रुणझुणत्या पाखरा/दिपोत्सव
इ.स. १ ते ४०० या काळात हा सण यक्षरात्री म्हणून रूढ होता. वात्स्यायनाने कामसूत्रात या सणासाठी हे नाव वापरले आहे. कनोजचा राजा हर्षवर्धनाने नागानंद नाटकात या सणाला 'दीपप्रतिपदुत्सव' असे नाव दिले आहे. हा काळ इ.स. ६०० चा. नीलमत पुराणात या सणास दीपमाला असे संबोधले असून त्याचे विस्तृत वर्णन आहे. या पुराणाचा प्रचार काश्मिरमध्ये होता. नवी वस्त्रे परिधान करणे. घर स्वच्छ आणि सुशोभित करणे, देवळे... घरे दिव्यांनी सजवणे, द्यूत खेळणे आणि भाईबंदांनी एकत्र येऊन मिष्टान्न सेवन करणे ही या सणाची वैशिष्टये वर्णिली आहेत. अल्बेरूनीने प्रवासवर्णनात या सणाचा उल्लेख केला आहे. कन्नड शिलालेखातही या सणाचा उल्लेख आहे. महमद गझनी व अफगाण राजेही हा लोकात्सव साजरा करीत असा उल्लेख आहे.
अबुल फजल याच्या 'ऐने अकबरी' या इतिहास ग्रंथात लिहिले आहे की दिवाळी हा देशातील सर्वात मोठा सण, वैश्य समाज हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करी. घरोघरी दिवे लावीत. दिवाळीचे महत्वाचे सहा दिवस असतात. वसुबारस, धनतेरस, नरकचतुदर्शी, अमावस्या-दीपपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज, वसुबारसेला गाईची पूजा करतात. गायवासरांना स्वच्छ करतात. गोठा स्वच्छ करतात. गुरांना पंचारतीने ओवाळतात. पुरणावरणाचा नैवेद्य करतात. गोठ्यातील मोकळ्या जागेत शेणाचा सडा घालून त्यावर शेणाचे गोकुळ उभारतात. गवळणी तयार करून त्यांना सजवून मांडतात. या गोकुळाला वेस असते. शेतात जाणारी, पाणी भरणारी, स्वयंपाक करणारी, बाजार मांडून बसणारी अशा गवळणी त्यात असतात. त्यांत पेंद्या असतो आणि शेणाचा बळिराजा असतो. खेड्यातील शेतकऱ्यांच्या घरात शेणाचे गोकुळ मांडून त्यात पेंद्या व बळिराजा मांडणे शुभ मानले जाते. मराठवाड्यात हे गोकुळ विधिपूर्वक मांडले जाते. पूजा करून घरदार घोषणा देते. अवकाशात आवाज उमटतात.
दहिया दुधानं भरले डेरे
स्त्रियांच्या सणांत शेणाचे महत्त्व आढळून येते. शेण हे सुफलनासाठी अत्यन्त प्रभावी खत होते. याची जाण स्त्रीला अनुभवातून आली होती. खेड्यातल्या शेणाच्या गोकुळाची जागा शहरात किल्ल्याने घेतली आहे.
धनत्रयोदशीला स्त्रियांची न्हाणी असतात. शेताशी, सर्जनाशी जोडलेल्या सर्व सणांत स्त्रियांचा सहभाग विशेषत्वाने असतो. त्या निमित्ताने घरातील सगेसोयरे एकत्र येतात. स्त्रिया आपले मन दगडी जात्याजवळ ओवीरूपाने मोकळे करतात. दिवाळीचे पदार्थ बनवायचे म्हणजे जात्याशी पहाटेपासून बसावे लागते. लेकीची वाट पाहणारी आई म्हणते-
लेकापरीस लेक प्यारी...
हिरवी नेसली पैठणी माय माझ्या लक्ष्मीनं..
धनत्रयोदशीचा दिवा नरकचतुर्दशीला घरातून फिरतो या दिवशी पुरूषांच्या आंघोळी असतात. त्यांना तेल चोळून, उटणं लावून, सुगंधी आंघोळ घालून ओवाळतात. या दिवशी घरातील घाण, दुर्गंधी दूर होवो अशी प्रार्थना करतात.
लक्ष्मी पूजनाचा दिवस सर्वात महत्वाचा या दिवशी खरी दिवाळी. लक्ष्मीचे... सुबत्तेचे पूजन. पण ही सुबत्ता येते कुठून?
माज्या बाळाला बोलते अवंदा माल झाला किती?
वाडा चढे डौलानं, माझ्या राजसाचा...
बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू. तो सत्तेने माजला त्याने देवांना जिंकून लक्ष्मीला दासी केले. तेव्हा विष्णूने वामनाचा अवतार घेऊन त्याचा नाश केला. बळीकडे तो यज्ञात याचक म्हणून गेला व तीन पावले जमीन मागितली. एक पाऊल स्वर्गात दुसरे मृत्यूलोकात तर तिसरे बळीच्या डोक्यावर ठेवले. त्याला पाताळात पाठवले. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला समाज तुझे स्मरण करील असा वर दिला. परंतु बळीचे राज्ये येवो अशी शुभेच्छा शेतकरी समाज विविध विधींतून सतत करत असतो. कारण बळी हा शेतकरी होता. आपल्याकडे शेतकऱ्याला बळीराजा म्हणत. केरळात श्रावणात ओणम् हा सण दिवाळी इतक्या थाटात साजरा होतो. अंगणात बळीचे प्रतीक म्हणून मातीचा ओटा तयार करतात. त्याभोवती रांगोळी घालतात. फुलांनी सजवतात. रात्री फेर धरून कैकद्विकळी हे नृत्य करतात. घरापर्यंत मातीची फुलांची पावले काढतात. या दिवशी पाताळात ढकलला गेलेला बळिराजा भेटायला येतो अशी समजूत आहे. पूर्वी बाली बेट भारताला लागून होते. त्याला पाताळ म्हणत. बाहेरून आलेल्या टोळ्यांनी बळिराजाला रेटत रेटत बाली बेटांत नेले. थर्स्टन नावाच्या शास्त्रज्ञाने तर ऑस्ट्रेलियातील लोकांचे व वनस्पतीचे दक्षिण भारतातील लोकांशी साम्य असल्याचे दाखवून दिले आहे.
बळिराजा शेणाचा करतात. शेणाला शुभा म्हणतात. शेण हे सर्वात उत्तम खत, या सर्व बाबींचा अनुबंध महत्वाचा आहे.
जी स्त्री भूमीस्वरूपा सर्जनतेचे प्रतीक मानली गेली. सन्माननीय मानली गेली. ती काळाच्या प्रवासात दुय्यम दासीसमान झाली, तिचे जगणे अत्यन्त दुःखमय झाले. रात्रंदिवस कष्ट करणे आणि खाली मान घालून समाजात व कुटुंबात दुय्यम दर्जाचे जिणे जगणे एवढाच तिच्या जीवनाला अर्थ उरला. तिने आपले दुःख दगडी जात्याजवळ मोकळे केले. तेवढाच तिला आधार होता.
बैल राबतो भाड्यानं, परक्याचे दारी...
पण माहेर म्हटले की तिचा जीव गलबलून जातो. भाऊबीज आली की तिचे डोळे भावाच्या वाटेकडे लागतात.
भाऊबीज महाराष्ट्रात अत्यन्त भावुकतेने साजरी होते. राजस्थान, उत्तर, मध्य प्रदेशात राखी पौर्णिमेचे वा भाई पांचचे महत्त्व ते महाराष्ट्रात भाऊबीजेचे. धावतपळत भाऊ भाऊबीजेला बहिणीचे घर गाठतोच. न आला तरी ती रागवत नाही. चंद्राला ओवाळते व भावाला आयुष्य चिंतिते. बहिण भावाचे नाते नितान्त निरामय आणि आंतरिक नात्याने ओलावलेले असते.
चंद्र आग का ओकेल काही केल्या..
भाऊ बहिणीच्या नात्यांचा ओलावा सांगणाऱ्या हजारो ओव्या महाराष्ट्रातील स्त्रियांनी रचल्या आहेत.
स्त्री घर सोडून पतीच्या घरी कायमची आली. पण त्या घरी तिला तिचे अवकाश मिळाले नाही. त्यामुळे तिच्या ओव्यात माती आणि माहेर सतत डोकावते. सासरी डोक्यावरचा पदर कपाळ झाकेपर्यंत घ्यायला हवा. ती तिची मर्यादा पण माहेर म्हणजे मोकळपणा. भाऊबीजेसाठी येणारा भाऊ पाहून ती म्हणते
खांद्यावरचा पदर डोकीवर मी झोकीला
शेताच्या बांधाला बंधुराजा मी देखिला....
□