महाराष्ट्र संस्कृती/समाज-परिवर्तन



३६.
समाज परिवर्तन
 


नवयुग- लक्षण
 समाजरचनेच्या दृष्टीने येथे ब्रिटिश कालात जे नवयुग निर्माण झाले त्याचे पहिले लक्षण हे की आपले पंडित या समाजातल्या घडामोडींची, उत्कर्षापकर्षाची, यशापयशाची भौतिक दृष्टीने कारणमीमांसा करू लागले. आणि वर्णभेद, जातिभेद, अस्पृश्यता, स्त्रीचे दास्य, व्यक्तीवरची अर्थशून्य बंधने, ही सर्व कारणे आपल्या अधःपाताच्या बुडाशी आहेत हे त्यांच्या ध्यानात येऊन तसे ते उघडपणे सांगू लागले. वरील प्रकारचे समाजाच्या भिन्न घटकांतले जे भेद, त्यांनी पराकाष्ठेची विषमता हिंदुसमाजात निर्माण होऊन तो समाज विघटित झालेला आहे, एकजिनसीपणा, एकसंधपणा असा त्याच्यात राहिलेलाच नाही, हा सर्व एक समाज आहे असे म्हणण्याजोगे कोणतेच लक्षण त्याच्या ठायी दिसत नाही, तेव्हा समाजसुधारणा करावयाची तर प्रथम हे भेद नष्ट करून सर्व जातिवर्णाना, स्त्री, शूद्र, अस्पृश्य यांना समपातळीवर आणले पाहिजे, हे त्यांनी जाणले व त्या उद्योगास ते लागले.

बाळशास्त्री
 या क्षेत्रातही बाळशास्त्री जांभेकर यांचेच नाव पुढे येते. ' 'महाराष्ट्राचे आद्य ऋषी' म्हणून त्यांचा गौरव केला जातो तो अगदी सार्थ आहे. 'लोकस्थिती, धर्मरीती, आणि राज्यरीती यांत चांगले व उपयोगी फेरफार घडवून आणणे' हे नियतकालिकांचे कर्तव्य आहे हे 'दर्पण'च्या पहिल्या अंकातच त्यांनी सांगून टाकले आहे आणि त्या दृष्टीने राम मोहन राय यांचा गौरव करताना, 'जशी त्यास विद्येची आवड, तशीच धर्मविचाराची होती. तो विचार करून शेवटी त्याने आपला मूळचा वर्णाश्रमादी धर्म, ब्राह्मण धर्म सोडला आणि वेदान्तमत स्वीकारले.' वरील एक दोन वाक्यांवरूनच पाश्चात्य विद्येमुळे येथल्या पंडितांच्या मनात केवढी क्रांती झाली होती ते ध्यानात येईल. लोकरीती, धर्मरीती यांत फेरफार घडविणे हे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन करणे आणि वर्णाश्रमादी ब्राह्मणधर्म सोडल्याबद्दल गौरव करणे, हे गेल्या हजार वर्षाच्या काळात कोणी केले नव्हते. हे बौद्धिक सामर्थ्य त्या काळात कोणाच्याही ठायी नव्हते. भौतिक विद्येच्या अध्ययनाने या अर्वाचीन पंडितांना ते प्राप्त झाले होते.

नवे तत्त्वज्ञान
 तसे सामर्थ्य प्राप्त झाल्यामुळे बाळशास्त्री यांच्यानंतर येथे सुधारकांची एक परंपराच निर्माण झाली. आणि समाजरचनेविषयी श्रुतिस्मृतींनी सांगितलेले नियम अगदी घातक असून पाश्चात्यांनी प्रतिपादिलेल्या समता, व्यक्तिस्वातंत्र्य इ. तत्त्वांचा अंगीकार करून आपण आपल्या समाजाची त्या तत्त्वांवर पुनर्घटना केली पाहिजे, असे निर्भयपणे सांगण्यास त्यांनी सुरुवात केली. व्यक्तीला विचार-उच्चार-आचारराचे पूर्ण स्वातंत्र्य असावे, वर्णभेद, जातिभेद ही व्यवस्था हानिकारक असून व्यक्तीची योग्यता तिच्या जन्मावरून न ठरविता तिच्या गुणांवरून ठरवावी, स्त्रीपुरुषांत पूर्ण समता असली पाहिजे, बालविवाह, पुनर्विवाहबंदी या रूढी नष्ट झाल्या पाहिजेत, पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही शिक्षण दिले पाहिजे, व्यक्तीला आपल्या इच्छेप्रमाणे कोणताही व्यवसाय करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे, हे व या तऱ्हेचे विचार हाच बहुतेकांच्या प्रतिपादनाचा सारार्थ होता. दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, जोतिबा फुले, विष्णुबुवा ब्रम्हचारी, न्या. मू. रानडे, डॉ. भांडारकर हे या प्रारंभीच्या काळातले प्रमुख पंडित आणि समाजसुधारक होत.

जुनी दृष्टी
 भौतिक विद्येचा अभ्यास येथे झाला नसता तर, आपला अधःपात झाला, पारतंत्र्य आले, दारिद्र्य आले हे कलियुगामुळे आले, पापाचरणाची ही फळे आहेत, पृथ्वीला हा सर्व भार झाला आहे, अशी कार्यकारणमीमांसा करून लघुरुद्र, महारुद्र, ब्राम्हण- भोजने, शतकोटी नामजप, गीता-ज्ञानेश्वरीची अखंड पारायणे, भागवताचे सप्ताह ही उपाययोजना येथल्या शास्त्रीपंडितांनी सांगितली असती !
 वरील सर्व समाजसुधारकांचा निर्देश मागल्या प्रकरणात धर्मपरिवर्तनाचा इतिहास सांगताना केलेलाच आहे. त्या क्षेत्रातले जे नेते तेच याही क्षेत्रात नेतृत्व करीत होते. आणि समाजाची ही दोन्ही अंगे अविभाज्य असल्यामुळे तसे होणे अपरिहार्यच होते.

दादोबा
 दादोबा पांडुरंग यांनी स्थापिलेल्या 'मानवधर्म सभा,' आणि 'परमहंस सभा' यांची माहिती मागे दिलीच आहे. धर्मसुधारणा हे जसे त्यांचे उद्दिष्ट होते तसे जातिभेदनाश हेही उद्दिष्ट होते. आणि त्याला पहिल्याइतकेच किंबहुना थोडे जास्तच महत्त्व होते. ख्रिस्त्याच्या हातचा पाव व मुसलमानाच्या हातचे पाणी घेतले पाहिजे हे नियम त्यासाठीच होते. पण सभेची सर्व कामे गुप्तपणे चालविल्यामुळे या क्रांतिकारक कृत्यांचा समाजपरिवर्तनाला फारसा उपयोग झाला नाही. शिवाय, 'असो कृष्णगीता किंवा ख्रिस्तगीता, महम्मदाची वार्ता असे ना का' असा उपदेश ते करीत. कृष्णाच्या बरोबरीने ख्रिस्त व महम्मद यांचा उल्लेख करणे त्या वेळी कोणालाही पटण्याजोगे नव्हते. प्रार्थनासमाजाची एकंदर चालवणूक केवळ चर्चमधल्या ख्रिश्चनांच्या उपासने- सारखी होती, एवढे कारण, समाज त्यांच्यापासून दुरावायला, पुरले. मग येथे तर ख्रिस्ताला मोठे पद दिलेले होते. ते समाजाला कसे मानवणार ?

लोकहितवादी
 १८४८ साली लोकहितवादींची 'शतपत्रे' प्रसिद्ध होऊ लागली. समाजसुधारणेचा सर्वांगीण विचार त्यात केलेला दिसतो. वर्ण किंवा जाती ही जन्मावरून न ठरविता गुणांवर ठरवावी असे सांगताना ते म्हणतात, 'कर्मकरून जातीचा आणि वर्णाचा निश्चय करावा. ब्राह्मण असून नीच कर्म करील तर ब्राह्मण नव्हे. तसेच क्षत्रियाने ब्राह्मण कर्म केले तर तो ब्राह्मण व्हावा.' त्यांच्या मते प्राचीन काळी अशीच व्यवस्था होती. 'ब्राम्हण कुळात जन्मून कित्येक राजे झाले व कित्येक क्षत्रिय कुळात जन्मून ब्राम्हण झाले, असे पुराणातील कथांवरून दिसते. वाल्मीक हा प्रथम कोळी होता व नंतर ऋषी झाला. पराशराने शूद्र स्त्री केली. तिचाच मुलगा व्यास. इतर देशातही समाजात भेद आहेत. पण तेथे ते वंशपरंपरा नाहीत. हिंदुस्थानात तसे आहेत. हेच आपल्या अधःपाताचे कारण होय.'

ब्राह्मण- अर्थशत्रू
 ब्राह्मणांवर लोकहितवादींनी इतकी कडक टीका केली आहे की तितकी जोतिबांनी सुद्धा केली नसेल. हे ब्राह्मण अर्थशत्रू असून पाठांतरालाच विद्या समजतात. आपली वृत्ती अविच्छिन्न चालावी म्हणून त्यांनी आपले माहात्म्य वाढवून ठेवले आहे. आणि दुर्दैव हे की हिंदुस्थानातील सर्व जातींची ब्राह्मणांवर श्रद्धा आहे. कित्येक ब्राह्मण हीन, भ्रष्टाचारी, लोभी असे असतात. तरी आपण सर्व वर्णांचे गुरू आहो, असा तोरा ते मिरवितातच.
 ब्राह्मण व इतर जाती यांत लोकहितवादी मुळीच फरक मानीत नाहीत. ते म्हणतात, भटांत व अतिशूद्रांत मला इतकेच अंतर दिसते की एक बोलता राघू व एक न बोलता राघू, परंतु ज्ञान एकच. अतिशूद्र गरीब, ते आपला लहानपणा जाणतात; पण भट मूर्ख असून स्वतःला ज्ञानी समजतात व गर्व करतात.' असे हे ब्राह्मण हिंदु समाजाचे नेतृत्व करतात हे त्याचे दुर्दैव होय असे सांगून, इंग्रजी राज्यात ब्राह्मणांचे महत्त्व नाहीसे होत आहे याबद्दल लोकहितवादींनी समाधान व्यक्त केले आहे.

सरदार तसेच
 लोकहितवादींनी ब्राह्मणांवर जशी टीका केली तशीच राजे लोक, सरदार यांच्यावरही प्रखर टीका केली आहे. 'हे राजे व सरदार इंग्रजांपुढे लाचार होऊन त्यांना म्हणतात की तुम्ही देवासारखे आहात. रयतेच्या कल्याणाची चिंता ते कधीच करीत नाहीत. पुण्यात लायब्ररी केली, पण ग्रंथ वाचवयास सरदार कोणी येत नाही. आम्ही थोर, चार शिपाई, घोडे, अबदागीर घेतल्यावाचून ते बाहेर पडत नाहीत. कुळंबी नांगर धरून मेहनत करतात आणि जहागिरदार किंवा इनामदार त्यास फक्त कोंडा ठेवून त्यांचे दाणे घेतो व आपण रेशीमकाठी धोतरे नेसतो व कामकाज काही करीत नाही.'
 सारांश असा की वंशपरंपरेवरून योग्यता ठरवितात. गुण कर्म पाहात नाहीत. हिंदुस्थानच्या सर्व अधःपाताचे हे मुख्य कारण आहे.

स्त्री-सुधारणा
 स्त्री-जीवनाविषयीही लोकहितवादींनी असेच पुरोगामी विचार मांडले आहेत. 'सांप्रत हिंदू लोकांत फारच मूर्खपणा आहे. यास्तव स्त्रियांची दुर्दशा फार आहे. प्राचीन काळी असे नव्हते. तेव्हा स्त्रियांना मान फार होता. पण पुढे मुसलमानांच्या अनुकरणाने त्यांच्या चाली हिंदू लोकांस लागल्या. आणि स्त्रियांचा अपमान होऊ लागला. कन्या झाली की लोक नाक मुरडतात. स्त्रियांची जनावरासारखी अवस्था झाली आहे. आता तरी हिंदू लोकांस उमज पडो व जसे पुरुष तशा स्त्रिया हे त्यांस समजो. आणि जे सुधारक हिंदू असतील त्यांनी निर्भयपणे कामास प्रारंभ करावा.'
 स्त्रियांच्या सुधारणेविषयी आपली तळमळ याप्रमाणे अनेक पत्रांत लोकहितवादींनी व्यक्त केली आहे. सतीची चाल, बालविवाहपद्धती, विधवाविवाहास बंदी, आणि स्त्रीला अज्ञानात ठेवण्याची प्रथा ही स्त्रियांच्या दुःस्थितीची, त्यांच्या मते, मुख्य कारणे होत. या सर्व रूढींवर व त्यांना आधारभूत असलेल्या शास्त्रावर त्यांनी फार प्रखर टीका केली आहे. ते म्हणतात 'मनू जर ईश्वरांश असेल तर कोणे एके स्त्रीचा नवरा आधी मरणार नाही. असे का केले नाही ? पण स्त्रियांवरील या आपत्तींचा बंदोबस्त मनूच्याने होत नाही, तर त्याचे शास्त्र फिरविण्यास काय चिंता आहे ?'

स्त्री-शिक्षण
 स्त्रियांची दुःस्थिती नाहीशी होण्यास स्त्रीशिक्षण हा उपाय लोकहितवादींनी सांगितला आहे. ते म्हणतात, 'स्त्रिया सुशिक्षित होतील तेव्हा आपला अधिकार स्थापतील. आणि संसार सुखास हानी करणाऱ्या पंडितांपासून असा तहनामात्र करून घेतील.' जर स्त्रियांस थोडे ज्ञान असते तर त्यांनी पंडितांच्या जुलमाचा विचार काढून, जे पुनर्विवाह करू नये म्हणतात त्यांचे श्रीमुखात दिली असती. पण अज्ञान व भोळसरपणा यामुळे सर्वत्र जुलूम चालतो असा नेम आहे.' यातील शेवटचे वाक्य हिंदुस्थानच्या गेल्या हजार वर्षांच्या इतिहासाचे सूत्र आहे. ज्ञानाचा, भौतिक विद्येचा अभाव, अज्ञान व भोळसटपणा यामुळे सर्वत्र जुलूम चालू शकला व या देशाला पारतंत्र्य आले. त्याची सर्व संपत्ती गेली आणि हा सर्व समाज शतधा भंगून गेला. सामर्थ्य असे कसलेही त्याच्याजवळ राहिले नाही.

जोतिबा
 म. जोतिबा फुले यांनी नेमके हेच वर्म जाणले होते आणि त्यांनी अस्पृश्यांसाठी व स्त्रियांसाठी शाळा स्थापून प्रत्यक्ष कार्याला प्रारंभही केला. त्यांचे असामान्यत्व यातच आहे. गेल्या शतकात समाजसुधारणेचे तत्त्वज्ञान अनेक थोर पंडितांनी सांगितले; पण प्रत्यक्ष कृती करणारे अपवादात्मकच होते. त्यांमध्ये म. फुले हे अग्रणी होत. त्यातही विशेष असे की त्यांनी आपल्या स्त्रीला शिक्षण देऊन शिक्षिका केले आणि त्या साध्वीनेही घरचा विरोध, कुटाळांची टवाळी याची परवा न करता आपल्या पतीच्या कार्यात अखंड सहकार्य केले. जोतिबांनी यानंतर एक पाऊल आणखी पुढे टाकून आपल्या समोरचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. यानंतर दहावीस वर्षांनी १८७३ साली जोतिबांनी 'सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ब्राह्मणांच्या वर्चस्वातून बहुजन समाजाला सोडविणे, हे जोतिबांचे प्रमुख उद्दिष्ट होते. आणि ते बहुजन समाजातील असल्यामुळे त्यांच्या कामाला वेग आला. पण ब्राह्मणांच्या वर्चस्वामागे काय तत्त्वज्ञान आहे, बहुजन समाज ब्राह्मणांच्या आहारी जाण्याची ऐतिहासिक कारणे कोणती आहेत, याचा कसलाही अभ्यास न करता जोतिबांनी वाटेल त्या काल्पनिक उपपत्ती मांडल्या. त्यामुळे त्यांच्या चळवळीमागची उदात्त प्रेरणा, थोर ध्येयनिष्ठा, असामान्य धैर्य यांचा जोतिबांच्या बरोबरच लोप झाला आणि ब्राह्मणद्वेष एवढेच रूप त्या चळवळीला राहिले. त्यामुळे केशवराव जेधे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्यांनाही सत्यशोधक समाजावर टीकास्त्र चालवावे लागले व त्या चळवळीपासून दूर व्हावे लागले. पण हे काही असले तरी जोतिबांचे समाजसुधारणेच्या क्षेत्रातले स्थान आजही अढळ आहे यात शंका नाही.

सुधारणेचे तत्त्वज्ञान
 जोतिबांचे कार्य चालू असतानाच न्या. मू. रानडे यांचा उदय झाला आणि लोकोत्तर बुद्धिमत्तेने व पांडित्याने त्यांनी समाजसुधारणेचे सर्व तत्त्वज्ञान सांगून महाराष्ट्रात समाजसुधारणेचा पाया भक्कम करून टाकला.

अविभाज्य
 सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक या सर्व सुधारणा अविभाज्य आहेत, हा त्यांचा पहिला सिद्धांत होता. या चारही क्षेत्रांतील सुधारणांमुळे ज्यावर परिणाम व्हावयाचा ते मानवी मन एकच असल्यामुळे या सर्व सुधारणांचा सामग्ऱ्यानेच विचार व्हावयास हवा. हा विचार लेख, व्याख्याने, प्रवचने याद्वारा रानडे यांनी समाजमनावर बिंबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

मानवी प्रतिष्ठा
 'मानवी प्रतिष्ठेचे उज्जीवन' हा त्यांचा दुसरा सिद्धांत होता. आजपर्यंत भारतात मानवी मनावर अनंत बंधने घातली गेल्यामुळे ते कायमचे दुबळे व पंगू होऊन गेले आहे. स्वतंत्र विचार करण्याची कुवतच त्याच्या ठायी राहिलेली नाही. त्यामुळे येथल्या मानवाचे मन सदैव बालच राहून आत्मनियंत्रणाचे सामर्थ्य त्याला कधी प्राप्तच झाले नाही. स्वयंशासनाने येणारी प्रौढता, प्रतिष्ठा, येथल्या समाजाला व मानवाला कधी प्राप्तच झाली नाही. तेव्हा या मानवी शक्तीचे, मानवाच्या बुद्धीचे, प्रज्ञेचे, व्यक्तित्वाचे उज्जीवन केल्यावाचून कोणतीही सुधारणा होणे शक्य नाही, हे माधवरावांनी परोपरीने सांगितले आहे.
 स्त्रीशिक्षण, प्रौढविवाह, पुनर्विवाह, समता, इ. बहुतेक सर्व सुधारणांचा रानडे यांनी पुरस्कार केला आहे आणि स्त्रियांच्या उन्नतीसाठी निर्माण झालेल्या प्रत्येक संस्थेत व चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांचा पिंड क्रांतिकारकाचा नव्हता. ते विकासवादी होते. भारताच्या प्राचीन परंपरेचा त्यांना अतिशय अभिमान होता आणि कोणतीही सामाजिक सुधारणा करावयाची असली तरी आपल्याला आपल्या प्राचीन ऋषींचा आधार निःसंशय मिळेल, आजच्या सुधारणा म्हणजे त्यांनी प्रतिपादिलेल्या तत्त्वांची परिणतीच होय, असे ते म्हणत असत. पण असे असले तरी अंधश्रद्धेचा लवलेशही त्यांच्या ठायी नव्हता. पूर्वजांचा आधार मिळत नसेल तर नवा मार्ग आखू नये, असे त्यांनी कधीच म्हटले नाही. पण नवा मार्ग आखताना विध्वंस, उच्छेद, प्रलय, असल्या आततायी प्रकारांचा आश्रय करणे त्यांस मान्य नव्हते.

विसंगती
 डॉ. भांडारकर, विष्णुशास्त्री पंडित यांसारखे सहकारी त्यांना लाभल्यामुळे त्यांच्या कार्याला चांगली गती मिळाली. पण या त्यांच्या कार्याला कृतीची जोड न मिळाल्यामुळे त्याला यावा तसा जोम आला नाही. प्रथम पत्नी निवर्तल्यावर त्यांनी स्वतः उपदेशिल्याप्रमाणे विधवाविवाह केला नाही. आणि पंचहौद मिशन प्रकरणी आपल्या विवेकाविरुद्ध जाऊन त्यांनी प्रायश्चित्त घेतले. या व अशा प्रकारच्या विसंगतींमुळे एकंदर समाजसुधारणेच्या कार्याची फार हानी झाली.

धोंडो केशव
 धोंडो केशव कर्वे यांचे या बाबतीतले उदाहरण मोठे लक्षणीय आहे. स्वतःच्य बोलाप्रमाणे कृती करून त्यांनी विधवाविवाह केला आणि स्त्रीशिक्षणसंस्था स्थापून त्या कार्याला सर्वस्वी वाहून घेतले. त्यामुळे आज महाराष्ट्रात स्त्रीशिक्षण म्हणजे कर्वे असे समीकरणच होऊन बसले आहे. तत्त्वज्ञान आणि कृती यांचे सामर्थ्य असे अद्वितीय आहे. त्याच्या अभावी आज अनेक विधवा, मुली घरीदारी, जुन्या काळाप्रमाणे पिचत पडल्या असत्या आणि अनेक कर्तबगार स्त्रियांना व संस्थांना महाराष्ट्र मुकला असता

आगरकर - जातिभेद
 'बुद्धिवादाचे जनक' असा आगरकरांचा मागे उल्लेख केलाच आहे. आणि महाराष्ट्राला बुद्धिवाद शिकविणे हेच त्यांचे सर्वात मोठे कार्य होय. बुद्धिवादाचे सर्व तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या लेखांतून मांडून सामाजिक व धार्मिक क्षेत्रातल्या प्रत्येक चळवळीला प्रोत्साहन व पाठिंबा दिला आहे. जातिभेदामुळे झालेले सर्व अनर्थ त्यांनी पुढील परिच्छेदात अगदी स्पष्टपणे मांडले आहेत. ते म्हणतात, 'जातीमुळे आपला देशाभिमान संकुचित झाला आहे. जातीमुळे ज्ञान, कला, शास्त्रे, ही जेथल्या तेथे कोंडल्यासारखी झाली आहेत; जातीमुळे धर्मविचारांत व आचारांत मतभेद उत्पन्न होऊन तो परस्परवैरास, छळास व मत्सरास कारण झाला आहे. जातीमुळे देशातल्या देशात किंवा परदेशी प्रवास करणे कठीण झाले आहे. जातीमुळे परद्वीपस्थ व परधर्मीय लोकांपासून अलग रहावे लागल्यामुळे, फार नुकसान झाले आहे व होत आहे. या जातीमुळे आमची भूतदया, आमचे बंधुप्रेम, आमची उदारता, आमची धर्मबुद्धी, आमची परोपकाररती, यांचे क्षेत्र अतिशय मर्यादित झाले आहे. सारांश, ज्या अनेक विपत्ती आपण भोगीत आहो, त्यांपैकी ज्यांचे जनन जातिभेदामुळे झाले नाही अशा फारच थोड्या असतील.'


वर्णसंकर अवश्य
 जातिभेदावर अशी प्रखर टीका करून आगरकरांनी वर्णसंकराचा हिरीरीने पुरस्कार केला आहे. ते म्हणतात, 'त्यांच्या (सनातनी शास्त्री- पंडितांच्या) धर्मग्लानीच्या बऱ्याच भागास आम्ही धर्मग्लानी न मानता धर्मोत्कर्ष समजतो. मूर्तिपूजा नाहीशी होणे, वर्णसंकर होऊन पाहिजे त्याला पाहिजे त्याशी अन्नोदकव्यवहार वा लग्न करण्याची सदर परवानगी असणे, पाहिजे त्याने पाहिजे त्या शास्त्राचा किंवा धर्मग्रंथाचा अभ्यास करणे वगैरे गोष्टी प्रचारात आल्यास कोणत्याही प्रकारची धर्मग्लानी होणार आहे, असे आम्हांस वाटत नाही. त्या जुन्या प्रकारच्या आचारांनी हिताहून अहितच अधिक होत आहे, असा आमचा समज आहे.' अस्पृश्यतेविषयी आगरकरांनी फारसे लिहिलेले नाही. पण त्याविषयी त्यांची मते अशीच क्रांतिकारक होती. ग्रामण्य प्रकरणाविषयी लिहिताना त्यांनी म्हटले आहे की 'ब्राह्मणेतराच्या हातचा चहा पिण्यास आम्हांस दोष वाटत नाही. इतकेच नव्हे, तर नीच मानलेल्या महारांची स्थिती सुधारून त्यांची व वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांची एक पंगत झालेली जर आम्हांस पाहता येती तर आम्ही स्वतःस मोठे कृतार्थ मानले असते.'

स्त्री-पुरुष समता
 सर्व सामाजिक सुधारणांमध्ये स्त्री-सुधारणेला आगरकरांनी अग्रस्थान दिले आहे. कारण त्यांच्या मते समाजस्थिती ही गृहस्थितीवर अवलंबून असते आणि ही गृहस्थिती स्त्रीचे कुटुंबातील स्थान, तिची प्रतिष्ठा, तिचे अधिकार, तिचे स्वातंत्र्य यांवर अवलंबून असते, असे सांगून प्रौढविवाह, पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण या सर्व सुधारणांचा त्यांनी पुरस्कार केला आहे. प्रौढविवाहाचा विचार मांडताना त्यांनी स्वयंवराचे किंवा आजच्या भाषेत प्रेमविवाहाचे समर्थन केले आहे. त्यांच्या मते तो व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. ज्यांना दुसऱ्या कोणी पसंत केलेल्या बायका चालतात आणि ज्यांना रत्युपभोगासाठी दुसऱ्यांनी कोंडून घालावे लागते, त्यांच्या हातून कसलेही राष्ट्रकार्य होण्याचा संभव नाही, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. स्त्री-शिक्षणाविषयी लिहिताना स्त्री- पुरुषांना एकच शिक्षण, आणि तेही एकत्र दिले पाहिजे, असे त्यांनी आग्रहाने सांगितले आहे. यात स्त्री-जीवनाचा उत्कर्ष तर आहेच, पण शिवाय प्रसंग आला तर शिक्षण हे स्त्रीला चरितार्थसाधन म्हणून उपयुक्त ठरण्याचा संभव आहे, हाही विचार त्या काळी त्यांनी सांगितला आहे.
 स्त्रीसुधारणाविषयक आगरकांनी जे लिहिले आहे ते अत्यंत आवेशाने, त्वेषाने, आणि तीव्र भाषेत लिहिले असून त्यामागे पांडित्य, तत्त्वचिकित्सा व तळमळ हीही तितकीच आहे. जातिभेद, अस्पृश्यता इ. सर्वच सुधारणांच्या बाबतीत त्यांची लेखणी अशीच जहाल आहे आणि विद्वत्तेने भूषविलेली आहे. आगरकरांना या क्षेत्रात अजूनही मोठा मान मिळतो तो यामुळेच.
 बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून सुरू झालेला महाराष्ट्रातील हा समाजसुधारणेचा प्रवाह मोठा सकस आणि जोमदार होता. आणि तो तसाच चालला असता तर आज महाराष्ट्र समाजसुधारणेच्या दृष्टीने अग्रस्थानी राहिला असता. पण तसे व्हावयाचे नव्हते. एका अगदी अनपेक्षित अशा कारणाने तो येथे कुंठित झाला.

विषमता
 वर अनेक ठिकाणी सांगितलेच आहे की येथल्या धार्मिक, सामाजिक, राजकीय सर्व प्रकारच्या सुधारणांमागे पाश्चात्य भौतिक विद्या ही प्रमुख प्रेरणा होती. पण या विद्येचे अध्ययन व उपासना महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी जशी केली तशी ब्राह्मणेतर समाजाने केली नाही. त्यामुळे या दोन समाजांच्या उत्कर्षांमध्ये फार मोठी तफावत पडून त्यांच्यांत समता प्रस्थापित होण्याऐवजी विषमताच निर्माण झाली आणि ती दिवसेंदिवस रुंदावत चालली.

ब्राह्मणांची मक्तेदारी ?
 ब्राह्मणेतरांनी भौतिक विद्येची उपासना केली नाही एवढेच नव्हे, तर ब्राह्मणांनी आम्हांला विद्येपासून वंचित केले, असा सतत आक्रोश चालू ठेवला. वास्तविक जोतिबा फुले अपृश्यांसाठीसुद्धा शाळा स्थापू शकले. त्यांचे सहकारी अनेक ब्राह्मण होते. असे असताना मराठ्यांना विद्येपासून दूर ठेवणे ब्राह्मणांच्या मनात असते तरी त्यांना ते शक्य नव्हते. वास्तविक प्राचीन काळी सुद्धा क्षत्रिय व वैश्य यांना वेदाध्ययनाचा अधिकार होता. संतांच्या काळात तर निम्याहून अधिक संत ब्राह्मणेतर होते. काहीतर शुद्रही होते. तरी सर्व हिंदुस्थानात ते धर्मोपदेशकाचे कार्य (जी ब्राह्मणांची मक्तेदारी असे मानलेले होते) करीत असत. आणि अनेक ब्राह्मण त्यांचे शिष्यत्वही पत्करीत असत. पण हे मागल्या काळचे सोडून दिले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे की फ्रेजर नावाच्या इंग्रज पंडिताने म्हटल्याप्रमाणे, इंग्रजी राज्य प्रस्थापित होताच विद्येच्या क्षेत्रातील ब्राह्मणांची मक्तेदारी संपली आणि विद्या सर्वांना सुलभ झाली. मिशनऱ्यांनी तर हिंदूंमधील हीनवर्णीयांच्या साठी अनेक ठिकाणी शाळा उघडल्या होत्या. बडोद्याचे सयाजीराव महाराज, कोल्हापूरचे शाहू छत्रपती, ग्वाल्हेरचे शिंदे महाराज यांनी मराठ्यांमध्ये विद्याप्रसार करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. पण त्यांना शेवटी निराश व्हावे लागले. मराठ्यांना विलायतेला जाण्यासाठीसुद्धा त्यांनी निधी ठेविले होते. पण त्याचा कोणी फायदा घेतला नाही. बंगालमध्ये रॉय, चतर्जी, बॅनर्जी, टागोर या ब्राह्मण घराण्यांप्रमाणेच घोष, बोस, पाल, दत्त हीही घराणी विद्यासंपन्न झाली. आणि लालमोहन, आनंद मोहन, रासबिहारी, अरविंद, बारींद्रकुमार घोष, रमेशचंद्र दत्त, विवेकानंद, जगदीशचंद्र सुभाषचंद्र असे एकेक रथी-महारथी या ब्राह्मणेतर घराण्यांत निर्माण झाले. महाराष्ट्रात हेच व्हावयास पाहिजे होते. याला ब्राह्मण केव्हाही बंदी घालू शकले नसते. विलायतेला आपली मुले धाडू शकतील अशी शंभर संपन्न घराणी शहाण्णव कुळीच्या मराठ्यांत सहज होती. पण त्यांनी हे मनातही आणले नाही आणि ब्राह्मणांनी आम्हांला विद्याविन्मुख केले असे मराठा समाजाचे प्रा. लठ्ठे, श्री. काशीराव देशमुख इ. ग्रंथकार म्हणतच राहिले. हा ब्राम्हणांचा नसता बडेजाव आहे. त्यांच्या हाती काडीचीही सत्ता नसताना, ती आहेच, असे ब्राह्मणेतरांनी प्रतिपादिले. आणि उत्कर्षाचा जो राजमार्ग सर्वांना खुला होता तो म्हणजे भौतिक विद्येचा मार्ग त्यांनी अनुसरला नाही.

कायमची अढी
 ब्राम्हणेतर समाजाने विद्याधनाची उपेक्षा केल्यामुळे ब्राह्मण व ब्राह्मणेतर समाजात फार मोठी विषमतेची दरी निर्माण झाली. डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक या समाजातल्या प्रतिष्ठेच्या जागा आणि कुळकर्णी, कारकून, मामलेदार, पोलीस अधिकारी, न्यायाधीश या व इतर सरकारी प्रतिष्ठेच्या सर्व जागा ब्राह्मण, प्रभू, इ. विद्यासंपन्न लोकांनी व्यापल्या. यामुळे ब्राह्मणेतर समाज अत्यंत असंतुष्ट होऊन गेला आणि ब्राह्मण हा आपला शत्रू आहे, वैरी आहे, अशी कायमची अढी त्याच्या मनात बसली.

इंग्रज मित्र
 यामुळे एक घातक परिणाम झाला. ब्राह्मण हेच फक्त आर्य आहेत व इतर सर्व समाज शूद्र आहे असे जोतिबांनी सांगितले होते. इंग्रज हे सुद्धा त्यांच्या मते शूद्र होते. तेव्हा ब्राम्हण या आपल्या शत्रूपासून आपले रक्षण व्हावयाचे असेल, तर इंग्रजांचे राज्यच येथे कायम राहिले पाहिजे, असा सिद्धान्त त्यांनी मांडला. आणि ब्राहाणेतर चळवळीतल्या लोकांनी तो मनोभावे उचलला. जोतिबांनी सांगितलेली विद्येची महती आणि सर्व ब्राह्मणेतर समाज शूद्र म्हणजे एकाच रक्ताचा, म्हणजेच समपातळी- वरचा आहे हा त्यांचा सिद्धान्त कोणीही मानला नाही. ब्राह्मण हा आपला वैरी व इंग्रज हा आपला मित्र व रक्षणकर्ता आहे, हा विचार मात्र त्यांनी स्वीकारला आणि जवळजवळ पन्नास वर्षे ते स्वातंत्र्याच्या चळवळीपासून अलिप्त राहिले. महाराष्ट्राची त्यामुळे फार मोठी हानी झाली.
 विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांच्यापासून महाराष्ट्रात आणि भारतात स्वातंत्र्याच्या चळवळीचे एक नवे युग सुरू झाले. या चळवळीत त्याच वेळी ब्राह्मणेतर समाज सामील झाला असता तर त्याच वेळी त्याचा उत्कर्ष होऊन त्या समाजातून मोठे मोठे कर्ते पुरुष निर्माण झाले असते. स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि भौतिकविद्या यांचा गुणच असा आहे. आणि ब्राह्मणेतर समाज रक्तातल्या गुणांच्या दृष्टीने पाहता ब्राह्मणांच्या पेक्षा रतीभरही कमी नाही. पण ते गुण विकसित होण्यासाठी जे वर सांगितलेले प्रयत्न करावयास हवे ते त्यांनी केले नाहीत.

मराठे-वर्णश्रेष्ठत्व
 पण एवढ्यावर हे भागले नाही. वर्णश्रेष्ठत्वाचा अभिमान ब्राह्मणांइतकाच मराठ्यांनाही आहे. त्यामुळे ब्राह्मणब्राह्मणेतर एवढेच या चळवळीला रूप न राहता मराठा- मराठेतर असे रूप तिने धारण केले. ब्राह्मणब्राह्मणेतर या चळवळीचे मूळ रूप अगदी गेले. ते राहिले असते तर ब्राह्मणेतर सर्व समाज एक झाला असता. पण सर्व हिंदुमात्र एक हे जसे ब्राह्मणांना मान्य नाही तसेच सर्व ब्राह्मणेतर एक हे मराठ्यांनाही मान्य नाही. ब्राह्मण हा ईश्वर आणि मनुष्य यांच्यातील दलाल म्हणून तो निंद्य, ब्राह्मण म्हणून नव्हे, अशी जोतिबांची भूमिका होती. पण छत्रपती शाहू महाराजांनी, क्षात्रजगद्गुरू हे पीठ निर्माण करून ते तत्त्व सोडले. कारण पुन्हा दलालाचीच प्रतिष्ठापना त्या योगे झाली. श्री. ठाकरे यांनी मराठ्यांच्या या वृत्तीवर कडक टीका केली आहे (के. सी. ठाकरे, शेतकऱ्यांचे स्वराज्य, प्रकरण ६). महर्षी शिंदे यांनी ब्राह्मणेतर चळवळीला राष्ट्रनिष्ठ वळण लावण्याचा फार प्रयत्न केला होता. मराठ्यांनी सरकार किंवा ब्राह्मण चळवळ्ये यांच्या पंखाखाली न जाता आपला स्वतंत्र संघ काढावा व राष्ट्रसेवा करावी असे ते म्हणत. त्याप्रमाणे त्यांनी स्वतः १९१७ साली मराठा राष्ट्रीय संघ स्थापन केला; पण ते अस्पृश्यांसाठी चळवळ करतात म्हणून मराठ्यांचा त्यांच्यावर राग होता. म्हणून त्या संघात सामील न होता त्यांनी 'मराठा लीग' ही स्वतंत्र संस्था स्थापिली आणि महर्षीचा प्रयत्न अयशस्वी झाला.

केशवराव जेधे
 ब्राह्मणेतर चळवळीला राष्ट्रीय वळण लावण्याचे कार्य दे. भ. केशवराव जेधे यांनी केले. बारा वर्षे प्रथम या चळवळीत ते होते. पण त्यांना राष्ट्रीयत्व कोठे दिसेना म्हणून श्री. ठाकरे यांच्यापेक्षाही कडक टीका करून ते तीतून बाहेर पडले. ते लिहितात, 'ब्राह्मणेतर चळवळीत राष्ट्रीय वृत्तीला वाव नव्हता; ती सर्वस्वी सरकारची मर्जी राखणारी चळवळ होती. बारा वर्षे मी ब्राह्मणेतर चळवळीत काढली, पण आपण देशाची सेवा करावी, असे मला कधीही वाटले नाही. या चळवळीच्या पुढाऱ्यांची दृष्टी अराष्ट्रीय व मतलबी होती. स्वार्थापलीकडे ते पाहात नव्हते' (प्रसाद, दिवाळी अंक, १९५५). हे सर्व घडले ते १९३० च्या नंतर. महात्माजींच्यापासून अनेक मराठ्यांना स्फूर्ती प्राप्त झाली. इंग्रज हा आपला खरा शत्रू हे जाणून ते सत्याग्रहाच्या राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. आणि त्यामुळे स्वातंत्र्याचा लढा यशस्वी ठरला.

गुणविकासाचे तत्त्व
 विष्णुशास्त्री, टिळक व एकंदर काँग्रेस यांनी जो राष्ट्रीय लढा सुरू केला त्याच वेळी हे व्हावयास हवे होते. कष्टकरी जनतेची उन्नती हेच टिळकांच्या चळवळीने सूत्र होते. अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य हेच सर्व मानवी गुणांच्या विकासाचे तत्त्व आहे, हे त्यांनी जाणले होते. म्हणून शेतकरी व कामकरी यांच्या जागृतीसाठीच त्यांनी आयुष्य वाहिले होते.

राष्ट्रीय पक्ष - विरोध
 पण राष्ट्रीय चळवळीत समाजसुधारणेला विरोध हे व्यंग पहिल्यापासूनच होते. त्यातल्या कोणत्याही नेत्याला वर्णविषमता, जातीयता मुळीच मान्य नव्हती. पण रानडेप्रभृती जे जे समाजसुधारक त्यांची काँग्रेसमधला राष्ट्रीय पक्ष नेहमी चेष्टा करीत असे. त्यांच्या आचरणातील विसंगतीमुळे ही टीका होती हे खरे. पण तेवढाच दोष दाखवून राष्ट्रीय पक्षाने समाजसुधारणेचा जोराने पुरस्कार करावयास हवा होता. तो न केल्यामुळे सामाजिक समतेच्या व एकंदर समाजसुधारणेच्या चळवळीची फार मोठी हानी झाली हे खरेच आहे. टिळकांनी वेदोक्त चळवळीच्या वेळी आणि पटेल बिलाच्या वेळी सनातन्यांची बाजू घेतली. तसे करण्याचे खरोखर काही कारण नव्हते. पण मानवी अपूर्णता ध्यानी घेऊन आपण कोणत्याही नेत्याचे मूळ कार्य लक्षात घेतले पाहिजे. टिळकांचे मुख्य कार्य वर सांगितल्याप्रमाणे अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सर्व समाजाचे सामर्थ्य जागृत करणे हे होय. हे जाणून सर्व ब्राह्मणेतर समाज त्याच वेळी खडा झाला असता तर फार मोठी प्रगती झाली असती. पण दुर्दैव असे की आजही स्वातंत्र्यप्राप्ती नंतर ती झालेली नाही. 'एक गाव एक पाणवठा' या डॉ. बाबा आढाव यांच्या चळळीचे जे वृत्तांत पाहावयास मिळतात, त्यावरून असे दिसते की वर्णविषमतेची भावना हिंदुसमाजात अजून जशीच्या तशी कायम आहे.

ब्राह्मणांच्या जागी मराठे
 ती जशी ब्राह्मणांत आहे, तशीच मराठ्यांतही आहे. ब्राह्मणांजवळ आता पूर्वीची विद्या नाही, तप नाही, वेदाध्ययन नाही; तरी आम्ही सर्व वर्णाचे गुरू ही भावना खेड्यापाड्यांतून अजून जिवंत आहे. 'जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तीन्ही लोकीं श्रेष्ठ', ही तुकारामांच्या वेळची वृत्ती अजून अनेक ब्राम्हणांत कायम आहे. जे ब्राह्मणांचे तेच मराठ्यांचे. त्यांच्यांतही जुन्या क्षत्रियांचे पराक्रम राहिलेले नाहीत. तरी आपला वर्ण सर्वात श्रेष्ठ ही भावना आहे. त्यामुळेच मराठामराठेतर चळवळ सुरू झाली. सत्तास्थानी सर्वत्र शहाण्णव कुळीचे मराठे असले पाहिजेत, अशी धडपड मराठ्यांची आहे. ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप या अस्पृश्य पुढाऱ्यांनी हेच लिहिले आहे. 'मराठ्यांनी ब्राम्हणांना हाकलून देऊन त्यांच्या जागा आपण घेतल्या आहेत. अस्पृश्यांनी आपली मुले शाळेत पाठवू नयेत म्हणून, घरादारांचा नाश करू, अशा धमक्या त्यांनी दिल्या.'

विधायक कार्य-दिशा
 ब्राह्मणांचे समाजमनावरील वर्चस्व नष्ट करणे हे ब्राह्मणेत्तर चळवळीचे उद्दिष्ट खरोखर फार चांगले होते. पण त्या दृष्टीने फार मोठे विधायक कार्य त्यांनी करावयास हवे होते. बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा, प्रयत्नवाद, यांची शिकवण ग्रामीण समाजाला देणे अवश्य होते. ब्राह्मणेतरांनी लोकजागृतीसाठी जे तमाशे सुरू केले होते त्यांतून ही शिकवण त्यांना देता आली असती. त्याचप्रमाणे कुळकर्णी, वकील असा एक वर्ग निर्माण करावयास हवा होता. या तमाशांच्या द्वारा, धर्माला आलेले कर्मकांडाचे रूप नष्ट करून खऱ्या भगवद्भक्तीचा, समतेचा, लोकसेवेचा धर्म प्रसृत करणे हे कार्य व्हावयास हवे होते. तसे झाले असते तर ग्रामीण भागात फार मोठी मानसिक क्रांती होऊन ब्राह्मणेत्तर समाज स्वातंत्र्याभिमुख झाला असता. त्याच्या ठायी राष्ट्रीय भावना निर्माण झाली असती. पण हे कार्य त्या तमाशांनी केले नाही. ब्राह्मणद्वेष एवढेच उद्दिष्ट त्यांनी डोळ्यांपुढे ठेवले होते. त्यामुळे पुढे पुढे त्यांना अत्यंत ओंगळ रूप प्राप्त झाले.
 वर्णभेद, जातिभेद, त्यातून निर्माण झालेली जन्मनिष्ठ श्रेष्ठ-कनिष्ठता या सर्वांच्या मागे हजारो वर्षांच्या रूढी, अज्ञान, भौतिकविद्येचा अभाव, धर्माला आलेले विकृत रूप, निवृत्ती, दैववाद, परलोकनिष्ठा, ऐहिक उत्कर्षाविषयी उदासीनता हे सर्व रोग आहेत. आणि त्यांचे समूळ उच्चाटन केल्याखेरीज जातिभेद, जातीय अहंकार नष्ट होणार नाहीत. जे वर्णभेद, जातिभेद यांच्याबद्दल आहे ते अस्पृश्यतेबद्दल शतपटीने खरे आहे.
 अस्पृश्य आणि आदिवासी मिळून भारताचा जवळजवळ एकचतुर्थांश समाज होतो. एवढी प्रचंड लोकसंख्या जोपर्यंत माणुसकीच्या पातळीवर येत नाही, त्यातील प्रत्येक व्यक्तीला व्यक्तित्वाची, मानवत्वाची प्रतिष्ठा लाभत नाही, तोपर्यंत भारताच्या लोकशाहीला खरा अर्थ येणार नाही.

कांबळे
 तो अर्थ प्राप्त होण्याच्या दृष्टीने, अस्पृश्यासाठी शाळा काढून म. फुले यांनी पहिला प्रयत्न केला, हे मागे सांगितलेच आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य असेच महत्त्वाचे आहे. १९०६ साली 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' ही संस्था त्यांनी स्थापन केली आणि पुढील पंचवीस वर्षात सर्व हिंदुस्थानभर तिच्या शाखा प्रसृत केल्या. कोल्हापूरचे शाहू छत्रपती, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, म्हैसूरचे महाराज यांनीही अस्पृश्यांसाठी शाळा, वसतिगृहे स्थापणे, त्यांना अधिकाराच्या जागा देणे, अशा तऱ्हेचे बहुमोल कार्य केले. साधारण १९०० सालापासून अस्पृश्य वर्गात जागृती होऊन त्या वर्गातून त्यांचे स्वतःचे नेते व कार्यकर्ते निर्माण होऊ लागले. त्यांपैकी शिवराव जानवा कांबळे यांचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. १९०३ साली त्यांनी सासवड येथे एक मोठी सभा भरविली व अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात असा अर्ज सरकारकडे केला. स्वजातीच्या उत्कर्षासाठी अशा रीतीने जमून चर्चा व विचारविनिमय करण्याचा पायंडा कांबळे यांनी पाडला, म्हणून या सभेचे विशेष महत्त्व आहे.

कलंक
 यानंतर महात्माजींच्या कार्यास प्रारंभ झाला. अस्पृश्यता हा हिंदुधर्मावरील कलंक आहे एवढेच सांगून ते थांबले नाहीत; तर राजकीय चळवळीचे अस्पृश्यता निवारण हे एक अविभाज्य अंग आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या कार्याला फार मोठी चालना मिळाली. स्वातंत्र्याचा संदेश घेऊन खेडोपाडी फिरणाऱ्या हजारो तरुणांनी अस्पृश्यांत मोठी जागृती निर्माण केली. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीला त्यायोगे फार मोठे साह्य झाले.

डॉ. आंबेडकर- शिकवण
 याच सुमाराला डॉ. आंबेडकरांचा उदय झाला आणि ते स्वतः अस्पृष्ट वर्गातील असल्यामुळे त्या वर्गाच्या अस्मितेला फार मोठा उजळा मिळाला. आपल्यातलाच एक माणूस पाश्चात्य देशात जाऊन मोठया पदव्या मिळवून अत्यंत उच्च स्थान प्राप्त करून घेऊ शकतो, या भावनेमुळे अस्पृश्यांना आत्मविश्वास आला आणि त्यांच्या कर्तृत्वाला चालना मिळाली. महाडचा व नाशिकचा असे जे दोन सत्याग्रह डॉ. आंबेडकरांनी घडवून आणले त्यांचे महत्त्व अगदी अनमोल असे आहे. उच्च ध्येयासाठी मनुष्य जेव्हा आत्मार्पण करण्यास सिद्ध होतो, तेव्हाच त्याच्या बुद्धीचा, प्रज्ञेचा खरा विकास होतो. डॉ. आंबेडकरांनी ही शिकवण या सत्याग्रहांच्या द्वारे दिली, म्हणून अस्पृश्यसमाज व एकंदर हिंदुसमाज त्यांचा कायमचा ऋणी राहील.

परागती
 या सत्याग्रहाप्रमाणेच १९३० सालच्या सत्याग्रहात आणि १९४२ च्या चळवळीत अस्पृश्यांनी भाग घेतला असता तर त्यांच्या कर्तबगारीचा याच्या दसपटीने विकास झाला असता. पण तसे घडले नाही. याला कारणे दोन. महात्माजींचा जन्मनिष्ठ वर्णभेद व जातिभेद यावर विश्वास होता. जातिपोटजातीसुद्धा आत्म्याच्या विकासाला अवश्य आहेत असे ते म्हणत असत (यंग इंडिया, ६-१०-२७). ही फार मोठी विसंगती होती. वर्ध्याच्या आश्रमात ते स्पृश्य व अस्पृश्य यांचे विवाह घडवीत असत. स्वतःच्या घरात त्यांनी जातींचा विचार न करता सोयरीक केली. ते स्वतः वैश्य असून त्यांनी राजकारण हा क्षत्रियांचा उद्योग केला. असे असूनही जातिभेदावर आपला विश्वास आहे, असे ते म्हणत असत. शिवाय पुढे त्यांनी अस्पृश्यांच्या विभक्त मतदारसंघाला प्राणपणे विरोध केला. यामुळे डॉ. आंबेडकर व एकंदर अस्पृश्य समाज महात्माजींवर चिडून गेला आणि स्वातंत्र्याच्या चळवळीपासून दूर राहिला. प्रारंभी डॉ. आंबेडकर ब्रिटिशांच्या विरुद्ध होते; पण पुढे स्वातंत्र्य आले तर सवर्ण हिंदुसमाज अस्पृश्यांचा छळ करील, असे ते म्हणू लागले. वास्तविक याही वेळी मानवाची अपूर्णता जाणून, महात्माजींची व पं. नेहरूंसारख्या इतर नेत्यांची उदार दृष्टी ध्यानी घेऊन, अस्पृश्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उतरावयास हवे होते. त्यांनी स्वतंत्रपणे ब्रिटिशांशी लढा केला असता तरी चालले असते. पण इंग्रज हा आपला उद्धारकर्ता आहे ही दुबळी व परावलंबी भूमिका त्यांनी स्वीकारली. त्यामुळे त्यांचे व देशाचे फार नुकसान झाले.

भविष्य
 आज स्वातंत्र्यानंतर पंचवीस तीस वर्षांनी पाहता, अस्पृश्यांच्या स्थितीत पुष्कळ पालट झाला आहे, हे जरी खरे असले तरी, वर्णजातिभेदावरची, जन्मनिष्ठ श्रेष्ठ- कनिष्ठतेवरची हिंदुसमाजाची श्रद्धा गेली आहे, असे दिसत नाही. एका पाणवठ्यावर पाणी भरणे ही साधी गोष्ट करण्यास अजून हा समाज तयार नाही. राजकारणात सर्वत्र जातीयतेचाच आश्रय केला जातो. तेव्हा नजीकच्या भविष्य काळात जातिभेदाचा वा अस्पृश्यतेचा प्रश्न पूर्णपणे सुटेल अशी आशा करण्यास फारशी जागा नाही. अस्पृश्यांना आता शिक्षणाची संधी मिळत आहे आणि सर्व क्षेत्रांत उत्कर्षाला अवसर मिळत आहे. त्यामुळे त्यांच्यातून थोर शास्त्रज्ञ, नेते, राजकारणी, संशोधक, साहित्यिक, मोठे ग्रंथकार, स्थापत्यविशारद, प्रशासक असे थोर पुरुष निर्माण झाले तरच हा प्रश्न सुटू शकेल. पण तशीही फारशी आशा दिसत नाही. तेव्हा विषम समाजरचना नष्ट होऊन हिंदुसमाज एकरूप केव्हा होईल हे सांगणे फार कठीण आहे.

आदिवासी
 अस्पृश्यांप्रमाणेच आदिवासींचा प्रश्न अत्यंत निकडीचा व जिव्हाळ्याचा आहे. वंजारी, भिल्ल, कातकरी, ठाकर, रामोशी, गोंड, वारली, बेलदार, भामटा, मंगेला इ. अनेक जमाती या वर्गात येतात. त्यांची लोकसंख्या अस्पृश्यांइतकीच आहे. यावरून ही समस्या केवढी बिकट आहे ते ध्यानात येईल.

प्राचीन काळी
 हिंदुसमाजात वर्णभेद व जातिभेद दीर्घकाळ आहेत. प्राचीन काळी सुद्धा होते. पण त्यांना असा कडकपणा आलेला नव्हता. शिकंदराच्या काळापासून हर्षवर्धनाच्या अखेरपर्यंत, शक, यवन, युएची, हूण इ. जमातींनी भारतावर नऊ वेळा आक्रमणे केली. भारतीयांनी ती सर्व मोडून काढली, इतकेच नव्हे, तर या सर्व जमातींना हिंदुसमाजात सामावून घेतले. त्यांतील कित्येक जमातींना तर क्षत्रिय, ब्राह्मण अशा श्रेष्ठ वर्णातही त्यांनी प्रवेश दिला. त्यामुळेच हिंदुसमाज सातव्या आठव्या शतकापर्यंत पुष्कळ अंशी एकरूप व बलाढ्य झाला. वर उल्लेखिलेल्या आदिवासी जमातींना त्याकाळीच असे आपल्यात समाविष्ट करून घेतले असते तर आज ही समस्या निर्माणच झाली नसती आणि हिंदुसमाजाला दौर्बल्य आले नसते.

अखंड सेवा
 स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने आदिवासींच्या उद्धारार्थ एक स्वतंत्र खाते निर्माण केले आहे. त्याशिवाय, ठाणे, खानदेश, नाशिक या जिल्ह्यांत आदिवासी मंडळ, भिल्लसुधारणा मंडळ, भिल्लसुधारसमिती, डांग सेवामंडळ अशी मंडळे हेच कार्य करीत आहेत. विश्वहिंदुपरिषदेनेही जागोजागी केंद्रे निर्माण करून आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. यातून त्यांच्यामध्ये हिंदुधर्माचा आणि भारताचा अभिमान निर्माण झाला आणि भौतिक विद्या त्यांना सुलभ झाली तर त्या समाजातून मोठमोठे कार्यकर्ते व नेते निर्माण होतील आणि मग त्या कार्याला खरी गती येईल. पण यासाठी या कार्याला वाहून घेणारे शेकडो तरुण पुढे आले पाहिजेत. मिशनरी हे धर्मांतर घडवितात याची आपल्याला चीड येते. ते स्वाभाविक आहे. पण घरदार स्वदेश सोडून, सर्व आयुष्य परक्या जमातीत राहून त्यांची अखंड सेवा करीत राहणे हा जो त्याग आहे तसा त्याग करणारे सहस्रावधी तरुण हिंदुसमाजात निर्माण झाल्यावाचून वर्ण, जाती, अस्पृश्यता आणि वन्यत्व यांनी शतधा भंगलेला हा समाज एकरूप होणे अशक्य आहे, आणि तसा तो एकरूप झाल्यावाचून त्याला सामर्थ्य प्राप्त होणे त्याहून अशक्य आहे.
 वर्णभेद, जातिभेद, अस्पृश्यता इ. हिंदुसमाजातील भेदांचा विचार येथवर केला. आता कुटुंबसंस्था हा जो समाजाचा प्रमुख घटक त्याचा विचार करून हे प्रकरण संपवू.

कुटुंबसंस्था
 मानवाच्या सर्व उत्कर्षाचा पाया कुटुंब हा आहे. याविषयी आता जगात दुमत नाही. पण ही संस्था आज सर्वत्र ढासळत चालली आहे. त्यामुळेच सर्व जगातले समाजशास्त्रज्ञ तिचा अभ्यास करीत आहेत, तसा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी एकमुखाने निर्णय दिला आहे की या संस्थेवाचून समाज जगणेच शक्य नाही. त्याग, सेवावृत्ती, प्रेम, भक्ती, उदारदृष्टी, विवेक, संयम इ. अनेक सद्गुणांचे शिक्षण व संवर्धन या संस्थेत होत असते. व्यक्ती ही समाजाची मूल घटक आहे. तिचे हित, तिचा विकास हेच समाजाचे अंतिम उद्दिष्ट आहे; पण या व्यक्तीचा विकास कुटुंबसंस्थेवाचून अशक्य असल्यामुळे कुटुंबसंस्था हाच पाया मानून, सर्व बळ एकवटून, समाजाने तिची जपणूक केली पाहिजे.

ढासळली
 पण आज या संस्थेला विघातक अशा अनेक शक्ती निर्माण झाल्या आहेत. मुंबई, सोलापूर अशी अनेक गिरणगावे निर्माण झाल्यामुळे कोकण, मावळ, खानदेश येथल्या शेतकऱ्यांचे कौटुंबिक जीवन संपुष्टात आले आहे. बायकामुळे गावी ठेवून त्याला एकट्याला मुंबईस राहावे लागते, कुटुंबाचे दर्शन त्याला सटी सहामासीच घडते. हळूहळू समाजाचे दारिद्र्य वाढत आहे. त्यामुळे मध्यम वर्गीय कुटुंब असेच मोडकळीस आले आहे. एकट्या पुरुषाच्या कमाईत कुटुंबाचा खर्च भागत नाही. त्यामुळे स्त्रीलाही द्रव्यार्जन करण्यासाठी दिवसभर बाहेर राहावे लागते. त्यामुळे अपत्य संगोपन ही कल्पनाच हळूहळू नाहीशी होत चालली आहे. दिवसभर आईबाप बाहेर राहत असल्यामुळे मुलांना कोठे तरी राखोळी घालावे लागते. त्यांना 'आई' अत्यंत दुर्मिळ झाली आहे. मग कशाचे संगोपन आणि कशाचे संस्कार ! मध्यम वर्ग हा राष्ट्राचा कणा आहे. नवे तत्त्वज्ञान निर्माण करणे, नवे ग्रंथ रचणे, समाजाला नवी दिशा देणे हे या विद्यासंपन्न वर्गाचे कार्य आहे. पण समाजातून कुटुंबसंस्थेच्या अभावी हा वर्गच नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्याची ती दशा झाली, मध्यम वर्गाची ही दशा झाली. मग तरुण पिढीवर संस्कार व्हावयाचे तरी कोठे?

स्त्रीचे व्यक्तित्व
 याशिवाय स्त्रीशिक्षणामुळे स्त्रीच्या व्यक्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊन, त्या बाजूनेही कुटुंबसंस्थेवर आघात होऊन, तिला तडे जाऊ लागले आहेत. इतके दिवस घरात पुरुष हाच एकमेव कर्ता व सत्ताधारी होता. पण शिक्षणामुळे, द्रव्यार्जनशक्तीमुळे स्त्रीला आपल्यालाही समप्रतिष्ठा प्राप्त व्हावी अशी आकांक्षा निर्माण झाली आहे आणि ती योग्यही आहे. पण त्यामुळे एक शास्ता व बाकी सर्व शासित अशी जी व्यवस्था होती, आणि जिच्यामुळे कुटुंबसंस्था टिकून होती, ती भंगली आहे आणि कुटुंबात अराजक माजण्याची वेळ आली आहे. एक शास्ता व बाकी सर्व त्याचे अंकित ही पद्धत व्यवस्थेच्या, शांततेच्या दृष्टीने योग्य असली तरी तीमुळे शासितांच्या व्यक्तित्वाचा नाश होतो. म्हणूनच लोकसत्तेचा विचार उद्भवला. सर्वाच्या व्यक्तित्वाला अवसर देऊनही शिस्त व स्थैर्य पूर्वीप्रमाणेच टिकवून धरणे ही लोकशाहीपुढची बिकट समस्या आहे. आणि सर्व पक्ष विवेकी असूनही लोकशाही शासन टिकत नाही. हा विवेक, हा समंजसपणा फार दुर्मिळ आहे. त्यामुळेच जगात गेल्या पन्नास वर्षात नव्याने स्थापन झालेल्या लोकसत्ता भराभर कोसळून पडत आहेत. आणि आता तर जुन्या व स्थिर झालेल्या इंग्लंड, अमेरिकेतील लोकसत्ता तरी टिकतील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. कुटुंबसंस्थेचे तेच होत आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही व्यक्तित्वाला अवसर द्यावयाचा, पुरुष शास्ता व स्त्री शासित ही पद्धत टाकून देऊन दोघांनाही समप्रतिष्ठा द्यावयाची आणि तरीही दोघांनीही जुळते घेऊन कुटुंबसंस्था टिकवावयाची हे फार अवघड आहे. इंग्लंड-अमेरिकेत इतके दिवस लोकसत्ता टिकविण्यात यश आले होते, पण कुटुंबसंस्था टिकविण्याला तेथले स्त्री-पुरुषही अयशस्वी झाले आहेत. दर तीन कुटुंबामागे एक घटस्फोट अशी तेथे अवस्था झाली आहे आणि आता हे प्रमाण इतके वाढत चालले आहे की लग्नसंस्था आणि कुटुम्बसंस्था मोडूनच टाकावी असा विचारप्रवाह तेथे सुरू झाला आहे. पण यामुळे तेथे मुले वाऱ्यावर सोडल्यासारखी झाली आहेत आणि त्यांच्यांत व्यसने, गुन्हेगारी, अत्याचार, स्वैराचार यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. म्हणजे स्त्रीच्या व्यक्तित्वाला अवसर द्यावा तर समाजातल्या सर्वांच्याच व्यक्तित्वाचा नाश होत आहे असा याचा अर्थ आहे. जगातील सर्व समाजात विवेक, समंजसपणा, दूरदृष्टी, आत्मसंयमन, जुळते घेण्याची वृत्ती यांचा अभाव आहे, अशा स्थितीत लोकशाही टिकणार नाही आणि कुटुंबसंस्थाही टिकणार नाही. भारतीय स्त्रीपुरुषांनी याचा गंभीरपणे विचार करून या गुणांची जोपासना केली पाहिजे आणि आपली लोकसत्ता व कुटुंबसंस्था टिकवून धरण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. ती टिकली तरच समाज टिकेल आणि सामाजिक क्रांतीच्या आपल्या कल्पना साकार होतील.

सावरकर
 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी धर्मक्रांतीप्रमाणेच सामाजिक क्रांतीचाही तितक्याच आवेशाने पुरस्कार केला आहे. तेव्हा त्यांचीच अवतरणे देऊन या विवेचनाचा समारोप करणे उचित होईल. सहभोजनाचा पुरस्कार करताना ते म्हणतात, 'शतवार सांगितले तरी फिरून एकदा सांगतो की हिंदू राष्ट्राच्या अभ्युत्थानास्तव राजकारण नि समाजकारण ही दोन्ही साधने अत्यावश्यक आहेत. राजकारण ही एका हातातील चढती तलवार तर समाजकारण ही दुसऱ्या हातातील बचावती ढाल! यांपैकी कोणतेही एक दुसऱ्यावाचून पंगू आहे' (जात्युच्छेदक निबंध, पृ. ३२४). भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा विचारही याच दृष्टिकोणातून ते मांडतात. 'जे हिंदुराष्ट्राचे स्वातंत्र्य आपणांस मिळवावयाचे, ते जातिभेदजर्जर झालेल्या या आपल्या राष्ट्रपुरुषास जरी मिळविता आले, तरी रोगाचे निर्मूलन झाले नाही तोपर्यंत, ते पुन्हा गमावण्याचा पाया भरत जाणार आहे' (उक्त ग्रंथ, पृ. १०).
 'जर आम्ही हिंदू या जन्मजात जातिभेदाचा समूळ उच्छेद करू तरच तरू व राष्ट्र म्हणून, धर्म म्हणून यापुढे जगू शकू. जोवर या जातिभेदास आम्ही आमच्याच इच्छेने आमच्या राष्ट्राच्या कंठास नख लावू देत आहो, तोवर आम्हांस मारण्याचे काम शत्रूस करावयास नकोच. आम्ही आपण होऊनच मरत आहो. मद्रासमध्ये इस्लाम व इसाई दोहो हातांनी आमचे संख्याबळ लुटीत आहेत यात काय आश्चर्य ! जी दु:स्थिती मद्रासची तीच सर्वत्र.'

रत्नागिरी
 अस्पृश्यतेच्या बाबतीत, रत्नागिरी जिल्ह्यात, ते नुसते तत्त्वज्ञान सांगून थांबले नाहीत, तर त्यांनी प्रत्यक्ष मोठे परिवर्तन घडवून आणले. १९२५ साली स्थानबद्धतेत असताना त्यांनी तेथे प्रथम लोकांचे मतपरिवर्तन घडवून आणले. त्या वेळी सवर्ण समाज तेथे महाराच्या सावलीचा सुद्धा विटाळ मानीत असे. अशी स्थिती असताना सावरकरांच्या उपदेशामुळे स्पृश्य लोक महारवाड्यात भजनकीर्तनास जाऊ लागले. नंतर क्रमाने अस्पृश्य हे स्पृश्य वस्तीत भजन कीर्तनास येऊ लागले. पुढे शाळांतून मुले सरमिसळ बसू लागली आणि २-४ वर्षांत स्पृश्यांच्या घरात दसऱ्याचे सोने देण्यासाठी, हळदीकुंकवासाठी अस्पृश्यांचा प्रवेश होऊ लागला. पुढे सहभोजनेही होऊ लागली. याच सुमारास श्री. कीर या धनिकाने पतितपावन हे मंदिर बांधले व तेथे स्पृश्य एकत्र उत्सवसमारंभ करू लागले. सावरकर पुढे मुक्त झाल्यावर मुंबईस गेले. आणि हिंदुमहासभेच्या कार्यास त्यांनी वाहून घेतले. पण त्याला प्राधान्याने राजकीय स्वरूप आल्यामुळे रत्नागिरीचे कार्य इतरत्र कोठे झाले नाही. हिंदुमहासभेने अखिल भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यात हे कार्य चालविले असते तर हिंदुसमाज तिचा कायमचा ऋणी झाला असता.

संकरमहत्त्व
 वर्णभेद, जातिभेद, अस्पृश्यता यांवर मुळीच विश्वास नसल्यामुळे आगरकरांप्रमाणेच सावरकरांनीही वर्णसंकराचा पुरस्कार केला आहे. व्यासांचे उदाहरण देऊन 'संकरः स्वर्गायैव' असा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. पराशर हा ब्राम्हण व सत्यवती ही कोळीण यांच्या संकरातून वेदव्यास जन्माला आले. त्याचप्रमाणे चंद्रगुप्त मौर्य, महादजी शिंदे हे संकरजन्यच होते. हे सांगून अशा संकराचा निषेध कसा करावा, असे ते विचारतात. संकराचा असा गौरव करून, आज सर्व हिंदुसमाज हा एक रक्ताचाच आहे, असा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. ते म्हणतात, पूर्वी स्मृतींनीच ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्या अनुलोम विवाहांस संमती दिली होती आणि प्रतिलोम विवाह इतके होत असत की कोणत्या संकरातून कोणती जात निर्माण झाली हे सांगताना स्मृतिकारांची पुरेवाट होत असे. त्यामुळे आजचा हिंदुसमाज एकरक्ताचा आहे या विधानावर कसलाच आक्षेप घेता येणार नाही. ('हिंदुत्व', आणि 'मनुस्मृतीतील महिला' यांत याचे सविस्तर विवेचन आहे.)
 समाजपरिवर्तनाच्या सर्व तत्त्वज्ञानाचा हा सारार्थ आहे.