नाही. अलीकडच्या काळात डॉ. आंबेडकर ही बौद्धधर्माची निस्तुल अशी देणगी आहे. नवबौद्धांची अस्मिता जागृत करण्याचे श्रेय त्या धर्मालाच आहे. असे असताना सरसकट विधाने करणे हे अनैतिहासिक होईल. असो. आता पुराणांचा विचार करू.
पुराण-धर्म
पुराणांची रचना साधारणतः इ. सनाच्या चौथ्या शतकापासून सुरू झाली, असे बहुतेक संशोधक मानतात. सध्याचा हिंदुधर्म हा श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्म आहे. त्या वरूनही प्रथम श्रुती, मग स्मृती आणि नंतर पुराणे हाच कालक्रम दिसून येतो. पण पुराणांची रचना चौथ्या शतकात झाली याचा अर्थ इतकाच की सध्याच्या स्वरूपातली रचना त्या वेळी झाली. मूळ पुराणे फार प्राचीन आहेत. ब्रह्मदेवाने वेदांच्याही आधी पुराणे रचली, वेद हे पुराणांवर अवलंबून आहेत असे पुराणांतच अनेक ठिकाणी सांगितले आहे. हरिश्चंद्र, नलदमयंती, सावित्री यांच्या कथा प्राचीन कथा, म्हणून महाभारतातही सांगितलेले आढळते. त्यावरून अत्यंत प्राचीन काळी लोककथांच्या रूपाने पुराणे अस्तित्वात असावी हा संशोधकांचा तर्क संयुक्तिक वाटतो. असे असल्यामुळे पुराणांचे महत्व वेदांपेक्षाही जास्त आहे, असे सांगण्यास पुराणकार कचरत नाहीत. वेद, षडंगे, उपनिषदे इतके पढूनही खरे ज्ञान होणार नाही, त्यासाठी पुराणांचा अभ्यास अवश्य आहे (वायु), पुराणे व इतिहास वेदांपेक्षाही श्रेष्ठ होत (कूर्म), असे ते निर्भयपणे सांगतात. वेदांसंबंधी अत्यंत पूज्यबुद्धी ठेवूनही पुराणे आपले महत्त्व अशा रीतीने सांगतात हे विशेष होय. अशा या पुराणांची रचना इ. सनाच्या चौथ्या शतकापासून दहाव्या अकराव्या शतकापर्यंतच्या कालखंडात झाली. आणि तेव्हापासून श्रौत व स्मार्त धर्माचा प्रभाव कमी होऊन पुराणोक्त धर्माचेच अधिराज्य हिंदुसमाजावर प्रस्थापित होण्यास प्रारंभ झाला. श्रौत व स्मार्त धर्माचा भारतात त्यानंतर समूळ लोप झाला असे नव्हे. वर एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे संपूर्णपणे उच्छेद असा कोणत्याच संप्रदायाचा भारतात झाला नाही. म्हणूनच नंतरच्या काळात हिंदुधर्म हा श्रुतिस्मृतिपुराणोक्त आहे असेच धर्मशास्त्र सांगत आले आहे. लोकमानसावर प्रभाव कोणत्या धर्माचा जास्त झाला एवढेच येथे सांगावयाचे आहे.
लोकसंग्रह
पुराणांचा पहिला विशेष हा की त्यांनी गीतेतील कर्मयोगाचा, लोकसंग्रहाचा म्हणजेच समाजसेवेचा अतिशय विस्ताराने व हिरीरीने प्रचार केला. अनेक पुराणांनी हा उपदेश करण्यासाठी गीतेतले श्लोक किंवा त्यांचा सारार्थ दिला आहे. यतः प्रवृत्तिः भूतानां, येन सर्वमिदं ततम् । स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदति मानवः । या गीतावचनाचे व्याख्यानच विष्णू, अग्नी, पद्म इ. पुराणांनी केले आहे. कूर्म पुराण म्हणते, 'मनुष्याने फलाची आशा सोडून सतत कर्म करावे, म्हणजे तो ज्ञानी नसला तरी कालांतराने त्याला मोक्ष मिळेल. मला अर्पण केलेल्या कर्मांचा बंध लागत नाही. उलट त्यांनी मोक्ष मिळतो.' मार्कंडेय पुराणाने हेच कर्मयोगशास्त्र सांगितले आहे. कर्मे कोणती करावी या प्रश्नाला, वर्णविहित कर्मे, हेच उत्तर आहे. पण पुराणांनी समाजधारणेकडे लक्ष देऊन समाजसेवेची अनेक कर्मे पुण्यप्रद म्हणून उपदेशिली आहेत. समाजसेवेला पुराणे पूर्तधर्म म्हणतात. त्यात दीनदलितांची सेवा, त्यांच्या दुःखांचा परिहार याला प्रमुख स्थान आहे. तप, यज्ञ कितीही आचरले तरी अशा लोकसेवेवाचून परलोक-प्राप्ती होत नाही असा पुराणांचा सिद्धान्त आहे. इष्टापूर्त हा जुना शब्द आहे. इष्ट म्हणजे अग्निहोत्र, तप, सत्य, स्वाध्याय, आतिथ्य, वैश्वदेव हे होय. आणि विहिरी, तळी बांधणे, देवळे बांधणे, धर्मशाळा, गोशाळा, वेदशाळा, मठ बांधून देणे, वड, पिंपळ, आंबा, लिंबू, जांभूळ ही झाडे लावणे, गरिबांच्यासाठी झोपड्या बांधणे, विविध फुलांनी सुशोभित अशी उद्याने, कमळांची सरोवरे तयार करणे हा पूर्तधर्म होय. पद्मपुराण यालाच धर्मकार्य म्हणते. या पूर्तधर्माचा उपदेश करून, पुराणांनी, स्वर्गलोकात वा ब्रह्मलोकात जे सुख नाही ते परोपकाराने मिळते, दयाधर्मावाचून यज्ञ, तप यांचा उपयोग नाही हे विशद करण्यासाठी अनेक कथा रचल्या व त्यांतील ऋषी, मुनी, राजर्षी यांच्या ताेंडी ती वचने घालून दिली. दानाचे महत्त्व सांगताना पुराणांनी हीच समाजसेवेची दृष्टी ठेविली होती. उपनिषदे, स्मृती यांनी, जो स्वतःसाठीच अन्न शिजवितो तो पापच भक्षण करतो, असे सांगितल्याचे प्रसिद्धच आहे. पुराणांनी नाना प्रकारांनी हा दानधर्म विशद करून सांगितला आहे. पद्मपुराण म्हणते, 'जो नित्य पंगू, अंध, बाल, वृद्ध, रुग्ण, दीन, अनाथ यांना अन्न दान करतो त्याला स्वर्गसुख प्राप्त होते. '
सर्वांचा धर्म
पुराणांचा दुसरा विशेष म्हणजे त्यांनी हा पुराण-धर्म ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत सर्वांना सारखाच सेव्य आहे, विहित आहे, आचरणीय आहे असे आग्रहाने सांगून सर्व समाजाला काहीसे एकरूप देण्याचा प्रयत्न केला. वेदप्रणीत श्रौत धर्माचा व पुढील स्मार्त धर्माचा अधिकार स्त्रियांना नव्हता व शूद्रांनाही नव्हता. पण पुराणधर्माचा अधिकार मात्र सर्व वर्णाना व सर्व जातींना, स्त्रियांना, पुरुषांना सारखाच आहे. गीताप्रणीत कर्मयोगाचा जसा पुराणांनी पुरस्कार केला तसाच त्यातील भक्तिमार्गाचाही केला. पण त्याला व्रते, तीर्थयात्रा, स्नाने व समाजसेवा यांची जोड देऊन त्यांनी धर्म अत्यंत सुलभ करून टाकला. म्हणूनच सर्व जातिवर्णीत त्याचा झपाट्याने प्रसार झाला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना शालिग्राम पूजेचा अधिकार आहे ( स्कंद ). स्त्रिया, शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या सर्वांना शालिग्राम-पूजेने मोक्षलाभ होईल (पद्म). सांख्य, योग, स्वाध्याय, तप, यज्ञयाग यांनी मी प्रसन्न होत नाही तर एका भक्तीने संतुष्ट होतो; किरात, हूण, पुलिंद, यवन, पुल्कस, अभीर, खस हे सुद्धा विष्णूची भक्ती करून तरून जातात ( भागवत ). हा धार्मिक समभाव पुराणे आग्रहाने सांगताना दिसतात. एकादशी, शिवरात्र ही व्रते, तीर्थयात्रा, तुलसीपूजा, प्रदक्षिणा, गोपूजा, दीपपूजा, यांचा पुराणांनी सर्व वर्णाना अधिकार दिला आहे.
निर्भय निर्णय
बुद्धिप्रामाण्य व तदनुषंगाने येणारे धर्मपरिवर्तनाचे तत्त्व यांची महाभारत व स्मृती यांची परंपराही पुराणांनी चालविली होती. पुराणे वेदापेक्षा श्रेष्ठ होत हे सांगणाऱ्यांची मने कणखर असली पाहिजेत हे उघड आहे. वायुपुराणात इन्द्राच्या यज्ञाची गोष्ट आहे. यात पशुहिंसेची वेळ आली तेव्हा ऋषिमुनींनी तिला विरोध केला. वास्तविक यज्ञातील पशुहिंसा ही वेदमान्य आहे. पण महर्षींनी, 'हा धर्म नसून अधर्म आहे' असे स्पष्टपणे सांगितले. पुढे हे प्रकरण वसूकडे गेले. त्याने, पशुहिंसा केली तरी चालेल, असे उत्तर दिले. त्यावर पुराणकार म्हणतो, ' वसूने वेदशास्त्राप्रमाणे निर्णय दिला हे खरे, पण तसे करताना त्याने बलाबलाचा विचार मुळीच केला नाही.' ( वायु ५७ ) याचा अर्थ असा की वेदशास्त्राचा निर्णयही परिस्थितीचा विचार करून अग्राह्य ठरविला पाहिजे असे पुराणकारांचे मत होते. पुरुषबुद्धीचे महत्त्व ते हेच. या बुद्धीचा आश्रय करूनच 'प्रत्येक मन्वंतराच्या वेळी निराळी श्रुती केली जाते, मन्वंतराच्या वेळी सप्तर्षी, मनू व इतर सज्जन तथ्याला धरून धर्म सांगतात, प्रत्येक मन्वंतराच्या वेळी सप्तर्षी धर्मव्यवस्था करून परमपदाला जातात' असे वायु ५९, मत्स्य १४५ इ. पुराणांनी सांगितलेले आहे. दर मन्वंतरात नवी श्रुती रचावयाची असते व सप्तर्षी तिची रचना करतात, हे दोन विचार समाज प्रगतीचा अत्यंत पोषक असे आहेत. सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाने एकदाच सर्व श्रुतींची रचना करून ठेविली असून त्या श्रुतीत बदल करण्याचा कोणालाही अधिकार नाही हा विचारप्रवाह प्रबळ झाला की समाजाचा अधःपात होतो. पुराणांच्या प्रारंभकाळी तरी तो तसा नव्हता, वेदशास्त्राचे निर्णय आंधळेपणाने स्वीकारणे उचित नाही, असे सांगण्याइतका निर्भयपणा त्या काळच्या धर्मशास्त्रज्ञांच्या ठायी होता, असे वरील वचनांवरून दिसून येईल.
नीतितत्त्वे
गीता, महाभारत, रामायण यांतील भक्तिमार्ग, व भक्तिमार्गातील समता यांचा जसा पुराणांनी समाजाच्या सर्व थरांत प्रसार केला तसाच त्यांतील नीतितत्त्वांचाही केला. कथारूपाने धर्मतत्त्व सांगण्याची पुराणांची पद्धत असल्यामुळे त्यांच्या कार्याला यशही चांगले आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, दान, क्षमा, मनोनिग्रह, औदार्य, भूतदया, धैर्य, अद्रोह हीच खरी सनातन धर्माची लक्षणे ( सनातनस्य धर्मस्य मूलमेतद् ) असे वामन, पद्म, ब्रह्मांड, मत्स्य यांनी वारंवार सांगितलेले आहे. वेदाध्ययन, यज्ञ, तप इ. मार्गांनी मोक्ष मिळणार नाही, पण जो मनुष्य प्राणिमात्राकडे आत्मौपम्यबुद्धीने पाहतो त्याला निश्चित मिळेल, सहस्र अश्वमेधांपेक्षा सत्य श्रेष्ठ होय, अशा तऱ्हेची वचने पुराणांत सर्वत्र विखुरलेली आहेत. मानवाच्या मनोगुणांचा विकास नीतिधर्माने होतो, म्हणून कर्मकांडापेक्षा, आचारधर्मापेक्षा नीतिधर्म श्रेष्ठ होय, हे तत्त्व सर्व धर्मांना सारखेच मान्य आहे. पुराणांनी ही नीतितत्त्वे हिंदुसमाजात दृढमूल करून टाकण्यात मोठेच यश मिळविले होते. ह्युएनत्संगासारख्या परकी प्रवाशांनी तत्कालीन हिंदूच्या तनीतिमची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. तो म्हणतो, 'हे उतावळ्या व अनिश्चित स्वभावाचे असूनही नीतिदृष्ट्या शुद्ध आहेत. ते कोणाची वस्तू अन्यायाने घेत नाहीत, व न्यायाने द्यावे लागते त्याहून अधिकच देतात. पापाचे प्रायश्चित्त अन्य जन्मी भोगले पाहिजे अशी त्यांची खात्री असल्यामुळे ते पापाला भितात व या जन्मी नीतीने वागण्याचा प्रयत्न करतात.'
महाभारत, स्मृती व पुराणे यांनी हा जो बुद्धिप्रामाण्यवादी, प्रवृत्तिप्रधान, नीतिनिष्ठ दृष्टफलार्थी व समाजोत्कर्षकारक धर्म सांगितला त्यामुळे वैदिक धर्मावरील हिंदूंची निष्ठा दृढ झाली व बौद्ध व जैन या पंथांनी त्याच्यावर जे प्रखर हल्ले चढविले होते त्यापासून त्याचे रक्षण झाले. कालांतराने बौद्ध धर्म भारतात नामशेष झाला व जैन धर्माचे आक्रमक धोरण संपुष्टात आले. याच कालखंडात भारतावर यवन, शक, कुशाण, हूण यांची सतत आक्रमणे होत होती. पण वरील तेजस्वी धर्माच्या प्रभावामुळे त्या आक्रमणांचे निर्दाळण करून अंती त्या जमातींनाच आत्मसात करून टाकण्यात हिंदुसमाजाला यश आले. अशा या धर्माची परंपरा साधारणपणे दहाव्या शतकापर्यंत चालू होती. पुढे या धर्मातील महातत्त्वांचा लोप झाला. त्याला अत्यंत विकृत रूप प्राप्त झाले आणि हिंदुसमाजाचा ऱ्हास होऊन एकंदर भारताला आणि थोड्या कालावधीने महाराष्ट्राला पारतंत्र्याच्या नरकात पिचत पडावे लागले. या धर्माच्या ऱ्हासाचे स्वरूप काय ते पाहून त्याची आता मीमांसा करावयाची आहे.
कुमारिल - शब्दप्रामाण्य
वर एके ठिकाणी सांगितले आहे की इ सनाच्या आठव्या शतकाच्या अखेरीस नव्या स्मृती होण्याचे बंद झाले व तेथून पुढे निबंधकारांचे म्हणजे जुन्या ग्रंथावर टीका लिहिणाऱ्या धर्मशास्त्रज्ञांचे युग सुरू झाले. स्मृती रचनाबंद झाली याचाच अर्थ बुद्धिप्रामाण्य व देशकाल परिस्थितीनुरूप धर्मनियम सांगण्याचे धोरण नष्ट झाले असा होतो. असा धर्म नेहमीच जड, आंधळा व त्यामुळे समाजाचे धारण करण्यास असमर्थ असतो. हिंदुधर्माला आठव्या शतकानंतर असे जडमूढ रूप आले व तेथपासून समाजाच्या अपकर्षाचे विष बीज पेरले गेले. या शतकात स्मृतिरचना बंद का झाली आणि पुढील सर्व धर्मशास्त्रज्ञ शब्दप्रामाण्यवादी, परिवर्तन विरोधी आणि अदृष्टवादी का झाले हे पाहू लागताच एक फार प्रबळ असे कारण आपल्या ध्यानात येते. ते म्हणजे कुमारिलभट्टाने प्रवर्तित केलेला मीमांसापंथ व त्यातून निर्माण झालेली समन्वयपद्धती हे होय. कुमारिलभट्ट हा इ. सनाच्या आठव्या शतकात होऊन गेला. वेदप्रणीत कर्ममार्गाचे म्हणजे यज्ञयाग प्रधान धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचा फार मोठा प्रयत्न त्याने केला. पण त्याला फारसे यश आले नाही. पण त्याने पुरस्कारिलेले शब्दप्रामाण्याचे तत्त्व, त्याचा अदृष्टवाद आणि विशेषतः त्याची समन्वयपद्धती यांनी मात्र हळूहळू धर्मशास्त्रज्ञांच्या मनाची पकड घेतली. ती इतकी की ब्रिटिशांच्या काळापर्यंत ती पूर्णपणे ढिली झालीच नाही. हिंदुसमाजाच्या अपकर्षाच्या अनेक कारणांपैकी निबंधकारांनी प्रचलित केलेला विकृत धर्म हे, माझ्या मते, प्रधान कारण होय.
मीमांसा
मीमांसा दर्शनाचा मूळ कर्ता जैमिनी हा होय. इ. स. पूर्व ३०० ते इ. स. १०० असा त्याचा काळ मानला आहे. वेद अपौरुषेय असून त्यांनी सांगितलेला श्रीधर्म हाच स्वर्गप्रद होय असे जैमिनीचे मत होते. हा यज्ञयाग-प्रधान श्रीधर्म व्यवस्थित आचरता येण्यासाठी वेदांचा अर्थ निश्चित समजणे अवश्य आहे. तो अर्थ कसा योग्य तऱ्हेने लावावा हे सांगण्यासाठी प्राधान्याने मीमांसाशास्त्राचा जन्म झालेला आहे. आणि तेवढ्याच दृष्टीने पाहता त्याचे महत्त्व आजही मानले जाते. पण त्याबरोबरच वेदांचे अपौरुषेयत्व, शब्दप्रामाण्य व अदृष्टवाद ही तत्वेही मीमांसेने सांगितलेली आहेत. ती मात्र स्वीकार्य नाहीत. आणि जैमिनीच्या समकालीनांनी व पुढेही हजार वर्षांच्या काळातील स्मृतिकारांनी ती स्वीकारली नाहीतच. जैमिनीच्या सूत्रावर भाष्य लिहिणारा शबर हा इ. सनाच्या पाचव्या शतकात होऊन गेला. आणि त्यानंतर आठव्या शतकात आज रूढ झालेल्या मीमांसाशास्त्राचा प्रवर्तक कुमारिलभट्ट हा झाला. आपल्याला त्याचे शास्त्र पाहावयाचे आहे.
बुद्धिहत्या
वेद अपौरुषेय आहेत, सर्व धर्मव्यवहारात तेच प्रमाण मानले पाहिजेत. धर्मशास्त्रात पुरुषबुद्धीला अवसर नाही, हे सिद्धान्त तर त्याने सांगितलेच; पण याशिवाय सर्व स्मृतीही प्रमाण मानल्या पाहिजेत, असे मत त्याने मांडले. शबरस्वामींना हे मान्य नव्हते. काही स्मृती लोभाने, मोहाने, स्वार्थाने लिहिल्या जातात, असे त्यांनी म्हटले आहे. कुमारिल भट्टांना हे मान्य नाही. स्मृती या वेदाप्रमाणेच मानल्या पाहिजेत, कारण सर्व स्मृती वेदमूल आहेत, असा त्यांचा आग्रह आहे. या आग्रहातून दुसरा एक विचित्र आग्रह निर्माण झाला. तोच हिंदू समाजाच्या नाशाला कारण झाला आहे असे वाटते. स्मृती या भिन्न काळी झालेल्या आहेत, आणि त्यांत अत्यंत परस्पर विरोधी मते सांगितलेली आहेत. मग प्रश्न असा आला की परस्पर-विरोधी स्मृतीतून कोणती स्मृती प्रमाण मानावयाची व एक प्रमाण मानली तर दुसरीच्या प्रामाण्याचे काय करावयाचे ? यावर कुमारिल भट्टाचे उत्तर असे: सर्व स्मृती एकाच मताच्या आहेत, त्यांत परस्पर विरोधी मते नाहीतच, असे टीकाकारांनी दाखवून दिले पाहिजे. पतिनिधनानंतर स्त्रीने सती जावे, असे एक स्मृती सांगते; जाऊ नये, असे दुसरी सांगते. या दोन्ही वचनांचा एक अर्थ आहे असे निबंधकाराने दाखविले पाहिजे, म्हणजेच त्याने त्या वचनांचा समन्वय केला पाहिजे असे भट्टपाद म्हणाले आणि दुर्दैव हे की पुढील सर्व टीकाकारांनी, निबंधकारांनी, धर्मशास्त्रज्ञांनी त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानिली. शतकाशतकाच्या अंतराने झालेल्या, देशकालाप्रमाणे धर्मात परिवर्तन केले पाहिजे असा आग्रह धरणाच्या, एकमेकींच्या मतांचे खंडन करणाऱ्या अशा सर्व स्मृतींची एकवाक्यता करणे ही खरोखर मानवी बुद्धीची हत्या आहे. ती ज्या समन्वयपद्धतीने केली ती समाजाच्या घातास कारण झाली, यात नवल काय ? पतिनिधनानंतर स्त्रीने सती जावे असे एक वचन व जाऊ नये असे दुसरे. टीकाकार म्हणाले सती जाऊ नये या वचनाचा अर्थ भिन्न चितेवर जाऊ नये, असा आहे. त्याच चितेवर जाण्यास हरकत नाही ! याचे नाव समन्वय ! पती नाहीसा झाला, मृत्यू पावला, त्याने संन्यास घेतला तर स्त्रीने दुसरा पती करावा असे एक वचन आहे; स्त्रीला पुनर्विवाह वर्ज्य असे दुसरे आहे. यांतील पहिल्या वचनातील 'पती' या शब्दाचा अर्थ, मेधातिथीसारख्या काहीशा स्वतंत्रबुद्धीच्या टीकाकारानेही, 'पालक' असा करून दोन्ही वचनांची एकवाक्यता केली आहे. शब्दप्रामाण्य या थराला नेऊन, या धर्मशास्त्रज्ञांनी मानवी बुद्धीची जाणूनबुजून हत्या केली आहे.
अदृष्टवाद
मीमांसकांचा अदृष्टवाद हा असाच अनर्थाला कारण झालेला आहे. धर्माने धारण होते की नाही, समाजाची प्रगती होते की नाही, त्याचे फल मिळते की नाही हे पाहूनच धर्मनियमांचे विवेचन करावे, असे महाभारतकारांचे व स्मृतिकारांचे मत होते. धर्मामुळे अर्थकामांचा लाभ होतो म्हणून तुम्ही धर्म आचारावा, असे व्यास म्हणतात. मीमांसकांनी हे सर्व पालटून टाकले. या जगात ज्यांचे फल दिसते अशा आज्ञा धर्मात नसतातच, धर्माची फले परलोकात मिळावयाची असतात. ती अदृष्ट असतात. तेव्हा धर्मवचनांच्या यशापयशाची चिकित्सा मानवी बुद्धीला करणेच शक्य नाही असा त्यांचा सिद्धान्त आहे. तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे यांच्या मते धर्माच्या अवनतीस येथूनच प्रारंभ झाला. ते म्हणतात, 'वेदापासून चालत आलेली दृष्टार्थतेची परंपरा सोडून देऊन सर्व धर्मक्रिया जेव्हा मेल्यानंतरच मिळणाऱ्या पारलौकिक फळाकरता आणि पुरुषबुद्धीस न कळण्याजोग्या कार्यास्तव असल्याचे ठरविले जाऊ लागले तेव्हापासून धर्माच्या अवनतीस प्रारंभ झाला. ऐहिक व्यवहाराला काही निर्बंध न राहून त्यात वाटेल तसे वागावे अशी प्रवृत्ती होऊ लागली. व्यवहारात अत्यंत अनीतिमान ठरलेले लोकही केवळ अदृष्टप्रधान व्रतवैकल्ये करून धार्मिकपणाचा टेंभा मिरवू लागले. निबंधकारांनी हे दोष लक्षात घेऊन, तसेच मानवी प्रवृत्ती व प्राचीन परंपरा यांचा विचार करून स्मृतिकारांप्रमाणेच इहलोक व परलोक यांची सांगड घातली असती तर आजच्या बुद्धिप्रधान युगातही धर्म उजळ माथ्याने हिंडला असता. या सर्व गोष्टींचा नीट विचार केल्यास धर्माच्या ऱ्हासाचे खरे कारण धर्माच्या दृष्ट फलाची उपेक्षा हेच होय हे पूर्णपणे लक्षात येईल.' ( धर्मस्वरूप निर्णय, पृ. २३२ )
मीमांसकांची समन्वयपद्धती, त्यांचा अदृष्टवाद आणि त्यातून निर्माण झालेले नीतिहीन कर्मकांड यांमुळे धर्माला किती विकृत रूप आले असेल व त्यामुळे समाजाचा कसा अधःपात झाला असेल याची वरील विवेचनावरून सहज कल्पना येईल. सातवाहन, यादव कालखंडाच्या अखेरीस हिंदुसमाजाच्या सामर्थ्याचा वैभवाचा, व त्याच्या स्वातंत्र्याचा नाश झाला त्याचे हे प्रधान कारण आहे.
संन्यासवाद
हिंदुसमाजाच्या ऱ्हासाचे मीमांसापद्धतीइतकेच दुसरे महत्वाचे कारण म्हणजे याच मुमारास निवृत्तिवादी, संन्यासवादी, आचार्यांची निर्माण झालेली परंपरा हे होय. वेदकाळी आर्य लोक, प्रवृत्तिवादी, विजिगीषू, धनवैभवस्वराज्यसाम्राज्याची आकांक्षा धरणारे असे होते. संसार मायामय असून मनुष्याने ज्या क्षणाला वैराग्य येईल त्या क्षणाला संन्यास घ्यावा, संसारत्यागावाचून मोक्ष नाही, ही विचारसरणी प्रथम उपनिषदांनी रूढ केली. त्यातही कठ, ईशावास्य इ. उपनिषदे प्रवृत्तीचे व कर्मयोगाचे प्रतिपादन करतातच. पण एकंदर उपनिषदांचा कल निवृत्तीकडे आहे असे दिसते. त्यानंतरच्या काळात या उपनिषदांचे दोहन करणाऱ्या गीतने कर्मयोगाचा निःसंदिग्ध पणे पुरस्कार केला. आणि भगवान श्रीकृष्णांचा अधिकार फार मोठा असल्यामुळे या कर्मयोगाच्या तत्त्वाचा प्रभाव पुढे अनेक शतके टिकून राहिला. सूत्रवाङ्मय व त्यानंतरचे स्मृतिवाङ्मय व महाभारत, त्याचप्रमाणे चाणक्यासारखे राजनीतिशास्त्रज्ञ यांनी सर्वांनी प्रवृत्तिवादाचाच परिपोष केला आहे. त्यामुळेच भरतखंडात इ. सनाच्या दहाव्या बाराव्या शतकापर्यंत पराक्रमाची, साम्राज्याची, विश्वविजयाची परंपरा टिकून राहिली. बौद्ध व जैन या पंथांनी आत्यंतिक निवृत्तिवादाचा उपदेश केला आहे हे खरे. त्याचा अशोकाने अत्यंत हिरीरीने पुरस्कार केला आणि त्यामुळे शकयवनाच्या आक्रमणाला हा देश काही काळ बळीही पडला. पण त्याच सुमारास महाभारताची रचना होऊन प्रवृत्तीचा जोर पुन्हा वाढला व उत्तरेत शुंग व दक्षिणेत सातवाहन यांनी भारताला त्या महान आपत्तीतून वाचविले. हीच परंपरा उत्तरेत दहाव्या व दक्षिणत तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंत चालू होती. त्यानंतर रजपूत, विजयनगर, मराठे यांनी हिंदूंचे उत्थापन करून मधून मधून या देशाचे रक्षण केले हे खरे. पण एकंदर हिंदुसमाजाची जीवनशक्ती अकराव्या शतकापासून क्षीण होत गेली हे खरे आहे. ती का क्षीण झाली याचीच कारणे आपण शोधीत आहोत, त्यांतील पहिले कारण कुमारिल भट्टाची मीमांसापद्धती हे असून दुसरे म्हणजे निवृत्तिवादी आचार्य परंपरा हे होय, असे वर म्हटले आहे.
या आचार्यपरंपरेला श्रीमत् आद्य शंकराचार्यांपासून प्रारंभ झाला. महाभारत व स्मृती यांची परंपरा प्रवृत्तीची, कर्मयोगाची व ऐश्वर्योपासनेची होती. श्री शंकराचार्यांच्या आधी गीतेवर जी भाष्ये झाली तीही कर्मयोगपरच होती असे लो. टिळकांनी गीतारहस्याच्या पहिल्या प्रकरणात दाखवून दिले आहे. पण वैदिक कर्मयोगाचा हा सिद्धान्त श्री शंकराचार्यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी गीतेवर भाष्य लिहून तिचा निवृत्तिपर अर्थ लावला. त्या काळी उपनिषदे, ब्रहासूत्रे व गीता हे ग्रंथ अत्यंत पूज्य मानले जात असत. ज्याला आपले काही मत समाजात मांडावयाचे असेल त्याला या तीन ग्रंथांवर (त्यांना प्रस्थानत्रयी असे म्हणत ) भाष्य लिहून, त्यां सर्वांचा तात्पर्यार्थ एकच असून त्यांनी आपल्याच मताचा पुरस्कार केला आहे, असे सिद्ध करावे लागत असे. श्री शंकराचार्यांनी हाही उद्योग करून, प्रस्थानत्रयीवर निवृत्तिपर भाष्ये लिहून, सर्व भारतभर संन्यासवादाचे तत्त्वज्ञान दृढमूल करून टाकण्याचा फार मोठा प्रयत्न केला श्री शंकराचार्य आठव्या शतकात होऊन गेले. त्यानंतर श्री रामानुज ( इ. स. १०१६ ), निंबार्क ( इ. स. १९६२), श्री मध्वाचार्य ( इ. स. ११९७ ), आणि श्री वल्लभाचार्य (इ. स. १४७९ ) हे जे भिन्न भिन्न पंथांचे आचार्य होऊन गेले त्यांनी सर्वांनी संन्यासवादाचा नसला तरी निवृत्तिवादाचाच पुरस्कार केला. ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याविषयी या आचार्याची भिन्न भिन्न मते होती. पण संसार असार असून त्याचा त्याग केल्यावाचून मोक्षलाभ शक्य नाही याविषयी सर्वांचे एकमत होते. यांपैकी कोणी ज्ञानमार्गी होते, कोणी भक्तिमार्गी होते. पण संसार - निवृत्ति- विषयी मतभेद कोणाचाच नव्हता. ज्ञानोत्तर ज्ञानी, मुक्त माणसाने लोकसंग्रहासाठी आमरण कर्म केली पाहिजेत, असा आग्रह यांपैकी कोणीच धरलेला नाही. त्यावरून हे सर्व आचार्य मोक्षैकनिष्ठच होते असे दिसून येते. धर्मवेत्ते मोक्षैकनिष्ठ झाले म्हणजे समाजही हळूहळू तसाच होतो व मग धर्माला व्यक्तिनिष्ठ रूप येऊन समष्टिधर्माचा लोप होतो. आणि मग समाजाचे विघटन सुरू होऊन अंती तो दुर्बल होऊन नाश पावतो. आठव्या शतकापासून उदय पावलेल्या आचार्य परंपरेने उपदेशिलेल्या निवृत्तिवादाचा हाच परिणाम झाला. त्यानंतर अखिल भारतात आणि महाराष्ट्रात संतपरंपरा निर्माण झाली. तिचे तत्वज्ञान निवृत्तिवादाचेच होते. त्यामुळे भारतातील लोकांची विजिगीषा, पराक्रम, साम्राज्याकांक्षा, वनवैभवाची स्पृहा समूळ नष्ट झाली. पण संत वाङ्मयाचे विवेचन पुढे बहामनी कालखंडात यावयाचे असल्यामुळे येथे त्याचा विस्तार करीत नाही. दहाव्या अकराव्या शतकात हिंदू समाजाचा जो ऱ्हासकाळ सुरू झाला त्याची कारणमीमांसा आपण करीत आहो, मीमांसापद्धती- इतकेच आचार्यांचा निवृत्तिवाद हे महत्वाचे कारण आहे, हे येथे सांगावयाचे आहे.
समन्वयपद्धती
आचार्य परंपरेने प्रस्थानत्रयीवर जी भाष्ये लिहिली त्यांतून दुसरेही एक अनिष्ट निर्माण झाले. सर्व स्मृतींची एकवाक्यता करण्याची निबंधकारांची जी समन्वय- पद्धती तिचा त्यांच्या इतक्याच निष्ठेने आचार्यांनीही अवलंब केला. दहा उपनिषदे ही निरनिराळ्या काळी रचली होती. त्यानंतर बऱ्याच काळाने गीता जन्मास आली. आणि त्यानंतर ब्रह्मसूत्रे लिहिली गेली. म्हणजे हजार एक वर्षांच्या कालखंडातील कमीत कमी बारा पुरुषांचे तरी हे ग्रंथ असले पाहिजेत. त्या सर्व ग्रंथांतील प्रत्येक वाक्यात ब्रह्म, आत्मा, माया, संसार, मोक्ष, मोक्षमार्ग या प्रत्येक विषयासंबंधी तंतोतंत एकमत आहे असे दाखविण्याचा अट्टाहास करणे हे स्मृतिवचनांची एक- वाक्यता करण्याइतकेच मानवी बुद्धीला, प्रज्ञेला, तर्कशक्तीला घातक आहे, अवमान- कारक आहे. तिच्याप्रमाणेच हीही बुद्धिहत्या आहे. शब्दप्रामाण्याचा हा अगदी कळस होय. हे आत्यंतिक प्रामाण्य मानवाच्या स्वतंत्र प्रज्ञेची वाढ कुंठित करते आणि अंती तिच्या नाशास कारण होते. आचार्य परंपरेच्या समन्वयपद्धतीमुळे भारतात हेच घडले. भारताची जनता, येथील धर्मधुरीण व येथील राज्यकर्ते प्रज्ञाहत होऊन येथल्या विद्या, येथल्या कला, येथली राजनीती येथला पराक्रम या सर्वांचाच लोप झाला. आणि दीर्घकालीन पारतंत्र्य या भूमीच्या नशिबी आले.
पुराण - विकृती
मीमांसापद्धती आणि निवृत्तिपरंपरा यांचा येथवर विचार झाला. आता पुराणांनी पुढच्या काळात धर्माला कसे विकृतरूप दिले त्याचा विचार करून हे विवेचन संपवू. वर एके ठिकाणी सांगितलेच आहे की कोणत्याच पुराणाचा काळ निश्चित सांगता येत नाही. आणि पुराणांत लोक सारखी भर घालीत राहिल्यामुळे कोणती विचारसरणी, कोणते तत्त्व, कोणी कोणत्या काळात सांगितले, याचाही पत्ता लावता येत नाही. पुराणांत भिन्न विचारप्रवाह आलेले आहेत. त्यांतील काही अनिष्ट विचारप्रवाहांचा जोर उत्तर काळात झाला एवढेच म्हणता येईल. अर्वाचीन भारतात लोकहितवादी, रानडे यांच्या काळापासून राष्ट्रनिष्ठेची शिकवण दिली जात होती. तिचा प्रभाव वाढत जाऊन अखिल भारतभर सर्वांच्या चित्तांत ती प्रबळ झाली तेव्हा स्वातंत्र्यलढा यशस्वी झाला. पण स्वातंत्र्यानंतरच्या तीस वर्षात तिचा आता संपूर्ण लोप झाल्यासारखे दिसत आहे. तेव्हा एखाद्या तत्त्वाचे, निष्ठेचे, विचाराचे प्रतिपादन केव्हा झाले याला महत्व नसून समाजात ते प्रभावी केव्हा झाले याला महत्त्व आहे. जर्मनीत सोळाव्या शतकापासून एकराष्ट्रीयत्वाचे प्रयत्न होत होते. पण सर्व ख्रिस्ती जग एक असे मानणाऱ्या होली रोमन एंपायरच्या कल्पनेचा तेव्हा जोर होता. त्याचप्रमाणे पंडितांच्या मनात विश्वराष्ट्राच्या कल्पनांची मोहिनी होती. नेपोलियनने १८०६ साली जर्मनीचा पराभव केला, तेव्हा सर्व जर्मनांचे डोळे उघडले व राष्ट्रनिष्ठेच्या तत्त्वाचा त्या देशात अत्यंत वेगाने प्रसार झाला. मीमांसा, निवृत्ती, पुराणधर्म यांच्या लोकांवरील परिणामांचा अभ्यास करताना, याच पद्धतीने विचार करावा, असे वाटते.
भक्ती - कर्मकांड
पुराणांनी प्रामुख्याने भक्तिमार्गाचा पुरस्कार केला होता. शिव, विष्णू, देवी, गणेश इ. अनेक देवतांचे माहात्म्य गाऊन, त्यांची उपासना केल्याने मोक्ष मिळेल, असे पुराणे सांगत. या भक्तिमार्गाला पुढच्या काळात जड कर्मकांडाचे रूप आले. वेदांतील यज्ञधर्माला पुढे जसे अत्यंत जटिल व जड रूप प्राप्त झाले त्याचप्रमाणे पुराणातील भक्तिमार्गाचे होऊन त्यातील चैतन्य नष्ट झाले. अमूर्त परमेश्वराचे ध्यान करता येत नाही, म्हणून सगुण मूर्तीचा आश्रय करावा, असे धर्मवेत्यांनी सांगितले. पण पुढे मूर्तिपूजा ही यज्ञप्रक्रियेप्रमाणेच जटिल होऊन तिचे अवडंबर माजले. प्रत्येक देवतेच्या आवडीनिवडी ठरल्या. फुले, नैवेद्य, अभिषेक, प्रदक्षिणा निश्चित झाल्या. त्यावर ग्रंथ झाले आणि या पूजाविधीत व प्रसादभक्षणात जरा कोठे प्रमाद झाला तर देव कोपून शाप देऊ लागले, त्याचप्रमाणे देवांचे रागलोभही ठरून जाऊन त्यांचे भोगविलास मानवांपेक्षाही जास्त काममोहमय होऊ लागले. यामुळे देवस्थाने ही पुजारी लोकांची मिरासदारी होऊन सामान्य जनतेला देव अंतरला. साधा भक्तिभाव हे मूर्तिपूजेचे रूप जाऊन तिचे जड कर्मकांड झाले.
व्रते वैकल्ये
व्रते वैकल्ये, उद्यापने, प्रायश्चित्ते, उपासतापास यांनाही असेच जडरूप प्राप्त झाले. यांचे माहात्म्य गाणारांनी अगदीच ताळतंत्र सोडले. वेदशास्त्राचे अध्ययन केले तरी, वैशाखस्नान केले नाही तर त्या अध्ययनाचा काही उपयोग नाही, असे पुराणे सांगू लागली. एकादशी व्रत मोठे सोज्ज्वळ हे खरे. पण त्याचे वर्णन करताना लोक मद्यप्यासारखे बोलू लागले तर परिणाम काय होईल ? एक वेळ मातृगमन केलेले चालेल, गोमांसभक्षणही विहित ठरेल, पण एकादशीला भोजन करणे मात्र महापाप होय (कालतरंगिणी ). असे कोणत्याही धार्मिक आचाराचे महत्व सांगताना उपदेशकांनी नीतितत्त्वांची, चारित्र्याची अवहेलना केली, मनोनिग्रह, सात्त्विक बुद्धी यांना हेटाळले, तर समाजाचा ऱ्हास झाल्याखेरीज राहाणार नाही. व्रतांचे माहात्म्य सांगणाऱ्या ग्रंथांत पुढे ही प्रवृत्ती दिसू लागली. ब्राह्मणांचा महिमा पुराणांना सांगावयाचा होता. चारित्र्यसंपन्न तपोनिष्ठ ब्राह्मणांचा त्यांनी महिमा गायिला असता तर ते श्लाध्यच होते. पण व्रतांच्या उद्यापनाला बोलविताना ब्राह्मणांच्या गुणावगुणांची चिकित्सा करू नये असे पुराणे सांगू लागली ! अधःपात याहून काही निराळा नसतो.
असहिष्णुता
पण पुराणांचे सर्वांत मोठे अपकार्य म्हणजे त्यांनी शैव, वैष्णव, शाक्त असे परस्पर- वैर करणारे पंथ स्थापून जातिभेद, धर्मपंथभेद यांनी विघटित होत चाललेल्या हिंदु- समाजाचे विघटन पुरे करून टाकले. हिंदुधर्म हा सहिष्णू आहे अशी त्याची कीर्ती आहे. सातवाहनादी सर्व राजघराण्यांनी स्वतः वैदिक धर्माची ती अभिमानी असूनही जैन, बौद्ध या पंथांना अत्यंत सहिष्णुतेने, आदराने वागविले. वेद, गीता यांचे हे संग्राहक धोरण प्रसिद्धच आहे. पण पुराणकारांची धर्मबुद्धी पुढे फिरली. किंवा बुद्धी फिरलेल्या कोणी पंडितांनी पुराणात आपल्याला हवी ती भर घातली असे पाहिजे तर म्हणू. पण त्यांनी एकाच वैदिक पंथातील दोन देवतांच्या भक्तांत परस्पराविपयी अत्यंत असहिष्णू वृत्ती निर्माण केली.
वराह, मत्स्य, वायू, भागवत, पद्म या पुराणांत शैव सिद्धान्तांची निरर्गल निंदा केली आहे. लोकांनी विष्णूखेरीज अन्य देवतांची उपासना करू नये, वैष्णवेतर लोकांना नमस्कारही करू नये, पशुपतीच्या स्मरणानेसुद्धा मनुष्य पतित होतो, असे काही पुराणे सांगू लागली. रामानुज हे वैष्णव होते ( इ. स. १०१६ ). एका चोळ राजाने त्यांचा अनन्वित छळ केला, कारण तो शैव होता. कुलत्तोग चोळ राजाने (इ. स. ११३०-५० ) शैवमताभिमानामुळे गोविंदाची मृत समुद्रात फेकून दिली होती. पूर्वीचा चोळराजा राजराज (इ. स. ९८५ - १०१५ ) याने शिव, विष्णू, जिन यांची मंदिरे स्वतः बांधली होती. पण ती सहिष्णुवृत्ती आता नष्ट झाली. आणि समाजाचा अधःपात झाला. (दि चोळाज्, प्रा. नीलकंठ शास्त्री, खंड २रा, भाग १ला, पृ. ४८८-९० ). कुलगुरू, चिंतामणराव वैद्य यांनी असेच मत दिले आहे. ते म्हणतात, 'या काळ- विभागात (इ. स. १००० - १२०० ) हिंदु धर्मात परस्परद्वेष करणारी भिन्न भिन्न मते प्रबळ झाली आणि मजबूत राष्ट्राचे जे एक मुख्य लक्षण धर्मैक्य ते नाश पावून हिंदुस्थान दुर्बळ झाले.' ( मध्ययुगीन भारत, भार ३ रा, पृ. ५८५ - ६२२ ).
कुमारिलभट्टाची निबंधकारांनी स्वीकारलेली मीमांसापद्धती, आचार्यप्रणीत निवृत्तिवाद आणि पुराणांचा कर्मकांडात्मक विकृत धर्म यांनी दहाव्या अकराव्या शतकात हिंदुसमाजाच्या कर्तृत्वाचा ऱ्हास कसा झाला हे येथवर पाहिले. आता त्याच सुमारास निर्माण झालेले व हिंदुसमाजास अत्यंत घातक झालेले जे कलिवर्ज्य प्रकरण त्याचा विचार करून या प्रकरणाचा समारोप करू.
कलिवर्ज्य
कलिवर्ज्य ही स्मृती नाही. तो एक निबंध आहे. अनेक श्रुतिस्मृतिपुराणवचने एकत्र करून रचलेले ते धर्मशास्त्र आहे. इ. स. १००० ते इ. स. १२०० या काळात त्याची रचना झाली असे विद्वद्-रत्न दप्तरी यांनी दाखवून दिले आहे. 'कलीच्या प्रारंभीच धर्मवेत्यांनी लोकरक्षणार्थ काही कृत्ये वर्ज्य ठरविली आहेत, आणि या साधु- सज्जनांनी निश्चित केलेल्या धर्माज्ञा असल्यामुळे त्या वेदाप्रमाणेच प्रमाण आहेत ' असे कलिवर्ज्यकार म्हणतो. या वाक्यावरून ही मोठी हितावह रूढी आहे, दर युगात धर्मवेत्यांनी परिस्थितीचा विचार करून लोकरक्षणासाठी धर्मनियम ठरवावे, हे मत या निबंधकाराला मान्य होते असे वाटेल. आणि तत्त्वतः तसा अर्थ आहेही. पण प्रत्यक्ष व्यवहारात या कलिवर्ज्य प्रकरणामुळे कोणते अनर्थ झाले ते पाहिले म्हणजे या भ्रमाचा निरास होईल.
कलियुगकल्पना
कलियुग ही कल्पनाच समाजाला अत्यंत घातक आहे. मनुष्य हा कालबद्ध आहे, परतंत्र आहे, त्याने कितीही पराक्रम केला, प्रयत्न केला तरी कलियुग हा काळच अधोगामी असल्यामुळे त्याला कदापि यश यावयाचे नाही, असा याचा अर्थ होतो. हीच कल्पना गेली हजार वर्षे हिंदुसमाजाच्या मानगुटीस बसलेली आहे व त्याच्या दौर्बल्यास कारण झालेली आहे. इतिहास पहाता इ. स. १००० च्या पूर्वी भारतात कोणत्याही धर्मशास्त्रज्ञाने ती मानलेली आहे असे दिसत नाही. सत्य, त्रेता, द्वापर व कली ही युगनामे पूर्वीच्या ग्रंथांत येतात. पण ही युगे राजाच्या कर्तबगारीवर अवलंबून आहेत, त्याने उत्तम दण्डनीतीचा अवलंब केला तर तो कृतयुग निर्माण करील, नाहीतर मात्र कलियुग येईल, असेच महाभारत, मनुस्मृती इ. प्राचीन ग्रंथ सांगतात. मेधातिथी हा नवव्या शतकातील मनूचा टीकाकार, त्यानेही युगकल्पना राजाने मानू नये, कारण युगे राजाच्या वर्तनावर अवलंबून असतात, असे म्हटले आहे. विज्ञानेश्वर हा अकराव्या शतकातला याज्ञवल्क्याचा टीकाकार, त्यानेही कलियुगाचा सध्याचा रूढ अर्थ कोठेही मान्य केलेला नाही. तेव्हा कालप्रवाहानेच अधःपाताला नेणारे युग म्हणजे कलियुग असा अर्थ पूर्वसूरींना मान्य नव्हता हे स्पष्ट आहे.
दुसरे असे की आजच्या युगकालगणनेचा विचार केला तर भारती युद्धानंतर लगेच कलियुगाला प्रारंभ झाला आहे असे दिसेल. म्हणजे महाभारत, स्मृती, पुराणे हे सर्व ग्रंथ कलियुगातच झालेले आहेत. तरी कलियुगाची ४२०० वर्षे उलटून जाईपर्यंत म्हणजे कलिवर्ज्य प्रकरण जन्माला येईपर्यंत एकाही ग्रंथकाराला त्याची कल्पना नव्हती असे दिसते. आणि कलिवर्ज्यकार या ग्रंथकारांनी कलियुगात रचलेल्या ग्रंथातल्याच कित्येक आज्ञा कलियुगात मानू नयेत असे सांगत आहे. तेव्हा कलीच्या आरंभकाळी धर्मवेत्त्यांनी हे नियम रचले हे त्याचे म्हणणे खोटे आहे हे उघड आहे. पराशरस्मृतीत तर मी हे धर्मनियम कलियुगासाठीच सांगतो असे स्मृतिकाराने म्हटले आहे. तरी, शूद्राचे अन्न खाण्यास हरकत नाही, काही प्रसंगी विधवेला पुनर्विवाह विहित आहे, हे त्याचे धर्मनियम कलिवर्ज्यकाराने कलियुगात मानू नयेत असे सांगितलेले आहे.
करंटेपणा
यावरून कलिवर्ज्य प्रकरणाला प्रामाण्य कसलेच नाही, हे उघड आहे. पुढील काळच्या काही निबंधकारांनीसुद्धा त्याच्या प्रामाण्यावर आक्षेप घेतलेले आहेत. तरी दुर्दैव असे की आधीच्या शास्त्रकारांनी समाजाला अत्यंत पोषक असे जे धर्मसिद्धान्त सांगितले होते ते कलिवर्ज्यकारांनी कलिवर्ज्य ठरविले आणि हिंदुसमाजाने त्या प्राचीन शास्त्रज्ञांना अप्रमाण मानून या करंट्या निबंधकाराला प्रमाण मानले. समुद्रगमन पूर्वी भारतात रूढ होते. साम्राज्यासाठी, धर्मप्रसारासाठी व व्यापारासाठी हिंदू लोक इ. सनाच्या दहाव्या अकराव्या शतकापर्यंत जगभर संचार करीत होते. धर्मशास्त्रालाही ते मान्य होते. हा विश्वसंचार कलियुगातच होत होता, तरी कलिवर्ज्यकाराने तो कलीत निषिद्ध ठरविला आणि हिंदुसमाजाने तो निषेध मानून प्रत्यक्षात नसलेले कलियुग निर्माण करून ठेविले. पतितपरावर्तनाच्या बाबतीत हेच घडले. परधर्मात गेलेल्यांना, पतितांना, हिंदुसमाज पूर्वी थोड्या प्रायश्चित्ताने परत स्वधर्मात घेत असे. बलात्काराने झालेले धर्मांतर हे धर्मांतरच नव्हे, असे मनूने म्हटले आहे. सिंधमध्ये महंमद कासीमने सक्तीने बाटविलेल्या हजारो हिंदूंना, देवल ऋषींनी नवी स्मृती रचून शुद्ध करून घेतले. असे असून कलिवर्ज्य प्रकरणाने पतितपरावर्तन निषिद्ध ठरविले. हिंदुसमाजाने ती आज्ञा वंद्य मानली व एकदा बाटलेले हिंदू कायम मुस्लिम किंवा ख्रिस्ती राहण्याची सोय करून ठेवली आणि या समाजाच्या विनाशाची योजना आखून टाकली.
धर्मविकृती - नाश
सातवहान ते यादव या दीड हजार वर्षांच्या कालखंडात आरंभीची हजार बाराशे वर्षे अत्यंत पराक्रमी व वैभवशाली असलेला महाराष्ट्र त्या काळाच्या अखेरीस परकी आक्रमणास दीर्घ काल बळी पडण्याइतका दीनदुबळा, नालायक व कर्तृत्वहीन कशामुळे झाला याची चिकित्सा आपण करीत आहो. त्या चिकित्सेत, या विनाशाची बीजे त्या काळी हिंदुधर्माच्या विकृतीत आहेत, असे आपल्या ध्यानात आले. प्रारंभीच्या अनेक शतकांत येथला धर्म प्रवृत्तिवादी, उत्साहदायक, बुद्धिप्रामाण्यवादी, दृष्टफलनिष्ठ, देशकाल पाहाणारा, परिवर्तनशील, मानवी कर्तृत्वावर श्रद्धा ठेवणारा, नीतिनिष्ठ व समाजधारणाची चिंता वहाणारा असा होता. आठव्या शतकात कुमारिलभट्टाने प्रवर्तित केलेल्या मीमांसापद्धतीने या धर्माचे स्वरूप हळूहळू पालटले. शब्दप्रामाण्य, अपरिवर्तनीयता, दृष्टफलद्वेष हे महादोष त्यात शिरले. आचार्यपरंपरेने या धर्माला निवृत्तिवादी बनविले. पुराणांनी त्याला जड कर्मकांडाचे निंद्य रूप दिले. आणि कलिवर्ज्य प्रकरणाने कलियुगाची आत्मविश्वास नष्ट करणारी, प्रयत्नवादाची हानी करणारी कल्पना रूढ करून, पतितपरावर्तन, समुद्रगमन, सहभोजन, यासारख्या पोषक धर्माचारांचा निषेध करून, हिंदुधर्माला अत्यंत अधोगामी असे रूप दिले. या विकृत धर्माची तत्वे जसजशी हिंदुसमाजाने स्वीकारली तसतसा त्याचा अधःपात होऊ लागला. घातक तत्त्वे किंवा विचारपद्धती जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा लगेच त्या स्वीकारल्या जातात असे नाही. बुद्धानंतर तीनशे वर्षांनी त्याचा अहिंसावादी धर्म भारतभर अशोकाने प्रसृत केला. ख्रिस्ती धर्माचा प्रसार ख्रिस्तानंतर तीनशे वर्षांनी कान्स्टंटाईन राजाने केला. आणि तोही पूर्व युरोपात. पश्चिम युरोपात त्याचा प्रसार होण्यास आणखी दोन तीन शतके लागली. भारतात इतिहासाची पूर्वकाळी आस्था नव्हती, तेव्हा नेमके काही सांगता येत नाही. तरी आज उपलब्ध झालेल्या साधनांच्या आधारे, या विकृत धर्माचा प्रभाव इ. सनाच्या अकराव्या बाराव्या शतकात पडू लागला व तेव्हा पासूनच हिंदुसमाजाचा ऱ्हास होऊ लागला, असे बऱ्याच निश्चयाने म्हणता येते. या ऱ्हासासंबंधी आमच्या थोर पंडितांची मते देऊन हे प्रकरण आता संपवितो.
डॉ. काणे
म. म. काणे यांनी आपल्या धर्मशास्त्राच्या ५ व्या खंडात हिंदूंच्या अधःपाताची मीमांसा केली आहे. प्रथम त्यांनी अत्यंत भेदक असे तीन प्रश्न विचारले आहेत. ते म्हणतात (१) ग्रीक, शक, कुशाण, टर्क, इंग्लिश यांनी हिंदूंवर आक्रमणे केली त्या वेळी प्रत्येक खेपेस आपण हीनबल का ठरलो ? (२) अखिल भारताचे एक राष्ट्र करून येथे दीर्घ काल आपल्याला एक शासन का स्थापिता आले नाही ? आणि (३) येथल्या नैसर्गिक संपत्तीचा शोध करून, तिचा उपयोग करून, आपण व्यापार व कारखानदारी यांत अग्रेसर का झालो नाही ? या प्रश्नांचा आपण अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. नुसती पूर्वीच्या वैभवाची गाणी गाऊन भागणार नाही. असे सांगून कारण- मीमांसा करताना ते म्हणतात, 'भारताचे एक राष्ट्र झाले नाही याचे एक कारण असे की आपल्या बहुतेक आचार्यांनी व संतांनी परलोक व वेदांत यावर अतिरेकी भर दिला, त्या मानाने व्यक्तीची स्वतःविषयीची, कुटुंबासंबंधीची व समाजाविषयीची कर्तव्ये यांवर दिला नाही किंवा यांचे महत्त्व यांनी मानलेच नाही. त्यामुळे जो उठतो तो परमार्थी होतो व ऐहिक उत्कर्षाची निष्ठेने चिंता करीत नाही अशी स्थिती झाली.' (पृ. १६२० - २२) याचा अर्थ असा नव्हे की आपण खरे परमार्थी झालो. आपल्या तत्त्वज्ञानात व आपल्या आचारात जमीनअस्मानाचा फरक असतो. प्रत्येक अणु- रेणूत परब्रह्म आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असे आपले तत्त्व आणि आचरणात मात्र पराकाष्ठेची विषमता, हीन जातीयाविषयी तुच्छता ! आपल्या समाजाच्या विघटनेचे व विनाशाचे, हे काणे यांच्या मते, एक मोठे कारण आहे.
डॉ. मुनशी
डॉ. कन्हय्यालाल मुनशी यांनी, 'हिस्टरी अँड कल्चर ऑफ दि हिंदू पीपल या ग्रंथाच्या ४ थ्या व ५ व्या खंडाच्या प्रस्तावनेत या काळात भारतात धर्माचा ऱ्हास कसा होत गेला याचे मोठे मौलिक विवेचन केले आहे. सारार्थाने ते पुढे देतो. ते म्हणतात, 'इ. स. १००० च्या सुमारास प्राचीन भारताचा अंत झाला. गझनीच्या महंमदाच्या स्वाऱ्यांमुळे हिंदुसंस्कृती हादरून गेली. यावेळी धर्मशास्त्राचा एक निष्प्राण सांगाडा झाला होता. मेधातिथी या मनूच्या प्रसिद्ध टीकाकाराने त्यात चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला होता. राजसत्ता ही ईश्वरदत्त नसून लोकदत्त असते, राजनीतिशास्त्र हे अनुभवाधारे रचावे, शूद्रालाही राजा होण्याचा अधिकार आहे, धर्मशास्त्रातही शब्द प्रामान्य नसावे, अशी फार हितकर वचने त्यांनी समाजाला ऐकविली (इ. स. ८२० ते ९००). पण हा दृष्टिकोण पुढे नष्ट झाला. आणि भारताच्या शास्त्रांची स्थिती साचलेल्या पाण्यासारखी झाली. येथील विद्या ही गत वैभवावर अवलंबून राहू लागली. वाङ्मय हे बाह्यनिष्ठ झाले. त्यातील चैतन्य गेले. प्रतिभेऐवजी त्यात पांडित्य दिसू लागले व ते जीवहीन झाले. सर्व क्षेत्रांतच भारतीयांची अशी स्थिती झाली. त्यामुळे आपल्यावर कोणती अनर्थपरंपरा कोसळत आहे, कोसळणार आहे याचे आकलन करण्याची शक्तीच त्यांना राहिली नाही.'
सातवाहन ते यादव या कालखंडातील धार्मिक जीवनात कसकशी स्थित्यंतरे होत गेली व धर्माला विकृत रूप आल्यामुळे शेवटी भारताचा व महाराष्ट्राचा अधःपात कसा झाला ते येथवर केलेल्या विवेचनावरून कळून येईल.
■