रुणझुणत्या पाखरा/भरदुपारी घनगर्द रानात
भर दुपारीची वेळ. भवताली सागाच्या झाडांची दाट गर्दी. माथ्यावर पानपिसाऱ्याचे घनगर्द छप्पर. भवताली मंदमधुर तरंगती हवा हेलकावे घेत अंगाअंगाला गुदगुल्या करीत फिरणारी. जणू आपण पानेरी हिरव्या सागराच्या तळाशी हिरव्या गर्दीत, झुळझुळत्या लाटांचे रेशमी झेलित उभे आहोत. चार दिवसांपूर्वी इथे आलो तेव्हा आमच्या स्वागतासाठी उभा होता सागवृक्षांचा दाटीवाटीने उभा राहिलेला परिवार. डोंगराला पाठ देऊन प्रौढ, ज्येष्ठ झाडे रूंदबंद पानांवर खानदानी नर्म हासू घेऊन उभी होते. त्यांच्या पुढ्यात प्रौढ... तरूण झाडे, अदबीने उभी. साऱ्यांचेच माथे चांदण फुलांनी मोहरलेले. पायाशी उभी असलेली चिमण्या झाडांची पिलावळ.आम्ही दहा दिवस सेमाडोह मधल्या सिपना नदीकाठच्या सरकारी तंबुमध्ये रहाणार होतो. तंबू म्हणण्यापेक्षा सिमेंट, विटांचा वापर करून उभ्या केलेल्या शासकीय गोलाकार राहुट्याच. या हऱ्याबऱ्या संकुलात येतांना सिपना नदी पार करावी लागते. सिपना म्हणजे साग. साग बनातून सिपना चन्द्राकार वळण घेऊन पुढे जाते. त्या चन्द्राकारावर या राहुट्या उभ्या आहेत.
महाराष्ट्रातील लेखकांकडून कांही नवे ललित म्हणजे कथा कादंबरी कविता इत्यादी लेखन करून घ्यावे या हेतूने शासनाने या परिसरात कार्यशाळा घेतली होती. म्हणून ही निसर्गाची जवळीक डोळाभरून अनुभवता आली.
खरं तर अशा वेळी फक्त डोळेच सजीव असतात. काही लिहावं म्हटलं तर बोटं पेन हातात घेत नाहीत. तऱ्हेतऱ्हेच्या पानांचा मलमली तर कधी मखमली स्पर्श साठवण्यात मग्न होतात. खोडांचे स्पर्श कधी खरबरित तर कधी नितळ. चार दिवसानंतरच्या एका थंडगार दुपारच्या वेळी छोट्याशा चौकोनी व्हरांड्यात आले... आद्रक आणि गवती चहाची पानं घातलेल्या चहाच्या घोटांचा आस्वाद घेत काय लिहावं, असा विचार करतेच तोच भर थंडीत पाऊस सुरू झाला. पहाता पहाता पावसाचा जोर एवढा वाढला की वाटावे आभाळच दहा ठिकाणी फुटलेय. तिकडच्या लोकांना याची सवय असावी. मेस मधला एक नोकर दोन छत्र्या आम्हा देऊन गेला. येतांना न विसरता वाफाळलेला चहा आणला होता. या राहुट्यांवर उतरती छपरे आहेत. आता मात्र त्यांची टिप्-टिप् ऐकत गेल्या चार दिवसातले सुंदर क्षण आठवण्या पलिकडे हातात काहीच उरले नव्हते!!
...इथे आल्यावर पहिले दोन दिवस सिपनाच्या प्रवाहाचा घुमता नाद ऐकत, भवतालचे नीरव हिरवे निवांतपण मनात... तनात रूजवण्यातच गेले. लेखणीतले प्राण जागेनात. मग डोंगरातल्या कोरकू जमातीच्या आदिवासींच्यात फिरायचे ठरवले. मेळघाटातल्या घटांग डोंगरावर अगदी उंच टोकावर माखला नावाचे खेडे आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. म्हटलं माखल्याचा डोंगर जीपमधून चढतांना वाघोबा दर्शन देतील. पण छे!! या परिसरात पावसाळा दरवर्षीच मुक्तपणे बरसत असतो. साग, आवळा, मोह या झाडांची गर्दी असलेले भवतालचे डोंगर. पानांचे दाट झुलते पिसारे ऐल पैल पसरून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून उभे आहेत. दूरचे डोंगर भर दुपारी थेंब धुक्याची तलम ओढणी माथ्यावर ओढून नजरेवर चेटुक घालताहेत. पंचवीस तीस अंशाचा कोनात वळणार डोंगरातला रस्ता. तोही अरूंद. एका बाजूला डोळे फिरवणारी दरी तर दुसऱ्या बाजूला हिरवी भिंत. पायाशी निळ्या, पिवळ्या, पांढऱ्या, गुलाबी रानफुलांची गालातल्या गालात खुदुखुदु हसणारी गर्दी. मध्येच रानकपाशीची प्रौढ पिवळी फुलं. आमच्यातला एक जण जीप थांबवून फोटो काढी. फिल्मचे रीळ संपले तरी तृप्ती नाही. शेवटी एक जण म्हणालाच. बेट्या आपण लेखक. नजरेचा कॅमेरा कधी थकतो का? आणि संपतो का? डोळ्यातला कॉम्प्युटरवर साठवून ठेव फोटो. आठवण आली की डोळे करायचे बंद आणि चालू करायची मनातली चिरंजीव चित्रफित !!
तर माखल्यात पोचलो. ज्वारी, मक्याची छोटी छोटी शेते दिसू लागली. हे गांव मुलांच्या कुपोषणामुळे विधानसभेत गाजलेले आहे. या वस्तीत दोन घरे गवलांची... गवळ्यांची, एक घर गोंडाचे तर बाकीची घरे कोरकूची गावात सातवी पर्यन्त शाळा आहे. सहा शिक्षक रोज येत. इथे सकाळी नऊ वाजता एक बस येई. ती सायंकाळी मुक्कामाला सेमाडोहात जाई. शाळेत मुले भरपूर. मुली त्याहून जास्त. शाळेत मिळणारी खिचडी, मुलीला रोज मिळणारा रुपया यामुळे शाळेत भरपूर मुले होती.
कोरकूंचे घर अक्षरश: देखणे, उंचावरून सूर मारावा तशी उतरती, गवताची छपरे. आतले घर शेणाने भिंतीसकट सुरेख सपोत सारवलेले. वर चुन्याने काढलेली चित्रे. आणि अगदी बुटके, अडीच तीन फूट उंचीचे दार. तीन बायकांना आम्ही नाव विचारले. त्यानुसत्याच हसत होत्या. आमच्या सोबत एक आदिवासी शिक्षक होता. त्याने विचारले 'विहीइमाकृविहील्या' मग उत्तर आले.
"सुमुरती, मीरा, सांती जी"
चाळिशी ओलांडलेली स्मृती आणि तिशीतल्या मीरा व शांती. जंगलात वेगवेगळ्या मधमाशांचा मध मिळतो. परतवाडा, धारणी, अमरावतीकडचे व्यापारी येतात आणि शेरभर मधासाठी शेरभर खडेमीठ देवून जातात. जंगलात मीठ अगदी दूर्मिळ... गावचा सरपंच सोमा सांगत होता.
... आम्ही वाघाच्या डरकाळ्या ऐकायला उत्सुकलो होतो. पण ना त्याने दर्शन दिले ना जीव थिजवणारी डरकाळी मारली. मात्र दोन दिवसांपूर्वी मोरपिसांची सळसळ आणि पिसारा फुलवू नाचणारे मोर मात्र मनाला... डोळ्यांना सुखावून गेले. माकडे मात्र दोस्त बनली होती. हे सगळे आठवत असतांना पाऊस मात्र धुवांधार कोसळत होता. रात्रभर पाऊस. सागाच्या रूंद, दडस पानांवर लयीत कोसळणारा पाऊस, त्याचा घनगंभीर नाद. भवताली सुम्म शांतता. तो घुमणारा आवाज ऐकतांना मला आठवला लहानपणी ऐकलेला मंत्रजागर. शेजारच्या घरी नवरात्रात मंत्रजागर असे. सोळा वेदशास्त्री ब्राह्मण दोन गटात समोरासमोर बसत आणि वेदातील मंत्र विशिष्ट लयीत, स्वरात अगदी एकात्मपणे गात. त्या रात्री तो पाऊस माझ्या मनात मंत्रजागराची सय जागवून गेला.
... दुसऱ्या दिवशी जाग आली ती सिपनेच्या वेगवान आवाजाने. सिपनेच्या पात्राजवळ रूंद डेऱ्याचे अर्जुन वृक्ष, साग आहेत. त्यांना कवेत घेऊन उफाणत, फणफणत, फेसाळत, उंचउंच उड्या घेत ती धावत होती. चहा घेण्यासाठी वनसंकुलाच्या उपहारगृहात आलो तर कळले की पुलावरुन पुरूषभर पाणी वाहतेय. पुलापाशी जाऊन सिपनेचे उरात धडकी भरविणारे रूप पाहिले. समोरच्या तीरावर अनेकजण थांबलेले. अलिकडच्या तीरावर दूध भाजीपाला घेऊन विकायला जाणारे आदिवासी थांबलेले. हो, एक आदिवासी सांगू लागला की पाच वर्षांपूर्वी असाच पूर आला होता. तो सहा दिवस ओसरला नव्हता. हे ऐकून मात्र मन बेचैन झाले. दुसऱ्या दिवशी सुरेख ऊन पडले. वाटले आता ओसरेल पूर. बासुंदी सारखा चहा पितांना छान वाटले. पण दुपारी उपहारगृहाच्या मालकाने विनंती केली. दोनच फलके मिळतील. खडी बासुंदी भरपूर प्या. पूर यायच्या आदल्या दिवशी त्याने गव्हाच्या दळणाचे पोते सिपने पलिकडच्या सेमाडोह गावच्या गिरणीत पाठवले होते ते पलिकडे अडकले होते. प्रत्येक कोरकू... गोडाच्या घरात जाते असते. चार पैसे जास्त देऊन गहू जात्यावर दळून जाणावे तर त्याच्या जवळचे ते शेवटचे पोते होते संध्याकाळी खिचडी नि ताकाचा वरवा सुरू झाला.
सिपना डोंगरातून उड्या घेत येते. या परिसरातला पाऊस शांतवला तरी पल्याडच्या भागात धो धो पाऊस असणार. पेपर्स नाहीत. फोन बंद. मोबाईलची रेंज नाही. रात्री कंदिलांचा प्रकाश. मी ठरवून टाकलं. मिळेल ते खायचं. पानाफुलांत हिंडायचं. भवतालची नीरव हिरवाई शब्दांतून वेचायची. आमच्यात एक बॉटनीवाले मग सगळे त्यांना सतावणार! कवितांना ऊत. प्रत्येकाच्या लेखणीतले प्राण जागे झाले. आणि भरदुपारी अनुभवलेली घनगर्द रात प्रत्येकाच्या मनात, शब्दांत, डोळ्यात नोंदली नाही तर गोंदली गेली. पाचव्या दिवशी सिपनादेवी शांत झाल्या. पुलावरचे पाणी ओसरले... पण त्या वेळी मनात भरदुपारी गोंदले गेलेले घनगर्द रान आजही हिरवेगार आहे.
□