युगान्त/युगान्त

(युगान्त/ युगान्त पासून पुनर्निर्देशित)




दहा



युगान्त




 अमक्या एका क्षणाला, दिवसाला वा वर्षाला एक युग संपले व दुसरे जन्मले, असे काही सांगता येत नाही. एक युग संपले, म्हणजे त्या युगात जे काय म्हणून होते, ते सर्व संपून नव्या युगाबरोबर नवी माणसे, समाजाची नवी घडी येते, असेही नाही. सोयीप्रमाणे कालप्रवाह अखंड चाललेला आहे. आपल्या, अभ्यासाचा, दृष्टिकोण असेल त्याप्रमाणे तुकडे पाडायचे व त्यांना दशके,सहस्त्रके, वा युगे अशी नावे द्यायची. महाभारताबरोबर एक युग संपले, ही कल्पना फार जुनी आहे. तीच मी उचलून धरलेली आहे.दुसऱ्या कोणालाही तितक्याच अधिकाराने ही कल्पना नाकारून दुसऱ्या तऱ्हेने कालाचे विभाग पाडता येतील. युग म्हणजे काय व त्याचा अंत झाला असे आपण का म्हणतो, हा दृष्टिकोण स्पष्ट केला म्हणजे झाले. काही गोष्टी महाभारताबरोबर नष्ट झाल्या, तर काही महाभारतापासून पुढे कित्येक शतके अगदी आजपर्यंत आपल्यांत चालू आहेत, असे दाखवता येईल. एका कालविभागाला 'युग' म्हटले, ते केवळ काही गोष्टी त्यात होत्या, पुढे नव्हत्या, एवढ्याचसाठी नव्हे. पूर्वी नसलेल्या, पुढे जास्त प्रमाणात आढळणाऱ्या समजुती, रीतीभाती ह्यांची सुरवात (म्हणजे- पुढच्या युगाची चाहूल) येथे जाणवते, म्हणूनही मी ह्या कालविभागाला 'युग' म्हणते. एका दृष्टीने एखाद्या युगाचा शेवटचा भाग त्या युगाचा प्रातिनिधिक नसून ती खरोखरीने संध्या- एका युगाची रात्र व दुसऱ्या युगाची पहाट असते. महाभारत अशाच तऱ्हेचे आहे. पण त्याच्या स्वरूपामुळे त्याला एक असामान्य वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. महाभारत म्हणजे त्या कालातले एका विशिष्ट वर्गातील लोक कसे राहत असत, ह्याची जंत्रीवजा माहिती नसून एक विशिष्ट कुटुंब घेऊन त्याच्या अनुषंगाने त्या काळाचे जीवन व विचार ह्यांचे खोल व व्यापक चित्रण ज्यात आहे, अशी एक दीर्घ कथा आहे. सर्व कथा छंदात सांगितलेली आहे आणि बऱ्याच प्रसंगी त्या छंदाला व त्यामुळे एकंदर कथेला खऱ्याखुऱ्या काव्याचे अविस्मरणीय रूप आले आहे.
 जुन्या पुराणकालीन समजुतीप्रमाणे पांडवांच्या राज्याची शेवटची वर्षे ही कलियुगाची सुरुवात आहे. द्वापरयुगाचा अंत आहे. पण भारतीय योद्धयांना तसे वाटत नव्हते, असे वाटते.* युग संपले, ही जाणीव युग संपून बराच काळ लोटल्यावर आलेल्या पिढीची... त्याचप्रमाणे पूर्वीचे क्षत्रिय-खरे(?) क्षत्रिय- महाभारत युद्धात नष्ट पावले, असा पुराणांचा दावा आहे. हीही समजूत मागाहूनची आलेली दिसते. युद्ध संपल्यावर निरनिराळ्या राजांचे वंश आपापल्या गादीवर बसले. खुद्द हस्तिनापूरला पांडवांचा नातू परीक्षित बसला, इन्द्रप्रस्थाला कृष्णाचा पणतू वज्र हा राजा झाला.इतर मुख्य यादवांचे वंशज दुसऱ्या राज्यांवर बसले, विदर्भाचा रुक्मी आपल्या राज्यावर होता, वगैरे वृत्तान्त लक्षात घेतला, म्हणजे क्षत्रियवर्ग नष्ट झाला, हा उत्तरकालीन दावा पटत नाही.पण जुन्या क्षत्रियवर्गाची रचना व घडी विस्कटली, ही गोष्ट मात्र ऐतिहासिकदृष्ट्या पटण्यासारखी आहे.

 

* ते त्यांना दाखवून दिले, हा भाग प्रक्षिप्त, मागाहून घुसडलेला वाटतो.

 महाभारतकाली काय होते, नंतर काय आले, महाभारतकालात कोणत्या सामाजिक घटनांचा पाया घट्ट रोवला गेला, वगैरेंचे ऊहापोह करण्याआधी महाभारतकाल म्हणजे काय हे स्पष्ट,सांगितले पाहिजे.
 महाभारताचा काल म्हणजे भारतीय युद्ध झाले, त्याच्या अलीकडचा व काही पलीकडचा शतकांचा काळ धरावा लागेल. निदान तसा तो ह्या विवेचनात धरलेला आहे. महाभारतकालाला 'युगान्त' म्हटले आहे. म्हणजे भारतीय युद्धानंतरचा फार-तर एक दोन काळ शतकांचाच अभिप्रेत आहे. पुराणकारांच्या मते तर पांडवांच्या मरणाआधीच कलियुगाची सुरवात झाली होती. महाभारताच्या आधी किती शतके जावे, हा एक कठीण प्रश्न आहे. वेदात दाशराज्ञ युद्धाचा शेवट ते भारतीय युद्धाचा शेवट, असा एक काळ धरावा लागेल, व युगान्त म्हणजे या काळाचा शेवट मानावा लागेल. वेद जरी नाहीत,तरी काही ब्राह्मणे व काही उपनिषदे ह्या काळातली मानावी लागतील.याज्ञवल्क्याचे आपला गुरू व मामा जो वैशंपायन त्याच्याशी झालेले भांडण कधीतरी भारतकथेकाळी झालेले सांगितले आहे. प्रत्यक्ष कथेशी ज्याचा संबंध नाही, असा हा भाग आहे. पण कालदृष्ट्या ते विधान खरे मानले, तर सबंध शुक्ल यजुर्वेद, त्यांची महत्त्वाची ब्राह्मणे (उदा.शतपथ) व ईशावास्यादी उपनिषदे ही भारतीय युद्धानंतरची, बुद्धकाळाला जवळची असे मानावे लागेल. भारतीय युद्धाचा काळ ख्रिस्तपूर्व १००० ते १२०० वर्षे, असे मी मानते.
 भारतीय युद्धाची कथा ही क्षत्रियकुळातील दोन भावांच्या मुलांच्या भांडणांची कथा आहे. क्षत्रियांखेरीज इतर माणसांच्या कथा व उल्लेख दुय्यम आहेत; पण जे काही आहेत, त्यांवरून समाजरचनेची काही अंगे स्पष्ट दिसतात. वर्ण होते; क्षत्रिय व ब्राह्मण वर्ण मुख्य होते; एकमेकांचे प्रतिस्पर्धा, एकमेकांचे पूरक व आधारस्तंभ म्हणून ते राहत होते. क्षत्रियांचा यज्ञयागांवर व ब्राह्मणांच्या मंत्रविद्येवर विश्वास असल्यामुळे व संस्कार त्यांच्या हातून होत असल्यामुळे त्यांना ब्राह्मणांची गरज होती व ब्राह्मणांना क्षत्रियांकडून संरक्षणाची, पुरस्काराची व पोषणाची अपेक्षा होती. हे दोघे ठामपणे एका समाजाचे घटक होते. त्या समाजाच्या दैवतकल्पना एकच होत्या. 'विश्’ वर्गाचे नाव काही वेळेला येते, पण त्या वर्गातील व्यक्तींचे चित्रण नाही. शूद्र वर्गाबद्दलही असेच म्हणता येईल. शूद्र कोण होते? राजकुले दासदासींनी भरलेली होती. सर्व दास व सर्व दासी शूद्र होत्या, असे म्हणायचे का? सुभद्रा गोपालिका- वेष घेऊन 'मी तुमची दासी,' म्हणून द्रौपदीला भेटायला आली. म्हणजे तिने विनयाने शूद्रत्व धारण केले, असा अर्थ होतो का?
 भगवद्गीता आज ज्या स्वरूपात आहे, त्या स्वरूपात ती पूर्वी (युद्धकाली?) नव्हती, म्हणून पुढच्या पुढच्या अध्यायांत जेथे कृष्णाचे देवपण उघड गृहीत धरले आहे तेथे- जे आले आहे, त्याचा दाखला देणे बरोबर होणार नाही. पण पुढच्या कालातला म्हणून धरला, तरी गीतेतील पुढील श्लोक विचार करण्यासारखा आहे. कारण तो पांडवांच्या वेळच्या समाजस्थितीचा निदर्शक आहे; स्मृतीतील समाजस्थितीचा नव्हे. कृषी, गोरक्ष, वाणिज्य अशी कर्म वैश्यांची व परिचर्यात्मक कर्म शूद्राचे (गीताः१८.४४) म्हणून सांगितले आहे. अशाच अर्थाचे दोन श्लोक पुढे कर्णपर्वात शल्याच्या तोंडी आहेत. (८.२३.३५-३६) कृषिवल म्हणजे शेतकरी, गोरक्ष म्हणजे गवळी व वाणिज्य म्हणजे सर्व प्रकारचा व्यापार करणारे, वस्तू तयार करून विकणारे लोक. शेतकरी राजाला कर देत होता. गवळी किंवा गोवारी गोधन बाळगीत. राजधानी स्थापायची म्हणजे निरनिराळ्या दुकानदारांना आणून त्यांना जागा देऊन, करांत सवलती देऊन नव्या राजधानीत त्यांना वसवायची प्रथा होतीसे दिसते. ते वसले, म्हणजे अर्थात करही देत असत. हे लोक परिचर्या म्हणजे एखाद्याची चाकरी करीत असे दिसत नाही. क्षत्रियांचे गोधन संभाळणाऱ्यांंत खूपसे चाकर व गोपाध्यक्ष म्हणजे राजपुरुष असत असे दिसते. ह्या वेळचे सामाजिक चित्र राजन्य, ब्राह्मण व सर्वसाधारण प्रजा म्हणजे 'विश्' व दास असे होते. ह्या काळानंतर वणिज धनवान व बलशाली झाले व त्यांनीच फक्त वैश्य वर्ण (तिसरा वर्ण) व्यापला; शेतकरी व गोपाल चौथ्या वर्गात गेले. ह्याचा अर्थ असाही करता येईल की, वैश्य-वर्गात असलेल्या धनवान लोकांच्या मालकीची जी जमीन होती, ती ते स्वतः (जुन्या 'विश्’- प्रमाणे) न करता गरीब शेतकऱ्यांंना किंवा भूमिहीन मजुरांना कसायला देत. भूमिहीन कामकरी स्थायिक नसून ते ह्या गावाहून त्या गावाला जाणारे लोक होते. ह्याशिवाय ह्या कामकरी वर्गात स्वतःचे असे दास होतेच. म्हणजे पुढील काळात वैश्य व शूद्र या वर्णाची व्यवस्था बदलली. वैश्य वा 'विश्' म्हणजे 'सर्वसाधारण प्रजा' न राहता 'वैश्य' नावाचा विशिष्ट कार्य करणारा वर्ण बनला; आणि मग सर्व तऱ्हेचे कारागीर, शेतकरी, गोपाल, परिचर्या करणारे व दास मिळून शुद्र वर्ण बनला काय? त्याचप्रमाणे सैन्यातही दोन प्रकार दिसतात. एक क्षत्रिय वर्ग व त्यांच्या जवळचे क्षत्रियांचेच आप्त व दुसरे पगारी(?) सैनिक. कृष्णाजवळ 'नारायणीय' नावाचे असे सैनिक होते. 'संशप्तक' हे अशाच तऱ्हेचे युद्धजीवी लोक होतेसे दिसते. ह्या लोकांचा दर्जा काय होता; तेही शूद्रच होते का? बाकीच्यांना (क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य-कृषक इत्यादीना) लढाईत वाटल्यास जाता येई, वाटल्यास अलिप्त राहता येई. पण हे लोक सैन्यात भरती झालेले व सैनिक म्हणून पोसलेले होते. त्यांना धनी सांगेल, त्याप्रमाणे लढाई करणे प्राप्त होते. म्हणजे ते 'क्रीतदास' होते. कृष्ण पांडवांच्या बाजूचा होता, पण 'नारायणीय' नावाचे योद्धे दुर्योधनाच्या बाजूने लढत होतेसे दिसते. वर्णसंस्थेत ह्या लोकांना स्थान काय होते, ते कळत नाही. भारतीय युद्धात भाग घेणारा समाज प्रामुख्याने त्रैवर्णिक होता. म्हणजे राजा, धार्मिक विधी करणारे ब्राह्मण व वैश्य ही मुख्य प्रजा, अशी समाजरचना होती; व ज्यांना कोणतेही हक्क नाहीत, ज्यांचे संस्कार वरील तिघांचे नव्हेत, व जे फक्त नोकर, ते शूद्र होते. कृषि व गोरक्षण वैश्यांकडे असल्यामुळे शूद्रांची संख्याही पुढील काळापेक्षा फारच कमी असली पाहिजे. हा समाज प्रामुख्याने त्रैवर्णिक असला, तरी चौथा वर्ण प्रस्थापित झालेला होता व त्याला नावही होते. म्हणून चातुर्वर्ण्यात्मक समाजव्यवस्थेची सुरवात व्हावयाला लागली होती. कृषी, गोरक्ष, वाणिज्य हे करणारा वैश्यवर्ग जाऊन त्याऐवजी व्यापार करणारा धनाढ्य व बलशाली वर्ग स्थापन झाला व कृषिगोरक्ष करणारे हे परिचर्या करणाऱ्या शूद्र पायरीला पोहोचले, हे दृश्य महाभारताच्या काळानंतर उदय पावलेल्या बौद्धयुगामध्ये स्पष्ट दिसते. बौद्ध व नंतरच्या जैन वाङ्मयात वैश्यवर्गाला प्राधान्य आहे. गोष्टींचा नायक हा वीरपुरुष व क्षत्रिय असावा, हा भारतकालीन प्रघात जाऊन तो श्रेष्ठी वा श्रेष्ठीपुत्र होऊ लागला. म्हणूनच बुद्धकथांमध्ये किसा गोतमी व विशाखा अशा वैश्य स्त्रियांची वर्णने आलेली आहेत. श्रीमंत वैश्य गृहस्थाश्रमात असण्याची आवश्यकता सांघिक प्रव्रज्याप्रधान धर्माला असते, असे म्हणता येईल का? प्रव्रज्याप्रधान धर्म पहिल्यापासूनच व्यक्तिपूजेवर आधारलेले असतात. ते सांघिक असतात व म्हणून की काय, धर्मसंस्थेची बांधणीही घट्ट आखीव होते. धर्माचा मुख्य, उपमुख्य, संघमुख्य, संघाचे व व्यक्तीचे जीवन सर्वच बांधले जाते. बौद्ध, ख्रिस्ती, व महंमदीय धर्म असेच होते. घरच्या वाणिज्यावर भागेनासे झाले, तेव्हा ह्या धर्माचे लोक साम्राज्य संस्थापक बनले व धर्माची तत्त्वे जगभर पसरली. बौद्ध धर्म घरच्या-घरी साम्राज्यवादी होता व त्याच्या हजारो भिक्षूंच्या पोषणासाठी त्या वेळी श्रीमंत वणिक् वर्गही होता. भारतीय युद्धाचे युग त्या मानाने आकुंचित संबंधित गटांनी व्यापलेले असे दिसते. धर्माला सार्वजनिक स्वरूप नव्हते. जो बांधीवपणा होता, तो समाजाच्या एकसंधपणामुळे; धर्माच्या स्वरूपामुळे नव्हे.धर्म हा शब्द फारच व्यापक व खऱ्या अर्थाने व्यक्तिगतच राहिला.
 पुढचा प्रश्न : जाती होत्या का? वर्ण होते, पण जाती नव्हत्या, असे म्हणण्याकडे बऱ्याच जणांचा कल आहे. जातींची नावे फारशी वाचण्यात येत नाहीत. पण ज्यांना जाती म्हणता येईल, असे समूह होते, सूतांचे स्थान 'विश्’ व शूद्र ह्यांच्या वरचे होते की काय, अशी शंका शल्याच्या पुढील वाक्यावरून येते. कर्णाचा सारथी होण्याची विनंती दुर्योधनाने केली, तेव्हा रागावून शल्य म्हणाला, “शूद्र ब्रह्मक्षत्रविश ह्यांचे परिचारक ठरलेले आहेत. सूत ब्रह्मक्षत्रांचे परिचारक आहेत. विश व शूद्र ह्यांचे नाहीत. मूर्धाभिषेक झालेला मी कर्णाची नोकरी करावी, असे कसे होईल?"
 ब्रह्मक्षत्रविशां शूद्रा विहिताः परिचारकाः। ८.२३-३५.
 ब्रह्मक्षत्रस्य विहिताः सूता वैपरिचारकाः।
 न विशूद्रस्य.....   ८.२३.३८.

 ज्यांची लग्ने आपसातच बहुतांशी होतात, अशा माणसांचा मिळून झालेला समाज म्हणजे जात. जातीचा एक गुण असा असतो की, तीतील एखादा मनुष्य अमक्या वर्णाचा अशी सार्वत्रिक कबुली मिळाली, म्हणजे इतर जातभाई त्या वर्णाचे होऊ शकतात. कर्णाची धडपड वैयक्तिक होती. तो सर्व सूतांना क्षत्रियत्वाचे दार मोकळे करू इच्छित नव्हता. जन्माने क्षत्रिय आहोत, हे सिद्ध करण्याची त्याची धडपड होती. मेल्यावर क्षत्रियांच्या विधीने अग्निसंकार झाल्यामुळे क्षत्रियत्व त्याला एकट्याला मिळाले; त्याच्या मुलाला मिळाले नाही. कारण तो सूत स्त्रीपासून जन्माला आला होता. ही एकच गोष्ट जात ह्या सामाजिक समुहाचे अस्तित्व दाखवण्यास पुरेशी आहे. भारतातील जातिसंस्थेचा एक विशेष असा आहे की, वरच्या जातींतील लोकांना खालच्या जातींतील स्त्रियांशी प्रसंगी लग्नही करता येत असे, पण त्यामुळे त्या स्त्रियांच्या माहेरच्या मंडळींची जात बदलत नसे. उदा. सुदेष्णा व कालीसत्यवती. जाती व वर्णसंस्था ह्यांचा एक विशेष महाभारत कथेतही दिसतो. खालच्या जाती बहुधा वरच्या वर्णांत जाऊ इच्छितात, फक्त एका जातीतून दुसरीत जायचा प्रयत्न नसे. सर्व जाती वा वंश ह्यांचे स्थान नक्की झालेले दिसत नाही. नागकुलांना- विशेषतः त्यांतील राजघराण्यांना बराच मान असे, पण त्यांना कोठच्या वर्गात स्थान होते, ते कळत नाही. बरीच राजघराणी क्षत्रिय नसूनही पुढच्या कालात स्वतःला 'क्षत्रिय' म्हणवून घेऊ लागली; पण बौद्ध-कालातही अशा प्रयत्नांना यश मिळत नसे व राजा असूनही क्षत्रिय नसलेल्या बलशाली राजालासुद्धा क्षत्रियकन्या मिळत नसे, हे पसेनदी कोसल व वासभखत्तिया ह्यांच्या गोष्टीवरून दिसून येते. पुढील काळात दिसून येणारी वर्ण व जाती ह्यांची व्यवस्था व खालच्या जातींची वरच्या वर्णांत जाण्याची धडपड व बऱ्याचदा यशस्वी झालेले प्रयत्न हे भारतीय समाजाचे आजपर्यंत दिसणारे अंग भारतीय युद्धाच्या काळात दृढमूल होऊ लागले होते. भारतीय युद्धाच्या वेळी क्षत्रिय म्हणवणारी घराणी बऱ्याच पूर्वीपासून अस्तित्वात होती. भारतीय कथेवरून पाहता क्षत्रिय घराणी आपल्या क्षत्रियत्वाला फार जपत होती, व त्याच-बरोबर एकमेकांच्या परंपरागत आलेल्या राज्यांना व क्षत्रिय समाजाच्या अशा विशिष्ट बांधणीला जपत असत. क्षत्रिय लहानशा का होईना, पण एकेका प्रदेशाला चिकटून होते. ह्याच्या उलट ब्राह्मण इतरांच्या आश्रयावर अवलंबून असल्यामुळे ह्या राज्यातून त्या राज्यात जात असत. नाना प्रदेशांशी, राजसभांशी त्यांचा संबंध येईच, पण नागांशी व अरण्यातून राहणाऱ्या इतर लोकांशीही त्यांचा संबंध येई व शरीरसंबंधही घडे. त्यापासून निर्माण झालेली ही प्रजा बऱ्याचदा ब्राह्मण गणली जाई. क्षत्रियांतही संकर होत होता, पण तो ब्राह्मणांइतका नव्हता असे कथेवरून दिसते.
 राजा असूनही क्षत्रिय नाही, असे कर्णाचे उदाहरण. लगेच पुढील काळातील पसेनदीचे उदाहरण. ह्यांवरून असे अनुमान काढता येईल की निरनिराळ्या व्यक्तींना किंवा समूहांना आपल्या जातीतून क्षत्रियवर्णात जाणे जरी यशस्वीपणे करता आले, तरी प्रत्येक वर्णात १) जुनी प्रतिष्ठित घराणी, २) जुनी प्रतिष्ठित पण मांडलिक व मातब्बर नसलेली घराणी व ३) नव्याने आत शिरू पाहणारी वा शिरलेली मातब्बर नसलेली घराणी असत. घराण्यांचा समूह आपापले वैशिष्ट्य टिकवी. फक्त नव्या आलेल्या घराण्यांना जुन्यांशी शरीर-संबंध जोडून आपण मुळापासून क्षत्रिय आहोत, वा ब्राह्मण आहोत, असा दावा करायचा असे. वर्णांतर्गत उच्च-नीच, नवे-जुने असे गट असत. व्यक्ती किंवा जाती वरच्या वर्गात जायची धडपड करीत, त्यावेळी त्या वर्गातील जुन्या सर्वांनी प्रमाणित मानलेल्या कुटुंबात लग्नसंबंध करण्याचे त्यांचे प्रयत्न असत असे दिसते. जाती व वर्ण ह्यांच्यामधील अशा तऱ्हेचे संबंध भारताच्या सगळ्या इतिहासात दिसतात. सर्व जगभर सर्वच समाजात सर्वकाळ चाललेल्या एका सामाजिक प्रक्रियेचेच हे भारतीय उदाहरण समजता येईल. एका वर्णात पुष्कळ जाती का असतात, त्याचे हे एक कारण देता येईल. वर्णसंकराबद्दल ओरडा जसा सनातन, तशीच वर्णसंकर ही क्रियाही सनातनच.
 वर्ण व जाती असलेल्या समाजाचे महाभारतातील चित्र फार उठावदार नाही. वर्ण दृढ होते, जाती अस्तित्वात होत्या, वैश्यांची कृत्ये पुढच्या काळातील शूद्रांची होती, इतक्याच गोष्टी सांगता येतात. ह्याउलट महाभारतातील कौटुंबिक चित्र फारच उठावदार, बारकाव्यांनी भरलेले व आजतागायत रूढ असलेल्या पितृप्रधान कुटुंबाचे प्रातिनिधिक आहे. हे चित्र इतके तपशीलवार आहे की, यामुळे त्यात पुढे पडलेले लहान-मोठे फेरफारही लवकर समजू शकतात. आजतागायत बहुतेक हिंदुस्थानभर रूढ असलेले पितृप्रधान सामायिक कुटुंब महाभारतात वर्णिलेले आहे. हस्तिनापूरच्या कुरुंचे ,पांचालातील द्रुपदांचे व द्वारकेतील यादवांचे असेच कुटुंब होते. एका वेळी कुटुंबात चार-चार पिढ्यांचे लोक असत. ह्या कुटुंबातील पुरुष त्यात जन्मलेले असत. (दत्तक गेलेल्यांचा, घेतलेल्यांचा अपवाद.) कुटुंबात जन्मलेल्या मुली परघरी जात व परघरच्या मुली सासवा, बायका व सुना म्हणून कुटुंबात येत. कुटुंबात जन्मलेल्या मुली कन्या व पुत्री असत. त्यांचे निराळे असे अंतःपुर होतेसे दिसते. परघरच्या मुलींना 'वधू' हे सामान्य नाव. त्यांचे अंतःपुर निराळे असे. ह्या काळचा विशेष असा की, नातेवाचक शब्द फारच कमी होते. 'पिता', 'तात' ह्या शब्दांनी बाप, बापाचे भाऊ ह्यांचा बोध होई. बापाची बायको व बापाच्या भावाची बायको ही 'माता' किंवा 'अम्बा' होती. स्वतःच्या बापाची व बापाच्या भावाची मुले, पुत्र व कन्या असत. महाभारत ही भावा-भावांच्या मुलांच्या भांडणाची गोष्ट आहे. पण बाप व चुलता, सख्खा भाऊ, चुलतभाऊ, मुलगे व पुतण्ये असे निरनिराळे शब्द नाहीत. ही गोष्ट परत-परत लक्षात येते. वारणावताला जाताना धर्म धृतराष्ट्राचा व गांधारीचा 'तात' व 'अम्ब' म्हणून निरोप घेतो. ही माणसे आपला घात करणार आहेत, हे माहीत असूनही त्यांना नमस्कार करून दीनपणे उभा राहतो. त्यावेळची 'तात' व 'अम्ब' ही संबोधने आजच्या वाचकाला तरी जास्तच करुण वाटतात. 'पुत्र' म्हणून पांडवांना त्यांनी दिलेला आशीर्वाद जास्तच दांभिक वाटतो. पांडवांना वनात पाठविले, तेव्हा विदुर त्यांच्या वतीने धृतराष्ट्राशी भांडला, तेव्हाही धृतराष्ट्राने विदुराला म्हटले, "अरे ! एवढा कळवळा आला असला, तर जा त्यांच्यामागून. माझ्यामागे भुणभूण लावू नकोस."
 कथं हि पुत्रं पाण्डवार्थे त्यजेयम्  ३.५.१ ७.
 ('पांडवांसाठी मी मुलाचा त्याग करणे कसे शक्य आहे'?)
 असंशयं तेऽपि ममैव पुत्रा दुर्योधनस्तु मम देहात् प्रसूतः।
 स्वं वै देहं परहेतोस्त्यजेति को नु ब्रूयात् समतामन्ववेक्षन्॥  ३.६.१७.
तो पुढे म्हणतो, "तेही निःसंशय माझेच मुलगे आहेत; पण दुर्योधन माझ्या शरीरापासूनचा आहे. दुसऱ्यासाठी स्वतःचा देह सोड, असे समानता शोधू पाहणारा कोणता शहाणा म्हणेल ?" म्हाताऱ्याच्या सर्व मुलांना मारून धर्म परत त्यांना 'तात' व 'अम्ब' म्हणत राहिलाच. हे शब्द म्हणताना कित्येक वेळी त्याची जीभ अडखळली असेल, असे काही प्रसंगी तरी वाटतेच. आजही कुटुंब पितृप्रधान व सामायिक आहे पण सख्खे व चुलत हा भेद सर्व उत्तर-भारतीय भाषांत स्पष्ट केलेला आहे.
 महाभारतकाळी 'पतिव्रता' ह्या शब्दाचा अर्थ काही दृष्टींनी पुढच्या काळापेक्षा निराळा होता. त्या वेळी औरस संतती नसली, तर नियोगाने पुत्रोत्पत्ती हा मार्ग दत्तक घेण्यापेक्षा जास्त चांगला समजत. नंतरच्या काळात नियोग मागे पडला, व दत्तक घेण्याचा प्रघात सर्रास सुरू झाला. ह्यामुळे स्त्रीला जास्त मान मिळाला असे मात्र होत नाही. पूर्वी स्त्री ही 'क्षेत्र' होती. तिला नवरा सांगेल त्याच्यापासून पुत्रोत्पत्ती करून घ्यावी लागे. पुढच्या काळी ही सक्ती नाहीशी झाली, पण त्याचबरोबर स्त्रीच्या हातून कुवारपणी वा लग्न झाल्यावर काही चूक झाली, तर तिला क्षमा करायची, ही वृत्तीही पार नाहीशी झाली. स्त्रीवर बलात्कार झाला, तर पूर्वीचे क्षत्रिय तिला टाकून देत नसत. त्यानंतरचा हिंदू समाज मात्र पावित्र्याच्या - फक्त स्त्रियांच्याच पावित्र्याच्या- बाबतीत इतका हट्टी व संकुचित, बनला की, तो आपल्या स्त्रियांना रक्षूही शकला नाही, वा परत आपल्यात घेऊही शकला नाही. आजतागायत ही भयंकर वृत्ती कायमच आहे, हे फाळणीच्या प्रसंगी प्रत्ययास आलेच!
 ज्यात आपला जन्म झाला, ते कुटुंब व ज्यांच्याशी सोयरीक झाली, ती इतर कुटुंबे अशा दोन विश्वांत आयुष्य सामावलेले होते. बापाचे कुटुंब ते मुख्य. पण त्यातच भांडणे निघाली, म्हणजे भांडणात सोयरे मदत करीत. स्वकुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांची भांडण टाळण्याकडे प्रवृत्ती. अन्याय झाला तरी चालेल, पण उघड भांडण नको. जो वाटा मागेल त्याला बऱ्या बोलाने वाटा मिळाला नाही तरी चालेल. त्याने गप्प बसावे, पण वाट्यासाठी तटून बसू नये, असाच सूर. पण सोयरे मात्र आपल्या जावयासाठी, मेहुण्यासाठी धडपडत. पांडवांचे सर्व मदतनीस सोयरेच होते. यादव आईच्या माहेरचे, द्रुपद बायकोच्या माहेरचे व विराट सुनेच्या माहेरचे. आपल्या बहिणीच्या आंधळ्या नवऱ्यासाठी व भाच्यांसाठी जीव टाकणारा गांधारराज शकुनी कौरवांकडे होता, तोही सोयराच !
 हे पितृप्रधान कुटुंब त्या वेळच्या समाजाचा आधारस्तंभ होते. सामाजिक मूल्ये समाजधारणेसाठी असतात. अशा कटुंबांचा परिपोष व्हावा, अशाच तऱ्हेची मूल्ये त्या समाजाचीही होती. पुरुषांचे मुख्य गुण पितृभक्ती व सौभ्रात्र हे होते. पितृप्रधान कुटुंब सुस्थिर रहायला, भांडणे टाळण्यास ह्या गुणांची आवश्यकता होती. ह्या कुटुंबात कायम राहायला येणाऱ्या स्त्रिया परघरच्या असत. त्यांच्यामध्ये पितृभक्ती किंवा सौभ्रात्र ह्या दोन्ही गुणांची अपेक्षा नव्हती. त्यांची पितृभक्ती लग्न झाले नाही तोवरची, पितृकुलाचे मोठेपण साधण्यासाठी. पण एकदा का लग्न झाले, म्हणजे माहेर तोडून सर्वस्व पतीसाठी वेचणे, व त्याच्या कुळाच्या मोठेपणासाठी जपणे ही तिची कर्तव्ये होती. आई म्हणून मुलांना संभाळणे, पत्नी म्हणून पती नेईल तिकडे जाणे व सून म्हणून सासू-सासऱ्यांची सेवा करणे ही तिची मुख्य कर्तव्ये होती. सामाजिक मूल्ये ही त्या-त्या समाजाच्या गरजेवर बहुतांशी आधारलेली असतात. देशकाल-निरपेक्ष मूल्ये असू शकतात का, असा एक प्रश्न ह्या लेखाच्या अनुषंगाने (कृष्ण वासुदेवाबद्दल) निघाला होता. सर्वस्वी देशकाल-निरपेक्ष मूल्ये असूच शकत नाहीत, अशी आपल्या तत्त्वज्ञानाची भूमिका आहे. ती तर्ककर्कश असली तरी रास्त वाटते. ह्याबद्दल पुढे उल्लेख येईल. सध्या एवढेच सांगता येईल की, एका विशिष्ट वर्गाची, विशिष्ट कुटुंबपद्धतीला पोषक अशी मूल्ये जशी असतात, तशीच सर्व-साधारणपणे मानवजातीला लागू पडतील, अशीही मूल्ये असतात. पण तीही एका काळाची मूल्ये दुसऱ्या काळाला तोकडी वाटू लागतात. द्रौपदी-वस्त्रहरणाच्या वेळी अशाच तऱ्हेच्या व्यापक मूल्यांचा प्रश्न होता. यक्षप्रश्न-प्रकरणात ह्या व्यापकतेचा पडताळा येतो. सर्व मनुष्यांना लागू म्हणून एक धर्म होताच. पण तो खांडवदाहप्रसंगी कृष्णार्जुन विसरले, असे आज आपण म्हणतो. त्यांना त्यावेळी तसे वाटले नाही. "दया करी जे पुत्रासी तेचि दासा आणि दासी" असे परमवैष्णव, तुकारामबुवा म्हणतात. पण आजचा मनुष्य म्हणेल, 'दास आणि दासी ह्या शब्दांनी व्यक्त झालेले दास्य समाजात असावे हाच अन्याय नाही का?' हा न संपणारा वाद आहे. अजूनपर्यंत तरी सर्व व्यक्तींना ज्या समाजात, न्याय व समता मिळाली, असा समाज उत्पन्न झाला नाही, हे कोणाही विचारी व्यक्तीला पटेल. असा समाज स्थापणे शक्य आहे का, ह्या प्रश्नाचे उत्तर येथे देण्याची गरज नाही.
 ह्या संदर्भात महाभारतातील काही घटनांचा विचार करणे रास्त होईल. धृतराष्ट्र आणि पांडू हे विचित्रवीर्याच्या विधवा राण्यांचे मुलगे नियोगाने झालेले असे म्हटले आहे. स्मृतींमध्ये 'नियोग' म्हणजे थोरल्या भावाच्या विधवेच्या ठायी धाकट्या भावाने पुत्रोत्पत्ती करणे असा आहे. व्यास सत्यवतीचा थोरला मुलगा, म्हणजे विचित्रवीर्याचा थोरला सावत्रभाऊ होतो. म्हणजे स्मृतींप्रमाणे संतती निर्माण करण्याचा हा प्रयोग 'नियोग' ह्या क्रियेत बसत नाही. त्याला दीर म्हणून नव्हे, पण एक ब्राम्हण म्हणून 'नियुक्त' केला, म्हणून 'नियोग' असे म्हणावे, तर

"कौसल्ये देवरस्तेऽस्ति सोऽद्य त्वानुप्रवेक्ष्यति।
अप्रमत्ता प्रतीक्षेनं निशीथे आगमिष्यति॥"

हे सासूचे बोलणे केवळ सुनेची फसवणूक करण्यासाठी होते का? उद्योगपर्वात कर्णकुंती-संवादाच्या वेळी कुंतीला कुवारपणी मूल होण्याच्या प्रकारालाही 'नियोग' हा शब्द योजिला आहे. ह्या अर्थाने 'नियोग' हा शब्द दुसरीकडे येत नाही. ह्याची उत्तरे दोन संभवतात... १) जरा अपप्रकार होत होता, त्याला एक रूढ शब्द वापरून झाले ते योग्यच, तो आपद्धर्मच होता, असे दर्शवायचे होते, किंवा २) 'नियोग' ह्या शब्दाला निश्चित असा अर्थ प्राप्त झाला नव्हता. स्त्रीच्या ठायी अमक्यानेच संतती निर्माण करावी, असा दंडकही रूढ झाला नव्हता.
 ह्यांपैकी कोठचा पर्याय स्वीकारायचा, हे सध्याच्या आवृत्तीवरून कळणे शक्य नाही. सध्याची आवृत्ती ज्या हस्तलिखितांची तपासणी करून सिद्ध केली आहे, त्यांतले जुन्यात जुने इ.स. ९०० किंवा १०००च्या पाठीमागचे नाही. आता सिद्ध झालेल्या आवृत्तीची आतून मजकुराची तपासणी होऊन जेव्हा नवी आवृत्ती सिद्ध होईल, तेव्हा असल्या प्रश्नांचा निकाल लागेल, एरवी नाही.
 दुसरी घटना म्हणजे शल्य आपल्या भाच्यांच्या बाजूला न लढता कौरवांना मिळाला ही. ह्या बाबतीत पहिली अडचण आहे ती शब्दांच्या अर्थाबद्दल. महाभारतात भाऊ, बहीण, बाप, आई वगैरे नातेवाचक शब्द सबंध एका तऱ्हेच्या नातेवाईकांना लावले आहेत, असे वरती दाखवलेच आहे. म्हणजे भाऊ सख्खा, की सावत्र, की चुलत, हे संदर्भाशिवाय काहीच कळत नाही. शल्य हा माद्रीचा सख्खा भाऊ होता की खूप लांबचा चुलतातला होता, हे समजत नाही. बहिणीच्या दुर्दैवी मरणाबद्दल शल्याचा पांडवांवर राग होता म्हणावे, तर तसेही काही दिसत नाही. तशा तऱ्हेचा एकही उल्लेख महाभारतात नाही व दुसरे म्हणजे जी घटना आपल्याला दुर्दैवी व विशेष म्हणजे संताप आणणारी वाटते, तशी ती शल्याला त्यावेळी वाटली असेल असे संभवत नाही. मद्रांनी आपली मुलगी खूपसे धन घेऊन एका अभिषिक्त राजाला धाकटी राणी म्हणून जाणून-बुजून सवतीवर दिली होती, तिला मुलेही झाली होती. ती नवऱ्यामागून सती गेली, ही तिने आपणहून केलेली इतर कित्येक क्षत्रिय स्त्रिया करीत त्याप्रमाणे केलेली गोष्ट होती. माद्रीमागून माद्रीच्या मुलांना सावत्रआईने व भावांनी विलक्षण आपलेपणाने वागवले होते. तेव्हा झाल्या गोष्टीवरून राग करण्यासारखे काहीच नव्हते. ह्या बाबतीत आणखी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मद्र- बाल्हीकांचेच हस्तिनापूरच्या घराण्याशी असलेले पिढीजाद संबंध. प्रतीपाची एक राणी मद्रांची राजकन्या होती. तिचा मुलगा मामाघरी दत्तक गेला होता. तो शंतनूचा सावत्रभाऊ. त्याचा नातू वा पणतू, सौमदत्ती कौरवांच्या दरबारात असे व तो कौरवांच्या बाजूने लढला. हा सौमदत्ती शल्याचा काका असावा. जिकडे वडील माणसे तिकडे आपण, अशी शल्याची वृत्ती असावी. म्हणजे शल्य पांडवांवर रागावला, किंवा भाच्यांना बेइमान झाला असे म्हणता येणार नाही. ही लढाईच अशी विचित्र होती की, न्याय कोणता, अन्याय कोणता, ह्यापेक्षा जवळचे कोण, लांबचे कोण, ह्यावरच कोण कुठून लढले, हे ठरवावे लागेल. वास्तविक हीच लढाई नाही, जगातील सर्वच लहानमोठ्या लढाया अशाच असतात. सर्व न्याय एका बाजूस सर्व अन्याय दुसऱ्या बाजूस, असे नसतेच.
 महाभारतात तिसरा एक प्रसंग असा आहे की, मूल्यांचा प्रश्न परत एका तीव्रतेने पुढे येतो. पितृभक्ती हा सर्वात मोठा गुण व पितृकुल सावरायचे, संभाळायचे, हे मोठे कर्तव्य, अशी त्या वेळच्या समाजांची मूल्ये होती. पण मूल्यांची मर्यादा काही दृष्टींनी फारच व्यापक, म्हणजे कुटुंबापलीकडे वा एखाद्या विशेष समाजापलीकडे असते, तर दुसऱ्या दृष्टीने ती सर्वस्वी व्यक्तिगत असते. भीष्माच्या चरित्रात न्याय, अन्याय वगैरेंना फारसे महत्त्व नाही. कुलरक्षण ही त्याला जबाबदारी वाटत होती. पांडवांची बाजू न्यायाची, का कौरवांची बाजू न्यायाची, ह्या वादात तो विदुराइतका खोल शिरला नाही. थोरल्या घराचे त्याने रक्षण केले. तिथे तो वाढला, लढताना उघड-उघड तरी तो त्या बाजूने लढला, लढायला उभे राहण्याचे नाटक केले. बापासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यात पितृभक्ती दाखवली. विचित्रवीर्याच्या मरणानंतर त्याला राज्यावर बसण्याची गळ घालण्यात आली, भावांच्या विधवांच्या ठिकाणी संतती निर्माण करावी, म्हणून त्याला विनंती केली गेली, पण त्याने दाद दिली नाही. कुळधारणेसाठी त्याने गौण मार्ग पत्करला, पण स्वतःची प्रतिज्ञा मोडली नाही. कुटुंब व कुलरक्षण करण्याच्या कर्तव्यापेक्षा- लोकदृष्टीने ते एक कर्तव्यच होते,- त्याला स्वतःच्या वचनाचे बंधन अधिक वाटले. अंतिम मूल्य तात्कालिक वा चिरकालिक, उपयोगी आहे वा नाही, हा विचार त्याने केला नाही. ते मूल्य हा त्याच्या स्वत्वाचा भाग झाला होता व ते त्याने टिकवले. मूल्यांची एक अंतिम मर्यादा भीष्माने दाखवली.
 समाजव्यवस्थेचाच एक भाग म्हणून त्या वेळच्या राजकीय स्थितीचे वर्णन देता येईल. 'कृष्ण वासुदेव' ह्या लेखात त्याचा उल्लेख आलाच आहे. राज्ये लहान-लहान व रानांनी वेढलेली अशी होती. प्रत्येक राज्यावर वंशपरंपरा आलेल्या घराण्यातील पुरुष बसलेला होता. बरीच राज्ये जिंकून, त्यांचा प्रदेश काबीज करून साम्राज्य स्थापण्याची प्रथा नव्हती. जरासंध सम्राट होता. त्याने उत्तरेकडची व पश्चिमेकडची राज्ये काबीज केल्याचा प्रत्यक्ष पुरावा नाही. कर्ण अंगाचा राजा होता.त्यावरून जरासंधाने मगधाशेजारचीही राज्ये जिंकली नाहीत, असे स्पष्ट होते. पण तो सारखा लढाईत गुंतलेला होता. त्याने बऱ्याच राजांना कैद केले होते असे दिसते. तो अतिशय बलाढ्य व भारी होता. यादव, मत्स्य वगैरे लोकांना त्याच्या भीतीने आपला मुलूख सोडावा लागला, त्यावरून त्यांचा प्रदेश त्याने जिंकला असला पाहिजे असे अनुमान निघते. त्याला मारल्याशिवाय धर्माला राजसूय करणे शक्य नव्हते. राजसूय यज्ञ म्हणजे सम्राटपदाचे* द्योतकच होते. पण ते मिळवताना धर्माने कोणाचे राज्य घेतले नव्हते. बरोबरीच्या राजांत शौर्याने, औदार्याने व गुणांनी जो पहिला, तो राजसूय यज्ञ करी. काही राजे जिंकून, काही वश करून, काही मित्रत्वाने व काही सोयरे-संबंधी म्हणून सर्वांकडून मान्यता


 

* 'सम्राट' ह्या शब्दाचा मूळचा अर्थ 'चांगला राजा' असा आहे.

मिळाल्यावर राजसूय होई. हे मोठेपण मिळवण्यासाठी शौर्य लागे,तसेच दातृत्वही लागे. राजेरजवाड्यांना पाहुणचारासाठी बोलावून त्यांचा योग्य सत्कार करावा लागे. हजारो ब्राह्मणांंना व इतरांना दक्षिणा द्यावी लागे. अशा तऱ्हेने पहिलेपणाचा मान मिळवण्याची धडपड इतरही मानव समाजात दिसते व त्यासाठी राजसूयासारखे सामाजिक संकेतही रूढ झालेले दिसतात ! 'अकिञ्चनत्वं मखजं व्यनक्ति' ही नुसती कविकल्पनाच नाही. अशा तऱ्हेचे अकिंचनत्व हा एक मोठा सामाजिक दर्जा होता. ही कल्पना सर्व मानवसमाजांत रूढ आहे. श्रीहर्ष दर सहा वर्षांनी सर्वस्वाचे दान करी, असे वर्णन आहे.* एका कुळात, राजसूययज्ञ एका पिढीत एकदाच होई, म्हणून दुर्योधनाला तो करता आला नाही. असेच अश्वमेधाचे होते. यादवांमध्ये वसुदेवाने अश्वमेध केला. कुरुकुलात धर्माने केला. 'बरोबरीच्यांत पहिला' हे सूत्र ह्या संबंधाचे द्योतक आहे. महाभारतीय युगानंतर उत्तर-भारतात मोठमोठी साम्राज्ये स्थापली गेली. बुद्धाच्या वेळी 'पसेनदी कोसल' नावाचा सम्राट होता. नंतर मगधातच एकामागून एक प्रथम मौर्याचे, नंतर गुप्तांचे अशी साम्राज्ये झाली. ह्या सम्राटपदात या सम्राटाचे इतरांवर बिनतोड वर्चस्व होते. बरोबरीच्यांत पहिला हा नियम अगदी मध्ययुगापर्यंत होता. जर्मनीमध्ये बिस्मार्कपर्यंत अस्तित्वात असलेली लहान-लहान राज्ये ह्या धर्तीवरचीच होती. जरी भारतात साम्राज्यांमागून साम्राज्ये होत राहिली, तरी कित्येक लहानलहान जातिसमूहांतून वर दिलेला नियम व त्याबरोबर आढळणारी मूल्ये व विचारसरणी दिसून येते. रजपुतांच्या निरनिराळ्या घराण्यांचे परस्पर नाते काहीसे असेच होते, मराठ्यांचेही असेच होते. शिवाजीला औरंगजेबासारख्या परकीयांशी लढणे जितके जड होते, त्याहीपेक्षा बरोबरीच्या स्वकीय मराठा- कुळाकडून राजा-सर्वांचा मुख्य- म्हणवून घेणे जड गेले. जुनी घडण


 

*अमेरिकन इंडियन लोकांत "पोटलॅच" म्हणून अशाच तऱ्हेचे एक कार्य असते.

व जुनी मूल्ये सर्वस्वी टाकाऊ कधीच होत नाहीत. मानवांना जशा तऱ्हेचे अनुभव एकदा आले, तशाच तऱ्हेचे अनुभव जेव्हा परतपरत येतात, तेव्हा ह्या जुन्या मूल्यांची वा घडणींची आठवण ठेवणे उपयुक्त ठरते. जगाच्या सध्याच्या परिस्थितीत मोठी साम्राज्ये लयास गेलेली असल्यामुळे बरोबरीच्या अनेक घटकांनी एकत्र नांदावयास कसे शिकावे, हाच प्राचीन भारतीयांचा पेच आपल्यापुढे आलेला दिसत आहे.
 महाभारतातील दैवतकल्पना जास्त प्रमाणात वेद-ब्राह्मणकालीन आहे; पुराणकालीन नाही. महाभारतात मूर्ती व देवळे ह्यांचे उल्लेख नाहीत.* शिवस्तोत्र व विष्णुसहस्त्रनाम वा सूर्याची नावे ही मागाहून घुसडलेली व प्रक्षिप्त वाटतात. ही भांडारकर आवृत्तीत असली, तरी मागाहूनचीच आहेत, ह्यात शंका नाही. सूर्यपूजा (प्रातःकाली वा सायंकाळी) ही वर दिलेल्या तीन दैवतांच्या पूजांपैकी जुनी असण्याचा संभव आहे. त्र्यंबक वा शिव नंतरचा, व शांतिपर्वात आलेले विष्णुसहस्त्रनाम सर्वात शेवटचे असावे. महाभारतातील धर्म यज्ञप्रधान दिसतो. राजाचा पुरोहित अग्नी प्रज्वलित ठेवून रोजच्या आहुती देत असे. यज्ञामध्ये पशूची आहुती होतीच. अश्वमेधात नक्कीच, इतरांतही बहुतकरून असावी. तरीही पुढच्या काळात यज्ञक्रिया ज्या महत्त्वाला पोहोचली, तितक्या महत्त्वाला ती गेली


 

*'देवायतन' हा शब्द चार वेळा आलेला आहे. आदिपर्व ६४.४०, अनुशासन १०.१८, आश्वमेधिक ६९.१५ व भीष्मपर्व १०८.११. त्याचप्रमाणे भीष्मपर्व अध्याय १०८ यामध्ये निरनिराळे अशुभ शकुन कसे झाले, त्यांचे वर्णन आहे.त्यात देवायतनातील देवता कंप पावल्या, हसल्या, रडल्या,नाचल्या असे वर्णन आहे.ही सर्व वर्णने पुढील काळात येणाया साचेबंद वर्णनासारखी आहेत, म्हणून ती मागाहून घातल्यासारखी वाटतात. भीष्मपर्वातला श्लोक तर फारच पुढच्या काळातील वाटतो. त्यातील 'कुलदैवत' किंवा एखाद्या माणसाचे खास असे ‘दैवत' ह्या कल्पना उत्तरकालीन संस्कृत वाङ्मयात वारंवार येतात. महाभारतात एकदाच आलेली ही कल्पना इतर गोष्टींशी संबंध नसलेली अशी आहे...

देवतायतनस्थाश्च कौरवेन्द्रस्य देवताः।
कम्पन्ते च हसन्ते च नृत्यन्ति च रुदन्ति च।

नसावी. इंद्र, सूर्य, रुद्र ह्या देवता मानल्या होत्या व त्यांना हविर्भाग पोहोचवणारा अग्नी होता. स्वर्गाची वा इंद्रलोकाची कल्पना होती. नरकाची कल्पना इतकी स्पष्टपणे आलेली नाही पण ती असावी. पितृश्राद्ध होते. पुनर्जन्मावर व कर्मावरही विश्वास होता. त्याचबरोबर आत्मानात्मविचार व धर्म काय, अधर्म काय हाही विचार वारंवार येतो.

 धर्माचा पदोपदी एवढा ऊहापोह होऊनही धर्माच्या व्याख्या, कृती, रूप व अंतरंग स्पष्ट झालेलेच नाही. महाभारतात आढळणारा तात्त्विक ऊहापोहातील हा कणखरपणा पुढे राहिला नाही. भक्तिमार्गाने सगळेच विचार बोथट झाले. काही दृष्टींनी मात्र धर्माचे साधारण स्वरूप तसेच राहिले. त्या धर्मातून निघणारे संप्रदाय बौद्ध, जैन, शैव, वैष्णव हे वगळले, तर हिंदूंचा धर्म अनामिक, लवचिक व व्यक्तिगतच राहिला. त्याला नाव दिले ते परकीयांनी, तोपर्यंत त्याला नावही नव्हते. आजही प्रत्येक विचारी हिंदूला धर्माचे पूर्ण स्वरूप सांगणे शक्य नाही. 'मला काय वाटते, ते सांगतो', असेच तो म्हणेल. आपली ही अगतिकता अनुभवली म्हणजे ठामपणे हिंदू धर्माचे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या पाश्चात्यांच्या प्रज्ञेचे व धार्ष्ट्याचे कौतुक वाटते.
 प्रत्येक प्रसंगी धर्म काय,अधर्म काय, ह्याची संवादात्मक चर्चा महाभारतात जितकी झाली आहे तितकी दुसऱ्या कोठच्याही पुस्तकात झालेली नाही. इतर पुस्तकांतून उदा. बायबल व कुराण.. धर्म काय ते ठाम सांगितले आहे. त्यावर संशय उत्पन्न होऊ दिलेला नाही. पण तशा तऱ्हेचे विवरण महाभारतात येत नाही. महाभारताची गोष्ट मनाचा ठाव घेते, ही ह्यामुळेच. मानवजीवित क्षणभंगुर आहे, असार आहे, त्याला काही अर्थ नाही, व्यक्ती एकटी आली, ती एकटी जाणार, अशा तऱ्हेची विचारसरणी व तीवर आधारलेले वैफल्यमय विदारक वाङ्मय फ्रान्स, इंग्लंड व अमेरिका येथे गेल्या २५-३० वर्षांत विशेष झाले आहे. मनात येते की, पश्चिमी साम्राज्याच्या अस्तानंतरचे हे वैराग्य आहे. अंतकाळच्या ह्या वेदना आहेत. जयाच्या क्षणाला 'जयोऽयमजयाकारो भगवन् प्रतिभाति मे' म्हणून दुःखाने रडणारा धर्म किंवा आपण सगळ्यांना मारू शकू, ही खात्री असताही 'एतान् न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन। अपि त्र्यैलोक्यराज्यस्य हेतोः। किं नु महीकृते॥' असे म्हणणारा अर्जुन ह्यांची धर्माची वा मानवी यशाच्या वैफल्याची जाणीव अधिक तीव्र व अधिक आतली वाटते.

न ही प्रपश्यमि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्॥

ही माणसे मरणार व आपण शोकाने झुरत राहणार, हे अर्जुनाला स्पष्ट, ठाम दिसत होते. अशावेळी ह्यांना मारूच नये; जे मिळणार, त्याची किंमत जबर आहे, असे वाटणे हे स्वजनाबद्दल प्रेम व दया दाखवते. श्रीकृष्णाचे उत्तर एका अर्थाने उत्तरच नव्हते. हे अन्यायी आहेत ह्यांना मारले पाहिजे, अशा तऱ्हेच्या न्यायावर आधारलेला एक भाग आहे; पण अर्जुनाचे उद्गार न्याय की अन्याय, ह्यावर आधारलेले नाहीत. मुख्य रोख आहे, तो न्यायान्यायावर नसून प्राप्त परिस्थिती व समाजातील स्थान ह्यांवर आहे. त्याचबरोबर मनुष्याचे जीवित क्षणभंगुर आहे, परत-परत येणारे आहे ह्यावरही रोख आहे. एकदा मनुष्याच्या विश्वातील स्थानाबद्दल विचार करावयास लागले, म्हणजे सर्वच क्षुद्र वाटू लागते. पण कृष्णाचे म्हणणे तसे नव्हते. ब्रह्मसत्यापर्यंत पोहोचले, म्हणजे इतर सर्वच मिथ्या. पण तिथपर्यंत पोहोचण्याआधी हे मिथ्यात्व गृहीत करून प्राप्त कर्तव्यापासून स्वतःला वाचवता येणे शक्य नाही, अशी त्याची भूमिका होती. एका दृष्टीने सर्वच मानवी मूल्ये सापेक्ष दिक्कालसापेक्ष म्हणून पूर्ण सत्य- नव्हेत. दुसऱ्या दृष्टीने अपरिपूर्ण अशा मानवयोनीत तीच दिशा दाखवतात व आयुष्यात अर्थ भरतात, असे कृष्णाचे सांगणे होते. अलिप्त रहावयाचे, पण नवीन वाङ्मयात आढळणारा 'Stranger' ‘(उपरा) किंवा केवळ 'Witness' (साक्षी) म्हणून नव्हे. तसे राहणे शक्यच नाही, 'अर्जुना, किती नाही म्हटलेस, तरी तुला युद्ध केल्याशिवाय रहायचे नाही. (प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति।) मग अशा बलात्काराने, अनिच्छेने करण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून, परिणाम लक्षात घेऊन युद्ध कर, आत्मविस्मृती होऊ न देता कर,' असे ते सांगणे आहे.
 भारतीय युद्धाच्या काळात भक्तिमार्ग प्रसृत झाला नव्हता. अर्जुन हा कृष्णाचा 'भक्त' म्हणजे प्रियसखा होता. कृष्णाने कितीही जीव तोडून सांगितले, तरी ज्या दोघांना मारायचे नाही, असे अर्जुन म्हणाला, त्यांना त्याने मारले नाही. 'कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि' असे तो म्हणाला. भीष्माला,- शिखंडीच्या शरांनी जर्जर झालेल्या भीष्माला मोठ्या नाईलाजाने त्याने खाली पाडले. भीष्म भूमीवर पडला, पडलेलाच राहिला. लढाईला वाट मोकळी झाली. द्रोणाला अर्जुनाने मारलेच नाही. पण त्या दोघांचे व इतरांचेही मरण त्याने पाहिले. आपला दुसरा प्राणच अशा कृष्णाचेही मरण पाहिले. जगातील सुखाचा व दुःखाचा, मानाचा व मानहानीचा पेला तो पुरेपूर भरलेल्या मापाने प्याला व आपल्या पायांनी चालत जाता येईल तितके जाऊन पडेल तेथे मरायचे, असे मरण त्याने पत्करले. अर्जुनच नव्हे तर इतरही सर्व... कुंती, द्रौपदी, धृतराष्ट्र, गांधारी असेच जगले व असेच मेले. धडपड करायची ती त्यांनी केली, प्रसंगी त्याग केला, पण काहीतरी लोकोत्तर मिळणार ह्या हावेने नाही. हा जो आयुष्याचा मार्ग त्याला साजेसाच कठोर धारदार असा महाभारताचा कथावृत्तान्तही आहे.
 ह्यापुढच्या काळातल्या मूल्यांच्या कल्पना, देवादिकांच्या कल्पना व वाङ्मय ह्यांचे सबंध वळणच निराळे आहे. एका दृष्टीने भावविश्व रुंदावले. सबंध मानवजातीबद्दल कणव उत्पन्न झाली. एका दृष्टीने विचारात शिथिलता आली. इतरांबद्दल करुणा वाटते, तिचा उगम स्वतःबद्दल वाटणाऱ्या करुणेमध्ये आहे. हायडेगरने ह्या भावनेचे पृथक्करण फार उत्तम तऱ्हेने केले आहे. असणे हा भाव (म्हणजेच जीव) हा नाशवंत असतो. जन्ममरण बरोबर घेऊनच तो येतो.

जेथ उदो होये अस्तवावेया चि लागि
मृत्यु उदयाचां परिवरी।गर्भ गिंवसी

ज्ञानदेवी : ९.४९७,४९८.

 जे असते, त्याला न असण्याची भीती कायम असते. आपल्या मनातली ही भीती दुसऱ्याबद्दलची कल्पून जीव (being) हा सर्व जगाच्या काळजीत गुंतून पडतो. म्हणजे विश्वाची चिंता, काळजी, भीती ही सर्व स्वतःविषयी वाटणाऱ्या काळजीचा इतरांवर केलेला अध्यारोप आहे. आजार, वार्धक्य व मृत्यू ही पाहून बुद्धाला उपरती झाली. 'जितके जगात गुंतून पडू, तितकी भयस्थाने जास्त, म्हणून जगात गुंतून पडू नका,' हा बुद्धाचा उपदेश. अगदी ह्याउलट महाभारताची व ब्राह्मणांची शिकवण. 'जातस्य हि ध्रुवो मृत्यूः' हा सगळ्यांच्याच तत्त्वज्ञानाचा पाया. 'ध्रुवं जन्म मृतस्य च' हा बुद्धाचा व कृष्णाचाही सिद्धान्त; हायडेगरचा नाही. पण एक जन्म असो वा अनेक असोत, सर्व मृत्यूतच नाश पावतात. म्हणून फलाशा न धरता उघड्या डोळ्यांनी कर्म कर, कर्मसंन्यास कठीण, जवळजवळ अशक्य, ही कृष्णाची शिकवण. शक्य तर संन्याय घ्या व गृहस्थाश्रमीच्या भिक्षेवर जगा, ही बुद्धाची शिकवण. आणि 'जे आहे, ते हे. पुढे काही नाही. मागे काही नव्हते. ह्या परिस्थितीत फक्त येथचाच विचार करा. उगीच मूल्यांच्या नादी लागूच नका,' ही हायडेगरच्या सिद्धान्तावर आधारलेली सध्याच्या लेखकांची तिसरी भूमिका. पहिली भूमिका कणखर, दुसरी पलायनवादीच नव्हे, तर विरोधाने भरलेली. मोठ्या संख्येने संन्यास घेणाच्या भिक्षुना संपन्न, दानशूर, गृहस्थाश्रमी कुटुंबांच्या भिक्षेवरच जगावे लागते. म्हणून संन्यासधर्म टिकावयास गृहस्थाश्रमी आवश्यक, असा हा अंतर्गत विरोध अशा धर्मातून दिसून येतो. तिसरी भूमिका सर्वस्वी अगतिक आणि निराशावादी. दुसऱ्या व तिसऱ्या भूमिकेत असामान्य करुणा भरून राहिलेली आहे. पुष्कळदा existentialist लिखाण अती कठोर व विदारकही असते, पण त्याचा उगम ‘मानवी जीवन विफल आहे,' ह्या ठाम समजुतीत आहे.
 जे महाभारतकाली नव्हते, जे बुद्धकाली होते व हल्लीही आहे, ते म्हणजे विभूतिपूजन व संघपूजन. 'बुद्ध सरणं गच्छामि' 'संघ सरणं गच्छामि' हेच सूत्र हल्लीही फार प्रमाणात दिसून येते. 'विभूती' ह्या ऐतिहासिक वा धार्मिक विभूती असतात, व 'संघ' म्हणजे ह्या विभूतींनी स्थापलेले ख्रिस्ती, कम्युनिस्ट वगैरे संघ असतात. विभूतिपूजेपोटीच भक्तिमार्गाचा जन्म झाला. विभूती वा दैवत विफलतेपासून आपली सुटका करील, अशी एक आशा उत्पन्न झाली. तिच्या पोटी काही अतिएकतर्फी संहारास उद्युक्त करणारे, त्याचप्रमाणे अतिरम्य हृद्य लिखाणाबरोबरच स्वप्नाळू अवास्तव लिखाणही उत्पन्न झाले. दैवकल्पना, भक्तिभाव, एकेश्वरी पंथ, कठीण वास्तव विसरण्याचा प्रयत्न हे सर्व मागाहून आलेले- महाभारतात नाही असे. त्यादृष्टीने महाभारत युगान्तच. एकतर्फी संहारास उद्युक्त करणारे लिखाण भारतात झाले नाही. कारण भारत अनेक दैवतवादाला चिकटून राहिला, पण भारतातील लिखाण स्वप्नाळू झाले. महाभारतातील सर्वव्यापी निराशेची वा वैफल्याची भावना, कठोरपणा व वास्तवता पुन्हा भारतीय लिखाणात आलीच नाही. मनोभूमिकेतील व वाङ्मयातील फरक काही उदाहरणांवरून स्पष्ट होईल.
 भरताने आपल्या नाट्यशास्त्रात स्पष्टच सांगितले आहे की, नाटक शोकान्त होता कामा नये. हा नियम पुढील नाटककारांनी या इमानाने पाळला की, मूळ शोकात्म कथासुद्धा 'उत्तररामचरित'सारख्या नाटकात सुखान्त होऊ लागल्या. नायक, नायिका व त्यांची मुले ह्यांचे एका सुंदर कौटुंबिक मेळाव्यात शेवटी मीलन होऊ लागले. 'विक्रमोर्वशीय', 'अभिज्ञान शाकुन्तल' ह्यांचाही शेवट तोच.अशाच तऱ्हेचे चित्र पाश्चात्त देशांत आज एक प्रकारच्या लिखाणात दिसते. कौटुंबिक जीवनाची नित्य क्रूर मोडतोड होत असते. रकानेच्या रकाने भरून सर्व वर्तमानपत्रांतून तिची वर्णने येत असतात; पण राजकारणी पुरुषांची चित्रे येतात, ती मात्र बायकांमुलांबरोबर काढलेल्या कुटुंब-मेळाव्याची, असा आजच्या पाश्चात्त्य देशांत दिसणारा विरोध ह्या नाटकात दिसतो. पुष्कळ बायका असलेला वयस्कर राजा राणीच्या परिवारातील वा इतर कुठे दिसतील त्या सुंदर पोरींच्या मागे लागलेला असतो, त्यांच्याशी त्याचा विरह होतो व शेवटी पुनर्मीलन होते ते प्रौढ बनलेल्या प्रियेचे व तिच्यापासून झालेल्या, चांगल्या वाढलेल्या मुलाचे! सर्वच खोटे. प्रेम खोटे, विरह खोटा, कौटुंबिक जिव्हाळाही खोटा आणि वाईट वाटते ते ह्यासाठी की, ह्या देखाव्याचे वर्णन करणारे खरोखरीचे कवी होते. त्यांचे काव्य हृदयाला भिडते; मात्र कोणाबद्दल व कशाच्या अनुषंगाने ते लिहिले आहे, ते विसरले पाहिजे.
 महाभारतातील 'शकुन्तलोपाख्यान' व कालिदासाचे 'अभिज्ञान शाकुन्तल' ह्यांचा अभ्यास करावा, म्हणजे वरील वचनाची प्रचीती येते. महाभारतातील राजा व शकुन्तला दोघेही स्वार्थी व धूर्त होते. दोघे परस्परांची पारध करीत होते. शकुन्तलेला आश्रमात मुलगा झाला. तो द्वाडपणा करून सर्वांना त्रास देऊ लागला, तेव्हा कण्वाने तिची पाठवणी केली व राजाने तिला ओळखूनही कानांवर हात ठेवले. मग आकाशवाणी होऊन शकुन्तलेचा व मुलाचा स्वीकार झाला. मुलगा होता, तो राजाला हवा होता, म्हणून शकुन्तलेच्या आयुष्याची विटंबना झाली नाही. ह्या गोष्टीत स्वभावदर्शन आहे. राजाची व विशेषतः शकुन्तलेची राजदरबारातील भाषणे फारच छान वठलेली आहेत. त्यांत राग आहे, उपरोध आहे, अगतिकता आहे. गोष्ट साधी आहे. त्या वेळच्या मूल्यांत व चालीरीतींत बसणारी आहे. ह्या साध्या व काहीशा व्यापारी गोष्टीचे रूपान्तर कालिदासाने एका रम्य स्वप्नसुष्टीत केले आहे. शाकुन्तलाचा चौथा अंक एकदा वाचला की, कधी त्याचा विसरच पडत नाही. पण मूळ कथेची धार मात्र अजिबात बोथटते. नुसती शकुन्तलाच निरागस दाखवून भागत नाही, तर अंगठीचे प्रकरण व दुर्वासऋषीचा शाप आणून राजालाही निरागस बनविण्याचा प्रयत्न तितकासा साधत नाही. शेवटचे कौटुंबिक मीलन तर इतके साचेबंद की, ते कालिदासाच्या काही सुंदर कविता किंवा उपमा नसत्या, तर वाचवलेच नसते. सगळेच पराकाष्ठेला नेऊन पोहोचवायचे. पराक्रम, निरागसता, विरह, श्रृंगार व शोक ही ठराविक साच्यात अत्युक्तीपूर्ण दाखवायची! द्रौपदी अर्जुनासाठी झुरत होती, तर महाभारतात चार-दोन श्लोक येतात. कुंतीच्या सवती-मत्सर व स्वतःबद्दलची कीव दाखवली आहे, ती आगीने धगधगणाऱ्या एका श्लोकात. कर्णाचे वैफल्य व निराशा एका वाक्यात. एक वाङ्मय रम्य, हृद्य व नादमधुर पण आभासमय तर दुसरे कठीण,खडबडीत, अत्यंत थोडक्यात व वर्षानुवर्षे विचार करावयास लावणारे !
 अशाच तऱ्हेचा अतिरेक पुराणकालीन कथांतूनही आढळतो. महाभारतात नाही पण ऐतरेय-ब्राह्मणात हरिश्चंद्राची कथा आली आहे, ती पुढील काळातील पौराणिक कथेशी ताडून पाहण्यासारखी आहे. हरिश्चंद्र राजाने मुलगा व्हावा म्हणून वरुणाची प्रार्थना केली आणि असे वचन दिले की, 'मुलगा झाला, तर तो वरुणाला अर्पण करीन.' वरुणाच्या कृपेने राजाला मुलगा झाला. त्याचे नाव रोहित. मुलगा जन्मल्यापासुन वरुण हा राजाकडे येऊन मुलाची मागणी करू लागला, आणि राजाने 'मुलगा अजून लहान आहे, अजून त्याला दात आले नाहीत,' अशा निरनिराळ्या सबबी सांगून वरुणाला परत घालवून दिले. मुलगा चांगला मोठा झाल्यावर 'आता तुला बळी द्यावयाचे,' असे त्याला सांगितले. त्याबरोबर 'छे' असे म्हणून रोहित धनुष्य घेऊन घराबाहेर पडला व रानात भटकत राहिला. इंद्राने सहा वर्षे त्याला रानातच भटकत ठेवले. शेवटी वचनभंगाचा राग येऊन वरुणाने राजाला शिक्षा केली. ती शिक्षा म्हणजे जलोदराचा रोग. जलोदराचा रोग होणे म्हणजे वरुणाच्या अवकृपेचे लक्षण समजले जाई.
 रोहिताने रानात अजीगर्त नावाच्या गरीब ब्राह्मणाचा शुनःशेप नावाचा मुलगा शंभर गाई देऊन विकत घेतला. तो रानातून घरी आला व शुनःशेपाला राजाच्या स्वाधीन करून म्हणाला, “माझ्या ऐवजी ह्याला वरुणाला द्या” राजाने वरुणाला प्रार्थना केली की, "माझा मुलगा काही तुला देता येत नाही. त्याऐवजी दुसरा ब्राह्मण मुलगा बळी देईन. तो तू गोड करून घे. मला वचनातून आणि रोगातून मुक्त कर" वरुणाने म्हटले, “क्षत्रियापेक्षा ब्राह्मण बळी मला जास्त पसंत आहे .तुझे म्हणणे कबूल आहे.” शुनःशेपाला यज्ञस्तंभाला बांधले व वरुणाप्रीत्यर्थ यज्ञ सुरू झाला. शुनःशेपाला मारायला कोणी तयार होईना. तीनशे गाई घेऊन ठरल्या वेळी मुलावर प्राणघातक वार करायला अजीगर्त तयार झाला. यज्ञाला विश्वामित्र व इतर मोठे ऋषी आले होते. आपण आता बळी जाणार, हे पाहून शुनःशेपाने वरुणासुद्धा सर्व देवांची करुणा भाकली. वरुणाच्या स्तुतीचे काव्य तो म्हणू लागला. आणि एकेका कडव्याबरोबर त्याचे पाश गळून पडू लागले. उषेने प्रसन्न होऊन शुनःशेपाला मोकळे केले. वरुणाने राजालाही रोगमुक्त केले व मिळाला तो हविर्भाग घेऊन तो निघून गेला. यज्ञाच्या शेवटी शुनःशेपाने आई-वडिलांकडे जाण्याचे नाकारले. पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या पोराला विकणारे व मारण्यास तयार होणारे हे लोक माझे आईबापच नव्हेत, असे तो म्हणू लागला व विश्वामित्राने त्याला दत्तक घेतले, अशी आहे जुनी कथा. पुराणांतरी हीच कथा अगदी निराळ्या स्वरूपात सांगितलेली दिसते. हरिश्चंद्र राजा स्वप्नात दिलेले वचन पुरे करण्यासाठी राज्य सोडतो. आपल्या स्वतःला व बायको-मुलाला विकतो. शेवटी आपल्या बायकोला मारायला तो तयार होतो आणि मग त्याच्या एकवचनीपणामुळे प्रसन्न झालेला विश्वामित्र ऋषी त्याच्या मेलेल्या मुलाला जिवंत करून सर्व राज्य परत देतो - अशी कथा आहे.
 ऐतरेयातला राजा मनुष्य होता. देवालासुद्धा तो आपला मुलगा द्यायला तयार नव्हता. वचनभंगाच्या पातकामुळे जलोदर झाल्यामुळे त्याने दुसराच एक विकत घेतलेला मुलगा देऊ केला, पण आपला, मुलगा दिला नाही. नवस करणे म्हणजे देवाला प्रत्यक्ष वचन देण्यासारखेच आहे. पण राजाला मुलापुढे वचनाची किंमत नव्हती. ह्याउलट पुराणकालीन राजा स्वप्नात दिलेले वचन पुरे करण्यासाठी नाना तऱ्हेचे छळ पत्करतो; मनुष्यस्वभावाला विसंगत अशा गोष्टी करीत राहतो; आणि शेवटी सर्व काही परत मिळून वचनपूर्ती (म्हणजे राज्यदान) होतच नाही. सत्यवचनीपणा हे एक मायाजाळच ठरते.
 हरिश्चंद्र कथाच नव्हे, तर मागाहून येणाऱ्या इतरही कथा ह्याच धर्तीच्या आहेत. कुठल्यातरी एका गुणाची परिसीमा दाखवायची, आणेि शेवटी होणारा सत्यानाश न दाखवता सर्वतोपरी चांगलेच झाले, असे दाखवायचे, अशा धर्तीच्या ह्या नव्या युगातील कथा आहेत. महाभारताच्या काळापर्यंतचे वाङ्मय अगदी ह्याच्या उलट आहे.
 महाभारताची कथा पहा. त्यामधली माणसे ही हाडामासाची, एका विशिष्ट समाजात राहणारी आहेत. ती काही कृत्ये करीत असतात व त्याची निमूटपणे फळे भोगीत असतात. आयुष्याच्या चाकाला एक दिशा व गती मिळालेली असते. ती दिशा बदलत नाही, ती गती थोपवली जात नाही. तो मनुष्य बाई असो, पुरुष असो, राजा असो, श्रीमंत असो, कंगाल असो, मनुष्य असो, देव असो, आयुष्याच्या ठरलेल्या फेऱ्यातून त्याला सुटका नाही. काही दिवस सुखाचे, ऐश्वर्याचे, भरभराटीचे काही दिवस दुःखाचे, कष्टाचे, किंवा सर्वनाशाचेसुद्धा! ही आयुष्याची गती भीष्माला चुकवता आली नाही. अंबेला चुकवता आली नाही. धर्माला चुकवता आली नाही, प्रत्यक्ष श्रीकृष्णालाही चुकवता आली नाही. भारत 'इतिहास' म्हणून गाईले गेले. 'हे असे झाले'. ते होत असताना व्यक्तीच्या आशा, आकांक्षा, तडफड, निराशा ह्या सर्वांचे चित्रण आले आहे; आणि सर्व मानवी पातळीवर. अतिमानुष चमत्कार जवळ-जवळ नाहीतच म्हटले तरी चालेल. देव किंवा इतर शक्ती आणून माणसांना संकटांतून, निराशेतून काढले असे आढळत नाही.
 ह्या सगळ्याच्या मागे आचाराची आणि विचाराची एक घट्ट चौकट होती. ज्या गोष्टी करायच्या त्या धर्म म्हणून, कर्तव्य म्हणून, पुष्कळदा पुढे वाढून ठेवलेल्या आहेत, म्हणून करावयाच्या. त्यांतून सर्व सुखे मिळतील, ही आशाच कधी नव्हती. काही थोडेसे मिळाले, तर त्याच्याबरोबर पुष्कळसे गेलेले असायचे. युद्धामध्ये एक जीव मरतो व जो जगाच्या दृष्टीने जिंकतो, तो सर्व सुखे गमावून. ह्या कथेतून मनुष्याच्या आकांक्षापूर्तीला वाव नाही. मनुष्याच्या आकांक्षा सर्व प्रकारे पुरवील असे दैवत नाही. खोट्या इच्छापूर्तीच्या कल्पनाही नाहीत. मनुष्य व त्याचे दैवत ही दोन्ही प्रचंड संसारचक्रात सापडलेली होती. ते चक्र परतवण्याचे सामर्थ्य कोणातच नव्हते.
 मानवी जीवनाच्या मर्यादा महाभारतात स्वच्छ, स्पष्ट सांगितल्या आहेत. ह्या मर्यादा ओलांडण्याची कुठच्याही तऱ्हेची स्वप्नसृष्टी महाभारतात दिसत नाही. काहीतरी अघटित घडावे, कोणाची तरी कृपा व्हावी व एकदम वाईटाचे चांगले व्हावे, असा प्रकार दिसत नाही. कर्तव्य करण्याचा उपदेश केला गेला, त्यावेळी सुखाचे किंवा वैभवाचे आमिष दाखवले गेले नाही. प्रश्न होता, तो मानाने जगण्याचा, आणि मानाने मरण्याचा आणि हा मान होता जन्मजात मूल्ये सांभाळण्याचा. 'जन्मजात' हा शब्द बुद्ध्या वापरला आहे. काही मूल्ये सबंध मानवजातीची म्हणून मानली गेली होती, तरी इतर मूल्ये ज्या तऱ्हेने मनुष्य जन्माला आला, त्यावर अवलंबून होती. कोणी क्षत्रिय होता, कोणी ब्राह्मण होता. कोणी मुलगी होती, कोणी आई होती, कोणी मुलगा होता- आणि जो-तो आपल्या जन्मामुळे प्राप्त झालेली कर्तव्य सांभाळून त्या स्थानाला चिकटलेल्या मूल्यांचे संरक्षण करीत होता. ह्या मूल्यांना धरून वागल्यामुळे जे कल्याण व्हावयाचे ते जगात न दिसणारे, मानवी हातांनी न गवसणारे असे होते.
 अगदी उलट परिस्थिती ह्यापुढच्या कालखंडात दिसते.सत्याच्या, शौर्याच्या, सतीत्वाच्या, भक्तीच्या कल्पना पराकोटीला गेलेल्या. त्यांचे वर्णन वास्तव नाहीच आणि ते सर्व गुणही खोटेच. कारण ह्या कल्पनेप्रमाणे वागणाऱ्या माणसाला सर्व सुखे प्राप्त होतात. दुःखे क्षणभंगुर ठरतात. मनुष्य अमक्या तऱ्हेने वागतो, ते मूल्यांची जोपासना करण्याच्या दृष्टीने वागतो की बक्षिसाच्या लालचीमुळे तेच कळत नाही. कथा, नाटक, काव्य सगळ्यांवर ह्या वृत्तीचा पगडा बसलेला; म्हणून ज्या मूल्यांचा पुरस्कार केलेला, ती मुळातच आभासात्मक, पोकळ, असत्य वाटू लागतात. त्याप्रमाणे वागण्याचा नुसता देखावा उभा केलेला असतो. हरिश्चंद्र सर्वस्व देतो व सर्व पूर्वीच्या कितीतरी पट जास्त मिळते; उत्तररामचरितात रामाने मारलेला शंबूक दिव्य रूपाने परत येतो; सीतेचे धरणीच्या पोटात जाणेसुद्धा खोटे खोटेच ठरते; चांगुणा मूल ठेचते, तेही परत मिळते. सर्व सत्वपरीक्षेच्या सदरात जाते व परीक्षेत उत्तम मार्क मिळाले की प्रसिद्धी होते, मान मिळतो,जे काय घालवले असेल, त्याच्या दसपट मिळते. ह्या किमयेत मानवी जीवनाच्या कष्टदायक मर्यादा नाहीतशा होऊन एक स्वप्नसृष्टी निर्माण होते. नायक-नायिकांवर अपरंपार संकट कोसळायची व त्यांतून त्यांनी पार होऊन जायचे, हा संकेत काव्यांत, नाटकांत सर्वत्र दृढ झाला. महाभारतानंतर हे युग सुरू झाले ते आजतागायत टिकले आहे. ते युग स्वप्नाळू माणसांचे; आयुष्याला भ्यालेल्या माणसांचे. जे प्रत्यक्षात दिसत नाही, मिळत नाही, ते वाङ्मयद्वारा मिळवण्याची खटपट करणाऱ्यांचे. थोडे बौद्ध वाङ्मय, शंकराचार्यांचे ब्रह्मसूत्रभाष्य व काही थोड्या कथा वगैरेंसारखे ग्रंथ सोडल्यास जवळजवळ सर्वच वाङ्मय ह्या धर्तीवरचे झाले.
 हे सर्व वाङ्मय टाकाऊ समजण्यास मी तयार नाही. त्यातील काही अतिहृद्य आहे, पण त्यात महाभारताची धार नाही. चिरकाल विचार करावयाला लावील असे काही नाही.
 उत्तरकालीन भक्तिकथा तर ह्याहीवर ताण करणाऱ्या आहेत. अजामिळाची कथा, चांगुणेची कथा, त्यांपैकीच. अजामिळाच्या कथेत सामाजिक मूल्यांचा पायाच मुळी उखडून टाकलेला आहे. चांगुणेच्या कथेतील भक्तीपायी केलेला त्यागही खोटा व त्यागाच्या सवाईने मिळालेले फळही खोटे!*
 भक्तीचा अतिरेक फक्त ईश्वरभक्तीतच नाही, तर गुरुभक्तीतही (व्यक्तिपूजेतही) दिसतो. 'यानि अस्माकं सुचरितानि तानि ग्रहीतव्यानि, नो इतराणि', हा महाभारतपूर्व किंवा महाभारतकालीन उपदेश व ज्ञानेश्वरांपासून तुकाराम-रामदासांपर्यंत वर्णिलेली गुरुपूजा ह्यांच्या मनोभूमिकेत जमीन-अस्मानाचा फरक आहे. महाभारतासारख्या ग्रंथाने सुरुवात होऊन सर्वच वाङ्मय इतके मऊ-मऊ का झाले ? 'धियो यो न: प्रचोदयात्' अशी प्रार्थना करणारे स्वतःची बुद्धी सर्वस्वी दुसऱ्याच्या हवाली कसे करू लागले हे आपल्या समाजे-तिहासातील एक मोठे कोडेच आहे.


 
  • ह्या दृष्टीने पाहता 'द्रौपदी' मधील मी रचलेला शेवटचा भाग ही 'नरोटी' आहे. जे भीमाला कळले नाही, जे देण्याची शक्यता द्रौपदीला नव्हती, ते जणू दिलेच, असा भास मी निर्माण केला आहे. हे महाभारताच्या परंपरेला सोडून आहे.

एवढे कळते आहे, तर शेवटचा भाग लिहिलाच का? मीही माझ्याच युगातली आहे. डोळे व मन दुबळे असलेली आहे. महाभारताच्या प्रकाशाचा झोत मला सहन झाला नाही.

 महाभारतामध्ये मैत्री म्हणजे काय, ह्याचे त्या वेळच्या चालीरीतींना धरून उत्तम चित्रण झाले आहे. दारिद्र्याने गांजलेला द्रोण द्रुपदाच्या राजदरबारी येऊन आपण द्रुपदाचे बालमित्र, म्हणजे आताचेही मित्र असे नाते सांगू लागला. द्रुपदाने हे मित्रत्व झिडकारले. 'राजा दरिद्री ब्राह्मणाचा मित्र कसा होऊ शकेल? मैत्री ही बरोबरीच्यांत असते, इतरांत नाही,' असे त्याने द्रोणाला बजावले. द्रोणाने शिष्यांकरवी द्रुपदाचे अर्धे राज्य हिरावून घेऊन, 'आता आपण बरोबरीचे मित्र झालो,' असे म्हणून द्रुपदाला जीवदान दिले. ही गोष्ट मैत्रीची सुरवात नसून एका भयंकर वैराचीच सुरवात ठरली. कर्णाचा शस्त्ररंगात अपमान झाल्यावर दुर्योधनाने कर्णाला आपला मित्र म्हणवले व अंगाचे राज्य दिले. राजे-राजे म्हणून बरोबरीचे मित्र म्हणावे तर तशी परिस्थिती नव्हती. एक क्षत्रिय होता, दुसरा लौकिकात सूत होता, व शेवटपर्यंत दुर्योधन-कर्णाचे नाते बरोबरीच्या मित्रांचे न होता पोष्यपोषकांचेच राहिले. कर्णपर्वात शल्याचे शब्द हेच दाखवतात. अर्जुनाचा रथ कर्णाला दाखवून शल्य म्हणाला, "कर्णा, दुर्योधनाने तुझ्यावर भार टाकला आहे. (८.६२.१३-१४) तो उचल. आता, वेळ आली आहे."
 अशाच तऱ्हेचे उद्गार भीष्माचेही होते. म्हणजे लौकिकात कर्ण दुर्योधनांचे संबंध बरोबरीच्या मित्रांचे नव्हतेच. तिसरे उदाहरण कृष्णार्जुनांच्या मैत्रीचे आहे. ते मात्र अगदी बरोबरीच्या मैत्रीचे आहे. दोघांचा सामाजिक दर्जा क्षत्रियाचा; दोघेही धाकटे मुलगे म्हणून अभिषिक्त राजे नव्हते; दोघांनीही पराक्रमाने एकमेकांना मदत केलेली; घराण्यांत विवाहसंबंध झालेले; एकत्र बसून 'विक्रान्तानि रतानि च,' अशा युद्धे व प्रेम ह्यांबद्दल मनसोक्त गप्पा मारलेल्या; दोघांनी बरोबर बसून दारू प्यालेली; ह्याच अवस्थेत एकाच्या बायकोचे पाय दुसऱ्याच्या मांडीवर अशा तऱ्हेने वागलेले; एक दुसऱ्याशिवाय जगू शकत नव्हता. महाभारतकालातल्या गाढ़ मैत्रीचे ते प्रतीक होते. महाभारत मैत्री, गाढ मैत्री बरोबरीच्यांशीच होई, असे दिसते.
 ह्यानंतरच्या काळात श्रीकृष्ण देवत्वाला पोहोचल्यावर त्याच्या व सुदाम्याच्या मैत्रीचे जे वर्णन आहे, ते महाभारतातील चित्रणाशी सर्वथैव विसंगत आहे.सुदामा हा एक गरीब ब्राह्मणाचा मुलगा कृष्णाबरोबरच गुरुगृही विद्या शिकत असे. शिकून झाल्यावर दोघेही आपापल्या घरी गेले. सुदामा कशातच- विद्येच्याही बाबतीत पारंगत झाला होता असे दिसत नाही. तो केवळ एक दरिद्री ब्राह्मणच राहिला. एवढेच नव्हे, तर तोंडाळ बायकोमुळेही गांजून गेला होता. ती त्याला म्हणे, 'अहो, तुमचा तो मित्र कृष्ण द्वारकेचा राजा झाला आहे, त्याच्याकडे जाऊन द्रव्य मागा,' ह्या गोष्टीत कृष्ण द्वारकेचा राजा दाखवला आहे. शेवटी कंटाळून सुदामा द्वारकेला जाऊन भीतभीत राजद्वारी उभा राहिला. कोण आले आहे, हे कळल्याबरोबर कृष्ण सिंहासनावरून उठून दाराशी गेला. त्याने मित्राला मिठी मारली; आपल्या शेजारी आणून बसवले. आपल्या राण्यांकडून त्याला स्नान घातले; त्याने आणलेले मूठभर पोहे मोठ्या आवडीने खाल्ले; पाहुणचार केला; व शेवटी त्याच्या गावात त्याला अपार धन दिले. ही कथा भारतभर सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक कीर्तनकार ती सांगत आला आहे. ह्या गोष्टीतली प्रत्येक घटना द्रुपद-द्रोणांच्या कथेकडे पाहून मुद्दाम तीविरुद्ध रचलेली दिसते. श्रीमंतांनी चढेलपणे वागू नये म्हणून लिहिलेली ही नीतिकथा आहे, की देव (श्रीकृष्ण) श्रीमंत-गरिबांत भेद करीत नाही, हे पटवण्यासाठी ही कथा लिहिली आहे हे कळत नाही. ज्याला 'मित्र' म्हटले आहे, तो एकदाच कृष्णाच्या मोठेपणाच्या आयुष्यात येतो व स्वतःची गरज भागवून जातो. आपल्या राज्यातल्या ब्राह्मण वगैरेंना तृप्त ठेवणे हे राजाचे कामच आहे. तेव्हा कृष्णाने केले ते योग्यच. पण हा संबंध मित्रत्वाचा नव्हे, असेच महाभारताच्या आचारविचारांच्या चौकटीचा विचार केला तर म्हणावे लागेल, 'मित्र' शब्दाचा अर्थच बदलला.
 महाभारतापर्यंत आपले वाङ्मय ही स्वतंत्र नवनिर्मिती होती.
 टीकावाङ्मय हे सर्व नंतरचे. नवनिर्मितीही होत होती, पण टीकावाङ्मय जास्त होते. एक प्रकारे हा क्रम सर्वच जागतिक वाङ्मयात दिसतो. वाङ्मयाच्या सुरवातीला सर्वच नवनिर्मिती असते. हीच निर्मिती पुढील टीकावाङ्मयाचा पाया असते. महाभारत हे आपले प्राथमिक वाङ्मय. त्याने पुढच्या कित्येक शतकांच्या काव्य-नाटकांना, कथा-पुराणांना व टीकावाङ्मयाला खाद्य पुरवले.
 महाभारतीय समाज बऱ्याच अर्थांनी संकुचित होता. त्याच्या जीवनाचे चित्र दाखवते की, आधिभौतिक दृष्टीने- द्रव्याच्या दृष्टीने- तो कृषि-गोरक्षकांचाच होता. वैदिक आर्य येथल्या लोकांत मिसळू लागले होते. पण त्यांचे सांस्कृतिक जीवन बहुतांशी गोरक्षक आर्यांच्याच मर्यादेत राहिलेले होते. घोडे हे त्यांचे आवडते जनावर. घोड्यांच्या संख्येवर, रूपावर व गुणांवर क्षत्रियांचा मोठेपणा अवलंबून असे. बऱ्याचशा राजांची नावेही घोड्याच्या मालकीची वा गुणांची निदर्शक होती. उदा. 'हर्यश्व' (तांबडा घोडा असलेला); 'अश्वपति' (घोड्यांचा स्वामी); 'श्वेतवाहन' (अर्जुनाचे एक नाव); 'युवनाश्व' (एका प्रसिद्धपूर्वकालीन राजाचे नाव). सारथी असणे, व रथातून लढणे (महारथी, रथी, अतिरथी) हा मोठेपणा समजला जाई. घोडा जोडलेले रथ असत. रथांची चाके अरा असलेली होती. रथ लहान-मोठे असत. पण महाभारतकाली कोणाला घोड्यावर बसता येत नसे. ती कला ख्रिस्तोत्तरकाली, म्हणजे भारतीय युद्धानंतर हजार वर्षांनी हिंदुस्थानात आली.
 गोरक्षण व कृषी हा जीवनाचा पाया होता. गोमांस खात असत का? असत, असाही पुरावा नाही. नसत, असाही पुरावा नाही. वेदब्राह्मण-काली खात होते. सणासुदीला, विद्वान ब्राह्मणासारखा मोठा पाहुणा आला, तर खाण्याचा तो जिन्नस होता. तसा उल्लेख महाभारतात नाही. खात नसतीलच, असेही नक्की सांगता येत नाही. जागोजाग व्याधांचे उल्लेख आहेत. भीमाला मांस आवडे, ते ते मृगया करून आणीत, असाही उल्लेख आहे.पांडव मृगयेवर राहत. त्यांनी आणलेली मृगया त्यांचे ब्राह्मण आश्रितही खात असणार. मृगयेच्या व व्याधांच्या उल्लेखांवरून वाटते की, गोमांस खायचा प्रघात अजिबात नाहीसा तरी झाला होता, किंवा फारसा अस्तित्वात नव्हता. सर्व क्षत्रिय गाईंचे मोठाले कळप पाळीत. ते का?, क्षत्रिय दूध विकीतसे दिसत नाही. मग गुरे कुटुंबाला दूधदुभत्यासाठी व नित्य होणाऱ्या यागाला तुपासाठीच होती का? क्वचित खाण्यासाठीही, असा प्रश्न मनात येतो. कर्णपर्वातील उघडउघड प्रक्षिप्त भाग कर्णाचे मद्र-बाल्हीक व गांधार या देशांतील माणसांबद्दलचे निर्देश हा वाटतो. कुरु-पांचाल धार्मिक, इतर राष्ट्र अधार्मिक, असा समज झाल्यानंतरचा तो असावा. त्यात म्हटले आहे की, वरील तिन्ही राष्ट्रांचे लोक गोमांस खात व दारू पीत. (८.२७-७७) दारू पिणे महाभारतकाळी क्षत्रियांना संमत होते हे उघड आहे. तसेच गोमांस खाणेही संमत असेल. पुढे त्यावर धार्मिक बंधन पडल्यावर पश्चिमेकडील लोक जुने रीतिरिवाज पाळीत असल्यामुळे ते नव्या समजुतीप्रमाणे धर्मबाह्य ठरले असतील.
 दूध, सान्नाय व धृत ही हविर्द्रव्ये होती. 'सान्नाय’ म्हणजे दूध फाडून फडक्यात बांधून केलेला छाना. ही सर्व खाद्येही असणारच. मनुष्य स्वतःसाठी जे उत्पन्न करतो व खातो, तेच आपल्या देवांना वाहतो. 'घृत' म्हणजे काय ? 'तक्र' व 'नवनीत’ हे दोन्ही शब्द महाभारतात नाहीत. लोणी तापवून केलेले हे घृत, की गोचर्ममांस तापवून युरोपात काढतात तशी चरबी? तोच प्रश्न 'आज्य' ह्या शब्दाविषयी. 'आज्य’ म्हणजे 'अजापासून झालेले ते'. 'आज्य' हे बोकडाचे वा शेळीचे मांसही असू शकेल.'आज्य'शब्द 'अञ्ज्' (='माखणे') ह्या धातूपासूनही होतो. आज्य म्हणजे ह्या अर्थाने अंगाला जे माखायचे ते. तिबेटी लोक व मध्य आशियातील पशुपालक भटके लोक आजही सर्व तऱ्हेची चरबी व लोणी अंगाला फासायलाही वापरतात. घोडा अश्वमेधात बळी देत. अजा क्षुद्र यागात उपयोगी पडत असेल. इतरही जनावरे मेध्य होती. मेध्य जनावरे खाद्यही होती. गो ही मेध्य व खाद्य दोन्ही होती का?
 महाभारतकालीन लोकांचे मुख्य धान्य काय होते, ते पुस्तकावरून कळत नाही. बहुधा जव असावे. क्षत्रिय भरपूर दारू पीत असत. धान्य जसे खाद्य होते, तसे देवाला पुरोडाशाच्या रूपाने अर्पण करावयाचे द्रव्यही असे. यागप्रधान धर्मात पत्र, पुष्प व फल ह्या तिहींनाही स्थान नव्हते. तशा तऱ्हेची पूजा महाभारतात नाही. गीतेत जरी ह्या तिन्हींचा ('पत्रं पुष्पं फलं तोयं यो मां भक्त्या' इत्यादी) उल्लेख असला, तरी तो नंतरचा समजला पाहिजे. महाभारतकाली जे आपले व आपल्या देवांचे खाद्य होते, ते मागाहून राहिले नाही. माणसे व देव दोन्ही बदलली.
 ज्याचा निर्णय करता येत नाही, अशी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे : ती म्हणजे लिपी व लेखन. महाभारतकाली लोकांना लिहिता येत होते का? महाभारतात लेखनाचा उल्लेख नाही. लिपी असती, तर उल्लेख आलाच असता, अशी ठिकाणे असूनही उल्लेख येत नाही. म्हणून लिहिणे माहीत नसावेसे वाटते. सगळी तोंडी निरोपानिरोपी. दूत पाठवायचे, तेही लिहिलेली चिठ्ठी न देता तोंडी निरोप देऊन. विदुराने वारणावतला धर्माकडे आपला जो एक विश्वासू 'खनक' (=खणणारा) पाठवला, तो तोंडी निरोप देऊन. निरोप फार गुप्त स्वरूपाचा म्हणून तोंडी दिला असे म्हटले, तरी इतर प्रकरणे मुळीच गुप्त नव्हती. प्रत्येक सांगावा चार माणसे जमवून बोलण्याचा होता. विराटपर्वात शमीवृक्षाखाली उभे राहून अर्जुन उत्तराला कोणची शस्त्रे कोणाची, हे जेव्हा सांगतो, त्यावेळी एकातरी शस्त्रावर नाव असावे, अशी अपेक्षा असते. पण नाव नसून खुणा मात्र होत्या. सोन्याचे ठिपके (जातरूपस्य बिन्दवः) असलेले धनुष्य गांडीव, ज्याच्यावर सोन्याचे हत्ती ते भीमाचे, ज्याच्यावर इन्द्रगोप ते धर्माचे, ज्याच्यावर सोन्याचे सूर्य ते नकुलाचे व टोळ असलेले ते सहदेवाचे. त्याचप्रमाणे बाण कोणाकोणाचे, तलवारी व म्याने कोणाकोणाची, ह्याचे वर्णन आहे. एकाही आयुधावर नाव मात्र नाही. तसेच, राजाचे गोधन मुद्रांकित असे. पण मुद्रेवर नाव असे, असे दिसत नाही. ही गोष्ट क्षत्रियांची. क्षत्रियांना लिहिणे-वाचणे आले नाही, तरी अगदी परवा-परवापर्यंत चालतच असे. पण इतरांच्याही बाबतीत लेखाचे नाव नाही. कृषी व गोरक्षण लेखनाशिवाय चालू शकते. आर्यांच्या आधी भारतात वसलेल्या सिंधुकाठच्या लोकांना लिपी होती, लिहिणे होते. आर्यांची लिपी पहिल्याने ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात सापडते. त्याआधी दोन शतके लेखन आले असल्यास बुद्धाच्या वेळी लेखन होतेसे दिसते. बुद्धयुगाला वणिग्युग म्हटले, तर ते अपेक्षितच आहे. कारण द्रव्याच्या उलाढाली लेखनाशिवाय होऊ शकत नाहीत. महाभारतात लेखनाचा व लेखनसाहित्याचा, शाई, पत्र व लेखणी यांतल्या कशाचाच उल्लेख नाही. लेखन असेल, पण असलेच, तर अपवादात्मक असावे. कदाचित सभा बांधणाऱ्या मयाला ती विद्या अवगत असली, तर कोण जाणे !
 रुक्मिणीची कथा ही महाभारताचा भाग नसली, तरी त्या कालातीलच ! कृष्ण कितीही श्रेष्ठ असला, तरी तोही त्या काळातील क्षत्रियच होता. तेव्हा रुक्मिणीने स्वयंवरापूर्वी प्रेमपत्रिका लिहिणे व कृष्णाला ती वाचता येणे दोन्ही गोष्टी असंभाव्य.
 जसे लेखन नव्हते, तशी विटांची वा दगडांची घरेही नव्हती. आर्य बहुधा लाकडी घरे बांधीत. पहिली बौद्ध लेणी ही लाकडी बांधणीच्या अनुकरणाची आहेत, असे जाणकारांचे मत आहे. यज्ञांत निरनिराळ्या चिती सांगितल्या आहेत. त्यांसाठी इष्टका म्हणजे वीट लागत असे. वीट करणे एकदा माहीत झाले, म्हणजे विटा घरांसाठी वापरणे शक्य आहे. पण तसा उल्लेख नाही. गरीब लोक आज बांधतात, तशी मातीची घरे बांधीत असतील.
 धर्म, तत्त्वज्ञान, सामाजिक मूल्ये ह्या बाबतींत खूप पुढे गेलेले हे लोक ऐहिक गोष्टीत फार पुढारलेले नव्हते. इतर आर्यभाषिकांप्रमाणेच मिसर व बावेरु येथल्या सेमिटिक-होमिटिक लोकांच्या मानाने ते मागासलेलेच होते. त्यांची शस्त्रे उत्तम होती व वाहनांमुळे त्यांना जलदगती होती. घोडा हे जनावर त्यांनीच नव्याने मिसर व बावेरु (इजिप्त व बाबिलॉन) देशांत नेले व त्याच्याच सहाय्याने ते देश जिंकून काही काळ त्यांनी त्यांवर पगडा बसवला. ह्याच भाषिक समूहातील लोक ग्रीसमध्ये गेले. ग्रीसमधील समाजव्यवस्था, दैवते व महाभारतातील चित्र ह्यांत विलक्षण साम्य आहे, व विचार करायला लावतील, असे फरकही आहेत. त्यांनीही अशाच एका जुन्या लढाईचा 'इलियड' नावाच्या अमर काव्यात वृत्तान्त दिला आहे. त्यात ती समाजस्थिती दिसते, ती आपल्या महाभारतकालीन समाजस्थितीशी जुळती आहे. तेथेही लहान-लहान राज्ये होती. सगळे राज्यकर्ते एकमेकांच्या बरोबरीचे होते; व ट्रॉयच्या युद्धात या राजांचे मानापमान करता-करता बिचाऱ्या आगामेम्नॉनची दुर्योधनाप्रमाणेच अवस्था झाली होती. ग्रीक कथेत देवादिकांची ढवळाढवळ महाभारतकथेपेक्षा जास्त आहे. ग्रीक देव एकमेकांशी भांडतात. ग्रीक कथांतून देवींचे स्थान स्वतंत्र, (उदा. पालासअथीनी)- देवांइतकेच महत्त्वाचे आहे. महाभारतकाळापर्यंत आपल्याकडे देवींना व देवांच्या बायकांना स्थान नाही. दोन्ही समाज पितृप्रधान असूनही ग्रीकांच्या कथांत स्त्रियांची चरित्रे ठळक, वैशिष्ट्यपूर्ण व विविध आहेत. मानवी समाजात काय, किंवा स्वर्गात काय, ग्रीकांमध्ये स्त्रीला भारतातल्यापेक्षा जास्त महत्त्व होते, ह्यांत शंकाच नाही. ग्रीकांच्या मानाने आपल्याकडील स्त्रिया उदात्त असल्या, तरी एकाच ठशाच्या व कंटाळवाण्या वाटतात. माता व पत्नी ह्या दोन भूमिकांतच त्या दिसतात. नवऱ्याने पोटच्या पोरीला देवाला बळी दिली, हे निमित्त पुढे करून नवऱ्याला मारणारी क्लिटेमनेस्ट्रा, आपला मुलगा मेलिआगर ह्याने आपला भाऊ थेस्टिआडीस ह्याला भांडणात मारले म्हणून रागाच्या भरात मेलिआगरला मारणारी त्याची आई आलथिआ,
युगान्त / २३५ ________________

लोक ऐहिक गोष्टीत फार पुढारलेले नव्हते. इतर आर्यभाषिकांप्रमाणेच मिसर व बावेरु येथल्या सेमिटिक-होमिटिक लोकांच्या मानाने ते मागासलेलेच होते. त्यांची शस्त्रे उत्तम होती व वाहनांमुळे त्यांना जलदगती होती. घोडा हे जनावर त्यांनीच नव्याने मिसर व बावेरु (इजिप्त व बाबिलॉन) देशांत नेले व त्याच्याच सहाय्याने ते देश जिकून काही काळ त्यांनी त्यांवर पगडा बसवला. ह्याच भाषिक समूहातील लोक ग्रीसमध्ये गेले. ग्रीसमधील समाजव्यवस्था, दैवते व महाभारतातील चित्र ह्यांत विलक्षण साम्य आहे, व विचार करायला लावतील, असे फरकही आहेत. त्यांनीही अशाच एका जुन्या लढाईचा 'इलियड' नावाच्या अमर काव्यात वृत्तान्त दिला आहे. त्यात ती समाजस्थिती दिसते, ती आपल्या महाभारतकालीन समाजस्थितीशी जुळती आहे. तेथेही लहान-लहान राज्ये होती. सगळे राज्यकर्ते एकमेकांच्या बरोबरीचे होते; व ट्रॉयच्या युद्धात या राजांचे मानापमान करता-करता बिचाऱ्या आगामेम्नॉनची दुर्योधनाप्रमाणेच अवस्था झाली होती. ग्रीक कथेत देवादिकांची ढवळाढवळ महाभारतकथेपेक्षा जास्त आहे. ग्रीक देव एकमेकांशी भांडतात. ग्रीक कथातून देवींचे स्थान स्वतंत्र, (उदा. पालासअथीनी)- देवांइतकेच महत्त्वाचे आहे. महाभारतकाळापर्यंत आपल्याकडे देवींना व देवांच्या बायकांना स्थान नाही. दोन्ही समाज पितृप्रधान असूनही ग्रीकांच्या कथांत स्त्रियांची चरित्रे ठळक, वैशिष्ट्यपूर्ण व विविध आहेत. मानवी समाजात काय, किंवा स्वर्गात काय, ग्रीकांमध्ये स्त्रीला भारतातल्यापेक्षा जास्त महत्त्व होते, ह्यांत शंकाच नाही. ग्रीकांच्या मानाने आपल्याकडील स्त्रिया उदात्त असल्या, तरी एकाच ठशाच्या व कटाळवाण्या वाटतात. माता व पत्नी ह्या दोन भूमिकांतच त्या दिसतात. नवऱ्याने पोटच्या पोरीला देवाला बळी दिली, हे निमित्त पुढे करून नवऱ्याला मारणारी क्लिटेमनेस्ट्रा, आपला मुलगा मेलिआगर खान आपला भाऊ थेस्टिआडीस ह्याला भांडणात मारले म्हणून रागाच्या भरात मेलिआगरला मारणारी त्याची आई आलथिआ,
आपला शापित भाऊ ओरेस्टेबरोबर वणवण हिंडणारी इलेक्ट्रा*, पापाचे प्रायश्चित्त म्हणून म्हातारपणी इडिपसने आपले डोळे फोडून घेतले तेव्हा ठरलेले लग्न मोडून ह्या निराधार अपंग बापाची काठी होणारी इफिजेनिया, अशी कितीतरी अविस्मरणीय विविध चरित्रे ग्रीक कथांतून आहेत. ग्रीकांचे देव व देवताही आपल्याकडील देवांच्या मानाने भारी रागीट, उतावळ्या व स्वभावाने दुष्ट वाटतात. ग्रीक कथेत बहीणभाऊ ह्यांचे नाते अतिशय प्रेमाचे व जवळिकीचे दाखवलेले आहे. लग्न झाले, म्हणून स्त्री आपल्या माहेरला विसरत नव्हती. मूळ एक पण मागाहून निरनिराळ्या प्रदेशांत गेलेल्या दोन पितृप्रधान संस्कृतीत हा फरक का असावा, असा प्रश्न साहजिकच उभा राहतो. ग्रीकांवर मिसरी संस्कृतीचा परिणाम झाला असला पाहिजे. मिसर देशात राजा जरी पुरुष असला, तरी संस्कृती मातृप्रधान होती व स्त्रियांचा दर्जा फार मोठा होता त्याचा हा परिणाम असला पाहिजे.

 ग्रीकांमध्येही राजकुले, पूजा-अर्चा करणारा वर्ग व इतर समाज होता. त्याशिवाय परिचर्या करणारा दासवर्गही होता. राजकुले जाऊन लोकसत्ताक प्रस्थापित झाले, तेव्हा मताधिकार


 

*महाभारतात बहीणभावांच्या प्रेमाबद्दल दाखले मिळत नाहीत.बहिणीच्या मोबदल्यात पराक्रमी वा श्रीमंत मेहुणा मिळवायचा, हाच भावाचा मुख्य उद्देश दिसतो. लग्न झाल्यावर बायकांचा माहेरी फारसा संबंध राहत नसे, असे दिसते. वैदिक वाङ्मयात मात्र बहीण भावांचे संबंध जवळचे दाखविले आहेत. भावाशिवाय असलेल्या बहिणींची स्थिती शोचनीय होती, असेही उल्लेख आहेत. पण महाभारतात बहीणभावांच्या प्रेमाचे उल्लेख नसले, तरी गांधारीच्या व द्रौपदीच्या पाठीशी भाऊ होते व कुंतीच्या पाठीशी भाऊ नाही तरी भाचा होता, असे दिसते. तरी गांधारीचे व शकुनीचे बोलणे किंवा धृष्टद्युम्न-द्रौपदीचे जिवाभावाचे संभाषण कुठे दिलेले नाही. पुढील काळात हीच परिस्थिती संस्कृत वाङ्मयात दिसते. पण मध्ययुगानंतर संस्कृत ग्रंथांतून यमद्वितीया व रक्षाबंधन ह्या सणांमध्ये भावा-बहिणींचे संबंध फार जिव्हाळ्याचे दाखवले आहेत, व भारतभर आजकालच्या सर्व भाषांमधून भाषाबहिणींच्या प्रेमाने थबथबलेले लोकवाङ्मय आहे. लोकांच्या तोंडी असलेल्या वाङ्मयातून सापडणारा हा भाव संस्कृतात नाही, पण आजकालच्या लिखित वाङ्मयात सर्वत्र आढळतो. जुन्या संस्कृताच्या परंपरेत अशा तऱ्हेचे संबंध नव्हते, पण बहुजनसमाजात होते व त्यांच्याकडून ते हळूहळू समाजातील सर्व थरांत पसरले, इतकेच नव्हे, तर वाङ्मयातही त्यांना स्थान मिळाले.

फक्त वरच्या तीन लोकांना होता, दासांना नव्हता. तोच प्रकार आजपर्यंत अमेरिकेत होता. इतर पाश्चात्त्य देशही एकाच वेळी घरी लोकसत्ताक व बाहेर साम्राज्यवादी होते व आहेत. आपले व परकीय, आपले देव व परकीयांचे देव, आपले हक्क घेण्याची व परकीयांना हक्क न देण्याची प्रवृत्ती हे सर्व तेव्हा होते, आताही आहे. मात्र तेव्हाच्या लिखाणात ह्या गोष्टी स्पष्ट आहेत. तेव्हाचे मानवसमाज लहान-लहान होते. ह्या तऱ्हेची समाजव्यवस्था हीच स्वाभाविक समजली जाई. तीत लपवण्यासारखे काही वाटत नसे. हल्ली पूर्वीच्या गोष्टीपैकी खूपच गोष्टी शिल्लक आहेत. पण त्या जणू नाहीतच, अशा भावनेने लोक लिहीत असतात. जुने नुसते त्याज्यच नाही, तर हल्लीच्या काळाला गैरलागू, अशी बऱ्याच लोकांची समजूत असते, तसे ते नाही. जुने कधीही सर्वस्वी टाकाऊ व सर्वस्वी गैरलागू होत नाही; नवे ते इतके नवे कधीही नसते की त्यात जुन्याचा अंशच नाही, अशी मानवशास्त्राची बैठक आहे. जुने, नवे, जवळ-जवळचे तसेच लांब-लांबचे, अप्रगत व प्रगत, सगळेच मानवसमाज अभ्यासास योग्य आहेत. अभ्यास व्हावा तो पूर्वी काय होते व आज काय आहे, त्याची तुलना करता येईल, ह्या दृष्टीने व्हावा. अभ्यासाआधीच ठाम मते ठरवून मूर्तिपूजकाप्रमाणे भक्तिभावानेही होऊ नये व मूर्तिभंजकाच्या आवेशाने द्वेषभावनेनेही होऊ नये, इतकीच प्रार्थना.

  

 हे सर्व लिहीत असताना एका मित्राने एक विचार मांडला. वेद, उपनिषदे, महाभारत अशी सुरुवात झाल्यावर आपल्या सबंध समाजाने पलटी का खाल्ली? इतक्या कणखरपणे आयुष्याचा विचार केल्यावर भक्तिमार्गाचा स्वप्नाळूपणा व विभूतिपूजा त्याने कशी पत्करली? गोमांसासुद्धा सर्व तऱ्हेचे मांस खाणारे शेवटी गाईचे शेण खाऊन व मूत पिऊन, एका चार पायाच्या जनावराला आपली माता कशी समजू लागले ?
 ह्या प्रश्नांची उत्तरे देणे-निदान एकट्या माणसाने ती देणे अशक्य आहे. विचार व्हावा, म्हणून माझे व इतरांचे प्रश्न पुढे टाकले आहेत. दुसऱ्या एका मित्राने मांडलेला विचार मात्र काहीसा सुखकारक आहे. तो म्हणाला, "अहो, दुसरे काही टिकले नाही, पण भाषा टिकली आहे, हे नशीब समजा. आज तुम्हांला महाभारत वाचता येऊन त्याचा अर्थ समजतो आहे, हे भाग्य नाही का? नाहीतर मोहेंजोदारोप्रमाणे झाले असते. चित्रे आहेत, वस्तू आहेत, काहीतरी लिहिलेले आहे, पण काय ते मात्र भाषेच्या ज्ञानाअभावी कळत नाही". खरेच केवढे माझे भाग्य की आज मला तीन हजार वर्षांपूर्वीची 'जय' नावाची कथा वाचता येते आहे व तीत माझे प्रतिबिंब पहाता येत आहे !

 वर्षप्रतिपदा, शके १८८९
 १० एप्रिल, १९६७.