रुणझुणत्या पाखरा/अक्षरांना अर्थ देऊन
'आम्ही आहोत महा-तारे,
आम्ही नाही म्हातारे'
'ज्येष्ठांचा सन्मान करा'
आपल्या ज्येष्ठत्वाचे नारे देत एक समुदाय रस्त्याने जात होता. त्यात निवृत्त अधिकारी, तंत्रज्ञ, विविध विषयांचे प्राध्यापक, अध्यापक, श्रम केल्याशिवाय पोटाला भाकर मिळणे दुरापास्तच असे थकिस्त श्रमिक, निवृत्त व्यावसायिक... असे अनेक होते. महिला होत्या. निवृत्त परिचारिका, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या. पण महिलांच्यात सर्वाधिक संख्या होती एकाकी, वृद्ध, निराधार बंदिनींची.
ज्येष्ठ नागरिक संघ आणि एका स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सहभागी होताना मनात उद्याची आशा होतीच. कारण आयोजनात अनेक तरुण-तरुणी होते. 'आहे रे' या वर्गात समावेश असलेल्यांच्या मनात 'नाही रे'ची झोळी ज्यांच्या हाती आली आहे, अशांसाठी काही रचनात्मक कार्यक्रम राबविण्याची उमेद होती. त्यांनी संकल्प सोडला. हे सारे जसे व्हायला हवे तसे झाले पण तरीही माझ्या मनाला एक वेदना चिरत गेली...
भारतीय जीवनरितीच्या गाभ्यात ज्येष्ठांचा सन्मान ही भूमिका मूलतःच आहे. महानुभाव पंथाची आद्यकवयित्री महदंबा ज्ञानी होती. तिच्या संदर्भात गोविंद प्रभू म्हणत 'म्हातारी चर्चक: काही तरी पुसतचि असे ।' जी व्यक्ती सतत चर्चा करणारी, एखाद्या विषयाचा शोध घेणारी असते तिला 'म्हातारी वा म्हातारा' म्हणण्याचा प्रघात होता. वृद्धत्व अनुभवाच्या समृद्धीचे प्रतीक असते. मग आजच्या विज्ञानमय युगात ज्येष्ठांना आमची 'दखल' घ्या असे म्हणण्याची वेळ का यावी? वैज्ञानिक शोधांमुळे माणसाची आयुमर्यादा सतत वाढते आहे. वृद्धांचे जगणे दीनवाणे होऊ नये यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था विविध प्रकल्पांद्वारे प्रयत्न करीत असतात. पण तरीही, वृद्धांनी संघटितपणे 'वृद्धत्व' सर्वार्थाने समृद्ध कसे होईल याची दिशा शोधायला हवी. प्रख्यात शिक्षणशास्त्रज्ञ वि. वि. चिपळूणकर यांनी 'पसायदान' ही अभिनव कल्पना मांडली. विविध खात्यांतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांजवळ त्या त्या विषयांचे ज्ञान आणि अनुभव असतो. त्याचा लाभ तो सर्वांना देऊ शकतो. एखादा निवृत्त कर्मचारी वृद्धांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ वृद्धांना मिळवून देऊ शकतो.
'वृद्धत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे' या केशवसुतांच्या ओळी आपल्याही अनुभवाला येतात. काही दिवसांपूर्वी एका गृहस्थांचे पोस्टकार्ड आले. ते आणि त्यांचे तीन मित्र काही स्वयंसेवी संस्थांचे काम पाहावे यासाठी येणार होते. अक्षर अत्यंत सुरेख. नेटके. त्यातून वयाची थरथर जाणवत होती. नळदुर्गचे 'आपलं घर', अथणी येथील ज्ञानप्रबोधिनिचा प्रकल्प व अंबाजोगाई येथील 'मानवलोक-मनस्विनी' या प्रकल्पांना ते भेट देणार होते. वृद्धत्वातही काही नवे निरखून, नव्यांच्या माथ्यावरून हात फिरविण्याची, मदत करण्याची ऊर्जा चैतन्य देणारी होती आणि ते आले. "काका, काही वर्षांपूर्वी काकूंचे निधन झाले. त्यानंतर केले जाणारे धार्मिक कर्मकांड टाळून तुम्ही मदत पाठवली होती. काकूही शिक्षिका होत्या. दर वर्षी आम्ही तुम्हांला वार्षिक अहवाल पाठवतो. या वयात, मुंबईहून इतक्या दूर... त्यापेक्षा तिथूनच..."
"अगं ज्या संस्था मी वर्तमानपत्रांतून पाहिल्या, ज्यांच्याशी विचारांचे नाते जोडले. त्या डोळे मिटण्यापूर्वी प्रत्यक्ष पाहाव्यात, त्यांना शुभेच्छा द्याव्यात. समविचारी वृद्धांना त्यांची ओळख करून द्यावी, असे मनोमन वाटले. मी ८८ वर्षांचा झालोय. हा माझा पन्नाशीतला पुतण्या. त्यालाही नवी वाट दाखवायला हवी. थांबला तो संपला," काकांनी माझे बोलणे मध्येच तोडून खणखणीत आवाजात पासष्टी ओलांडलेल्या मानसकन्येला बजावले.
बाबा आमट्यांवर उधळून प्रेम करणारा माझा मित्र काही दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून सांगत होता, "अगं, बाबांना ब्लड कॅन्सर असल्याचे कळले नि सरळ नागपूर गाठले. तर बाबा निवांत. अरे मी इतक्यात जात नाही. माझी दोन कामं राहिली आहेत. ती पूर्ण व्हायलाच हवीत. मी ४-६ दिवसांनी वरोऱ्याला जाईन तेव्हा तू मला समोर हवास."
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे शिक्षणमहर्षी बाबासाहेब परांजपे यांची जन्मशताब्दी नुकतीच झाली. निजामशाहीत होरपळणाऱ्यांना लढवय्या सैनिकांची अधिक गरज आहे हे ओळखून हिप्परगा येथील अनंतराव कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय विचारांच्या शाळेत बी. एस्सी. झालेले बाबासाहेब शिक्षक म्हणून गेले आणि निजामाविरुद्ध आंदोलनातील तरुण मनांना वाणीने चेतावणारा या लढ्यात झोकून द्यायला प्रवृत्त करणारा तरुण तेजस्वी वक्ता ही ओळख त्यांची मराठवाडाभर झाली. निजामाने त्यांनाही मृत किंवा जिवंत पकडून आणण्यासाठी दहा हजार रुपयांचे इनाम ठेवले होते. मराठवाडा १७ सप्टेंबर १९४७ रोजी मुक्त झाला. बाबांनी शिक्षणाद्वारे ज्ञान, विज्ञान, राष्ट्रनिष्ठा, सर्वधर्म समभाव, जातीविरहित समाज रचनेचे संस्कार करणाऱ्या शाळा, महाविद्यालये सुरू केली. धनिकांना त्यात सहभागी करून घेतले आणि संसारही थाटला, तोही जात परंपरांच्या सीमा ओलांडून. अत्यंत साधेपणाने आयुष्य शिक्षणासाठी समर्पित केले. पंचवीस वर्षांपूर्वी त्यांचा अमृतमहोत्सव अंबाजोगाईत झाला. बाबा आणि सिंधूताईंनी मला एक आगळे चिरस्वरूचपी माहेर दिले. त्या समारंभात मी सहजपणे माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या. ते शब्द केवळ बाबांचे न राहता अनेक ज्येष्ठ प्रेरकांसाठी आहेत.
अक्षरांना अर्थ देऊन श्वास प्रेरित चालणे
अमृता वोल्हाविती ही समर्पित जीवने...
□