राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान

राष्ट्रीय एकात्मता
आणि
भारतीय मुसलमान




हमीद दलवाई







सुगावा प्रकाशन, पुणे
राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान

 हमीद दलवाई

आवृत्ती पहिली - १ मे २००२
 आवृत्ती दुसरी - १५ ऑगस्ट २०१२

प्रकाशक/मुद्रक
 उषा वाघ
 सुगावा प्रकाशन
 ५६२ सदाशिव पेठ,
 पुणे ४११ ०३०
 दूरध्वनी : (०२०) २४४७८२६३
 फॅक्स : (०२०) २४४७९२२८
 E-mail: vilaswaghpune@gmail.com

मुद्रणस्थळ
 स्वरूप मुद्रणालय
 नारायण पेठ,पुणे ४११ ०३०

० ISBN : 978-93-80166-55-1


किंमत : २००/- रू.
प्रथम आवृत्तीचे
प्रकाशकाचे निवेदन

 तीस वर्षांपूर्वी माझे मित्र आणि थोर समाजसुधारक हमीद दलवाई मला म्हणाले होते की, 'राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान' या विषयावर त्यांनी पुस्तक लिहायला घेतले आहे. मला हे ऐकून फार आनंद वाटला. कारण, भारतीय समाजाच्या परिवर्तनासंबंधीचे हमीद दलवाईंचे विचार मराठी वाचकांपर्यंत गेले पाहिजेत असे मला तीव्रतेने वाटे. नंतर राजकारणाला खूप गती आली आणि कामाच्या व्यापात मी ते विसरूनही गेलो. त्यानंतर हमीद आजारी पडले आणि त्यांचे निधन झाले. त्या वेळी, हे संकल्पित पुस्तक त्यांच्या हातून लिहून झाले नसावे असे मला वाटले.
 चार महिन्यांपूर्वी मेहरुन्निसा दलवाई माझ्याकडे हमीद दलवाईंचे एक हस्तलिखित घेऊन आल्या, त्या वेळी मला हे सारे आठवले. हस्तलिखिताची काही पाने हरवलेली होती. मी आणि भाई वैद्य यांनी ते वाचले आणि मी मेहरुन्निसांना म्हणालों, “हे पुस्तक पूर्वीच प्रसिद्ध व्हावयास हवे होते. ते का घडले नाही या वादात मला रस नाही. 'साधना'चे आणि हमीद दलवाईचे जिव्हाळ्याचे संबंध होते. हमीद दलवाईचे विचार मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणे हे साधना ट्रस्टचे नैतिक कर्तव्यच आहे. 'साधना प्रकाशन' हे लवकरात लवकर प्रसिद्ध करील." मी मेहरुन्निसांना म्हणालो, 'जी पाने हरवली आहेत ती सुरुवातीच्या प्रकरणातील आहेत आणि ती नसली तरी पुस्तकाच्या पुढील विवेचनात अपूर्णता येत नाही. या विषयावर सरिता पदकी, भाई वैद्य, मेहरुन्निसा दलवाई आणि मी एकत्र बसून चर्चा केली. लेखकाच्या मूळ हस्तलिखितात एक शब्दाचाही फरक करावयाचा नाही ही नैतिक भूमिका 'साधना प्रकाशना'ला मान्यच आहे. जी पाने नव्हती त्यातील मजकुराचा आशय काय असावा हे सहज लक्षात येण्याजोगे होते. इस्लामचा प्रसार युरोपच्या कोणत्या भागात कसा झाला आणि तो कोठे थांबला हे हमीद दलवाईंनी लिहिले आहे. त्यापुढील पाने हरवली आहेत आणि नंतर एकदम, 'औरंगजेबाचा अस्त होईपर्यंत (इ. स. १७०७) भारतात अव्याहत मुसलमानांची सत्ता अस्तित्वात होती.' अशी सुरुवात झाली आहे. त्यावरून हमीद दलवाई यांनी भारतात मुसलमानी आक्रमण प्रथम केव्हा झाले तेव्हापासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतच्या घटनांची माहिती या भागात दिली असावी हे स्पष्ट होते. या घटनांचा केवळ वस्तुनिष्ठ उल्लेख करणारी दोन पाने कंसात टाकली तर वाचकाला ती उपयुक्त वाटतील याबद्दल आम्हा चौघांचे एकमत झाले. दलवाई यांच्या निवेदनाशी विसंगत असा एखादा शब्दही येता कामा नये अशी खबरदारी घेण्याचा प्रयत्न करून हा दोन पानांचा मजकूर कंसात टाकला आहे. तो हमीद दलवाईंनी लिहिलेला नाही, परंतु वाचकांना उपयुक्त व्हावा म्हणून तटस्थ भूमिकेतून केवळ काही घटनांचा उल्लेख केला आहे. इतके स्पष्टीकरण दिल्यावर त्यावर आक्षेप येणार नाही अशी आम्ही आशा करतो. हमीद दलवाई हे त्यांचे लेखन प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याच्या पहिल्या मसुद्यात आवश्यक त्या सुधारणा करीत. या पुस्तकाचे लेखन झाल्यावर हमीद दलवाई हे फार आजारी पडले. त्यामुळे या पुस्तकातील लेखनावर त्यांचा अखेरचा हात फिरलेला नाही. त्यामुळे काही त्रुटी राहिल्या आहेत, हे वाचकांनी लक्षात घ्यावे ही विनंती. विशेषत: ‘समारोप' हे अखेरचे प्रकरण घाईने संपविल्यासारखे वाटते. हमीद दलवाई यांच्या निधनामुळे ही अपूर्णता राहिली आहे. असे असले तरी हमीद दलवाई यांचे विचार आहेत तसे देणे हेच प्रकाशकाचे नैतिक कर्तव्य आहे असे मी मानतो. म्हणून हमीद दलवाई यांचे अप्रकाशित लेखन उपलब्ध झाले. ते जसे आहे तसे 'साधना प्रकाशन' प्रसिद्ध करीत आहे. मेहरुन्निस्सा दलवाई यांच्या विनंतीवरून या पुस्तकाला भाई वैद्य यांनी प्रस्तावना लिहिली याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. तसेच या पुस्तकाच्या निर्मितीस ज्या सर्व मित्रांचे साहाय्य झाले त्यांचे आणि मुखपृष्ठकार शेखर गोडबोले व अमीर शेख यांचेही मनःपूर्वक आभार.

ग. प्र. प्रधान

१ मे २००२

प्रथम आवृत्तीची
प्रस्तावना

 कोणतीही विचारधारा असो, त्यात सुरुवातीला जो प्रवाहीपणा असतो तो नंतर राहात नाही. त्यात साचलेपण येऊन साचेबंदपणा वाढत जातो; सुरुवातीचा ताजेपणा नष्ट होऊन त्याला एक तं-हेचे घनरूप प्राप्त होते, व त्याचे तेज लुप्त होऊ लागते. कम्युनिझमबद्दल ही गोष्ट आपल्या सहज ध्यानी येऊ शकते. मार्क्सच्या विचाराचा ताजेपणा, आवेश व जोश जसा १८४८ साली प्रसिद्ध झालेल्या कम्युनिस्ट मॅनेफॅस्टोमध्ये प्रत्ययास येतो तसा तो लेनिनच्याही लिखाणात पुरेसा येत नाही. स्टॅलिनची राजवट ही तर मार्क्सवादाचे एक साचलेले डबके बनली व तिची दुर्गंधी जगभर पसरली! विसाव्या काँग्रेसमध्ये क्रुश्चेवने आणि नंतर गोब्राचेव्हने स्टॅलिनची सर्व दुष्कृत्ये मांडून मार्क्सवादाला कसे विकृत वळण लागले त्याचे स्पष्टीकरण सर्व जगापुढे सादर केले. जी गोष्ट कम्युनिझमबद्दल तीच 'व्यक्तिवाद' या विचारधारेबद्दल म्हणता येईल. एकछत्री अंमल असलेला राजा, दैवी अधिकार प्राप्त झाला असा दावा करून, अनियंत्रितं सत्ता उपभोगू लागला व त्याने प्रजेचे जीवन साधनरूप बनविले. त्याप्रमाणेच पोपची अनियंत्रित अशी सत्ता सबंध युरोप व त्यामार्फत जगावर वर्चस्व गाजवू लागली. याप्रमाणे राजा व धर्माधिकारी सर्वंकष सत्ता उपभोगीत असताना त्यांच्या सत्तेला व्यक्तिवादाने जबरदस्त टक्कर दिली. 'निरंकुश सत्तेपुढे उभी ठाकलेली समर्थ व्यक्ती' असा त्याचा उल्लेख केला गेला. परंतु हाच सुरुवातीचा प्रमाथी व्यक्तिवाद भांडवलशाहीचा आधार बनला आणि त्या व्यक्तिवादाचे रूपांतर स्पर्धायुक्त समाजातील निखळ व्यक्तिकेंद्री व स्वार्थी माणसाच्या समाजात झाले आणि व्यक्तिवादी विचारसरणी घातक बनली.
  जी गोष्ट विचारधारेची तीच विविध धर्मांची. आर्य प्रथम भारतात आले असताना वेदकाळात दिसणारे त्यांचे विजिगीषु व प्रवाही रूप स्मृतीच्या कालखंडात पार भ्रष्ट बनले आणि हिंदुसमाज चातुर्वर्ण्य पद्धतीचा गुलाम बनला. ब्राह्मणवर्णाने ज्ञानाची मक्तेदारी प्राप्त करून 'वेदोऽखिलं जगत् सर्वम्' असा नारा देऊन हिंदू समाज साचलेल्या डबक्याप्रमाणे बनवला आणि स्त्रीशूद्रातिशूद्र यांच्या बहुजन समाजाला गुलाम बनविले. येशूच्या काळातील ख्रिश्चन धर्माचे तजेलदार तेजस्वी व अखिल मानवतेला व्यापणारे रूप राजेशाहीसारख्या बनलेल्या पोपशाहीमध्ये उरले नाही. म्हणूनच शॉने म्हटले की, "Nearer the Church, further from the God." पोपशाहीने ख्रिश्चॅनिटीचे रूपांतर चर्च्यानिटीमध्ये केले. महावीरांचा जैन धर्म अपरिग्रहवादी होता तर आता जैन धर्म परिग्रहवादी बनला. चातुर्वर्ण्यविरोधी असलेल्या जैन व बौद्ध धर्मांत जातीयता शिरली व साधूंचे महत्त्व प्रस्थापित झाले. तीच गोष्ट इस्लामबाबतही घडली. म्हणून मुस्लिम समाजात धर्मसुधारणा व प्रबोधन या चळवळींची नितांत गरज आहे व त्यातील साचेबंदपणा नष्ट करायला हवा असे मत हमीद दलवाईंनी केवळ निर्भीडपणेच नव्हे तर जिवावर उदार होऊन मांडले आहे.

::::

 हमीद दलवाई हे माझे फार घनिष्ठ मित्र होते. लेखक, कार्यकर्ता, पट्टीचा वक्ता, इतकेच नव्हे तर मित्र म्हणून ते फार मोठे होते. केवळ सत्तेचाळीस वर्षांच्या आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी जे महान कार्य केले ते मुस्लिम समाज व एकूण भारतीय समाज यांच्या दृष्टीने चिरंतन मूल्य असलेले होते याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. कार्यकर्ता म्हणून त्यांचा कार्यकाल १९६० ते १९७७ असा केवळ सतरा वर्षांचा होता. या काळात 'मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया' आणि 'मुस्लिम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपाय' हे दोन ग्रंथ लिहून आणि भारतभर प्रबोधनावरील असंख्य व्याख्याने देऊन त्यांनी मुस्लिम समाजात एक नवीन प्रखर अशी लाटच निर्माण केली. १९७० मध्ये स्थापन केलेले 'मुस्लिम सत्यशोधक मंडळ' म्हणजे चौदाशे वर्षांच्या मुस्लिम इतिहासातील एक नवीन ऊर्जस्वल असा प्रारंभ मानावा लागेल. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्याची गंगोत्री गुरुवार पेठेतील माझ्या घरामध्ये प्रवाही बनली याचा मला मनापासून अभिमान आहे. १९६६ साली तलाकपीडित अशा सात स्त्रियांचा मोर्चा, सनातन्यांच्या धमकावण्यांना भीक न घालता, मुंबई येथे त्यांनी काढला आणि अखेरीस, अहले हदीसपासून अनेक संघटनांना जबानी तलाकच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली ही गोष्ट असामान्यच मानावी लागेल. काहीजण असा प्रश्न विचारतील की स्वत:ला ईहवादी, धर्मनिरपेक्षतावादी मानणाऱ्या व आपले अंत्यसंस्कार मुस्लिम रिवाजाप्रमाणे न करणाऱ्या हमीद दलवाई यांनी मुस्लिम समाजातच कार्य करण्याचे का ठरविले? जन्माने मुस्लिम असल्यामुळे हमीद दलवाई यांना स्वाभाविकपणे असे वाटले की भारतीय एकात्मतेचा प्रवाह दृढमूल करण्यासाठी मुस्लिम समाजात आधुनिक बदलाव अत्यावश्यक आहेत आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय बेडरपणे घेतला. हमीद दलवाई यांच्यावर जे अनेक आरोप करण्यात आले त्यांमध्ये ते हिंदुत्ववादी विचारांचे हस्तक होते असाही एक आरोप होता. परंतु हमीद दलवाई हे सर्व धर्मीयांतील कट्टर पंथीयांच्या विरोधात प्रखरपणे झुंज घेत असत. त्यामुळेच पुण्यातील टिळक स्मारक मंदिरातील त्यांच्या सभेत हिंदुत्ववाद्यांनी आरडाओरडा केला आणि अमरावती येथील त्यांची एक सभा दगड मारून हिंदुत्ववाद्यांनी बंद पाडली. मुस्लिम समाजातील ज्या मंडळींना हमीद दलवाई आपले विरोधक वाटत असत, त्यांनी निर्माण केलेला हा एक चुकीचा आरोप आहे. आता प्रसिद्ध होत असलेल्या पुस्तकातील 'हिंदुत्ववादी' हे प्रकरण निदान मुस्लिम वाचकांनी प्रथम वाचावे असा माझा त्यांना सल्ला राहील. त्यामुळे आधीच विकृत दृष्टीने हमीद दलवाई यांच्याकडे पाहण्याचे टळेल व त्यांचे विचार निर्लेप मनाने समजावून घेता येतील.

::::

 हमीद दलवाईंना जाऊन पाव शतक पूर्ण झालेले आहे. त्यांच्या हयातीतील कट्टरता कितीतरी पटींनी वाढलेली आहे. हिंदुत्ववादी तर, अधिक आक्रमक नव्हे तर अधिक हिंसक बनले आहेत. आज संघ परिवार हिंदू राष्ट्राची जोरकस तरफदारी करू लागला आहे. संघपरिवाराचे नवीन सरसंघचालक श्री. सुदर्शन यांनी पदभार स्वीकारताच जे व्यक्तव्य केले ते महाभयंकर, विकृत व विनाशकारी होते. सरसंघचालक झाल्यावर व संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी मंडळाच्या विशेष बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही पहिलीच मुलाखत होती. त्यात त्यांनी हिंदू व बिगरहिंदू यांच्यामध्ये महाभारतकालीन युद्धाप्रमाणे महायुद्ध भडकेल असे मत मांडलेले होते. संघपरिवाराने यादवीचाच शंख फुंंकला. ही मुलाखत १९ मार्च २००० च्या 'पांचजन्य' व 'ऑर्गनायझर' या त्यांच्या पत्रांतून आलेली आहे. नंतर त्यांनी हे विधान मागे घेतले असल्याचे जाहीर केलेले असले तरी ती माघार संघ स्वयंसेवकांसाठी नाही हे ते खचितच जाणून असतील. संघाच्या ठरावामध्ये १९८८ पर्यंत अयोध्या हा विषय नव्हता, परंतु संघपरिवाराने विश्व हिंदू परिषदेच्या आडून किती धुमाकूळ घातला आहे हे आपण अनुभवतच आहोत. १९६० पासून जातीय दंग्यांचे प्रमाण वाढीस लागले असून रांची, जमशेदपूर, मोरादाबाद, बिहार शरीफ, हजारीबाग, नेली, जळगाव, अहमदाबाद, मुंबई आणि आता गुजरात येथे झालेले दंगे पाहता हिंदू-मुस्लिम समाजांतील दरी रुंदावत आहे याचा प्रत्यय येतो. गुजरातमधील दंगल ही केवळ गोध्राची प्रतिक्रिया आहे हे मुख्यमंत्री मोदी यांचे विधान माणुसकी व संवेदनशीलता नाकारणारे आहे. सत्ताधारीच भारतीयांमध्ये धर्मावरून फरक करू लागले तर ते यादवीला पाचारणच ठरेल. विश्व हिंदू परिषदेचे गिरिराज किशोर तर 'इंदिरा गांधींचा खून झाल्यावर चार हजार शिखांच्या हत्या झाल्या' अशी माणसुकीहीन आकडेवारी मांडू लागले आहेत. डॉ. रफीक झकेरिया यांनी १९९५ साली 'दि वायडनिंग डिव्हाईड' असे पुस्तक लिहिले आहे, त्या पुस्तकात त्यांनी दिल्लीतील आपले १९७१ मधील भाषणही छापलेले आहे. त्या भाषणातील त्यांची वाढती निराशा मनावर एक त-हेचे मळभ निर्माण करते. आफ्रिकेतील टोळीयुद्धाचे स्वरूप आजकालच्या दंग्यांना येऊ लागलेले आहे. गुजरातमधील दंग्यांबाबत विद्या सुब्रह्मण्यम् या पत्रकर्तीचा लेख, श्री. हर्ष मंदेर या आय.ए.एस. अधिकाऱ्याचा 'टाईम्स ऑफ इंडिया'तील लेख आणि राष्ट्रीय मानवाधिकार समितीने गुजरात सरकारवर ठेवलेला ठपका पाहता संघ परिवार कोणत्या थराला गेलेला आहे याची जाणीव होते. संघ परिवाराचे महान गुरू गोळवलकर यांनी 'वुई:दि नेशनहूड डिफाईंड' व 'बंच ऑफ थॉट्स' यामध्ये हिटलरने ज्यूंचे जे शिरकाण केले त्यापासून धडा शिकला पाहिजे अशी मांडणी केलेली आहे. आता हिटलरच्या शिष्यांनी आपला कार्यक्रम सुरू केला आहे काय, असा विचार आपल्या मनापुढे उपस्थित होतो. सामाजिक दुरावा दिवसेंदिवस वाढीस लागलेला असून त्यामुळे भारतीय प्रजासत्ताकापुढे एक महान संकट उभे राहिलेले आहे. यामध्ये हिंदू जमातवाद्यांचा वाटा फार मोठा आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही.

::::

 स्वातंत्र्यवीर सावरकर यांची हिंदुमहासभा संपुष्टात आल्यानंतर व विशेषत: सावरकर यांच्या निधनानंतर संघ परिवार हाच हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व करीत आहे. सावरकरांच्या हयातीत गुरू गोळवलकरांचे व त्यांचे कधीही पटले नाही. ज्या काळी सावरकर ‘संघाने राजकारणात सहभागी व्हावे' असा आग्रह धरीत होते, तेव्हा संघ परिवाराने आपली कार्यक्रमपत्रिका वेगळी आखलेली होती. सामाजिक प्रश्नांबाबत तर त्यांचे तीव्र मतभेद होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली झाली आणि तेव्हापासून त्यांनी मुस्लिम जातीयवाद्यांप्रमाणेच स्वत:ला स्वातंत्र्यलढ्यापासून कटाक्षाने दूर ठेवले. त्याचे कारणही उघड आहे. महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढ्याने काही मूल्ये उराशी बाळगलेली होती. त्यामध्ये लोकशाही प्रणाली, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, भारतातील संमिश्र संस्कृतीचा विकास व समाजवाद ही मूल्ये प्रमुख होती. स्वातंत्र्यलढ्यामध्ये सामील होणे म्हणजे ही मूल्यव्यवस्था स्वीकारणे असा त्याचा अर्थ होता. या मूल्यव्यवस्थेला संघजनांचा किती विरोध होता, हे त्यांच्या अलीकडील वक्तव्यावरूनही कळून येते. पूर्वीचे संघप्रचारक व विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख नेते अशोक सिंघल म्हणाले की, “आम्ही समाजवाद संपविला, आता आम्हाला धर्मनिरपेक्षता संपवायची आहे." संघाने आपल्या स्थापनेपासून हिंदुराष्ट्रसंस्थापनेचे अत्यंत चुकीचे उद्दिष्ट आपल्या डोळ्यांपुढे ठेवले असून गेली पंचाहत्तर वर्षे येनकेन प्रकारे, वेळप्रसंगी लांड्या-लबाड्या, अफवाप्रसार, आक्रमकता व हिंसाचार करूनही ते त्या दिशेने पुढेपुढे सरकू पाहत आहेत. लोकशाही प्रणालीमध्ये हे उद्दिष्ट साध्य होणे शक्य नाही हे लक्षात घेऊन ते लोकसंसदेपुढे धर्मसंसदेचे आव्हान उभे करू पाहत आहेत. त्यांच्या हाती बहुमताची सत्ता मिळताच लोकशाही प्रणाली नष्ट करण्यास त्यांना यत्किंचितही दिक्कत वाटणार नाही. त्यासाठीही हिटलरचा धडा त्यांच्यापुढे आहेच. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आम्ही मानणार नाही, अयोध्या हा भावनेचा प्रश्न आहे, असे पूर्वी सरसंघचालक देवरस यांनी मांडलेलेही होते. या बाबतीत पाकिस्तान निर्मितीचा प्रयत्न कोणत्याही मार्गांची तमा न बाळगता करणाऱ्या बॅ. जीनांशीच त्यांची तुलना होऊ शकते. किंबहना बॅ. जीना यांचे शिष्यत्व पत्करूनच त्यांच्या प्रत्यक्ष कृती-कार्यक्रमाप्रमाणे श्री. सुदर्शन यांनी हिंदू व गैरहिंद यांच्यातील महायुद्धाची कल्पना मांडलेली आहे. हिंदू समाज एकच विशिष्ट ग्रंथ मानणारा नसल्याने, अनेक देवदेवतांचे संप्रदाय त्यात असल्याने आणि अनेक नास्तिक दर्शनांचा त्यात सहभाग असल्याने आक्रमक बनण्यात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळेच अन्य धार्मिक समूहांना आपल्यामध्ये गुण्यागोविंदाने सामावून घेण्याची परंपरा हिंदू समाजात निर्माण झालेली होती. परंतु हा समाज सहनशील न राहता आक्रमक बनावा या हेतूनेच संघपरिवाराने हिंदू जमातवादाची कास धरलेली आहे. त्यातूनच बजरंग दल व त्यांचा त्रिशूल पुढे आलेला आहे. हिंदू जमातवाद्यांना हिंदू धर्मापेक्षा हिंदू राष्ट्र अधिक महत्त्वाचे वाटते. त्यामुळेच सद्य:परिस्थितीत अधिक दाहकता निर्माण झाली आहे. त्या दाहकतेत या देशाचे काय होईल याची पर्वा हिंदू जमातवाद्यांना दिसत नाही. त्यांच्याबाबत हमीद दलवाई यांनी लिहिलेले प्रकरण अत्यंत उद्बोधक आहे.

::::

 हमीद दलवाई यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असे की, ते अत्यंत प्रखर असे पुरोगामी व धर्मनिरपेक्षवादी राष्ट्रभक्त होते.थोर समाजवादी नेते एसेम जोशी यांनी १९४१ मध्ये सुरू केलेल्या राष्ट्र सेवादलामध्ये ते १९४६ साली सामील झाले. त्यातून त्यांनी जो समाजवादी विचारांचा अंगीकार केला तो आयुष्याच्या अंतापर्यंत कायम टिकला. समाजवादी आंदोलनातील डॉ. लोहिया, जयप्रकाश नारायण व एसेम जोशी यांच्याबद्दल त्यांना विशेष आदरभाव वाटत आला. गांधी-नेहरूंच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढ्याला त्यांनी मनःपूर्वक साथ दिली आणि त्या स्वातंत्र्य लढ्यातून उदित झालेल्या संविधानातील मूल्यांना त्यांनी.आपली अव्यभिचारी निष्ठा अर्पण केली. ते मनाने पूर्णपणे ईहवादी असले व इंडियन सेक्युलर सोसायटीचे सदस्य असले तरीही संविधानात ग्रथित केलेल्या व व्यक्तीला अर्पण केलेल्या धर्मस्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. स्वत: धर्म न मानताही इतर व्यक्तींच्या धर्मस्वातंत्र्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला असता याची मला खात्री आहे. भारताची फाळणी झाली याबद्दल मुस्लिम जमातवादाचे नेते बॅ.जीना यांच्यावर तसेच संविधान न मानणाऱ्या मंडळींवर त्यांचा अत्यंत राग असे. भारतीय संस्कृती ही बहुरंगी व संमिश्र आहे, याबद्दल त्यांना नितांत अभिमान होता. या राष्ट्रामध्ये व्यापक संस्कृतीच्या मागे अनेकविध जाणिवा व उपसंस्कृती आहेत ही गोष्ट ते आग्रहपूर्वक मांडत असत. अशा या प्राचीन, प्रचंड लोकसंख्या असलेल्या आणि बहुविधतेने नटलेल्या राष्ट्रामध्ये एकात्मता कशी निर्माण होईल याची चिंता त्यांना रात्रंदिवस वाटत असे. यासाठी बहुसंख्य तसेच अल्पसंख्य समाजाने राज्य व धर्म अलग अलग ठेवले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. किंबहुना भारतीय इतिहासात, काही अपवाद वगळले तर, बहुसंख्य राजांनी स्वत:चा धर्म व राज्य यांच्यात कधी भेसळ होऊ दिली नाही. अशोक, अकबर व शिवाजी ही फार मोठी उदाहरणे आहेत. हिंदुराष्ट्र स्थापनेची भूमिका घेणाऱ्या संघपरिवारातील वाजपेयी व अडवाणी यांना सत्तेवर आल्यावर; वरकरणी का होईना; या भूमिका झकत घ्याव्या लागत आहेत ही गोष्ट ध्यानी घेतली पाहिजे. हमीद दलवाई यांच्या मते भारतामध्ये आधुनिकतेवर भर दिला गेला, नागरी स्वातंत्र्य व कायद्याचे राज्य कटाक्षाने पाळले गेले, लोकशाही प्रणालीला निष्ठा अर्पण केली व नागरिकांनी धर्मस्वातंत्र्य पाळूनही राज्य व धर्म अलग ठेवले तर बहुसंख्य-अल्पसंख्य हा प्रश्न निश्चित संपेल.
 या प्रक्रियेत जर कोणाचा अडथळा असेल तर तो विविध धर्मीयांतील कट्टर पंथीयांचाच आहे. धर्मांध जमातवादी व त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुल्ला-मौलवी व साधुसंत यांच्यामुळेच अस्पृश्यता, गोवधबंदी, कुटुंबनियोजन, समान नागरी कायदा, स्त्रियांना समान अधिकार व राष्ट्रीय सार्वभौमत्व इत्यादी प्रश्नांना बाधा येते हे स्पष्ट आहे. भारतात कायद्याने जाती, धर्म, वंश, लिंग व भाषा या पलीकडे जाऊन सर्वांना समान नागरिकत्व व अधिकार आहे. परंतु बेरोजगारी, शिक्षण व आरोग्य यांचा अभाव, गरिबी, कुपोषण इत्यादी दैनंदिन प्रश्नांमुळे नागरिकांना समान अधिकारांपासून वंचित ठेवले जाते आणि धर्माने राजकारणात लुडबूड केल्यामुळे दैनंदिन प्रश्न दुर्लक्षिले जातात. वंचित व शोषित समाजाचा वापर करून समाजात तंटे-बखेडे माजविण्यासाठी कट्टरपंथीय सर्व त-हेचा प्रयत्न करतात असे दिसून येते. हमीद दलवाई हे अशा सर्व कट्टरपंथीयांविरुद्ध दंड थोपटून उभे असल्याचे दृश्य दिसते. विशेषतः आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजातील कट्टरपंथीयांविरुद्ध आपण सर्व बाजूंनी हल्ला करण्याची गरज आहे असे हमीद दलवाई अखेरपर्यंत मानीत होते. त्यांचे 'मुस्लिम सत्यशोधक मंडळ' त्याच दिशेने आजही प्रयत्नशील आहे.

::::

 ईहवादी विचारांच्या हमीद दलवाई यांनी 'मुस्लिम सत्यशोधक मंडळ' का स्थापले हे समजावून घेतले पाहिजे. मुस्लिम समाजाच्या कृतज्ञभावनेने मुस्लिम समाजात प्रबोधन कसे सुरू होईल याबद्दलची घोर चिंता त्यांना सतावीत होती.त्या कार्यासाठी वेळप्रसंगी प्राणार्पण करण्याची मानसिक तयारीही त्यांनी केलेली होती. कारण मुस्लिम समाजात प्रबोधनपर्व सुरू झाल्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य सुकर होणार नाही अशी त्यांची खात्री होती. ख्रिश्चन समाजात मार्टीन ल्यूथरच्या सुधारणेमुळे आणि युरोपातील महाझंझावाती प्रबोधनयुगामुळे युरोपीय समाज आमूलाग्र बदलला आणि त्या समाजात आधुनिकतेचे मोकळे वारे वाहू लागले होते. त्यातूनच पुढे औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली. भारतातील हिंदू समाजातही तेराव्या शतकापासून सुरू झालेली बहुजनवादी संतपरंपरा निर्माण झाली व समाज बदलू लागला. “वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भार माथा" असे रोखठोक उद्गार संत तुकारामांनी सतराव्या शतकात काढले. अठराव्या शतकात राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथेविरुद्ध चळवळ सुरू करून आधुनिक शिक्षणालाही चालना दिली. एकोणिसाव्या शतकात तर महात्मा फुले यांनी मुलींसाठी आणि महार-मांगांच्या मुला-मुलींसाठी शाळा सुरू करून आणि भटशाहीविरुद्ध तुतारी फुकून समाजक्रांतीला चालना दिली. त्या पार्श्वभूमीवरच लोकहितवादी व न्यायमूर्ती रानडे यांचे कार्य पाहावे लागेल. मुस्लिम समाजाने मात्र, सर सय्यद अहमद यांनी सुरू केलेल्या अलीगढ चळवळीला कालांतराने जातीय वळण देऊन प्रबोधनाची ज्योत मंद केली होती. इकबालही पाकिस्तानवादी बनले व जीनांनी विनाशकारी अतिरेकी टोक गाठले. हमीद दलवाई यांच्या मते मुस्लिम समाजाने अलगता किंवा स्वत्व विसरणे या दोन मार्गाऐवजी आपले स्वत्व टिकवून व आपल्यात प्रबोधन घडवून राष्ट्रीय ऐक्याची कास धरण्याची गरज आहे. परंपरानिष्ठ अस्मितेऐवजी आधुनिक व राष्ट्रीय ऐक्याला पूरक अशी अस्मिता प्रबोधनाच्या साहाय्याने निर्माण केली पाहिजे. अमेरिकेमध्ये पूर्वी 'कढई सिद्धांत' प्रचलित होता. सर्व वंशीयांनी उकळत्या कढईत आपल्या अलग जाणिवा विसर्जित कराव्यात अशी कल्पना होती. आता त्याऐवजी 'फ्रूट सॅलडचा वाडगा' असा नवा सिद्धांत निर्माण झालेला आहे. फ्रूट सॅलडमध्ये प्रत्येक फळाची वेगळी चव राहूनही सर्व मिळून एक संमिश्र स्वादिष्ट रस तयार होतो. याला काहीजण 'इंद्रधनुष्य सिद्धांत' ही म्हणतात. हमीद दलवाई यांच्या मते अशा त-हेचे आधुनिक पद्धतीने राष्ट्रीय ऐक्य तयार व्हावे असे होते.
 या प्रबोधनासाठी विवेकनिष्ठ आचाराची गरज आहे. त्याबरोबरच वैज्ञानिकतेचा आधार आचाराच्या बुडाशी असावा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे म्हणणाऱ्या कोपर्निकस, गॅलिलिओ आदी शास्त्रज्ञांचा युरोपमध्ये छळ झाला, कारण त्यांचे संशोधन बायबलविरोधी मानले गेले. सृष्टीच्या व्युत्पत्तीचे सिद्धांत पुराण, कुराण व बायबल येथे ईश्वरी अस्तित्व गृहीत धरून आलेले आहेत. परंतु आधुनिक विज्ञान असे उत्पत्तिशास्त्र मान्य करीत नसतानाही कट्टरवादी व मूलतत्त्ववादी मात्र अट्टाहासाने शब्दप्रामाण्याची कास धरतात. शब्दप्रामाण्याऐवजी प्रयोगशीलतेचा आधार प्रबोधनासाठी आवश्यक आहे. इतिहास, परंपरा आदींबाबतची विचक्षण वृत्ती हे प्रबोधन घडवते आणि आत्मटीकेमुळे ते काम अधिक सोपे होते. आत्मटीकेबरोबरच धर्मचिकित्सा तितकीच महत्त्वाची आहे. जोपर्यंत मानवाला पूर्ण अधिकार दिला जात नाही व त्याचे भाग्य शब्दप्रामाण्याच्या खुंटीवर अडकविले जाते, तोपर्यंत धर्मचिकित्सा अवघड आहे याचा विचार आधुनिक मनाने करण्याची गरज आहे.
 हमीद दलवाई यांच्या मते मुस्लिम मन हे कुराण, हदीस, पैगंबरांचे जीवन व इस्लामिक परंपरा यांच्या आधारेच बनते. सनातनी व मूलतत्त्ववादी हे इस्लाममध्ये पूर्ण धर्म व परिपूर्ण समाज आहे असे मानतात. त्यांच्या दृष्टीने पैगंबर साहेबांनी जो प्रयोग केला त्याचे फक्त अनुकरण करणे व कोठल्याही परिस्थितीत चिकित्सा न करणे हे आपले काम आहे. या भूमिकेतूनच जे मुस्लिम मन बनते ते धर्मसुधारणेस व समाज प्रबोधनास कसे तयार होणार? हमीद दलवाई यांचे वैशिष्टय बरोबर या ठिकाणी आहे. मुस्लिम मन या शब्दप्रामाण्यातून व धर्मांधतेतून मुक्त व्हावे असा त्यांचा अत्यंत निकराचा प्रयत्न होता. असा प्रयत्न यापूर्वी कोणी केल्याचे अजिबात दाखविता येणार नाही. परंपरागत चौकटीत जुजबी बदल सुचविण्याचे धाडस अनेकांनी केले. परंतु 'मूले कुठारः' ही भूमिका मात्र हमीद दलवाईंनी घेतली हे मान्यच करावे लागेल.
 आज जगभर पाश्चात्त्यांच्या विरोधात अनेक कारणांमुळे आक्रोश केला जात आहे. पाश्चात्त्य संस्कृतीची निखळ व्यक्तिकेंद्री भूमिका, पाश्चात्त्यांनी लादलेला साम्राज्यवाद आणि चुकीच्या अर्थव्यवस्थेतून जगाची केलेली लूटमार ही त्यामागील कारणे आहेत. पाश्चात्त्यांनी आधुनिकतावाद मांडल्यामुळे आधुनिकतेलाही विरोध केला जात आहे. आधुनिकोत्तर विचारसरणी निर्माण झालेली असून त्याला कित्येकजण 'उत्तर आधुनिकतावाद' असेही म्हणतात. आधुतिकतेला विरोध म्हणजे पुनरुज्जीवनवाद नव्हे व परंपरावाद नव्हे हे प्रथम ध्यानी ठेवले पाहिजे. उत्तर आधुनिकतावाद हा समरसतावाद विरोधी, केंद्रीकरण विरोधी व परिपूर्ण दर्शनवाद विरोधी आहे हे विसरून भागणार नाही. सध्या जे पुनरुज्जीवनवादी व मूलतत्त्ववादी आधुनिकतेला विरोध करीत आहेत, तो विरोध मूलत: मानवविरोधी आहे. उत्तर आधुनिकतावादामध्ये राष्ट्रांतर्गत अनेकविध जाणिवांना महत्त्व देण्यात आलेले आहे. मात्र याचा अर्थ राष्ट्रवाद निरर्थक ठरला असे म्हणून भागणार नाही. अलीकडेच श्री. आंद्रे बेतेले यांनी लिहिलेल्या लेखाप्रमाणे व्यक्तीचे अनेकविध संबंध असतात. कुटुंबापासून ते संबंध वाढत वाढत विश्वापर्यंत जातात. मात्र सध्या तरी जगभर राष्ट्रवादाचे संबंध अनुल्लंघनीय आहेत. राष्ट्र-राज्य ही संकल्पना कोणालाही टाळता येणार नाही. आधुनिकताविरोध म्हणजे राष्ट्रवाद संकल्पनेला विरोध ही कल्पना अयोग्य ठरेल. अशा स्थितीत पॅन इस्लामीझम ही राष्ट्रवादापलीकडे जाणारी व मिल्लतचा आधार मानणारी कल्पना अवास्तव ठरते. आज जगात जी पन्नासपेक्षा अधिक मुस्लिम राष्ट्रे आहेत ती काही वेळा एकत्र येत असली तरी त्यांपैकी कोणीही आपला राष्ट्रवाद सोडलेला नाही. किंबहुना इराण-इराक, इजिप्त-सीरिया, जॉर्डन-अफगाणिस्तान-पाकिस्तान या मुस्लिम राष्ट्रांतील झगडे, राष्ट्रवाद किती प्रबळ आहे हेच दाखवितात. म्हणूनच हमीद दलवाई हे भारतीय राष्ट्रवादाशी संपूर्ण निष्ठा ठेवून तो राष्ट्रवाद बलवान करण्याचा प्रयत्न करीत राहिले व मुस्लिम समाजाने त्या राष्ट्रवादाची कास धरावी असा त्यांचा आग्रह राहिला.
 हमीद दलवाई यांनी मुस्लिम समाजापुढे जे प्रश्न उपस्थित केले ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मुस्लिम मनाने अकबर व दाराशिकोह या संमिश्र संस्कृतीच्या पुरस्कर्त्यांपेक्षा औरंगजेबाला अधिक महत्त्व का दिले? बॅ. जीना हे परंपरागत धर्मवादी नसतानाही त्यांच्या मुस्लिम धर्म-जमातवादावर भाळून मौलाना आझादांसारख्या प्रकांड पंडिताला मुस्लिम समाजाने का डावलले? असाही प्रश्न उपस्थित करता येईल की, संत कबीर, सावित्रीबाई फुले यांची सहकारी व पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख, परमवीर चक्राचे मानकरी अब्दुल हमीद, डॉ. झाकीर हुसेन, न्या. छागला, न्या. हिदायतुल्ला यांची मुस्लिम समाजाने उपेक्षा का केली? इराणच्या खोमेनीला, अफगाणिस्तानमधील तालिबानला व दहशतवादी लादेनला का पाठिंबा दिला? तालिबानचा पराभव होताच अफगाणिस्तानमध्ये जो विजयोत्सव, विशेषतः स्त्रियांकडून केला गेला तो विसरून कसे चालेल? वास्तविक अनेक ख्रिस्ती व बौद्ध राष्ट्र असताना त्यांच्या धर्माधिष्ठित राष्ट्रसंघटना नाहीत. मग 'ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज' (ओआयसी) का बरे निर्माण होते? गेल्या वर्षी अफगाणिस्तानला व १९७१ ला बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान या झगड्यात पाकिस्तानला सहानुभूती का बरे दाखवली गेली? उत्पत्तिशास्त्र, उत्क्रांतिशास्त्र, सात स्वर्गांच्या कल्पना, चंद्राबाबतची मिथके, पृथ्वीकेंद्रित अवकाशशास्त्र या कल्पना आधुनिक विज्ञानाने कालविसंगत ठरविल्यावरही मुस्लिम मन अजूनही त्या कल्पनांभोवती का बरे घोटाळत राहते? याउलट हमीद दलवाई यांनी स्त्रीविषयक नोकरी, तलाक, शिक्षण, पडदा, पोटगी, कुटुंबनियोजन आदी प्रश्न उपस्थित केले. उर्दू भाषेच्या अट्टाहासापायी मुस्लिम तरुणांना नोकरीला वंचित राहावे लागते, त्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. उर्दू भाषा धार्मिक समाजाची भाषा बनवणे व प्रादेशिक भाषांची उपेक्षा करणे याला त्यांचा प्रखर विरोध होता. त्याला ते अलगतावादी व तरुणांचे नुकसान करणारे कृत्य मानीत. बहुसंख्य समाजाकडून मुस्लिम तरुणांना जो दुजाभाव दाखविला जातो, त्याबद्दल सवाल निर्माण करताना ते कधीही कचरले नाहीत. आज मुस्लिम समाज मागासलेला आहे, कारण त्यातील अशरफ फक्त दोन टक्के आहेत. उलट ९७% असलेल्या अजलफ या परंपरागत धंदे करणाऱ्या समाजाची जागतिकीकरणामुळे पूर्ण उपेक्षा होत आहे व त्या विरोधात आवाज उठविण्याचे काम अशरफ समाज करीत नाही. एक टक्का असलेला हीन-दीन स्थितीतला अर्जाल समाज तर पूर्णपणे उपेक्षितच आहे. अन्य मागासवर्गीय मुस्लिमांनी सध्या संघटित होण्याचा चंग बांधलेला आहे. परंतु प्रस्थापित नेतृत्वाला असे संघटित होणे मान्य नाही. मंडल आयोगाला संघपरिवाराने ज्या पद्धतीने विरोध केला तसाच विरोध मुस्लिम समाजातही धार्मिक ऐक्याच्या नावाखाली होत आहे. हमीद दलवाई यांच्या मते मुस्लिम समाजाने आपल्या कोषातून बाहेर पडून या दैनंदिन प्रश्नांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. श्रमिकांच्या चळवळीत सामील होऊन आर्थिक व सामाजिक समतेसाठी व सामाजिक न्यायासाठी संघर्ष केले पाहिजेत अशी दलवाई यांची अपेक्षा होती. मुस्लिमांनी मुख्य प्रवाहात यावे याचा अर्थ हिंदू धर्माच्या प्रवाहात गौणत्वाची भूमिका घेऊन सामील व्हावे असा नाही, असे दलवाई सतत सांगत. भारतातील मुख्य प्रवाह लोकशाही समाजवादी चळवळ हा व्हावा आणि त्या प्रवाहात न्यायासाठी लढताना मुस्लिम समाजाने इस्लामच्या समतेच्या मूल्याची भर भारतीय संस्कृतीत घालावी अशी त्यांची भूमिका होती.
 स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर राजकारणावर-प्रामुख्याने मुस्लिम राजकारणावर हमीद दलवाई यांनी लिखाण केले आहे. त्यांच्या मते स्वातंत्र्यपूर्व मुस्लिम राजकारण बॅ. जीना यांनी व्यापलेले होते. पाकिस्ताननिर्मिती व त्यासाठीचे सर्व डावपेच, प्रत्यक्ष कृती, ओलीस सिद्धांत यात बहुसंख्य मुस्लिमांचे मन पूर्णपणे अडकून गेले होते. आजही बॅ. जीना यांनी भारतीय राजकारणात केलेल्या घोडचुका मुस्लिम मनाने समजून घेतल्या असतील असे मानायला फारशी जागा नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही मुस्लिम समाजासाठीच निर्माण झालेल्या पक्षाचा अगर संस्थांचा तो आश्रय घेताना दिसून येतो. मतदानाच्या वेळी काँग्रेस, समाजवादी पक्ष अगर बहुजन समाजवादी पक्ष यांच्यासारख्या, हिंदू जातीयवादी भाजपला पराभूत करू शकणाऱ्या, पक्षाला त्या त्या वेळी मतदान करतो, मात्र मोठ्या संख्येने बिगर मुस्लिम पक्षात तो दिसत नाही. मुस्लिम संस्थांमध्ये बहुसंख्य संस्था अत्यंत कट्टरतावादी वा अलगतावादी असल्याचे दिसून येते. त्यामध्ये जमाते इस्लामी, जमाते तुलबा, हिज्बुल मुजाहिद्दीन, अखिल भारतीय मुस्लिम कायदा बोर्ड, तबलीग जमात, मुस्लिम लीग, इत्तेहादुल मुस्लेमीन, तामीरे मिल्लत, मशावरत, मुस्लिम मजलीस इत्यादी राजकीय व धार्मिक संघटना अत्यंत कट्टरतावादी आहेत. जमाते उलेमा ही संघटना स्वातंत्र्यकाळात काँग्रेसबरोबर होती, परंतु सध्या तिच्यात व जमाते इस्लामीमध्ये फारसा फरक आढळत नाही. हमीद दलवाई यांनी तथाकथित राष्ट्रीय मुस्लिम व कम्युनिस्ट मुस्लिम यांची चांगलीच खिल्ली उडवलेली आहे. त्यांचे राजकारण अखेरीस कट्टरतावादाकडे जाते, कट्टरतावाद्यांच्या मूळ धार्मिक बैठकीत त्यांचा कसा मिलाफ होतो, हे त्यांनी घणाघाती पद्धतीने मांडलेले आहे. अखेरीस न्या. छागला, प्रो. हबीब, प्रो. रशिदुद्दीन खान, डॉ. झकेरिया व ए. ए. ए. फैजी यांसारख्या उदारमतवदी व धर्मनिरपेक्ष मुस्लिम नेत्यांकडे मुस्लिम समाज ढुंकूनही पाहात नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. हमीद दलवाई पुन्हा पुन्हा असे मांडतात की 'मुस्लिम समाजात गांधींसारखी मानवतावादी व्यक्ती कोण आहे? मी त्याच्या शोधात आहे.' मुस्लिम समाजात पंडित नेहरूंसारखे स्वतःच्या सांस्कृतिक परिघापलीकडे जाणारे व्यक्तित्व निर्माण होत नाही, याचा त्यांना विषाद वाटतो. 'गमख्वार हमारे कायदेआझम, गांधीकी पर्वा कौन करे' अशी भूमिका मुस्लिम मनोमनात आहे काय, अशी त्यांना शंका वाटते. मला मात्र असे वाटते की संघपरिवाराप्रमाणे गांधी नेहरूद्वेष मुस्लिम समाजाने कधी दाखवला नाही. स्वातंत्र्योत्तर काळात तर त्यांनी गांधी-नेहरू परंपरेचा आधारच मानला.
 हमीद दलवाई यांचा सर्वांत मोठा विशेष हा आहे की मुस्लिम समाजावर टीका करूनही, मुस्लिम मन बदलू शकते याबद्दल मात्र त्यांना पूर्ण विश्वास आहे. त्यांचा हा आशावाद अत्यंत प्रेरणादायी आहे. श्री. शेषराव मोरे या लेखकाने 'मुस्लिम मनाचा शोध' ह्या नावाने जंगी पुस्तक लिहिलेले आहे. त्यांनी प्रेषितांचा जीवनादर्श, ईश्वरी ग्रंथाचा संदेश व हदीसची साक्ष यांबाबत लिहिलेले आहे. कुराण व हदीसच्या त्यांच्या अध्ययनाबद्दल जमातेइस्लामीच्या मुस्लिम पंडितांनी शिफारस पत्र दिलेले आहे. परंतु शेषराव मोरे यांचा निष्कर्ष पूर्णपणे नकारार्थी आहे. उलट हमीद दलवाई यांनी जामिया-मिलिया, अबीद हुसेन, प्रो. यासीन दलाल, प्रो. जहानआरा बेगम, केरळची 'इस्लाम अँन्ड मॉर्डन एज सोसायटी' यांचा उल्लेख करून मुस्लिम मन कसे बदलत आहे ते मांडले आहे. राजकारण, मतदान कायदे, दैनंदिन जीवन, जातिप्रथा, शिक्षण व आर्थिक धोरणे इत्यादी अनेक शक्ती धर्माबाहेरही कार्यरत असून त्यांचा परिणाम मुस्लिम मनावर झाल्याशिवाय राहत नाही. स्त्रियांना शिक्षणाची ओढ किती आहे हे आपण तालिबानमुक्त अफगाणिस्तानमध्ये पाहिले आहे. भारतात तर लाखो मुस्लिम स्त्रिया शिक्षण, नोकरी, प्रवास व संस्थात्मक कार्यक्रमांत मग्न आहेत. फातिमाबीबी राज्यपाल असून नजमा हेप्तुल्ला राज्यसभेच्या उपाध्यक्षा व शबाना आझमी खासदार आहेत. मुस्लिम मन सनातन्यांच्या पकडीत कायम बंदिस्त राहील असे मानण्याचे काहीही कारण नाही. हमीद दलवाई हे जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या आशेने प्रयत्न करीत राहिले.

::::

 आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेच्या वर्तणुकीमुळे मुस्लिम प्रश्नाबाबत अधिक गुंतागुंत निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानमधून रशियनांना हुसकून लावण्यासाठी अमेरिकेने ज्या तालिबानला व लादेनला अल कायदाला शस्त्रे, पैसा व प्रशिक्षण देऊन सुसज्ज केले, त्यांच्यावरच अमेरिकेने हल्ला करून त्यांचा पाडावही केला. इतकेच नाही तर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी 'क्रुसेड' हा शब्द वापरून धर्मयुद्धाचे आवाहनही केले व मध्य आशियात दोनशे वर्षांचे जे धर्मयुद्ध झाले त्याचे स्मरण करून दिले. जो आमच्या बाजूला नाही तो दहशतवाद्यांच्या बाजूस आहे, अशी भूमिकाही अमेरिकेने बेमुर्वतखोरपणाने घेतली. जगातील दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आणि त्यात बहुसंख्य मुस्लिम संस्था गोवल्या. अलीकडे दुष्टशक्ती म्हणून इराक, इराण, सुदान व लिबिया यांचा नामोल्लेख केला. नावाला त्यात उत्तर कोरियाचाही समावेश करण्यात आला. यामागे अमेरिकेची भूमिका काय आहे हे समजावून घेण्याची जरुरी आहे. अमेरिकेच्या धोरणाच्या मागे संस्कृतिसंघर्षाची भूमिका आहे. प्रो. सॅम्युएल हटिंग्टन यांनी 'क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स' हे पुस्तक लिहून शीतयुद्ध संपल्यानंतर जगातील भावी संघर्ष सांस्कृतिक असतील व अखेरचा संघर्ष पाश्चिमात्य जग व इस्लाम यांत असेल अशी मांडणी केलेली आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम राष्ट्रे एकमेकाला धरून अमेरिकेविरुद्ध प्रयत्न करणे स्वाभाविकच आहे. वास्तविक सांस्कृतिक संघर्षाचा हा सिद्धांतच मुळी चुकीच्या पद्धतीने मांडलेला, गैरलागू सिद्धांत आहे. 'एन्ड ऑफ हिस्टरी' चा लेखक फ्रेंन्सिस फुकुयामा हा सिद्धांत अमान्य करतो. अमेरिकेतील इस्लामी अध्ययन संस्थेच्या प्रो. शिरीन हंटर यांनी 'दि फ्यूचर ऑफ इस्लाम अँन्ड दि वर्ल्ड' हे पुस्तक लिहून संस्कृती-संघर्षाचा मुद्दा खोडून काढलेला आहे. जगात मुस्लिम देशांतील राष्ट्रवाद बलवान असून ते एकमेकांविरुद्ध लढत असतात. इतकेच नव्हे, तर पैगंबर साहेबांच्या मृत्यूनंतर लगेच वारसायुद्ध व झगडे सुरू झाले होते. तेव्हा मुस्लिम जगत हे एकसंध आहे असे मानून संस्कृती-संघर्षाचा हा सिद्धांत मांडणे चुकीचे आहे असे त्यांचे मत आहे. मात्र अमेरिकेच्या या भूमिकेमुळे मुस्लिम मन काहीसे भयग्रस्त आहे हे कबूल केले पाहिजे. अशा परिस्थितीत आपली परराष्ट्रीय धोरणे अमेरिकेच्या दबावाखाली आखणे अत्यंत घातक ठरेल. विकसित देशांच्या जागतिकीकरणाच्या मोहिमेचे नेतृत्व अमेरिकेकडे असून विश्व बँक, नाणेनिधी व विश्वव्यापार संघटना यांचे लगाम अमेरिकेने आपल्या हातात ठेवले असून सर्व मागास देश बहुउद्देशीय कंपन्यांच्या उदरात ढकलण्याचे पाप अमेरिका करीत आहे. भारतातील भाजपाचे सरकार संस्कृतीसंघर्ष आणि जागतिकीकरण या दोन्ही प्रश्नांबाबत पूर्णपणे अमेरिकेच्या मांडलीक राष्ट्राप्रमाणे वागत आहे, त्याचेही दुष्परिणाम भारतीय समाजावर झाल्याशिवाय राहणार नाहीत.
 आज जगामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांमध्ये, जागतिकीकरणामुळे मागास देशांचा होणारा विनाश आणि तेथे वाढणारा असंतोष हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याबरोबरच धार्मिक मूलतत्त्ववाद, दहशतवाद, अस्मितेचे प्रश्न, बहुसंस्कृतिवाद, बहुसंख्यांक व अल्पसंख्यांकांचे वाद आणि उत्तर-आधुनिकतावादाने पुढे मांडलेले अनेकविध प्रश्न यांचा विचार आपणांस करावा लागणार आहे. मुस्लिम समाजाला स्वरचित कोषाबाहेर येऊनच खुलेपणाने या प्रश्नांचा विचार करावा लागणार आहे. त्या दृष्टीने हमीद दलवाई यांनी मांडलेली भूमिका ही अत्यंत मोलाची व उपयुक्त आहे.

::::

 डॉ. रफिक झकेरिया यांनी नुकताच १५ मार्च २००२ रोजी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक लेख लिहिला असून जगभराच्या मुस्लिमांपुढे ज्या गंभीर समस्या पैदा झाल्या आहेत त्यांचे विवरण केले आहे. त्यांच्या भाषेत 'लिबरल इस्लाम इज बेस्ट डिफेन्स.' इस्लामी धर्मशास्त्रात उदारपणा आणल्याशिवाय अमेरिकेने निर्माण केलेला धोका टळणार नाही, असे त्यांचे मत आहे. त्यासाठी कालविसंगत गोष्टी सोडून आधुनिकता स्वीकारावी लागेल. हमीद दलवाई यांनी इस्लामी धर्मशास्त्राच्या उदारीकरणाची मागणी केलेली नाही. कदाचित त्यांना जे काम अवघड वाटत असेल. मात्र मुस्लिम समाजात अपवाद म्हणून ते उदारमतवादी मुसलमान आहेत त्यांच्याऐवजी उदारमतवादी मुसलमानांचा, अन्य धर्मीयांत आहे असा वर्ग बनावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. यासाठी मात्र जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
 परिस्थिती फार निराशाजनक नाही. १९८८ मध्ये आंतरराष्ट्रीय मुस्लिम स्त्री कार्यकर्ता परिषद भरली होती. त्या परिषदला रझिया पटेल उपस्थित होत्या. त्या परिषदेचा जो अहवाल रझिया पटेल यांनी सादर केला आहे तो अत्यंत आशादायक आहे. "The International Solidarity, Network of Women Living Under Muslim Laws" यांच्या वतीने मुस्लिम स्त्रियांच्या लेखांचे Dossiers प्रसिद्ध होत असते. डेल आयकेलमन यांचे 'The Coming Tranformation in the Muslim World' तसेच दिलीप पाडगावकर यांनी १५/३/१९९३ रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेला आणि ९/१०/१९९६ रोजी 'आऊटलुक' मध्ये सागरिका घोष यांनी लिहिलेला लेख यांवरून हमीद दलवाई यांच्याप्रमाणेच अनेक मंडळी आपापल्या देशात उदारमतवादी प्रभाव वाढावा म्हणून प्रयत्नशील आहेत असे दिसते. त्यांतील कित्येक आजही तुरुंगात आहेत. सर्वजण सर्व मुद्यांवर हमीद दलवाई यांच्याबरोबर सहमत झाले असतेच असे म्हणण्याचे कारण नाही. परंतु हा उदारमतवादी प्रवाह सर्वत्र जिवंत आहे ही गोष्ट मोलाची मानली पाहिजे. नेदरलँडच्या संसदसदस्या औसाना चेरीवी, इराणच्या प्रो. फरीबा अडेहका, 'द बुक अॅन्ड द कुराण' लिहिणारे सीरियाचे मोहम्मद शहरूर, सीरियाचे धर्मनिरपेक्ष विचारवंत सादिक जलाल अल् अझम, तुर्कस्तानच्या फतुल्लाह गुलेन, इराणचे अब्दोल करीमसोरौश, पाकिस्तानचे नझीर अहमद, इजिप्तचे नोबेल पारितोषिक विजेते नगीब महफूज, इजिप्तच्या कादंबरीकार नावल एल् सादवी, व्यंजनकार फुराग फौउदा, कादंबरीकार अल् हमीद, पाकिस्तानचे अख्तर हमीद खान, इराणची लेखिका मरियम फिराैज, कुवेतचे पत्रकार फौद अल् हशेम, पटन्याचे प्रो. ए. आर. बेदर, सौदी अरेबियाचे अ. रहमान मुनीफ, बांगलादेशचे दाऊद हैदर व तस्लीमा नसरीन, पाकिस्तानच्या रिफात हसन, इंग्लंडचे सलमान रश्दी इत्यादी अनेक लोक मुस्लिम समाजात उदारमतवाद रुजवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रातही सदा-ए-निसवाँ, बोहरा सुधारणावादी, तरक्की पसंद मुस्लेमीन, मुस्लिम मराठी साहित्य परिषद, प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्स, मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन अशा अनेक संघटना कार्यरत आहेत. हमीद दलवाई संपले असे मानण्याचे काही कारण नाही. त्यांच्या मागे गेले पाव शतक मुस्लिम सत्यशोधक मंडळ व हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट काम करीत आहे, ही सामान्य गोष्ट नाही.
 हमीद दलवाई यांच्या पुस्तकाच्या वाचकांना माझी अशी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी हमीद दलवाई यांचे विचार व तळमळ नीट समजून घ्यावी. विश्व हिंदू परिषदेचे लोक अयोध्येचा प्रश्न उपस्थित करून जसे हिंदू मनाला भडकावीत आहेत तसे मुस्लिम समाजाने करू नये. पैगंबरसाहेबांचा विवाह, विविध युद्धे, करार इत्यादी अनेक मुद्यांबाबत हमीद दलवाई यांनी जरूर लिहिले आहे. याचा अर्थ असा नव्हे की त्यांना पैगंबरसाहेबांचे कर्तृत्व मान्य नव्हते. उलट त्यांच्या कर्तृत्वाबद्दल हमीद दलवाईंच्या लेखनात गौरवपूर्ण उल्लेख आहेत. तथापि कराण असो, हदीस असो अगर पैगंबर साहेबांचे जीवन असो, त्याबद्दलही उलटसुलट चर्चा करण्याची उदारता मुस्लिम समाजात निर्माण होवो, असे हमीद दलवाई यांना वाटते. अशा आत्मटीकेच्या प्रथेमुळेच ख्रिश्चन व हिंदू धर्मीयांत प्रबोधनाचे प्रवाह निर्माण होऊ शकले. तसा प्रवाह मुस्लिम समाजामध्ये निर्माण व्हावा यासाठी तर हमीद दलवाई यांनी आपले पुरे आयुष्य वेचले.
 दलवाईभाभी यांनी गेली पंचवीस वर्षे या पुस्तकाचा पाठपुरावा केला. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्या पुन्हा एकदा मनापासून म्हणतील की 'मी भरून पावले.' त्यांनी या प्रस्तावना लिखाणाचे काम, माझा अधिकार असल्यामुळे नव्हे तर, हमीद दलवाई व त्यांच्यानंतर दलवाईभाभी यांच्या स्नेहामुळेच माझ्यावर सोपवले. हे काम त्यांनी माझ्या खांद्यावर टाकले हे मी माझे भाग्य समजतो. हमीद दलवाई यांच्या प्रेरणादायी व्यक्तित्वाला नम्र अभिवादन करून ही प्रस्तावना पुरी करतो.

-भाई वैद्य

◼️

अनुक्रमणिका
१. भारतीय इस्लाम १९
२. मुसलमानांच्या धार्मिक चळवळी २७
३. पाकिस्तानची चळवळ ६१
४. भारत-पाक संबंध ८०
५. पाकिस्तानची उद्दिष्टे १०९
६. भारतीय मुसलमान १२२
७. हिंदुत्ववाद १६८
८. समारोप १८५