महाराष्ट्र संस्कृती/नव्या प्रेरणा
विभाग तिसरा
ब्रिटिश काल
ब्रिटिश काल
३४.
नव्या प्रेरणा
हिंदुपदपातशाही स्थापावी, सर्व हिंदुस्थानावर मराठ्यांचे साम्राज्य स्थापन करावे, अशी मराठ्यांची आकांक्षा होती. पण यासाठी धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक क्रांती करणे अवश्य होते, याची त्यांना कल्पनाही नव्हती. रणांगणातील पराक्रम, बाहुबल एवढ्यावरच हे सर्व भागेल असा त्यांना भ्रम होता. या दृष्टीने पाहता ते अगदी अडाणी होते. त्यांचा सर्वात मोठा जो शत्रू म्हणजे इंग्रज, त्याला त्यांनी जाणले नव्हते. म्हणून त्यांना त्यांच्या कार्यात यश आले नाही. येणे शक्यच नव्हते.
इंग्रजांनी जाणले
इंग्रजांनी मात्र मराठ्यांना आणि सर्व हिंदी जनांना चांगले जाणले होते. हिंदी राजे, संस्थानिक किंवा त्यांचे विद्वान- अविद्वान मुत्सद्दी हिंदुस्थानात राष्ट्रीयत्व निर्माण करू शकत नाहीत; कारण ते जगाच्या संस्कृतीत मागासलेले, अर्ध रानटी, आपसात भांडणारे, शिस्तीचे व कवायतीचे महत्त्व न ओळखणारे, परकीय प्रभुत्वाची चीड न बाळगणारे, धर्मवेडात गुरफटलेले, आधुनिक राष्ट्रनिर्मितीस पारखे, लोकसत्तेचे ज्ञान नसलेले, आणि जगातील घडामोडींविषयी पूर्ण अज्ञानी, असे आहेत, हे इंग्रजांनी चांगले ओळखले होते. त्यामुळे तेथील राजेरजवाड्यांना एका निशाणाखाली गोळा करून, आपल्या साम्राज्याचा कोणी पाडाव करील, अशी भीती त्या वेळी ब्रिटिश मुत्सद्दयांना मुळीच वाटत नव्हती. सर जॉन शोअर याने म्हटले आहे की 'आपल्या गावापलीकडे देशाचे प्रेम म्हणजे काय याचे ज्ञान हिंदी लोकांना नाही. एखाद्या अधिकाऱ्याविषयी किंवा स्वामीविषयी त्याला प्रेम किंवा निष्ठा वाटेल. पण एकंदर राज्यसंस्थेविषयी तो अगदी बेफिकीर असतो. जो पगार देईल त्याच्यासाठी तो लढेल आणि जर त्याला असे दिसून आले की आपण ज्या सरकारची नोकरी करीत अहोत त्याचा पाडाव होत आहे तर तो त्या सरकारची नोकरी सोडून देईल आणि चांगल्या पगाराच्या किंवा लुटीच्या आशेने तो शत्रुपक्षाला जाऊन मिळेल.'
माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन, सर जॉन मालकम यांसारख्या ब्रिटिश राज्यकर्त्यांना हे पक्के कळून चुकले होते, आणि आपल्या ग्रंथांत व खलित्यांत त्यांनी लिहिलेही होते की 'येथील सामान्य जनता राष्ट्रनिर्मितीच्या ज्ञानापासून अलिप्त आहे, येथील राज्यकर्ते व संस्थानिक परकियांविरुद्ध एकजुटीने लढून स्वातंत्र्य स्थापना करण्यास नालायक आहेत आणि येथील विद्वानांना, जगाचे, भौतिक शास्त्रांचे आणि सामाजिक विद्यांचे गाढ अज्ञान आहे.' तेव्हा यांच्यापासून साम्राज्याला धोका नाही अशी त्यांची निश्चिती होती.
उदार धोरण
पण असे असतानाही पाश्चात्य विद्यांचे ज्ञान हिंदी जनांना द्यावे याविषयी मात्र सर्व ब्रिटिश राज्यकर्त्यांचे एकमत होते. ही विद्या हिंदुस्थानात पसरली तर पुढे मागे आपल्या साम्राज्यास धोका आहे, राष्ट्रीयत्व जागृत होऊन हिंदी लोक आपणांस येथून घालवून देणे शक्य आहे, हे ते जाणत होते. तरीही त्यांना अर्ध रानटी ठेवून त्यांच्यावर दीर्घ काल राज्य करण्यापेक्षा त्यांना सज्ञान करून त्यांच्यांतून एकराष्ट्र निर्माण करणे हे आपल्या राष्ट्राच्या व मानवतेच्या दृष्टीने जास्त योग्य आहे व भूषणावह आहे, असे त्यांचे मत होते. सर जॉन मेटकाफ याने तर त्याकाळी हिंदी जनांना मुद्रणस्वातंत्र्यही दिले. त्यापायी त्याची नोकरी गेली. पण तरीही वरील मताचा आपला आग्रह त्याने सोडला नाही. या लोकांना विद्या देऊन आपण येथून जाणे हेच जास्त कीर्तीकर आहे, इंग्लंडला हितावह आहे, असेच तो म्हणत होता.
इंग्रजांच्या अपेक्षा
या संबंधात ब्रिटिशांना भीती एकच होती. त्यांनी येथे साम्राज्य स्थापिले होते ते सर्व हिंदी सैन्याच्या बळावर; आणि त्या सैन्यात प्रक्षोभ माजून तेच जर आपल्यावर उलटले तर मग मात्र आपली धडगत नाही, ही ती भीती होय. त्यांना आशा अशी होती की प्रथम पाश्चात्य विद्या व राष्ट्रीयत्व हे हिंदी जनतेत पसरेल, त्यांच्या अंगी बाणेल आणि तेथून ते हळूहळू सैन्यात पसरेल. तसे होऊन आपले साम्राज्य जाण्याची वेळ आली तरी त्याला त्यांची तयारी होती. कारण मग या देशात शांतता नांदेल, सर्व हिंदुस्थानचा कारभार यशस्वी करून दाखविणारे पुरुष येथे निर्माण होतील, ते देशात शिस्त व कायदा आणतील आणि मग आपला व्यापार तरी हिंदुस्थानात उत्तम चालेल. साम्राज्यापेक्षा त्यांना व्यापाराचीच काळजी जास्त होती. त्यामुळे प्रथम जनता व नंतर सैन्य यांच्यांत राष्ट्रीय वृत्ती निर्माण व्हावी व मग त्यांनी स्वातंत्र्य मिळवावे, याला त्यांची हरकत नव्हती. पण आहे या स्थितीत लोक व लष्कर अर्ध रानटी अवस्थेत असताना जर लष्कर उलटले व आपल्याला येथून जावे लागले तर मात्र साम्राज्यही जाईल व व्यापारही जाईल असा धोका होता आणि त्याला मात्र त्यांची तयारी नव्हती.
पुढल्या इतिहासावरून आपण हे जाणतोच की ब्रिटिशांची आशा व अटकळ अगदी खरी ठरली. प्रथम राष्ट्रभावना हिंदी जनतेत पसरली व तेथून ती सैन्यात शिरली. टिळक, गांधी यांनी पहिले कार्य केले व सुभाषचंद्रांनी दुसरे कार्य केले आणि सैन्य आपल्यावर उलटले आहे हे ध्यानात येताच, इंग्लंडचे मुख्य प्रधान मेजर ॲटली यांनी, इंग्लंडातून सैन्य आणून हिंदुस्थानात राज्य करणे अशक्य आहे, हे जाणून भारताला स्वातंत्र्य देऊन टाकले.
हे कसे घडत गेले तेच आता अपाणास पाहावयाचे आहे. मराठ्यांना जे साधले नाही, इ. सनाच्या अकराव्या शतकापासून आलेली अचेतन स्थिती नष्ट करण्यात कोणालाच यश आले नाही, ते यश अगदी अल्पावधीत, साधारण शंभर वर्षांत मिळवून स्वातंत्र्यप्राप्ती करून घेण्याइतके सामर्थ्य भारताला कसे प्राप्त झाले, त्याचाच आता विचार करावयाचा आहे.
भौतिक विद्या
भारतीयांनी सर्वांगीण क्रांती घडवून हे जे सामर्थ्य प्राप्त करून घेतले त्याचे पहिले साधन म्हणजे भौतिक विद्या, ऐहिक जगाचे ज्ञान हे होय. राजा राममोहन राय यांची याविषयीची मते प्रसिद्धच आहेत. येथे संस्कृत विद्येच्याच शाळा काढाव्या असा इंग्रजांचा विचार होता. पण बेकन, डेकार्ट यांच्या ज्या ज्ञानामुळे युरोपीय समाज सुधारला ते ज्ञान, ती भौतिक विद्या आम्हांला द्या असा आग्रह त्यांनी धरिला. प्रारंभी जे विवेचन केले आहे त्यावरून इंग्रज मुत्सद्द्यांचाही त्याला विरोध नव्हता, हे ध्यानात येईल.
बाळशास्त्री
महाराष्ट्रात असा पहिला प्रयत्न बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ साली दर्पण हे साप्ताहिक काढून केला. पहिल्या अंकात त्यांनी लिहिले आहे की 'वृत्तपत्रामुळेच युरोपास सज्ञानदशा प्राप्त होऊन त्याची प्रगती झाली. ज्या ज्या देशात अशा लेखांचा (वृत्तपत्रातील) प्रचार झाला आहे, तेथे लोकांचे आंतर व्यवहारामध्ये व बाह्य व्यवहारामध्ये हित झाले आहे. यापासून बहुत वेळ विद्यांची वृद्धी झाली आहे. लोकांमध्ये नीती रूपास आली आहे. अलीकडे कित्येक देशांत धर्मरीती व राज्यरीती यांत जे चांगले व उपयोगी फेरफार झाले आहेत त्यांसही थोडेबहुत हे लेख उपयोगी पडले आहेत. बंगाल प्रांत इंग्रजांचे हाती जाऊन साठसत्तर वर्षेच झाली. परंतु तेवढ्यात तो आता निर्भयपणे स्वातंत्र्य भोगतो आणि तेथील लोकांस विद्याकलांचे विशेष ज्ञान होत आहे. सर्व हिंदुस्थानात जो अंधकार फार दिवस व्यापून राहिला होता तो जाण्यास आता प्रारंभ झाला आहे.'
बाळशास्त्री हे मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करीत असत. गणित, ज्योतिष व भौतिक शास्त्र हे त्यांचे विषय होते. पण त्यांना ग्रीक, लॅटिन, इंग्लिश, फ्रेंच, आरबी, फार्शी, हिंदी, बंगाली, गुजराथी व कानडी इतक्या भाषांचे ज्ञान होते. शिक्षणक्षेत्रात काम करून प्राचीन शिलालेखांवर संशोधनात्मक लेखही त्यांनी लिहिलेले आहेत. रॉयल एशियाटिक सोसायटीचे नियतकालिक १८४१ पासून सुरू झाले. त्यात त्यांचे लेख येत असत. 'दर्पण' साप्ताहिक १८४० साली बंद पडले. तेव्हा 'दिग्दर्शन' हे मासिक सुरू करून त्यांनी तोच उद्योग पुढे चालविला.
यावरून ध्यानात येईल की धार्मिक, सामाजिक, राजकीय कोणतीही सुधारणा वा क्रांती असो, तिचा पाया भौतिक विद्या हा आहे, हे अगदी प्रारंभापासून येथल्या विद्वानांच्या मनावर ठसले होते आणि त्याच हेतूने प्रेरित होऊन त्यांनी आपले उद्योग सुरू केले होते.
लोकहितवादी
या पाश्चात्य भौतिक विद्येचे दुसरे मोठे पुरस्कर्ते म्हणजे लोकहितवादी. अज्ञान ही हिंदुलोकांची, आणि ब्राह्मणांची महाव्याधी आहे, असे त्यांचे मत होते. त्यांची मने व बुद्धी सर्वस्वी पुराणात बुडालेली होती. विष्णू शेषावर निजतो, खांबातून नरसिंह निघाला, राहू-केतू चंद्रसूर्यांना ग्रासतात, हेच त्यांचे अजूनही ज्ञान आहे. जगाचा इतिहास, भूगोल, रसायन, गणित, शिल्प इ. शास्त्रांची त्यास काही कल्पना नाही. इंग्रजी ग्रंथात आहे काय दगड, असे ते म्हणतात. आणि विशेष नवल म्हणजे या अज्ञानातच त्यांस भूषण वाटते. लोकहितवादी म्हणतात, हे शास्त्री, भट, व संपूर्ण हिंदू लोक अजून मागल्या गोष्टीचे भरात आहेत. कोणी म्हणतो विलायत बेट लहान दोनचार कोसांचे आहे, कोणी म्हणतो कंपनी सरकार बायको आहे. ज्ञान म्हणजे काय हे त्यांस ठाऊकच नाही. इंग्लंडातील थोरली सनद, पार्लमेंट, फराशीस यांची राज्यक्रान्ती, रूमचे राज्याचा नाश, अमेरिका खंडात युरोपियांची वस्ती, लोकसत्तात्मक राज्य, या शब्दांचा अर्थही बहुतेक हिंदुलोकांस ठाऊक नसतो. तेव्हा हिंदू लोकांची सुधारणा व्हावयाची तर त्यांना मुख्य म्हणजे विद्या हव्या. पण त्या पुराणातल्या विद्या नव्हत, संस्कृतातल्या नव्हत. तर ज्या विद्या त्या काळी प्रगट झाल्या होत्या, ज्या वास्तविक जग व व्यवहार यांच्या दर्शक होत्या त्या विद्या होत.
महात्मा फुले
जोतिबा फुले हे स्वतः फार शिकलेले नव्हते. पण पाश्चात्य ग्रंथकारांच्या ग्रंथांचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांना भौतिक विद्येची महती उत्तम समजली होती. म्हणून तर त्यांनी स्त्रियांसाठी व अस्पृश्यांसाठीही शाळा उघडल्या.
यानंतर भारतात विद्यापीठांची स्थापना झाली आणि इतिहास, भूगोल, तत्त्वज्ञान, पदार्थविज्ञान, जीवशास्त्र, गणित, इतर भाषा, भाषाशास्त्र, यांचा रीतसर अभ्यास सुरू झाला. न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर, विश्वनाथ नारायण मंडलीक, दादोबा पांडुरंग, आत्माराम पांडुरंग इ. विद्वान पुढे आले आणि त्यांनी आपल्या सर्व सुधारणांची या नव्या विद्येच्या पायावरच उभारणी केली. याच सुमारास जॉर्ज वॉशिंग्टन, नेपोलियन, कोलंबस इ. थोर पाश्चात्य पुरुषांची चरित्रे मराठीत लोक लिहू लागले. वर्तमानपत्रे निघू लागली आणि भौतिक ज्ञानाचा प्रसार सर्वत्र होऊ लागला.
ज्ञानाची देणगी
असे असूनही विष्णुशास्त्री, टिळक यांच्या काळापर्यंत पाश्चात्य ज्ञानाचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचे महत्त्व लोकांना वाटत असे. 'वक्तृत्व' या निबंधात विष्णुशास्त्री म्हणतात, 'इंग्रज सरकारचा या देशावर सर्वात मोठा उपकार हा होय की ज्ञानाची अमोलिक देणगी त्याने या देशास दिली व अद्याप देत आहे. चाळीस वर्षांपूर्वी मेकॉलेने जी नवी पद्धत सुरू केली तिच्यामुळे ही विद्या प्रसार पावून त्यामुळे देशाची स्थिती आजवर एकंदर बदलून गेली आहे, असे म्हटले असता चालेल.' 'निबंधमाला' हे नवे मासिक पुस्तक काढताना त्यांनी म्हटले आहे की, 'इंग्लंड वगैरे देशात सामान्य माणसास जे ज्ञान असते ते येथील सुशिक्षितासही नसते.' आणखीही अनेक ठिकाणी, जेथे संधी सापडेल तेथे विष्णुशास्त्री यांनी पाश्चात्य विद्येचा असाच गौरव केला आहे.
पाश्चात्य शास्त्रे
लो. टिळकांचे असेच धोरण होते. पाश्चात्य विद्येशिवाय तरणोपाय नाही, याविषयी त्यांचे दुमत नव्हते. १९०७ साली बेळगावला, 'सरकारी शिक्षण व राष्ट्रीय शिक्षण ' या विषयावर बोलताना ते म्हणाले, 'तरुण पिढीने विद्वान, बुद्धिमान, निश्चयी व शरीरसामर्थ्याने युक्त व्हावे, एवढीच आमची इच्छा नाही, तर आमच्या तरुणांनी पाश्चात्य शास्त्रात पारंगत व्हावे, अशी आमची प्रबल इच्छा आहे. ही पाश्चात्य शास्त्रे आमच्या विद्यार्थ्यास शिकविण्यास ज्या दिवशी हरकत होईल त्या दिवशी हिंदुस्थानचा भाग्योदय सरला आहे असे मी म्हणेन.' यावरून हिंदुस्थानचा भाग्योदय या पाश्चात्य शास्त्रांवर अवलंबून आहे असे त्यांचे निश्चित मत होते, असे स्पष्ट दिसते. मोर्लेसाहेब म्हणत, 'हिंदुस्थानातील सुशिक्षित लोक हे आमचे शत्रू आहेत.' त्याला उत्तर देताना टिळक म्हणत की 'आम्ही त्यांचे शत्रू नसून आमचे ज्ञान हे त्यांचे शत्रू आहे.' शिक्षण या विषयावर बोलताना ते नेहमी म्हणत की 'इंग्लंड, अमेरिका यांसारख्या स्वतंत्र देशांत जे शिक्षण देतात ते शिक्षण आम्हांला पाहिजे. इंग्लंडने ज्या प्रकारच्या संस्था काढून आपली स्थिती सुधारली, तशा प्रकारच्या संस्था काढून आपण आपली स्थिती सुधारून घेतली पाहिजे.' टिळकांची ही विवेचने वाचताना एक गोष्ट स्पष्टपणे ध्यानात येते की समाजाला जिवंतपणा यावयास हवा असेल तर पाश्चात्यांप्रमाणे प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम, दृक्प्रत्ययशरण अशा शास्त्रांचा अनाग्रही बुद्धीने आपण अभ्यास केला पाहिजे, हा सिद्धांत त्यांच्या मनाशी निश्चित झाला होता.
लो. टिळकांच्या नंतर पाश्चात्य विद्येला कधी कोणी फारसा विरोध केला नाही. महात्माजींचा वैज्ञानिक सुधारणांना विरोध होता. पण एकतर मोटार, आगगाडी या यंत्रशक्ती ते स्वतः वापरीत असत आणि त्यांच्या या मताला कोणी फारसे महत्त्व दिले नाही.
तरी एक गोष्ट मनाला जाणवते की पाश्चात्य विद्या येथे आल्या. आता त्या बहुजनातही पसरत आहेत. पण त्यांच्यामुळे जी बुद्धिवादी, प्रयोगनिष्ठ, प्रत्यक्षनिष्ठ, कार्यकारणनिष्ठ अशी वृत्ती भारतीय समाजात निर्माण व्हावयास पाहिजे, ती अजून झालेली नाही आणि ती नाही तोपर्यंत जी खरी प्रगती व्हावयास हवी, ती येथे होणार नाही.
बुद्धिप्रामाण्य
या पाश्चात्य विद्येमुळे भारताला फार मोठी देणगी मिळाली, ती म्हणजे बुद्धिप्रामाण्य ही होय. शेकडो वर्षे येथे ग्रंथप्रामाण्याचे किंवा शब्दप्रामाण्याचे युग होते. सूत्रग्रंथांच्या काळापासून म्हणजे इ. सनपूर्व सातव्या आठव्या शतकापासून येथे शब्दप्रामाण्याला प्रारंभ झाला. पण तरीही इ. सनाच्या दहाव्या शतकापर्यंत त्याचा अमंल इतका जारी नव्हता. स्मृती या प्रमाण मानल्या जात, पण स्मृतिकार पूर्वीच्या स्मृतींवर टीका करून, मला हे मत मान्य नाही, असे निर्भयपणे सांगत असत. पण आठव्या शतकापासून नव्या स्मृती होण्याचेच बंद झाले आणि स्मृतींमध्ये कितीही परस्परभिन्नता असली तरी त्यांतील सर्व वचनांचा एकच अर्थ आहे, असे टीकाकारांनी लिहिले पाहिजे, असा कुमारिल भट्टाने दण्डक घालून दिला. तेव्हापासून हिंदुस्थानच्या विनाशास प्रारंभ झाला. ती प्रथा दहाव्या अकराव्या शतकापासून पूर्ण रूढ झाली व चतुर्वर्गचिंतामणी, निर्णयसिंधू, धर्मसिंधू असे ग्रंथ तयार होऊ लागले आणि मानवी बुद्धीला अत्यंत अवजड अशा बेड्या पडल्या, स्वतंत्र विचार करणे हे येथे संपुष्टात आले.
रूढिप्रामाण्य
या शब्दप्रामाण्याच्या जोडीला रूढिप्रामाण्य आले. ब्राह्मण लोक संस्कृत ग्रंथ वाचीत. पण इतर जातींत श्रुतिस्मृतींकडे कोणी पाहात नसे. पण त्या प्रत्येक जातीच्या पंचायती असत. आणि ठरलेल्या रूढीबाहेर कोणी वागला तर त्या पंचायती त्याला व त्याच्या कुटुंबाला बहिष्कृत करीत. ही शिक्षा फाशीच्या शिक्षेपेक्षाही जास्त भयंकर होती, असे मागे सांगितलेच आहे. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य हे भारतातून अजिबात लुप्तच झाले. मागे अनेक शास्त्रांमध्ये आर्यभट्ट, नागार्जुन यांसारखे थोर पंडित येथे होऊन गेले. पण या पुढच्या काळात, काही अपवाद वजा जाता, तसे शास्त्रज्ञ झाले नाहीत, याचे हेच कारण होय.
शास्त्र म्हणजे काय ?
बुद्धीवरची ही बंधने ब्रिटिश कालात नष्ट होऊ लागली. या बुद्धिस्वातंत्र्याचा पहिला मोठा पुरस्कर्ता म्हणजे लोकहितवादी हा होय. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की 'मनूचे वचन असो, याज्ञवल्क्याचे असो, कोणाचे का असेना, ब्रह्मदेवाचे का असेना, 'बुद्धिरेव बलीयसी' असे आहे. तुम्ही उघड जे पाहता त्याचा बंदोबस्त, शास्त्रात नाही, म्हणून करीत नाही, हे योग्य नाही. शास्त्रास एकीकडे ठेवा, आपली बुद्धी चालवा, विचार करून पाहा', असा उपदेश त्यांनी पुनर्विवाहाचा पुरस्कार करताना केला आहे. परदेशगमनाविषयी त्यांनी असाच विचार सांगितला आहे. 'दुसरे मुल- खात जाऊ नये असा शास्त्राचा अर्थ नसेल असे वाटते आणि जर कदाचित असला तर ती शास्त्राज्ञा मानण्याची जरूर नाही.' ते म्हणतात, 'शास्त्र म्हणजे लोकांस सुख होण्याकरिता रीती घातली आहे. त्यातून जर काही विपरीत असेल तर एकीकडे ठेवण्यास चिंता काय आहे ?' बुद्धीवरील बंधनांना त्यांनी बेड्या म्हटले आहे. अलीकडे सावरकरांनी 'सप्त शृंखला' असा शब्द वापरला आहे. तोच शब्द शंभर वर्षापूर्वी लोकहितवादींनी वापरून शब्दप्रामाण्यावर घाव घातले, हे त्यांस विशेष भूषणावह आहे.
लोकहितवादींनी उपदेश केला. पण तो उपदेश प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने आचरणात आणल्यावाचून कोणत्याही सुधारकाला, ब्रिटिश कालातील नेत्याला एक पाऊलही पुढे टाकता आले नसते. वर बाळशास्त्री जांभेकर यांचा उल्लेख केला आहे. त्यांनी 'दर्पण' व 'दिग्दर्शन' ही नियतकालिके चालविली. त्यांतील कोणताही विचार त्यांना जुने शब्दप्रामाण्य मानून लिहिता आला नसता. त्यांना इतर भाषा शिकता आल्या नसत्या. स्त्रियांना शिक्षण द्यावे असे म्हणता आले नसते. शुद्धिकार्याचा पुरस्कार करता आला नसता. इतकेच नव्हे, तर वरील नियतकालिकांतून एकही लेख लिहिता आला नसता.
जी गोष्ट बाळशास्त्री यांची तीच भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग इ. लेखकांची होती. किंबहुना कोणत्याही सुधारकाची होती. शब्दप्रामाण्याचे बंधन पाळून त्यांना काहीही करता आले नसते. जोतिबा फुले यांचे कार्य तर विशेष अभिनंदनीय आहे. त्यांनी या शब्दप्रामाण्याचा क्षणभरही मुलाहिजा न बाळगता, ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वावर टीका केली, इतर वर्णांच्या समानतेचा पुरस्कार केला, आणि स्त्रियांना व अस्पृश्यांना शिक्षण देण्यासाठी शाळा काढल्या. त्यांचा आयुष्यातला प्रत्येक श्वासोच्छ्वास म्हणजे शब्दप्रामाण्यावर आघातच होता.
कार्यकारण नाही
जुन्या शास्त्रांतील बंधनांमध्ये आणखी एक घातक गोष्ट होती. त्यांत केवळ आज्ञा केलेल्या असत. त्यांच्या मागे तर्काचे, कार्यकारणाचे, सयुक्तिकतेचे कसलेही विवेचन केलेले नसे. मानवाला यामुळे त्यांनी सर्वस्वी गुलाम करून टाकले होते. त्याच्या मानवत्वाला कसली म्हणून प्रतिष्ठाच त्यांनी ठेवली नव्हती. पशूला जसे दाव्याने बांधून जखडून टाकतात, तसे त्यांनी मानवाला बांधून टाकले होते. न्या. मू. रानडे यांनी म्हटले आहे की अशा बंधनांमुळे आपला समाज हा बालच राहिला. त्याला प्रौढपणा आलाच नाही. मानवाला काही व्यक्तित्व असते, त्याला स्वतंत्र विचार करण्याची शक्ती असते, तिला काही अवसर दिला पाहिजे, याचा कसलाही विचार या जुन्या ग्रंथकारांनी केलेला नाही. जातींच्या आचारधर्मात तेच आहे. त्याच्या मागे विचारसरणी अशी काही नाही आणि व्यक्तीचा विचार तर मुळीच नाही. मागली सगळी शास्त्रबंधने, रूढीबंधने आणि जातिबंधने ही व्यक्तीला मुळी विचारातच घेत नाहीत. असले हे शब्दप्रामाण्य समाजाचा अधःपात न घडवील तरच नवल.
मानसिक स्वातंत्र्य
विष्णुशास्त्री यांनी इंग्रजांवर कडक टीका केली आहे. तरी त्यांच्या राज्यातील व्यक्तिस्वातंत्र्याचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. निबंधमालेच्या पहिल्या निबंधातच त्यांनी म्हटले आहे की 'वरच्या लिहिण्याने हल्लीच्या राज्याचा आम्ही द्वेष करतो किंवा त्यांनी आपल्या देशावर जे अपरिमित उपकार केले आहेत किंवा अजूनही करीत आहेत ते आम्ही जाणीत नाही असे नाही. आम्हांस तर वाटते की असे विचार करण्याची शक्ती आमचे अंगी आणून त्याचा उल्लेख उघडपणे करण्याची जी मोकळीक आमचे सरकार आम्हांस देत आहे त्यापरते औदार्य कोणतेही नाही.' 'आमच्या देशाची स्थिती' या शेवटच्या निबंधात त्यांनी हेच विचार व्यक्त केले आहेत. 'त्याचप्रमाणे मानसिक स्वातंत्र्य हाही या काळात झालेला सर्वात मोठा लाभ होय. मानसिक स्वातंत्र्य म्हणजे हवा तसा विचार करण्याची व ते विचार वाग्द्वारा किंवा लेखनद्वारा प्रसिद्ध करण्याची मोकळीक. हल्लीच्या राज्यात आम्हांस जे स्वातंत्र्य आहे, तितके यापूर्वी स्वदेशी राजांच्या उत्कृष्ट कारकीर्दीतही नव्हते.' असे धन्यवाद त्यांनी सरकारला दिले आहेत.
'ग्रंथावर टीका' या निबंधातही त्यांनी शब्दप्रामाण्यावर अशीच टीका केली आहे. 'आपणांहून जे थोर आहेत त्यांचे दोष काढण्याचा आपल्याला अधिकार नाही, अशी समजूत होती. असे म्हणणे म्हणजे चंद्रास कलंकी म्हणू नये किंवा सूर्यावर डाग आहेत असे म्हणू नये अशासारखेच आहे.' या तत्त्वाअन्वये विष्णुशास्त्री यांनी जुन्या शास्त्रीपंडितांवर किंवा खुद्द शंकराचार्यावरही कशी प्रखर टीका केली आहे ते प्रसिद्धच आहे.
आगरकर
आगरकरांच्याविषयी तर बोलावयासच नको. बुद्धिवादाचे त्यांना जनक मानतात, ते अगदी यथार्थ आहे. न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर हे बुद्धिवादी होते, सुधारक होते. पण नव्या सुधारणांना शक्यतो जुन्या श्रुतिस्मृतींच्या वचनांचा आधार शोधून काढण्याकडे त्यांची प्रवृत्ती होती. हा काहीसा शब्दप्रामाण्यवादच होय. आगरकरांनी यावर कडक टीका केली आहे. अशा रीतीने एका ऋषीविरुद्ध दुसरा ऋषी उभा करण्यात काही अर्थ नाही. शेकडो मनूंचे किंवा पाराशरांचे आधार तुम्ही दिलेत तरी 'आम्हांस इष्ट असेल ते आम्ही बोलणार आणि साध्य असेल ते करणार,' अशी त्यांची प्रतिज्ञाच होती. आणि त्यांनी केलेला स्त्रीस्वातंत्र्याचा व एकत्र शिक्षणाचा पुरस्कार, प्रवृत्तिवादाचे समर्थन, देव हे भूतपिशाच्च्यांपासून निर्माण झाले आहेत, हे त्यांचे प्रतिपादन, यावरून ती त्यांनी सार्थ करून दाखविली होती, यात शंकाच नाही. येथे इंग्रजांचे राज्य होते, म्हणून आगरकर सुरक्षित राहिले, नाही तर त्यांना वहिष्कारास बळी पडावे लागले असते. युरोपात तर शब्दप्रामाण्याविरुद्ध ब्र काढणाऱ्याला जिवंत जाळून मारण्याची शिक्षा होती. पण ती शिक्षा भोगूनही अनेक वीर पुरुषांनी तेथे बुद्धिप्रामाण्याची ज्योत जागती जिवंत ठेवली. म्हणूनच युरोपची प्रगती झाली. आणि हिंदुस्थानात तसे धैर्य एकानेही न दाखविल्यामुळे त्याचा अंधःपात झाला.
ब्रह्मवाक्यही-
लो. टिळकांचा बुद्धिवाद किंवा बुद्धिप्रामाण्य फार उद्बोधक आहे. पंचांग संशोधनाच्या बाबतीत त्यांची बुद्धिनिष्ठा अनेक वेळा प्रत्ययास आलेली आहे. एका लेखात त्यांनी म्हटले आहे की 'केरूनाना छत्रे, दीक्षित यांच्यावर आधुनिक यवनाचार्य म्हणजे युरोपीय ज्योतिर्गणिती यांच्या संशोधनाचा परिणाम झालेला आहे. स्वतः वेध घेऊन जुने शास्त्र सुधारले पाहिजे, असे त्यांचे मत होते. पूर्वी ब्रह्मगुप्ताची अशीच वृत्ती होती. त्याने आर्यभट्टाच्या गणितास दोष दिलेले आहेत. तो म्हणतो ब्रह्मदेवाने सांगितलेले ग्रहगणित महान् काळ गेल्यामुळे खिळखिळे झाले आहे. ते मी विष्णुसुत ब्रह्मगुप्त स्पष्ट करून सांगतो. यावरून असे दिसते की ब्रहादेवाचे वाक्यही जसेच्या तसे मानता येत नाही, हे सांगण्याचे धैर्य त्या काळी होते. अशी वृत्ती असल्यामुळेच प्राचीन काळी आमची शास्त्रे जिवंत राहिली. पण पुढे ही वृत्ती पालटली व त्यामुळे शास्त्रांची वाढ खुंटली.'
शास्त्रे खुंटली
हे पंचांग- संशोनाविषयी झाले. पण आपल्या सर्वच शास्त्रांची वाढ शब्दप्रामाण्यामुळे खुंटली असे अनेक ठिकाणी टिळकांनी सांगितले आहे. ते म्हणतात, 'पाश्चात्य राष्ट्रे अद्याप जिवंत आहेत आणि ती आपल्या शास्त्रांची वाढ करण्याच्या उद्योगात सतत मग्न असतात. प्राचीन काळी आमचे आचार्य असाच उद्योग करीत असत. पण पुढे ही वृत्ती सुटली व आमच्या शास्त्रांची वाढ खुंटली.' 'ख्रिस्ती शकानंतर काही शतकांनी आमच्या शास्त्रविद्येचा जिवंतपणा कमी होऊ लागला. आणि आमचे पंडित पूर्वाचार्यानी केलेले सिद्धान्तच खलीत बसले. हिंदुस्थानातील शास्त्रांची ही स्थिती, सदर शास्त्रे युरोपियन पंडितांच्या हातात पडल्यावर पालटली.' (केसरीतील लेख, खंड ४ था, पृ. ४८५, ४८६). पाश्चात्य विद्यांचा आग्रह टिळक धरीत त्याशी हे सुसंगतच होते.
महात्माजी
महात्माजी हे बुद्धिप्रामाण्यवादीच होते. त्यांना अंतर्ज्ञानशक्ती होती. 'आतला आवाज' असे या संदेशाला ते म्हणत. पण हे सर्व अपवादप्रसंग होत. आणि स्वतःला अंतर्ज्ञानी असले तरी श्रुतिस्मृतीप्रमाणे ते एखाद्या ग्रंथातले वचन प्रमाण मानीत, असे कधीच घडले नाही. त्यांचे सर्व व्यवहार व महत्त्वाचे निर्णय हे तर्क, अनुभव, बुद्धी यांनीच होत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बुद्धिप्रामाण्याबद्दल शंकाच नव्हती. त्यांची बुद्धिनिष्ठा व विज्ञाननिष्ठा जगजाहीर आहे. महात्माजींच्या आतल्या आवाजाला त्यांनी काही वेळा विरोधही केला आहे. तेव्हा त्यांच्या बुद्धिप्रामाण्याविषयी कशालाही वाद नाही.
अशा रीतीने ब्रिटिश कालातील सर्व नेते बुद्धिप्रामाण्यवादी होते. मागल्या काळातल्या प्रमाणे ग्रंथप्रामाण्य चुकूनसुद्धा या नव्या नेत्यांनी कधी अवलंबिले नाही. म्हणूनच आपापल्या क्षेत्रात चौफेर प्रयत्न त्यांना करता आले आणि ते भारताचा उत्कर्ष साधण्यात यशस्वी झाले.
ब्रिटिश कालामध्ये १९४७ पर्यंतच्या शंभर सवाशे वर्षात सर्वांगीण क्रान्ती घडवून स्वातंत्र्यप्राप्ती करून घेण्याइतकी प्रगती येथल्या नेत्यांना कशी घडविता आली याचा विचार आपण करीत आहो. पाश्चात्य विद्या हे त्याचे प्रधान कारण होय, हे आरंभी सांगितले. तीतूनच निर्माण झालेले बुद्धिप्रामाण्य हे दुसरे कारण होय. आणि यातूनच निर्माण झालेल्या भिन्नभिन्न क्षेत्रांतल्या अनेकविध संस्था हे तिसरे कारण होय. या तिसऱ्या कारणाचा म्हणजे महाराष्ट्रीयांच्या संस्थात्मक जीवनाचा आता विचार करावयाचा आहे.
संस्थात्मक जीवन
राष्ट्र हे सामुदायिक जीवन आहे. आणि सामुदायिक जीवनाचे मुख्य लक्षण म्हणजे संस्था हे होय. अशा तऱ्हेच्या संस्था प्राचीन काळात येथे मुळीच नव्हत्या. येथे ग्रामसंस्था होत्या, जातिसंस्था होत्या आणि कुटुंबसंस्था होत्या. पण वर उल्लेखिलेल्या संस्थांप्रमाणे त्यांतली एकही संस्था नव्हती. ग्रामसंस्था आपल्या गावापुरत्या पाहात आणि तेही दुष्काळ, महापूर, दरोडे इ. आपत्तींच्या प्रसंगी. जातिसंस्था या आचारधर्माचा भंग, बहिष्कार याच उद्योगात मग्न असत. सर्व राष्ट्राचा उत्कर्ष लांबच राहिला, पण आपल्या जातीसंबंधीसुद्धा, तिची औद्योगिक उन्नती, तिचे शिक्षण, तिचे समाजजीवनातले स्थान याविषयीसुद्धा, जातीच्या पंचायती कधी विचार करीत नसत.
व्यक्ती अभाव
ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी जवळजवळ हजार वर्षे सर्वत्र अशीच स्थिती होती. समाजाच्या भवितव्याची चिंता वहाणाऱ्या संस्था या देशात त्या काळात निर्माणच झाल्या नाहीत. कारण अशा तऱ्हेचे ध्येय डोळ्यांपुढे ठेवणाऱ्या व्यक्तीच येथे नव्हत्या. खरे म्हणजे येथील जीवन हे व्यक्तिजीवन नव्हतेच. कारण येथे व्यक्तीच नव्हत्या, जाती होत्या. त्या जातींत व्यक्तीच्या स्वतंत्र जीवनाला स्थानच नव्हते आणि त्यामुळे समाजाच्या उत्कर्षापकर्षाचे चिंतन करावे, घडलेल्या व घडणाऱ्या इतिहासाचे अनुभव जमेस धरून त्यावरून काही निष्कर्ष काढावे, आणि त्याअन्वये समाजाची नवी घडी बसवावी, हा जो समाजातील तत्त्ववेत्यांचा प्रधान उद्योग तो या भूमीतून प्रायः लुप्तच झाला होता. या काळात या भूमीवर शेकडो आक्रमणे झाली. पण ती मारून काढण्याचे सामर्थ्य आपल्या ठायी का नाही, आपली समाजरचनाच याला कारण आहे की काय, धनधान्यासाठी समृद्ध असा या देशाचा पूर्वी लौकिक असताना, सुवर्णभूमी म्हणून हा देश प्रतिद्ध असताना, आज येथे अन्नान्नदशा का झाली आहे, आपण व्यापारात मागे का पडलो, याची चिंता करणाऱ्या व्यक्तीच या समाजात नव्हत्या. खरे म्हणजे पूर्वीचा इतिहासच या लोकांना माहीत नव्हता. आपले पूर्वज धर्मप्रसारासाठी, व्यापारासाठी व साम्राज्ये स्थापन करण्यासाठी सर्व जगभर फिरत असत, याची या काळच्या लोकांना कल्पनाच नव्हती. स्वतःचा इतिहासच ज्यांना ठाऊक नाही ते लोक चिंतन कशाचे करणार आणि तसे चिंतन केल्यावाचून संस्था कशा निर्माण होणार ?'
पाश्चात्य विद्येचा प्रसार येथे होऊ लागताच या सर्व जाणिवा येथल्या सुशिक्षित समाजातील व्यक्तींना झाल्या आणि त्यांनी या देशात धर्म, राजकारण, शिक्षण, संशोधन, व्यापार, उद्योग इ. सर्व क्षेत्रांत अनेकविध संस्था निर्माण केल्या. या संस्थांच्या पसाऱ्याची काहीशी कल्पना देऊन हे प्रकरण पुरे करू. प्रत्येक क्षेत्रातल्या त्यांच्या सांस्कृतिक कार्याचे विवेचन पुढे स्वतंत्रपणे करावयाचे आहेच.
धर्मसंस्था
धर्मक्षेत्रात नवीन धर्मकल्पनांचा प्रसार करण्यासाठी दादोबा पांडुरंग यांनी प्रथम 'मानवधर्मसभा' आणि नंतर 'परमहंससभा' अशा संस्था स्थापन केल्या. नंतर आत्माराम पांडुरंग, न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर यांच्या पुरस्काराने 'प्रार्थना समाजा'ची स्थापना झाली. प्रार्थना समाजाचे वळण काहीसे ख्रिश्चनधर्मीय होते. त्याच्या प्रतिकारार्थ स्वामी दयानंद यांनी मुंबईस 'आर्यसमाजा'ची स्थापना केली. त्याचा प्रसार मात्र प्रामुख्याने पंजाबात झाला. अलीकडच्या काळात म. म. काणे, तर्कतीर्थ कोकजे यांनी लोणावळे येथे 'धर्मनिर्णय मंडळ' स्थापन करून हिंदू धर्मात मोठे परिवर्तन घडवून आणण्याचे प्रयत्न केले. स्वामी केवलानंद यांनी वाईला 'प्राज्ञपाठशाला' याच हेतूने स्थापन केली.
शिक्षणसंस्था
शिक्षणक्षेत्रात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी अनेक शाळा काढल्या. सरकारनेही शाळा स्थापन केल्या होत्या. पण वर सांगितल्याप्रमाणे विशेष ध्येय डोळ्यांसमोर ठेवून म. ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी व स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा स्थापन केल्या. पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना झाली व न्यू इंग्लिश स्कूल, नू. म. विद्यालय, भावे स्कूल, फर्ग्युसन कॉलेज, न्यू पूना कॉलेज अशा संस्था त्यांनी काढल्या व पुढे महाराष्ट्रभर त्यांच्या शाखांचे जाळे विणले. महर्षी कर्वे यांनी हिंगणे अनाथ बालिकाश्रम, नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालय, कन्याशाळा व रमाबाई रानडे यांनी सेवासदन अशा संस्था स्थापून स्त्रीशिक्षणाचा प्रश्न धसास लाविला. वरील संस्थांच्या अनुकरणानेच पुढे सर्व महाराष्ट्रभर अनेक शिक्षणसंस्था निघाल्या.
राजकीय
पितामह दादाभाई, जगन्नाथ शंकरशेठ, भाऊ दाजी या मंडळींनी १८५२ साली मुंबईला 'बॉम्बे असोसिएशन' ही संस्था स्थापन करून अर्वाचीन राजकारणाचा पाया घातला. पुढे सार्वजनिक काकांच्या साह्याने न्यायमूर्ती रानडे यांनी सार्वजनिक सभा चालविली व शेतकऱ्यांत खेड्यापाड्यात हिंडून राजकीय जागृतीचा प्रारंभ केला. १८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली आणि भारतीय राजकारण एका विशिष्ट दिशेने चालू लागले. लवकरच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात कॉंग्रेसच्या शाखांची स्थापना झाली.
सामाजिक
म. फुले यांनी स्थापिलेला 'सत्यशोधक समाज,' महर्षी शिंदे यांचे 'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ,' प्रथम काँग्रेसची एक उपसंस्था म्हणून स्थापन झालेली 'सामाजिक परिषद' या समाजक्षेत्रात काम करणाऱ्या संस्था होत. कामगार संघटना उभारण्याचे काम लोखंडे यांनी आणि शेतकरी संघटनेचे काम भालेकर यांनी सुरू केले. मुंबईला ट्रेड युनियन या संस्थेची बांधणी करण्याचे कार्य ना. म. जोशी, बॅ. बॅप्टिस्टा यांनी प्रारंभिले. मार्क्सवादी तत्त्वावर याच चळवळी डांगे, निमकर, जोगळेकर, इ. कम्युनिस्ट नेत्यांनी चालविल्या.
१९१० मध्ये 'भारत इतिहास संशोधक मंडळा' ची स्थापना झाली. 'भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था' ही इतिहास संशोधक संस्थाच आहे. धुळे येथील 'राजवाडे संशोधन मंदिर' या संस्थेने महाराष्ट्र इतिहास संशोधनाचे कार्य पुढे चालविले आहे.
औद्योगिक
औद्योगिक क्षेत्रात डोळ्यात भरण्याजोगे कार्य महाराष्ट्र करू शकला नाही. किर्लोस्कर, ओगले ही उदाहरणे अभिनंदनीय आहेत. पण ती त्या काळी अपवादात्मक होती. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांनी औद्योगिक क्षेत्रात संघटना निर्माण करण्याचे प्रयत्न नेटाने चालविले आहेत. सहकारी साखर कारखान्यांचा विशेष अभिमानाने उल्लेख केला पाहिजे. कारण महाराष्ट्राला जी काही थोडी समृद्धी लाभली आहे ती त्यांच्यामुळेच लाभली आहे.
नावीन्य
वरील संस्थांचे नुसते रूप डोळ्यांपुढे आणले तरी मागल्या काळच्या संस्थाहून या अगदी निराळ्या आहेत हे ध्यानात येईल. ग्रामस्थ म्हणून किंवा जात म्हणून या संस्थांत कोणी आलेले नाही. काही उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून नेत्यांनी संस्था काढल्या आणि ते ज्यांना पटले, मानवले त्या त्या व्यक्ती त्या संस्थांना जाऊन मिळाल्या नवे जीवन ते हेच होय. सार्वजनिक, राष्ट्रीय कार्य असे मागे नव्हतेच. ते आता य. संस्था करू लागल्या. त्यांना जाऊन मिळण्याचे जसे स्वातंत्र्य प्रत्येकाला होते, तसे न मिळण्याचे किंवा मतभेद झाल्यास ती संस्था सोडण्याचे स्वातंत्र्यही होते. ग्रामसंस्थांत किंवा जातिसंस्थांत असले स्वातंत्र्य कोणालाच नव्हते.
यावरून हे स्पष्ट होते की मानवाकडे मानव म्हणून आता समाज पाहू लागला. हेच पूर्वी नव्हते. माणसाची ओळख जातीवरून व्हावयाची आणि जात म्हटली की अनेक कर्मकांडे व अनेक अर्थशून्य बंधने यांनी तो मनुष्य जखडलेला असे. म्हणजे तो एकपरी गुलामच होता. आता ती गुलामगिरी संपली. आता मानवाला महत्त्वाची प्रतिष्ठा आली. त्याच्या मनाला, बुद्धीला, प्रजेला स्वातंत्र्य आले, त्यांच्या विकासाला संधी मिळाली आणि तसा विकास झाल्यामुळेच येथे शंभर वर्षांत क्रांती होऊ शकली.
ऐहिक आकांक्षा
वरील संस्था पहिल्या म्हणजे भारतीयांच्या आणि त्याप्रमाणेच महाराष्ट्रीयांच्या ऐहिक आकांक्षा आता जागृत झाल्या होत्या हे स्पष्ट दिसते. निवृत्तिवाद, आचार्य, संत यांनी केलेली संसारनिंदा, मायावाद, कर्मविपाकवाद यामुळे या भूमीत ऐहिक वैभवाच्या, श्रीसमृद्धीच्या सर्व आकांक्षाच नष्ट झाल्या होत्या. परकीयांनी सर्व हिंदुस्थान जिंकला तो बहुतेक हिंदू सेनापती आणि हिंदू लष्कर यांच्या साह्यानेच जिंकला. हे कशाचे द्योतक आहे ? स्वराज्य, वैभव, सत्ता, समृद्धी, दिग्विजय यांच्या आकांक्षाच येथील लोकांच्या मनात नव्हत्या. किंवा असल्या तर त्या अत्यंत क्षीण अशा होत्या. 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' अशी येथल्या समाजाची वृत्ती झाली होती. पाश्चात्य विद्येमुळे ती पालटली व ऐहिक पराक्रमाची प्रेरणा हिंदी लोकांच्या ठायी निर्माण झाली. स्वातंत्र्यासाठी पुढे त्यांनी मरणमारणाचे संग्राम केले ते या प्रेरणेमुळेच.
ब्रिटिश कालाच्या शंभर सवाशे वर्षात महाराष्ट्रीय संस्कृतीत कोणते परिवर्तन झाले त्याचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. धर्म, समाजकारण, विज्ञान, अर्थव्यवस्था या सर्व क्षेत्रांचा विचार त्यात होईलच. पण या परिवर्तनामागे कोणत्या प्रबळ प्रेरणा होत्या पहाणे अवश्य वाटल्यावरून त्यांचे विवेचन प्रथम केले. आता वरील अंगांचा तपशिलाने विचार करणे सुलभ होईल.
■