महाराष्ट्र संस्कृती/प्रबोधनाच्या अभावी
३३.
प्रबोधनाच्या अभावी
साहित्य आणि कला यांच्याइतकीच धर्म, समाजरचना, अर्थव्यवस्था आणि विद्या ही संस्कृतीची अंगे आहेत. किंबहुना तीच अधिक महत्त्वाची आहेत. पण एक- तर आधीच्या कालखंडात त्यांच्या मूलतत्त्वांची चर्चा येऊन गेलेली आहे. आणि बहामनी व मराठा कालखंडातही वेळोवेळी त्या दृष्टीने विवेचन केलेले आहे. तेव्हा आता फक्त वर्तमाठी त्यांचे विवेचन येथे करावयाचे आहे.
धर्म-तत्त्वज्ञान
तत्त्वज्ञान, नीती, आणि आचार ही धर्माची तीन अंगे होत. यांपैकी तत्त्वज्ञानाचा विचार करता असे दिसते की मुकुंदराजापासून संत, पंडित, इतर सत्पुरुष आणि सामान्यजन यांनी शंकराचार्याचा अद्वैत वेदान्ताचा सिद्धांतच स्वीकारलेला आहे. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या-माया- आहे आणि जीव आणि ब्रह्म हे एकरूपच आहेत, हा तो सिद्धांत आहे. याबरोबर, कर्म, पुनर्जन्म, ज्ञान, मोक्ष याविषयीचे विचारही वेदान्त- पंथाचेच सर्वांनी स्वीकारलेले आहेत. ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवात मायावादाचे खंडन करून 'चिद्विलासवाद' मांडला आणि विश्व हे माया नसून सत्य आहे असे मत प्रस्थापित केले, असा एक पक्ष आहे. सोनोपंत दांडेकर, तर्कतीर्थ जोशी या पक्षाचे आहेत. पण रा. द. रानडे, डॉ. शं. दा पेंडसे यांसारख्या पंडिताना हे मत मान्य नाही. आणि हा वाद इतका जटिल आहे की त्याचा केव्हा निश्चित निर्णय लागेल असे वाटत नाही. दुसरे असे की ज्ञानेश्वरांच्या या सिद्धांतामुळे मराठा समाजावर काही परिणाम झाला आहे असे दिसत नाही. तसा काही निराळा सिद्धांत आहे, हे अर्वाचीन काळी अभ्यासक सांगतात. ज्ञानेश्वरानंतरच्या संतपंडितांनी त्याचा परामर्श केलेला नाही. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीने मराठा समाजाचा जीवनौघच सर्व बदलला. वारकरी पंथाचा त्या ग्रंथाने पायाच रचला. तसा काही प्रकार चिद्विलासवादाने झाला नाही. तेव्हा मराठा समाजाने शंकराचार्याचा अद्वैत वेदांतच स्वीकारला यात शंका नाही.
नीती
नीतीच्या दृष्टीने पाहता सत्य, दया, परोपकार इ. जी नीतीची शाश्वत तत्त्वे तीच मराठा समाजाने स्वीकारलेली आहेत. त्यांचा आचार कोणी किती केला हा भाग निराळा. मराठा काळात, ब्रह्मेंद्र स्वामी, कायगावकर दीक्षित, ज्योतिपंत महाभागवत इ. सत्पुरुषांनी धर्मशाळा बांधणे, तलाव, विहिरी खणणे, देवालये बांधणे अशी समाजसेवेची बरीच कार्य केली आणि समाजाची सेवा करण्याचे शिक्षण मराठा समाजाला स्वोदाहरणाने दिले.
आचार
आचाराच्या दृष्टीने पाहता 'चतुर्वर्गचिंतामणी' इ. ग्रंथांत सांगितलेली सर्व प्रकारची व्रते- वैतल्ये, तीर्थयात्रा, अनुष्ठाने, ब्राह्मणपूजा व ब्राह्मणभोजने, देवपूजा व देवाचे उत्सवसमारंभ, पाठशाळा, स्नानसंध्या, अग्निहोत्र, इ. सर्व आचारधर्म महाराष्ट्रात सर्व समाजात चालू होता. त्याबरोबरच भुतेखेते, चेटुक, ग्रहदशा, ग्रहशांती यांवरही समाजाचा विश्वास होता आणि त्यामुळे त्या आपत्तींच्या निवारणासाठी ब्राह्मणांनी सांगितलेले उपायही समाज करीत असे.
वैयक्तिक धर्म
पण धर्माच्या बाबतीत मुख्य गोष्ट ध्यानात ठेवावयाची ती ही की मराठे आचारीत तो सर्व धर्म वैयक्तिक होता. समर्थांनी व शिवछत्रपतींनी समाजाच्या अभ्युदयासाठी जो धर्म सांगितला त्याचे आचरण महाराष्ट्रात कोणी केले नाही, हे वेळोवेळी मागे सांगितलेच आहे. नीलकंठ, भट्टोजी दीक्षित हरी दीक्षित. नागोजी भट्ट, नीळकंठ शास्त्री थत्ते असे अनेक शास्त्री या काळात होऊन गेले. पण स्वतंत्रपणे समाजाला नवा धर्म सांगण्याची, किंवा शिवसमर्थांनी सांगितलेल्या धर्माचे विवेचन करण्यासाठी ग्रंथ लिहिण्याची बुद्धी एकालाही झाली नाही. तशी कुवतच त्यांच्या ठायी नव्हती. परदेशगमन जे एकदा निषिद्ध ठरले, ते चालू करण्याचा प्रयत्न शिवछत्रपतींनी केला. पण पुढे तो चालला नाही. राघोबाला मुंबईहून सुरतेला बोटीने नेण्याचा इंग्रजांचा विचार होता. पण 'धर्म बुडतो म्हणून तो गेला नाही. अर्थातच या समजुतीमुळे परदेशी व्यापार हा चालू शकला नाही. शुद्धीबद्दल हेच. छत्रपतींनी धर्मातरितांची शुद्धी करण्याचा पायंडा पाडला. पुढे क्वचित् कोठे बाटलेल्यांना शुद्ध करून स्वधर्मात घेतल्याची उदाहरणे आढळतात. पण तशी कायम रूढी शास्त्री पंडितांनी पाडली नाही. नाहीतर लक्षावधी वाटलेले हिंदू स्वधर्मात देऊन पाकिस्तानचा प्रश्न निर्माणच झाला नसता. स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद आहे, असा काही सिद्धान्त शिवछत्रपतींनी सांगितला आहे, दुष्ट तुरूक यास साह्य करणे हा अधर्म होय, असे तत्त्व सांगितले आहे, याची मराठेशाहीत कधी कोणाला आठवणही झाली नाही. यामुळे गायकवाड, भोसले, सखाराम बापू इ. सरदार खुशाल शत्रूला जाऊन मिळतात. सामान्य जनांना याचा कसलाच विधिनिषेध नव्हता. मुसलमान, इंग्रज, पोर्तुगीज व आपण हिंदू असा भेदाभेद, वैयक्तिक क्षेत्र सोडून, त्यांनी कधीच केला नाही. सर्व पक्षांत मराठ्यांतील सर्व जातीचे लोक नेहमी असत. तेव्हा समष्टिधर्म हा महाराष्ट्रात नव्हताच असे म्हटले पाहिजे. ते सर्व हिंदू होते. त्या धर्माचा त्यांना अभिमानही होता. पण तो सोवळेओवळे, जातींचे अचार येवढ्यापुरताच. हिंदुधर्माला काही सामाजिक रूप आहे, अभ्युदयाचा व धर्माचा काही संबंध आहे, एकधर्मीय लोकांच्या संघटनेला काही महत्त्व आहे, याची जाणीव मराठयांना कधी झाली नाही. तशी असती तर मराठयांचे राज्य बुडाले नसते.
समाजरचना
समाजरचनेच्या दृष्टीने विचार करावयाचा तर चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, स्त्रीपुरुष संबंध आणि व्यक्ती व समाज यांचे संबंध येवढ्याचा विचार केला पाहिजे. यांपैकी चातुर्वर्ण्य हा शब्द हिंदूंच्या तोंडी रूढ आहे इतकेच. अगदी आरंभीचा काळ सोडला तर येथे विवाह व व्यवसाय या दृष्टीने चातुर्वर्ण्य कधीच नव्हते. वेदकाळी सुद्धा एकाच घरातले लोक भिन्नभिन्न व्यवसाय करताना दिसतात. याविषयी तपशील मागे येऊन गेलाच आहे. त्याची पुनरुक्ती येथे करण्याचे कारण नाही. मुख्य गोष्ट ही जातिधर्माच्या जंजाळातून मराठेशाहीत लोक कधीही मुक्त झाले नव्हते.
जातिभेद
मराठेशाही कशाने बुडाली याचा विचार करताना जातिभेद हे कारण मुळीच नव्हे, असे बहुतेक सर्व अभ्यासकांनी सांगितले आहे. आणि वरवर पाहता ते खरे आहे. जाती-जातींचे तट असे मराठा राजकारणात कधी पडलेले दिसत नाहीत. माधवराव व राघोबा हे उदाहरण नेहमी देतात. दोघेही कोकणस्थ ब्राह्मण. पण प्रत्येकाच्या पक्षाला ब्राह्मणातील सगळ्या पोटजाती होत्या. मराठे व इतर जातीचे लोकही दोन्ही पक्षांत होते. असेच सर्वत्र घडलेले दिसते. कोकणस्थ, देशस्थ, सारस्वत, कऱ्हाडे, मराठा शाण्णव कुळीचे व इतर यांच्यांत आकस नव्हते असे नाही. कधी कधी त्याचे परिणामही होत. पण मराठ्यांचे राजकारण यामुळे नासले, दुही फितुरी यांच्यामागे जातिभेद होता, असे कधी झाले नाही. त्यामुळे मराठेशाही जातिभेदामुळे बुडाली, असे म्हणता येत नाही.
कडक जातिनिर्बंध
पण हा वरवरचा विचार झाला. बाराव्या शतकानंतर विद्या, कला, व्यापार, साहित्य, या दृष्टींनी मराठ्यांची कसलीही प्रगती झाली नाही. याला अत्यंत कडक असे जातिनिर्बंध हे एक प्रधान कारण आहे, यात वादच नाही. कपडे कसे पेहेरावे, बांगड्या कसल्या घालाव्या, भांडी कसली वापरावी, लग्नात मिरवणुकी कशा काढाव्या, असल्या बाबतीत सुद्धा जातिबंधने कडक असत आणि याविषयी कज्जा झाला तर भागवत पुराण, विष्णू पुराण, चरणव्यूह, शूद्रकमलाकर, यातिनिर्णय यांसारखे ग्रंथ पाहून, किंवा पूर्वापार वहिवाट काय आहे ते पाहून निर्णय होत असे. म्हणजे ग्रंथ आणि रूढी यांच्या शृंखलांत हा समाज इतका जखडलेला होता की स्वतंत्र आचार तर राहोच, पण स्वतंत्र विचार करण्याची सुद्धा येथे सोय नव्हती. परदेश राहिला, परप्रांत राहिला, पण साधे मुंबईला राहून परत येणे हे सुद्धा कठीण होते. कारण इतर जातींचा अन्नोदक संसर्ग तेथे होण्याचा संभव ! तसा नुसता संशय आला की त्या माणसावर बहिष्कार पडे. आणि तुरुंगवास, फाशी यापेक्षाही बहिष्कार हे शस्त्र फार भयानक होते. मुलाबाळांसंकट मनुष्याचे जीवनच त्यामुळे उद्ध्वस्त होण्याचा प्रसंग येई. युरोपातही बाराव्या तेराव्या शतकापर्यंत धर्माचारांच्या बाबतीत अशीच स्थिती होती. पण तेथे जॉनहस, लूथर, काल्हिन, कोपरनिकस, केप्लर, गॅलिलिओ इ. वीरांनी पोपशी लढा करून त्याची सत्ता हाणून पाडली आणि प्रगतीचा मार्ग खुला केला. तसा मार्ग खुला करण्याचा प्रयत्नही भारतात व महाराष्ट्रात झाला नाही. आणि त्याला कारण येथले जातिनिर्बंध ! त्या निर्बंधांना आधार ग्रंथांचा किंवा वहिवाटीचा. मनुष्य एकदा स्वबुद्धीने विचार करीनासा झाला, तो वचनप्रामाण्याच्या आहारी गेला की त्याची सर्व प्रगती खुंटते. युरोपात त्या शतकात धर्मपीठांनी जी जखडबंदी केली होती तीच येथे जातिभेदाने केली होती. त्यामुळेच येथे कोणत्याही क्षेत्रात प्रगती झाली नाही आणि मुस्लिम, पोर्तुगीज, इंग्रज जो येईल त्याच्या आक्रमणास हा समाज बळी पडत गेला. महाराष्ट्रात प्रारंभी सांगितल्याप्रमाणे शिवछत्रपतींनी क्रांतीची बीजे पेरली होती. पण ती रुजली नाहीत.
अमंगळ भेद
प्रभुजातीचे उदाहरण पाहा. शिवछत्रपतींनी बाळाजी आवजी चिटणीस याला, त्याचा मुलगा खंडो बल्लाळ याची, मुंज वैदिक विधीने करण्याची परवानगी दिली होती. परंतु शंभू छत्रपतींनी तो बेत रद्द करविला. शाहू छत्रपतींच्या वेळी गोविंदराव चिटणीस यांनी प्रयोगाला आपल्या बंधूंच्या हस्ते ब्राह्मणांच्या मदतीने अतिरुद्राचे अनुष्ठान करविले. पण शाहू शत्रपतींनी ब्राह्मणांची सभा भरविली- प्रभू हे शूद्र आहेत, असा निर्णय सभेने दिला. नारायणराव पेशव्याच्या वेळी आणि पुढे नाना फडणिसांच्या वेळीही प्रभूंच्यासंबंधी ब्राह्मणांच्या सभेने असाच निर्णय दिला. या ब्राह्मणांना वेद कळत असते, त्यांच्याविषयी आदर असता, तर जास्तीत जास्त लोकांना संस्कार करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले असते. कारण, 'ही कल्याणकारक वाणी शूद्रांनाही वर्ज्य नाही' असा वेदांचा निर्णय आहे आणि वेदांतील अनेक सूक्ते शूद्रांनी रचलेली आहेत. पण 'सूत्रकालापासूनच हा अमंगळ भेद सुरू झाला. दहाव्या शतकानंतर तो फारच जारी झाला. आणि वेदांचा आधार घेऊन, त्याविरुद्ध बंड करून उठण्याचे धैर्य येथे कोणीच दाखविले नाही. जातिभेदामुळे सर्वात जास्त वात झाला तो हा. क्रांती ही कल्पनाच भारतात रुजू शकली नाही आणि कित्येक प्रसंगी आमूलाग्र क्रांतीवाचून प्रगती ही अशक्य होऊन बसते. आजही हिंदू समाजाच्या प्रगतीच्या मर्गात पावलोपावली जातिभेद येत आहे. मग त्या वेळी काय असेल याची सहज कल्पना येईल.
क्षुद्र भेदापायी
कासार जातीचे लोक स्वतःला सोमवंशीय क्षत्रिय मानतात. लग्नकार्यात कलशासह मिरवणूक काढण्याचा त्यांचा प्रघात होता. पण वऱ्हाडच्या लिंगायत वाण्यांनी याविषयी कज्जा केला. पण या वेळी निकाल कासारांच्या बाजूने झाला. खानदेशात अभीर ब्राह्मण व यजुर्वेदी ब्राह्मण यांच्यांत तंटा निर्माण झाला. यजुर्वेदी अभीरांना कमी लेखीत. पण याही वेळी निकाल अभीरांच्या बाजूने झाला. पण यातली ध्यानात ठेवण्याजोगी गोष्ट ही की अशा क्षुद्र गोष्टीवरून त्याकाळी कज्जे चालत. आणि त्यावरून मारामाऱ्याही होत. वेदमंत्रांचा घोष करताना आधी ऋग्वेद की यजुर्वेद की वाजसनेयी संहिता असा तंटा पडून वाजसनेयी लोकांनी प्रत्यक्ष मारामारीच केली !
अर्थव्यवस्था
जातिसंस्थेमुळे अर्थव्यवस्था स्थिर राहिली, असे काही पंडित सांगतात. प्रत्येक जातीचा व्यवसाय बांधलेला होता. त्यामुळे प्रत्येकाला पोटाच्या उद्योगाची विवंचना या समाजात नव्हती, असे म्हणतात. पण याला फारसा अर्थ नाही. एकतर एवढ्या तेवढ्या कारणाने जातीत पोटजाती पडत आणि मग त्यांच्यांत धंद्यावरून तेढ माजे. शिवाय अनेक जाती एकच धंदा करीत हे प्रसिद्धच आहे. शिवाय व्यवसाय अगदी बांधून ठेवणे हे फार कठीण आहे. कारण सोनारकी, सुतारकी एवढ्या नावावरून काही ठरत नाही. त्या व्यवसायात पुष्कळ प्रकार आहेत व त्यावरून जातीत तेढ येते. पटवेकऱ्याचे काम रेशीम वळण्याचे, ते काम आपलेही आहे, असे जंगमांचे म्हणणे, त्यावरून तेढ निर्माण झाली. तेव्हा पटवेकऱ्यांचे काम रेशमाचे व जंगमांचे कापसाचे, असा निकाल झाला. आता या दोन व्यवसायांत जातिभेद करण्याजोगे काय आहे ? पण तेवढे कारण तेढीला पुरले. ब्राह्मण हा सेनापती होता, सावकार होता, मंत्री होता, शिपाई होता, आचारी होता, पाणक्या होता, पुजारी होता, भिक्षुक होता, गुरू होता. आता हे सर्व व्यवसाय काय एक आहेत ? यांची प्रतिष्ठा सारखी आहे ? हेच इतर अनेक जातींचे होते. तेव्हा जातीमुळे अर्थव्यवस्थेला स्थैर्य आले, या म्हणण्यात काही अर्थ नाही. पण आचारविचारांच्या जखडबंदीमुळे, आणि व्यवसायांच्या तात्त्विक बंदीमुळे समाजातली स्पर्धा नष्ट झाली आणि त्याची प्रगती खुंटली हे मात्र निश्चित. जातीमुळे स्थैर्य आले असे सांगणारे पंडितही, या स्थिरावस्थेमुळे स्पर्धा नष्ट झाली आणि प्रगती खुंटली, हे मान्य करतातच.
स्त्रियांची दैन्यावस्था
आता स्त्रियांच्या स्थितीचा विचार करू. स्त्रियांना अनेक शतके शिक्षण बंद झाले होते. ती बंदी या काळातही होतीच. शिवाय बालविवाह हे मोठे अरिष्ट त्यांच्यावर होते. त्या काळी तर ते भयंकरच होते. लढाईत पुरुष मृत्यू पावणे हा नित्याचा क्रम होता. त्यामुळे एकेका घरात दहा दहा विधवा असत. त्यांच्या जीवनात कोणते सुख असेल, याची कल्पनाच केलेली बरी ! पण यापेक्षा भयंकर म्हणजे विषम विवाह ! अंबूजी इंगळे हा ८१ व्या वर्षी मृत्यू पावला. पण त्यापूर्वी एक महिना त्याचे लग्न ठरले होते. मुलगी अर्थातच ८/९ वर्षांची होती. नशीब तिचे म्हणून ते लग्न झाले नाही. नाना फडणिसाला नऊ बायका होत्या. तो साठाव्या वर्षी वारला तेव्हा त्याची सर्वात धाकटी बायको जिऊबाई नऊ वर्षांची होती. लग्न ही त्या वेळी पुरुषाला एक करमणूकच होती. सहज जाता जाता ते लग्न करीत. तेव्हा स्त्रीजीवनाची काय परवड असेल याची सहज कल्पना येईल. महादजी शिंदे याने दक्षिणेत आल्यावर मरण्यापूर्वी वर्ष दोन वर्षे, एक बालिका बरी दिसली म्हणून, तिच्याशी लग्न केले. त्याच्या मृत्युसमयी ती वयातही आली नव्हती. राधाबाई, अहल्याबाई, गौतमाबाई अशा काही स्त्रियांची नावे इतिहासात गाजली आहेत. पण तेवढ्यावरून स्त्रियांना समाजात काही प्रतिष्ठा होती, असे मानता येणार नाही. सतीची चाल हे कशाचे लक्षण आहे ? पुरुषामागे स्त्रीने जगणे हे पापच होय, अशी रूढी होती. त्यामुळे हजारो स्त्रिया- दहा बारा वर्षांच्या बालिका सुद्धा सती जात. या अनर्थाला, या क्रौर्याला, काही सीमा आहे काय ?
स्त्रियांची लग्ने आठव्या नवव्या वर्षी होत. मुलगे त्यावेळी फार तर बारातेरा वर्षांचे असत. पण अनेक घरांत मुलगे आडदांड मग्रूर असत आणि पत्नीला हर प्रयत्नाने जवळ घेण्याचा, त्यावेळीही, प्रयत्न करीत. दुसऱ्या बाजीरावाची गोष्ट वा. कृ. भावे यांनी दिली आहे. आई आनंदीबाई हिने मना करताच तो तिला वाटेल ते अभद्र बोलला. तेव्हा तिने त्याला लाथांनी तुडविले. पण असा प्रसंग पुरुषाने आणला तर त्यातून किती लहान बालिकांची सुटका होत असेल, ते एक परमेश्वरच जाणे.
कर्तृत्व खुंटले
अस्पृश्येविषयी त्या वेळी काय स्थिती असेल याची सहज कल्पना येईल. इंग्रजी राज्य शंभर दीडशे वर्षे झाले. त्यानंतर स्वराज्य पंचवीस वर्षे झाले. अनेक कायदे झाले. तरी सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्याचा हक्कही अस्पृश्यांना मिळालेला नाही. मग त्या वेळी, तेव्हा यातले काहीच नव्हते तेव्हा, अस्पृश्यांची स्थिती कशी नरकासमान असेल, हे कशाला सांगायला पाहिजे ? काही अस्पृश्यांना सैन्यात प्रवेश मिळे. काही वरच्या पदाला क्वचित जात. पण एवढेच. मल्हारराव होळकर सेनापती झाला, राजा झाला. पण धनगर समाजाच्या स्थितीत अणुमात्र फरक पडला नाही. तीच स्थिती या देशात सर्व सुधारणांची होती. तेवढ्या तेवढ्या पुरते अपवाद होत. समाजही ते मान्य करी. पण सर्व जातींना सर्व क्षेत्रांत उत्कर्षाची संधी मिळत असे, असा त्याचा अर्थ नाही. आणि ती नाही म्हणजे समाजाच्या उत्कर्षाला पुरेसे कर्तृत्व निर्माण होणे कधीही शक्य नाही. मराठेशाही बुडण्याचे हे प्रधान कारण आहे. स्त्री, शूद्र, अस्पृश्य व कनिष्ठ जाती यांच्यावर आणि ब्राह्मण व मराठे या वरिष्ठ जातींवरही इतकी बंधने जखडलेली होती की सर्व प्रकारचे, राष्ट्राला अवश्य ते कर्तृत्व या समाजात फुलून येणे हे शक्यच नव्हते.
क्रांती अशक्य
हे सर्व सांगितल्यानंतर समाज आणि व्यक्ती यांच्या परस्पर संबंधाविषयी स्वतंत्र पणे काही सांगण्याची गरज नाही. समाजाने सर्वप्रकारच्या आचार-विचार-उच्चारां- वर अत्यंत कडक अशी बंधने घातलेली होती. त्यांचा भंग केल्यास जातिबहिष्काराची शिक्षा होत असे. त्यामुळे व्यक्तीला नवे काही करण्याची छाती होणेच शक्यच नव्हते. आणि ते नाही, म्हणजे क्रांती नाही, परिवर्तन नाही ! क्रांती नाही, मग उत्कर्ष कोठला ?
स्पर्धा नाही
धर्म आणि समाजरचना यांचा विचार केल्यानंतर आता तत्कालीन अर्थव्यवस्थेचे रूप पाहावयाचे. सर्व हिंदुस्थान आणि अर्थातच महाराष्ट्र, त्या वेळी ग्रामप्रधान होता. या ग्रामात म्हणजे खेड्यात पाटील हा राजा आणि कुळकर्णी हा त्याचा प्रधान होता. या खेड्यांची अर्थव्यवस्था ही शेतकरी, बलुतेदार आणि अलुतेदार यांच्यावर उभी होती. चौगुला, सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव, कोळी, महार आणि चांभार हे बलुतेदार आणि तेली, तांबोळी, साळी, शिंपी, माळी, सनगर, गाेंधळी, ठाकर, गोसावी, जंगम, मुलाणी, वाजंत्री, घडशी, तराळ हे अलुतेदार असत. बहुतेक सर्व खेडी स्वयंपूर्ण असत. सुतार, लोहार हे ज्या गावचे त्या गावास, तेथलेच काम त्यांनी करावयाचे आणि वर्षअखेर मळणीच्या वेळी खळ्यावर जाऊन शेतकऱ्याकडून आपल्या कामाबद्दल मोबदला म्हणून भात, नाचणी, ज्वारी असे धान्य घ्यावयाचे. असा हा सर्व कारभार असे. स्वयंपूर्णतेमुळे कारागिरीत प्रगतीचा प्रश्नच नव्हता. कारण स्पर्धा कशातच नव्हती. माल चांगला वाईट असाही प्रश्न नव्हता. कारागीर देईल तो माल सर्वांनी घ्यावयाचा. जातिबंधनांमुळे जशी स्पर्धा नव्हती तशीच या व्यवस्थेतही नव्हती.
शेतीचे दारिद्र्य
गावचा मुख्य धंदा शेतीचा असे. पाटील, कुळकर्णी, इनामदार यांना जमिनी वतनदारीने मिळालेल्या असत. शास्त्री-पंडित, देवस्थाने यांनाही जमिनीची वतने असत. आणि राहिलेल्या कोणाच्या तरी मालकीच्या असत.
अशा या अर्थव्यवस्थेवर शेकडो वर्षे समाज गुजराण करीत राहिला होता. ही सर्व व्यवस्था अत्यंत निकृष्ट व दरिद्री होती, हे उघडच आहे. सर्व शेती बहुधा कोरडवाहू असल्यामुळे दोन वेळची बेगमी करणे, हेच मुळी शेतकऱ्याला अवघड होते. आणि अशा या शेतीवर त्याचा आणि राष्ट्राचा प्रपंच चालावयाचा ! मराठेशाहीत पूर्वीप्रमाणेच हा चालत राहिलाही असता. पण मराठ्यांच्या चित्तात अखिल भारतात साम्राज्य स्थापण्याची, हिंदुपदपातशाही स्थापण्याची, महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. त्यांची ही आकांक्षा या अर्थव्यवस्थेतून भागणे अशक्य होते.
व्यापार हा पाया
इंग्रज बाहेर पडले ते व्यापारासाठी. तात्यासाहेब केळकर यांनी आपल्या पुस्तकात हिशेब दिला आहे. तीस हजार रुपयांच्या लवंगा येथून नेल्या की इंग्लंडात त्याची तीन लक्ष साठ हजार रुपये किंमत येत असे. एका जहाजामागे ७-८ लक्ष रु. फायदा सहज होई. टॉमस रो याने आपल्या अहवालात लिहिले आहे की 'मोगलांची सधन बंदरे आम्ही भिकेस लावली, त्यांचा व्यापार बुडविला' इंग्रजांनी साम्राज्य स्थापण्याचा विचार केला तेव्हा, त्यांच्यामागे धनाचे असे सामर्थ्य होते. पुढे १७६० च्या सुमारास तेथे कारखानदारी मुरू झाली आणि तीतूनही इंग्लंडला अमाप पैसा मिळू लागला. तो व्यापार आणि ती कारखानदारी यांच्या बळावर इंग्रजांना हिंदुस्थानात साम्राज्याच्या उलाढाली करण्यास पैसा उपलब्ध होऊ शकला. उलट मराठ्यांनी आकांक्षा साम्राज्याची ठेवली, पण अर्थव्यवस्था मात्र जुनीच राहू दिली. तीत सुधारणा करण्याचे त्यांच्या मनातही आले नाही. त्यामुळे कर्ज, दारिद्र्य, दैन्य, दिवाळखोरी हीच येथल्या अर्थव्यवस्थेची कायमची लक्षणे होऊन बसली. यावर साम्राज्य कसे उभे राहाणार ?
आर्थिक पाया नाही
शेती हा हिंदुस्थानातील लोकांचा मुख्य व्यवसाय. 'पेशवेकालीन महाराष्ट्र' या आपल्या ग्रंथात वा. कृ. भावे यांनी त्याची माहिती दिली आहे. एकंदर दोन पृष्ठे ! सर्व अर्थव्यवस्थेच्या पायाची इतकीच प्रतिष्ठा ! पेशव्यांनी काही ठिकाणी पडलेले, फुटलेले बंधारे दुरुस्त करण्यास मंजुरी दिली; कोठे माळरानावर नवीन शेती करण्यास साह्य केले, एवढीच ही माहिती आहे. पण धरणे बांधली, कालवे काढले, असे कोठेही नाही. हा उद्योग वास्तविक भारतात वेदकालापासून चालू होता. महाभारतात नारदाने युधिष्ठिराला प्रश्न विचारला आहे की 'तुझ्या राज्यात शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून नाहीना ?' विजयनगरच्या राज्यात कालवे होते. पंजाबात मुस्लिमांनी पाटबंधारे, कालवे यांकडे लक्ष दिले होते. मराठ्यांनी दिल्लीच्या बादशहाला ताब्यात घेण्याचा दरिद्री उद्योग सोडून, महाराष्ट्रात राज्यसत्ता प्रत्यक्ष स्थापण्याचे ठरविले असते, तर त्यांनाही इकडे लक्ष पुरविता आले असते. पण साम्राज्य- विस्तारासाठी आर्थिक पाया भक्कम करणे अवश्य आहे, हे मराठयांना कधी उमगलेच नाही !
येथले व्यापारी
जी गोष्ट शेतीची तीच व्यापाराची. पूर्वीप्रमाणे आमचे व्यापारी सर्व जगभर हिंडत असते, तर लाखो रुपयांचे धन त्यांनी मराठ्यांना पुरविले असते. पण समुद्रगमननिषेध हा दर ठिकाणी आडवा येत असे. देशातला व्यापार तरी मराठ्यांच्या हाती होता काय ? शून्य ! दुर्गादेवीच्या दुष्काळात येथला मराठा व्यापारी वर्ग जो बसला तो बसलाच. फिरून त्याने डोके वर काढले नाही. इतर प्रांतीयांच्या हाती सर्व व्यापार गेला. आणि त्यांतील अनेक इंग्रजांना, धनाचेच केवळ नव्हे, तर गुप्त बातम्या देण्याचेही साह्य करीत. युरोपात पंधराव्या सोळाव्या शतकात जी क्रांती झाली ती विद्यासंपन्न लोकांइतकीच व्यापाऱ्यांनीही केली आहे. आणि येथले व्यापारी, मराठा सरदारांप्रमाणेच इंग्रजांना सर्वतोपरी साह्य करीत होते ! कारागिरीतही महाराष्ट्र मागासलेलाच होता. कलाकुसरीच्या वस्तूंतील महाराष्ट्राची लंगडी बाजू नाना फडणिसाच्या काळातही फारशी सुधारली नाही. मुलाम्याची अत्तरदाणी, सतारी इ. अनेक वस्तू परप्रांतातून मागवाव्या लागत. जयपूरचे कारागीर पुण्यास आणण्याचा नाना फडणिसाचा प्रयत्न होता, पण तो जमला नाही (पेशवेकालीन महाराष्ट्र, पृ. ३१७).
येथला माल युरोपात नेणे हा व्यापार मराठ्यांनी केला नाही. पण साखर, सुका मेवा इ. अशिया खंडातून, चीन, अफगणिस्थान येथून येणारा माल आपण आणावा, असा उद्योगही त्यांना सुचला नाही. तोही उद्योग पाश्चात्यच करीत. लाखालाखाचे कर्ज देणारे पुण्यात शंभर दीडशे ब्राह्मण सावकार होते. ब्राह्मणांनी सावकारी करणे हे कुठले चातुर्वर्ण्य ! आणि ते धर्मात खपत असे, तर हे आशियातले व्यापार त्यांनी का नाही ताब्यात घेतले ? तेथे चातुर्वर्ण्य का आड आले ? कोणी हीन जाती वेदोक्त कृत्ये करीत आहेत की काय, यांवर नजर ठेवण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा ब्राह्मणांनी हा उद्योग केला असता तर साम्राज्याला पैसा तरी मिळाला असता.
आर्थिक आक्रमण
हे तर त्यांनी केले नाहीच. पण हळूहळू येथे होणाऱ्या वस्तू यंत्राच्या साह्याने जास्त सुबक करून, पाश्चात्य लोक येथला व्यापार मारू लागले, त्यालाही येथे कोणी आळा घातला नाही. व्यापार नाही, कारण परदेशगमन निषिद्ध. आणि यंत्रविद्या नाही, कारण न वदेत् यावनीं भाषां प्राणैः कंठगतैरपि । 'जीव गेला तरी परकी भाषा उच्चारू नये !' चाकू, मेणबत्त्या, कुलपे हे पदार्थ मुद्धा युरोपातून हळूहळू येथे येऊ लागले आणि खपू लागले. कनोज हे अत्तराविषयी प्रसिद्ध होते. पण तो हिंदी धंदाही हळूहळू पाश्चात्यांनी आक्रमिला. काच, कागद हे पदार्थ येथे होत असत. पण तेही युरोपातून येऊ लागले. १७६० साली नानासाहेबाच्या कारकीर्दीतच देशी कागदापेक्षा परदेशी कागद चांगला, असे ठरून गेले होते. हिंदुस्थान सुती वस्त्रांविषयी कार प्रसिद्ध. पण १७६० पासून इंग्लंडात कापसाची वस्त्रे विणण्यास प्रारंभ झाला. १७८२ साली वॅटने वाफेचा शोध लावला. त्यामुळे गिरण्या निघाल्या आणि मग येथला हातमागाचा धंदा इंग्रजांनी ठार मारला आणि येथल्या मालाच्या जगातल्या पेठाही हस्तगत गेल्या (पेशवेकालीन महाराष्ट्र, पृ. ३४२). इंग्रजांच्या साम्राज्याकांक्षेच्या मागे हे वाफेचे बळ सतत उभे होते. तसले काहीच बळ मराठ्यांजवळ नव्हते. त्यामुळे मुलूखगिरीपलीकडे त्यांना काहीच करता आले नाही.
लष्करी लूट
शेती, व्यापार आणि कारागिरी हे धनोत्पादनाचे मुख्य व्यवसाय. ते या देशात कोणत्या अवस्थेत होते ते येथवर सांगितले. आणि अशा स्थितीत दरसाल सर्व देशभर फिरत असलेल्या लष्कराने केलेली लूट आणि विध्वंस यांची भर, याविषयी मागे अनेक वेळा सांगितलेच आहे. वा. कृ. भावे यांनी 'पेशवेकालीन महाराष्ट्र' या आपल्या ग्रंथात 'लोकस्थिती' या प्रकरणात याची सविस्तार माहिती दिली आहे. 'मोगलांचा हायदोस', संकटांची सवय', 'कोणीही कोणास लुटावे' या मथळ्यांवरूनच सर्व कल्पना येईल. 'कुंपणाने शेत खाल्ले' असा एक मथळा आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की स्वतःच्या राजाची स्वारी आली तरी लोक भयभीत होत. कारण लुटालूट होणारच ! धारचा तुकोजी पवार याची फौज कासारघाट चढून साकोऱ्यास आली. तेथे खुद्द शाहू महाराजांची बागायत होती. तीतही हत्ती-घोडे घुसवून तुकोजीने तिची संपूर्ण नासाडी करून टाकली. छत्रपतींच्या शेतीची ही अवस्था ! मग सामान्य रयतेच्या शेतीचे काय होत असेल ? तिचा विध्वंस शत्रूची लष्करेच करीत असे नाही. छत्रपती, पेशवे आणि सरदार यांच्या सेनाही लुटालूट करीत. कुंपणच असे शेत खात असे. मग धनोत्पादन कसे होणार आणि साम्राज्याचा विस्तार करण्यास लागणारा पैसा कोठून मिळणार ! लोकांच्या जीवनाला काही प्रमाणात तरी स्थैर्य असल्यावाचून धनोत्पादन होत नाही. शिवछत्रपतींना याची काळजी किती होती, ते मागे सांगितलेच आहे. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा कोणी हात लावावयाचा नाही, असे त्यांचे हुकूम असत. पण त्यांच्यामागे हा विचार राहिलाच नाही. शेतकऱ्यांना, सावकारांना, व्यापाऱ्यांना, लमाणांच्या तांड्यांना लुटणे, हा नियमच होऊन बसला. त्यामुळे सर्व हिंदुस्थान दरिद्री होऊन बसला. आग्रा, दिल्ली, येथून सुबक कारागिरीचा माल पेशवे मागवीत. त्यांच्या तेथील मुनिमांनी कळविले की आता इकडे कारागीरच राहिले नाहीत. कारण त्यांना आता आश्रयदाते कोणी नाहीत. कारण तेही भिकेस लागले आहेत (पेशवेकालीन महाराष्ट्र, पृ. ३१८). लष्करी लुटालुटीचा परिणाम लोकांवर आणि अर्थव्यवस्थेवर काय होत असेल, हे यावरून ध्यानी येईल. म्हणूनच मनात वरचेवर येते की मराठ्यांनी दक्षिणेत निदान महाराष्ट्रात तरी स्थिर राज्य स्थापण्याचे धोरण अंगीकारावयास हवे होते.
आमची विद्या
विद्या हे मनुष्याच्या मनुष्यत्वाचे पहिले लक्षण. विद्येवाचून मनुष्य केवळ पशू होय. ही विद्या दोन प्रकारची असते. अध्यात्म विद्या आणि भौतिक विद्या. आत्मा, मोक्ष, ज्ञान, भक्ती, योग, माया, कर्म ही सर्व अध्यात्मविद्या आणि रसायन, पदार्थविज्ञान जीवनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, वैद्यक, गणित, इतिहास, भूगोल, ज्योतिष ही सर्व भौतिकविद्या होय. इ. सनाच्या सहाव्या सातव्या शतकापर्यंत या दोन्ही विद्यांचा अभ्यास भारतात होत असे. म्हणूनच भारताचा सर्व बाजूंनी उत्कर्ष होत होता. पुढे निवृत्ती आणि कर्मकांड ही बळावली आणि हळूहळू भौतिक विद्येचा येथे ऱ्हास होऊ लागला. संतांच्या कार्याच्या विवेचनात हे स्पष्ट केले आहे. आणि गौतम, नागार्जुन, आर्यभट्ट, वराहमिहीर यांसारखे शास्त्रज्ञ पुढे झाले नाहीत, यावरून हे स्पष्टच आहे. मुसलमानांच्या स्वाऱ्यांनंतर तक्षशिला, नालंदा, वलभी, विक्रमशीला ही विद्यापीठे नष्ट झाली आणि येथे सर्वत्र अंधार झाला. मराठ्यांच्या कारकीर्दीत येथील शास्त्री पंडितांनी महाराष्ट्रात एकही विद्यापीठ स्थापन केले नाही. या विद्येकडे त्यांनी लक्षच दिले नाही. मागील काळच्या पाणिनी, पतंजली, शंकराचार्य, रामानुज या सारख्यांच्या ग्रंथांवर टीका, त्या टीकेवर आणखी टीकाग्रंथ, आणि ते समजावे म्हणून आणखी प्रकाश, बोधिनी, अशा टीका, यातच शास्त्री- पंडितांचे आयुष्य खर्ची पडत असे. म. दा. साठे यांनी म्हटले आहे की गेल्या हजार बाराशे वर्षात म्हणजे मध्य- युगात, जुन्या ग्रंथांवर टीका लिहिण्यापलीकडे हिंदू विद्वानांच्या हातून विशेष काही झाले नाही (महाराष्ट्र जीवन, खंड २ रा, पृ. ११).
पुराणप्रिय
महाराष्ट्रात अभ्यास होत असे तो सर्व अध्यात्माचा आणि पुराणांचा. पेशवे आणि त्यांचे मोठमोठे सरदार यांना ग्रंथसंग्रहाचा आणि ग्रंथवाचनाचा नाद पुष्कळ होता. पण हे ग्रंथ कोणचे ? रामायण, महाभारत, गीता, पुराणे, मार्गशीर्ष माहात्म्य, वैशाख- माहात्म्य ! याच्या जोडीला फारतर बखरी, तवारिखा, कैफियती हे पुराणवजा ग्रंथ. ज्ञानेश्वरी, तुकारामाचे अभंग, एकनाथी भागवत, मुद्गल रामायण, पांडवप्रताप, महीपतीची संतचरित्रे यांचेही वाचन होत असे. पण हे सर्व ग्रंथ मोक्षदायक आहेत. ऐहिक उत्कर्षापकर्षाशी त्यांचा संबंध नाही. नाना फडणिसाने सवाई माधवरावाच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली होती. पण त्यासंबंधी लिहिताना सरदेसाई म्हणतात, नानाची बुद्धी केवळ पुराणप्रिय असून कालाबरोबर धाव घेण्यास ती बिलकुल समर्थ नव्हती. स्नानसंध्या, पोथ्यापुराणे, परंपरेची नीती, दांडपट्टा, घोडदौड यांपलीकडे त्याची दृष्टी गेली नाही.' सवाई माधवरावाकरता एक भूगोलाचे पुस्तक तयार करावे, असे नानाच्या मनात आले. डॉ. फिंडले नावाच्या इंग्रजास त्याने हे काम सांगितले. त्याने त्या पुस्तकात काय लिहिले ? इंग्रजांची विलायत रूमशामनजीक आहे, रूमचा बादशहा मुख्य असून दिल्ली हा त्याचा सुभा आहे, इंग्रज हिंदुस्थानात आले ते दैवी योजनेनेच आले, अशा तऱ्हेचा बराच मजकूर त्याने दडपून लिहून ठेवला. मराठ्याच्या भौतिक विद्येची ही अवस्था होती.
सृष्टपदार्थ-संशोधन
योगायोग असा की ज्या काळी येथे विद्या लुप्त झाली त्या काळात, तिचा युरोपात उत्कर्ष होऊ लागला. शं. वा. दीक्षित यांनी आपल्या ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथात लिहिले आहे, 'कोपरनिकसाचा ग्रंथ शके १४६५ साली झाला. त्याच्या आधी आमच्या देशातील व युरोपातील ज्योतिष सारख्याच स्थितीत होते म्हटले तरी चालेल. कोपरनिकसाच्या आधी आमच्या देशातील शोधक पितापुत्र केशव दैवज्ञ व गणेश दैवज्ञ हे होऊन गेले. पण नंतर तसा शोधक येथे झाला नाही. युरोपात मात्र या लहान वृक्षाचा पुढे वटवृक्ष झाला.' हाच भावार्थ राजवाडे यांनी निराळ्या शब्दांत सांगितला आहे. ते म्हणतात, 'शहाजीच्या हयातीत युरोपात बेकन, डेकार्ट इत्यादी विचारवंत, सृष्टपदार्थ- संशोधन- कार्याचे वाली, पंचमहाभूतांचा शोध लावण्यास जारीने प्रोत्साहन देत होते. आणि आपल्याकडे एकनाथ, तुकाराम, दासोपंत, निपट निरंजन इ. संत पंचमहाभूतांना मारून ब्रह्मसाक्षात्कारात राष्ट्राला नेऊन, मुक्त करण्याच्या खटपटीत होते. अशांना स्क्रू, टाचणी, बंदूक व तोफ यांचा विचार वमनप्राय वाटल्यास नवल नाही (दीक्षित, राजवाडे यांचे उतारे, संस्कृतिसंगम, द. के. केळकर, पृ. ३७३).
ग्रंथ
विद्येचे प्रधान लक्षण म्हणजे ग्रंथनिर्मिती हे होय. मुकुंदराजापासून पेशवाईअखेर- पर्यंत येथे महाराष्ट्रात ग्रंथ विपुल निर्माण झाले. पण ते सर्व अध्यात्माचे ग्रंथ होत. भौतिक विद्येसंबंधी, ऐहिक उत्कर्षापकर्षाविषयी एकही ग्रंथ झाला नाही. आणि चमत्कार असा की पेशवाई संपून इंग्रजी राज्य येथे प्रस्थापित होताच पुढच्या पाऊणशे वर्षांत ऐहिक विषयांवर शेकडो ग्रंथ निर्माण झाले. बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, जोतिबा फुले हे तर पंचवीस तीस वर्षांच्या आतच अशा प्रकारचे लेखन करू लागले. त्याआधी राजकारण, लोकशाही, कारखानदारी स्त्रीपुरुषसमता, व्यापारवृद्धी, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व, अस्पृश्यता, जातिभेद धर्मातील वचन- प्रामाण्य, जगातील थोर पुरुषांची वॉशिंग्टन, नेपोलियन, शिकंदर अशा पुरुषांची चरित्रे, इंग्लंडचा, फ्रान्सचा इतिहास, पुरातत्त्वसंशोधन, भारताचा प्राचीन इतिहास या व असल्या विषयांना, संत, पंडित, आख्यानकवी, चरित्रकार, आणि शाहीर सुद्धा, यांपैकी कोणी स्पर्शही केला नव्हता. याचा अर्थ काय ?
याचे कारण उघड आहे. ते सर्व या विषयांना वमनप्राय मानीत होते. वामन, श्रीधर, मोरोपंत यांच्या भोवतीच मराठ्यांचा इतिहास घडत होता. तरी त्याविषयी त्यांनी काहीच कसे लिहिले नाही, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. या विषयात त्यांना रस नव्हता, ते याविषयी सर्वस्वी उदासीन होते, म्हणून त्यांनी त्याविषयी लिहिले नाही, हे त्याचे उत्तर आहे.
बुद्धीला आवाहन
दुसरी गोष्ट अशी की ऐहिक विषयांवर निबंध, प्रबंध किंवा ग्रंथ लिहावयाचा म्हणजे त्यात बुद्धीला आवाहन करावे लागते. अध्यात्मात असे काही नाही. संतांनी सर्वसामान्य जनतेला अध्यात्माचे गहन सिद्धान्त समजावून दिले. बुद्धीला आवाहन करून पटवून देण्याचा तेथे प्रश्नच नव्हता. तसे करावयाचे तर स्वतःच्या व इतर देशातल्या इतिहासातील प्रमाणे, भोवतालच्या परिस्थितीचे विवेचन, घटनांची कार्य- कारणमीमांसा हे सर्व आले. पण प्राचीन मराठी साहित्याला याची मुळीच गरज नव्हती. कारण अध्यात्मातील आत्मा, परमात्मा, मोक्ष, कर्म इ. सर्व सिद्धान्त हे बुद्धीच्या पलीकडचे आहेत. ते फक्त उपमा-दृष्टान्तांनी समजावून द्यावयाचे असतात. प्राचीन मराठी साहित्यिकांनी तेच केले. पंडितांना याच्या जोडीला काव्य सौंदर्य निर्माण करावयाचे होते. तेथेही बुद्धीला आवाहन करण्याचा प्रश्न नव्हता. प्राचीन संस्कृत साहित्याचे उत्तम मराठीत रूपांतर त्यांना करावयाचे होते. ते त्यांनी केले. महाभारतात काही ठिकाणी राजधर्म, व्यापार, अर्थमाहात्म्य, इ. विषयांवर बौद्धिक विवेचन आहे. पण पंडितकवींनी तो विषय अजिबात गाळून टाकलेला आहे. कारण तो त्यांना त्याज्यच होता. भगवन्नामसंकीर्तन करावे, संसारातून तरून जाण्यासाठी गावे हा त्यांचा, लेखनामागचा हेतू होता. यामुळे त्यांनी ऐहिक विषयांवर ग्रंथ लिहिले नाहीत. पण मराठ्यांना ऐहिकप्रपंच करावयाचा होता, साम्राज्यविस्तार करावयाचा होता. त्यासाठी निबंध, ग्रंथ निर्माण करणे अवश्य होते. व्याख्यानांची आवश्यकता होती. पेशव्यांना व्याख्यानांचे महत्त्व समजले नव्हते, असे राजवाडे यांनी म्हटले आहे. ही फारच मोठी उणीव होती. तोफाबंदुकांपेक्षाही राष्ट्रभावना, देशाभिमान, पूर्वजांचा इतिहास, शत्रूचा इतिहास, त्याचे बलाबल, या विषयांवरील ग्रंथांचे महत्त्व जास्त आहे, हे पेशव्यांनी जाणले नाही. मराठेशाहीचा अंत होण्याच्या अनेक कारणांपैकी हे प्रधान कारण आहे.
डेकार्ट
निबंध, ग्रंथ, ऐहिक प्रपंचाचे विवेचन यात बुद्धीला आवाहन करावे लागते, असे वर म्हटले आहे. ते करावयाचे म्हणजे शंका, आक्षेप, विरुद्ध पक्ष हे सर्व आलंच. पण अध्यात्मात याचे अगदी वावडे असते. श्रद्धा हा अध्यात्माचा, परमेश्वरप्राप्तीचा पाया आहे. त्यात मूलतत्त्वांच्या बाबतीत पूर्वपक्ष असले तरी, भक्तांना ते सर्व वर्ज्य आहे. आणि प्राचीन मराठी साहित्यात भक्ती हाच प्रधान विषय होता. आख्यानकवींच्या काव्यातही रोख सगळा भक्तीकडेच होता. त्यामुळे शंका, अश्रद्धा, आक्षेप हे ते पाप समजत. उलट युरोपात रेनी डेकार्ट याने युरोपीयांना शंका, आक्षेप घेण्यास शिकविले, म्हणून त्याला अर्वाचीन युरोपचा जनक मानतात. पण त्याच्या आधीच तेराव्या चौदाव्या शतकापासूनच मार्सिलियो, विल्यम ऑफ ओकहॅम, पीटर डुबाईस, वायक्लिफ, जॉन हस यांनीही आक्षेप घेण्याची, धर्मपीठाशी संग्राम करण्याची वृत्ती प्रगट केली होती. आणि हळूहळू ती सर्व युरोपात पसरली. त्यामुळेच तेथे सामान्यजनांना व्यक्तित्व प्राप्त झाले. भौतिक विद्येचे प्रधान कार्य मनुष्याला व्यक्तित्व प्राप्त करून देणे हे आहे. तसा भारतात- महाराष्ट्रात- प्रयत्न सुद्धा झाला नाही. अशा स्थितीत व्यक्तित्वसंपन्न असा जो इंग्रजी समाज, त्याच्याशी मराठ्यांची गाठ पडली. त्यात त्यांचा विजय होणे शक्यच नव्हते.
शाहीर त्यांतलेच
शाहिरांनी ऐहिक विषयांवर लिहिले. पण त्यांच्या मनोवृत्तीत इतर साहित्यिकांपेक्षा कसलाच फरक नव्हता. त्यांनी काही ग्रंथ लिहिले नाहीत. ज्या भौतिक विद्येची महती वर सांगितली आहे, ती त्यांच्याजवळ नव्हती. जयापजय हे पापपुण्यावर अवलंबून असतात, असेच ते मानीत असत. सवाई माधवरावाला ते अवतार मानीत असत. तो मृत्यू पावला तेव्हा, क्षीरसागरातून त्यांना तसे सांगितले गेले, म्हणून ते गेले, असे शाहीर म्हणतात. पेशव्यांचे राज्य बुडाले ते कलियुगामुळे बुडाले, असे शाहीर सांगत असत. ही भौतिकविद्या नव्हे. इतिहास, अनुभव, तर्क, परिस्थिती, कार्यकारणमीमांसा यांना भौतिक विद्येत महत्त्व असते. शाहिरी काव्यात यातले काहीच नाही. याची त्यांना कल्पनाही नव्हती. इतरांनी रामकृष्णांविषयी लिहिले. त्यांनी नाना, सवाई माधवराव यांच्यावर लिहिले. हा फरक, मागे सांगितल्याप्रमाणे, मोठा असला तरी आपल्या विषयाच्या दृष्टीने इतर कवी आणि शाहीर यांच्यांत कसलाही फरक नव्हता. त्यांच्याइतकाच भौतिक विद्येशी यांचा संबंध होता.
विचारही नाही
मराठ्यांना अखिल हिंदुस्थानात मराठा साम्राज्य स्थापावयाचे होते. हिंदुपदपातशाहीची स्थापना करावयाची होती. हे फार मोठे आणि अत्यंत दुष्कर असे ध्येय होते. दीर्घ काळ स्थापन झालेल्या मुस्लिम सत्तेचा समूळ उच्छेद करावयाचा आणि पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज हे जे पाश्चात्य आक्रमक त्यांची आक्रमणे मोडून काढावयाची असे हे दुहेरी कार्य होते. वर सांगितल्याप्रमाणे धर्म, समाजरचना, अर्थव्यवस्था या क्षेत्रांत समूळ क्रांती केल्यावाचून, हिंदुसमाजाची पुनर्घटना केल्यावाचून, एवढ्या कार्यासाठी अवश्य ते कर्तृत्व त्यांच्या ठायी निर्माण होणे शक्यच नव्हते. त्या कर्तृत्वासाठी भौतिक विद्येची पाश्चात्यांपेक्षाही जास्त उपासना करून वरील विषयांवर शेकडो ग्रंथ येथे निर्माण व्हावयास हवे होते. पण यातल्या कशाचाही प्रयत्न वा विचारही न करता मराठे साम्राज्यविस्तार करू लागले. या वेळी मुस्लिम हे त्यांच्यापेक्षाही मागासलेले व कर्तृत्वशून्य झाले होते. त्यांच्या सत्तेचा उच्छेद करणे मराठ्यांना जमले. पण हिंदुपदपातशाहीसाठी अखिल हिंदुसमाज, आसेतुहिमाचल राहणारा हिंदुसमाज, संघटित करणे अवश्य होते. म्हणजे शतकानुशतके उराशी बाळगलेली समाजरचनेची, धर्माची मूलतत्त्वे समूळ बदलावयास हवी होती. पण असे काही मराठ्यांच्या स्वप्नातही नव्हते, राज्यकर्त्यांच्या नव्हते आणि शास्त्री पंडित, कवी, तत्त्ववेत्ते यांच्याही नव्हते. ते राज्यकर्त्यांपेक्षा जास्त मागासलेले होते. तेव्हा साम्राज्यविस्तार करून हिंदुपदपातशाहीची स्थापना करण्यात मराठ्यांना यश आले नाही, यात नवल वाटण्याजोगे काहीच नाही. ज्या पातळीवरून ते हा प्रयत्न करीत होते, तेथून तसे यश येणे शक्यच नव्हते. चवदाव्या पंधराव्या शतकापासून युरोपात जे प्रबोधन युग सुरू झाले, त्यामुळे युरोपीय राष्ट्रे समर्थ झाली. तसे प्रबोधन हिंदुस्थानात घडणे अवश्य होते. निदान अखिल भारतीय साम्राज्य स्थापण्याची आकांक्षा धरणाऱ्या मराठ्यांनी तरी महाराष्ट्रात ते घडवावयास हवे होते. पण याची त्यांना कल्पनाही नव्हती. अशा स्थितीत हिंदुस्थानातच काय, महाराष्ट्रात सुद्धा स्थिर सत्ता स्थापन करणे त्यांना शक्य झाले नसते.
■