महाराष्ट्र संस्कृती/महाराष्ट्रीयांची कलोपासना ( २ )



४३.

महाराष्ट्रीयांची कलोपासना-
नाटक, चित्रपट, नृत्य, चित्र व शिल्प

 


 गेल्या प्रकरणात महाराष्ट्रातील संगीत कलेचा- नाट्यसंगीत, सिनेसंगीत, इ. तिच्या सर्व शाखांचा- विचार केला. आता नाट्यकला, चित्रपट, नृत्य, चित्र आणि शिल्प या कलांचा परिचय करून घेऊन हे विवेचन संपवू

नाट्यकला
 संगीतानंतर प्रथम महाराष्ट्रातील तितकीच लोकप्रिय जी नाट्यकला तिचा विचार करावयाचा. अर्वाचीन नाट्यकलेला खरा प्रारंभ १८८० साली अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी 'संगीत शाकुंतल' नाटक रंगभूमीवर आणून केला. त्याआधी १८४३ साली विष्णुदास भावे यांनी काहीसा नवा नाट्यप्रकार सुरू केला होता. पण तमाशा, लळिते, भारुडे, दशावतार यांच्या मिश्रणाचाच तो प्रकार होता. ती अर्वाचीन रंगभूमी नव्हती. त्यांच्या नाटकात पदे फक्त लिहिलेली असत. आणि बाकीची भाषणे नट आपल्या मनाने आयत्या वेळी म्हणत. तरी त्या वेळी भावे यांच्या नाटकाला फार लोकप्रियता मिळाल्यामुळे इतर अनेक लोकांनी तशा कंपन्या काढल्या व पैसा मिळविला.
 यानंतर मध्यंतरीच्या काळात भाषांतरित नाटकाला सुरुवात झाली. १८५१ साली परशुरामतात्या गोडबोले यांनी उत्तर रामचरिताचे भाषांतर केले. आणि मग पुढे वेणीसंहार, प्रबोध चंद्रोदय, प्रसन्नराघव, मालती-माधव, जानकी-परिणय, नागानंद इ. नाटकांची मराठीत भाषांतरे होऊ लागली. त्यानंतर लवकरच १८६१ साली विनायक जनार्दन कीर्तने यांनी 'थोरले माधवराव पेशवे' हे नाटक लिहिले. हे मराठीतले पहिले नाटक, कारण हे नाटक म्हणजे नाटकाला अवश्य असा जो लिखित नाट्य प्रबंध, जो भावे यांच्या नाटकात नव्हता, तो होता. इचलकरंजीकर नाटक मंडळीने हे नाटक रंगभूमीवर आणले. त्यानंतरच्या काळात १८७४ साली महादेवशास्त्री कोल्हटकर यांनी ऑथेल्लो या शेक्सपियरच्या नाटकाचे मराठीत भाषांतर केले आणि तेथून पुढे मराठीत शेक्सपियरच्या नाटकांची भाषांतरे होऊन ती रंगभूमीवरही येऊ लागली. याच काळात 'स्वैरसकेशा' सारखी काही सामाजिक विषयावर नाटके लिहिली गेली. शिकलेल्या स्त्रियांची टवाळी व बीभत्स निंदा करणे हाच त्यांचा हेतू होता. पण त्या नाटकांना नाटकाचे रंगरूप असे काही नव्हते. त्यांची रचना अत्यंत शिथिल असून संवाद, स्वभावलेखन इ. कोणतेच गुण त्यात नव्हते.
 म्हणून या सर्व दृष्टींनी विचार करता अण्णासाहेब किर्लोस्कर हेच अर्वाचीन रंगभूमीचे जनक ठरतात. त्यांच्या 'संगीत शाकुंतला'ने नवे युगच सुरू केले. त्यानंतर त्यांनी 'सौभद्र' व 'रामराज्य वियोग' अशी दोन नाटके लिहिली. दुर्दैवाने त्यांच्या अकाल मृत्यूने रामराज्यवियोग हे अपुरे राहिले. पण शाकुंतल व सौभद्र यांनी आपले कार्य करून टाकले होते. सौभद्राची लोकप्रियता तर अजून कायम आहे. किर्लोस्करांनंतरचे मोठे नाटककार म्हणजे देवल हे होत. प्रथम त्यांनी 'विक्रमोर्वशीय,' 'मृच्छकटिक' ही भाषांतरित नाटके लिहिली. बाणाच्या कादंबरीच्या आधारे 'शापसंभ्रम' हे लिहिले आणि 'ऑथेल्लो'च्या आधारे 'झुंझारराव' हे नाटक लिहिले. पण देवलांची खरी कीर्ती झाली ती 'शारदा' नाटकाने तो प्रश्न समाजाच्या इतक्या जिव्हाळ्याचा आहे की त्या एकाच नाटकाने त्यांना अमर कीर्ती मिळवून दिली आहे. त्यांचे 'संशय कल्लोळ' हे नाटकही असेच लोकप्रिय आहे.
 १८९६ साली श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे युग सुरू झाले. वीरतनय हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर मूकनायक, गुप्तमंजूष, प्रेमशोधन, मतिविकार ही नाटके त्यांनी लिहिली. कोल्हटकरांनी नाटकांसाठी विषय सामाजिक घेतले तरी कथानके सर्व कल्पनारम्य अशी रचली. वास्तवाशी त्यांचा कसलाही संबंध त्यांनी ठेवला नाही. संभवनीयता, असंभवनीयता यांकडेही त्यांनी लक्ष दिले नाही. तरीही १८९६ ते १९१० या काळात किर्लोस्कर मंडळीच्या रंगभूमीवर त्यांच्या नाटकांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर कोल्हटकरांचा काळ संपला. त्यांच्या नाटकांत विनोद आहे, व्यक्तिरेखा आहेत, पण हे सर्व कमालीचे कृत्रिम आहे. त्यामुळे वाङ्मयकलेच्या दृष्टीने त्या नाटकांना आज महत्त्व नाही.
 कोल्हटकरांच्या बरोबरच कृ. प्र. खाडिलकर उदयास येत होते. 'सवाई माधवरावाचा मृत्यू' हे त्यांचे पहिले नाटक. हेच खरे कलासंपन्न असे ऐतिहासिक नाटक होय. त्यांच्या 'कांचनगडची मोहना' या नाटकाला इतिहासाचा आधार जवळजवळ नाहीच. पण तेही त्या काळी खूप गाजले. खाडिलकरांचे सर्वोत्तम नाटक म्हणजे 'भाऊबंदकी'. रघुनाथराव व नारायणराव यांच्या भाऊबंदकीतून त्यांनी त्या काळच्या राजकीय भिन्नपक्षांचे पडसाद उमटविले आहेत. संवाद, व्यक्तिरेखा या सर्वच दृष्टींनी हे नाटक अमाप कीर्ती मिळवून गेले. 'कीचकवध' हे पौराणिक नाटक त्यांनी कर्झनशाहीच्या जुलमावर लिहिले आहे. प्रा. फडके यांच्या मते, जागतिक कीर्ती मिळावी, इतके ते नाटक उत्तम आहे. त्यातील कीचक हा लोकांना मूर्तिमंत कर्झन वाटे. यामुळेच सरकारने ते नाटक जप्त केले. त्यानंतर खाडिलकरांनी संगीत नाटके लिहिण्यास प्रारंभ केला आणि बालगंधर्वांनी ती नाटके कसोशीने रंगभूमीवर आणल्यामुळे खाडिलकरांची आजची सर्व कीर्ती त्यांच्या संगीत नाटकांवरच उभी आहे. मानापमान, विद्याहरण व स्वयंवर ही त्यांची नाटके फारच गाजली. खरे पाहता नाट्यकलेच्या दृष्टीने ही नाटके सुमार आहेत. पण लोकांना मोहिनी आहे ती त्यातील संगीताची. त्यामुळे ती नाटके खरीखुरी खाडिलकरांची नसून बालगंधवांचीच आहेत, असे म्हणावेसे वाटते. त्यांची मेनका, सावित्री, द्रौपदी ही नाटके फारच हीन दर्जाची आहेत. काही काळ संगीतामुळे व गंधर्वामुळे ती रंगभूमीवर चालली, पण आज लोक त्यांना विसरून गेले आहेत आणि ती त्याच लायकीची आहेत. या सर्व दृष्टींनी पाहता किर्लोस्करांचे सौभद्र व देवलांची शारदा व संशयकल्लोळ हीच नाटके नाट्यकलेच्या दृष्टीने जास्त सरस आहेत. तशी कला भाऊबंदकी हा अपवाद वगळता कोल्हटकर व खाडिलकर या दोघांनाही साधली नाही.
 गडकरी हे स्वतः कोल्हटकरांचे शिष्य म्हणवीत. आणि त्यांची नाटके अगदी निराळ्या धर्तीची असली तरी, कल्पनारम्य, अद्भुत, अवास्तव प्रसंग नाटकात खेचून भरण्यात त्यांनी गुरूचेच अनुकरण केले आहे. 'प्रेमसंन्यास' नाटकात त्यांनी विधवाविवाहाचा विषय हाताळला आहे. पण तत्कालीन वास्तव जगाचे हे चित्र आहे, असे कधीच वाटत नाही. 'पुण्यप्रभाव' हे नाटक तर येथून तेथून कल्पनारम्यतेच्या वातावरणातच आहे. 'भावबंधना'त वास्तवतेचा स्पर्श जरा जाणवतो आणि 'एकच प्याला' हे बरेचसे वास्तववादी नाटक झाले आहे. गडकऱ्यांच्या नाटकात असे दोष असले तरी करुण आणि हास्य यावर त्यांचे विलक्षण प्रभुत्व असल्यामुळे त्यांची भावबंधन व एकच प्याला ही नाटके आजही प्रभावी राहिली आहेत. प्रेमसंन्यास व पुण्यप्रभाव यात मथुरा, गोकुळ, कंकण, किंकिणी, नूपुर यांच्या विनोदालाच पुष्कळ वेळा प्राधान्य येते. भावबंधन व एकच प्याला यात उगीचच दोन कथानके त्यांनी एकत्र केली आहेत. एकच प्याला या नाटकात विधवाविवाहाच्या प्रश्नाचे प्रवेश येण्यात कसलेच स्वारस्य नाही. तळिराम व त्याचे सगेसोबती यांना विषयात निश्चित स्थान आहे. पण त्यांच्या प्रवेशाला अवास्तव महत्त्व आल्यामुळे केव्हा केव्हा विरस होतो. तरीही वर सांगितल्याप्रमाणे करुण आणि हास्य यांच्या बळावर गडकऱ्यांची नाटके मराठीत कायम प्रभावी राहतील असे वाटते.
 गडकऱ्यांची नाटके चालू असतानाच वरेरकरांचा नाट्यसंसार सुरू झाला होता. 'कुंजविहारी' हे त्यांचे पहिले नाटक. त्यानंतर 'हाच मुलाचा बाप', 'संन्याशाचा संसार', 'सत्तेचे गुलाम', 'तुरुंगाच्या दारात' ही त्यांची नाटके बरीच गाजली. यांत सामाजिक व क्वचित राजकीय समस्या त्यांनी हाताळल्या आहेत; पण अवास्तव, कल्पनारम्य घटनांचा त्यांनी भरपूर उपयोग केला आहे. वरेरकरांच्या अखेरीपर्यंत या दोषांतून मराठी नाटक सुटले नव्हते. त्याला सोडविले ते 'नाट्यमन्वंतर' या संस्थेच्या 'आंधळ्यांची शाळा' या नाटकाने. 'मराठी नाटक आज रंगभूमीवर अवतरले,' असे ते पाहून प्रेक्षकांना वाटले. पण दुर्दैवाने 'नाट्यमन्वंतर' पुढे टिकले नाही. अगदी अल्पावकाशात ते विराम पावले.
 १९३० नंतर प्र. के. अत्रे यांचे युग सुरू झाले. 'साष्टांग नमस्कार' हे त्यांचे पहिले नाटक. त्याने मराठी रंगभूमीचे रूपच पालटून टाकले. त्यानंतर 'भ्रमाचा भोपळा', 'लग्नाची बेडी', 'पराचा कावळा', 'घराबाहेर', 'उद्याचा संसार', 'वंदे मातरम्', अशी नाटके त्यांनी लिहिली व सिनेमामुळे पडता काळ आलेल्या मराठी रंगभूमीला सावरून धरले. त्यांची बहुतेक नाटके विनोदप्रधान आहेत. पण 'घराबाहेर' व 'उद्याचा संसार' यात त्यांनी सामाजिक समस्याही हाताळल्या आहेत. पण एकंदरीत पाहता विनोद हाच अत्र्यांच्या नाटकाचा स्थायी भाव आहे.
 अत्रे यांच्यानंतर मराठी रंगभूमीला सावरण्याचे कार्य मोतीराम गजानन रांगणेकर यांनी केले. 'आशीर्वाद', 'कुलवधू', 'नंदनवन', 'माझे घर', 'वहिनी' ही त्यांची नाटके त्या वेळी पुष्कळ लोकप्रिय होती. विशेषतः 'कुलवधू' हे नाटक त्या वेळी फारच गाजत होते. चित्तवेधक संवाद व नवी सजावट यामुळे मराठी रंगभूमी त्यांनी खूपच बदलून टाकली. शिवाय नाटक हे वाचण्यासाठी नसून पाहण्यासाठी आहे, हा कटाक्ष ठेवून त्यांनी नाटके लिहिल्यामुळे त्यांच्या नाटकांत 'नाट्य' पुष्कळच साधले आहे. त्यांचा विनोदही अकृत्रिम व प्रसंगनिष्ठ असतो. त्यामुळे रांगणेकरांना नाट्यसृष्टीत बरेच वरचे स्थान आहे.
 माधव नारायण जोशी यांनी एके काळी नाट्यसृष्टी पुष्कळच गाजविली. 'स्थानिक स्वराज्य', 'वऱ्हाडचा पाटील', 'गिरणीवाला', 'पैसाच पैसा', 'प्रो. शहाणे' ही त्यांची नाटके. सामाजिक दोष हेरून त्यावर विडंबनात्मक टीका करण्यात त्यांचा हातखंडा होता. विशेषतः 'स्थानिक स्वराज्या'त हा त्यांचा गुण विशेष दिसून येतो. विकृती, अतिशयोक्ती इ. विनोदी साधनांच्या आश्रयाने त्यांनी सामाजिक दोषांवर मर्मभेदक टीका केली आहे. पण त्यांच्या नाटकांत अनेक वेळा फार अश्लीलता येते. हे गालबोट वगळता एके काळी ते एक मोठे सामाजिक टीकाकार होते असे म्हणावयास हरकत नाही.

गद्य रंगभूमी
 संगीत रंगभूमीचा असा विकास होत असताना गद्य रंगभूमीनेही आपले कार्य तितक्याच जिद्दीने चालविले होते. पण एक गोष्ट खरी की महाराष्ट्राने संगीत नाटकांना जो पुरस्कार दिला तसा गद्य नाटकांना दिला नाही. एका अर्थाने संगीताने नाटकातील समरप्रसंगाचा वेग, अभिनय यांची हानी होते. गद्य नाटकात हे होत नसल्यामुळे खरे नाट्य तेथेच पाहावयास मिळते. तरी मराठी जनतेने उचलून धरले ते संगीत रंगभूमीलाच. अशाही स्थितीत गद्य रंगभूमीने जे यश मिळविले तेच जास्त होय असे म्हटले पाहिजे. १८८० सालीच शंकरराव पाटकर व देवल यांनी 'आर्योद्धारक' नाट्यसंस्था स्थापन केली. ती फार दिवस चालली नाही. पण तिच्या परंपरेतूनच 'शाहू नगरवासी' या गद्य नाटक मंडळीची स्थापना झाली. या मंडळीने 'हॅम्लेट', 'मानाजीराव', 'झुंझारराव', 'त्राटिका' ही शेक्सपियरची अनुवादित नाटके, 'तुकाराम', 'नामदेव' ही संतचरित्रावरची नाटके व 'राणा भीमदेव' हे वीररसप्रचुर नाटक रंगभूमीवर आणले. यातील गणपतराव जोशी यांची कीर्ती त्यांच्या हॅम्लेटच्या भूमिकेमुळे अमर झाली आहे. गणपतराव जोशी व हॅम्लेट ही नावे महाराष्ट्रात एकरूपच झाली आहेत. बाळाभाऊ जोग हे असेच असामान्य नट होते. अभिनयाच्या गुणांमुळे त्यांनी नायिकांच्या भूमिकांतून गणपतरावांच्या बरोबरीने यश मिळविले होते. सतत तीस वर्षे या जोडीने गद्य रंगभूमीवर अद्वितीय असे कर्तृत्व करून दाखविले.

महाराष्ट्र नाटक मंडळी
 १९०४ मध्ये 'महाराष्ट्र नाटक मंडळी' ही दुसरी गद्य मंडळी स्थापन झाली. तिला 'कीचकवध', 'भाऊबंदकी' इ. खाडिलकरांची नाटके लाभल्यामुळे एकदम कीर्ती मिळाली. कारखानीस, टिपणीस बंधू, त्र्यंबकराव प्रधान व गणपतराव भागवत हे या यशाचे प्रमुख मानकरी होते. हॅम्लेट व गणपतराव जोशी हे जसे एकरूप झाले होते तसेच कीचक व भागवत एकरूप झाले होते. त्या वेळी त्यांनी सारा महाराष्ट्र भारून टाकला होता. याच परंपरेत पुढे गणपतराव बोडस, नानासाहेब फाटक, चिंतामणराव कोल्हटकर, दिनकर कामण्णा, भांडारकर या नटांनी अलोट कीर्ती मिळविली. 'बेबंदशाही', 'शिवसंभव', 'कृष्णार्जुनयुद्ध', 'विचित्र लीला', 'चंद्रग्रहण', 'हाच मुलाचा बाप' ही गद्य नाटके त्या वेळी खूपच यशस्वी झाली. त्यांतील प्रमुख कलाकार केशवराव दाते, पोतनीस, नानबा गोखले, टिपणीस बंधू हे होत. यांत केशवराव दाते हे अग्रगण्य होत. त्यांचे अभिनयनैपुण्य लोकोत्तर होते. पुढे चित्रपटांतही त्यांनी याच गुणामुळे अलौकिक यश मिळविले.

ऐतिहासिक नाटके
 मराठीत ऐतिहासिक नाटकांची परंपराही उपेक्षणीय नाही. 'थोरले माधवराव पेशवे' हे कीर्तने यांचे पहिले ऐतिहासिक मराठी नाटक. वासुदेवशास्त्री खरे यांची 'शिवसंभव', 'गुणोत्कर्ष' व 'तारामंडळ' ही तीन नाटके. यांतील 'शिवसंभव' हे एका काळी बरेच गाजले होते. खाडिलकर यांचे 'सवाई माधवराव पेशवे' व 'भाऊबंदकी' यांचा उल्लेख वर आलाच आहे. औंधकरांचे 'बेबंदशाही' हे गडकऱ्यांच्या 'राजसंन्यास' याच विषयावर लिहिलेले आहे. पण ते पुष्कळ प्रभावी ठरले. केळकरांची 'अमात्यमाधव', 'चंद्रगुप्त' व 'तोतयाचे बंड' ही तीन ऐतिहासिक नाटके. त्यांतले 'तोतयाचे बंड' हे आपल्या गुणांनी सर्व ऐतिहासिक नाटकांत मूर्धस्थानी आहे. सावरकरांची 'संन्यस्त खड्ग', 'उत्तरक्रिया' ही नाटके फार प्रचारकी झाली आहेत. टिपणीस यांची 'चंद्रग्रहण', 'शहाशिवाजी' ही नाटके सुमार आहेत. मराठीत ऐतिहासिक नाटके इतकी झाली, पण इतिहासाचे मर्म उकलून दाखविण्याचे सामर्थ्य त्यांतल्या एकालाही नाही. त्या दृष्टीने पाहता सामाजिक नाटकांचे तसेच आहे. हरिभाऊंच्या 'पण लक्षात कोण घेतो' व 'मी' या कादंबऱ्यांचा जो परिणाम होतो तसा मराठीतल्या 'शारदा' हा अपवाद वगळता एकाही सामाजिक नाटकाचा होत नाही. त्यामुळे एकंदर मराठी नाट्यसृष्टी ही करमणूकप्रधान अशीच भासते. मोठमोठे ऐतिहासिक वा सामाजिक प्रश्न हाताळण्याचे सामर्थ्य तिच्यात नाही असे खेदाने म्हणावे लागते.
 याच वेळी नाट्यकलेचा शतसांवत्सरिक महोत्सव झाला व त्यातून उत्तेजन मिळून पुन्हा नाट्यकला सावरली. वसंत कानेटकर, बाळ कोल्हटकर, पु. ल. देशपांडे, दारव्हेकर, विजय तेंडुलकर, शिरवाडकर असे नवे नाटककार उदयास आले आणि भालबा केळकर, डॉ. लागू, विजया मेहता, जयमाला शिलेदार, तोरडमल, दाजी भाटवडेकर, काशिनाथ घाणेकर, राम मराठे, मा. दत्ताराम, प्रसाद सावकार, रामदास कामत, प्रभाकर पणशीकर, बाबूराव गोखले, गणेश सोळंकी, श्रीकांत मोघे, भालचंद्र पेंढारकर, दादा कोंडके, निळू फुले, धुमाळ, शरद तळवलकर, वसंतराव देशपांडे, अरुण सरनाईक, आशालता वाबगावकर, सुधा करमरकर, फैयाज, नलिनी चोणकर, पुष्पा भोसले, पद्मा चव्हाण, निर्मला गोगटे, कुसुम शेंडे, आशा काळे, कीर्ती शिलेदार, ललिता जोगळेकर, सीमा, ज्योत्स्ना मोहिले, लता काळे, इंदुमती पैंगणकर या नटनट्यांचा उदय झाला.
 या कामी मुंबई मराठी साहित्यसंघ व प्रोगेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. वरील उज्जीवनाचे बरेचसे श्रेय त्यांना आहे.
 सुहासिनी मुळगावकर व पु. ल. देशपांडे यांचे एकपात्री प्रयोग हाही या काळातला एक अभिनव प्रकार उल्लेखनीय आहे. त्याने नाट्यकलेला एक अगदी निराळे वळण लावले.
 या काळात विशेष गाजलेली नाटके म्हणजे 'हिमालयाची सावली', 'नटसम्राट', ,प्रेमा तुझा रंग कसा ?', 'मला काही सांगायचंय', 'अश्रूंची झाली फुले', 'तो भी नव्हेच', 'रायगडला जेव्हा जाग येते', 'वेड्याचे घर उन्हात', 'तुझे आहे तुजपाशी', 'वाहतो ही दुर्वाची जुडी', 'गारंबीचा बापू', 'शांतता! कोर्ट चालू आहे', 'अशी पाखरे येती' ही होत. याच काळात संगीत रंगभूमीचाही पुनरुद्धार झाला व 'होनाजी बाळा', 'पंडितराज जगन्नाथ', 'मंदारमाला', 'कटयार काळजात घुसली' इ. नाटके लोकप्रिय झाली.
 मराठी नाट्यसृष्टीचे स्वरूप हे असे आहे. हे वैभव मोठे आहे, स्पृहणीय आहे. यात आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते. मराठी रंगभूमी केवळ करमणूकप्रधान आहे असे वर म्हटले आहे. पण वर उल्लेखिलेली अलीकडची 'हिमालयाची सावली' इ. जी गद्य नाटके ती जीवनभाष्यही मार्मिक रीतीने करीत आहेत असे दिसते. त्या दृष्टीने मागल्या सामाजिक नाटकांच्या तुलनेने त्यांची उंची मोठी वाटते. तेव्हा मराठी रंगभूमीची उत्तरोत्तर प्रगती होत जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही.

चित्रपट
 चित्रपट कला ही नाट्यकलेइतकीच मोठी महत्त्वाची आहे. मराठी कलावंतांनी या कलेतही मोठी कीर्ती व नाव मिळविले आहे. या कलेचे आद्यप्रवर्तक म्हणजे दादासाहेब फाळके हे होत. १९११ साली महाराष्ट्रात पाश्चात्य चित्रपट येऊ लागले. त्यापासून दादासाहेबांना स्फूर्ती मिळाली. १९१२ साली साधनसामग्री जमविण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि परत येऊन १९१३ साली त्यांनी 'राजा हरिश्चंद्र' हा मराठीतला पहिला चित्रपट काढला. ती पौराणिक कथा प्रत्यक्ष पडद्यावर येताच तिला अमाप कीर्ती मिळाली. यानंतर 'भस्मासुर मोहिनी' व 'सावित्री' हे दोन चित्रपट दादासाहेबांनी काढले. ते महाराष्ट्रात तर लोकप्रिय झालेच. पण दादासाहेबांनी ते इग्लंडला नेऊन दाखविले तेव्हा तेथेही त्यांचे फार कौतुक झाले. त्यानंतर दादासाहेबांनी एकंदर १७ चित्रपट तयार केले. भांडवलाचा पुरवठा व्यवस्थित व्हावा म्हणून त्यांनी 'हिंदुस्थान फिल्म कंपनी'ही काढली. पण ती फार चालली नाही आणि दादासाहेबांचा सुवर्णकाळ लवकरच संपला. दादासाहेब हे केवळ चित्रपटाचे निर्माते नव्हते, तर रंगभूषाकार, छायाचित्रकार, नेपथ्यकार व तंत्रज्ञही तेच होते. यामुळे भारतात चित्रपटयुगाचे प्रवर्तक म्हणून त्यांना मिळालेला मान सर्वथैव योग्यच आहे.
 दादासाहेबांच्या सारखेच दुसरे मोठे चित्रपटकार म्हणजे बाबूराव पेंटर हे होत. १९१९ साली त्यांनी कोल्हापूर येथे 'महाराष्ट्र फिल्म कंपनी'ची स्थापना केली व 'सैरंध्री' हा पहिला चित्रपट काढला. तो इतका उत्तम निघाला की तो पाहून लो. टिळकांनी बाबूरावांना 'सिनेमाकेसरी' अशी पदवी दिली. चित्रपटाचे दिग्दर्शन, छायालेखन, नेपथ्य सर्व बाबूरावांनीच केले होते. इतकेच नव्हे, तर कॅमेरा त्यांनी स्वतःच बनविला होता. फाळके यांच्या चित्रपटापेक्षा बाबूरावांचे चित्रपट अनेक दृष्टींनी सरस होते. केवळ चमत्कृतीपेक्षा अभिनय, कथानकाची कलात्मक मांडणी, त्याद्वारा लोकांना काही संदेश देणे या गोष्टीकडे बाबूराव अधिक लक्ष देत. तेव्हा ध्येयवादी व कलात्मक चित्रपटांची परंपरा बाबूराव पेंटरांच्यापासूनच सुरू झाली.
 सैरंध्रीनंतर 'सुरेखा अभिमन्यू', 'वत्सलाहरण' हे चित्रपट महाराष्ट्र फिल्म कंपनीने काढले. आणि त्यानंतर इतिहासाकडे दृष्टी वळवून हरिभाऊ आपटे यांच्या कादंबरीच्या आधारे 'सिंहगड' हा नरवीर तान्हाजीच्या हौताम्यावर चित्रपट काढला. हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय झाला. त्यानंतर १९२५ साली सुप्रसिद्ध 'सावकारी पाश' हा चित्रपट बाबूरावांनी काढला. हा पहिला सामाजिक चित्रपट होय. चंद्रकांत व विष्णुपंत औंधकर यांच्या भूमिकांमुळे हा अत्यंत यशस्वी झाला.

'प्रभात'
 या वेळी व्ही. शांताराम, केशवराव धायबर, एस. फत्तेलाल व विष्णुपंत दामले हे कलाकार 'महाराष्ट्र फिल्मकंपनी'तच होते. पण बाबूरावांशी न जमल्यामुळे ते बाहेर पडले व त्यांनी कोल्हापूरलाच १९२९ साली 'प्रभात फिल्म कंपनी'ची स्थापना केली व थोड्याच काळात 'गोपाळकृष्ण' हा प्रभातचा पहिला चित्रपट पडद्यावर आला. त्याने 'प्रभात'ला एकदम कीर्ती मिळवून दिली.

बोलपट
 यानंतर बोलपटाचे युग सुरू झाले. तेव्हा त्यांचा सांगोपांग अभ्यास करून प्रभात कंपनीने 'अयोध्येचा राजा' हा पहिला बोलपट काढला. यात हरिश्चंद्राचे काम गोविंदराव टेंबे यांनी, तारामतीचे काम दुर्गाबाई खोटे यांनी आणि खलनायक गंगानाथ महाजन याचे काम बाबूराव पेंढारकर यांनी केले होते. ही सर्व कामे अप्रतिम झाली. शिवाय व्ही. शांताराम यांचे दिग्दर्शन, फत्तेलाल यांची सजावट व धायबर यांचे छायालेखन यामुळे प्रारंभीच्याच या बोलपटाला उदंड यश मिळाले. यानंतर 'मायामच्छिंद्र' हा चित्रपट प्रभातने काढला, तोही यशस्वी झाला. १९३३ साली प्रभात फिल्म कंपनी पुण्यास आली व तिने प्रथम एकनाथाच्या जीवनावर 'धर्मात्मा' हा चित्रपट काढला. त्यात बालगंधर्वांनी एकनाथांचे काम केले होते. पण तो व्हावा तितका यशस्वी झाला नाही. पण त्यानंतर दर्यावर्दी जीवनावर शांतारामबापूंनी काढलेला 'अमरज्योती' हा चित्रपट, त्यातील नावीन्यामुळे, फारच लोकप्रिय झाला. 'अमरज्योती' नंतरचा प्रभातचा चिरस्मरणीय चित्रपट म्हणजे 'तुकाराम' हा होय. त्याचे दिग्दर्शक दामले व फत्तेलाल, संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे, सर्वांगीण दिग्दर्शक शांताराम बापू व राजा नेने, कथासंवाद- शिवराम वाशीकर, गीतलेखकशांताराम आठवले आणि मुख्य कलाकार- विष्णुपंत पागनीस असे होते. याची भारतात तर कीर्ती झालीच पण जागतिक चित्रस्पर्धेतही याला तिसरे पारितोषिक मिळाले. यातील जिजाऊची भूमिका गौरीबाई यांनी आणि सालोमालोची भूमिका काका भागवत यांनी केली होती. यानंतर प्रभातने तीन सामाजिक विषयांवर चित्रपट काढले. 'कुंकू', 'माणूस' व 'शेजारी' हे ते चित्रपट होत. हे चित्रपट म्हणजे प्रभातच्या सांघिक कलाकीर्तीचे दीपस्तंभ होत. यांचे दिग्दर्शन शांतारामबापूंनी केले होते. कथा अनुक्रमे ना. ह. आपटे, अनंत काणेकर व विश्राम बेडेकर यांच्या होत्या. 'कुंकू' व 'माणूस' चे संगीत केशवराव भोळे यांचे व 'शेजारी' याचे मास्टर कृष्णराव यांचे होते. कुंकुमध्ये प्रमुख भूमिका केशवराव दाते व शांता आपटे यांच्या होत्या. त्या अगदी अविस्मरणीय आहेत. माणूसमध्ये शाहू मोडक व शांता हुबळीकर यांनी व शेजारीमध्ये केशवराव दाते व गजानन जागीरदार यांनी अशाच उत्तम भूमिका केल्या आहेत.

'रामशास्त्री'
 यानंतर प्रभातने 'माझा मुलगा', 'ज्ञानेश्वर' इ. चित्रपट काढले. तेही प्रभातच्या कीर्तीला साजेसेच होते. पुढे शांतारामबापू यांनी प्रभात कंपनी सोडली व 'राजकमल' ही कंपनी मुंबईस काढली. प्रभातने यानंतर उत्कृष्ट चित्रपट काढला तो म्हणजे 'रामशास्त्री' हा होय. यातील गजानन जागीरदार यांची रामशास्त्री यांची भूमिका लोक कधीही विसरणार नाहीत.
 प्रभातच्या 'अयोध्येच्या राजा'ची कीर्ती गाजत असतानाच 'सरस्वती सिनेटोन'चे दादासाहेब तोरणे यांनी 'शामसुंदर' हा चित्रपट काढला. त्याची कथा व दिग्दर्शन भालजी पेंढारकर यांचे, तर राधा व कृष्ण यांच्या भूमिका शांता आपटे व शाहू मोडक यांच्या होत्या. हा बोलपट २२ आठवडे एकाच चित्रमंदिरात चालला. अशी अपूर्व लोकप्रियता याला मिळाली. सरस्वती सिनेटोनचा यानंतरचा 'भक्त प्रल्हाद' हा चित्रपट असाच गाजला.
 प्रभातने कोल्हापूर सोडल्यावर शाहू महाराजांच्या आश्रयाने मेजर दादासाहेब निंबाळकर, भालजी पेंढारकर, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी 'कोल्हापूर सिनेटोन' ही कंपनी काढली. तिने अल्पावधीतच श्रीकृष्णचरित्रावर 'आकाशवाणी' हा लोकप्रिय चित्रपट काढला व नंतर वरेरकरांच्या कथेवर आधारित असा 'विलासी ईश्वर' हा चित्रपट काढला.

'हंस चित्र'
 पण थोड्याच अवधीत भालजी पेंढारकर, बाबूराव पेंढारकर व मास्टर विनायक हे कोल्हापूर सिनेटोनमधून बाहेर पडले व त्यांनी 'हंस चित्र' नामक नवी चित्रसंस्था काढली. त्यांनी प्रथम खांडेकरांच्या कथेवर 'छाया' हा चित्रपट काढला. त्याचे दिग्दर्शन मास्टर विनायक यांनी केले. आणि प्रमुख भूमिका लीला चिटणीस, बाबूराव पेंढारकर व विनायक यांनी केल्या. या सर्वांच्या प्रभावामुळे 'छाया' चित्रपटाला फार लोकप्रियता लाभली. पुढे अत्रे यांच्या अत्यंत प्रभावी कथा हंस चित्राला मिळाल्या. त्यांनी प्रथम 'धर्मात्मा' हा चित्रपट काढला व नंतर 'ब्रह्मचारी' तयार केला. या चित्रपटाने तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. यातील मास्टर विनायक, मीनाक्षी व दामुअण्णा मालवणकर यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या आहेत. यानंतर हंसचित्राने 'ब्रँडीची बाटली', 'देवता', 'सुखाचा शोध', 'अर्धांगी' असे एकाहून एक नावीन्यपूर्ण चित्रपट काढले. यांच्या कथा खांडेकर व अत्रे यांच्या आहेत व भूमिका मा. विनायक, मीनाक्षी, बाबूराव पेंढारकर, साळवी, दामुअण्णा मालवणकर या अव्वल नटांच्या आहेत, इतके सांगितले की पुरे.
 हे युग चित्रपटांच्या अमाप लोकप्रियतेचे असल्यामुळे नवयुग, अत्रे पिक्चर्स, अरुण स्टुडिओ (भालजी पेंढारकर) अशा कंपन्या भराभर निघाल्या व त्यांनी पायाची दासी, गोरखनाथ, थोरातांची कमळा असे चित्रपट काढले. त्यांत के. नारायण काळे (दिग्दर्शक), वनमाला (नटी), ग. दि. माडगूळकर (गीतकार) असे नवे कलाकार उदयास आले.
 यानंतरच्या स्वातंत्र्याच्या काळात जयमल्हार, रामजोशी, होनाजी बाळा, अमर भूपाळी, पेडगावचे शहाणे, लाखाची गोष्ट, ऊनपाऊस, जगाच्या पाठीवर, वहिनींच्या बांगड्या, छत्रपती शिवाजी, वासुदेव बळवंत, महात्मा फुले असे अनेक उत्तम चित्रपट निघाले व त्यांतूनच राजा परांजपे, सुलोचना, दत्ता धर्माधिकारी, राजा गोसावी, ललिता पवार, हंसा वाडकर, विश्वास कुंटे, वसंत देसाई, सुधीर फडके असे अनेक कलाकार उदयास आले. या काळातला 'श्यामची आई' (साने गुरुजी) हा आचार्य अत्रे यांचा चित्रपट विशेष उल्लेखनीय आहे. त्याला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले. 'सांगत्ये ऐका' हा अनंत माने यांचा चित्रपट एकशे एकतीस आठवडे चालला व त्याने मागले सगळे उच्चांक मोडून टाकले.
 स्वातंत्र्योत्तर काळात मराठी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तमोत्तम कलावंतांचा व तंत्रज्ञांचा लाभ झाला. त्यांत, राजा परांजपे, राम गबाले, अनंत माने, राजा ठाकूर, शांताराम आठवले, माधव शिंदे, दिनकर पाटील, राजदत्त यांच्यासारखे दिग्दर्शक; ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, ग. रा. कामत, मधुसूदन कालेलकर, मधुकर पाठक, पु. ल. देशपांडे यांसारखे उत्कृष्ट पटकथा लेखक; पं. महादेवशास्त्री जोशी, पु. भा. भावे, अरविंद गोखले, द. र. कवठेकर, य. गो. जोशी यांसारखे कथालेखक; सुधीर फडके, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम, दत्ता डावजेकर, यांसारखे संगीत दिग्दर्शक; ग. दि. माडगूळकर, जगदीश खेबुडकर, संजीव इ. गीतलेखक; ई. महंमद, दत्ता गोर्ले, बाळ बापट, अरविंद लाड इ. छायालेखक हे अग्रगण्य होत.
 पण असे असूनही मराठी चित्रपटसृष्टी आता निष्प्रभ होत चालली आहे असे जाणकार म्हणतात. हिंदी चित्रपटांत हाणामाऱ्या, हीन भावनांना आवाहन, कमालीची कृत्रिमता यांचा हैदोस मुरू आहे. त्यांच्याशी स्पर्धा करताना मराठी चित्रपट टिकत नाहीत. म्हणून त्यांनीही आपली पायरी सोडून खाली उतरायला सुरुवात केली आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.

नृत्य : प्राचीन परंपरा
 आता नृत्यकलेचा विचार करू. भारतामध्ये वेदकालापासून किंवा कदाचित त्याच्याही पूर्वीपासून नृत्यकलेचा शास्त्रोक्त अभ्यास होत असे, असे दिसते. वेद, ब्राह्मणे या ग्रंथांत नृत्याचे उल्लेख आहेत व त्याचा महिमाही वर्णिला आहे. यज्ञप्रसंगी नृत्य करण्याची प्रथा होती. शिव आणि पार्वती या दोन देवता तांडव आणि लास्य (नाजूक नृत्य) यांसाठी प्रसिद्ध आहेत. गंधर्व आणि अप्सरा या जमातींची नृत्यगायनासाठीच कीर्ती आहे. ऊर्वशी, मेनका, रंभा, तिलोत्तमा या इंद्राच्या नृत्यांगनांचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. नृत्यावरचा पहिला शास्त्रीय ग्रंथ 'नटसूत्रे' हा होय. शिलाली या पंडिताने तो इ. स. पूर्व ५०० च्या सुमारास लिहिला. त्यानंतरचा ग्रंथ म्हणजे नंदिकेश्वराचा 'भरतार्णव' होय. भरताच्या 'नाट्यशास्त्रा'त प्रामुख्याने नाटकाचेच विवेचन असले तरी नृत्याचाही विचार त्यात सविस्तर केला आहे. पुराणांमध्ये विष्णुधर्मोत्तर पुराण व अग्निपुराण यांनी नृत्यकलेची चर्चा केली आहे. शार्ङ्धराच्या 'संगीत रत्नाकरा'तही नृत्यकलेचे विवेचन आढळते. त्यानंतर सर्वच क्षेत्रांत ऱ्हासकाळ आला, तसाच तो नृत्यकला व तीवरील ग्रंथ यांनाही आला.
 महाराष्ट्रातील नृत्यकलेचा विचार सातवाहन ते यादव या कालखंडातील एका प्रकरणात केलाच आहे. त्या काळी नृत्य-संगीताला राजाश्रय तर होताच, पण अनेक राजस्त्रियाही स्वतः नृत्यकुशल होत्या. शिवाय वेरूळ, अजंठा येथील कोरीव लेण्यांत अनेक नृत्यमूर्ती आढळतात. यावरून त्या काळी ही कला किती महत्त्व पावली होती, ते कळून येते.
 मुसलमानी आक्रमणानंतर या कलेचा ऱ्हास झाला. ठाकूर, कातकरी, भिल्ल इ. आदिवासी जमाती फेर धरून नृत्य करतात हे खरे, पण ते ठरीव आणि साचेबंद असून त्यात आत्माविष्कार व भावनाविष्कार नसल्यामुळे तिला नृत्यकला म्हणता येत नाही. स्त्रियांच्या फुगड्या, झिम्मा इ. खेळांचा दर्जा जरा वरचा आहे. पण तीही कला नव्हे. मराठा कालात तमाशात नृत्य केले जात असे. पण, रोहिणी भाटे यांच्या मते, त्याची पातळी आणखी वरची असली तरी ती कला नव्हे.
 आज कथ्थक, मणिपुरी, भरतनाट्य व कथाकली अशा चार नृत्यपरंपरा भारतात अभ्यासल्या जात आहेत. या विशिष्ट पद्धती तेराव्या शतकानंतर वेगळ्या झाल्या व त्यांना नावेही तेव्हाच मिळाली. त्यातील दोन उत्तरेकडच्या व दोन दक्षिणेकडच्या आहेत. महाराष्ट्राने स्वतःची अशी स्वतंत्र नृत्यपद्धती जोपासलेली नाही. वरील पद्धती महाराष्ट्रात आल्या त्या ब्रिटिश कालात.

गोमांतक
 गोमांतक हे सर्व कलांचे माहेरघर आहे त्याचप्रमाणे नृत्यकलेचेही आहे. गोमांतकात जेवढ्या म्हणून नामांकित गायिका झाल्या त्यांपैकी बहुतेक चांगल्या नर्तिकाही होत्या. तथापि नृत्यकलेत विशेष प्रावीण्य मिळविले त्या गायिका म्हणजे ताराबाई कुमठेकर या होत. त्या बिहारीलाल व पूरणलाल यांच्या शिष्या होत. विसाव्या शतकाच्या आरंभी त्यांचे नाव विशेष गाजले होते. जनाबाई साखळकर या अशा दुसऱ्या नर्तकी होत. भास्करबुवा, वझेबुवा यांसारखे नांमांकित गवईही त्यांचा मुक्तकंठाने गौरव करीत. चंद्रकलाबाई यांनी नृत्याची विशेष साधना केली होती. भारतामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. चंपाबाई वाकळीक या कथ्थक नृत्यात प्रसिद्ध असून इंदूर, ग्वाल्हेर इ. ठिकाणी त्यांचे सत्कारही झालेले आहेत. नर्तकीप्रमाणे गोव्याचे नर्तकही प्रसिद्ध आहेत. धर्माजी जांबावलीकर हे जुन्या जमान्यातील नर्तक होत. हे कालिकाविंदाचे शिष्य. त्यांनी आपल्या नृत्याचा भारतभर दौरा काढला होता. दुसरे नर्तक म्हणजे राजाराम मांजरेकर. यांनी एकदा सिनेमासृष्टी गाजविली होती.
 मुंबईला जव्हेरी भगिनी आणि कनक रेळे या नर्तिकांनी मणिपुरी नृत्यात विशेष कीर्ती मिळविली आहे.
 मुंबई शहर व्यापारी शहर झाले व तेथे धनसमृद्धी झाली. त्यामुळे तेथे सर्व कलांना उदार आश्रय मिळू लागला. त्यामुळे उत्तरेकडचे मोठमोठे गायनाचार्य जसे मुंबईत व महाराष्ट्रात येऊन राहिले, तसेच अनेक मोठमोठे नृत्यविशारदही येथे येऊन राहिले. लच्छू महाराज, सुंदरप्रसाद, गौरीशंकर, गोपीकृष्ण, कृष्णन् कुट्टी, विपिन सिंह, गोविंदराज पिले इ. अनेक जाणकार मुंबईत वास्तव्य करून येथलेच झाले आहेत.
 यांच्या सहवासाने व त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन पार्वतीकुमार, मोहनराव कल्याणपूरकर, दमयंती जोशी इ. कलाकार आज या क्षेत्रात कार्य करीत आहेत. रोहिणी भाटे यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी पुण्याला नृत्यसंस्था स्थापून अनेक शिष्या तयार केल्या आणि महाराष्ट्रभर या कलेची अभिरुची निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. सुचेता जोशी, प्रभा मराठे यांची नावे सध्या सुप्रसिद्ध झाली आहेत.
 हा नृत्याचा विचार झाला. आता चित्र व शिल्प यांचा विचार करावयाचा.

चित्रकला
 महाराष्ट्रात अर्वाचीन काळी चित्रकलेचे उज्जीवन झाले ते १८५७ साली मुंबईला जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् या संस्थेच्या स्थापनेनंतर सर जमशेटजी जीजीभाई यांच्या उदार देणगीमुळे ही संस्था स्थापन झाली. अर्थात तेथे पाश्चात्य चित्रकलेचाच अभ्यास सुरू झाला. भारतीय चित्रकलेचा अभ्यास करण्याजोगे त्या वेळी येथे काही शिल्लकच नव्हते. अभ्यासक नव्हते, ग्रंथ नव्हते आणि त्यांची अभिरुची असलेले लोकही नव्हते. जुन्या भारतीय कलापरंपरा नष्ट झाल्या होत्या. त्यामुळे छायाप्रकाशाचे हुबेहूब चित्रण करणाऱ्या इंग्लंडमधील ॲकॅडेमिक शैलीतच भारतीय कलाकार चित्रनिर्मिती करू लागले. पुढे विख्यात महाराष्ट्रीय चित्रकारांची माहिती दिली आहे. तीवरून महाराष्ट्रीय चित्रकलेची कल्पना येईल.
 राजा रविवर्मा हे मूळ महाराष्ट्रीय नव्हेत. ते केरळीय होते. पण अल्लादियाखां- सारखे ते येथे येऊन महाराष्ट्राशी एकरूप झाले होते. त्यातही विशेष म्हणजे त्यांनी जी लक्ष्मी, सरस्वती या देवतांची व ऊर्वशी, मेनका या अप्सरांची चित्रे काढली त्यांत त्या स्त्रियांना त्यांनी नऊवारी लुगडे व चोळी हा संपूर्ण महाराष्ट्रीय स्त्रीचाच पोषाख दिला. स्त्रीला सौंदर्यदृष्टीने हाच पोशाख आदर्श होय, असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांची देवतांची चित्रे महाराष्ट्रात घराघरात गेली व सर्व महाराष्ट्रात ती अत्यंत लोकप्रिय झाली. इतकी लोकप्रियता दुसऱ्या कोणत्याही चित्रकाराला मिळाली नाही.
 रा. ब. महादेव विश्वनाथ धुरंधर हे जे. जे. स्कूलमधून बाहेर पडलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर महाराष्ट्रीय चित्रकार होत (१८६७- १९४४) भारतीयांची अलंकार- प्रधान शैली व पाश्चात्य वास्तववादी शैली यांचा सुरेख समन्वय धुरंधरांना साधला होता. ऑइल, वॉटर, पेन्सिल व इंक या सर्वच माध्यमांवर त्यांचे सारखेच प्रभुत्व होते. निसर्गचित्रण, फिगर ड्रॉइंग, स्केचिंग, पिक्चरकांपोझिशन, स्टिल लाइफ या सर्व प्रकारच्या चित्रणात त्यांचा हातखंडा होता. गतिमानता, प्रमाणबद्धता, भावपूर्णता व कलासंपन्नता ही त्यांच्या चित्रशैलीची वैशिष्ट्ये होत. अनेक देशी व विदेशी प्रदर्शनांत आपली चित्रे मांडून त्यांनी अनेक सुवर्णपदके व पारितोषिके मिळविली आहेत. रामायण, महाभारत, मेघदूत, शाकुंतल, भगवद्गीता इ. ग्रंथांतील प्रसंगांवर त्यांनी काढलेली चित्र विदेशांतही प्रशंसनीय ठरली. गौरी, नैवेद्य, सैरंध्री, लक्ष्मी, शिवाजीची मिरवणूक, राणी ताराबाई या त्यांच्या विशेष गाजलेल्या कलाकृती होत.
 आबालाल रहिमान हे धुरंधर युगातील मोठे कलोपासक होत. कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींच्या आश्रयाला ते होते. ते प्रामुख्याने निसर्गचित्रकार होते. प्रत्यक्ष अवलोकन व अभ्यास करून ते चित्रे काढीत. त्यामुळे त्यात जिवंतपणा असे. पंचगंगा घाट, कोटीतीर्थ, रावणेश्वर, हत्तीची टक्कर, रायबागचे देवालय ही त्यांची सर्वोत्कृष्ट चित्रे होत.
 श्री. म. केळकर हे धुरंधर युगातीलच चित्रकार होत. त्यांनी अनेक व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. अनेक कलाप्रदर्शनांत चित्रे मांडून त्यांनी पुरस्कार व बक्षिसे मिळविली. त्यांच्या व्यक्तिचित्रांना व्हाइसरॉय- सुवर्णपदकही मिळाले होते. कलेच्या उत्तेजनार्थ मुंबईला 'बॉम्बे आर्ट सोसायटी' स्थापन झालेली आहे. तिचे व 'आर्ट सोसायटी ऑफ इंडिया' या संस्थेचे ते तहाहयात सभासद होते.
 बाबूराव पेंटर हे कोल्हापुरातील एक अष्टपैलू कलावंत होते. त्यांनीच कोल्हापूरला कलापूर ही प्रतिष्ठा प्राप्त करून दिली; ते पोर्टेट पेंटिंगमध्ये अत्यंत निष्णात होते. त्यात कमालीचा हुबेहूबपणा असे. त्यांची पेन्सिल ड्रॉइंग्ज व मेमरी ड्रॉइंग्ज रेखीव, देखणी असत. लक्ष्मी, सरस्वती, दत्तात्रेय, ना मारो पिचकारी, मंदिराकडे अशी मोजकीच डिझाइन्स् त्यांनी केली. पण ती सगळीच कलादृट्या परिपूर्ण व सुंदर आहेत. बाबूराव शिल्पकारही होते. त्यांनी तयार केलेले महात्मा गांधी, शिवाजी, महात्मा फुले इ. बस्ट्स् प्रसिद्ध आहेत. बाबूराव पेंटर हे हरहुन्नरी कलावंत होते. ते चित्रकार, मूर्तिकार, तंत्रज्ञ, चित्रपट दिग्दर्शक, कॅमेरामन, संगीतमर्मज्ञ व सतारियेही होते. चित्रपटातील त्यांच्या कार्याचा उल्लेख मागे आलाच आहे.
 मुरलीधर आचरेकर हेही एक विख्यात चित्रकार आहेत. परदेशातही त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरत असत. मुंबईस 'आचरेकर ॲकॅडेमी ऑफ आर्टस्' ही सुप्रसिद्ध संस्था त्यांनी स्थापन केली असून बाँबे आर्ट्स् सोसायटीचे ते सदस्य आहेत. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे तर ते एके काळी अध्यक्ष होते. उत्कृष्ट व्यक्तिचित्रे रेखाटणे हे आचरेकरांचे वैशिष्ट्य आहे. जलरंगात चित्रे काढणारे त्यांच्यासारखे कलावंत जगात क्वचितच असतील. गोलमेज परिषद, दिल्लीदरबार, संयुक्त महाराष्ट्राची स्थापना ही त्यांची फार महत्त्वाची चित्रे होत. त्यांनी चित्रकलेवर अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.
 नारायण श्रीधर बेंद्रे यांची भारताच्या अग्रगण्य कलाकारांत गणना होते. सुरुवातीला त्यांनी यथातथ्य चित्रे रेखाटली. नंतरच्या काळात अमूर्त शैलीत रंग व आकार यांचे त्यांनी अनेक प्रयोग केले. दोन्ही शाखांतली त्यांची चित्रे सरस व सुंदर आहेत. आकाराची सुंदर मांडणी व आकर्षक रंगभरणी ही बेंद्रे यांची कलावैशिष्टये आहेत.
 मकबूल फिदा हुसेन यांना पद्धतशीर शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. तरीही भारतातील श्रेष्ठ कलाकारांत त्यांची गणना होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीही संपादन केली आहे. युरोपात व अमेरिकेतही त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली आहेत. त्यांची चित्रे जगातील प्रसिद्ध कलासंग्रहात जतन करून ठेवलेली आहेत. प्रो. माधव श्रीपाद सातवळेकर हे वेदमूर्ती सातवळेकर यांचे चिरंजीव. वडिलांच्या हाताखालीच त्यांनी प्रारंभी चित्रकलेचे शिक्षण घेतले व नंतर इटली, इंग्लंडमध्ये जाऊन आपली विद्या पुरी केली. व्यक्तिचित्रे काढणारे प्रौढ कलावंत म्हणून त्यांची कीर्ती आहे. त्यांच्या कलेत सफाईदारपणा व समृद्ध रंगांचे वैभव यांची प्रतीती येते. देशात व विदेशात मिळून त्यांची १८ चित्रप्रदर्शने भरली होती. त्यांनी 'इंडियन आर्ट सोसायटी' ही संस्था स्थापून रसिकांची मोठीच सोय करून ठेविली आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांची 'डायरेक्टर ऑफ आर्ट्स्' या पदावर नेमणूक केली आहे.
 पद्मश्री वि. ना. आडारकर हे मुंबईच्या 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'मध्ये 'अप्लाइड आर्ट' या विभागाचे प्रमुख. त्यांच्याच प्रयत्नाने व्यवहारोपयोगी चित्रकलेचा विभाग येथे सुरू झाला. 'इंडस्ट्रियल डिझायनिंग' हा यांचा आवडता विषय आहे. 'ब्रिटिश इन्स्टिटयूट ऑफ आर्ट अँड डिझाइन' या संस्थेने १९४७ साली यांना आपले सदस्य करून घेतले. हा मान मिळविणारे हे पहिलेच भारतीय कलावंत होत. ऑल इंडिया आर्ट बोर्डाचे हे तीन वेळा अध्यक्ष होते. अनेक सुवर्णपदके व पारितोषिके यांनी मिळविली आहेत.
 ज. द. गांधळेकर हे काही काल स्कूल ऑफ आर्टचे डीन होते. टाइम्स ऑफ इंडियामध्ये ते आर्ट डायरेक्टर म्हणून काम करतात. तैलचित्रे, मातकाम व पोर्टेट पेंटिंग हे यांचे आवडीचे विषय होत. के. के. हेब्बार हे कल्पनानिष्ठ चित्रे काढणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. खेडेगावातील वातावरणातील दृश्ये यांनी चितारली आहेत. त्यांच्या कलेत एकांगीपणा नाही. त्यांनी विविध शैलीतून चित्रे काढली आहेत. त्यातील सहजता उल्लेखनीय आहे. देऊसकर यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेऊन चित्रकलेचा विशेष अभ्यास केला. बालगंधर्व रंगमंदिरातील गंधर्वांची चित्रे यांनीच काढली आहेत. दीनानाथ दलाल यांच्या चित्रांत रंगसंगतीबरोबर व्यक्तीचे भावदर्शन विशेष आढळते. पुणे येथील कॉमनवेल्थ इमारतीतील 'छत्रपती शिवाजी' यांचे अत्युत्तम तैलचित्र दलाल यांनी केलेले आहे. श्री. एस. एल. हळदणकर हे त्यांच्या जलरंगातील चित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. जलरंगावर प्रभुत्व असलेले जे थोडे चित्रकार आहेत त्यांच्यांतील हे प्रथम श्रेणीचे कलाकार आहेत. व्यक्तिचित्रे काढण्यात यांचा हातखंडा आहे. अनेक प्रदर्शनांतून व चित्रसंग्रहांतून यांची चित्रे मांडली गेली आहेत.
 श्री. त्रिंदाद हे स्कूल ऑफ आर्टचे एक नामवंत शिक्षक असून जातिवंत कलावंत होते. 'विचारमग्न स्त्री' हे यांचे विशेष गाजलेले चित्र होय. व्यक्तिचित्रे व निसर्गचित्रे हे सारख्याच कौशल्याने रेखाटू शकतात. यांच्या सर्वच चित्रांत भावनांचा ओलावा जाणवतो. शिल्पकलेतही त्यांचा हातखंडा होता. त्यांनी थोडीच शिल्पे केली, पण ती जाणकारांच्या प्रशंसेस पात्र ठरली. विविध रंग वापरण्यात यांचे कौशल्य इतके अप्रतिम होते की त्यांना 'रंगकवी' असे संबोधले जाते.
 जी. एम्. सोलेगावकर हे असेच नामांकित चित्रकार आहेत. बाँबे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक व आर्ट सोसायटी ऑफ इंडियाची 'पटेल ट्रॉफी' यांनी मिळविली आहे. आधुनिक भारतीय शैलीत कल्पनांकन करण्यात ते निपुण आहेत. रेखांकन या कौशल्यात त्यांनी असामान्य व विपुल रंगबोधाची भर टाकली आहे. त्यांच्या चित्रात अनुकरण किंवा संकेत नाही. सोलेगावकर हे भित्तिचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत.

शिल्प
 चित्रकलेप्रमाणेच शिल्पकलेतही महाराष्ट्रीयांनी जागतिक कीर्ती मिळविली आहे. या शिल्पकारांत अग्रगण्य म्हणजे गणपतराव म्हात्रे हे होत. 'मंदिरपथगामिनी' हा पूजेचे साहित्य घेऊन मंदिराकडे जाणाऱ्या एका महाराष्ट्रीय तरुणीचा यांनी जो पुतळा केला त्याची जगातल्या प्रत्येक देशातील कलाभिज्ञांनी अमाप प्रशंसा केली आहे. राजा रविवर्मा म्हणाले की 'इतकी सुंदर शिल्पाकृती यापूर्वी झाली नाही व पुढेही होईल की नाही याविषयी शंका आहे.' कोणी यांची तुलना मायकेल एंजेलोशी केली आहे. 'मॅगेझिन ऑफ आर्ट' (लंडन) या मासिकाने यांच्या 'मंदिरपथगामिनीचा' मोठा गौरव केला आहे. 'सरस्वती' या त्यांच्या शिल्पाचाही त्या मासिकाने असाच गौरव केला आहे. फ्रान्सच्या जागतिक कलाप्रदर्शनातही त्यांचा गौरव झाला. शिकागाेच्या कलाप्रदर्शनातही या कलाकृतीला मानाचे स्थान देण्यात आले होते. अनेक संस्थानांत यांनी घडविलेले शिवछत्रपतींचे अश्वारूढ पुतळे यांच्या असामान्य कलेची साक्ष देतात. राणा प्रतापसिंह, नाना फडणीस, राणा रणजितसिंह यांचेही प्लॅस्टरचे भव्य पुतळे यांनी बनविले आहेत. त्यांनी घडविलेल्या पुतळ्यांची संख्या जवळ जवळ दीडशेपर्यंत आहे. या कलाकृतींनी भारतीय कलेच्या इतिहासात म्हात्रे यांचे नाव अमर करून टाकले आहे.
 विनायक पांडुरंग करमरकर हे महाराष्ट्रातले दुसरे प्रसिद्ध शिल्पकार होत. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट व लंडन रॉयल ॲकॅडमी येथे त्यांचे शिक्षण झाले. १९२२ ते १९४५ पर्यंत त्यांनी अनेक शिल्पाकृती केल्या. अमेरिकेतील मिल्टन कॉलेजने मॉडेलिंगचे प्रात्यक्षिक देण्याकरिता यांना बोलाविले होते. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ते एक वर्ष अध्यक्ष होते. पुण्यातील शिवछत्रपतींचा अश्वारूढ ब्राँझ पुतळा यांनीच घडविला आहे.
 

र. कृ. फडके हेही आणखी नामवंत शिल्पकार होत. त्यांचे शिक्षण खाजगीरीत्याच झाले. पण अंगच्या प्रतिभेमुळे लवकरच त्यांनी शिल्पकार म्हणून नाव मिळविले. मुंबई, मद्रास, बडोदे येथील प्रदर्शनांत तर यांची शिल्पे मांडली गेलीच. पण लंडन, शिकागो, फिलाडेल्फिया येथील प्रदर्शनांतही त्यांच्या कलाकृतीला मानाचे स्थान मिळाले होते. बाँबे आर्ट सोसायटीचे शिल्पकलेचे सुवर्णपदक मिळविणारे फडके हे पहिलेच शिल्पकार होत. मुंबईच्या चौपाटीवरील लोकमान्यांचा पुतळा, इंदूर येथील महात्माजींचा पुतळा हे पुतळे फडके यांच्याच हातचे आहेत.
 वा. व. तालीम हे कित्येक वर्षे जे. जे. स्कूलचे सन्मान्य प्राध्यापक होते. ते एक ख्यातनाम शिल्पकार असून त्यांनी बनविलेले दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल यांचे पुतळे त्याच्या कलेची साक्ष देतात. त्यांनी सुमारे ३०० शिल्पाकृती केल्या आहेत. बाँबे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक त्यांनी दोनदा मिळविले होते.
 

महाराष्ट्रीयांच्या कलोपासनेचे गेल्या दोन प्रकरणांत वर्णन केले. त्यावरून असे दिसते की अगदी थेट सातवाहन काळापासून महाराष्ट्रात कलेची अभिरुची सर्वसामान्य लोकांना होती व आजही ती तशीच कायम आहे. संगीत, नाट्य, चित्रपट, नृत्य, चित्र, शिल्प या कलांत महाराष्ट्रीयांनी जागतिक कीर्ती मिळविली आहे. नृत्य मागल्या काळी उत्तम अभ्यासले जात होतेव. फक्त ब्रिटिश काळात त्या कलेची प्रगती इतर कलांइतकी झाली नाही. तीही उणीव आता लवकरच भरून निघेल अशी आशा करण्यास जागा आहे. हा देश दगडांचा आहे असे त्याचे वर्णन केले जाते. ते खरे आहे. पण सह्याद्रीचे पहाड दुर्भेद्य असूनही त्यांतून अनेक नद्या पाझरतात, तसेच या दगडी मनातून कलांचे अनेक पाझर वाहत असतात असे दिसते. हीन अभिरुचीला बळी पडून कलेची पातळी सध्या खालावत आहे असे जाणकार सांगतात. पण लवकरच हे मळभ नाहीसे होऊन महाराष्ट्रीय कलेचा चंद्रमा पुन्हा पूर्ववत आल्हाद देऊ लागेल अशी आशा करू या.