माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो...






माझ्या शेतकरी भावांनो
मायबहिणींनो



शरद जोशी




जनशक्ती वाचक चळवळ


प्रकाशकाचे मनोगत


 शरद जोशी यांच्या २९ भाषणांचा हा संग्रह. पिंपळगांव बसवंत येथील १९८१च्या भाषणापासून ते परभणी येथे जानेवारी २००९ मध्ये केलेल्या कार्यकारीणीतील भाषणापर्यंत २८ वर्षांतील वैचारीक मांडणी यात समाविष्ट आहे. शरद जोशींचे सर्व लिखाण ग्रंथरूपात उपलब्ध करून देण्याच्या योजनेत आत्तापर्यंत नऊ पुस्तके आम्ही प्रकाशित केली. हे दहावे पुस्तक शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात वाचकार्पण करताना समाधानाची भावना आहे.
 टीकाकारांकडून आमची एवढीच अपेक्षा आहे, की त्यांनी किमान हे लिखाण वाचून मग टीका करावी. शरद जोशींनी भूमिका बदलली, नव्वद नंतरचे शरद जोशी आम्हाला मंजूर नाहीत, अशी अतिशय अप्रस्तूत टीका त्यांच्या टीकाकारांनी केली आणि आजही करतात. त्यांच्यासमोर हे सर्व लिखाण आम्ही ठेवीत आहोत. निदान आतातरी लिखाण उपलब्ध नसल्याच्या तक्रारीला संधी नाही. शेतकरी संघटनेचा विचार हा स्वतंत्रतावादी विचार आहे इतकी साधी भूमिका समजून घेतली तरी नव्वदच्या आधीचे शरद जोशी व नंतरचे शरद जोशी अशी विसंगती टीकाकारांच्या लिखाणात व बोलण्यात येणार नाही.
 शेतकरी संघटनेच्या विचारांवर आक्षेप नोंदवणाऱ्यांना या निमित्ताने आम्ही नम्र विनंती करू इच्छितो, की त्यांनी त्यांची मांडणी लेखी स्वरूपात आमच्याकडे द्यावी. हे सर्व लिखाण अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यासाठी ग्रंथरूपात प्रसिद्ध करण्यास आम्ही तयार आहोत. सामान्य शेतकऱ्यांनी विचारांचे खुले व्यासपीठ म्हणून शेतकरी संघटनेचा उपयोग केला. पुरोगामी महाराष्ट्रातील विद्वानांनीही या व्यासपीठावर आपले विचार मांडावेत. वैचारिक खुलेपणाची परंपरा हे शेतकरी संघटनेचे वैशिष्ट्य आहे.
 शरद जोशींच्या सर्व पुस्तकांना सामान्य वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. शरद जोशींनी आमच्या प्रकाशनावर टाकलेल्या विश्वासाची ही पावतीच आहे. 'समग्र शरद जोशी' मालिकेतील उर्वरीत चारही पुस्तके शेगांव येथील मेळाव्यापर्यंत (१० नोव्हेंबर २०१०) आम्ही प्रकाशित करीत आहोत.


६ जून २०१०
श्रीकांत अनंत उमरीकर