महाराष्ट्र संस्कृती/स्वराज्याचे साम्राज्य



२७.
स्वराज्याचे साम्राज्य
 


 पेशवा बाळाजी विश्वनाथ याने मराठा शक्ती काही प्रमाणात संघटित करून स्वराज्याचे रक्षण केले आणि दिल्लीहून सनदा आणून त्याला बादशाही मान्यता मिळविली; तर त्याचा मुलगा बाजीराव याने या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करून मराठ्यांना हिंदुस्थानच्या इतिहासात वैभवाचे स्थान मिळवून दिले. ते साम्राज्य कसे झाले, त्याच्या मागे प्रेरणा कोणत्या होत्या, त्यातील मराठी सत्ता कशी होती आणि एकंदर त्या साम्राज्याचे स्वरूप काय होते ते संस्कृतीच्या दृष्टीने आता पहावयाचे आहे.

चौथाई पद्धती
 स्वराज्याचा विस्तार झाला तो चौथाईच्या पद्धतीने झाला. चौथाईची पद्धत प्रथम शिवछत्रपतींनी सुरू केली. काही प्रदेशावर त्यांनी आपली सत्ता पूर्णपणे बसविली होती. ते त्यांचे स्वराज्य. त्यानंतर ते वारंवार मोगलांच्या ताब्यातील मुलखावर स्वाऱ्या करीत. त्यामुळे तेथील प्रजाजनांना त्रास होई. तेव्हा त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना व व्यापारी, सावकार इ. प्रमुख नागरिकांना सांगितले की 'या मुलखाच्या उत्पन्नाचा चौथा भाग म्हणजे चौथाई जर तुम्ही आम्हांला दिली तर आम्ही तुम्हांला कसलाही उपद्रव देणार नाही, उलट तुमचे नेहमी संरक्षण करू.' चौथाईची पद्धत ती हीच. स्वराज्याच्या विस्तारासाठी सैन्य ठेवावे लागते, त्याला भारी खर्च येतो. तो खर्च परस्पर शत्रूच्या मुलखातून भागवावयाचा आणि त्या निमित्ताने शिरकाव करून मग तेथे पूर्ण सत्ता स्थापावयाची अशी ही स्वराज्याच्या विस्ताराची अभिनव योजना होती. साम्राज्याच्या विस्तारासाठी मराठ्यांनी याच चौथाईच्या पद्धतीचा अवलंब केला. पुढे इंग्रजांचा पराक्रमी गव्हर्नर वेलस्ली याने तैनाती फौजेचे जे तत्त्व प्रस्थापित केले. ते म्हणजे चौथाईचेच निराळे रूप होते, असे इतिहास पंडित सांगतात.

विस्ताराची सनद
 मोगल बादशहाने, दक्षिणेतले मोगली सत्ता असलेले बऱ्हाणपूर, वऱ्हाड, विजापूर, कर्नाटक, बेदर आणि हैदराबाद हे जे सहा सुभे, त्यांतून चौथाई व सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्याची सनद मरठ्यांना दिली. तीमुळे साम्राज्यविस्तार करण्यास मराठयांना फार मोठी संधी मिळाली. हा सर्व वसूल मराठ्यांनी स्वतः करावयाचा होता आणि त्याच्या बदल्यात तेथे सतत फौज ठेवून त्या मुलखाचा बंदोबस्त राखावयाचा होता. याचा अर्थ असा की ही सनद म्हणजे राज्यविस्ताराचीच सनद होती. हे जाणून मराठ्यांनी या सहा सुभ्यांत तर संचार सुरू केलाच. पण त्या मर्यादा ओलांडून माळवा, गुजराथ, बुंदेलखंड, या प्रदेशांत फौजा नेल्या आणि प्रथम जबरदस्तीने तेथून चौथाई वसूल करण्यास प्रारंभ केला आणि मागाहून तशा सनदा बादशहाकडून मिळविल्या आणि हेच धोरण पुढे रेटून बंगाल, बिहार, पंजाब, राजस्थान या प्रदेशांतही आपली सत्ता प्रस्थापित केली. अशा रीतीने चौथाई- सरदेशमुखीच्या पद्धतीने मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार झाला. यांतील माळवा, गुजराथ, बुंदेलखंड येथील बडोदे, उज्जयिनी, इंदूर, ग्वाल्हेर, धम, देवास, सागर अशा काही ठिकाणी पुढे पूर्ण सत्ता स्थापण्यात मरठ्यांना यश आले. पण अन्यत्र तसे यश आले नाही. त्यामुळे मराठयांच्या येथील पराक्रमाला लोकांच्या दृष्टीने हीन रूप प्राप्त झाले. पण तो पुढचा इतिहास आहे. पेशवा बाजीराव यांच्या कारकीर्दीत साम्राज्य विस्तारले कसे ते सध्या आपण पाहत आहो.

हिंदू विरुद्ध मुस्लिम
 बादशाही सनदा मिळाल्या, म्हणून दक्षिणच्या सहा सुभ्यांतील चौथाईची वसुली आणि इतर कारभार सुखाने, सुरळीत होऊ लागला, असे मुळीच नाही. मोगल बादशहा या वेळी स्वतः दुबळा असला तरी त्याचे सुभेदार व सरदार हे मराठ्यांचे अगदी हाडवैरी होते. मोगली सुभ्यांतीलच काय, पण स्वराज्यातलासुद्धा मराठ्यांचा कारभार सुखाने होऊ द्यावयाचा नाही, असा त्यांचा निश्चय होता. या सर्वांत निजाम उल्मुल्क हा मराठ्यांचा सर्वात मोठा शत्रू हा महा धूर्त, कारस्थानी व पाताळयंत्री होता. मराठ्यांची सत्ता शक्य तर समूळ नाहीशी करावी, आणि दक्षिणेत आपले स्वतंत्र राज्य स्थापावे, अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. त्याचे सरदार मुबारिजखान, तुरुकजातखान हेही मराठ्यांचे वैरीच होते. शिवाय दक्षिणेत आर्काटचा नबाब सादतुल्लाखान व त्याच्या विभागातील कडाप्पा, कर्नूळ, शिरे, सावनूर अशा ठाण्यांवरचे नबाब हेही आपापली ठाणी पक्की धरून होते. बादशाही सनदा मानाव्या, असे यांपैकी एकाच्याही मनात नव्हते. उत्तरेत पाहिले तरी तेच. महंमदखान बंगष, सरबुलंदखान, कमरूद्दिनखान या बादशाही सरदारांना मराठ्यांचा होत असलेला उत्कर्ष मुळीच सहन होत नसे. सवाई जयसिंगासारख्या रजपूत सरदारांनी मराठ्यांना अनुकूल असा काही सल्ला बादशहाला दिला तर हे सरदार त्याला कसून विरोध करीत. बुंदेलखंड, गुजराथ, माळवा या प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या फौजा घेऊन त्यांनी मराठ्यांना पायबंद घालण्याचा सतत प्रयत्न चालविला होता. यामुळे मराठ्यांना प्रत्येक पाऊल पुढे टाकताना लढाई करावी लागे. आणि ती दरसाल करावी लागे. लढाई केल्यावाचून चौथाई सरदेशमुखीचे हक्क वसूल झाले, असे एका वर्षीही घडले नाही.

निष्ठाशून्य
 पण लष्करी बळावर मराठ्यांच्या मुलखात शिरून या मुस्लिम सुभेदार सरदारांनी जो विध्वंस केला, जो संहार केला त्यापेक्षाही, त्यांनी मोठमोठया मराठा सरदारांना नाना विलोभने दाखवून, भेदनीतीने त्यांना स्वपक्षाला सामील करून घेतले, यामुळे मराठी सत्तेची जास्त हानी झाली. चंद्रसेन जाधव, रंभाजी निंबाळकर, उदाजी चव्हाण यांच्या कथा मागे आल्याच आहेत. त्यांच्या जोडीला आता सेनासाहेब सुभा कान्होजी भोसले, सरलष्कर सुलतानजी निंबाळकर, कंठाजी कदम, उदाजी पवार, चिमणाजी दामोदर राजाज्ञा, त्रिंबकराव दाभाडे सेनापती हे सरदारही निजामाला मिळाले. आश्चर्याची गोष्ट अशी की यातल्या बहुतेकांनी शाहूछत्रपतींच्या बाजूने गुजराथ, माळवा, कर्नाटक या प्रदेशांत आणि स्वराज्यातही मोठमोठे पराक्रम करून साम्राज्यविस्ताराला विपुल साह्य केले होते. पण तरीही त्यांना आपल्या पक्षात ओढण्यात निजाम यशस्वी झाला. कोणत्याही प्रकारच्या निष्ठा त्यांच्या ठायी नव्हत्या हेच त्याचे कारण होय. निजामाला मिळण्यात आपण धर्मद्रोह करीत आहो, आणि महाराष्ट्र राज्याला विरोध करण्यात आपण राष्ट्रद्रोह करीत आहो, असे त्यांच्या मनाला कधी वाटले नाही. स्वामिनिष्ठा ही एक निष्ठा त्या काळी प्रबळ असे; पण तीही त्यांच्या ठायी नव्हती. आज शाहू, उद्या संभाजी, परवा निजाम असा नित्य रुचिपालट ते करीत.

कोल्हापूर- संभाजी
 या सरदारांप्रमाणेच कोल्हापूरचे संभाजी राजे हा साम्राज्यविस्ताराच्या मार्गातला फार मोठा अडसर होता. महाराणी ताराबाई यांच्याप्रमाणेच, मराठी राज्याचे खरे धनी आपणच, अशी त्यांची भावना होती. वास्तविक, शाहुछत्रपतींनी या बाबतीत त्यांच्याशी शक्य ती तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही पराक्रम करा, पराक्रमी माणसे हाताशी घ्या, मोगली प्रदेश जिंकून घ्या, आम्ही तसाच उद्योग करू आणि आमच्यातला निम्मा वाटा तुम्हांला देऊ, तुमच्यातला निम्मा वाटा आम्हांला द्या, असे छत्रपतींनी संभाजी राजांना अनेक वेळा विनविले होते. पण त्यांच्या ठायी ती कर्तबगारी नव्हती. दाभाडे, कदम, उदाजी चव्हाण असे अनेक सरदार शाहूचे राज्य बुडवून संभाजी राजांना गादीवर आणण्याची भाषा बोलत. पण त्यासाठी ते निजामाचा आश्रय करीत. वास्तविक याची काय गरज होती ? एवढे सरदार संघटित झाले असते तर त्यांच्या साह्याने निजामाला आणि कर्नाटकातील नबाबांना सहज रगडून काढता आले असते. आणि मराठयांचे स्वतंत्र राज्यच स्थापिता आले असते. पण संभाजीराजांना किंवा त्या सरदारांना तसली काही आकांक्षाच नव्हती. म्हणून त्या त्या वेळेच्या लहरीप्रमाणे ते एका पक्षाच्या बाजूने दुसऱ्याच्या मुलखात धुमाकूळ माजवीत आणि लूटमार करून पैसा जमवीत. यामुळे यातील बहुतेक सरदारांचे कर्तृत्व, त्यांची गुणसंपदा वाया गेली, आणि त्यांची बंडखोरी शमविण्यात शाहूछत्रपती आणि पेशवे यांची निम्मी शक्ती वाया गेली.

कर्तृत्वशून्य प्रधान
 भारतभर भिन्नभिन्न प्रदेशांत सत्ताधारी असलेले मुस्लिम सुभेदार, सरदार, नबाब ही मराठी साम्राज्यविरोधी अशी पहिली शक्ती. या सरदारांना फितूर होऊन शाहू- छत्रपतींना बुडविण्यास सज्ज होणारे मराठा सरदार ही दुसरी शक्ती. तिसरीही अशीच एक शक्ती होती. ती म्हणजे शाहू छत्रपतींचे प्रतिनिधी, अमात्य, सुमंत, मंत्री, सेनापती इ. पेशव्याला पाण्यात पाहणारे प्रधान. हे सर्व पिढीजाद लोक होते आणि त्यांच्या मते, पेशवा म्हणजे कानामागून आलेला एकोणीस वीस वर्षांचा पोरगा ! त्याला हे सर्वात महत्त्वाचे पद दिले, याचे त्यांना वैषम्य वाटत असे. ते त्याच्या मत्सराने जळत असत. असा मत्सर वाटणे हे अगदी स्वाभाविक आहे. पण एक तर छत्रपतींनी एकदा नेमणूक केल्यानंतर राज्याची शिस्त म्हणून सर्व प्रधानांनी व सरदारांनी मान देणे अवश्य होते. पण शिस्त ही कल्पनाच मराठा सरदारांना मान्य नव्हती. एकदा आज्ञा झाल्यानंतर स्वार्थ, मानापमान, मत्सर सर्व बाजूस ठेवून, सर्वांनी आज्ञेप्रमाणे एकजुटीने कार्य केले पाहिजे, हा जो कोणतीही संस्था चालण्यास अवश्य असलेला गुण तो मराठ्यांच्या अंगी कधी बाणलाच नाही. त्यामुळे पेशव्याविरुद्ध या प्रधानांनी कायम आघाडी उघडलेली होती.

पेशव्यांचा मत्सर
 पण पेशव्याशी दावा धरूनही या प्रधानांना मराठी सत्तेच्या विकासाला साह्य करता आले असते. शाहू महाराजांनी प्रत्येकाला मुलुखगिरीसाठी स्वतंत्र प्रदेश वाटून दिला होता. आणि यवनाक्रांत सर्व हिंदुस्थान त्यांना पराक्रमासाठी मोकळा होता. आपल्या हिंमतीवर सेना उभारून त्यांनी या प्रदेशात मराठी सत्ता विस्तारली असती तर छत्रपतींनी त्यांचे कौतुकच केले असते. १७२५ च्या दसऱ्यानंतर त्यांनी या सरदारांना कर्नाटकची मोहीम स्वतंत्रपणे करण्यास आज्ञाच दिली होती. या वेळी फत्तेसिंग भोसले यास प्रमुख नेमून श्रीपतराव प्रतिनिधी, खंडेराव दाभाडे, सुलतानजी निंबाळकर, सरलष्कर यांना त्याच्या हाताखाली सामील होण्याचे हुकुम सोडले होते. पेशवा बाजीराव यास त्यांनी मुद्दामच त्यातून वगळले होते. त्यांना स्वतंत्रपणे मोहीम करण्यास अवसर द्यावा, हा त्यांचा हेतू होता. पण बाजीरावावाचून हे सरदार पुढे पाऊल टाकण्यास तयारच होईनात. तेव्हा नाइलाजाने छत्रपतींना त्याला पाठवावे लागले. ही या प्रधानांची हिंमत, हे यांचे कर्तृत्व! पुढच्या वर्षीच्या कर्नाटकच्या दुसऱ्या म्हणजे श्रीरंगपट्टणच्या स्वारीत तर ते आणखीन उघडे पडले. बाजीराव स्वारीवर असताना निजामाने संभाजी राजांना उठवून शाहू महाराजांना उखडून टाकण्याचा डाव मांडला होता. त्या वेळी स्वसंरक्षणासाठी महाराजांना बाजीरावालाच परत बोलवावे लागले. ती कामगिरीसुद्धा करण्याची ताकद इतर कोणात नव्हती आणि असे असूनही या प्रधानांचा मत्सर, द्वेष कायम होता. आणि संभाजी राजांचे नाव पुढे करून निजामाला मिळणे हे उद्योग चालूच होते. आनंदराव सुमंताने तर निजामास चिथावणी दिली की बाजीरावाशी वैर धरल्यास शाहूमहाराजांना वाईट वाटणार नाही, राज्यातील कुत्रेही त्यास (बाजीरावास) सामील होणार नाही ! प्रतिनिधी, नारोराम मंत्री, अमात्य सर्वांची हीच तऱ्हा स्वतःच्या ठायी कर्तृत्व नाही आणि बाजीरावाचा उभा द्वेष ! आणि त्यापायी त्याच्या मार्गात कांटे पसरणे आणि छत्रपतींचे मन त्याच्याविषयी कलुषित करणे हा उद्योग !

थोरले बाजीराव
 अशा या परिस्थितीतून, दारचे आणि घरचे शत्रू यांचा विरोध मोडून काढून श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे ऊर्फ राऊस्वामी यांनी मराठी स्वराज्याचे साम्राज्य कसे केले ते आता पहावयाचे आहे. हिंदुपदपातशाहीवरील अढळ दृष्टी, अविचल स्वामिनिष्ठा, निःस्वार्थ, निकोप वृत्ती, असामान्य युद्धनेतृत्व, अखंड सावधानता आणि नवे कर्तृत्व निर्माण करण्याची विद्या या बळावरच त्यांनी हे प्रचंड कार्य साधले, यात शंका नाही.
 शाहू छत्रपती स्थिरपद झाले आणि चौथाई सरदेशमुखीच्या सनदा त्यांना मिळाल्या. त्यामुळे हिंदुपदपातशाहीच्या कार्यास नव्या उत्साहाने, नव्या जोमाने त्यांनी प्रारंभ केला. प्रथम त्यांनी कर्नाटककडे दृष्टी वळविली. त्या वेळी तुंगभद्रेच्या दक्षिणेच्या सर्वच प्रदेशाला कर्नाटक म्हणत असत. त्या प्रदेशातून चौथाईचे हक्क वसूल करण्यासाठी त्यांनी फत्तेसिंग भोसले यास आज्ञा दिली.

कर्नाटक मोहिमा
 वर सांगितलेच आहे की निजाम हा मराठ्यांचा सर्वांत मोठा शत्रू होता. स्वतःच्या हैदराबाद सुभ्यात तर त्याने सुखाने कधी वसूल होऊ दिला नाहीच, पण कोणत्याच सुभ्यात असा वसूल होऊ द्यावयाचा नाही, असा त्याचा निर्धार होता. त्यामुळे कर्नाटकात तर त्याने अडसर उभे केलेच. गुजराथ, माळवा, बुंदेलखंड या प्रदेशांतही तो मराठ्यांच्या विरुद्ध कारस्थाने रचीत असे. कर्नाटकात मराठे जातात असे पाहाताच, त्याने तेथील सर्व मुस्लिम सरदार- नबाबांना पत्रे लिहून चिथावणी दिली व स्वतःही लष्कर घेऊन तेथे उतरला. यामुळे या संग्रामाला साहजिकच हिंदू विरुद्ध मुसलमान असे रूप आले. कर्नाटकात तंजावरला व्यंकोजीच्या वंशजांचे राज्य आधीपासूनच होते. संताजी घोरपडे याचे पुत्र पिराजी व मुरारराव घोरपडे यांनी गुत्तीला मराठ्यांचे बळकट ठाणे निर्माण केले होते. शिवाय श्रीरंगपट्टणचा वोडियार, साेंध्याचा राजा बस्वलिंग यांनीही मुसलमानी उपद्रवापासून आम्हांस सोडवावे अशी छत्रपतींची विनवणी केली होती. हे सर्व ध्यानी घेऊनच शाहू महाराजांनी फत्तेसिंग भोसले, दाभाडे, निंबाळकर, प्रतिनिधी यांना तिकडे पाठविण्याचा विचार केला होता. निरनिराळ्या सरदारांना निरनिराळे प्रदेश वाटून देऊन त्यांच्या कर्तृत्वास अवसर द्यावा असा त्यांचा यात हेतू होता. पण दुर्दैवाने त्यांनी कच खाल्ली. आणि पेशवा बाजीराव यालाही तिकडे जावे लागले. लागोपाठ चित्रदुर्ग व श्रीरंगपट्टण या दोन स्वाऱ्या करून त्याने त्या प्रांतांत मराठ्यांची पत पुष्कळच वाढवली. मुस्लिम अधिसत्ता सोडून कर्नाटकीय संस्थानिक मराठ्यांच्या अधिसत्तेखाली येण्यास खुषीने तयार झाले, यातच पेशव्यांचे यश सामावलेले आहे.

निजाम- शाहू
 पण पेशवा बाजीराव आणि इतर मराठे सरदार कर्नाटकाच्या मोहिमेत गुंतलेले पाहून निजामाने इकडे भलताच उपद्व्याप सुरू केला. कोल्हापूरच्या संभाजीराजांना त्याने चिथावले आणि चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, रंभाजी व जानोजी निंबाळकर यांना शाहूमहाराजांच्या विरुद्ध उठवून त्यांच्या राज्यावर चहूबाजूंनी चढाईच सुरू केली. मात्र शाहूराजांना त्याने मानभावीपणाने पत्र लिहिले की तुमचा आमचा तंटा नाही. पण तुमचा पेशवा बाजीराव हा कारण नसता आमच्या मुलखाला त्रास देतो. तेव्हा त्याला दूर करा. मग तुमचा आमचा स्नेह कायमचा आहे. शाहूमहाराजांना प्रथम हे खरं वाटे. बाजीराव नसते उद्योग करीत आहे, असा त्यांचा समज झाला. पण निजामाने प्रत्यक्ष चढाईच सुरू केली, तेव्हा त्यांचे डोळे उघडले. शिवाय निजामाने त्यांना असेही लिहिले की संभाजीराजेही तुमच्याप्रमाणेच मराठी राज्यावर हक्क सांगत आहेत. तेव्हा तुम्ही आपसात लढून काय तो निकाल लावा म्हणजे चौथाई देण्यास आम्ही तयार आहो. बहादुरशहाने ताराबाईच्या बाबतीत शाहूराजांना हेच सांगितले होते. तोच डाव निजामाने पुन्हा टाकलेला पाहून महाराज संतापले आणि त्यांनी लगोलग पेशवा बाजीराज यास कर्नाटकातून परत बोलाविले.

पालखेड
 आणि मग १७२७ च्या दसऱ्यापासून १७२८ च्या फेब्रुवारीपर्यंत बाजीराव आणि निजाम यांची प्रचंड लढाई झाली. दोघांनी एकमेकांच्या प्रदेशात प्रचंड विध्वंस व संहार केला. पण शेवटी बाजीरावाने १७२८ च्या फेब्रुवारीत पालखेडजवळ निजामाचा पुरा कोंडमारा केला, तेव्हा त्याची रग जिरली व शरण येऊन त्याने, संभाजीस शाहू महाराजांच्या स्वाधीन करावे आणि दक्षिणेच्या सहा सुभ्यांवर मराठयांचे हक्क सुरळीत चालू द्यावे, या अटी मान्य केल्या. मराठयांच्या इतिहासात ही लढाई फार प्रसिद्ध आहे. कारण त्या लढाईने मराठ्यांचा सर्वात मोठा शत्रु नामोहरम झाला, बाजीराव पेशव्याचा पराक्रम जगाला दिसून आला, शिंदे, होळकर, पवार इ. त्याच्या सरदारांची कर्तबगारी लोकांच्या प्रत्ययास आली आणि मराठी साम्राज्याचे भवितव्य ठरले. अत्यंत विस्कळित, विघटित, फुटीर अशा मराठा समाजातून मोठमोठ्या शत्रुवरही मात करणारी सांघिक शक्ती निर्माण करणारा एक नवा पुरुष उदयास आला आहे याची समज त्या दिवशी सर्व हिंदुस्थानला मिळाली.

माळवा
 माळवा आणि बुंदेलखंड हे प्रदेश चिमाजी बाजीरावांनी जिंकले, तेव्हा या नव्या सामर्थ्याचा सर्वांना पुन्हा एकदा प्रत्यय आला. पालखेडची लढाई निजाविरुद्ध होती. तर अमझेरा आणि जैतपूर येथील लढाई दिल्लीच्या मोगल बादशहाचे मोठे पराक्रमी सरदार यांच्या विरुद्ध होती. त्यामुळे माळव्यातील विजय सर्व हिंदुस्थानात फार दुमदुमला. या लढायांची वर्णने येथे देण्याचा विचार नाही. त्याचे कारणही नाही. त्या वेळच्या राजकीय पटावरील भिन्न भिन्न शक्ती कोणत्या होत्या, त्यांच्यामागे प्रेरणा कोणत्या होत्या, मराठ्यांच्या मार्गात अडसर कोणते होते, नवे कर्तृत्व कोणते उदयास आले, हे सर्व पाहून यशापयशाची मीमांसा आपल्याला करावयाची आहे.
 महाराष्ट्रात स्वातंत्र्ययुद्ध चालू होते, तेव्हा मराठे सरदार मधूनच नर्मदा पार होऊन गुजराथ, माळवा, बुंदेलखंड या प्रदेशात मुसंडी मारीत असत. या सर्व प्रांतांतून आपल्याला चौथाई वसूल करावयाची आहे, हा विचार त्यांच्या मनात तेव्हापासून पक्का रुजलेला होता. शाहू छत्रपतींची सत्ता स्थापन झाल्यावर त्यांनी वरील प्रदेशात आपले सरदार पाठविण्यास योजनापूर्वकच प्रारंभ केला.

हिंदू नेता
 अर्थात मोगल पातशहा आणि त्याचे सरबुलंदखान, महंमदखान बंगष इ. सरदार यांचा या मराठा आक्रमणास सक्त विरोध होता, हे उघडच आहे. त्यांच्याप्रमाणेच निजामाचाही विरोध होता. त्याची स्वतःची आकांक्षा दक्षिणेपुरतीच होती हे खरे. पण मराठे प्रबळ झाले तर पुढे आपल्याला भारी पडतील हे त्याला दिसत होते. म्हणून शक्य तेथे तो त्यांच्याविरुद्ध कारस्थाने करीत असे. पण या वेळी माळव्यात रजपूत सरदार आणि लोक मराठ्यांना अनुकूल होते. सवाई जयसिंग हा तर मराठ्यांना पूर्ण अनुकूल होता. आणि त्यानेच बाजीरावास बोलावून घेऊन ही स्वारी करविली, असे काही पंडितांचे मत आहे. मंडलोई, अनूपसिंग या सरदारांनी तर बाजी- चिमाजीस प्रत्यक्ष साह्यच केलं. कारण मोगली अंमल लोकांना असह्य झाला होता. गिरिधर बहाद्दूर व दया बहाद्दूर या दोन बादशाही अंमलदारांनी प्रजेला अगदी पिळून काढले होते. त्यामुळे सरदारांप्रमाणेच प्रजाजनांनीही मराठ्यांचे स्वागतच केले. याच कारणाने नानासाहेब सरदेसाई यांनी या युद्धाला रजपूत व मराठे यांचे मोगलांविरुद्ध धर्मयुद्ध असे म्हटले आहे. यावरून कर्नाटकातील युद्धाप्रमाणेच हे माळव्यातील युद्धही हिंदुपदपादशाहीच्या स्थापनेसाठीच होते, हे स्पष्ट दिसते. पेशवा बाजीराव याचा, शिवछत्रपतींच्या नंतरचा हिंदूंचा मोठा पुरस्कर्ता, असा गौरव सर्वत्र झाला, तो याच कारणाने.
 माळवा बुंदेलखंड या स्वारीत उदाजी पवाराचे फार मोठे साह्य झाले. बाजीरावाच्या आज्ञेवरून तो १७२२ पासून माळव्यात संचार करीत होता. १७२४ साली त्याने धारला आपले ठाणेही वसविले. आणि तेथून तो गुजराथ, काठेवाड, मारवाड, बुंदी, कोटा, बुंदेलखंड एवढ्या टापूत संचार करीत असे.

अद्भुत पराक्रम
 कंठाजी कदम हा माळव्यात उपद्रव करीत होता. त्याच्यावर गिरिधर बहादूर हा मोगल सुभेदार चालून गेला तेव्हा तो पळून गेला. तेव्हा बहादुराने अमझेरा येथे मुक्काम केला. येवढ्यात चिमाजी आप्पा आणि उदाजी पवार २२ हजार फौजेनिशी त्यावर चालून गेले. २२ नोव्हेंबर १७२८ रोजी मोठी लढाई होऊन गिरिधर व दया- बहादूर ठार झाले. मराठ्यांची फत्ते झाली. आणि क्षणभर सर्व हिंदुस्थान हादरले. मराठ्यांचा हा पराक्रम अद्भुत असाच होता.
 याच वेळी बुंदेलखंडावर झडप घालून बाजीरावाने महंमदखान बंगष या दुसऱ्या बादशाही सरदारास खटा केले. बुंदेले हे रजपूतच होते. त्यांचा राजा छत्रसाल हा पराक्रमी होता. तो शिवछत्रपतींना भेटल्याचे मागे सांगितलेच आहे. पण त्यानंतर बुंदेल्यांनी विशेष पराक्रम केला नव्हता. ही एक मोठी खेदाची गोष्ट आहे की राजस्थानातील किंवा बुंदेलखंडातील रजपूत यांनी मराठ्यांच्यासारखी संघशक्ती कधी निर्माण केली नाही आणि मोगल पातशाहीविरुद्ध स्वतःच्या बळावर कधी उठाव केला नाही. पण बाजीरावाच्या पराक्रमाच्या वार्ता ऐकून त्यांना आता जोम आला, उत्साह आला आणि ते मराठ्यांना सामील होऊन बादशाही बुडवू लागले. तेव्हा महमंद खान बंगष त्यावर चालून आला आणि जैतपूरच्या लढाईत त्याने छत्रसालाचा पराभव केला. याच वेळी चिमाजी आप्पाच्या विजयाच्या वार्ता छत्रसालाच्या कानावर आल्या व त्याने आपला वकील दुर्गादास यास बाजीरावाकडे पाठवून मदतीची याचना केली. बाजीराव तिकडे निघालाच होता. त्याला आता अधिकच जोर चढला. त्याने त्वरेने येऊन बंगषाला वेढा घातला आणि अन्नपाणी काटून त्याचे नरडे आवळले. १७२९ च्या मे महिन्यात ही लढाई झाली. बंगषाच्या मदतीला बादशाही सरदार आले होते. पण वाटेतच मराठ्यांनी त्यांना धुळीस मिळविले. त्यामुळे बंगषाला शरणागती पत्करण्यावाचून गत्यंतरच राहिले नाही.

नवे कर्तृत्व
 असे हे दोन फार प्रचंड व निर्णायक विजय मिळवून बाजी- चिमाजी परत आले. पालखेडच्या व या स्वारीत राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, पिलाजी जाधव, उदाजी पवार हे प्रमुख आणि बाजी भीवराव रेठरेकर, गणतपराव मेहेंदळे, अंताजी माणकेश्वर, नारो शंकर, गोविंद बल्लाळ खेर, तुकोजी पवार, दावलजी सोमवंशी, असे अनेक नवे कर्ते पुरुष उदयास आले. त्यांच्या कर्तृत्वावरच पुढचा साम्राज्यविस्तार झालेला आहे.

मराठ्यांची वृत्ती
 माळवा, बुंदेलखंड यांवरील अपूर्व विजयामुळे मराठी सत्तेची हद्द यमुनेला जाऊन मिळाली त्यामुळे समस्त यावनी मंडळास मोठी दहशत बसली. बादशहास तर वाटू लागले की बाजीराव आता दिल्लीवर येतो. आणि पुढे सात आठ वर्षांनी हा पेशवा दिल्लीवर चालून गेलाच होता; त्यावरून ही भीती निराधार होती असे नाही. मराठ्यांच्या एका वकिलाने त्या वेळी लिहिलेच की 'रायांचा पुण्यप्रताप ऐसा जाला आहे की हस्तानापूरचे राज्य घेऊन छत्रपतीस देतील तर आज अनुकूल आहे.' बादशहाप्रमाणेच निजामही धसकून गेला. बादशहाबद्दल त्याला मुळीच निष्ठा नव्हती. पण दिल्लीला मोगल, मुस्लिम पातशाही राहिली पाहिजे आणि हिंदूंचा सर्वत्र पाडाव झाला पाहिजे अशी त्याची प्रबळ आकांक्षा होती. आणि दिल्ली पडली तर आपले राज्यही जाईल ही भीती त्याला होतीच. बादशहा आणि निजाम याप्रमाणे हादरले आणि संतप्त झाले तर ते स्वाभाविक होते. पण बाजीरावाच्या या पराक्रमामुळे संभाजी राजे व सेनापती दाभाडे हेही संतापून उठले ही दुर्दैवाची गोष्ट होय. पण मराठ्यांची फुटीर वृत्ती, बेशिस्त वर्तन आणि निखालस निष्ठाशून्यता ही लक्षात घेता, मुस्लिम सत्ताधीश माळव्यामुळे संतापणे जितके स्वाभाविक होते, तितकेच मराठे सरदार संतापणे हेही स्वाभाविकच होते असे म्हणावेसे वाटते.

निजामाची विश्रांती
 मराठयांच्या या वृत्तीचा फायदा घेण्यास निजाम सदैव टपलेलाच होता. मराठ्यांच्यात जेथे फूट दिसेल तेथे पाचर मारून, भेदनीतीचा अवलंब करून, त्यांचे सामर्थ्य खच्ची करण्याचे निजामाने व्रतच घेतले होते. आणि पुढील निजामांनी मराठ्यांच्या सत्तेच्या अखेरीपर्यंत ते काम चालवले होते. निजाम नसता, किंवा वेळीच व्यंकोजीराम या वकिलाने म्हटल्याप्रमाणे, 'निजामाची बाजीरावांनी विश्रांती केली असती', तर मराठी साम्राज्याचा विस्तार झाला यापेक्षा कितीतरी जास्त झाला असता...पण तसे झाले नाही. असो. पालखेडला पूर्ण पराभव झाल्यामुळे या वेळी निजामाला उघडपणे लष्करी हालचाल करणे जरा धोक्याचे वाटले. म्हणून त्याने संभाजी राजे व सेनापती दाभाडे यांना शाहू छत्रपतींच्या विरुद्ध उठविले आणि त्यांचे राज्य समूळ नष्ट करण्याचा डाव टाकला.

वारणेचा तह
 संभाजीराजांचा या वेळी उदाजी चव्हाण हा मुख्य साह्यकर्ता होता. निजामाच्या पाठिंब्याने आणि चव्हाणाच्या बळावर त्यांनी शाहू छत्रपतींवर स्वारी करण्याचेच ठरविले. मग मात्र संभाजीराजांचा पक्का बंदोबस्त करण्याचे छत्रपतींनी ठरविले आणि स्वारीची तयारी केली. या वेळी त्यांनी प्रतिनिधीस ही कामगिरी सांगितली आणि शंभुसिंग जाधव - चंद्रसेनाचा मुलगा- याला त्याच्या हाताखाली दिले. ही स्वारी पन्हाळे भागावर झाली. प्रतिनिधीने या वेळी यश चांगले मिळविले. संभाजी व उदाजी यांचे सर्व लष्कर लुटून फस्त केले; हजारो लोक पाडाव केले आणि ताराबाई, राजसबाई, संभाजीराजांच्या स्त्रिया, भगवंतराव अमात्य आणि व्यंकटराव घोरपडे यांना कैद केले. इतके झाल्यावर संभाजीराजांना शरण येणे भागच पडले. त्याप्रमाणे ते शरण आल्यावर छत्रपती व राजे यांच्यात तह ठरला. तो वारणेचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. वारणेचा मुलूख छत्रपतींनी राजांना दिला व पुन्हा मराठी राज्यात हस्तक्षेप करणार नाही असा करार त्यांच्याकडून लिहून घेतला.

अस्तनीतील निखारे
 छत्रपतींच्या स्वभावातील एक वैगुण्य येथे ध्यानात घेतले पाहिजे. ते स्वभावाने फार मृदू होते, कनवाळू होते. बंडखोर, अपराधी, स्वामिद्रोही यांना त्यांनी कठोर अशी शिक्षा कधी केलीच नाही. त्यामुळे त्या त्या विरोधी शक्ती अस्तनीतील निखाऱ्याप्रमाणे कायम राहिल्या. कोल्हापूरला संभाजीराजांच्या बाबतीत हेच झाले. तहा- अन्वये त्यांना स्वतंत्र राज्य दिलेले नव्हते. ती एक जहागीर होती. पण हळूहळू कोल्हापूरला स्वतंत्र सवत्या सुभ्याचे रूप आले आणि मराठी राज्याची शक्ती कायमची द्विधा होऊन बसली.

सेनापतीची दुर्बुद्धी
 दाभाड्यांच्या बाबतीत असेच घडले. खंडेराव दाभाडे हा मोठा पराक्रमी पुरुष. त्याचा पराक्रम पाहून शाहूछत्रपतींनी त्याला १७१७ साली सेनापती नेमले आणि गुजरात प्रांत त्याच्याकडे दिला. तेथे प्रथम त्याने व पुढे तो आजारी झाल्यावर त्याचा सरदार पिलाजी गायकवाड आणि त्याचा मुलगा त्रिंबकराव यांनी चांगली कामगिरी केली. पण १७२० नंतर बाजीरावाचा झपाट्याने उत्कर्ष होऊ लागला. त्याच्या पराक्रमामुळे शाहू छत्रपती त्याला फार मान देऊ लागले. यामुळे सर्व प्रधानांना व सेनापतीलाही त्याचा मत्सर वाटू लागला. याविषयी मागे लिहिलेच आहे. बाजीराव हा कालचा वीस वर्षांचा पोर. आपल्याहून श्रेष्ठपदी जातो याचा मत्सर वाटणे साहजिक होते. पण त्यापेक्षा आपण जास्त पराक्रम करून दाखविणे हा त्यावर उपाय होता. शाहूछत्रपती तसा अवसर प्रत्येकाला देत होते. कर्नाटकच्या स्वारीत त्रिंबकराव होताच. तरी बाजीरावावाचून स्वारी पुढे जाईना. असे झाले तरी बाजीरावाशी या मोठया सरदारांनी वैर धरावे, हे मराठ्यांचे दुर्दैव होय.
 गुजराथ प्रांत त्यांना नेमून दिलेला असताना दाभाडे व गायकवाड मावळ, कल्याण, भिवंडी या भागात व माळव्यात म्हणजे पेशव्याच्या मुलखात घुसून लुटालूट करीत, खानदेश, बागलाण या मुलखातही घुसत. छत्रपतींनी त्यांची अनेक वेळा कानउघाडणी केली. पण त्याचा कधीच काही उपयोग झाला नाही. त्यांनी बाजीरावांशी कायम तेढ धरली. बाजीरावाची या बाबतीतली भूमिका निराळी होती. छत्रपतींनी सर्व भरीभार त्याच्यावर टाकला होता. त्यामुळे कोणा सरदाराला प्रांत वाटून दिला तरी त्या प्रांताशी पेशव्याचा संबंध कायम राहावा असे त्याचे मत होते. आणि राज्याच्या एकसूत्रतेच्या दृष्टीने ते योग्यच होते. या दृष्टीने सेनापती दाभाडे यास पेशव्याने सांगितले की माळवा भागाचा निम्मा वसूल आम्ही तुम्हांला देतो, गुजराथचा निम्मा तुम्ही आम्हांला द्यावा. पण निंबाळकर दाभाडे याला ते मान्य झाले नाही. पेशव्याच्या मुलखात लूटमार करण्याचे त्याने थांबविले नाही. त्यामुळे पेशव्याने गुजराथेतही उदाजी पवार व पिलाजी जाधव यांना चौथाईच्या वसुलीसाठी पाठविले.
 यातूनच सेनापती दाभाडे व पेशवा बाजीराव यांची दुभईची लढाई उद्भवली. निजाम वरील सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होता. दाभाडे व पेशवा यांच्यातील तेढ तीव्र झालेली पाहताच त्याने पाऊल उचलले आणि गुजराथकडून दाभाडे व खानदेश बागलाण या बाजूने निजाम यांनी उठावणी करून एकमेकांस मिळावयाचे अशी मोहीम त्यांनी आखली. त्रिंबकराव दाभाडे यांनी जाहीर केले की 'आमचे धनी छत्रपती, त्यांचे राज्य बाजीरावाने घेतले ते त्यांचे त्यांस परत द्यावयास जातो.' या वेळी पिलाजी गायकवाड, कंठाजी कदम, रघूजी कदमबांडे आणि उदाजी व आनंदराव पवार (हे बाजीरावाचे सरदार आता फितूर झाले) असे त्याच्या बरोबर होते.
 या संबंधात चिमाजी आप्पाने लिहिले आहे की 'दाभाड्यांनी कज्जा केला तर तो आम्ही संभाळतो. पण ते जर निजामास जाऊन भेटले तर त्यांचा हुद्दा परिच्छिन्न दूर करावा. एवढी गोष्ट महाराजांपाशी पक्की ठरवून मग दाभाड्यांना गुजराथच्या सनदा द्याव्या.'
 यावरून पेशवे आणि इतर सरदार यांच्या वृत्तीतला फरक स्पष्ट होईल.
 दाभाड्यांनी स्वारीच काढली, तेव्हा पेशव्यांनीही तयारी केली. सेनापतींची समजूत घालून त्यांना साताऱ्यास घेऊन यावे, असे शाहू महाराजांनी बाजीरावास सांगितले होते. त्याप्रमाणे स्वारीस निघाल्यापासून बाजीरावाने जासूदातर्फे प्रयत्न चालविले होते. पण त्रिंबकरावाला ते नकोच होते. त्यामुळे लढाई अटळ झाली. निजामाची व दाभाड्याची मिळणी होण्यापूर्वीच बाजीरावाने डभई येथे दाभाड्यांना गाठले. लढाई मोठी झाली. आणि सेनापती गोळी लागून पडले. लढाई थांबली. बाजीराव एकदम मागे सरला. त्याने लुटालूट होऊ दिली नाही. आणि तो सर्व आवराआवर करून महाराजांना जाऊन भेटला. महाराज म्हणाले, 'अविवेके करून नबाबाशी (निजामाशी) राजकारण केले. दुर्बुद्धी धरून, आगळिक करून, आपणांतच लढाई केली. त्याचे फळ झाले.'
 कर्नाटकातील मोहिमा, पालखेड येथे निजामावर मिळविलेला विजय, माळवा आणि बुंदेलखंड या प्रदेशांतील साम्राज्यविस्तार, आणि संभाजीराजे व सेनापती दाभाडे यांनी उभारलेल्या बंडखोरीचा बंदोबस्त या सर्व विजयांचे श्रेय बाजीराव, चिमाजी आणि त्यांचे राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, इ. जे एकनिष्ठ सरदार यांना आहे. मराठेशाहीला पुढे साठसत्तर वर्षे जे काही यश मिळाले त्याचा पाया यातून घातला गेला.
 यानंतरचे दोन मोठे विजय म्हणजे कोकण विजय आणि उत्तर हिंद-विजय होत. त्यांचा क्रमाने विचार करून मग मराठ्यांच्या या साम्राज्यविस्ताराच्या प्रयत्नांची गुणदोष-चिकित्सा करू.

कोकण-जंजिरा
 कोकणात पोर्तुगीज व जंजिरेकर सिद्दी हे मराठ्यांचे कायमचे शत्रू. त्यांना इंग्रजांचे आणि मोगल बादशहाचे कायमचे साह्य असे. हे कोकणचे चित्र शिवाजी महाराजांच्या वेळेपासून आपल्याला दिसत आहे. त्यात या वेळी फारसा फरक झालेला नव्हता. कान्होजी आंग्रे हा मराठ्यांचा मोठा प्रवळ सागरमेनानी होता, म्हणून हे सर्व शत्रू काही काळ दबून होते. तो जाताच मराठ्यांची ही बाजू अगदी लंगडी झाली.
 हिंदुधर्माचा नाश करावयाचा आणि हिंदूंचा विध्वंस करावयाचा है मोगलांप्रमाणेच जंजिरेकरांचे कायमचे धोरण होते. कोकणातील परशुराम क्षेत्री ब्रम्हेंद्रस्वामी यांचे कायमचे वास्तव्य असे. छत्रपती शाहू, पेशवे बाळाजी विश्वनाथ व बाजीराव त्याचे अनन्य भक्त होते. काही काळ सिद्दीही त्याचा भक्त होता. पण १७२७ साली काही कारणाने स्वामीशी त्याचे वाकडे आले आणि त्याने शिवरात्रीच्या दिवशी परशुराम क्षेत्राचा पूर्ण विध्वंस केला. तेव्हा ब्रह्मेंद्रस्वामीने शाहू छत्रपतींना सिद्दीचा कायमचा बंदोबस्त करण्यास सांगितले. तेव्हापासून मराठ्यांचे सरदार कोकणात मधून मधून मोहिमा करीत होते. पण संभाजीराजे, निजाम, माळवा ही प्रकरणे हाती होती. त्यामुळे पेशव्यांना तिकडे जाता आले नाही. १७३३ साली ही प्रकरणे मिटल्यावर शाहू छत्रपतींनी जंजिऱ्याची मोहीम आखली आणि पेशवा बाजीराव याची तीवर नेमणूक केली.
 कोकणच्या या संग्रामात जंजिरा आणि वसई अशा दोन मोहिमा झाल्या. या दोहींच्या इतिहासावरून पेशवेकालीन मोहिमांची वैशिष्ट्ये स्पष्ट दिसून आली. मोहिमांची कुलमुखत्यारी जेव्हा पेशव्यांच्याकडे असे, तेव्हा ते मोठमोठे विजय मिळवीत. पण प्रतिनिधी, सेनापती, सुमंत किंवा इतर पेशव्यांचा मत्सर करणारे सरदार यांची जेव्हा एकत्र नियुक्ती शाहू छत्रपती करीत, तेव्हा मोहिमेला फारसे यश येत नसे. जंजिऱ्याच्या मोहिमेत असेच झाले. शाहू छत्रपतींनी जंजिऱ्याची मोहीम आखल्यावर दाभाडे, गायकवाड, उदाजी चव्हाण, शंभुमिंग जाधव, सचिव या सर्वांना बाजीरावांची कुमक करण्याविषयी आज्ञापत्रे लिहिली.
 प्रतिनिधी कोकणात उतरला; पण त्याने बाजीरावाची भेटही घेतली नाही आणि परस्पर रायगडावर हल्ला करून ते ठाणे हस्तगत केले. पेशव्याला भेटून त्याने हा कार्यक्रम आखावयास हवा होता. पण तो पेशव्याचा द्वेष्टा होता. त्यामुळे मोहीम प्रारंभापासूनच ढिली पडू लागली. पुढे सेखोजी आंगरे याचा सरदार बंकाजी नाईक याने सिद्दी साताचा मोड करून त्याला गोवळकोटपर्यंत मागे रेटीत नेले. आता गोवळकोट पडला असता. पण प्रतिनिधीने लढाईस मना करून वाटाघाटी सुरू केल्या आणि 'आम्ही गनीम सुखे करून घेऊ, भांडायाचे प्रयोजन नाही,' असे नाईकास बजावले. त्यामुळे नाईक परत गेला.
 दाभाडे व गायकवाड यांचे व बाजीरावाचे वाकडे असल्यामुळे त्यांनी शाहू छत्रपतींचे हुकूम मानलेच नाहीत ! सेखोजी आंगरे हा बाजीरावाची मिळून होता. पण १७३३ साली मृत्यू पावला. तेव्हा त्याचे बंधू संभाजी व मानाजी यांच्यात वैमनस्य निर्माण झाले. आणि आंगरे घराण्यातच बेबनाव निर्माण झाला. आणि ही कमजोरी पाहून इंग्रज व सिद्दी यांनी आंगऱ्यांचा संपूर्ण नाश करण्याचा डाव टाकला. यामुळे, आणि आरमारी युद्धात स्वतः अनभिज्ञ असल्यामुळे, बाजीराव पेशव्याने जमेल तसा तह केला आणि मोहिमेतून अंग काढून घेऊन तो परत आला.
 यानंतर सर्वच मोहीम बारगळावयाची. पण शाहूछत्रपतींनी या वेळी जास्त नेट धरला. प्रथम त्यांनी पिलाजी जाधव यास कोकणात पाठविले. आणि नंतर मानाजी आंगऱ्याच्या आग्रहावरून चिमाजी आप्पा कोकणात उतरला. त्या वेळी रेवस बंदरा- नजीक मोठी लढाई होऊन सिद्दी सात हा 'रावणासारखा दैत्य' मारला गेला. मराठयांना मोठा विजय मिळाला. जंजिरा हस्तगत झाला नाही, अंजनवेल व गोवळकोट हे किल्लेही मिळाले नाहीत. तरी पण दुसरा एक सिद्दी सरदार याकूब हाही वरील लढाईत मारला गेला होता. त्यामुळे सिद्दी रहमान याने पूर्वीचा तह कायम करून युद्ध थांबविले.

रचनाच अपायकारक
 या मोहिमेचे विवेचन करताना नानासाहेबांनी लिहिले आहे, 'मराठमंडळाची शक्ती पाहिजे तितकी असूनही त्याची रचना राज्यवृद्धीस कशी अपायकारक होती याचे विशिष्ट उदाहरण ही जंजिऱ्याची मोहीम होय.' सत्ता महाराजांची, कर्तृत्व बाजीरावाचे. या दोहीचा मेळ बसला नाही की घोटाळे होत. जंजिऱ्याच्या मोहिमेतील अपयशाचे कारण म्हणजे वरील द्विमुखी कारभार होय ! (मराठी रियासत, पेशवा बाजीराव, प्र. २१४, २३३)

एकमुखी नेतृत्व
 या उलट वसईच्या संग्रामाची व्यवस्था होती. त्याची सर्व सूत्रे चिमाजी व बाजीराव यांच्या हाती होती. शिंदे, होळकर, बाजी भीवराव, तुकोजी व भिवाजी पवार इ. सरदार एकदिलाचे होते. म्हणून त्यांना हे अपूर्व यश मिळाले. हे यश अनेक दृष्टींनी अपूर्व असेच होते. मोगलांवर, निजामावर मराठ्यांनी अनेक विजय आतापर्यंत मिळविले होते. पण ते पौर्वात्य लोक. त्यांची युद्धपद्धती जुनी. पोर्तुगीज हे पाश्चात्य. दारूगोळा, शिस्त या सर्वच दृष्टींनी त्यांची पद्धती नवी, त्यांचा कारभार व्यवस्थित, संघटन अगदी दृढ; यामुळे मराठ्यांना त्यावर विजय मिळविता येईल असे कोणालाच वाटले नव्हते. पण तरीही मराठ्यांनी वसई जिंकली म्हणून हा विजय अपूर्व होय.
 १७१९ साली स्वराज्याच्या सनदा मिळाल्या आणि लगेच मराठ्यांनी कल्याण व भिवंडी ही ठाणी आपल्या ताब्यात घेतली. आणि तेव्हापासून पोर्तुगीज व मराठे यांचा नव्याने संग्राम सुरू झाला. मराठे सरदार वरचेवर कोकणात उतरत, मुलूख जिंकीत. पण देशावर निजाम, संभाजीराजे, मोगल ही राजकारणे चालू असल्यामुळे पेशव्यांना कोकणात लक्ष द्यावयास फारशी फुरसद होत नव्हती. वर सांगितल्याप्रमाणे १७३६ साली सिद्दीशी तह झाल्यावर त्यांना जरा उसंत मिळाली. याच वेळी पोर्तुगीजांच्या धर्मछळाला कोकणातील हिंदू लोक कंटाळून गेले होते. तेव्हा मग कोकणचा सोक्षमोक्ष करावयाचे ठरले. आणि वसईची मोहीम मुरू झाली. आणि १७३८ च्या डिसेंबरात चिमाजी आप्पा कोकणात उतरला. त्या आधीच ठाण्याचा किल्ला मराठयांनी घेतला होता. त्यामुळे त्यांची बाजू बळकट झाली होती. चिमाजी आप्पा आल्यावर माहीम, तारापूर, वेसावे, मढ अशा अनेक लढाया झाल्या, त्या सर्व मराठ्यांनी जिंकल्या. त्यात माहीम व तारापूर हे संग्राम फार निकराचे झाले. त्यामुळे मराठयांचे मनोधैर्य वाढले. आणि वसई घेणे त्यांना सुलभ झाले. वसईचा वेढा तीन महिने चालू होता. याच वेळी गोव्याकडून काही मदत येऊ नये म्हणून आप्पाने व्यंकटराम यास तिकडे पाठविले होते. तेथे त्याने मोठा पराक्रम करून गोवा पादाक्रांत करण्याची वेळ आणली होती. वसईला पोर्तुगीजांनी लढण्याची शिकस्त केली. पण त्यांचे काही चालले नाही. शरणागती पतकरून त्यांना किल्ला मराठयांच्या हवाली करावा लागला. या विजयामुळे उत्तर कोकण संपूर्णपणे मराठ्यांच्या हाती आले. आणि एका पाश्चात्य सत्तेला ते नामोहरम करू शकतात असा त्यांचा लौकिक झाला. त्यामुळेच इंग्रजही नरम आले. त्यांनी बाजीरावाची मर्जी संभाळण्यासाठी चौल हे महत्त्वाचे ठिकाण त्याच्या ताब्यात दिले. यामुळे बाजीरावाचा आपल्यावरील वहीम नाहीसा होऊन मुंबईचे संरक्षण होईल, अशा अर्थाचा मुंबई कौन्सिलने ठरावच केला.
 मराठ्यांचे बळ काय होते, याची यावरून कल्पना येईल. त्यांना दुहीने पोखरले नसते, शाहू छत्रपती स्वतः मराठ्यांचे नेतृत्व करीत असते, स्वतः ते मोहिमा करीत असते आणि कठोर शिस्त या देशाला त्यांनी लावली असती तर हिंदुस्थान जिंकणे मराठ्यांना अवघड नव्हते.

उत्तर दिग्विजय
 १७३७ च्या मार्चमध्ये पेशवा बाजीराव याने दिल्लीवर स्वारी करून जे अपूर्व साहस केले आणि विजय मिळविला त्यावरून हे सहज दिसून येते. हा उत्तर दिग्विजय मराठयांनी माळव्यावर स्वारी केली, तेव्हापासूनच सुरू झालेला होता. मध्यंतरी इतर उद्योग निघाल्यामुळे त्याला जोर चढला नव्हता. १७३२ सालापासून त्या राजकारणाला पुन्हा जोर चढून १७३७ च्या दिल्लीस्वारीत त्याची परिणती झाली.
 या स्वारीचे मुख्य कारण हेच होते की मराठ्यांचा उत्कर्ष मोगल बादशहाला आणि त्याच्या सरदार, सेनापतींना सहन होत नव्हता. बादशहा स्वतः दुबळा होता, अंगी पराक्रमही नव्हता आणि सारासार विचार करून निर्णय करण्याचे सामर्थ्यही त्याच्या ठायी नव्हते. त्याच्या दरबारात यामुळे दोन पक्ष झाले होते. सवाई जयसिंग आणि खान डौरान हा एक पक्ष आणि सादतखान, कमरुद्दिनखान व महंमदखान बंगष हा दुसरा पक्ष पहिल्या पक्षाचे म्हणणे असे की मराठ्यांचा मोड करणे, त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना नर्मदेच्या दक्षिणेस हाकलून लावणे; किंवा त्यांच्या पराक्रमास पायबंद घालणे हे आपल्याला शक्य नाही, तेव्हा त्यांच्याशी आपण सलोखा करावा, बाजीरावाला भेटीस बोलवावे आणि बादशाही साम्राज्याच्या रक्षणाची त्याच्यावरच जबाबदारी टाकावी. पण दुसऱ्या पक्षाला यात नामर्दपणा वाटत होता. आमच्या हाती सत्ता द्या, आम्हांला माळव्याची सुभेदारी द्या, निजामाला आपल्या साह्याला बोलवा म्हणजे आम्ही मराठ्यांना सहज जागी बसवू, असे हा पक्ष बादशहाला सांगत असे. बादशहाला कधी यांचे खरे वाटे, तर कधी त्यांचे. आणि मग त्या त्या मताप्रमाणे तो नेमणुका करी. पण दुसऱ्या पक्षाच्या लोकांच्या हाती सत्ता व सुभेदारी देऊन काहीच उपयोग झाला नव्हता. दर वेळी मराठ्यांनी त्यांना नामोहरम केले होते. त्यामुळे बादशहाची डळमळ होई, तो पुन्हा जयसिंहाच्या पक्षाला वळे. तसा तो एकदा वळाला आणि त्याने बाजीरावास भेटीस बोलावण्याचे ठरविले. पण त्यामुळे मुस्लिम पक्षात प्रचंड खळबळ माजली आणि सर्व मुस्लिमविश्व मराठ्यांच्या प्रतिकारार्थ सिद्ध झाले, तेव्हा या सर्व प्रकरणाचा कायमचा निकाल लावावयाचा अशा जिद्दीने बाजीराव १७३५ च्या धनत्रयोदशीला दक्षिणेतून निघाला.

राजपुतांना जिंकले
 या उत्तर दिग्विजयासाठी दोन मोहिमा कराव्या लागल्या. रजपूत संस्थानिकांच्या भेटीगाठी घेऊन, त्यांच्याशी दृढ संबंध जोडून, त्यांची एक आघाडी उभी करणे हे पहिल्या मोहिमेत साधले. माळव्यामध्ये मराठ्यांनी उत्तम व्यवस्था लावून रयतेची आबादानी केली होती. त्यामुळे मोगलांपेक्षा मराठ्यांची सत्ता जास्त हितावह आहे हे रजपूत सरदारांना आणि रयतेलाही कळून चुकले. आणि ते सर्व मराठ्यांना अनुकूल झाले. त्यामुळे बाजीराव उदेपुरास पोचेपर्यंत वाटेत अनेक राजपूत सत्ताधीशांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. उदेपूर हे मुख्य संस्थान. तेथला राणा जगत् सिंह याने बाजीरावाच्या स्वागतासाठी सुवर्ण सिंहासन केले होते. पण बाजीरावाने सांगितले की खरे चक्रवर्ती आपण आहांत, तो मान आपला आहे. असे म्हणून तो दुसऱ्या खालच्या आसनावर बसला. या कृत्यामुळे त्याने सर्व राजपुतांची मने जिंकली आणि हिंदुपदपातशाहीच्या सिद्धीचे एक पाऊल पुढे पडले.
 याच वेळी बादशहाशी तह व्हावयाचा होता. २० लाख रुपये नक्त, ४० लक्षांची माळव्यात जहागीर, आणि भोपाळकरांचे मुलखात तनखा, असा तह करण्याचे बादशहाने मान्य केले होते. पण वाटाघाटीचा घोळ संपला नाही. मुस्लिम सरदार आणि निजाम यांनी पुनः पुन्हा विरोध केला आणि यातच मे महिना उजाडल्यामुळे बाजीरावाला परत फिरावे लागले. तेव्हा त्या वेळी परत फिरून तो १७३६ च्या नोव्हेंबरात निघून १७३७ च्या जानेवारीत भेलशाला आला.

चलो दिल्ली
 ही मोहीम अगदी जगड्व्याळ होही. १००० मैल लांब व ५०० मैल रुंद एवढ्या विस्तृत प्रदेशात युद्धाचा भडका झाला होता. भेलसा, भोपाळ, वोडशा, दतिया, भदावर, अटेर, दुआब व शेवटी दिल्ली असे हे संग्राम झाले. प्रत्येक ठिकाणी मराठ्यांना विजय मिळाला. एकदा दुआबात मात्र त्यांचा पराभव झाला. पण तेवढ्यावरून, सादतखानाने आपण मराठ्यांना बुडविले, अशी बादशहापाशी फुशारकी मारली. बादशहालाही ते खरे वाटून त्याने त्याचा मोठा गौरव केला. पण चारपाच दिवसांतच २८ मार्च १७३७ ला बाजीराव दिल्लीवर जाऊन कोसळला; तेव्हा त्याचा भ्रमनिरास होऊन पळून जाण्यासाठी त्याने यमुनेत नावाही जमविल्या. त्याने प्रत्यक्ष लढाई का केली नाही ? बाजीरावासारख्या भुरट्या चोराचे अंगावर स्वतः बादशहाने जाणे शोभत नाही, असे त्याच्या सरदारांचे मत पडले !
 या वेळी बाजीरावाने दहा दिवस अहोरात्र प्रवास करून दिल्लीवर घाला घातला होता. मराठे बुडाले नाहीत, मराठे आहेत, हेच त्याला दाखवावयाचे होते. दिल्ली मारावी असा या वेळी विचारच नव्हता. ते शक्यही नव्हते. पण मराठ्यांचा दणका बादशहाला कळला म्हणजे त्याचे व सरदारांचे डोळे उघडतील हा यातील हेतू होता. तो सिद्ध झाल्यामुळे बाजीराव लगेच परत फिरला. वाटेत एकदोन संग्राम झाले. ते जिंकून पावसाळ्याच्या प्रारंभी तो दक्षिणेत परत आला.
 त्याला अडविण्यासाठी वाटेत निजाम आडवा आलेला होता. पण त्याला चुकवून बाजीराव निसटून खाली आला. त्या वेळी त्याच्याशी संग्राम करणे सोयीचे नव्हते. सैन्य सर्व थकलेले होते. म्हणून पावसाळा दक्षिणेत काढून बाजीराव १७३७ च्या ऑक्टोबरमध्ये परत उत्तरेत आला.

भोपाळ - निजाम
 या वेळी उभयपक्षांची फार जंगी तयारी होती. या वेळी बादशाही तारणारा एक काय तो निजाम, असे बादशहाला वाटत होते. म्हणून त्याला दिल्लीला बोलावून बादशहाने त्याचा मोठा गौरव केला. आणि मोठी फौज व मुबलक पैसा घेऊन, माळव्यातून मराठ्यांना कायमचे हाकलवून देतो अशी प्रतिज्ञा करून, निजाम बुंदेलखंडात शिरला. तसे झाले असते तर चाळीस वर्षांचा मराठ्यांचा उद्योग फुकट जाईल हे जाणून बाजीरावही ऐंशी हजार फौज घेऊन, निघाला आणि भोपाळवर त्याने निजामाला कोंडले. त्याचा पुत्र नासिरजंग दक्षिणेतून त्याच्या मदतीला निघाला होता. त्याला वाटेतच चिमाजी आप्पाने अडवून ठेवले. दिल्लीहून येणाऱ्या फौजांचा शिंदे होळकरांनी नाश केला, सुजायतखान येत होता त्याला रघुजी भोसले याने ठार केले. तेव्हा निजामाचा नाइलाज झाला आणि शरणागती पतकरून तो तहास तयार झाला. माळवा प्रांत देणे, नर्मदा व चंबळ यांतील सर्व मुलूख देणे, मराठ्यांच्या खर्चाने ५० लाख देणे, अशा तहाच्या अटी होत्या. ७ जानेवारी १७३८ रोजी निजामाने सह्या केल्या व अडीच तीन वर्षे चाललेले हे मराठ्यांचे युद्ध संपले. सर्व भारतात मराठे अजिंक्य ठरले आणि स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर झाले.

छत्रपतींचा विरोध
 हे जे साम्राज्य झाले त्याचा पाया याच वेळी जास्त दृढ आणि व्यापक असा करता आला असता. निजामाचा कायमचा नाश करणे या वेळी सहज शक्य होते. बाजीरावाचे कर्तृत्व व त्याने निर्माण केलेले नवे कर्ते पुरुष यांना हे सहज शक्य होते. पण शाहू छत्रपती यांचा याला सक्त विरोध होता. पालखेडनंतर बाजीरावाचा निजामाला नेस्तनाबूद करण्याचा मनसुबा होता. पण छत्रपतींनी त्यास लिहिले की 'नबाबाचा व स्वामीचा सल्ला आहे. तेव्हा भागानगराकडे स्वारीस जाऊ नये.' पुन्हा खानदेशात निजाम शिरला असता बाजीरावाने तसाच विचार केला होता. पण शाहू- महाराजांनी कठोरपणे त्याला लिहिले की 'तुम्ही नबाबाचे नजीक राहू नये. त्यांच्या स्नेहास अंतर करू नये.' महाराजांनी आज्ञापत्र लिहून शपथपूर्वक आज्ञा केली की नबाबाची मर्जी राखावी. कै. नानांच्या पायाची शपथ सांगितली. नबाबाशी कलह न केला पाहिजे. (पे. द. उतारा, सरदेसाई, पेशवा बाजीराव, पृ. ११०).
 या वेळी निजामास पूर्ण गारद केला असता तर सर्व दक्षिण लवकरच मराठ्यांना निर्वेध करता आली असती. पण मराठा छत्रपतींचाच त्याला विरोध होता.

पातशाहीचे रक्षण
 दुसरे शाहू छत्रपतींचे घातकी धोरण म्हणजे त्यांची दिल्लीच्या बादशहाविषयीची भक्ती. पातशाहीचे रक्षण करणे हे ते आपले कर्तव्य मानीत. औरंगजेबाच्या मुलीने त्यांचा संभाळ केला होता. म्हणून ते तिला मातृस्थानी व तिच्या बंधूंना मातुलस्थानी मानीत असत. तेव्हा 'मातृस्थानी विरोध करणे कामाचे नाही, असे मनात येऊन बादशहाची स्वस्थता राखून सपूर्ण सत्ता वागवावी हा इरादा मनातील' शाहू महाराज बादशाहीला शिवमंदिर मानीत, तेव्हा नवे मंदिर उभारण्यापेक्षा जुन्याचा जीर्णोद्धार करणे त्यांना जास्त पसंत होते (पृ. ३३३, ३३४).
 शाहूछत्रपतींच्या या धोरणाचा विचार मराठयांच्या साम्राज्याचा विचार करताना कायम मनात ठेवणे अवश्य आहे.