महाराष्ट्र संस्कृती/महाराष्ट्रीयांची कलोपासना ( १ ) संगीत
४२.
महाराष्ट्रीयांची कलोपासना- संगीत
सुख, दुःख, शृंगार, वीर, करुण, भक्ती, वात्सल्य, राग, द्वेष, इ. भावनांच निर्हेतुक आविष्कार म्हणजे कला, अशी कलेची व्याख्या कोणी करतात. ती मानून पुढील विवेचन केले आहे. कलेच्या व्याख्येविषयी अनंत वाद व मतभेद आहेत. त्यांचा ऊहापोह येथे करण्याचा विचार नाही. वरील व्याख्येच्या दृष्टीने संगीत, नाट्य, नृत्य, चित्र, शिल्प या कला होत. कोळ्याचे जाळे, पक्ष्यांची घरटी, मोराचे नृत्य, कोकिळाचा पंचम या कला नव्हेत. निसर्गाने त्या व्यवहारी जीवनासाठी त्यांना दिलेल्या चिजा आहेत. त्यांत व्यवहारी हेतू असतो आणि त्यांत वैयक्तिक आत्माविष्कार नसतो. कोळी, वारली इत्यादिकांची गाणी, बायकांची गाणी व खेळ, दिंड्या, भजने याही कला नव्हेत, कारण त्यांतही आत्माविष्कार नसतो. आत्माविष्काराच्या दृष्टीने कला नेहमी साभिप्राय असते. वर सांगितलेल्या भावनांचा व इतर अनेक अभिप्रायांचा आविष्कार कलेत होत असतो. ती निर्हेतुक असते असे म्हटले आहे ते व्यावहारिक उपयुक्ततेच्या दृष्टीने. कला जो जो व्यावहारिक उपयुक्ततेच्या दृष्टीने दूर जाईल तो तो ती उच्च पातळीवर जाते. महाराष्ट्रीय कलांचा जो सांस्कृतिक दृष्टीने आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. त्या दृष्टीने एवढे प्रास्ताविक विवेचन पुरेसे आहे.
या दृष्टीने संगीत, नाट्य, चित्रपट, नृत्य, चित्र, शिल्प या प्रमुख कला होत. त्यांतील संगीताचा विचार प्रथम करू.
शास्त्रीय संगीत
मुस्लिम सत्तेच्या काळातील कलेचा मागे विचार केलाच आहे. गोपाल नायक या पंडितास अल्लाउद्दिनाने सक्तीने दिल्लीला नेले आणि त्यानेच तेथे संगीताचा प्रसार केला. आज उत्तर हिंदुस्थानी संगीत म्हणून दक्षिणेत आले आहे ते हेच संगीत. ते मूळचे दक्षिणेतल्या यादवांच्या दरबारातलेच संगीत होय.
उत्तर हिंदुस्थानातून महाराष्ट्रात हे संगीत आणणाऱ्यांमध्ये पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, पंडित विष्णू दिगंबर पलुसकर, पंडित विष्णू नारायण भातखंडे, पंडित भास्करबुवा बखले, खांसाहेब अब्दुल करीम खां, गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे आणि संगीतसम्राट अल्लादिया खांसाहेब हे प्रमुख होते. 'सात स्वरश्री' या पुस्तकात श्री. गोपाळकृष्ण भोबे यांनी यांची चरित्रे देऊन त्यांचा महाराष्ट्रीय जनतेला परिचय करून दिला आहे. या सर्वांचे महाराष्ट्रावर अपार प्रेम होते. अब्दुल करीम खां आणि अल्लादिया खां हे तर नेहमी म्हणत की 'महाराष्ट्रासारखे रसिक इतरत्र आढळत नाहीत.' म्हणूनच तर ते महाराष्ट्रात येऊन कायमचे राहिले होते. इतर सर्व तर महाराष्ट्रीयच होते. तेव्हा महाराष्ट्राला संगीतात अग्रस्थान होते यात शंका नाही.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत महाराष्ट्रात आणून येथे अनेक शिष्य तयार करणारे पहिले गायनाचार्य म्हणजे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे होत. त्यांचे गुरू वासुदेवबुवा जोशी आणि देवजीबुवा परांजपे यांनी त्यांच्या आधीच उत्तरेत जाऊन या विद्येचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला होता. पण हे दोघेही शेवटपर्यंत तिकडेच राहिले. म्हणून महाराष्ट्राचे आद्य गुरू बाळकृष्णबुवा हेच होत. पूर्ण सप्तकात अनायासे त्यांचा आवाज फिरत असे. आणि अनेक मोठ्या गवयांच्या आवाजाचा त्यांच्या कंठात समवाय साधलेला असे. १८८३ साली 'संगीतदर्पण' नावाचे मासिक त्यांनी सुरू केले व एका गायन समाजाची स्थापना केली. या समाजात डॉ. भांडारकर, महादेव चिंतामण आपटे, कुंटे, न्या. मू. तेलंग अशी बडी मंडळी होती. बाळकृष्णबुवा हे सर्व कार्य विनामूल्य करीत असत. आणि एकीकडे शिष्य तयार करीत असताना स्वतःची गायनतपस्याही त्यांनी अखंड चालू ठेविली होती.
बाळकृष्णबुवांच्या नंतर त्यांचेच शिष्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर हे दुसरे स्वरश्री होत. ते प्रथम सांगली- मिरजेकडे राजाश्रयास होते. पण तो सोडून ते लवकरच उत्तरेत गेले व तेथेच त्यांनी आपली संगीत साधना केली. या क्षेत्रातले त्यांचे पहिले मोठे कार्य म्हणजे संगीत-विद्या जनतेत पसरवणे हे होय. गवई हे व्यसनी व लहरी असत. त्यांचे तस्त विसळण्यापासून त्यांची सर्व सेवा शिष्यांना करावी लागे. विष्णू दिगंबरांनी हे सर्व बदलून टाकले. त्यांनी लाहोर, नागपूर, मुंबई व पुणे येथे संगीताची गांधर्व महाविद्यालये स्थापन केली. आणि फी देऊन इतर शिक्षणाप्रमाणेच संगीताचे शिक्षण मिळण्याची सोय केली. दुसरे कार्य म्हणजे त्यांनी संगीताचे नोटेशन किंवा स्वरलेखनपद्धती सुरू केली हे होय. यामुळे विद्यार्थ्यांची फार मोठी सोय झाली. आज महाराष्ट्रात घरोघर संगीताची अभिरुची निर्माण झाली आहे, त्याचे श्रेय पंडितजींनाच आहे. नारायणराव व्यास, पटवर्धनबुवा, पाध्येबुवा, ओंकारनाथ ठाकूर हे त्यांचेच शिष्य होत.
पं. विष्णू नारायण भातखंडे यांचे संगीताच्या क्षेत्रातले कार्य अजरामर आहे. वकिली सोडून त्यांनी या विषयासच वाहून घेतले आणि सर्व हिंदुस्थानभर हिंडून अनेक दुर्मिळ चिजा, राग व त्यांचे ग्रंथ मिळवून त्या चिजा नोटेशनने प्रसिद्ध करण्यास प्रारंभ केला. या सर्वांचा परिपाक म्हणजे 'हिंदुस्थानी संगीतपद्धती' हा त्यांचा ग्रंथ होय. या पद्धतीनुसार त्यांनी क्रमिक पुस्तकेही प्रसिद्ध केली. हा त्यांचा उद्योग एवढा अजस्र व अफाट होता की एका आयुष्यात तो त्यांनी पुरा केला हे सर्वानाच विस्मयजनक वाटते.
भास्करबुवा बखले यांना संगीतज्ञ लोक या दुनियेतले अवतारी पुरुषच समजतात. त्यांचे नाव ऐकून गहिवरला नाही असा गवई विरळाच. त्यांचा कंठ जन्मतःच मधुर होता. किर्लोस्कर कंपनीला त्या वेळी एक स्त्री नट हवा होता. अण्णासाहेबांनी भास्करबुवांची त्यासाठी योजना केली. त्यांचे नाटकातले गाणे ऐकून वस्ताद बंदे अल्ली खां हे संतुष्ट झाले व त्यांनी त्यांना गाणे शिकवायचे ठरविले. पुढे इंदूर सुटल्यावर बडोद्यास ते फैज महंमद खां यांच्याकडे गाणे शिकले. त्यानंतर नत्थन खां यांच्याकडे व अल्लादिया खां यांच्याकडेही त्यांनी तालीम घेतली. त्यानंतर ते सर्व भारतभर हिंडले व गाण्यात त्यांनी अपार कीर्ती मिळविली. भास्करबुवांनी बाळकृष्णबुवांप्रमाणेच अनेक शिष्य तयार केले. मास्टर कृष्णराव, बालगंधर्व हे त्यांचेच शिष्य. गंधर्व कंपनीच्या स्वयंवर, विद्याहरण, द्रौपदी या नाटकांचे संगीत दिग्दर्शन करून संगीताचा दरबार त्यांनीच मराठी रंगभूमीवर खुलविला. त्यांनी दिलेल्या चाली अमर झाल्या आहेत. आणि त्यांनी महाराष्ट्रातील लहानथोरांच्या अंतःकरणात कायमचा प्रवेश केला आहे. 'भारत गायनसमाज' ही संस्था त्यांनीच स्थापन केली व पुण्याला आपली कायमची स्मृती करून ठेविली.
महाराष्ट्राचे पाचवे स्वरश्री म्हणजे अब्दुल करीम खां हे होत. हे मूळ 'किराणा' घराण्याचे होते. यांचे मूळ पुरुष नायक धाेंडू हे आग्र्याजवळील किराणा या गावचे होते. त्यांनी प्रत्यक्ष श्रीकृष्णाजवळून विद्या संपादिली व ती आपल्या शिष्यांना दिली असे म्हणतात. अब्दुल करीम खां हे महाराष्ट्रात येऊन मिरजेला स्थायिक झाले आणि त्यांनी इतकी कीर्ती मिळविली की कोणी किराणाऐवजी त्या घराण्याला 'मिरज' घराणे म्हणतात.
शास्त्राबरोबरच रंजन व रसपरिपोष करणारी व करुण भावना आंदोलित ठेवणारी करीम खां यांची गायकी एकदम महाराष्ट्राच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेली. महाराष्ट्राला हा एक नवा ठेवाच सापडला. एक काळ असा होता की कोणत्याही उत्सवात किराणा घराण्याचाच गायक बोलविला जाई. इतकी महाराष्ट्रावर अब्दुल करीम खां यांची छाप पडली होती. पुण्याला खांसाहेबांनी 'आर्य संगीत विद्यालय' स्थापिले आणि नंतर मुंबईला त्याची झाखा काढली. तेथील विद्यार्थ्याचा सर्व खर्च विद्यालयच चालवी. जलसे करून त्यांवर पैसा मिळवून खांसाहेब तो यावर खर्च करीत. रामभाऊ कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व, सुरेशबाबू माने, बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, रोशन आरा बेगम, शंकरराव सरनाईक हे सर्व त्यांचेच शिष्य होत. भीमसेन जोशी व गंगूबाई हनगल यांनी किराणा घराण्याचीच परंपरा पुढे चालविली आहे. महाराष्ट्रात 'ग्वाल्हेर' घराण्याच्या खालोखाल 'किराणा' घराण्याचाच प्रसार आहे. वर सांगितल्याप्रमाणे किराणा घराण्याला मिरज घराणे म्हणावे इतके अब्दुल करीमखां महाराष्ट्राशी एकरूप झाले होते.
महाराष्ट्राचा संगीताबद्दल जो एवढा लौकिक झाला त्यात रामकृष्णबुवा वझे यांचाही मोठा वाटा आहे. इंदूर, ग्वाल्हेर, उज्जैन येथे अपार कष्ट सोसून, दारिद्र्य, दुःख, मानहानी सोसून त्यांनी अनेकांकडून गायनविद्या मिळविली. त्यांनी शागिर्दी केली ती ग्वाल्हेर घराण्याची. बाळकृष्णबुवा, पंडित विष्णू दिगंबर हे याच घराण्याचे. पण वझेबुबांनी इतर अनेक गायकांकडूनही चिजा व राग घेऊन एक स्वतंत्र पद्धती निर्माण केली. ते नेपाळात काही दिवस दरबारी गायक म्हणून होते. तेथे लखनौ घराण्याचे गायक हुसेन खां, वीणावादक सादिक अली खां यांचा त्यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यापासूनही बुवांनी असंख्य ठुमऱ्यांचा साठा मिळविला.
महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी मुक्त हस्ताने सर्वाना आपली विद्या दिली. 'ललित कलादर्श' व 'बलवंत संगीत मंडळी' यांच्या अनेक नाटकांचे संगीत-दिग्दर्शन त्यांनी केलेले आहे. त्यातल्या काही चाली अजूनही महाराष्ट्राच्या ओठावर खेळत आहेत. व्हायोलिन व सतार या दोन्ही वादनांत बुवा निष्णात होते. त्यांचा शिष्यपरिवारही मोठा होता. केशवराव भोसले, बापूराव पेंढारकर, मास्टर दीनानाथ, चाफेकर, कागलकरबुवा इ. बुवांचे शिष्य नामवंत झाले. बुवांनी आपल्या अनेक चिजा नोटेशन सह 'संगीत कलाप्रकाश' या नावाच्या पुस्तकात प्रसिद्ध केल्या आहेत.
उत्तरेतून येऊन संपूर्णपणे महाराष्ट्रीय झालेले दुसरे थोर गायक म्हणजे अल्लादिया खां हे होत. १८९३ साली ते येथे आले, ते मृत्यूपर्यंत म्हणजे १९४६ पर्यंत येथेच राहिले. कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या दरबारी ते चोवीस वर्षे होते. आणि त्यानंतर २०-२२ वर्षे मुंबईस होते. महाराष्ट्राने त्यांचा पराकाष्ठेचा गौरव केला. कोणी त्यांना 'संगीतसूर्य' म्हटले, कोणी 'संगीतभगीरथ' म्हटले. बॅ. जयकर त्यांना गायन कलेतील गौरीशंकर म्हणत. या सर्व गौरवाला पात्र अशीच त्यांची कला होती.
त्यांनी महाराष्ट्रात आणलेले खटतोडी, खोकर, मालागौरी, पूर्वासावनी, हेमनट, कामोदनट इ. अनेक राग, ते येथे येण्यापूर्वी, महाराष्ट्रीय संगीतज्ञांना माहीतही नव्हते. 'आम्हांलासुद्धा हे अगम्य आहे' असे भास्करबुवा बखले त्याविषयी म्हणत, मग इतरांची कथा काय !
अल्लादिया खां हे जयपूर घरण्याचे होत. त्यांनी येथल्या वास्तव्यात आपली विद्या देऊन अनेक शिष्य तयार केले. सुरश्री केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर, गोविंदबुवा शाळिग्राम, शंकरराव सरनाईक, लीलाबाई शिरगावकर इ. अनेकांना त्यांनी तालीम देऊन तयार केले. महाराष्ट्रावर खांसाहेबांचे इतके प्रेम होते की 'महाराष्ट्रीयांसारखे रसिक व मर्मग्राही श्रोते इतर कोणत्याही प्रांतात आढळत नाहीत', 'कलाविकासाची पारख महाराष्ट्रालाच अधिक', असे ते स्पष्टपणे सांगत.
सर्व भारतात महाराष्ट्राला संगीतक्षेत्रात ज्यांनी अग्रस्थान मिळवून दिले, त्याला अमाप कीर्ती मिळवून दिली, त्या सात स्वरश्रींची माहिती वर दिली आहे. महाराष्ट्राचे संगीत त्यांच्या पुण्यावरच आज उभे आहे. आज महाराष्ट्रात जे प्रख्यात गवई आहेत ते बहुधा सर्व यांपैकी कोणाचे ना कोणाचे तरी शिष्य आहेत.
प्रो. बी. आर देवधर हे नाव संगीतज्ञ म्हणून महाराष्ट्रात विख्यात आहे. ते विष्णुबुवा पलुसकरांचे शिष्य. यांनी पौर्वात्य संगीताबरोवर पाश्चात्य संगीताचाही उत्तम अभ्यास केला आहे. मुंबईला 'इंडियन स्कूल ऑफ म्युझिक' ही यांची संस्था फार प्रसिद्ध आहे. कुमार गंधर्वासारखे कीर्तिवंत गवई येथेच गाणे शिकले.
संगीताच्या बाबतीत आणखी एक महाराष्ट्राचा विशेष म्हणजे संगीतशास्त्रावर व संगीतसमीक्षेवर ग्रंथ लिहिणारे महाराष्ट्रात जितके पंडित झाले तितके भारताच्या दुसऱ्या कोणत्याही प्रांतात झाले नाहीत. गं. भि. आचरेकर, बाळासाहेब आचरेकर, रघुवीर पेंटर, गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे, वा. ह. देशपांडे, अ. गं. मंगरुळकर, गोपालकृष्ण भोबे, अरविंद गजेंद्रगडकर, ग. ह. रानडे, ना. सी. फडके ही नावे शास्त्रीय विवेचनासाठी प्रसिद्ध आहेत. यांतले काही स्वतः गायकही होते व संगीत दिग्दर्शकही होते. त्यामुळे त्यांच्या लेखनाला विशेष बोज प्राप्त झाला आहे.
यानंतर काही प्रसिद्ध गायिकांचा परिचय करून व्यावयाचा आहे. बावलीबाई पालकर, अंजनीबाई मालपेकर, केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर, हिराबाई बडोदेकर आणि माणिक वर्मा या त्या गायिका होत. यांची संगीतसेवा वर सांगितलेल्या स्वरश्रींच्या इतकीच महत्त्वाची आहे.
यांतल्या बऱ्याच गायिका गोव्याच्या आहेत. त्यांत बावलीबाईना जाणकार अग्रपूजेचा मान देतात. पाऊणशे वर्षापूर्वी सबंध भारतामध्ये नामांकित गायिका म्हणून त्यांचा लौकिक होता. नत्थन खां यांच्या त्या शिष्या. त्यांच्या जवळून पाठ घेऊन पुढे त्या इतक्या निपुण झाल्या की तत्कालीन थोर गवय्ये, उस्ताद, खांसाहेब सुद्धा त्यांची बैठक झाल्यानंतर आपली मैफल रंगविण्याचे धाडस करीत नसत. भास्करबुवा बखले, अब्दुल करीम खां यांसारखे भारतीय कीतांचे थोर गवईही त्यांना मानीत असत. बावलीबाईंच्या मैफली अनेक संस्थानिकांच्या दरबारी झालेल्या आहेत. पुढे त्या भावनगर संस्थानच्या दरबारी गायिका म्हणून राहिल्या. आयुष्याच्या उत्तर काळी त्या भजने म्हणू लागल्या. ती इतकी प्रासादिक व रसाळ असत की श्रोते तल्लीन होऊन जात.
अंजनीबाई मालपेकर यांनी एका काळी सर्व भरतखंडात आपले नाव असेच गाजविले होते. भारतातील असे एकही मोठे देऊळ नाही की जेथे त्यांचे गायन झालेले नाही. असा एकही मोठा संस्थानिक नाही की ज्याच्या दरबारात त्यांची मैफल झालेली नाही. नेपाळ, पालनपूर, इंदूर, ग्वाल्हेर येथे तर त्यांच्या मैफली अनेकवार झाल्या आहेत. वयाच्या आठव्या वर्षापासून त्या गायन शिकत होत्या. नजीर खां भेंडीबाजारवाले हे त्यांचे गुरू. त्यांच्याजवळ त्या छत्तीस वर्षे गानतपस्या करीत होत्या.
सुरश्री केसरबाई केरकर यांना एकाच गुरूच्या हाताखाली शिकण्याचे भाग्य लाभले नाही. अब्दुल करीम खां, वझेबुवा, खांसाहेब बरकतुल्ला, पं. भास्करबुवा बखले आणि मुख्यतः अल्लादिया खां अशा भिन्न गुरूंच्या जवळ, त्यांच्या गावी राहून, त्यांना संगीतकला शिकावी लागली. यासाठी त्यांना अपार कष्ट करावे लागले. गैरसोयी सोसाव्या लागल्या. पण हे सर्व त्यांनी सोसले आणि संगीतकलेत अग्रपूजेचा मान मिळविला. भारत सरकारनेही त्यांच्या या कलेचा गौरव केला आहे. त्यांचे सबंध चरित्र म्हणजे संगीताचा जोगवा घेतलेल्या एका योगिनीच्या संगीतसाधनेचा इतिहास आहे.
मोगुबाई कुर्डीकर यांची कीर्ती व गानतपस्या अशीच असामान्य आहे. गाणे शिकायला मिळावे म्हणून प्रथम त्यांनी नाटकात कामे केली. 'सातारकर संगीत मंडळी' मध्ये त्या गेल्या. तेथे रामलाल नावाच्या गवयाने शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण त्यांना दिले. त्या आपल्या घरी गाणे म्हणत असताना अल्लादिया खां रस्त्यावरून जात होते. तो सुरेल कंठ ऐकून ते इतके भारावले की ओळख नसताना ते तसेच वर गेले आणि मोगुबाईंना त्यांनी आपल्या शिष्या करून घेतले. मध्यंतरी हैदर खां हे अल्लादिया खांचे बंधू यांच्याजवळ त्या शिकत होत्या. पण नंतर पुन्हा अल्लादिया खांकडे त्या आल्या व शेवटपर्यंत त्यांच्याजवळ राहून त्यांची विद्या त्यांनी अभ्यासली. मोगुबाईंच्या एका गाण्याच्या मैफलीला स्वतः येऊन अल्लादिया खांनी मुक्त कंठाने त्यांची स्तुती केली.
हिराबाई बडोदेकर या गायिका म्हणून अखिल भारतात ख्यातनाम आहेत. प्राथमिक शिक्षण चालू असतानाच अब्दुल वहीद खां यांच्याकडे त्या संगीताचे पाठ घेऊ लागल्या. पुढे त्यांनी इतकी कीर्ती मिळविली की कलकत्ता, अलाहाबाद येथील संगीत परिषदांमध्ये त्यांचा मोठा गौरव झाला. त्यांनी स्वतःची नाटक कंपनी काढून नाट्यसंगीताचीही सेवा केली आहे. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला, तेव्हा दिल्ली रेडिओवरून 'वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत गाण्याचा मान त्यांना देण्यात आला होता. भारतातून चीनला जे सांस्कृतिक शिष्टमंडळ गेले होते त्यात हिराबाईचा समावेश झाला होता. या क्षेत्रात महाराष्ट्राला त्यांनी कशी कीर्ती मिळवून दिली ते यावरून समजेल.
माणिक वर्मा यांचे नाव एका दृष्टीने या सर्वापेक्षा आगळे आहे. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन, भावगीत, लावणी या सर्व प्रकारच्या संगीतात त्यांचा अप्रतिहत संचार आहे. सातव्या वर्षीच त्यांचे गाणे ऐकून बालगंधर्वांनी, 'तुझ्या गळ्यात माणिक मोती आहेत, तू मोठी गायिका होशील', असा आशीर्वाद त्यांना दिला होता. आप्पासाहेब भावे, सुरेशबाबू, इनायत खां आणि जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडून त्यांनी विद्या मिळविली आणि भारतात व युरोपातही अपूर्व कीर्ती जोडली. दिल्ली रेडिओवरून त्यांचे अनेक राष्ट्रीय कार्यक्रम झाले. मैफलीही त्यांनी अनेक गाजविल्या. आणि युरोपीय लोकांना प्रथमच भारतीय कंठसंगीताची गोडी दाखवून दिली. तोपर्यंत आपले वाद्यसंगीतच तिकडे जात असे. कंठसंगीत त्यांना आवडणार नाही, असा समज होता. माणिक वर्मा यांनी तो भ्रम दूर केला आणि चांगल्या पस्तीस बैठकी त्यांनी गाजवल्या. भारतातील सर्व सभासंमेलनांत त्या मानाने गेल्या आहेत आणि आकाशवाणीवरील सर्वश्रेष्ठ श्रेणी त्यांनी मिळविली आहे. अशा रीतीने, 'देवा, मोठी गायिका होशील', हा बालगंधर्वांचा आशीर्वाद त्यांनी खरा करून दाखविला आहे.
कीर्तन संस्था
शास्त्रीय संगीताचा विचार करताना कीर्तनसंस्थेचा विचार सहजच मनात येतो. भारतात कीर्तनसंस्था फार पुरातन काळापासून नावारूपास आलेली आहे. नारद हे या संस्थेचे आद्य प्रवर्तक असे पुराणे सांगतात. संतांपैकी नामदेवांची कीर्तने प्रसिद्ध आहेत. पण ते गात असावेत असे वाटत नाही. समर्थ रामदासस्वामींनी 'संगीत, नृत्य, तानमान' हे कीर्तनाला अवश्य म्हणून सांगितले आहे. तेव्हा त्या वेळी कीर्तनकार संगीताचा अभ्यास करीत असावेत, असे वाटते. अलीकडच्या काळात मात्र कीर्तनकार शास्त्रशुद्ध संगीताचा अभ्यास करीत, हे त्यांच्या चरित्रांवरून दिसते. देवजीबुवा गोगटे, चिलुबुवा फलटणकर, नानाबुवा बडोदेकर, ताहराबादकर, कऱ्हाडकर, सांगलीकर, नाशिककर इ. या क्षेत्रातली नावे प्रसिद्ध आहेत. नाट्यसंगीतात प्रारंभी प्रसिद्धीस आलेले प्रख्यात गायक भाऊराव कोल्हटकर, मोरोबा वाघुलीकर, बाळकोबा नाटेकर यांचा संबंध प्रथम कीर्तनसंस्थेशीच आला होता. त्यांच्या गाण्यावर कीर्तनसंस्थेतील गाण्याची छाप होती, असे जाणकार म्हणतात.
कीर्तनातील गायनाची तमाशातील गायनावरही छाप होती असे म्हणतात. मागल्या काळी, प्रसिद्ध तमासगीर रामजोशी पुढे तमाशा सोडून कीर्तनकार झाले हे प्रसिद्धच आहे. पुढच्या काळातही कीर्तनाच्या लोकप्रियतेमुळे तमाशातील गायकीवर कीर्तनातील गायकीचा परिणाम झाला असणे पूर्ण शक्य आहे. तेव्हा कीर्तनसंस्था अशी सर्वव्यापक होती हे उघड आहे.
लोकसंगीत
कीर्तनाखालोखाल गायनाची परंपरा चालू ठेवणारे लोक म्हणजे वासुदेव, गोंधळी, भुत्या, वाघ्यामुरळी, भराडी, पोतराज, जोगती हे होत. वासुदेवाच्या मुखी रंगणारी गाणी विविध प्रकारची आहेत. त्यातली काही भक्तीचा महिमा रंगविणारी आहेत; काही बालकृष्णाचे चरित्र सांगणारी आहेत. गाेंधळी हा आबालवृद्ध श्रोत्यांना रंजविण्यासाठी कृष्णलीला, गौळणी, पोवाडे अशी विविध प्रकारची गीते आकर्षक पद्धतीने गातो. भुत्या सर्वत्र हिंडतो व तुळजापूरच्या आई भवानीची गाणी तन्मयतेने गातो. वाघ्यामुरळीच्या मुखीची गाणी शाहिरी ढंगाची आहेत. ते प्रामुख्याने खंडोबाची गीते गातात. त्यात खंडोबा व बाणाई यांच्या शृंगाराची गाणीही असतात. भराडी हा अनेक पुराणकथा व लोककथा गीतबद्ध करून लोकांना सांगतो. पोतराजाची गाणी ही मरीआईची किंवा महालक्ष्मीची असतात. याशिवाय त्याच्या पाठात काही कथात्मक गीतेही असतात. पार्वती भिल्लीण झाली ही कथा त्यात नेहमी असते. जोगती आणि जोगतिणी हे यल्लमाचे उपासक आहेत. यांच्या गीतांत यल्लमाचे माहात्म्य सांगणारी अनेक गीतं असतात.
कौटुंबिक गीते, बालगीते, स्त्रीगीते, मंगळागौरीची गीते ही सर्व लोकगीताच्या परंपरेतलीच होत. लोकगीतांना शास्त्रीय संगीत म्हणता येणार नाही. पण लोकांच्या गायनश्रवणाच्या अभिरुचीची ती तृप्ती करतात व ती अभिरुची समाजात पसरवून त्याचे मनोरंजन करतात यात वाद नाही.
नाट्यसंगीत
यानंतर नाट्यसंगीताचा विचार करायचा. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी साग्रसंगीत अशी शाकुंतल, सौभद्र ही नाटके रंगभूमीवर उभी केली, त्यामुळे संगीताचा सर्व लोकांत प्रसार झाला. कीर्तनपरंपरेतील लोकप्रिय चाली, लावणी ढंगाच्या चाली आणि कर्नाटकी व हिंदुस्थानी यांचा मिलाफ यामुळे किर्लोस्करांचे संगीत नाटक हा घरातला विषय झाला. सुदैवाने त्या वेळी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'ला भाऊराव कोल्हटकर, मोरोबा वाघुलीकर, बाळकोबा नाटेकर असे गायक नट लाभले. या सगळ्यांत भाऊराव कोल्हटकर हे अग्रगण्य होते. तेजःपुंज सौंदर्य आणि सुरेल, कर्णमधुर गायन हे भाऊरावांचे विशेष होते. त्यांनी देवलांच्या मार्गदर्शनामुळे सुभद्रा, शकुंतला, मंथरा या स्त्रीभूमिकांप्रमाणेच पुंडरीक, चारुदत्त, कोदंड या पुरुष भूमिकाही तितक्याच यशस्वी केल्या. यानंतर सर्व भारतात ज्यांची अमर कीर्ती झाली ते नारायणराव राजहंस अथवा बालगंधर्व हे उदयास आले. प्रथम ते 'किर्लोस्कर कंपनी'त होते. पुढे त्यांनी स्वतंत्रपणे 'गंधर्व नाटक मंडळी'ची स्थापना केली. कृ. प्र. खाडिलकरांनी १९११ साली मानापमान नाटक लिहिले आणि नाट्यसंगीतात नवयुग सुरू झाले. त्यांनी गोविंदराव टेंबे यांच्याकडून हिंदुस्थानी संगीताच्या चाली घेतल्या. त्यामुळे नाट्यसंगीताला प्रौढ व भारदस्त वळण मिळाले. असे हे संगीत बालगंधर्वांच्या कंठातून ऐकावयास मिळाल्यामुळे रंगभूमीवर स्वर्गच अवतरल्यासारखे झाले. गायनाला त्यांनी हृदयस्पर्शी अभिनयाची जोड दिली, त्यामुळे स्वप्नसृष्टीचाच आस्वाद रसिकांना वर्षानुवर्षे मिळत राहिला. देवल, खाडिलकर यांसारखे नाट्यशिक्षक व बखलेबुवांसारखे संगीत मार्गदर्शक त्यांना लाभले. त्यांनी उत्तम श्रेष्ठ संगीतनटांचा संग्रहही केला. पटवर्धनबुवा, मा. कृष्णराव, पंढरपूरकरबुवा, नेवरेकर, लोंढे यांसारख्या संगीत नटांचा उदय त्यांच्याच कंपनीत झाला. केशवराव भोसले हे तिसरे प्रख्यात संगीत नट, बाबूराव पेंढारकर हे त्यांचेच सहकारी. 'ललितकला' ही संगीत संस्था त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालली होती. गंधर्व आणि ललितकला यांनी १९२१ साली मानापमान नाटकाचा संयुक्त प्रयोग केला. मराठी रंगभूमीच्या सुवर्णयुगाचा तो कलशाध्याय समजला जातो. पुढील काळात बलवंत, यशवंत, इ. नाट्यसंस्थांनी आपल्या संगीतासाठी वझेबुवा या संगीतज्ञांचे साह्य घेतले. आणि त्यातून सरनाईक, मा. दीनानाथ हे नट उदयास येऊन खानदानी संगीताचे लोण सर्व महाराष्ट्रभर पोचले. स्वयंवर, द्रौपदी, राक्षसी महत्त्वाकांक्षा, विद्याहरण, संन्याशाचा संसार, शहाशिवाजी, सत्तेचे गुलाम, एकच प्याला, भावबंधन इ. नाटके या काळात जुन्या आणि या नव्या संगीत नटांनी अत्यंत लोकप्रिय केली.
१९३१ नंतर सिनेमामुळे मराठी रंगभूमीला उतरती कळा लागली. त्या वेळी प्र. के. अत्रे यांनी तिला सावरून धरली. 'बालमोहन' नाटक मंडळी त्यांची नाटके करीत असे. त्यातूनच छोटा गंधर्व हा नामवंत कलाकार पुढे आला. १९४० साली अत्रे बोलपटसृष्टीत गेले. तेव्हा रांगणेकरांनी रंगभूमी सावरली. माफक संगीत असलेली नाटके त्यांनी लिहिली. त्यांतील 'कुलवधू' हे नाटक, सौ. जोत्स्ना भोळे यांची भूमिका व त्यांनी गायिलेली पदे यामुळे, अत्यंत लोकप्रिय झाले. आणि त्यावरोवर 'नाट्य निकेतन' या रांगणेकरांच्या संस्थेलाही स्थैर्य आले. सौ. जोत्स्ना भोळे यांचे खादिम हुसेन खां, इनायत खां, वझीर खां, धम्मण खां हे संगीत क्षेत्रातले गुरू होत... 'नाट्यमन्वंतर' च्या रंगभूमीवर त्या प्रथम पुढे आल्या. त्यानंतर 'नाट्यनिकेतन' च्या त्या नायिकाच झाल्या. त्यांच्या असामान्य मधुर गायनामुळे पुढे त्यांचा खूप गौरव झाला. भारताच्या सांस्कृतिक पथकावरोवर त्या चीनला गेल्या होत्या. दिल्ली, लखनौ येथील रेडिओवरील संगीतोत्सवात त्यांना नेहमी मानाचे स्थान असे. कलकत्ता संगीत परिषदेतही त्यांचा गौरव झालेला आहे. संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात तिला अशी गायिका नटी म्हणून मिळाली हे तिचे भाग्यच होय.
सिनेसंगीत
नाट्यसंगीतानंतर सिनेसंगीताचा विचार करावयाचा. सिनेमात दोनतीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ गाणे चालत नाही. त्यामुळे, हे गाणेच नव्हे, असे काही लोक म्हणतात. आणि त्यांच्या म्हणण्याला अर्थही आहे. कारण कोणताही राग दोनतीन मिनिटांत केव्हाही आळवता येणे शक्य नाही. पण दुसरी गोष्ट तितकीच खरी आहे की सिनेमाचे प्रेक्षक नाटकापेक्षा दसपटीने जास्त असल्यामुळे संगीताचा प्रसार नाटकापेक्षा सिनेमामुळे दसपटीने, शतपटीने जास्त झाला आहे. प्रारंभी पार्श्वगायनाची सोय नव्हती. तेव्हा नटनटी स्वतःच गाणी म्हणत. अशा नटनटींत शांता आपटे, शांता हुबळीकर, मीनाक्षी, दुर्गा खोटे, मास्टर विनायक, जोग हे प्रमुख होत. पुढे पार्श्वगायनाची सोय झाल्यामुळे नटी कोणतीही असली तरी लताबाई, आशाबाई, उषाबाई, सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा यांसारख्या अव्वल दर्जाच्या गायिकांचे गायन सर्वांना नेहमी ऐकायला मिळू लागले. लताबाई मंगेशकर यांनी या क्षेत्रात जी कीर्ती मिळविली आहे तिला जगात क्वचितच कोठे तोड असेल. त्यांची कंठमाधुरी, त्यांचा भावनाविष्कार, त्यांच्या तानांच्या फेकी या ज्यांनी ऐकल्या नाहीत असा मनुष्य भारतात बहुधा सापडणारच नाही. मराठीप्रमाणेच हिंदी व इतर भाषांत त्या गात असल्यामुळे सर्व भारतभर त्यांची कीर्ती झाली आहे. त्यामुळे लताबाई या महाराष्ट्राचे अनन्यसाधारण असे भूषण झाल्या आहेत. या क्षेत्रात आशाबाई भोसले, उषाबाई मंगेशकर, सुमन कल्याणपूर यांनी लताबाईंच्या खालोखाल कार्य करून महाराष्ट्राला सर्व भारतात आणि इंग्लंड, अमेरिकेतही कीर्ती मिळवून दिली आहे.
वाद्यसंगीत
हे सर्व कंठसंगीताविषयी झाले. आता वाद्यसंगीताचा विचार करून हे संगीत समालोचन पुरे करू.
वाद्यसंगीत हे पुष्कळ वेळा कंठसंगीताची साथ म्हणून येत असले तरी त्याला स्वतंत्र अस्तित्व व महत्त्वही आहे, हे सनई, सतार, व्हायोलिन, तबला यांच्या स्वतंत्र मैफली होतात यावरून स्पष्ट दिसते.
प्रथम सतारीचा महिमा पाहू. नारो आप्पाजी भावे, बाळाजीपंत अशी काही पेशवेकाळची नावे आढळतात. भावे नानासाहेब पेशवे यांच्या पदरी होते व बाळाजीपंत राघोबाजवळ होते. गेल्या म्हणजे एकोणिसाव्या शतकात बिच्चू खां यांचे नाव प्रसिद्धीस आले. उत्तर हिंदुस्थानातून येऊन हे सातारच्या महाराजांच्या आश्रयास राहिले होते. सातारचे विष्णुबुवा मटंगे हे बिच्चू खां यांचेच शिष्य होत. काही दिवसांनी पुण्याचे डॉ. विनायकराव लिमये यांनी त्यांना पुण्यास आणले व ते स्वतः खांसाहेबां जवळ सतार शिकले. प्रसिद्ध सतारिये अण्णा घारपुरे हे त्यांचेच शिष्य होते. डॉ. लिमये यांच्याकडे सतारीच्या वारंवार मैफली होत. जीवनजी महाराज हे गुजरातेतून मुंबईस येऊन राहिले होते व तेथे त्यांनी अनेक सतारिये शिष्य तयार केले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईत यांचे नाव महशूर होते. विश्वनाथबुवा काळे हे जीवनजी महाराजांच्या जवळच सतार शिकले. तबलावादन, सतारवादन यावर यांनी पुस्तके लिहिली आहेत. अनेक राजेरजवाड्यांच्या दरबारात यांच्या व अण्णा घारपुरे यांच्या सतारीच्या मैफली झालेल्या आहेत. अण्णा घारपुरे यांनीही तबला व सतार यांवर पुस्तके लिहिली आहेत.
सारंगी हे सतारीइतकेच महत्त्वाचे वाद्य आहे. रमजानी, देवीदास हे पेशवेकाळी प्रसिद्ध सारंगीवादक होते. गोविंद राम हे सारंगीवादक गेल्या शतकात होऊन गेले. ते मुंबईस असत. गोव्यामध्ये विनायक बांदोडकर, पांडुमामा मंगेशकर, राम नागेशकर, मोतीराम कवळेकर इ. अनेक सारंगीवादक होऊन गेले. त्यांत दत्तारामजी पर्वतकर हे अग्रगण्य होत. हे दीर्घकाळ मुंबईस होते आणि ऑल इंडिया रेडिओ, हिज मास्टर्स व्हॉईस, इंपीरियल फिल्म कंपनी या संस्थांमध्ये त्यांनी नोकरी केली. नामांकित गवयांना त्यांची साथ फार मोलाची वाटे. मोगुबाई कुर्डीकर, केसरबाई केरकर, हिराबाई बडोदेकर यांना साथ करण्याचेही भाग्य त्यांना लाभले होते. अनंतराव केरकर हे केसरबाईंचेच आप्त. सारंगीवादन ही कला त्यांच्या घराण्यातच होती. अनेक गवयांना व गायिकांना साथ करून त्यांनी नाव मिळविले आहे. बाबूराव कुमठेकर, यशवंतराव आमोणकर यांची नावे अशीच उत्कृष्ट साथीदार म्हणून प्रसिद्ध आहेत.
पेटी किंवा हार्मोनियम व तबला ही साथीची वाद्ये म्हणूनच प्रसिद्ध आहेत. पेटी वाजविण्यात गोविंदराव टेंबे यांचे नाव सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यांच्या तोडीचा हार्मोनियमपटू दुसरा कोणी झाला नाही, असे जाणकार म्हणतात. नाटक, चित्रपट यांतही त्यांनी उत्तम नट म्हणून कीर्ती मिळविली होती. म्हैसूर दरबारात यांनी काही दिवस नोकरी केली होती. विठ्ठलराव कोरगावकर व डॉ. पाबळकर यांची नावेही पेटीवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. गोव्याचे रत्नकांत रामनाथकर हे जसे गायक तसेच पेटीवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. एकवीस वर्षे ऑल इंडिया रेडिओमध्ये पेटीची साथ करून त्यांनी उदंड कीर्ती मिळविली. यांच्या जोडीला पंढरीनाथ काळे यांचे नाव हार्मोनियमपटू म्हणून असेच प्रसिद्ध आहे. मुंबई, कलकत्ता येथील संगीत परिषदांमध्ये यांना सन्मानपूर्वक पाचारण करण्यात येत असे. याशिवाय मधुकर पेडणेकर, शांताराम मांजरेकर, वसंत शेजवाडकर, मुरलीधर नागेशकर हेही पेटीवादनात कुशल म्हणून प्रसिद्ध आहेत. मधुकर पेडणेकर यांनी अनेक वर्षे हिज मास्टर्स व्हॉईस- सारख्या कंपन्यांत व काही चित्रपटांत संगीत दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. १९२३ साली सवाई गंधर्वांच्या गायनाच्या वेळी डॉ. कुर्तकोटी यांनी त्यांना सुवर्णपदक दिले होते.
सनई हे महाराष्ट्राचे सर्वपरिचित असे वाद्य असून त्यात गायकवाड, विशेषतः शंकरराव गायकवाड, देवळणकर, खळदकर ही नावे अत्यंत प्रसिद्ध आहेत. व्हायोलिन- वादनात गजाननराव जोशी, व्ही. जी. जोग, श्रीधर पार्सेकर ही नावे सर्वश्रुत आहेत. श्रीधर पार्सेकर हे परशुरामबुबा पार्सेकर, गजाननराव जोशी व नत्थन खां यांच्या जवळ व्हायोलिन (फिड्ल) शिकले. 'स्वरनिनाद' हे त्यांचे व्हायोलिनवादनावरचे पुस्तक फार सुंदर आहे. श्रीधर पार्सेकर यांचे बंधू सहदेव हेसुद्धा उत्तम फिड्लवादक आहेत. सिनेमा क्षेत्रात फिड्लवादक म्हणून यांनी चांगली कीतीं मिळविली आहे.
आता पखवाज आणि तबला या वाद्यांच्या वादनात जे कलाकार निष्णात झाले त्यांची माहिती घेऊन वाद्यसंगीताचे वर्णन पुरे करू.
नानासाहेब पानसे पखवाजवादक म्हणून फार प्रसिद्ध होते. काशीला ज्योतिसिंग नावाच्या एका कलाकाराकडून हे ती विद्या शिकले आणि जन्मभर तिचा अभ्यास करून ती त्यांनी पूर्णतेस नेली. इंदूर दरबारात त्यांना नोकरी होती. पण त्यांचे शिष्य सर्व महाराष्ट्रभर पसरले आहेत. ते स्वतःही महाराष्ट्रात मिरज, पुणे येथे येऊन आपल्या कलेचे वैभव दाखवून गेले आहेत. त्यांचे चिरंजीव बळवंतराव पानसे हेही वडिलांप्रमाणे विख्यात पखवाजवादक होते. नानासाहेब पानसे हे तबलावादनातही निष्णात होते. वामनराव चांदवडकर यांना तबल्याचा बाज त्यांनीच शिकविला. वामनरावांचा हात फार मुलायम, वाजविणे मधुर व नियमबद्ध असे. पानशांच्या शिष्यांत यांच्याइतका प्रवीण दुसरा कोणी झाला नाही, असे म्हणतात. मिरजेचे दत्तोपंत पटवर्धन यांना तबलावादन यांनीच शिकविले. मन्याबा कोडीतकर हे सातारा जिल्ह्यातील कोडीत गावचे राहणारे. ते जातीने गुरव होते. पखवाजवादन ते आपल्या वडिलांजवळ शिकले. प्रसिद्ध हरिदास त्र्यंबकबुवा नाशिककर यांच्या पाठीमागे मन्याबा कीर्तनात पखवाज वाजवीत असत. सखाराम गुरव हे प्रथम इंदुरास व नंतर बऱ्हाणपुरास राहत असत. हे नाना पानशांचे शिष्य. त्यांनी स्वतःही अनेक शिष्य तयार केले होते.
गोमंतक समाजातील काही स्त्रियांचा नृत्य-गायन हा पेशाच होता. अशा घराण्यातील स्त्रियांना साथ करण्याचे काम त्यांच्या नात्यातील पुरुषांना करावे लागे. त्यातून अनेक तबलावादक उदयास आले. लक्ष्मणराव ऊर्फ खापरूमामा पर्वतकर हे अशांपैकीच तबलजी होत. त्यांना अल्लादिया खांनी लयभास्कर अशी पदवी दिली होती. दत्ताराम नांदोडकर हे सर्व महाराष्ट्रात तबलजी म्हणून गाजले. हे काही काल गंधर्व कंपनीत होते. भास्करबुवा व ताराबाई शिरोडकर यांना साथ करण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. विठ्ठल मालपेकर हे प्रथम नर्तक म्हणून प्रसिद्धीस आले. पण पुढे ते तबल्यात प्रवीण झाले आणि नृत्याला उत्तम साथ करू लागले. सुब्रावजी अंकोलेकर यांचा या काळात महान तबलजी म्हणून लौकिक होता. मुन्ने खां यांच्याकडे त्यांचे शिक्षण झाले. यांनी स्वतःही अनेक शिष्य तयार केले आहेत. कामुराव मंगेशकर हे तबलजी म्हणून भारतभर गाजले. अनेक नामांकित गवयांना साथ करून त्यांनी नाव मिळविले. अनेक संस्थानिक व राजे महाराजांनी त्यांना सुवर्णपदके व प्रशंसापत्रके देऊन गौरव केला आहे. पंढरीनाथ नागेशकर व यशवंतराव केरकर यांनी मुंबईत तबलजी म्हणून उत्तम कीर्ती मिळविली. रेडिओवर त्यांचे कार्यक्रम अनेक वेळा झाले. दोघांचेही मुंबईला तबल्याचे क्लास आहेत. याशिवाय अनेक तबलजी प्रारंभी सांगितलेल्या कारणामुळे गोव्यात उद्यास आलेले आहेत.
मुरारखा गोवेकर हे गोव्याचे राहणारे. गाणे, सतार, तबला व पखवाज या कलांत प्रवीण होते. या विषयांवर त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेत. हे कधी कधी पुण्यास येऊनही राहत असत. गणपतराव रास्ते हे जमखंडीचे राहणारे. बळवंतराव वैद्य यांच्याजवळ हे पखवाज व तबला शिकले. तोंडाने बोल काढून मग ते बोल पखवाजात काढीत असत. त्यामुळे श्रोत्यांचे मनोरंजन उत्तम होई. शंकरभय्या हे पुण्याचे राहणारे. बळवंतराव वैद्य यांचा पुण्याला गायनवादनाचा समाज होता. तेथे हे मृदंग व तबला वाजविण्यास शिकले. बेलबाग देवस्थानात त्यांस नोकरी होती. अनेक गवयांना यांनी साथ करून नाव मिळविले होते. दादा लाडू व रुकडीकर यांची नावेही तबलावादनात प्रसिद्ध आहेत. नाटकात ते साथ करीत असत.
तबलजींमध्ये सर्वांमध्ये अग्रगण्य म्हणजे अहमदजान थिरकवा हे होत. हे गंधर्व नाटक मंडळीत होते व तेथेच त्यांना अलौकिक कीर्ती मिळाली. असा तबलावादक पूर्वी कधी झाला नाही व पुढे होणार नाही, असे त्यांच्याविषयी गोविंदराव टेंबे म्हणत असत. पं. मालवीयांनीसुद्धा थिरकवांची प्रशंसा केली होती. बालगंधर्वाना ते साथ करीत असताना गंधर्वांच्या गाण्याला टाळ्या पडत, तशा कित्येक वेळा स्वतंत्रपणे थिरकवांच्या तबल्यालाही पडत. 'वाहवा अहंमदजान' असे म्हणून लोक त्यांना दाद देत. गंधर्व कंपनीत त्यांच्याच बरोबर कादरबक्ष हे सारंगिये होते. म्हणून त्यांची माहिती येथेच मुद्दाम देतो. त्यांच्या सारंगीला बेसूर असा कधी माहीतच नव्हता. त्यांचे सारंगीवरचे उच्चारण इतके विलक्षण होते की कित्येक वेळा गाण्यातील शब्दच उमटत आहेत असे श्रोत्यांना वाटे. बालगंधर्वानी अशी गुणी माणसे जोडली होती. थिरकवा व कादरबक्ष यांच्यावर त्यांची फार भिस्त होती.
महाराष्ट्रीय संगीताचा इतिहास असा मोठा वैभवशाली आहे. शास्त्रीय संगीत, सिनेसंगीत, नाट्यसंगीत, वाद्यसंगीत इ. विविध शाखांत अग्रपूजेचा मान मिळविणारे कलाकार महाराष्ट्राने भारताला दिले आणि येथल्या श्रोत्यांनीही खरे रसिक श्रोते अशी कीर्ती परकीयांकडून मिळविली. आज पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, सुधीर फडके, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे यांनी तीच संगीताची परंपरा पुढे चालविली आहे.
■