रुणझुणत्या पाखरा/जून महिना आला की



 जून महिना आला की गुरूजींची आठवण येते. त्यांच्या सहवासात घालवलेले काही क्षण पुनः पुन्हा आठवतात. त्या वेळी त्या सहवासाचे मोल कळण्याचे वय नव्हते. दहा वर्षाची होते मी. माझे वडिल स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसमधील समाजवादी गटाचे अनुयायी. डॉ. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, युसुफ मेहरअली, एस्.एम्. जोशी यांच्या विचारावर त्यांची विशेष श्रद्धा. पू. सानेगुरूजींची समाजवादावर निष्ठा. ही सर्व मंडळी व्याख्याने, बैठकीच्या निमित्ताने पश्चिम खानदेशात,...धुळे जिल्ह्यात आली की घरी येत. आमचे घर खानदेशातील समाजवादी विचारांचा दिलखुलास थांबा... अड्डा होता.
 ...गुरूजींची संध्याकाळी सभा होती. हॉलमधल्या खिडकीजवळच्या लाकडी कॉटवर ते विश्रांती घेत आडवे झाले होते. डोळा लागला होता. कॉटशेजारच्या पाळण्यात माझा सहा महिन्यांचा भाऊ झोपला होता. तो उठलाय का ते पाहण्यासाठी आईने मला पाठवले. तो उठला होता. हात पाय हालवून छान खेळत होता. त्याला उचलायला गेले तर त्याने घाण केली होती. मी दहा वर्षांची. माझ्यापाठी सोडे नऊ वर्षांनी झालेला भाऊ. मला ती घाण काढून साफ करायची किळस वाटली. मी पाळण्याजवळ गेले. घाण वास येत होता. मी जवळ ठेवलेल्या पिशवीतील जाडसर पांघरूण काढले नि त्याच्या अंगभरून टाकले. परत मधली गच्ची ओंलाडून स्वैपाकघरात येऊन खेळत बसले. पण माझे मन मला खात होते. आई गुरूजींच्या सभेची तयारी कुठवर आली हे पहाण्यासाठी गेली होती. मला चैन पडेना मी पण हॉलमध्ये गेले. तर काय...
 ...गुरूजींनी छोट्या भावाला कॉटवर ठेवले होते. जवळच्या थर्मासमधले गरमपाणी घेऊन मऊ कापडाने त्याची शी पुसून, त्याला छान पावडर लावून, लंगोट घालीत होते. त्या क्षणी मला स्वत:ची लाज वाटली. दुसऱ्या दिवशी सार्वजनिक संडास सफाईचा कार्यक्रम नागरिकांच्या सहकार्याने करण्याचे राष्ट्र सेवा दलाने ठरविले होते. त्यात मीही हिरीरीने सामील झाले. मी दहा वर्षांची होते. पण एक नवे शहाणपण मनाने गोंदवून घेतले. साने गुरूजी, राष्ट्र सेवा दल हा माझा 'प्राण' आहे असे म्हणत. त्याचे मर्म मात्र आज जाणवते.
 त्याच वर्षीची जून मधली दुसरी घटना. आम्ही मुंबईला माझ्या आजोळी आलो होतो. माझे पिताश्री मला साधना साप्ताहिकाच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले होते. साने गुरूजी तिथे होतेच. त्यांनी लहानमुलांसाठी लिहिलेल्या गांधीजींच्या गोड गोष्टींचे सापडले ते सहा भाग मला दिले. सगळ्यांशी गप्पा मारून माझे वडिल मला घेऊन परत विलेपारल्याला आले. नंतर दोनच दिवसांनी सकाळच्या दैनिकात ती दुःखद बातमी आली. पू. साने गुरूर्जीनी आपली जीवनयात्रा आपणहून संपवली होती.
 आई, श्यामच्या आईच्या गोष्ट आम्हाला सांगायची. नंतर मी ते पुस्तक स्वत: वाचले. वाचता वाचता अनेकदा डोळे भरून आले. नंतर १४/१५ च्या किशोरवयात गुरूजींनी लिहिलेले साहित्य,.. यती की पती, दुःखी, पत्री हा काव्यसंग्रह, सुधा या पुतणीस लिहिलेली सुंदर पत्रे... हाती येईल तसे वाचून काढले. पुढे मराठी वाङमयाचा अभ्यास करतांना त्यांच्या साहित्या बद्दलची समीक्षाही वाचली. साने गुरुजी हे रडके, कल्पनेच्या आधाराने 'स्यूडो' उसनी भावनात्मकता निर्माण करणारे, आभासात्मक संवेदनशील साहित्य 'पाडणारे' लेखक होते वगैरे. पण मी नेहमीच वैचारिक पातळीवर, तर्काच्या आधारे त्या समीक्षेला विरोध केला.
 'आदर्शवाद' ही स्वातंत्र्यपूर्व काळातील सद्भावी समाजमनाची श्रद्धा होती. १९६० नंतर प्रखर वास्तवाचे भान समाजाला आले. ते विविध कलांच्या माध्यमातून प्रकटू लागले
 ...आज गुरूजींना आपल्यातून जाऊन साठ वर्षे होत आली आहेत. परंतु 'श्यामच्या आईचा' ताजेपणा, त्यातल्या शब्दाशब्दांतून कुमारमनावर पडणारे संस्काराचे कवडसे आजही खूप चेतना व प्रेरणा देणारे आहेत. आणि भविष्य काळातही देत रहाणार आहेत...