प्रस्तावना






 ' माझे चिंतन ' या माझ्या निबंध संग्रहाची ही दुसरी आवृत्ती आहे. पहिली आवृत्ती १९५५ साली प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर आता अनेक वर्षांनी माझे मित्र कॉन्टिनेंटल प्रकाशनचे चालक श्री. अनंतराव कुलकर्णी ही दुसरी आवृत्ती प्रकाशित करीत आहेत.
 पहिल्या आवृत्तीतले काही निबंध गाळून त्यांच्या ऐवजी १९५५ नंतर लिहिलेले काही इतर निबंध या दुसऱ्या आवृत्तीत समाविष्ट केले आहेत. या निबंधांत काही जास्त महत्त्वाच्या समस्यांचा विचार केला आहे. जे निबंध काढून टाकले त्यातील विषयांपेक्षा हे विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे वाटल्यामुळे हा बदल केला आहे.
 आपल्या समाजाचे अवलोकन व अभ्यास करताना त्यातील अनेक उणीवा ध्यानात येतात. अशा काही उणीवा, समाजाला, विद्यार्थ्यांना विचारवंतांना दाखवाव्या, त्यांचे मूळ कारण शोधावे, उपायचिंतन करावे आणि त्यांविषयी सर्वांगीण अभ्यास करून मग त्या विषयांवर लेख लिहावा अशी पद्धत साधारणतः मी अनेक वर्षे अवलंबिलेली आहे. 'माझे चिंतन' हा बव्हंशी अशा लेखांचा संग्रह आहे.
 ऐहिक जीवनातील राजकारण, समाजरचना, अर्थव्यवस्था, विज्ञान- संशोधन इ. क्षेत्रांतील विषय घेऊन त्यांचा शास्त्रीय पद्धतीने सांगोपांग अभ्यास करून त्यांवर मोठे ग्रंथ लिहावे ही प्रथा भारतात फारशी नाही. काही अपवाद सोडल्यास प्राचीन काळीही नव्हती. ब्रिटिशांच्या पूर्वीच्या हजार वर्षांच्या काळात तर ती अपवादालाही नव्हती. गेल्या शंभर वर्षात भारतात ग्रंथलेखन होऊ लागले आहे. पण ज्या मानाने समाजाला गरज आहे त्या मानाने ते फार अपुरे आहे. ही आपल्या समाजातील उणीव ' सरस्वतीची हेळसांड ' व ' ग्रंथसत्ता ' या दोन लेखांत मी मांडली आहे. पहिल्या लेखात ब्रिटिशपूर्व काळात वरील विषयांवर ग्रंथ न लिहिले गेल्यामुळे केवढी हानी झाली आहे ते सांगितले आहे. दुसऱ्या लेखात समाजावर प्रत्यक्षात राजा, दण्डशहा किंवा लोकसभा यांची सत्ता असली तरी खरी सत्ता ग्रंथांचीच असते हा सिद्धान्त विशद केला असून गेल्या शंभर वर्षांत कोणत्या ग्रंथांनी कशी सत्ता महाराष्ट्रावर व भारतावर प्रस्थापित केली आहे ते मराठी साहित्याचा मागोवा घेऊन सांगितले आहे. ग्रंथ हे समाजपरिवर्तनाचे मोठे साधन असल्यामुळे तरुण कार्यकर्त्यांनी ते साधन हस्तगत करून घ्यावे हे सांगण्याचा यात हेतू आहे.
 अध्यात्मज्ञान, भक्ती, नीती, समाजरक्षण, संवर्धन हा धर्माचा खरा गाभा होय. पण तो दुर्लक्षून टिळेटोपीमाळा हे जे कर्मकांड त्यालाच आपण खरा धर्म मानतो. साधुसंतांनी या कर्मकांडावर टीका करून भक्तीचे माहात्म्य वर्णिले हे खरे; पण तरीही भारतीय जीवनात कर्मकांडाचेच महत्त्व जास्त मानले गेले आणि मानले जात आहे. आपण 'नरोटीची उपासना' करतो याचा हा अर्थ आहे. या निबंधात धार्मिक दृष्टीने प्रथम याचा विचार करून नंतर सध्या शिक्षण, नियोजन या सर्वच क्षेत्रांत आपला कारभार कर्मकांडात्मक कसा झाला आहे ते त्या त्या क्षेत्रांतील उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. एकापरीने हा विषय जुनाच आहे. पण आजच्या काळांच्या संदर्भात व आजच्या जीवनातील उदाहरणे देऊन तो मांडलेला असल्यामुळे मानवी मनाच्या त्या दोषांमुळे सध्या आपल्या प्रगतीला कशी खीळ बसत आहे ते ध्यानात येईल.
 'भारतीय जीवनातील क्रिकेट व हॉकी' या निबंधाच्या नावावरून विषयाची काही कल्पना येणार नाही. हे दोन खेळ आपल्या जीवनाची दोन प्रतीके म्हणून घेऊन, संघटित जीवन, सामूहिक कार्यशक्ती यांचा आपल्या समाजातील अभाव या आपल्या महान दोषाचे विवेचन या लेखात केले आहे. व्यक्ती, व्यक्ती या दृष्टीने पाहता जगातील थोर पुरुषांच्या तुलनेला येतील असे अनेक पुरुष ही भूमी निर्माण करू शकते. पण हे थोर पुरुष संघटित कार्य करू शकत नाहीत. यामुळे आपली सर्व गुणसंपदा वाया जात आहे, असा या निबंधाचा भावार्थ आहे. क्रिकेटमध्ये विक्रमी वीर आपल्याकडे आहेत पण संघभावना नाही. म्हणून जगात कोणत्याच कसोटी सामन्यात आपल्याला जय मिळत नाही. उलट संघभावना प्रबळ असल्यामुळे, हॉकीमध्ये आपण अजिंक्य ठरतो. असा तेव्हा इतिहास दिसत असल्यामुळे हे दोन खेळ प्रतीक म्हणून मी निवडले होते.
 हा लेख १९५३ साली लिहिला आहे. त्यानंतरच्या पंधरा एक वर्षांत जरा उलटापालट झाली आहे असे दिसते. १९६४ सालानंतर हॉकीमधले आपले अजिंक्यपद गेले आणि क्रिकेटमध्ये इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाशी सामना देऊन १९६२ साली आपण भारतात झालेल्या कसोटी सामन्यात अजिंक्यपद मिळविले. न्यूझीलंड संघाविरुद्धही आपण दोन- तीनदा अजिंक्यपद मिळविले आहे. तज्ज्ञांच्या मते हे विजय संघभावनेचे आहेत. तेव्हा मनात येते की हीच भावना आणखी प्रबळ झाली तर वेस्ट इंडीज, आस्ट्रेलिया, इंग्लंड या देशांत जाऊन तेथील कसोटी सामन्यातही आपण अजिंक्यपद मिळविण्याचा संभव आहे. या संग्रहाची दुसरी आवृत्ती १९७० साली प्रसिद्ध झाली. आता ही तिसरी आवृत्ती १९७३ साली प्रसिद्ध होत आहे. त्या दरम्यान असे प्रत्यक्ष घडलेच आहे. १९७१ साली इंग्लंडमध्ये व १९७२ साली भारतात आपण इंग्लिश क्रिकेट संघावर विजय मिळविला आहे. आणि क्रिकेट हा खेळ खरोखरच आपल्या जीवनाचे प्रतिबिंब दाखवीत असला तर जीवनाच्या इतर क्षेत्रांतही आपण सामूहिक कार्य करण्याची विद्या हस्तगत करण्यातही कदाचित यशस्वी होऊ !
 ' समृद्धीचा शाप ' ही व्यथा अतिशय दुःखदायी आहे. जगात आज अनेक देशांत बहुसंख्य लोकांना पुरेसे अन्नवस्त्रही मिळत नाही. अतिशय भीषण दारिद्रयात निम्म्या पाऊण जगाला राहावे लागते. या दारिद्र्यामुळे मनुष्य साहजिकच गुन्हेगारीस प्रवृत्त होतो. अशा स्थितीत विज्ञानामुळे, नवीन उत्पादनसाधनांमुळे, यंत्रविद्येमुळे सर्वांना पुरेसे अन्न, वस्त्र, घर, शिक्षण, आरोग्य हे देता आले की समाज सुखी होईल, गुन्हेगारी नष्ट होईल व मानवसमाज संस्कृतीच्या वरच्या पायरीवर जाईल असे समाजशास्त्रवेत्ते म्हणत असत. पण प्रत्यक्षात झाले आहे ते अगदी उलटेच. पाश्चात्त्य देशांत आणि विशेषतः अमेरिकेत सर्व प्रकारची समृद्धी आली आहे. आपल्या तुलनेने पाहता तेथे नंदनवनच आहे. पण आश्चर्याची व खेदाची गोष्ट अशी की तेथे गुन्हेगारी, अनाचार, स्वैराचार, गुंडगिरी मवालीपणा, पेंढारशाही यांना खळ तर पडत नाहीच, तर उलट समृद्धीच्या प्रमाणात हे सामाजिक रोगही वाढतच आहेत. ' समृद्धीचा शाप ' या निबंधात याची कारणमीमांसा केली आहे.
 ' विश्वाविरुद्ध ', ' आमची फौजदारनिष्ठा ' व ' चौथ्या दशांशाची दक्षता ' या निबंधांत भारतीयांच्या अंगच्या तीन फार मोठ्या वैगुण्यांचा विचार केला आहे.
 प्रत्येक समाजात धार्मिक, सामाजिक संस्था, रूढी, नियम यांना कालांतराने जडपणा येतो. त्यांची उपयुक्तता नाहीशी होते. व त्यांत परिवर्तन होणे अवश्य असते. पण अशा संस्थांवर समाजाचे फार प्रेम असते, श्रद्धा असते. त्यामुळे त्या बदलण्यास तो तयार होत नाही. अशा वेळी कोणीतरी समाजसुधारकाने धैर्याने परिवर्तनाचे, क्रांतीचे तत्त्वज्ञान सांगणे व त्यांचा आचार करणे अवश्य असते. समाज अर्थातच अशा समाजसुधारकावर अत्यंत संतापतो, त्याला धर्मद्रोही, समाजद्रोही ठरवून जबर शिक्षा करतो, पुष्कळ वेळा मृत्युदंडही देतो. तरीही सर्व समाजाविरुद्ध जाऊन, देहदंडाची भीती न बाळगता, धैर्याने समाजाला नवे तत्त्व, नवे विचार सांगणे अवश्य असते. नाहीतर कालबाह्य झालेल्या संस्था, घातक रूढी यामुळे समाजाचा ऱ्हास होतो. पण अशा प्रकारे सर्व समाजाविरुद्ध केवळ तत्त्वासाठी एकट्याने उभे राहण्याचे, प्रसंगी त्यासाठी आत्मबलिदान करण्याचे धैर्य अंगी असणारे पुरुष भारताच्या दीर्घ इतिहासात केव्हाच झाले नाहीत. युरोपात सॉक्रेटीस हा तसा पहिला धीर पुरुष झाला आणि पुढे रॉजर वेकन, वायक्लिफ, जॉन हस, मार्टिन लूथर असे अनेक धीर पुरुष पश्चिमेला लाभले आणि त्यांनी मोठी परंपराच निर्माण केली. हिंदुस्थानात आगरकर हे असे समाजसुधारक होते. पूर्वी अनेक शतके तसा पुरुष येथे कोणीच निर्माण न झाल्यामुळे हा समाज अधोगतीला गेला होता. पाश्चात्य विद्येच्या प्रसारानंतर हे विश्वाविरुद्ध एकाकी उभे राहण्याचे धैर्य या भूमीत हळूहळू निर्माण होऊ लागले. या धैर्याची जोपासना करण्यावरच समाजाची प्रगती अवलंबून आहे.
 लोकसत्ताक राज्यपद्धतीला हा गुण व पुढील दोन निबंधांत सांगितलेले गुण अत्यंत अवश्य आहेत.
 स्वतःचे कायदे स्वतः करणे हे स्वातंत्र्य आणि अनियंत्रित सत्तेने, राजाने किंवा परकीय आक्रमकांनी आपल्यासाठी कायदे करणे हे पारतंत्र्य. पण स्वातंत्र्याकांक्षी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या समाजाने केलेले कायदे स्वतःहून, खुषीने, निष्ठेने पाळले तरच लोकसत्ता जगू शकते. आपल्या समाजात ही वृत्ती अजून निर्माणच होत नाही. आपण कायदा पाळतो तो पोलिसाच्या भीतीने, तुरुंगाच्या धाकाने. तो नसेल तर आपण कायदा पाळीत नाही, इतकेच नव्हे तर तो न पाळण्यात भूषण मानतो. याचाच अर्थ असा की आपण फौजदारनिष्ठ लोक आहो. ' आमची फौजदारनिष्ठा ' या निबंधात आपल्या या घातक प्रवृत्तीचे विवेचन केले आहे.
 ब्रिटिशपूर्व काळात हजार दीड हजार वर्षे या भूमीत विज्ञानसंशोधन लुप्तच झाले होते. इंग्रजी राज्य झाल्यापासून ते पुन्हा सुरू झाले आणि गेल्या शंभर-दीडशे वर्षांत या देशात विज्ञानाचा प्रसारही पुष्कळ झाला आहे. पण येथे अजून वैज्ञानिक मनोवृत्ती फार थोडी दिसून येते. रेखीवपणा, काटेकोरी, सूक्ष्म अभ्यास, कातीव हिशेब, अणुपरमाणूंच्या गणनेचीही दक्षता हे गुण विज्ञानाने येतात. त्यांचा अभाव हे फार मोठे वैगुण्य आपल्या समाजात आहे. फ्रान्स व जर्मनी यांच्यातील एका युद्धाच्या आधारे प्रथम या विद्यानिष्ठेची महती सांगून मग भारतातील तिच्या अभावाच्या कारणांची मीमांसा ' चौथ्या दशांशाची दक्षता ' या लेखात केली आहे.
 ' भगवान श्रीकृष्ण ' हा जरा निराळ्या प्रकारचा निबंध आहे. त्यात आपल्या समाजातील वैगुण्याचा विचार नाही. श्रीकृष्णचरित्राचे रहस्य त्यात सांगितलेले आहे. श्रीकृष्ण हा हिंदुस्थानात परमेश्वराचा अवतार गणला जातो. त्याच्या गोकुळच्या लीला आणि त्याची गीता एवढ्याचाच सामान्यतः भारतीयांना परिचय असतो. पण महाभारतात याहून फार निराळे असे त्याचे चरित्र दिसून येते. तो एक असामान्य, अलौकिक, अद्वितीय पण मानवी पुरुष होता असेच त्याचे रूप महाभारतावरून दिसते. त्या रूपाचे वर्णन या निबंधात केले आहे. विश्वरूपदर्शनापेक्षा मला ते जास्त प्रिय आहे.
 ' युद्ध अटळ आहे काय ? ' –ही काहीशी तात्त्विक चर्चा आहे, असे वाटेल. काही अंशी ती तशी आहेही. पण सर्वस्वी नाही; कारण कॉमन मार्केटच्या उदाहरणांवरून अगदी अंधुक का होईना पण तशी आशा करण्यास जागा आहे असे वाटते. आणि आपल्या विकासासाठी चिरकालीन शांततेची अपेक्षा धरणाऱ्या भारताने तर त्या अंधुक आशेच्या बळावर सतत प्रयत्नशील राहणेच हितावह होईल. असे असल्यामुळेच आणि सर्व जगापुढची ती अत्यंत जटिल समस्या असल्यामुळे त्या निबंधाचा या संग्रहात समावेश केला आहे.
 ' माझे चिंतन ' या माझ्या पुस्तकाची प्रथमावृत्ती प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक वाचकांची मला पत्रे आली. आपल्या समाजाच्या अगदी जिवाला लागलेल्या अशा या समस्या आहेत असे त्यांचेही मत दिसले.
 अशा समस्यांचे विवेचन करणाऱ्या या निबंधांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी व तरुणांनी भावी जीवनाच्या दृष्टीने करावा. या अभ्यासामुळे त्यांच्या विचारांना काही निश्चित दिशा लागेल अशी आशा मी करतो.

पु. ग. सहस्रबुद्धे