रुणझुणत्या पाखरा/संक्रांत... प्रकाशपर्व
डिसेंबर अखेरच्या थंडीतच काटेरी हलव्याची याद येऊ लागते. अलीकडे पैसे टाकले की, काटेरी हलवा मिळतो. पण पंचेचाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या संक्रांतीची आठवण दर वर्षी मनातून उजळतेच. स्वतः हलवा तयार करून तो सुरेखशा नक्षीदार कागदी डब्यातून गुरुजन, मित्र-मैत्रिणींना वाटण्याचा केवढा उत्साह असे! मग एक नाक मुरडून, हलक्या आवाजातील कुजबुज पण...
'त्या मिनूच्या हलव्याला काटाच फुटला नाही. गोलमटोल ती तसाच हलवाही.'
'नुसती अभ्यासात हुशार. पण छान हलवा कुठे जमतोय? नि पोळ्यांचे तर आशिया-आफ्रिकेचे नकाशे.'
'उषीला आई नाहीये ग. पण घरचं सगळं आवरते. तिच्या हलव्याला इतके सुरेख नि नाजूक काटे आलेयत, आणि अग खसखशीवर केलाय हलवा.'
जानेवारी लागण्यापूर्वी आईमागे भुणभुण सुरू होई. छोट्या बादलीतली चिमुकली शेगडी, त्यावर स्वच्छ तवा, हलवायला दोन शुभ्र, तलम, सुती फडकी, असा जामानिमा आई... काकी... वहिनीकडून करून घ्यायचा नि मग मी हलवा स्वतः केलाय म्हणून मिरवायचे. वयाची पासष्टी गाठली की, जुन्या आठवणी गाभुळल्या चिंचेगत मिठ्ठास होत जातात आणि त्या चोखून चोखून आठवाव्याशा वाटतात...
आमच्या घरात देवघर नव्हते. आजोबा असेपर्यंत आणि पुढेही खाण्यापुरते सणवार होत. म्हणजे होळीला पुरणपोळी किंवा गणेशचतुर्थीला उकडीचे मोदक वगैरे. पण माझ्या हट्टाकरिता आईला संक्रांतीचे हळदी-कुंकू करावेच लागे. मग वस्तू पण लुटाव्याच लागत. घर समाजवादी आल्या गेल्यांचे. सदा माणसांनी बहरलेले. सगळ्यांच्या घरी जाऊन बोलावणी करण्याचा दांडगा उत्साह. एका बाबतीत मात्र आई ऐकत नसे. साखर, तांदूळ, डाळ, शेंगदाणे किंवा निवडलेल्या भाज्या या वस्तूच ती लुटायला आणी. काचेच्या वा प्लॅस्टिकच्या वस्तूंना तिचा सक्त विरोध असे. मी मोठी होऊ लागले आणि तिचे नि घराचे वेगळेपण उमजू लागले. हळदी-कुंकवाच्या वाट्या ठेवण्याऐवजी गजरा, अत्तर, तिळगुळाच्या दोन घसघशीत वड्या किंवा लाडू यावर तिचा भर असे. जिला हवे ती आपण होऊन कुंकू लावून जाई. पण मग आग्रहाने बोलावलेल्या काही महिला संकोचून पण आवर्जून येत. त्यात वडील नसलेल्या सुमनची आई असे किंवा नवऱ्यापासून दूर राहून धनसिंगला वाढवणाऱ्या परदेशीभाभी पण असत.
त्या अदमुऱ्या दह्यासारख्या तेरा चौदाच्या वयात मनात अनेक प्रश्न उगवत. हळदी-कुंकू फक्त नवरा जिवंत असलेल्या बायकांसाठीच का? वाणही त्यांनाच का द्यायचे? वाण म्हणजे काय? वसा म्हणजे काय? कालपर्यंत नवरात्रात मला आपटे आजी 'कुमारिका' म्हणून जेवायला बोलवीत. माझ्या हाताच्या मनगटावर चंदनाची उटी लावीत, मला आटवलेलं दूध देऊन फळे, सुकामेवा देत. मग त्या वर्षी मात्र मला 'कुमारिका' म्हणून का नाही जेवायला बोलावले? ...?... ?
हे प्रश्न जणू त्या काळात माझ्या मनात खोल खोल रुजले. गोंदले गेले. जणू त्यांचे आदिबंध बनले. ते मला नेहमीच सतावीत राहिले. त्यातूनच माझ्या मनाच्या दिशा उजळत गेल्या. क्षितिजे प्रकाशत गेली, विस्तारत गेली. शब्दांनाही पंख फुटून भरारण्याची ऊर्मी मिळाली.
...नवे वर्ष येतच असते. तशीच संक्रांतही येते. या संक्रांतीने सर्वांच्या मनात, लेकी-सुनांच्या मनात प्रश्नांकुरांचे काटे फुलावेत. त्या प्रश्नांची उत्तरे शोधित प्रकाशपर्वाकडे वाटचाल आपण सगळेच करुया.
□