रुणझुणत्या पाखरा/माहेरचा खोपा
अण्णा. संपूर्ण मराठवाड्यात वेढून राहिलेल्या बालाघाटाच्या डोंगरासारखा मजबूत सावळा बांधा. त्याहीपेक्षा कणखर आणि टणक मन. लेखणीही तशीच लखलखित. पण आतला गाभा मात्र गाभुळा. रसदार. अण्णांची तब्बेत विचारण्यासाठी स्वैपाकघरात काकू नाहीतर सुषमाकडे जायचे. पण जरा आवाजाची चाहूल लागली की, 'काय ग, शैला आलीये का?' अशी विचारणा होई. अपराध्यासारखी उंबरठ्याजवळ जाऊन मी म्हणे.
'अण्णा, काकूंकडे आले होते, तुम्ही विश्रांती घ्या.' 'अग ये, डॉक्टरनी पार पंचाईत केलीय माझी. काही होत नाही. बस' अण्णांचे बोलणे सुरू.
"द्वारकादास कसा आहे? त्याची मान कशी आहे? आमचा सबनिस काय म्हणतो? भिकाभाऊ कसे आहेत ?' माझा गोंधळलेला चेहेरा पाहून, 'अग तुमचे राखे गुरूजी.' मग योगेश्वरी शाळेतील जुनी मंडळी, मानवलोकचे काम, अशा वळणांनी गाडी जाई नि शेवटी काय वाचतेच? काय लिहिते आहेस अलिकडे?" इथे येऊन थांबे. आणि माझ्याजवळ उत्तर नसे.
गप्पांच्या ओघात स्वतः वहाणे, इतरांना वाहत नेणे, अशा ऐसपैस अण्णांना केवढी दुष्ट शिक्षा. माझ्या मनात येई पंढरपूरच्या पांडुरंगाला एकान्तवासाची शिक्षा दिली तर काय अवस्था होईल? जसा तो लेकुरवाळा तसेच अण्णाही लेकुरवाळे. मराठवाड्यातील, उभ्या महाराष्ट्रातील हजारो जणांना इथून अव्याहत पसायदान मिळे. आणि या पांडुरंगाची रखुमाईही कायम द्रोपदीची थाळी घेऊन उभी असे.
मी अण्णांच्या मायेच्या खोप्यात प्रवेश केला १९६० साली. वक्तृत्व स्पर्धा औरंगाबादेत होत्या. मी नि अशोक मोडक यांची निवड झालेली. पण बरोबर प्राध्यापक पाठवणे न परवडणारे. मग माझे वडिल म्हणाले, तू अनंतराव भालेरावांकडे जा. मी चिठ्ठी देतो. आणि मी गेले.
'अरे तू आमच्या शंकररावांची मुलगी का? वा वा बस. अग सविता...' अण्णांनी चिठ्ठी वाचून सविताला बोलावले. ती असेल दहावीत. तिला हाक मारण्यातून, तिची ओळख करून देण्यातून लेकीविषयीची अपार माया आणि अभिमान मला जाणवला होता. बाप आणि लेकीचे गहिरे नाते असते. ते शब्दांपल्याडचे असते. ते लेकींनाच उमगते.
तेव्हाचे ते मिणमिणते औरंगाबाद. डोंगरदऱ्या पार करत पोचावे तशी गाठलेली सन्मित्र कॉलनी. तिथे अण्णा भेटले. कुटुंब वत्सल. अतीव आपुलकीने भरलेला, खास मराठवाडी वळणाचा सरळसोट आवाज ऋणानुबंध जुळला. लोहियाशी लग्न करून मी मराठवाड्यात आले. त्याचे 'गॉडफादर ' बापू काळदाते पण अण्णा मात्र माझे माहेर होऊन भेटले. त्यांचे पितृवात्सल्य माझ्याही वाट्याला आले. लग्नापूर्वीच मी माहेरचा खोपा शोधून ठेवला होता.
मराठवाड्यातील पुरोगामी व्यक्तींना, चळवळींना दैनिक मराठवाडा आणि अण्णा यांचा हक्काचा आधार होता. धुळे, जळगाव, नासिक हे जिल्हे लागूनच. प्रत्येक जिल्ह्याचे घर, चूल, अंगण वेगळे. पण आमच्या मराठवाड्यात मात्र तसे नाही. परभणीकरांना लातूर, बीड आपले वाटणार तर नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबादकरांना लातूर, बीड, परभणी, हिंगोली आपले वाटणार. भलेही चुली वेगळ्या असोत. पण घर आणि अंगण एकच. या परिसरात एक 'मिळालेपण' आहे. ही मानसिक एकात्मता रझाकार विरोधी चळवळीने पक्की केली असावी. स्वातंत्र्योत्तर काळात ती टिकवून धरण्याचे काम मराठवाडा दैनिकाने, अनंतराव... गोविंदभाई, बाबासाहेब परांजपे आदींनी केली. नामान्तर चळवळीतली गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव या पुरोगामी जीवन जगणाऱ्यांनी घेतलेली भूमिका म्हणजे 'मराठवाडा' म्हणून एकमनाने लढलेल्या मनाचा प्रामाणिक कौल होता.
कितीही घाई असली तरी आंब्याला आल्यावर ते घरी येत. लिहित जा. असे सांगत. बेशरमाची झाडे, वाहत्या वाऱ्यासंगे ही सदरे लिहून मी सुरूवार केली. ह्याला ते 'द्वारकादास' म्हणत. आणीबाणीत नासिक जेलमध्ये १५०० राजकैदी होते. तिथे अण्णांची भर पडली नि अनेकांना दिलासा मिळाला. अण्णा कॅरम अप्रतीम खेळत. गोटीवरची नजर दृढ करीत. स्ट्रायकर मारता मारता ते तऱ्हेतऱ्हेचे चुटके सांगत. उर्दू शेर सांगत. अण्णा म्हणजे चालता बोलता संदर्भकोष होता. उर्दू जणू मातृभाषाच. आणि इंग्रजीवर प्रभुत्व. अण्णांच्या लेखणीला रझाकार चळवळीत धुमसणाऱ्या वादळाची धार होती. तिची अनेक रूपे. अन्यायाविरूद्ध आगीची बरसात करणारी तर कधी खाजकुयरीच्या बियांसारखी गुदगुल्या करत बेजार करणारी. कधी इतकी ऋजू की येशूख्रिस्ता समोरची मेणबत्ती उग्र वाटावी. या लेखणीवर मराठवाड्यातील लोकांनी नेहमीच प्रेम केले. 'मराठवाडा' आणि अण्णा जणू एकच.
अण्णा 'स्वातंत्र्यातल्या तुरूगंवासा' वरही दिलखुलासपणे बोलत. होमीजी तल्यारखान प्रकरणातल्या तुरूंगवासाबद्दल बोलतांना आत्मप्रौढी नसे.
'आणीबाणी' पूर्वीच आम्ही नवा रस्ता शोधला होता. रचनात्मक संघर्षाच्या भूमिकेतून धडपडणाऱ्या मानवलोकबद्दल त्यांना आस्था होती. त्यांच्या उबदार घरट्यात मलाही जागा होती. आज अण्णा नाहीत. सोबतीला आहेत त्यांच्या आठवणी. सदैव ताजी अशी ग्रंथ संपदा. आणि त्यांच्या गोतावळ्यात आपणही एक आहोत याची सुखद जाणीव.
□