प्रस्तावना



 यातील दुसरा लेख ‘गांधारी' जुलै १९६२ मध्ये लिहिला. त्या वेळी महाभारतातील व्यक्तींवर आणखी काही लेख मी लिहीन, अशी कल्पनाही नव्हती. एकातून एक ह्याप्रमाणे गेल्या पाच वर्षांत लेख लिहिले गेले. प्रत्येक लेख लिहिताना आता ह्यापुढचा लिहीन, अशी कल्पना नव्हती. तशा तऱ्हेचे लिखाण आता ह्या पुस्तकाबरोबर संपले, असेही नाही. प्रत्येक लेख लिहून झाला की वाटत होते की, हा लेख शेवटचाच ! ह्यापुढे आता तेच-तेच येत राहणार. आता काही लिहायचे नाही. तशीच भावना ह्याही क्षणाची आहे. ती कायम राहते की परत आणखी काही मी महाभारतावर लिहिणार, हे आज काही सांगता येत नाही. माझ्या पुष्कळ मित्रांनी मी हे का लिहिले म्हणून विचारले. ह्या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य नाही. बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे हा. ही एक दबून न राहणारी प्राथमिक प्रवृत्ती आहे. ह्यापेक्षा जास्त काही हे लेख लिहिताना माझ्या मनात होते, असे मला आढळत नाही. पेशा

मास्तराचा असल्यामुळे आपण सांगतो ते इतरांना जास्तीत जास्त कळावे, अशी इच्छा, त्यामुळे विवरण स्पष्ट व सुबोध व्हावे, हा माझा कटाक्ष आहे. माझे लिखाण काय आहे, हे कळून त्यात एखाद्याला काही आक्षेपार्ह वाटले, चुकीचे वाटले व त्याने त्याप्रमाणे म्हटले, तर मला काही दुःख होत नाही; पण माझे लिहिणे निष्काळजीपणाचे होऊन त्यातून निराळाच अर्थ निघत असला, तर मला वाईट वाटते. उदा, माझ्या एका मित्रांनी ‘द्रौपदी'च्या शेवटी असलेल्या "पुढच्या जन्मी थोरला भाऊ हो, भीमा !" ह्या वाक्याचा अर्थ "पुढल्या जन्मी माझा (द्रौपदीचा) थोरला भाऊ हो," असा केला ह्याचे मला फार वाईट वाटले. माझ्या मनातील द्रौपदी पाच नवऱ्यांशी इमानाने वागणारी होती. शिवाय एखाद्या पुरुषाची बायको म्हणून राहून त्याच्यापासून मूल झाल्यावर त्याला पुढच्या जन्मी का होईना, "भाऊ हो," हे म्हणणे मला अस्वाभाविक, दांभिक व सर्वतया अशक्य वाटते. म्हणून ह्या आवृत्तीत माझा आशय स्पष्ट करण्यासाठी "पुढच्या जन्मी पाचांतला थोरला भाऊ" असे शब्द घातले आहेत. माझ्या आशयाचा विपर्यास होईल. असे आणखी काही राहिले नसेल, अशी आशा आहे.
 मी महाभारताची भांडारकर इन्स्टिट्यूटने काढलेली संशोधित आवृत्तीच वापरलेली आहे. त्यामुळे पूर्वी आपल्याला महाभारतात आहेत अशा वाटत असलेल्या बऱ्याच गोष्टी गळल्या आहेत. लेखात ठिकठिकाणी त्या नमूद केलेल्या आहेतच. त्याशिवायही ह्या आवृत्तीत राहिलेल्या पण उघड-उघड मागाहून घुसलेल्या गोष्टीही पुष्कळ आहेत. ह्याचे कारण सध्याची ‘भांडारकर-आवृत्ती' ही सर्व हस्तलिखिते तपासून झाल्यावर जुन्यांत जुन्या हस्तलिखितावर आधारलेली आहे हे. जुन्या हस्तलिखितांत सर्वस्वी नाही, पण इतर हस्तलिखितांतून काहींत आहे, काहींत थोडेसे आहे, असे जर काही असेल, तर ते ह्या नव्या आवृत्तीत काढून टाकलेले आहे. आपल्याला नव्या आवृत्तीने जे दिले, ते संपादकांना मिळालेल्या सर्वांत जुन्या आवृत्तीत आढळते ते ! ही आवृत्ती ख्रिस्ती शतकाच्या आठव्या-नवव्या शतकामागे जात नाही. ही आवृत्ती आता पुढील संशोधनास व अभ्यासास योग्य अशी झाली आहे. आतापर्यंतचे संशोधन बव्हंशी बाह्य रूपांवर आधारलेले होते. आता जी प्रत मिळाली आहे, तीमध्ये उघड-उघड मागाहून घुसडलेले, कथेशी काडीमात्र संबंध नसलेले असे कितीतरी भाग आहेत. अभ्यासाने ते काढण्याची आवश्यकता आहे. तसे झाल्यास आणखी काही वर्षांनी भांडारकर-प्रतीत जे आहे, त्यांतले निम्मेशिम्मे जाऊन कदाचित आणखी एक संशोधित आवृत्ती मिळण्याचा संभव आहे. एवढ्यावरच हे काम थांबत नाही. कदाचित त्याहीपुढे जाऊन महाभारताच्या मुळाशी असलेली ‘जय' नावाची गाथा प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. जसजसे संशोधन होत राहते, तसतसे संशोधनाचे नवेनवे मार्ग उपलब्ध होतात. जुन्या पिढीतील संशोधनाच्या चुकाही समजतात. म्हणून कुठचेही एक संशोधन म्हणजे कोणत्याही गोष्टींवर अगदी शेवटचे शिक्कामोर्तब झाले, असे समजू नये.

 संस्कृत हा माझा अभ्यासाचा विषय नव्हे. मी महाभारत वाचते, ते आवड म्हणून. मला जे भाग प्रक्षिप्त वाटले. किंवा मागाहून घुसडलेले वाटले, त्यांचा मी पदोपदी उल्लेख केलेला आहे. हे माझे मत वाचता वाचता झालेले आहे. त्याच्या पाठीमागे भक्कम संशोधन नाही. मला प्रक्षिप्त वाटलेला भाग संशोधनाने तसा नाही असे ठरले, तर तेवढ्यापुरते माझे विवेचन चुकले, असे म्हणावेच लागेल. पण एरवी ‘बाईचे विवेचन चुकले,' असे म्हणता येणार नाही. ‘पटत नाही,' असे जरूर म्हणता येईल. महाभारत ही एक मोठी खाण आहे. तीतून काही बाहेर काढायचे, तर निरनिराळ्या तऱ्हांनी काढता येईल. एकाने जे लिहिले, त्यात सर्व काही आले - यावे, असे म्हणताच येणे शक्य नाही. जो-तो आपल्या कुवतीप्रमाणे ह्या संस्कृति-भांडारातील द्रव्य वापरीत असतो. ज्योतिषशास्त्र, भाषाशास्त्र, प्रागैतिहासिकशास्त्र ही माहीत असणाऱ्यांना महाभारतातील व्यक्तींवर व प्रसंगांवर निरनिराळ्या तऱ्हांनी लिहिता येईल. मी लिहिले, ते माझ्या कुवतीप्रमाणे व आवडीसाठी. काही गोष्टींचा नुसता उल्लेख केला आहे. (उदा. 'आज्य' म्हणजे काय असावे; ‘घृत' म्हणजे काय असावे.) पण त्या गोष्टींवरती मी संशोधन केलेले नाही हे लिहिण्याचे कारण कोणीतरी तरुण वाचक कदाचित ह्या असल्या संशोधनात रस घेऊन त्याच्या मागे लागेल, व माझ्या चित्रणांत ज्या उणिवा आहेत, त्या भरून काढील हे.

 ‘गांधारी' हा लेख प्रसिद्ध झाल्यावर एका तरुण हिंदी मित्राने विचारले, 'ही गांधारी कोण होती बुवा?' मला अतिशय वाईट वाटले. आपण ह्या युगात निरुपयोगी,उगीचच भूतकाळात वावरणारी अशी एक अडगळ आहोत, असे वाटले. पुढे काहीच लिहू नये, असेही उद्वेगाच्या भरात वाटले. किंवा इंग्रजी आवृत्तीत लिहिल्याप्रमाणे महाभारताची सबंध गोष्टच प्रस्तावनेत लिहावी, असेही मनात आले. पण हे दोन्ही मार्ग विचारांती सोडून दिले. मी अतिशय हट्टी आहे. तरुण पिढी आपले म्हणणे माझ्या गळी उतरवण्याचा प्रयत्न सारखा करीत असते. तीन अत्याधुनिक मुले व पी-एच.डी.चे तरुण विद्यार्थी ह्यांच्या हल्ल्याला मी सारखी तोड देत असते. माझे म्हणणे ह्या पिढीच्या गळी उतरवण्याचाच हा एक प्रयत्न आहे. माझे विवेचन चुकले असे वाटून ह्या पिढीने महाभारत वाचले, तरी मी जिंकले, असे मला वाटेल.

 महाभारताची संशोधित आवृत्ती म्हणजे काय, संशोधन कसले झाले, पन्नास वर्षे खपून काढलेल्या ह्या आवृत्तीवर माझे लेख आधारलेले आहेत असे मी म्हणते, मग अमका भाग मागाहून घुसलेला, अमका प्रक्षिप्त असे मला वाटते, असे मी कसे म्हणू शकते, इत्यादी प्रश्न राहतातच. हा रुक्ष वृत्तांत प्रस्तावनेत मी मांडणार नव्हते; पण बऱ्याच मित्रांनी परत-परत हेच प्रश्न विचारले, म्हणून लिहीत आहे. ज्यांना अगोदरच माहिती आहे, ज्यांनी सुखटणकरांचे मूळ लेख वाचले आहेत, त्यांनी त्या लेखांवरूनच घेतलेली ही माहिती वाचण्याची गरज नाही. तसेच, ज्यांना इतिहासाच्या काथ्याकुटात शिरायचे नाही, त्यांना हा भाग न वाचताही लेख समजायला काहीच अडचण नाही. पण बऱ्याच जणांना जिज्ञासा आहे; माझी भूमिका काय, हे समजायला त्यामुळे मदत होईल, असेही त्यांना वाटते. म्हणून थोड्याशा अनिच्छेनेच हे विवरण करीत आहे.

 ज्या पुस्तकाचे शास्त्रीय संपादन होते, ते जुने असते. काही दशकांचे असेल, काही शतकांचे असेल, काही सहस्त्रकांचे असेल. त्याचा ग्रंथकार (-एक वा अनेक-) जिवंत नसतो. आणि त्याच्या बऱ्याच आवृत्त्या प्रचारात असतात. बऱ्याच वेळा तो ग्रंथ निरनिराळ्या भाषांतूनही असतो. अशा वेळी सर्व उपलब्ध आवृत्त्या तपासून, सर्वात जुनी, शक्य तर ग्रंथकाराच्या वेळची आवृत्ती संपादन करण्याचा जो प्रयत्न, त्यालाच एका प्रकारची संशोधित (critical) आवृत्ती म्हणतात. दुसऱ्या तऱ्हेच्याही संशोधित आवृत्त्या असतात. ते पुढे दिलेले आहे. बायबलच्या अशा आवृत्त्या सारख्या निघत आहेत. काही नवा शोध लागला की, जुन्या आवृत्तीवर प्रकाश पडत राहतो. म्हणजे अशी एखादी आवृत्ती काढली, तर ते शेवटचे संशोधन झाले, असे म्हणता येत नाही. अमक्या एका काळी जो पुरावा उपलब्ध होता त्यावर आधारलेली अमकी आवृत्ती, एवढेच म्हणता येईल. महाभारताच्या संपादकांचाही एवढाच दावा आहे. महाभारताचे एखादे नवे हस्तलिखित भारतातच नव्हे, तर भारताबाहेर चीन, तिबेट, ब्रह्मदेश इकडे-मिळाले, तर ते मिळवण्याची खटपट हेच संपादक पहिल्याने करतील व त्यामुळे जास्त आधीचे काही मिळाले, तर त्याबरहुकूम आपल्या आवृत्तीत सुधारणा करतील.
 महाभारत-संपादनात एक हजारावर हस्तलिखिते तपासण्यात आली. काही पोथ्या सबंध महाभारताच्या मिळाल्या, काही थोड्याशा पर्वांच्याच मिळाल्या. सर्वच सारख्या महत्त्वाच्या नव्हत्या. त्यांतल्या ज्या महत्त्वाच्या ठरल्या, त्यांची फारच बारकाईने छाननी झाली. नव्या संशोधित आवृत्तीतील शब्द-न्-शब्द बाकीच्या आवृत्त्यांतील शब्दांशी ताडून पाहिला आहे. हे सांगितले, म्हणजे काम किती किचकट व परिश्रमाचे होते, हे कळेल.

 महाभारताच्या आवृत्त्या गोळा केल्यावर सुखटणकरांनी जी पहिली गोष्ट प्रस्थापित केली, ती ह्या निरनिराळ्या आवृत्त्यांचे वर्गीकरण व त्यांतील फरक, त्यात असे दिसून आले की, मिळालेल्या आवृत्त्यांची उत्तरेकडल्या' व 'दक्षिणेकडल्या' अशी प्राथमिक विभागणी होते. उत्तरेकडल्या आवृत्त्यांत एकमेकीशी मिळत्या-जुळत्या पुष्कळ गोष्टी आहेत; तसेच दक्षिणेकडच्या पोथ्यांतून आपापसांत साम्य आहे. उत्तरेकडच्या पोथ्यांचे परत दोन विभाग पडतात. एकात शारदालिपीत लिहिलेली, काश्मिरात भूर्जपत्रांवर लिहिली गेलेली एक पोथी, व त्याच पोथीच्या वा तसल्याच पोथीच्या आधारे केलेल्या इतर पोथ्या. ह्या गटाला 'K' नाव दिलेले आहे. दुसऱ्या विभागाचे परत दोन भाग पडतात. एकात मैथिली, बंगाली व नेपाळी लिपीत लिहिलेल्या पोथ्या व दुसऱ्यात देवनागरी लिपीत लिहिलेल्या पोथ्या, दक्षिणेकडील पोथ्यांचेही दोन विभाग पडतात. एका विभागात तेलुगू व ग्रंथ लिपीत लिहिलेल्या पोथ्या व दुसऱ्या विभागात मल्याळी लिपीत लिहिलेल्या पोथ्या. ह्या पोथ्यांचा एकमेकांशी व मूळ भारताशी काय संबंध असावा, है खालील आकृतीवरून सुखटणकरांनी दाखविले आहे.

 आज ज्या आवृत्त्या उपलब्ध आहेत, त्या सर्व तळाच्या ओळीतील, वरच्या ओळींतील सर्व आवृत्त्यांचे काय झाले असावे, ह्याचा तर्क करून त्या कल्पिलेल्या आहेत, व्यासाने भारत सांगितले, ते पाच शिष्यांना, तीच पांडवांची ‘जयगाथा', 'जय' नावाचे काव्य, असा तर्क आहे. पाच शिष्यांना कथा सांगितली, तिची प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे व कलाप्रमाणे मांडणी केली. जैमिनीने दुर्योधनाच्या बाजूने लिहिले असावे, असा तर्क आहे. (आश्वमेधिक-पर्वातील प्रो.करमरकरांची प्रस्तावना पहावी.) तिघांनी लिहिली असल्यास आज त्यातील काहीच उपलब्ध नाही. आपल्यापुढे जी कथा आहे, ती वैशंपायनाने अर्जुनाच्या पणतवाला

(जनमेजयाला) जी सांगितली, तिची वाढवलेली आवृत्ती आहे. कारण ही कथा उग्रश्रवा लोमहर्षणीने नैमिषारण्यात कुलपती शौनकाला जी सांगितली, ती आहे, व्यासभारत, वैशंपायन-भारत, लोमहर्षणीने वैशंपायनाचे म्हणून सांगितलेले ते मूळ महाभारत, अशा पायऱ्या कल्पिल्या आहेत. ह्या मूळ महाभारताची एक पायरी उत्तरेकडच्या सध्याच्या पोथ्यांच्या मुळाशी व दुसरी दक्षिणेकडच्या पोथ्यांच्या मुळांशी. उत्तरेकडील मुळातून वायव्येकडील एक आवृत्ती निघाली. (ह्याला सुखटणकरांनी 'न्यू ν ' हे ग्रीक अक्षर घातले आहे,) तीपासून शारदा व देवनागरी ह्या लिप्यांत लिहिलेल्या पण शारदेवर आधारलेल्या पोथ्या निघाल्या. गंगेच्या खोऱ्यासाठी (-‘गामा γ ' हे ग्रीक अक्षर-) एक version होते. त्यातून पूर्वेकडच्या भाषांची (-‘एप्सिलॉन ε' हे ग्रीक अक्षर- हे मूळ धरून) नेपाळी, मैथिली व बंगाली ही महाभारते लिहिली गेली. ही सर्व महाभारते शारदा व 'K' ह्या पोथ्यांपेक्षा विस्ताराने मोठी आहेत. गंगेच्या खोऱ्यातील पोथ्यांपासूनच पण खूप भर पडून निघालेल्या पोथ्या म्हणजे देवनागरी लिपीतील पोथ्या, ह्यांत श्लोकसंख्या अतिशय आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व ह्या सर्व भागातील पोथ्यांतून घेतलेले भागही आहेत. दक्षिणेकडच्या मूळ ग्रंथातून खूप भर पडलेल्या ‘सिग्मा नावाच्या आवृत्तीच्या पोथ्या निघाल्या. तीतून ग्रंथ व तेलुगू पोथ्यांचा उगम झाला. दक्षिणेकडच्याच मूळ ग्रंथांतून पण नवीन भर न पडता साधलेली आवृत्ती ती मल्याळी भाषेतील पोथ्यांची
 ह्या पोथ्यांतील बहुतांश पोथ्यांवर कालनिदर्शक असा महिना वा वर्ष दिलेलेच नाही. ज्यांच्यावर दिलेले आहे. त्यांतील सगळ्यात जुनी नेपाळी पोथी इसवी सन १२००-च्या सुमाराची. सर्वात । अर्वाचीन इ. स. १८४२-मधली ! जी पोथी सर्व कामाला आधार म्हणून घेतलेली ती मुंबईत छापलेली व येथल्याच हस्तलिखितावर आधारलेली वर दिलेल्या देवनागरी परंपरेतील व भारुडभरती झालेली अशी निघाली. पण ती पोथी छापलेली असल्यामुळे विलायतेत व इकडे सर्वांना माहीत होती, व तीतले गेले काय, राहिले काय, हे येथल्या व तिकडल्या विद्वानांना तपासून पाहता येणे शक्य होते. सर्वत्र माहीत असलेल्या ह्या आवृत्तीचा 'The Vulgate' ह्या नावाने सर्वत्र उल्लेख आहे. (Vulgate = नेहमीच्या प्रचारातील सर्वांना ठाऊक असलेली आवृत्ती. हा शब्द मूळ इटालियन वा लॅटिन भाषेत असलेल्या बायबलच्या प्रतीला लावल होता. - Oxford Dictionary]
 ही निरनिराळी हस्तलिखिते पाहता असे दिसून आले की, 'शारदा' हे सर्वांत कमी श्लोकांचे महाभारत आहे. K-च्या बहुतेक आवृत्त्या त्याशी जुळत्या आहेत. नेपाळी आवृत्तीही त्याच्याशी खूप जुळती आहे. एवढेच नव्हे, तर दक्षिणेकडील मल्याळी आवृत्तीही ब-याच बाबतींत शारदेशी जुळते. म्हणजे कधीतरी जुन्या काळी दक्षिणेकडे जी आवृत्ती गेली, व जिच्यापासून पुढे मल्याळी आवृत्ती निघाली, ती उत्तरेकडच्या आवृत्तीपेक्षा फार निराळी असावी. तीत भर पडून मैथिली वगैरे आवृत्त्या निघाल्या व सारखी भर पडपडून शेवटी देवनागरी आवृत्त्या निघून मूळ भारताला ‘शतसाहस्त्री संहिता' असे नाव मिळाले, प्रत्येक गटाचे काही विशेष आहेत. उत्तरेकडच्या आवृत्तींत नसलेला व ग्रंथ व तेलुगू या आवृत्तींत आलेला एक विशेष म्हणजे एका विशिष्ट प्रकारचा नीतिबाजपणा. उत्तरेकडच्या आवृत्तीत दुष्यन्त-शकुन्तला, ययाति-शर्मिष्ठा ह्यांचे लग्न झालेले नाही, हे स्पष्ट आहे. दक्षिणेकडे ह्या लग्नसमारंभाचा व ब्राह्मणांना दिलेल्या दक्षिणेचाही उल्लेख आहे. एवढेच नव्हे. तर सत्यवतीचे व पाराशराचेही मोठ्या समारंभाने लग्न लावून दिलेले आहे! देवनागरी लिपीतून असलेली पण शारदा, K व नेपाळी यांमध्ये नसलेली अशी प्रकरणे म्हणजे कणिकनीती, दुर्वासाने हजारो शिष्यांसह वनात जाऊन पांडवांकडून जेवण मागणे, व द्रौपदीचा धावा आणि कृष्णाने वस्त्रे पुरवणे. शिवाय, लहान-लहान प्रकरणे तर कितीतरी आहेत. सर्वांत मोठ्या पोथीत शतसहस्त्र नाहीत, पण ९५५८६ श्लोक आहेत, तर संशोधित आवृत्तीत ८९१३६ राहिले आहेत.
 प्रत्यक्ष महाभारताच्या पोथ्यांखेरीज सापडतील तशी इतरही प्रमाणे ह्या आवृत्तीसाठी उपयोजिली आहेत. त्यांतील एक म्हणजे महाभारताचा संक्षेप करून लिहिलेला ‘भारतमंजिरी' नावाचा ग्रंथ. हा क्षेमेंद्राने सुमारे इ. स.११०० ते १२०० दरम्यान लिहिला आहे. जेथे श्लोक-न्-श्लोक तपासला जातो, तेथे अशा ग्रंथांची उपयुक्तता मर्यादितच. पण काही बाबतीत तो उपयुक्त ठरला. क्षेमेंद्राने । महाभारतातील आख्यानांची जंत्री दिली आहे. तीतही ‘कणिकनीती' हे प्रकरण नाही. काही श्लोक नसते. तर त्यावरून कयास बांधता आला नसता. पण ज्या प्रकरणावर टीका लिहिल्या आहेत. ते सबंध प्रकरणच नसावे, म्हणजे शारदादि पोथ्यांच्या (-ज्यांचा काल दुदैवाने माहीत नाही,-) जुनेपणाबद्दल पुरावा मिळतो.
 आंध्रात वादिराज नावाच्या कवीने ह्याच सुमारास तेलुगू भाषेत महाभारताचे भाषांतर मुळातील श्लोक न वगळता केले आहे. त्याही भाषांतराची छाननी करून वादिराजापुढे कोणती प्रत असावी, ह्याची छाननी झाली.
 महाभारत-ग्रंथ जावामध्ये १५००च्या सुमारास गेला व तेथे त्याचे तिकडील भाषेत भाषांतर झाले. अधूनमधून मूळ संस्कृत श्लोकांचे व श्लोकार्थांचे बरेच भ्रष्ट असे उतारे त्यांत आहेत. ह्या उताऱ्यांचाही तुलना करताना फार उपयोग झाला. पुष्कळदा जुना संस्कृत शब्द न कळल्यामुळे जेथे नवा शब्द देवनागरी आवृत्त्यात घातलेला आहे, तेथे जावा-आवृत्तीत जुनाच शब्द सापडला आहे.
 ह्या तीन ग्रंथांखेरीज महाभारतावरील टीकाकारांच्या टीकांचाही फार उपयोग झाला आहे. ते टीकाकार पुढीलप्रमाण देवबोध- विमलबोध- सर्वज्ञ-नारायण- अर्जुनमिश्र-नीलकंठ.
 देवबोधाची टीका ‘ज्ञानदीपिका' या नावाची आहे. देवबोध इ.स.१०००-११००च्या सुमाराचा असावा. सर्वांत जुना टीकाकार, तसाच अतिशय विद्वान, म्हणून त्याची ही टीका फार उपयोगी पडली. विमलबोधाची टीका ‘दुर्घटार्थप्रकाशिनी' किंवा ‘विषमश्लोकी' नावाची आहे. काल नक्की नाही. सर्वज्ञ- नारायणाची टीका ‘भारतार्थप्रकाश' नावाची आहे. काल सुमारे इ. स. ११००. अर्जुनमिश्राच्या टीकेचे नाव ‘भारतार्थप्रदीपिका, ‘काल सुमारे इ.स. १४००, नीलकंठाची टीका ‘भारतभावदीप' नावाची व तिचा काल सुमारे इ. स. १७०० ह्याची माहिती सर्वांत जास्त. हा गोदावरी तीरावरील कोपरगावचा राहणारा, जातीने ब्राह्मण. बाप गोविंदसूरी व आई फुल्लाम्बिका, देवबोधाच्या टीकेत बरीच प्रकरणे नाहीत. ती शारदा-आवृत्तीतही नाहीत. म्हणजे देवबोधाची टीका व शारदाआवृत्ती एकमेकींना पूरक आहेत. शिवाय, अर्वाचीन आवृत्तीत आलेले नवे शब्द तीत नसून शारदेत आलेले जुने शब्द आहेत, व त्यांचा अर्थही नीट लावलेला आहे. ह्यांखेरीजही इतर टीकाकार होऊन गेले.
 महाभारताच्या पोथ्या, टीकाकार वगैरे वर दिलेल्या साधनांशिवाय महाभारताचे श्लोक व आख्याने इतर कोठे आलेली असल्यास त्यांचाही उपयोग केलेला आहे. उदा. भीष्मपर्वाचे संपादन करताना प्रो.बेलवलकरांनी असे दाखवले आहे की, सध्या आपल्याला माहीत असलेली गीताच शंकराचार्यांच्या पुढे भाष्य करताना होती.
 ह्या सर्वांचा अर्थ हा की, सध्या संपादित केलेली आवृत्ती जुन्यांत जुन्या माहीत असलेल्या हस्तलिखितांच्या परीक्षणाने सिद्ध झालेली आहे. हे हस्तलिखित सन १०००च्या सुमाराचे असावे. म्हणजे महाभारतकथा ख्रिस्तपूर्व १०००ची धरली, तर घडलेल्या वृत्तांताच्या नंतर ते २००० वर्षांचे आहे. आज जी आवृत्ती आपल्या पुढ्यात आहे, तिच्यात उघड-उघड प्रक्षिप्त भाग असूनही सर्व जुन्या पोथ्यांत-विशेषतः शारदा व मल्याळम् अशा दोन टोकांच्या पोथ्यांत तो आहे म्हणून हात न लावता तो जसाच्या तसा ठेवला आहे. खुद्द संपादकांनी ठिकठिकाणी हे दाखविले आहे. पण त्यांच्यापुढे जे कार्य होते (जुनी पोथी काय, ते हुडकून काढणे), त्यामुळे अंतर्गत विरोधात त्यांना शिरता येत नव्हते. जुने सौत वाङ्मय ब्राह्मणांच्या हाती जाऊन अध्यायाचे-अध्याय भृगुकथा त्यांत घुसडल्या गेल्या आहेत. कृष्ण ज्यात मुख्य देवता आहे, तो भागवतधर्म प्रचारात आल्यावर कृष्णाच्या अतिमानुषत्वाच्या व देवपणाच्या गोष्टी व अवास्तव स्तुती त्यात मागाहून आली आहे. सध्याच्या पोथीमध्येच महाभारताला दोन सुरवाती आहेत. अशा एक-ना-दोन अनेक गोष्टी खुद्द सुखटणकरांनी व इतर संपादकांनी जागोजाग दाखविल्या आहेत. त्या जमेस धरूनच बहुतेक करून मी अमके प्रक्षिप्त, अमके मागाहून घुसडलेले, असे म्हटले आहे. क्वचित एखाद-दुसऱ्या ठिकाणी स्वतःची बुद्धी वापरून तसे म्हटले आहे.

 संशोधित आवृत्ती ही सटीक आवृत्ती नव्हे. ती काय व तिच्या मर्यादा काय, हे कळलेच असेल. ही आवृत्ती हाताशी आली आहे. आता तिच्यावर पुढचा अभ्यास होऊन अंतर्गत संशोधनाने अगदी उघडउघड प्रक्षिप्त भाग काढले, म्हणजे दुसरी संशोधित आवृत्ती सिद्ध होईल. मग परत आणखी खोलात शिरता येईल. काम क्रमाक्रमाने, टप्प्याटप्प्याने विशिष्ट तत्त्वांनी व महाभारताच्या जगातील सर्व अभ्यासकांची मदत घेऊन झाले पाहिजे. असले काम तत्त्वतः सौंदर्यशोधाचे नसते. पण सौंदर्यशोध व आनंदबोध हे दोन्ही असल्या कामाचे फळ म्हणून मिळतात. हा फक्त वाङ्मयीन शोध नव्हे. आपल्या सांस्कृतिक मुळांचा हा शोध आहे. हा शोध चालला म्हणजे इतरही सांस्कृतिक इतिहास समजू शकतो, समजायला मदत होते. महाभारतावरून आपली प्राचीन कुटुंबसंस्था, राजकीय संस्था, धार्मिक व्यवहार काय होते, हे कळून आपल्या सांस्कृतिक इतिहासातला एक टप्पा जाणवतो. त्या अनुषंगाने इतरही प्रश्न डोकावतात. प्रो.सुखटणकरांनी आपल्या लेखांत लिहिले आहे की, शारदापोथी ही पुष्कळ वेळा दक्षिणेकडील मल्याळी पोथीशी कमालीचे साम्य दाखवते. त्याला दोन कारणे असू शकतील :

 १) पूर्वी महाभारत-कथा जेव्हा दक्षिणेत पोहोचली, तेव्हा उत्तरेत प्रसृत असलेल्या आवृत्तीत व तिच्यात फारसा फरक नसावा. मल्याळी म्हणजे केरळ देश एका टोकाला. तेथे ती भर न पडता राहिली. उलट, आंध्र-प्रदेशात इतर प्रदेशांप्रमाणे तीत भर पडत गेली.

 २) ह्या कारणाखेरीज दुसरे असेही संभवते की, पश्चिमेकडील किनाऱ्याने खाली शिरणारे आर्यभाषिक ब्राह्मण पंचनद्यांच्या प्रदेशातील (पंजाबातील व काश्मिरातील) असतील, व

त्यांनी आपल्याबरोबर महाभारताची काश्मिरी आवृत्ती आणिली असेल. म्हणजे भारतातील लोकसमूहांच्या हालचालींबद्दलही ह्या अभ्यासाने काही नवी माहिती मिळण्याचा संभव आहे.

 हे इतके विद्वान लोक पन्नास वर्षे मान वर न करता खपले, म्हणून संशोधनाचे एक बहुमोल साधन आपल्याला प्राप्त झाले आहे.

१४ जानेवारी १९६७