रुणझुणत्या पाखरा/गौतम बुद्धाचा धम्म आणि धम्मावर नवा प्रकाश

 'धर्म या शब्दाचा पगडा आणि धास्ती सर्वसामान्य माणसाच्या मनावर असतेच. अगदी आजही. मग तो धर्म कोणताही असो. परंपरागत धर्म अपरिवर्तनीय नियमांनी बांधलेला असतो. या अपरिवर्तनीय नियमांचा ऐहिक जगण्याच्या संदर्भात सखोल शोध घेऊन, आजवर काही शोधकांनी धाडसाने नव्या दिशा शोधल्या. त्यांना मानणारे, त्या दिशांनी जाणारे अनुसरक मिळाले.
 इ.स. पूर्व सुमारे ६०० ते ५५० वर्षापूर्वी हिंदुधर्मातील चातुर्वर्ण्य आणि धर्मसुत्रे यांनी सर्वसामान्य माणसाचे जगणे कंटकमय केलेले होते. जखडून टाकले होते. धर्माच्या नावाने मुली देवाला अर्पण केल्या जातात, विधवा स्त्रीस जाळले जाते. हिंदू धर्माने तर स्त्री ही सर्वार्थाने दुय्यम, दासीसमान मानली होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जातीत जन्मलेल्या स्त्रियांनाही ज्ञानाचा अधिकार नव्हता. चातुर्वर्ण्याची नियमांनी बांधलेली धर्मव्यवस्था आणि निसर्गाने माणसाला बहाल केलेल्या चार गरजा - आहार, निद्रा, भय, मैथुन! त्यांच्या झटापटीतून जातींची भेंडोळी निर्माण झाली. दलितांप्रमाणे शूद्रत्वाचा शिक्का स्त्रियांच्या कपाळावर मारला. त्यांच्या ताटातही दारिद्रय, शिवाशीव टाकलेलीच होती. स्त्रियांच्या अब्रूला सतत धोका होता. ८००-१००० वर्षांपूर्वी त्यांचा महत्वाचा भाकरीसाठीचा व्यवसाय 'दासी' होणे हाच होता. रूपवती स्त्रिया संगीत, नृत्य, मनोरंजन करणारे संवाद याचे शिक्षण घेऊन वारयोशिता... स्वतःच्या इच्छेनुरूप प्रियकर निवडून त्याच्याकडून धन गोळा करणाऱ्या स्त्रिया... होत. काही नर्तिका, काही गायिका वगैरे. लाखात एखादीच बुद्धीमत्तेच्या बळावर विद्यावाचस्पती, योगिनी होत असे. कुंठित झालेल्या सर्वसामान्य विशाल बहुजनांना, गौतमबुद्धाच्या 'धम्मा' ने जगण्याची नवी दिशा दाखवली. 'धम्म' सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचरण. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत माणसामाणसांतील व्यवहार उचित ठेवावेत. असावेत. ते एकमेकांवर कुरघोडी वा अन्याय करणार नसावेत. असा 'धम्म' शासनाने साधन म्हणून स्वीकारला तर समाजात अराजक, स्वैराचार, हुकूमशाही माजणार नाही. एखाद्याने धम्माचे उल्लंघन केले तर त्याला शासन देणारा हुकूमशहा नसेल तर न्यायाधीश असेल. आणि अशा समाजात सर्वच स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतील. बुद्धाच्या धम्माच्या दोन कोनशिला आहेत. प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी. खुळया, अंधश्रद्धांना तेथे थारा नाही. आणि करूणा म्हणजे प्रेम, करूणेशिवाय माणूस जगू शकणार नाही. स्वत:ची उन्नतीही करू शकणार नाही. आणि म्हणूनच या धम्माने सामान्य माणूस उपेक्षित, निराधार, एकाकी स्त्रिया, चुका उमजलेले पश्चातापदग्ध स्त्री पुरूष यांच्या जगण्याला आधार दिला. जगण्याची... धम्मानुसार जीवन उज्ज्वल करण्याचीच ऊर्जा दिली.
 नेपाळ, थायलंड, चीन येथे मला जाण्याचा योग आला. तेथे आजही बौद्ध धर्माची पूजास्थाने... पॅगोडे... विशिष्ट शैलीत बांधलेली, आढळतात. बोधिसत्वाचे विविध आकाराचे पुतळे आहेत. ओठावरचे एक निरंकारी स्मित, जे पूर्ण चेहेरा शून्यात्मक तृप्तीने उजळून टाकते, ते पहाणाऱ्यालाही धम्माचे वेगळेपण सांगून जाते.
 गौतमाने त्याला पडणाऱ्या दोन प्रश्नांनी सतत सतावले. त्यांचा शोध घेण्यास उद्युक्त केले. व्यक्तीला होणाऱ्या दुःखाची कारणे कोणती? आणि हे दुःख नाहीसे कसे होईल? हा शोध घेतांना स्वत:तले दोष काढण्यासाठी त्यावर लक्ष केन्द्रित केले. सोनार चांदीतले कीटण काढून ती शुद्ध करतो तसे मनातील अशुद्ध विचार, वासना, द्वेष, खुशामत करण्याची वृत्ती यांचा त्याग केला. दहा स्थित्यंतरे झाल्यावर तो 'स्व' पासूनही दूर गेला. अनंतस्वरूप झाला. बोधिसत्व न रहाता बुद्ध झाला. 'धम्म'चे आगळेवेगळेपण शब्दांतून व्यक्त करण्याचे सामर्थ्य आले. लाखोंची जीवने उजळून गेली.
 गेल्या तीन/चारशे वर्षात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांनी परिसीमा गाठली होती. गळ्यात धुंकण्यासाठी मडके, रस्त्याच्या कडेने काट्याकुट्यातून चालण्याची जबरदस्ती, स्त्रियांनी पोटऱ्या उघड्याटाकून लुगडे नेसणे... शिक्षण नाही. एक अंधार यात्राच. या अंधारयात्रेत ज्ञान आणि करूणेचा प्रकाश निर्माण करणारे महापुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी हा नवा प्रकाश अंधारयात्रींच्या जीवनात निर्माण करण्यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार करून 'धम्म'वरही नवा प्रकाश टाकला. त्यांना या निमित्ताने प्रमाण करण्याऐवजी त्यांनी सांगितलेल्या धम्माचा शोध घेणे प्रकाश देणारे आहे.
धम्मावर नवा प्रकाश
 ६ डिसेंबर १९५६ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. महात्मा गौतम बुद्धांचा 'धम्म' १४ ऑक्टोबर १९५६ दसऱ्याच्या दिवशी स्वीकारल्यानंतर अवघ्या ४३ दिवसांनी त्यांचे परिनिर्वाण झाले. अर्थात त्या आधी अनेकवर्षे त्यांचे चितंन सुरू होते. बाबासाहेबांनी दलित समाजातल्या सामान्य व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचे धाडस दिले. निसर्गाने वर्ण व्यवस्था निर्माण केली नाही. ती आपमतलबी माणसाने स्वार्थासाठी निर्माण केली असल्याचा एहेसास... ठाम विश्वास त्यांनी दिला. परंतु त्याही पूर्वी सवर्ण मानल्या जाणाऱ्या अनेकांना ही समज महात्मा गांधीजींनी दिली. त्यांनी दलितांना परमेश्वराला प्रिय असणारी माणसे ...'हरिजन' असे संबोधले. अर्थात ज्यांना परमेश्वर वा ईश्वर ही संकल्पनाच मान्य नाही अशांना ..नव बौद्धांना ते आवडले नाही. पण अनेक कुटुंबे गांधीजींच्या विचारांनी भारावलेली होती. मला पहाटे चरख्याच्या लयबद्ध आवाजाने जाग येई. आई पप्पा चरख्यावर सूत कातीत असत. त्याच सुताने विणलेल्या खादीचे ते कपडे वापरीत. वयोमान व कामाच्या व्यापामुळे चरखा खुंटीला टांगला गेला. पण अखेरपर्यन्त त्यांच्या अंगावर खादीच होती. आईला जुन्या रीती नुसार अहेवमरण आले. एका गृहस्थांनी हिरवी साडी त्या सामानात आणली. ती पाहून पपांनी मला खूण केली. मी तात्काळ विनंती करून ती साडी परत केली. केवळ त्यांच्या समाधानासाठी हिरव्या काठांची शुभ्रसाडी आणली. तिच्या इच्छेनुसार मंत्रविधी न करता भडाग्नी दिला.
 राष्ट्र सेवा दल, पू. सानेगुरूजी, एस.एम.जोशी, डॉ. राम मनोहर लोहिया, बॅ. नाथ पै, जयप्रकाशजी अशा अनेकांचा प्रत्यक्ष सहवास ही माझी माहेरची मिळकत... समृद्धी. घरच अ किंवा न जातीय होते. आई हरिजन सेवा संघाची २५ वर्षे अध्यक्षा होती. मुलींच्या वसतीगृहातील होतकरू मुलींना पपा कोर्टातून आल्यावर इंग्रजी व गणित शिकवीत. पाण्यापर्यन्त सर्वांचा वावर. पण 'बाईंच्या' म्हणजे आईच्या घरात 'हात स्वच्छ धुणे' हेच सोवळे.
 त्यावेळी अनेक सवर्ण... ब्राह्मण घरांतील धुरिणांनी जातीयता नाकारली होती. हरिजन सेवा संघाचे संस्थापक काकासाहेब बर्वे हे त्यापैकी एक. त्यावेळच्या धुळे जिल्ह्यात राष्ट्र सेवा दलाच्या अनेक शाखा, जातपात न माननारी... खुले, समतोल जीवन जगणारी अनेक तरुण मंडळी होती. त्यात कोणताही अभिनिवेष नव्हता किंवा 'दलित सेवक' अशी शासकीय 'डिग्री' ... पदवी मिळवण्याचा अट्टहास नव्हता.
 डॉ. बाबासाहेब एका जातीचे नव्हे तर सर्वांचेच आधारस्तंभ होते. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष, ... सर्वधर्म, सर्वजाती, सर्व वर्ग समभाव हा घटनेचा 'प्राणबिंदू' ठेवणारे महात्मा. पाश्चात्य देशातील स्त्रियांना समतेच्या निकषावर मतदानाचा अधिकार मागण्यासाठी चळवळ करावी लागली. बाबांनी तो अधिकार आम्हाला स्त्रियांना घटनेद्वारा दिला. हिंदू कोड बिलात योग्य ते बदल होत नाहीत हे पाहून घटना समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
 धर्म मग कोणताही असो त्याच्या चौकटी दुधारी... न तोडता येण्यासारख्या कठोर बनवण्याचे काम धर्मातले धुरिणच करतात. मुळात सर्व सामान्य माणसांना संघटितपणे सुखकर, एकमेकांसह जगता यावे म्हणून 'धर्म' निर्माण झाले. सर्वांना सोयीस्कर असे नियम केले गेले. मूलत: धर्म माणसाने माणसांच्या सोयीसाठी निर्माण केला. माणुसकी, परस्पर प्रेम त्याचा पाया होता.
 हिंदू धर्मात चातुर्वर्ण्य आला त्या आधारे शेकडो जातींचे जाळे निर्माण झाले. कठोरता आली.
 "संगच्छंध्वं, संवदध्वं, संवो मनासि जानताम्..." एकमेकांची मने जाणून घेऊ आणि सामूहिकपणे उजेडाच्या... सुखसमृद्धीच्या दिशेने सुसह्य जीवन जगू अशी प्रार्थना वेदात होती. वेद अपौरूषेय म्हणजे ईश्वर निर्मित नाहीत असे सांख्य, वैशेषिक मानीत. आद्य शंकरार्चांनी हिंदू धर्माचा सखोल अभ्यास करून सामान्य माणसाला काचणारे नियम काढून नवीन रचना केली. 'ब्रहम सत्य जगन् मिथ्या' अशी मांडणी केली ती गौतम बुद्धाच्या 'जगत् शून्यं' च्या जवळ जाणारी आहे. ती करतांना त्यांनी तत्कालीन सर्वच धर्मांचा अभ्यास केला. नव्या रचनेवर बौद्धाच्या 'धम्माचा' प्रभाव होता. म्हणूनच त्यांना 'प्रच्छन्न बौद्ध' असे म्हणत.