महाराष्ट्र संस्कृती/शास्त्री पंडित



१४.
शास्त्री पंडित
 


 बहामनी कालातील महाराष्ट्राचे दुसरे नेते म्हणजे शास्त्री पंडित हे होत. मराठा सरदारांच्या नंतर त्यांच्या नेतृत्वाचे स्वरूप आता पाहावयाचे आहे.

जड हिंदुधर्म शास्त्र
 या काळात महाराष्ट्रात दलपती, अनंतदेव, नीळकंठ भट्ट, कमलाकर भट्ट असे मोठे पंडित होऊन गेले; पण मागे 'सातवाहन ते यादव' या कालखंडाचा विचार करताना सांगितल्याप्रमाणे, या काळात अखिल भारताचे धर्मशास्त्र सामान्यतः एकच होते. प्रांताप्रांतात मुळीच फरक नव्हता असे नाही. पण हा फरक गौण विषयांत असे. चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, स्त्रीचे समाजातील स्थान, शब्दप्रामाण्य, निवृत्ती, सोवळे-ओवळे, कर्मकांड, अदृष्टप्रधानता इ. विषयांत भारतातील मिथिला, प्रयाग, काशी, पैठण, इ. धर्मक्षेत्रांतील पंडितांचे धर्मशास्त्र बव्हंशी एकरूपच होते. या पंडितांनी अकराव्या बाराव्या शतकात, हिंदुधर्मशास्त्राला जे रूप दिले त्यात बहामनी कालात फारसा बदल झाला नव्हता. त्यामुळे या काळातील धार्मिक क्षेत्रातील नेतृत्वाचा विचार करताना महाराष्ट्रातील आधीच्या एकदोन शतकांतील धर्मवेत्यांच्या मतांचा आधार घेणे आणि मिथिला, काशी, प्रयाग येथल्या शास्त्री पंडितांच्या ग्रंथांचा निर्देश करणे यात असयुक्तिक असे काहीच नाही. हा सर्व हिशेब पाहून विज्ञानेश्वर, अपरार्क, हेमाद्री, नीळकंठ भट्ट, कमलाकर भट्ट, रघुनंदन, शूलपाणी, इ. धर्मशास्त्रज्ञांच्या ग्रंथांच्या आधारे येथे बहामनी कालातील महाराष्ट्राच्या धार्मिक नेतृत्वाचा विचार केला आहे.

धर्माची तरुणता ?
 हा विचार करू लागताच पहिली गोष्ट ध्यानात येते ती ही की या धर्मशास्त्रज्ञांनी, आपल्या भोवतालच्या परिस्थितीचा, क्षणमात्रही विचार केला नव्हता. बहामनी सुलतान व त्यांचे सरदार दीन, अनाथ, हिंदू प्रजेवर भयानक जुलूम करीत होते, स्त्रियांवर अत्याचार करीत होते, देवळे पाडीत होते, मूर्ती फोडीत होते, धनदौलतीची लूट करीत होते; शेती उत्सन्न होत होती; व्यापार बसत चालला होता; अवर्षण, दुष्काळ यांनी लोकांची अन्नान्नदशा होत होती; पण धर्मशास्त्राने याची दखल घेतली पाहिजे, या आपतींच्या निवारणार्थ काही उपाययोजना केली पाहिजे असे या धर्मशास्त्रज्ञांच्या स्वप्नातही कधी आले नाही. धर्माचा व या दीनदशेचा, त्यांच्या लेखी, काही संबंधच नव्हता. धर्मामुळे अभ्युदयही साधला पाहिजे, समाजाची धारणा झाली पाहिजे, धर्म- नियम हे समाजाच्या प्रभावासाठी, उत्कर्षासाठी केलेले असतात, लोकसंग्रह हे धर्माचेच कार्य आहे, हा प्राचीन थोर धर्मवेत्त्यांचा विचार या शास्त्रीपंडितांच्या दृष्टीपुढे कधीही नव्हता. यादव राजा कृष्णदेव - कन्हरदेव - (१२४७ - १२६०) याची प्रशस्ती गाताना 'कालवशात क्षीण झालेल्या धर्माला त्याने पुन्हा तरुणता प्राप्त करून दिली' असे हेमाद्रीने म्हटले आहे. या कन्हरदेवाच्याच काळात, महाराष्ट्रात मुस्लिमांचे धार्मिक आक्रमण चालू झाले होते. देवगिरीजवळच्या परिसरात ते मशिदी उभारीत होते. लोकांना इस्लामची दीक्षा देत होते व इस्लामचा प्रसार करीत होते. पण यामुळे काही धर्महानी होते, असे हेमाद्रीला वाटत नसावे. कारण याच वेळी 'कृष्णदेवाने धर्माला तारुण्य प्राप्त करून दिले होते', असे तो म्हणतो. धर्माची अशी सुस्थिती, असा उत्कर्ष असतानाच, मुस्लिमांचे प्रथम धार्मिक व नंतर राजकीय आक्रमण झाले व त्यात महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा लोप झाला. यावरून धर्माचा स्वातंत्र्याच्या अस्तोदयाशी, प्रजेच्या उत्कर्षापकर्षाशी काही संबंध असतो, हे या धर्मवेत्त्यांना मान्य नव्हते, असे दिसते.

सुखद अज्ञान
 विज्ञानेश्वर, अपरार्क, हेमाद्री, कमलाकर भट्ट इ. धर्मशास्त्रजांना, म. म. डॉ. काणे हे मध्यमयुगीन धर्मशास्त्रज्ञ म्हणतात, आणि त्यांच्या कार्याचे विवेचन करताना म्हणतात, 'या काळात मुस्लिम सर्वत्र देवळे पाडीत होते. लोकांना सक्तीने बाटवीत होते. अत्याचार करीत होते. पण त्या वेळचे धर्मशास्त्रज्ञ व्रते, प्रायश्चित्तविधी, श्राद्धविधी, तीर्थयात्रा, अशौच यांवर आपले सर्व बुद्धिबळ खर्च करीत होते. सर्व भारताला घेरीत चाललेल्या राजकीय व धार्मिक घोर आपत्तींविषयी ते अगदी अलिप्त होते. त्यासंबंधीच्या सुखद अशा अज्ञानातच ते रहात होते.' (धर्मशास्त्राचा इतिहास, खंड ५ वा, पृ. ४७).
 वेदकाळापासून भारताच्या धमशास्त्रात दोन विचारप्रवाह दिसतात हे, मागें यादव- पूर्वकाळातील धर्माच्या स्वरूपाची चर्चा करताना, विशद करून सांगितलेच आहे. बुद्धिप्रामाण्य, समता, प्रवृत्ती, लोकसंग्रह, धर्माची परिवर्तनीयता, लोकाभिमुखता, स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद, राजधर्म, क्षात्रधर्म यांची श्रेष्ठता हा एक विचारप्रवाह आणि शब्दप्रामाण्य, विषमता, निवृत्ती, वैयक्तिकता, अपरिवर्तनीयता, समाजविमुखता, स्वराज्य - राजधर्म यांविषयी उदासीनता, हा दुसरा विचारप्रवाह होय. इ. सनाच्या दहाव्या अकराव्या शतकात दुसऱ्या प्रवाहाचा जोर झाला, पहिला उत्तरोत्तर क्षीण होऊ लागला आणि त्यामुळेच या देशाचे नष्टचर्य ओढविले. तो मुस्लिम आक्रमणाला बळी पडला आणि विद्या, कला, धनदौलत, कृषी, व्यापार या सर्व दृष्टींनी नागविला गेला. अशा स्थितीत धर्मवेत्त्यांनी रूढ धर्मतत्त्वांचा पुनर्विचार करून, धर्मसुधारणा करणे अवश्य होते. समाजघातक अशा रूढी त्याज्य ठरवून, उत्कर्षकारक अशी नवी तत्त्वे समाजाला उपदेशावयास हवी होती. धर्मवेत्त्यांचे हेच कार्य आहे. पण बहामनी कालातील या शास्त्रीपंडितांनी असे तर काही नाहीच केले. उलट त्यांनी धर्माला जास्त वैयक्तिक, समाजविमुख, परलोकनिष्ठ व जड कर्मकांडात्मक रूप देऊन, महाराष्ट्र समाजाची संपूर्ण अधोगती व्हावी, अशीच व्यवस्था करून ठेवली.

निर्णयसिंधू
 हेमाद्रीचा 'चतुर्वर्गचिंतामणी', अनंतदेवाचा 'स्मृतिकौस्तुभ' कमलाकर भट्टाचे 'निर्णयसिंधू' व ' शूद्रकमलाकर', रघुनंदनाचा 'शुद्धितत्व' हे ग्रंथ वरवर जरी चाळून पाहिले तरी, धर्मविचारात या धर्मशास्त्रज्ञांच्या मते महत्त्व कशाला होते, ते सहज दिसून येईल. यांतील कमलाकर भट्टाचा 'निर्णयसिंधू' हा ग्रंथ प्रातिनिधिक म्हणून आपण घेऊ. यात विज्ञानेश्वर, हेमाद्री, अपरार्क, रघुनंदन इ. धर्मवेत्त्यांची मते तो दर वेळी उद्धृत करतो व बहुधा त्यांच्या आधारेच निर्णय देतो. तेव्हा या एका ग्रंथावरून त्या वेळच्या धर्मशास्त्राचे स्वरूप कळून येईल. (१) एकभुक्त, नक्त, कार्तिक स्नान, माघस्नान, एकादशी, चतुर्थी, कोकिला व्रत, अनंत व्रत इ. व्रते, त्यांचे आरंभ व त्यांची उद्यापने (२) जातकर्म, नामकरण, चौल इ. सोळा संस्कार (३) नित्य श्राद्ध, नैमित्तिक श्राद्ध, सपिंड श्राद्ध, पार्वण श्राद्ध, कर्मांग श्राद्ध, पुष्टी श्राद्ध इ. श्राद्धांचे बारा भेद व त्यांची लक्षणे (४) अशौच, (सोयर सुतक), जननाशौच, मृताशौच, मुंज झालेल्यांचे, न झालेल्यांचे अशौच, स्त्रीशूद्रांचे अशौच, आणि (५) प्राजापत्य, कृच्छ्र, चांद्रायण इ. प्रायश्चित्ते हे यातील मुख्य विषय आहेत. 'निर्णयसिंधू' हा ग्रंथ इ. स. १६१० च्या सुमारास लिहिलेला आहे. त्या वेळी महाराष्ट्र समाजाच्या दैन्य- दारिद्र्याची पराकाष्ठा झाली होती. तरी त्याचा लवमात्रही विचार या ग्रंथात केलेला नाही. राजधर्म नाही, क्षात्रधर्म नाही, आक्रमणाचा प्रतिकार नाही, धर्मांतरितांची शुद्धी नाही, समाजसंघटना नाही, समाजाचे बळ, सामर्थ्य नाही ! हा विषय धर्मात येतच नाही. व्रते -वैकल्ये, श्राद्ध पक्ष, सोवळे-ओवळे, प्रायश्चित्ते यांतच, या शास्त्रीपंडितांच्या मते, सर्व धर्म साठविला होता.
 यादवकाळाचे विवेचन करताना हेमाद्रीच्या व्रतवैकल्यप्रधान धर्माचे राजवाडे यांनी वर्णन केले आहे. त्याचप्रमाणे संतप्रणीत धर्माचे स्वरूप वर्णिताना संतवाङ्म- याच्या अनेक अभ्यासकांनीही यादवकाळातील कर्मकांडात्मक धर्माचे स्वरूप, तुलनेसाठी म्हणून, वर्णिले आहे. पण तेवढ्यावरून वर निर्देशिलेल्या धर्मशास्त्राचे स्वरूप नीटसे ध्यानात येणार नाही. आणि या शास्त्रामुळे समाजमनावर अत्यंत हीन संस्कार होऊन त्याचा किती प्रकारे अधःपात होत होता तेही कळणार नाही. म्हणून शास्त्री- पंडितांच्या त्या धर्माचे जरा तपशिलाने वर्णन करणे अवश्य आहे.

शुभाशुभ काल
 प्रथमतः या धर्मशास्त्रातील 'कालनिर्णय' हे प्रकरण पाहा. एकादशी, शिवरात्र हे उपवास, कृष्णाष्टमी, रामनवमी हे उत्सव, किंवा हरतालिका, ऋषिपंचमी ही व्रते (धर्मग्रंथांत या सर्वाना व्रते असेच म्हटले आहे ) करण्यास सांगितली, तर त्यात काही बिघडते असे नाही. उलट या आचारांच्या निमित्ताने मनावर धर्माचे संस्कार होतात व समाजाची उत्सवाची हौसही भागते. पण हे इतके साधे स्वरूप या व्रतांचे नाही. कोणते व्रत कोणत्या तिथीला करावे, हे सांगताना धर्मशास्त्रज्ञ निश्चित कालाचे महत्त्व सांगतात व ते सांगताना कालनिर्णयाची अशी काही चिकित्सा करतात की व्रतांचा मूळ उद्देश बाजूला राहून त्यांना अगदी विचित्र, विकृत रूप प्राप्त होते.
 व्रते अमक्याच तिथीला केली पाहिजेत, असे शास्त्र आहे. पण पुष्कळ वेळा दिवसाच्या प्रारंभी एक तिथी असते व थोड्या वेळाने ती संपून दुसरी सुरू होते. अशा वेळी काय करावे, हा प्रश्न धर्मशास्त्राला मोठा गंभीर वाटतो आणि अशा वेळी निर्णय करताना शास्त्रज्ञ अत्यंत विवेकहीन होतात. हरतालिका व्रत तृतीयेला असते. त्याबद्दल शास्त्र असे आहे की जी तृतीया चतुर्थीयुक्त असेल ती घ्यावी. द्वितीयायुक्त असेल ती वर्ज्य मानावी. असे का ? शास्त्र म्हणते की 'द्वितीयायुक्त तृतीयेला जी स्त्री हरतालिका- व्रत करील तिला वैधव्य प्राप्त होईल !' हे कशावरून ? तर 'असे आपस्तंब म्हणतो म्हणून. क्षणमात्र जरी द्वितीया त्या दिवशी असली तरी ती वर्ज्य, असे स्कांदवचन आहे म्हणून.' (निर्णयसिंधू, निर्णयसागर छापखाना, इ. स. १९२५, पृ. १४६) एकादशी व्रताविषयी असेच आहे. सकाळी प्रथम थोडी दशमी असेल, म्हणजे एकादशी दशमी-विद्धा असेल, तर ती वर्ज्य करावी. गांधारीने दशमी-विद्धा एकादशी केल्यामुळे तिचे शंभर पुत्र युद्धात मरण पावले. मात्र दशमी विद्धा-एकादशी वैष्णवांना फक्त वर्ज्य आहे. स्मार्ताना ती चालेल. असे का ? तर 'गरुड पुराणात तसे म्हटले आहे म्हणून.' आणि ' दशमीविद्धा एकादशी केली तर तीन जन्मांचे पुण्य नष्ट होते, असे नारद पुराण म्हणते म्हणून ती वैष्णवांना वर्ज्य.' नवरात्रात घटस्थापना केव्हा करावी हा प्रश्न असाच आहे. द्वितीयाविद्धा आश्विन प्रतिपदा असावी, असे दुर्गादेवीने स्वतः सांगितले आहे.
 पण काही पंडितांना ते मान्य नाही. ते म्हणतात की प्रतिपदा अमावास्याविद्धा असावी. द्वितीयाविद्धा अज्ञानाने जरी स्वीकारली, तरी स्वीकारणाऱ्याचे पुत्र मरतील. कालनिर्णयाचे माहात्म्य असे आहे. अज्ञानाने जरी तिथी चुकली तरी सर्वनाश ओढवतो. यातली मौजेची गोष्ट अशी की प्रत्येक व्रताच्या तिथीच्या कालाविषयी तीनचार तरी भिन्न मते असतातच. म्हणजे प्रत्येक व्रतात निषिद्ध काल कोणी तरी मानणारच; म्हणजे प्रत्येक वेळी कोणी तरी स्त्री विधवा होणारच, कोणाचे तरी पुत्र मरणारच !

अपराण्ह !
 श्राद्धपक्षांच्या काळाविषयी असेच मतभेद आहेत. श्राद्ध अपराण्ही करावे, असे वचन आहे. पण अपराण्ह केव्हा लागतो हा गंभीर प्रश्न आहे. हेमाद्री, अपरार्क यांनी याबद्दल पांडित्यपूर्ण विवेचन केले आहे ! दिवसाचे तीन भाग करावे आणि दुसऱ्याला अपराण्ह म्हणावे, असे एक मत आहे. पाच भाग करून चौथ्याला अपराण्ह म्हणावे असे दुसरे मत आहे. इतर पंडिताची आणखी भिन्न मते आहेत. बिचारे पितर ! या वादातून न कळत जरी त्यांच्या वंशजांनी चुकीचा अपराण्ह धरला, तरी त्यांना नरकात जावे लागणार ! एकभुक्त म्हणजे एकदाच व ते दिवसा जेवण्याचे व्रत. नक्त म्हणजे एकदाच पण रात्री जेवण्याचे व्रत. पण दिवसा म्हणजे केव्हा व रात्री म्हणजे केव्हा, याविषयी भिन्न असे सहा पक्ष आहेत ! शिवाय गृहस्थाश्रमीयांनी नक्त व्रतात सूर्यास्तानंतर रात्री भोजन करावे व यती आणि विधवा यांनी सूर्यास्तापूर्वी करावे असे शास्त्र आहे. आणि असे कशासाठी म्हणून विचारले तर, असे जाबालीवचन आहे, असे स्कांदवचन आहे, असे विज्ञानेश्वर म्हणतो, असे मदनरत्नात म्हटले आहे, असे उत्तर मिळते.

बालमन
 न्या. मू. रानडे यांनी म्हटले आहे की भारतात व्यक्तीची प्रतिष्ठा विकास पावू शकली नाही, याचे प्रधान कारण असे की आपल्यावरची धर्मबंधने ही तर्कहीन, कार्यकारणहीन अशी होती. यामुळे आपली प्रज्ञा हत झाली, मन बालपणातच राहिले. त्याला प्रौढत्व आलेच नाही. मानवाला बंधने, व्रते निश्चित असावी. पण त्यात कार्य- कारणसंगती असली पाहिजे, त्यांची बरी वाईट फळे बुद्धीला कळली पाहिजेत. पण वरील काळातील धर्मशास्त्रात एकाही ठिकाणी असा बुद्धिगम्य विधिनिषेध सांगितलेला नाही. भारतीयांची मने दुबळी झाली, त्यांची प्रज्ञा हत झाली, त्यांची बुद्धी पांगळी झाली, त्याचे प्रधान कारण हे आहे. गेल्या हजार वर्षातले आपले धर्मशास्त्र जड होते, आंधळे होते, अदृष्टप्रधान होते, अर्थशून्य होते.
 व्रते, उत्सव, श्राद्धपक्ष यांमध्ये मनुष्याच्या हातून देवपूजा किंवा पितृपूजा घडावी, हरिकीर्तन, भगवद्भजन घडून मनाची उन्नती व्हावी, त्याच्या खाण्यापिण्यावर, एकंदर वर्तनावर बंधने पडून त्याला मनोनिग्रहाचे, संयमाचे शिक्षण मिळावे, असा हेतू असणे शक्य आहे. तसा तो असेल तेथे व्रते समाजाला निश्चित उपकारक होतील. पण आपल्या धर्मशास्त्रज्ञांनी या व्रतोत्सवाला इतके जड रूप दिले आहे की त्यातून हे हेतू, ही उद्दिष्टे दिसतच नाहीत.

गाजर मुळा-धर्म
 कालनिर्णयाप्रमाणेच खाणेपिणे, शरीरशुद्धी यांतील वर्ज्यावर्ज्य हे प्रकरण आहे. व्रते, उत्सव, श्राद्धपक्ष यांमध्ये मनुष्याच्या हातून देवपूजा घडावी, पितृपूजा व्हावी, पूर्वजांचे स्मरण व्हावे हा हेतू मुळात असावा. पण शास्त्रीपंडितांनी या व्रतवैकल्यांना इतके जड रूप दिले आहे, त्यांतील कर्मकांडावर इतका भर दिला आहे की हा मूळ उद्देश त्यात लोपून जातो. 'तिथितत्त्व', 'कृत्यकल्पतरू', 'निर्णय सिंधू' इ. ग्रंथांत प्रत्येक तिथीला काय खावे व काय खाऊ नये, कोणते पदार्थ व कृत्य वर्ज्य करावे आणि तसे न केल्यास कोणते पाप लागते, याच्या याद्याच्या याद्या दिल्या आहेत.
 पुढे रामनवमी, अक्षय्य तृतीया इ. व्रतांचे, या शास्त्रपंडितांनी सांगितलेले यमनियम दिले आहेत. त्यावरून खाण्यापिण्यावरच सर्व धर्म त्यांनी कसा उभारला होता, हे कळून येईल. या व्रतांची उदाहरणे देण्यात आणखी एक हेतू आहे. ही व्रते महाराष्ट्रातील व भारतातील बहुजनसमाज अत्यंत निष्ठेने पाळतो. पण तो त्यातील काटेकोरी कितपत संभाळू शकेल याचा वाचकांनीच विचार करावा. सर्व समाजासाठी, चारही वर्णाच्यासाठी, जी व्रते सांगितली त्यांच्या बाबतीत तरी यमनियम सैल करावे, हे व्यवहारी धोरण सुद्धा, शास्त्री पंडितांनी संभाळले नाही. आणि त्यांनाही कायम नरकात धाडण्याची व्यवस्था करून ठेवली. कारण तिथींविषयी, गाजरमुळ्यांविषयी लवमात्र जरी चूक झाली तरी नरक अटळ आहे! आणि शास्त्रीपंडितांनी घालून दिलेले नियम पाहिले की चूक झाल्यावाचून एखादे व्रत करणे अशक्य आहे हे सहज दिसून येईल.

त्याचा प्रभाव
 शास्त्रीपंडितांच्या या धर्माचा बहुजन समाजाशी फारसा संबंध नव्हता, असा एक समज रूढ आहे. पण तो खरा नाही. ज्ञानेश्वर, नामदेव इ. वारकरी पंथाच्या संतांनी या कर्मकांडात्मक धर्मावर प्रखर टीका केली, हे खरे. पण त्या टीकेमुळे या धर्माचे समाजमनावरचे वर्चस्व कमी झाले नाही. संतांच्या आधीच्या काळापासून इंग्रजी राज्याच्या प्रस्थापनेपर्यंत, येथल्या समाजाची मने या जड धर्माच्या शृंखलांनी अगदी दृढबद्ध होती आणि अजूनही ती पूर्ण मुक्त झाली आहेत, असे नाही. तशी ती मुक्त झाल्यावाचून या देशाची द्रुत गतीने प्रगती होणे शक्य नाही. कारण मानवाची बुद्धी, प्रज्ञा, विचारशक्ती, चिंतनशक्ती, निर्णयशक्ती या सर्वाची या शास्त्रीपंडितांच्या मूढ धर्माने हत्या केली आहे.
 या धर्मग्रंथांत वारंवार असे सांगितलेले आढळते की हा धर्म, ही व्रते, हे विधी, हे यमनियम सर्व वर्णासाठी सांगितलेले आहेत आणि व्यवहारात सर्व हिंदुसमाज हे यमनियम भक्तीने व भीतीने काटेकोरपणे पाळतो हे आपण पाहतोच. रामनवमी, अक्षय्य तृतीया, वटसावित्री, चतुर्मास, जन्माष्टमी, रक्षाबंधन, हरितालिका, अनंतव्रत, नवरात्र-घटस्थापना, दसरा, संक्रांत, शिवरात्री ही व्रते आणि पितृपंधरवड्यातील श्राद्धपक्ष, ग्रहणातील सोवळे-ओवळे, सोयरसुतकाचे नियम - हे सर्व शास्त्र हिंदुसमाज गेल्या शतकाच्या अखेरीपर्यंत किती निष्ठेने पाळीत होता हे सर्वांना माहीतच आहे. व्रते, श्राद्धपक्ष, अशौच यांविषयी सांगितलेले हे सर्व शास्त्र अर्थशून्य, तर्कहीन, जड- मूढ, विवेकशून्य व त्यामुळेच अत्यंत वेडगळ असे आहे.

रामनवमीचे शास्त्र
 रामनवमी हे व्रत सर्व हिंदूंना अत्यंत प्रिय आहे. या दिवशी त्या प्राचीन पितृनिष्ठ, एकपत्नी, एकवाणी, एकवचनी, महाधनुर्धर अशा महापुरुषाचे स्मरण करावे, कीर्तन करावे, आणि त्याचा ध्येयवाद, त्याचा क्षात्रधर्म, त्याचे बंधुप्रेम या गुणांचे संस्कार आपल्या मनावर करावे, हा या व्रताचा मुख्य हेतू. पण धर्मशास्त्रज्ञांनी त्याला कसे जड रूप दिले आहे पाहा. ही चैत्रातील नवमी अष्टमीयुक्त असावी असे एक मत. नसावी असे दुसरे मत. त्यात स्मार्तांना एक नियम, वैष्णवांना दुसरा. हे व्रत करावयाचे म्हणजे काय करावयाचे ? तर उपोषण व जागरण, जो मूर्ख मनुष्य रामनवमीस उपोषण करीत नाही- म्हणजे या लहरी शास्त्रज्ञांनी नेमून दिलेले पदार्थ खात नाही, जो अज्ञानाने का होईना पण भोजन करतो- म्हणजे तांदूळ, गहू, मसुरा, चवळ्या हे पदार्थ खातो- तो कुंभीपाक नरकात पडतो. हे व्रत न करता कोणी अन्य व्रते केली तरी त्या व्रतांचे फल त्यांना मिळणार नाही. आणि या व्रताचा सर्व भर कशावर तर मसुरा, चवळ्या, दूध, फळे यांच्या भक्षणाभक्षणावर. अज्ञानामुळे जरी वर्ज्य पदार्थ पोटात गेले, किंवा चुकीच्या तिथीला व्रत केले गेले तरी, नरक ठेवलेलाच.

चवळ्या मसुरा-धर्म !
 वैशाख शुद्ध तृतीया, अक्षय्यतृतीया अथवा अखेती हिचे बहुजनात फारच माहात्म्य आहे. पण ही तृतीया द्वितीयायुक्त असता कामा नये. अशी पूर्वविद्धा तृतीया भक्तीने केली तरी ती पूर्वीच्या सर्व पुण्याचा नाश करते. वटसावित्रीचे व्रत ज्येष्ठी पौर्णिमेस असते. ही पोर्णिमा चतुर्दशीयुक्त असावी. पौर्णिमेच्या इतर व्रतांना चतुर्दशीयुक्त पौर्णिमा निषिद्ध होय. पण सावित्री व्रताला ती योग्य होय. कारण स्कंदपुराण, ब्रह्मवैवर्त, मदनरत्न यांत तसे वचन आहे. या पौर्णिमेस दान दिल्याचे फलही मोठे आहे. तिलदान केले तर अश्वमेधाचे पुण्य मिळते व छत्री, जोडा इ. दान दिल्यास पुरुषाला राज्य प्राप्त होते. चातुर्मास्य हे व्रत चार वर्णांच्या चारही आश्रमांतल्या मनुष्यास नित्य होय. या व्रताचा आत्मा कशात आहे ? काही पदार्थ खाणे व काही वर्ज्य करणे यात ! पहिल्या महिन्यात भाज्या वर्ज्य, दुसऱ्यात दही, तिसऱ्यात दूध व चौथ्यात द्विदल धान्य वर्ज्य. व्रताचे हे सर्वसाधारण रूप सांगून मग कमलाकर भट्टाने भिन्नभिन्न पंडितांच्या आधारे वांगे, चवळ्या, बोरे, ऊस, मसुरा, मोहऱ्या, पडवळ, मुळा, यांविषयी गंभीरपणे चर्चा केली आहे. त्या त्या काळात उत्पन्न होणाऱ्या शाका वर्ज्य असे एक मत आहे. पण यावरून आधीच्या वर्षी सुकवून ठेवलेल्या शाका चालतील, असे कोणाला वाटेल. पण तसे नाही. त्याही निषिद्धच होत. मग चातुर्मास्यात खावे काय ? हविष्य खावे. कोणते ? तांदूळ, मूग, तीळ, वाटाणे, चंदनबटवा, चाकवत, मुळा, गायीचे दूध व तूप, फणस, आंबा, नारळ, केळे, पिंपळी, जिरे ही सर्व हविष्ये होत. यांच्या सेवनाने पुण्य प्राप्त होते. उलट वांगे, उंबर, द्विदल धान्ये इ. पदार्थ पोटात गेल्यास हरी दूर होतो. हेमाद्रीने इतरही व्रते व त्यांची फळे सांगितली आहेत. गूळ वर्ज्य केल्यास मनुष्य मधुरस्वरी राजा होतो, तेल वर्ज्य केल्याने सुंदरांग होतो. कटुतैल वर्ज्य केल्याने शत्रुनाश होतो. भूमीवर किंवा दर्भावर निजणारा मुनिश्रेष्ठ ब्राहाण होतो. मौनव्रत जो पाळील त्याची आज्ञा सर्वत्र मानली जाते. जो भूमीवर भोजन करील तो पृथ्वीपती होईल ! ही व्रते करणारांनी ब्राह्मणांस दाने कोणकोणती द्यावी हेही हेमाद्रीने सविस्तर सांगितले आहे.
 नवरात्र व्रत हे अखिल भारतात रूढ आहे. त्याचा महिमा व त्याचे यमनियम काय आहेत ? नवरात्रात देवीची पूजा करावयाची असते. त्या देवीने स्वतःच सांगितले आहे की द्वितीयायुक्त प्रतिपदेस माझ्या पूजनास प्रारंभ करावा. अमावास्यायुक्त प्रतिपदेस प्रारंभ केला तर त्या मनुष्याला मी शाप देऊन भस्म करीन. जो आग्रहाने अमायुक्त प्रतिपदेस कलशस्थापना करील त्याच्या संपत्तीचा नाश होईल व त्याचा ज्येष्ठ पुत्र मृत्यू पावेल !

तिथितत्त्व
 या व्रतांच्या प्रतिपादनात ब्रह्मचर्य, उपोषण, कथाश्रवण यांचा उपदेश मधून मधून केला जातो. नाही असे नाही. पण महत्त्व सगळे आहे ते तिथीला, खाण्यापिण्याला, सोवळ्या-ओवळ्याला. लल्ल या पंडिताचे पुढील वचन कमलाकरभट्टाने उद्धृत केले आहे. 'व्रताचे तिथी हेच शरीर, तिथी हेच कारण, तिथी हेच प्रमाण होय. ज्या कर्मास जी तिथी सांगितली आहे तीच स्वीकारली पाहिजे.' व्रतवैकल्ये हा जड धर्म कसा ते यावरून कळेल. भक्तिभावनेला त्यात महत्त्व नाही. तिथी चुकली तर भक्तीने केलेल्या व्रताचे पुण्य तर मिळत नाहीच, उलट मागल्या सर्व पुण्याचा नाश होतो. तिथी किंवा इतर नियम अज्ञानाने मोडले तरी क्षमा नाही. नरक टळणार नाही. आणि अशी ही व्रते सर्व वर्णाना अवश्य आहेत. नवरात्राविषयी सांगताना हेमाद्री म्हणतो, सर्व जनांनी प्रत्येक स्थानी, प्रत्येक नगरी, प्रत्येक ग्रामी, वनी, गृही नवरात्र करावे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांनी व भक्तियुक्त म्लेच्छांनीही देवीपूजन करावे. देवीपुराण म्हणते, जो मनुष्य अज्ञानाने, आळसाने, दंभाने, द्वेषाने दुर्गादेवीचे पूजन करीत नाही, त्यावर भगवती क्रुद्ध होऊन त्याच्या इष्ट मनोरथांचा नाश करते. शिवरात्रिव्रताचा महिमा असाच आहे. या व्रताच्या व त्याच्या पारण्याच्या तिथीविषयी इतर व्रतांप्रमाणेच नियम आहेत. ते मोडले तर सर्वनाश होतो. असे व्रत ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत सर्वांना भुक्ती व मुक्ती देते.

वर्ज्यावर्ज्य
 खाण्यापिण्याप्रमाणेच इतर कृत्याकृत्यांचे नियम आहेत आणि तेही असेच अर्थशून्य आहेत. मंगळवार, गुरुवार, रविवार, अमावास्या, पौर्णिमा, संक्रांती, द्वादशी या दिवशी तुळशीपत्र तोडू नये. ज्यांनी तसे तोडले त्यांनी, भगवंताचे मस्तक तोडले, म्हणून समजावे. रविवारी दुर्वा तोडली व कार्तिकात आवळीचे पान तोडले तर मनुष्य अतिनिंद्य अशा नरकास जातो. शिक्षा अशा भयंकर असल्या तरी, त्या बाबतीतही, मतभेद आहेतच. 'स्मृतिसार' या ग्रंथान्वये, अमावास्येला तुळशीपत्र तोडणे निंद्य होय, तर 'विष्णुधर्मा' अन्वये त्या दिवशी तुलसीपत्र तोडण्यास हरकत नाही. दात धुण्याविषयी असेच विधिनिषेध आहेत. प्रतिपदा, षष्ठी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या दिवशी काष्ठाने दंतधावन करू नये. या तिथींत नारदपुराणाने एकादशी व पौर्णिमा यांची भर घातली आहे. शनी, रवी, मंगळ, शुक्र या दिवशी काष्ठाने दंतधावन करू नये, असे वसिष्ठाचे मत आहे. ज्या स्त्रीचा पती प्रवासात आहे तिला काष्ठ- दंतधावन वर्ज्य. श्राद्धकाळ, विवाहकाळ, सुतक या काळी हाच नियम आहे. हेमाद्रीच्या मते उपवास दिवस, श्राद्ध दिवस यांचे ठायी काष्ठाने दंतधावन करू नये. मातीने दात धुवावे. काष्ठाने धुतल्यास सात कुलांचा नाश होतो. व्यासांच्या मते कोणतेही व्रत घेतले असता, स्त्रियांनी दंतधावनच करू नये. (निर्णयसिंधू, पृष्ठ ३९८, ५०, ३० ). अभ्यंग स्नानाविषयी शास्त्रीपंडितांनी असाच गंभीर विचार केला आहे. आवळे वाटून अंगाला लावून स्नान करणे उत्तम. पण सप्तमी, नवमी, पर्वकाल, ग्रहणे या वेळी हे आमलक स्नान एका ग्रंथाने वर्ज्य सांगितले आहे, तर दुसऱ्याने प्रतिपदा, तृतीया, नवमी, दशमी, कृष्ण द्वादशी, त्रयोदशी या तिथींना ते वर्ज्य सांगितले आहे. अमावास्येला आमलक स्नान केले तर मातापित्यांच्या आयुष्याचा क्षय होतो.

विकृत धर्म
 धर्माविषयी या शास्त्री पंडितांच्या कल्पना किती विकृत होत्या हे यावरून दिसून येईल. धर्म म्हणजे मनाची उन्नती, मनाचा विकास, धर्म म्हणजे सद्गुण-संवर्धन, प्रज्ञाबल, बुद्धिबल यांचे पोषण, थोडक्यात म्हणजे मनुष्याच्या व्यक्तित्वाचा विकास असा अर्थ सर्व थोर धर्मवेत्त्यांनी, संतांनी, तत्त्ववेत्त्यांनी व ऋषिमुनींनी सांगितलेला आहे. पण या शास्त्रीपंडितांना त्याचे तितकेसे महत्त्व वाटत नाही. त्यांच्या मते सर्व उत्कर्ष- अपकर्ष तुळशी- दुर्वा तोडण्याच्या तिथींवर, दात घासण्याच्या वारांवर, तेल, तीळ, चवळ्या, मसुरा, मध, दूध, हे पदार्थ खाण्या न खाण्यावर अवलंबून आहे. त्यांचा सर्व भर आहे तो जड, तांत्रिक क्रियांवर, कर्मकांडावर आहे. एकादशी, चतुर्थी या दिवशी उपवास करून मन एकाग्र करून भगवद्भजन करावे, नामजप करावा, एवढे सांगून ते थांबत नाहीत. अमक्या व्रताला अमक्या देवतेची उपासना करावी, पूजा करावी, इतक्यावर त्यांचे समाधान नाही. त्या उपवासाचे पारणे ठरीव वेळेच्या आत केले नाही, त्या व्रतांचे उद्यापन नेमक्या तिथीला किंवा वाराला केले नाही, तर कुलनाश होतो, घोर नरकात पडावे लागते, असे ते सांगतात. नवरात्रात देवीच्या स्तोत्रांचा पाठ करण्यास ते सांगतात. पण लगेच पुस्तक कशावर तरी ठेवून वाचावे, हातात घेऊन वाचले तर पाठ विफल होतो, असे बजावतात. पुस्तक कोणी लिहिलेले असावे यालाही महत्त्व आहे. स्वतः लिहिलेले चालणार नाही, शूद्राचे चालणार नाही. पुण्य मिळत नाही. श्राद्धामध्ये पितृपूजा यथासांग झाली तरी, ब्राह्मणभोजनाच्या वेळी अन्न लोहपात्रातून वाढले तर, दाता नरकात जातो. तूप, कोशिंबीर हे पदार्थ पळीनेच वाढले पाहिजेत, पाणी आणि पक्वान्न पळीने वाढू नयेत. हे पाळले नाही तर पदार्थ पितरांना प्राप्त होत नाहीत व खाणाराला पाप लागते ! (निर्णय सिंधू, पृ. ४८९) सर्व भूमी यवनांक्रात झाली असताना, मूर्ती, देवळे यांचा विध्वंस होत असताना, भयानक अत्याचारांमुळे स्त्रिया धाय मोकलून रडत असताना कमलाकर भट्टासारखे महाराष्ट्राचे धार्मिक नेते, ब्राहाणांना पळीने वाढावे की हाताने वाढावे, कोणती उद्यापने कशी करावी, चवळ्यांचे महत्त्व काय, मसुरांचे काय, यांचा गंभीरपणे विचार करीत होते. आणि त्यातून निघालेले निर्णय हिंदू जनतेला महान धर्म म्हणून उपदेशीत होते. हे महाराष्ट्राचे धर्मक्षेत्रातले नेते ! धर्म म्हणजे काय हे समजण्याचीसुद्धा त्यांना पात्रता नव्हती.

जर्मन पंडित जॉली
 प्रसिद्ध जर्मन पंडित ज्यूलियस जॉली म्हणतो, 'हिंदुधर्मशास्त्र रचणारे हे निबंधकार, परिस्थिती पाहून कधी लिहीत नसत. या शास्त्राचा वास्तवाशी काहीही संबंध नव्हता. भोवतालच्या जगातील व्यवहारापासून ते अगदी अलिप्त असत. हिंदुराज्ये पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत असताना, हे शास्त्रीपंडित पाल अंगावर पडली तर कोणते प्रायश्चित्त द्यावे, या विचारात गर्क होते.' (विश्वरूप या निबंधकारावरचा जॉलीचा लेख, जर्नल ऑफ इंडियन हिस्टरी, १९२४, २५, २६, व्हॉल्यूम ३ व ४ )
 धर्माची प्रवृत्ती मूलतः मानवाच्या मनोविकासासाठी, त्याच्या उन्नयनासाठी, त्याच्या गुणोत्कर्षासाठी झालेली असते. पण या धर्माच्या अंतिम हेतूचा विसर पडला की त्याला जड कर्मकांडात्मक रूप येते व त्यामुळे समाजाचा अधःपात होतो. हा धर्म तिथीवर, बाह्य कर्मावर, खाण्यापिण्यावर, जड देहाच्या संस्कारावर म्हणजे टिळे, टोपी, भस्म यांवर भर देऊ लागतो. मध्ययुगीन धर्मशास्त्रज्ञांनी शास्त्रीपंडितांनी याचा अतिरेक करून खरा धर्म व त्याबरोबरच हिंदु-समाज रसातळाला नेला, हे मागे अनेक वेळा दाखविलेच आहे. तीर्थयात्रा हा जो एक साधनमार्ग त्याच्या विवेचनावरून हे अधिक स्पष्टपणे ध्यानात येईल.

तीर्थयात्रा
 धर्मसूत्रे व मनुयाज्ञवल्क्यांच्या स्मृती यांत तीर्थयात्रांचे फारसे माहात्म्य सांगितलेले नाही. धर्मसाधन म्हणून त्यांना महाभारत व पुराणे यांनी मात्र फार महत्त्व दिले आहे. पण तीर्थयात्रांचे महत्त्व सांगताना, या ग्रंथांनी त्यांमुळे होणाऱ्या नैतिक व आध्यात्मिक लाभावर सर्व भर दिला आहे. तीर्थयात्रांनी मनःशुद्धी होत नसेल तर त्यांचा काही उपयोग नाही, असा स्वच्छ अभिप्राय ते देतात. स्कंद, पद्म इ. पुराणांनी तर सत्य, क्षमावृत्ती, इंद्रियनिग्रह, परोपकार, ब्रह्मचर्य, ज्ञान, हीच खरी तीर्थ होत व मनःशुद्धी हे तीर्थांचे तीर्थ होय, असे सांगितले आहे. वायुपुराण म्हणते, जो पापी आहे, अश्रद्ध आहे, नास्तिक आहे, त्याला तीर्थापासून काही फल मिळणार नाही. खरा तीर्थस्थान कोण ? जो निग्रही आहे, शुद्ध आहे, निष्पाप आहे तो. केवळ देह गंगेत बुडविणे म्हणजे स्नान नव्हे. वामनपुराण म्हणते, जो लोभी आहे, दुष्ट आहे, क्रूर आहे, ढोंगी आहे, सदा भोगीसक्त आहे त्याने सर्व तीर्थांत स्नान केले तरी त्याचे पाप धुतले जात नाही. मासे पवित्र गंगाजलातच राहतात व तेथेच मरतात. पण तरी त्यांना स्वर्गप्राप्ती होत नाही. कारण त्यांची मनःशुद्धी झालेली नसते. ब्रह्मपुराण म्हणते, इंद्रियनिग्रही, वैराग्यशील मनुष्य जेथे असतो तेथेच कुरुक्षेत्र, प्रयाग, पुष्कर ही सर्व तीर्थे असतात (म. म. काणे, हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र, खंड ४ था, पृ. ५६३).

पंडे, गयावळ
 पण पुढच्या काळात या श्रेष्ठ मानसिक गुणांचे महत्त्व हळूहळू लुप्त होऊ लागले. आणि प्रत्येक बाबतीत भावहीन, भक्तिहीन जड क्रियांना महत्त्व येऊ लागले. पूजाविधी, स्नान, ब्राह्मणभोजने, नानाविध दाने, गंधभस्मलेपन, मुद्रा, क्षौर, वेणीदान या जड आचारांचे प्रस्थ माजले. गयावळ, पंडे, बडवे यांनी यांतून धंदा निर्माण केला आणि तो फारच फायदेशीर ठरू लागल्यामुळे, हिंदुस्थानात दरसाल हजारो, अक्षरश: हजारो, तीर्थक्षेत्रे निर्माण होऊ लागली. त्या क्षेत्रांची कल्पित माहात्म्ये रचली जाऊन तीं व्यासांच्या माथी मारली जाऊ लागली. दुर्दैव असे की ज्या पुराणांनी मनःशुद्धीचे अपार महत्त्व सांगितले त्यांतच पुढीलांनी भर घालून या बाह्य क्रियांचे स्तोम माजविले. आणि मग काशी किंवा कुरुक्षेत्र या क्षेत्रांत नुसते राहिल्याने मोक्ष मिळतो, गंगेचा केवळ वारा लागला तरी मुक्ती मिळते, असे लोभी शास्त्र रूढ होऊन गुणविकास आत्मोन्नती हा धर्माचा मूळ हेतू लोप पावला. म. म. काणे म्हणतात, मध्ययुगीन निबंधकारांची प्रवृत्तीच अशी होऊ लागली की 'प्रत्येक गोष्टीचे, विधीचे, आचारांचे अवडंबर करून ती दुष्कर करून टाकावी. यातूनच पंडे, गयावळ यांच्या लोभी वृत्ती पोसल्या जाऊन यात्रेकरूंची लूट व नागवणूक सुरू झाली.' (खंड ४ था, पृ. ५८०) मध्ययुगीन शास्त्रीपंडितांनीच धर्माला अधर्माचे रूप कसे दिले ते यावरून कळून येईल.

नियमांचे जंजाळ
 आणि अवडंबर करण्याची ही प्रवृत्ती केवळ तीर्थयात्रांच्या बाबतीतच दिसते असे नाही. कालनिर्णय, तिथींचे शुभाशुभत्व, सुतकसोयर या प्रत्येक बाबतीत धर्मसूत्रे, स्मृती यांत एकपट असेल तर त्याचे दसपट करून मांडावयाचे हाच या मध्ययुगीन शास्त्री- पंडितांचा धंदा. घरात मूल जन्मले तर त्याचे सोयर एखादा दिवस पाळावे, असे स्मृतीतही सांगितले आहे. पण या शास्त्रीपंडितांनी ते दहापर्यंत वाढवीत नेले आणि त्यात मग आईला किती, बापाला किती, नात्यातल्या कोणत्या माणसाला किती यासंबंधीच्या नियमांचे जंजाळ ! सुतकासंबंधी हेच दिसते. लहान मूल मेले तर, नाळ कापण्यापूर्वी मेले तर इतके सुतक, दात येण्यापूर्वी गेले तर इतके ! मोठ्या माणसांच्या मृत्यूविषयीच्या सुतकाचे असेच अवंडबर श्राद्धपक्षांच्या नियमांचा असाच एक मोठा गुंतवळा आहे. ब्राह्मणांना बोलवावयाचे ते केव्हा बोलवावे, सकाळी निमंत्रणासाठी जावे की संध्याकाळी, आदल्या दिवशी की त्याच दिवशी, यांविषयी नियम. तरुण माणसाचे श्राद्ध असले तर कोणता ब्राह्मण, म्हाताऱ्याचे असले तर कोणता, याचे नियम. ब्राह्मणाच्या योग्यतेविषयी असेच दंडक आणि यात जरा चूक झाली की नरकवास !

समान धर्मशास्त्र ?
 अखिल हिंदू समाजाला, ब्राह्मणांपासून अत्यंजांपर्यंत सर्वांना समान असा एकही आचार, सर्वाना समान असे एकही धर्मसाधन हिंदुधर्मशास्त्राने सांगितलेले नाही, त्यामुळे भारतात धर्म हे संघटनतत्त्व कधीच होऊ शकले नाही, असा एक अक्षेप घेण्यात येतो. याला उत्तर म्हणून असे सांगण्यात येते की व्रते आणि तीर्थे हे आचार तसे आहेत. रामनवमी, शिवरात्र, एकादशी इ. व्रते व काशी, पुष्कर, रामेश्वर इ तीर्थक्षेत्रांच्या यात्रा या शूद्र चांडाळ यांना सुद्धा विहित आहेत. तेव्हा अखिल हिंदूंना एक धर्म, एक आचार नाही, असे म्हणता येणार नाही. पण हे उत्तर फोल आहे. कारण वते, तीर्थे ही, सर्व वर्णाना विहित व फलप्रद आहेत हे सांगताना, हिंदुसमाजातील वर्णविषमता जशीच्या तशी कायम ठेवण्याची, एवढेच नव्हे तर ती तीव्रतर करण्याचीही शास्त्री पंडितांनी तरतूद करून ठेवलेली आहे.

वर्णविषमता
 निर्णयसिंधू व शूद्रकमलाकर हे कमलाकर भट्टाचे ग्रंथ पाहा. अत्यंत प्राचीन काळी शूद्राला वेदमंत्रांचाही अधिकार होता, इतकेच नव्हे, शूद्रांनी वेदमंत्रांची रचनाही केलेली आहे, हे मागे सांगितलेच आहे. पुढील काळात शूद्रांचा वेदमंत्रांचा अधिकार नष्ट करण्यात आला. त्यांची धार्मिक कृत्ये पुराणमंत्रांनी करावी, असा दंडक घातला गेला. तरीही इ. स. १००० पूर्वी शूद्रांना पुराणोक्त मंत्रांचा पाठ स्वतः करण्याचा अधिकार होता. मिताक्षरेचा कर्ता विज्ञानेश्वर व कल्पतरूचा कर्ता लक्ष्मीधर हे अकराव्या व बाराव्या शतकातले निबंधकार. त्यांनीही शूद्राचा हा अधिकार मान्य केलेला आहे. पण कमलाकर भट्टाला तो मान्य नाही. शूद्रांना पुराणोक्त मंत्राचा पाठ करण्याचा त्याच्या मते अधिकार नाही. त्यांची धर्मकृत्ये व संस्कार पुराणमंत्रांनी करावे. पण ते मंत्र ब्राह्मणांनी म्हणावयाचे व शूद्रांनी फक्त ऐकावयाचे ! त्यांचा उच्चार त्यांनी करावयाचा नाही. शिवाची भक्ती, शिवरात्रीव्रत शूद्रांना विहित आहे. पण 'ॐ नमः शिवाय' या मंत्रातील ॐ चा उच्चार करण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांनी उरलेला मंत्र म्हणावा. काही व्रतात उपवास करावयाचा असतो. तो कधी कधी तीन, चार, पाच दिवसांचाही असतो. पण शूद्रांना व वैश्यांनाही दोन दिवसांपेक्षा जास्त उपवास करण्याचा अधिकार नाही. प्रश्न असा येतो की हा भेद करून शास्त्रज्ञांनी काय साधले ? पण हा प्रश्न व्यर्थ आहे. कारण तशी कसलीही दृष्टी शास्त्रज्ञांना नव्हती समाजसंघटनेची दृष्टी या शास्त्रज्ञांना असती तर या विषमतेमुळे शुद्ध, चांडाळ हे हीनवर्णीय लोक मुस्लिम धर्माला बळी पडत आहेत, यासाठी आपण विषमता शक्य तो कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे धोरण त्यांनी आखले असते. पण हिंदूंचे धर्मांतर हे मोठे संकट आहे हे जाणण्याची ऐपतच कमलाकर भट्टासारख्यांना नव्हती, त्याला काय करणार ? उपवासाच्या दिवसापुरताच भेद करून तो थांबलेला नाही. कूर्मपुराणाच्या आधारे तो सांगतो की व्रत आचरणाऱ्या पुरुषाने त्या दिवशी महार, अंत्यंज, पतित यांना स्पर्श करू नये. त्यांच्याशी संभाषण करू नये, त्यांच्याकडे पाहूही नये. व्रतधर्म हिंदूतील सर्व वर्णांना समान म्हणून सांगितला आहे. त्यातील समानतेचा हा अर्थ आहे.
 बहामनी काळातील नेत्यांचा जो दुसरा वर्ग म्हणजे शास्त्रीपंडित त्यांच्या नेतृत्वाची चिकित्सा आपण करीत आहो. वरील विवेचनावरून आपल्या हे ध्यानात येईल की समाजाचे नेतृत्व करण्याची कसलीही ऐपत या शास्त्रीपंडितांच्या ठायी नव्हती. डॉ. काणे आणि जर्मन पंडित जॉली यांची या शास्त्रीपंडितांच्या विषयीची मते वर दिलीच आहेत. डॉ. काणे यांनी आपल्या 'धर्मशास्त्राचा इतिहास' या ग्रंथाचा समारोप करताना, शेवटच्या पाचव्या खंडाच्या दुसऱ्या विभागात, पुन्हा याच स्वरूपाची टीका केली आहे. (पृ. १६२३). ते म्हणतात, गझनीच्या महंमदाने अनेक स्वाऱ्या केल्या. प्रत्येक स्वारीत त्याचाच विजय झाला. याची चिकित्सा, याची कारणमीमांसा एकाही हिंदू पंडिताने का केली नाही ? महंमदाच्या बरोबर आलेला मुस्लिम पंडित अल्बेरुणी याने ही चिकित्सा करून हिंदूंच्या अनेक दोषांवर टीका केली आहे. पण महंमद गझनीच्या स्वाऱ्यासंबंधी किंवा त्यानंतरच्या आक्रमणासंबंधी, हिंदुपंडितांनी विवेचन करून शत्रूच्या विजयाची व आपल्या दोषाची कारणमीमांसा करून, समाजाला मार्गदर्शन केले नाही. या पंडितांचे सर्व लक्ष व्रत, दान, श्राद्ध, प्रायश्चित्ते यांवर होते. त्यांवर त्यांनी हजारो पानांचे ग्रंथ लिहिले. पण राजकीय परिस्थिती, इतिहास, शस्त्रास्त्रे, आरमार, यांविषयी त्यांनी एक अक्षरही लिहिले नाही.'
 डॉ. काणे यांनी ज्या अल्बेरुणीचा निर्देश केला आहे त्याची थोडी माहिती देतो. तीवरून तुलनात्मक दृष्टीने पाहाता येईल व तत्कालीन भारतीय शास्त्रीपंडितांचे वैगुण्य ध्यानात येईल. अबू रैहान महंमद अल्बेरुनी (९७३ - १०४८) हा गणितशास्त्रज्ञ ज्योतिषी, इतिहासकार व तर्कपंडित होता. संस्कृतमध्ये त्याने चांगले प्रावीण्य मिळविले होते. त्याने अनेक देशांतून प्रवास केला होता. सुलतान महंमद याच्या बरोबर तो हिंदुस्थानात आला होता. आणि तेथल्या परिस्थितीचा, चालीरीतींचा, पुराणे, गीता, वेद, यांचा अभ्यास करून त्याने 'तारीख अल् हिंद', 'हिंदुस्थानचे वर्णन' या नावाचा ग्रंथ लिहिला. त्याने अनेक ग्रीक ग्रंथांची भाषांतरे केली होती. भूगोल, पदार्थविज्ञान रसायन या शास्त्रांची त्याला आवड होती.
 हे वर्णन वाचून मनात येते की भारतात त्यावेळी असे दहापाच पंडित जरी असते तरी या देशाचा अधःपात झाला नसता. अनेक देशांत प्रवास केलेले, ग्रीक आरबी या भाषांचा अभ्यास केलेले, पदार्थ-विज्ञान, रसायन, इतिहास भूगोल याची आवड असणारे पंडित यावेळी भारताला हवे होते. ही परंपरा सातव्या आठव्या शतकापूर्वी येथे होती. पण पुढे मूढ व अविवेकी, अंध असे धर्मशास्त्र प्रवर्तित झाले आणि परदेश- गमन बंद झाले. परकी भाषांचे अध्ययन संपले आणि शब्दप्रामाण्यामुळे विद्याही लोपली. योगायोग असा की याच वेळी ग्रीक विद्येचे पुनरुज्जीवन करून मार्सिग्लिओ, विल्यम ऑफ ओकॅम, महाकवी दांटे, पियरी डुवॉईस या पाश्चात्य पंडितांनी पश्चिम युरोपात भौतिक विद्येचा प्रसार केला; अवलोकन, स्वतंत्र चिंतन, प्रयोग, बुद्धिप्रामाण्य इतिहासचिकित्सा या ज्ञानसाधनांची महती लोकांना पटवून दिली आणि युरोपचा उत्कर्ष घडवून आणला. भारतात प्राचीन काळी ग्रीकविद्येसारखीच विद्या होती. अकराव्या शतकातील किंवा बहामनी कालातील शास्त्रीपंडितांनी तिचे पुनरुज्जीवन केले असते तर पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे परकीय आक्रमणांचा निःपात करण्यास भारत समर्थ झाला त्याचप्रमाणे या काळातही तो समर्थ होऊन तेराव्या शतकातच हा देश स्वतंत्र झाला असता. पण त्या प्राचीन विद्येची गोडी या शास्त्रीपंडितांना मुळीच नव्हती. त्यांना व्रते, श्राद्धे, प्रायश्चित्ते, हाच धर्म असे वाटत होते. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत यांतील- विशेषतः महाभारतातील श्रेष्ठ धर्मतत्त्वांची त्यांना जाणीवही नव्हती. असे शास्त्रीपंडित समाजाचे नेतृत्व काय करणार ?