रुणझुणत्या पाखरा/रंगवल्ली... रांगोळी

 पहाटेचे जेमतेम चार वाजलेले असत. पक्षांची किलबिल नुकतीच सुरू झालेली असे. पावलांचे धावते झपझप आवाज घरासमोरच्या रस्त्यावरून उजवीकडून डावीकडे अस्पष्ट होत जात. गाढ झोपेत असलेली मी टक्क जागी होई. "आई, आज नवरात्र सुरू झाले बहुदा. बघ ना एकवीरा मंदिराकडे पहाटेच लोक चाललेत. ऊठ आज आजेपाडवा आहे ना?" आईला गदागदा हलवणारी मी.
 सगळा वाडा गाढ झोपेत असे. मला मात्र शेणाचा सडा घालून रांगोळीने अंगण सजवण्याचे वेध लागत. आमच्या घरात सण उत्सव खाण्यापुरते साग्रसंगीतपणे साजरे होत. पप्पा पक्के समाजवादी होते. आईने त्या काळच्या रितीनुसार पतीच्या हाताला हात लावून 'मम' म्हणण्याची परंपरा कायम ठेवली होती. पण पहिल्या माळेच्या दिवशी ती आजेपाडवा, तिच्या वडिलांची- माझ्या दिवंगत आजोबांची आठवण म्हणून, आवर्जून साजरा करी. ज्येष्ठ सद्गृहस्थांना जेवायला बोलावले जाई. त्यांचा पिता म्हणून सन्मान केला जाई.
 घर आग्रा रस्त्यावर भर बाजारात होते. त्यामुळे अगदी एवढेसेच अंगण हातात येई. गायी दिसल्या की, शेण गोळा करण्यासाठी आम्ही मैत्रिणी धावत असू. अवघे अंगण तऱ्हेतऱ्हेच्या रांगोळ्यांनी आकंठ भरून जाई. ठिपक्यांच्या पारंपारिक रांगोळीबरोबरच, सुंदर पाना-फुलांची रांगोळी, मध्यभागी अदृश्य उभी रेषा कल्पून दोन्ही बाजूंनी अगदी तंतोतंत समान आकृती काढण्याचा प्रयत्न केलेले फ्री हँड... नंतरची प्रत्येक सकाळ रांगोळीची, घर सजावटीची असे ती थेट, देव दिवाळीपर्यंत. त्या उमलत्या वयात सण-व्रते, उत्सव त्यातला स्त्रियांचा भरभरून उत्साह हे संपन्न सांस्कृतिक ठिपके माझ्या मनात कायमचे उमटले आणि कदाचित त्यातूनच लोकव्रते, लोकोत्सव, लोकसाहित्य, त्यातील स्त्रियांचा सहभाग हा विषय मी शोधनासाठी निश्चित केला आणि लक्षात आले की स्त्रीप्रधान व्रतोत्सवात रांगोळीला विशेष महत्त्व आहे. तामिळनाडू, आंध्र, केरळातील अंगण आजही मोकळे नसते. पहाटे उठून स्त्रिया ते बहरवून टाकतात. दिवसभर ते स्वागतशील असते. सणासुदीला महाराष्ट्रातले काहींचे अंगण सजते. पण रोज सकाळी सजणारे अंगण आज हरवत चाललेय.
 रंगवल्ली ही एक चौसष्ट कलांपैकी महत्त्वाची कला मानली आहे. तिचा उगम धर्माच्या अनुबंधातून झाला असावा. ती मूर्तिकला वा चित्रकलेच्याही पूर्वीची आहे असे मानले जाते. कोणत्याही मांगलिक कृत्यात रंगवल्ली आवश्यक असते. ही प्रथा भारतभर आहे. भोजनाची तृप्ती वाढावी, वातावरण निर्मिती आणि शुभंकर म्हणून रांगोळी काढली जाते. 'प्रतीक' हा रांगोळीचा आधार आहे. रंगवल्ली... रांगोळी ही जणू सांकेतिक भाषाच होती. स्वस्तिक, सूर्यचंद्र, नागयुग्म... अशा अनेक आकृती विविध भावबंध दर्शविणाऱ्या असतात. रांगोळीसाठी तांदुळाची पिठी, गारगोटीचे पीठ यांचा वापर केला जातो. मात्र केवळ पांढरी रांगोळी काढणे अशुभ मानले जाते. त्यात गुलालं वा कुंकवाचा वापर आवश्यक मानला जातो.
 रांगोळीचे आकृतिप्रधान व वल्लरीप्रधान असे दोन भेद आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात आकृतिप्रधान रांगोळ्यांचे प्रकार आढळतात. बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू वगैरे भागात वल्लरीप्रधानता लोकप्रिय आहे. भारताच्या प्रत्येक प्रांतात रंगवल्लीचे नाव आणि आकृतिबंधही वेगळा आहे.
 दहाव्या शतकातील नलचंपू या ग्रंथात उत्सवप्रसंगी घरासमोर रांगोळी काढण्याचा उल्लेख आहे. हेमचंद्राने बाराव्या शतकात लिहिलेल्या 'देशीनाम माले'त तांदळाची पिठी वापरण्याचा उल्लेख आहे. त्याच शतकातील सोमेश्वराच्या मानसोल्हासात 'धुलिचित्र' या नावाने तर श्रीकुमाराच्या 'शिल्परत्नात' 'क्षणिक चित्र' असा रांगोळीचा उल्लेख आहे. ही कला किमान दोन हजार वर्षांपूर्वीची असावी. जैन आणि पारशी धर्मांतही रांगोळी अशुभ निवारक मानली जाते. हादगा व भुलाबाई हे महाराष्ट्रातील कुमारिकांचे लोकोत्सव तर सांझी हा मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशातल्या काही भागात खेळला जाणारा लोकोत्सव. त्यात सांत्या (स्वस्तिक) सप्तर्षी, केळीचे झाड, म्हातारा म्हातारी, अष्ठपाकळ्यांचे कमळ वगैरे प्रत-आकृती पारंपारिक शैलीत काढल्या जातात.
आजही अंगणात रांगोळी काढून देवीचे स्वागत करताना गृहिणी गुणगुणते

साजिरे अंगण, शेणाने सारविले ।
वर रेखिते मी रंगावली ॥
घरी ये ग योगेश्वरी ।
तुझ्या सोन्याची पावली ॥
भांग भरते मोत्यानं; कुंकू कपाळी भरते ।
नव्या धानाचे तुरे मी, तुझ्या तोरणा बांधते ||