रुणझुणत्या पाखरा/सुगंधी वादळे : शुभ्रांकित निरामयता
प्रत्येक लिंबोणीच्या झाडाचा रंग असा कोवळा का दिसतोय? काल परवापर्यंत ही झाडं हिरव्यागार रंगात तांबुस अंजिरी छटा लेवून बसली होती. आणि आज चक्क चांदणरंगी झिरझिरीत अवगुंठणाने चेहेरा झाकुन घेतलेल्या स्वप्नमोहिनी सारखी का दिसत आहेत? ...त्या मागे पळणाऱ्या झाडांच्या फुलांचा किंचीत कडवट मधूर गंध. निंबवृक्षाकडे पहातांना मनात शब्दचित्रे उमटत होती. निंबाची कोवळी केशरी पाने, गूळ, बत्तासे, गोमुत्र यांच्या मिश्रणाचं तीर्थ नाही का घेतलं पाडव्याला? अर्थात गोमुत्रा ऐवजी आता पाणी घालतो आपण.दोहोबाजूंची चांदणस्वप्नांची मोहरलेली झाडं निरखण्यात दंग असतांनाच एक विलक्षण मधूर गंध अंगाअंगाला छेडून गेला. मी दचकून भवताली पाहिले. अधमुऱ्या हिरवट रंगाच्या फुलांचे शिरिषाचे ते झाड. बिस्किटी पिवळ्या रंगाच्या रूंद लांबोड्या शेंगाचे खुळखुळे वाजवीत जणू माझीच वाट पहात उभे आहे. कॉलेजच्या रस्त्यावरच्या या झाडांवर फुले कधी थव्या थव्यांनी येऊन उतरतात नि विलक्षण मत्तमंद सुगंधाची वादळे भवताली पेरीत रहातात ते कळत नाही. आणि मी भानावर येऊन हळहळत रहाते. मला फुलत जाणारे झाड पहायचे असते. खरं तर झाडाच्या पानात लपलेल्या हिरव्या रूंदबंद शेंगा पिवळ्या होतानाचा बदल मला निरखायचा असतो. आणि झाडावरच्या कळ्यांची कुलपे उघडून त्यातील रेशमी चवऱ्यांनी झुलती फुले कधी उमलतात हेही मला अगदी एकटक निरखायचे असते. गेली तीस पस्तीस वर्षे हे वेळापत्रक साधण्याचा मी मन:पूर्वक प्रयत्न करते. पण ते चुकतेच. जेंव्हा आत्मभान येते तेंव्हा झाडावर झुलत्या रेशमी चिमुकल्या चवऱ्यांचे थवे झुलायला लागलेले असतात. आणि त्या जादुई सुगंधाची भुलई अवघे अस्तित्व अदृश्य करून टाकते.
शिरिष वृक्षाच्या ओढीने मी त्याला त्याचे रोप आणायला सांगते. त्यानेही अगदी आज्ञाधारकपणे आणले. मग मृग बरसल्यावर अगदी स्वत: खणून खड्डा आम्ही ते रोवले. झाड पानांनी मोहरू लागले. झुलू लागले. पहाता पहाता सात वर्षे निघून गेली. त्या नववयसा झाडावर कळ्यांचे घोस लखडू लागले. आणि एक दिवस काही कळ्यांनी साई सुटयो म्हणत डोळे उघडले. पिस्ता रंगाच्या चवऱ्याऐवजी फिकट गुलाबी रंगाच्या चवऱ्या झुलू लागल्या. पण सुंगधी लहरींची वलये? ते मात्र 'नस्से'. निर्गंधी फुले. मग माझा वैताग. तोही हिरमुरलेला. मग जिथून ते रोप आणले ते गृहस्थ घरी भेटायला.
'मॅडम या झाडाला रेनबो फ्लॉवर म्हणतात. हे झाड चोहोबाजूंनी बहरते. वाऱ्याची लयलूट. डोळे सुखावणारा रंग बहार...
'रंग मात्र फारच मधुर राणी रंगातली अगदी हलकी छटा. असू दे असू दे' निराशा लपवी माझे आभार.
अशी ही वसंती चाहूल भवतालच्या पक्षापानांना किती सहजपणे लागत असते ना. एका संध्याकाळी तीन वर्षांपूर्वीची माझी लाडकी विद्यार्थिनी आशा वेलीमोगरीच्या फुलांचा गजरा घेऊन येते. ती पायऱ्या चढत असतांनाचा मोगरीचा घनदाट दरवळ घरभर पसरतो.
'बाई , हा गजरा, तुमच्या लाडक्या फुलांचा आणि अंधार झाला की हे सुंगधी चांदणं पहाया या' असे सांगून जाते. मला रात्रीचे वेध लागतात. वेली मोगरा क्वचितच आढळतो. हे दोन वेल थेट वरच्या मजल्या पर्यंत पोचले आहेत. एकात एक गुंतलेली हिरव्या पानाची वलयदार नक्षी. फेब्रुवारीच्या मध्यातच लक्षलक्ष कळ्यांनी लखलखून जाते. चंद्र चढणीला लागला की अक्षरश: फुलांची झुलती झुंबरे लटकू लागतात. मनाच्या कोपऱ्यातून साठलेले सारे मळ नाहीसे करून निरामयतेच्या वाटेने नेणाऱ्या निर्मल मधुर गंधाच्या पुरात आपण बुडून जातो नव्हे वाहून जातो. आणि कवितेच्या ओळी आठवतात.
मज नकळत कळते कळते
गंधातून गूढ उकलते.
त्याच्या सर्वात्मक अस्तित्वाची साक्ष आपल्या तनामनामधून पसरते. दगडातील सगुण देव न दिसणाऱ्या माझ्या सारख्या अनेकांनाही...गंधातून गूढ उकलते.
कधी वेळेवर कधी उशिरा, पण लहरी पाऊस येतो. आणि कडक उन्हाने उदासलेल्या जुईच्या... सायलीच्या वेलींवरही पहाटेचा ताजवा खेळू लागतो. सायली जुईच्या वेलीवरही कोवळ्या उन्हात न्हाऊन आलेल्या सायीच्या पांढुरक्या रंगाच्या कळ्या रूमझुमू लागतात. घनघोर पावसात...उधाणत्या वाऱ्यात चिंब भिजत, झुलमझुलत हसत रहातात. जुईची पाने नाजुक, कळ्या... फुलेही नाजुक, इतकी की, श्वासभरून गंध घेतला तर कोमेजून जावीत अशी. दिवस उतरणीला लागला की ह्या वेलीच्या कळ्यांचे डोळे उमलू लागतात.
...आठवते ३८ वर्षापूर्वीची संध्याकाळ. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आसपास राहणाऱ्या वसतीगृहातील आम्ही मुली लकडी पुलापर्यंत फिरायला म्हणून निघायचो भांडारकर रोडकडे जाणारा रस्ता सोडून पुढे आलो की जुईचे दुहेरी वळेसर विकणारी लहान मुले समोर गजरे नाचवीत चार आण्याला एक - रुपयाला पाच, ओरडू लागत. पण तेव्हां महिन्याला तीस रुपये जेवणाचे नि वीस रुपये वर खर्चाला अशी पन्नास रुपयांच्या मनीऑर्डरची वाट पहाणाऱ्या आम्हाला 'चार आणे' देणेही जड जाई.
थंडीचा काटा हवेतून बोचू लागला की वसतीगृहाच्या आवारातली बुचाची उंच उंच झाडे, लांब पुंगळीच्या दांडीवर चांदणी निवाऱ्याला यावी अशी पांढऱ्या रंगाच्या असंख्य फुला-कळ्यांच्या घोसांनी फुलून जात. पानाचे पिसारे जणू मिटवून घेतलेले, या फुलांचा धुंद करणारा मधुरगंध, झाडांचा आभाळाला भिडायला धावणारा शेलाटा बांधा आणि चांदणी रूप पाहूनच की काय कविवर्य बा. भ. बोरकरांनी त्यांना आकाशमोगरी म्हटले असावे. या फुलांचा घनदाट सडा पडतो. तो वेचायला भवतालच्या मुली आणि आम्ही सकाळीच झाडाखाली गर्दी करत असू.
दसरा दिवाळीचे दिवस येत आणि चमेलीच्या मांडवावर फुलांचे थेंब उतरून बसू लागत. टपोरे फुल. पाकळीच्या पाठीवर लालम छटा, शारीरिक प्रेमाची धुंदी आठवून देणारा त्यांचा उन्मादक गंध तरूणाईला छेडणारा. तर याच काळात कुंद कळ्यांची गर्दी होई. मंद पवित्र गंधाने आसमंताला निरामयतेचा स्पर्श देणारी कुंदाची शुभ्र फुले.
मला तेव्हाही आणि आजही एक प्रश्न सतावतो. जाईजुई, मोगरा, चमेली, निशिगंध, कुंद ही सारीच सुगंधी फुले शुभ्राकिंत का? पांढरा चाफा सुगंधी, अपवाद फक्त चांदणी फुलांचा. शुभ्राकिंत निरामयता आणि ही सुगंधी फुले यांच्यात काही आंतरिक नाते असेल का?
आज माझ्या अंगणात आकाश मोगरीचा शेलाटा वृक्ष उभा आहे. चमेली, कुंद, निशिगंध सारीच झाडे वेली आहेत. दारात 'सायलीची वेलण' नखऱ्यात उभी आहे. जुईलीची तर दोन झुडपे... बैठ्या पसरट वेली अंगणात आहेत. वेली फुलायला लागल्या की माझ्या नाती, लेकी, सुना गजरे गुंफतात. माझ्या समोर गजरा ठेवतात. तो माळायला आज डोक्यावर केस नाही पण त्या सुगंधाने पुन्हा माझ्या डोक्यावर कुरळ्या केसांची झालर झूलू लागते... आणि सुगंधाच्या वादळांत मी हरवून जाते.
□