युगान्त/मयसभा
सहा
मयसभा
महाभारतात मयसभेच्या जन्माची कथा सांगितलेली आहे ती अशी : द्रौपदीच्या लग्नानंतर पांडवांचे पारडे एकदम जड झाले. पांडवांना मारायचा घाट घातला होता, पण तो फुकट जाऊन ते नव्या जोमाने प्रकट झाले. अशा वेळी त्यांना राज्याचा वाटा देणे धृतराष्ट्राला भाग पडले. त्याने धर्माला बोलावून त्याला एक वाटा दिला व खांडवप्रस्थाला जाऊन रहा म्हणून सांगितले. वंशपरंपरा आलेली कुरूंची राजधानी धर्माला मिळाली नाही. राज्याच्या एका सीमेवर मोठ्या अरण्याशेजारी वसलेले एक गाव त्याच्या वाट्याच्या हिश्श्यात त्याला मिळाले. तोवर खांडवप्रस्थाचे नावही महाभारतात आलेले नाही. खांडवप्रस्थाला गेल्यावर धर्माने त्या लहानशा गावाचे राजधानीत रूपांतर करावयास प्रारंभ केला. निरनिराळे उद्योगधंदे करणारे लोक येऊन तेथे स्थायिक झाले. श्रीमंत व्यापारी तेथे येऊन राहिले. धर्माने निरनिराळ्या हरहुन्नरी लोकांना आग्रहाने आणून वसवले. धर्माने खांडवप्रस्थाचे राजधानीत रूपांतर केले. पण ही राजधानी नवीनच म्हणून हस्तिनापूरच्या मानाने लहानच असणार. ह्या खांडवप्रस्थाचेच ‘इन्द्रप्रस्थ' असेही दुसरे नाव वारंवार येते. तेथेच नारदाने घालून दिलेल्या नियमाचा भंग झाल्यामुळे अर्जुनाला वनवासास जावे लागले. वनवासात असतानाच त्याचे सुभद्रेशी लग्न झाले. वनवास संपवून तो इन्द्रप्रस्थाला परत आला व यादव हे सुभद्रा आणि खूप संपत्ती, दास-दासी, रथ-घोडे वगैरे आंदण बरोबर घेऊन मोठ्या लवाजम्यानिशी मागोमाग आले. राजधानीत कित्येक दिवस मोठा उत्सव झाला. दिवस उन्हाळ्याचे होते. अशावेळी अर्जुनाने मनात आणले की, वनविहाराला जावे. एका दिवसाचा वनभोजनाचा बेत झाला. धर्माची परवानगी घेऊन वडील मंडळींना न घेता कृष्णार्जुन वनविहाराला गेले. त्यांच्या बायका व दासदासी ह्याखेरीज इतर मंडळी नव्हती. सर्वांनी खूप खाल्ले, खूप दारू प्याली. बायका कोणी नाचत होत्या, कोणी गात होत्या, वृक्षांच्या दाट सावलीने ऊन मुळीच भासले नाही. कुष्णार्जुनांनी एकत्र बसून पुष्कळ गप्पा मारल्या. एकमेकांना युद्धातील व प्रेमातील पराक्रम (विक्रान्तानि रतानि च) ऐकवले, ते असे बसले असताना एक ब्राह्मण त्यांच्याकडे आला व म्हणाला, “मी भुकेला आहे. मी खूप खाणारा आहे. नेहमी अमाप खातो. माझी तृप्ती करा." त्यांनी त्याला अन्न देऊ केले असता त्याने आपले अग्निरूप प्रकट करून सांगितले, "मला आतील सर्व प्राण्यांसकट खांडववन खाण्यास द्या. ते मला जाळू द्या. जेव्हाजेव्हा मी ते जाळण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा-तेव्हा इन्द्र पाऊस पाडून माझा प्रयत्न हाणून पाडतो." कृष्णार्जुनांनी हे काम पार पाडण्याचे कबूल केले, पण अशी अट घातली की, उत्तम रथ व शस्त्रे अग्नीने पुरवावी. एक दिव्य रथ, पांढरे शुभ्र व वायुवेगाने धावणारे घोडे व गांडीव धनुष्य अग्नीने अर्जुनाला दिले आणि कृष्णाला चक्र व इतर आयुधे दिली. अरण्य जळत असताना दोघांनी रथात दोन बाजूंकडून एवढा कडेकोट बंदोबस्त ठेवला की, आगीने भिऊन पळणाऱ्या प्राण्यांना निसटून जाण्यास छिद्रच सापडेना. भोवती रथ पिटाळून त्यांनी भयंकर संहार केला. ज्यांना आत पिटाळले, ते प्राणी होरपळून मेले. जे बाहेर आले, ते ह्या दोघांच्या शस्त्रांना बळी पडले. नागराज तक्षक कुरुक्षेत्राला गेला होता म्हणून वाचला. त्याचा मुलगा मोठ्या युक्तीने स्वतःचा प्राण देऊन आईने वाचवला. तक्षकाच्या आसऱ्याने तक्षकाच्या घरी राहणारा 'मय' नावाचा असुर 'अर्जुना धाव' अशी हाक मारीत आला. त्याला अर्जुनाने जीवदान दिले व एका ब्राह्मणाची शाङ्गी नावाच्या पक्षिणीपासून(?) झालेली मुले वाचवली. तक्षकाच्या घराण्यातील तेथे असलेले 'नाग' व इतर पशुपक्षी सर्व मारले गेले. इन्द्र व देव अरण्याचे रक्षण करावयास धावले, तेव्हा कृष्णार्जुनांनी त्यांचा पराभव करून त्यांना हाकलून लावले. "तुझा मित्र तक्षक वाचला आहे," असे सांगून देवांनी इंद्राला निकराचे युद्ध करू दिले नाही. रान आठवडाभर जळत होते व सारा वेळ अर्जुन आणि कृष्ण भोवती हिंडून प्राण्यांचा संहार करीत होते. आतील यच्चयावत् प्राण्यांचे मांस व चरबी खाऊन अग्नी तृप्त झाला व दोघा वीरांचा निरोप घेऊन गेला. प्राण वाचवले, त्याची परतफेड म्हणून नाना देशांतून साहित्य आणून मयाने इन्द्रप्रस्थ राजधानीत मयसभा बांधली. ही सभा बांधल्यावर धर्माच्या भावांनी चारी दिशांस जाऊन सर्व राजांना जिंकले, आणि मग धर्माने राजसूय यज्ञ केला. हस्तिनापूरच्या नातेवाईकांनाही मोठ्या आग्रहाने यज्ञाचे निमंत्रण दिले. त्या वेळच्या सर्व राजांसमोर पांडवांच्या वैभवाचे व विक्रमाचे प्रदर्शन झाले, पण सर्वांत दाहक प्रदर्शन झाले ते चुलत-भावांपुढे. मयसभा अशी बांधली होती की, पाणी आहे तेथे साधी जमीन वाटावी व जमीन आहे तेथे पाण्याचा प्रवाह वाहतोसे वाटावे. दार म्हणून पलीकडे जायला पहावे, तो डोके भिंतीवर आपटावे. रत्नांचे पशुपक्षी, झाडे इतकी सुंदर बनवली होती की, खऱ्याचा भास व्हावा. दुर्योधन पाय घसरून भिजला, त्याचे डोके भिंतीवर आपटले, व पांडव आणि द्रौपदी त्याची ही फजिती पाहून खदखदा हसली. पांडवांनी नुसते आपले वैभवच दाखविले असे नाही, तर जाणूनबुजून दुर्योधनाचा सर्वांदेखत अपमानही केला.
लौकरच फासे उलटे पडले. पांडव सर्वस्व हरले व तेरा वर्षे वनात गेले. परत येऊन युद्ध जिंकल्यावर ते वाडवडिलांपासून आलेल्या हस्तिनापुरात राहिले; इन्द्रप्रस्थाला गेले नाहीत. यादववंशाचा नाश झाल्यावर ज्या उरल्या-सुरलेल्यांना घेऊन अर्जुन आला, त्यांत कृष्णाचा नातू वज्र होता. पांडव महाप्रस्थानाला गेले, तेव्हा परिक्षिताला हस्तिनापूर देऊन वज्राला इन्द्रप्रस्थाचे राज्य दिले. परत इन्द्रप्रस्थाचे नाव ऐकू येत नाही व मयसभेचे वर्णन एकदा सभापर्वात येऊन गेल्यावर परत तिचा उल्लेखही नाही.
ही झाली खांडव जाळण्याची कथा. तीत विचार करायला लावण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. एवढे मोठे वन का जाळले? आतील सर्व प्राणी, नाग, पक्षी वगैरे निःशेष का मारले? स्वतःला 'बीभत्सु'* म्हणवणाऱ्या अर्जुनाने ही क्रूर शिकार का केली?
यमुनेच्या काठी मजेत वनविहार करावयास गेले असताना
- 'बीभत्सु' ह्याचा अर्थ अतिशय क्रूर कर्म करणारा असा आहे. अर्जुन स्वतः असे सांगतो की, "मी लढत असताना कधीही बीभत्स कृत्य करीत नाही, म्हणून मला 'बीभत्सु' हे नाव पडलेले आहे." अर्जुनाने आपल्या स्वतःच्या सहा नावांचे स्पष्टीकरण केले, त्या वेळचा विराटपर्वातील हा प्रसंग आहे. (४.३९.१६)
अरण्य जाळण्याची कल्पना निघालीच का? महाभारतात म्हटले आहे की, अग्नी ब्राह्मणाला 'नाही' कसे म्हणावयाचे, म्हणून ह्या वीरांनी खांडव जाळले. जाळले ते कसे? तर दोघांनी दोन बाजूंनी रथ व धनुष्यबाण असे चालवले की, एकाही प्राण्याला बाहेर निघता येऊ नये. नुसती झाडेच जाळली नाहीत, तर रानातला प्रत्येक प्राणी टिपून मारून किंवा मागे हाकून रानात जाळला. तूप खाऊन कंटाळलेल्या अग्नीने रुचिपालट म्हणून रानातील जनावरे खाण्यास मागितली व अशा प्रकारे कृष्णार्जुनांनी ती दिली. ह्या कथेत दोन पर्याय संभवतात; पहिला, कृष्णार्जुनांनी खांडव जाळले नाही, ते आपसूख जळाले, व त्याचा मोठेपणा कृष्णार्जुनाला दिला गेला. दुसरा, खरोखरच कृष्णार्जुनांनी वन जाळले. दुसरा पर्याय खरा धरला, तर एवढे मोठे रान प्राण्यांसकट जाळले हे मोठे शौर्याचे व यशोदायी कृत्य समजले गेले पाहिजे, हे तर निर्विवादच. महाभारतात म्हटल्याप्रमाणे खरोखरच त्यांनी खपून-पाऊस पडला तरीही पुन्हापुन्हा आग लावून हे वन जाळले, असे गृहीत धरण्यास काही प्रत्यवाय दिसत नाही. पण ते का जाळले?
गुरे-ढोरे बाळगणाऱ्या, नांगराने शेती करणाऱ्या 'आर्य'- जमातींच्या इतिहासात वन जाळण्याची वा कापण्याची घटना आढळते. संबंध उत्तर हिंदस्थानात दाट अरण्ये होती. त्यांचे वर्णन वेदांत येते; महाभारतात येते. काही प्रसिद्ध वनांचे वर्णन बौद्ध वाङ्मयातही येते. एवढेच काय, पण ऐतिहासिक काळातील शिलालेखांत ते येते.
महाभारतातली राज्ये फार लहान होती. आजचा पंजाब व दिल्लीच्या भोवतालचा भाग एवढ्या प्रदेशात कुरू, दक्षिण व उत्तर पांचाल, त्रिगर्त, मत्स्य एवढी राज्ये होती. ती एकमेकांना लागून नव्हती. एक राजधानी, भोवती शेती असलेली खेडी व त्यांभोवती अरण्ये असे राज्याचे रूप होते. काम्यकवन, द्वैतवन, खांडववन अशा कितीतरी वनांची वर्णने येतात. महाभारतानंतर बौद्धकालात
सुमारे पाच-सहाशे वर्षांनी पश्चिमेकडच्या वनांची वर्णने येत नाहीत. पण पूर्वेकडे वेळूवन, जेतवन वगैरे लहान-लहान वनांची नावे व वर्णने येतात. हजार-दोन हजार वर्षांत जवळ-जवळ सर्व राने नाहीतशी होऊन सिंधूपासून गंगा-सागरापर्यंत एक सपाट शेत झाले आहे. विलायतेतही मोठाली अरण्ये होती. ती जाऊन त्यांच्या जागी शेते झाली. जेव्हा विलायतेतील लोक दक्षिण व उत्तर अमेरिकेत गेले. तेव्हा त्यांनी राने तोडली वा जाळली, व सपाट मैदान करून शेती केली. धर्म खांडवप्रस्थाला आला, तेव्हा त्याने आपल्या नव्या राजधानीत वाणी वगैरे लोक आणून बसवले. प्रत्येक राजधानीच्या भोवती शेते असत व शेताच्या पलीकडे राने पसरलेली असत. तशाच तऱ्हेचे पांडवांचे राज्य होते. खांडववनाशेजारी 'इक्षुमती' ही लहान नदी व शेजारी यमुना नदी. खांडववनाचे नावही लक्षात ठेवण्यासारखे आहे. 'खाण्डव' हा शब्द 'खण्डु' शब्दापासून बनलेला. 'खण्डु' म्हणजे जाड खडीसाखरेसारखी साखर, काहीतरी गोड पदार्थ एवढे खरे. शेजारी 'इक्षुमती' नदी. इक्षु म्हणजे ऊस. 'इक्षुमती' हेसुद्धा नाव काहीतरी गोड पदार्थ नदीकाठी होता असे दाखवते. कृष्णाच्या बाळलीला जेथे वर्णन केल्या आहेत, त्याचे नावही 'मधुवन' होते. तेही यमुनेशेजारचेच. 'इक्षुमती', 'खाण्डव', व 'मधुवन' ह्या शब्दांनी असे वाटते की, ह्या वनात काहीतरी गोड पदार्थ उत्पन्न होत होता. तो मध का? कदाचित असेलही. हल्ली मध्यभारतातील रानातून एक रम्य, विशाल वृक्ष आढळतो. त्याला 'मोह' किंवा 'महुवा' म्हणतात. ह्याचे संस्कृत नाव 'मधुक' असे आहे. मोहाचे झाड हे वन्यलोकांची एक कामधेनूच असते. झाडाची पाने पत्रावळीसाठी वापरतात. गोड सुवासिक मधाने भरलेल्या फुलांपासून दारू करतात. फुले वाळवून खातात. आतील चिकट रसात वळलेले लाह्यांचे लाडू मधुर असतात. कदाचित खांडववन अशा तऱ्हेच्या वृक्षांनी भरलेले म्हणूनही त्याला 'गोड' असे नाव असेल पण त्याची गोडी, त्याची पारख, तेथल्या सुंदर विशाल मधुर वृक्षाची खरी किंमत आत राहणाऱ्या आर्येतर लोकांना; आर्यांना नव्हती. वाणी व हरहुन्नरी नागर लोक राजधानीत असत, तर शेतकरी राजधानीच्या बाहेर गावांतून असत. राने जाळणे, किंवा तोडणे व शेतकऱ्यांना ते वसाहतीला देणे हे राजाच्या कर्तव्यापैकीच एक होते. तेच कृष्णार्जुनांनी केले. पण हे वन जाळण्यास मोठा विरोध होता असे दिसते. हा विरोध कोणाचा? एकंदर वर्णनावरून असे दिसते की, खांडववन म्हणजे काही निर्मनुष्य अरण्य नव्हते. कोणाचीच मालकी नाही अशी ही भूमी नव्हती. तेथे 'तक्षक' नावाच्या नागाचा परिवार होता. त्याच्याच घरी 'मय' नावाचा मोठा कारागीर राहत होता. शार्ङ्गी नावाची पक्षिकुलाचे नाव असलेली व एका ब्राह्मणाशी लग्न झालेली बाई तेथे राहत होती. हे नाव असलेल्या व्यक्तींखेरीजही इतर खूपच व्यक्ती होत्या. त्यांची नावे सर्पांची, पक्ष्यांची अशी होती. त्याशिवाय पशूही होते. हे खरोखर पशू होते, का पशूकुलाचे नाव असलेली (उदाहरणार्थ; लांडगे, वाघ, मोर, वगैरे) माणसे होती हे कळणे शक्य नाही. रान जाळताना त्या सर्वांना कृष्णार्जुनांनी मारले. वर सांगितल्याखेरीज इतर कोणालाही जिवंत सोडले नाही. परत प्रश्न मनात येतो, 'हा संहार का?' रान जाळून जमीन वहितीला द्यावयाची असेल, तर त्या जमिनीला कोणी मालक असता कामा नये. म्हणन त्या भूमीत वंशपरंपरा राहणाऱ्या सर्वांचा संहार करावा लागला, असे तर नव्हे? अरण्यात वंशपरंपरा दीर्घकाळ राहणारे लोक मुख्यत्वे 'नाग' नावाचे होते. महाभारतकथेत 'शेष', 'वासुकी' 'धृतराष्ट्र', 'ऐरावत', 'एलापत्र', 'तक्षक' व 'कर्कोटक' हे निरनिराळ्या नागकुलांचे मुख्य होते व त्यांना नागराज असे विशेषण दिलेले आढळते. आर्य ज्या भूमीत पहिल्याने आले (पंचनद्यांचा प्रदेश), तोच ह्या नागकुलांचा प्रदेश होता. मात्र नाग नदीकाठाने अरण्यात राहत असत, तर आर्य उघड्या माळावरती वस्ती पसंत करीत. वासुकी भोगावतीकाठी होता. ऐरावत इरावतीकाठी होता. तक्षक यमुनेकाठी कुरुक्षेत्राजवळ होता. एलापत्र हे ऐरावत शब्दाचेच प्राकृत रूप आहे. ज्या ठिकाणी नाग राहत, ते त्यांच्या मालकीचेच होते. आर्य-राजाला आपल्या प्रजेसाठी रान जाळून शेतजमीन द्यावयाची, तर आधीच्या मालकाला नष्ट करण्याची कोशीस करावी लागे का? दुसरा विचार मनात येतो की, रानातली माणसे व जनावरे ही सर्वच शिकारीला योग्य, अशी कृष्णार्जुनांची भूमिका होती का? कृष्णार्जुनांनी केलेल्या प्राणिसंहाराचे रसभरित वर्णन ह्या तर्काला जुळते आहे.
क्षत्रियाचे ब्रीद शरणागताचे रक्षण, क्षत्रियाचे ब्रीद बरोबरीच्यांशी युद्ध, क्षत्रियाचे ब्रीद निरुपक्रोश, (=कोणाचा तळतळाट न घेणे). हे सर्व ह्या संहाराच्या प्रसंगी कोठे नाहीसे झाले होते? बरोबरीच्यांशी युद्ध, निरुपक्रोश हे सर्व नियम स्वतःच्या समाजापुरते होते. आपल्या समाजाबाहेरचा जो असेल, त्याला अशी मुल्ये लावायची नाहीत, असा ह्या कृतीच्या मुळाशी दंडक असणार. परत एकदा ऐतिहासिक घटनांची आठवण होते. जी आपल्या समाजातील नव्हेत, अशा माणसाचा संहार तैमूरलंग, चेंगीझखान ह्यांनी नाही का केला? एकोणिसाव्या शतकात जनावरांची करावी तशी शिकार गोऱ्या लोकांनी टॅस्मेनियातील वन्यमाणसांची केली, असा अगदी ताजा इतिहास आहे. नीतिनियम सामाजिक असतात. ते बहुधा त्या-त्या समाजात समाजांतर्गत व्यक्तींपुरते मर्यादित असतात. समाजातल्या समाजात परत त्या-त्या वर्गाचे, जातींचे, कुटुंबाचे, असे वागण्याचे नियम असतात. स्वकीय-परकीय, आपण-इतर असे नेहमीचे व्यवहाराचे विश्व असते. स्वकीय वा आपला समूह ह्यांच्याशी वागण्याचे नियम परकीयांना लागू पडत नाहीत. विश्वकुटुंब वृत्तीचे लोक अपवादात्मक, आणि कृष्ण व अर्जुन खासच त्यांपैकी नव्हते. ते दोघेही निरनिराळ्या अर्थांनी त्या वेळच्या क्षत्रियांत गाजलेले होते. एक मुत्सद्दी म्हणून. दुसरा योद्धा म्हणून. अचाट संहाराने त्यांचे मन हेलावलेले दिसत नाही. महाभारतात 'मृगस्वप्नभय' म्हणून प्रकरण आहे. पांडव एका वनात राहत होते. रानातसुद्धा पांडवांचा परिवार मोठा होता. सर्वांचे पोट भरण्यासाठी व मजा म्हणूनही पांडव रोज खूप शिकार करीत. एकदा धर्मराजाच्या स्वप्नात जनावरे (हरिणे?) आली व त्यांनी सांगितले, "राजा, तुम्ही जनावरांचा एवढा संहार चालविला आहे की लौकरच आम्ही नष्ट होण्याच्या मार्गाला लागणार आहोत. तुम्ही दुसऱ्या वनात जा, आम्हांला थोडी उसंत मिळू द्या, आमची वीण वाढू द्या, मग परत या." हे ऐकून धर्म भावांना घेऊन दुसऱ्या वनात गेला. ज्या पांडवांना जनावरांचा निर्वंश होऊ नये अशी समज होती, त्यांनी खांडववनात इतका क्रूर संहार कसा केला? खांडववनात संहार कृष्णार्जुनांनी केला, धर्माने नव्हे, असे एक उत्तर व जनावरांचा निर्वंश न करण्यामागे दया नसून धोरण होते, हे दुसरे कारण.
जगात सर्व समाजांतून जनावरे व पक्षी अशा वन्य प्राण्यांच्या शिकारीविषयी काटेकोर नियम आहेत. जनावरांची पैदास ज्या ऋतूत होते, त्या ऋतूत जनावरे मारू नयेत; गाभण मादीला मारू नये. लहान लहान जनावरांना मारू नये; एक-ना-दोन, अगणित नियम आहेत. हरिणांच्या शिकारीचा हंगाम एक, तर तित्तिरपक्षी मारण्याचा दुसराच. अशाच तऱ्हेचे नियम महाभारतकालापासून किंवा या पूर्वीपासून आपल्याकडेही असावेत, असे दिसते. गाभण मादी मारू नये असा नियम हेाता. ज्या क्रूर कृत्यामुळे कळवळा येऊन वाल्मीकीला काव्य स्फुरले, तेही कृत्य नुसते पक्षी मारण्याचे नव्हते, तर विणीच्या दिवसांत एकमेकांशी क्रीडा करणाऱ्या जोडप्यापैकी एकाला मारण्याचे (यत् क्रौंचमिथुनादेकमवधीः काममोहितम्।) कृत्य होते. हे सर्व मृगयेचे नियम होते; पण आपल्यापैकी नव्हेत अशा माणसांना मारण्याबद्दल नियम नव्हते. जनावरांना आज जिवंत ठेवले, तरी इच्छेला येईल तेव्हा मारता येते. पण माणसांना जिवंत ठेवले, दास म्हणून जरी जिवंत ठेवले, तरी माणसा-माणसांच्या व्यवहारात दासाचे म्हणून काही क्षुद्रतम का होईना, पण अधिकार निर्माण होतात. अरण्य ज्यांच्या मालकीचे, त्यांना जिवंत ठेवणे तर जास्त धोक्याचे. जितांना दास म्हणून ठेवणे म्हणजेही धोका मोठा. म्हणून जेव्हा एका जमातीने इतरांवर मात केली, तेव्हा शक्यतो त्यांचा निःपात करण्याचे धोरण तिने पत्करले.
खांडववनात ज्यांची कत्तल झाली, त्यांपैकी मुख्य होते तक्षकनागाचे घराणे. तक्षक कुरुक्षेत्राला गेला होता, म्हणून वाचला. पण त्याची बायको व इतर परिवार जळाला. ह्या तक्षकाच्या निमित्ताने महाभारतात गुंफलेली एक उपकथा आपल्याला सापडते. खरोखर ही उपकथा नसून महाभारताच्या मुख्य कथेइतकीच महत्त्वाची व तीन पिढ्यांचा इतिहास व दोन मानववंशांचा झगडा सांगणारी एक जोडकथा आहे. महाभारताच्या सुरवातीलाच ही कथा येऊन जाते. कर्णपर्वात हीतील एक प्रसंग येतो. पण एकदा आदिपर्वात तिचा विस्तार झाल्यावर महाभारताच्या कथानकात ती डोकावत नाही. उत्तंकाच्या कथेत असा उल्लेख आढळतो की, तक्षक कुरुक्षेत्री इक्षुमती नदीच्या काठी राहत होता. खांडवदाह प्रकरणात आपल्याला कळते की, खांडववन हे तक्षकाचे राहण्याचे अरण्य होते. इक्षुमती ही यमुनेला मिळणारी एखादी लहान नदी असावी. खांडववनात तक्षक तर मेला नाहीच, पण त्याचा निर्वंशही झाला नाही. पण ह्या प्रयत्नामुळे नुसते तक्षकाचेच नव्हे, तर एकंदर 'नाग' नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांचे व पांडववंशाचे वैर जडले. हे वैर अर्जुन, अर्जुनाचा नातू परीक्षित व परीक्षिताचा मुलगा जनमेजय असे तीन पिढ्या टिकले. कृष्णार्जुन युद्धाच्या वेळी तक्षकाच्या मुलाने अर्जुनाला मारण्याचा निकराचा प्रयत्न केला, तो साधला नाही. पण अर्जनाचा नातू परीक्षित ह्याला तक्षकाने मारले. त्याचा सूड परत एकदा सर्पसत्राच्या निमित्ताने भयंकर हत्या करून जनमेजयाने घेतला.
हे 'नाग' नावाचे लोक काही त्या वेळच्या क्षत्रियांच्या दृष्टीने परके नव्हते व जंगली नव्हते. कुरूंची जी वंशावळ सांगितली आहे, तीत निरनिराळ्या दोन राजांनी तक्षकाच्या 'ज्वाला' नावाच्या मुलींंशी लग्न केल्याची नोंद आहे, व ह्या दोन ज्वालांची मुले राज्यावर बसली, असाही उल्लेख आहे. म्हणजे कुरुवंशात-निदान शंतनुपर्यंत तरी नागवंशाचे बीज नि:संशय होते. नागवंशाच्या ज्या मुलींशी लग्ने झाली, त्या राण्या झाल्या व त्यांचे मुलगे गादीवर आले. म्हणजे क्षत्रिय त्यांना आपल्यासमान मानीत असत असे दिसते. नाग-राजांची जी यादी आढळते, तीत तक्षकाच्या वंशाचे नाव नेहमी असते. तक्षकांच्या मुलाचे नाव 'अश्वसेन' हेही इतर क्षत्रिय नावांसारखेच आहे. अर्जुनाने ज्या उलुपी नावाच्या नागकन्येशी लग्न केले, ती कौरवकुलातली(!) होती, त्या कुलात 'ऐरावत' व 'धृतराष्ट्र' नावाचे राजे होते. नागवंशातील एका कुलाचा पूर्ण नाश करण्याचा असा क्रूर प्रयत्न कृष्णार्जुनांनी का केला?
'ब्राह्मणाने दान मागितले आम्ही दिले,' असे उत्तर समाधानकारक वाटत नाही. ब्राह्मणाने-प्रत्यक्ष द्रोणाने-द्रुपदाचा पराभव करण्याचे दान मागितले होते व अर्जुनाने द्रुपदाला बांधून आणले, पण सर्व द्रुपदांचा काही नाश केला नाही. आपल्या विजेत्याला आपली मुलगी देताना द्रुपदाला दुःख झाले नाही. क्षत्रियांशी युद्धाची काही नीती होती. पण खांडवदाह-प्रकरणात कुठल्याच तऱ्हेचे विधिनियम दिसत नाहीत. नागांचा संहार हेच एक उद्दिष्ट दिसते. कृष्णाने लहानपणी यमुनेच्या डोहात राहणाऱ्या कालियानागाचा पराभव करून त्याला यमुनेतील राहण्याचे ठिकाण सोडावयास लावले होते. कृष्णाच्या निरनिराळ्या हेतूंपैकी यमुनेच्या प्रदेशातून नागांची हकालपट्टी करणे हाही एक हेतू होता, अशी शंका मनात येते. हा हेतू साध्य करण्यासाठी तेथील नागांचा निर्वंश करण्याचे धोरण क्रूर तर होतेच, पण ते उघड-उघड फसले हेही पुढील कथेवरून दिसून येते. ज्यू लोकांचा निर्वंश करायचा, अशा हिटलरी धोरणांपैकीच ते वाटते. त्याचा हेतू तर साध्य झाला नाहीच पण तीन पिढ्यांचे वैर मात्र पदरी पडले. सहस्त्रावधी नाग व इतर वंशाचे लोक तडफडत, तळतळाट करीत मेले.
ह्यातून वाचलेला मय हा एक असुर होता. तो उत्तम कारागीर होता. कृष्णाच्या आज्ञेने त्याने पांडवांना एक अप्रतिम सभा बांधून दिली. गंगे-यमुनेकाठी राहणाऱ्या कोणत्याही क्षत्रियाची इतकी सुंदर सभा नव्हती. आर्यांची सगळी बांधणी लाकडाची असे. याउलट आर्यांच्या आधी भारतात असलेल्या लोकांनी भाजलेल्या विटांनी मोठमोठी शहरे बांधली होती. असुर नावाचे लोक तर बांधकामात फारच प्रवीण होते. नुसत्या साध्या विटा नव्हेत, तर काचेचा थर बसवलेल्या निरनिराळ्या रंगांच्या विटाही ते बनवीत असत. त्याच विटा वापरून मयाने पांडवांची सभा बांधलेली असणार. हिरवट निळ्या विटांनी त्याने पाण्याचा भास निर्माण केला. पाणी खेळवलं, त्याच्या खाली निराळ्याच रंगाच्या विटा वापरून जमिनीचा भास निर्माण केला. ह्या सभेत पुष्कळांची खूप फजिती झालेली असणार: पण महाभारतात वर्णन आहे, ते फक्त दुर्योधनाच्या फजितीचे आणि त्याला मोठमोठ्याने हसणाऱ्या द्रौपदीचे व भीमाचे! आधीच पांडवांच्या वैभवाने जळणाऱ्या दुर्योधनाला हे हसणे जिव्हारी भिडले असल्यास नवल नाही. इकडे भीम व द्रौपदी हसत होती, तिकडे धर्माने त्याला हात धरून उठवून नवी वस्त्रे नेसावयास दिली. हा प्रकार त्याला सिद्ध-साधकपणाचाच वाटला असला पाहिजे. एकाने उपहासाने मारावे, दुसन्याने औदार्याने मारावे! दुर्योधन संतापाने व इर्षेने इतका जळला की, पांडवांचा नक्षा उतरवण्याकडे त्याचे सारखे लक्ष लागले, ते साध्य झाले नाही. तर तो जीव देण्यास निघाला होता. शेवटी त्याच्या मामाने पांडवांना द्यूतात हरवून देशोधडीला लावले, व भाच्याचे हृदय शांत केले.
रान जाळून आतील प्राण्यांचा एवढा अमानुष संहार करून सभा मिळवली, तिचा उपभोग पांडवांना पुरती पाच-दहा वर्षेसुद्धा मिळाला नाही.
पांडव वनवासात होते, तेव्हा इन्द्रप्रस्थाची किंवा मयसभेचा काही पडझड झाल्याचा उल्लेख नाही. पण पांडवांनी युद्धोत्तर राज्य केले ते हस्तिनापुरातच. वज्र किती वर्षे इन्द्रप्रस्थात टिकला, त्याच्यामागून त्याचे वंशज तेथे राहिले का, वगैरे काहीच उल्लेख
नाही. खुद्द पांडव-वंशालाही जनमेजयामागून लौकरच हस्तिनापूर सोडून कौशाम्बीला राजधानी करावी लागली. इन्द्रप्रस्थाच्या यादव-वंशालाही तसेच करावे लागले असणार. उत्तरेकडून नव्या-नव्या लोकांच्या स्वाऱ्या होत होत्या. महाभारत युद्धाने खिळखिळी झालेली क्षत्रियकुले त्याला तोंड देऊ शकली नाहीत. महाभारतकालीन कुरु-पांचालांतील राजकुले, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था सर्वच नष्ट झाली. ह्यापुढे नाव ऐकू येते ते मगधाचे, कुरु पांचालांचे नव्हे. ह्या सर्व उत्पातात हस्तिनापूर नष्ट झाले, इन्द्रप्रस्थही नष्ट झाले. पण हस्तिनापूर एक दीर्घकालीन परंपरा ठेवून गेले. हस्तिनापुरात कुरुवंशाने कित्येक शतके राज्य केले. तेथल्या राजांच्या व राण्यांच्या अद्भुत वा रम्य किंवा अगदी साधारण अशा जीवनकथांशी हस्तिनापुराचे नाव कायम जडलेले आहे. हस्तिनापुराच्या रस्त्यांची वर्णने आहेत, तेथील नागरिक निरनिराळ्या प्रसंगी काय बोलले, त्याची नोंद आहे; कुंतीला आसरा देणाऱ्या विदुराचे घर तेथे होते; धृतराष्ट्राची राजसभा तेथे होती; द्रौपदीला ज्यातून ओढून आणले ते अंतःपुर तेथे होते; शेवटी शोक करणाऱ्या कौरव-स्त्रियाही तेथेच होत्या.
इन्द्रप्रस्थाशी कोणताही राजवंश निगडित नाही. खांडवदाहाच्या भयानक गोष्टीखेरीज संस्कृत वाङ्मयातील कोणतीही कथावस्तू ह्या शहराचा आसरा घेऊन नाही, त्याला घनता नाही. कोणताही आकार आलाच नाही. मयसभेची वास्तू तर नुसती अपशकुनीच नव्हे, तर आभासमयच राहिली. माणसाच्या तामसी वृत्तीतून निर्माण झालेल्या क्षणभंगुर, नेत्रदीपक, हृदयदाहक अशा 'आसुरी संपत्तीचे' ते एक स्वप्नवत् दर्शन ठरले.
सप्टेंबर, १९६४