भाग दुसरा

बहामनी व मराठा काल











१२.
बहामनी काल
 


 सातवाहन ते यादव या कालखंडातील महाराष्ट्र संस्कृतीचे विवेचन गेल्या अकरा प्रकरणांत केले. आता बहामनी काल, मराठा काल, व ब्रिटिश काल असे तीन कालखंड राहिले. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेथपर्यंत हा इतिहास द्यावयाचा आहे. वरील तीन कालखंडांपैकी आता बहामनी कालखंडाला प्रारंभ करू.

राजसत्तेचे स्वरूप
 बहामनी राज्याची स्थापना महाराष्ट्रात इ. स. १३४७ साली झाली. पण महाराष्ट्राचे स्वातंत्र्य १२९६ सालीच लोपले होते. तेव्हा या मधल्या अर्धशतकाच्या काळात येथे कोणता इतिहास घडत होता, तो कोण घडवीत होते, त्याच्यामागे प्रेरक शक्ती कोणत्या होत्या याचा विचार करून मग बहामनी राज्याचे स्वरूप वर्णन करणे युक्त होईल.

यादवांचा नाश
 १२९६ साली अल्लाउद्दिन खिलजी याने देवगिरीवर स्वारी केली, रामदेवराव यादव व त्याचा पुत्र शंकरदेव यांचा पराभव केला आणि अपार खंडणी व रामदेवरावाची कन्या घेऊन तो परत गेला. अशा रीतीने यादव मांडलिक झाले व या भूमीचे सातवाहनांच्या काळापासून दीड हजार वर्षे अखंड, अबाधित असलेले स्वातंत्र्य नष्ट झाले. पुढे रामदेवराव खंडणी देईनासा झाला म्हणून १३०७ साली मलिक काफूर या अल्लाउद्दिनाच्या सेनापतीने देवगिरीवर दुसरी स्वारी केली व रामदेवरावाला कैद करून दिल्लीस नेले. तेथे पुन्हा एकदा मांडलिकत्व मान्य करून, रामदेवराव रायरायन हा किताब सुलतानाकडून घेऊन, परत आला. चार वर्षांनी १३११ साली तो मृत्यू पावल्यावर, त्याचा पुत्र शंकरदेव राजा झाला. त्याने दिल्लीचे जू झुगारून देण्याचे ठरवून खंडणी बंद केली. त्यामुळे मलिक काफूर पुन्हा देवगिरीवर १३१३ साली चालून आला. त्याने शंकरदेवास ठार मारले व देवगिरीचे राज्य दिल्लीला जोडून टाकले. त्यानंतर काफूर दोन वर्षे देवगिरीलाच होता. त्याने ते आपले मुख्य ठाणे केले होते व तेथून तो वरंगळ, द्वारसमुद्र, मदुरा या राज्यांवर स्वाऱ्या करीत असे. १३१५ साली दिल्लीला बंडाळ्या सुरू झाल्या म्हणून अल्लाउद्दिनाने त्याला परत बोलाविले. अल्लाउद्दिनाच्या मृत्यूनंतर मलिक काफूर याने त्याच्या मुलांना मारून स्वतः सुलतान होण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो स्वतःच मारला गेला आणि १३१६ साली मुबारक खिलजी हा सुलतान झाला. याच सुमारास रामदेवरावाचा जावई हरपाळदेव याने पुन्हा स्वातंत्र्य स्थापण्याचा प्रयत्न केला. तेव्हा १३१८ साली मुबारक खिलजी याने त्याच्यावर स्वारी करून त्याला जिवंत सोलून ठार मारले व यादवांचे राज्य खालसा केले.

बेसावध राजे
 या इतिहासावरून हे स्पष्ट होईल की यादवांचे राज्य जाऊन महाराष्ट्राला पारतंत्र्य आले ते केवळ योगायोगाने नव्हे. १२९६ पासून पुढल्या वीस बावीस वर्षात ओळीने चार वेळा यादवांचा रणात पराभव झाला. याचा अर्थच असा की स्वराज्य संभाळण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नव्हते. १२९६ सालचा पहिला पराभव हा एखादे वेळी योगायोग म्हणता येईल. ते सुद्धा खरे नाही. उत्तर हिंदुस्थानात मुस्लिम टोळधाडी येऊ लागल्याला तीनशे वर्षे होऊन गेली होती. आणि दिल्ली येथे कुतुबुद्दिन ऐबक याने सुलतानी स्थापन केल्याला नव्वद वर्षे होऊन गेली होती. या नव्वद वर्षात उत्तर हिंदुस्थानातील, नेपाळचा अपवाद वजा जाता, एकूणएक प्रांत मुस्लिम आक्रमणास बळी पडून परतंत्र झाले होते. तेव्हा ही धाड आपल्यावर येईल याची कल्पना यादवराजांना यावयास हवी होती. पण नर्मदेच्या दक्षिणेस वरंगळचे काकतीय, द्वारसमुद्राचे होयसळ यादव व मदुरेचे पांड्य यांपैकी कोणालाही ती आली नाही. तशीच यादवांनाही नाही. ती सर्वच राज्ये १३०७ ते १३२१ या पंधरा वर्षात एकट्या मलिक काफूरने धुळीस मिळविली; यावरून स्वराज्य संभाळण्याची ऐपत त्यांपैकी कोणालाच नव्हती हे उघड आहे. यादवांची तीच गत होती. संकटाआधीच त्याची अपेक्षा करून सावध व्हावे, आणि सज्जता ठेवावी, हे तर या हिंदू सत्ताधीशांनी केले नाहीच, पण अल्लाउद्दिन स्वारीवर निघाला, म्हणजे प्रत्यक्ष संकट कोसळू लागले तरीही ते सावध झाले नाहीत. २६ फेब्रुवारी १२९६ या दिवशी अल्लाउद्दिन निघाला आणि महिना दीड महिन्याने देवगिरीस येऊन पोचला. यादवांचे हेरखाते कार्यक्षम असते तर ही वार्ता महिनाभर आधी कळण्यास काहीच हरकत नव्हती. देवगिरीवर धाड चालण्यापूर्वी दोन दिवस अल्लाउद्दिन एलिचपूरला थांबला होता. तेथील सुभेदार कान्हा याने त्याचा प्रतिकारही केला. या वेळी जरी रामदेवाला वार्ता मिळाली असती तरी देवगिरी किल्ला पडला नसता. पण किल्ल्यावरून मुस्लिम लष्करातील घोड्यांच्या टापांची धूळ दिसू लागली तेव्हा राजाला कळले की कोणीतरी ( ! ) स्वारी करून येत आहे. त्याने या आधीच आपला पुत्र शंकरदेव यांच्याबरोवर यादवसेना दक्षिण- सरहद्दीकडे धाडून दिल्या होत्या. अल्लाउद्दिनाला ही बातमी बरोबर होती. म्हणूनच त्या नेमक्या वेळी त्याने हल्ला केला. पण हल्ला येणार ही बातमी रामदेवरावाला मात्र नव्हती !

कर्तृत्वशून्यता
 यादवांच्या पराभवाची वार्ता अशीच खेदजनक, उद्वेगजनक आहे. रामदेवरावाचा पराभव झाला, त्याने शरणागती पत्करली. तेवढ्यात शंकरदेव परत आला. अजूनही सर्व डाव सावरता आला असता. कारण अल्लाउद्दिनाची फोज सारी तीनचार हजार होती. शंकरदेवाला तिचा निःपात करणे मुळीच अवघड नव्हते. पण अल्लाउद्दिनाने आधीच भूमका उठवून ठेविली होती की मी पुढे आलो आहे, मागून दिल्लीहून २०००० लष्कर येत आहे. शंकरदेवाने त्याच्या सैन्यावर हल्ला केला तेव्हा मुस्लिम कच खाऊ लागले होते. पण तेवढ्यात नुसरतखान याच्या हाताखाली अल्लाउद्दिनाने देवगिरीच्या किल्ल्यापाशी ठेविलेली एक लहानशी टोळी त्यांच्या मदतीला आली. यादव सेनेला वाटले, हेच ते सुलतानाचे लष्कर आणि मग तिचा धीर खचला. मग तिची धुळधाण होण्यास किती उशीर ? म्हणजे एका खोट्या कंडीमुळे, एका थापेमुळे यादवाचे, महाराष्ट्राचे, दक्षिणेचे आणि भारताचे भवितव्य बदलले! दिसावयास असे दिसते खरे, पण ते खरे नाही. थापेवर विश्वास ठेवणारे, बेसावध, नादान राज्यकर्ते येथे होते, राज्य संभाळण्यास अवश्य ते सामर्थ्य, ती राजनीती, ती सावधानता, चतुरस्रता, आक्रमणशीलता, ते क्षात्रतेज यांपैकी कसलाही गुण त्यांच्या ठायी नव्हता, म्हणून भारताचे भवितव्य फिरले हे सत्य आहे.
 तसे नसते तर या पहिल्या लढाईतला पराभव निर्णायक ठरला नसता. आणि इतिहासाने तो योगायोग मानला असता. पण मलिक काफूरच्या पुढच्या स्वारीच्या वेळी हेच झाले. ती १३०७ साली आली. म्हणजे मध्यंतरी तयारीला ११ वर्षे मिळाली होती. यादवांचे क्षात्रतेज जिवंत असते, त्यांचे प्रधानमंडळ कार्यक्षम असते, त्यांचे सेनापती रणनिपुण असते तर तेवढ्या अवधीत त्यांना दिल्लीवर चालून जाऊन सुलतानीचा निःपात करण्याइतकी तयारी करता आली असती. पण ही ऐपतच आता हिंदूंच्या ठायी राहिली नव्हती. म्हणून दुसऱ्याही लढाईत यादवांचा पराभव झाला आणि तेथून पुढे ते मलिक काफूरला वरंगळ, द्वारसमुद्र ही राज्ये बुडविण्यास साह्य करू लागले.

कीड लागली
 पुन्हा ही एका राज्याच्या नालायकीची, नादानीची कथा नाही, रामदेवराव हाच नाकर्ता होता असे नाही. तसे असते तर पहिले दोन पराभव त्याच्या माथी मारता आले असते. पण पुढेही तेच झाले. त्याच्या मृत्यूनंतर शंकरदेव राजा झाला. त्यालाही मुस्लिमांचा प्रतिकार करता आला नाही. तो स्वतःच मारला गेला. नंतर हरपाळदेव आला. त्याचे कर्तृत्वही त्याच लायकीचे. या वेळी तर अल्लाउद्दिन व काफूर दोघेही मृत्यू पावले होते. मुबारक खिलजी हा सुलतान अत्यंत नादान, दारुडा, बदफैली व व्यसनमग्न असा होता. पण खंडणी थांबवताच चालून यावे, ही रग त्याच्या ठायी आहे, आणि लष्कर, सेनापती, सरदार यांचे संयोजन करून देवगिरीचा पाडाव करावा ही कर्तबगारीही त्याच्या ठायी आहे ! तेव्हा हिंदूंच्या सामर्थ्याला जीवन- शक्तीला, कर्तबगारीला कसली तरी कीड लागली होती, हा समाज आतून पोखरून गेला होता, जगण्याची विद्या त्याच्या बुद्धीतून नष्ट झाली होती, असाच यातून निष्कर्ष निघतो. अन्यथा देवगिरीचे यादव आणि दक्षिणेतील इतर सर्व हिंदुराज्ये दहा पंधरा वर्षात भूतलावरून नाहीशी व्हावी या भयानक घटनेचे स्पष्टीकरण करता येत नाही.

तेव्हा आणि आता
 या वेळी हिंदुसमाजाचा संपूर्ण शक्तिपात झाला होता, त्याची जीवनशक्तीच नष्ट झाली होती, हे आणखी एका गोष्टीवरून दिसून येईल. त्या वेळी दिल्लीच्या पातशाही सत्तेचे स्वरूप काय होते ? ती किती समर्थ होती ? मुस्लिम व वरिष्ठ सरदार वर्गात ऐक्य, संघटना कितपत होती ? सुलतानावर अनन्यनिष्ठा ठेवणारे लोक किती होते ? इतिहास पाहता या सर्व प्रश्नांचे उत्तर 'शून्य' असे आहे. राजधानीत नित्य बंडाळ्या चालत. अल्लाउद्दिनाने चुलत्याचा खून करून तख्त बळकावले व त्याच्या पक्षाच्या अनेक सरदारांना ठार मारले. हिंदूंवर असह्य कर लादून त्याने त्यांचा अनन्वित छळ चालविला होता. शेवटी मलिक काफूरने त्यालाच कैदेत ठेवून, केवळ संशयावरून अनेक लोकांना ठार मारले, सुलतानाच्या दोन मुलांचे डोळे काढले, बेगमेला कैदेत घातले आणि तो मरताच स्वतः तख्त बळकाविण्याचा घाट घातला. पण मुबारक खिलजीच्या पक्षाच्या लोकांनी त्याला ठार मारून मुबारकला तख्तावर बसविले. असे प्रकार चालू असताना सत्तेला दृढता कितीशी येणार ? राज्य बलाढ्य कसे होणार ? ते केव्हाही शक्य नव्हते. तरीही यादवांना आपले हरपलेले स्वातंत्र्य परत मिळविता आले नाही. या अधःपाताला काही सीमा आहे काय ? पाचव्या सहाव्या शतकात रानटी हूण जमातींनी सर्व युरोपचे निर्दाळण केले होते. रोमन साम्राज्य धुळीला मिळविले होते. त्या हूणांना गुप्त सम्राटांनी अनेक वेळा खडे चारले. पुढे अर्धशतकानंतर त्यांनी फिरून उठावणी करताच यशोवर्म्याने त्यांचा निःपात केला. आक्रमकांचे निर्दाळण, शत्रूंवर विजय नव्हे विजयमालिका, हा तेव्हाचा नियम होता. आता पराभव हा नियम झाला ! यादवांचा एक, दोन, तीन, चार लढायांत लागोपाठ पराभव होऊन त्यांचे साम्राज्य नष्ट झाले. गौतमीपुत्र शातकर्णी, सत्याश्रय पुलकेशी, राष्ट्रकूट गोविंदराज यांच्या काळी मराठ्यांच्या ठायी असलेला पराक्रम आता कोठे गेला ?

दिल्लीचे बलाबल
 १३१८ साली यादवांचे राज्य खालसा झाले, त्यानंतर १३४७ मध्ये हसन गंगू- जाफर खान याच्या बहामनी राज्याची स्थापना होईपर्यंत तीस वर्षांच्या काळातही दिल्लीची सुलतानी बलाढ्य होती असे नाही. बंडाळ्या, खून, कत्तली मागील अंकावरून पुढे चालू होत्या. १३२० साली मुबारक खिलजी याचा त्याचा सेनापती मलिक खुश्रू तथा खुश्रुखान याने खून केला, अल्लाउद्दिनाच्या राहिलेल्या मुलांपैकी तिघांचे डोळे काढले, दोघांना ठार मारले आणि तो स्वतः सुलतानपदी आरूढ झाला. आपली सत्ता निर्वेध करण्यासाठी त्याला अनेक सरदारांची व त्यांच्या अनुयायांची कत्तल करणे भाग होते. हा खुश्रुखान मलिक काफूरप्रमाणेच मूळचा हिंदू होता. असा एक प्रवाद आहे की सुलतान झाल्यावर त्याने हिंदुसत्ता दिल्लीस प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालविला होता. पुष्कळांना हे मान्य नाही. पण त्याच्या विरुद्ध ग्यासुद्दिन तघ्लख याने उठावणी केली ती 'इस्लाम धर्मावर संकट आले' अशी घोषणा देऊनच केली हे सर्वमान्य आहे. (दिल्ली सलतनत, भारतीय विद्याभवन, खंड सहावा, पृ. ४४-४६ ) लढाईत खुश्रुखान मारला गेला व ग्यासुद्दिन तल्लख सुलतान झाला. त्या पदी येताच त्याने आपला मुलगा जौनाखान - महंमद तल्लख - यास दक्षिणेतील बंडाळ्या मोडण्यासाठी पाठविले व तो बंगालमधील बंडाळ्या मोडण्यासाठी चालून गेला. १३२५ साली जौनाखान याने बापाचा खून केला आणि महंमद तघ्लख म्हणून तो तख्तावर आला. त्याची कारकीर्द १३५१ पर्यंत टिकली; पण बंडाळ्या, उठावण्या, कत्तली, रक्ताच्या नद्या, प्रजेची अन्नान्न दशा, अनन्वित छळ असह्य जुलूम हेच तिचे प्रधान लक्षण होते. याने आपली राजधानीच देवगिरीस आणली होती. असे करण्यामुळे दिल्ली ओस पडली, प्रवासात हजारो लोक मरण पावले व अनेक सरदार घराणी नामशेष होऊन राज्याला मोठा हादरा बसला. तांब्याची नाणी त्याने प्रचलित केल्यामुळे तर भूकंप झाल्याप्रमाणे सर्वत्र प्रलय झाला. या दोन्ही प्रसंगी विरोधी पक्षाच्या लोकांच्या कत्तली तो करीतच होता. अनेक मुस्लिम उलेमा, मौलवी त्याच्या विरुद्ध होते. त्यांनाही त्याने ठार मारले. या काळात मध्य आशियातील मोगल लोकांच्या दिल्लीवर स्वाऱ्या येतच होत्या. या स्वाऱ्या म्हणजे अस्मानी संकटच असे. १३२७ साली चकताई सरदार तरमाशिरीन हा लाखाच्या फौजेसह हिंदुस्थानावर कोसळला. आणि सिंध, मुलतान, दिल्ली हे प्रांत त्याने कत्तली, आग, लूट यांनी उजाड करून टाकले. महंमद हात बांधून त्याला शरण गेला आणि अपार खंडणी देऊन त्याने त्याला परत पाठविले.
 महंमद तल्लखाची सत्ता काही काळ, निदान पाच-सहा वर्षे तरी, अखिल भारतावर पसरली होती. पण तिला स्थैर्य असे कधीच आले नाही. प्रत्येक प्रांतात बंडाळ्या चालु होत्या. बंगाल, गुजराथ, माळवा, महाराष्ट्र येथले सुभेदार सारखे स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करीत होते. आणि महंमद त्यांच्यावर सारख्या स्वाऱ्या करीत होता व सापडतील त्या सरदारांच्या कत्तली करीत होता. १३४५ साली गुजराथमध्ये बंडाळी झाली, म्हणून महंमद तेथे चालून गेला, तो इकडे देवगिरीला उठावणी झाली. कुतलबखान नावाचा सरदार तेथे सुभेदार होता. त्याला महंमदाने कारण नसता बडतर्फ केले. त्यामुळे सर्व सरदार चिडून गेले होते. त्यांनीच ही उठावणी केली होती. हे ऐकताच गुजराथमधून महंमद देवगिरीवर धावून आला. पण गुजराथेत पुन्हा बंडाळी माजली म्हणून त्याला परत जावे लागले. याच वेळी हसन गंगू बहामनी हा सरदार उद्यास आला व त्याने गुलबर्गा येथे १३४७ साली स्वतंत्र राज्य स्थापन केले. सुलतान महंमद याने गुजराथेतील बंडाळ्या मोडल्या व तेथून तो सिंधवर निघाला. पण वाटेतच १३५१ साली तो मृत्यू पावला. त्यामुळे गुलबर्गा येथे नव्याने स्थापन झालेल्या बहामनी राज्याला निर्वेधता मिळाली.

सामर्थ्यच नाही
 प्रत्येक प्रांतात होणाऱ्या बंडाळ्या, दर वेळी वारशासाठी होणाऱ्या कत्तली, राज्यातील सरदारांमधील नित्याची दुही, सुलतानांच्या पिसाट लहरीमुळे होणारा अनन्वित जुलूम, प्रजेचा रक्तशोष, तिची अन्नान्नदशा, प्रत्येक स्वारीत होणारी अमित प्राणहानी आणि शेती व व्यापार यांचा होणारा विध्वंस, सुलतानांची नादानी, यामुळे सर्वत्र कायम असणारी अंदाधुंदी यामुळे दिल्लीची मुस्लिम पातशाही किती अस्थिर, बलहीन व भंगुर होती हे सहज ध्यानात येईल. तरीही, अशाही स्थितीत, हिंदूंना ती नष्ट करून तेथे हिंदू साम्राज्याची स्थापना करता आली नाही. मुस्लिम सरदारांपैकी कोणीही उठून सुलतानाला ठार मारून तख्त बळकावू शकत असे. तेव्हा सुलतानी सत्तेच्या ठायी किती सामर्थ्य होते ते दिसतेच आहे. पण असल्या विकल, भंगुर नित्य डळमळीत असणाऱ्या सत्तेचा हिंदूंना नाश करता आला नाही, ११९३ साली हातातून गेलेली दिल्ली परत घेता आली नाही. या समाजाच्या ठायी ते सामर्थ्यच राहिले नव्हते. निवृत्ती, शब्दप्रामाण्य, जातिभेद, अपरिवर्तनीयता, सिंधुबंदी, स्पर्शबंदी या अधर्मालाच धर्म मानल्यामुळे हा समाज विघटित झाला होता, त्याचे बुद्धिसामर्थ्य लोपले होते, विपरीत धर्माच्या रोगामुळे तो आतून पोखरून निघाला होता.
 दिल्लीच्या केंद्रसत्तेकडून प्रांताकडे पाहिले तरी हेच दिसून येते. बंगाल, गुजराथ, पंजाब, माळवा, महाराष्ट्र, मदुरा या प्रांतांत स्वतंत्र सत्ता स्थापन झाल्या. पण त्या हिंदूंच्या नव्हे, तर मुस्लिमांच्या ! दिल्लीच्या सत्तेचे जोखड झुगारून देण्याचे सामर्थ्य भिन्न भिन्न प्रांतातील मुस्लिम सरदारांच्या ठायी होते. पण तेथे शतकानुशतके राज्य करणाऱ्या हिंदू सरदारांच्या ठायी ते नव्हते. या काळात त्या त्या प्रातांतील मुस्लिम सत्ता उलथून हिंदुराज्य स्थापन करण्याचे सामर्थ्य फक्त दोनच प्रांतांनी प्रगट केले. ते म्हणजे मेवाड व विजयनगर. त्यांचा विचार पुढे योग्य संदर्भात येईलच. प्रथम आता दिल्लीच्या सत्तेला उपमर्दून महाराष्ट्रात स्थापन झालेल्या बहामनी सत्तेचे स्वरूपवर्णन करू.

हिंदूंच्या नादानीचा इतिहास
 या सत्तेचे स्वरूप दिल्लीच्या सुलतानी सत्तेहून फारसे निराळे नव्हते. राजसत्ता दुबळी, कमजोर व अकार्यक्षम होण्यास जी जी कारणे असू शकतात ती सर्व येथे होती. म्हणूनच हा इतिहास म्हणजे मुस्लिमांच्या कर्तबगारीचा पराक्रमाचा, सामर्थ्याचा इतिहास नसून हिंदूंच्या नादानीचा, कर्तृत्वशून्यतेचा, दैन्यदारिद्र्याचा इतिहास आहे, हे निर्विवाद सिद्ध होते. हिंदू राजवंशांच्या कर्तबगारीच्या दृष्टीने पाहता प्रारंभीच एक विपरीत गोष्ट दिसून येते. इ. स. १३३४ साली राजस्थानातील शिसोदे कुलातील सजनसिंह व क्षेत्रसिंह हे दोन तरुण पुरुष दक्षिणेत आले होते. हसन गंगू तथा जाफरखान हा त्यानंतर लवकरच उदयास आला. हा जाफरखान व ते दोघे रजपूत यांच्या पराक्रमाची तुलना करता काय दिसते ? जाफरखान हा मूळचा गुलाम. त्याच्या पाठीशी कसलीही पूर्वपरंपरा नाही. असे असून दक्षिणेत येऊन त्याने स्वतंत्र राज्य स्थापिले आणि सजनसिंह व त्याचा पुत्र दिलीपसिंह हे भारतातल्या अत्यंत विख्यात अशा शिसोदे रजपूत कुलातील राजपुत्र. त्यांनी काय मिळविले ? दक्षिणेत राज्य स्थापन करण्यात त्यांनी जाफरखानाला साह्य केले व त्याला प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून दौलताबादेजवळ दहा गावांची जहागिरी व सरदारी मिळविली ! ( मराठी रियासत - शहाजी, सरदेसाई, पृ. १८ )
 दुसरी अशीच व इतकीच विपरीत आणि उद्वेगजनक गोष्ट या इतिहासाच्या प्रारंभी दिसून येते. यादव राजांनी दिल्लीचे मांडलिकत्व सुखाने पत्करिले असे नाही. ते जू झुगारून देण्याचा त्यांनी सारखा प्रयत्न चालविला होता, हे वर सांगितलेच आहे. रामदेवराव, शंकरदेव व हारपाळदेव यांपैकी प्रत्येकाने स्वतंत्र होण्याची धडपड चालविली होती. पण त्यांना अल्पांशानेही यश आले नाही. उलट जाफरखानाने मात्र गुलबर्ग्याला राज्य स्थापन केले व दिल्लीचे जोखड झुगारून देण्याचे मनात येताच, एखादे झुरळ उडवून द्यावे तसे त्याने ते उडवून लावले. वर सांगितलेच आहे की प्रत्येक प्रांताच्या मुस्लिम सुभेदाराने याप्रमाणेच दिल्लीला झुगारून दिले. पण बहुसंख्य हिंदू राजवंशांना- राम, कृष्ण, चंद्र, सूर्य यांच्यापर्यंत परंपरा नेऊन भिडविणाऱ्या राजवंशांना ते शक्य झाले नाही !

बहामनी सुलतान
 बहामनी सुलतानांपैकी पहिला सुलतान जाफरखान ऊर्फ अल्लाउद्दिनशहा, (१३४७-५८), त्याचा मुलगा महंमदशहा (१३५८- ७५) फिरोजशहा, (१३९७- १४२२ ), अहंमदशहा वली (१४२२ - १४३५) व अल्लाउद्दिनशहा (१४३५-५७) एवढेच काय ते पराक्रमी व कर्तबगार असे होते. एकंदर अठरा मुलतानांपैकी बाकीचे बहुतेक नादान, व्यसनी व नालायक असेच होते. केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया या ग्रंथात सर वूलसे हेग हे म्हणतात, 'दारू हा या वंशाला शापच होता. अठरा सुलतानांपैकी बहुतेक सर्व कट्टे दारुडे होते. त्यामुळे चहाडखोर, तोंडपुजे, आपमतलबी यांचाच दरबारात भरणा असे. आणि त्यांच्या सांगण्यावरून हे सुलतान वाटेल ती अनन्वित व क्रूर कृत्ये करीत' (खंड ३ रा, पृ. ४३२ ). गो. स. सरदेसाई यांनी असाच अभिप्राय दिला आहे. ते म्हणतात, 'महंमदशहानंतर (१३७५ नंतर) झालेल्या राज्यकर्त्यांचे महत्त्व ऐतिहासिक दृष्ट्या पाहिले असता विशेष नाही. त्यांच्या कारकीर्दीत हिंदू व मुसलमान यांमध्ये (विजयनगर व बहामनी) एकसारखे युद्धप्रसंग चालू होते. शिया व सुनी किंवा परदेशी आणि दक्षिणी या दोन पक्षांतील कलह कधी मिटले नाहीत.' (मुसलमानी रियासत, आवृत्ती इ. स. १८९८, पृ. २५३) बहुतेक सुलतान मद्यासक्त व नादान आणि त्याच्या भरीला दर वेळी होणारे वारशाचे कलह. अशा स्थितीत राजसत्ता किती दृढ असू शकेल याची सहज कल्पना येईल. महंमदशहाचा मुलगा मुजाहिदशहा (१३७५ - ७८) यास त्याचा चुलता दाऊदखान याने ठार मारिले. पुढे दोन महिन्यांत त्याचाही खून झाला व महंमूदशहा गादीवर आला. याला दोन मुलगे होते. पण दरबारी कारस्थानात ते बळी पडले व दाऊदखानाचा मुलगा फिरोजशहा गादीवर आला. त्याच्या भावाने याच्या विरुद्ध बंड केले. तेव्हा त्याचे डोळे काढण्याचा शहाने विचार केला. पण लढाईत त्याचाच पराभव झाला व तो भाऊ अहंमदशहा वली हा किताब घेऊन तख्तावर बसला. १४५७ मध्ये हुमायूनशहा जालीम हा सुलतान झाला. तेव्हा याचा भाऊ हसनखान याने बंड केले. त्या वेळी शहाने त्याला पकडून अत्यंत क्रूरपणे त्याचा वध केला व त्याच्या सात हजार शिपायांना कल्पनातीत हाल करून ठार मारले. या शहाच्या भेटीस जाताना सरदार लोक बायका पोरांचा निरोप घेऊनच जात असत.

झोटिंगशाही
 वारसांच्या प्रमाणेच सरदार लोकांत सरदारी व वजिरी यांसाठी कायमचे कलह चालत. जनानखान्यातील स्त्रिया कारस्थाने करून कलह पेटवीत ते वेगळेच. हुमायूनशहाचे दोन सरदार निजाम उलमुल्क घुरी व ख्वाजाखान यांनी देऊरकोंड्यास वेढा घातला होता. पण त्यांचा पराभव होऊन त्यांना पळ काढावा लागला. या वेळी ख्वाजाखानाने शहाच्या कानी लागून, निजाम उलमुल्क घुरी याने दगा दिल्यामुळे पराभव झाला, असे त्याच्या मनात भरविले. शहाने कसलाही शोध न करता, घुरी यास ठार मारले. पुढे ख्वाजाखानावर तोच प्रसंग आला. महंमद गवान व हा ख्वाजाखान यांच्यांत स्पर्धा निर्माण झाली. तेव्हा सुलतान महंमदशहा याच्या आईने ख्वाजाखानास ठार मारून तंटा मिटविला. महंमद गवान हा वजीर अत्यंत कर्तबगार होता. तो इमानी व एकनिष्ठही होता. त्याने राज्यव्यवस्था उत्तम ठेविली होती. पण यामुळेच दरबारी मंडळींच्या डोळ्यांत तो सलू लागला. त्यांनी गवानच्या सहीचे एक बनावट पत्र तयार केले. त्यात, बहामनी राज्याचा पिढीजात शत्रू जो ओढ्याचा राजा त्याला बहामनी राज्यावर स्वारी करण्यास चिथावणी दिली होती. असे बनावट पत्र तयार करून सरदारांनी ते सुलतान महंमदशहा याच्या हाती दिले. त्या वेळी तो दारूच्या नशेत होता. त्याने लगेच महंमद गवान यास बोलावून घेतले व त्याची कैफियत ऐकूनही न घेता, आपल्या देखत त्या ७८ वर्षाच्या वृद्ध, कर्तबगार व अत्यंत इमानी वजिरास ठार मारविले ! कर्तबगार वजिरांना असे किडामुंगीप्रमाणे चिरडून टाकणारी सत्ता किती स्थिर व दृढ होऊ शकेल याचा अभ्यासकांनी विचार केला पाहिजे.

दक्षिणी व परदेशी
 वारसाचे कलह व सरदारांची गटबाजी यांच्या जोडीला दक्षिणी व परदेशी आणि सुनी व शिया हे वांशिक व धार्मिक भेद यांनी उत्पन्न झालेली वैरे, वैमनस्ये व कारस्थाने यांनी तर बहामनी राज्य नित्य हादरून जात असे. मागे सांगितलेच आहे की यादवांच्या कारकीर्दीतच उत्तरेकडील अनेक मुसलमान दक्षिणेत येऊन स्थायिक झाले होते. त्यांनी हिंदू स्त्रियांशी लग्नेही केली होती व हिंदूंना बाटविण्याचे कार्यही चालू ठेविले होते. पुढे मलिक काफूरने दक्षिणेची सर्व राज्ये बुडविल्यावर, ही मुस्लिमांची आयात मोठ्या प्रमाणात होऊ लागली आणि दक्षिणेत राज्यस्थापना झाल्यावर हे सर्व मुस्लिम येथे स्थायिक होऊन येथेच त्यांनी आपली घरेदारे केली. त्यामुळे त्यांचे बाह्यसंबंध सर्व तुटून त्यांच्या पुढील पिढ्या या एतद्देशीय म्हणजेच दक्षिणी झाल्या. पण इ. स. १३५० च्या सुमारास मुस्लिमांचा दुसराही एक ओघ महाराष्ट्रात येऊ लागला. अरबस्तान, इराण, अफगाणिस्तान, तुर्कस्तान या देशांतून मुस्लिम मुल्ला- मौलवी, विद्वान धर्मवेत्ते यांना अगत्याने पाचारण करून दरबारात आश्रय द्यावा, असे बहामनी शहाचे धोरण होते. येथे मुस्लिम सत्ता प्रस्थापित झाल्यामुळे या वरील देशांतील अनेक धाडशी, साहसी पुरुष नशीब काढण्यासाठीही महाराष्ट्रात येत व आपल्या कर्तबगारीने दरबारात व लष्करात प्रतिष्ठेच्या जागा मिळवीत. अनेक अरबी व इराणी व्यापारीही याच सुमारास येऊ लागले व सुलतानांच्या आश्रयाने वर चढून पुढे राजकारणातही शिरू लागले. पहिला सुलतान जाफरखान याने महंमद तल्लखाच्या आश्रयास असलेल्या अनेक मोगल व अफगाण अमिरांची मने वळवून त्यांना दरबारी ठेवून घेतले, मुजाहिदशहाने याचप्रमाणे अनेक इराणी व तुर्क सरदारांना आश्रय दिला आणि पुढील सुलतानांनी हेच धोरण ठेविल्यामुळे या परदेशाहून आलेल्या अरब, तुर्क, इराणी, अफगाण या मुस्लिमांचा एक स्वतंत्र पक्षच बनला व त्याला परदेशी असे नाव मिळाले. हे परदेशी लोक सहजगत्याच धाडशी असत. नाना देश पाहिल्यामुळे, संकटे भोगल्यामुळे, त्यांची बुद्धी चतुरस्त्र झालेली असे व कर्तबगारीही वाढलेली असे. त्यामुळे दक्षिण्यांना स्पर्धेत सहज मागे टाकून भराभर ते वरच्या जागा मिळवीत आणि सर्वत्र आपले वर्चस्व प्रस्थापीत. यामुळे दक्षिणी लोकात त्यांच्याविषयी तीव्र मत्सर व द्वेषभाव निर्माण होऊन त्यातून अनेक अनर्थ निर्माण झाले.

कत्तलखाना
 परदेशी यांनी आपल्याला शह दिला असून ते हळूहळू आपल्यावर मात करीत आहेत हे दक्षिण्यांच्या ध्यानी आले व या आपल्या शत्रूचा नाश करण्याची ते संधी पाहू लागले. १४३०–३१ साली बहामनी सुलतानांच्या गुजराथच्या सुलतानाशी तीन लढाया झाल्या. त्या तीहींतही बहामनींचा पराभव झाला. या सर्वाचे अपश्रेय परदेशी लोकांवर फोडून, दक्षिणी यांनी बादशहा वली याचे कान भरले. त्याला ते सर्व खरे वाटून त्याने परदेशी सरदारांना पदच्युत करून दक्षिण्यांच्या सर्वत्र नेमणुका केल्या. १४४६ साली खेळणा किल्ल्यावर बहामनी सेनापती खलफ हसन याने स्वारी केली. त्या वेळी तेथील राजे शंकरराव शिर्के यांनी संगमेश्वरचे राजे यांचे साह्य घेऊन हसन खानाची धूळधाण केली. बहामनी लष्करच कसेबसे जीव घेऊन, चाकणच्या किल्ल्यात येऊन राहिले. तेव्हा पुन्हा संधी साधून दक्षिणी यांनी, परदेशी यांच्या दगाबाजीमुळे व नालायकीमुळे हा पराभव झाला, असे सुलतान अल्लाउद्दिनशहा याच्या मनात भरवून दिले. लगेच त्याने हुकूम देऊन चाकणच्या किल्ल्यातील सर्व परदेशी लष्कराला बाहेर काढून त्याची कत्तल केली. पुढे तेथून सुटून आलेल्या परदेशी लोकांनी बादशहाला खरा प्रकार सांगितला. तेव्हा संतापून जाऊन त्याने दक्षिण्यांची तशीच कत्तल केली ! १४८२ साली सुलतानपदी आलेला महमूद हा अज्ञान होता. सर्व सत्ता दक्षिणी दिवाण मलिक नाईब याच्या हाती होती. आदल्या वर्षीच परदेशी वजीर महंमद गवान याला सुलतानाने ठार मारले होते. आता यूसफ अदिलखानासारख्या राहिलेल्या परदेशी सरदारांचाही काटा काढावा असा मलिक नाईब याने मनसुबा केला. पण ही बातमी बाहेर फुटली. आणि मग राजधानीमध्ये दोन्ही पक्षातील वैरानी भडकून वीस दिवसांपर्यंत उभयपक्षांत रणधुमाळी चालू होती. खून, कत्तली, रक्तपात यांनी नुसते थैमान मांडले होते. यानंतर मलिक नाईब याचाही खून होऊन हे सूडसत्र त्या वेळेपुरते संपले.

शिया व सुनी
 दक्षिणी व परदेशी या वांशिक भेदाप्रमाणेच सुनी व शिया हा धार्मिक भेदही बहामनी सत्ता विकल करण्यास कारणीभूत झाला होता. बहुतेक सर्व दक्षिणी हे सुनी असून परदेशी हे शियापंथी होते. त्यामुळे त्यांच्या वैमनस्याला धर्मद्वेषाची धार दर वेळी येत असे. पण हा धर्मद्वेष याहीपेक्षा जास्त अनर्थाला कारण झाला; कारण बहामनी सुलतान कधी शियापंथ स्वीकारीत तर कधी सुनी पंथ. त्यामुळे शिया सुलतानाच्या जागी सुनी सुलतान आला की सर्व सत्ताधारी मंडळच पदभ्रष्ट होई व नवीन येणाऱ्या सुनी सरदारांविषयी आकस धरी. हसन गंगू जाफरखान हा शिया होता तर त्याचा मुलगा महंमद हा सुनी होता. सुलतान फिरोज हा सुनी होता तर त्याच्या मागून आलेला अहंमद शहावली हा शिया होता. अबिसिनियातून आलेले हबशी लोक हे वास्तविक परदेशी. पण ते सुनी होते. शिवाय ते अतिशय कुरूप असल्यामुळे अरब, इराणी, तुर्क हे परदेशी त्यांना तुच्छ लेखीत. त्यामुळे सर्व हबशी नेहमी दक्षिणी पक्षात असत. या धर्मपंथाविषयी लिहिताना सर वूलसेले हेग म्हणतात, 'साधारणतः परदेशी हे शिया व दक्षिणी हे सुनी असत. पक्ष व पंथ यांची अगदी काटेकोर समव्याप्ती होती असे नाही. स्वार्थ, भीती, यामुळे या पक्षाचे त्या पक्षात किंवा पंथात जात हे खरे. पण बव्हंशी विभागणी तशी होती. त्यामुळे निर्माण झालेला पक्षद्वेष हाच नित्य प्रबळ असे. स्वार्थातीत अशी राष्ट्रीय दृष्टी कोणत्याही पक्षात किंवा पंथात केव्हाच निर्माण झाली नाही.' (केंब्रिज हिस्टरी, खंड ३ रा, पृ. ४०४)

हिंदू काफरांचा उच्छेद !
 अशा या इस्लामी राज्यात हिंदू प्रजेची स्थिती काय असेल याची कल्पना करणे अवघड नाही. सर वूलसेले हेग म्हणतात, 'बहामनी सुलतानांचे समकालीन व समधर्मी जे दिल्लीचे सुलतान त्यांच्या प्रजेसारखीच, किंबहुना थोडी अधिकच, हलाखीची स्थिती बहामनी प्रजेची होती. हिंदू शेतकऱ्यांच्या हिताकडे मुळीच लक्ष दिले जात नसे. त्या वेळच्या भारतात आलेला रशियन प्रवासी निकितिन म्हणतो, 'सरदार लोक सर्व गबर झालेले असून या भूमीचे पुत्र हे दुःख व दारिद्र्यात पिचले होते. १३८७ पासून बारा वर्षे महाराष्ट्रात अत्यंत भीषण दुष्काळ पडला होता. त्या वेळी सुलतान महंमद याने एक हजार बैलांचा तांडा ठेवून गुजराथ व माळवा येथून धान्य आणविण्याची व्यवस्था केली होती. ते धान्य स्वस्त दराने विकले जाई. पण ते फक्त मुसलमानांना. हिंदूंना नव्हे.' (केंब्रिज हिस्टरी, खंड ३ रा, पृ. ४८५.) हा सुलतान महंमद मोठा विद्वान व सुसंस्कृत व प्रजाहितदक्ष असा होता, असे इतिहासकार म्हणतात. त्याल दक्षिणचा ॲरिस्टॉटल असे म्हणत असत (ॲरिस्टॉटल या अभिधानाचा अर्थ कळण्याचीही पात्रता येथे नव्हती इतकाच याचा अर्थ). अशा सुलतानाच्या राज्यात हिंदू प्रजेविषयी अन्नाच्या बाबतीत असा दारुण पक्षपात होता. मग एकंदर बहामनी राज्यात काय असेल ते कळतेच आहे.
 धर्माच्या दृष्टीने पाहता, हिंदू हे इस्लामच्या मूळ सिद्धान्ताप्रमाणेच मुस्लिमांचे शत्रु होते. शिया व सुनी हे इस्लामचेच दोन पंथ. त्यांच्यांत किती सलोखा व सहिष्णुता होती ते वर सांगितलेच आहे. स्वधर्मातल्याच एका पंथाची दुसरा जेथे घोर कत्तल करण्यात भूषण मानीत असे, तेथे सर्वस्वी परधर्मी व निर्बल असे जे हिंदू त्यांच्या नशिबी काय असेल, हे सांगण्याचे कारण नाही. सय्यद अली तवा तवा हा सोळाव्या शतकाच्या अखेरीस होऊन गेलेला मुस्लिम इतिहासकार. त्याने 'बुरहाने मासीर' या नावाचा बहामनी राज्याचा इतिहास लिहिला आहे. त्यावरून हिंदुप्रजेविषयी बहामनी सुलतानांची काय वृत्ती होती ते स्पष्ट दिसून येते. त्याचे पहिलेच वाक्य असे आहे, सुलतान अल्लाउद्दिन हसनशहा गंगू बहामनी याने दक्षिणेत इस्लामची स्थापना करून काफरांचा उच्छेद केला.' अन्यत्र तो म्हणतो, 'वरील सरदारांपैकी इमाद उलमुल्क आणि मुबारकखान यांनी सुलतानाच्या आज्ञेप्रमाणे हिंदूंच्या मुलखात लुटालूट करीत तापी नदीपर्यंत मजल मारली. वाटेत त्यांना जे जे मूर्तिपूजक आढळले त्यांची त्यांनी सर्रास कत्तल केली.' हसन गंगू हा कोणी शेख जुनैदी याचा चाकर होता. त्या वेळी त्याचे भविष्य उज्ज्वल आहे असे सांगताना शेख म्हणाला,' हसन राजा, तू सैन्य गोळा कर आणि जिहाद पुकारून पाखंड्यांचा सर्व प्रदेश इस्लामच्या छायेखाली आण.' (बहामनी राज्याचा इतिहास, सय्यद अली याच्या 'बुरहाने मासीर' या पुस्तकाचे भाषांतर, भाषांतरकार डॉ. भ. ग. कुंटे, पृ. २, ७, २६,) या पुस्तकाला जोडलेल्या प्रस्तावनेत डॉ. कुंटे यांनी बहामनी राज्याबद्दल मधून मधून पुढीलप्रमाणे अभिप्राय दिले आहेत. 'शिया व सुनी हे वाद ज्यांच्यांत प्रबळ होऊन घोर कत्तली होऊ शकतात ते राज्यकर्ते आपल्या सामान्य बहुसंख्य हिंदुप्रजेबरोबर सहिष्णुतेने वागणे असंभवनीय होते.' 'हिंदु-समाजाला सांस्कृतिक दृष्टीने नेस्तनाबूद करणे जरी बहामनी राज्यकर्त्यांना शक्य झाले नाही, तरी इतर सर्व बाबतीत मात्र त्यांनी हिंदूंची गळचेपी करण्यास मागेपुढे पाहिले नाही.' आपल्या अहमदनगरच्या इतिहातात, सय्यद अली, 'काफरांची देवळे पाडण्यात आली, त्यांची मालमत्ता जत करण्यात आली' असे स्पष्टपणे म्हणतो. तीच स्थिती बहामनी राज्यात असली पाहिजे, हे नाकारणे म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करणे होय.' बहामनींची सारी कारकीर्द वारसाहक्कासाठी झालेली बंडे व खून यांनी भरलेली आपल्याला दिसून येईल.' महमूद गवान याचा कालखंड सोडून दिल्यास बहामनींना राजकीय स्वास्थ्य व शांतता यांचा लाभ कधीच झाला नाही.' (उक्त ग्रंथ ). सुलतान हुमायून, सुलतान महमूदशहा (१४८२ ते १५१८) हे तर केवळ सैतानच होते. प्रजेची कत्तल करणे हा त्यांचा करमणुकीचा प्रकार होता. अल्लाउद्दिन, महंमद २ रा यांसारखे आरंभी बरे असलेले सुलतानही पुढे व्यसनासक्त झाल्यावर या प्रकाराने मनोरंजन करून घेत. हुमायून हा प्रजाजनांच्या स्त्रिया व मुली जबरीने पळवून आणीत असे. तो मेला तेव्हा त्याच्या सरदारांनीही निःश्वास टाकला. बहुतेक सर्व सुलतानांची मद्यासक्ती, भोग लालसा, पिसाट धर्मांधता, परधर्माविषयीची इस्लामी धर्माची शत्रुवृत्ती हे सर्व घटक ध्यानात घेता बहामनी राज्यात हिंदुधर्मीयांची स्थिती काही निराळी असणे शक्यच नव्हते हे सहज ध्यानी येईल.

विजयनगर व बहामनी
 गुलबर्गा येथे १३४७ साली बहामनी राज्य स्थापन झाले. त्याच्या आधी अकरा वर्षे म्हणजे १३३६ सालीच विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना झाली होती. आणि ती, मुस्लिम आक्रमणापासून हिंदुधर्माच्या रक्षणाच्या उद्देशानेच झाली होती. मलिक काफूर याने इ. स. १३१९ सालापर्यंत दक्षिणेतील सर्व हिंदुराज्ये उद्ध्वस्त करून टाकलीच होती. त्यानंतर महंमद तल्लख याने त्या सर्व प्रदेशावर मुस्लिम सत्ता प्रस्थापित करून दौलताबाद, मदुरा येथे आपले सुभेदार नेमले होते. या मुस्लिम आक्रमणाचा उच्छेद करण्यास भारतात दोनच सत्ता समर्थ झाल्या. त्या म्हणजे मेवाडची रजपूत सत्ता व विजयनगरची कन्नड सत्ता. १३३६ साली विजयनगर येथे संगम वंशातील हरिहर व बुक्क यांनी स्वतंत्र हिंदुराज्याची स्थापना केल्यानंतर हळूहळू त्यांनी तुंगभद्रेच्या दक्षिणेचा सर्व प्रदेश मुस्लिमांपासून मुक्त केला व त्याच वेळी तुंगभद्रेच्या उत्तरेस पाऊल टाकून कृष्णेपर्यंत हिंदुराज्याची सीमा भिडविण्याचा त्यांनी निश्चय केला. यातूनच बहामनी राज्याशी त्यांचा संघर्ष उद्भवला. बहामनी राज्याच्या इतिहासात प्रारंभापासून अखेरपर्यंत विजयनगरच्या राज्याशी झालेल्या लढाया हे एक कायमचे प्रकरण आहे. किंबहुना बहामनी इतिहास तीनचतुर्थांश तरी या संग्रामांच्या वृत्तानेच व्यापला आहे, असेही म्हणण्यास हरकत नाही.

इतिहासलेखन नाही
 या संग्रामांचे इतिहास मुस्लिम इतिहासकार व काही पाश्चात्य इतिहासकार यांनी लिहून ठेविले आहेत. हिंदू पंडित हे अनादी कालापासून इतिहासाविषयी उदासीन असल्यामुळे आजपर्यंत दुर्दैवाने भारताच्या इतिहासाच्या अभ्यासकाला त्या परकी इतिहासकारांवरच अवलंबून राहावे लागत असे. अलीकडेच नाणी, शिलालेख, वाङ्मय इ. साधनांच्या साहाय्याने हिंदू पंडितांनी भारताच्या इतिहासाची पुनर्रचना करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यांतील डॉ. कन्हय्यालाल मुन्शी यांनी भारतीय विद्याभवनातर्फे केलेला प्रयत्न सर्वात मोठा व तितकाच अभिनंदनीय आहे. 'हिस्टरी अँड कल्चर ऑफ दि इंडियन पीपल' या नावाने दहा खंडांत त्यांनी हा इतिहास प्रसिद्ध केला आहे. त्यांतील सहाव्या खंडातील बहामनी व विजयनगर यांच्या इतिहासांच्या आधारे पुढील विवेचन केले आहे.
 आजपर्यंत या इतिहासांचा मुख्य आधार म्हणजे फिरिस्ता या इराणी लेखकाचा 'हिस्टरी ऑफ दि राइज ऑफ दि मोहमेडन पॉवर इन इंडिया' हा ग्रंथ होय. हा मूळचा कास्पियन समुद्राजवळ राहणारा. बहामनी काळात, अनेक परदेशी मुस्लिम भारतात येत, तसा हा आला होता व नगर, विजापूर येथील सुलतानांच्या आश्रयाला राहिला होता. तेथे राहून अनेक ग्रंथ मिळवून याने १६१२च्या सुमारास वरील ग्रंथ पुरा केला. त्याची इंग्रजीत दोनतीन भाषांतरे झालेली आहेत. अलीकडच्या संशोधना- अन्वये पाहता फिरिस्ताच्या इतिहासात अतिशयोक्ती, सत्यविपर्यास, काल्पनिक माहिती, संशयास्पद विधाने असे फार दोष आहेत. विद्याभवनाने प्रकाशित केलेल्या इतिहासात बहामनी व विजयनगर या राज्यांचे इतिहास अनुक्रमे डॉ. जोशी व डॉ. वेंकटरमणय्या यांनी लिहिले असून फिरिस्ताचे वरील दोष त्यांनी ठायी ठायी दाखवून दिले आहेत. आणि आद्ययावत् साधनांच्या आधारे आपले इतिहास लिहिले आहेत.

तुंगभद्रा ते कृष्णा
 बहामनी सत्तेचे विजयनगरच्या साम्राज्याशी संग्राम मुरू झाले ते पहिला सुलतान हसन गंगू याचा मुलगा महंमदशहा पहिला याच्या वेळी (१३५८ - १३७५). त्या वेळी विजयनगरच्या गादीवर सम्राट बुक्क हा होता. तुंगभद्रा व कृष्णा या नद्यांतील दुआब व तेथील रायचूर व मुद्गल हे किल्ले यांवरील सत्तेविषयीचा वाद हा बहुधा या दोन सत्तांमध्ये झालेल्या युद्धाच्या मुळाशी होता. हसन गंगू याने हे किल्ले घेतले होते. सम्राट बुक्क व वरंगळचा राजा यांनी महंमदशहाला अंतिमोत्तर पाठवून या किल्ल्यांची मागणी केली. याच पत्रात वरंगळच्या राजाने कौलस या आपल्या किल्ल्याची मागणी केली. महंमदाने या मागण्या नाकारल्यामुळे युद्धाला तोंड लागले. या युद्धातील सर्व मोहिमांत महंमदशहाला विजय मिळाले असे फिरिस्ता लिहितो. पण तहाच्या अटी पाहिल्या तर ते सर्वस्वी खोटे आहे असे दिसते. आपल्या साम्राज्याची हद्द कृष्णे- पर्यंत असावी, दुआबावर आपली सत्ता असावी, अशी बुक्काची मागणी होती. तहात ती महंमदशहाने मान्य केलेली आहे. तेव्हा लढाईत विजयनगरचा विजय झाला हे उघडच आहे. ही लढाई १३६५ साली झाली. महंमदाच्या मागून त्याचा मुलगा मुजाहिद (१३७५ - ७८) सुलतान झाला. त्याने तख्तावर येताच १३६५ सालचा तह रद्द समजून तुंगभद्रा ही बहामनी राज्याची दक्षिण सरहद्द मानावी अशी मागणी केली; व सम्राट हरिहर २ रा याने ती नाकारताच दुआबावर हल्ला केला. पण अडोनी येथे हरिहराच्या सैन्याने त्याचा पूर्ण पराभव केला. तेथून परत येत असताना मुजाहिदचा खून झाला. त्यामुळे बहामनी राज्यात सर्वत्र गोंधळ माजला. ही संधी साधून हरिहराने उत्तर कर्नाटक, वनवासीप्रांत, गोवा व कोकण, यांवर स्वारी करून तो सर्व प्रदेश जिंकला. गोवा, चौल, दाभोळ ही बंदरे तुरुष्कांचा पराभव करून हरिहराचा सेनापती माधवमंत्री याने जिंकली, असे इतिहासकार सीवेल याने म्हटले आहे (फरगॉटन एंपायर, पृ. ३०१ ) सुलतान फिरोजशहा (१३९७ - १४२२) याने १३९८, १४०६ व १४१७ या सालीं विजयनगरवर तीन वेळा स्वाऱ्या केल्या. राचकोंडाचे बेल्मा व कोडविडूचे रेड्डी हे हिंदुराजे होते. पण ते नेहमी बहामनी सुलतानाशी सख्य ठेवून असत. विजयनगरच्या सत्तेशी त्यांनी कायम वैर धरले होते. १३९७ साली महंमदशहा २ रा हा मृत्यू पावला व त्याचा सतरा वर्षांचा मुलगा ग्यासुद्दिन हा गादीवर आला. पण तुघलचिन या एका प्रबळ सरदाराशी त्याचे वाकडे होते. यामुळे संधी साधून तुघलचिन याने ग्यासुद्दिनचे डोळे काढले व दरबारातील अनेक सरदारांचे खून केले. या घालमेलीत ग्यासुद्दिनचा मेहुणा फिरोज याने तख्त बळकावले. या अंदाधुंदीची संधी साधून सम्राट हरिहर २ रा याने बहामनी प्रदेशावर हल्ला करून सागर हा किल्ला घेतला. या वेळी झालेल्या लढाईत वेल्मा हे सुलतानाच्या पक्षाला होते. नळगोंडा जिल्ह्यातील पानगळ येथील शिलालेखाप्रमाणे हरिहराने दोघांचाही पराभव करून कृष्णेचा उत्तरेचाही काही मुलूख घेतला. १४०६ साली देवराय १ ला विजयनगरच्या गादीवर आला. याच साली सुलतान फिरोज याने दुआबावर स्वारी केली व त्याचे दोस्त बेल्मा व रेड्डी यांनी विजयनगर साम्राज्याच्या पूर्व प्रदेशावर हल्ला चढविला. फिरिस्ताच्या वृत्तांताप्रमाणे सुलतान थेट विजयनगरच्या वेशीपर्यंत गेला व त्याने सर्व प्रांत उजाड करून टाकला. तेव्हा देवरायाने मोठी खंडणी व राजकन्या देऊन त्याला परत पाठविले. इतर मुस्लिम इतिहासकार राजकन्येचा उल्लेखही करीत नाहीत. त्यांच्या मते सुलतात विजयनगरपर्यंत पोचलाही नव्हता. देवराय हा मोठा पराक्रमी असून त्याने आपल्या कारकीर्दीत विजयनगर साम्राज्याच्या कक्षा वाढविल्या, हे सर्वमान्य आहे. अशा स्थितीत देवरायाने वरील नामुष्कीच्या तहास मान्यता दिली असेल हे सर्वथा असंभवनीय आहे. १४१७ च्या लढाईत तर सुलतान फिरोज याचा नक्षाच उतरला. पानगळचा किल्ला अत्यंत बळकट असून तो मोक्याच्या ठिकाणी होता. हे त्याचे महत्त्व जाणून फिरोजने त्यास वेढा घातला. हा वेढा दोन वर्षे चालू होता. किल्ल्यातील शिबंदी मोठ्या धैर्याने लढत होती. शेवटी देवरायाने अनेक हिंदू राजे मिळवून घेऊन वेढा घालणाऱ्या फौजेला घेरा घातला. याच वेळी किल्ल्यावरील सेनाही खाली उतरली व अशा रीतीने दोन चक्रांत गाठून त्यांनी बहामनी सैन्याचा निःपात केला व देवरायाने दुआबावर आपले स्वामित्व निर्विवाद प्रस्थापित केले. देवराय २ रा (१४२२ - ४६) याच्या कारकीर्दीत बहामनी सुलतानांनी विजयनगरवर तीन वेळा स्वारी केली. पण तीनही वेळा कृष्णा तुंगभद्रा दुआब हा विजयनगर- कडेच राहिला असे दिसून येते. १४७० साली महंमदशहा ३ रा याचा वजीर महंमद गवान याने कोकणावर स्वारी केली. आणि दोन तीन वर्षांत सर्व कोकण व गोवा प्रांतही त्याने घेतला. गोवा व कोकण गेल्यामुळे विजयनगरचे फार मोठे नुकसान झाले. त्या साम्राज्याच्या प्रतिष्ठेलाही मोठा धक्का बसला. त्या वेळचा सम्राट विरुपाक्ष याने गोवा परत घेण्याचे दोन तीनदा प्रयत्न केले. पण ते निष्कळ झाले. पुढे काही वर्षांनी तेथे पोर्तुगीज सत्ता स्थापन होऊन ते महत्त्वाचे बंदर हिंदूंच्या हातून कायमचे गेले.
 १४९० ज्या सुमारास बहामनी राज्याची सत्ता संपुष्टात आली आणि त्याचे पाच तुकडे पडून महाराष्ट्रात पाच भिन्न शाह्या प्रस्थापित झाल्या. त्यामुळे मुस्लिम सत्ता अगदी कमजोर झाली. याच वेळी विजयनगरच्या सत्तेला नरसनायक, वीर नरसिंह व कृष्णदेवराय (१४९० ते १५२९) असे प्रबळ सम्राट लाभले. त्यामुळे त्यांनीच भंगलेल्या बहामनी सत्तेवर आक्रमण करून ती अगदी खिळखिळी करून टाकली. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांनी अनेक वेळा ऐक्य करून विजयनगर- विरुद्ध जिहाद पुकारला. पण त्या प्रबळ सम्राटांपुढे त्यांचे काही चालले नाही. १५३० नंतर विजयनगरची सत्ता हळूहळू दुबळी होऊ लागली आणि १५६५ साली वरील शाह्यांनी पुन्हा एकदा जिहाद पुकारला व राक्षस तागडी येथे त्या सत्तेचा पूर्ण पराभव केला. पण तो इतिहास पुढे येईल. बहामनी सत्तेचा भंग होऊन तिची पाच शकले झाली याचा थोडासा वृत्तांत आधी पाहावयाचा आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासातील ती फार महत्त्वाची घटना आहे.

पाच तुकडे
 सुलतान महंमदशहा २ रा (१४६३ - १४८२) याने आपला कर्तबगार वजीर महंमद गवान यास स्वामिद्रोहाच्या संशयावरून ठार मारल्याचे वर सांगितलेच आहे. महंमद गवानच्या कर्तृत्वानेच गेली वीस पंचवीस वर्षे बहामनी सत्ता अनेक संकटांतून वाचली होती. तो जाताच तिला तडे जाण्यास सुरुवात होऊन त्या एका राज्याची लवकरच पाच राज्ये झाली. बहामनी राज्याच्या सरदारांनीच, केन्द्रसत्ता दुबळी झाल्यामुळे आपापल्या सुभेदारीच्या प्रदेशात ही राज्ये स्थापन केली होती. बहामनी सुलतान दुसरा महंमद याच्या नंतरचे सुलतान इतके दुबळे होते की त्यांच्या या सुभेदारांना स्वतंत्र होण्यास मुळीच प्रयास पडले नाहीत. इ. स. १४८४ स.ली वऱ्हाडचा सुभेदार इमाद उल्मुल्क याने गाविलगड येथे स्वतंत्र इमादशाही स्थापन केली. १४८९ साली अहंमद निजाम उल्मुल्क याने नगर येथे निजामशाहीची स्थापना केली. त्याच साली विजापूरचा सुभेदार यूसफ आदिलशहा याने विजापूर येथे आदिलशाही हे राज्य स्थापिले. बहामनी राज्याची बेदर ही राजधानी होती. कासीम बेरीद हा तेथला सुभेदार होता. सुलतान दुबळा होताच त्याने त्याला ठार मारून इ. स. १४९२ साली ते तख्त बळकाविले. बेदरची बेरीदशाही ती हीच. आंध्रप्रदेशातील गोवळकोंड्याच्या सुभ्यावर कुली कुतुब उलमुल्क हा सुभेदार होता. जुना वरंगळ प्रदेश तो हाच. १५१२ साली कुतुबशहाने तेथे कुतुबशाही स्थापिली. आणि अशा रीतीने बहामनी सत्ता पंचधा भग्न झाली.

मृतावस्था
 या सर्व घडामोडींचा आपल्याला मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या म्हणजेच संस्कृतीच्या दृष्टीने अभ्यास करावयाचा आहे. त्या दृष्टीने पाहू लागताच एक उद्वेगजनक गोष्ट प्रथमच ध्यानात येते. बहामनी सत्ता १४८० नंतर अगदी विकल झाली होती. त्यानंतर तख्तावर आलेले सुलतान अगदी नालायक व दुबळे होते. त्यामुळे सर्वत्र अंदाधुंदी व अराजक माजले होते. मोठमोठया सरदारांचे व प्रसंगी सुलतानांचेही खून पडत होते. दक्षिणी व परदेशी यांच्यांत नित्य रक्तपात चालू होता. यामुळेच वर सांगितलेल्या सुभेदारांना बहामनी सत्तेचे लचके तोडून आपापली स्वतंत्र राज्ये स्थापणे शक्य झाले. पण उद्वेगजनक गोष्ट ही की यातला एकही लचका हिंदूंनी किंवा मराठ्यांनी तोडला नव्हता. या काळात महाराष्ट्रात, राजवाडे म्हणतात त्याप्रमाणे, निकम, राणे, शिरके, सावंत, मोरे, भोसले, जाधवराव, काटे, घोरपडे अशी अनेक मराठा घराणी नांदत होती. पण या कोसळत्या सत्तेचा एक लचका आपण तोडावा, आणि जावळी, ठाणे, वाडी, खानदेश इ. ठिकाणी आपापले स्वतंत्र राज्य स्थापावे, अशी बुद्धी किंवा स्फूर्ती एकाही घराण्यातील पुरुषाला झाली नाही, इतके ते मृत झाले होते. आदिलशाही, इमादशाही, इ. पाच शाह्या ज्यांनी स्थापन केल्या ते कोण होते हे पाहिले तर मनाचा उद्वेग दसपटीने वाढतो. बेरीदशाही स्थापन करणारा कासीम बेरीद हा प्रथम महंमद शहापाशी एक गुलाम होता. पण स्वतंत्र राज्य निर्मिण्याचे कर्तृत्व प्रगट करू शकला. विजापूरचा यूसफ आदिलशहा हाही एक तुर्क गुलाम होता. तो इराणातून १४५९ साली दाभोळास आला. आणि त्याची कर्तबगारी अशी की तीस वर्षांच्या अवधीत भारतातला तो एक स्वतंत्र राजा झाला. हा उपरी, आगापिछा नसलेला मनुष्य. पण पिढिजाद खानदानीवर वारसा सांगणाऱ्यांना जे जमले नाही ते त्याने सहज करून दाखविले. कुली कुतुबशहा हाही इराणातून आलेला. तो एका मोठ्या कुळात जन्मला होता. पण येथे आला तो उपरी म्हणूनच. पण तोही राज्यकर्ता होऊ शकला. या तिघांचे चरित्र पाहून स्वजनाकडे पहावे, तो मन उद्विग्न होते. आपला उद्वेग दसपटीने वाढतो, असे वर म्हटले आहे. राहिलेल्या दोघांचे चरित्र पाहिले तर तो शतपट होतो. इमादशाही स्थापन करणारा फतेहल्ला इमादशहा हा मूळचा हिंदू ब्राह्मण होता. विजयनगरबरोबर झालेल्या एका लढाईत तो मुसलमानांच्या कैदेत पडला. नंतर तो मुसलमान झाला. निजामशाही स्थापन करणारा अहंमद निजामशहा हाही एका ब्राह्मणाचा मुलगा. विजयनगरचा एक ब्राह्मण भिमाप्पा बहिरू याचा मुलगा लढाईत कैदी झाला. रीतीप्रमाणे तो मुसलमान झाल्यावर मलिक नाईब निजाम उल्मुल्क झाला. या मूळ ब्राह्मण असलेल्या मलिक नाईबाचा मुलगा अहंमद निजामशाही हे स्वतंत्र राज्य स्थापण्यास, आणि वरील फत्तेउल्ला इमादशहा इमादशाही स्थापण्यास समर्थ होऊ शकला. ब्राह्मण हा ब्राह्मण असताना जे करू शकत नाही, ते मुसलमान झाल्यावर सहज करू शकतो. या घटिताचा विचार हिंदुधर्मीयांनी, भारतीय संस्कृतीच्या अभिमान्यांनी व अभ्यासकांनी अवश्य केला पाहिजे. कोणीही उपरी माणूस महाराष्ट्रात येतो व राज्य स्थापन करतो, कोणीही बाटगा मनुष्य स्वतंत्र शाही निर्माण करतो. आणि येथे शतकानुशतक वंशत्व मिरवणारे वसिष्ठ वामदेवांचे, याज्ञवल्क्य-पराशरांचे गोत्र सांगणारे ब्राह्मण व रामकृष्ण, सूर्यचंद्र, अग्नी यांचा वारसा सांगणारे मराठे, देवळे, मूर्ती, स्त्रिया, स्वधर्म व स्वसंस्कृती यांची विटंबना पहात स्वस्थ बसतात. नव्हे त्या विटंबना करणाराच्या चाकरीत भूषण मानतात. याचा अर्थ आपण नीट लावला पाहिजे. या समाजाच्या मूळ कर्तृत्वालाच कोठे तरी कीड लागली असली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. शब्दप्रामाण्य, निवृत्ती, जातिभेद, अस्पृश्यता, कर्मकांड, दैववाद, सिंधुबंदी, शुद्धिबंदी या अत्यंत अधम लक्षणांनी युक्त असा जो व्यक्तिनिष्ठ व समाजपराङ्मुख धर्म, तीच ही कीड होय हे मागल्या अनेक विवेचनांवरून ध्यानी येईल.

राज्यलक्ष्मीपासून अलिप्त
 बहामनी राज्याच्या उत्तरकाळाचा इतिहास पाहिला तर महाराष्ट्रीयांची त्या काळची कर्तृत्वशून्यता, या समाजाच्या पराक्रमाला आलेली अवकळा जास्तच स्पष्ट होते. इ. स. १४९० च्या सुमारास बहामनी सत्तेची पाच शकले होऊन तिच्या इतिहासाचा पहिला कालखंड संपला. त्यानंतर आदिलशाही, निजामशाही इ. वर सांगितलेल्या पाच शाह्यांचे राज्य महाराष्ट्रात सुरू झाले. एका राज्याची पाच शकले झाल्यामुळे त्यांचे सामर्थ्य एकपंचमाशापेक्षाही कमी झालेले होते, हे उघडच आहे. नालायक सुलतान, अल्पवयी वारस, त्यामुळे दरबारी लोकांत पडलेले तट व त्यांतून उद्भवणारी कारस्थाने, कर्त्या वजिरांचे खून, शिया-सुनी, दक्षिणी परदेशी हे भेद ही सर्व बहामनी सत्तेला घातक झालेली कारणे या शाह्यांत होतीच. आणि शिवाय, या पाचही शाह्यांत नित्य चालू असलेल्या लढाया हे शक्तिपाताचे आणखी कारण होते. सुमारे अर्ध- शतकानंतर दिल्लीला अकबर हा उदयास आला. आणि तेव्हापासून या पाच शाह्या नेस्तनाबूद करण्याचा विडा उचलून मोगल बादशहा सतत शंभर वर्षे त्यांच्यावर स्वाऱ्या करीत होते. त्यामुळे त्यांच्या सामर्थ्याची आणखी पोखरण होत होती तरीही सुमारे दीडशे वर्षांच्या अवधीत मराठ्यांना यांतली एकही शाही बुडविता आली नाही ! यांतील शाह्या बुडाल्याच नाहीत असे नाही. पण ते कार्य इतर मुस्लीम सत्तांनी केले. मराठ्यांचा त्यात कोठेच संबंध नव्हता. इ. स. १५२९ साली विजापूरच्या आदिलशहाने बेदरची बेरीदशाही जवळजवळ बुडविली, तरी पुढे १००-१२५ वर्षे ती जीव धरून होती. १६५६ साली ती औरंगजेबाने पूर्ण नष्ट केली. १५७२ साली वऱ्हाडची इमादशाही अहमदनगरच्या निजामशहाने खालसा केली. नंतर १६०० साली मोगलांनी ती निजामशाही बव्हंशी आणि १६३७ साली निखालस बुडवून टाकली. तेव्हा या शाह्यांची पडझड चालूच होती. पण तो उद्योग परकी, उपरी लोक करीत होते. या महाराष्ट्रभूमीचे धनी जे मराठे ते राज्यलक्ष्मीच्या मोहापासून सर्वस्वी अलिप्त होते !
 वर सांगितलेली नाना भेदकारणे, शक्तिक्षयकारणे या पाच शाह्यांना कशी नित्य ग्रासून राहिली होती याची कल्पना येण्यासाठी त्यांतल्या त्यात बलिष्ठ अशी जी विजापूरची आदिलशाही तिचा इतिहास थोडक्यात पाहू. त्यावरून शीतभात न्यायाने या पाचही सत्तांच्या विकलतेची परीक्षा होईल.

आदिलशाही
 यूसफ आदिलशहाने हे राज्य १४८९ साली स्थापन केले. तो १५१० साली वारला तेव्हा त्याचा मुलगा इस्माईल हा नऊ वर्षांचा होता. त्याचा पालक कमालखान याने या संधीचा फायदा घेऊन त्याला व त्याच्या आईला ठार मारण्याचे कारस्थान रचले. पण बेगम बुवजीखान हिने ते उलटवून त्यालाच ठार मारले. हे घोटाळे पाहून बेरीद, निजाम व इमाद या शाह्यांनी विजापूर बुडविण्याचा विचार करून त्यावर स्वारी केली. पण तीत त्यांचाच पराभव झाला. १५२५ साली बुऱ्हाण निजामशहाने पुन्हा विजापूरवर स्वारी केली. पण वजीर असदखान याने त्याचा पराभव केला. १५२९ साली इस्माइल आदिलशहाने बेदरवर स्वारी करून बेरीदशहाला पूर्ण नागविले. तेव्हा त्याच्या वतीने पुन्हा निजामशहा चालून आला. पण पुन्हा त्याचाच पराभव झाला. असदखान हा वजीर फार कर्तबगार होता. पण म्हणूनच इब्राहीम आदिलशहाने त्याला ठार मारण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले. सुलतान व त्याचा वजीर यांचे हे वैमनस्य बघून निजामशहा व कुतुबशहा यांनी विजयनगरच्या साह्याने विजापूरवर स्वारी केली. (इ. स. १५४३). पण असदखानाने विजयनगर व निजामशहा यांशी स्वतंत्र तह करून त्यांना फोडले व कुतुबशहाचा पराभव केला. पण निजामशहाने मागून स्वारी करून इब्राहीमशहाचा पराभव केला. यामुळे इब्राहीम अगदी बेताल होऊन अनन्वित कृत्ये करू लागला. तेव्हा दरबारी लोकांनी त्याचा भाऊ अब्दुल्ला यास गादीवर बसविण्याचा कट केला. पण तो उघडकीस येऊन अब्दुल्ला व त्याचे पक्षपाती यांना पळून जावे लागले. यानंतर इब्राहीमशहाच्या क्रौर्याला ताळतंत्रच राहिले नाही. उपचारार्थ आलेल्या वैद्य लोकांनाही तो ठार मारू लागला. पुढील सुलतान अली आदिलशहा याने रामराजाच्या मदतीने निजामशाहीवर स्वारी केली व त्याचा मुलूख उजाड करून टाकला (इ. स. १५५८). पुढल्या वर्षी पुन्हा हुसेन निजामशहा चालून आला तेव्हा पुन्हा रामराजा व कुतुबशहा यांच्या मदतीने आदिलशहाने त्याचा मोड केला.
 या घटनांमुळे विजयनगरचा हिंदुराजा, रामराजा, हा एक दिवस आपल्या सर्वच शाह्या गिळंकृत करील, अशी सार्थ भीती या सुलतानांना वाटू लागली व त्यांनी धर्मासाठी ऐक्य करण्याचे ठरवून जिहाद पुकारला. त्याचे फल त्यांना मिळून १५५६ साली राक्षस तागडी येथे विजयनगरच्या सत्तेचा त्यांना नाश करता आला. पण हे ऐक्य फार दिवस टिकले नाही. निजामशहाने एकदोन वर्षातच विजापूरवर स्वारी करून अदिलशाहीचा बराच मुलूख बळकावला.

खून-कारस्थाने
 १५८० साली तख्तावर आलेला सुलतान इब्राहिम हा नऊ वर्षांचा होता. त्या वेळी कामिलखान या वजिराने सर्व सत्ता बळकावण्याचा प्रयत्न केला म्हणून शहाची चुलती चांदबिबी हिने त्याला कैद करून किश्वरखानाकडे कारभार दिला. पण तोही तसाच होता. त्याने सर्व सत्ता बळकावून चांदबिबीलाच कैदेत टाकले. पण इतर काही सरदारांनी तिला मुक्त केले. तेव्हा किश्वरखान पळून गेला. हा सर्व गोंधळ पाहून निजामशहा व कुतुबशहा आदिलशहावर चालून आले. या वेळी अबुल हुसेन या सरदाराने पराक्रम करून त्यांचा पराभव केला. पण दिलावरखान या दुसऱ्या एका सरदाराने त्याला ठार मारून तो स्वतः मुख्य वजीर झाला. पुढे इब्राहिमशहा मोठा झाला तरी तो त्याच्या हाती सत्ता देईना. तेव्हा शहाने काही सरदारांच्या मदतीने त्याला पकडून त्याचे डोळे काढले व त्याला कैदेत टाकले. १५९३ साली शहाचा भाऊ इस्माईल याने बंड केले तेव्हा शहाने त्याला पकडून तोफेच्या तोंडी दिले. पुढे अकबराने निजामशाहीवर स्वारी केली. तेव्हा आदिलशहाने निजामाच्या मदतीसाठी लष्कर धाडले. पण अकबराने दोघांचाही मोड केला. तेव्हा इब्राहिमशहाने शरणागती पत्करून अकबराच्या मुलास आपली मुलगी दिली व इतरही मोठे नजराणे देऊन आपल्यावरचे संकट टाळले.

सरदारांच्या कत्तली
 महंमद आदिलशहा १६२६ मध्ये तख्तावर आला. प्रथम त्याने आपल्या वडील भावाचे डोळे काढले व इतर भावांची बोटे तोडून त्यांना लुळे पांगळे करून टाकले. याच्या कारकीर्दीत मोगल सरदार आसफखान याने विजापुरास वेढा घातला. या वेळी मुरारराव या सरदाराने मोठा पराक्रम करून मोगलांची खोड मोडली व त्यांना पिटून काढले. आसफखानाचा पराभव झालेला पाहून शहाजहान याने महाबतखान या सरदारास विजापुरात पाठविले. त्या वेळी शहाजीला आपल्या आश्रयास घेऊन आदिलशहाने महाबतखानाचा पराभव केला. याच वेळी दिवाण खवासखान व वर उल्लेखिलेला सरदार मुरारराव हे भारी होत आहेत असे पाहून सुलतानाने त्या दोघांसही ठार मारले. नंतर काही दिवसांनी शहाजीबद्दलही तीच शंका येऊन बाजी घोरपडे व मुस्ताफखान यांच्याकरवी त्याला सुलतानाने कैद केले. त्यालाही मारून टाकण्याचा त्याचा विचार होता. पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांशी संधान बांधून शहाजीराजे यांची सुटका करविली.

भेदजर्जर
 मद्यपी, व्यसनासक्त, नालायक सुलतान, अल्पवयी वारस, त्यामुळे कारस्थाने करणारे वजीर व सरदार, आणि या पाच भिन्न शाह्या यांची अखंड चाललेली आपसा-आपस युद्धे ही कारणे कोणत्याही सत्तेचा शक्तिक्षय करण्यास पुरेशी आहेत. याच्या भरीला दक्षिणी परदेशी व शिया-सुनी यांचे कलह हेही मागल्या अंकावरून पुढे तसेच चालू होते. आदिलशाहीचा मूळ संस्थापक युसूफ आदिलशहा ह्याने शियापंथाची दरबारात प्रसिद्धपणे स्थापना केली. त्यामुळे पुष्कळ सुनी लोक नोकऱ्या सोडून गेले. त्याचा मुलगा इस्माइल याने दक्षिणी व हबशी लोकांना घालवून देऊन लष्करात व दरबारात परदेशी लोकांचा भरणा केला. इस्माइलनंतर त्याचा भाऊ इब्रहीम तख्तावर आला. त्याने शियापंथ मोडून सुनीपंथाची स्थापना केली व परदेशी लोकांना हाकलून देऊन दक्षिण्यांचा भरणा केला. १५५७ साली सुलतानपदी आलेला अली अदिलशहा हा शिया होता. त्याने सुनीपंथ मोडून पुन्हा शियापंथाला आश्रय दिला. १५८० साली इब्राहीमशहा २ रा गादीवर आला. सत्ता हाती येताच त्याने शियापंथ मोडून सुनी चालू केला. शेवटी औरंगजेबाने आदिलशाही बुडविली त्या वेळी ती शिया पंथी होती. औरंगजेब कट्टा सुनी होता. गोवळकोंडा व विजापूर यांशी त्याचे वैर असण्याचे, त्या दोन्ही शाह्या शिया होत्या, हे एक कारण होते. एक सुलतान जाऊन दुसरा तख्तावर येण्याचे वेळी बारशाच्या कलहाप्रमाणेच या पंथभेदामुळे व दक्षिणी-परदेशी भेदामुळे राजसत्तेला हादरे बसत.

पोर्तुगीजांपुढे
 विजापूरची ही जी वर कथा सांगितली तशाच इतर शाह्यांच्या कमीअधिक प्रमाणात कथा आहेत. अशा स्थितीत त्या कितपत बलशाली असू शकतील याची कल्पना करणे फारसे अवघड नाही. १५७० साली त्यांच्या बलाची कसोटी लागण्याचा प्रसंग आला. त्या साली अली आदिलशहा, मूर्तजा निजामशहा व कालिकतचा झामोरीन यांनी दोस्तीचा करार करून पोर्तुगीजांना भारतातून हाकलून लावून त्यांचा मुलूख वाटून घेण्याचे ठरविले. त्याअन्वये अलीशहाने गोव्याला व मूर्तजाने चौलास वेढा दिला. आदिलशहाची फौज दीड लक्षापर्यंत होती व निजामशहाचीही जवळजवळ तितकीच होती. उलट गोव्याच्या किल्ल्यात जेमतेम ४००० व चौलच्या किल्ल्यात ३००० लष्कर होते. असे असूनही आदिलशहा व निजामशहा यांना ८-१० महिने त्या दोन्ही किल्ल्यांनी दाद दिली नाही. शेवटी अपार हानी सोसून दोघांनाही वेढे उठवून परत जावे लागले. या लांछनास्पद अपयशाचे कारण पोर्तुगीजांचे शौर्य हे तर आहेच, पण मुस्लिम लष्करातील फूट, भेद व फितुरी हेही तितकेच प्रबल कारण आहे. चौलच्या किल्लेदाराला मूर्तजा निजामशहाचे बहुतेक सरदार बातम्या तर पुरवीतच, पण दाणागोटाही पुरवीत. गोव्याला हा माल तर पोर्तुगीजांना पुरवला जाईच, पण शिवाय फौजेचा सेनापती नुरीखान याने अली आदिलशहाच्या खुनाचाही कट केला होता ! पोर्तुगीजांचे शौर्य व शिस्त ही तर अव्वल दर्जाची होतीच, पण त्यांचा व्हाइसराय डॉन लुई हा विलक्षण कर्ता पुरुष होता. त्याची शिबंदी तुलनेने फारच कमी होती. पण त्याचा आत्मविश्वास असा दांडगा होता व वेढा घालणाऱ्यांना तो इतका कःपदार्थ लेखीत असे की गोवा व दाभोळ ही दोन्ही ठाणी संभाळून त्याने, झामोरिनने हल्ला चढविलेल्या दक्षिणेकडील मोल्यूकस व मोझँबिक या दोन्ही ठाण्यांना इकडून मदत पाठविली. त्याच वेळी काही पोर्तुगीज व्यापारी जहाजे गोव्याहून पोर्तुगालला निघाली होती. खरे म्हणजे संकटाला ओळखून डॉम लुई याने त्यांना थांबवून धरावयाचे. पण त्याला त्याची गरजच वाटत नव्हती. तो या संकटाला जुमानायलाच तयार नव्हता. त्याने खुशाल ती जहाजे जाऊ दिली आणि आपणच बाहेर पडून त्याने दाभोळवर हल्ला केला. बहामनी इतिहासात हा प्रसंग लहान आहे. पण या बहामनी शाह्यांच्या सामर्थ्याचा हिशेब देण्यास तो पुरेसा आहे.
 अशी स्थिती असूनही मराठ्यांना त्या उलथून टाकता आल्या नाहीत. तसा प्रयत्नही मराठ्यांनी केल्याचे दिसत नाही. वास्तविक १४९० साली बहामनी सत्ता भंगली होती व तेव्हापासून १५३० पर्यंत विजयनगरची सत्ता अत्यंत प्रबळ होती. वीरनरसिंह व कृष्णदेवराय (इ. स. १५०३ - १५३०) हे सम्राट अतिशय पराक्रमी व समर्थ होते. त्यांनी विजापूर, बेदर या नगरींवर स्वाऱ्या करून त्यांचा विध्वंसही केला होता. या वेळी मोरे, सावंत, भोसले, राणे यांपैकी कोणाही एकदोन सरदारांनी उठाव केला असता तर विजयनगरच्या साह्याने त्यांना महाराष्ट्र स्वतंत्र करता आला असता. विजयनगरचे राजे या पाच शाह्यांच्या परस्परयुद्धात बहुधा कोणाची तरी बाजू घेऊन महाराष्ट्रात सारखे लष्कर घेऊन येतच असत. हिंदूंच्या उठावणीला साह्य करण्यासाठी ते निश्चितच आले असते. पण येथे उठावणीच झाली नाही ! महाराष्ट्र हा थंड गोळा होऊन पडला होता.
 असे का घडले ते पाहण्याचा आता थोडासा प्रयत्न करू.