रणरणत्या उन्हात तापलेला माळ. धगधगणारे जळते डोंगर. रानोमाळ भटकणारी गुरे नि माणसे. वणवण. का? भूक भागवणाऱ्या बरबड्याच्या दाण्यांसाठी! बरबडा हे दाणे देणारे रानगवत ...आगाताच्या सुगीचे १९७० साल बिनपावसाचे उलटले. पाठोपाठ १९७१ ही तसेच. १९७२ ची आशा होती. पण तेही तोकड्या पावसाचे. अवघा मराठवाडा दुष्काळाने हैराण. होरपळणारी. खंगलेली जनावरे कत्तल खान्याच्या दिशेने नेणारे उदास शेतकरी. गंगथडीचा पट्टा सोडला.तर इथून तिथून तीच तऱ्हा.
 बीड जिल्हा तर कायमचा तहानलेला. दुष्काळी. आष्टी, पाटोदा, केज, अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण परिसरातील हजारो कुटुंबांनी भाकरीसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सुरत असे रस्ते धरले. घरादाराला कडी घालून, चिरेबंदी वाडा मोकळा सोडून. देशमुख पाटलाच्या घरातल्या मध्यमवयीन बाया हळदीकुंकवाच्या निमित्ताने वलगट पांघरुन घराबाहेर पडणाऱ्या. त्या पितळी टोपली घेऊन रोजंदारीच्या कामावर, दगडमाती भरून एकमेकींना देऊ लागल्या. घरची म्हातारी कोतारी दीड दोन एकर रान.. शेत सांभाळण्यासाठी. दारात बसवली गेली.
 ...१९४७ साली आम्ही स्वतंत्र झालो. १९५२ साली जात, धर्म, लिंग निरपेक्ष समतावादी स्वतंत्र राष्ट्राची राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झाली. आमच्या हक्कांचे, अधिकारांचेक नेमके अर्थ समजून घेतांना नागरिक म्हणून कर्तव्यांची माहिती जाणून घेण्याचे भान मात्र सुटून गेले. आमच्या डोक्यात एकच समीकरण पक्के झाले. शासन हा 'देता' आणि नागरिक हा 'घेता'. जे संघटित झाले त्यांनी घेराव, मोर्चे, हल्लाबोल, उपोषण वगैरेंच्या मार्गांनी शासनाकडून जमेल तितके मिळवायचे! सामान्य माणूस मात्र आहे तिथेच. आशाळलेला आणि ओशाळलेला.
 निसर्ग आणि नियतीच्या धक्क्यांनी माणसे आतून हलतात. डोकी धावू लागतात. विशेषत: तरूणांच्या मनातली उर्जा जागी होते. फुलत जाते. आणि तसेच झाले. काही हातात हात घालून फिरणाऱ्या तरूणांना स्वप्ने पडू लागली. दगडातून झिरपणाऱ्या झुळझुळत्या पाण्याची. स्वप्ने. पण ती मृगजळ होती?
 ...एक दिवस तिघे चौघे तरूण डोंगरावरच्या एका उमाठ्यावर उभे होते. थांबत थांबत उतरत जाणारा डोंगर उतार. आणि थेट खाली पूर्व पश्चिम पसरलेली वाळूची रूंद नदी. म्हणजे पट्टा. मैलोनमैल पसरत गेलेला. तिचे नाव नीलगंगा
 मग त्या तरूणांपैकी एकाने विचारले. "भाऊ, हितं पाण्याचा थेंब नाही नि नीलगंगा कसं हो नाव या वाळूच्या पट्ट्यांचं?"
 'अवं दादा आमची आजीमाय न्हान व्हती तवा लई मोठं जंगल व्हतं म्हन हितं. ही निळाई बारमास वहायची. रातच्याला बिबठे, कोल्हे फिरायचे. बाया पहाटे पानी भराया, धुनं धुवाया जायच्या तवा दिसायचे. हरेक खेड्यातलं एखाद दुसरं जनावर, कंदीतरी सुगी राखणाऱ्या गड्याला ओढून न्यायचे. या डोंगराळ भागात पीक पिवळ्या जवारीचं आन् जवसाचं. मोठ्या जवारीची भाकर सणासुदीलाच. दुभत्या गायी म्हशी, मेंढरं लई होती. पाटील देसमुखाची घरं हाताच्या बोटावर मोजावी इतकी. एखादं बामणाचं. पुजेला तो नि मर्तिकेला तोच. एखादं मारवाड्याचं दुकान. दुकानदार नि सावकार तोच. या भागात वस्ती धनगर, हटकर, वंजारी, आन् शिवे भाईर त्यांची.' गावात राहणारा एखादा काटक म्हातारा अशी माहिती देई. मग ही तरूण पोरं त्या शब्दांमागचा शोध घेत.
 दिवस उलटतच असतात. तसे ते उलटत होते. पाऊस बऱ्यापैकी पडू लागला. पोरं उत्साहानं डोंगरात गेली. पण काय? पाणी सगळं वाहून गेलेलं. नाही म्हणायला खुरट्या गवताचे गालिचे. झाडे टवटवून जीव वाचवून उभी. निळाई कोरडाईच!
 मग दुप्पट वेगाने डोकी चालायला लागली. नवेनवे प्लॅन्स घेऊन पुण्यामुंबईकडे धाव. डोक्यातली स्वप्ने जमिनीवर उतरवायची झाली तर तल्लख, अनुभवी साथ हवी आणि पैसाही. एका ज्येष्ठ निनावी व्यक्तीने दहाएकर नाठाळ डोंगर खरेदी करायला, पैसे दिले. पाठीवर दिलाशाची थाप दिली. आणि एक नवी प्रयोगशाळा सुरू झाली. दर शनिवारी, रविवारी ही तरूण मंडळी डोंगरात जात. दगड गोटे घेऊन उतारावरच्या अरूंद घळी भक्कमपणे बंद करून टाकत. उतारावर एकाखाली एक बंद केलेल्या घळी तग धरलेल्या वाळक्या बाभळी पिंपळा भोवती खंदून आळी केलेली. चाराचे दहा, वीस...पंचवीस. पोरं आणि पोरी. गावातल्यांनाही उत्सुकता. मग तेही सामील. मग यायचा तेव्हा पाऊस आला. नि काय? ... त्या घळीतलं पाणी क्षणभर थांबत थांबत इकडे तिकडे पाहू लागलं. बाभळ पिंपळाखालची आळी टचाटच भरली. गेल्या सालपेक्षा त्या डोंगरातली हिरवळ जावळासारखी झुलु लागली. तरूणांच्या मनातले बळ दुप्पट झाले. ही आगळी वेगळी बिनभिंतीची प्रयोगशाळा चहुअंगांनी बहरू लागली. गावातला माणूस गावात राहू लागला. झाडे लावू लागला. बरबडा खाण्याऐवजी पिवळी ज्वारी, जवस, उडिद अशी आगाताची पिके घेऊ लागला, पाणी मातीत जिरू लागले. मग सामुदायिक विहिरीची कल्पना. हा प्रयोग वंसतराव नाईकांनी शासनाच्या वतीने राबवला. शेवटी चांगल्या शासकीय योजनांचं झालं तेच या प्रयोगाचे झाले. पण मुख्यमंत्र्यांच्या या योजनेने त्या धडपडणाऱ्या तरूणांच्या मनात घर केले. मग या प्रयोगशाळेची रोजगार हमी शंभर दिवस काम देणारी. मग त्यात नवी भर. ती अशी. बायांना एक तास लिहायला वाचायला शिकवायचे. अन् तो तास कामाचा धरायचा काही दिवसात म्हाताऱ्या, तरूण सगळ्या बाया अंगठा उमटवून नव्हे तर सही करून मजूरी उचलू लागल्या. जुन्या विहिरींचे झरे जिवंत होऊन झिरपू लागले. मग प्रत्येक खेड्यात धावणारी एस. टी., १० वी पर्यंत शाळा, शिकणाऱ्या.. खेळणाऱ्या मुली.. आणि २५ वर्षानंतर आज?

भिरभिरणाऱ्या पायांना
मिळालाय विसावा
उजाडणारा प्रत्येक दिवस
वाटतोय नवा
दांडातून खेळतयं झुळझुळतं पाणी
दीड दोन एकराची मालकीण
गातेय सुगीची गाणी.
 ही अशी गोष्ट. सुफळ होऊन संपूर्ण होण्याच्या दिशेचा शोध घेणारी. ती वाचणाऱ्यालाही सुफळ होवो.