१३.
मराठा सरदार
 


तीन वर्ग
 बहामनी कालातील राजसत्तेचे - सुलतान सत्तेचे स्वरूप कसे होते, याचा येथवर विचार केला. आता या कालातील महाराष्ट्रीय हिंदुसमाजाचे जे नेते होते त्यांच्या कर्तृत्वाचे विवेचन करावयाचे आहे. या कालाचा इतिहास पाहताना, या नेत्यांचे तीन प्रमुख वर्ग डोळ्यांपुढे येतात. त्या काळातले मराठा सरदार हा पहिला वर्ग. निंबाळकर, सावंत, सुर्वे, शिरके, माने, घाटगे, यादव, भोसले असे अनेक मराठा सरदार या काळात पराक्रम करताना दिसतात. नेत्यांचा दुसरा वर्ग म्हणजे शास्त्री पंडितांचा. या काळातले धर्मशास्त्रज्ञ हे मागे सांगितल्याप्रमाणे टीकाकार व निबंधकार होते. भारतात स्वतंत्र स्मृती रचण्याची परंपरा कधीच लोपली होती. आठव्या शतकानंतर एकही नवी स्मृती रचली गेली नाही. या पुढल्या काळात धर्मशास्त्रज्ञांनी मनू, याज्ञवल्क्य, नारद, पराशर यांच्या स्मृतींवर फक्त टीका लिहिल्या. आणि त्यानंतरच्या काळात अनेक जुन्या स्मृती, पुराणे, धर्मसूत्रे यांच्यांतील वचने घेऊन शास्त्रीपंडित धर्मग्रंथ रचू लागले. बहामनी काळात महाराष्ट्रात नृसिंहप्रसादकर्ता दलपती, निर्णयसिंधू व शूद्रकमलाकर यांचा रचयिता कमलाकर भट्ट, व्यवहारमयूखकर्ता नीलकंठ भट्ट, स्मृतिकौस्तुभकर्ता अनंत देव, असे धर्मशास्त्रज्ञ होऊन गेले. नेत्यांचा तिसरा वर्ग म्हणजे संतांचा होय. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास हे पाच प्रसिद्ध संत या काळात होऊन गेले हे सर्वश्रुतच आहे.

नेतृत्वाचे निकष
 अशा या त्रिविध नेतृत्वाचा आता विचार करावयाचा आहे. मुस्लिम आक्रमणाचा प्रतिकार करून स्वराज्य स्थापण्याचे प्रयत्न त्यांनी केले काय, त्या दृष्टीने समाजाला जागृत करून त्याला संघटनेचे तत्त्व या नेत्यांनी सांगितले काय, मुस्लिमांच्या क्रूर सत्तेच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या असहाय प्रजेचा दुःखभार हलका करण्याच्या दृष्टीने त्यांनी काय केले, 'धारणात् धर्म इत्याहुः।', 'प्रभवार्थाय भूतानां धर्मस्य नियमः कृतः' या प्राचीन काळच्या धर्माच्या व्याख्या ध्यानी घेऊन, लोकांचा प्रभव (उत्कर्ष), किंवा समाजाचे धारण पोषण करण्यास समर्थ असा धर्म यांनी उपदेशिला काय, हे व अशा तऱ्हेचे प्रश्न नेतृत्वाचा विचार करताना मनात उभे राहतात. नेतृत्वाचे ते निकषच होत. ते मनात ठेवूनच वर सांगितलेल्या विविध नेत्यांच्या कार्याचे निरीक्षण करावयाचे आहे.
 त्यांतील मराठा सरदार हा जो वर्ग, त्याच्या नेतृत्वाचा या प्रकरणात विचार करू आणि नंतर शास्त्रीपंडित आणि संत यांच्या कार्याचे एकेका प्रकरणात मूल्यमापन करू.

यवन सेना
 वर सांगितलेच आहे की यादव, निंबाळकर, सावंत, सुर्वे, शिरके, भोसले अशी अनेक सरदार घराणी बहामनी रियासतीत पराक्रम करीत होती. ही घराणी अस्सल क्षत्रियांची असून ती यादवांच्या कारकीर्दीत किंवा त्यांच्या पूर्वीही उत्तरेतून दक्षिणेत येऊन स्थायिक झाली होती. काही यादवांच्या काळात स्वपराक्रमाने उदयास आली होती बहामनी काळात यातील बहुतेक घराण्यांतले पुरुष पाचशेपासून पाच हजार स्वारांचे मनसबदार झालेले दिसतात. मुरार जगदेव, जगदेवराव पवार, लखूजी जाधवराव, मालोजी, शहाजी भोसले असे काही असामी तर आदिलशाही, निजामशाही या राज्यात सेनापतिपदापर्यंतही गेले होते. पण यांपैकी कोणीही केव्हाही मुस्लिम सत्ता नष्ट करून स्वराज्य स्थापण्याचा प्रयत्न केल्याचे आढळत नाही. सर्वांनी इमाने- इतबारे, राजीखुषीने, अक्कलहुषारीने सुलतानांची सेवा करून वतने, जहागिऱ्या, मनसबदाऱ्या या मिळविण्यातच धन्यता मानली असे दिसते.

घोरपडे
 गेल्या प्रकरणात भोसल्यांचे मूळ पुरुष सजनसिंह व त्याचा पुत्र दिलीपसिंह यांनी हसन गंगू यास बहामनी सत्ता स्थापन करण्यास साह्य केल्याचे सांगितलेच आहे. कर्णसिंह व भीमसिंह हे यांचेच वंशज. १४६९ साली बहामनी वजीर महंमद गवान याने कोकणात स्वारी केली, तेव्हा हे दोघे त्याच्याबरोबर होते. गुलबर्गा येथे बहामनी सत्ता स्थापन झाली तरी शंभर सव्वाशे वर्षे ती कोकण जिंकू शकली नव्हती. १४५३ साली बहामनी सेनापती मलिक उत् तुजार याने कोकणावर स्वारी करून राजे शिरके यांस जिंकले, आणि तू मुसलमान झालास तर जीवदान मिळेल नाहीतर तुझा शिरच्छेद करीन, अशी धमकी त्यांना दिली. राजे शिरके यांनी वरवर धर्मांतरास मान्यता दिल्याची बतावणी करून आतून खेळण्याचा सरदार शंकरराय यास साह्यार्थ पाचारण केले. आणि मग दोघांनी मिळून मुस्लिम सेनेचा त्या डोंगरी मुलुखात निःपात केला आणि कोकणचे स्वातंत्र्य अबाधित राखले. पण १४६९ साली महंमद गवान कोकण जिंकण्यात यशस्वी झाला. त्या वेळी कर्णसिंह याने बहामनी सुलतानाच्या सेवेत रणांगणी देह ठेविला. पण त्याचा मुलगा भीमसिंह याने घोरपडीच्या साह्याने खेळणा किल्ला सुलतानासाठी जिंकला. यामुळे संतुष्ट होऊन सुलतानाने भीमसिंहास 'घोरपडे' हा किताब व मुधोळजवळ ८४ गावांची जगीर नेमून दिली आणि भोसल्यांची ही शाखा मुधोळ घोरपडे म्हणून तेव्हापासून प्रसिद्ध झाली.

आकांक्षा नाही
 कोकणातले हे सरदार - संगमेश्वरचे शिरके व खेळण्याचे शंकरराय फार पराक्रमी व प्रबळ होते. त्यांची स्वतःची १३० जहाजे असून अरबी समुद्रात त्यांचे फार वर्चस्व होते. त्या समुद्रावरचे व्यापारी व मक्केचे यात्रेकरू यांना ते निःशंक लुटीत असत. १४३६ साली दिलावरखान या बहामनी सरदाराने रायरी व सोनखेड हे किल्ले जिंकून सोनखेडची राजकन्या सुलतानासाठी नेली होती. पण यामुळे शिरके यांची सत्ता भंगली नाही. १४५३ साली तर त्यांनीच बहामनी सैन्याला धूळ चारली. अशा रीतीने बहामनी सत्ता स्थापन झाल्यावर, शंभर सवाशे वर्षे कोकणात शिरके यांची सत्ता अबाधित राहिली होती. तरी मराठ्यांची संघटना करून अखिल महाराष्ट्र मुक्त करण्याचा त्यांनी प्रयत्नही केला नाही. बहामनी सुलतानांच्या मनात सत्तारूढ झाल्या दिवसापासून राज्यविस्तार करण्याची अदम्य आकांक्षा असे. सर्व महाराष्ट्र जिंकूनही ते स्वस्थ बसले नाहीत. वरंगळ त्यांनी बुडविले आणि विजयनगरच्या साम्राज्यवरही ते अखंड आक्रमण करीत राहिले. कर्नाटकात घुसून, तेथली सत्ता नष्ट करून, रामेश्वरपर्यंत इस्लामसत्ता पोचविण्याची ईर्ष्या त्यांना असे आणि १५६५ साली विजयनगरचा पराभव झाल्यानंतर त्यांनी ती काही अंशी पूर्ण केलीही. त्यासाठी आपसांतील वैरे विसरून निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही या एक झाल्या होत्या. दिल्लीचे मोगलही त्यांच्या पाठीशी होते. पण कोकणच्या प्रबळ मराठा सरदारांच्या चित्तात मात्र महाराष्ट्र जिंकण्याची व स्वराज्य स्थापण्याची आकांक्षा उदित झाली नाही. मोरे, निंबाळकर, मोहिते, सावंत है सरदार संघटित झाले असते तर त्यांना मुस्लिम सत्ता भारी नव्हती. पण तसा प्रयत्न १६५० पर्यंत कधी झालाच नाही. असे का व्हावे ?

मुस्लिमांचे आधारस्तंभ
 फलटणचे निंबाळकर हे असेच पराक्रमी होते. हे मूळचे धार येथील. पवार (परमार) या घराण्यातील एक पुरुष निंबराज हा दक्षिणेत आला. त्याचे वडील जगदेवराव तथा धारापतराव यांनी महंमद तबलखाच्या लष्करात, दुराणी लोकांशी लढून, मोठा पराक्रम केला, म्हणून सुलतानाने त्यास फलटणजवळ साडेतीन लक्षांची जहागीर दिली व नाईक हा किताब दिला. हा निंबराज १३४९च्या सुमारास दक्षिणेत आला. त्याच वेळी हसन गंगू दक्षिणेत आला. त्याने महंमद तबलखाची सत्ता झुगारून देऊन दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापन केले. निंबराजांनी असे का केलं नाही ? त्यांना मोठी जागीर मिळाली होती. (दुराणी) अफगाण लोकांनाही पराभूत करावे असा पराक्रम त्यांच्या रक्तात होता. पण त्यांनी जहागिरीतच संतोष मानला. प्रथम बहामनी राज्यात व पुढे आदिलशाहीत निंबाळकर मोठे मनसबदार झाले. १५७० साली जहागिरीवर आलेला वणंगपाळ फार पराक्रमी होता. विजापूरचे वजीरही त्यास वचकून असत. 'राव वणंगपाळ बारा वजिरांचा काळ' अशी त्यांच्याबद्दल म्हण पडली होती. पण हा पराक्रम, हे शौर्यधैर्य मुस्लिमांच्या सेवेत खर्ची पडत होते. त्यांच्या राज्याचा ते विस्तार करीत होते. त्याचा ते आधारस्तंभ होते.

घाटगे
 घाटगे घराण्याचा मूळ पुरुष कामराज घाटगे हा सोळाव्या वर्षीच हसन गंगू जाफरखान याच्या लष्करात मनसबदार झाला. त्याला मलवडी व ललगुण या दोन महालांची देशगत म्हणजे जहागीर होती. घाटगे घराण्यात अनेक शूर पराक्रमी पुरुष झाले. निजामशाहीचा दिवाण मलिकंबर याने विजापूरवर चढाई केली असताना घाटगे घराण्यातील वावजी व मिटोजी यांनी शर्थ करून आदिलशाहीचे रक्षण केले. त्या वेळी निजामशाहीत भोसले व जाधव ही घराणी व आदिलशाहीत घाटगे व घोरपडे ही घराणी फार पराक्रमी असून ती परस्परात लढाया करून आपापल्या सुलतानांची सेवा करीत असत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी असे त्यांना कधी वाटलेच नाही.

ब्राह्मण गुरू
 घाटग्यांचे मूळ पुरुष कामराज यांचे रामेश्वरभट काळे म्हणून एक गुरू होते. ते महा ईश्वरभक्त व मोठे सत्पुरुष होते. त्यांना योगविद्या व मंत्रविद्या वश होती. गंधाक्षता व तीर्थ यांनी ते कामराजांची सर्व संकटे नाहीशी करीत. पुढे काही काळाने घाटगे घराणे जरा खालावले होते. पण लवकरच बावजी झुंजारराव हा शूर पुरुष त्या काळात उदयास आला. ह्यास उदयास आणण्यास परशुराम भट हा तपस्वी ब्राह्मण कारणीभूत झाला. वावजीच्या विनंतीवरून त्याने खटावप्रांती श्रीरामेश्वर मंदिरात मोठे अनुष्ठान केले. तेव्हा श्रींनी साक्षात प्रसन्न होऊन सांगितले, 'विजापुरास जाऊन अंबरखान याची भेट घेणे. तो तुम्हांस इब्राहिम पातशहा जगद्गुरु यास भेटवील. दौलत अक्षयी होईल. चिंता नाही.' त्याप्रमाणे बावजी विजापुरास गेले. पातशहांनी त्यास सात लक्ष होनांची दौलत दिली. कुलगुरू परशुराम भट हे स्वारीत सदैव बावजीबरोबर असत. संकटप्रसंगी त्यास धीर देत व श्रींचा आशीर्वाद देऊन त्याचे कल्याण चिंतीत असत. बावजी यांचे पुत्र राजजी यांच्यावर परशुरामभट यांचे पुत्र वेदंभट यांची अशीच कृपा होती. वेदंभटांचे राजजींना हरकामात उत्कृष्ट साह्य असे. एकदा ते राजजींचा पठाण सावकार याच्याकडे, सात दिवस अन्न-पाण्यावाचून, कर्जफेडीसाठी ओलीस म्हणूनही राहिले होते.

मुस्लिम मौलवी
 तपस्वी, योगी, वेदवेत्ते ब्राह्मण आपल्या भक्तांना काय अशीर्वाद देत असत, कसे मार्गदर्शन करीत असत, हे वरील दोन तीन उदाहरणांवरून ध्यानी येईल. याच काळात मुस्लिम मुल्ला मौलवी, अवलिया, शेख हे आपल्या भक्तांना काय आशीर्वाद देत असत, ते पहाणे उद्बोधक होईल. हसन गंगू जाफरखान दिल्लीला एक सामान्य नोकर असताना तेथे शेख निजामुद्दीन या नावाचा एक अवलिया होता. एके दिवशी सुलतान महंमद तबलख त्याच्या दर्शनाला आला होता. तो परत गेला तेव्हा हसन लगेच तेथे आला. त्या वेळी निजामुद्दीन त्याला म्हणाला, 'हिंदुस्थानच्या एका प्रांताचा तू सार्वभौम होणार आहेस. मी जे तुला काही सांगत आहे ते विधिसंकेत म्हणूनच.' दक्षिणेत हसन आल्यावर शेख सिराज जुनैदी याच्याकडे तो गेला; तेव्हा त्याने त्याला उत्तेजन देऊन, 'राजाधिराज, तू सैन्य गोळा कर आणि जिहाद पुकारून, पाखंड्यांचा सर्व प्रदेश इस्लामच्या छायेखाली आण' असा शुभाशीर्वाद दिला आणि गुप्त धन दाखवून, मिरजेच्या किल्ल्यातल्या गुप्त बातम्या पुरवून, नाना प्रकारे साह्य केले. आणि तो किल्ला पडल्यावर, आता तुम्ही आक्रमण चालू ठेवा. विजयश्री तुमच्या बाजूला आहे' असा संदेशही त्याला दिला. सुलतान मुजाहिद याला शेख सिराजुद्दिन याचा असाच आशीर्वाद असे. तेव्हा मुस्लिम मौलवी, अवलिया यांची, आपल्या शिष्यांनी राज्य स्थापावे, सार्वभौम व्हावे, काफरांचा नाश करावा, इस्लामच्या छायेत जग आणावे, अशी प्रेरणा असे, असा आशीर्वाद असे, असे दिसते. (बहामनी राज्याचा इतिहास, डॉ. कुंटे, पृ. १, २६, २७, ३६.)

श्रींचा संदेश !
 या उलट मराठा सरदारांचे ब्राह्मण गुरू त्यांना कोणती प्रेरणा देत असत ते वर सांगितलेच आहे. या ब्राह्मणांच्या कृपेमुळे साक्षात श्रींचे दर्शन घाटगे यांना झाले आणि संदेश मिळाला की 'इब्राहिम आदिलशहाकडे जा. दौलत अक्षयी होईल.' श्रींनी विजापूरची चाकरी करण्याची प्रेरणा दिली, एवढेच नव्हे तर इब्राहम स्वतःला जगद्गुरू म्हणवीत असे, त्यालाही श्रींची मान्यता होती ! काळे रामेश्वरभट, परशुरामभट व वेदंभट असे तीन हिंदू ब्राह्मण सत्पुरुष घाटगे कुळातल्या सरदारांची चिंता वहात असत. पण त्या चिंतेची परमोच्च महत्त्वाकांक्षा आदिलशहा, निजामशहा यांच्या पदरी सरदारी मिळविणे एवढीच होती. सार्वभौमत्व, हिंदुधर्माला आलेली ग्लानी नष्ट करणे, असे विचार त्यांच्या स्वप्नातही कधी आले नाहीत.
 वर सांगितलेले राजजी घाटगे हे विजापूर दरबारी सरदार असता शिवछत्रपतींचा उदय झाला. पण त्यांचे गुरु वेदंभट यांनी, त्यांना महाराजांना जाऊन मिळण्याची प्रेरणा दिली नाही. राजजी अफजुलखानाबरोबर स्वारीत होते आणि शेवटपर्यंत त्यांनी विजापूरशीच आपले इमान राखले. (मुसलमानी अमदानीतील मराठे सरदार, द. ब. पारसनीस. मराठा सरदार घराण्यांची माहिती या पुस्तकातून घेतली आहे.)

राजा - किताब
 निंबाळकर, शिरके, घाटगे यांच्याप्रमाणेच म्हसवडचे माने हेही अस्सल मराठा क्षत्रियांचे घराणे होय. त्यातील एक मनुष्य सिदोजी याने, म्हसवड महालाचा अंमलदार सुजातमिया याच्या हाताखाली पराक्रम करून, विजापूर दरबारी प्रवेश मिळविला व बहुत कीर्ती संपादन केली. बेरदचा एक सुभेदार हुशेनशा म्हसवडवर चालून आला. त्या वेळी वणगोजी नाईक निंबाळकर त्याला फितले. पण सिदोजींनी आपले इमान सोडले नाही. त्यांनी बहुत शर्थ करून परचक्र नष्ट केले. तेव्हा इब्राहिम शहाने संतुष्ट होऊन त्यास दरमहा तीनशे होनांची तैनात चालू केली. सिदोजी माने याचे नरसिंहपंत केसकर म्हणून एक साह्यकर्ते होते. त्यांना विजापूर दरबाराने 'विश्वासराव' असा किताब दिला होता. पुढे विजापूरची स्थिती खालावली. त्या वेळी मुस्लिम सरदार हिंदू सरदारांचा द्वेष करू लागले. त्या वेळी अनेक मराठे सरदार औरंगजेबास जाऊन मिळाले. माने कुळातील रघाजी माने हेही त्यात होते. जयसिंग दक्षिणेत शिवाजी महाराजांवर चालून आला. त्या वेळी रघाजी माने यांनी बादशाही सैन्यात विशेष पराक्रम केला. तेव्हा औरंगजेबाने मेहेरबान होऊन त्यास म्हसवड, दहीगाव, कासेगाव, सांगोली, आटपाडी इ. गावांचे देशमुखी वतन दिले. रधाजी माने वारल्यानंतर, नागोजी माने यांनी शिपाईगिरी करून, औरंगजेबाकडून राजा हा किताब मिळविला.

उत्तरकालीन यादव
 जाधव आणि भोसले या दोन घराण्यांतील कर्त्या पुरुषांची माहिती देऊन सरदार घराण्यांचा हा विचार संपवू. देवगिरीच्या यादवांनाच पुढे जाधव म्हणू लागले. यादवांचा शेवटचा राजा शंकरदेव याचा मुलगा गोविंददेव हा, हसनगंगू दक्षिणेत आला तेव्हा, चांगला प्रौढ झाला होता. महंमद तबलखाच्या क्रूर, जुलमी कारभारामुळे सर्वत्र बेदिली माजली होती. त्या वेळी प्रत्येक प्रांतात अराजक माजून ठायी ठायी स्वतंत्र राज्ये निर्माण होत होती. हरिहर आणि बुक्क यांनी याच वेळी विजयनगरला स्वराज्यस्थापना केली. तोच पराक्रम शंकरदेवाचा मुलगा गोविंददेव याने करावयास हवा होता. पण तसे काही न करता, त्याने बहामनी राज्य स्थापन करण्याच्या कामी, हसनगंगू यास साह्यच केले. गोविंददेव याने, बहामनी राज्यस्थापना होण्याच्या आधी, खानदेशात स्वतंत्र राज्य स्थापिले होते. पण हसनगंगू येताच ती आकांक्षा सोडून देऊन, अनेक हिंदू राजांबरोबर, त्यानेही त्याला साह्य केले. पुढे बहामनी राजे कृतघ्न होऊन हिंदूंवर जुलूम करू लागले. तेव्हा पश्चात्ताप पावून गोविंददेव याने त्यांच्याविरुद्ध उटावणी केली. पण त्याचा पराभव होऊन त्यास गुजराथेत पळून जावे लागले. पुढे त्याचा मुलगा ठाकुरजी याने बहामनी राज्यात ५० गावांची देशमुखी मिळविली व मलिक उत् तुजार या बहामनी सरदाराच्या हाताखाली अनेक देशमुखांबरोबर पराक्रम करून नाव मिळविले. पंधराव्या शतकाच्या अखेरीस बहामनी राज्याच्या पाच शाखा झाल्या. त्यांतील निजामशाहीत दिवाण कंवरसेन याच्या हाताखाली, जाधव घराण्यातील एक पुरुष अचलोजी याने ५००० घोड्यांची मनसब मिळविली. १५६५ साली तालिकोटच्या लढाईत रामराजाविरुद्ध निजामशाहीच्या बाजूने विठ्ठलदेव जाधव याने मोठा पराक्रम केला. तो १५७० साली मृत्यू पावल्यावर लक्ष्मणदेव ऊर्फ लखूजी जाधव हे प्रसिद्ध सरदार देशमुखीवर आले. मालोजी भोसले यांचे व्याही ते हेच होत. निजामशाहीत यांनी शौर्याची शर्थ करून अनेक वेळा तिला वाचविले. पण हा सर्व पराक्रम त्यांनी वजीर मलिकंबर याच्या हाताखाली केला. हिंदू व मुसलमान यांच्या कर्तृत्वाच्या दृष्टीने या मलिकंबरचे वृत्त पाहण्याजोगे आहे. हा मूळचा एक गुलाम, तोही बगदादच्या एका व्यापाऱ्याचा. त्याने निजामशाहीचा वजीर चंगीजखान यास विकले. पण या अत्यंत हीन पातळीवरून हा मनुष्य निजामशाहीचा वजीर झाला व आपल्या कर्तृत्वाने त्याने अकबर, जहांगीर, शहाजहान या मोगल पातशहांशी सामना देऊन, रणात त्यांचा पराभव करून, निजामशाही काळाच्या दाढेतून सुरक्षित बाहेर काढली. लखुजी जाधवराव, मालोजी, शहाजी भोसले, बाबाजी काटे व इतर अनेक मराठा सरदार त्यांच्याच हाताखाली पराक्रम करीत असत !

आश्रय पाहिजे
 मुस्लिम राजसत्तेचे मराठे असे आधार असले तरी, सुलतान किंवा त्यांचे वजीर त्यांचा मुळीच मुलाहिजा राखीत नसत. त्यांना त्यांचा संशय आला, किंवा ते फार पराक्रमी होऊन डोईजड होतील असे वाटले, की ते त्यांची वतने खालसा करीत किंवा त्यांचा नाश करीत. असा प्रसंग दिसू लागताच हे मराठे सरदार एक शाही सोडून दुसऱ्या शाहीच्या आश्रयाला ती सोडून मोगलांच्या आश्रयाला पण कोणाच्या तरी आश्रयाला जात. मोगल सरदार शहानवाजखान निजामशाहीवर चालून आला तेव्हा जाधवराव, त्यांचे बंधु मंडळ, उदाराम, बाबा काटे, शहाजी भोसले यांचे भाईबंद एकदम निजामशाही सोडून, मोगलांना जाऊन मिळाले आणि मलिकंबरचा त्या वेळी पराभव झाला. पण हेच सरदार संघटित होऊन मराठा राज्य स्थापनेस प्रवृत्त झाले नाहीत. विद्वान ब्राह्मण पंडितांनाच कोणाचा तरी आश्रय लागे असे नाही. या सरदारांनाही आश्रयावाचून जगण्याचे धाडस नव्हते. लखुजी जाधवराव अशाच कारणांनी मोगलांना सोडून पुन्हा निजामशाहीत आले. त्या वेळी मूर्तजा निजामशाहाचा वजीर फत्तेखान हा मगरूर झाला होता. त्याला त्याने लखूजीच्या साह्याने कैद केले. त्याच वेळी मोगल सैन्य निजामशाहीवर चालून येत होते. तरी काही संशय आल्यामुळे मूर्तजाने लखुजी व त्याचा मुलगा अचलोजी यास राजवाडयात बोलावून कपटाने ठार मारले, त्यानंतर लखुजीचा भाऊ जगदेवराव जाधव हा मोगलांकडे गेला. त्यांनी त्याला पंचहजारी मनसब दिली व मग त्याने निजामशाही पूर्ण नष्ट करण्यास मोगलांना साह्य केले. पुढे यांच्या वंशातील अनेक पिढ्यांनी मोगलांची इमानेइतबारे सेवा करून मोठे पराक्रम केले. लखुजी जाधव मारले गेले. त्या वेळी त्यांचा नातू लहान होता. ती शाखा पुढे शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या कारभारात सामील झाली. सेनापती धनाजी जाधव हे त्याच शाखेतले.

भोसले
 बहामनी कालातील मराठा सरदारांत सर्वात पराक्रमी, कर्तबगार व चतुरस्र सरदार म्हणजे शहाजी राजे भोसले हे होत. भोसल्यांचे मूळ पुरुष राजनसिंह व दिलीपसिंह यांनी हसन गंगू जाफरखान यास बहामनी राज्य स्थापन करण्यास साह्य केले आणि त्यांचेच वंशज भीमसिंह यांनी, महंमद गवानच्या हाताखाली पराक्रम करून, कोकणातही बहामनी राज्याची सत्ता पसरविण्यासाठी मोठा पराक्रम केला, हे वर आलेच आहे. भीमसिंहाचे वंशज हेच मुधोळचे घोरपडे यांनी शेवटपर्यंत आदिलशाहीची एकनिष्ठ सेवा केली. भोसल्यांची दुसरी शाखा म्हणजे वेरुळ दौलताबाद या बाजूला वतने मिळवून राहिलेली. मालोजी व शहाजी हे त्याच शाखेतले होत. या शाखेत मालोजीच प्रथम स्वपराक्रमाने उदयास आला. त्याने निजामशाहीत पंचहजारी मनसब व शिवनेरी, चाकण, पुणे व सुपे या मुलखाची जहागीर शहाकडून मिळविली आणि निजामशाहीतील दुसरे प्रसिद्ध सरदार वर सांगितलेले लखूजी जाधवराव यांची मुलगी जिजाऊ हिला सून करून घेऊन, त्या मातबर घराण्याशी सोयरीक जोडून, आपली प्रतिष्ठा खूपच वाढविली. याच मुमारास मोगल पातशहा अकबर याने निजामशाहीवर स्वारी केली व अहमदनगर हे राजधानीचे शहर जिंकले. निजामशाही तेव्हाच बुडायची, पण मलिकंबर हा प्रसिद्ध कर्तबगार वजीर तिच्या पाठीशी उभा राहिला व त्याने परिंडा, दौलताबाद येथे शहाला ठेवून, पुढील वीस पंचवीस वर्षे अकबर, जहांगीर व शहाजहान या तीन मोगल पातशहांशी सामना देऊन ही शाही वाचविली. या सामन्यासाठी मलिकंबर यास मराठा सरदारांच्या साह्याची फार जरूर होती. त्यामुळे या सरदारांनाही पराक्रमाची संधी मिळाली. मालोजीला शहाजी व शरीफजी हे दोन पुत्र व त्याचा भाऊ विठोजी यास आठ पुत्र होते. मोगल व निजामशाही यांच्या संग्रामात हे सर्वच भासले पुरुष अंगच्या शौर्यधैर्यादी गुणांनी वर आले.
 पण हे सर्व एकजुटीने, एकत्र असा, निजामशाहीत पराक्रम करीत राहिले, असा मात्र याचा अर्थ नाही. एकमेकांविषयीचा मत्सर, वतनांविषयीची भांडणे व खाजगी हेवेदावे यांमुळे जाधव, भोसले व इतर मराठा सरदार यांच्यांत कायमची दुही असे, आणि त्यामुळे एक निजामशाहीत तर दुसरा आदिलशाहीत आणि तिसरा मोगलांच्या पक्षाला अशी या सरदारांची नित्य वा स्थिती असे. मोगल सेनापती शहानवाज खान व मलिकंबर यांची रोशनगावला लढाई झाली त्या वेळी, लखूजी जाधव, विठोजीचे काही पुत्र व इतर अनेक मराठा सरदार मलिकंबरला सोडून मोगलांना मिळाले होते. शहाजीराजे त्या वेळी निशामशाहीच्या बाजूने लढत होते. जाधव आणि भोसले यांचे कायमचे वितुष्ट आले ते येथपासूनच.

शहाजी राजे
 यानंतर आता शहाजी राजे भोसले यांच्या पराक्रमाचा विचार करून मराठी नेतृत्वाचा हा अभ्यास संपवू.
 शहाजी राजांच्या कर्तृत्वाचा इतिहासपंडितांनी फार गौरव केलेला आहे. राजे महापराक्रमी होते. रणधुरंधर होते. अव्वल दर्जाचे मुत्सद्दी होते. त्या काळच्या मराठा सरदारांत आपल्या शौर्यधैर्यादी गुणांमुळे ते अग्रगण्य ठरले होते यात कसलीच शंका नाही. पण इतर मराठा सरदार आणि शहाजी राजे यांच्या कर्तृत्वात काही मूलगामी फरक होता की काय, हे येथे पाहावयाचे आहे. तसा तो फरक होता असे पंडितांचे मत आहे. 'शिवाजीला जर 'राज्यसंस्थापक' असे म्हणावयाचे, तर शहाजीला 'राज्य- संकल्पक' असे पद देण्यास हरकत नाही' असे नानासाहेब सरदेसाई म्हणतात. 'राधा-माधवविलासचंपू' या काव्याच्या प्रस्तावनेत राजवाडे यांनी म्हटले आहे की 'शहाजी राजांनी जवळजवळ स्वतंत्र राज्य स्थापिले होते. शहाजी हा सिंहासनाधीश्वर व छत्रपती नावाने झाला नसला तरी कृतीने तो झाला होता' (पृ. ३२) असा जयराम पिंडे या कवीचा, त्यांच्या मते, अभिप्रेत अर्थ आहे. जयराम कवीने, युधिष्ठिर, विक्रम, शालिवाहन हे शककर्ते शहाजीशी तुलण्याला योग्य नाहीत, असा अभिप्राय दिला आहे. राजवाडे म्हणतात, जयराम कवीची ही उक्ती सार्थ नव्हती, असे कोण म्हणेल?' (पृ. १२१ ) वा. सी. बेंद्रे यांनी तर शिवछत्रपतीचे कर्तृत्व हे मूलतः शहाजी राजांचेच होते, असे म्हटले आहे. 'हिंदवी स्वराज्या' च्या हालचालींना त्यांनी सुरुवात करविली. शिवाजीकडून मावळी जमाव जमवून, हिंदवी स्वराज्याचा मुहूर्त केला, अशी भाषा ते वापरतात. (मालोजीराजे आणि शहाजी महाराज, पृ. ५७४ )

तीन कारणे
 या तीन थोर इतिहास संशोधकांच्या या विधानांचे, त्यांनी भोसले घराण्याचा जो इतिहास दिला आहे, त्याच्याच आधारे, परीक्षण केले तर, ती विधाने सार्थ आहेत, असे दिसत नाही. असे म्हणण्याची तीन कारणे प्रथम मांडतो आणि मग त्यांचे सविस्तर विवरण करू. (१) शहाजी राजांनी निजामशाही, आदिलशाही आणि मोगल अशा तीन सत्तांची सेवा केली. या तीनही सत्तांनी अनेक वेळा त्यांचा वाटेल तो अपमान, उपमर्द केला होता. त्यांची जहागीर जप्त करणे, अत्यंत हीन मुस्लिम सरदारांच्या हाताखाली त्यांना काम देणे, येथपासून त्यांना बेड्या घालून कैदेत टाकणे, येथपर्यंत वाटेल तसा अपमान या सत्ता करीत असत. तरी एकाही प्रसंगी राजांनी स्वतंत्र होण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. एका शाहीकडून दुसरीकडे, तिच्याकडून तिसरीकडे किंवा परत पहिलीकडे, अशा येरझारा करून ते कोणाच्या तरी आश्रयालाच जात. (२) विजयनगरचे साम्राज्य नष्ट झाल्यावर राजघराण्यातील राजपुत्र व इतर अनेक सरदार दक्षिणेत स्वतंत्रपणे राज्ये स्थापून राहिले होते. या सर्व राज्यांना संघटित करून, त्यांचे नेतृत्व करून 'हिंदुपदपातशाही' किंवा 'हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याऐवजी शहाजीराजे यांनी आदिलशाही मार्फत स्वाऱ्या करून, ही सर्व स्वतंत्र हिंदू राज्ये बुडविली ! आणि (३) १६४५ सालापासून त्यांचे पुत्र शिवछत्रपती यांनी 'हिंदवी- स्वराज्या'चा उद्योग आरंभिला असताना, आणि त्या वेळी २० हजारापर्यंत जय्यत लष्कर जवळ असताना, शहाजी राजे त्यांच्या कोणत्याही मोहिमेत या लष्करासह सामील झाले नाहीत.
 शहाजी राजे स्वराज्य संकल्पक असते, कृतीने ते छत्रपती झालेच होते हा दावा खरा असता, विक्रम, शालिवाहन यांच्यापेक्षा ते श्रेष्ठ असते, हिंदवी स्वराज्याचा मुहूर्त त्यांनी पुत्राकडून करविला असता, तर वरील प्रकार घडले नसते.
 वर तीन मुद्दे मांडले आहेत. त्यांचा थोड्या तपशिलाने आता विचार करू.

उत्तम संधी
 (१) १६२४ साली भातवडीच्या संग्रामात शहाजी राजे प्रथम उदयास आले. त्या वेळी मोगल व आदिलशहा यांच्या फौजा एक झाल्या होत्या. निजामशाही नष्ट करण्याचा त्यांचा डाव होता. वजीर मलिकंबर हा त्यांना सवाई भेटला. त्याने या दोन्ही फौजांचा निःपात केला. या यशाचे श्रेय मलिकंबर इतकेच इतिहासकारांच्या मते, शहाजी राजांना आहे. पण यामुळेच त्यांच्या डोळ्यांत ते सलू लागले. तो त्यांचा पदोपदी अवमान करू लागला. त्याची जहागीरीही त्याने काढून घेतली. तेव्हा राजे निजामशाही सोडून आदिलशहाच्या आश्रयास गेले. त्या वेळी आदिलशहाने त्यांना सरलष्कर म्हणजे सेनापती नेमून, मावळप्रदेश हस्तगत करण्याची कामगिरी सांगितली. या वेळी स्वतंत्र होण्याची केवढी उत्तम संधी होती ! मोगलांनाही व आदिलशालाही पाणी पाजण्याचे सामर्थ्य त्यांनी नुकतेच प्रकट केले होते. डोंगराळ मुलखात पठाणी किंवा इतर मुस्लिम सरदार जाण्यास धजत नसत. राजे स्वतः पंचहजारी सरदार पूर्वीच झाले होते. यांपैकी कोणतीच पुण्याई गाठी नसताना, शिवछत्रपतींनी त्याच प्रांती हिंदवी स्वराज्याची स्थापना पुढे केली. राजांना ती प्रेरणा असती तर त्यांनी याच वेळी हे साधले असते. असो. आदिलशाहीतही राजे २-३ वर्षांपेक्षा जास्त टिकले नाहीत. मलिकंबरच्या मृत्यूनंतर, मूर्तजा निजामशहाने त्यांना परत बोलावून घेतले. पुन्हा निजामशाहीचा मोगलांशीच सामना होता. त्यातही राजांनी पुन्हा पराक्रम केला असता. पण याच सुमारास मूर्तजाने लखुजी जाधवराव, त्याचे पुत्र व नातू यांना वाडयात बोलावून त्या सर्वांचा खून केला. तेव्हा, आपल्यावरही असाच प्रसंग येईल अशी भीती वाटून, राजे मोगलांच्या आश्रयाला गेले. त्यांनी त्यांना पंचहजारी मनसब दिली व त्यांची जहागीर परत दिली. पण वर्षभरातच त्यांना पस्तावा झाला. निजामशाहीचा वजीर फत्तेखान याने मोगलांशी संधान बांधले. ते यशस्वी झाले. तेव्हा राजांची जहागीर काढून मोगलांनी ती फत्तेखानास दिली. त्यामुळे संतापून जाऊन राजांनी मोगलांची ताबेदारी सोडली व ते परत निजामशाहीच्या म्हणजे फत्तेखानाच्या आश्रयास गेले. यापुढे पाच वर्षे शहाजी राजांनी निजामशाही वाचविण्यासाठी खरोखर अद्भुत असा पराक्रम केला. विजापूरचे साह्य जोडून त्यांनी मोगलांशी दीर्घ लढा केला. पुढे विजापूरचे शहा उलटल्यावर दोन्ही सत्तांशी काही काळ लढा केला. निजामशाहीच्या गादीवर कोणीतरी बाहुले बसवून, मुखत्यारीने राज्यकारभार केला. पण निजामशाही वाचली नाही. आदिलशहापुढे राजांना शरणागती पत्करावी लागली. ती पत्करून त्यांनी पुन्हा आदिलशहाचा आश्रय घेतला. जवळ जवळ बारा वर्षे निजामशाही, आदिलशाही व मोगल याशी झुंज दिल्यावरही, शहाजी राजे पुन्हा एका शाहीच्या आश्रयाला गेले.
 बहामनी राज्याची पाच शकले झाली तेव्हाची हकीगत मागे सांगितलीच आहे. पाच स्वतंत्र राज्ये स्थापणारे कोण होते ? दोघे बाटून मुस्लिम झालेले ब्राह्मण. दोघे लहानपणी गुलाम असलेले; एक येथला, एक तुर्कस्थानातून आलेला. यांनी स्वतंत्र शाह्या स्थापन केल्या. बरे, त्या मुस्लिम म्हणून त्यांना निर्वेधपणा मिळाल्या, असे नाही. प्रत्येक शाही बुडविण्याचा इतर शाह्या सतत प्रयत्न करीत. मोगलांच्या स्वाऱ्याही त्याचसाठी होत. तरी त्यांतली एक शाही अठ्ठ्यांयशी वर्षे, दोन दीडशे वर्षे, व बाकी दोन दोनशे वर्षे टिकून होत्या. अशी स्थिती असताना, शहाजी राजांनी स्वतंत्र राज्य स्थापिले असते, तर तेही दीड-दोनशे वर्षे टिकले असते. इतकेच नव्हे, तर कालांतराने शिवछत्रपतींच्या साह्याने त्यांनी सर्व बहामनी शाह्या बुडवून महाराष्ट्र स्वतंत्र केला असता.


आयुष्याच्या अखेरीस ही
 विजापूरच्या आदिलशाहीतही राजांचे अपमान टळले नाहीत. जिंजीच्या वेढ्याच्य वेळी ते कुचराई करीत आहेत असा संशय येऊन मुस्ताफाखानाने, बाजी घोरपड्याच्या करवी राजांना कैद केले. त्याआधीच त्यांनी कुतुबशाहीच्या आश्रयास जावयाचे ठरवून, शहाकडे तसा अर्जही केला होता. शिवछत्रपतींच्या राजकारणी डावामुळे राजांची सुटका झाली व ते बंगलोरला गेले. तेथे कर्नाटकात त्यांनी फार मोठा पराक्रम करून आदिलशहाचे राज्य वाढविले. असे असूनही, १६६३ साली राजांच्या मृत्यूच्या आदल्याच वर्षी, बंकापूरच्या वेढ्याच्या वेळी, अली आदिलशहाने या वयोवृद्ध सरदाराच्या पायांत बेड्या ठोकल्या ! आणि तरीही बेडी निघाल्यावर राजे आदिलशाहीच्या राज्याचा विस्तार करण्याचे कार्य करीत राहिले.
 (२) शहाजी राजांनी दक्षिणेतील सर्व हिंदू राज्ये बुडविली. तो इतिहास पाहतानाही इतिहास पंडितांच्या मताविषयी शंका येते.

हिंदू राज्ये
 राजे १६३६ साली विजापूरच्या आश्रयास आले आणि पुढील चार वर्षांत त्यांनी कर्नाटक प्रांतावर तीन स्वाऱ्या केल्या. या तीन स्वाऱ्यांत त्यांनी वीरभद्राचे श्वकेरीचे राज्य, केंपगौडा याचे बंगलूरचे राज्य, वोडियार याचे श्रीरंगपट्टणचे राज्य आणि बसवपट्टण कांदळ, बाळापूर येथील नायकांची राज्ये बुडविली ही राज्ये का बुडविली ? महंमदशहाचा सक्त हुकूम होता की 'कर्नाटकातील सर्व हिंदू सत्ताधीशांस जिंकून, त्यांचा प्रदेश हस्तगत करावा, हिंदुधर्माचा पाडाव करून मुसलमानी धर्म वाढवावा आणि संपत्ती लुटून विजापुरास आणावी.' आणि या स्वाऱ्यानंतर त्यांनी प्रौढी मिरविली की 'आम्ही सर्व राजे महाराजे जिंकले, मोठमोठी मंदिरे धुळीस मिळविली, सेतुबंध रामेश्वराची भक्ती करणाऱ्या हिंदूंच्या शेंड्या कापल्या आणि काफरांचे निर्मूलन केले.'
 पुढील दीर्घ काळात शहाजी राजांनी चंडगिरीचा श्रीरंगराय वेदनूरचा शिवाप्पा नायक यासारख्यांना पुनः पुन्हा जिंकून, त्यांचे, आपापली हिंदू राज्ये स्वतंत्र राखण्याचे प्रयत्न संपूर्णपणे हाणून पाडले. १६६३ साली त्यांना बेड्या घातल्या गेल्या. या घोर अपमानानंतरही त्यांनी वेदनूरच्या नायकास जिंकून आदिलशहाला संतुष्ट केले; त्यानेही वस्त्रे, भूषणे, हत्ती, घोडे पाठवून त्यांचा गौरव केला.
 १६४० ते १६६४ या चोवीस वर्षाच्या काळात दक्षिणेतील हिंदू नायक राजे आणि श्रीरंगरायांसारखे विजयनगरचे वारसदार यांनी मुस्लिम सत्तेशी फार चिवटपणे लढा दिला. या काळात त्यांना शहाजी राजांसारखा महापराक्रमी, कुशल नेता मिळाला असता तर कृष्णेच्या दक्षिणेस स्वतंत्र हिंदुपदपातशाही स्थापन झाली असती. पण शहाजी राजांनी आदिलशाहीचा राज्यविस्तार करण्यातच सार्थक मानले. इतिहास - पंडित तर त्यांना विक्रम, शालिवाहन यांच्यापेक्षा श्रेष्ठ मानतात. पण त्यांच्या या विधानात आणि त्यांनीच वर्णिलेल्या राजांच्या चरित्रात मेळ बसत नाही.

राजवाडे - विसंगती
 आणि राजवाड्यांच्या बाबतीत तर त्यांच्या स्वतःच्या विधानातच मेळ बसत नाही. कारण, राधामाधवविलासचंपूच्या प्रस्तावनेत शहाजी राजांचा वरील प्रकारे गौरव केल्यावर, पुढल्या पानात त्यांनीच म्हटले आहे की 'शहाजी राजांची सत्ता शककर्त्याची नव्हती. ती मांडलिकी सत्ता होती.' 'शहाजी राजांना शककर्ता का होता आले नाही ? राजवाडे म्हणतात, 'त्या वेळी लोकांत राष्ट्रभावना नव्हती. स्वराज्य करण्याची उत्कट इच्छा ज्या समाजात नाही त्याला राष्ट्र म्हणता येत नाही. राज्य करण्याची प्रबल इच्छा व तत्प्रीत्यर्थ प्राणही वेचण्याची तयारी, त्या काळी, फक्त एकट्या शहाजीच्या व त्याच्या काही ब्राह्मण मुत्सद्द्यांच्या ठायी तेवढीच होती. बाकी सर्व समाज निश्चेष्ट होऊन पडला होता.'

विपरीत विधाने
 ही विधाने अत्यंत विपरीत व इतिहास पंडिताला न शोभेशी आहेत. राष्ट्रभावना नेता निर्माण करतो. म्हणूनच तो नेता होतो. दुसऱ्या कोणी राष्ट्रभावना निर्माण करावयाची आणि मग नेत्याने लढाई करावयाची, असा का प्रकार आहे ? शिवछत्रपतींनी असे मानले असते तर हिंदवी स्वराज्य कधीच साकार झाले नसते. ते प्रारंभापासूनच साहसाने, प्राणार्पणाची तयारी करून, मुस्लिम सत्तेच्या विरुद्ध उभे ठाकले आणि त्यामुळेच लोकांत राष्ट्रभावना निर्माण झाली आणि ते प्राणार्पणास सिद्ध झाले. शहाजी राजे असे उभे ठाकले असते तर तेव्हाच ती निर्माण झाली असती.

तिहेरी शक्ती
 (३) आणि खेदाची गोष्ट अशी की तशी राष्ट्रभावना निर्माण झाल्यावरही शहाजी राजे आदिलशहाचा आश्रय सोडून देऊन छत्रपतींच्या उद्योगात सामील झाले नाहीत. १६४८ साली राजे कैदेत पडले. त्यानंतर बंगलोर आणि कोंडाणा (सिंहगड) दोन्ही ठाणी हस्तगत करण्यासाठी आदिलशहाने फौजा पाठविल्या. पण कर्नाटकात बंगलोरला राजांचे वडील पुत्र संभाजी यांनी त्यांच्यावर आलेल्या फर्हादखानाचा मोड केला आणि धाकटे पुत्र शिवछत्रपती यांनी पुरंदरच्या लढाईत विजापूरच्या मुसेखानास ठार मारले व त्याचे लष्कर उधळून लावले. दोन पुत्रांचा पराक्रम पाहून कैदेतून सुटताच शहाजी राजे आपल्या सर्व सरंजामानिशी जर या महारथी पुत्रांना सामील झाले असते तर एकदोन वर्षातच हिंदवी स्वराज्याची आकांक्षा सर्व महाराष्ट्रभूमीत साकार झाली असती. शिवछत्रपतींची एकट्याची शक्ती कार्य करीत होती तेथे आता तिघांची शक्ती एकवट होऊन तिचा प्रभाव दसपट शतपट झाला असता. पण असे काही घडले नाही. आणि राजांनी उलट शिवाजी राजांनाच कोंडाणा किल्ला सोडून देण्याचा उपदेश केला !
 १६५० सालानंतर दर क्षणाला शहाजी राजांविषयी, त्यांनी छत्रपतींना सामील व्हावयास हवे होते, असे इतिहास वाचताना वाटते. त्यातला एक क्षण तर विशेषच होता. १६५९ साली अफजलखान शिवाजी राजांवर चालून आला होता. ते पाहून खानाच्या विश्वासघातकी व खुनी स्वभावाची चांगली ओळख असल्यामुळे, तो वाईला गेल्याचे कळताच शहाजी राजे सतरा हजार सैन्यानिशी विजापुरावर चालून जाऊ लागले. पण राजे अर्ध्या रस्त्यावर येत आहेत नाहीत तोच शिवाजीराजांनी खानाचा निकाल उडविल्याची बातमी मिळाली. तेव्हा शहाजीराजे माघारी गेले. (बेंद्रे, मालोजीराजे व शहाजी महाराज, पृ. ५६९)
 या वेळी राजे माघारी गेले याचा अर्थ काय ? विजापूरवर हल्ला करून ते जिंकण्याची यापेक्षा जास्त चांगली संधी कोणती होती ? शहाजी राजांनी तसा हल्ला केला असता तर ते राज्यसंकल्पक म्हणून न राहता राज्यसंस्थापकच झाले असते, आणि विक्रम, शालिवाहन यांच्या पंक्तीत निश्चित जाऊन बसले असते. कारण तो क्षणच असा होता की भारताचा इतिहासच तेथे बदलला असता.
 हा सर्व इतिहास वरील थोर पंडितांच्या आधारे- त्यांच्याच ग्रंथांच्या आधारे- मांडला आहे. या घटनांचे वर्णन त्यांनी स्वतः केले असताना, त्यांनी शहाजी राजांना हिंदवी स्वराजाच्या स्थापनेचे श्रेय द्यावे याचा उलगडा होत नाही. शिवछत्रपतींच्या असामान्य कर्तृत्वाची मीमांसा पैतृक गुणसंपदा दाखविल्यावाचून होत नाही, असा तर त्यांचा समज नसेल ना ? थोर पित्याच्या पोटीच थोर पुरुष निर्माण होतात, असा सिद्धान्त तर त्यांच्या मनाशी नसेल ना ? व्यास, वाल्मीकी, सातवाहन, चंद्रगुप्त, ज्ञानेश्वर, तुकाराम यांनी व जगातल्या अनेक महापुरुषांनी हा समज भ्रामक आहे हे वेळोवेळी दाखविले आहे. मग शिवछत्रपतींचे कर्तृत्व स्वयंभू होते असे मानण्यास प्रत्यवाय का असावा ?

वैयक्तिक धर्म
 निंबाळकर, घाटगे, माने, जाधव, भोसले ही मराठा घराणी अत्यंत पराक्रमी होती. बहामनी राज्याची स्थापना झाली तेव्हापासून, व काही घराण्यांत त्याच्या आधीपासूनच, अनेक थोर, पराक्रमी, शौर्यधैर्यसंपन्न पुरुष निर्माण होत होते. तरी त्यांना स्वराज्य- स्थापना करता आली नाही. मुस्लिमांच्या आक्रमणापासून महाराष्ट्राचे व भारताचे रक्षण करता आले नाही. याचे कारण एकच की या सरदारांना क्षात्रधर्माचा, राजधर्माचा विसर पडला होता. रणात पराक्रम करणे, लढाईत तलवार गाजविणे, युद्धात शौर्यधैर्य प्रगट करून विजय मिळविणे एवढ्यालाच ते क्षात्रधर्म मानीत, रजपुती बाणा समजत. हा पराक्रम स्वधर्मरक्षणासाठी, प्रजापालनासाठी, लोकरक्षणासाठी, करावयाचा असतो; त्या ध्येयाने, त्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन केलेला जो पराक्रम त्यालाच क्षात्रधर्म म्हणतात हे त्यांच्या स्वप्नातही आले नाही. हे सर्व सरदार धर्मनिष्ठ होते. शिव, राम, विठ्ठल यांचे उपासक होते. पण हा व्यक्तिनिष्ठ धर्म झाला. हा राजधर्म नव्हे. त्यांना आपल्या राजधर्माची जाणीव असती तर पिढ्यानपिढ्या ते या देशाचे, धर्माचे, संस्कृतीचे जे शत्रू मुसलमान, त्यांची सेवा करीत, व हिंदुराजांची राज्ये नष्ट करण्यात भूषण मानीत राहिले नसते. त्यांची शिवभक्ती, रामभक्ती, त्यांची एकादशी, त्यांच्या तीर्थयात्रा या मुस्लिम सेवेच्या आड येत नव्हता. याचाच अर्थ असा की त्यांचा धर्म हा वैयक्तिक धर्म होता. स्वतःचा समाज, स्वदेश, स्वजन यांच्या उत्कर्षाची चिंता ही त्या धर्मात अंतर्भूत होत नव्हती.

क्षात्रधर्म
 हे सरदार रामायण, महाभारत कथा - कीर्तनात ऐकत असतील; पण त्यातील राजधर्माच्या तत्त्वज्ञानाचे कसलेही संस्कार त्यांच्यावर झाले नाहीत. 'अनाथ होऊन, पीडित होऊन लोकांना रडत बसण्याची पाळी येऊ नये, एवढ्याकरिता क्षत्रियांनी धनुष्य धारण करावयाचे असते. '

क्षत्रियैर्धायते चापो नार्तशब्दो भवेदिति । रामायण ३|१०|३
दुर्बलस्य त्वनाथस्य राजा भवति वै वलम् । ७।५९।२३

'अनाथ, दुर्बल यांचे राजा हे बल होय' अशा तऱ्हेची अनेक वचने रामायणात आहेत. महाभारतात तर राजधर्मावर स्वतंत्र पर्वच आहे. 'क्षत्रियाला शत्रूच्या नाशावाचून दुसरा धर्म नाही', ( उद्योग २१ - ४३ ) 'राज्य जिंकण्याच्या कामी कोणी अडथळा करील तर त्याचा वध करणे हा क्षात्रधर्म होय,' ( शांति १०-७ ) असा उपदेश ठायी ठायी महाभारतात आहे. वेद व्यासांच्या मते राजधर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म होय. पंढरीची वारी, व्रते, तीर्थयात्रा, अनुष्ठाने हा सर्व गौण धर्म होय. भीष्म म्हणतात-

यथा राजन् हस्तिपदे पदानि संलीयन्ते सर्व सत्त्वोद्भवानि ।
एवं धर्मान् राजधर्मेषु सर्वान् सर्वावस्थं संप्रलीनान् निबोध ॥

(शांति ६३ - २५ )

'हे राजा, ज्याप्रमाणे एकट्या हत्तीच्या पावलात इतर सर्व प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो, त्याप्रमाणे एका राजधर्मात इतर सर्व धर्माचा सर्व प्रकारे अंतर्भाव होतो, हे तू निश्चित समज.'
 राजा मांधाता यास उपदेश करताना, सुरेश्वर इंद्राने पुढील विवेचन केले आहे. 'श्रीविष्णूने पूर्वी क्षात्रधर्माचाच अवलंब करून शत्रूंचा निःपात केला व देवांचे आणि ऋषींचे रक्षण केले. त्या अप्रमेय अशा विष्णूने शत्रूचा असा वध केला नसता तर ब्राह्मण जिवंत राहिले नसते, लोक राहिले नसते, आदिकर्ता भगवान ब्रह्मदेवही शिल्लक राहिला नसता, हा धर्म राहिला नसता व सनानत आर्यधर्मही राहिला नसता. मागे शाश्वत धर्माचा लोप झाला असताना, क्षात्रधर्माच्या योगानेच त्याची अभिवृद्धी झाली. आदिधर्म प्रत्येक युगात प्रवृत्त होतात. पण क्षात्रधर्म हाच सर्व लोकांत श्रेष्ठधर्म होय.' (शांति ६४-२३, २४) क्षात्रधर्माचे हे रामायण-महाभारतप्रणीत लक्षण पाहिले म्हणजे निंबाळकर, घाटगे, भोसले हे सरदार आपला धर्म विसरले होते या म्हणण्याचा अर्थ ध्यानात येईल. बहामनी काळाच्या प्रारंभापासूनच हिंदुसंस्कृती, हिंदुधर्म व हिंदुजनता यांचा समूळ उच्छेद करण्याचा उद्योग मुस्लिम सुलतानांनी प्रारंभिला होता. त्यांच्या या उद्योगाचे सविस्तर वर्णन मागे केलेच आहे. सर्व हिंदुप्रजा अनाथ व दीन झाली होती. अशा वेळी त्या अविंध सत्तेच्या जुलमापासून तिचे व तिच्या धर्माचे, तिच्या सत्त्वाचे रक्षण करणे हाच या सरदारांचा धर्म होता.

आत्मत्यागः सर्वा भूतानुकंपा, लोकज्ञानं पालनं मोक्षणं च ।
विपण्णानां मोक्षणं पीडितानां, क्षात्रे धर्मे विद्यते पार्थिवानाम्

(शांति ६४-२६)

स्वार्थत्याग, सर्व प्राणिमात्रांविषयी अनुकंपा, राष्ट्राविषयी पूर्णज्ञान, लोकांचे पालन, संकटग्रस्तांना मुक्त करणे, गांजलेल्यांची पीडा दूर करणे ही क्षात्रधर्मनिष्ठ राजाची कर्तव्ये होत.

साक्षात्कार नाही
 मराठा सरदारांना स्वराज्यस्थापना का करता आली नाही याचे कारण वर सांगितले. ते क्षात्रधर्म विसरले होते, स्वराज्य व स्वधर्म ही अविभाज्य आहेत याची जाणीव त्यांना नव्हती, हे ते कारण होय. कर्नाटकात हरिहर आणि बुक्क यांना स्वराज्य- स्वधर्म यांच्या अद्वैताचा साक्षात्कार होताच त्यांनी १५-२० वर्षांत, मुस्लिम आक्रमणाचा निःपात केला आणि स्वधर्माचे रक्षण केले. महाराष्ट्रात मराठा सरदारांना हे साधले नाही याचे कारण हेच की त्यांना हा साक्षात्कार झाला नाही. त्यांना यवनसेवेचा साक्षात्कार होत असे. शिवछत्रपतींना क्षात्रधर्माची जाणीव होताच त्यांनी अत्यंत अल्प अवधीत, अगदी अल्प वयात हे कार्य करून दाखविले. यावरून अन्वय- व्यतिरेकाने हे सिद्ध होते की राजधर्मनिष्ठेच्या अभावामुळेच मराठा सरदार पारतंत्र्यात खितपत पडले होते.
 बहामनी काळातील महाराष्ट्र समाजात नेत्यांचे वर्ग होते, असे प्रारंभी सांगितले आहे. मराठा सरदार, ब्राह्मण शास्त्रीपंडित आणि संत हे ते तीन वर्ग होत. यांपैकी मराठा सरदारांच्या नेतृत्वाचा विचार येथवर केला. क्षात्रधर्माचा लोप या कारणामुळे हे नेते समाजरक्षण व धर्मरक्षण करण्यात अपयशी झाले असा निष्कर्ष त्यातून निघाला. पण याविषयी राजवाडे यांनी एकदोन निराळ्या उपपत्ती मांडल्या आहेत. त्यांचा परामर्श घेऊन हे प्रकरण संपवू.

राजवाडे - उपपत्ती
 मराठ्यांच्या कर्तृत्वहीनतेची भीमांसा करताना राजवाडे यांनी दोन उपपत्ती मांडल्या आहेत. एक वांशिक व दुसरी आर्थिक. 'राधामाधवविलासचंपू'च्या प्रस्तावनेत, त्यांनी वांशिक उपपत्ती मांडली आहे. आणि 'महिकावतीची बखर , या ग्रंथाच्या प्रस्तावनेत आर्थिक उपपत्ती मांडली आहे. येथे क्रमाने त्यांचा विचार करू.

नाग महाराष्ट्रोत्पन्न
 राजवाडे यांच्या मते, महाराष्ट्रातले मराठे हे अस्सल क्षत्रिय नव्हेतच. महाराष्ट्रावर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, वा मराठा घराण्यांनी राज्ये केली. पण, राजवाडे यांच्या मते, ही घराणी उत्तर हिंदुस्थानातून आलेली अतएव परकी होत. ही घराणी अस्सल क्षत्रिय होती. पण महाराष्ट्रातले मराठे ते हे नव्हेत. ते मूळचे मराठे इ. स. पूर्व सहाव्या शतकात मगध, कुरू, पांचाल इ. प्रदेशांतून दक्षिणेत आले होते. ते क्षत्रिय होते. पण रामकृष्णांचे वंशज नव्हते. अस्सल क्षत्रियांना शूद्र भार्यापासून झालेली ती संतती होती. त्या काळी अनुलोम विवाह शास्त्रसंमत होते. त्यामुळे क्षत्रियांच्या शुद्र भार्याच्या संततीलाही क्षत्रियच म्हणत. महाराष्ट्रातले बहुसंख्य मराठे असे क्षत्रिय होते. शिवाय उत्तरेतून महाराष्ट्रात आल्यावर, त्यांनी येथील नागलोकांशी सोयरिकी केल्या. त्यामुळे त्यांच्या रक्ताचा अस्सलपणा आणखी कमी झाला. आणि या संकरामुळे या मराठ्यांच्या अंगी कर्तृत्व निर्माण होऊ शकले नाही. यांना राजवाडे नागमहाराष्ट्रिकोत्पन्न मराठे असे म्हणतात. (चालुक्य, राष्ट्रकूट, यादव हे जे अस्सल क्षत्रिय ते महाराष्ट्र क्षत्रिय. आणि मराठे हे नागमहाराष्ट्रोत्पन्न.) या लोकांनी महाराष्ट्रात वसाहती केल्या. पण त्यांनी राज्ये किंवा साम्राज्ये स्थापन केली नाहीत. कारण त्यांच्या ठायी ती ऐपतच नव्हती. पाटिलकी, देशमुखी, सरदेशमुखी मिळवावी व सांभाळावी यापलीकडे जाण्याचे बुद्धीचे व मनाचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नव्हते. स्वत्त्व नाही, धर्म नाही, ऐतिह्य नाही, कला नाही, विद्या नाही, शास्त्र नाही, त्यांचे महत्त्व जाणण्याची ऐपत नाही अशी त्यांची स्थिती होती. इ. स. पूर्व तिसऱ्या शतकापासून इ. स. तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सातवाहन, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य व यादव यांनी महाराष्ट्रावर राज्य केले. त्यांनी साम्राज्ये विस्तारली. पण यांना सर्वांना राजवाडे परके म्हणतात. म्हणून या काळात महाराष्ट्रिकोत्पन्न मराठे पारतंत्र्यातच रखडत होते असे म्हणावे लागते. बहामनी काळात पारतंत्र्य होते हे उघडच आहे. शहाजी राजे व शिवछत्रपती यांनी बहामनी सत्ता नष्ट करून स्वराज्य स्थापिले. तेथपर्यंत म्हणजे १६०० वर्षे, राजवाडयांच्या मते, मराठे हे पारतंत्र्यातच होते. भोसल्यांच्या राज्यापासून त्यांचे पारतंत्र्य नष्ट झाले. कारण भोसले हे अस्सल क्षत्रिय व महाराष्ट्रीय असे होते. चालुक्य यादवांप्रमाणे परकीय नव्हते (राधामाधव, पृ. १९१-९३ ).

कल्पनाजाल
 राजवाडे यांच्या या उपपत्तीतील मुख्य वैगुण्य म्हणजे तिला कसलाही आधार नाही. ते त्यांचे कल्पनाजाल आहे. येथील पाटील, देशमुख, सरदेशमुख ही उत्तरेतील क्षत्रियांची शूद्रभावोत्पन्न संतती असे म्हणण्यास काहीही पुरावा नाही. शिवाय त्या कालात अनुलोम विवाह पूर्ण मान्य असल्यामुळे क्षत्रियभार्योत्पन्न संततीपासून शूद्रभार्योत्पन्न संतती वेगळी काढली जात होती असे नाही. सर्वांची गणना क्षत्रियवर्णातच होत असे. त्यामुळे दक्षिणेत आलेले राष्ट्रिक, महाराष्ट्रिक हे शूद्रभार्योत्पन्न होते असे म्हणण्यास कल्पनेवाचून दुसरा आधार नाही तेव्हा चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांपासून मराठे हे वंशाने किंवा रक्ताने निराळे होते असे म्हणणे निराधार आहे. चालुक्य - यादव यांना परकी म्हणणे हे असेच तर्कदुष्ट आहे. ते उत्तरेतून आले हे खरे. पण हे नागमहाराष्ट्रोत्पन्न मराठेही उत्तरेतूनच आले होते. चालुक्य यादव हे जर परकीय असतील तर हेही तितकेच परकीय म्हणावे लागतील. चालुक्य यादवांपासून भोसले यांना निराळे काढणे यात तर कसलीच तर्कसंगती नाही. तेही उत्तर हिंदुस्थानातूनच आले होते असे राजवाडे यांचे मत आहे. कोणते घराणे प्राचीन काळी दक्षिणेत आले व कोणते अर्वाचीन काळी, हे ठरविण्यास कसलाही पुरावा उपलब्ध नाही. आणि किती शतके एखाद्या भूप्रदेशात वसती केल्यावर घराणी स्वीय होतात, याचे काहीही गणित ठरलेले नसल्यामुळे, मराठ्यामराठ्यांत कसलाही फरक करता येणार नाही, आणि चालुक्य यादवांच्या काळात मराठे पारतंत्र्यात होते व भोसल्यांच्या काळात ते स्वतंत्र झाले या म्हणण्यात काही अर्थ नाही आणि अशा रीतीने नागमहाराष्ट्रोत्पन्न क्षत्रिय व महाराष्ट्र क्षत्रिय हा भेदच निराधार ठरल्यानंतर मराठ्यांच्या कर्तृत्वाविषयी राजवाड्यांची उपपत्ती कोसळून पडते.

वंशशुद्धीचा आग्रह
 आणि ती क्षणभर खरी मानली तरी शूद्ररक्तसंकरामुळे हे मराठे कर्तृत्वहीन झाले या राजवाड्यांच्या म्हणण्याला कसलाही अर्थ नाही. महाराष्ट्राचे पहिले स्वीय राजघराणे म्हणजे सातवाहनांचे. सातवाहन हे राजवाडे यांच्याच मते शूद्र होते. तरी त्यांनी महाराष्ट्रावर साडेचारशे वर्षे राज्य केले व माळव्यापासून रामेश्वरापर्यंत साम्राज्य विस्तारले. विद्या, कला, शास्त्र यांच्या जोपासनेविषयी सातवाहनांची जेवढी कीर्ती आहे तेवढी दुसऱ्या कोणाची नसेल. इ. पू. चौथ्या शतकात मगधात साम्राज्य स्थापन करणारा चंद्रगुप्त मौर्य हा पुराणांच्या मते शूद्रच होता, त्याचा नातू अशोक हाही अर्थात शूद्रच होता. पण त्याचे ते शूद्रत्व त्याच्या कर्तृत्वाला मारक झाले नाही. राधामाधव-विलासचंपूच्या प्रस्तावनेत शहाजीला इतर मराठा सरदारांनी साह्य का केले नाही, त्यांनी स्वतंत्र पराक्रम करून स्वराज्य स्थापना का केली नाही याची चर्चा करताना राजवाडे म्हणतात, 'फलटण, जत, मुधोळ, सावंतवाडी, जावळी येथले मराठे हे शहाजीप्रमाणेच उच्च मराठे होते व या देशाचे तेच स्वभावसिद्ध नायक होते. तरी ते निर्माल्यवत निस्तेज व सुस्त राहिले. याचे कारण असे की त्यांच्या ठायी राष्ट्रभावना नव्हती. उत्तम फौजफाटा उभारण्याचे कर्तृत्व त्यांच्या ठायी नव्हते, उठावणी केली, तर आहे हीच धनदौलत जाईल, ही त्यांना भीती होती. त्यांचे सल्लागार भट- भिक्षुक होते व कारागिर हत्यारे पैदा करण्याची त्यांना अक्कल नव्हती !' (राधामाधव, पृ. १२४-२५) एखादा साधा परदेशातून आलेला मुसलमान गुलाम किंवा येथलाच बाटून मुसलमान झालेला भटभिक्षुक जे करू शकतो ते या उच्च मराठ्यांना करता आले नाही ! तरी कर्तृत्व रक्तावर, वंशशुद्धीवर अवलंबून असते हा आग्रह सोडण्यास राजवाडे तयार नाहीत. पण आपणांस ऐतिहासिक सत्य पहावयाचे असल्यामुळे त्यांच्या उपपत्तीचा क्षणमात्रही स्वीकार करता येणार नाही.

आर्थिक उपपत्ती
 मराठ्यांच्या नाकर्तेपणाची राजवाडयांची दुसरी उपपत्ती म्हणजे आर्थिक उपपत्ती. महिकावतीच्या बखरीच्या प्रस्तावनेत, उत्तर कोकणातील लोकांच्या कर्तृत्वाचे विवेचन करताना, प्रथम त्यांनी ती मांडली. व नंतर पुढील विवेचनात, अखिल महाराष्ट्रीय लोकांना व अखिल भारताला तो सिद्धान्त लावून टाकला. उत्तर कोकणात पहिली वसाहत कातवड्यांची होती. नंतर तेथे नाग, वारली, कोळी व ठाकर यांनी वसती केली. त्यांच्या मागून पुढील दोन हजार वर्षांत महाराष्ट्रिक, आंध्र, मांगेले, नल, मौर्य, शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकूट, मुसलमान, पोर्तुगीज व मराठे यांनी तेथे जाऊन राज्ये स्थापन केली. या घडामोडीत दर वेळी पूर्व समाजाची सत्ता नवेनवे वसाहतवाले हिरावून घेत. पण पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी नवीन आक्रमकाला कधीच विरोध केला नाही. असे का झाले ? आक्रमकांशी त्यानी झुंज का दिली नाही ? राजवाडे म्हणतात, अन्नवैपुल्य व अन्नसौलभ्य हे त्याचे कारण आहे.

अन्नवैपुल्य
 सह्याद्रीमध्ये कोकणच्या रानात व समुद्र किनाऱ्याला विपुल अन्न होते. त्यामुळे, राजवाड्यांच्या मते, जुने वसाहतकार व नवे आक्रमक यांच्यात संघर्ष होण्याचे कारणच नव्हते. सगळा झगडा व्हावयाचा तो अन्नासाठी. पण उत्तर कोकणात तेच इतके विपुल होते की कोणीही तेथे यावे व निराळी वसाहत करून सुखाने पोट भरावे. एकमेकांना ठार मारले तरच जगता येईल, अशी स्थिती असेल, तेथे राज्य, साम्राज्य, शस्त्रास्त्रे, सैन्य, संघटना या कल्पना उद्भवतात. पण कोकणात उद्भिज व प्राणिज संपत्ती ऊर्फ अन्न इतके मुबलक आहे की येईल त्याला तेथे राहण्यास यथेच्छ वाव आहे (कोकणात असे काही नाही हे राजवाड्यांखेरीज सर्वांना माहीत आहे).

अखिल भरतखंड !
 प्रारंभी राजवाडे यांनी ही मीमांसा फक्त उत्तर कोकणापुरतीच केली. पण पुढे त्यांनी सर्व हिंदुस्थानचीच ही स्थिती आहे, असा भरघोस सिद्धान्त मांडला. ते म्हणतात, मुबलक अन्न व यथेच्छ जागा असल्यामुळे कोकणात जीवनार्थ कलह, युरोपातील किंवा मध्य आशियातील भुके कंगाल देशातल्याप्रमाणे, जाज्वल्य नाही. पण संपन्नतेने आपला वरदहस्त एकट्या कोकणावरच ठेविला आहे, असे समजू नये. भरतखंड म्हणून ज्या खंडाला म्हणतात त्या बहुतेक सर्व खंडावर अन्नपूर्णची अशीच पूर्ण कृपादृष्टी आहे. या कृपादृष्टीचा परिणाम होऊन येथील लोक राजकारणपराङ्मुख, राष्ट्रपराङ्मुख, समाजपराङ्मुख, मुक्तद्वारी, तुटक, संन्यस्त व व्यक्तिंतंत्र झाले आहेत. येथे बाहेरच्या देशातून नवीन आक्रमक येतात, त्यांना पहिली काही वर्षे राज्य, साम्राज्य, समाजसंघटना, विद्या, कला, शास्त्रे यांच्याविषयी उत्साह वाटतो. पण येथे काही पिढ्या राहिल्यावर अन्नाचे वैपुल्य व सौलभ्य यामुळे त्यांचा तो उत्साह मावळतो व या सर्व खटाटोपाविषयी ते उदासीन होतात. त्यांना मरगळ येते.
 राधामाधवविलासचंपूच्या प्रस्तावनेत महाराष्ट्रातल्या मूळच्या मराठ्यांना राजवाडे यांनी नाकर्ते ठरविले आणि शूद्रसंकर हे त्याचे कारण दिले. आता या विवेचनात त्यांनी अखिल भारतीयांनाच नालायक, नाकर्ते, राष्ट्रशून्य, विद्याशून्य ठरवून, अन्नधान्याची समृद्धी हे त्याचे कारण दिले आहे आणि मौजेची गोष्ट अशी की पहिली वांशिक उपपत्ती, या विवेचनात त्यांनी कसलीही कारणे न देता, रद्द ठरविली आहे.

अर्थशून्य
 वांशिक उपपत्तीप्रमाणेच, ही आर्थिक उपपत्तीही अर्थशून्य, निराधार व कमालीची तर्कदुष्ट आहे, हे वरवर पाहताही, दिसून येईल. महाराष्ट्रापुरतेच बोलावयाचे तर येथे इ. पू. ३५० पासून सतत अखंड १५०० वर्षे कर्तृत्वाला खंड पडला नव्हता, आणि या काळात कोकणाप्रमाणे दर वेळी बाहेरचे आक्रमक येऊन त्यांनी पराक्रम केला, असे नाही. येथे जे शेकडो वर्षे चिरस्थायी झाले होते तेच कधी उदयाला येत होते, कधी ऱ्हास पावत होते. राजवाडे यांच्या मते इ. स. १६०० च्या आधी हजार दीड हजार वर्षे तरी भोसल्यांचे घराणे महाराष्ट्रात आले होते. तरी इतक्या वर्षात येथल्या अन्न- वैपुल्यामुळे त्यांना मरगळ आली नाही. तुलनेने पाहता, कर्नाटकात अन्नवैपुल्य जास्त. त्यांना जास्त मरगळ यावी. पण मुस्लिम आक्रमणाचा त्यांनी तत्काळ निःपात केला आणि त्या मानाने दरिद्री असणाऱ्या महाराष्ट्राला तीनशे वर्षे लागली. पण राजवाड्यांच्या या (किंवा इतर कोणत्याही ) उपपत्तीची चर्चा करीत बसण्यात अर्थ नाही. अन्नवैपुल्य व सौलभ्य कोठे, किती होते, हिंदुस्थानवर ज्यांनी आक्रमणे केली ते सर्वच लोक दरिद्री देशांतून आले होते काय, याविषयी त्यांनी कोठेही कसलीही प्रमाणे दिलेली नाहीत. शिवाय एक अन्नवैपुल्य असले की मनुष्याला इतर कसल्याही आकांक्षा नसतात या आपल्या सिद्धांताचा त्यांनी केवळ विधाने करण्यापलीकडे, कसलाही प्रपंच केलेला नाही. धर्म, वंश, राष्ट्र, राज्य, साम्राज्य इ. कितीतरी प्रेरणा मनुष्याला, अन्नवैपुल्य असले तरी किंवा नसले तरी, पराक्रमाला उद्युक्त करीत असतात याचा राजवाडे विचारही करीत नाहीत. ज्या वेळी जे सुचेल ते दडपून देणे एवढेच त्यांचे धोरण असे. ऐतिहासिक चर्चेत त्याला स्थान देणे युक्त नाही.
 बहामनी कालातील महाराष्ट्रातल्या मराठा सरदारांच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा येथवर विचार केला. या सरदारांची घराणी अव्वल क्षत्रियांची होती. ती पराक्रमी होती. भोसल्यांचे घराणे तर विशेष पराक्रमी होते. असे असूनही, तीनशे वर्षांच्या काळात, त्यांना स्वतंत्र राज्ये स्थापिता आली नाहीत विजयनगरच्या राज्यकर्त्यांना जे पंधरावीस वर्षांत जमले ते यांना तीनशे वर्षात साधले नाही. माझ्या मते, याचे कारण एकच. या घराण्यातील थोर पुरुषांना क्षात्रधर्माचा विसर पडला हे ते कारण होय. स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद आहे हे त्यांनी जाणले नाही. शिवछत्रपतींनी ते जाणले होते. यामुळेच विजयनगरच्या सम्राटाप्रमाणेच त्यांनी, अत्यंत अल्पावधीत, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
 महाराष्ट्रातल्या सरदार घराण्यांची जी स्थिती होती तीच महाराष्ट्रातल्या शास्त्री - पंडितांच्या घराण्यांची होती. वेद, उपनिपदे, रामायण, महाभारत, गीता या ग्रंथांत वसिष्ठ, विश्वामित्र, व्यास, वाल्मीकी, श्रीकृष्ण, वेदव्यास, भीष्म यांनी सांगितलेल्या थोर धर्माचे आकलन करण्याची पात्रताच त्यांच्या ठायी नव्हती. श्राद्ध, पक्ष, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, यालाच ते धर्म समजत. त्यामुळे स्वराज्य व स्वधर्म ही अविभाज्य आहेत या थोर सत्याचा त्यांना विसर पडला. त्यामुळे हे दुसरे नेतृत्वही महाराष्ट्राचा उत्कर्ष साधण्यास असमर्थ ठरले. पुढील प्रकरणात या शास्त्रीपंडितांच्या नेतृत्वाचा विचार करू.