माझे चिंतन/समृद्धीचा शाप
मनुष्य गुन्हा का करतो, पापाचरणास का प्रवृत्त होतो याची प्राचीन काळापासून धर्मशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, राजकारणी हे मीमांसा करीत आलेले आहेत. अतृप्त वासना, लोभ, मोह हे सर्व प्रकारच्या पापांमागे कारण असतात असेच मत बहुतेक सर्व शास्त्रज्ञांनी दिलेले आहे. 'बुभुक्षितः किं न करोति पापम् ?' हे वचन प्रसिद्धच आहे. भावार्थ असा की, माणसांची कोणतीही भूक शमली नाही की, तो ती शमविण्यासाठी वाटेल ते पाप करतो. सामान्यतः धनलोभ, स्त्री-मोह व सत्तालोभ याच वासना सर्वत्र प्रबल असतात आणि त्यातील धनलोभ हाच मनुष्याला जास्तीकरून गुन्हा करण्यास प्रवृत्त करीत असतो. कामवासना ही कमी प्रबळ असते असे नाही. पण तिचा काही तरी उपशम नित्याच्या संसारातच व्हावा अशी सोय असते. सत्तालोभ फार भयंकर असतो. पण बहुसंख्य लोक यापासून मुक्त असतात. कारण त्यांना नित्याच्या विवंचना खूप असतात. धनलोभ मात्र सर्वव्यापी आहे; आणि त्याच्या तृप्तीत खोट आली की, दुसरा काही इलाजच चालत नाही. म्हणूनच 'दारिद्र्यं इति यत् प्रोक्तं पर्यायमरणं ही तत् ।' दारिद्र्याला पर्यायी शब्द मरण हाच आहे 'दरिद्रं पातकं मन्ये' । 'अर्थस्य पुरुषो दासः ।' 'अन्नाची भ्रान्त यासारखी पापी अवस्था दुसरी नाही,' 'मृतो दरिद्रः पुरुषः ।' इ. वचने जुन्या ग्रंथांत जागोजाग आढळत असतात. तेव्हा दारिद्र्य हेच सर्व गुन्हेगारीच्या बुडाशी कारण आहे, असा मागल्या काळच्या बहुतेक सर्व शहाण्या पुरुषांनी सिद्धान्त केला होता, असे दिसते.
समाजवादी समाजरचना
साठ-सत्तर वर्षापूर्वी मार्क्सवादाचा सर्वत्र विशेष प्रभाव पडू लागल्यानंतर गुन्हेगारीची मीमांसा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली; आणि धनसाधने हीच सर्व क्षेत्रांत निर्णायक होत, असा मार्क्सचा सिद्धान्त असल्यामुळे दारिद्रय, गरिबी हीच सर्व प्रकारच्या पापाला कारण असते, हे मत फार प्रभावीपणे मांडले जाऊ लागले. त्यानंतर गुन्हेगारीचे विवेचन जास्त शास्त्रीय पद्धतीने होऊ लागले, आणि सध्याच्या दारिद्र्याला व पर्यायाने गुन्हेगारीला भांडवलशाही हीच कारणीभूत आहे, असा निष्कर्ष त्यातून निघाला व तोच हळूहळू सर्वमान्य झाला. अर्थातच भांडवलशाही हीच या सर्व अनर्थाला कारण असेल तर ती नष्ट करून समाजवादी समाजरचना स्थापन करणे हा त्यावर उपाय होय, हा विचार ओघानेच प्राप्त झाला. जमिनी, कारखाने, खाणी, अरण्ये, ही जी धनोत्पादनाची साधने, ती समाजाच्या- म्हणजे सरकारच्या मालकीची करणे हे समाजवादी समाजरचनेचे मुख्य लक्षण. तशी ती मालकीची झाली की, त्या उद्योगातून मिळणारा नफा भांडवलशाहीऐवजी सरकारला- म्हणजेच समाजाला मिळेल, त्याचे दारिद्र्य नष्ट होईल व मग अर्थातच गुन्हेगारीला आळा बसेल, ही विचारसरणी प्रचलित झाली व तिला सर्व सुशिक्षित जगाची मान्यता मिळाली.
या समाजवादी समाजरचनेमुळे सर्व पापप्रवृत्ती, सर्व गुन्हेगारी नष्ट होईल, अशी मार्क्सची श्रद्धा इतकी दृढ होती की, ती अमलात आल्यानंतर सरकार ही संस्था नष्ट होईल, तिची गरजच राहणार नाही, असे भविष्य त्याने वर्तविले होते. त्याने आणखी असेही सांगितले होते की, शास्त्रांची वाढ झाली, तंत्रविज्ञान प्रगत झाले की उत्पादन इतके वाढेल, समृद्धी इतकी येईल की कोणत्याही मनुष्याला दिवसातून चार तासांपेक्षा उपजीविकेसाठी जास्त काम करण्याची गरज राहणार नाही. मग राहिलेल्या वेळात माणूस काय करील ? तो कला, साहित्य, विज्ञान यांच्या अभ्यासाने तो वेळ कारणी लावील आणि त्यामुळे समाजाच्या संस्कृतीची पातळी उंचावेल, असे मार्क्सचे मत होते. आज अन्नवस्त्रासाठी सोळा- अठरा तास माणसाला काम करावे लागत असल्यामुळे कला, साहित्य, विज्ञान, क्रीडा ही धनिकवर्गाची मिजास आणि मक्तेदारी होऊन बसली आहे. या संस्कृतिसाधनांची उपासना करण्यास कष्टकरी वर्गाला वेळच नसतो आणि शक्ती व उत्साहही नसतो. पण समाजवादी समाजरचना येऊन पुरेसे अन्नवस्त्र चार तासांच्या श्रमांनीच मिळू लागल्यावर साहजिकच मनुष्य राहिलेला वेळ संस्कृति- संवर्धनात घालवील, अशी अपेक्षा होती.
मार्क्सची शासनाविषयीची आणि 'चार तासांचा दिवस' या कल्पनेविषयीची एकांतिक मते कोणालाच मान्य झाली नाहीत हे खरे. पण सर्वसामान्यतः दारिद्र्यामुळे मनुष्य गुन्हेगारीस, दुसऱ्याच्या धनाच्या अपहारास प्रवृत्त होतो, दारिद्र्यामुळेच तो चोर-दरोडेखोर बनतो, हे मत सर्वांना सयुक्तिक वाटत होते. कारण दारिद्र्य हे पापप्रवृत्तीचे प्रधान कारण होय हे प्राचीन काळापासून सर्वांनाच मान्य होते व आजही प्रत्यक्षात तसे दिसत होते. त्यामुळे अपार समृद्धी येऊन सर्वांना गरजेपुरते अन्नवस्त्र मिळू लागले की गुन्हेगारीला खूपच आळा बसेल, समाजातली निम्मी-पाऊण गुन्हेगारी घटेल हा विचार सर्वानाच पटत होता.
विपरीत अनुभव
पण प्रत्यक्षात अनुभव मात्र अत्यंत विपरीत असा आला. पाश्चात्त्य देशांत, विशेषतः अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, बेल्जम, जर्मनी या देशांत आज खरोखरीच समृद्धी आलेली आहे, आणि या सर्व देशांत समाजवादी समाजरचना अवतरली नसली तरी कल्याणकारी शासने तेथे निश्चित स्थापन झाली आहेत. या देशांत अन्नवस्त्रालाही महाग असे लोक फारच थोडे, जवळजवळ नाहीतच. पूर्वीच्या मानाने पाहता त्यांची संख्या आज नगण्यच आहे. अमेरिकेत तर आज ऋद्धि- सिद्धी अवतरल्यासारखे झाले आहे. आणि इंग्लंड, स्वीडन येथे समाजवादी समाजरचनाही अस्तित्वात आली आहे. प्रारंभीच्या सिद्धान्तान्वये पाहता या देशांत गुन्हेगारीचे समूळ निर्मूलन होणे, निदान तिला पुष्कळ आळा बसणे अवश्य होते. पण तसे तर झालेले नाहीच; उलट या देशांत गुन्हेगारी अगदी भयानक प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि काही पंडितांनी तर ही गुन्हेगारी आणि समृद्धी यात कार्यकारण संबंध आहे, गुन्हेगारी हा समृद्धीचा शाप आहे, असे मत मांडले आहे. श्रीमंत देशांतले हे दृश्य इतके विपरीत आहे की, जगातले विचारवेत्ते हादरून जाऊन, मूढ होऊन त्याकडे बघत राहिलेले आहेत.
लक्ष्मी व आक्काबाई
समाजवादी समाजरचना स्वीडनमध्ये आज पूर्ण झाली आहे, असे मानले जाते. रेल्वे, पॉवर स्टेशन्स, टेलिफोन, टेलिग्राफ, फॉरेस्ट, इंडस्ट्रीज, मद्य, तंबाखू खाणी, बांधकाम या सर्ववांर तेथे आज शासकीय मालकी आहे. राहिलेल्या सर्व उद्योगांवर शासनाचे नियंत्रण आहे. यातून सरकारला जे धन मिळते त्याचा विनियोग नागरिकांना सुख-समृद्धी उपलब्ध करून देण्याकडेच होत असतो. प्रत्येक मुलामागे मातेला वर्षाकाठी चारशे रु. मिळतात. शाळेत दुपारी सर्व विद्यार्थ्यांना जेवण मोफत मिळते. विद्यापीठाचे शिक्षण सर्वांना विनाशुल्क मिळते. वैद्यकीय खर्चापैकी पंचाहत्तर टक्के खर्च सरकार देते. रुग्णालयात सर्वांना उपचार फुकट असतात. वृद्धांना पेन्शन व सुखसोयी पुरेशा मिळतात. अनाथ, पंगू लोकांच्या उपजीविकेची सर्व जबाबदारी शासन घेते. या सर्वामुळे स्वीडनला भूवरील नंदनवन असे म्हणतात. निदान दहा एक वर्षापूर्वीपर्यंत तरी म्हणत होते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, या ऋद्धि-सिद्धीच्या बरोबरच स्वीडनमध्ये आक्काबाईनेही प्रवेश केला आहे, हे आता सर्वांच्या ध्यानात येत आहे. गेल्या १७ वर्षांत तेथील गुन्हेगारी दुपटीने वाढली आहे. खून व दरोडेखोरी ८० टक्यांनी वाढली आहे. स्त्रियांवर शे. २८ टक्के जास्त बलात्कार होतात. मद्य व मादक द्रव्यांचे सेवन तर साथीच्या रोगासारखे पसरत आहे. आत्महत्येचे प्रमाण सारखे वाढत चालले आहे. आणि सर्वात उद्वेगकारक म्हणजे १५ वर्षाच्या आतील मुलांत गुन्हेगारी तिपटीने वाढली आहे.
संघटित गुन्हेगारी
अमेरिकेच्या समृद्धीला सर्व जगात तोड नाही. पण त्याचबरोबर तेथल्या गुन्हेगारीलाही सर्व जगात तोड नाही. अमेरिकेतल्या गुन्हेगारीचा विशेष हा की, ती गुन्हेगारी संघटित आहे. टोळी करून दरोडेखोर नेहमीच राहतात. पण त्यांची टोळी पन्नासशंभर माणसांची व एखाद्या लहानशा तालुक्यापुरती मर्यादित असते. अमेरिकेतला गुन्हाव्यवसाय एखाद्या बँकेच्या किंवा उद्योगकंपनीच्यासारखा चालतो. त्याची मुख्य शाखा एके ठिकाणी व सर्व देशभर उपशाखा असतात; तसेच येथील ठगव्यवसायाचे आहे. कुंटणखाने, जुगारअड्डे, मादक द्रव्यांची विक्री, मुले-माणसे खंडणीसाठी पळविणे, दहशत घालून पैसे उकळणे हे या गुन्हेगारांचे मुख्य धंदे असून त्यासाठी खून, जाळपोळ, विध्वंस, बलात्कार, अत्याचार हे करण्यास ते मुळीच मागेपुढे पाहात नाहीत. केफाव्हर नावाच्या सीनेटरने यासंबंधीची सविस्तर माहिती देऊन शेवटी म्हटले आहे की, अमेरिका हा देश या गुन्हेगारीमुळे विनाशाच्या कडेवर येऊन ठेपला आहे. या गुन्हेगारीतील जास्त भयावह गोष्ट म्हणजे अनेक राजकारणी पुढारी, मुत्सद्दी, अधिकारी या ठगांना सामील असतात व त्यांच्या पाठीशी राहून त्यांचे संरक्षण करतात! यासाठी हे डाकू आपल्या धंद्यात त्या राजकीय पुढाऱ्यांची पाती खुबीने ठेवतात!
माफिया या नावाची या डाकूंची संस्था असून तिचे जाळे जगभर पसरलेले आहे. जुगार, कुंटणखाना, मादक द्रव्यांची चोरटी आयात हे धंदे तर ती करतेच, पण याशिवाय आकड्यांच्या जुगारावर ती दरसाल ५०० कोटी डॉलरची उलाढाल करते. १९६२ साली मोरायरिटी या कुविख्यात डाकूला पकडले तेव्हा त्याच्याजवळ २४ लक्ष डॉलरच्या नोटा सापडल्या. डेट्राइट येथील गोथाम हॉटेलवर पोलिसांनी छापा घातला, तेव्हा त्या एका हॉटेलात दरसाल २ कोटींचा जुगार चालतो, असा हिशेब सापडला. रोज दोन कोटी अमेरिकन नागरिक या माफियाच्या आकड्यावर पैसे लावतात, आणि श्रमाने मिळविलेला पैसा कोटीच्या राशीने त्या डाकूंना मिळवून देतात. एवढा अवाढव्य धंदा, पोलिसांच्या पकडीत न सापडता करणारे लोक किती सावध, किती दक्ष, किती कार्यक्षम असले पाहिजेत आणि पोलीस, अधिकारी, न्यायाधीश व राजकारणी पुढारी त्यांना किती सामील असले पाहिजेत याची सहज कल्पना येईल. नॅशनल शेरीफ असोसिएशनपुढे भाषण करताना डॉ. रूथ अलेक्झांडर या पंडितेने म्हटले आहे की, "आपल्या देशाचे राहणीमान सर्व जगात उच्च आहे. पण आपल्या गुन्हेगारीचे मानही तितकेच उच्च आहे."
प्रगतीचे लक्षण !
जोफ्रे लूसी याने निरनिराळ्या देशांतील वर्तमानपत्रांतील माहिती जमा करून सध्या जगातील बाल तरुण मुले-मुली कोणत्या दिशेने वाहवत चालली आहेत सांगितले आहे. त्याच्या प्रत्येक परिच्छेदाचे पालुपद हेच आहे की कल्याणकारी राज्य, त्यामुळे येणारे उच्च राहणीमान आणि गुन्हेगारीची वाढ ही सांगातीच वाटचाल करीत आहेत. समृद्धी आली की पाठोपाठ गुन्हेगारी, विशेषतः बाल- तरुण गुन्हेगारी आलीच. ब्रिटनचे उदाहरण पाहा. १९६४ च्या एप्रिलांत ८०० तरुण मवाली व त्यांच्या ४०० मैत्रिणी यांनी क्लॅक्टन, ऑस्टेंड या गावी नानाप्रकारचे अत्याचार केले. घरांतील हॉटेलांतील सामानाची मोडतोड केली. नोकरांना मारले व मुलींच्या वरून रक्तपात केला. हे सर्व तरुण स्कूटरवरून मोटारसायकलवरून आले होते. त्यांतील बहुतेक सुशिक्षित मध्यम वर्गातून आले होते. हा वर्ग इतके दिवस सौजन्य, सभ्यपणा, कायदापालन यासाठी नावाजला होता. आता पाशवी अत्याचार, स्वैरसंभोग, नीतिभ्रष्टता ही आक्काबाई या वर्गात शिरत आहे. १९६३ साली या वर्गातील बालवयी गुन्हेगारांनी जवळ जवळ ४ कोटी रुपयांची मालमत्ता जाळून पोळून टाकली. कल्याणकारी राज्याला हे अगदी लांच्छनास्पद आहे असे 'गार्डियन' या पत्राने म्हटले आहे. पण समृद्धीचे हेच लक्षण सर्वत्र होऊ पाहात आहे. समृद्धीचा हा शापच आहे असे सर्वत्र दिसत आहे.
या श्रीमंत देशांत स्वैरसंभोगाला तर कसली मर्यादाच राहिलेली नाही. बेल्जममधील एक मॅजिस्ट्रेट म्हणतात की, चौदा वर्षांच्या आतील मुला-मुलींत इतका अनाचार चालतो की, पुष्कळ वेळा आपण कितीजणांशी संगत झालो हेही त्यांना आठवत नसते ! ऑस्ट्रेलियातील सिडने विद्यापीठातील पुरुष विद्यार्थी नृत्यसमयी पुष्कळ वेळा पूर्ण नग्न होऊन नाचतात. तेरा ते सतरा वयाच्या ३०० मुली पोलिसांनी पकडल्या होत्या. त्यांतील २४० जणांनी किमान ५० वेळा तरी समागम केला होता. कॅनडातील १८ ते २१ वर्षांच्या मुलांची गुन्हेगारी गेल्या ५ वर्षात २१ टक्क्यांनी वाढली आहे. टोरंटो येथील शाळांना विद्यार्थ्यांनी केलेल्या विध्वंसापायी दरसाल सव्वा कोटी रुपयांचा भुर्दंड बसतो. साऊथ आफ्रिका, अर्जेंटिना, व्हेनेझुएला, मेक्सिको, ब्राझील येथील तरुणांच्या अत्याचारांची कहाणी सांगून दरवेळी लेखक म्हणतो की, राहणीमान व बालगुन्हेगारी यांची वाढ सम वेगानेच चालली आहे. व्यभिचार, गर्भपात, देहविक्रय, आत्महत्या, जाळपोळ, मारामारी, रक्तपात हे गुन्हे हेच जणू प्रगत देशांचे लक्षण होत आहे. एक युरोपीय समाजसेवक कडवटपणे म्हणाला, आज बालतरुणवयीन ठगडाकूंचे विपुल प्रमाण दाखविल्यावाचून आमचा देश प्रगत आहे, असा दावा कोणत्याच देशाला करता येणार नाही !
जगाचे आणि त्यातील बाल-तरुणांचे हे चित्र अत्यंत विकट आहे. घोरदर्शन आहे. कोणत्याही विचारी माणसाची झोप उडून जावी इतके ते विपरीत व अशुभ आहे. जगातील प्रत्येक देशाच्या समाजधुरीणांची झोप खरोखरच आज उडून गेली आहे. भूकंपाचे धक्के काहीच नव्हेत, असे हे धक्के आहेत. पुराणात कल्पान्त जवळ आल्याची जी लक्षणे सांगितली आहेत तीच ही असे पुष्कळांना वाटते. क्वचित असे वाटते की, त्याहूनही ही लक्षणे भयंकर आहेत. कारण सामान्यतः प्रौढ, सज्ञान, तिशी-पत्तीशी चाळिशीचे लोक गुन्हे करतात. पण सध्या रि-ओ-डी जानेरो येथील बालगुन्हेगारांचे न्यायाधीश डॉ. गुसमाओ यांनी म्हटल्याप्रमाणे, प्रौढांचे गुन्हे आज तरुण व बाल जास्त करीत आहेत. कल्पान्ताच्या लक्षणाहून हे लक्षण खचित निराळे आहे आणि दुसरे म्हणजे ही गुन्हेगारी श्रीमंत, सुविद्य, सभ्य गणलेल्या कुटुंबातील मुलांमुलींची आहे. समृद्ध देशात आज एकच प्रश्न पुनःपुन्हा विचारला जात आहे, आईबाप कपाळावर हात मारून तो विचारीत आहेत- 'अहो, या मुलींना काय कमी होते म्हणून या चोऱ्या करतात, आणि देहविक्रय करतात ?' 'अहो, ही मुले सहजासहजी सुरामारीस का प्रवृत्त होतात, यांची वये झाली की काय म्हणून यांनी भेटेल त्या मुलीवर बलाकार करावा ?' हेही लक्षण कल्पान्त लक्षणाहून निराळे आहे. म्हणूनच जगातले विचारवंत यांची कारणे शोधण्यात, उपपत्ती बसविण्यात अहोरात्र मग्न झालेले आहेत. ते विचारवंत काय म्हणतात ते आता पाहू.
जबाबदारीतून मुक्त
श्रीमंत संपन्न देशात बालतरुणांचा हा जो अधःपात झाला आहे त्याचे, या विचारवंतांच्या मते, पहिले कारण म्हणजे समाजवादी समाजरचना हे होय. हे विधान प्रथम कानाला मोठे विचित्र वाटते. पण त्यामागची विचारसरणी ध्यानात आली म्हणजे त्याविषयीचे आश्चर्य लोपून त्यातील सत्यता स्पष्ट दिसते आणि हे आधीच आपल्या ध्यानात यावयास हवे होते, असे वाटू लागते. 'बेजबाबदार' या शब्दाचा मूळ अर्थ आपण ध्यानी घ्यावा. ज्याच्या शिरावर कसलीही जबाबदारी नाही, कर्तव्याचा भार नाही, त्यामुळे ज्याच्यावर कसलीही बंधने नाहीत, आणि म्हणूनच ज्याच्या वागण्याला कसलेही ताळतंत्र नाही, असा मनुष्य, असा त्या शब्दाचा अर्थ आहे. मनुष्य कार्यप्रवण होतो, कष्ट करतो, चिंता वाहतो, परिस्थितीशी झगडा करतो; काही मनोनिग्रह, संयम करतो; आपल्या काही भुका मारतो, वासना दडपतो, हे केव्हा घडते ? त्याच्यावर काही जबाबदारी असेल तर ! बायकामुलांचे पोषण करावयाचे आहे, रक्षण करावयाचे आहे, त्यांच्या व स्वतःच्या पुढील आयुष्याची तरतूद करावयाची आहे, यांतून वेळ, शक्ती, धन शिल्लक राहिल्यास काही सामाजिक कार्य करावयाचे आहे, आपल्या बांधवांना साह्य करावयाचे आहे, अशा तऱ्हेची जबाबदारी मनुष्याच्या शिरावर असली तरच तो कष्ट करतो संयम करतो, वाटेल ती झीज सोसतो व प्रसंगी आत्मबलिदानही करतो. समाजवादी समाजरचना आणि कल्याणकारी राज्य यांनी आपल्या नागरिकांना या सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त केले आहे. मूल जन्माला येताच अनुदान सुरू होते. त्याच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी शासनावर असते. त्याचा रोजगार निश्चित आहे. घरातल्या सर्व माणसांना वैद्यकीय मदत मोफत मिळते. रुग्णालयाचाही खर्च नाही. म्हातारपणाची सर्व व्यवस्था शासनच करते ! मग प्रपंचातील कर्त्या पुरुषावर जबाबदारी कसली ? इतर देशांत शिक्षण चालू असतानाच विद्यार्थ्यांच्यावर जबाबदाऱ्या येऊन पडतात. आपली धाकटी भावंडे, आपले मातापिता यांची जबाबदारी हळूहळू आपल्यावर येणार आहे, ही जाणीव त्या वयातच त्यांच्या ठायी निर्माण होते. अनेकांना स्वतःचे शिक्षणही स्वतःच करावे लागते. या कौटुंबिक कर्तव्याचीही आच समाजवादी समाजरचनेत आणि कल्याणकारी राज्यात मनुष्याच्या मनाला नसते. मग समाजऋणाची आच कोटली ? समाजाची सर्व जबाबदारी शासनाने उचललेलीच असते ! निसर्गतः मनुष्याच्या वासना फार प्रबळ असतात. त्यांना स्वैर सोडावे, वाटेल ते करून त्या शमवाव्या, बंधन कसलेही मानू नये ही त्याची मूळ प्रवृत्ती असते. असा हा मनुष्य या वासनांवर नियंत्रण घालावे, संयम करावा, त्याग करावा, हे कुटुंबात व समाजात शिकतो. या संबंधीचा काही ध्येयवाद त्याच्या मनात निर्माण झालेला असतो. काही उच्च आकांक्षा त्याला असतात. या सर्वांची मूळ प्रेरणा आई, बाप, बहीण, भाऊ, आप्त, स्नेही, शेजारी, गोत यांच्यासाठी काही करावे, या इच्छेत असते. समाजवादी समाजरचनेत ही प्रेरणाच नष्ट होते. आणि मग निग्रह, संयम कशासाठी असा प्रश्न येऊन सर्व संस्कृतीचा, प्रगतीचा हेतूच नष्ट होतो. मग मनुष्य विशेषतः तरुण स्त्री-पुरुष स्वैर होतात व अक्षरशः नंगा नाच घालू लागतात. सामान्य माणसाना मोठमोठी ध्येये पेलत नाहीत. आपल्या कुटुंबीयांचे भरणपोषण करावे हेच त्यांचे उद्दिष्ट असते. तेच नष्ट झाल्यामुळे त्यांचे जीवन अर्थशून्य झाले आहे.
नीरस जीवन
या सर्वांचा कळस सध्या स्वीडनमध्ये झाला आहे. याची कारणमीमांसा करताना तेथील एक मानसोपचारतज्ज्ञ डॉ. स्टेन मार्टिन्स म्हणतात, "आपले सध्याचे जीवनच मुळी अनैसर्गिक आहे. जीवशास्त्राशी विसंगत आहे. संघर्षहीन जीवन हे खरे सुखी जीवन नव्हे. घरासाठी, मुलाबाळांसाठी काही माया ठेविली पाहिजे, अशांसारखे गंभीर प्रश्न या जीवनात उद्भवतच नाहीत. स्वीडनमधील अतिनियोजन, अतिरिक्त अनुदानपद्धती यामुळे मनुष्याला स्वतः काही चिंतन, निर्णय करावेच लागत नाहीत. वैवाहिक जीवनात किंवा इतर बाबतीत जरा कोठे खुट्ट झाले की, लोक आत्महत्या करतात. याचा अर्थ हाच की, झगडण्याची, टक्कर देण्याची, त्यांना कधी सवयच नसल्यामुळे, शीतोष्ण सोसण्याची त्यांच्या ठायी शक्तीच नसते." कल्याणकारी राज्याचे अभ्यासक आज म्हणत आहेत की या जीवनात जी सुरक्षितता, जी शाश्वती लाभते तिच्यामुळे, त्यांतील चढउतार लोपले आहेत. ते एकसुरी, साहसहीन, साचेबंद झाले आहे. आज सर्व जगातल्या या स्वैराचारी तरुणांची एकच तक्रार आहे, ―― निरुद्योग ! नीरस, कंटाळवाणे आयुष्य! त्यात काही रस यावा म्हणून ही अनन्वित कृत्ये ते करतात. जीवनाला काही उद्दिष्ठच नाही, मग त्यात रस यावा कसा ?
खून, जाळपोळ, स्वैराचार यांहून जीवनात रस निर्माण करण्याचा आणखी एक मार्ग या निरुद्योगी तरुणांना सापडला आहे. 'एल. एस. डी!' नव्या प्रकारची अफू ! गेल्या वीस वर्षात पाश्चात्त्य देशांत मादक द्रव्यांची व्यसने वाढत आहेतच. त्यांत आता हे एक नवे द्रव्य आले आहे. पण ते आले ते मोठ्या इतमामाने आले आहे. याच्या सेवनाने समाधिसुख मिळते, ब्रह्मानंदाचा अनुभव येतो, या लोकातच स्वर्ग दिसतो, अशी त्याची जाहिरात त्याचे पुरस्कर्ते करीत असतात. आपल्याकडे गांजा, भांग याची वर्णने त्यांचे सेवन करणारे लोक अशीच करीत असतात. यांचे सेवन करून कायम धुंदीत व तंद्रीत राहणाऱ्या गोसाव्यांचे व साधूंचे अनेक पंथ भारतात : प्राचीन काळापासून आहेत. आता पाश्चात्त्य देशांत असे पंथ स्थापन होत आहेत. 'हिप्पी' हा त्यांपैकीच एक होय. अमेरिकेत बहुतेक सर्व शहरांत या पंथाच्या वसाहती आहेत. युरोपातही दहा- बारा नगरांत यांचा प्रवेश झाला आहे. घरेदारे सोडून हजारो मुले व मुली या वसाहतीत येऊन राहतात व तेथे अनन्वित कृत्ये करतात. 'एलएसडी' बरोबर 'अँफेटामाइन' हे दुसरे एक द्रव्य त्यांना सापडले आहे. याची विक्री करून त्यांना खूप पैसा मिळतो व स्वतः तीही नित्य त्या तारेत राहतात. आतापर्यंत हिरोइन, अफू, चरस ही द्रव्ये विकणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळ्या युरोपअमेरिकेत होत्याच. अजूनही त्यांचा चोरटा व्यापार 'माफिया' सारख्या संघटनांच्या द्वारे चालतोच. पण या टोळीतल्या कोणत्याही माणसाला स्वतः ही द्रव्ये सेविण्यास परवानगी नव्हती ! कारण त्यामुळे पोलिसांकडून पकडले जाण्याचा धोका जास्त असतो. 'हिप्पी' किंवा 'डिगरस' या पंथांत असली बंधने नाहीत. कारण असा हीन का होईना, पण व्यापार करून पैसे मिळवावे एवढेसुद्धा उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यांपुढे नाही. 'एलएसडी' व 'अँफेटामाइन' ही द्रव्ये इतकी भयंकर आहेत की हिरोइन, अफू, चरस ही त्यापुढे काहीच नव्हेत. त्याचा एक कण जरी पोटात गेला तरी मनुष्य धुंद व बेफाम होतो, वेडा होतो व खून, आत्महत्या, जाळपोळ करण्याची त्याची प्रवृत्ती अनिवार होते. ही मुले चौथ्या पाचव्या मजल्यावरून खुशाल उड्या टाकतात. आपण हवेत तरंगू शकू, असे त्यांना वाटत असते. ती धावत्या मोटारीपुढे उभी राहतात. आपण मोटारी थांबवू शकू असा भ्रम त्यांना असतो. अशा तंद्रीतच ही शेकडो मुले व मुली एकत्र राहतात. स्वैर समागमाला तेथे सीमाच नसते; खून- मारामाऱ्या नित्याच्याच आहेत. आसपासच्या लोकांना किळस येईल अशा घाणीत ती राहतात. स्वच्छतेचे व त्यांचे वाकडे आहे. गुप्तरोग त्यांच्यात इतके वाढत आहेत की तीच एक भयानक समस्या होऊन बसली आहे.
समृद्धीमुळे समाजवादी समाजरचना आली व तिच्यामुळे मनुष्याची कुटुंब व समाज यांच्याविषयीच्या जबाबदारीची जाणीवच नष्ट झाली, हे सध्या पाश्चात्त्य समाजाच्या अधःपतनाचे प्रधान कारण होय. त्याचा विचार येथवर केला. आता इतर कारणांचा विचार करावयाचा आहे. ह्यांतील एक कारण म्हणजे भग्न संसार होय.
भग्न संसार
अमेरिकेत आणि कमी-अधिक प्रमाणात इतर पाश्चात्त्य देशांतही दर तीन विवाहांतला एक विवाह नियमाने भंग पावतो. भग्न संसारात मुलांच्या मनावर सुसंस्कार होणे अशक्यप्राय असते. इतकेच नव्हे तर अशा अनेक संसारांतली मुले केवळ वाऱ्यावर सोडली जातात. आणि मग ती गुन्हेगार होतात. वर सांगितलेले हिप्पी, डिगरस अशांसारखे जे पंथ, त्यांच्या बुडाशी भग्न संसार हेच कारण आहे असे अनेक समाजशास्त्रज्ञ म्हणतात. संसार प्रत्यक्ष भंगलेला नसला तरी सध्या बहुसंख्य स्त्रिया दिवसभर कामधंद्याच्या निमित्ताने घराबाहेरच असतात. त्यामुळे अशा संसारातली मुले ही एका दृष्टीने मातृहीनच असतात. या प्रकारे कुटुंबसंस्था सर्वत्र मोडकळत चालली आहे आणि सध्याच्या बाल- गुन्हेगारीचे ते एक प्रधान कारण आहे असे मत प्रसिद्ध संशोधक सदरलँड व क्रेसी यांनी आपल्या 'क्रिमिनॉलजी' या ग्रंथात मांडले आहे. लहानपणी योग्य संस्कार झाले नाहीत, मुलांना शिस्त लावली गेली नाही, तर ती मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळतात. मुलांपेक्षा मुलींच्या बाबतीत ही हानी जास्त होते. भग्न संसारामुळे गुन्हेगारीकडे वळलेल्या मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असते असे त्यांचे मत आहे. प्रौढांमध्येही गुन्हे करून तुरुंगात जाणाऱ्यांत कुटुंबहीनांचे प्रमाण जास्त असते. एक लक्ष लोकांतील तुरुंगात जाणाऱ्यांचा इतिहास पाहता असे दिसते की सर्वात कमी प्रमाण विवाहितांचे, विधवा-विधुरांचे त्यापेक्षा जास्त आणि घटस्फोटितांचे सर्वोत जास्त ! (पृ. १७७- १७८)
कोणी कोणाचा नाही
कुटुंबविघटना हे वाढत्या गुन्हेगारीचे प्रमुख कारण आहे याविषयी दुमत नाही; पण काही पंडित असे सांगतात की, ही विघटनाही समृद्धीमुळे व तीतून निर्माण झालेल्या कल्याणकारी राज्यामुळेच झालेली आहे. स्त्रीचे व्यक्तित्व, तिचे अर्थार्जन त्यामुळे तिला मिळालेली स्वतंत्रता व समता यामुळे कुटुंबसंस्थेवर फार मोठा आघात झाला होता, हे खरे; पण यामुळे सर्वच कुटुंबे भग्न झाली होती असे नाही. पण आता मुलांची, त्यांच्या शिक्षणाची, रोजगाराची, सर्व कुटुंबीयांच्या आरोग्याची, मातापित्यांच्या वृद्धापकाळाची सर्वच जबाबदारी शासनाने घेतल्यामुळे कुटुंबातली माणसे एकमेकांची कोणी नव्हेत, असे झाले आहे. कोणाला कोणाची गरजच नाही, त्यामुळे कोणाला कोणाचा धाक नाही. आता वर म्हणजे दिवसभर श्रमून आलेल्या चार पाच माणसांची रात्री विश्रांती घेण्याची जागा, म्हणजे एक धर्मशाळा झाली आहे. यामुळे घरात मुलांच्यावर : होणारे संस्कार आता होत नाहीत आणि पुढेही समाजवादी रचना असेपर्यंत होणार नाहीत- होणे अशक्य आहे, असे समाजशास्त्रवेत्ते सांगत आहेत. आज पाश्चात्त्य देशांत मुलांना दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून अठरा-वीस वयापर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. तरीही कुटुंबसंस्थेला पर्याय म्हणून त्यातली एकही संस्था चालू शकणार नाही, हे सर्वमान्य होत चालले आहे. याचे मुख्य कारण मातापित्यांची माया, त्यांच्या ठायीचे अपत्यांविषयीचे अनन्य प्रेम, त्यांचे अनंत अपराध पोटात घालण्याची त्यांची क्षमाशीलता, अपत्यांविषयी अहोरात्र चिंता वाहण्याची व कष्ट करण्याची त्यांची वृत्ती या सर्वांतून मुलांना शिक्षण मिळत असते हे होय. भाऊ- बहिणी यांच्यासाठी करावी लागणारी लहान कामे, हळूहळू त्यातून निर्माण होणारी जबाबदारीची जाणीव यांमुळे त्याग, सेवा, निग्रह यांचे प्राथमिक पाठ मुलांना घरात मिळत असतात. आज हे संस्कार सर्व लुप्त झाले आहेत. कारण एक तर मध्यंतरी त्यांचे महत्त्व कोणाला वाटेनासे झाले होते आणि आईबाप दोघेही दिवसभर घराबाहेर असल्यामुळे त्यांना संगोपनाला वेळच मिळेनासा झाला होता आणि आता सर्व कुटुंबीयांच्या योगक्षेमाची जबाबदारी शासनाने घेतल्यावर एकमेकांसाठी झीज सोसल्यामुळे जे पाश निर्माण व्हावयाचे ते तुटून गेले व या संस्थेचा पायाच निखळून पडला. अशा रीतीने गुन्हेगारीला अप्रत्यक्ष रीतीने समृद्धीच कारण झालेली आहे
फ्रॉइडचे मानसशास्त्र
सध्याच्या जगातल्या वाढत्या गुन्हेगारीच्या दोन कारणांचा येथवर आपण विचार केला. आता तिसऱ्या कारणाचा विचार करावयाचा आहे. ते कारण म्हणजे फ्रॉइडचे मानसशास्त्र हे होय. वरील दोन कारणे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समृद्धीशी निगडित आहेत. फ्रॉइडच्या मानसशास्त्रामुळे जो अनर्थ झाला आहे, त्याचा तसा समृद्धीशी संबंध नाही. मग त्याचा येथे विचार कशासाठी करावयाचा ते प्रथम स्पष्ट करतो. समृद्धीमुळे जे अनर्थ झाले आहेत ते वास्तविक समृद्धीमुळे झाले नसून, समाजाच्या चारित्र्यहीनतेमुळे झाले आहेत आणि तो समाजाचा रोग नष्ट झाला तर समृद्धी हा शाप ठरणार नाही, असे प्रतिपादन मला करावयाचे आहे. समाजाची ही जी चारित्र्यहीनता, ती कुटुंबसंस्थेची विघटना व फ्रॉइडच्या मानसशास्त्राच्या वर्चस्वामुळे समाजाची शिस्त, बंधने, नियमने यांना आलेली शिथिलता यामुळे निर्माण झालेली आहे. आणि अशा समाजाच्या अवस्थेतच कल्याणकारी राज्य व समाजवादी समाजरचना यांची स्थापना झाल्यामुळे समृद्धी हा शाप ठरू लागला आहे. हा विचार स्पष्ट करण्यासाठी येथे प्रथम फॉइडच्या मानसशास्त्राच्या दुष्परिणामांची चिकित्सा करणे अवश्य आहे.
माया आणि शिक्षा
बालवयात मुलांना अनेक खोड्या कराव्याशा वाटतात, पुस्तके फाडावीशी वाटतात, चाकू उघडावासा वाटतो, खिडकीबाहेर ओणवावेसे वाटते, दहा लाडू खावेसे वाटतात. या सर्वांवर पूर्वी एकच उपाय होता. तो म्हणजे आईबापांचा धाक. वडिलांची हुकमत पूर्वी फार कडक असे. त्यांचे ऐकले नाही तर मार मिळेल, ही भीती पूर्वी होती. फ्रॉइडच्या तत्त्वज्ञानामुळे हे सर्व आता पालटले आहे. मुलांना दरवेळी अमके करू नको, असे बोलू नको, असे सांगणे म्हणजे त्यांच्या अंतरीच्या ऊर्मी दडवणे होय, आणि अशा ऊर्मी दडपल्या की, त्यांच्या मनात नाना प्रकारच्या विकृती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तित्वाची हानी होते, असे फ्रॉइडचे तत्त्वज्ञान सांगते. यामुळे कुटुंबातील 'धाक' हा शब्द गेला, आणि त्यापासून फल काय मिळाले ? तर मुले स्वैर झाली व पुढच्या वयात त्यांची गुन्हेगारीकडे प्रवृत्ती होऊ लागली. लंडन विद्यापीठाचे मानसशास्त्राचे प्राध्यापक एच. जे. आयसेंक यांनी फ्रॉइडच्या सिद्धान्तावर अतिशय कडक टीका करून 'मुलांच्या या दण्डहीन बाल्यातच, अनिर्बंध आविष्कारातच गुन्हेगारीची बीजे आहेत' असे म्हटले आहे. शिक्षणशास्त्रातही या मुलांच्या मनाच्या अनिर्बंध विकासाचे असेच खूळ माजले आहे. 'डोंट' हा निषेधाचा शब्दही शिक्षकाने वापरू नये, असे शास्त्र आहे. डॉ. डोनाल्ड ए. ब्लॉक यांनी 'नॅशनल पेरेंट-टीचर' या मासिकात 'डोंट बी अफ्रेड ऑफ डोंट्स' या नावाचा लेख लिहून या खुळचटपणावर टीका केली आहे. ते म्हणतात, 'आईबापांनी मुलांवर माया करावी, पण तितक्याच कडकपणे त्यांचा निग्रहही करावा.' 'मानसशास्त्रच मानसशास्त्रावर कसे उलटते ते पाहा. एक मुलगी रस्त्यात खेळत होती. तिची मैत्रीण तिला म्हणाली, "तुला आई रस्त्यात खेळू देते ? असे कसे ? माझी आई मला असे कधीच खेळू देणार नाही. कारण मी गाडीखाली सापडेन अशी तिला भीती वाटते." डॉ. ब्लॉक म्हणतात, "ती मुलगी हे अभिमानाने सांगत होती. आई-बापांच्या अशा कडक शिस्तीचा मुलांना मनातून अभिमानच वाटतो. कारण तीतून त्यांचे आपल्यावर प्रेम आहे, हेच त्यांना दिसत असते." हेही तत्त्व त्यांनी मानसशास्त्रान्वयेच सांगितले आहे ! रस्त्यात खेळू नये, गोड फार खाऊ नये, हे स्वतःहून मुलांना कळत नसते. त्याची कारणे सांगावी तर ती त्यांना समजत नाहीत. तेव्हा त्यांना वचक पाहिजे. शिक्षा पाहिजे ! पण हे फ्रॉइडला मंजूर नाही !
मुक्त उद्रेकाचे फल
फ्रॉइडच्या तत्त्वज्ञानाची अत्यंत विषारी फळे चाळीस पन्नास वर्षे चाखल्यानंतर आता पाश्चात्त्य मानसशास्त्रज्ञ स्वसमाजाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करीत आहेत. माया, प्रेम, लालन यांच्याइतकीच धाक, वचन, कडक शिक्षा, कडवी शिस्त यांची मुलांच्या निरामय वाढीला आवश्यकता असते, असे सांगू लागले आहेत. डॉ. जॉन स्कॉफिल्ड हे अमेरिकन मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात, "हल्लीच्या मुलांना पौगंडावस्था (८ ते १८ वयाचा काळ - टीन एज) मोठी धोक्याची झाली आहे. कारण आई-बापांच्या कडक शिस्तीचे कवच हल्ली त्यांना मिळत नाही. आमच्या पौगंडावस्थेत आम्ही पुंडाई करू लागलो तरी वडिलांच्या धाकामुळे तिला आळा बसे, आणि अनर्थापासून आमचे रक्षण होत असे. आता दुर्दैवाने आईबापांच्या अपत्यसंगोपनाच्या कल्पना बदलल्या आहेत. दारू पिऊ नये, मोटार बेफाम हाकू नये, वर्गातल्या मुलांना मारू नये यासंबंधी ते मुलांशी वाद करीत बसतात. वास्तविक हे वय वादाचे नाही. कडक शिस्तीचे, हुकमतीचे आहे. मुलांच्या अंतरातील दैवी व आसुरी या दोन्ही संपदा या वेळी उफाळत असतात. त्यांतील दैवी संपदेला अवसर देऊन आसुरीचा नाश करणे अवश्य असते. आणि त्या कामी मुलांना मातापित्यांचे साह्य हवे असते. या वेळी अत्यंत कठोरपणे, वेळी फोडून काढूनही, आई-बापांनी हे साह्य केले पाहिजे. त्या दुष्ट प्रवृत्तींचा स्वैर उद्रेक होऊ दिला तर मुले वाममार्गी होतात व पुढे माता-पित्यांनाच दोष देतात. त्या पौगंडावस्थेतही बाह्यतः शिस्तीवर मुळे चिडत असली, तिला विरोध करीत असली, तरी मनातून तुम्ही कणखर राहावे, ढिले होऊ नये अशीच त्यांची इच्छा असते. अशा वेळी आई-बापांनी माघार घेतली तर मुलांच्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर नाहीसा होतो. म्हणून अन्न, प्रेम यांच्या इतकीच कडक शिस्त ही मुलांच्या वाढीला अवश्य आहे, हे सध्याच्या पिढीच्या आई- बापांनी जाणावे."
हे मानसशास्त्र फ्रॉइडच्या बरोबर उलट आहे. अंतरीचे उद्रेक दडपले तर मुले विकृत होतात असे त्याचे शास्त्र होते. म्हणून त्यांना मुक्त अवसर द्यावा असे तो म्हणत होता. पण त्यामुळे ती आसुरी संपदा वाफेसारखी विरून जाण्याऐवजी विषवल्लीसारखी माजतच चालली आणि बालगुन्हेगारीची अनन्वित फळे तिला आली. न्या. मू. विल्फ्रेड ए. वॉल्टिमेड म्हणतात, "आजची तरुण मुले वाह्यात झाली आहेत, बहकली आहेत, याचे कारण म्हणजे आमच्या शाळांतील कडक शिस्तीचा अभाव, हे होय. त्या 'परमिसिव्ह एज्युकेशनची' फळे आम्ही आता भोगत आहो." डॉ. रूथ अलेक्झांडर या विषयावर अगदी चिडून लिहितात. त्या म्हणतात, "मुलांच्या किळसवाण्या गुन्ह्याला आत्माविष्कार म्हणावयाचे किंवा मानसिक आजार म्हणावयाचे अशी सध्याची तऱ्हा आहे. अशा प्रकारे शिस्तीच्या जागी आत्माविष्कार आला आणि धर्माच्या जागी मानसशास्त्र आले. त्यामुळे गुन्हेगारी साथीच्या रोगासारखी पसरत आहे."
दैवी संपदेचा विकास
आतापर्यंत गुन्हेगारीच्या कारणांचे जे विवेचन केले, त्यावरून हे दिसते की, समाजाची काही नवी व्यवस्था करताना मनुष्याच्या अंगच्या दैवी संपदेची जी वाढ करणे अवश्य असते, तिच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि आतापर्यंत संवर्धिलेली संपदा नाश पावत आहे याची दखल न घेतल्यामुळे आजचे अनर्थ ओढवत आहेत. लोकशाही स्थापन करताना विवेक, सहिष्णुता, समाजहिताची जाणीव, प्रत्येक मानवाच्या हक्काची जाणीव, बुद्धिप्रामाण्य या गुणांची जोपासना करणे अवश्य असते. ती ज्यांनी केली नाही त्या समाजाची लोकशाही टिकू शकत नाही. समाजवादी समाजरचना आणि कल्याणकारी राज्य या नव्या व्यवस्थांचे हेच झाले आहे. पूर्वी राजकीय हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य हे सर्वांना द्यावयाचे होते. पण काही समाजांना व्यक्तिस्वातंत्र्य हा शापच ठरला. कारण ते पेलण्यासाठी अवश्य त्या गुणांची त्यांनी जोपासना केली नाही. आज समाजाने उत्पन्न केलेले धन सर्वांना द्यावयाचे आहे. पण त्याचे विभाजन करताना लोकशाहीच्या वेळचेच प्रमाद लोक पुन्हा करीत आहेत असे दिसते. पूर्वी समाजातील व्यक्तींच्या योग- क्षेमाची जबाबदारी सरकार कधीच घेत नसे. किंबहुना व्यक्तीच्या कोणत्याच विकासाची जबाबदारी मागे शासनावर नव्हती. सर्वांना अन्नवस्त्र मिळावे, ही जबाबदारी सुद्धा कोणाच्या शिरी नव्हती. मग शिक्षण, आरोग्य यांची कथा काय ? आता हे सर्व शिरी घ्यावे अशी नवी आकांक्षा आहे. लोकशाही पेलण्यास दैवी संपदेची एकपट गरज असल्यास आता ती शतपट आहे. आणि तिची जोपासना न करताच कल्याणकारी राज्ये स्थापन करण्याचे प्रयत्न झाल्यामुळे जगात प्रथमच आलेली लक्ष्मी ही आक्काबाई ठरत आहे.
समाजवादी समाजरचनेसाठी सात्त्विक गुणांची आवश्यकता शतपट जास्त का आहे, याचे थोडेसे दिग्दर्शन करून हे विवेचन संपवू.
चारित्र्य हा पाया
समाजवादी समाजरचनेत धनाची वाटणी व्हायची असते. आणि धनाचा मोह मनुष्याला सर्वात जास्त असतो. आपल्याकडे बाराशेच्या आत उत्पन्न असलेल्या लोकांच्या मुलांना सरकार शिक्षण मोफत देते. आज ज्यांचे उत्पन्न याच्या दुपटीतिपटीने जास्त आहे, असे सहस्रावधी लोक या सवलतीचा फायदा घेत आहेत ! शेतकऱ्यांना, लहान उद्योगधंदे काढणाऱ्यांना, सहकारी संस्थांना सरकार दोन्ही हातांनी पैसा वाटीत आहे. हा सर्व पैसा 'कर्ज' म्हणून दिलेला असतो. पण तो परत करण्याची कल्पना स्वप्नातही कोणाला शिवत नाही. आणि ज्यांना गरज नाही असेच लोक हा पैसा पदरी पाडून घेतात. समाजवादी समाजरचनेत पूर्वीपेक्षा दसपट, सहस्रपट कायदे जास्त करावे लागतात. कारखाने कोणी कोठे काढावे यासंबंधी पूर्वी निर्बंध नव्हते. आता उत्पादन हे गरजा पाहून करावे लागते, म्हणून बंधने आली. त्यामुळे आयात-निर्यातीवर बंधने आली. देशातल्या वाहतुकी वर बंधने आली. शेतीत कोणी कोणती पिके काढावी यावर बंधने आली. वस्तूंच्या किंमतीसंबंधी कायदे करणे आले. शाळेच्या व्यवस्थेसंबंधी कायदे, तेथील पाठ्य- पुस्तकांसंबंधी कायदे,कामगार, शिक्षक, अधिकारी यांच्या पगारासंबंधी कायदे, दुकाने, कारखाने यांच्या कामाच्या वेळासंबंधी कायदे, आरोग्याविषयी, डॉक्टरांविषयी कायदे अशी पावला-पावलाला कायद्याची जखड बंधने समाजवादी रचनेत घालावी लागतात. नाही तर अन्न, वस्त्र, घर, शिक्षण व आरोग्य यांची न्याय्य वाटणी होणे अशक्य आहे. हे कायदे पाळावयाचे म्हणजे नागरिकांचे व पोलिसांचे चारित्र्य किती निर्मळ पाहिजे याची, सध्या भारतात काय घडत आहे त्यावरून सहज कल्पना येईल. समाजवादी समाजरचनेत पोलीस हा भ्रष्ट होणे अपरिहार्य आहे. प्रत्येक पावलाला त्याला पैसा मिळविण्याची संधी असते. ती दिसत असूनही पोलीसदल निर्मळ ठेवण्याइतके चारित्र्य ज्या समाजाजवळ नाही, त्याला समाजवादी समाजरचना कशी पेलणार ?
सेवावृत्ती
समाजवादी समाजरचनेत सर्वांना अन्न, वस्त्र, घर, आरोग्य व शिक्षण द्यावयाचे असल्याने कामे इतकी वाढतात की लाखो लोकांनी त्यांतली निम्म्याहून अधिक कामे स्वयंसेवावृत्तीने विनामूल्य शिरावर घेतली नाहीत तर, कितीही उत्पादन वाढले तरी ते धन पुरणार नाही. अमेरिकेत स्त्रियांच्या अनेक संस्था आहेत. त्या लहान मुलांचे संगोपन, रुग्णसेवा, अपंगांची सेवा, ग्रंथालयाची व्यवस्था, चर्चमधली व्यवस्था, शाळांतून अध्यापन, अशी अनेक प्रकारांची सेवा 'स्वयंसेविका' म्हणून करतात. त्यांना धन्यवाद देताना आयसेनहॉवर एकदा म्हणाले होते की, या कामासाठी पगार द्यावा लागला असता तर तो कधीच परवडला नसता. अमेरिकेसारख्या अत्यंत श्रीमान् राष्ट्राची ही स्थिती ! मग इतरांची काय असेल ? तेव्हा कायदापालनाच्या कर्तव्यबुद्धीला सेवावृत्तीची जोड असली, लक्षावधी नागरिकांच्या ठायी ही वृत्ती बाणलेली असली तरच समाजवादी समाजरचना (किंवा कल्याणकारी राज्य) शक्य आहे. असे असताना जेथे कर्तव्यबुद्धीचा अभाव आहे, सर्व समाज चारित्र्यहीन आहे, दुष्काळ, महापूर, भूकंप यांसाठी द्यावयाच्या पैशांचा सुद्धा अपहार करण्याची वृत्ती लोकांत आहे, तेथे ती कशी शक्य होईल ? समृद्धी कितीही आली, उत्पादन कितीही वाढले, लक्ष्मी कितीही प्रसन्न झाली तरी ती अशा स्थितीत पुरी पडणार नाही. आणि ती पुरी पडली नाही की, काळा बाजार, वशिला, अन्याय, अपहार यांचे राज्य सुरू होते. स्वीडनमधल्या समाजवादी लोकांना आज हीच भीती वाटत आहे !
शापाचे वरदान होईल
याचा अर्थ असा की, आज समृद्धी हा शाप ठरत आहे हा दोष समृद्धीचा नसून मनुष्याच्या चारित्र्यहीनतेचा आहे. काही चारित्र्यहीनता अनेक कारणांमुळे आधीच निर्माण झालेली होती. समाजवादी समाजरचना बेसावधपणे आणल्यामुळे तिच्यात आणखी भर पडली. यामुळे सर्व जगात आज समृद्धी व गुन्हेगारी यांत कार्यकारणसंबंध प्रस्थापित होऊ पाहात आहे !
महाभारतात म्हटले आहे की,
संपत्तीचा धनी असूनही मनुष्य इंद्रियांचा (वासनांचा) धनी नसेल, तो चारित्र्यसंपन्न नसेल तर, चारित्र्यहीनतेमुळे, इंद्रियांवर त्याची हुकमत नसल्यामुळे, तो ऐश्वर्यापासून भ्रष्ट होतो.
हे व्यासवचन आजही सत्य आहे. तेव्हा समाजात क्रांती घडवून नवी व्यवस्था प्रत्यक्षात आणण्याची ज्यांना आकांक्षा आहे त्यांनी प्रथम मानवाला आपल्या इंद्रियांचा ईश्वर होण्यास शिकविणे अवश्य आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. हे अवधान ठेवले तर समृद्धी हा शाप न ठरता ते वरदानच ठरेल. नाही तर मात्र तो शाप ठरेल यात शंका नाही.
५
समृद्धीचा शाप

अर्थानां ईश्वरो यः स्यात् इंद्रियाणां अनीश्वरः ।
इंद्रियाणां अनैश्वर्यात् ऐश्वर्यात् भ्रश्यते हि सः ॥

नोव्हेंबर १९६८