महाराष्ट्र संस्कृती/साहित्य आणि कला


३२.
साहित्य आणि कला
 


साहित्यमहिमा
 साहित्य हे मानवी संस्कृतीचे, धर्म, समाजरचनेची तत्त्वे, अर्थव्यवस्था यांइतकेच महत्त्वाचे अंग आहे, यात वाद नाही. 'जे न देखे रवी, ते देखे कवी,' असा कवीचा गौरव केलेला आहे. 'कविः क्रांतदर्शी-' असेही त्याच्याविषयीचे वचन प्रसिद्ध आहे. ही वचने अगदी सार्थ आहेत हे, रामायण व महाभारत ही दोन संस्कृत महाकाव्ये पाहिली असता, सहज ध्यानात येईल. भारतीय मनाला वळण लावण्याचे, त्याला स्फूर्ती, प्रेरणा देण्याचे महाकार्य आज हजारो वर्षे हे दोन ग्रंथ करीत आहेत.

मराठी साहित्य
 मराठीच्या दृष्टीने पाहिले तर ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास यांनी मराठी मन कसे घडविले हे आपण पाहिलेच आहे. मुस्लिम आक्रमणाच्या काळात यांच्यामुळेच हिंदूंची स्वधर्मनिष्ठा जिवंत राहिली, असे म्हणण्यात मुळीच अतिशयोक्ती नाही. पण या संत कवींनी मुख्यतः आध्यात्मिक, तात्त्विक विवेचनपर ग्रंथ लिहिले. आत्मा, परमात्मा, मोक्ष, कर्म, पुनर्जन्म ही जी वेदांतातील तत्त्वे, त्यांच्या विवेचनावर त्यांचा भर होता. त्यांच्यानंतरच्या काळात मराठीत आख्यानकवी निर्माण झाले. मुक्तेश्वर, वामन, श्रीधर, मोरोपंत ही नावे प्रसिद्धच आहेत. त्यांनी रामायण, महाभारत व पुराणे यातील राम, कृष्ण, हरिचंद्र, ध्रुव यांच्या कथा मराठीत आणून व महापुरुषांचे आदर्श मराठी मनापुढे उभे करून त्याला नानाप्रकारच्या प्रेरणा दिल्या. काव्य लिहिताना 'आम्ही हे तरून जाण्यासाठीच लिहीत आहो,' असे त्यांनी म्हटले असले तरी, प्राचीन थोर पुरुषांच्या कथा वर्णून त्यांनी मराठ्यांचे मन खंबीर व दृढ करून टाकले, यात शंका नाही. याच काळात महीपतीसारखे चरित्रकार उदयास आले आणि संतांची चरित्रे लिहून त्यांनीही धर्मजागृतीचे कार्य केले. यानंतर विचार करावयाचा तो शाहिरांचा. त्यांचे महत्त्व इतके आहे की त्यांचा काळ म्हणजेच 'मराठी काव्याची प्रभात' होय असे कोणी म्हणतात. हे झाले काव्याविषयी. पण याच काळात गद्य बखरवाङ्मयही लिहिले जात होते आणि मराठी मनाच्या घडणीच्या दृष्टीने या वाङ्मयाचेही तसेच महत्त्व आहे. शाहीर आणि बखरकार यांनी ऐहिक जीवनाकडे लक्ष देऊन स्वकालीन घडामोडींवर रचना केली हा त्यांचा विशेष होय. अशा रीतीने मराठा कालखंडातील साहित्याचा विचार करताना आख्यानकवी, चरित्रकार, शाहीर व बखरकार अशा चार प्रकारच्या साहित्यिकांचा आपल्याला विचार करावयाचा आहे.
 हा विचार संस्कृतीचे साहित्य एक अंग म्हणून करावयाचा आहे. मराठ्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा त्याच दृष्टीने आपण विचार केला. त्यांचा इतिहास देणे हा आपला हेतू नव्हता. तेच धोरण येथे आहे. काही प्रमुख साहित्यिकांच्या महत्त्वाच्या कृतींचा येथे संस्कृतीच्या दृष्टीने परामर्श घ्यावयाचा आहे. आणि त्याच दृष्टीने त्यांचे महत्त्वमापन करावयाचे आहे.

आख्यानकवी
 प्रथम आख्यानकवींचा विचार करू. त्यांतील पहिला मोठा कवी म्हणजे मुक्तेश्वर हा होय. हा एकनाथांच्या मुलीचा मुलगा. म्हणजे सतराव्या शतकाचा प्रारंभ हा याचा काळ होय. याची मुख्य ख्याती आहे ती महाभारत रचनेसाठी. मराठीतला सर्वश्रेष्ठ कवी, असे याच्या संबंधी, हरिभाऊ आपटे, कृष्णशास्त्री चिपळूणकर अशांसारख्या पंडितांनी म्हटलेले आहे. याने महाभारत मराठीत आणले. पण त्याची आदी, सभा, वन, विराट व सौप्तिक पर्व अशी पाचच पर्वे उपलब्ध आहेत. वि. ल. भावे यांच्या मते यातील आदिपर्व हे खरे श्रेष्ठ काव्य होय. आदिपर्व ही पौर्णिमा असून पुढे वद्य पक्ष लागतो, असे ते म्हणतात. काव्यसौंदर्याचे बहुतेक सर्व गुण याच्या काव्यात दिसून येतात. मनोविकारांची वर्णने, सृष्टीची वर्णने, युद्धांची वर्णने, शृंगार, वीर, करुणादी रस हे काव्यसौंदर्य याच्या भारतात कोठे कोठे उत्कटत्वाने दिसते. सभा पर्वातील द्रौपदीचा संताप, विराटपर्वातील कीचकाची मदोन्मत्तता, वन पर्वातील नलदमयंती विरह, शकुंतला, भीम, अर्जुन, सावित्री ही व्यक्तिचित्रे, यांची वर्णने विशेष उल्लेखनीय आहेत.

मुक्तेश्वर
 मुक्तेश्वर हा विद्वान कवी होता. परिणामवाद, विवर्तवाद, जीवेश्वरवाद, मीमांसाशास्त्र यांविषयीही तो काव्यात प्रसंगविशेषी चर्चा करतो. पण त्याच्या काव्याचे महत्त्व आहे ते त्यातील काव्यगुणांसाठी. भाषाप्रभुत्व, रचनाचातुर्य, प्रसाद, माधुर्य, अर्थ- गांभीर्य, उदात्त कल्पना या गुणांनी मराठी काव्याला त्याने सौंदर्य प्राप्त करून दिले आणि मराठी भाषेला अभिमानास्पद अशी देणगी दिली.

वामन पंडित
 आख्यानकवीत काही कवी न्यायवेदान्तमीमांसादी शास्त्रांत पारंगत होते. त्यांना पंडित कवी म्हणत. संस्कृत महाकाव्याचे आदर्श पुढे ठेवून ते मराठीत रचना करीत अशा कवींत वामनपंडित हा अग्रणी होय. इ. स. १६३६ ते १६९५ असा त्याचा काळ मानला जातो. वामनपंडिताने शास्त्रीय विषयांवर ग्रंथरचना केली आहे आणि काव्यही लिहिले आहे. 'निगमसार' 'कर्मतत्त्व,' 'समश्लोकी गीता' आणि 'यथार्थदीपिका' इ. याचे तात्त्विक ग्रंथ होत. त्यांतील 'यथार्थदीपिका' हा फार प्रसिद्ध आहे. ती गीतेवर टीका आहे. ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असे ज्ञानेश्वरांनी प्रतिपादन केले आहे. ते वामनाला मान्य नाही म्हणून त्यावर आणि इतरही ज्ञानेश्वरांच्या मतांवर त्याने या दीपिकेत टीका केली आहे. पण वामन आज लोकांत प्रसिद्ध आहे तो त्याच्या कथाकाव्यामुळे. त्याने रामायण, महाभारत किंवा भागवत यांवर स्वतंत्रपणे मोठी अशी ग्रंथरचना केलेली नाही. प्रामुख्याने श्रीकृष्णाच्या गोकुळातल्या क्रीडा हा त्याचा विषय आहे. 'वनसुधा', 'वेणुसुधा', 'राधाविलास', 'कात्यायनी व्रत', 'उखळी बंधन', 'राधाभुजंग' ही त्याची प्रकरणे प्रसिद्ध आहेत. रामायणातील 'भरतभाव' आणि 'सीतास्वयंवर' हीही प्रकरणे उत्तम आहेत. भावमधुर कोमल रचना, उत्तम प्रत्ययकारी वर्णने, शब्दचित्रे, रसाविष्कार, मनोहर नादमधुर भाषा हे त्याच्या काव्याचे विशेष गुण आहेत. एकनाथांप्रमाणेच वामन हा विषयाला अध्यात्मरंग देतो. वसुदेवाने हरीला यशोदेपुढे ठेवले व तिची मुलगी आणली म्हणजे प्रत्यक्ष मायाच आणली. त्यामुळेच तो मग बद्ध झाला. रामाने शिवधनुर्भंग केला म्हणजे संसाराचाच भंग केला. वधू आणि वर म्हणजे शांती आणि आत्मा होत. अशी वर्णने हा करतो.
 जगन्नाथ पंडिताच्या गंगालहरीचे आणि भर्तृहरीच्या शतकांचे वामनाने भाषांतर केले आहे. तेही अनेकांच्या वाचनात असते. पंडित कवींना यमकाची हौस फार. त्याला वामनही अपवाद नाही. म्हणूनच त्याला यमक्या 'वामन' असे नाव पडले आहे. पंडित कवी कोठे कोठे अत्यंत अश्लील लिहितात आणि ते सर्व हरी म्हणजे परमात्मा आणि राधा म्हणजे माया अशा वर्णनाने पचविण्याचा प्रयत्य करतात, पण हे अश्लाघ्य आहे असे वाटते. वामनाने काही ठिकाणी याचा अतिरेक केला अहो

रघुनाथ पंडित
 वामनानंतर रघुनाथपंडित हा कवी येतो. अठराव्या शतकाच्या प्रारंभी हा होऊन गेला. 'नलदमयंतीस्वयंवराख्यान' हे याचे सुप्रसिद्ध काव्य होय. काहींच्या मते मराठीतला हा सर्वश्रेष्ठ कवी होय. वि. ल. भावे यांनी रघुनाथ पंडितांचा खूप गौरव केला आहे. पण त्याचे काव्य करामतीचे, मेहनतीचे फल आहे, असे ते म्हणतात. मन वेडावून टाकण्याचे, नवे अनुभवविश्व पुढे उभे करण्याचे सामर्थ्य त्याच्या कवितेत, त्यांच्या मते नाही. एरवी मागे वर्णिलेले सर्व काव्यगुण त्याच्या या काव्यात आढळतात, हे त्यांनाही मान्य आहे.

सामराज
 निरंजन माधव आणि सामराज हे दोन कवी काहीसे प्रसिद्ध आहेत. निरंजन माधव हा थोरले बाजीराव आणि नानासाहेब पेशवे यांच्या पदरी होता. 'संप्रदाय परिमळ' हा याचा ग्रंथ प्रसिद्ध असून, त्याने आपली गुरुपरंपरा आपल्या स्त्रीस सांगितली आहे. 'मंत्ररामचरित,' 'निर्वोष्ठ राघवचरित,' 'चिद्बोध रामायण', 'रामकर्णामृत' अशी रामकथेवर याने बरीच रचना केली आहे. हा सर्व देशभर हिंडत असे. आणि ज्या ज्या देवतांचे तो दर्शन घेई त्यांवर स्तोत्रे रचीत असे. क्षेत्रामधील उपाध्ये, वडवे, गयावळ यांच्या नीतिहीन लोभी वृत्तीवर याने आपल्या कवनात फार कडक टीका केली आहे. सामराज या कवीचे 'रुक्मिणीहरण' हे एकच काव्य प्रसिद्ध आहे. पण त्यामुळे त्याला फार मोठी कीर्ती मिळालेली आहे. याचे एकंदर ८ सर्ग असून ११०० श्लोक आहेत. रुक्मिणीला तिच्या आईने सासरी कसे वागावं याचा उपदेश केला आहे. तो त्या काळच्या मुलींच्या दृष्टीने उत्तम आहे, असे टीकाकार म्हणतात. (पण रुक्मिणी ही राजकन्या होती व महाराणी व्हावयाची होती. त्या दृष्टीने हा उपदेश हास्यास्पद वाटतो). एकंदर रुक्मिणीहरण काव्याविषयी लिहिताना डॉ. वाटवे म्हणतात, येथे प्राचीन मराठी पंडिती काव्य खऱ्या अर्थाने साकार झाले आहे.

श्रीधर
 आख्यानकवींत श्रीधर कवीला फार महत्त्वाचे स्थान आहे. आधीच्या कवींनी स्फुट रचना पुष्कळ केल्या. मुक्तेश्वराने सर्व महाभारत रचण्यास प्रारंभ केला. पण पाचच पर्वे त्याच्या हातून झाली. या तुलनेने पाहता श्रीधराचे कार्य फार मोठे आहे. 'हरिविजय', 'रामविजय', 'पांडवप्रताप', 'जैमिनी अश्वमेध ', इ. मोठे ग्रंथ याने पूर्ण करून टाकले. कवी मोरोपंत याने अशीच मोठी रचना केली आहे. पण ती सर्व आर्यावृत्तात व संस्कृतप्रचुर भाषेत केल्यामुळे बहुजनसमाजाला दुर्बोध झाली. आख्यान कवींपैकी सर्व पंडित कवींची हीच वृत्ती आहे. अक्षरगणवृत्तांची त्यांना हौस फार. त्यामुळे व संस्कृतप्रचुतेरमुळे ते समाजापासून दूर गेले. श्रीधर कवीने आपली ही सर्व रचना ओवीवृत्तात व साध्या सोप्या नित्याच्या सुबोध भाषेत केली आहे. त्यामुळे खेड्या- पाड्यांतून घरोघर हरिविजय, रामविजय हे त्यांचे ग्रंथ अजूनही आवडीने वाचले जातात. रामकृष्णाच्या कथा सर्वजनांच्या मुखी करून टाकण्याचे मोठे श्रेय श्रीधराला आहे.
 साध्या सोप्या भाषेत लिहिल्यामुळे श्रीधराची कविता काव्यगुणात कमी पडली, असे मुळीच नाही. रस, अलंकार, वर्णनशैली, संवादरचना, संक्षेपविस्ताराचे कौशल्य, स्वभावलेखन या सर्व गुणांत श्रीधर कोठेही कमी नाही.
 रामविजय, पांडवप्रताप इ. ग्रंथ श्रीधराने मूळ रामायण महाभारत यांवरूनच लिहिले. पण मध्यंतरीच्या काळात या मूळ ग्रंथांत भर पडत गेली व मूळ कथानकात त्या त्या कवींनी फेरफारही खूप केले. श्रीधराने या सर्वांतून थोडा थोडा भाग घेऊन आपली रचना केली आहे.
 या मोठ्या रचनांशिवाय 'शिवलीलामृत', पांडुरंगमाहात्म्य' 'व्यंकटेश- माहात्म्य', 'ध्रुवचरित्र' अशी स्फुटरचनाही श्रीधराने केली आहे. त्यांतील 'शिवलीलामृत' हा ग्रंथ फार लोकप्रिय आहे. अनेकांच्या तो नित्यपाठात अजूनही आहे.
 आपली सर्व रचना श्रीधराने इ. स. १७०२ ते १७२० या काळात केलेली आहे.
 मध्वमुनी आणि त्याचा शिष्य अमृतराय हे, पहिला आपल्या पदरचेनेसाठी आणि दुसरा कटावरचनेसाठी, प्रसिद्ध आहेत. धनेश्वराची कथा व चोळराजाची कथा या मध्वमुनीच्या रचना आहेत. या दोघांपैकी मोठी ग्रंथरचना कोणी केलेली नाही. पण मध्वमुनीची पदरचना मधुर असल्यामुळे त्या पदांचा प्रसार घरोघरी झाला. आणि अमृतरायाला प्रसिद्धी मिळाली ती त्याच्या कटावांमुळे. हे कटाव प्रास, अनुप्रास, यमके यांचा पाऊस पाडतात. त्यामुळे ऐकणारा मोहून जातो. कीर्तनकारांनी यांचा विशेष उपयोग केला. स्वतः अमृतराय कीर्तनकार होता. त्यामुळे त्या वेळी हे कटाव ज्याच्या त्याच्या तोंडी झाले. दोघेही कवी अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेले.

मोरोपंत
 आख्यानकवींमध्ये सर्वात विख्यात म्हणजे मोरोपंत. १७२९ ते १७९४ हा याचा काळ. बाबूजी नाईक बारामतीकर यांच्या पदरी ते पुराणिक होते. तेथेच त्यांनी आपली सर्व कविता केली. पंतांची एकंदर कविता पाऊण लक्ष आहे. आणि त्यातील निम्म्याच्या वर आर्यावृत्तात आहे. संस्कृत शास्त्र व काव्यनाटके यांचा पंतांनी कसून अभ्यास केला होता. त्यांची ९००० कविता प्रत्यक्ष संस्कृतातच आहे. यामुळे त्यांच्या भाषेत संस्कृतप्रचुरता फार आली आहे. 'कुशलवोपाख्यान', 'हरिश्चंद्राख्यान', प्रल्हाद- विजय', 'देवी माहात्म्य', 'सीतागीत', 'रुक्मिणीगीत' ही यांची स्फुटरचना होय. 'संशयरत्नमाला', 'केकावली' ही यांची स्तोत्रे महाराष्ट्रात फारच प्रसिद्ध आहेत. 'आर्याभारत', 'कृष्णविजय', 'मंत्रभागवत', 'हरिवंश' ही पंतांची मोठी काव्ये होत.
 पंतांना त्यांच्या हयातीतच अमाप प्रसिद्धी मिळाली. रस, वर्णनशैली, अलंकार, स्वभावचित्रे, भाषाप्रभुत्व इ. सर्व गुणांनी मोरोपंतांची कविता सजलेली आहे. त्यांच्या आर्यांचा कीर्तनकारांना फार उपयोग होत असे. आणि त्या काळी, सर्व भारतभर मराठ्यांच्या ठाण्यांतून उत्सव-समारंभात कीर्तने होत असल्यामुळे, पंतांची कविता सर्वत्र पसरली.
 संस्कृतातले सर्व आख्यानभांडार राम, कृष्ण, पांडव या वीरपुरुषांची स्फूर्ति दायक चरित्रे, पुराणातील हरिश्चंद्र, ध्रुव, अंबरीष, इ. आदर्श राजपुरुष, सीता, सावित्री, दमयंती, अनसूया यांच्या अनमोल कथा मराठीत आणून या आख्यानकवींनी मराठीला व महाराष्ट्राला कायमचे ऋणी करून ठेविले, याविषयी दुमत नाही. पण ऐतिहासिक दृष्टीने यांचे मूल्यमापन करून त्याचे स्थान ठरविणे हे अवश्य आहे.

महाकवी
 'प्राचीन मराठी पंडित काव्य' या नावाचा एक ग्रंथ डॉ. के. ना. वाटवे यांनी लिहिला आहे. त्यात मोरोपंतांविषयीचे आपले मत मांडले आहे. त्यांच्या काव्याचे सर्व गुणवर्णन वाटवे यांनी केले आहे. पण ते महाकवी होते काय या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणतात, 'संस्कृतातील माघ, भारवी, श्रीहर्ष, इ. विदग्ध कवींप्रमाणे, पंतांनी महाभारताचा एखादा सुटा कथाभाग घेऊन, त्यावर स्वतःची कलाकुसर केली असती, पांडित्य, कलात्मकता आणली असती, त्या कथेतून फलित होणारे विशिष्ट तत्त्व दर्शविले असते, आणि त्या स्वयंपूर्ण कथेवर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि स्वकालाच ठसा उमटविला असता, तर त्यांचे 'आर्याभारत' हे महाकाव्य झाले असते. पंतांनी काही ठिकाणी स्वतःच्या उपमा, उत्प्रेक्षा इत्यादी घातल्या आहेत; पण एवढ्याने काम भागण्यासारखे नाही. आर्ष महाकाव्याचे जुने कथानक नव्या संस्कृतीच्या, विद्याकलांच्या आणि विशिष्ट हेतूंच्या चौकटीत बसवावे, तेव्हाच ते विदग्ध महाकाव्य होते, एरवी नाही. त्यामुळे मुक्तेश्वरांच्या संक्षेप रामायणाप्रमाणे किंवा त्यांच्या भारताप्रमाणे, 'आर्याभारत' हेही महाकाव्य नाही.'
 असेच मत ग्रंथाच्या शेवटी उपसंहारात एकंदर सर्व पंडित कवींविषयी त्यांनी मांडले आहे. काही तरी तत्त्व, काही ध्येयवाद कवीच्या मनापुढे असला पाहिजे; तो व्यक्त करण्यासाठी त्याने काव्यरचना केली तरच ते महाकाव्य होते. 'राजधर्म हा त्यागधर्म आहे' हे तत्त्व कालिदासाने 'रघुवंशा'त मूर्त केले आहे. भारवीने 'किरातार्जुनीया'तून एक नवा अर्थ काढला. संन्यासवृत्तीची मरगळ त्या वेळी समाजाला आली होती. ती मोडून काढून, अर्जुनाच्या तोंडून कवीने कणखर प्रवृत्तीची चढाई दाखविली. श्रीहर्षाने 'नैषधीयचरिता'त जयचंद आणि पृथ्वीराज यांच्यांतील कलहाचा घातकपणा सूचित केला. अशा तऱ्हेचा ध्येयवाद आणि स्वकालसमरसता पंडिती काव्यात प्रायः आढळून येत नाही. जुन्या कथांचा नवीन अर्थ ते सांगत नाहीत. विशिष्ट विचारसरणीचा पाठपुरावा ते करीत नाहीत. थोडक्यात म्हणजे ज्याला महाकाव्याचा विशिष्ट हेतू म्हणतात तो कुठेही दिसत नाही. मोरोपंत आणि वामन यांनी जे काही चांगले लिहिले आहे त्याची पूर्ण जाणीव बाळगून असे सांगावेसे वाटते की यांना संस्कृत महाकवींची बरोबरी नाही. डॉ. वाळिंबे यांनीही, पंडिती कवींचा अभिजातवाद हा बेगडी अभिजात वाद आहे, असे म्हटले आहे. विष्णुशास्त्री यांना मोरोपंतांचा फार अभिमान होता हे प्रसिद्धच आहे, पण त्यांनीही त्यांच्याविषयी व एकंदर मराठी कवीं विषयी हेच मत दिले आहे. 'आमच्या महाराष्ट्र कवींनी सामान्यतः पाहाता अर्थव्यंजनाच्या पलीकडे थोडेच लक्ष दिलेले आढळते. अर्थ शब्दांनी व्यक्त झाला की झाले.' असे त्यांनी मोरोपंतावरील विवेचनाच्या समारोपात म्हटले आहे.

स्वतंत्र तत्त्व
 पण डॉ. वाटवे यांनी दाखविलेली उणीव ही खरी उणीव आहे. स्वतंत्र तत्व, स्वतंत्र ध्येय, स्वतंत्र विचारसरणी सांगण्यासाठी मराठी कवींनी काव्य लिहिले नाही. रघुवंश, किरातार्जुनीय, शाकुंतल, मृच्छकटिक यांसारख्या स्वतंत्र काव्यकृती मराठी कवींना साधल्या नाहीत. वरील काव्य, नाटके जगाला, पाश्चात्य जगालाही, मोह घालतात. तशी आख्यानकवितेत एकही रचना नाही.
 तरीही वर सांगितले त्याप्रमाणे मराठे व महाराष्ट्र त्यांचा ऋणी आहे. मराठी भाषेला त्यांनी संपन्न केले. आणि प्राचीन कथा मराठीत आणून प्राचीन परंपरेचे व धर्माचे रक्षण केले हे खरेच आहे. एवढे ऋण आपण मान्य केलेच पाहिजे.

संप्रदाय
 हा आख्यान कवितांचा विचार झाला. आता याच काळात महाराष्ट्रात जे भिन्नभिन्न संप्रदाय किंवा पंथ रूढ होते त्यांच्या वाङ्मयाची माहिती देऊन हे विवेचन पुरे करू. महानुभाव, नाथ, दत्त, वारकरी आणि रामदासी असे पाच पंथ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांतील महानुभाव पंथाचे विवेचन पूर्वी येऊन गेले आहे. बहामनी कालाच विचार करताना वारकरी आणि रामदासी संप्रदायांचा विचार विस्तृतपणे केला आहे. आता राहिले नाथ आणि दत्त संप्रदाय.

दत्तसंप्रदाय
 दत्तसंप्रदाय हा फार प्राचीन आहे. पुराणात त्याची वर्णने येतात. महानुभावांचे दत्त हे दैवत आहे. पण तो त्रिमूर्ती दत्त नव्हे. तो एकमुखी दत्त असून, त्याचे माहात्म्य 'सैहाद्रवर्णनात' आले आहे, हे मागे सांगितलेच आहे. 'या मार्गासि आदिकारण दत्तगुरू' असे चक्रधरानेच म्हटले असल्यामुळे महानुभाव दत्तसंप्रदायच होय, असे कोणी म्हणतात. पण महाराष्ट्रात आज जो दत्तसंप्रदाय रूढ आहे तो त्रिमुखी दत्ताचा आहे. आणि त्याचे प्रवर्तक पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेले नरसिंह सरस्वती हे होत. त्यांचा स्वतःचा एकही ग्रंथ नाही. पण मागे उल्लेखिलेला 'गुरुचरित्र' हा सरस्वती गंगाधराचा ग्रंथ तो या पंथाचा प्रमुख ग्रंथ होय. यात काय प्रतिपाद्य आहे ते मागे सांगितलेच आहे. या पंथाने हिंदुमुसलमानांचे ऐक्य करण्याचा प्रयत्न केला होता, असे म्हणतात. आणि श्रीदत्त आपल्या भक्तांना मलंग वेषात दर्शन देत असत, असे सांगतात. पण प्रत्यक्षात याची काही फलप्राप्ती झाली नाही हे उघडच आहे.

नाथपंथ
 दुसरा पंथ म्हणजे नाथसंप्रदाय हा होय. हा संप्रदाय स्वतः श्रीशंकरानेच प्रस्थापित केला आहे. आदिनाथ, मत्स्येन्द्रनाथ, गोरखनाथ, गैनीनाथ, निवृत्तिनाथ, ज्ञाननाथ (ज्ञानेश्वर) अशी आपली परंपरा स्वतः ज्ञानेश्वरांनीच सांगितली आहे. पण ज्ञानेश्वर नाथपथी असले तरी, त्यांनी त्या संप्रदायाचे विवरण करणारे ग्रंथ लिहिले नाहीत, त्यांचे सर्व ग्रंथ वारकरी पंथाचे आहेत. त्यांच्या पूर्वीचे गोरक्षनाथ यांची काही पदे व गैनीनाथांची 'गोरक्षगीता' एवढेच त्या काळचे मराठी वाङ्मय आहे. पण नाथसंप्रदाय हा पुढे चालूच राहिला आणि त्याने मराठीला वाङ्मयही विपुल दिले. त्यापैकी दासोपंताचे वाङ्मय फार प्रसिद्ध आहे. गीतेवर त्याने चारपाच टीका लिहिल्या. त्यांपैकी 'गीतार्णव' ही टीका सव्वा लक्ष ओव्यांची आहे. याशिवाय याने सव्वा लक्ष पदेही रचली आहेत. 'गीतार्णव' हा ग्रंथ इतका व्यापक आहे की त्यात अमुक विषय आल नाही असे नाही. पण दासोपंताचे वाङ्मय हे नाथपंथाचे विवरण करीत नाही. तो नाथपंथी होता हे खरे. आणि हठयोग व एकांतिक गुरुभक्ती यांचे वर्णन तो ग्रंथात करतो. पण मुख्य विजय तो नाही. त्याच्या नंतर झालेला नाथपंथी म्हणजे सत्यामलनाथ हा होय. त्याचा 'सिद्धान्तरहस्य' हा ग्रंथ होय. गैनीनाथ, गुप्तनाथ, उद्बोधनाथ, केसरीनाथ व शिवदिननाथ अशी ही शिष्यपरंपरा आहे. यातील शिवदिननाथ किंवा 'शिवदिन केसरी' हा विशेष प्रसिद्ध आहे. याने 'विवेक दर्पण', 'ज्ञानप्रदीप' वगैरे ग्रंथ रचले. इ. स. १६९८ ते १७७४ हा याचा काल होय. परंपरेतल्या इतर लोकांनी पदे, अभंग वगैरे रचना केली. मोठा ग्रंथ असा रचला नाही.

जैन मराठी काव्य
 दत्तसंप्रदाय व नाथपंथ यांच्याप्रमाणेच जैन पंथीय मराठी साहित्याचाही विचार करणे अवश्य आहे. मराठीत याचा अभ्यास पूर्वी फारसा झालेला नाही. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात याचा विचार फारसा कोणी करीत नाही. पण तो केला पाहिजे इतके ते साहित्य विपुल आहे आणि महाराष्ट्रात राहणारे जैन हे महाराष्ट्राचा व मराठीचा इतरांइतकाच अभिमान धरतात, हे फार महत्त्वाचे कारण आहे. जैनांच्या 'तीर्थकल्पा'त सातवाहन राजाची कथा येते आणि तेथे पैठणचा 'महाराष्ट्र लक्ष्मीचे रत्न' असा उल्लेख आलेला आहे.
 ब्रह्मजिनदास हा पंधराव्या शतकातील प्रसिद्ध गुजराथी साहित्यिक होय. त्याने आपल्या शिष्यांना मराठीत लेखन करण्याची प्रेरणा दिली. त्याने स्वतः मराठीत 'श्रेणिक चरित्र' हा ग्रंथ लिहिला आहे. शिशुनाग वंशातील श्रेणिक- बिंबिसार- यांचे हे चरित्र आहे. त्यांचे शिष्य मेघराज, कामराज आणि सूरीजन यांनी अनुक्रमे 'यशोधरचरित्र', 'सुदर्शनचरित्र' व 'परमहंसकथा' असे ग्रंथ मराठीत रचले. ब्रह्मजिनदासाचा एक शिष्य ब्रह्मगुणदास हाच पुढे गुणकीर्ती आचार्य म्हणून प्रसिद्ध झाला. 'पद्मपुराण' हे जैनांचे रामायण त्याने रचले आहे. याशिवाय 'धर्मामृत', 'रुक्मिणीहरण', 'नेमिनाथ पाळणा' इ. अनेक ग्रंथ याने लिहिले आहेत. अभ्यासक या गुणकीर्तीला जैन मराठी साहित्यात आद्य स्थान देतात. चरित्र, भाष्य, टीका, गीत इ. सर्व प्रकारचे वाङ्मय याने लिहिले आहे.
 मेघराजाचे 'यशोधरचरित्र' हे एक चांगले काव्य आहे. यशोधर व त्याची राणी अमृता यांची ही कथा आहे. यात शृंगार आणि वैराग्य यांचे सुंदर वर्णन केले आहे. याशिवाय 'पार्श्वनाथभवांतर', 'कृष्णगीत', 'गुजरी मऱ्हाठी गीत' अशी विविध रचना त्याने केली आहे. याचा गुरुबंधू पंडित सूरीजन याने 'परमहंसकथा' हा आध्यात्मिक रूपकात्मक ग्रंथ रचला आहे. प्रमाणबद्धता, नाट्य यांनी हा ग्रंथ संपन्न आहे.
 १६५० च्या सुमारास दामा पंडित याने 'जंबुस्वामी-चरित्र' व 'दानशील तपभावना' असे दोन ग्रंथ रचले. जंबुस्वामी हे महावीरांनंतरचे तिसरे आचार्य. त्यांचे हे काव्यमय चरित्र फार महत्त्वाचे मानले जाते. 'दानशील तपभावना' हा ओवीबद्ध ग्रंथ आहे व त्यात या गुणांची महती संवादरूपाने वर्णिली आहे. सतराव्या शतकाच्या अखेरीस लातूर येथील भट्टारक महीचंद्र याने 'आदिनाथपुराण' या महाकाव्याची निर्मिती केली. आद्य तीर्थंकर ऋषभदेव यांचे हे चरित्र आहे. महीचंद्र याचे एक शिष्य देवेंद्रकीर्ती यांनी 'कालिकापुराण' हा ग्रंथ रचला. कष्टकरी जनतेची कालिका ही देवता आहे. तिचे हे पुराण आहे. कासार व बोगार समाजात याचे श्रद्धेने वाचक केले जाते.
 जिनसागर हा जैन मराठी कवी अठराव्या शतकात होऊन गेला. 'जीवंधरपुराण' ही त्याची कथा शृंगार व वीररसाने ओथंबलेली आहे. जिनसागराने याशिवाय व्रतकथा, आरत्या, स्तोत्रे अशीही रचना केली आहे. याच शतकात जनार्दन याने 'श्रेणिकचरित्र' लिहिले. हा पुराणकाव्याचा आदर्श मानला जातो. या काव्यात त्याचा मराठीचा अभिमान प्रगट झाला आहे.
 महतीसागर हा कवी एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी होऊन गेला. बारामती, फलटण या भागात त्याचे वास्तव्य असे. 'महती- काव्य-कुंज' या नावाने त्याचे काव्य प्रसिद्ध आहे. याच काळात १८१३ साली कवी रत्नकीर्ती याने 'उपदेशरत्नमाला' हा ग्रंथ लिहिला. त्यात सर्व जैन धर्माचे सार ग्रंथकर्त्याने आणले आहे.
 या वर्णनावरून जैन मराठी साहित्याचे महत्त्व ध्यानात येईल. पुराण, चरित्र, आख्यान, धर्मकथा, खंडकाव्य, स्तोत्र, आरत्या, पदे, इ. सर्व प्रकारचे आणि विपुल वाङ्मय जैन मराठीत आहे. त्याचा एक विशेष म्हणजे त्यात कथानायक देव किंवा ऋषी नसून राजे, व्यापारी, अथवा शूद्रही असतात. त्यात चातुर्वर्ण्य संस्थेला महत्त्व नाही, यज्ञयागाला महत्त्व नाही, तर अहिंसादी गुणांचे वर्णन येते.
 पण स्वकालाशी समरस होऊन, काही विशिष्ट उद्दिष्ट, काही ध्येय डोळ्यांपुढे ठेवून रचना करणे हे जे महाकाव्याचे प्रधान लक्षण ते जैनपंथीय मराठी काव्यांतही दिसत नाही.

स्वकालविमुख
 आख्यानकवी आणि दासोपंतापासून पुढे उल्लेखिलेले संप्रदायकवी हे पूर्णपणे स्वकालविमुख होते. महाराष्ट्रावर भयानक संकट कोसळत होती. प्रचंड संघर्ष चालू होते. पण यांनी, क्तचित काही अपवादभूत निर्देश वगळता, त्याची दखलही घेतली नाही. महाराष्ट्र समाजात अनंत घडामोडी चालू होत्या. त्याचा उत्कर्षापकर्ष चालू होता. त्यांविषयी काही सामाजिक, राजकीय, आर्थिक असा एखादा विचार घेऊन, तत्त्व घेऊन त्याला मूर्त रूप काव्यात द्यावे, असे कधी कोणास वाटले नाही. 'कविः क्रांतदर्शी', 'रवि न देखे ते कवी देखे', हे उद्गार सार्थ होतील असा एकही कवी या काळात झाला नाही. संस्कृत महाभारत वाचताना हे सर्व विशेष ध्यानात येते. स्वकालीन सर्वांगीण जीवनाविषयी त्या ग्रंथाचा कर्ता किती जागरूक होता हे पाहून, तशी जागृती एकाही मराठी कवीने दाखवू नये, याचे आश्चर्य वाटते.

वास्तवहीन
 स्वकालाच्या राजकीय किंवा सामाजिक घडामोडी सोडून दिल्या तरी इतर जे वास्तव जीवन त्याचे अवलोकन तरी या कवींनी करावे. पण तेही त्यांनी केले नाही. निसर्गाचे वर्णन करताना त्या वनात साही ऋतू एकदम अवतरले, असे ते बिनदिक्कत लिहितात. ज्याला अप्रतिम रूप नाही असा पुरुष किंवा स्त्री यांच्या काव्यात आढळणार नाही. वस्त्रालंकारांच्या बाबतीत, पक्वान्नांच्या बाबतीत सर्वत्र हेच आहे. इहलोकात जे कधी कुठे आढळत नाही ते यांच्या काव्यात सदैव हात जोडून उभे आहे.

मूल्यमापन
 दासोपंताविषयी विवेचन केल्यानंतर समारोपादाखल वि. ल. भावे यांनी जे लिहिले आहे तेच, थोड्याफार फरकाने, एकंदर वर निर्देशिलेल्या मराठी कवींविषयी खरे आहे, असे वाटते. दासोपंताचे वडील दिगंबरपंत हे नारायण पेठचे देशपांडे होते. एकदा दुष्काळ असल्यामुळे त्यांच्याकडून बादशहाकडे वेळेवर रसद पोचली नाही. तेव्हा त्याने दासोपंताला पकडून ओलीस म्हणून ठेवले आणि, रसद आली नाही तर त्याला बाटवून मुसलमान करू, अशी धमकी दिली. सुदैवाने पुढे रसद पोचली आणि दासोपंताची सुटका झाली. ह्याचा संदर्भ देऊन भावे लिहितात, दासोपंताची ही प्रचंड रचना पाहून कौतुक वाटते. पण एवढा मोठा विशाल बुद्धीचा पुरुष, सरकारी नोकरी सुटल्यानंतर, केवळ वेदांत कुटीत शांतपणे स्वस्थ राहावा, याबद्दल थोडे वाईटही वाटते. ज्याने दुष्टपणाने आपल्याला छळले, व ज्याच्या अमलात आपल्या देशावर, आपल्या लोकांवर आपल्या मुलाबाळांवर असा जुलूम झाला, अशा बादशहाला काही अद्दल घडवावी, असे दासोपंताच्या मनात देखील आले नाही व त्याने तसा यत्नही केला नाही, याबद्दल मन खट्टू होते. आणि या शांत समाधानी वृत्तीबद्दल थोडा किळसही येतो. क्षणभर असेही मनात येते की ज्यांना इहलोकाची चाडच राहिली नाही ते इहलोकी राहण्याला थोडे अयोग्यच खरे.'

चरित्र वाङ्मय
 आख्यान काव्यानंतर जुन्या मराठीतील चरित्र वाङ्मयाचा विचार करावयाचा. चरित्र लेखनपरंपरा तशी मराठीत जुनीच आहे. महीन्द्रभट याने 'लीळाचरित्र' हे चक्रधरांचे चरित्र लिहिले. नामदेवाने आदी, तीर्थावळी, समाधी असे भाग करून ज्ञानेश्वरांचे चरित्र लिहिले. नामदेव, तुकाराम, निरंजनमाधव यांनी लहान मोठी आत्मचरित्रे लिहिली. सरस्वती गंगाधरांच्या 'गुरुचरित्रा'चा उल्लेख मागे आलाच आहे. बखरीत काही चरित्रे आहेत. पण ती गद्य आहेत. त्यांचा विचार तेथे करू.

महीपती
 वरील लेखकांनी एकेका पुरुषाचे चरित्र लिहिले. यापुढे अनेकांची चरित्रे लिहिणारे ग्रंथकार झाले. उद्धवचिद्घन, दासोदिगंबर आणि महीपतीबुवा ताहराबादकर हे प्रसिद्ध चरित्रकार होत. त्यातील महीपतीचे ग्रंथ हे सर्व महाराष्ट्रभर पसरले व गाजले. या लोकांनी देवादिकांची नाही, पण ज्ञानेश्वर, तुकाराम इ. साधुसंतांची चरित्रे लिहिली. ऐहिक पराक्रम करणाऱ्यांचे चरित्र त्यांनी एकही लिहिले नाही. 'भक्तविजय,' 'संत- लीलामृत', 'भक्तलीलामृत', व 'संतविजय' असे महीपतीचे चार चरित्रग्रंथ प्रसिद्ध आहेत. ते १७६२ ते १७७५ या काळात लिहिलेले आहेत. निजशांतिसुख, विवेक लाभावा, भक्तिमहिमा वाढावा, या हेतूने ही चरित्रे लिहिली, असे महीपती सांगतो.

चमत्कार प्रधान
 सध्या ज्याला आपण चरित्र म्हणतो तशी ही चरित्रे नाहीत. स्थलकालाचा निश्चय यांत नाही. तसा प्रयत्न, तशी कल्पनाही, या चरित्रकारांच्या मनात नाही. आख्यानकवी ज्याप्रमाणे स्वकालापासून अलिप्त, तसेच हे चरित्रकार अलिप्त होते. राजकीय, आर्थिक घडामोडी करणारा माणूस यांना चरित्र लिहिण्यास योग्य वाटत नाही. ते फक्त साधुसंतांची चरित्रे लिहितात. आणि त्यातही चमत्कारांना प्राधान्य असते. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यांचे तत्त्वज्ञान विवरून सांगावे असा यांचा हेतू नाही. भक्तांवर संकटे आली आणि देवाने चमत्कार करून किंवा त्यांनी स्वतः चमत्कार करून ती निवारली. हे वर्णन करून भक्तांचा व भक्तीचा महिमा वर्णावा, असा या चरित्रकारांचा हेतू आहे.
 भाषेला सौंदर्य आणावे, असा सुद्धा यांचा प्रयत्न नसतो. आवेश, त्वेष, ध्वनी, उपरोध, कल्पनाप्रचुरता असे काही भाषासौंदर्य या ग्रंथात नाही. अगदी साध्या भाषेत महीपतीने आपली सर्व चरित्रे लिहिली आहेत.
 महीपतीनंतर भीम स्वामी व राजाराम प्रासादी असे दोन चरित्रकार होऊन गेले. हे दोघेही समर्थ संप्रदायातले होते. यांनी समर्थांचे चरित्र लिहिले आहेच. पण पुढे महीपतीने सांगितलेली बरीच चरित्रे यांनी पुन्हा सांगितली आहेत.
 इतिहास या दृष्टीने या चरित्रग्रंथांना फारसे महत्त्व नाही. यात स्थलकालनिश्चय नाही. दैवी चमत्कार सर्व असल्यामुळे कार्यकारणचिकित्सा नाही. आणि याच कारणामुळे स्वकालाचे दर्शनही नाही.

शाहीर
 संत, आख्यानकवी आणि चरित्रकार यांहून शाहिरांचे काव्य अगदी वेगळे आहे. मुख्य म्हणजे ऐहिक जीवन, मराठ्यांचे पराक्रम हा त्यांचा विषय आहे. अफजलखानाचा वध, तान्हाजीचा पराक्रम, पानपतचा संग्राम, राक्षसभुवनची लढाई, नारायणरावाचा खून, तळेगावचा संग्राम, खर्ड्याची लढाई, खडकी, अष्टी या लढाया हे त्यांचे विषय लाहेत. लावण्यांमध्ये त्यांनी शृंगार वर्णिला तो मराठा स्त्रीपुरुषांचा शृंगार आहे. त्यांनी दुःखे वर्णिली ती मराठ्यांची आहेत. अशा रीतीने केवळ पारलौकिकात बुडून राहिलेली मराठी कविता त्यांनी इहलोकात आणली आणि म्हणूनच हीच खरी मराठी काव्याची प्रभात, असे कोणी म्हणतात.
 अगीनदास-(अफजलखानाचा वध), व तुळशीदास- (सिंहगड) हे दोन प्रारंभीचे शाहीर. पण ज्यांची नावे विशेष गाजली ते सर्व शाहीर उत्तर पेशवाईत होऊन गेले. परशुराम, होनाजी, अनंत फंदी, राम जोशी, प्रभाकर, सगनभाऊ हे सहा शाहीर इ. स. १७५४ ते १८४० या काळातले आहेत.

उत्तरकालीन
 परशुराम हा जातीने शिंपी होता. तरुण वयातच तमाशाचा धंदा याने सुरू केला व स्वतःच लावण्या रचून त्यात तो त्या म्हणू लागला. याची ध्रुवपदे ठाशीव असतात. 'सतीला नाही बत्ती, हत्ती आहे शिंदळीच्या धरी', अशी सुभाषिते तो सहज रचतो. मल्हारराव होळकर, फत्तेसिंग गायकवाड यांसारख्या सरदारांवर आणि मुंबईकर इंग्रजांवरही याने पोवाडा रचला आहे.

घनःशाम
 होनाजी बाळा हा आपल्या 'घनःशाम सुंदरा' या अमर भूपाळीने फार प्रसिद्ध आहे. हा जातीने गवळी होता. [ संतकवींमध्ये जसे सर्व जातीचे संत होते तसेच शाहिरांत सर्व जातींचे शाहीर होते. तसे नव्हते फक्त पंडित कवींत. कारण ती रचना संस्कृतप्रचुर होती, वृत्तबद्ध होती आणि संस्कृत विदग्ध महाकाव्य हा तिचा आदर्श होता. असो. ] सवाई माधवराव आणि खर्ड्याची लढाई हे याचे दोन पोवाडे फार प्रसिद्ध आहेत. लावण्यांना याने रागदारीच्या चाली लावल्यामुळे याला मोठी कीर्ती मिळाली. 'शंकरपार्वतीसंवाद', 'श्रीकृष्णतुला', 'दमयंती विलाप', 'द्रौपदी- वस्त्रहरण' या व इतर त्याच्या कवनातून सवतीमत्सर, कारुण्य, वात्सल्य, वीररस इ. सर्व भाव प्रगट होतात. 'नूतन वय दोघांचे', 'पति प्रवासामध्ये' 'हार नव्हता साहत' या शृंगारिक लावण्या अजोड आहेत. महादजी शिंदे रंग खेळले, त्यावरही त्याने एक पोवाडा रचला आहे.

राम जोशी
 राम जोशी वाला शाहिरांचा तुरा म्हणतात. लहानपणीच तो लावण्या रचून तमासगिरांना देऊ लागला. पुढे बयाबाई व चिमाबाई यांच्यासह त्याने स्वतःचाच तमाशा काढला. त्यात त्याने अमाप पैसा मिळवला आणि विलासी राहण्यात खर्चही केला. पुढे तो कीर्तनकारही झाला. मोरोपंतांच्या आर्या यानेच प्रथम कीर्तनात आणल्या. 'ब्राह्मणी राज्य जोरावर' या पोवाड्यात याने पुण्याच्या वैभवाचे वर्णन केले आहे. दुष्काळ, लूटमार अशा प्रसंगांवरही त्याने पोवाडे रचले आहेत. पण राम जोश्याची प्रसिद्धी त्याच्या शृंगारी लावण्यासाठी आहे. 'सुंदरा मनामध्ये भरली', 'कोण्या ग सुभगाची मंजरी', 'तुम्ही सजणा' या लावण्यांची गोडी अजूनही अवीट आहे.
 शाहिरांचा वेदांत, अध्यात्म यांशी तसा काही संबंध नाही. त्यांची वृत्ती अगदी निराळी होती. पण त्यांतील अनेकांनी त्या विषयांवर लावण्या रचल्या आहेत. त्यांना भेदिक लावण्या असे म्हणतात. 'दो दिवसांची तनु ही साची', 'नरजन्मामधि नरा करुनि घे', या राम जोश्याच्या वेदांतपर लावण्या त्या काळी मान्यता पावल्या होत्या. आपल्या शेजारच्या एका ढोंगी बुबावर, 'हटातटाने पटा रंगवुनि' ही त्याने रचलेली लावणी तर सर्वांच्याच तोंडी झाली होती.

प्रभाकर
 प्रभाकराचे नाव राम जोश्याइतकेच, आणि काहींच्या मते, त्यापेक्षाही मोठे आहे. हा गंगुहैबतीच्या प्रसिद्ध फडात असे. 'सवाई माधवराव- रंग', 'खर्ड्याची लढाई', 'दुसरा बाजीराव' हे त्याचे पोवाडे आहेत. 'मोहिनी जशी सुरसभेमधी', 'डुलत डुलत चाले', 'कंठ तुझा मंजूळ', 'नका जाउ दूर देशी' या त्याच्या लावण्या फार लोकप्रिय होत्या, 'धन्य वंश एकेक पुरुष कल्पवृक्ष पिकले', 'अपार दिधलिस संपत्ति सुख भोगायाला', 'यशस्वी झाले श्रीमंत पहिले लढायाला' या पोवाड्यांनी प्रभाकराचे नाव मराठ्यांच्या कायम ध्यानात राहिले आहे.

अनंत फंदी
 अनंत फंदी हाही राम जोश्याप्रमाणेच प्रारंभी तमासगीर आणि पुढे कीर्तनकार झाला. होनाजी बाळाने याला 'कवनाचा सागर' म्हटले आहे. पण त्याची कविता फार थोडी उपलब्ध आहे. त्याने जे उपदेशपर फटके रचले, त्यामुळे त्याला मोठी कीर्ती मिळाली. या कवनांतून त्याची तडफ आणि मार्मिकता दिसून येते.
 'खर्ड्याची लढाई', 'शेवटचे बाजीराव', 'यशवंतराव होळकर', 'फत्तेसिंग गायकवाड' हे त्याचे पोवाडे प्रसिद्ध आहेत. 'उलटा जमाना' ही त्याची दुष्काळावर रचलेली लावणी आहे. 'धन्य तुझे लावण्य', 'चंद्रावळ' या त्याच्या शृंगारी लावण्या आहेत.
 शेवटचा मोठा शाहीर म्हणजे सगनभाऊ (१७७८- १८४०) हा होय. हा मुसलमान असून त्याचा शिकलगारीचा धंदा होता. पानपत, खडकी, दुसरा बाजीराव यांवर याने पोवाडे रचले आहेत.
 या शाहिरी वाङ्मयाचे परीक्षण केले असता, अलंकार, कल्पना, रस, शब्दचित्रे, निसर्गवर्णने, उपहास, विनोद, निवेदनशैली इ. काव्याचे सर्व गुण त्यात ओतप्रोत भरलेले दिसतात. आणि शिवाय शाहिरांनी स्वकालीन ऐहिक जीवन वर्णिले, हा त्याचा आगळा वेगळा विशेष आहे. म्हणूनच मराठी साहित्यात त्यांना मोठे मानाचे स्थान. मिळाले आहे.

द्रष्टेकवी?
 पण हे सर्व सांगितल्यावर क्रांतदर्शी कवी, द्रष्टे कवी अशा दृष्टीने त्यांचे परीक्षण करू लागताच, त्यांच्यात फार उणिवा दिसू लागतात. मराठ्यांच्या इतिहासाचे विवेचन मागे आलेच आहे. त्यांपैकी जे प्रसंग त्यांनी निवडले त्यांची काही मीमांसा यांनी काव्यात केली आहे काय ? दुही, फितुरी, स्वार्थ, राष्ट्राभिमानाचा व कोणत्याही निष्ठेचा अभाव या कारणांनी आपला पराभव झाला, याची, यांपैकी कोणाला जाणीव तरी दिसते काय ? मुळीच नाही. असे विवेचन करण्याचे सामर्थ्यच त्याच्या ठायी नव्हते.
 हे पोवाडे केव्हा कोणी रचले हे पाहण्यातही मर्म आहे. एकंदर पोवाडे ३०० उपलब्ध आहेत. पैकी शिवाजी ते शाहू ७, पेशवे काल १५० आणि बाकीचे मराठेशाहीच्या अंतानंतरचे आहेत. हा काळ आणि ही संख्याच त्यांच्या कविप्रतिभेवर विदारक प्रकाश टाकतात. स्वातंत्र्ययुद्धप्रसंगी, जालीम कवने रचून, गिरिकंदरात फिरून, या कवींनी, औरंगजेबाशी निःस्वार्थीपणे, वतनलोभ न धरता लढावे, अशी स्फूर्ती दिली काय ? स्वकाल हा त्यांचा विषय होता. पण या काळावर एकही पोवाडा नाही. हिंदवी स्वराज्य, महाराष्ट्रराज्य, गनिमी कावा, आरमारी युद्ध, इंग्रजांची, पोर्तुगिजांची आक्रमक राजनीती, महाराष्ट्र धर्म, धर्म आणि स्वराज्य, अशा काही विषयांची चिकित्सा यांनी भावमय केली आहे काय ? या विषयांना त्यांनी स्पर्शसुद्धा केला नाही.
 थोरले बाजीराव, नानासाहेब, माधवराव, रघुनाथराव, महादजी, दत्ताजी, नाना फडणीस अशा पुरुषांची उत्तम व्यक्तिरेखा, त्यांच्या गुणावगुणासकट, त्यांच्या यशापयशासकट, कोणा शाहिराने रंगविली आहे काय ? एकही नाही.
 हे सर्व कवी मनाने पुराण काळातच होते. पाप, कलियुग हीच त्यांच्या मते पराभवाची कारणे होती. ते मोठ्या माणसांना अवतारी पुरुषच मानीत. आणि भक्तांच्या चरित्रांसारखीच त्यांची चरित्रे लिहीत. वास्तवाशी, कार्यकारणाशी त्यांचा काही संबंधच नव्हता. ती चिकित्सा करण्याचे बळ त्यांच्या मनाला मुळीच नव्हते.
 अगदी शेवटच्या दिवसांत तर जो कोणो पैसा देईल त्याच्या गौरवाची कवने शाहीर रचून देत असत. आणि अशा कवनांची संख्या जवळजवळ निम्मी आहे. तेव्हा द्रष्टा, क्रांतदर्शी असली विशेषणे कोणत्याही शाहीराला लाविता येणार नाहीत. मागे सांगितलेच आहे की मराठ्यांना सर्व भारतभर सुयंत्र साम्राज्यव्यवस्था स्थापण्याचे सामर्थ्य नव्हते. अशा वेळी खरा कालवेत्ता एखादा शाहीर उदयास आला असता, (इंग्रज, पोर्तुगीज, मुसलमान यांना जाणणारा, स्वकीयांना त्यांच्या सामर्थ्यांचे रहस्य उलगडून सांगणारा) आणि राष्ट्रीय भावनेचे, हिंदुपदपातशाहीचे तत्त्वज्ञान सर्वत्र विवरून सांगण्याचे कार्य त्याने केले असते, तर त्याला द्रष्टा कवी म्हणता आले असते. दुर्दैवाने तसा शाहीर येथे कोणी झाला नाही. तसे महाकाव्य रचण्याचे सामर्थ्यच मराठी मनाला त्या काळी नव्हते.
 आख्यानकाव्य, चरित्र व लावण्या, पोवाडे यांचे विवेचन झाले. आता बखर या गद्य साहित्याचा विचार करावयाचा.

बखर वाङ्मय
 शिवपूर्व काळात महिकावतीची बखर व राक्षसतागडीची बखर अशा दोन बखरी झाल्या. त्यांत विविध प्रकार आहेत. ९६ कलमी बखर, सभासदांची बखर, सप्त प्रकरणात्मक चरित्र ही शिवछत्रपतींची चरित्रे आहेत. पेशव्यांची बखर, मराठेशाहीची बखर, मराठी साम्राज्याची छोटी बखर हे समग्र वृत्तांत आहेत. हरिवंशाची बखर, होळकरांची कैफियत अशा काही कुळांच्या बखरी आहेत. पानपतची बखर, खर्ड्याची लढाई अशी काही विशिष्ट लढायांची वर्णने आहेत.
 ९६ कलमी बखर हे पुण्यश्लोक राजा (शिवाजी) याचे चरित्र आहे. दत्ताजीपंत वाकेनवीस याजपाशी तपशिलवार यादी लिहिली होती. तीपासून खंडो आबाजी मलकरे यांनी नक्कल करून घेतली. दुसरी बखर म्हणजे सभासदाची. कृष्णाजी अनंत सभासद याने ही इ. स. १८९४ साली राजाराम महाराजांचे सांगण्यावरून लिहिली. लेखकाने सर्व घडामोडी प्रत्यक्ष पाहिल्या असल्यामुळे ही बखर विश्वसनीय समजतात. 'शिवछत्रपतींचे सप्त प्रकरणात्मक चरित्र' ही महाराजांच्या चरित्रावरची तिसरी महत्त्वाची बखर होय. लेखकाची शैली उत्तम आहे. पण महाराज गेल्यानंतर शंभर- सवाशे वर्षांनी ही लिहिली असल्यामुळे अनेक ठिकाणी विपर्यास झाला आहे. यानंतर महत्त्वाची बखर म्हणजे भाऊसाहेबांची बखर ही होय. कृष्णाजी शामराव या दिल्लीच्या एका गृहस्थाने ही लिहिली असून, कुंभेरीच्या वेढ्यापासून नानासाहेब पेशव्याच्या अंतापर्यंत हकीकत या बखरीत आहे. ही बखर सर्वात जास्त विश्वसनीय असून लेखकाची वर्णनशैली फार उत्कृष्ट म्हणून नावाजलेली आहे. मराठी साम्राज्याची छोटी बखर ही १८१७ साली लिहिलेली आहे. भोसल्यांचा मूळ पुरुष बाबाजीपासून प्रतापसिंहाअखेरपर्यंतची हकीकत हीत आहे. पेशव्यांची बखर ही कृष्णाजी विनायक सोहोनी यांनी लिहिली असून तीत पेशव्यांच्या कुळाचा सर्व वृत्तांत आला आहे.

इतिहास नव्हे
 या सर्व बखरींचे मराठ्यांच्या दृष्टीने फार महत्त्व असले तरी, या बखरी म्हणजे इतिहास नव्हेत, हे ध्यानात ठेविले पाहिजे. हे सर्व लेखन पुराणांच्या धर्तीवर लिहिलेले आहे. इतिहासकाराची वस्तुनिष्ठ दृष्टी, सत्याची चिकित्सा, कार्यकारणमीमांसा यांपैकी यात काही नाही. स्थलकालनिश्रयाचा प्रयत्न नाही. कालविपर्यास भरपूर आहे आणि थोर व्यक्तींना अवतार मानण्याची पुराणवृत्ती लेखकांच्या ठायी आहे. मात्र साहित्य म्हणून त्यांना खूपच महत्त्व आहे. भाषेचा थाट, वर्णनशैली, संभाषणातील ऐट, व्यक्तिदर्शनाची हातोटी, निवेदनाची बहार, आणि विशेष म्हणजे शब्दाशब्दांतून व्यक्त होणारा स्वाभिमान ! यामुळे ऐतिहासिक काळ व त्या वेळचे वीर पुरुषांचे पराक्रम हे डोळ्यांसमोर उभे राहतात.
 बखरीखेरीज नाना फडणिसाचे आत्मचरित्र, नारायण-व्यवहार-शिक्षा, फादर स्टीफन्स याने लिहिलेली ख्रिस्त पुराणाची प्रस्तावना, अमात्यांची राजनीती, पंचतंत्राचे मराठी भाषांतर असे काही गद्य लेखन या काळात झालेले आहे. यांतील 'राजनीती' किंवा 'आज्ञापत्र' याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण राजनीतीचे विवेचन करणारा मराठीतला तो एकुलता एक ग्रंथ आहे. त्याचा परिचय मागे येऊन गेलाच आहे. नाना फडणिसांच्या आत्मचरित्राची अशीच महती आहे. कारण तशी परंपराही मराठीत नव्हती. पानपतनंतर स्वतःवर ओढवलेल्या प्रसंगाचे वर्णन नानाने फार उत्कृष्ट केले आहे आणि जाता जाता जगाच्या रीतीचे वर्णनही केले आहे. 'नारायण- व्यवहार- शिक्षा' हा ग्रंथ बाल सवाई माधवराव याच्या शिक्षणासाठी लिहिलेला आहे. गोव्यातील ख्रिश्चन मिशनरी फादर स्टीफन्स याने 'ख्रिस्त पुराण' हा पद्य ग्रंथ लिहिला. पण त्याची प्रस्तावना गद्यात आहे. त्यात अर्थातच ख्रिश्चन धर्माची महती सांगितलेली आहे.
 मराठी गद्याचा पसारा हा एवढाच आहे. (महानुभावीय गद्याचे वर्णन मागे आलेच आहे.) त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बखरी. त्यांना ऐतिहासिक दृष्टीने फारसे महत्त्व नसले तरी साहित्याच्या दृष्टीने निःसंशय आहे. बखरीतले काही काही भाग अगदी काव्यमय आहेत, आणि मराठी राज्याचा अभिमान हा त्यात रस असल्यामुळे बखरींना आगळे महत्त्व आहे.

कलासौन्दर्य
 मराठी काळातील साहित्यसौंदर्याचा विचार येथवर केला. आता कलासौंदर्याचा विचार करावयाचा. साहित्य- संगीत- कला ज्याला नाही तो पशु होय, असे एक सुभाषित आहे. यावरून मानवी संस्कृतीत कलेला काय स्थान आहे, हे ध्यानात येईल. मनुष्याचे ते प्रधान लक्षणच येथे मानलेले आहे.
 संगीत, नृत्य, नाट्य, चित्र आणि शिल्प या पाच प्रमुख कला होत. या कलांचा विचार केला तर असे दिसेल की मानवाच्या जन्मापासून, त्याच्या वन्य अवस्थेच्या कालापासून, या कला, प्राथमिक, बोजड स्वरूपात का होईना, त्याच्या जीवनाशी निगडित आहेत. जंगली माणसांनीही गुहांमधून काही चित्रे रेखलेली आज आढळतात. भिल्ल, कातकरी, ठाकूर इ. आदिवासी लोकही नृत्य करताना व काही गाणी गाताना दिसतात. इतर कलांचे असेच काही अवशेष प्राचीन उत्खननात आढळून येतात. तात्पर्य असे की मानवाला उपजतच कलेची आवड आहे.

निकष
 पण आपल्यासमोर वरील कलांची नावे घेताना या स्वरूपातल्या कला नाहीत. खरी कला म्हणजे नवनिर्मिती, आत्माविष्कार आणि साभिप्रायता या गुणांनी संपन्न असली पाहिजे. के. ना. काळे, रोहिणी भाटे या कलाकोविदांनी कलेची ही लक्षणे सांगितली आहेत. आदिवासींची नृत्ये ही खरी कला नव्हे, असे सांगताना त्यात वैयक्तिक आत्माविष्कार नसतो, ती ठरीव, साचेबंद असतात, असे रोहिणी भाटे यांनी म्हटले आहे. (महाराष्ट्र जीवन खंड २ रा, पृ. ३७०-७१)

संगीत
 या दृष्टीने पाहिले तर महाराष्ट्रात संगीतकलेचा काहीसा विस्तार मराठा काळी झाला होता, इतकेच फार तर म्हणता येईल. संगीतावर आज जो सर्वमान्य ग्रंथ आहे तो म्हणजे 'संगीत रत्नाकर' हा होय. सिंघण यादवाच्या कारकीर्दीत शार्ङ्गदेव नावाच्या संगीतज्ञाने तो लिहिला. दक्षिणी व उत्तरी दोन्ही संगीतकला त्यालाच प्रमाण मानतात. त्याचाच समकालीन पार्श्वदेव याने 'संगीत समयसार' हा ग्रंथ लिहिला. हे दोन्ही ग्रंथ संस्कृत आहेत. पण यात अनेक मराठी संज्ञा आल्या असून मराठी पद्यांची उदाहरणेही दिली आहेत. रामदेवरावाच्या पदरी गोपालनायक नावाचा संगीतज्ञ होता. अल्लाउद्दिन खिलजीने यादवाचा पराभव केल्यावर त्याला सक्तीने दिल्लीस नेले आणि तेथे त्याने आणि अमीरखुश्रू याने आजची भारतीय संगीतपद्धती उदयास आणली. खुश्रू ती गोपाल नायकापासूनच शिकला आणि मग त्यानंतर तिचा उत्तर हिंदुस्थानात प्रसार झाला. आज आपण उत्तर हिंदुस्थानातून ती कला आली, असे म्हणतो. पण ती मूळची महाराष्ट्रीय आहे. पुढे स्वातंत्र्य नष्ट झाल्यावर येथे तिचा व्हावा तसा विकास झाला नाही हे निराळे.
 महानुभाव पंडित दामोदर याची हिंदी भाषेतील रागतालबद्ध अशी काही पदे सध्या उपलब्ध झाली आहेत. त्यावरून दामोदर पंडित मोठा संगीततज्ज्ञ होता असे दिसते. पुढे नाव घेण्याजोगा संगीततज्ज्ञ म्हणजे मागे उल्लेखिलेला दासोपंत हा होय. (१५५१- १६१६) त्याच्या सवालक्ष पदांपैकी सोळाशे पदे राग-तालांत बद्ध असून त्यांत सुमारे पंचेचाळीस राग आले आहेत. रामदास तर 'धन्य ते गायनी कळा' असे म्हणत असत. समर्थांचा जो पदसंग्रह प्रसिद्ध आहे त्यात प्रत्येक पदास राग व ताल सांगितलेले आहेत. समर्थांचा शिष्यसंप्रदाय दक्षिणेत होता. त्यामुळे तिकडील हरिदासी गायकीवरही याचा प्रभाव पडलेला आहे. इब्राहिम आदिलशहा (२ रा) (१५८०- १६२७) हा कवी असून अनेक भाषाभिज्ञ होता. मराठी त्याला उत्तम येत असे. त्याने स्वतः निरनिराळ्या रागांत व तालांत धृपदे बांधली असून त्यांतील पहिली रचना गणपतीवर असून दुसरी सरस्वतीवर आहे. हा शिवपूर्व कालचा इतिहास झाला.

सामान्य
 शिवकालानंतर पेशव्यांच्या वेळी दरबारी उत्सव, तमाशा, कीर्तने यातून संगीताचा प्रसार झाला. शाहू महाराजांनी उत्तरेतून काही पोरी आणून त्यांना नर्तकी व गायिका करण्याचा प्रयत्न केला होता. पण तो सफल झाला नाही. पेशव्यांच्या दरबारात गणेशोत्सवात गवयांचे गायन होत असे. रघुनाथराव व बाजीराव पेशवे यांच्या पदरीही गवई असत. पण पुष्कळ वेळा मोठे गवई परप्रांतातून बोलाविलेले आढळतात. या सर्वांवरून एक गोष्ट दिसते की आज पलुसकर, वझे, भातखंडे अशांनी जो शास्त्रोक्त अभ्यास करून गायनकलेचा विकास केला आहे, तसा यादवांच्या विनाशानंतर मराठा कालात झाला नाही. गायनवादन याची हौस मराठा राज्यकर्त्यांना व सरदारांना होती. पण येथे कोणी असामान्य गवई उदयास आला, असे दिसून येत नाही. 'पेशवेकालीन महाराष्ट्र' या ग्रंथात वा. कृ. भावे यांनी मोठ्या कसोशीने माहिती जमा करून, 'गायन, वादन व नर्तन' या दहाव्या प्रकरणात ती दिली आहे. तीवरून हे अगदी स्पष्ट होते. त्यांनी काही कलावंत व कलावंतिणी यांची नावे दिली आहेत. पण ही सर्व मध्यम- अगदी प्राथमिक नव्हे- स्वरूपाची कला, एवढेच त्यांच्या कलेचे रूप दिसते. प्रारंभी दिलेल्या व्याख्येप्रमाणे श्रेष्ठ कला येथे अवतरली नव्हती, असेच म्हणावे लागते.

नृत्य !
 नृत्यकलेबाबत असेच आहे. जानपद रूपात ही कला येथे होतीच. पण तीत वैयक्तिक आत्माविष्कार नसल्याने तिला कला म्हणता येत नाही. लेजीम, भलरी किंवा मुलींचे घुमा, आगोटा हे खेळ, यांत काही प्रमाणात सामुदायिक भावाविष्कार होत असल्याने, त्या प्रकाराच्या नृत्यांना, रोहिणी भाटे यांच्या मते, जरा वरचा दर्जा आहे. हे अगदी खेळ या प्रकारात गणता येणार नाहीत. तमाशात होणारे, लावणी गाताना होणारे नृत्य हे यापेक्षा आणखी वरच्या दर्जाचे. ते लयबद्ध, नियमबद्ध व काहीसे तंत्रबद्धही असते. काही ठराविक पद्धतीचा नैसर्गिक मुद्राभियनही या पद्धतीत आढळतो. तेव्हा हे नृत्यकलेच्या वाटेवरचे पुढचे पाऊल असे म्हणण्यास हरकत नाही.
 पण पारतंत्र्यामुळे म्हणा किंवा अन्य कारणामुळे म्हणा महाराष्ट्रात नृत्यकलेचा विकास या पायरीच्यावर झाला नाही. भरतनाट्य, मणिपुरी, कथाकली आणि कथक या नृत्यपद्धतींचे नाव सुद्धा परवा-परवापर्यंत महाराष्ट्रात आले नव्हते. या सर्व पद्धतींचा अभ्यास महाराष्ट्रात गेल्या तीस चाळीस वर्षातला आहे. मराठा कालात महाराष्ट्राने त्याची अशी नृत्यपद्धती विकसित केली नाही.

जगाच्या दृष्टीतून
 चित्र, मूर्ती, शिल्प या कलांत मराठा कालात महाराष्ट्र मागासलेलाच राहिला. स्वराज्याचे रूपांतर साम्राज्यात होऊ लागले, तसा येथील सरदार लोकांच्या हाती पैसा खेळू लागला. त्यातून त्यांनी आपापल्या गावी देवळे बांधली, वाडे बांधले, बागा तयार केल्या, तळी बांधून पाण्याची सोयही केली. पेशव्यांना वास्तू, चित्र, मूर्ती यांविषयी चांगली रसिकता होती. त्यांनी बांधलेल्या देवळांत व वाड्यांत उत्तम मूर्ती बसविल्या आणि भिंतींवर चित्रेही काढून घेतली. पण हे सर्व कारागिरी या सदरात येईल. वेरूळ, अजिंठा, घारापुरी ही महाराष्ट्रातलीच शिल्प आणि चित्रकला. पण वेरूळ- अजिंठ्याची इंग्रज येथे येईपर्यंत मराठ्यांना माहितीही नव्हती. मदुरा, कांची, विदिशा, कोणार्क येथील कला त्यांनी पाहिली होती. पण त्या दर्जाची कलाकार मंडळी मराठा कालात महाराष्ट्रात झाली नाहीत. पेशव्यांनी इंग्रज चित्रकार वेल्स याला नेमून एक चित्रकलेची शाळाही स्थापन केली होती आणि त्याच्याकडून व इतर इंग्रज चित्रकारांकडून नाना, महादजी, सवाई माधवरावाचा दरबार अशी चित्रेही काढून घेतली होती. पेशवे आणि त्यांचे सरदार हे चित्रसंग्रहही जवळ ठेवीत. नाना फडणिसाने पदरी चितारीही बाळगले होते. शिवाय विणकर, कुंभार, पाथरवट यांना ते उत्तेजनही देत. पण हा सगळा इतिहास पाहिल्यावर शेवटी निर्णय असाच होतो की दक्षिणेत, किंवा उत्तरेत किंवा पूर्वी महाराष्ट्रातच जी वास्तुकला, चित्रकला, मूर्तिकला होती, तशी मराठाकालात महाराष्ट्रात उदयास आली नाही. आजही विचार केला तरी असे दिसेल की कोणीही प्रवासी मराठाकालातली कला पाहण्यास महाराष्ट्रात येत नाही. कोणार्क, खजुराहो, वेरूळ, अजंठा, ताजमहाल, गोल घुमट यांसारखी कीर्ती मराठा कालात कोणत्याही कलाकृतीला मिळाली नाही.
 राहता राहिली नाट्यकला. तिच्याविषयी काही लिहिण्याची गरजच नाही. भारुडे, तमाशा, लळिते, दशावतारी खेळ यापलीकडे येथली नाट्यकला त्या काळात कधी गेलीच नाही. शाकुंतल, मृच्छकटिक, उत्तर-रामचरित्र किंवा हॅम्लेट, ऑथेल्लो, डॉल्स हौस अशा दर्जाचे एकही नाटक मराठीत त्या काळी लिहिले गेले नाही. तमाशा, लळिते हे नाटयाचेच प्रकार होत. पण ते अगदी प्राथमिक रूपाचे. त्यांना कला म्हणणे कठीण आहे. बांधीव कथानक, सुंदर व्यक्तिरेखा, विकसत जाणारा समरप्रसंग, असले त्यात काही नाही. आदिवासींची जशी नृत्ये तशीच ही नाट्यकला. फार तर एखादे पाऊल पुढे, इतकेच.
 मराठी साहित्य व कला याचा संसार हा असा आहे. यावरून असे दिसते की जे राजकीय पराक्रमाच्या बाबतीत, तेच कलेच्या बाबतीत घडले. मराठ्यांनी पराक्रम केला, मोठा पराक्रम केला. पण त्यामागे धर्म, राजकारण, समाजरचना, अर्थव्यवस्था किंवा एकंदर जीवन याविषयी तत्त्वदृष्टी अशी कोणतीच नव्हती. बाहुबलाने ते पराक्रम करीत गेले एवढेच. तेच साहित्याच्या आणि कलेच्या बाबतीत झाले. या दोन्ही कार्याच्या मागे तत्त्वदृष्टी काहीच नव्हती. काल जाणण्याची शक्ती जशी राजकीय वीर पुरुषांत नव्हती, तशीच ती कलाकारांतही नव्हती. त्यामुळे जगाच्या दृष्टीने पाहता जपान, इंग्लंड, रशिया यांसारखे अलौकिकत्व मराठ्यांना लाभले नाही.