महाराष्ट्र संस्कृती/समारोप
४४.
समारोप
महाराष्ट्र संस्कृतीचे जे दर्शन येथवर आपल्याला घडले त्यावरून एक गोष्ट निश्चित दिसते की भारतातल्या इतर प्रांतांच्या संस्कृतीपेक्षा ही संस्कृती कोणत्याही दृष्टीने कमी नाही, असली तर काही क्षेत्रांत सरसच आहे.
परकीयांचे आक्रमण मोडून काढणे याबाबतीत महाराष्ट्राने विशेष पराक्रम केला आहे. गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहन कुळातील राजाने शकांचे आक्रमण निर्दाळून त्यांना राजस्थान, सौराष्ट्र येथपर्यंत पिटाळून लावले व महाराष्ट्रभूमीत पुन्हा स्वातंत्र्याची स्थापना केली. चालुक्य राजा सत्याश्रय पुलकेशी याने हर्षवर्धनाचे आक्रमण मोडून काढले. शिवछत्रपतींच्या मराठ्यांनी अखिल भारतात संचार करून मुस्लिम आक्रमणाची पाळेमुळे खणून काढली आणि शेवटी ब्रिटिश सत्तेला सुरुंग लावण्याचे कार्य विष्णुशास्त्री चिपळूणकर व लोकमान्य टिळक या महाराष्ट्रीय पुरुषांनीच केले. परकीय आक्रमणाचा मोड करून स्वातंत्र्यरक्षणाचे कार्य तसे चंद्रगुप्त मौर्यापासून अनेक प्रांतांतील वीरपुरुषांनी केले आहे. पण या कार्याची एवढी दीर्घ परंपरा महाराष्ट्राखेरीज अन्य प्रांतांत क्वचितच दिसते.
महाराष्ट्र संस्कृतीच्या इतिहासाचे, सातवाहन ते यादवकाल, बहामनीकाल, मराठा काल व ब्रिटिश काल असे चार विभाग पडतात, हे मागे सांगितलेच आहे. यांतील पहिला काल स्वातंत्र्याचा, पराक्रमाचा, विद्या, कला, व्यापार यांच्या उत्कर्षाचा काल आहे. या सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राने मोठे वैभव निर्माण केले होते. त्यातील विद्येच्या क्षेत्रात मात्र थोडी उणीव दिसते. तेथे तक्षशिला, नालंदा येथल्यासारखे एकही विद्यापीठ स्थापन झाले नाही. पण त्याहून जास्त खटकणारी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात आर्यभट, वराहमिहिर, लल्ल, ब्रह्मगुप्त यांसारखा गणित, ज्योतिष या क्षेत्रांत एकही पंडित झाला नाही. तक्षशिला, नालंदा येथे पारलौकिक विद्येबरोबर ऐहिक विद्येचाही अभ्यास होत असे. तसा अभ्यास महाराष्ट्रात झाला नाही. ऐहिक विद्येचा खरा अभ्यास महाराष्ट्रात ब्रिटिश काळातच झाला. तोपर्यंत महाराष्ट्र या बाबतीत मागेच राहिला.
दुसरा कालखंड हा बहामनी कालखंड होय. हा पूर्ण पारतंत्र्याचा काल होय. यातील दुर्देव हे की ब्राह्मण पंडित व मराठा सरदार हे जे समाजाचे नेते ते या काळात यवनसेवेतच धन्यता मानीत असत. स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद आहे हे येथील ब्राह्मण पंडितांना कधी कळलेच नाही. इतकेच नव्हे तर गीता, महाभारत यांचे वाचन करणाऱ्या या विद्वानांना धर्म म्हणजे काय हे जाणण्याची पात्रता सुद्धा कधी आली नाही. मराठा सरदारांची अशीच त्यांच्या क्षेत्रात अवनती झाली होती. तीनशे वर्षे हे सरदार मुस्लिम सत्ताच वृद्धिंगत करीत राहिले. स्वातंत्र्यप्राप्तीचा प्रयत्नसुद्धा यांपैकी कोणी केला नाही, हे फार खेदकारक होय.
यानंतरचा काल म्हणजे मराठा काल होय. या कालाचे मुख्य वैभव म्हणजे मुस्लिम सत्तेचे निर्दाळण हे होय. तो काळ असा होता की मराठे उभे राहिले नसते तर सर्व हिंदुस्थान यवनाक्रांत होऊन हिंदुधर्म नामशेष झाला असता. अशा वेळी शिवछत्रपतींचा उदय झाला व त्यांच्या प्रेरणेने मराठ्यांच्या स्वराज्याची व पुढे साम्राज्याची स्थापना झाली. हिंदुस्थानचे व हिंदुत्वाचे रक्षण हे मराठ्यांचे अलौकिक कर्तृत्व होय यात शंका नाही. पण हे उभारलेले वैभव कायम टिकविण्याची कोणतीही विद्या मराठ्यांनी जोपासली नाही. रणातील पराक्रमामागे जे दुर्भेद्य असे ऐक्य, जी एकजूट लागते, तीही त्यांना साधली नाही. याशिवाय राजसत्तेला पोषक असे जे वनोत्पादन, व्यापार, शेती यांकडेही त्यांनी लक्ष दिले नाही. इंग्रजांचे सर्व कर्तृत्व हे मराठे तीनशे वर्षे पाहत होते. पण त्यांची राजनीती, संघभावना, युद्धशास्त्र, समुद्रपर्यटन, व्यापार, कारखानदारी, यांचे आकलनसुद्धा त्यांना झाले नाही. यामुळेच मुस्लिम सत्ता नष्ट करण्यात जरी ते यशस्वी झाले तरी इंग्रजांपुढे ते टिकाव धरू शकले नाहीत.
मराठी राज्यात कोणी लेणी कोरली नाहीत, दक्षिणेतल्यासारखी भव्य मंदिरे उभारली नाहीत, संगीत, नाट्य, चित्र, शिल्प या कलांची उपासना केली नाही आणि राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र यांचा अभ्यासही केला नाही.
त्या दृष्टीने पाहता ब्रिटिश काल हा पारतंत्र्याचा काल असूनही त्याचे वैभव निश्चितच श्रेष्ठ वाटते. आणि याचे कारण एकच, प्रारंभापासूनच महाराष्ट्राने स्वातंत्र्याकांक्षा धरून पाश्चात्य विद्यांचा अभ्यास करून स्वातंत्र्यलढ्याची तयारी चालविली होती. हिंदुस्थान हे एक राष्ट्र आहे व ते स्वतंत्र झाले पाहिजे, ब्रिटिश लोक येथून गेले पाहिजेत, हे लोकहितवादींच्या पासून महाराष्ट्रीयांच्या मनात होते. स्वातंत्र्याकांक्षा व पाश्चात्य विद्य यामुळे येथे लोकांत व्यक्तित्व जागृत झाले, त्यांची अस्मिता प्रदीत झाली. या अस्मितातूनच सर्व प्रकारचे मानवी कर्तृत्व उदयास येत असते. महाराष्ट्रात तसे ते उदयास आले आणि स्वातंत्र्यलढा यशस्वी करण्याची प्रेरणा तो भारताला देऊ शकला. आणि त्याचबरोबर विद्या, कला या क्षेत्रांतही तो मोठे वैभव प्राप्त करून येऊ शकला.
स्वातंत्र्यानंतर मात्र या सर्व दिव्य प्रेरणा मंदावलेल्या दिसतात. ध्येयवाद, त्याग, लोकसेवा, भव्य आकांक्षा या सर्व गुणांचा महाराष्ट्रातूनच नव्हे, तर सर्व भारतातून लोप झाला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या एकदोन वर्षातच नेहरू, पटेल सांगू लागले की इतके दिवस त्याग केला, आता भोगावयाचे आहे, अशी लोकांची वृत्ती झाली आहे. महाराष्ट्रही याला अपवाद नाही. वास्तविक त्याग, ध्येयवाद यांची स्वातंत्र्यलढ्याच्या काळात एकपट जरूर असली तर नंतरच्या काळात दसपट जरूर होती व आहे. महाराष्ट्राच्या हे ध्यानात येईल काय ? येथे निम्मी जनता अजून दारिद्र्याच्या खाईत पडलेली आहे. तिची उन्नती कशी होणार ? लो. टिळक तरुणांना सांगत असत की 'तुम्ही ग्रॅज्युएट रामदासी व्हा.' सर्व देशभर संचार करून पाश्चत्त्य विद्येच्या आधारे जनतेत प्रबोधन घडवून आणा, असा याचा अर्थ आहे. हे व्रत महाराष्ट्रीय तरुणांनी घेतले तर महाराष्ट्र संस्कृतीला पुन्हा उत्कर्षकाळ प्राप्त होईल. उद्योग, व्यापार शेती, विद्या, कला यांत पुन्हा ती संस्कृती नवे विक्रम करील. टिळकांचा संदेश कृतीत आणण्याची सद्बुद्धी महाराष्ट्रीय तरुणांना होवो व महाराष्ट्र संस्कृतीचे पुनरुज्जीवन त्यांच्या हातून घडो, अशी शुभेच्छा प्रकट करून त्या संस्कृतीचे हे प्रदीर्घ विवेचन संपवितो.
■