माझे चिंतन/भारतीय जीवनातील किक्रेट व हॉकी






भारतीय जीवनातील क्रिकेट व हॉकी





जीवनाचे प्रतिबिंब
 क्रिकेटचा खेळ हे इंग्लिश राष्ट्राच्या जीवनाचे प्रतिबिंब आहे असे म्हणतात. इंग्लिशांची जीवनाकडे पाहण्याची वृत्ती, त्यांची चिकाटी, शिस्त, धीमेपणा, दिलदारी या सर्व राष्ट्रीय गुणांचे आपणास त्यांच्या क्रिकेटच्या खेळात दर्शन घडते. वॉटर्लूची लढाई जिंकली तेव्हा इंग्रजांनी जे गुण प्रगट केले त्या सर्वाचा विकास ईटन व हॅरो या इंग्लंडमधील दोन शाळांच्या खेळाच्या मैदानांवर झाला होता असे नेहमीच सांगितले जाते. गेली पन्नास पाऊणशे वर्षे आपण भारतीयांनीही हा क्रिकेटचा खेळ उचलून आत्मसात केला आहे. त्यांत प्रावीण्यही संपादन केले आहे. आणि फार... फार निराळ्या अर्थाने तो खेळ आपल्याही राष्ट्रीय जीवनाचे प्रतिबिंब होऊन बसला आहे !
 फार निराळ्या अर्थाने म्हणजे कोणत्या ?

फार निराळा अर्थ

 या खेळात भारतीयांनी अगदी असामान्य प्रभुत्व संपादन केले आहे यात शंका नाही. रणजी, धुलीप ही नावे क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांत गाजली आहेत. रणजी हे तर त्या खेळाचे राजे, तो खेळ खेळणाऱ्यांचे परात्पर गुरु होऊन बसले आहेत. कॅ. नायडू, देवधर, जोशी, पै, विठ्ठल ही पूर्वीची आणि मर्चंट, मनकड, हजारे, अमरसिंग ही आताची नावेही या क्षेत्रात फार उंच जागी आरूढ होऊन बसली आहेत. इंग्लंडमध्येही त्यांना फार मान आहे. तेथील खेळाडूंच्या बरोबरीचा, क्वचित वरचाही मान त्यांना दिला जातो. हे सर्व पाहून एक विचार सारखा मनात येत असतो; तोच आज येथे विशद करून मांडावयाचा आहे. आमचे हे खेळाडू, वैयक्तिक रीतीने पाहिले तर जगातील कोणत्याही संघातल्या खेळाडूंच्या तोलाचे आहेत असे दिसते. मर्चंट, अमरसिंग, मनकड, हजारे हे तर इंग्लंड-ऑस्ट्रेलियांतील अव्वल दर्जाच्या खेळाडूंच्याही तोडीचे आहेत; यांनी काही गुण त्यांनाही शिकवावे अशी यांची योग्यता आहे. हे आम्हीच म्हणतो असे नाही; इंग्लिश लोकांनीही याच सुरात त्यांची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. असे असल्यामुळे मनात एक कल्पना, एक आशा, एक स्वप्न नेहमी उभे राहते. हे एकेक खेळाडू जर असे भारी आहेत, तर असे अकरा खेळाडू एकत्र आणून त्यांचा संच केला, तर तो संच निश्चितच अजिंक्य होईल !

एक विचित्र हिशेब !

 तर्काने, गणिताच्या हिशेबाने हे बरोबर आहे. पण सत्यसृष्टी असल्या हिशोबाने चालत नाही. तिचे स्वतंत्र कायदे आहेत. ते कायदे प्रबल ठरतात आणि आमचे स्वप्न भंगून जाते ! ती आशा सफल होत नाही; ती कल्पना वाऱ्यावर विरून जाते. भारतीय जीवनातला हा सर्वांत मोठा दोष आहे. आमच्यात हत्तीचे बळ असलेले अनेक पुरुष सापडतात; पण असे अकरा पुरुष एकत्र झाल्यावर त्यांच्या संघात अकरा हत्तींपेक्षा जास्त बळ निर्माण व्हावे, तसे न होता ते कमी होते ! एकेकटे असताना शूर व समर्थ असणारे हे पुरुष एकत्र येताच त्यांचे सामर्थ्य वृद्धिंगत होण्याऐवजी कमी होते ! वैयक्तिक दृष्टीने आम्ही वाटेल तितके उंच- अगदी नक्षत्रापर्यंत जाऊ शकतो; पण समाज म्हणून, संघ म्हणून एकत्र येऊन त्यापेक्षाही उंच जावे हे आम्हांला जमत नाही. आम्ही खालीखालीच जातो. सांघिक, सामाजिक, सामुदायिक जीवनाची राजविद्या निराळीच आहे. ती आम्ही हस्तगत केलेली नाही.
 नेपोलियनने एकदा रणांगणातला एक हिशेब सांगितला होता. फ्रेंच सेना घेऊन तो इजिप्तमध्ये गेला होता. तेथील अरबांच्या एका जमातीचे नाव 'मामेलुक' असे होते. ते लोक अंगापिंडाने कणखर व शरीरांने धिप्पाड होते. फ्रेंच लोक त्या मानाने बारीक दिसत. तेव्हा या धिप्पाड लोकांशी लढताना फ्रेंचांचा धीर खचू नये, त्यांचा आत्मविश्वास ढळू नये म्हणून त्याने फ्रेंचांना मानवी गणिताचा हिशेब सांगितला. तो म्हणाला, एक फ्रेंच व एक मामेलुक यांचा सामना झाला तर मामेलुक निश्चित भारी आहे. शंभर फ्रेंच व शंभर मामेलुक असा सामना झाला तर बरोबरी होईल. आणि दहा हजार फ्रेंच व एक लक्ष मामेलुक अशी लढाई झाली, तर फ्रेंच मामेलूकांचा सपशेल पराभव करतील ! याचा अर्थ असा, की फ्रेंचांची संख्या वाढत जाते तसतसे त्यांचे बळ संख्येपेक्षा जास्त होत जाते आणि मामेलुकांची संख्या वाढू लागली की ते कमजोर होत जातात ! हे मानवी गणित आहे. जड वस्तूंच्या गणितापेक्षा ते फार निराळे आहे.
 आपण भारतीय हे मामेलुकांच्या गणितात बसतो; फ्रेंचांच्या नाही. वैयक्तिक हिशेब केला तर आपण खरोखरच जगात अद्वितीय ठरू; पण आपण संघ करू लागलो, चार माणसे एकत्र आली की आपले सामर्थ्य तितक्या पटीने न वाढता उलट कमी होते. असे का व्हावे याची मीमांसा करावयाची आहे. पण तसे करण्यापूर्वी आपण वैयक्तिक दृष्टीने खरोखरच कसे गुणसंपन्न आहो हे दिग्दर्शित करतो. म्हणजे याच गुणांची संघटना केली तर जगात आपण पराक्रमाच्या कोणत्या कोटी करू शकू याची कल्पना येईल.

त्यांचे सामुदायिक जीवनातील सामर्थ्य

 यासाठी जपानशी तुलना करणे उद्बोधक होईल. आपली अर्वाचीन काळातील सर्व प्रगती ब्रिटिश विद्येच्या प्रसारानंतरची म्हणजे शंभर-सव्वाशे वर्षातली आहे. अर्वाचीन जपानचा उत्कर्ष त्याच काळातला आहे. मेजी युगापासून जवळजवळ गेली पाऊणशे वर्षे जपान प्रगतीच्या मार्गाने अत्यंत वेगाने अंतर कापीत चालला आहे. समाजाची पुनर्घटना, औद्योगीकरण, राष्ट्रनिष्ठा, विज्ञान-अभ्यास, लष्करी सामर्थ्य या बाबतीत जगाला थक्क करून सोडील अशा गतीने जपान चालला आहे. पण असे असूनही जपानच्या या सर्व वैभवातील एक वैगुण्य जाणवल्याखेरीज राहात नाही. आम्ही भारतीय वैयक्तिक कर्तृत्व निर्माण करू शकतो, सामुदायिक जीवनाचा उत्कर्ष आम्हांस साधत नाही. जपान दुसऱ्या टोकाला आहे. सामुदायिक जीवनातील सामर्थ्याची त्याने अगदी तड गाठली आहे; पण वैयक्तिक वैभवात जपान फार खुजा आहे. गेल्या शंभर वर्षांत किंवा त्याच्या मागच्या काळातही जगाचे डोळे आपल्या गुणवैभवाने, व्यक्तित्वाने दिपवील असा एकही महापुरुष जपानमध्ये झाला नाही. अब्राहम लिंकन, रूझवेल्ट, लेनिन, एडिसन, मेरी क्युरी, डार्विन, पाव्हलॉव्ह, शॉ, इब्सेन, गॉर्कि, टॉलस्टाय, नेपोलियन, नेल्सन' आयसेनहोवर, नॉर्मा शेअरर, ग्रेटा गार्बो, पॉल मुनी यांसारखे एकही नाव जपानच्या इतिहासातून ऐकू येत नाही.
 उलट हिंदुस्थानच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासातच अशी कितीतरी नावे आढळतात. टिळक, सावरकर, महात्माजी, नेहरू, सुभाषचंद्र, जगदीशचंद्र, चंद्रशेखर रमण, सुब्बाराव, (अमेरिकेतील) शंकरराव गोखले, भाभा, राममोहन रॉय, विवेकानंद, रवींद्रनाथ, शरच्चंद्र, राधाकृष्णन्, उदयशंकर या व्यक्तींची कीर्ती जगात दुमदुमली आहे. यांच्या तोडीचा एकही पुरुष जपानमध्ये निर्माण झाला नाही. आपल्या भूमीचे हे वैभव स्पृहणीय आहे यात शंका नाही; पण असे असूनही गेल्या पन्नास वर्षात जपानने सामुदायिक जीवनात जे अलौकिक सामर्थ्य निर्माण केले आहे, त्याच्या शतांशानेही आपल्याला निर्माण करता आलेले नाही. या गोष्टीचा आपण अगदी जिवाला लावून घेऊन विचार केला पाहिजे.

अपयश : वैयक्तिक व राष्ट्रीय

 मला याची जी काही मीमांसा सांगावीशी वाटते, ती स्पष्ट करण्यासाठी दोन उदाहरणे सांगतो. १७६१ साली पानपतची लढाई झाली. तीत दोन प्रहरपर्यंत विजयश्री मराठ्यांची होती. पुढे विश्वासराव पडले आणि सैन्य एकदम कच खाऊन सैरावैरा धावू लागले. अशा वेळी भाऊसाहेब वीराच्या आवेशाने एकदम सैन्यात घुसले व त्यांनी धारातीर्थी आत्मार्पण केले. हे दिव्य करताना त्यांच्या मनात असे आले, की आपण पुण्याहून एवढ्या प्रतिज्ञा करून आलो, आता हे अपयशी तोंड पुण्याला कसे दाखवावे ? या स्थितीत जगणे असह्य आहे असे म्हणून त्या वीर पुरुषाने मृत्यूला कवटाळले. वैयक्तिक जीवनाच्या दृष्टीने भाऊसाहेबांचे हे कृत्य भूषणावह असेच आहे. जो आत्मार्पणाला सिद्ध झाला, त्याच्यापुढे आपले मस्तक नम्र झालेच पाहिजे.
 पण ते तसे नम्र करून, सामाजिक जीवनाच्या दृष्टीने भाऊसाहेबांच्या या कृत्याचे मूल्यमापन करण्यास हरकत नाही. मराठी सत्तेच्या उत्कर्षाच्या दृष्टीने, हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने भाऊसाहेबांनी असे करावयास नको होते असे वाटते. त्या वेळी शांत मनाने रणातून माघार घेऊन, जितके सैन्य बचावणे शक्य होते तितके बचावून, अपयश पतकरून, पुण्याला अपयशी तोंड दाखविण्याची आपत्ती त्यांनी स्वीकारावयास हवी होती. त्यात वैयक्तिक मानहानी झाली असती हे खरे आहे; पण राष्ट्रांचे मोठे सैन्य आणि मग राष्ट्राचे मोठे धन सुरक्षित राहून त्या पराभवाचा काळिमा धुऊन काढता आला असता. वैयक्तिक अपयश व राष्ट्राचे अपयश यांत भाऊसाहेबांनी पहिल्याची पर्वा न करता, दुसऱ्याची चिंता वाहणे अवश्य होते.
 पण आपल्याकडे शौर्यधैर्याच्या, वीरपरंपरेच्या, क्षात्रधर्माच्या कसोट्या अशा पाहात नाहीत. रजपूत लोक, रणातून परत फिरावयाचे नाही, अशा प्रतिज्ञेने निघत व धारातीर्थी देह ठेवीत. वैयक्तिक शौर्याची व त्यागाची ती परमसीमा होय हे खरे आहे; पण थोडा वैयक्तिक कमीपणा पतकरून, हे वैभव सोडून देऊन रजपूत वीरांनी त्या त्या वेळी माघार घेऊन, पुन्हा तयारी करून शिवछत्रपतींच्या प्रमाणे पुन्हा चढाई केली असती तर मुसलमानांचे आक्रमण कायमचे मोडून काढण्यात पुढे मराठ्यांना जे यश आले ते आधीच रजपुतांना आले असते; आणि राजस्थानची व मग अखिल भारताची राष्ट्रीय हानी टळली असती. वैयक्तिक क्षात्रधर्माच्या अतिरिक्त कल्पनेमुळे इतके रजपूत वीर रणात पडले, मारले गेले, की राजस्थान या राष्ट्राचा त्यामुळे कणाच मोडून गेला.

हा विवेक फार मोलाचा !

 भाऊसाहेब किंवा हे रजपूत वीर यांचे हे काहीसे मनोदौर्बल्य होय असे म्हटले तर वाचकांना ते अत्यंत विपरीत वाटेल. म्हणून इंग्रज या बाबतीत कसा विचार करतात ते सांगून पाहतो. पटले तर पटेलही. ट्राफल्गारच्या लढाईत नेल्सन हा इंग्लिशांचा अत्यंत मोठा सेनापती कामास आला. आरमारी लढाई चालू होती; नेल्सन हा अगदी वरच्या बाजूला डेकवर उभा राहून आज्ञा देत होता. त्याने त्यावेळी क्राऊन, इपॉलेट इत्यादी त्याच्या थोर सेनापतिपदाची सर्व बिरुदे अंगावर धारण केली होती. त्यामुळे तो सहज ओळखू येऊन फ्रेंच गोलंदाज नेल्सन त्याच्यावर गोळा टाकतील अशी भीती वाटून, त्याचे सरदार त्याला विनवू लागले, "महाराज, आपण एक तर ही बिरुदे उतरून ठेवा किंवा लढाई आम्ही सांभाळतो, तिच्यावर लक्ष ठेवून, आपण केबिनमध्ये बसून नुसत्या आज्ञा द्या." पण नेल्सनने यातले काहीच मान्य केले नाही. "ही बिरुदे मी भूषण म्हणून मिळविली आहेत आणि भूषण म्हणूनच मी ती छातीवर धारण करीन" असे त्याने उत्तर दिले. दुर्दैवाने त्याच्या अधिकाऱ्यांची भीती खरी ठरली. फ्रेंचांनी त्या बिरुदांवरून त्याला ओळखून त्याच्यावर नेमका गोळा टाकला आणि त्यामुळे भयंकर जखमी होऊन शेवटी नेल्सन मृत्यू पावला. या घटनेचे वर्णन करून तिच्यावर भाष्य करताना नेल्सनचा चरित्रकार साऊदे याने म्हटले आहे, "थोर पुरुषाच्या मनाला हा मोह शेवटी वश करतोच; हे दौर्बल्य त्याच्या ठायी शेवटी दिसतेच."
 नेल्सनवर साउदेने ही जी टीका केली आहे ती अतिशय वरच्या मूल्यमापनातून केली आहे. आपल्या राष्ट्रासाठी प्राणांचे बलिदान करणाऱ्या थोर पुरुषाच्या मनाचे हे फार सूक्ष्मपणे केलेले विश्लेषण आहे आणि त्यातून दिसून आलेले हे वैगुण्य आहे. आघाडीवर जाऊन निर्भयतेने प्राणत्याग करणे जेथे अवश्य असेल, त्यावरच सैन्याचे चैतन्य व अंतिम यश अवलंबून असेल, तेथे ते करणे अवश्यच आहे. तेथे माघार घ्यावी असे कोणीच म्हणणार नाही. पण काही प्रसंग असे येतात, की याच्या उलट धोरण ठेवणे विजयाच्या दृष्टीने अवश्य असते. पण कित्येक थोर पुरुषांच्या प्रकृतीला ते मानवत नाही; त्यांना यात कमीपणा वाटतो. पण राष्ट्रासाठी, अंतिम यशासाठी तो पत्करणे अवश्य असते. तेथे आत्मार्पण हे व्यक्तीच्या यशाला पोषक, पण राष्ट्राच्या हिताला मारक असते. तरीही जे थोर पुरुष हा विवेक न करता आत्मबलिदान करतात ते प्राणाचा त्याग करतात; पण स्वयशाचा, स्वकीर्तीचा करीत नाहीत. एरवी हे युक्तच आहे. पण त्या यशाचा त्याग करून राष्ट्राचे यश वाढविले पाहिजे अशी वेळ आली असतानाही तसे न करणे ही काहीशी मोहवशता आहे, ते दौर्बल्य आहे, असा साउदेचा अभिप्राय आहे. नेल्सन ती बिरुदे उतरण्यास तयार नव्हता, खाली केबिनमध्ये जाण्यास तयार नव्हता; कारण त्याला त्यात स्वतःच्या कीर्तीला कलंक लागेल ही भीती वाटत होती. पण या त्याच्या कृत्यामुळेच लढाई फसण्याचा संभव होता. मग त्यामुळे इंग्लिश राष्ट्राच्या कीर्तीला कलंक लागला असता. हा विवेक न सांभाळणे हीच मोहवशता असे साउदे म्हणतो.
 वैयक्तिक कीर्ती व राष्ट्राची कीर्ती यांत राष्ट्राच्या कीर्तीला वरचे स्थान देणे अवश्य होते असे त्याचे म्हणणे आहे. त्याच अर्थाने भाऊसाहेबांच्याविषयी मी लिहिले आहे. १६६५ साली जयसिंगापुढे शरणागती पतकरताना शिवछत्रपतींनी हा विवेक सांभाळला होता. वैयक्तिक मानापमानाच्या भावनेच्या आहारी जाऊन त्यांनी त्या वेळी धारातीर्थी आत्मबलिदान केले असते, तर राजस्थानचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात घडून येऊन हिंदवी स्वराज्याची भाषाच संपली असती ! भाऊसाहेबांनी तोच विवेक संभळून, त्या वेळी माघार घेऊन, वर्ष दोन वर्षे जरूर तर थांबून पुन्हा चढाई केली असती तर महाराष्ट्राची एक पिढी गारद होण्याऐवजी त्याचे आसन त्या वेळीच दिल्लीला स्थिर झाले असते. पण भाऊसाहेबांच्या त्या मनोवृत्तीमुळे हे साधले नाही.
 पण ही वृत्ती हीच भारताची प्रकृती आहे ! शिवछत्रपती हे अपवाद आहेत.

जीविताची घडणच तशी !

 आपण एका राष्ट्राचे, समाजाचे, एका समूहाचे एक घटक या दृष्टीने स्वतःकडे पाहावे हा संस्कार आमच्या मनावर नाही. या दृष्टीने आम्ही स्वतःकडे पाहात नाही. एक स्वतंत्र, स्वयंपूर्ण व्यक्ती अशा दृष्टीने आपण स्वतःचा विचार करतो. आपली स्वतःची उन्नती, परिणती, पूर्णता, मोक्ष ही गोष्ट सर्वस्वी समाजनिरपेक्ष आहे, अशी आमची बाल्यापासून वार्धक्यापर्यंत भावना असते व तद्नुसार आपले वर्तन असते; मराठ्यांनी कुंभेरीच्या किल्ल्यास वेढा घातला होता त्या वेळी मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेराव गोळी लागून ठार झाला. त्यामुळे भयंकर संतापून मल्हाररावांनी प्रतिज्ञा केली की "सुरजमल जाटाचा शिरच्छेद करीन व कुंभेरीची माती खणून यमुनेत टाकीन !"
 या प्रतिज्ञेचे वर्तमान ऐकून जाट घाबरून गेला. त्या वेळी वेढ्याच्या एका बाजूचे काम जयाप्पा शिंदे पाहात होते. त्यांच्याकडे रात्री गुप्तपणे जाऊन जाटाने त्यांच्या पायावर डोके ठेवले. 'शरण आलेल्याला मरण देऊ नये' हा धर्म आठवून जयाप्पांनी त्यास अभय दिले आणि वेढा ढिला केला. हे होळकरांना कळले तेव्हा शिंदे व होळकर या उभयतांत आधीच वैमनस्य होते ते विकोपाला गेले. शिंदे-होळकरांच्या या बिघाडामुळेच मराठे उत्तर हिंदुस्थानात अनेक वेळा अपयशी झाले आणि मराठी राष्ट्राची हानी झाली. जयाप्पा ज्या धर्माला जागले तो व्यक्तिधर्म होता, समाजधर्म नव्हता. मराठी राष्ट्राचा एक घटक या दृष्टीने ते स्वतःकडे पाहात नव्हते, तर महाराष्ट्रातला एक जयाप्पा नावाचा सरदार अशी त्यांची दृष्टी होती.
 आज शेकडो वर्षे आमच्या जीविताचे वळणच असे आहे; त्याची घडणच तशी झालेली आहे. आम्ही स्वकेंद्रित आहो. समाज हा आमच्या अवलोकनाचे केंद्र नाही. त्यामुळे समाज म्हणून जगण्याची विद्या आम्हांला हस्तगत करता येत नाही. स्वार्थ, लोभ, दुष्टपणा, मत्सर यांमुळे माणूस स्वकेंद्रित होतो ते निराळे; त्यामुळे समाजाची हानी होतच असते. पण आम्ही वरच्या पायरीवर गेलो, निर्लोभ झालो तरी आमची दृष्टी अशी स्वकेंद्रित असते. आणि त्यामुळे वैयक्तिक सद्गुणांची संपादणी उत्तम करूनही श्रेष्ठ समाजधर्म व ते सद्गुण यांचा समन्वय घालण्याची दृष्टी नसल्यामुळे आमच्या सद्गुणांतूनही विपरीत अनर्थ निर्माण होतात. मी सांगत आहे ती आपल्या सद्गुणांची कहाणी आहे ! दुर्गुणांमुळे समाज विघटित होणे हे नेहमीचेच आहे; पण आपण सद्गुण म्हणून ज्यांची जोपासना करतो त्यांतूनच आपल्या समाजविमुख, आत्मकेंद्रित दृष्टीमुळे अशी चमत्कारिक मूल्ये निर्माण होतात, की त्यांचा परिणाम विघातक व्हावा !
 आपल्या समाजातील कित्येक जमातींनी भूतदयेमुळे मांसाहार वर्ज्य केला. आता भूतदया हा केवढा सद्गुण आहे ! पण आपला हा धर्म अखिल समाजधर्माशी मिळून कसा बनेल याचा विचार स्वप्नातही, आमच्या मनाला शिवत नसल्यामुळे त्यातून काय निर्माण झाले पाहा ! मांसाहारी लोकांपेक्षा शाकाहारी लोक स्वतःला श्रेष्ठ समजू लागले. त्यांचा प्रथम निराळा गट व नंतर स्वतंत्र जाती झाली, इतरांना ते लोक तुच्छ लेखू लागले व दूर ठेवू लागले; आणि त्यामुळे जातिमत्सर वाढून त्यांची भूतदया विघटनेस मात्र कारण झाली ! प्राण्यांची हत्या होऊ नये या शुभ व्रतांतून इतके तीव्र जातिद्वेष निर्माण झाले, की त्यामुळे मनुष्यहत्या होऊ लागली. याचे कारण एकच; स्वतःच्या भूतदयेच्या सामाजिक मूल्यांचा आपण विचार करीत नाही. वैयक्तिक व सामाजिक धर्माचा समन्वय घालण्याची दक्षता आम्ही बाळगीत नाही.

आमच्या स्वच्छतेच्या शास्त्रात

 आमचे स्वच्छतेचे शास्त्र पाहा. आम्ही भारतीय स्वच्छतेचे भोक्ते आहो यात शंका नाही. आपल्या घरात आपण स्वच्छता ठेवतो ती वाखाणण्याजोगी असते. खेड्यांतसुद्धा जमिनी स्वच्छ सारवलेल्या, भांडी लख्ख घासलेली, झाडलोट आस्थेने केलेली असे घराचे स्वरूप आपल्याला दिसते; पण ते घरात ! उंबरठ्याबाहेर बघा. घरातली सर्व घाण तेथे चार फुटांवर टाकलेली असते. ती कुजत असते, तेथे दुर्गंधी येत असते; पण तो विचार घरातल्या माणसांच्या स्वच्छतेच्या शास्त्रात येत नाही. कारण ती जागा सार्वजनिक आहे. आणि सार्वजनिक जीवनात स्वच्छता आणावी ही कल्पना आमच्या मनात उद्भवतच नाही; ते आमच्या इतिहासातच नाही.
 मुंबईच्या उत्तम इमारतीतून अगदी आजच्या घटकेलासुद्धा हे किळसवाणे दृश्य दिसते. इमारतीच्या मध्ये असलेल्या चौकात वाटेल ती घाण टाकलेली असते. अगदी चौथ्या, पाचव्या मजल्यावरून आमटी, वरण, निःशंकपणे खाली ओतून देतात. शाळा-कॉलेजांतल्या कन्यका केशरचना करीत असताना, केस स्वच्छ करीत करीत त्यातला केरकचरा त्या चौकात टाकीत असतात. ब्रशाने तोंड धुणारे लोक गॅलरीतच शेजारी उभे राहून, मुखाची स्वच्छता करीत असतानाच खाली मुखरस टाकीत असतात. ती जागा एकट्या कोणाची नाही; सर्वांची आहे. पण म्हणून ती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वाची आहे असे न मानता, तेथे घाण करण्याचा हक्क मात्र सर्वांचा आहे, अशी श्रद्धा नागरिक बाळगतात ! या इमारतीतील बिऱ्हाडे आतून अगदी स्वच्छ असतात; पण दोन बिऱ्हाडांचा जेथे संबंध येतो, तेथे घाण साचलेली असते. वैयक्तिक जीवन आम्ही स्वच्छ ठेवू; पण सार्वजनिक जीवन हक्काने घाण करू !
 कोणतेही कृत्य करताना, कोणतेही धोरण ठरविताना आपल्या अखिल समाजाचे चित्र डोळ्यांपुढे ठेवावे, अखिल समाजाच्या जीवनाचे आपण अंशभागी आहो ही जाणीव मनात ठेवावी, असा संस्कार भारतीय मनावर गेल्या सातशे- आठशे वर्षांत झालेलाच नाही. ब्रिटिश राज्य येथे आल्यानंतर ही कल्पना प्रथम वातावरणात निर्माण झाली. त्याच्या आधीच्या काळात आपण एकमेकाशेजारी एका भूमीवर राहात होतो इतकेच. त्या सहवासाने आपल्यामध्ये सहजीवन, सामुदायिक जीवन निर्माण झाले नव्हते. याचे कारण असे, की धर्म, राजकारण इत्यादी सामाजिक जीवनाच्या भिन्न क्षेत्रांतील भारतीयांचे तत्त्वज्ञानच सर्व व्यक्तिवादी होते. धर्मामध्ये मोक्ष हे आमचे अंतिम प्राप्तव्य होते. त्या मोक्षधर्माला व्यक्तीच्या त्यागाची, संयमाची, तपश्चर्येची अत्यंत आवश्यकता असते. पण सामाजिक गुणांची त्याला काडीइतकीही जरूर नाही. मोक्ष प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्रपणे मिळवावयाचा असतो, त्यासाठी संघटनेची मुळीच आवश्यकता नाही. पाच- पंचवीस, पाचशे, हजार असे लोक एकत्र येऊन मोक्षधर्म साध्य करावयाचा नसतो; ते अगदी एकट्याचे, अगदी वैयक्तिक कार्य आहे. त्यामुळे आपले सर्व निकष, सर्व मूल्यमापन तसे होऊन बसले आहे.
 स्त्रीपुत्र, आप्तइष्ट हे मोक्षाच्या आड येतात असे वाटताच त्यांचा संबंध तोडावा, त्यांच्याविषयी उदासीन व्हावे असे येथले धर्मधुरीण शिकवू लागले. कोणतेही कृत्य करताना कुटुंबहित दृष्टीसमोर ठेवावे हेसुद्धा जेथे मान्य नाही, किंवा तसे न करण्यातच जेथे भूषण मानले जाते, तेथे समाजहित दृष्टीपुढे ठेवण्याची जाणीव कशी निर्माण होणार ? राजकारणातही हेच झाले. आजही कोणी कोणी जुन्या काळाचे अभिमानाने वर्णन करतात, की आमची ग्रामव्यवस्था अशी स्वयंपूर्ण होती की तिकडे राज्यकारभारात कसल्याही उलथापालथी होवोत, शेतात नांगर धरणाऱ्या शेतकऱ्याला त्याची दखल नसे. पहिले राज्य जावो, दुसरे येवो, राजा स्वकीय असो, परकीय असो, आमच्या शेतकऱ्याच्या व त्याच्या भोवताली असणाऱ्या कुंभार, लोहार, साळी, माळी, सोनार यांच्या जीवनाशी त्याचा कसलाही संबंध येत नसे. याचा अर्थ असा, की आमच्या वैयक्तिक जीवनाच्या आखणीत सार्वजनिक जीवनाच्या विचाराला स्थान नव्हते; इतकेच नव्हे, तर तसे नसण्यात आपण भूषण मानीत होतो.

सांघिक जीवनाच्या गुणांची कमतरता

 वैयक्तिक जीवनात परमोच्च बिंदू गाठण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असताना सांघिक जीवनात आम्ही सर्वत्र नामोहरम होतो ही दुःखद स्थिती म्हणजे आपल्या पूर्वीच्या तत्त्वज्ञानाचा परिपाक आहे. गेल्या शंभर वर्षांत ही स्थिती पुष्कळच सुधारली आहे; पण अजूनही आपल्या अनेक योजनात आपल्याला जे अपयश येत आहे त्याचे, पंडितांच्या मते, प्रधान कारण असे की योजना कार्यवाहीत येत असताना अखिल भारतीय प्रपंचाची दृष्टी कार्यकर्त्यांच्या अवलोकनात नसते. स्वातंत्र्यानंतर प्रारंभीच आखलेल्या प्रांतविकास योजनांवर टीका करताना डॉ. ग्यानचंद यांनी भिन्न प्रांतांत भिन्न कार्यकर्त्यांत, योजनेच्या भिन्न विभागांत सहकार्य नाही, एकसूत्रता नाही, परस्परसंगती नाही, अंतिम साध्याविषयी एकवाक्यता नाही, याच दोषांवर सारखा भर दिला आहे. एके ठिकाणी तर त्यांनी म्हटले आहे, की भिन्न खात्यांत एकसूत्रता व सहकार्य घडवून आणण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती तिच्या कामातच सुसंगती नव्हती !
 कार्याचे धोरण आखताना अखिल भारताचे चित्र कोणाच्याच डोळ्यांपुढे नसते हा ग्यानचंद यांचा मुख्य आरोप आहे. आणि या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना पंडित जवाहरलालजींनी आणखी पुढे जाऊन सांगितले आहे, की केंद्र व प्रांत यांच्यांत आणि प्रांताप्रांतांत सहकार्य व एकवाक्यता नाही एवढेच नव्हे तर एका प्रांताच्या भिन्न खात्यातही सहकार्य दिसत नाही ! येथे एक गोष्ट मुद्दाम निदर्शनास आणावयाची आहे ती ही, की आळस, अनभ्यास, अज्ञान, नालायकी, कर्तृत्व- शून्यता इत्यादी दुर्गुण वरील अपयशास कारण झालेले आहेतच; पण एवढ्या प्रचंड योजनेत प्रत्येक प्रांतात कार्यनिपुण, दक्ष, तंत्रविशारद असे कार्यकर्तेही होते व आहेत. पण सांघिक जीवनाच्या गुणांची कमतरता त्यांच्या ठायीही असल्यामुळे आपल्या बहुतेक योजना कोसळून पडत आहेत !
 'क्रिकेट हे आपल्या जीवनाचे प्रतिबिंब आहे' असे मी म्हटले ते या अर्थाने. वैयक्तिक गुणांच्या दृष्टीने कार्यनिपुण, क्रीडा कुशल असलेले विख्यात असे खेळाडू एकत्र येऊनही आपल्याला अपयश येते ! कारण अकरा लोकांची शक्ती एकाच्या अकरा पट करण्याची विद्या आपल्याजवळ नाही ! आपण एकमेकांच्या सान्निध्यात आलो की अपूर्णकांचा गुणाकार तयार होतो.

आणि हे कशाचे निदर्शक ?

 या ठिकाणी एक गमतीचा विचार मनात येतो. अलंकारिक अर्थापुरता का होईना पण तो खरा आहे असे वाटते. आपल्या हॉकीच्या खेळाकडे दृष्टी टाकून पाहा. या खेळाच्या संघाने गेल्या पंचवीस वर्षांत सारखे विजय मिळविले आहेत. जर्मनी, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स इत्यादी सर्व देशांत तो अजिंक्य ठरला आहे. तेव्हा सांघिक जीवन कसे असावे याचा 'भारतीय हॉकी संघ' हा उत्कृष्ट आदर्श आहे. पण या हॉकीच्या खेळाची व त्या संघाची भारतीय लोक कितपत दखल घेतात ? क्रिकेटच्या तुलनेने कितपत घेतात ? शाळा-कॉलेजात त्याची उपेक्षाच असते. क्रिकेटसारखे त्याचे मोठे सामनेही होत नाहीत. कारण, समाजाला त्याची गोडी नाही आणि सरकारलाही त्याचे फारसे सोयरसुतक नाही. परवा हेलेसिंकीला विजय मिळविणाऱ्या संघाजवळ मायदेशी परत येण्यापुरता पैसा नव्हता! प्रत्येक देशात सामने करून त्यावर पैसा मिळवून त्यांना परत यावे लागले.
 हा केवळ योगायोग असेल, आपण मुद्दाम, हेतुपूर्वक असे केले असे मी म्हणत नाही. पण हा योगायोग कशाचा निदर्शक आहे ? व्यक्तिगत प्राविण्याने संपन्न असूनही संघविद्या नसल्यामुळे ज्या क्रिकेटमध्ये जगाच्या आखाड्यात आपल्याला एकदाही विजय मिळवता आला नाही त्याच्यासाठी आपण जीव टाकतो ! आणि वैयक्तिक प्राविण्याच्या जोडीला सांघिक खेळाला अवश्य त्या गुणांची जोपासना करून, ज्या हॉकीने अखंड दोन तपे सर्व लहानथोर राष्ट्रांचा पराभव करून, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक क्रीडास्पर्धात भारताचे नाव उजळून टाकले आहे, त्याविषयी आपण पूर्णपणे उदासीन आहो ! त्याची आपण पूर्ण उपेक्षा करतो. योगायोगाने का होईना, पण सध्या असे घडते आहे, की आपल्याला क्रिकेटच्या संघात दिसणारे स्वतःचे प्रतिबिंब हॉकीच्या खेळात दिसणाऱ्या प्रतिबिंबापेक्षा जास्त प्रिय, जास्त आकर्षक वाटते !

नोव्हेंबर १९५३