महाराष्ट्र संस्कृती/पेशवाईचा उदय
२६.
पेशवाईचा उदय
कारणे
मराठ्यांनी स्वातंत्र्ययुद्ध जिंकले आणि मराठ्यांच्या इतिहासाचा दुसरा कालखंड समाप्त झाला आणि थोड्याच म्हणजे पाचसहा वर्षात पेशवाई हा तिसरा कालखंड सुरू झाला. वर सांगितलेच आहे की युद्धसमाप्तीनंतर मराठ्यांच्यातील दुही संपली नाही. शाहू राजे दक्षिणेत आल्यानंतर तर ती जास्तच तीव्र झाली. पण एवढ्यावर हे भागले नाही. चंद्रसेन जाधव, रावरंभा निंबाळकर, दमाजी थोरात, हिंदुराव घोरपडे, इ. प्रमुख मराठा सरदार कधी ताराबाईच्या तर कधी शाहूराजांच्या पक्षाला असे करीत करीत शेवटी मोगलांना जाऊन मिळाले. मोगल उत्तरेत निघून गेले तरी त्यांचे दाऊदखान, निजाम हे सुभेदार दक्षिणेत होतेच. आणि मराठा सरदारांच्यांत फूट पाडून त्यांना आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी होत होते. यामुळे १७१३-१४ च्या सुमारास एक वेळ अशी आली होती की मराठ्यांचे स्वराज्य आता राहात नाही. वरील सरदारांनी ताराबाई किंवा शाहू यांपैकी कोणाचाही पक्ष घेऊन एकजूट केली असती तर असा प्रसंग आला नसता; उलट मोगली सत्ता त्याच वेळी संतुष्टात आली असती. त्यांच्यांत केवळ दुफळी माजली असती तरी स्वराज्य नष्ट होण्याचा प्रसंग आला नसता. पण ते सरदार मोगलांनाच मिळाले. खटावकरांसारखे काही सरदार आधीपासूनच मोगलांचे मनसबदार होते, तेही त्यांना सामील झाले. आणि सर्व शून्याकार होण्याची वेळ आली. अशा वेळी हे बुडते जहाज, नानाप्रयत्नाने त्याच्या फटी सांधून, छिद्रे बुजवून, बाळाजी विश्वनाथ, शाहू छत्रपतींचा पेशवा, याने प्रथम तरते केले, मग त्याच्यावर सर्व प्रकारचा सरंजाम भरून त्याला भक्कमपणा आणला, आणि ते पैलतीराला नेऊन स्वराज्याचे रक्षण केले.
स्वराज्याचे रूप
स्वराज्याचे रक्षण झाले हे खरे, त्याचे पुढे साम्राज्य झाले हेही खरे; पण हे स्वराज्य शिवछत्रपतींच्या स्वराज्याहून फार निराळे होते. त्याचे वैभव, त्याचे उज्ज्वल रूप याला नव्हते, आणि पुढे तसे केव्हाही आले नाही, पुढल्या शंभर वर्षात मराठ्यांनी मोठा गौरवास्पद इतिहास घडविला. पण हिंदवी स्वराज्य, अखिल भारताचे एकसंघ साम्राज्य, सर्व भरतभूवर एकछत्री सत्ता, या थोर उद्दिष्टांच्या आसपासही ते कधी येऊ शकले नाहीत. शिवसमर्थांनी शिकवलेली धर्मनिष्ठा, त्यांनी उपदेशिलेली राष्ट्रभक्ती मराठ्यांनी अंगी बाणविली असती तर ते स्वप्नही साकार झाले असते. पण या महाप्रेरणा त्यांच्याबरोबर लुप्त झाल्या. आणि वतनासक्ती, स्वार्थ, दुही, फितुरी या व्याधींनी मराठ्यांना ग्रासले. यांतून काही संघटित शक्ती निर्माण करून पेशव्यांनी मराठा राज्याचे रक्षण केले हेच जास्त. हे राज्य म्हणजेच पेशवाई. अशी ही जी पेशवाई तिचे स्वरूप आता न्याहाळावयाचे आहे.
मुक्तता
औरंगजेब मृत्यू पावला आणि त्याचा मुलगा अजमशहा याने अहमदनगर येथे तख्तावर आरोहण केले, आणि फौजफाटा, सरंजाम घेऊन तो दिल्लीकडे निघाला. जाताना शाहू राजे, मातुःश्री येसूबाई, राजांच्या स्त्रिया, आणि इतर लवाजमा यांना त्याने बरोबरच नेले. शाहू राजांना मुक्त करावे असे त्याच्या मनात नव्हते. पण नर्मदा पार झाल्यावर झुल्पिकारखानादी सरदारांनी राजांना सोडल्यास मराठ्यांच्यात दुफळी माजेल आणि पुढे मागे त्यांना जिंकणे सोपे होईल, असा विचार अजमशहाला सांगितला. तो त्याला पटून त्याने शाहू राजांना मुक्त केले. त्या वेळी मोगलांच्या ताबेदारीत राहून शाहू राजांनी राज्य करावे, आणि स्वराज्य, चौथाई, सरदेशमुखीचे हक्क त्यांनी वसूल करावे, असा उभयतांत करार झाला. पण सनदा मात्र त्या वेळी बादशहाने दिल्या नाहीत. पण मुक्तता झाली हेच पुष्कळ असे मानून राजे छावणीतून दोनशे स्वार बरोबर घेऊन निघाले व १७०७ सालच्या जून महिन्यात दक्षिणेत येऊन पोचले.
पुण्याई
शाहू राजे दक्षिणेत आले, तेव्हा येताना वाटेत आणि पुढे अहमदनगरपर्यंत, त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी त्यांचे जे उत्स्फूर्त स्वागत झाले त्यावरूनच त्यांचे आणि महाराष्ट्राचे भवितव्य ठरून गेले. आत्मबलिदान करणाऱ्या शंभुछत्रपतींचा हा मुलगा आहे, हाच खरा आपला राजा आहे, कैदेत त्याचे फार हाल झाले आहेत, त्याची आता आपण भरपाई केली पाहिजे, आपल्या निष्ठा त्याच्या चरणी वाहिल्या पाहिजेत, अशीच महाराष्ट्रात सर्वत्र भावना होती. परसोजी व कान्होजी भोसले, मानसिंग मोरे, अमृतराव कदमबांडे, नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर, केसो चिमल पिंगळे, हणमंते मंडळी, रायाजी, कृष्णाजी प्रभू, बोकील, पुरंदरे हे सर्व त्यांना मिळाले. पुढे ताराबाईने आणि वर निर्देशिलेल्या मराठा सरदारांनी द्वैत माजविले, त्यामुळे शाहूराजांना आपले आसन स्थिर करण्यास अतिशय प्रयास पडले, हे खरे. पण त्यातून निभावून ते स्थिरपद झाले ते त्यांच्या पाठीशी ही जी सर्व महाराष्ट्राची पुण्याई उभी राहिली तिच्यामुळेच होय यात शंका नाही.
दोन पक्ष
शाहू राजे दक्षिणेत आल्यावर त्यांनी ताराबाईंना पत्र पाठवून कळविले की 'आम्ही स्वदेशी आलो आहोत, आता आम्ही राज्य करू, आपला आशीर्वाद असावा.' पण हे न मानता शाहूराजांचा सर्वतोपरी नायनाट करण्याचा उद्योग त्यांनी आरंभिला. त्यांनी प्रथम, हा शाहू खरा नव्हे, तोतया आहे, असा पुकारा केला. पण हे टिकण्याजोगे नव्हते. राजांना शेकडो मराठा सरदारांनी औरंगजेबाच्या छावणीत ते असतानाही, अनेक वेळा स्वतः पाहिले होते. त्यामुळे ताराबाईचा पुकारा कोणीच मानला नाही. मग त्यांनी दुसरा मुद्दा मांडला. शंभूराजांनी राज्य चालविले ते राजाराम महाराजांनी रक्षिले. तेव्हा त्यांच्याच मुलाचा गादीवर हक्क आहे. तात्त्विक दृष्टीने या मुद्दयाला काहीतरी अर्थ होता. पण व्यवहारात मुळीच नव्हता. कारण राजारामांचा मुलगा धाकटा शिवाजी हा अगदीच नाकर्ता होता. त्याचे वागणे पुष्कळ वेळा वेडसरच असे. १७१४ साली ताराबाईंना व त्याला, त्याचा सावत्र भाऊ, राजसबाईचा मुलगा संभाजी याने कैदेत डांबले, तेव्हा तो अठरा वर्षांचा होता. त्याच्या अंगी काही कर्तृत्व असते तर त्याने त्याच्या पक्षाच्या मराठा सरदारांच्या मदतीने आकाशपाताळ एक करून, शाहू व संभाजी यांना बाजूस सारून, स्वतः राज्य घेतले असते. पण तसे त्याने काहीच केले नाही. १७१४ पासून बारा वर्षे कैदेत राहून १७२६ साली तो मृत्यू पावला. अंगात पाणी असते तर कैदेतून त्याने अनेक उलाढाली केल्या असत्या व तो निसटून तरी गेला असता. पण त्याच्या ठायी हे पौरुष नव्हतेच. तेव्हा ताराबाईंचा पक्ष खरा की शाहू राजांचा खरा या वादात काडीचाही अर्थ नाही. शाहू राजे हेच एकमेव मराठी राज्याचे धनी होते, आणि स्वार्थी मराठा सरदार वगळता अखिल महाराष्ट्राने तोच निर्णय ते परत येताक्षणीच दिला.
शाहू छत्रपती
पण ताराबाईंनी तो न मानल्यामुळे शाहूराजांना प्रत्यक्ष रणांगणात उतरून या वादाचा निकाल लावावा लागला. पहिली लढाई भीमेच्या काठी खेड येथे झाली. ताराबाईचे सैन्य चालून आले, थोडी चकमक झाली. पण तेवढ्यात सेतापती धनाजी जाधव यांनी राजांना पाहून, घोड्यावरून उतरून त्यांना मुजरा केला व आपल्या लोकांनिशी ते राजांना जाऊन मिळाले. लढाई पूर्वीच खंडो बल्लाळ, नारोराम आणि बाळाजी विश्वनाथ यांनी भेद करून ताराबाईच्या अनेक सरदारांना वळवून घेतले होते. परशुराम त्रिंबक हा मात्र ताराबाईशी एकनिष्ठ होता. तो पळून साताऱ्यावर गेला व ती राजधानी लढविण्याचा विचार त्याने केला. पण लवकरच किल्ल्याला वेढा घालून शाहूराजांनी मोठ्या तडफेने तो घेतला. आणि १२ जानेवारी १७०८ रोजी स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. लगेच त्यांनी अष्टप्रधानांच्या नेमणुकाही केल्या आणि क्षत्रियकुलावतंस श्री शाहू छत्रपती यांची कारकीर्द सुरू झाली.
अंकित राज्य
शाहूराजे यांनी शिवछत्रपतींच्या सारखीच पदवी धारण केली तरी ते शिवछत्रपतींच्या सारखे स्वतंत्र राजे झाले नाहीत. ते दक्षिणेत आले ते बादशाही मनसबदार म्हणून, एक अंकित म्हणून. आणि चौथाई सरदेशमुखीबरोबरच त्यांनी स्वराज्याच्याही सनदा बादशहाकडूनच घेतल्या होत्या. राज्याभिषेकसमयी त्यांच्या हाती त्या आल्या नव्हत्या, तरी बादशहाने जे तोंडी आश्वासन दिले होते त्याच्या आधारावरच ते राज्य करीत होते. १७०९ साली मोगल बादशहा बहादूरशहा (मूळचा शहा आलम) दक्षिणेत आला असताना शाहू छत्रपतींनी सरदेशमुखीच्या सनदांसाठी फिरून अर्ज केला. पण त्याच वेळी ताराबाईनींही आपला वकील धाडून तसाच अर्ज केला. तेव्हा तुम्ही आपसात लढून तंटा मिटवा, मग सनदा देऊ, असा बादशहाने निर्णय दिला. या वेळीही चौथाईच्या व स्वराज्याच्या सनदा बादशहाने दिल्या नाहीतच. त्या पुढे १७१९ साली बाळाजी विश्वनाथाने दिल्लीहून आणल्या. याचा अर्थ असा होतो की औरंगजेबाने मराठ्यांचे राज्य जिंकले ते त्यांनी लढून परत मिळविले नाही, तर बादशाही सनदेने त्यांना ते परत मिळाले; आणि शाहू छत्रपती प्रारंभापासूनच तसे मानून त्या आधारावरच स्वराज्यावर आपला हक्क सांगत होते.
सनदांचा आधार
शाहूछत्रपतींचे हे सांगणे केवळ कागदोपत्री नव्हते. तसे करण्यावाचून त्यांना गत्यंतरच नव्हते. बादशहा दिल्लीला परत गेला तरी त्याचे दाऊदखान, निजाम असे सुभेदार दक्षिणेतच होते. त्याचे सरदारही अनेक ठाण्यांवर आपल्या जागा धरून बसले होते. मराठ्यांचे स्वराज्य पुन्हा सिद्ध होऊ द्यावयाचे नाही, असाच त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे त्यांच्याशी लढणे शाहू छत्रपतींना भागच पडत होते. याच वेळी ताराबाई शाहूराजांचा हक्क नाकारीत होत्या. म्हणून त्यांच्याशी लढाई करावी लागतच होती. आणि सगळ्यांत मोठे दुर्दैव म्हणजे सेनापतीसकट मोठमोठे बलवान मराठा सरदार मोगलांना जाऊन मिळत होते. तसे नसते, ते शाहूछत्रपतींच्या मागे संघटितपणे उभे राहिले असते, तर बादशाही सनदेने स्वराज्य चालविण्याचे छत्रपतींना कारणच पडले नसते. येथील सुभेदारांना जिंकून त्यांनी स्वतःच्या बळावर स्वराज्य पुन्हा स्थापिले असते. पण असा स्वराज्याभिमान त्या मराठा सरदारांना नव्हता. ताराबानईंनाही नव्हता. राजारामांच्या मृत्यूपासूनच त्या बादशहाकडे अर्ज करीत होत्या. त्यामुळे, शाहूराजांनी मांडलिकी स्वीकारली व ताराबाई मात्र स्वतंत्र राज्य करणार होत्या, असा पक्ष मांडण्यात कसलाच अर्थ नाही. त्या काळच्या मराठा सरदारांनाही त्याचे महत्त्व वाटत नव्हते. शाहू, ताराबाई व मोगल यांत कोण बलिष्ट ठरतो याचा अदमास ते पहात होते व त्याप्रमाणे कधी इकडे तर कधी तिकडे असे करीत होते. स्वराज्याचे कसलेही सोयरसुतक त्यांना नव्हते. भरभक्कम वतने मिळून जास्तीत जास्त वैयक्तिक वार्थ जेथून साधेल तो त्यांचा पक्ष. म्हणून मोगलांचा जोर दिसताच, ते त्यांना जाऊन मिळाले. त्यामुळेच, बादशाही सनदेनेच आम्हांला स्वराज्य मिळाले आहे, असे दाखवून, मोगल सुभेदार व हे सरदार याच्या मागचा बादशाही पाठिंबा शाहूराजांना आपल्या मागे उभा करावा लागला.
पण असे कोणतेही कारण असले तरी मराठ्यांचे स्वराज्य हे पूर्ण स्वतंत्र राज्य आता राहिले नाही हे मान्य केलेच पाहिजे. पुढे नानासाहेब पेशव्याने १७४३ साली माळव्याची सनद मिळविली त्याचा हाच अर्थ आहे. आणि १७९२ साली महादजी शिंदे यांनी वकील मुतलकी हा अधिकार पेशव्यांसाठी व मीरबक्षीगिरी स्वतःसाठी आणली याचाही अर्थ पेशवे बादशहाचे अंकित होते हाच होतो. प्रत्यक्षात ही अंकितता कितपत होती याचा विचार पुढे करू. पण पूर्ण स्वातंत्र्य येथून पुढे राहिले नाही हे नाकारता येईल असे वाटत नाही.
बाळाजी विश्वनाथ
पेशवाईचा उदय कसा झाला आणि त्या सत्तेला कोणते स्वरूप प्राप्त झाले याचा विचार आपण करीत आहोत. तसे करताना शाहू छत्रपतींच्या प्रारंभीच्या काळातील परिस्थितीचा आपण विचार केला. मराठ्यांच्यांत फूट पाडण्याची मोगलांची वृत्ती, ताराबाईनी माजविलेली दुही आणि प्रमुख मराठा सरदारांची दुही आणि फितुरी या परिस्थितीतून पेशवाईचा उदय झाला. अर्थात, त्या उदयाला मूळ कारण बाळाजी विश्वनाथ याचे कर्तृत्व हे होय, हे उघडच आहे. वरील परिस्थितीत त्याने हे बुडते तारू कसे सावरले ते आता पाहू.
बाळाजी विश्वनाथ हा १६९९ सालापासून सात आठ वर्षे पुणे प्रांताचा सुभेदार म्हणून काम करीत होता. त्याच्या आधी दहापंधरा वर्षे तरी तो श्रीवर्धनहून वरघाटी आला असला पाहिजे. सेनापती धनाजी जाधवाच्या हाताखाली त्याने कारभारी (कारकून) म्हणूनही काम केले होते. शाहूराजे आणि येसूबाई मोगली कैदेत असताना त्यांची देखभाल नीट करण्याची कसोशी बाळाजी करीत असे. अनेक मोगल सरदारांशी त्याच्या ओळखी होत्या. त्यांच्या मार्फत तो आपली कामे करून घेत असे. पुणे प्रांतीचा सुभेदार असताना वसूल, न्यायनिवाडे, देवस्थानची इनामे, आणि क्वचित युद्धप्रसंग ही बहुविध कामे तो करीत असे. त्यामुळे अष्टप्रधान व इतर मराठा सरदार यांच्याशी त्याचा उत्तम परिचय होत असे.
शाहूराजे कैदेत असताना बाळाजीची ही कर्तबगारी पहात होते. ज्योत्याजी केसकर, बंकी गायकवाड इ. मध्यस्थांमार्फत त्यांचा त्याच्याशी संबंधही येत असे. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांनी हा माणूस हेरून ठेवला असला पाहिजे. पुढे खेडच्या लढाईच्या आधी ताराबाईच्या पक्षाच्या अनेक असामींची मने त्याने शाहूपक्षाला वळविल्याचे त्यांच्या ध्यानात आले होते. त्यामुळे राज्याभिषेक होताच, त्यांनी बाळाजीला सेनाकर्ते हे पद देऊन, पैसा जमवून सेना उभारण्याचे अत्यंत जबाबदारीचे व जोखमीचे काम त्याच्याकडे दिले. बाळाजीच्या कर्तृत्वाच्या खऱ्या विकासाला तेथूनच प्रारंभ झाला आणि महाराष्ट्र राज्य हे ध्येय डोळ्यांपुढे बाळगून, शाहू छत्रपतींच्या ठायी अचल निष्ठा ठेवून, त्याने अखेरपर्यंत कार्य केल्यामुळे त्याला मराठ्यांच्या राज्यरक्षणाचे अवघड कार्य करता आले.
इतर सरदार
वास्तविक त्या वेळी रामचंद्रपंत अमात्य, परशुरामपंत प्रतिनिधी, शंकराजी नारायण, चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, रावरंभा निंबाळकर, कृष्णराव खटावकर, हिंदुराव घोरपडे, खंडेराव दाभाडे, दामाजी थोरात असे अनेक मोठे कर्ते पुरुष स्वराज्यात होते. पण स्वराज्य हा ध्येयवाद, अचल निष्ठा आणि संघटनविद्या या गुणांत ते या ना त्या कारणाने उणे पडले. आणि त्यांचे कर्तृत्व वाया गेले. ते दुर्मिळ गुण बाळाजीने प्रगट केल्यामुळेच पुढल्या मराठी वैभवाचा पाया घातला गेला.
द्विधा मन
रामचंद्रपंतांच्या अलौकिक कर्तृत्वाचे वर्णन मागे केलेलेच आहे. ताराबाईंनी १७०० साली शाहूविरुद्ध भूमिका घेतल्यामुळे त्याचे मन द्विधा झाले. आणि त्याचे कर्तृत्व ऱ्हास पावू लागले. शाहू सुटून आल्यावर ताराबाईंनी सर्व मोठमोठ्या सरदारांकडून दूध- भातावर हात ठेवून एकनिष्ठेच्या शपथा घेवविल्या. मनातून ताराबाईवर निष्ठा नसताना अमात्याने ती शपथ घेतली. त्यामुळे तो जास्त खालावला. त्यातच त्याने शाहूराजांना एक उत्तेजनपर निरोप पाठविला. त्यामुळे ताराबाईंनी त्याला बेड्या घातल्या. पुढे साताऱ्यावर परशुरामपंत कैदेत पडला, तेव्हा त्याला मुक्त करून ताराबाईंनी पुन्हा अधिकार दिले. नंतर कोल्हापूर- संभाजीने ताराबाईला कैद केल्यावर अमात्यांनी त्याचा पुरस्कार केला असला पाहिजे. कारण त्याचे आज्ञापत्र त्याला उद्देशून लिहिले आहे. ताराबाईंना प्रारंभापासून ठाम विरोध करण्याचे धैर्य रामचंद्रपंताने दाखविले असते, तर त्याचे कर्तृत्व वाया गेले नसते व मराठी राज्याची हानी झाली नसती.
शंकराजी नारायण याने अमात्याप्रमाणेच शपथ घेतली होती. त्याला शाहू राजाचे पत्र गेले की भेटीस येतो. तेव्हा त्याचे मन अगदी द्विधा झाले व त्याने आत्महत्या केली. परशुरामपंत प्रतिनिधी याने प्रथम ताराबाईंशी खंबीर निष्ठा ठेवली. पण शाहूराजांनी कैदेत टाकल्यावर त्याने पक्ष बदलला. शाहू छत्रपतींनी त्यास प्रतिनिधिपदही दिले. पण पुढे तो पुन्हा ताराबाईंना मिळाला. आणि पुन्हा कैद केल्यावर पुन्हा शाहुराजांचा सेवक झाला. मराठी स्वराज्यावर या तीनही पुरुषांची निष्ठा होती. स्वार्थ त्यांना सुटला नव्हता हे खरे, पण फितुरीचा विचार त्यांच्या मनात आला नाही. पण ठाम निश्चय नाही, धरसोड, अविवेक यांमुळे त्यांचे कर्तृत्व वाया गेले.
एकमेव आधार
पण वर निर्देशिलेले जाधव- निंबाळकरादी जे सरदार त्यांचे कर्तृत्व, उच्च ध्येय, स्वराज्यनिष्ठा, स्वामिनिष्ठा यांच्या अभावी स्वराज्याला घातकच ठरले. शिवाय याच सुमाराला सेनापती धनाजी जाधव, परसोजी भोसले हे शाहुपक्षाचे कर्ते पुरुष, आणि मोगल दरबारात राहून शाहूराजांचे कार्य साधणारा, मोगल मनसबदार रायभानजी भोसले हे मृत्यू पावले. अशा या काळात शाहुछत्रपतींशी व स्वराज्याशी एकनिष्ठ राहून, सर्व आपत्तींना तोंड देऊन, त्यांवर मात करून, छत्रपतींना स्थिरपद करणारा एकमेव पुरुष म्हणजे बाळाजी विश्वनाथ. त्याने हे कार्य कसे केले ते आता पाहावयाचे आहे.
सामर्थ्य कशात ?
बाळाजी हा सेनापती नव्हता, रणनिपुण नव्हता. त्याचे सर्व सामर्थ्य मुत्सद्देगिरी, समयज्ञता, वाक्चातुर्य, युक्तिवाद यांत होते. मोठमोठ्या सरदारांना, सावकारांना आपल्या पक्षाला वळविणे, शत्रूचे बलाबल व मर्मस्थान जाणणे, शत्रूमित्रभाव योग्य रीतीने जोपासणे, अखंड सावध राहून योग्य वेळी पाऊल टाकणे आणि अत्यंत चतुराईने मोहरी व प्यादी हालवून शत्रूवर मात करणे यांत तो निपुण होता. या बळावरच तो यशस्वी झाला. अर्थात हे यश त्याला सुखासुखी मिळाले नाही. त्या धडपडीत त्याच्यावर अनेक कठीण प्रसंगही आले. त्याचे अनेक डाव अयशस्वी झाले, अंगावर उलटले. पण या सर्वातून त्याने जिद्दीने, धैर्याने मार्ग काढला व अखेर जिंकली.
धनाजीचा मुलगा
चंद्रसेन जाधव हा सेनापती धनाजी जाधव याचा मुलगा. धनाजीच्या मृत्यूनंतर शाहूछत्रपतींनी त्याला सेनापती नेमले. पण धनाजी हा स्वराज्याचा सर्वांत मोठा हितकर्ता होता, तर चंद्रसेन स्वराज्याचा सर्वांत मोठा शत्रू झाला. आरंभी शहागड, फत्यावाद अशा काही लढाया त्याने शाहू छत्रपतींच्या साठी जिंकल्या. पण जाधव, निंबाळकर, थोरात इ. सरदारांना ताराबाई आणि मोगल सुभेदार दाऊदखान यांच्याकडून सारखी विलोभने येऊ लागली, जागिरी, वतने, मनसबी यांची आश्वासने येऊ लागली. त्यामुळे त्यांची मने डळमळली आणि या तिघांतील जो भारी ठरेल त्याला मिळावयाचे असा विचार त्यांनी केला. शाहू किंवा ताराबाई यांच्या मागे उभे राहून आपण स्वराज्य-पक्ष भारी करावयाचा आहे असा ध्येयवाद त्यांच्या मनात नव्हता. त्यामुळे मोगलांकडून आश्वासने येताच त्यांनी शाहूछत्रपतींशी कुरापती काढून भांडणे करण्यास प्रारंभ केला.
सरदेसाई लिहितात, खानाशी बळकट संधान सिद्ध झाल्यावरच चंद्रसेनाने शाहूकडे दरडावणी चालू केली. आणि, ताराबाईंना एका पत्रात चंद्रसेनाने स्वतःच लिहिल्याप्रमाणे, दमाजी थोरात, शहाजी निंबाळकर, संताजी पांढरे, खंडेराव दाभाडे, परशुरामपंत प्रतिनिधी, मानसिंग मोरे, यांची मने शाहूविरुद्ध वळवून, सर्वांनी साताऱ्यावर चालून जाण्याचा कट केला. ही कारस्थाने चालू असतानाच बंडखोर सरदारांच्या बंदोबस्तासाठी शाहू छत्रपतींनी चंद्रसेन व बाळाजी यांना पाठविले होते. त्या वेळी एका क्षुल्लक कारणावरून त्याने बाळाजीला कैद करण्याचे ठरविले, तेव्हा बाळाजी आपले लष्कर घेऊन साताऱ्यास गेला. त्या वेळी चंद्रसेनाने शाहूछत्रपतींना धमकी दिली की स्वामींनी बाळाजीस आमच्या स्वाधीन करावे, नाही तर आम्हांस महाराजांचे पाय सुटतील. या उद्धटपणाचे प्रायश्चित्त देण्याचे ठरवून छत्रपतींनी हैबतराव निंबाळकर यास त्याच्यावर पाठविले. जेऊरच्या लढाईत हैबतरावाने त्याचा पुरा मोड केला (१७११). तेव्हा चंद्रसेन उघडपणे प्रथम ताराबाईस आणि दोनच महिन्यांनी (ऑगस्ट १७११) दाऊदखानास मिळाला.
खटावकर
याच वेळी खटावकरांनी दंगा सुरू केला. हे घराणे पूर्वापार मोगलांचे मनसबदार होते. स्वराज्यस्थापनेनंतरही अनेक घराणी मोगलांनाच आपले धनी समजत असत. त्यांतलेच हे एक. शाहूछत्रपतींनी बाळाजीस कृष्णराव खटावकर यावर पाठविले. या वेळी परशुरामपंत साताऱ्यास कैदेत होता. शाहूछत्रपतींची मर्जी सुप्रसन्न करून घेण्यासाठी त्याने आपला मुलगा श्रीपतराव यास बाळाजीबरोबर दिले. लढाईत कृष्णराव मारला गेला. त्याच्या मुलांना क्षमा करून शाहूराजांनी त्यांच्याकडे वतन कायम ठेविले.
वैयक्तिक धर्म
तत्कालीन धर्मकल्पनेचे स्वरूप लक्षात यावे म्हणून खटावकर घराण्याच्या धार्मिक वृत्तीची कल्पना येथे देतो. खटावकर हे देशस्थ ब्राह्मण. संस्कृत विद्येविषयी त्यांचा मोठा लौकिक होता. स्वतः कृष्णराव हा विद्वान असून विष्णुसहस्रनामावर द्वैतमताची टीकाही त्याने लिहिली होती. शंभुछत्रपतींच्या वधानंतर औरंगजेबाने कृष्णरावाला खटावची जहागीर दिली. ती स्वीकारण्यात त्याची विष्णुभक्ती कोठे आड आली नाही. खटाव येथे याने एक दत्तमंदिर बांधले. जेजुरीचा खंडोबा हे याचे कुलदैवत होते. तेथले सध्याचे मंदिर यानेच बांधले आहे. या घराण्यातले अनेक पुरुष विद्वान आणि साधुवृत्तीने राहणारे होते, असा त्यांचा लौकिक आहे.
शिवछत्रपतींनी स्वधर्म व स्वराज्य यांचे ऐक्य मानून लोकांवर ते संस्कार केले, दुष्ट, तरुक यांची सेवा हा अधर्म होय, अशी शिकवण दिली, ती मराठा समाजात कितपत रुजली ते यावरून ध्यानात येते. तुरुक सेवा हा अधर्म आहे, असे या सरदारांच्या स्वप्नातही कधी आले नाही. त्यांचा धर्म सर्व वैयक्तिक होता. खंडोबा, दत्त यांची मंदिरे बांधणे व परलोकसाधना करणे यापलीकडे धर्माचे काही कार्य आहे, असे त्यांना वाटतच नव्हते. धारणात् धर्मः।, प्रभवार्थाय लोकानां धर्मस्य नियमः कृतः।, हे विचार त्यांच्या मनाला कधी शिवलेच नाहीत. धर्माचे सामाजिक स्वरूप त्यांनी कधी जाणलेच नाही.
आणि जे देवधर्माच्या क्षेत्रात तेच राजकारणाच्या पराक्रमाच्या क्षेत्रात होते. मराठा सरदार आणि एकंदर हिंदू समाज हा समाज म्हणून जगायला कधी शिकलाच नाही. हे सर्व सरदार व्यक्ती म्हणूनच जगत होते. व्यक्तिगत मोक्ष हा कितीही उच्च असला तरी तो व्यक्तिगत स्वार्थच आहे, असे लो. टिळकांनी म्हटले आहे. हे पारलौकिक क्षेत्रात जर खरे आहे तर ऐहिक क्षेत्रात ते त्याच्या दसपटीने, शतपटीने खरे आहे. पण हिंदूंचे ऐहिक क्षेत्रातले जीवन असेच आहे. धर्मात ते जसे व्यक्ती म्हणून जगतात तसेच इहलोकात, राजकीय क्षेत्रातही व्यक्ती म्हणूनच जगतात.
दमाजी थोरात
दमाजी थोराताचे उदाहरण पहा. रामचंद्रपंताने यास प्रथम पुढे आणिले. पुणे व सुपे हे दोन परगणे त्यास जागीर म्हणून दिले होते. १७०८ साली शाहूछत्रपतींच्या भेटीस तो व रंभाजी निंबाळकर गेले असताना त्यांनी उद्धट वर्तन केले व तेव्हापासून त्यांनी स्वराज्यात दंगा सुरू केला. काही दिवस त्यांनी ताराबाईचा पुरस्कार केला, आणि त्या १७१४ साली कैदेत पडताच ते मोगलांना जाऊन मिळाले.
दक्षिणेच्या कारभारावर प्रथम दाऊदखान, नंतर निजाम व त्यानंतर हुसेन अल्ली असे मोगल सुभेदार होते. त्या सर्वास हे मराठा सरदार नमून वागत. १७१६ साली हुसेन अल्लीने पोशाख देऊन थोरातबंधूंचा गौरव केला व त्यांना बादशाही सेवेत घेतले.
निष्ठेअभावी
१७१६ साली जाधव, निंबाळकर, थोरात, मुहकमसिंग, तुरुकजातखान यांनी साताऱ्यावर चालून जाण्याची मोहीम आखली होती आणि रोहिडेश्वर, लोणी- भापकर येथपर्यंत ते आलेही होते. चंद्रसेनाने शाहूस व दमाजीने बाळाजीस पकडून द्यावयाचे असा मोगलांनी व्यूह रचला होता. पण बाळाजीने दाभाडे, मोरे, शिवदेव, सुलतानजी निंबाळकर यांच्या सेना एकत्र करून तो मोडून काढला. याचसाठी 'अतुल पराक्रमी सेवक' म्हणून शाहूछत्रपतींनी बाळाजीचा गौरव केलेला आढळतो. याच सुमारास दमाजी थोराताकडे शाहूपक्षामार्फत बोलणे करण्यास बाळाजी गेला होता. थोराताकडून त्याने आधी बेलभंडाराची शपथही आणविली होती. पण भेटीस येताच थोराताने बाळाजीस कैद केलं आणि जबर दंडाची मागणी केली. शपथेची आठवण देताच तो म्हणाला, बेल म्हणजे झाडाचा पाला, आणि भंडार म्हणजे रोजची खायची हळद! त्याचे काय महत्त्व! शेवटी सावकारांकडून पैसा जमवून दंड भरला, तेव्हा बाळाजीची सुटका झाली. १७१८ साली बाळाजी पेशव्याचा व सय्यद हुसेन अली यांचा तह ठरला. त्याबरोबर तिकडून तोफखाना आणून बाळाजीने दमाजी थोरातावर चाल केली. त्यास कैद केले आणि त्याच्या हिंगणगावच्या गढीवर नांगर फिरविला. पण वर्षभराने कैदेतून सुटल्यावर थोराताने पूर्वीचाच उद्योग आरंभिला. त्यामुळे पुन्हा तो कैदेत पडला व तेथेच मृत्यू पावला.
भालेराई
हिंदुराव घोरपडे, रंभाजी निंबाळकर, उदाजी चव्हाण या सरदारांच्या कथा काहीशा याच स्वरूपाच्या आहेत. स्वातंत्र्ययुद्धाच्या काळी भालेराई निर्माण झाली म्हणून मागे सांगितले आहे. त्या भालेराईचीच ही पुढली परंपरा आहे. या सरदारांना आपल्यावर कोणाची सत्ता म्हणून नको होती. स्वराज्य, स्वातंत्र्य, मराठ्यांचा उत्कर्ष याचे कसलेही सोयरसुतक यांना नव्हते. लष्कर जमवावे, चौफेर लुटालूट करावी, कधी दंडेलीने चौथाई, कधी सरदेशमुखी वसूल करावी, असा त्यांचा जीवनक्रम होता. या धोरणात ज्या वेळी ज्या पक्षाला मिळावेसे वाटेल त्याला ते मिळत आणि कार्यभाग झाला की पुन्हा उधळून जात. बाळाजीने मोगल बादशहाकडून सनदा आणल्यावर हे सरदार जरा नरम पडले. स्वराज्याला स्थैर्य येऊन त्याची शक्ती वाढल्यामुळेही त्यांचा जोर हटला. पण खरे म्हणजे याचा बंदोबस्त पूर्णपणे केव्हाच झाला नाही, कारण कोल्हापूरचा संभाजी, निजाम आणि पेशव्यांचे इतर हितशत्रू यांचा अशा सरदारांना नेहमीच पाठिंबा असे, त्यामुळे भालेराई कधी संपली नाही, आणि अराजक निमाले नाही. मराठी स्वराज्याचे साम्राज्य झाले तरी त्यातही हीच स्थिती होती. आणि याचे मुख्य कारण म्हणजे धर्म, स्वराज्य, स्वातंत्र्य यासंबंधीच्या निष्ठा या समाजाला शिकवून त्याला ' संगच्छध्वम्', 'संवदध्वम्' असे वळण लावून, एकजीव, संघटित समाज असे रूप देणारा नेता येथे निर्माणच झाला नाही.
अशा या अराजकातून, बेबंदशाहीतून काही प्रमाणात मराठा शक्ती संघटित करण्यात व टिकविण्यात बाळाजीला व पुढे पेशव्यांना यश मिळाले, म्हणून शंभर एक वर्षे तरी मराठ्यांचा उत्कर्ष होत गेला.
कान्होजीला वळविले
अशी शक्ती संघटित करण्याच्या बाळाजीच्या प्रयत्नातील सर्वात मोठा, अत्यंत यशस्वी व अत्यंत लाभदायक असा प्रयत्न म्हणजे कान्होजी आंग्रे याला स्वराज्य- पक्षाला वळविण्याचा होय. १६९८ सालापासून मराठा आरमाराचा कान्होजी हा प्रमुख होता. त्याला राजारामांनी सरखेल ही पदवी दिली होती. आणि आपल्या पराक्रमाने त्याने पोर्तुगीज, सिद्दी, इंग्रज या नाविक सत्तांना दहशत बसविली होती. असा हा कान्होजी शाहूराजे दक्षिणेत आल्यावर प्रथम त्यांना मिळाला होता. पण पुढे चंद्रसेनाच्या कारस्थानामुळे तो ताराबाईकडे गेला. अर्थात त्याचा बंदोबस्त करणे आले. शाहूछत्रपतींनी त्याच्यावर पेशवा बहिरोपंत पिंगळे यास पाठविले; पण कान्होजीने एकदम वरघाटी येऊन लोहगड किल्ला घेतला व बहिरोपंतास कैद केले. ही १७१३ सालची गोष्ट. या वेळी वरील आपत्तीमुळे शाहूराजांना आभाळ फाटल्यासारखे झाले. कारण विश्वासाचा व कर्ता असा एकही सरदार त्यांच्याजवळ या वेळी राहिला नव्हता. अशा वेळी बाळाजी पुढे झाला व आंग्ऱ्यांच्यावर चालून जाण्याची जोखीम त्याने पत्करली. मात्र त्याने, मला काही मोठे अधिकारपद दिलेत तर माझ्या शब्दाला प्रतिष्ठा येईल, असे छत्रपतींना सांगितले. ते त्यांना पटून त्यांनी १८ नोव्हेंबर १७१३ रोजी बाळाजीस पेशवाईची वस्त्रे दिली. अधिकार मिळताच बाळाजीने कान्होजीच्या बंदोबस्ताचे काम सुरू केले. मात्र ते त्याच्या पद्धतीने. येवढ्या बलाढ्य सरदाराला लष्करी बळाने जिंकणे अशक्य आहे, हे बाळाजी जाणत होता. म्हणून त्याने आपली माणसे पाठवून कान्होजीला परिस्थिती व शत्रुमित्रांचे बलाबल याची यथार्थ कल्पना दिली. ताराबाईच्या पक्षात आता काही अर्थ राहिला नव्हता. पश्चिमेच्या नाविक सत्तांचे बळ वाढत होते. अशा वेळी शाहू छत्रपतींचा व सर्व स्वराज्याचा पाठिंबा त्याला लाभला तर त्याला वाटेल तो पराक्रम करता येईल, हे बाळाजीने कान्होजीला पटवून दिले. आणि कुलाब्याला जाऊन त्याची प्रत्यक्ष भेट घेऊन, 'महाराजांचे चाकर होऊन कृपा संपादून घ्यावी' हा विचार त्याच्यापुढे मांडला. कान्होजीला तो मान्य झाला. आणि पश्चिमेचा हा बलाढ्य सरदार स्वराज्याचा आधारस्तंभ झाला. ताराबाईचा पक्ष नामशेष करून टाकणे आणि स्वराज्याची पश्चिम दिशा निर्धास्त करून टाकणे ही दोन कामे बाळाजीने या उद्योगाने साधली. त्यामुळे महाराष्ट्रात त्याची प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात वाढली. आणि पेशवा हे एक नवे सामर्थ्य महाराष्ट्रात निर्माण झाले.
ग्रहयोग
येथून पुढे शाहू छत्रपतींच्या पक्षाला ग्रहयोग जरा अनुकूल असे होऊ लागले १७१४ च्या फेब्रुवारीत आंग्रे त्या पक्षाला मिळाले आणि त्याच सालच्या ऑगस्ट- मध्ये ताराबाईना त्यांचा सावत्र मुलगा राजसबाईचा पुत्र संभाजी याने कैदेत टाकले आणि कोल्हापूरला आपली स्वतंत्र गादी स्थापिली. हा संभाजी काही शाहूपक्षाला अनुकूल होता असे नाही. निजामाला मिळून स्वराज्याविरुद्ध कारस्थाने करणे, एकंदर मराठा समाजाचा, महाराष्ट्राचा, विचार स्वप्नातही न करणे या दृष्टीने वर सांगितलेल्या मराठा सरदारांच्या जातीचाच तो होता. पण या वेळी तरी ताराबाईचा स्वराज्याला होणारा उपद्रव थंड पडण्यास तो कारण झाला. म्हणून हा ग्रहयोग अनुकूल होय, असे म्हटले आहे. वास्तविक या वेळी ताराबाईचा मुलगा शिवाजी हा अठरा वर्षाचा होऊनही कसलीही कर्तबगारी दाखवीत नव्हता. तेव्हा शाहूराजांच्या हाती सत्ता जाण्यातच मराठी राज्याचे हित आहे, हा विचार ताराबाईला कळावयास हवा होता आणि त्यांनी आपले स्वराज्यविघातक उद्योग थांबवावयास हवे होते. पण मराठी राज्याच्या हिताची दृष्टी डोळ्यांपुढे असेल तेव्हा असे विचार संभवतात. ती नसल्यामुळे ही बाई मरेपर्यंत आपले विघातक उद्योग करीतच राहिली होती. आणि विशेष दुर्दैवाची गोष्ट ही की अनेक मराठा सरदार आणि अष्टप्रधानांपैकी काही प्रधानही तिला शेवटपर्यंत साथ देत राहिले.
सय्यद बंधू
ताराराणी निष्प्रभ झाल्या हा अनुकूल ग्रहयोग असे वर म्हटले. तसाच दिल्लीचा बादशहा फरूकसीयर याने सय्यद हुसेन अली याची दक्षिणच्या सुभ्यावर नेमणूक केली हा दुसरा अनुकूल ग्रहयोग होय. हा ग्रहयोग पहिल्याच्या शतपटीने अधिक लाभदायक होता. सय्यदच्या या नेमणुकीमुळे दक्षिणच्या राजकारणाचा सर्व ओघ बदलून गेला. शाहूछत्रपती व मराठी स्वराज्य यांचे भवितव्य त्यामुळे निश्चित झाले.
१७१२ च्या फेब्रुवारीत बहादूरशहा मरण पावला आणि जहांदरशहा तख्तावर आला. पण १७१३ च्या जानेवारीत त्याला ठार मारून फरुकसीयर बादशहा झाला. या बादशहाला तख्त मिळविण्याच्या कामी सय्यद बंधूंचे फार मोठे साहाय्य झाले होते. ते इतके की पुढे सर्व सत्ताच सय्यद हसन व हुसेन यांच्या हाती गेली आणि बादशहाला त्यांच्याविषयी द्वेष उत्पन्न होऊन तो त्यांच्या नाशाची खटपट करू लागला. त्यातलाच एक डाव म्हणून, त्या बंधूंची जोडी फोडण्यासाठी त्याने हुसेन अलीची दक्षिणच्या सुभ्यावर १७१५ च्या मे महिन्यात नेमणूक केली.
त्याच्या आधी निजाम उल्मुल्क दक्षिणचा सुभेदार होता. तो मराठ्यांचा हाडवैरी होता. हुसेन अली काही फार निराळा नव्हता. पण बादशहाने त्याच्या नाशाचे डाव रचले, तेव्हा नाइलाजाने त्याला मराठ्यांशी दोस्ती करावी लागली. आणि या संधीचा फायदा बाळाजीने घेतला. वर मराठ्यांना हा ग्रहयोग अनुकूल झाला असे म्हटले आहे. पण बाळाजीने अत्यंत मुत्सद्देगिरी लढवून आणि धाडशी डाव टाकून त्यांचा उपयोग करून घेतल्यामुळेच मराठ्यांचा लाभ झाला. नाहीतर अनुकूल योग येऊनही उपयोग होतोच असे नाही.
बादशहाला शह
हुसेन सय्यद दक्षिणेकडे निघाला तेव्हा, गुजराथेत असलेल्या दाऊदखानास बादशहाने गुप्तपणे हुकूम पाठविला होता की त्यास कारभार न देता मारून टाकावे. त्याप्रमाणे दाऊदखान चालून आलाही; पण लढाईत दाऊदखानच मारला गेला (ऑगस्ट १७१५). हुसेन अलीविरुद्ध बादशहाने मराठ्यांनाही चेतविले होते; त्यामुळे त्यांनी मोगली मुलखावर हल्ले करण्यास प्रारंभ केला होता. हुसेन अलीने त्याशी मुकाबला करण्याचा खूप प्रयत्न केला. पण खंडेराव दाभाडे आणि सुलतानजी निंबाळकर यांनी त्याच्या फौजांचा पूर्ण मोड केला. तेव्हा हुसेन अलीने मराठ्यांशी गोडी करून बादशहालाच शह देण्याचा डाव टाकला आणि मराठ्यांना ती सुवर्णसंधी मिळाली.
तह
हुसेन अलीने शंकराजी मल्हार याच्या मार्फत शाहूछत्रपतींशी बोलणी सुरू केली. शंकराजी मल्हार पूर्वी राजारामांचा सचिव होता. पण ते पद सोडून तो जिंजीहून काशीस गेला व तेथून दिल्लीला जाऊन तेथे त्याने आपला जम बसविला. तो हुसेन अलीचा कारभारी म्हणूनच दक्षिणेत आला होता. बाळाजी विश्वनाथ आणि चिमणाजी दामोदर यांच्या मध्यस्थीने त्याने शाहूछत्रपतींशी वाटाघाटी चालविल्या आणि त्यांतूनच हुसेन अलीच्या मार्फत छत्रपती आणि बादशहा यांच्यांत तह ठरला. (१) शिवाजीच्या वेळचा स्वराज्याचा मुलूख शाहूच्या हवाली करावा. (२) अलीकडे मराठ्यांनी खानदेश, वऱ्हाड, गोंडवन, हैदराबाद व कर्नाटक या प्रांतांतले काही विभाग जिंकले होते, ते बादशहाने त्यांच्या स्वराज्यात दाखल करून टाकावे. (३) दक्षिणेतील मोगलांच्या सहा सुभ्यांतून मराठ्यांनी चौथाईचे व सरदेशमुखीचे हक्क वसूल करावे आणि त्या बदल्यात त्या मुलखात बादशहाचे मदतीसाठी पंधरा हजार फौज ठेवावी. (४) मराठ्यांनी बादशाहाला दरसाल दहा लाख खंडणी द्यावी. आणि (५) शाहूराजांची माता येसूबाई, त्यांचा कुटुंबपरिवार, संभाजीचा दासीपुत्र मदनसिंग यांना मुक्त करून स्वदेशी पोचवावे. असा तहाचा मुख्य मतलब होता.
सनदा
कराराप्रमाणे खंडेराव दाभाडे याच्या हाताखाली मराठ्यांची फौज औरंगाबादेस आली. याच वेळी दिल्लीचा सय्यद हसन अली अबदुल्ला याचे व बादशहाचे सडकून वाकडे आले, म्हणून त्याने हसन अलीला दिल्लीला बोलाविले. तेव्हा तो मराठ्यांची फौज बरोबर घेऊन निघाला. बादशहाला अर्थातच हे रुचले नाही. त्याने मराठ्यांशी झालेला तह नामंजूर केला आणि आपल्या वगीच्या सरदारांना सेना घेऊन दिल्लीस बोलविले.
याचा अर्थ असा की दिल्लीला एका लढाईचीच तयारी चालू झाली आणि प्रत्यक्षात झालेही तसेच. सय्यद बंधूंची स्वतःची तीस चाळीस हजार फौज होती. शिवाय मराठ्यांची दहाबारा हजार. यामुळे बादशहाच्यातर्फे कोणी सरदार ठाण मांडून उभा राहीना. सय्यद बंधू शहराची नाकेबंदी करून राजवाड्यात शिरले. तेथे कलह विकोपाला जाऊन त्यांनी फरुकसीयरला कैद केले व नव्या बादशहाची स्थापना केली. आणि मग त्याच्याकडुन मराठ्यांशी झालेल्या तहाला मंजुरी देवविली आणि ठरल्याप्रमाणे स्वराज्य, चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा बाळाजी विश्वनाथाच्या हवाली केल्या. २० मार्च १७१९ रोजी बाळाजी दिल्लीहून निघाला आणि जुलैमध्ये साताऱ्यात येऊन पोचला.
वरील प्रकारच्या सनदांमुळे शाहूछत्रपतींचे आसन स्थिर झाले आणि त्यांच्या राजपदाला अवश्य ती प्रतिष्ठा प्राप्त झाली. चिटणीस लिखित शाहूचरित्राच्या आधारे सरदेसाई यांनी म्हटले आहे की अष्टप्रधान व सरदार त्यांचे हुकूम बिनतक्रार बजावून बाहेर संचार करू लागले. हुजुरांनी बोलाविले असता एका क्षणाचाही विलंब न करता येऊ लागले. सर्व निष्ठेने चालू लागले (पुण्यश्लोक शाहू, पृ. १३८). याचा अर्थ असा की शाहूपक्षाच्या मराठ्यांच्या मताने सुद्धा बादशाही सनदा मिळाल्यामुळेच शाहूराजे हे स्वराज्याचे खरे धनी झाले. मग दक्षिणेतल्या मुसलमान सुभेदार, सरदारांना तसे वाटले असल्यास नवल नाही. सनदांनंतरही निजामासारखे दक्षिणेचे सुभेदार आणि काही सरदार छत्रपतींना जुमानीत नव्हते हे खरे. अनेक मराठा सरदारांनी सुद्धा आपला विरोध सोडला नव्हता. हे सर्व खरे असले तरी शाहू छत्रपतींच्या सत्तेला या सनदांमुळे नैतिक प्रतिष्ठा लाभली, आणि स्वराज्यातील राज्यकारभार आणि दक्षिणच्या सहा मोगली सुभ्यांतील चौथाई- सरदेशमुखीचा वसूल पूर्वीपेक्षा जास्त सुकर झाला हे नाकारता येणार नाही.
नवा उद्योग
दुसरा मोठा फायदा असा की मराठ्यांना बादशही हुकमानेच एक स्वतंत्र उद्योग मिळाला. बऱ्हाणपूर, वऱ्हाड, विजापूर, कर्नाटक, बेदर आणि हैदराबाद हे मोगलांचे दक्षिणेतले सहा सुभे. यांतून चौथाई व सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्याचा अधिकार मराठ्यांना मिळाला. याच्या बदल्यात मराठयांनी आपली पंधरा हजार फौज बादशहाचे दिमतीम ठेवून तेथला बंदोबस्त राखावा असा करार होता. यामुळे मराठा सरदारांचे लक्ष घरगुती भांडणातून काढून बाहेरच्या उद्योगात लावण्याचा बाळाजीचा हेतू सिद्धीम गेला. आणि मराठ्यांना एक नवीन कार्यक्षेत्र मिळाले; आणि मराठी राज्याचे फार मोठे रूपांतर झाले.
सरंजामदारी
वतनासक्ती आणि वतनदारी यामुळे सर्व राज्य कसे विस्कळित विघटित झाले ते मांगे सांगितलेच आहे. शाहूराजे छत्रपती झाले, तेव्हा त्यांना अनेक मराठा सरदार अनुकुल झाले तरी त्यांची वतने त्यांच्याकडे जशीच्या तशी कायमच होती. त्यात हस्तक्षेप करून शिवछत्रपतींच्या धोरणाअन्वये वतनदारीवर नियंत्रण घालणे हे शाहू छत्रपतींना सर्वथा अशक्य होते. बादशाही सनदांनंतर मराठ्यांना जो नवा उद्योग मिळाला म्हणून वर सांगितले त्यातून आता सरंजामदारी निर्माण झाली. सरदारांना स्वतंत्र फौज ठेवावयास सांगून तिच्या खर्चासाठी स्वतंत्र मुलूख किंवा प्रदेश त्यांच्याकडे लावून दिले की ती सरंजामदारी होते. आदिलशाहीचे बहुतेक सरदार सरंजामदारच होते. शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन केल्यावर मात्र स्वतंत्र फौज ठेवण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही. त्या वेळचे मराठा लष्कर हे सर्व छत्रपतींचे लष्कर होते. राजारामांच्या काळी वतनदारी पुन्हा जोरावली, तेव्हा तिला सरंजामदारीचे रूप येऊ लागले. तीच व्यवस्था शाहू छत्रपतींना पुढे चालवावी लागली. त्यांच्याजवळ पैसा नव्हता. वसूल सर्व बंद पडला होता. आणि फौज तर हवी होती. धनाजी जाधव, आंगरे, निंबाळकर, दाभाडे, नागपूरकर भोसले यांना छत्रपतींनी प्रारंभीच मोठमोठे सरंजाम तोडून दिले. हे सरदार व त्यांचे वारस मुजोर झाले, तेव्हा बाळाजीस सेनाकर्ते हो पदवी देऊन छत्रपतींचे लष्कर स्वतंत्रपणे उभारण्याची व्यवस्था त्यांना करावी लागली पण त्यामुळे सरंजामदारीला आळा बसला असे नाही.
बादशाही सनदा मिळाल्यानंतर एकंदर राज्याकारभाराची पद्धत निश्चित करण्याची वेळ आली, तेव्हा शाहुछत्रपती व बाळाजी विश्वनाथ यांना सरंजामदारी व्यवस्था मान्य करूनच पुढे पाऊल टाकावे लागले. त्यावाचून गत्यंतरच नव्हते. असे असल्यामुळे पुढीलप्रमाणे व्यवस्था करण्यात आली.
राज्याची वाटणी
सरदेशमुखीचे सर्व उत्पन्न हे छत्रपतींचे खाजगी उत्पन्न असे ठरविण्यात आले. उत्पन्नाचा खरा मोठा भाग म्हणजे राज्यातील वसूल आणि मोगली सुभ्यातील चौथाईचा वसूल हा होय. यातील चौथा हिस्सा वसूल हा राजबाबती म्हणून निराळा काढण्यात येई व तो सर्व राजाच्या खर्चासाठी दिला जाई. राहिलेला तीनचतुर्थांश म्हणजे जो पंचाहत्तर टक्के वसूल त्याला मोकासा म्हणत. त्यातून राज्याचा खर्च व्हावयाचा. यातील शेकडा सहा वसूल म्हणजे साहोत्रा आणि शेकडा तीन वसूल म्हणजे नाडगौडा. हा राजाने आपल्या मर्जीप्रमाणे कोणालाही द्यावयाचा असे. आता एकंदर वसुलापैकी ६६ टक्के राहिले. हा भाग प्रदेशाच्या रूपाने निरनिराळ्या सरदारांना वाटून देण्यात आला. खानदेश व बालाघाटचा काही भाग हा पेशव्यांकडे, बागलाण व गुजराथ सेनापतीकडे, सेनासाहेब सुभा कान्होजी भोसले याच्याकडे वऱ्हाड व गोंडवन, सरलष्कराकडे गंगथडी व औरंगाबाद सुभा, प्रतिनिधी-नीरा, वारणा व हैदराबाद, चिटणीस व आंग्रे- कोकण, अशी उद्योगाची वाटणी छत्रपतींनी करून दिली. या प्रदेशांत सरदारांनी फौज ठेवून संचार करावा, वसूल करावा आणि बंदोबस्त ठेवावा अशी व्यवस्था आखण्यात आली.
स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात वतनांच्या आश्वासनांमुळे मराठ्यांना जशी पराक्रमाची स्फूर्ती मिळाली तशीच स्फूर्ती या सरंजामी व्यवस्थेमुळे आता आणि पुढे त्यांना मिळाली. पुढल्या काळात दक्षिणच्या सहा सुभ्यांखेरीज उत्तरेतील गुजराथ, माळवा, पंजाब, बंगाल, बुंदेलखंड, आग्रा, दिल्ली, दुआब, अयोध्या, ओरिसा या प्रदेशांच्या चौथाईच्या सनदा मराठ्यांनी काही खुषीने, काही जबरदस्तीने मिळविल्या. आणि यामुळेच सर्व हिंदुस्थानभर मराठयांचा संचार होऊ लागला व मुस्लिम सत्ता नष्ट झाली.
मुलूखगिरी
पण यामुळे मराठी राज्य हे राज्य असे राहिलेच नाही. प्रदेश तोडून दिल्यामुळे आणि प्रत्येक सरदाराने स्वतंत्र फौज ठेवावयाची असल्यामुळे ते ते प्रदेश म्हणजे स्वतंत्र राज्येच झाली. आणि हे सरंजाम वंशपरंपरेने दिल्यामुळे सर्व राज्य कायमचे विघटित झाले. शिवाय दर पिढीस कर्ता पुरुष निर्माण होतोच असे नाही. त्यामुळे पराक्रम, राज्यविस्तार यासाठी दिलेले सरंजाम, पराक्रम नसतानाही, त्या त्या घराण्याकडे तसेच कायम राहिले. आणि मग स्वाऱ्या मोहिमांसाठी छत्रपती व पेशवे यांना पुरेसा पैसा मिळणे अशक्य होऊन बसले. या पद्धतीने मराठी राज्याचे साम्राज्य झाले हे खरे. पण सत्ता आणि राज्यव्यवस्था या दृष्टीने त्या साम्राज्याला फारच थोडा अर्थ उरला. मराठ्यांच्या मोहिमांना मुलूखगिरी असे कायमचे रूप प्राप्त झाले.
दुर्बल छत्रपती
सरंजाम तोडून दिल्यामुळे मराठी राज्य विघटित झाले. आणि मराठी राज्यातील आणखी एका मोठया वैगुण्यामुळे त्या विघटनेला आवर घालणे अशक्य होऊन बसले. ते वैगुण्य म्हणजे मराठा छत्रपतींचे दौर्बल्य, त्यांची कर्तृत्वहीनता! राजारामांसंबंधी मागे सांगितलेच आहे. ते केवळ नाममात्र सत्ताधीश होते. कारभाराची सूत्रे रामचंद्रपंत अमात्य याच्याकडे होती. तो काही झाले तरी दुय्यम सत्ताधारी, छत्रपती नव्हे. त्यामुळे सर्वावर जरब बसविणे, सर्वांना लगामी लावणे त्याला अशक्य होते. शाहू छत्रपतींच्या कारकीर्दीत हेच झाले. प्रारंभीच्या चारपाच वर्षांच्या काळात त्यांनी बरे कर्तृत्व प्रगट केले, पण ते पुढे टिकले नाही. 'त्याची ही पहिली तरतरी अखेरपर्यंत टिकती तर मराठी राज्याचा पुढील इतिहास पुष्कळसा निराळा झाला असता असे सरदेसायांनी म्हटले आहे (पुण्यश्लोक शाहू, पृ. ४०). ते अगदी खरे आहे. पण ती तरतरी टिकली नाही आणि कारभाराची मुख्य सूत्रे पेशव्यांच्या हाती गेली. म्हणजे जबाबदारी सगळी, पण सत्ता मात्र दुय्यम, अशी स्थिती पुन्हा आली. या दुय्यम सत्तेच्या बळावर पेशव्यांनी कर्तृत्व खूपच गाजविले. त्यामुळेच मराठी स्वराज्याचे साम्राज्य झाले. पण छत्रपतींच्या एकमुखी, निग्रहानुग्रहसमर्थ अशा सत्तेच्या अभावी त्याला वर सांगितल्याप्रमाणे मुखगिरीचे रूप आले.
पेशवाईचे रूप
पेशवाईचा उदय कसा झाला आणि या कालखंडात मराठी राज्याला कोणते रूप प्राप्त झाले ते आपण पाहत आहो. शाहूराजे दक्षिणेत येऊन छत्रपतीपदी आरूढ झाले, तेव्हा चंद्रसेन जाधव, निंबाळकर, थोरात, घोरपडे इ. अनेक सरदार महाराष्ट्रात प्रबळ होते. ते सर्व संघटित होऊन छत्रपतींना मिळाले असते तर मराठी स्वराज्याला बळकटी येऊन मोगली सत्तेचा त्याच वेळी समूळ उच्छेद झाला असता. पण ते सरदार मोगलांना जाऊन मिळाले. त्यामुळे बाळाजी विश्वनाथ या कर्त्या पुरुषाला शाहू छत्रपतींनी हाताशी घेतले व त्याला पेशवेपद दिले. सुदैवाने तो पुरुष असामान्य कर्तृत्वाचा निघाला. त्याने काही सरदारांना नमवून, काहींना शाहूपक्षाला वळवून महाराष्ट्रात संघटित शक्ती निर्माण केली आणि हुसेन अल्लीच्या गरजेचा फायदा घेऊन दिल्लीहून स्वराज्य, सरदेशमुखी आणि चौथाई या सनदा आणल्या. त्यानंतर शाहूछत्रपतींनी स्वतः राज्यकारभार पाहून स्वाऱ्या, मोहिमा केल्या असत्या तर अल्पकाळातच स्वराज्याला पूर्वीचे रूप प्राप्त झाले असते. पण ते कर्तृत्व, ते तेज त्यांच्या ठायी नव्हते. सर्व भार पेशव्यांवर सोपवून ते सुखासीन झाले. त्यामुळे सत्ता पेशव्यांच्या हाती गेली. पण अनेक सरदारांपैकी एक व अनेक प्रधानांपकी एक अशीच त्यांची पदवी असल्यामुळे, वतनदारीमुळे सुरू झालेल्या विघटनेला आवर घालणे त्यांच्या शक्तीबाहेरचे होते. इतर प्रधान व मंत्री यांना जरब बसविणे त्यांना शक्य नव्हते. वतनदारीला सरंजामदारीचे रूप आले होते तेच मान्य करून त्यांनी राज्याची व्यवस्था केली. यामुळे मराठी राज्यात अनेक, बव्हंशी स्वतंत्र अशी, राज्येच निर्माण झाली. कोणत्याही राज्याच्या बळकटीसाठी अवश्य अशी जी एकमुखी सार्वभौम सत्ता ती मराठी राज्याला कधी लाभलीच नाही. पेशवा हा त्या राज्याचा नेता झाला, पण हे नेतृत्व यशस्वी करण्यास अवश्य ती सत्ता मात्र त्याला कधी मिळाली नाही. त्यामुळे मराठमंडळाची सत्ता असे मराठी राज्याला व साम्राज्याला रूप प्राप्त झाले. अर्थात या मंडळाला काही निश्चित घटना होती असे मुळीच नाही. पेशवा आपल्या कर्तबगारीने या विस्कळित प्रपंचातून जी एकसूत्रता व संघटित शक्ती निर्माण करील तेवढेच मराठी राज्याचे सामर्थ्य.
अशा सामर्थ्यावर चालविलेला राज्यकारभार हे पेशवाईचे स्वरूप होते.
■