रुणझुणत्या पाखरा/सूर्यकिरण पहिले पाऊल टेकते ते अरूणाचल
घनदाट हिरव्याकंच झाडांच्या मध्यातून आमच्या चार सुमो आणि एक मिनीबस सुसाट वेगाने धावत होत्या. खरे तर घड्याळाच्या काट्याने नुकतीच साडेचारची रेषा ओलांडलीय. पण भवतालच्या झाडांच्या सावल्या गर्द होत जाणाऱ्या पहाता पहाता झाडं आणि सावल्या अंधारात बुडून गेल्या. मधूनच एखादे गाव..., खेडेच म्हणाना पार होई. पाऊस झेलणाऱ्या उतरत्या झोपड्या. आत एखादाच मिणमिणता दिवा. गोहाटी सोडून दोन तास उलटून गेले होते. काकडवणारी थंडी गाडीच्या काचेला न जुमानता आत येत होती. आता बहुदा डोंगरपहाडातून आमचा प्रवास सुरू झाला असावा. मधूनच धडडम् ... खडड्म असा आवाज येई, पत्र्यावरून दणाणा पळत जावे तसा. कर्कश... काटेरी. मग मनात भीती. उल्फा, नागा वगैरेंची.
पंधरा दिवसांपूर्वी शारदाचा मुंबईहून फोन आला होता. की नावो-नॅशनल अलायन्स ऑफ विमेन्स ऑर्गनायझेशनची बैठक अरूणाचलला आहे. परवापर्यन्त माझे तिकिट काढण्याबद्दल कळवायचे होते. बैठक इटानगरला होती. फोन ऐकताच मी मनातल्या मनात टुण्कन उडी मारली. हो, पासष्टी पार केली तरी! माझी आजी मला "हिंडणभंवरी" म्हणायची तर, "पायाला चाकं बांधून घे" असे आई म्हणे. प्रवासाची हौस भाझ्या रक्तात भिनलीये!
... सकाळी सातला इमायनातला पट्टा कमरेभोवती आवळला. तो सोडत, पुन्हा बांधत दुपारी दोन वाजता कलकत्ता मार्गे गोहाटीला सुखरूपपणी उतरलो. चेन्नई, हैद्राबाद, राजस्थान, नागपूर, गुजराथ, अमृतसर इत्यादी प्रान्तातून... शहरातून वीस जणी आल्या होत्याच. त्यात आमची भर.
गोहाटीतून सुमोतून चढता प्रवास. भारताच्या ईशान्येकडे... अति पूर्वोत्तरेकडे जिथे उगवत्या अरूणाची पहिली किरणे झेलली जातात त्या हिमालयाच्या पठारावरच्या प्रदेशाकडे...अरूणाचलकडे आम्ही सुसाटलो होतो. गच्चकन् सुमो थांबली. रात्रीचे बारा वाजून गेले होते. आम्ही इटानगरमध्ये होतो.
खोलीत हीटर होते. अंगात गरम कपडे. तरीही दुलई, ब्लँकेटमधून बाहेर येण्यास मन धजावत नव्हते. पण साडेनऊला विवेकानंद केन्द्रात बैठक सुरू होणार होती. सकाळी नऊ वाजता रस्त्यावर उतरलो. भवताली निरभ्र प्रकाश. रस्त्यावरून येणारी जाणारी चपट्या नाकाची. चिमण्या डोळ्यांची पिवळसर गोऱ्या रंगाची हसरी माणसे वावरत होती. आसाममध्ये स्त्रिया कमरेला लुंगीसारखे वस्त्र गुंडाळतात. त्याला मेखला म्हणतात. येथील महिलांच्या अंगावर मेखलाच होत्या. त्या सुतीच होत्या. परंतु त्यांची वीण अधिक घट्ट, दुहेरी होती. अरूणाचल जंगलांनी विविध प्रकारच्या वनस्पतींनी समृद्ध असलेला, हजारो वर्षांपासून विविध भाषा बोलणाऱ्या सुमारे २९ अदिवासी जमातींचा, ३१ हजार चौरस मैलांचा हिमालयातला डोंगराळ प्रदेश आहे. पूर्वी काही आदिवासी जमाती 'हेड हंटर्स' होत्या असे म्हटले जाते. परंतु अदिवासी नसलेल्या, शिक्षित... अभ्यास करणाऱ्या व त्यांच्याशी मित्रत्व, भारतीयत्वाचे नाते जोडण्यास गेलेल्या लोकांनी त्यांच्याशी प्रेमाचे नाते बांधले. मग कळले की या जमातींवर आक्रमणे सतत होत असत. युद्ध हे नित्याचे बनले. शत्रूला मारणे म्हणजे विजय. स्वतःच्या विजयाची गाथा, मारलेल्यांची मुंडकी, कवट्या ओळीने लावून, जमवून निरक्षर आदिवासींचे पूर्वज लिहित. आज ते इतिहासात जमा झाले आहे.
...तर काय या आदिवासींचे वनस्पतीबद्दलचे अनुभवाधारित ज्ञान विपुल, विशाल आहे. वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांनी रंगलेले यांचे कपडे. फाटले तरी रंगांची चमक जिवंत ठेवणारे असतात.
...भाकरी हाच भुकेल्यांचा परमेश्वर असतो हे सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या 'हिंदू' या शब्दातील विशाल आणि सखोल व माननीय भूमिकेवर नितान्त निष्ठा असणाऱ्यांनी पस्तिस वर्षांपूर्वी या प्रदेशात शिक्षणाच्या माध्यमातून सांस्कृतिक एकात्मतेचा ध्यास... अभ्यासाची भूमिका घेऊन पाय रोवले. एकनाथजी रानडेंनी विवेकानंदांचे कन्याकुमारीतील स्मारक ज्या ठिकाणी त्यांना एकात्म भारतीयत्वाची मनोभूत... अंगभूत जाणीव झाली तेथे उभारले आहे. भारताचे उत्तरेचे टोक, पहिली सूर्यकिरणे ज्या पर्वतराजीवर पावले टेकतात तो अरूणाचल, म्हणून येथे काम सुरू केले. आज संपूर्ण अरूणाचल विवेकानंद केन्द्रे, रामकृष्ण मिशन, माँ शारदा मिशनच्या मुलामुलींच्या शाळांनी व्यापलेला आहे.
... तर त्या मेखलेवर येथील महिला पाठपोट झाकणारे लांब रंगीत पोलके घालतात. त्यावर सुरेख जॅकेट असते. केसांचा अंबाडा आणि त्यावर डोके झाकणारा रेशमी रूमाल बांधलेला. पुरूषांच्या पोषाखात विजार आली. पण भारतातील स्त्रियांच्या
या वेशातली जॉर्जुम एत्ते गेल्या १५/२० वर्षांपासून आम्हाला भेटते. स्त्रियांचे 'माणूसपण' समाजाने समजून घेऊन मान्य करावे, यासाठी नम्रपणे संघर्ष करणाऱ्या संघटनांच्या राष्ट्रीय बैठकीत ती असतेच. यावेळी 'नावो' ची बैठक तिने आयोजित केली. म्हणून ही संधी.
भारताचे रक्षण करणाऱ्या ईशान्य सीमेवरच्या सप्तभगिनी - सेव्हन सिस्टर्स पैकी एक अरुणाचल. याच्या चार सीमा चीन, भूतान, तिबेट, म्यानमार ऊर्फ ब्रम्हदेशाशी जोडलेल्या. तर दक्षिणेकडे आसाम, नागालँड हे भारतीय प्रदेश. इथे पावसाची सरासरी चाळिस ते दोनशे इंच. उंचावरून उड्या घेत थरार धावणाऱ्या नद्या, घनदाट जांभुळ हिरवी अरण्ये. अरुणाचल चे देखणे निसर्ग सौंदर्य डोळ्यांना तहानलेले ठेवणारे. दुसऱ्या दिवशीची बैठक 'झिरो' नावाच्या दक्षिण सुबनसरी जिल्ह्यातील आपातानी पठारावर वसलेल्या अगदी गोंडस, चिमुकल्या गावात होती. तिथे अरुणाचलमधील महिला येणार होत्या. त्यांचे प्रश्न मांडणार होत्या. पहाटे सहाला निघायचे होते. खरा अरुणाचल येत्या दोन दिवसांत डोळे भरून पहायचा होता. दोन दिवस कमीच होते.
□