९.
समाजरचना
 


अवयव अवयवी
 राजकारणाचा व धर्माचा विचार झाल्यावर आता महाराष्ट्राच्या समाजकारणाचा विचार करावयाचा आहे. राजकारणात प्रामुख्याने शास्ते व शासित यांच्या संबंधांचा विचार होतो तर समाजकारणात एकाच समाजाच्या भिन्न घटकांचे परस्पर-संबंध पाहावयाचे असतात. समाज अनेक घटक मिळून झालेला असतो. शरिरात ज्याप्रमाणे प्रथम पेशी, मग त्यांचे बनलेले स्नायू, अस्थी, मज्जा, त्वचा इ. घटक असतात आणि शरिराचे जीवन या घटकांच्या परस्पर संबंधांवर अवलंबून असते त्याचप्रमाणे समाजाचे आहे. प्रथम त्यात व्यक्ती असतात, त्यांचे कुटुंब बनलेले असते. अनेक कुटुंबे मिळून जाती होतात, अनेक जाती मिळून वर्ण किंवा त्यासारखे इतर संघ होतात आणि या सर्व घटकांचा मिळून समाज होतो. समाजाचे हे जे अनेक घटक त्यांचे परस्पर संबंध काय आहेत, त्यांच्यांतील भेद कोणत्या तत्त्वावर झालेले आहेत, ती तत्त्वे ग्राह्य आहेत की त्याज्य आहेत, त्याज्य असतील तर नवी कोणती तत्त्वे स्वीकारली पाहिजेत, ती का स्वीकारली पाहिजेत, याचे जे विवेचन ते समाजकारण होय. थोडक्यात म्हणजे अवयवी जो समाज व त्याचे अवयव जे वरील घटक त्यांच्या परस्परसंबंधांचे जे शास्त्र ते समाजरचनाशास्त्र किंवा समाजकारण होय.

विषयाचा व्याप
 व्यक्ती, कुटुंब, जाती आणि वर्ण हे आपल्या समाजाचे आज हजारो वर्षे घटक आहेत. त्यांच्या परस्पर संबंधांचा विचार करताना आणखीही बऱ्याच तपशिलात आपणास शिरावे लागेल. व्यक्तीपेक्षा कुटुंब मोठे व कुटुंबापेक्षा जाती व्यापक असे जरी असले तरी व्यक्तीचा स्वतंत्रपणे संबंध यांतील प्रत्येक वरच्या घटकाशी असतो. म्हणून व्यक्तीचा कुटुंबाशी, जातीशी, वर्णाशी, आणि शेवटी समाजाशी संबंध काय आहे याचाही विचार करणे अवश्य होते. व्यक्ती व समाज यांचे संबंध हा तर समाजकारणाचा फार महत्त्वाचा भाग आहे. त्याचप्रमाणे स्त्री-पुरुष संबंध हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. स्त्री व पुरुष या स्वतंत्रपणे दोन व्यक्तीच असल्या तरी ते अत्यंत भिन्न घटक असल्यामुळे त्यांचा स्वतंत्रपणे विचार झाला पाहिजे. या एकंदर दृष्टीने व्यक्तिस्वातंत्र्य (व्यक्ती व समाज यांने संबंध), विवाहसंस्था (स्त्री-पुरुष संबंध), जातिसंस्था, वर्णसंस्था, स्पृश्यास्पृश्यता यांचा विचार हा समाजकारणाचा विषय आहे. समाजाची संस्कृती व त्याचा उत्कर्ष या भिन्न घटकांचे परस्पर- संबंध त्यांवर फार अवलंबून असतात. हे सर्व ध्यानी ठेवून इ. स. पूर्व २५० ते इ.स. १३०० या कालखंडातील महाराष्ट्राच्या समाजरचनेचा आता आपल्याला अभ्यास करावयाचा आहे.

महाराष्ट्र समाज
 भारतातील कोणत्याही प्रदेशाच्या समाजरचनेचा विचार करावयाचा म्हणजे प्रथम चातुर्वर्ण्याचा विचार करावा लागतो. हिंदुसमाज म्हणजे चातुर्वर्ण्य आणि चातुर्वर्ण्य म्हणजे हिंदुसमाज अशी अभिन्नता आज हजारो वर्षे आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. उत्तर भारतातील आर्यांनीच इ. पू. सातव्या सहाव्या शतकात येथे येऊन वसाहती केल्या, हे मागे पहिल्या प्रकरणात सांगितलेच आहे. त्यांनी येताना आपल्या बरोबर आपल्या सर्व जीवनाचे तत्त्वज्ञान आणलेच होते. आणि चातुर्वण्यांकित समाज- रचना हे त्यातले फार मोठे तत्त्व असल्याने, तेही त्यांच्या बरोबर आले होते. येथे आल्यावर येथले आदिवासी जे नाग, कातकरी, ठाकूर, वारली यांच्याशी त्यांचे दृढ संबंध येऊ लागले व त्यातूनच महाराष्ट्र समाज निर्माण झाला. त्या समाजाचे स्वरूप आता पाहावयाचे आहे

एकरूप प्रयत्न
 आर्य हे भारतात बाहेरून आले की ते येथलेच मूळचे रहिवासी होते याविषयी फार वाद आहेत, पण आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने ते अप्रस्तुत आहेत. आर्य हा स्वतंत्र वंश होता किंवा काय हा दुसरा प्रश्न आहे. त्याला मात्र महत्त्व आहे. आर्य हे नाव वंशवाचक आहे व भारतातले मूळचे द्रविड, अमुर, नाग इ. लोक आर्याहून भिन्न वंशाचे होते, हे युरोपीय पंडितांचे मत अगदी निराधार आहे, हे ज्ञानकोश- कारांनी व इतर अनेक पंडितांनी आता निर्णायकपणे दाखवून दिले आहे. या पंडितांच्या मते आर्य शब्द हा गुणवाचक आहे, जातिवाचक नाही. सुसंस्कृत, प्रभू, श्रेष्ठ असा आर्य शब्दाचा अर्थ आहे. 'वृत्तेन हि भवत्यार्थी न धनेन न च विद्यया. ' आर्यत्व हे चारित्र्यावर अवलंबून आहे, असे महाभारतात स्पष्टपणे सांगितलेले आहे. त्या प्राचीन काळी भारतात नाग, द्रविड, असुर, वानर, दैत्य, दानव, निपाद, किरात, कैवर्त, पुलिंद, आंध्र, यवन, पणी, कांबोज, पारद, पल्लव, खस, भरत, तुर्वसू इ. शेकडो जमाती लहान लहान पुंज करून येथे राहिल्या होत्या. या जमातींतून अग्नीची पूजा करणारा, संस्कृत भाषा बोलणारा एक थोर, पराक्रमी प्रज्ञावंत व बुद्धिमान असा वर्ग उदयास आला. यजनशीलता व तत्संबद्ध अशी वैदिक संस्कृती हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण होते, भिन्न वंश किंवा शुभ्र वर्ण हे नव्हे. हा वर्ग आपल्याला श्रेष्ठ व आर्य म्हणवू लागला. आणि सर्व जनांना आपल्या वैदिक संस्कृतीची दीक्षा देऊन त्यांनाही आर्य करावयाचे अशी त्याने प्रतिज्ञा केली. 'कृण्वतो विश्वमार्यम' ही ती प्रसिद्ध प्रतिज्ञा होय. आर्य हा शब्द वंशवाचक असता तर या प्रतिज्ञेला काहीच अर्थ निर्माण झाला नसता. यज्ञप्रधान वैदिक धर्माचे संस्कार सर्वांवर करून हा शेकडो जमातींनी घडलेला भारतीय समाज एकरूप करून टाकावयाचा, सर्वांना आर्य करून सोडावयाचे असा त्या प्रतिज्ञेचा अर्थ आहे.

रक्तसंकर
 सर्व भारताला एकरूप करून टाकण्याच्या, भारताचे आर्यीकरण करण्याच्या आर्यांच्या या महान प्रयत्नाला त्या काळी फार मोठे यश आले यात शंका नाही. सर्व भरतखंड ही एक भूमी आहे, भारतीयांचा सर्व समाज एक समाज आहे, अशी भावना आज हजारो वर्षे भारतात दृढमूल झालेली आहे ती त्याच प्रयत्नाचे फल होय. हे साधण्यासाठी आपण सर्व एकवंशीय आहो ही जाणीव आर्यांनी सर्व समाजांत निर्माण करण्याची पराकाष्ठा केलेली दिसते. पुराणे, महाभारत, रामायण, यांतील कथांवरून हे स्पष्ट दिसते. आज देव, दैत्य, असुर, नाग, राक्षस या सर्व भिन्न वंशीय जमाती होत्या, असे आपण मानतो. पण पुढील कथेवरून या भ्रमाचा निरास होईल. कश्यप हा थोर ब्राह्मण, दिती व अदिती या त्याच्या दोन स्त्रिया. एकीची प्रजाती दैत्य व दुसरीची ती आदित्य याच कश्यपाने प्रजापतीच्या बारा कन्यांशी विवाह केला होता. आणि त्यापासून त्याला प्रजा झाली ती कोणती ? नाग, सर्प, गरुड, राक्षस, अप्सरा. असुर या शब्दाचा अर्थ राक्षस, दैत्य, अत्यंत क्रूर, हिंस्त्र, रानटी असा आज रूढ आहे. वेदांत या शब्दाचा तसा अर्थ आहे. पण दुसरा याच्या बरोबर उलट असाही अर्थ वेदांत आहे. असुर म्हणजे परमात्मा, देवाधिदेव ! इन्द्र, वरुण, अन्नी यांनाही वेदांत असुर म्हटले आहे. सत्यवान हा शाल्व कुळातला व सावित्री ही शिबी कुळातली. ही दोन्ही कुळे दैत्यकुळे होती. हा सत्यवान सूर्याप्रमाणे तेजस्वी, बृहस्पतीसारखा बुद्धिमान, इन्द्रासारखा सामर्थ्यवान व पृथ्वीप्रमाणे क्षमाशील होता ( म्हणजेच आर्य ) असे नारदांनी त्याचे वर्णन केले आहे. आणि सावित्री तर सर्व पतिव्रतांचा आदर्श. जरत्कारू हा वेदवेत्ता, तपस्वी ब्राह्मण. त्याने वासुकी या नागराजाच्या भगिनीशी विवाह केला. त्यांचा पुत्र आस्तिक हाही वेदपारंगत, तपोनिष्ठ ब्राह्मण झाला, आर्य मानला गेला.

आदर्श
 म्लेंच्छ व यवन या अगदी परकीय भारतबाह्य व हीन जमाती मानल्या जातात. पण ययातीचा पुत्र तुर्वसू याची संतती ती यवन व दुसरा पुत्र अनू त्याची संतती ती म्लेंच्छ असे महाभारत सांगते (आदि ८५ - ३५ ). भृगू, अंगिरस, वसिष्ट, पौलस्त्य, पुलह इ. कुळे ही ब्राह्मणांची श्रेष्ठ कुळे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांतील शेवटच्या दोन कुळांत राक्षस, वानर, किन्नर, यक्ष, किंपुरुष, पिशाच्च इ. जमाती निर्माण झाल्या आहेत. शुक्राचार्यांची कन्या देवयानी दिव्याशी म्हणजे एका श्रेष्ठ ब्राह्मणकन्येशी ययाती या क्षत्रिय राजाने विवाह केला. त्याचप्रमाणे असुरांचा राजा वृपपर्वा याच्या कन्येशीही ययातीने ( मनाने ) विवाह केला होता. यावरून ब्राह्मण, क्षत्रिय व असुर हे एकवंशीय तरी असले पाहिजेत किंवा त्यांनी वर्णसंकर तरी केला असला पाहिजे. ययाती-देवयानी हा प्रतिलोम विवाह उत्तरकालीन धर्मशास्त्राप्रमाणे त्यांची प्रजा शूद्र ठरते. त्यांचा मुलगा यदू हा यादव कुलाचा मूळपुरुष होय. ययाती - शर्मिष्ठा हा वर्ण- संकर इतका मान्य झाला होता की कालिदासाने कण्वमुखाने शकुंतलेला आशीर्वाद असा दिला की तू शर्मिष्ठेप्रमाणे पतीला प्रिय हो व तिच्या पुरुराजाप्रमाणे तुलाही सम्राटलक्षणी पुत्र होवो. दैत्यकुळातील सावित्री व असुरकुळातील शर्मिष्ठा या आर्य स्त्रियांना आदर्श म्हणून सांगताना, प्राचीन कवींना अश्लाघ्य असे काहीच वाटले नाही.

गुणनिष्ठ वर्ण
 वेदकाळी व पुढेही अनेक शतके समाजात आजच्यासारखे वर्ण नसून ब्राह्मण, क्षत्रिय हे वर्ग होते, असे म. म. काणे यांसारख्या पंडितांचे मत आहे. त्यांचे म्हणणे प्रमाणसिद्ध आहे, हे पुढील उदाहरणांवरून दिसून येईल. त्या काळी क्षत्रिय कुळात अनेक ब्रह्मर्षी निर्माण होत व ब्राह्मणकुळात अनेक राजर्षी निर्माण होत. वीतहव्य हा क्षत्रिय राजा भृगुऋषींच्या कृपेने ब्रह्मर्षी झाला. त्याचा पुत्र गृत्समद वेदातल्या काही सूक्तांचा कर्ता आहे. शौनक हा त्याच्याच कुळात जन्मला. त्याने चातुर्वर्ण्य निर्माण केले असे विष्णुपुराण सांगते. म्हणजे त्याच्या आधी ते नव्हते असे दिसते. शौनकाचा पिता शुनक याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या सर्व वर्णांचे पुत्र होते. पुरुवंशात कोणी क्षत्रिय झाले, कोणी ब्राह्मण झाले. मांधाता, कक्षीव, अजमीढ हे सर्व ब्रह्मर्षी क्षत्रिय कुलोत्पन्न होते. नाभागाचे व या क्षत्रियांचे पुत्र पुढे वैश्य झाले.
 वरील इतिहास ध्यानात घेऊनच प्रारंभी एकच वर्ण होता व त्यातून गुणकर्म- भेदाने पुढे चार वर्ण निर्माण झाले, असे रामायण, महाभारत, भागवत, ब्रहापुराण, लिंगपुराण इ. प्राचीन ग्रंथांत वारंवार सांगितलेले आढळते. यामुळे गुणांवरून मनुष्याचा वर्ण ठरतो, जन्मावरून नव्हे, ही विचारधारा त्या काळी प्रबळ होती असे दिसते. महाभारतात आदी, वन, अनुशासन, शांती या पर्वात हा विचार पुनःपुन्हा आवर्जून सांगितलेला आहे. वेदाध्ययन, सत्यपरायणता, सदाचार इ. गुणांनी ब्राह्मणत्व येते, प्रजापालन, क्षात्रतेज, इ. गुणांमुळे मनुष्य क्षत्रिय होतो, कृषि, गोरक्षण, धनार्जन यामुळे वैश्य होतो, आणि वेदांचा त्याग, अमंगळ आचार यामुळे मनुष्य शुद्र ठरतो असे भृगृने सांगितले आहे. गुणांवरून वर्ण ठरावयाचा तर गुणांची परीक्षा होणे अवश्य ठरते. नाहीतर कोणाची प्रवृत्ती कशी आहे, हे कळण्यास मार्गच राहणार नाही. म्हणून या सर्व वर्णांना, म्हणजेच सर्व समाजाला, यज्ञाचा व वेदाध्ययनाचा अधिकार आहे, असे भृगूने आपले मत दिले आहे. 'ब्राह्मण हा सात्विक गुणांनी संपन्न नसेल तर शूद्र मानून, दास मानून त्याला वेठीला धरावे', 'हीन कुलात जन्मलेला शूद्र जर आगमसंपन्न असेल तर त्याला संस्कृत ब्राह्मण मानावे' असे विचार महाभारतात ठायीठायी आढळतात.

एक समाज
 समाज एकरूप करून टाकण्याचे प्राचीन ऋषिमुनींचे किती अट्टाहासाने प्रयत्न चालले होते हे यावरून दिसून येईल. अखिल भारतीयांना एका वैदिक यज्ञधर्माची दीक्षा त्यांनी दिली. संस्कृत वाणीचा आसेतुहिमाचल प्रसार करून ती वाणी वा अन्य तदुद्भव भाषा सर्वांच्या मुखी रूढ करून टाकल्या आणि एवढ्यावरच न थांबता या सर्वांचे रक्तही एक करून टाकण्याचा अत्यंत चिकाटीने त्यांनी प्रयत्न केला. असे दीर्घ प्रयत्न त्यांनी केले नसते तर भारत हा एक देश, भारतीय हा एक समाज आणि त्या सर्वांचा हिंदुधर्म हा एक धर्म, असे स्वरूप या भूमीला कधीच प्राप्त झाले नसते; आणि ही भूमी सामर्थ्यसंपन्नही झाली नसती. समाज एकरूप झाल्यावाचून, त्याच्यात समता नांदत असल्यावाचून तो संघटित व बलसंपन्न होणे दुर्घट असते. ऐतिहासिक काळात इ. स. पूर्व चौथ्या शतकापासून इ. सनाच्या सहाव्या शतकापर्यंत भारतावर ग्रीक, शक, कुशाण, हूण इ. जमातींची महाभयंकर अशी नऊ आक्रमणे झाली. पण या सर्व आक्रमणांचे निर्दाळण करून या सर्व जमातींना स्वधर्मात व स्वसमाजात विलीन करून टाकण्यात भारतीयांनी अपूर्व यश मिळविले. या जमातींच्या आक्रमणांच्या आधीच हा समाज एकरूप झालेला नसता तर हे कधीही शक्य झाले नसते. नाग, द्रविड, असुर, कैवर्त, किरात, आंध्र, पुलिंद या ज्या शेकडो जमाती येथे प्राक्काळी होत्या त्या तशाच भिन्न रूपात व विघटितपणे येथे राहिल्या असत्या तर येथे कोणत्याच संस्कृतीचा विकास झाला नसता; आणि शक, यवन, कुशाण, हूण यांच्या आक्रमणाला त्या अगदी सहज बळी पडल्या असत्या. पण तसे तर झाले नाहीच, उलट या आक्रमकांना हतवीर्य करून भारतीयांनी आपल्या अंतरात त्यांना विलीन करून टाकले. या आक्रमणांच्या काळी भारतात चातुर्वण्य, जातिभेद यांचे नियम उत्तर काळातल्याप्रमाणे कडक असते, उदार धोरणाचा येथे अभाव असता तर या सर्व आक्रमक जमाती जिंकल्या गेल्यावर अस्पृश्य ठरल्या असत्या व त्यांचे भिन्न गट, भिन्न पुंज आजही भारतवर्षात ठायी ठायी दिसले असते. पण आज त्या नावापुरत्याही उरल्या नाहीत. समाजात एकरूपता. समता निश्चयाने प्रस्थापित करण्याचे प्राचीन ऋषिमुनींचे तत्त्व त्याचेच हे फळ आहे.

मिश्र विवाह
 महाराष्ट्राच्या इतिहासाकडे पाहता, प्रारंभीच्या हजार बाराशे वर्षांच्या काळात तरी असे स्पष्ट दिसते की हा समाज वर्णजातींनी बद्ध असला तरी, त्या वर्णजातिव्यवस्थेला कडक रूप मुळीच आलेले नव्हते. त्यांच्यात मिश्र विवाह बऱ्याच प्रमाणात होत असत. प्रारंभीच्या सातवाहनांच्या कुलाचा वृत्तांत पाहा. पुराणकथेप्रमाणे ब्राह्मणकन्या व नागपुरुष यांच्यापासून या कुलाच्या संस्थापकाचा जन्म झाला. हा प्रतिलोम विवाह. अर्थातच तज्जन्य संतती ही शूद्र होय. पण या शूद्रवंशाने महाराष्ट्रावर साडेचारशे वर्षे राज्य केले. सातवाहन क्षत्रिय होते की ब्राह्मण असा आज वाद आहे. पण पुराणांनी त्यांना शूद्र ठरविले आहे, त्या अर्थी त्या काळी त्यांना शूद्र मानीत असतील, असे वाटते. पण असे असूनही या वंशातील बहुतेक थोर सम्राटांनी अश्वमेध केलेले आहेत. तेव्हा ज्या ब्राह्मणांनी त्यांच्या यज्ञात पौरोहित्य केले त्यांना, सातवाहन हे शास्त्राअन्वये शूद्र असले तरी, गुणकर्मामुळे ते क्षत्रिय ठरतात, हे मान्य असले पाहिजे. सातवाहनांनी केवळ अश्वमेध यज्ञच केले असे नाही, तर पौंडरिक, अग्न्याधेय, दाशरात्र इ. अनेक यज्ञ केल्याचे नाणे घाटातील शिलालेखात सांगितले आहे. सातवाहन स्वतःला चातुर्वर्ण्याचे संरक्षक म्हणवितात. गौतमीपुत्र शातकर्णी याने वर्णसंकर थांबविला असा, त्याची माता गौतमी बलश्री हिने कोरविलेल्या शिलालेखात, त्याचा गौरव केला आहे. पण सातवाहन कुळात तर वर्णसंकर प्रारंभापासून चालू होता असे इतिहास सांगतो. या कुळाच्या संस्थापकाचा उल्लेख वर आलाच आहे. नंतरचा पहिला शातकर्णी याची राणी नागनिका ही नाग कुळातील होती. वर उल्लेखिलेल्या गौतमीपुत्र शातकर्णीचा मुलगा वसिष्ठीपुत्र शातकर्णी याची राणी ही शकराजा रुद्रदामा याची कन्या होती. म्हणजे नाग, शक यांच्याशी संकर झाला तरी चातुर्वर्ण्याला बाध येत नाही, असे या राजांचे मत होते असे दिसते. ( महात्माजी वर्ध्याच्या आश्रमात स्पृश्य व अस्पृश्य यांच्यात आग्रहाने विवाह घडवून आणीत. स्वतः वैश्य असून त्यांनी एक ब्राह्मण- कन्या सून म्हणून घरात आणली होती. तरी जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्य व जाती, पोटजाती यांवर त्यांची अविचल श्रद्धा होती. ) गुप्त है वैश्य होते. पण त्यांचा पहिला सम्राट चंद्रगुप्त याने लिछवी या क्षत्रिय घराण्यातील राजकन्येशी लग्न केले होते. हा प्रतिलोम विवाह होय. भारताचा नेपोलियन म्हणून ज्याची कीर्ती आहे तो सम्राट समुद्रगुप्त या प्रतिलोम विवाहातून जन्मला होता. महाराष्ट्रातील वाकाटक राजे हे ब्राह्मण होते. त्या घराण्यातील नृपती रुद्रसेन २ रा याची राणी प्रभावती गुप्ता ही वरील गुप्त सम्राट घराण्यातील चंद्रगुप्त २ रा याची कुबेरनागा या नाग स्त्रीपासून झालेली राजकन्या होय. वाकाटक नृपती देवसेन याचा मंत्री हस्तिभोज याच्या एका ब्राह्मण पूर्वजाने ब्राह्मण व क्षत्रिय अशा दोन स्त्रिया केल्या होत्या. कदंब राजे ब्राह्मण होते. त्यांचा एक राजा ककुस्थवर्मा याने आपल्या कन्या गुप्तांच्या वैश्य घराण्यांत व इतर क्षत्रिय घराण्यांत दिल्या होत्या. हे सर्व प्रतिलोम विवाह होत. शास्त्राअन्वये यांची संतती शूद्र ठरावयास हवी. पण तसे कधी कोणी मानले नाही. सातवाहन सम्राटांचा अश्वमेध व इतर यज्ञ करण्याचा अधिकार ज्याप्रमाणे वेदवेत्या ब्राह्मणांनी मान्य केला होता, त्याचप्रमाणे गुप्त, वाकाटक, भगनाग यांचाही मान्य केला होता. वाकाटक ब्राह्मण असून त्यांनी वैश्य, क्षत्रिय व नाग कुळांतील स्त्रिया केल्या होत्या, तरी त्यांच्या वंशाच्या ब्राह्मण्याला बाघ आला नाही.

प्रतिलोम-प्रतिष्ठा
 या कालखंडात महाराष्ट्रात व त्याच्या आसपास जी राजघराणी झाली त्यांत ब्राह्मण, क्षत्रिय, नाग, शूद्र अशी भिन्न वर्णाची व वंशांची घराणी होती. त्यांतल्या अनेक राजांनी शक, नाग, हूण यांच्या कन्यांशी विवाह केले होते. तरीही या सर्व घराण्यांत परस्परांत विवाहसंबंध सर्रास होत असत. पण त्यामुळे त्यांच्या राजपदाला, कर्तृत्वाला किंवा कुलप्रतिष्ठेला कधी कमीपणा आला नाही. सातवाहनांच्या काळी वनवासी या प्रदेशावर राज्य करणारे चुटू हे घराणे मानव्यगोत्री ब्राह्मणाचे होते. चुटू हे सातवाहनांचे मांडलिक असून त्यांचे नातेवाईकही होते. वाकाटक नृपती नरेंद्रसेन ( ब्राह्मण ) याची राणी अज्झितभट्टारिका ही राष्ट्रकूट (क्षत्रिय ) घराण्यातील होती. चालुक्य, राष्ट्रकूट व कलचूरी यांच्यांत वारंवार सोयरिकी होत असत. बदामी चालुक्य विक्रमादित्य २ रा याच्या दोन राण्या लोकमहादेवी व त्रैलोक्यमहादेवी या कलचूरी घराण्यातील होत्या. विक्रमादित्य ४ था याची राणी बाेधादेवी ही कलचूरी होती. कलचूरी घराण्यातील कर्णदेव याची राणी अव्वलदेवी ही हूण राजकन्या होती. कल्याणी चालुक्य विक्रमादित्य याची राणी कदंब (ब्राहाण ) कुळातील जयकेशी (इ. स. १०५०-१०८० ) याची कन्या होती. कदंबकुलातील जयकेशी २ रा ( ११०४-११४०) याची कन्या चालुक्य नृपती विक्रमादित्य २ रा याला दिली होती. हे दोन्ही प्रतिलोम विवाह होत. पण त्यांची संतती कधी शूद्र ठरली नाही. राष्ट्रकूट नृपती इन्द्रनित्यवर्ष (इ. स. ९१४ ) याची राणी विजंबा, त्याचप्रमाणे कृष्ण ३ रा याची आई व राणी या सर्व कलचुरी घराण्यातील होत्या. राष्ट्रकूट राजा कर्क याने आपली कन्या कल्याणी चालुक्य तैल अथवा तैलप याला दिली होती. राष्ट्रकूटांचा संस्थापक दंतिदुर्ग याची आई बदामी चालुक्य घराण्यातील होती. कल्याणी चालुक्य जयसिंह ३ रा याची कन्या, याची बहीण अक्कादेवी ही कदंब घराण्यात दिली होती. कल्याणी चालुक्य विक्रमादित्य ६ वा याची एक राणी जक्कलदेवी ही कदंब कुलातील होती. त्याची दुसरी एक राणी उच्च कुळातली नसून एका गावकामगाराची कन्या होती. विक्रमादित्याने आपली एक कन्या कदंब (ब्राह्मण) कुळातील जयकेशी याला दिली होती. पल्लव, चोल, गंग यांच्या घराण्यांशीही चालुक्य, राष्ट्रकूट या घराण्यांच्या नित्य सोयरिकी होत असत. राजघराण्यातच असे मिश्र विवाह होत असे नाही. सुप्रसिद्ध कवी बाण याची सावत्र आई शूद्र होती. प्रख्यात संस्कृत प्राकृत कवी राजशेखर (ब्राह्मण) याची स्त्री अवन्तीसुंदरी ही चव्हाण कुळातील क्षत्रिय कन्या होती. [ ( १ ) डॉ. रा. गो. भांडारकर, अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन. (२) म. म. काणे, धर्मशास्त्र, खंड २ रा, भाग १ ला, पृ. ४४७-५१. (३) म.म. काणे यांचा लेख 'भारतवर्षातील मिश्रविवाह'- बाँबे लॉ, रिपोर्टर, १९३६ ऑगस्ट १५ (४) कुलगुरु चिंतामणराव वैद्य, मध्ययुगीन भारत, भाग १ ला ] अशा रीतीने आंतरवर्णीय विवाह इ. सनाच्या दहाव्या अकराव्या शतकापर्यंत चालू होते. नंतरच्या काळात ते बंद झाले असे काणे व वैद्य या दोघाही पंडितांनी मत दिले आहे. डॉ. कन्हय्यालाल मुनशी व डॉ. यू. एन. घोपल यांनी इ.स. ३२० ते ७८० (क्लासिकल एज ) या कालखंडात अनुलोम विवाह ही नित्याचीच गोष्ट होती व प्रतिलोमही दुर्मिळ होते असे नाही, असे आपले मत दिले आहे (दि हिस्टरी अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल, खंड ३ रा, प्रस्तावना व सोशल कंडिशन्स हे प्रकरण ).

व्यवसायसंकर
 प्राचीन काळी याप्रमाणे अनुलोम आणि प्रतिलोमही वर्णसंकर शास्त्रमान्य व जनमान्य होता, तर व्यवसायसंकर यापेक्षाही जास्त रूढ असला पाहिजे, हे उघडच आहे. चातुर्वर्ण्य संस्थेचे वैशिष्टय म्हणजे ही दोन बंधने. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांनी एकमेकांत विवाह करू नये आणि एकमेकांचे व्यवसाय करू नये. पण पुराण काळात या वर्णाचा व आंतरप्रभव जातींचा उल्लेख येत असला व त्या वर्णांचे व जातींचे व्यवसायही शास्त्रकारांनी ठरवून दिले असले तरी, त्या काळी वर्णभेद व जातिभेद कोणत्याच अर्थाने उत्तर काळातल्याप्रमाणे कडक नव्हते. त्या काळी वर्णभेद नव्हते, वर्गभेद होते, असे काही पंडित म्हणतात त्यात हाच अर्थ अभिप्रेत आहे. अनुलोम विवाह तर त्या काळी धर्मशास्त्रानेच मान्य केले होते आणि वर्णाना व जातींना आपापले व्यवसाय त्यांनी नेमून दिले असले तरी त्यातही पुष्कळच लवचिकपणा होता. त्यामुळे समाजातील बहुतेक थरांतील लोकांना उत्कर्षाला संधी मिळून समाजात बन्याच अंशाने समता प्रस्थापित होत असे.

दोन प्रवाह
 या विषयाचा विचार करताना, दुसरी एक गोष्ट ध्यानात येते ती अशी की समतेचे व विषमतेचे अशी दोन तत्त्वज्ञाने, या दोन विचारांचे दोन प्रवाह फार प्राचीन काळापासून भारतात दिसून येतात. वेद, ब्राह्मणे, उपनिषदे, धर्मसूत्रे, स्मृतिग्रंथ या सर्व धर्मग्रंथांत प्रारंभापासून जन्मनिष्ठ वर्णभेदाचा व जातिभेदाचा पुरस्कार केलेला आढळतो आणि तितक्याच आग्रहाने गुणकर्मनिष्ठ चातुर्वर्ण्याचाही गौरव केलेला आढळतो. महाभारत या एकाच ग्रंथात अगदी दोन परस्परविरुद्ध अशी आत्यंतिक टोकाची मते सांगितलेली दिसतात. म्हणून अभ्यासकांना पुराणे व इतिहास यांच्या आधारे कोणत्या काळी काय स्थिती असावी याविषयी निर्णय करावा लागतो.

शास्त्र व व्यवहार
 त्या दृष्टीने पाहिले तर प्रारंभीच्या काळी समतेचे तत्त्व, तो विचारप्रवाह जोरकस होता असे दिसते आणि हळूहळू त्याचा जोर ओसरून इ. सनाच्या दहाव्या अकराव्या शतकात हिंदुसमाज अत्यंत विषम झाला व त्यामुळेच तो विघटित होऊन मुस्लिम आक्रमणाला बळी पडला. आज आपल्या समाजात आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय सर्व प्रकारच्या समतेचा उद्घोष चालू आहे. तरी त्या मानाने प्रत्यक्षात त्याच्या शतांशही नाही. समाजवादी समाजरचनेच्या घोषणा तर प्रत्यही शतवार होत असतील. पण पुढील शंभर वर्षांत तरी तशी रचना अवतरेल की नाही याची सर्वांनाच, घोषणा करणाऱ्यांना सुद्धा, शंका आहे. अस्पृश्यतानिवारण, बालविवाहबंदी, हुंडाबंदी, दारूबंदी या सर्वांचे तेच आहे. हे ध्यानात घेऊन मागल्या काळचा विचार केला पाहिजे. धर्मशास्त्रात काहीही सांगितले असले तरी समाजाच्या व्यवहारात शास्त्र कितपत आचरिले जाते, हे पाहूनच निर्णय केला पाहिजे.
इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् ।
असे शास्त्रवचनच आहे. प्रत्यक्ष वेदांना सुद्धा इतिहास-पुराणाच्या दृष्टीतून आपला अभ्यास व्हावा असे वाटत असे. आणि त्या दृष्टीने आपल्या समाजरचनेकडे पाहिले तर असे दिसून येते की वर्णाची व जातींची नियमने प्राचीन ग्रंथांत सांगितली होती तरी व्यवहार तसा काटेकोरीने होत नव्हता. इ. सनाच्या सातव्या आठव्या शतका पासून शास्त्रातही विषमता जास्त प्रतिपादिली जाऊ लागली आणि व्यवहारातही भेदाभेद फार रूढ होऊ लागले. त्यामुळे समाजाची एकरूपता बिघडली, भिन्न घटकांत जास्त दुरावा निर्माण झाला आणि समाजाची संघटना भंगून तो दुबळा व सामर्थ्यहीन झाला.

समता
 या भूमिकेतून प्राचीन काळच्या व्यवसाय बंधनांचा विचार करता असे दिसते की शास्त्रात अशी बंधने सांगितलेली असली तरी प्रत्यक्षात ती असून नसल्यासारखीच होती. वेदातील अनेक सूक्ते क्षत्रियांनी रचलेली आहेत. गायत्रीमंत्राचा द्रष्टा विश्रामित्र हा क्षत्रिय होता. चंद्रवंशीय राजा पुरुरवा हाही अनेक मंत्रांचा द्रष्टा होता. शंतनूचा भाऊ देवापी हा तर मंत्रकर्ता असून पौरोहित्यही करीत असे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील ९४ वे सूक्त नागवंशीय कद्रूचा पुत्र अर्वुद याने रचले आहे. त्याच मंडलातील १०९ व्या सूक्ताची कर्ती सर्पराज्ञी ऋषी ही होती. ७६व्या सूक्ताचा कर्ता नागजातीय इरावतपुत्र जरत्कर्ण हा होता. प्रत्यक्ष वेदमंत्रांची रचनाच जेथे क्षत्रियांनी व नागांनी केलेली होती, तेथे याजन, अध्यापन, प्रतिग्रह यांचा अधिकार त्यांना नाही, तो फक्त ब्राह्मणांनाच आहे, या वचनाला कितपत अर्थ असेल हे दिसतच आहे.
 क्षत्रिय जसे वेदमंत्रांचे द्रष्टे होते तसेच ते औपनिषदिक ब्रह्मविद्येचे ज्ञाते व उपदेष्टेही होते. गार्ग्यनामक ब्राह्मणास काशीचा राजा अजातशत्रू याने ब्रह्मविद्या शिकविली, जीवलपुत्र प्रवहण या राजाने गौतमनामक ब्राह्मणाला ब्रह्मज्ञान दिले, केकयपुत्र अश्वपतिराजाचे पाच ब्राह्मण शिष्य होते. तेव्हा वेदमंत्रांचे दर्शन व ब्रह्माचे ज्ञान फक्त ब्राह्मणांनाच होत असे असे नाही. क्षत्रियही त्या क्षेत्रात तितकेच श्रेष्ठ होते. ब्रह्मविद्या प्राप्त करून घेण्याचा अधिकार त्या काळी शूद्रांना सुद्धा होता. यजुर्वेदातील 'ही कल्याणकारी वाणी मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व चारण या सर्वासाठी उच्चारली' या मंत्रावरून हे स्पष्ट होते. 'ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या सर्वांमध्ये तू तेज निहित कर' या तैत्तिरीय संहितेतील मंत्रावरून हेच दिसते. ( पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर, स्पर्शास्पर्श, पृ. ४४,४६ ) हे उतारे देऊन पंडित सातवळेकर म्हणतात, 'ही समानता पाहण्यासारखी व विचार करण्यासारखी आहे.'

शूद्रप्रतिष्ठा
 ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे भेद त्या काळी निर्माण झाले असले तरी शूद्रांना तेव्हा आजच्यापेक्षा शतपटीने जास्त प्रतिष्ठा होती, हे त्या काळच्या वाङ्मयावरून सहज दिसून येते. 'नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो' इ. यजुर्वेदातील (अ. १६।२७ ) मंत्र देऊन पंडित सातवळेकर म्हणतात: सुतार, लोहार, रथकार, कुंभार, निषाद, भिल्ल हे सर्व कारागीर शूद्र. यांना नमन करावे, असे वेदांमध्ये सांगितले आहे. हे मंत्र द्विजांच्या तोंडचे आहेत. त्या दृष्टीने त्यांची महती विशेष आहे. काळाच्या ओघात विचारांना चालना न मिळाल्यामुळे या नमस्कारार्ह जाती पुढे हीन व वहिष्कृत गणल्या गेल्या. क्षुद्र विषमता शेवटी कोणत्या थरास जाऊन पोचते व ती समाजाला कशी बाधक होते हे पहावयाचे असल्यास हिंदुसमाजातील ही स्पर्शास्पर्शाची चाल पहावी. (स्पर्शास्पर्श, पृ. १०७, १०८ ) राजाचे मंत्री किती असाचे व ते कोणत्या वर्णाचे असावे, याविषयी महाभारतात पितामह भीष्मांनी पुढीलप्रमाणे अभिप्राय दिला आहे. 'राजाने चार ब्राह्मण मंत्री, आठ क्षत्रिय मंत्री, एकवीस वैश्य मंत्री, तीन शूद्र मंत्री व एक सूत मंत्री असे मंत्री नेमावे.' (शांति, ८५, ८ ). सूत हा प्रतिलोम विवाहजन्य अर्थात शूद्र होता. हे ध्यानात घेता ब्राह्मणांइतके शूद्र मंत्री होते असे दिसेल. 'तीन वर्णांची सेवा हाच शूद्राचा धर्म होय' असे त्या वेळी शास्त्र होते. महाभारतातच तसे अनेक ठिकाणी सांगितलेले आहे. शूद्र मंत्रिपदापर्यंत गेल्यानंतर या शास्त्राचा मुलाहिजा कितपत राखला जात असेल याची कल्पना सहज येईल, आणि शूद्राला त्या काळी राजपदही दुष्प्राप्य नव्हते हे पाहिल्यावर तर याविषयी शंकाच राहणार नाही. 'शूद्र राजा होऊ शकेल की नाही' या युधिष्ठिराच्या प्रश्नाला उत्तर देताना भीष्म म्हणतात, 'राजा, अपार व नौकाशून्य अशा संकटरूपी समुद्रामध्ये जो मूर्तिमंत नौकाच झालेला असतो तो जरी शूद्र असला तरी त्याचा तो सन्मान करणें सर्वथैव योग्यच आहे.' ( शांति ७८- ३८ ) वर्णनिश्चय गुणकर्मांवरून करावा व ज्याच्या अंगी पात्रता दिसेल त्याला उत्कर्षाची जन्मनिरपेक्ष वाटेल ती संधी द्यावी याविषयी प्राचीनांचा किती कटाक्ष होता हे यावरून स्पष्ट होईल.

उदार दृष्टी
 वर्णभेद व जातिभेद याविषयीची ही उदारदृष्टी केवळ शास्त्रग्रंथांतच होती असे नाही. इतिहासही तिला पुष्टी देतो. मौर्य व सातवाहन हे पुराणांच्या मते शूद्र होते, तरी ते साम्राज्यपदी आरूढ होऊ शकले आणि शतकेच्या शतके त्यांनी राज्ये केली. आज, ते क्षत्रिय होते, असे काही पंडित म्हणतात. पण त्या काळच्या रूढ मताप्रमाणे ते शूद्र होते, तरीही शास्त्राने व लोकांनी त्यांच्या राजपदाला मान्यता दिली होती. ह्युएनत्संगाने लिहून ठेविले आहे की त्याच्या काळी दोन राजे वैश्य होते व दोन राजे शूद्र होते. कुलगुरू चिंतामणराव वैद्य यांनी म्हटले आहे की इ. पू. ३०० पासून इ. स. ६०० पर्यंत येथील राजपदावर बरीच वैश्य व शूद्र घराणी, त्याचप्रमाणे बरीच परदेशी घराणी आल्यामुळे सूर्य व चंद्र वंशांची मातब्बरी नाहीशी होऊन ताम्रलेखात राजांच्या वंशांचा निर्देश करण्याची आवश्यकता राहिली नसावी असे दिसते. (मध्ययुगीन भारत, भाग १ ला, पृ. ९३ )

आक्रमक विलीन
 इ. पू. चौथ्या शतकापासून पुढील एक हजार वर्षांत यवन, शक, कुशाण, हूण यांची भारतावर अनेक आक्रमणे झाली. या जमातींना मनूने शूद्र ठरविले आहे. त्याच्या मते ते मूळचे क्षत्रिय, पण संस्कारलोपामुळे ते शूद्र झाले. पण तरीही त्यांनी येथे राज्ये, साम्राज्ये स्थापन केली व ती अनेक शतके चालविली. त्यांचे शूद्रत्व याच्या आड आले नाही. सामान्य जनांनी त्यांच्या राजपदाला मान्यता दिली, एवढेच नव्हे तर मोठमोठ्या वैदिक ब्राह्मणांनीही दिली. हे ब्राह्मण शेकडो वर्षे या शूद्र राजांकडून भूमीची व धनाची दाने घेत राहिले. शूद्राकडून दान येणे हे निंद्य होय. पण तरीही प्रत्यक्षात ब्राह्मणांनी तसे मानले नाही. आणि त्या ब्राह्मणांना लोकांनीही कमी लेखिले नाही. शूद्र राजा होणे, कलियुगाचे लक्षण, असे शास्त्रकार मानतात. महाभारतात तसे सांगून त्यामुळे होणाऱ्या अनर्थाचे भयंकर वर्णन केलेले आहे. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. मौर्य, सातवाहन इ. शूद्र सम्राटांच्या कारकीर्दीत या भूमीला वैभवाचे व समृद्धीचे दिवसच प्राप्त झाले. जितक्या अंगांनी समाजाचा उत्कर्ष होणे शक्य असते तितक्या अंगांनी झाला, आणि शास्त्रकारांची भीती व्यर्थ ठरली.

ब्राह्मण - सर्व व्यवसाय
 यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान व प्रतिग्रह हे ब्राह्मणांचे व्यवसाय, असे एक रूढ शास्त्र आहे. पण मन्वादी स्मृतिकारांनीच राजाने न्यायाधीश व मंत्री या पदांवर ब्राह्मण नेमावे, असे सांगितले आहे. चार मंत्री ब्राह्मण असावे हे महाभारताचे मत वर सांगितलेच आहे. याशिवाय आपद्धर्म म्हणून ब्राह्मणांनी शेती, व्यापार हे उद्योग करण्यास हरकत नाही, असेही शास्त्र सांगते. पण आपत्काळ नेमका कोणता हे कोणी सांगितलेले नाही. त्यामुळे पुरातन काळापासून ब्राह्मण सर्व प्रकारचे व्यवसाय करीत आहेत. काही स्मृतींनी ब्राह्मणांना शेती वर्ज्य सांगितली आहे. कारण शेतीत हिंसा होते. पण ब्राह्मण राजे झाले व सेनापती झाले म्हणजे त्यांच्या हातून हिंसा होणारच. नव्हे, तो त्यांचा धर्मच ठरतो. धर्मावर संकट आले की सर्व द्विजांनी हाती शस्त्र घ्यावे, असे शास्त्र म्हणते. पण राजे व सेनापती यांनी कायमचेच हाती शस्त्र घेतलेले असते. वाकाटक घराणे हे ब्राह्मण होते. त्यांनी तीनशे वर्षे राज्य केले. या कालखंडात ब्राहाण सेनापती तर अनेक होऊन गेले. रेवादास दीक्षित व विसोत्तर दीक्षित हे राष्ट्रकूटांचे ब्राह्मण सेनापती फार शूर होते असे त्यांचे वर्णन शिलालेखात आहे. शिवाय गणराम व तक्षदत्त या ब्राह्मणांना धारातीर्थी मृत्यू आला म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे. हे सर्व ब्राह्मण सोमयाजी, वेदवेत्ते असेही होते. ब्राह्मण कुलाला भूषण असा त्यांचा गौरव कोरीव लेखांत आहे (राष्ट्रकूट, डॉ. आळतेकर, पृ. २५० ). यादवांचे नागरस, सोविदेव, शिवराज, खोलेश्वर, हेमाद्री हे सेनापती ब्राह्मण होते आणि शास्त्रपारंगतही होते. राजसेवा करील तो ब्राह्मण एक वर्षात ब्राह्मण्यापासून पतित होतो असे शास्त्र आहे. पण हे कधीच कोणी मानले नाही. ब्राह्मणांनी न्यायाधीश, मंत्री, सेनापती ही पदे तर भूषविलीच, पण राज्यकारभारातील इतरही अनेक प्रकारची सेवा ते मौर्य - काळापासून करीत होते. राष्ट्रकूटांच्या काळी तर अनेक ब्राह्मण राजसेवेत असल्याचे दिसते. वैद्यकीचा व्यवसाय मनूने ब्राह्मणांना वर्ज्य मानला आहे. अशा ब्राह्मणांना तो हीन मानतो. पण अनेक ब्राह्मण हा व्यवसाय करीत होते; इतकेच नव्हे तर त्यांना इतर ब्राह्मणांच्याप्रमाणेच मान व प्रतिष्ठाही मिळे. पल्लव राजांनी तर त्यांना अग्रहारही दिलेले आहेत. धर्मसूत्रांनी ( इ. स. पूर्व ६ वे शतक) ब्राह्मणांना शेती व व्यापार करण्यास परवानगी दिली आहे. पण ती मुनिमामार्फत, स्वतः नाही. पण राष्ट्रकूटकाळच्या स्मृतींनी असला आडपडदा ठेवलेला नाही. हारीत, पाराशर, आपस्तंब, बृहस्पती या स्मृतींनी व्यापार, शेती, लष्कर, सावकारी हे व्यवसाय ब्राह्मणांना आपद्धर्म म्हणून नव्हे, तर नित्याचे विहित म्हणून सांगितले आहेत आणि आपस्तंबाने तर सावकारी हा व्यवसाय ब्राह्मणांना आदर्श म्हणून सांगितला आहे (कित्ता, पृ. ३२७).

क्षात्रधर्म
 राज्य आणि युद्ध हा क्षत्रियांचा शास्त्रप्रणीत मुख्य व्यवसाय होय. आणि सातवाहन काळापासून यादव अखेरपर्यंत या दोन्ही क्षेत्रांत क्षत्रियांनी बहुमोल कार्य केले, हे इतिहासप्रसिद्ध आहे. चालुक्यांची दोन्ही घराणी - राष्ट्रकूट व यादव ही घराणी - क्षत्रिय होती. सातवाहन व वाकाटक यांच्या काळातही अनेक सेनापती क्षत्रियच होते. आणि सामंत घराणी तर बहुतेक क्षत्रिय होती. यजन, याजन इ. व्यवसायांखेरीज ब्राह्मणांना जसे स्मृतींनीच न्याय, मंत्रिपद इ. व्यवसाय सांगितले आहेत त्याप्रमाणे क्षत्रियांना सांगितलेले दिसत नाहीत. प्रजापालन, राज्यकारभार व युद्ध हाच त्यांचा शास्त्रमते एकमेव व्यवसाय होय. पण अशा शास्त्रवचनांना व्यवहारात फारसा अर्थ असणे कधीच शक्य नव्हते. कारण या व्यवसायात सर्व क्षत्रिय समाविष्ट होणे शक्यच नव्हते. आणि युद्ध हा सार्वकालिक उद्योग नसल्यामुळे तो कायमचा उपजीविकेचा व्यवसाय होणे केव्हाच शक्य नसते. कौटिल्याने कांबोज, सौराष्ट्र येथील क्षत्रियांचे वर्णन, वार्ताशस्त्रोपजीवी असे केले आहे. म्हणजे युद्धप्रसंगी ते क्षत्रिय शस्त्रावर उपजीविका करीत, पण एरवी शेती व व्यापार हाही व्यवसाय करीत असत. आपल्या कालखंडात हेच घडत असले पाहिजे. शिवाय महाभारत काळापासून सैन्यामध्ये सर्व क्षत्रियच असत असे नाही. ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत सर्व वर्णाचे लोक लष्करात भरती होत. राष्ट्रकूटांच्या काळापर्यंत तर ही प्रथा निश्चित होती. तेव्हा क्षत्रियांना अन्य व्यवसाय करणे अपरिहार्यच होते. क्षत्रिय हे व्यापार व शेती करतात हे त्या काळच्या परकी प्रवाशांनी लिहून ठेविलेच आहे.
 कलियुगात क्षत्रियच नाहीत असा एक सिद्धान्त या काळात रूढ होऊ पहात होता. महानंदी हा शैशुनाग वंशातला राजा. महापद्मनंद हा त्याला एका शूद्र स्त्रीपासून झालेला मुलगा. या महापद्मनंदाने परशुरामाप्रमाणे सर्व क्षत्रियांचा संहार केला, असे पुराणे म्हणतात. याचा अर्थ असा की तेव्हापासून म्हणजे इ. पू. ४ थ्या शतकापासून भारतात क्षत्रियच नाहीत. विष्णुपुराण, मत्स्यपुराण ( काळ इ. स. ३०० ते ६०० ) या पुराणांत हा विचार मांडलेला आहे. याचा त्या काळी प्रत्यक्षात कसलाच परिणाम झालेला दिसत नाही. चालुक्य, राष्ट्रकूट आणि भारतातील इतर अनेक राजवंश आपणांस क्षत्रिय म्हणवीत. आणि वेदशास्त्रपारंगत असे अनेक ब्राह्मण आचार्य त्यांचे पौरोहित्य करीत. त्यांच्या अश्वमेधासारख्या यज्ञालाही ब्राह्मणांची मान्यता होती. पण मुख्य म्हणजे कोणत्याही स्मृतींनी हा पुराणांचा दावा मान्य केला नाही. मागल्या शास्त्रकारांप्रमाणेच त्यांनी क्षत्रियांची कर्तव्ये इतर वर्णांप्रमाणेच सांगितली आहेत. मात्र येथून पुढल्या काळात एक गोष्ट दिसते. येथून पुढे पुराणधर्माचे वर्चस्व समाजावर बसू लागले. श्रुतिस्मृतीपेक्षा पुराणधर्म लोकांना जास्त मान्य होऊ लागला. त्याचा एक परिणाम असा झाला की ब्राह्मण हे क्षत्रियांची धर्मकृत्ये वेदमंत्राप्रमाणे न करता पुराणमंत्राप्रमाणे करू लागले. अकराव्या शतकातील मुस्लिम पंडित अल्बेरूणी याने हे लिहून ठेविले आहे. त्याच्या आधी किती काळ ही प्रथा पडली ते सांगणे कठीण आहे. पण या काळात क्षत्रिय वर्णाची प्रतिष्ठा मोठी असून ती या कालखंडाच्या अखेरपर्यंत टिकून होती असे दिसते.

वाणिज्य महत्त्व
 विद्येची उपासना हा ब्राह्मणांचा व्यवसाय, व समाजाचे संरक्षण हा क्षत्रियांचा. हे दोन उद्योग समाजधारणेस जितके अवश्य तितकाच धनोत्पादन हा वैश्य व्यवसायही अवश्य होय हे प्राचीन शास्त्रज्ञांनी चांगले जाणले होते. 'सर्व जग हे शेती व व्यापार यांवरच अवलंबून आहे, 'वार्तामूलो ह्ययं लोक:।', त्यामुळेच जगाचे पालनपोषण होत असते' असे महाभारतात म्हटले आहे (शांति ६८ - २५ ) कोशसंचयाचे महत्त्व युधिष्ठिराला सांगताना पितामह भीष्मांनी कृषिवाणिज्याचे महत्त्व विशद केले आहे. ते म्हणतात, 'हे राजा, कृषी, गोरक्ष व व्यापार आणि अशाच प्रकारचे दुसरे व्यवसाय लोकांकडून करवावे. हे उद्योग करणाऱ्यांना चोर किंवा अधिकारी यांच्यामुळे त्रास होत असेल तर त्यांमुळे राजा निंदेस पात्र होतो. राजाने अन्नपान व वस्त्रे यांच्या योगाने सदैव द्रव्यसंपन्न लोकांचा बहुमान करावा. हे भरतकुलोत्पन्ना, द्रव्यसंपन्न पुरुष हे राज्याचे मोठे अंग आहे. म्हणून तो सर्व प्राण्यांचे मूर्धस्थान होय, यात शंका नाही (ककुदं सर्व भूतानां धनस्थो नात्र संशयः । शां. ८८, ३० ). कृषि गोरक्ष्य वाणिज्यं लोकानां इहजीवनम् । शां । ८९, ७- शेती, पशुपालन व व्यापार यांवरच जगाची प्राणयात्रा अवलंबून असते हे सत्य महाभारतकार कधीही न विसरल्यामुळे, वैश्यांची मतेही त्यांनी कधी कमी लेखिली नाहीत. राजाच्या एकंदर ३७ मंत्र्यांपैकी २१ मंत्री वैश्य असावे असे त्यांनी सांगितल्याचे मागे म्हटलेच आहे. त्यावरून धनोत्पादन हा व्यवसाय व तो व्यवसाय करणारे वैश्य यांना समाजात त्या काळी मोटी प्रतिष्ठा होती हे स्पष्ट दिसते.

श्रेणी
 व्यापारी लोकांचे पूर्वी स्वतंत्र संघ असत. त्यांना श्रेणी किंवा पूग अशी नावे होती. सातवाहनांच्या काळापासून यादव अखेरपर्यंत कोरीव लेखांत अशा श्रेणींचे विपुल उल्लेख सापडतात. हिंदूंचा व्यापार व उद्योग यांचे श्रेणीव्यवस्था हे पुरातन काळापासून प्रधान अंग होते. सातवाहनांच्या काळी सर्व महाराष्ट्रभर अशा संघांचे जाळेच पसरलेले होते. सर्व व्यापार व उद्योग यांच्यावर यांचे नियंत्रण असे, यांच्या मोठ्या पेढ्याही असत. त्यांनी धर्मार्थ अनेक देणग्या दिल्याचे उल्लेख आढळतात. कोष्टी, सोनार, गवंडी, तांबट यांच्याही श्रेणींचा उल्लेख, सातवाहनकालीन त्रिरश्मी पर्वत, कार्ले, कुडे, भीमाशंकर येथील लेण्यांत आढळतो. या श्रेणींना इतके स्थैर्य व प्रतिष्ठा होती की धर्मार्थ दान देणारे लोक आपला निधी या संघांच्या पेढ्यांत ठेवीत असत. राष्ट्रकूटांच्या काळच्या अशा श्रेणींचे वर्णन डॉ. आळतेकर यांनी आपल्या ग्रंथात सविस्तर केले आहे ( राष्ट्रकूट, पृ. ३६८-७० ). बेळगाव, मनगोळी, कोल्हापूर, मिरज येथील लेखांच्या आधारे त्यांनी त्यांच्या कारभाराचेही वर्णन केले आहे. यातील काही लेख राष्ट्रकूटांच्या काळचे तर इतर अनेक कल्याणीचे चालुक्य व यादव यांच्या काळचेही आहेत. या श्रेणींना आपल्या श्रेणीपुरते स्वतंत्र उपकायदे करण्याचाही अधिकार असे. ते कायदे संघाच्या सर्व सदस्यांवर बंधनकारक असत. मनू, याज्ञवल्क्य व उत्तरकालीन स्मृतिकार यांनी असा दण्डक घालून दिला आहे की राजांनी या कायद्यांना मान्यता देऊन त्यांचा अमल करण्यास साह्यही केले पाहिजे.
 या श्रेणींना आपापले स्वतंत्र ध्वजही असत असे हरिवंशात वर्णन आहे. ही प्रथा दीर्घ कालपर्यंत चालू होती असे कोल्हापूरच्या लेखावरून दिसते. काही मोठ्या श्रेणींना छत्र व चामरे वापरण्याचाही अधिकार राजे देत असत. बदामी चालुक्यराज जगदेक- मल्ल १ ला (इ. स. १०१८ ते १०४० ) याने डंबळ येथील श्रेणीला असा अधिकार दिल्याचा उल्लेख डंबळ शिलालेखात आहे. या डंबळच्या श्रेणीचा ऐहोळी नगरीचे अधिपती असा निर्देश या लेखात आहे. ईस्ट इंडिया कंपनीला जसा राजसत्ता चालविण्याचाही अधिकार मिळाला होता तसाच अधिकार या श्रेणीला मिळाला असावा, असे डॉ.आळतेकर म्हणतात. अर्थात अशा श्रेणींना स्वतंत्र लष्कर ठेवण्याचा अधिकार होता हे ओघानेच आले. डंबळ व कोल्हापूर येथील लेखांत या श्रेणीच्या सदस्यांचा 'रणदेवतेचे प्रिय ' असा उल्लेख केलेला आहे. पाचव्या शतकातील मंदसोरच्या शिलालेखात संघसंदस्याचा, 'धनुर्धर, शत्रूंचा निःपात करण्यास समर्थ,' असा गौरव केलेला आढळतो. या संघांना सर्व भारतभर आपल्या व्यापारी मालाची ने-आण करावी लागे. तेव्हा मार्गातील चोर लुटारूंपासून आपले व आपल्या मालाचे रक्षण करण्यासाठी त्यांना लष्कर बाळगणे भागच होते. आपल्या कालखंडात दक्षिण भारताच्या पूर्वेला जावा- सुमात्रा या देशांशी व पश्चिमेला ग्रीस - रोम येथपर्यंत फार मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असे. त्या वेळी धर्मप्रसारासाठी ब्राह्मण, साम्राज्यासाठी क्षत्रिय व व्यापारासाठी वैश्य सर्व जगभर फिरत असत. त्यामुळे त्या वेळचा समाज जिवंत व समृद्ध होता. याचे श्रेय ब्राह्मण- क्षत्रियांइतकेच वैश्यवर्णालाही आहे.
 प्राचीन काळापासून धनोत्पादनाचे व ते करणान्या वैश्ववर्णाचे त्या काळच्या धुरीणांनी असे महत्त्व जाणले होते तरी, धर्मशास्त्रात मात्र या वर्णाची प्रतिष्ठा मागल्या काळापासूनच कमी होऊ लागली, असे दिसते. स्त्रियो वैश्यः तथा शूद्राः तेऽपि यांति परां गतिम् | असा गीतेत यांचा शूद्रांबरोबर हीनत्वद्योतक उल्लेख केलेला आढळतो. बौधायन सूत्रात, वैश्य हे शूद्रांशी सर्रास मिश्रविवाह करतात व त्यांच्या व्यवसायांतही फारसा भेद नाही, यामुळे वैश्य हे शूद्रसम होत, असे म्हटले आहे (१-११-४). बौधायन धर्मसूत्राचा काळ इ. पू. ६०० ते इ. पू. ३०० म्हणतात. महाभारत साधारण याच काळातले आहे. पण त्यात तर सर्व वर्णातच सर्रास संकर चालू आहे, असे म्हटले आहे. तेव्हा संकरामुळे वैश्यांना हीनपद आले हे म्हणणे कितपत सयुक्तिक आहे याची शंका येते. याच काळात बौद्ध व जैन धर्माचा प्रसार होत होता. त्यातील अहिंसा तत्त्वामुळे वैश्यांनी हिंसाप्रधान असा शेतीचा धंदा सोडून दिला. आणि त्या वेळी ज्या वैश्यांनी तो सोडला नाही त्यांना अहिंसाश्रयी वैश्य हीन मानू लागले. असे कुलगुरू चिंतामणराव वैद्य यांनी म्हटले आहे. हे मतही ग्राह्य मानणे कठीणच आहे. ब्राह्मण, क्षत्रिय हे वर्णसुद्धा प्रारंभी जरा आडपडद्याने व पुढे राजरोस शास्त्राधाराने शेती करीत असत. पण त्यामुळे त्यांना हीनत्व आले नाही. मग वैश्यांनाच का यावे, हे कळत नाही. याचा अर्थ असा दिसतो की धर्मशास्त्राचे दंडक व प्रत्यक्ष व्यवहार यात वैश्यांच्या बाबतीतही त्या काळी खूप अंतर पडले होते. सर्व भारतभर व जगभर संसार करणारे, रणविद्येतही निपुण असणारे, धनदौलतीचा प्रचंड व्यवहार करणारे असे जे वैश्य त्यांना शूद्रसम म्हणण्यात काहीच अर्थ नाही. हे वैश्य अनेक वेळा राज- सत्तारूढ होऊन साम्राज्येही स्थापीत व चालवीत हे मागे गुप्त, हर्ष यांची उदाहरणे देऊन सांगितलेच आहे. तेव्हा वंशशुद्धीच्या काही हेकट कल्पनांनी धर्मशास्त्रकार त्यांना हीन गणू लागले असे दिसते. प्रारंभी समाज किंवा सत्ताधारी राजे हे शास्त्र मानीत नसत. पुढे त्यांच्याही मनावर त्या शास्त्राचा प्रभाव पडू लागला तेव्हा मात्र या वर्गाला आणि सर्व वर्णांना हीनकळा आली व समाजाचा अधःपात झाला.

शूद्र वर्ण
 चातुर्वण्यांतील विवाहबंधने व व्यवसायबंधने यांविषयी येथवर विचार केला. त्यावरून असे दिसले की या कालखंडात वर्णभेद जरी अस्तित्वात होते तरी त्यांना तीव्रता आलेली नव्हती. अनुलोमविवाह तर शास्त्रमान्य व रूढ होते पण प्रतिलोमही अगदी वर्ज्य नव्हते, आणि प्रतिलोमसंततीला कोणी शूद्रही गणीत नसत. व्यवसाय- बंधने तर फारच ढिली होती. एक यजन याजन हा ब्राह्मणांचा व्यवसाय सोडला तर सर्व वर्गांचे लोक सर्व वर्णाचे व्यवसाय करीत असत. वरिष्ठ वर्णाच्या लोकांना खालच्या वर्णाचे व्यवसाय करण्यास शास्त्राची अनुज्ञा होती, पण खालच्या वर्णांना वरिष्ठ व्यवसाय करण्यास परवानगी नव्हती, असा एक समज आहे. व्यवहारात तर तो खोटा होताच. महाभारताअन्वये शूद्र, वैश्य यांना मंत्रिपद व राजपदही वर्ज्य नव्हते. पण स्मृतिकारांनी तशी परवानगी दिलेली आहे. प्रथम आपद्धर्भ म्हणून व पुढे नित्याची. वसिष्ठ स्मृतीने 'आत्मत्राणे वर्णसंकरे वा' आत्मरक्षणासाठी किंवा वर्णसंकर थांबविण्यासाठी ब्राह्मण व वैश्य यांनी शस्त्र घ्यावे असे सांगितले आहे. याज्ञवल्क्य, बृहद्यम, उशनस, देवल इ. स्मृतिकारांनी शूद्राला व्यापार, कारागिरी, उद्योग हे व्यवसाय आपद्धर्म म्हणून नव्हे, तर नित्याचे विहित म्हणून सांगितले आहेत. प्रत्यक्षात शूद्र राजपदीही विराजमान होत हे आपण पाहिलेच आहे.

अन्नव्यवहार
 जे विवाह व व्यवसाय याविषयी तेच धोरण अन्नपानाविषयीही होते. शूद्रांघरी उत्तम पक्काने असली तरी ती द्विजांनी कशी सेवावी, अशी पृच्छा ज्ञानेश्वर करतात. पण पूर्वीच्या काळी असली बंधने नव्हती. मध्ययुगाविषयी लिहिताना कुलगुरू चिंतामणराव वैद्य म्हणतात, 'या कालातील विशेष लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे उच्च जातींत एकत्र होणारा अन्नपानादी व्यवहार ही होय. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे सर्व जातींचे लोक प्रसंगविशेषी एकत्र भोजन करीत. एवढेच काय, तर विशिष्ट शूद्रांसमवेतही भोजन करण्यास त्यांस प्रत्यवाय वाटत नसे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी एकत्र भोजन करू नये, असे निषेधपर स्मृतिवचन सापडत नाही. तर उलट अशा भोजनास संमतिदर्शक अशीच वचने सापडतात. व्यासस्मृतीत असे सांगितले आहे की 'धर्मेण अन्योन्य भोज्यान्नाः द्विजास्तु विदितान्वयाः ।' सर्व द्विजांनी - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी एकत्र भोजन करावे. (मात्र पंक्तीला बसताना सर्व द्विजच आहेत ही खात्री करून घ्यावी.) त्याचप्रमाणे, नापित, गुराखी व आपल्या कुलाचा (शूद्र) मित्र यांच्याशी हे शूद्र असले तरीही अन्नोदक व्यवहार करण्यास हरकत नाही. वसिष्ठ स्मृतीतही असे वचन आढळते अनुलोम विवाहाप्रमाणेच एकत्र भोजनाच्या प्रघाताने समाजात एकजीवपणा व जोम उत्पन्न होई, यात शंका नाही.' (मध्ययुगीन भारत, भाग २, पृ. ३२९ ).

सहभोजन
 डॉ. आळतेकर यांनी या विषयासंबंधी पुढीलप्रमाणे विवेचन केले आहे. 'आपस्तंब, बौधायन व इतर धर्मसूत्रकार सर्व जातींच्या सहभोजनास मुक्त अनुज्ञा देतात. पण पुढील स्मृतिकार ते निषिद्ध मानतात. अंगिरसाने ब्राह्मणाला शूद्राशी सहभोजन वर्ज्य केले. क्षत्रियाशी सहभोजनसुद्धा धार्मिक उत्सवप्रसंगी व वैश्याशी आपत्काळी विहित होय. यम आणि व्यास यांनी ब्राह्मणाला फक्त स्वजातीपासून पक्वान्न भिक्षा घेण्यास अनुज्ञा दिली आहे (अंगिरस, यम, व्यास इ. स. ६०० ते ९०० ). अल्बेरूणीने लिहून ठेविले आहे की ब्राह्मण काही दिवस शूद्रान्न घेईल तर तो बहिष्कृत होत असे. याचा अर्थ असा की या उत्तरकालीन स्मृतींनी त्रैवर्णिकांनाही सहभोजन निषिद्ध ठरविले. याच काळात अनुलोम विवाह बंद होत आले होते. शिवाय दक्षिणेतील ब्राह्मणांनी मांसाहार वर्ज्य केला होता. त्यामुळे सहभोजन दिवसेंदिवस अशक्य होत गेले. वास्तविक बन्याच वैश्यांनीही मांसाहार वर्ज्य केला होता. तेव्हा त्यांच्या बरोबर भोजनास हरकत नव्हती. पण त्यांना स्मृतींनी शूद्रसम ठरविले होते. यामुळे सह- भोजनाची प्रथा लुप्त झाली.' ( राष्ट्रकूट, पृ. ३३९).
 पूर्वी मिश्रविवाह होते, व्यवसायसंकर होता आणि एकत्र अन्नपान व्यवहारही होता. या तिन्ही रूढी समाजाच्या ऐक्याला पोषक व संवर्धक होत्या. त्या इ. सनाच्या नवव्या दहाव्या शतकात नष्टप्राय होऊ लागल्या. त्यामुळे समाजाची एकरूपता नाहीशी होऊन तो विघटित झाला, परकी आक्रमणास बळी पडला.

अस्पृश्य
 ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या हिंदुसमाजाच्या घटकांचा विचार झाला. आता अस्पृश्यांचा विचार करावयाचा. पंडित सातवळेकर, श्रीधरशास्त्री पाठक, म. म. काणे या पंडितांचे असे निश्चित मत आहे की पूर्वकाळी आजच्या सारखी अस्पृश्यता हिंदुममाजात मुळीच नव्हती. काणे म्हणतात की वेद वाङ्मयात चर्मकार, चांडाळ पौल्कस ही नावे आहेत, पण त्या जाती अस्पृश्य आहेत असा कोठेही निर्देश नाही. आरंभीच्या काही स्मृती चारच वर्ण मानतात. मनूच्या मते पाचवा वर्णच अस्तित्वात नाही. याचा अर्थ असा की त्या काळी आजच्या अस्पृश्यांची गणना शूद्रवर्णातच होत असे. आणि शूद्राच्या हातचे अन्न खाण्यासही ८ व्या ९ व्या शतकापर्यंत शास्त्रकारांची हरकत नव्हती. वरील तीनही पंडितांच्या मते जन्मजात अस्पृश्यता हिंदुधर्मशास्त्रात फक्त चांडाळाच्या बाबतीत सांगितली आहे. ब्राह्मण स्त्री व शूद्र पुरुष यांचे अपत्य म्हणजे चांडाळ, तोच फक्त जन्माने अस्पृश्य. श्रीधरशास्त्री पाठक म्हणतात, 'ही अस्पृश्यता फक्त त्या व्यक्तीपुरती आहे. चांडाळ म्हणून एक जात आहे ती यामुळे अस्पृश्य ठरत नाही. शूद्र-ब्राह्मणी यांच्या संकरापासून झालेली अपत्ये यांना लावलेला चांडाळ शब्द पारिभाषिक आहे, तो जातीचा वाचक नाही. चांडाळ जाती म्हणून आहे ती शूद्र आहे, म्हणून ती स्पृश्यच आहे. वरील पारिभाषिक चांडाळ ते मात्र खरे जन्मजात अस्पृश्य. इतर काही अस्पृश्य शास्त्रात सांगितले आहेत, ते जन्मजात नव्हेत. ते केवळ त्यांच्या हीन व्यवसायामुळे अस्पृश्य झालेले असतात आणि तेही तेवढ्या वेळेपुरते. त्यातून ते मोकळे झाले, स्वच्छ झाले की ते स्पृश्य होतात. पारिभाषिक चांडाळ सोडले तर इतरांच्या बाबतीत जी अस्पृश्यता मानली जाते ती उत्तरकालीन रूढीमुळे आलेली आहे. तिला शास्त्राधार नाही. रूढी- वादी लोकांनी आपल्या लहरीप्रमाणे हा कडकपणा अवलंबिलेला आहे (अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ, भाग ४ था व ५ वा). अस्पृश्यता पूर्वी नव्हती. अस्पृश्यांच्या दर्शनाने द्विज अपवित्र होतात, त्यांच्या सावलीने विटाळ होतो, असले मूर्ख दंडक मनुयाज्ञवल्क्यांच्या स्वप्नातही नव्हते. १० व्या शतकात होऊन गेलेला मनुस्मृतीचा टीकाकार मेधातिथी यानेही असेच मत मांडले आहे. त्यानंतरच्या काळात सर्वच जातिबंधने कडक होऊ लागली. दूरीकरणाची, भेदाची प्रवृत्ती वाढत चालली आणि त्यानंतर अस्पृश्यता निर्माण झाली ( म. म. काणे, धर्मशास्त्र, खंड २ रा प्रकरण ४ थे ). या बाबतीत काणे यांनी व्याघ्रपाद, बृहस्पती, कुल्लुक, अपरार्क यांचा निर्देश केला आहे. आपल्या टीकांमधून त्यांनी अस्पृश्यतेचे शास्त्र सांगितले आहे. पूर्वपरंपरेला ते मुळीच मान्य नाही.

स्त्री-जीवन
 भिन्न वर्ण व भिन्न जाती यांच्या परस्पर संबंधाइतकाच स्त्रीपुरुष संबंध हाही समाजकारणातील एक महत्त्वाचा विषय आहे. वरील घटकांच्या परस्परसंबंधावर समाजाचा उत्कर्षापकर्ष जसा अवलंबून आहे तसाच किंवा त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात तो स्त्रीपुरुषसंबंधावर आहे. म्हणून या कालखंडातील महाराष्ट्रातील स्त्री- जीवनाचा आता अभ्यास करावयाचा आहे.

स्त्री-रत्ने
 भारतातील स्त्रीजीवनाचा इतिहास वरवर पाहिला तरी असे दिसते की या भूमीत स्त्री हा शब्द त्याग, निष्ठा, चारित्र्य, सेवा, कर्तव्यबुद्धी, आत्मार्पण, यांशी समानार्थक झालेला आहे. सीता, सावित्री, दमयंती, द्रौपदी, पद्मिमी, जिजामाता, लक्ष्मीबाई ही नावे उच्चारताच वरील सर्व पवित्र भावना चित्तात उदित होतात आणि मस्तक नम्र होते. पण याच वेळी मनामध्ये दुसरा एक खेदकारक विचार उभा राहतो व मन उद्विग्न होऊन जाते. ज्या भारतभूमीत ही स्त्रीरत्ने जन्माला आली आणि ज्या हिंदुसमाजाला त्यांनी आपल्या असामान्य पावित्र्याने मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली त्याच भूमीतल्या त्याच हिंदुसमाजाने भारतीय स्त्रीची जेवढी अप्रतिष्ठा करता येईल तितकी केली आहे. स्त्री ही चंचल आहे, ती नित्य विकाराधीन असते, स्वातंत्र्याला ती नालायक आहे, तिला बंधनातच ठेविली पाहिजे, ती मोक्षमार्गातील धोंड आहे, शहाण्याने स्त्रीच्या नादाला लागू नये, तिला विद्येचा, वेदमंत्राचा, धनाचा कसलाही हक्क नाही असे तिच्याविषयीचे अनेक उद्गार हिंदूंच्या धर्मशास्त्रात व इतर वाङ्मयात आढळतात. ज्या लोकांची अशी विचारसरणी आहे त्यांच्या समाजात स्त्रीला किती प्रतिष्ठा लाभेल हे कळतेच आहे.
 त्यातल्या त्यात मनाला दिलासा देणारी एक गोष्ट आहे, ती ही की प्राचीन काळी स्त्रीकडे बघण्याची इतकी अनुदार व हीन दृष्टी नव्हती. ही विचारसरणी उद्भवलीच नव्हती असे नाही. श्रीरामचंद्रांना सीतेचा त्याग करणे भाग पडले ते त्याच काळात. द्रौपदीला धर्मराजाने पणाला लाविले ते त्याच काळात भर सभेत तिला विवस्त्र करण्याचा कौरवांनी विचार केला तो त्याच काळात आणि अशा वेळी तात्विक कारण सांगून भीष्मद्रोण मूग गिळून बसले ते त्याच काळात. हरिचंद्राने तारामतीला कर्जफेडीसाठी विकून टाकली ही कथा पुराणकाळाचीच आहे. या कथा स्त्रीजीवनाला काही मोल असल्याच्या द्योतक नव्हेत. पण त्या काळचा एकंदर इतिहास पाहता उत्तर काळातल्यापेक्षा त्या प्राचीन काळचे स्त्रीजीवनाचे चित्र पुष्कळच जास्त उदात्त व विलोभनीय होते यात शंका नाही.

स्त्री-वेदाधिकार ?
 एकूण एक सर्व स्मृतिकारांच्या मते स्त्रीला वेदाधिकार नाही. तिने वेदपठन करावयाचे नाही, वेदमंत्र म्हणावयाचे नाहीत, तिचे संस्कारही वेदमंत्रांनी करावयाचे नाहीत, असा दण्डक सर्व स्मृतिकारांनी घातलेला आहे. पण वेदसंहिता पाहिली तर असे दिसते की प्रत्यक्ष वेदमंत्रांची रचना स्त्रियांनी केलेली आहे. अपाला, विश्ववारा, घोषा, लोपामुद्रा, सिकता, निवावरी अशी जवळ जवळ वीस स्त्रियांची नावे ऋग्वेदातील सूक्तांच्या कर्त्या ऋषींच्या नावांच्या यादीत आढळतात. हिंदुधर्माचा वेद हा मूलाधार मानला जातो. त्या वेदाची रचना करण्याचा अधिकार पुरुषाइतकाच स्त्रियांना आहे, हे प्राचीनांना निश्चित मान्य असले पाहिजे. त्यांच्या मताने स्त्रियांना वेदाधिकार आहे की नाही हा प्रश्न बालिश व हास्यास्पदच ठरला असता. वेदमंत्राइतकाच ब्रह्मविद्येचाही स्त्रियांना अधिकार होता. मैत्रेयी, गार्गी, वाचक्नवी, वडवा, या ब्रह्मवादिनी स्त्रिया उपनिषदात प्रसिद्ध आहेत. मीमांसा, व्याकरण या शास्त्रांचे अध्ययन व अध्यापनही स्त्रिया प्राचीन काळी करीत होत्या. आचार्या, उपाध्याया ही अभिधाने व्याकरणकारांनी त्यांच्यासाठी निराळी योजिलेली आहेत. आचार्यानी म्हणजे आचार्यांची पत्नी. पण आचार्या म्हणजे स्वतः अध्यापन करणारी पंडिता. प्राचीन समाजधुरीणांचे स्त्रीच्या बुद्धीविषयी, तपश्चर्येविषयी हीन मत नसल्यामुळे त्यांनी तिला ज्ञानाच्या क्षेत्रातले सर्व अधिकार देऊन टाकले होते. मुलांप्रमाणे मुलींचे त्या काळी उपनयन होत असे. त्यांनाही वेदविद्या शिकविली जात असे. आणि त्या संध्याही करीत असत. सीता संध्या करीत असल्याचा उल्लेख रामायणात आहे. स्त्रीला उत्तम शिक्षण मिळाले तरच ती उत्तम संसार करू शकेल, असे मत अथर्ववेदाने मांडले आहे. काही स्त्रिया त्या काळी अविवाहित राहून आजन्म विद्येची उपासना करीत व अध्ययन-अध्यापनाला वाहून घेत. स्त्रीचा हा अधिकार त्या काळच्या समाजाने मान्य केला होता.

प्रौढ विवाह
 डॉ. आळतेकरांच्या मते इ. पू. तिसऱ्या शतकापर्यंत मुलींच्या विवाहाचे वय १५-१६ असे होते. त्यानंतर धर्मशास्त्रकारांचे मत बदलले आणि मुलींच्या विवाहाचे वय कमी होऊन ऋतूत्तर विवाह हे पाप मानले जाऊ लागले; आणि ८ व्या ९ व्या शतकापर्यंत नऊ, दहा वय मुलींच्या विवाहाला योग्य मानले जाऊ लागले. ब्रह्मपुराणात तर चौथ्या वर्षी मुलीचे लग्न करावे असा उपदेश केला आहे. अर्थात बालविवाहाच्या रूढीबरोबर मुलींचे शिक्षणही संपुष्टात आले; आणि मग समाजातली त्यांची प्रतिष्ठाही कमी होऊ लागली (पोझिशन ऑफ विमेन इन् हिंदू सिव्हिलिझेशन, डॉ. आळतेकर, पृ. १ ते २५ ).

स्त्री-निंदा
 आपल्या कालखंडाच्या प्रारंभीच्या पाच-सहाशे वर्षीच्या काळातील प्रमुख शास्त्र- ग्रंथ म्हणजे महाभारत, मनुस्मृती व याज्ञवल्क्य स्मृती हे होत. या ग्रंथांनी स्त्रियांना वेदाध्ययन सर्वस्वी वर्ज्य मानले आहे. विवाहाशिवाय त्यांचा कोणताही संस्कार वेदमंत्रांनी करावयाचा नाही, असा त्यांचा दंडक आहे. विवाहानंतर पतिसेवा हाच त्यांचा यज्ञ व हेच त्यांचे वेदाध्ययन, असे या ग्रंथांचे मत आहे. स्त्रीला कसल्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही, बालपणी पिता, तरुणपणी भर्ता व वृद्धापकाळी पुत्र हे त्यांचे रक्षणकर्ते होत. धार्मिक व्रतवैकल्याचेही स्वातंत्र्य त्यांना पुराणांनी दिलेले नाही. पतीच्या अनुज्ञेवाचून ती आचरली तर त्यांचे फळ मिळत नाही, असे पुराणे म्हणतात. दासाप्रमाणेच स्त्रियांना धनाचाही हक्क नाही. त्यांचे जे स्वामी त्यांची मालकी त्यांच्या धनावर असावयाची. 'स्त्रीणां अष्टगुणः कामः ।' असे कौटिल्य म्हणतो. तर स्त्रिया पुरुषांचे रूप पाहात नाहीत, वय पाहात नाहीत. तो केवळ पुरुष आहे, एवढेच त्यांना पुरते, असे मनूने म्हटले आहे ( ९.१४ ). स्त्रिया फार चंचल स्वभावाच्या असतात. सत्वर मोहवश होतात. त्यामुळे कितीही सावधगिरी ठेविली तरी त्या पतीशी प्रतारणा करतातच, असेही तो म्हणतो ( ९.१५ ).

स्त्री कर्तृत्व
 ही शास्त्रवचने दिली ती त्या काळी कलौघ कसा बदलला होता हे दाखविण्यासाठी. वैश्यशूद्र यांच्याविषयी त्या काळात कडक दण्डक असूनही प्रत्यक्षात त्याची कडक अंमलबजावणी होतच असे असे नाही, हे वर सांगितलेच आहे. स्त्रियांच्या बाबतीत असेच होते. या काळी स्त्री जीवनाच्या विकासाला बाधक असे जरी शास्त्रनियम रचले गेले तरी, पुढे दीर्घकाळपर्यंत स्त्रीला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात व्यक्ति- विकासास अवसर मिळत गेला व त्यामुळे स्त्रिया कर्तबगार होऊ शकल्या. इ. सनाच्या अकराव्या बाराव्या शतकात मात्र स्त्रीची सर्व बाजूंनी कोंडी झाली व तिचे जिणे कष्टाचे व विद्याविहीन होऊ लागले.
 आपल्या कालखंडातील महाराष्ट्र- स्त्रियांच्या कर्तृत्वाची काही उदाहरणे प्रथम पाहू. सातवाहन सम्राट सातकर्णी १ला (इ. स. पूर्व १९४ - १८५ ) याची राणी नागनिका ही मोठी कर्तबगार स्त्री होती. महारथी अणकथिगे याची ही कन्या. सातकर्णी निधन पावला त्या वेळी वेदश्री, सतिश्री ही त्याची मुले लहान होती. त्या वेळी अनेक वर्षे नागनिकेने संन्यस्त वृत्तीने राहून साम्राज्याचा कारभार पाहिला. नाणे घाटातील सातवाहन कुळातील स्त्रीपुरुषांचे पुतळे व लेख तिनेच कोरविले आहेत. सातवाहनांचा अत्यंत विख्यात सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी (इ. स. ७२- ९५ ) याची माता बलश्री ही अशीच असामान्य स्त्री होती. या सातकर्णीने शकांच्या दास्यातून महाराष्ट्राला मुक्त केले. त्याचे श्रेय विद्वानांच्या मते त्याच्या मातेलाच आहे. यामुळे म. म. मिराशी यांनी गौतमी बलश्री व सातकर्णी यांची तुलना जिजामाता व शिवछत्रपती यांशी केली आहे ( संशोधनमुक्तावली, सर २, १६७ - १७८ ). नाशिकच्या सातवाहन लेण्यात आपल्या पुत्राच्या गौरवाचा लेख हिनेच कोरविला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील तिसरी विख्यात राणी म्हणजे वाकाटक नृपती द्वितीय रुद्रसेन याची अग्रमहिषी प्रभावती गुप्ता ही होय. गुप्त सम्राट चंद्रगुप्त याची ही कन्या. पतीच्या मागे पुत्र लहान असल्यामुळे हिने १२ वर्षे राज्यकारभार पाहिला. हिने दिलेल्या दोन ताम्रपटांवर हिची सर्व माहिती आज उपलब्ध झाली आहे. हिच्या साह्यार्थ हिचा पिता चंद्रगुप्त याने आपल्या दरबारातील अधिकारी व मुत्सद्दी पाठविले होते. त्यातच कविकुलगुरू कालिदास हाही होता असा विद्वानांचा तर्क आहे. पुढील काळातही राजप्रतिनिधी म्हणून किंवा राज्यपाल म्हणून शासन करणाऱ्या अनेक स्त्रिया होऊन गेल्या. बदामी चालुक्यराज विक्रमादित्य याच्या भावाची स्त्री विजयभट्टारिका ही राज्यपाल होती. कल्याणी चालुक्यराज सोमेश्वर ( इ. स. १०५३) याची राणी मेलादेवी ही वनवासी प्रांताची राज्यपाल होती. त्याची दुसरी राणी केतलादेवी ही पोन्नवदची राज्यपाल होती. जयसिंहाची बहीण अक्कादेवी ही हानगलच्या कदंब घराण्यात दिली असून जयसिंहाच्या कारकीर्दीत किसुकाड, तोरगरे, मासवाडी या विभागांचा कारभार पाहात असे. तिला तिच्या गुणांवरून 'गुणाड वेदांगी ' ( सद्गुणमूर्ती) व ' एकवचनी' अशा पदव्या मिळाल्या होत्या. तिला तिच्या शौर्यावरून रणभैरवीही म्हणत. काही काळ विजापूर जिल्ह्यातील विक्रमपूर ही तिची राजधानी होती. गोकाककडील बंड मोडण्यासाठी तिने इ. स. १०४७ मध्ये गोकाकला वेढा घातला होता (बांबे गॅझेटियर, जनरल चॅप्टरस्, ट. ४३५ ). विजयादित्याची थोरली बहीण कुंकुमदेवी परीगेरीचा कारभार पहात असे (इ. स. १०७७ ) सहावा विक्रमादित्य याची पट्टराणी लक्ष्मीदेवी एकंदर १८ अग्रहारांचा कारभार पहात असे ( इ. स. १०९५ ). ( डॉ. आळतेकर, राष्ट्रकूट, पृ. १५४ )
 इ. सनाच्या तेराव्या शतकानंतर नृत्य, गायन, चित्र या कला स्त्रियांना अगदी वर्ज्य मानल्या गेल्या. कुलहीन स्त्रियांचे ते काम होय, असे मत समाजात रूढ झाले. पण त्या पूर्वीच्या काळी राजघराण्यांतील स्त्रियाही या कलांचा मनोभावे अभ्यास करीत असत, असे तत्कालीन काव्यनाटकांवरून दिसते. सम्राट हर्ष याची बहीण राज्यश्री ही नृत्यगायनादी कलांत निपुण होती. शकुंतलेची सखी अनसूया हिने चित्रकला अभ्यासली होती. तिला इतिहासज्ञानही होते. मालविका तर नृत्यगायनाचे नियमित पाठ घेत असे. तिची परीक्षा एका तपस्विनीने घेतली, यावरून तप व कला यांत विद्वेष नव्हता, असे दिसते. रत्नावलीतील सागरिका आपल्या प्रियाचे चित्र वाढते. मालतीमाधवातील मालतीही असेच चित्र काढते. प्रियदर्शिकेत नृत्य, गायन, वादन या उच्चकला मानलेल्या असून, तरुण तरुणींनी त्यांचा अभ्यास आवर्जून करावा, असे सांगितले आहे. वात्स्यायनाने आपल्या कामसूत्रात स्त्रियांनी ६४ कलांचा अभ्यास करावा असे आग्रहाने प्रतिपादिले आहे. त्याने आदर्श गृहिणीचे चित्र काढले आहे; त्यात संसारातील सर्व जमाखर्चाचे ज्ञान तिला असावे असे सांगितले आहे. गुप्त कालातील साहित्यावरून असे दिसते की थोर कुळातील स्त्रिया व आश्रमवासी स्त्रिया इतिहास व पुराणे यांचे वाचन करीत असत व काव्यरचनाही करीत असत. गाथासप्तशतीत अनेक स्त्रियांच्या गाथा समाविष्ट केलेल्या आहेत, हे प्रसिद्धच आहे. पुढील काळात स्त्रियांसाठी स्वतंत्र शिक्षणसंस्था होत्या व काही ठिकाणी सहशिक्षणही होते असे दिसते. 'मालतीमाधवा'तील कामंदकी हिचे शिक्षण नायकाच्या वडिलांच्या बरोबर एकाच गुरूच्या आश्रमात झाले. त्या वेळी त्या आश्रमात इतरही अनेक विद्यार्थिनी होत्या. 'उत्तररामचरिता'तील तपस्विनी आत्रेयी हिचे शिक्षण वाल्मीकींच्या आश्रमात लव आणि कुश यांच्या बरोबर झाले होते. आणि त्यानंतर ती दंडकारण्यात अगस्त्यांच्या आश्रमात वेदान्त अध्ययनासाठी आली होती. विद्वानांचा असा तर्क आहे की कवींनी ही चित्रे समकालीन जीवनावरून रंगविली असावीत ( क्लासिकल एज - हिस्टरी ॲड कल्चर ऑफ इंडियन पीपल, सं. डॉ. मुनशी, पृ. ५६३).

बालविवाह
 बालविवाहाविषयी वर निर्देश आलाच आहे. या रुढीमुळे स्त्रीचे विद्याध्ययन खुंटते आणि तिच्या एकंदर मनोविकासाची सर्व संधी नष्ट होते आणि ती केवळ चूल व मूल यांची अधिकारी होऊन बसते. पण ही रूढी प्राचीन काळी नव्हती. गाथासप्तशतीतील काही गाथा देऊन त्या काळी मुलींचे विवाह प्रौढपणी होत असत, असे स. आ. जोगळेकर यांनी दाखविले आहे. त्याच ठिकाणी डॉ. भांडारकर, डॉ. आळतेकर यांच्या ग्रंथाच्या आधारे आश्वलायन, बौधायन, हिरण्यकेशी इ. या धर्मसूत्रांतील वचनांचे निर्देश करून विवाहसमयी मुली प्रौढ असत या मताला शास्त्रग्रंथांची प्रमाणेही त्यांनी दिली आहेत (गाथासप्तशती, पृ. २०२ ). कुलगुरू चिंतामणराव वैद्य यांच्या मते हर्षाच्या काळापर्यंत या देशात बालविवाह रूढ नव्हता. बाणाच्या हर्षचरितातील राज्यश्रीच्या विवाहवर्णनाच्या व स्वतः बाणाच्या विवाहाच्या आधारे त्यांनी हे अनुमान काढले आहे. त्यानंतरच्या काळात मात्र हळूहळू बालविवाह रूढ होऊ लागले, असे ते म्हणतात. पराशर, व्यास हे या काळातील स्मृतिकार होत. त्यांनी आठ ते दहा वर्षापर्यंतच मुलींचा विवाह झाला पाहिजे असे शास्त्र सांगितले आहे, आणि तसे न न केल्यास पित्याला भ्रूणहत्येचे पातक लागते असे म्हटले आहे. डॉ. आळतेकरांनी आपल्या 'राष्ट्रकूट' या ग्रंथात बृहद्यम, संवर्त, यम, शंख, इ. स्मृतिकारांच्या वचनांचा निर्देश करून याच मतास दुजोरा दिला आहे. इ. स. ७५३ ते ९७३ हा राष्ट्रकूटांचा काळ होय. वरील स्मृतिकार त्या काळातले होत. त्यांनी कन्येचा ऋतुपूर्वकाली विवाह न करणाऱ्या पित्याला किती भयंकर पातके लागतात त्याचे सविस्तर वर्णन केले आहे. अल्बेरुणीच्या ग्रंथावरूनही त्याच्या काळी म्हणजे दहाव्या शतकात बालविवाहाची रूढी दृढमूल झाली असल्याचे दिसते, असे ते म्हणतात. ( डॉ. आळतेकर, राष्ट्रकूट, पृ. ३४२).

विधवा-विवाह वंदी
 एकीकडून बालविवाहाचे शास्त्र सांगून त्याच काळात स्मृतिकारांनी विधवा विवाहास बंदी घातली आणि स्त्रीजीवन निर्माल्यवत करून टाकले. स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व आहे, तिच्या जीवनाला स्वतंत्र प्रतिष्ठा आहे, हे या शास्त्रकारांना व तत्कालीन समाजाला मान्यच नाही. मनूने अक्षतयोनी स्त्रीच्या पुनर्विवाहास परवानगी दिली आहे ( ९. १७६ ). अशा विवाहापासून झालेल्या पौनर्भव पुत्रालाही मान्यता दिली आहे. पण अन्यत्र ( ९. ६५) विधवा-विवाहाचा निषेध केला आहे. पुढील काळात तर उत्तरोत्तर स्मृतिकार पुनर्विवाहाचा अती तीव्र निषेध करू लागले. त्यातही पराशर, नारद व लघुसातातप यांनी कुमारी विधवांच्या विवाहास अनुज्ञा दिली आहे. पण अंगिरस व लघु आश्वलायन यांनी वधू केवळ वाग्दत्ता असली, आणि नियोजित वर मृत्यू पावला असला तरीही, तिचा विवाह दुसऱ्याशी करू नये, असा नियम सांगितला आहे. कलिवर्ज्य प्रकरणात व पुढील काळात स्मृतींच्या आधारे धर्मशास्त्र सांगणारे निबंधकार यांनी एकमुखाने स्त्रीचा पुनर्विवाह निषिद्ध मानला आहे. यासंबंधी लिहिताना कुलगुरू वैद्य लिहितात, 'पतिनिधनानंतर वैधव्यदशेत आयुष्य कंठावयाची चाल हिंदुसमाजात फार पुरातन कालापासून चालत आली आहे व या कालात ( इ. स. ८०० - १००० ) त्या चालीत बदल झाला नसावा हे उघड आहे. इतकेच काय, पण या कालातच या चालीचे हिडीस व दैन्यवाणे स्वरूप प्रगट झाले. समाजात बालविवाहाची चाल रूढ झाल्यामुळे बालविधवांची संख्या फार झाली असावी व हल्लीप्रमाणेच बालविधवांची स्थिती तेव्हा अत्यंत कारुणिक झाली असेल' ( मध्ययुगीन भारत, भाग २ रा, पृ. ३३५ ). तेव्हा साधारणतः असे दिसते की धर्मशास्त्राचा प्रारंभापासूनच विधवा-विवाहाविरुद्ध कटाक्ष आहे. पतीच्या मागे स्त्रीने व्रतस्थ राहून, धर्माचरणात निमग्न राहून काल कंठावा असाच सर्वांनी उपदेश केलेला आहे.
 पण अनेक शास्त्रकारांना पतीच्या मागे स्त्रीने जिवंत रहावे हेच मान्य नाही. तिने सती जावे हाच तिचा श्रेष्ठ धर्म होय असे त्यांचे मत आहे. महाभारत, रामायण या ग्रंथांत सतीची उदाहरणे सापडतात. पण इतिहासकाराच्या मते ती अपवादात्मक होत. पुढल्या काळात मात्र काही स्मृतिकार या चालीचा आग्रहाने पुरस्कार करू लागले. बृहस्पतीने विकल्पाने सहगमन सांगितले आहे. पण शंख, अंगिरस व हारीत यांचा, सती गेलेच पाहिजे, हा दण्डक आहे. तरी त्याच काळात या चालीचा निषेध करणारे शास्त्रकारही होते. त्यामुळे गुप्त काळाच्या अखेरीपर्यंत तिचा फार जोर नसावा असे तज्ज्ञांचे मत आहे. पुढच्या काळात या सहगमनाचा आग्रह फार होऊ लागला आणि त्याला कित्येक ठिकाणी सक्तीचे स्वरूप येऊ लागले.

व्यक्ती आणि समाज
 यानंतर व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधांचा विचार करावयाचा. पण तो 'धार्मिक जीवन' या प्रकरणात येऊन गेला आहे. शब्दप्रामाण्य, जातिबंधने, कार्य- कारणावाचून केलेल्या आज्ञा या व्यक्तीचे व्यक्तित्व नष्ट करतात. सातव्या आठव्या शतकापर्यंत शास्त्रात जरी अशी बंधने असली तरी प्रत्यक्षात व्यक्तीला पुष्कळच स्वातंत्र्य होते. बुद्धिस्वातंत्र्याच्या संबंधीचे अनेक उद्गार तेथे दिले आहेत. आणि वर जे जातींचे संकर, रक्तसंकर, व्यवसाय संकर यांविषयी विवेचन केले आहे त्यावरून सर्व क्षेत्रांत व्यक्तीला विपुल स्वातंत्र्य होते असे दिसते. त्या काळच्या विद्यापीठांतून सर्व वर्णाच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे, वेदांचे सुद्धा, शिक्षण मिळत असे. यावरूनही जातिबंधने व्यक्तिस्वातंत्र्य नष्ट करीत असे दिसत नाही. पण पुढच्या काळात व्यक्तीवरची बंधने वाढत गेली आणि तिचे कर्तृत्व हळूहळू लोप पावू लागले. अकराव्या बाराव्या शतकात ते पूर्णपणे लुप्त झाले आणि भारताचा अधःपात झाला.
 या एकंदर विवेचनावरून, समता, सहजीवन, व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य या तत्त्वांवर समाजरचना उभी असते तेव्हा समाजाचा उत्कर्ष होतो, या तत्त्वांची गळचेपी झाली की त्याचा नाश होतो, असे दिसून येईल. सातवाहन ते यादव या काळात प्रारंभी त्या उच्च तत्त्वांचा पुष्कळच आदर केला जात असे. पुढे शास्त्रकार त्यांचा अनादर करू लागले. त्यामुळेच हा देश, त्याची जीवशक्ती क्षीण होऊन, परकीय आक्रमणास बळी पडला व त्याचे सर्व क्षेत्रांतले प्राचीन वैभव नष्ट झाले.