माझे चिंतन/भगवान श्रीकृष्ण
कौस्तुभ
महाभारताची थोरवी आज त्रिखंडातल्या विद्ववरांना व रसिकांना मान्य झालेली आहे. प्राक्कालीन भारतातील महाप्रज्ञावंत पुरुषांच्या अद्भुत प्रतिभेचा तो एक असामान्य असा विलास आहे याविषयी आता दुमत राहिलेले नाही. अनेक साहित्यगुणांनी संपन्न असल्यामुळेच या ग्रंथाला आजच्या जगात असे अलौकिक स्थान प्राप्त झाले आहे हे उघड आहे. या महाभारतात इतिहास आहे. काव्य आहे. तत्त्वज्ञान, धर्मप्रवचन आहे. स्वतः वेदव्यासांनीच म्हटल्याप्रमाणे हा ग्रंथ भगवान समुद्र किंवा हिमवान गिरी यांच्याप्रमाणे अनंत रत्नांनी समृद्ध आहे. आणि म्हणूनच त्याला अमरता प्राप्त झाली आहे. या अनंत रत्नांमध्ये श्रेष्ठकनिष्ठ भाव लावणे फार कठीण आहे हे खरे व याबद्दल फार मतभेद होतील ही खरे. तरी पण हा प्रयत्न करणे अगदी निष्फल होईल असे वाटत नाही. या अनंत रत्नांमध्ये भगवान श्रीकृष्णाचे चरित्र हे अगदी निस्तुल व अद्वितीय असे रत्न आहे, असे मला वाटते. हे चरित्र म्हणजे या रत्नमालेतील कौस्तुभ आहे. भारतातील सर्व घटना, सर्व प्रसंग, त्यातील धर्मवेत्त्यांनी केलेली प्रवचने, सांगितलेली तत्त्वज्ञाने या सर्वोवर या महापुरुषाच्या कर्तृत्वाची, विचारांची व चारित्र्याची छाप पडलेली सष्ट दिसून येते. शरीरातील प्रत्येक अणू, रक्तबिंदू व पेशी यांशी आत्मतत्त्वाचा संबंध असतो आणि त्या आत्मतत्त्वामुळेच त्या शरीराला एकता, सांगता व पृथगात्मता हे गुण प्राप्त झालेले असतात. महाभारतांतील अनंत रत्नांची ज्याच्यामुळे एक माला बनली आहे व ज्यामुळे तिचे सौंदर्य वृद्धिंगत झाले आहे त्या या कौस्तुभाचा तेजोविलास जितका जवळून न्याहाळावा तितका जास्त मनोरम वाटतो.
कुल व राष्ट्र
भरतखंडाच्या इतिहासात श्रीरामचंद्र व श्रीकृष्ण हे दोन अवतारी पुरुष गणले गेले आहेत. त्यांची प्रत्यक्ष अवतारकार्ये कोणती हे त्यांच्या चरित्रांत वर्णिलेले आहे. या त्यांच्या चरित्रांवरून असे स्पष्ट दिसते की, या दोन पुरुषांनी धर्म म्हणून जी तत्त्वे डोळ्यांपुढे ठेविली होती ती एकमेकांपासून अगदी भिन्न अशी होती. मानवजातीच्या इतिहासक्रमात अनुक्रमाने येणाऱ्या दोन भिन्न कालखंडांची ती तत्त्वे होती. मानवसमाजाच्या संघटनेत कुटुंब हा पहिला घटक आहे. तो पहिला पेशी आहे. अशी अनेक कुटुंबे मिळून नंतर समाज होतो. या दोन अवस्थांत दोन भिन्न धर्मतत्त्वे प्रचलित असणे हे साहजिक आहे. श्रीरामचंद्र हा कुटुंब किंवा कुल या पहिल्या अवस्थेतला अवतार असून श्रीकृष्ण हा अशी अनेक कुले एकमेकांशी दृढपणे संलग्न झाल्यानंतर जो समाज निर्माण झाला त्या अवस्थेतला अवतार आहे. कुल ही रामाची अंतिम निष्ठा आहे. त्यामुळे पित्राज्ञापालन हा त्याचा सर्वश्रेष्ठ धर्म होता. समाज किंवा प्रजा यांच्या कल्याणाची त्याला चिंता नव्हती असे नाही; पण पित्याच्या आज्ञेचा अवमान करून ते साधावे अशी त्याची दृष्टी नव्हती. लोकसमूहात शासन निर्माण करण्याची इच्छा उद्भूत झाली की त्यात प्रथम शासनाचा एक लहान एकांक (युनिट) तयार होती अणि मग त्या एकांकात कोणाची तरी सत्ता अंतिम म्हणून मानावी लागते. कुल या एकांकात पिता ही अंतिम सत्ता सर्व जगात मानलेली होती, आणि त्यामुळे त्या अवस्थेत त्या पित्याची आज्ञा पाळणे हा सर्वश्रेष्ठ धर्म ठरत असे. रामचंद्राचे हेच तत्त्व होते. आपला पिता काममूढ झाला असून लंपटबुद्धीने तो आपणास वनवासात हाकून देत आहे, हे रामचंद्राला मान्य होते. गंगा ओलांडून एका वृक्षाच्या खाली विश्रांतीसाठी त्रिवर्ग बसले असताना रामचंद्राने मन मोकळे करून हे लक्ष्मगाला सांगितले; पण म्हणून त्याच्या आज्ञेचा अवमान करणे हे त्याला मान्य नव्हते. वनवासाला जाण्यापूर्वी लक्ष्नण नाना तऱ्हेने त्याला सांगत होता की, 'हा दशरथ पिता म्हणवून घेण्यास पात्र नाही. मी याला कैदेत टाकतो. त्याची पर्वा न करता तू राज्य हाती घे.' अशी परोपरीने लक्ष्मणाने विनवणी चालविली होती. पण रामाचे उत्तर एक. 'मी पित्याची आज्ञा उल्लंघिण्यास असमर्थ आहे. हे रघुकुलाला शोभणार नाही. पित्राज्ञापालन हाच सनातन धर्म होय. पित्याने जी आज्ञा केली ती क्रोधामुळे किंवा विषयाधीनतेमुळे केलेली असली तरी धर्मनिष्ठ पुरुषाने ती पाळलीच पाहिजे,' (अध्याय २१- ५९) असे रामाचे धर्मतत्त्व होते; आणि त्याप्रमाणे तो वर्तत होता. या वर्तनामुळे अपरिमित हानी होईल हे त्याला दिसत होते. कैकेयी ही दशरथाला व कौसल्येला विष घालील अशी त्याला भीती वाटत होती. आपण गेल्यावर राज्यावर विपत्ती येईल हेही त्याच्या ध्यानी येत होते. तरी सुद्धा 'पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन करणे हा अधर्म होय'- 'धर्म व अर्थ यांना सोडून केवळ कामवशतेमुळे केलेल्या आज्ञेचेही उल्लंघन करणे या अधर्माची मला भीती वाटते' असे तो म्हणाला; आणि पित्राज्ञापालन या श्रेष्ठ व सनातन धर्माचे आचरण त्याने केले.
समाजरक्षण हाच धर्म
या ठिकाणी श्रीकृष्ण असता तर ? त्याने ही पित्राज्ञा कधीही पाळली नसती हे निश्चित होय. समाजरक्षण हा त्याचा धर्म होता. ती त्याची अंतिम निष्ठा होती. कोणत्याही कार्याची युक्तायुक्तता तो 'लोकसंग्रह' या निकषावरून ठरवीत असे. त्याची धर्माची, सत्याची, न्यायाची व्याख्या एकच होती. समाजाचे कल्याण हाच धर्म होय. धर्मनियम हे लोकांच्या प्रभवासाठी म्हणजे उत्कर्षासाठीच केलेले असतात, धर्म हे समाजनिरपेक्ष असे काही तत्त्व नव्हे, असे त्याचे मत होते. आपल्या काही प्रतिज्ञांचे अर्जुन स्तोम माजवू लागला तेव्हा श्रीकृष्णाने त्याला हे तत्त्व समजावून दिले. श्रुती हा धर्माचा आधार हे खरे; पण भूतांचा उत्कर्ष हेच ध्येय पुढे ठेवून श्रुतीत धर्माची व्याख्या केलेली असते. म्हणून धर्माधर्मनिर्णय तर्काने करावा लागतो, असा आपला अभिप्राय श्रीकृष्णाने दिलेला आहे. (कर्णपर्व ६९). रामाच्या ठायी श्रीकृष्ण असता तर त्याने आपल्या मृदू, सौम्य पण निश्चयात्मक वाणीने दशरथाला धर्मतत्त्व विशद करून सांगितले असते आणि कैकेयीला लोककल्याणासाठी कदाचित शासनही केले असते.
तारतम्य
श्रीकृष्णाच्या चारित्र्याचा प्रधानगुण म्हणजे त्याचा हा धर्मविषयक दृष्टिकोण होय. तो अत्यंत मोठा व्यवहारपंडित होता. मानवी संसारातील शक्याशक्यतेच्या मर्यादा त्याने पूर्णपणे जाणल्या होत्या. तारतम्याचे अवलोकन हे त्याच्या बुद्धीचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे अर्वाचीन काळच्या युटिलिटेरियन किंवा याहूनही निश्चित म्हणजे प्रॅग्मॅटिस्ट पंथासारखी त्याची धर्मविषयक विचारसरणी होती. व्यवहारपांडित्य हा तिचा सारार्थ आहे. मानवी जीवनात नेहमी सत्याचाच जय होतो असे नाही, निष्पापता हीच विजयी होते असे नाही, नीतियुक्त आचरण हेच फलदायी ठरते असे नाही, हे त्या मानवव्यवहारवेत्त्याने चांगले जाणले होते. आणि त्यामुळे समाजरक्षणासाठी अनेक वेळा असत्याचा, अधर्माचा आश्रय करणे भाग पडते, असे त्याने अनेकवार सांगितलेले आढळते. द्रोणाला फसवून मारणे हा अधर्म होय, हे त्याला मान्य होते. यामुळे धर्मराजाचा त्या वेळपर्यंत अधांतरी चालणारा रथ हा भूमीवरून चालू लागेल हेही त्याला दिसत होते; पण फसवणूक केली नाही तर तो रथ जमिनीत गाडला जाईल हेही त्याला कळत होते. म्हणून 'हे पांडवहो, आता तुम्ही धर्ममार्ग सोडूनच युद्ध करा-' 'आस्थीयतां जये योगो धर्ममुसृज्य पांडवाः । (द्रोणपर्व १९१.११) ।' 'अशा वेळी असत्य हे सत्यापेक्षा श्रेष्ठ होय-' 'सत्यात् ज्यायः अनृतं वचः' (द्रोण १९१-४७) असा अत्यंत स्पष्ट शब्दांत त्याने उपदेश केलेला आहे. जयद्रथ- वधाचे वेळी, दुर्योधनाच्या वधाच्या वेळी व इतरही अनेक प्रसंगी कृष्णाने हेच धोरण ठेविले आणि, मी अशा तऱ्हेने कपटाचा आश्रय केला नसता तर धन, राज्य, विजय, समृद्धी ही मिळाली नसती, (शल्य ६१-६४) असे आपल्या कृत्याचे समर्थनही केले. व्यवहारपांडित्य किंवा तारतम्यज्ञान ते हेच होय. भीष्मद्रोण यांसारखे महात्मेसुद्धा अन्याय, जुलूम, अत्याचार, अधर्म यांच्या बाजूने उभे राहू शकतात हे मानवी जीवनातले महान वैगुण्य आहे. धर्मयुद्ध करून याचा निर्णय करावा तर युद्धात नेहमी सत्याचाच जय होतो असे नाही. युद्धात काहीही घडते, हे या मर्त्यलोकात तेवढेच वैगुण्य आहे, हे श्रीकृष्णाने चांगले जाणले असल्यामुळे, समाजरक्षण हाच धर्म असून सत्य हे साधन आहे, हे त्याने मनाशी निश्चित ठरविले होते. 'दैव आणि पुरुषप्रयत्न या दोहोंवर मिळून लोकहित अवलंबून आहे, हे प्राचीन महात्म्यांनी विचारपूर्वक ठरविले आहे.' (उद्योग ७९.४) हे तो धर्मराजाला नेहमी सांगत असे. मानवी जीवनाचे असे सम्यक् आकलन झालेले असल्यामुळे धर्मासाठी धर्म ही एकांतिक धर्मनिष्ठा कृष्ण त्याज्य समजत असे. रामयुगातही हा विचार उद्भूत झाला होता; नाही असे नाही 'काममूढ पित्याचीसुद्धा आज्ञा पाळावयाची ही तुझी फाजील धर्मनिष्ठा असून ती अत्यंत निंद्य आहे' असे लक्ष्मण रामचंद्राला अनेक वेळा सांगत असे (अयोध्याकांड २३.१४). पण लक्ष्मणाची भूमिका व पुण्याई लहान असल्यामुळे तो रामचंद्राचे मन वळवू शकला नाही. श्रीकृष्णाने आपल्या थोर पुण्याईने हे व्यवहारज्ञान समाजाला शिकविले व भारतीय समाज एकांतिक अव्यवहार्य सत्यनिष्ठेने उत्सन्न होऊ नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
क्षात्र संघटना
त्या काळच्या उत्तर भारतात जरासंघ, कंस, शिशुपाल यांसारखे अन्यायी, जुलमी व मदांध असे अनेक राजे होते. अशा राजांच्या सत्तांचा उच्छेद करून सर्व क्षत्रियमंडळात एक शिस्त निर्माण करावी, त्यांच्यांतील कलह नाहीसे करून सख्य घडवून आणून, सर्वत्र शांतता प्रस्थापित करावी आणि अशा रीतीने भारतीय समाजाची सुस्थिती राखावी हे श्रीकृष्णाचे जीवितकार्य होते. राजसूय यज्ञाचे आधी जरासंधाचा वध करणे अवश्य आहे असे त्याने युधिष्ठिराला सांगितले त्याचे कारण हेच होते. हा जरासंध पाशवी सामर्थ्याच्या जोरावर अनेक राजांना बंदिवान करीत असे. त्यांचे राज्य लुटीत असे. असे ८६ राजे त्याने कैदेत टाकले होते व तसे शंभर झाल्यावर तो त्यांना शंकरापुढे बळी देणार होता. अशा वेळी आपल्या या ज्ञातिबांधवांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे आणि ते करीत असता मृत्यू आला तरी पत्करला पाहिजे, अशी कृष्णाची भूमिका होती (सभा- १५. २४-२५) क्षत्रिय- राजमंडळाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे याची कृष्णाला नित्य रुखरूख होती. जरासंधाशी बोलताना त्याने ते स्पष्ट करून सांगितले आहे. 'हे राजा, तू निरुपद्रवी राजांची हिंसा करीत आहेस. आम्ही धर्मरक्षण करण्यास समर्थ आहोत. आणि अशा वेळी ते आम्ही केले नाही तर तुझे पातक आम्हांला लागेल.-' (अस्मान् तद् एनोपगच्छेत्) या जाणिवेमुळेच श्रीकृष्ण जरासंधवधास उद्युक्त झाला होता. (सभा, २२-९)
जरासंध वधाचे वेळी, पुढे कौरवपांडवांचे युद्धात व इतरही अनेक प्रसंगी श्रीकृष्णाने जे सामदामदण्डाचे प्रयत्न केले ते पूर्ण निःस्वार्थी हेतूने केलेले होते. भारतातील क्षत्रियमंडळाचे सार्वभौमपद आपण घ्यावे अशी चुकूनसुद्धा त्याने कधी इच्छा केली नाही. बुद्धिमत्ता, सेनासामर्थ्य व धनसमृद्धी इत्यादी सम्राटपदे जिंकण्यासाठी लागणारे सर्व गुण त्याच्या ठायी होते. ज्या युधिष्ठिराने सार्वभौम व्हावे अशी त्याची इच्छा होती, त्याने एका पायावर कृष्णाचे सार्वभौमत्व मान्य केले असते. असे असूनही श्रीकृष्णाने तो अभिलाष कधी धरला नाही. जरासंघाला मारून ८६ राजांना त्याने बंधमुक्त केले त्यावेळी अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांनी 'आम्हांस काही सेवा सांगा' असे विनविले. त्यावेळी तुम्ही सर्वांनी युधिष्ठिरास साह्य करावे, अशी त्याने त्यांना आज्ञा दिली आणि स्वतःला अर्पण केलेली रत्नेही त्याने त्यांची दया येऊन मोठ्या कष्टाने स्वीकारली (सभा. २४- ३९). जरासंधाचे राज्यही त्याने खालसा केले नाही; ते त्याच्या पुत्राला दिले. ते श्रीकृष्णाची ही विशुद्ध बुद्धी त्याच्या प्रत्येक कृतीतून व्यक्त होते. कौरव-पांडवांचा समेट घडावा म्हणून बोलणी चालली असताना 'धर्मराजाच्या आज्ञेबाहेर मला जाता येणार नाही' असे इतरांना त्याने अनेक वेळा निक्षून सांगितले आहे. कर्णाने पांडवांकडे यावे म्हणून त्याचे मन वळवीत असतानाही 'तू इंद्रप्रस्थाचा स्वामी झालास तर समस्त यादवांसह मी तुझा अनुपायी होईन' असे अभिवचन कृष्णाने त्यास दिले होते.
एकांतिक पावित्र्य
श्रीकृष्णाने सार्वभौमपदांचा लोभ मनातून काढून टाकला तो आपल्या जीवितकार्याचा विचार करून, त्या थोर ध्येयाला तो मारक होईल हे मनाशी निश्चित ठरवूनच काढून टाकला असावा असे वाटते. त्याला लोकांना कठोर व्यवहार, नीतीचा उपदेश करावयाचा होता. समाजरक्षण हे त्याचे ध्येय होते आणि या हेतूच्या सिद्ध्यर्थ कंटकांचे व दुष्कृतांचे निर्दाळण करणे अवश्य आहे हे त्याने जाणले होते. दुष्कृतांचे निर्दाळण सत्याच्या व एकांतिक पावित्र्याच्या आश्रयाने कधीच होत नाही, ही मानवी इतिहासातील दुःखद उणीव ध्यानात आल्यामुळे सत्याच्या व पावित्र्याच्या रक्षणासाठीच त्यांना व्यवहारात मुरड घालणे अवश्य आहे, तसे न केल्यास या अनीतिमय जगात दुष्ट- चांडाळांचे वर्चस्व होऊन समाज रसातळाला जातो, प्रजा उत्सन्न होतात, हा त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला होता. यामुळेच 'कित्येक वेळा असत्य हे सत्यापेक्षा श्रेष्ठ असते' 'या वेळी धर्म सोडूनच लढणे अवश्य आहे', 'भीमसेन धर्माने लढेल तर त्याला जय मिळणार नाही; अन्यायाने लढणे प्राप्त आहे', असा अनेकदा त्याने उपदेश केला आहे. अशा वेळी याला स्वतःला सार्वभौमपदाचा अभिलाष आहे अशी शंका जरी कोणाला आली असती तरी त्याच्या वाणीला कसलेच यश आले नसते. पण असे प्रतिपादन तो करीत असताही साऱ्या भरतभूमीत त्याच्या लोकहितबुद्धीविषयी कोणाला शंका आली नाही. 'जे लोकहिताला अनुकूल तेच सत्य', 'जे प्राण्यांना उत्कर्षकारक तेच धर्मपूत' हे त्याचे विचार स्वार्थमूलक नसून त्यामागे समाजाच्या हिताची पराकाष्ठेची तळमळ आहे, हीच प्रतीती भारतीय प्रजांना त्या काळी येत होती आणि म्हणूनच प्रत्यक्ष सार्वभौम न होताही तो तत्कालीन भारताचा अनभिषिक्त सम्राट झाला होता. त्याचे धर्मप्रवचन ऐकण्यास अखिल भरतभू त्या वेळी उत्सुक असे. श्रीकृष्ण येणार ही वार्ता पसरताच मैलोमैल रस्ता तुडवीत येऊन लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहात. दूरदूरची अंतरे तोडून विद्वान लोक त्याचे भाषण श्रवण करण्यास येत आणि ते ऐकण्यातच स्वतःच्या जीविताची सफलता मानीत.
वाणीचे शिल्प
आणि खरोखरच, भरतखंडाच्या इतिहासात श्रीकृष्णाची एक थोर वक्ता म्हणून अग्रमालिकेत गणना करावी लागेल. श्रीकृष्णाचे एकेक भाषण म्हणजे वाणीच्या शिल्पाचा एकेक नमुनाच असे. शिल्पकाराने एखादी घडीव मूर्ती आपल्यापुढे उभी केली आहे असे त्याच्या श्रोत्यांना वाटत असे. मीमांसेत उपक्रमोपसंहाराचे जे महत्त्व वर्णिले आहे ते श्रीकृष्णाच्या भाषणाचा आदर्श पुढे ठेवूनच वर्णिले असेल, असे म्हणावयास हरकत नाही. कौरवसभेत उभा राहताच पहिल्याच वाक्यात त्याने आपल्या आगमनाचा हेतू व विचाराचा व्याप स्पष्ट करून सांगितला. 'कौरव आणि पांडव यांचा साम व्हावा, युद्ध होऊ नये, वीरांचा प्राणनाश होऊ नसे, अशी प्रार्थना करण्यासाठी मी आलो आहे' असे त्याचे पहिले वाक्य आहे आणि शेवटीही समारोप तसाच निःसंदिग्ध व सर्व भाषणाचा सारार्थरूप आहे. 'पांडव तुझी सेवा करावयास सिद्ध आहेत किंवा तुझ्याशी युद्धही करावयास तयार आहेत. हे धृतराष्ट्रा, यांतले तुला काय रुचत असेल ते सांग.' श्रीकृष्णाची महाभारतातील सर्वच भाषणे अशी सुबद्ध, आखीव व शिल्पयुक्त आहेत. स्वतः भारतकारांनी त्याच्या वक्तृत्वाचे मोठे सुंदर वर्णन केले आहे. 'श्रीकृष्णाचा स्वर मेघासारखा गंभीर होता. स्वराची उंची कमी न होता तो एकसारखा बोलू शकत असे. त्याचे वर्णोच्चार योग्य त्याच स्थानातून होत. ते नेहमी हेतुयुक्त, अर्थसंपन्न असून त्यात गोंधळ कधी नसे. (उद्योग. ९१- १७, १८). स्वतः तो एक महान तत्त्ववेत्ता असल्यामुळे जगाला शाश्वत सत्ये सांगण्याच्या भूमिकेतूनच तो नेहमी बोलत असे. दीर्घकाल चिंतन करून मनाशी निश्चित केलेले सिद्धान्त त्याच्या वाणीच्या ओघातून मोठ्या प्रतिष्ठेने बाहेर पडत आणि जग त्यांना शिरसावंद्य मानी. श्रीकृष्ण बोलू लागला की शाश्वदर्थ- संपन्न असे एखादे सुभाषित त्याच्या मुखातून ऐकण्यास मिळणारच, अशी लोकांची खात्री असे. 'जो समर्थ असतो व जगाला वश करू शकतो त्यालाच साम्राज्य प्रप्त होते' 'हे राजा, बालिश पुरुष परिणामाकडे लक्ष न देता एकाएकी कार्याला हात घालतो, म्हणून अशा बालिश शत्रूचा कोणी विचारही करीत नाही' 'कर्माला अनुकूल अशा ज्या विद्या त्याच सफल होत असतात. कर्म न करता संन्यासच जो श्रेष्ठ मानतो त्या दुर्बल पुरुषाचे बरळणे व्यर्थ आहे.' अशा तऱ्हेची शाश्वत सत्ये श्रीकृष्णाच्या मुखातून नित्य बाहेर पडत आणि त्यांच्या मागे दीर्घ चिंतन व विपुल अनुभव याची पुण्याई उभी असल्यामुळे ती आजही जगाच्या आदराला पात्र झालेली आहेत.
उत्कट रागद्वेष
मानवी स्वभावाची घडण हा विधात्याचा एक चमत्कार आहे. अत्यंत भिन्न किंवा अगदी परस्परविरोधी असेही गुण मानवाच्या ठायी अविरोधाने नांदू शकतात; इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा परस्परांना पोषक होतात हे पाहून व वाटतो. श्रीकृष्णाचे चरित्र पाहता असे दिसते, की विवेक, व्यवहारदृष्टी, स्थिर प्रज्ञा हाच त्याच्या प्रकृतीचा स्थायीभाव होता. अशा या पुरुषाचे व्यक्तिगत जीवनातले रागद्वेष अत्यंत तीव्र होते हे पाहून मन विस्मयाने व आनंदाने भरून जाते. विचारशील मनुष्य सहसा विकारांच्या अधीन होत नाही. इतकेच नव्हे तर त्याचे विकार फारसे उत्कट रूपही धारण करीत नाहीत. त्याच्या विकारांच्या धारा बऱ्याच बोथट झालेल्या असतात आणि त्याचे विकाराचे बोलणेही सौम्य, समतोल व समन्वयी असे असते. श्रीकृष्ण याला अपवाद होता. त्याच्या बोलण्याला बहुतेक वेळा अगदी जहरी अशी धार असे व त्यातील अर्थ भेदक, मर्मघातक आणि प्रेम किंवा द्वेष अगदी एकांतिकपणे व्यक्त करणारा असा असे. हस्तिनापुराला गेला असताना दुर्योधनाने श्रीकृष्णाला भोजनाचे आमंत्रण दिले. प्रथम साधे कारण सांगून त्याने नकार दिला; पण दुर्योधनाने पुन्हा आग्रह करताच श्रीकृष्णाने ताडकन उत्तर दिले, 'अरे, दुसऱ्याच्या घरी जेवावयास जातात ते प्रेम असले तर किंवा आपल्या घरी अन्न मिळत नसले तर जातात. येथे तुझ्यामाझ्यांत प्रेम नाही आणि मी अन्नाला अजून महाग झालेला नाही.' श्रीकृष्ण कौरवांकडे जाऊन समेट करील व आपल्या अपमानाचा सूड घेतला जाणार नाही अशी द्रौपदीला भीती वाटली व अत्यंत संतापून जाऊन तिने कृष्णाचीही निर्भर्त्सना केली. त्यावेळी श्रीकृष्णाने तिला सांगितले, 'कृष्णे, भिऊ नको. कौरव स्त्रिया विधवा होऊन रडत असलेल्या लवकरच तुझ्या दृष्टीस पडतील. कालपक्व असे धार्तराष्ट्र जर माझे म्हणणे ऐकणार नाहीत तर रणांगणात मरून पडतील आणि त्यांची प्रेते कोल्हेकुत्री खातील याविषयी शंका बाळगू नको. हिमालयसुद्धा एखादे वेळी चलित होईल, पण माझे बोलणे निष्फळ होणार नाही.' आपल्या प्रिय भगिनीवरचे गाढ प्रेम आणि कौरवांबद्दलचा तितकाच तीव्र द्वेष या भाषणातून कमालीच्या उत्कटतेने व्यक्त होतो. रागद्वेषाची ही उत्कटता हे श्रीकृष्णाच्या लोकोत्तर सामर्थ्याचे एक रहस्य होते. तो ज्यांना जवळ करी त्यांच्यासाठी प्राणही वेचण्यास तो सदा सिद्ध असे, आणि ज्यांचा तो द्वेष करी त्यांचे निर्दाळण करून टाकावे हीच त्याची वृत्ती असे. 'न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ।' हे वचन त्याच्या स्वभावाला मुळीच लागू पडणार नाही. एकंदर मानवी व्यवहारात उत्कट रागद्वेष याच प्रबल अशा प्रेरणा असतात. या प्रेरणांनी श्रीकृष्णाचे मन पूर्ण संपन्न होते असे त्याच्या अनेक प्रसंगींच्या उद्गारांवरून दिसते.
देव नव्हे- मानव
या त्याच्या तीव्र प्रवृत्तीवरूनच श्रीकृष्ण हा कोणी देवकोटीतला पुरुष नसून मानवी गुणांनी नटलेला, मानवी भावनांनी संपन्न असलेला, मानवी मर्यादांतच रमणारा, तुमच्याआमच्यासारखाच विकारविचारांच्या आहारी असलेला, पण या सामान्यांतच असामान्य उंचीला व लोकविलक्षण पदवीला गेलेला असा पुरुष होता, हे स्पष्टपणे ध्यानात येते. मध्यंतरीच्या काळात त्याला परमेश्वररूप आणले गेल्यामुळे त्याच्या जीवनातले हे वैशिष्ट्य दुर्लक्षिले गेले होते. पण महामती वेद- व्यासांनी या पुरुषाचे चरित्र वर्णिताना असे दुर्लक्ष केलेले नाही हे आपले भाग्य होय. महाभारतातला श्रीकृष्ण हा या अपूर्ण जगातील अपूर्ण असाच मानव होता याविषयी शंका घेण्यास व्यासांनी जागा ठेवलेली नाही. जरासंधाविषयी बोलताना 'सतत तीनशे वर्षे याच्याशी झुंजत राहिलो तरी त्याचा पराभव करण्यास आपण समर्थ होणार नाही हे आम्ही जाणले व त्याच्या भयामुळे ज्ञातिबांधवांसह आम्ही मथुरेतून पळून जाऊन द्वारका नगरीत राहिलो.' असे श्रीकृष्णाने प्रांजलपणे युधिष्ठिरास सांगून टाकले. युद्धाचे प्रयत्न सुरू झाले त्या वेळी कृष्णाने अनेक प्रसंगी जे उद्गार काढले त्यावरून अतिमानुष शक्ती गृहीत धरून हा बोलत आहे अशी शंकासुद्धा येत नाही. 'हा घोर अनर्थ ओढवला आहे. याचा परिणाम काय होईल, यशस्वी कोण होईल हे काही सांगता येत नाही. मानवाला जेवढे शक्य आहे तेवढे मी करीन, परंतु प्राक्तन मला हाणून पाडता येणार नाही,' असे श्रीकृष्णाचे उद्गार आहेत. अर्जुनाने जयद्रथवधाची प्रतिज्ञा केलेली कळताच श्रीकृष्ण अत्यंत चिंताक्रांत झाला. 'अर्जुना, तू हा मोठा अविचार केलास. आमचा सल्ला न घेता तू हे करावयास नको होतेस. अरे, उद्या संध्याकाळच्या आत जयद्रधाचा वध करणे किती अशक्य आहे याची तुला कल्पना नाही.' असे कृष्ण म्हणाला, आणि त्या रात्री श्रीकृष्णाला या काळजीमुळे झोप आली नाही. या व अशा तऱ्हेच्या अनेक प्रसंगांवरून श्रीकृष्णाचे चरित्र पूर्णपणे मानवकोटीत येऊन पडते आणि त्यामुळे त्या दिव्य व अलौकिक चरित्राचे वैभव शतगुणित होते.
७
भगवान श्रीकृष्ण

महाभारत हे या भरतभूमीचे वैभव आहे; आणि भगवान श्रीकृष्ण हे त्या महाभारताचे वैभव आहे. महाभारताच्या सुवर्णकोंदणात बसविलेला हा कौस्तुभ आज हजारो वर्षांनंतरही आपल्या भास्वर दीप्तीने व अव्यय तेजाने जगाला धवळून टाकीत आहे. जगामधल्या अनेक देशांतील इतिहासपूर्व काळातील वाङ्मय आज उपलब्ध झाले आहे. त्यापैकी कोणत्याही ग्रंथात असले दिव्य चरित्र आपणांस पाहावयास सापडत नाही. मानवी व्यवहाराचे सूक्ष्म आकलन, धर्मा- धर्माचा निश्चय करणारी परिणत प्रज्ञा, अधिकारवाणीने त्या धर्माचे प्रवचन करण्याइतकी चारित्र्याची उंची, लोकसंग्रहाची तळमळ, अमोघ वाणी इतके सर्व गुण त्या मागल्या काळात एकवटलेले पाहून मन विस्मित होऊन जाते, आणि मानवजातीच्या इतिहासात क्वचित जमून येणारा हा योग भरतभूमीच्या भाग्यात लिहिला गेला या जाणिवेने आजच्या पडत्या काळातही मस्तक उन्नत होते.
(फेब्रुवारी १९५२)