रुणझुणत्या पाखरा/महाराष्ट्र दर्शन आणि १ मे १९६०
०१ मे १९६१ ची संध्याकाळ राष्ट्र सेवा दल कलापथकाचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा नृत्यनाट्य संगीतावर आधारित कार्यक्रम हैद्राबादला खुल्या रंगमंचावर सादर होत होता. प्रमुख अतिथी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ समोर बसलेले. अधुक्या उजेडात संत तुकाराम टाळ चिपळ्यांवर अभंग आळवताहेत.
कन्या सासुरासी जाये, मागे परतोनी पाहे
तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा
मागे पांढराशुभ्र छाया नाट्याचा... शॅडोप्लेचा पडदा. त्यावर छाया दिसताहेत. अंगावर शेला, मुडांवळ्या, नऊवारी लुगड्यातली नववधू. मागे वळून पहातेय. तिचा शेला पांघरलेला हात आर्ततेने आईकडे ओढ घेतोय. आईचा एक हात, सोडून जाणाऱ्या लेकीची समजावणी करतोय. तिच्या दिशेने दिलासा देत झेपावतोय. मंदिल बांधलेला पुढे ओढ घेणारा ताठ नवरदेव. त्याच्या उपरण्याला शेल्याची बांधलेली गाठ. ओढली जाणारी. छाया नाट्यातल्या सावल्यांचा खेळही विलक्षण बोलका. स्नेहल भाटकर किंवा शरद जांभेकरांचा भावगर्भ स्वर. शिवाशी एकरूप व्हायला आतुरलेल्या जीवाच्या मनाची तगमग.तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा
स्वामीजींच्या डोळ्यातून घळघळा पाणी ओघळत होते.
६ मे ला कलकत्त्याला प्रयोग होता. हैद्राबाद ते कलकत्ता सुमारे दीड हजारापेक्षा जास्त किलोमीटर्स चे अतंर. राजमुंडीच्या अलिकडे गोंदावरी अनेक हातांनी बंगालच्या उपसागराला भेटायला धावू लागते. या प्रवाहांवर ॲनिकट नावाचा सात किलामीटर्सचा पाणरस्ता आहे. हे प्रवाह खोल नसतात. तिथे कमी उंचीचे पूल. जमिनीवर किंचित उंच पक्का रस्ता. सायंकाळी हे रस्ते बंद केले जातात. आम्ही तिथे पोचलो तर अनेक वाहने आमच्यापुढे. संध्याकाळ झाली. आपण राजमहेन्द्रीला पोचू या हिशेबाने. जवळ खाण्यासाठी फक्त चुरमुरे अलिकडच्या लहान गावातल्या डाक बंगल्यात आमचा मुक्काम. रात्री अचानक अवकाळी पाऊस आभाळ कवेत घेऊन कोसळू लागला. सकाळी नवे संकट समोर. ॲनिकट पार उध्वस्त झालेला. ०३ मे ची सकाळ. ०६ मे ला कलकत्ता गाठायचे. कवी वसंत बापट, लिलाधर हेगडे, वर्देकाका सगळेच अस्वस्थ. इतक्यात समोरून एक माणूस तराफ्यावरून नदी पार करून आला. लगेच बापटकाका धावले. तो अधिकारी होता. त्याच्याशी विनवणीवजा चर्चा. यशवंतरावजी, काकासाहेब गाडगीळ यांची ओळख वगैरे. मग त्याने एक प्रचंड मोठा तराफा मागवला. तो तराफा. त्यावर आमची साठमाणसांची बस. त्यात आम्ही. हलायचे नाही. बोलायचे नाही या सूचना. एकदाचे आम्ही पल्याड पोचलो. राजमहेन्द्रीत उपाशी पोटांनी भरगच्च जेवून पुन्हा प्रवास सुरू. घनदाट जंगलातून. वाटेत एक भलामोठा जाडजूड पिवळा अजगर उजवीकडून डावीकडे गेला. बस बऱ्यापैकी वेगात, ब्रेक मारला तरी तो जखमी झाला. गाडीच्या ड्रायव्हरनी गाडी थांबवली. जखमी अजगर दूर जाऊ शकत नाही तो मरतोच, आणि तसेच झाले. एवढा प्रचंड अजगर पुन्हा कधी पाहणार? राणीची बाग नाहीतर सर्पसंग्रहालयात. पण ते पिंजऱ्यातले. ओरिसात महाकाय महानदीने अडवले. तिथेही तराफा नाट्य. सततचा प्रवास. पोटात न मावणारी भूक..असनसोल जवळच्या पेट्रोलपंपावर प्रत्येकी अर्धा पराठा, एक लोणच्याची फोड नि बटाट्याच्या भाजीचे दोन तुकडे यावर भूक भागवली. कलकत्ता गाठेस्तो संध्याकाळचे चार वाजलेले. पूर्वेकडे पाचलाच अंधारते. महाराष्ट्र मंडळाने सगळ्या खोल्या उघडून दिल्या. मग आंघोळी. थोडेफार खाणे. आणि ठीक ०६ ला पडदा वर गेला. त्या दौऱ्यातला तो सर्वोत्कृष्ट कार्यक्रम...
४७ वर्षापूर्वी ०१ मे १९६० ला महाराष्ट्र दर्शनचे पहिले सादरीकरण दिल्लीत झाले. सुरूवात पहाटे येणाऱ्या जागल्या... मागत्यांपासून होई. मग त्यात वासुदेव, . वाघ्यामुरळी, जोगी असत. २ तास ५० मिनिटांचा बांधीव, आखीव, रेखीव कार्यक्रम. रचना कविवर्य वसंत बापट यांची. संगीत दिग्दर्शन वसंत देसाईंचे. महाराष्ट्राच्या संस्कृती दर्शनात मंगळागौरीच्या निमित्ताने रात्रीच्या जागरणात खेळले जाणारे विविध खेळ. फुगड्यांचे प्रकार... पिंगा... खुर्ची का मिरची हा नववधूला फेरात अडकवून, तिला बाहेर न जाऊ देण्याची कसरत, सासुरवाशिणी, लेकी, वयस्क सासवा... काक्या, माम्या अशा समस्त महिलांना अंतर्बाह्य मोकळे करणाऱ्या खेळांचा समावेश असे. नाव घेण्याचा (अर्थात पतीचे) कार्यक्रम असेच. आज ते खेळ उखाणे पार अंधारात पुरले गेले आहेत.
मग एकनाथांचे भारूड, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, नामदेवांच्या अभंगाची, स्वामी समर्थांच्या दासबोध यांची चित्रमय, संवादमय दखल. पंतांच्या कवितेतील हंसांच्या क्रिडेचे नृत्यमय दर्शन. सुटुनि खग पळाला, बैसला शाल शाखे... हे नृत्य सुधाताईची चिंटुकली झेलम नि आवाबेनची माणिक करत असत. आज झेलम ओडिसी नृत्याची प्रख्यात जाणकार, अदाकार आहे. रामजोशीच्या वेशातले उमदे बापटकाका. 'सांग सखे सुंदरी कुण्या ग सुभगाची मदन-मंजिरी' या लावणीच्या ठेक्यावर नाचणारी आमची सुधाताई (वर्दे) ती नाचू लागली की लय अक्षरश: तिच्या नृत्याविष्कारातून लवलवू लागे. शाहीर लिलाधर हेगडे पठे बापुरावांचा पोवाडा सादर करीत. बैठकीची लावणी ही महाराष्ट्राची खासियत.
पाऊस वर पडतो, सख्या रे रात्र अशी अंधारी
भिजत मजसाठी तू उभा केव्हाचा दारी...
अत्यन्त करूणार्त स्वरात गाणारी लीला. अनुताई किंवा मी. महाराष्ट्रातल्या लोकनृत्यांची अधून मधून पेरणी. देव पावला देव माझा मल्हारी हे कोळीगीत. नाचणाऱ्यात रामनगरकर.भिजत मजसाठी तू उभा केव्हाचा दारी...
महाराष्ट्राला सुफलित करणाऱ्या नद्या. कृष्णा तापी, गोदावरी, प्रवरा, भीमा... त्यांची वैशिष्ट्ये अवघ्या दोन ओळीत रेखाटनारे भरतनाट्यम शैलीवर वर आधारित अतिशय देखणे नृत्य. तारपा या वाद्यावरचे आदिवासी नृत्य.
महाराष्ट्राला अस्मिता देणारे म. फुले, आगरकर, टिळक आदींची त्यांच्या विशिष्ट वाक्यांच्या अभिव्यक्तीतून झलक. केशवसुतांच्या नव्या मनूचा शिपाई' या कवितेचे समुहाने सादरीकरण. बालकवींची 'कुणी नाही ग कुणी नाही आम्हाला पाहत बाई.' ही चांदण कविता नृत्यातून सादर.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मिती झाली. कोकणातली अनेक कुणबी समाजाची मुले 'रामागडी' होऊन मुंबईत येतात. इथेच संसार थाटतात. होळी... रंगपंचमीच्या काळात ते महाभारतातली सोंगे घेऊन घरोघर फिरतात. त्यांचे बालीनृत्य सादर केले जाई. अर्धी विजार, वर चटेपटेरी बनियन, गळ्यात रंगीबेरंगी रूमाल, पायात घुगरु. हे नृत्य एकमेकांच्या हातात हात घालून गोलाकारात असते. मध्येच गोलांची दिशा बदलते. त्याची लयच अन कोकणी गीत ही त्यांची खासियत. 'गणराया पडतो पाया पडतो पाया धावत येरे मती मला देरे. येऊन सभेच्या ठाया...' हे नृत्य महाराष्ट्र दर्शनमध्ये होते आणि शेवटी गणेशोत्सव आणि लेझिम. मराठी संस्कृतीचा गाभा.
महाराष्ट्र दर्शनची सुरवात कवी वसंत बापटांच्या गर्जा जयजयकार, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा गर्जा जयजयकार' या गीताने होई.
जय वऱ्हाडचे आजोळ, जय अजंठानि वेरूळ
जय बारा मावळ बाई जावळ खानदेश सातार...
संपूर्ण महाराष्ट्राचा सांस्कृतिक आलेख संयत शब्दांतून त्यात रेखाटला होता. तर शेवटी त्यांचेच गीत.जय बारा मावळ बाई जावळ खानदेश सातार...
जय हिंद हिंद, आनंदभुवन, जय भारतवर्ष महान ॥धृ॥
हा रजत शिखरधर गिरिवर सुंदर उत्तरेस हिमवान
हे नील गगन गत चक्र सुदर्शन तळपत वरि भास्वान्
हे चन्द्रचलित जल उर्मिल सागर मंद्रगाती मधुगान...
हे गीत होई व २ तास ५० मिनिटांची सांस्कृतिक झलक संपे...
गेली अनेकवर्षे प्रत्येक महाराष्ट्र दिनी अनेक सेवादल सैनिकांच्या कलाकार... गायक... तंत्रज्ञ... यांच्या मनात महाराष्ट्र दर्शन' जागे होते. साठी ओलांडली तरी जुन्या आठवणींनी मन शहारून जाते आणि बहारून जाते.
□