श्रावण अगदी अंगणात नाही तर उंबऱ्यावर येऊन ठेपतो आणि अनेकांच्या, अगदी ऐंशीच्या उंबरठा पार केलेल्यांपासून ते नुकतीच पंचविशी ओलांडलेल्यापर्यंतच्या मनात आपोआप उमटू लागतात ओळी...

श्रावणमासी, हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहींकडे ।
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात फिरुनी ऊन पडे ।।

 आणि ही ताजी हिरवळ तनामनात झुळकू लागते. गैरसमजांचे काळे ढग कमी होऊन स्वच्छ निरभ्र ऊन पडते. अशा वेळी माहेरच्या आठवणीचे शहारे अंगभर लहरू लागतात. ओठांवर चव घुटमळू लागते आईच्या हाताच्या खांडवीची. नागपंचमीला तवा चुलीवर ठेवायचा नाही ही परंपरा. देशावर पुरणाची उकडलेली दिंडं करतात, तर कोकणात तांदळाचा रवा साजूक तुपावर भाजून, त्यात गुळाचे पाणी घालून केलेला शिरा. थाळ्याला तूप लावून अलवार हाताने पसरवायचा. वर ओलं खोबरं, वेलचीची पूड, बदामाचे काप घालून चौकोनी रेशमी वड्या पाडायच्या. भेंडीची भाजी, सोलकढी, गरम वाफेचा भात, नारळाची चटणी नि खांडवी असा बेत आजोबा असेपर्यंत घरी होईच. मी खांडवी करते; पण ती तोंडात घोळणारी नि रेशीम स्पर्श असे काही जमत नाही.
 नागपूजा अत्यंत प्राचीन आहे. तैत्तिरीय संहितेत, पुराणांत नागाचा उल्लेख आहे. विष्णूचे आसन शेषनाग, तर शिवाच्या गळ्यात नाग. जैन धर्मात नागाचा उल्लेख आहे. बुद्धाच्या जन्मानंतर नंद उपनंद या नागांनी त्याला स्नान घातले असा उल्लेख आहे. सिंधू नदीच्या परिसरात प्रत्येक गावात नागमूर्ती होत्या. बौद्ध काळात ब्राह्मण नागपूजा करीत असत. चिनी प्रवासी ह्युअेनत्संगने नोंदवून ठेवले आहे. सौराष्ट्र, उत्तर प्रदेशात चंबा, कांगडा खोरे, काश्मीर येथे गावागावांतून नागमंदिरे आहेत. तक्षशीलेचे राजे नाग होते. अश्वमेध यज्ञात लोहितावादी आणि बायस या नागांचे पूजन करावे असे सांगितले आहे. हिमालयात शेषनाग, अनंतनाग, संतनाग, इंद्रनाग यांची देवळे प्रसिद्ध असून चिनाब नदीच्या तिरावर वासुकीचे मंदिर आहे. काश्मीरचे राजे कर्कोटकाच्या वंशाचे आहेत असे राजतरंगिणी हा काश्मीरच्या वंशाच्या इतिहासाची प्रत्यक्ष नोंद असलेला ग्रंथ नोंदवितो. केरळमध्ये नायरांच्या घरात काउस नावाचे छोटे सर्प मंदिर असते. नागाला ते कुलदैवत मानतात. बंगालमध्ये नागमंडळ हा नृत्यप्रकार प्रचलित आहे. महाराष्ट्र, छत्तीसगडमध्ये श्रावणात नागपूजा करतात. पंजाबमधील सफदोन या गावी जनमेजयाने सर्पसत्र केले या समजुतीने विशेष नागपूजा केली जाते.
 नागांचे पाताळात स्वतंत्र जग आहे अशी कल्पना भारतात रूढ आहे. नागकन्या विलक्षण देखण्या असतात. पृथ्वीवरच्या सुंदर, पराक्रमी पुरुषांवर भाळतात. त्यांना नागलोकात नेतात असा कल्पनाबंध अनेक लोककथांतून येतो. अर्जुनाची एक पत्नी उलुपी ही नागकन्या होती. शेष हा नागराज; तो कामवासनेचे प्रतीक मानला जातो. या संदर्भातली एक लोककथा. द्रौपदी ही पाच पतींची पत्नी. तिला आळीपाळीने एकेकाकडे जावे लागे. या गोष्टीचे एक स्त्री म्हणून तिला अत्यंत दुःख असणारच. या वर्मावर दुर्योधन तिला एकटीला गाठून 'आज कुणाची पाळी?' असे विचारून बोट ठेवत असे. हे दुःख ती कोणाजवळ बोलून दाखवणार? एक दिवस तिने आपले मन श्रीकृष्णाजवळ मोकळे केले. श्रीकृष्णाने द्रौपदीस सांगितले. 'आज शेषाची नव्हती' एवढेच उत्तर दे. दुर्योधनाने पुन्हा हा प्रश्न विचारला नाही. दुर्योधनाच्या पत्नीचा उपभोग घेण्यासाठी शेष येई अशी जांभुळख्यानांसारखी कथा लोकवाङ्मयातून मिळते. नाग वा सर्प कामवासनेचे प्रतीक मानले जाते. कटनर या मानववंश शास्त्रज्ञाने सर्प हे सुफलीकरणाचे प्रतीक मानले आहे.
 नागपंचमी हा श्रावणातला सण सुफलीकरणाशी जोडला आहे. नाग हा क्षेत्ररक्षक मानला जातो. वारुळाची माती सर्वांत सुफल, संपूर्णत्वाने भरलेली असते. भूमीच्या सर्जन क्षमतेचे प्रतीक वारूळ तर नाग हे पुरुषत्वाचे... पुरुषत्वाचे प्रतीक हा कल्पनाबंध भारतीय मनात रुजलेला आहे. नागाची विजेसारखी नागमोडी, वेगवान चाल त्याचे लखलखीत तेज. त्यानंतर भूमीला सहस्रधारी भिजवणारा पाऊस त्यानंतर फुलणारी हिरवी किमया.
 ज्येष्ठ -आषाढात शेतकरी, शेतकरणी शेतीची मशागत आणि पेरणीच्या धांदलीत गुंतलेले असतात. श्रावणात थोडी उसंत मिळते. अशा वेळी निवांतपणे थकवा दूर करण्याची, मनमोकळे करण्याची हक्काची जागा माहेरच. महाराष्ट्रात नागपंचमी आणि माहेर यांचा अतूट अनुबंध आहे.
 बंधूच्या रूपाने नाग आमच्या भावजीवनात स्थिर झाला आहे. त्याच्या विषयीचे भय वाटतेच. ते दूर करण्याची ही सांस्कृतिक रीत. पेरलेले बियाणे उंदरापासून वाचवणारा तोच, नागपंचमी केवळ भावनिक, सांस्कृतिकच नव्हे तर जातीय सलोख्याचे रूप. ही आहे पंचमी आधी ४-५ दिवसांपासून महिला एकत्र येऊन फेर धरतात, गाणी म्हणतात. त्यातून माहेरची ओढ आणि सासरचा त्रास या बद्दल मनमोकळं करतात.

बारा सणाला नेऊ नकोस
पंचमीला रे ठेवू नको...

मैत्रिणींना साद घालताना त्या म्हणतात,
वाण्या-बामणाच्या लेकी
वारुळाला येता का कुणी?
साळ्या कोष्ट्याच्या मुली
वारूळाला येता का कुणी?
लेकीच्या भेटीला आसुसलेली माया लेकाला विनवते
आली वर्साची पंचमी
जारे सुभाना बाळा
जारे बाळाई बोलावू
लोकाच्या लेकी माहेरात
आमची बाळाई सासरात
सासरी बहीण मनोमनी साद घालते,
पंचमीचा सण नागोबा वेगीला
मुऱ्हाळी यावा मला,
पाठी भाऊ मागितला...

वेडाबागडा भाऊ बहिणीला असावा
चार आण्याची चोळी एका रात्रीचा विसावा...

 खणकणाऱ्या काचेच्या बांगड्या घालून, झाडाला बांधलेले झोके... स्वप्नांचेही, आभाळाला भिडवताना तिने मनातली चिरंतन व्यथा आभाळाला नोंदवली. आज काळासोबत सासर माहेरच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. तरीही

सासराच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे गुलाल-बुक्का दाटे...

 या ओळी ऐकल्या की बाईचे मन भरून येतेच नाही का? शेवटी माहेर ते माहेर!