रुणझुणत्या पाखरा/किती तरी अशा 'राणी'
अगदी अशात मध्य प्रदेशातील लेखिका मेहेरूनिसा परवेझ यांची कथा वाचण्यात आली. त्या विशिष्ट जमातीत मोठी मुलगी वयात आली की, तिला साग्रसंगीतपणे देवीला अर्पण करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. मेहंदी चढविण्याच्या रिवाजापासून ते पहिली रात्र सजविण्यापर्यंतचे सर्व रिवाज खऱ्याखुऱ्या लग्नासारखेच. मात्र त्या रात्रीची बोली. किंमत, बाप वा मोठा भाऊ ठरविणार. प्रत्येक घरात बडी बुआ... आत्या, एखादी आजी 'अशी' असणारच. मग गावात वा मोहल्ल्यात जी सर्वात वयस्क आजी असेल, तिने त्या दोघांना खोलीत बंद करून दाराला बाहेरून कडी लावायची. त्या खोलीला बिनगजाची एक खिडकी. पहाट होत आली की पहिल्या रात्रीच्या मालकाने त्या खिडकीतून पळून जायचे. सकाळी भाचीला सुगंधी स्नान घालून मोठ्या आत्याने तिला गावाबाहेरच्या देवीला नेऊन आणायचे... गावातील प्रत्येक स्त्री-पुरूष हा धार्मिक(?), पांरपारिक विधी नेमकेपणाने पार पडतो की नाही हे पाहण्यात दक्ष असणार. कारण त्या पुण्यमय विधीत त्या व्यक्तीचाही खारीचा वाटा. मात्र पोरीच्या मनातील वादळांची दखल कोण घेणार? त्या कथेतील राणीने त्या मोकळ्या खिडकीचा उपयोग विषव्यूहातून पळून जाण्यासाठी केला. एका तरूण शिक्षकाने तिच्या भांगात सिंदूर भरून तिचा चेहरा ओढणीने झाकून 'कुलवधू' होण्यासाठी मदत केली. पण ही एक कथा. कल्पित सत्याच्या अवकाशातली. प्रत्यक्षात अशा किती 'राणी' सापडतील!इतिहास असे नमूद करतो की, भारतात पूर्वी मातृसत्ताक जीवनपद्धती होती. स्त्री उत्पादनाच्या क्षेत्रात होती. शेतीचा शोध, अन्न शिजविण्याची कला, कुटुंबाचे व्यवस्थापन यांची निर्माती तीच. मानवी विकासाच्या प्रवासात यंत्राच्या शोधानंतर ती प्रजननाच्या नैसर्गिक जबाबदारीमुळे बाजूला पडली, बीज पेरणारा पुरूष महत्त्वाचा ठरला आणि उत्पादनात, कौशल्यात व्यवस्थापनात अग्रेसर असणाऱ्या स्त्रीचे समाजात 'देहस्विनी' हे रूप रूजले. स्थिर झाले. तिचे समाजातील वा कुटुंबातील स्थान जुजबी, दुय्यम झाले. पण शेवटी जगाचा गाडा प्रत्यक्षपणे चालवणारी 'ती'च. तो 'निमित्त'. यातून निर्माण झाल्या विविध प्रथा आणि रीतीरिवाज. सुमारे पंधराशे वर्षांपूर्वीच्या दाक्षिणात्य साहित्यातून कळते की, स्त्रियांचा महत्त्वाचा व्यवसाय देहाशी जोडलेला होता. अर्थात त्यातही दोन महत्त्वाचे प्रकार. सौंदर्य आणि विद्वत्ता यांच्या भट्टीत तयार झालेले स्वतंत्र तेजस व्यक्तिमत्व असलेल्या आम्रपाली, चित्रलेखा यांसारख्या गणिका किंवा दासी गणराज्यात सर्वात बुद्धीमान रूपवती आणि विविध कलांत निष्णात असलेली तरूणी सन्मानित केली जाई. प्रतिष्ठितांचे मनोरंजन करून त्यांना राज्य चालवितांना येणार ताण हलका करण्याची जबाबदारी तिच्यावर शासन यंत्रणेने सोपविलेली असे. अशा गणिकांच्या मागे-पुढे दास/दासी यांची फौजच असे. मात्र या स्त्रियांवर देह अर्पण करण्याची सक्ती नसे, तो त्यांचा निर्णय असे. नृत्य, संगीत, वाद्यवादन यांच्याद्वारे त्या मनोरंजन करीत. अर्थातच तो त्यांचा व्यवसाय होता. कवी राजेश्वरने आपल्या काव्यात गणिकांच्या विद्वत्तेचा, त्यांच्यातील कलागुणांचा भरभरून गौरव केला आहे.
इ.स. एक हजार साली दक्षिणेतील देवालयात शेकडो देवदासी होत्या. पण मंदिराची देखभाल करणे. परिसर स्वच्छ ठेवणे या 'देवा'च्या सेवेव्यतिरिक्त समाजातील प्रतिष्ठितांचीही वेगळी 'सेवा' करावी लागे. देवदासी म्हटले की बाकी बाब कवी बा. भ. बोरकरांची 'भाविण' ही कादंबरी आठवतेच. याशिवाय मुरळी, जोगतिणी वगैरे वगैरे. चरितार्थासाठी देहप्रदर्शन, देहविक्रय करणाऱ्या अनेक स्त्रिया असत. दासीप्रथा, त्यांच्या विक्रीच्या बाजारांचे संदर्थ प्राचीन साहित्यात सापडतात. बाईचे जगणे कबंधासारखे. शिर नसलेला जिताजागता देह म्हणजे कबंध.
गेल्या काही वर्षात 'बाई' बोलू लागलीये. तरीही अजून मनावरचे गडद पडदे उतरलेले नाहीत, काही वर्षांपूर्वी स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांची बैठक होती. सांगली, कोल्हापूर भागात काम करणाऱ्या कार्यकर्तीने स्वत:बरोबर पूर्वी या व्यवसायात असलेली, बालपणी देवीला 'सोडलेली' एक महिला आणली होती. या संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर तिने हा व्यवसाय सोडला होता. अशा देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांना स्वत:च्या जगण्याचे भान देण्याचे काम त्यांच्यात जाऊन ती करू लागली होती. गप्पा मारतांना माझ्यासमोर एक प्रश्न तिने फेकला होता.
"ताई तुमी कालिजात शिकविता. तुमचं पोट, घर चालविता. आमच्यासारख्या गरिबाच्या घरात जलमलेल्या पोरींना ना शिकशन ना काही. तुमच्यासारख्या हापिसात जाणाऱ्या बाया त्यांचचं डोकं इकतात नि पैसे कमवतात. आमच्यापैकी काहींजवळ असतं सुंदर शरीर, त्यातून जवान वय. मंग आमी त्ये इकतो नि पोरा-बाळांचं, आईबापाचं पोट भरतो. फरक काय? काही तरी इकायचं नि पैसे मिळवायचे! त्यातून आपल्यात पोरग्यांसाठी नवस बोलून पोरी देवीला वाहतात. अशा पोरींना साळंत कोण घालणार?'
□