रुणझुणत्या पाखरा/हिंदू जीवन दृष्टी: तिच्यात उमललेले चार्वाकाचे लोकायत तत्वज्ञान



 चार्वाकाचे नाव नववीत असतांना जोशी सरांकडून ऐकले. ते आम्हाला संस्कृत शिकवीत. रोज एक नवा श्लोक म्हणवून घेत आणि त्यावर त्यांची मल्लीनाथी. संस्कृत श्लोक घटवून घेतल्यामुळे वर्गातील सर्व मुलींची वाणी मात्र शुद्ध झाली.
 'ज्ञान प्राप्त करून घेणे हा सर्वांचा हक्क आहे. मात्र तो अधिकार कष्ट साध्य असतो. केवळ ब्राह्मणाच्या घरात जन्माला येऊन तो मिळत नाही. फार तर पूजाअर्चा सांगता येते. ती सांगणे म्हणजे ज्ञान नाही. ती एक दुय्यम दर्जाची कारागिरी आहे.' असे ते म्हणत आणि 'बेकंबे'चा पाढा पूजा सांगण्याच्या अविर्भावात आणि स्वरात म्हणून दाखवित. अख्खा वर्ग पोट धरून हसे.
 'हं आता दक्षणा द्या' असे म्हणत मोठ्यांदा खोऽ खोऽ हसत. नंतर डोक्यावरची काळी टोपी काढून धोतराच्या सोग्याने शेंडी राखलेल्या टकलावरचा घाम पुशित. तो एक मोहक संस्कार होता हे आज जाणवते.
 ज्ञान म्हणजे परमेश्वराचा घेतलेला शोध, जीवाशिवाचा सिद्धान्त. तो त्यांचा लाडका. रिकाम्या मडक्यातही हवा असते आणि बाहेर सर्वत्र हवा असते. मडके फुटले की त्यातील हवा बाहेरच्या हवेत मिसळून जाते. तसेच शरीर मृत होणे म्हणजे जीव ... आत्मा, परमात्म्याशी एकरुप होणे वगैरे. ते रंगून सांगत. काही नास्तिकांनी मात्र परमेश्वरच नाकारला असे सांगत त्यांनी चार्वाकाचा श्लोक तेव्हा सांगितला होता.
यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणंकृत्वा घृतं पिबेत् ।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनो कृतः।।
 जीव आहे तोवर मौज मजा करा. भस्म झालेला देह पुन्हा येत नसतो. म्हणून खा ..प्या. रिण काढून सण साजरा करा. हा श्लोक सांगतांना चार्वाक् कसा अनीतीमान होता. नास्तिक होता हे भरभरून सांगत.
 चार्वाकाच्या तत्वज्ञानाचे नेमकेपण लोकसाहित्याचा शोध घेतांना हाती आले. चार्वाक दर्शनाला 'लोकायत' म्हणतात. 'लोक' म्हणजे इहलोक. पंचेन्द्रियांनी जे प्रत्यक्ष अनुभवतो ते सत्य. 'आयात' म्हणजे आधारित. इहलोकावर आधारलेली, सर्व सामान्यांना मान्य असणारी विचारधारा. एक इहवादी, जीवनवादी तत्वज्ञान. मानवाला स्वत:च्या माणूसपणाची, निसर्गाने त्याला दिलेल्या दोन शक्तींची, ... कार्यकारण भावाचा शोध घेण्याची (विचार करण्याची), तो वाचे द्वारे व्यक्त करण्याची... जाणीव झाली आणि तो स्वत:ला 'मी कोण? मला कोणी निर्माण केले? मृत्यू म्हणजे काय? मृत्यूनंतर काय?' असे प्रश्न विचारू लागला. त्यातून तत्वज्ञानाच्या अनेक विचार धारा निर्माण झाल्या. त्यालाच आपण 'दर्शने' असे म्हणतो. एकूण नऊ दर्शने आहेत. सहा आस्तिक दर्शने आहेत. तर तीन नास्तिक दर्शने आहेत. ईश्वराचे अस्तित्व, परलोक, पापपुण्य, वेदांचे प्रामाण्य नाकारणारे नास्तिक.
 हा नास्तिक शब्दही लहानपणीच भेटला. नास्तिक म्हणजे दुराचारी, परमेश्वर न मानणारा, वागण्यात ताळतंत्र नसलेला, नीतीहीन, जेजे चांगले ते नाकारणारा समाजद्रोही माणूस ...व्यक्ती. हा अर्थ मनात स्थिर झाला.
 माझी आजी म्हणायची. "बेबीचा नवरा पक्का नास्तिक आहे. घरात देव नाहीत. पण वागायला किती चांगला. बेबीला फुलासारखा सांभाळतो. नाहीतर प्रेमाचा. विंजिनेर आहे. पण किती धाक. मोटार चालवायला शिकलीच पाहिजे म्हणून धाक आणि कोणाकडे हळदीकुंकवाला जायचं तरी धाक. जळला मेला तो धाक ...पण बेबीच्या नवऱ्यानं मला आंब्याच्या योगेश्वरीचं दर्शन मोटारीतून नेऊन घडिवलं. पण जावईबापू मंदिरात मात्र आले नाहीत हो." आणि 'नास्तिक' हा शब्द फारसा वाईट नसतो असा बारिकसा बिंदूही मेंदूत नोंदला गेला.
 लोकसाहित्याच्या शोधात देवीप्रसाद चटोपाध्याय यांचे 'लोकायत', स. रा. गाडगिळांचे मराठी भाषेतून सुलभपणे अंतरंगात पोचलेले 'लोकायत' हे महत्वाचे थांबे, टप्पे होते. शोधन कधी पूर्ण होत नाही. चिमुटभर ओंजळीत येते असे वाटते तोवर नवी दिशा खुणावू लागते. आणि तसेच झाले. दिशा उजळत गेल्या. 'हिंदु' ही जीवनदृष्टी आहे. गुरुवर्य मांडेसरांची लाडकी भूमिका. त्यादृष्टीने विविध विचारधारांना या नऊ दर्शनांना विकसित होण्यास अवकाश दिला. इरावतीबाई कर्व्यांनी Theory of Agglomeration मांडली. स्वीकार आणि समन्वयाचा सिद्धांत मांडला. आणि ती भूमिका हिंदू जीवनदृष्टीचा मध्यबिंदु आहे. या दृष्टीने चार्वाक दर्शनालाही अवकाश प्राप्त करून दिला. परंतु नंतरच्या वैदिक हिंदू धर्माची मांडणी करणाऱ्यांनी चार्वाक दर्शन नष्ट केले. चार्वाकास जाळून टाकले.
चार्वाक दर्शनाने सांगितले-
स्वातंत्र्यं मोक्षः, पारतंत्र्यं बन्धः
 सर्वश्रेष्ठ ईप्सित म्हणजे मोक्ष असेल तर स्वातंत्र्य हा मोक्ष आहे. आणि पारतंत्र्य हे बंधन आहे.
कृषिगोरक्ष्यवणिज्यदण्डनित्यादिभिर्बुधैः।
एवैरेव सदोपार्येर्भॊगान् अनुभवेद् भुविः।।
 ... शेती, गोपालन, व्यापार, नोकरी इत्यादी सदुपायांनी अर्थार्जन करून शहाण्यांनी सुख उपभोगावे.
 मुख आदि अवयवांचेक शरीरात सारखेच महत्व असते. मग वर्णभेद मानणे अयोग्यच.
वर्णक्रमः कीदृशः।
इतकेच नाही तर,
पतिव्रत्यादिसङकेतः बुद्धिदुबलैः कृतः।।
 पतिव्रत्यादि संकेत हे अत्यंत बुद्धिहीन पुरूषांनी निर्माण केले आहेत.
 मानवी मूल्यांची कदर, सामाजिक न्यायावरचा विश्वास चार्वाकांनी आम्हाला दिला.
 डेल रीप या अभ्यासकाने 'द नॅचरॅलिस्टिक ट्रॅडिशन इन इंडिया' या ग्रंथात म्हटले आहे.
 'It may be said from the available material that Charvaka holds truth, integrity, consistency and freedom of thought in the highest esteem.'
 उपलब्ध झालेल्या पुराव्यांवरून असे म्हणता येते की चार्वाकांना सत्य, एकता, सुसूत्रता आणि वैचारिक स्वातंत्र्य या तत्वांबद्दल पराकोटीचा आदर होता.
 आ. ह. साळुंखेंनी चार्वाकाला 'आस्तिक शिरोमणी' असे का म्हटले तेही पटते; नव्हे तर 'आस्तिक' या शब्दाचे नेमकेपणही लक्षात येते.