रुणझुणत्या पाखरा/स्वप्नातून खुणावणारं मधाळ आजोळ



 उन्हाळ्याच्या सुट्टया जवळ येऊ लागत. आजीच्या सुरकुतल्या हातांनी हातावर ठेवलेला लोण्याचा गोळा नि खडीसाखर पहाटेच्या स्वप्नात येऊ लागे. आणि त्याचवेळी साखर झोपेत आई अंगावर पाणी टाकून उठवत असे.
 'उठा ताईबाई आज 'विंग्रजीचा प्येपर हाये.' तुमचा अवघड विषय. उद्या गण्या गण्या गणोबा. नि परवा. पहाटे मामाबरोबर पारल्याला निघायचंय.'
 ...उन्हाळ्याच्या सुट्या म्हणजे चहुअंगांनी भाजून टाकणारं बाभळीच्या काट्यासारखं ऊन, रोजन् रोज वाढणारं. खानदेश म्हणजे जणू कोळशाची भट्टी. त्या उन्हाची तलखी कमी व्हावी, तोंडाला चव यावी म्हणून निसर्गानेच कैऱ्या आंब्याचे दिवस या काळात नेमले असावेत. विलेपार्ले माझे आजोळ. आमच्या धुळ्याला चटकगोड रायवळ आंब्याच्या पाट्या खेड्यातून भरभरून बाजारात येत. आग्रारोडवरच्या कोपऱ्यावर बाया आंबे विकायला बसत. रुपया, आठ आणे डझनाचा आंबा घरात येई. रस रोजच लागे. पारल्याला गेल्यावर एक मामा पायरीच्या करंड्या घरात आणून टाकी. अकरा भावंडांची लेकरं त्या अवाढव्य सरस्वती बंगल्यात जमली की जणू त्या बंगल्याची लांबी रुंदी कमी होई. लपायला शेजारच्या बंगल्याच्या मागे शेताडीत उड्या मारून जावे लागे.
 सकाळी आठ वाजता गुरगुट्या भात, मेतकुटाची पंगत बसे. त्या आधी मोठ्या मामीने भल्यामोठ्या रवीने डेऱ्यात ताक घुसळुन लोण्याचा दगडी भला मोठा सट माई... आजीजवळ ठेवलेला असे. माई तो बाळकृष्णाच्या चिमुकल्या मूर्ती समोर ठेवी. आचमन करून भोवती पाणी फिरवून देवाला नमस्कार करी. डोळे उघडून आमच्याकडे पहात 'या रे पोरांनो' म्हणे. प्रसादाची खडीसाखर नि लोण्याचा चिमुकला मोठ्या सुपारी एवढा गोळा हातावर पडला की देवाला नि आजीला नमस्कार करून आम्ही गुरगुट्या भाताची वाट पहात असू. मागच्या शेताडीतल्या केळीच्या चतकोर पानावर गुरगुट्या तुपाळ भात, वर मेतकुट, डाव्या बाजूला मिठाची चिमूट नि त्या खाली लिंबाच्या खमंग गोड लोणच्याची फोड...
 दुपारी हुंदडतांना रात्री डोक्यावर पाटी घेऊन येणारा 'कुलपिऽ मल्ला ऽऽ ई' वाला आठवे. माठातून काढलेल्या पांढऱ्या पत्र्याच्या त्रिकोणी कुप्या असत. बदामाच्या पानावर आपली कुलपी तो काढून ठेवी नि धारदार चाकूने त्याच्या गोल गोल चकत्या करी. तेव्हाच बहुदा तोंडातले पाणी आवरण्याचा संस्कार आम्ही करून घेतला असावा. तरीही त्या पाण्याचा फुरका मारून अरूदादा म्हणेच 'भैय्या फालुदा...'. मग त्या बारक्या मटक्यातल्या उकडलेल्या लांबच लांब शेवया तो कुल्पीवर घाली.
 ...आज अठ्ठावन्न...साठ वर्षे उलटून गेलीत. आज आमची नातवंडं जेंव्हा त्यांच्या लाडक्या मॅगी नुडल्सचे निसटते रेशमी दोरे तोंडात घालतांनाची धावपळ एन्जॉय करतात तेंव्हा ते पाहून दूर दूर गेलेले दिवस मनात मिणमिणू लागतात..
 एक मामा मंगळदास मार्केटमधून येतांना हापुसच्या पेट्या घेऊन येई. मग रात्री जेवण झाल्यावर एक मामी आंब्याच्या फोडी करायला विळी घेऊन बसे. कितीही फोडी खाल्ल्या तरी बाठींसाठी भांडण लागेच.
 सुपर सॉनेट विमानासारखे दिवस पळत असत. मग विमानतळ दाखवायला एक मामा घेऊन जाई. माझ्या पपांची धुळ्याहून एखादी फेरी मुंबईला होईच. जुहूला घेऊन जाण्याचे लाड ते करीत. आमची दीड क्रिकेट टीम जुहूला जायला निघे. जातांना पपा बजावत. पाणीपुरीचा हट्ट करायचा नाही. कोरडी भेळ खायची. आणि नारळपाणी प्यायचं. पोचे पर्यन्त हो...हो... जुहू गाठल्यावर मात्र ओली भेळ, पाणीपुरी, नव्याने आलेले रगडापॅटीस सारे वसूल होई. नारळपाणी पोटात गेले तरी मार्केट मधून येतांनाच्या रस्त्यावरचा उसाचा रस प्यायची हुक्की पपांनाच येई. मग काय आमचीही मज्जा..
 माझी मुलंही गावांकडच्या दादाजी, दादीजींची वाट पहात. ते दोघे मोठ्या घरी उतरले तरी हर्बऱ्याच्या पेंढ्या, ऊस, भाजलेला हुळा, खमंग दाणे, हुर्ड्याची कणसं, चवदार वाळकं, ओल्या गव्हाच्या ओंब्या. शिवाय भाजलेल्या ओंब्या. आणि गुळाची ढेप घेऊन येत. सुगीची धमाल लुटायला दादाजींकडे जाण्याची ओढ त्यांनाही लागे, शेतात आठदहा बोरी, प्रत्येकाच्या बोरांची चव वेगळी. शेंगड्या बोरीची बोरं वाळली तरी चवदार लागत. गर कितीही चोखला तरी बोरीची गोडी संपतच नसे. एका बोरीची बोरं टप्पोरी आणि देखणी पण चवीला मात्र कडवट आणि आंबटढुस्स ! ... दादाजी दादीजींची वाट पहाणारे डोळे ...मन. एक दिवस माझ्या शब्दातून फुलून डोलू लागले.
गावाकडच्या आजोबांची
पहातेय मी वाट
हिरव्या कंच हर्बऱ्याच्या
पेंढ्या आणतील साठ... गावाकडच्या दादाजींची पहातेय मी वाट
मऊ मऊ सुरकुत्यांची
गावाकडची आजी
घेऊन येईल कर्डईची
मेथीची भाजी
गावकडच्या दादीजी
कधी येतील आई
घेऊन मऊचा हुर्डा
अन् सायीचं दही...?
 ...आणि आता आमच्या नातवंडांचं आजोळ? रिती, कृती बदलल्या तरी रेशमी मधाळ स्पर्श तोच. आता अत्यन्त स्वच्छ पाण्याच्या टँकमध्ये, डोक्याला प्लास्टिकची रंगित टोपी घालून पोहोण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, कंम्प्युटरचे तऱ्हेतऱ्हेचे क्लासेस, वेगाने गणिताची सोडवणूक करणारी ॲबॅकस पद्धती, आपल्या नातवंडांना हसत खेळत... धाका शिवाय हे सारं शिकता यावे म्हणून आजोबा आजी नातवंडांना आजोळी आणतातच.
 'आजोळ' ही लहान लेकरांच्या मनातली चिमुकली, गोंडस स्वप्नभूमी आहे. १९९३ च्या किल्लारीच्या भूकंपात हजारो मुले अनाथ झाली. त्या चिमुकल्यांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने प्रकल्पाचे नांव 'आजोळ' असे ठेवले होते.
 ...पिढ्या बदलल्या तरी सगळ्यांच्याच मनातले. आजोळ, रसाळ, मधाळ असते. सत्तरी उलटली तरी पहाटच्या स्वप्नातून ते येतच राहते आणि पिढ्यान् पिढ्या अव्याहत येतच राहणार!