रुणझुणत्या पाखरा/पुनव...पौर्णिमा
त्या दिवशी सकाळीच मोठ्या घरून निरोप आला. आज पौर्णिमा आहे. दोघांना जेवायला घरीच बोलावलंय. मी इथे संसार मांडून जेमतेम महिना झाला होता. जातपात, विवाह जुळवण्याची पारंपरित रीत....यांच्या सीमा ओलांडून दसऱ्याला खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन केले होते. त्याच्या घरच्यांना सद्भावाने जिंकायचे एवढेच उद्दिष्ट समोर होते. शिवाय विवाहाला होकार देतांना पिताश्रींनी एकच मंत्र दिला होता.
...प्रेमात पडलं की फक्त गुणच दिसतात. संसारात सारीपाट एकदा मांडलात की मतभेद एकमेकांचे स्वभावदोष यांचाही अनुभव येईल. पण त्यावेळी शांतपणे एकमेकांना समजून घ्या आणि दोषासकट 'आपलं माणूस' म्हणून एकमेकांचा स्वीकार करा. अशा तऱ्हेचे विवाह यशस्वी होणे देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. ...आज या सर्वात्मक स्वीकाराची चाळिशी उलटून गेली आहे. पण त्यांचे शब्द ताजे आहेत.
तर, सासरच्यांचे मन जिंकायचे म्हणजे 'या' म्हटले की जायचे. हा म्हणाला थोडी लवकर जा. मदत कर. घरी पुरणावरणाचा तळणा, भज्यांसकट साग्रसंगीत स्वयंपाक झालेला होता. मी घरात शिरले तर सासूजी मोठ्या भाभीजींना सांगत होत्या.
'बिनणी, पैले बिरामणीने... रसोईवाल्या दादीजीने जिमाई दे. पछे टाबरटुबर, मोठ्याराना पुरस दे...'
त्यावेळी बिनणी, टाबरटुबर, मोट्यार शब्द कळले नाहीत 'रसोईवाल्या दादीजींना जेवू घाल... बिरामणी म्हणजे ब्राम्हणबाई' ऐवढे अंदाजाने कळले. आज कधीतरी भेटणाऱ्या नातलगांना मी मीरवाडीत सहजपणे बोलतेय हे पाहून आश्चर्य वाटते. भाभीजी मात्र हसत सांगतात 'न आवान कांई हुयो ए कालिजमा मराठी भाषाकी मास्तरणी हे. किशीभी भाषा आवेच ना?'
हळूहळू मी घरात लोणच्यासारखी मुरत गेले. आणि प्रश्नही विचारत गेले. प्रत्येक पौर्णिमेला मोठ्या घरी जेवायला जाणे, पुरणावरणाचा स्वयंपाक वगैरे सुरूच होते.
'भाभीजी, प्रत्येक पौर्णिमेला पुरणाचा वाटण्याघाटण्याचा स्वयंपाक म्हणजे घरातल्या बायकांची कंबर तोड. (तेव्हा मिक्सरचा जमाना तालुक्यापर्यंत पोचलेला नव्हता) त्यापेक्षा खीरपोळी का नाही का करू?'
'हे बघ पोरी, पुनव म्हणजे चंद्राचा पूर्ण प्रकाश. तो समद्या जगाला शांती देतो. पुरणाचा स्वयंपाक म्हंजी पूर्णान्न. आपल्या जीवनात नेहमीच आनंद नसतो. संकटच लई. तुकाराम बाप्पा काय म्हंतात? सुख पहाता जवा पाडे दुःख पर्वता ऐवढे । पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो. पूर्ण सुखाचे रुप म्हणून पुनवेला पुरण घालायचं ग! माझ्या सासूजींना शेवटची अनेकवर्षे दिसत नव्हते पण पुनवेकडे पहाण्याची नवी दृष्टी मला त्यांनी दिली. मग मलाही नाद लागला प्रत्येक पौर्णिमेचा चन्द्र आणि चांदणरात न्याहाळण्याचा. आषाढ श्रावणातला ढगांच्या मलईदार बुरख्यातून जाणवणारा तलम चन्द्रप्रकाश. तर कवी धुवांधार पावसातली काळोखी पुनव. पण त्या काळोखावरही चंदेरी हल्लक झिलई. भाद्रपदात कधी कधी गणपतींची सजावट पार भिजून जाई. पण अनंत चतुर्दशी आणि भादव्याच्या पुनवेचा ओलाचिंब प्रकाश, आश्विन पौर्णिमा बुचाच्या झाडावर उतरून आल्याची जाणीव देई. भाद्रपदातली अवस असावी त्या अंधारात गच्चीवर निवांतपणे बसून उंचउंच सरसरत गेलेल्या बुचाच्या झाडाच्या शेंड्याकडे पहावे. आश्विन पौर्णिमा त्या झाडावर उतरून वाहणाऱ्या सुगंधी प्रवाहात नाहतांना दिसेल. बुचाला कोणी अजरणीची फुले म्हणतात. पण मी मात्र त्या फुलांना आकाश मोगरीच म्हणणार!
आश्विन पौर्णिमेला शिवपत्नी गौरी 'को जागर्ति? को जागर्ति' असे विचारीत अवघ्या विश्वाला वेढून टाकते. ही पुनव सर्वार्थाने स्वत:च्या अस्तित्वाचा, भवतालचा निसर्ग, समाज, कुटुंब यांच्यामधले नाते यांचा निरामय होऊन शोध घ्या, म्हणून 'जागे व्हा' म्हणत रात्रभर फिरणारी पार्वती. ती एक पूर्ण माणूस... मानुषी. म्हणूनच शिवाला, आपल्या सहचराला प्रश्न विचारून भंडावून सोडणारी. आणि तो चुकतोय असे वाटले तर त्याच्याशी भांडणारी. त्यालाही सल्ला देणारी. अशी 'पूर्णा'.
या दिवशी मोठ्या मुलीला रात्री आई ओवाळते. हा मान ज्येष्ठ मुलाला नाही हं. कोजागिरी म्हटले की आटवलेले दूध हवेच. पावसाचे दिवस ओसरलेले. भरपूर हिरवा चारा नदी नाले वाहणारे. जनावरांनाही विश्रांती मिळण्याचे दिवस. रब्बीच्या पेरणीची तयारी किंवा पेरणी सुरू. अशा वेळी
जित्राप झुललंय,
साळूनं घातली भलरी... म्हणावेसे वाटणारच.
भारतीय जीवनरीतीने केवळ पौर्णिमेचे पावित्र्य जाणले नाही तर त्या प्रकाशात अमावस्येचा अंधारही कर्म आणि कर्तव्याने उजळून टाकण्याच्या दिशा शोधल्या. आषाढातल्या अमावस्येला दीपपूजा केली जाते. वा दिवाळीची सुरूवात धन त्रयोदशीने होते. तर अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. खरी दिवाळी तीच. लक्ष्मी, केवळ चांदीच्या नाण्यांची वा सोन्या मोहरांची नाही.
गायी म्हशी ओवाळी
गायी म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या....
□