रुणझुणत्या पाखरा/धोबीका कुत्ता
'ताई, कायम माघारी आलेली नणंद भावजयांना बोचणारच की. त्यांची वानीकिनीची दोन लेकरं, उद्या ती मोठी व्हायची. त्यांच्या शिक्षण, कपड्यालत्त्याचा खर्चा. त्यात आमची तिघांची भर कशाला? दोघं भाऊ वाड्यातच वेगळे रहातात. मोठ्याकडे माय रहाते. वडील मागेच खर्चले. ते एक परीन बरंच झालं म्हणायचं. आमी रहावं तरी कोणाकडं? गांजव्याचा अर्धावाडा वडलांनी विकला, धा एकर जमीन बी विकली तवा कुठे आम्हा तीन बहिणींना घराबाहेर काढता आलं. सोभाव चांगलाय. दोन पोरी झाल्यावर पोरासाठी हट्ट धरला नाही. माजं आपरीसन करुन घेण्यासाठी माझं मन तयार क्येलं. पन या डाळीच्या कारखान्यात आल्यापासून बाबाचं मन चळलं. बिथरलं. त्या इधवाबाईच्या नादी लागल्यात. अशात लईच माराया लागलेत. पोरींनाबी मारत्यात. पोरी हुशार हाईत. दिसाया चांगल्या हाईत. म्हणून तुमच्यापासी आले... आता भावाच्या दारात जायाला नको आन् त्यांचं मार खाणं बी नग. काम केल्यानं शरीर कमी होत नाही. दोन गोष्टी सोडून काय बी केलेलं वाईट नसतं.
...हितं तुमच्या छायेखाली इज्जतीने राहू. पोरी साळा शिकल्यात. मशीनवर कपडे शिवाया बी शिकत्याल. मंग कसं?
आणि सुमन इथेच राहिली. महिना हजार रुपये स्वयंपाकाचे. मुली धुणंभांडी करून मग शाळेत जातात. त्या चारशे रुपये कमवून आणतात. आणि सुमन संस्थेच्या मेसमध्ये काम करू लागली. दुपारच्या विश्रांतीच्या वेळी ती पेपर वाची. तिचे ते नियमित पेपर वाचणे पाहून मी एकदा विचारलेच. तिचे शिक्षण किती झालेय.
'ताई मी नववी पास आहे हो. पन शाणी झाले म्हणून बापाने त्याच्या मामे बहिणीच्या मुलाशीच माझं लगीन लावून दिलं. अनिताचा बाप पहिले चांगला वागायचा. आमाला शेतीवाडी न्हाई. पन लोकाच्या शेतात काम करी. मी पन काम करीन. अनिता जलमली. दोन वर्षांनी सुनिता झाली. दोन मुलीवर आपरीसन केलं की सात हजार रुपये मिळतात म्हणून ते केलं, म्हणत आपल्याला काळीत रान नाही. पांढरीत... गावात आहे ते पडकं मोडकं घर. लातुरात जाऊन डाळीच्या कारखान्यात काम पाहिलं. मालकाकडे मी काम करी. बरं चाललं होतं. मालकाच्या मेहुण्यानं परळीत डाळमिल काढली. मालकांनी थोडा पगार वाढवून तिथं पाठिवलं. तिथ पन चार पाच वरिसं बरी गेली. पन हाताखाली काम करणाऱ्या त्या ढालगज बाईनं काय जादू क्येली की. मला कळलं तवा लई दुक झालं. पन वाटलं पोरी मोठ्या झालेल्या. नवरा सोडून जानार तरी कुठे ? पन दारुचाबी नाद लागला. पैसे त्यातच जाऊ लागले. मग मला मारहाण कधी पैशासाठी तर कधी तिखट... मटन खाऊ घाल म्हणून. अनिताच्या मैत्रिणीच्या आईनं सवस्थेचा पत्ता दिला हिते आले.
... ताई, हितं कित्येक वरिसांनी निवान्तपना मिळतोय आता जुनी वाचण्याची हौस भागवतेय. दुसरं काय...! ...हितं माज्यासारख्या अनेक बाया येतात. त्याच्या कथा माज्या सारख्याच. ताई, बापानं पैसा खर्च करून लगीन लावून दिलं. पन पैसा कुनाला मिळाला तर सासऱ्याला. तो चार दिवसात संपला. सिकले असत्ये तर मास्तरीण तरी झाले असते. लगीन झालेल्या आडाणी बाईची गत धोब्याच्या कुत्र्यासारखी. धोबी का कुत्ता न घरका ना घाटका...!
□