रुणझुणत्या पाखरा/बीजिंगने दिलेला मंत्र रूजतोय का समाजात?
२७ ऑगस्ट १९९५ ची संध्याकाळ. अगदी बावरलेली गोंधळलेली. भारतातील चारशे-साडेचारशे महिला कार्यकर्त्या बीजिंगच्या दिशेचा ध्यास घेऊन, गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीच्या रस्त्याने रिक्षा वा टॅक्सीतून धावताहेत. मयुरी ट्रॅव्हल्सची वीणा विश्वानाथन् अनेकींच्या ओठांवर नाचतेय नि साऱ्याजणी कॅनॉटप्लेस परिसरातील त्यांच्या कार्यालयाभोवती अक्षरश: भिरभिरताहेत. त्यात मीही आहे.'म्हारो तो थई गयो... दो बेननो होटल कन्फर्मेशन आव्यो नथी अे...' 'कस्तुरीका पासपोर्ट आज मिलेगा शायद...'
'हेमा तर वैतागलीय. धावाधाव तरी किती करावी? तरी तिचा नवरा खूप मदत करतोय...'
अशा अनेकविध उद्गारांचे थवे भवताली. महाराष्ट्रातल्या विद्या, हेमा, आशाअपराद, ज्येष्ठ भगिनी मेहरून्निसा दलवाई यांचा रजिस्ट्रेशन नंबर मिळाला. पण चीनमध्ये राहण्याच्या जागेची निश्चिती कळलेली नाही. हॉटेल कन्फर्मेशनं पत्र मिळालेलं नाही त्यात २६ ला शनिवार नि २७ ला रविवार. दोन दिवस चायना एम्बसी बंद. मग वावड्यांची वावटळ.
छत्तीसगडमधील खेड्यात काम करणारी, सुरेख ढोलक वाजवणारी विशीतली कस्तुरी आशेनं प्रश्न विचारते.
"दिदी, चायनीज एम्बसीत फॅक्स येऊन पडलेत म्हणे. माझं नाव त्यात असेलच नाही का?"
या प्रश्नानेही डोळे भरून येतात माझे. वाटतं बीजिंगला जाण्यातला उन्मुक्त आनंद कुठेतरी दुखावलाय.
शब्दांचा पोकळपणा... वाळलेपण अगदी आतून जाणवतो. बीजिंगच्या दिशेनं जाण्याची ओतप्रोत तयारी करून आलेल्या, परदेशवारीचा आगळा आनंद, ऊर भरून घेण्याच्या उत्सुकतेनं बहरलेल्या या मैत्रिणींना, आम्ही आमची सहानभूती शब्दातून... डोळ्यातून...हात दाबून दिली, तर त्याच्या उरातलं वादळ शांत का होणार होतं?
...तर या मैत्रिणींना दिल्लीत ठेवून २७ च्या रात्री आम्ही अनेकजणींनी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ अक्षरश: ताब्यात घेतला. ओढणी...घागरा नि चांदीचे दागिने घातलेल्या राजस्थानी मैत्रिणी. भवरीबाई...नोरती. शरारा घातलेली अहमदबादची राबिया. शेकडोजणी. त्यातील दोन पाच अनुभवी बाकीच्या आम्ही 'नवशा'च. ते दृश्य पाहत असतांना मला मीराबाईचं भजन आठवलं. युनिफेम इंडियाने २६-२७ ला बीजिंग तयारीची कार्यशाळा घेतली होती. त्याची सुरूवात विद्या राव यांनी त्या भजनाने केली होती. विद्या रावचा सूर... साक्षात मीरा गातेय असा भास. ऐकतांना आपणही 'मीरा'! मीरा म्हणते... मी त्या न पाहिलेल्या देशाला चाललेय. अंगात 'धीरज का गागरा' पहेनलाय आणि अंगभर 'सच की ओढनी' पांघरलीय. तो न पाहिलेला देश. मला नक्कीच गवसेल. या भजनाचा अर्थ सांगत होती कमला भसीन.
तू खुदको बदल... तू खुदको बदल
तबही जो जमाना बदलेगा...
असे अगदी खेड्यातल्या बाईच्या कानात विश्वासाने सांगणारी कमला.तबही जो जमाना बदलेगा...
"...गेल्या काही वर्षात आपण खूप काही शिकलो आहोत. रडणं फेकून दिलंय आपण. तरीही एकत्र येऊन 'बीजिंग' च्या न पाहिलेल्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. समता-प्रगती-शांतीचा नवा प्रदेश शोधायला आहे..."
आणि याच वेळी माझ्या पलीकडे काही तामिळी नि केरळी भगिनी एकीमेकींशी तामिळ व इंग्रजीत बोलत होत्या. आमच्या कन्नड मैत्रिणींना ते सारं समजत होतं. त्यात त्याही सामील झाल्या. पण आम्ही मराठी. गुजराथी मैत्रिणी मात्र निर्विकार नजरेनी ते दुरून न्याहाळत होतो...
तर दिल्ली विमानतळ भारतीय भगिनींच्या ताब्यात. अरूणाचलची जाजो... मणिपूरची छोबीदेवी... हरियाणाची शशी. तामिळनाडूची अमल. अवघा भारत भाषा वेशभूषेसह विमानतळावर उसळलेला. अचानक चिपको चंपाबेन आवाज देते.
हम सब एक है।
दुसऱ्या क्षणी 'हम होंगे कामयाब' नि We shall over come चे सूर घुमायला लागतात.
...२८ ची पहाट, रात्रीचाच एक वाजलेला. थायी विमानाने भारताची जमीन सोडली. एकशे पासष्ट जणी बँकॉकच्या दिशेने उडू लागल्या. बँकॉकच्या घड्याळ भारताच्या दीड तास पुढे आहे. तिथल्या वेळेनुसार आम्ही सकाळी पाच वाजता तिथे पोचणार होतो.
बँकॉकचा आंतरराष्ट्रीय विमानतळ जणु दहा हजार वस्तीचं गावच. एवढा प्रचंड मोठा. त्या झकपक विमानतळाला आम्ही चक्कं 'यस्टी स्टॅन्ड' बनवला. करणार काय? दुपारी दोन वाजता पुढचं विमान सुटणार होतं. ऐवढा वेळ हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी गुप्पचळी कशी जमणार? शिवाय पाय पसरल्याशिवाय थकवा कसा जावा? मग काय भिंतीच्या कडेकडेनी कितीतरी जणी बॅगा उशाशी घेऊन सुस्तावल्या. मग कुणीतरी चिवड्याचा पुडा मोकळा केला. गप्पांना रंग चढला. मग पुन्हा एकदा क्षकिरणांकित दरवाजातून जाणे, पोटाशी बांधलेल्या चंचीतला पासपोर्ट चाचपडत विमानात चढणे वगैरे.
...आता मात्र बीजिंग जवळ आले होते. माझ्या अल्याड राजस्थानची नोरती. नवरात्रीचं हे बोलीभाषी रूप... बसलेली. मागे जिनी श्रीवास्तव या भारतात स्थायिक झालेल्या ग्रामीण परिसरात महिला संघटन करणाऱ्या कार्यकर्तीसोबत आलेल्या चौघी खेड्यात काम करणाऱ्या, इंग्रजीचा ठसका न लागलेल्या साध्यासुध्या 'लुगाया'- बायका. मला मनोमन हळहळ वाटली, की आमची एखादी सखूमाय न्हाईतर हमिदाक्का का नाही या जमावात? एकतर सगळी घोडी पाण्यापाशी म्हणजे. पैशापाशी अडणार. स्वतःसाठी मदत गोळा करण्यात आमच्यासारखे हौशे... नवशे बेज़ार. मग अशा तळागाळातल्या मैतरणीची आठवण कशी व्हावी? एक मात्र वाटलं की, कोऑर्डिनेशन युनिट... मध्यवर्ती समन्वय समितीने प्रतिनिधी निवडीची आखणी करतांना किमान २/ ३ अशा कार्यकर्त्यांची निवड करण्याची भूमिका घ्यायला हवी होती. निदान पुढच्या वेळी तरी..!!
विद्याताई बाळ, छाया दातार यांच्या लेखांतून 'डॉन डॉक्युमेंट'... नैरोबीच्या जागतिक महिला परिषदेत उगवलेली, स्त्रीच्या माणूसपणाचे नैसर्गिक सत्य जगाला ठणकावून सांगणारी पहाट आमच्यापर्यंत पोचली होती. हे जरी खरे असले तरी ती जागतिक महिला परिषद गावातील गल्लीबोळात वा खेड्यापाड्यात पोचली नव्हती. स्त्रीच्या माणूसपणाचा एहसास... विश्वास शेवटच्या स्त्रीपर्यंत पोहचलेला नव्हता. पण बीजिंग परिषद मात्र गेल्या दोन वर्षापासून गाजतेय. जाणीवपूर्वक ती खेड्यातील, तळागाळातील सामान्य स्त्रीच्या प्रश्नांपर्यंत भिडवण्याचा प्रयत्न अनेक महिला संघटनांनी केला. जिल्हावार... विभागवार नियोजन केले गेले शेती आणि स्त्रिया, स्त्रीया आणि उद्योजकता, स्त्रिया आणि माध्यमे, स्त्रियांचे आरोग्य, स्त्रीचा निर्णय प्रक्रियेत सहभाग इत्यादी अनेक विषयांवर परिसंवाद आयोजित केले गेले. सामान्य स्त्रिला बोलते करून, तिला नेमके काय हवं आहे त्याची दिशाही शोधली गेली. हे केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतभर घडत होते.
ते बीजिंगमय दिवस आज १२ वर्षांनी विचारताहेत. स्त्रियांच्या नैसर्गिक माणूसपणाचा विश्वास, आपण कृती, कायदेबद्दल यांच्या द्वारे रूजवतोय ना समाजात? हो नक्कीच करतोय. लैंगिक शोषणा विरूद्धचा 'विशाखा' कायदा २००५ चा स्त्रियांवर कुटुंबांतर्गत होणाऱ्या अन्यायाची दखल घेणारा कायदा शिवाय स्त्रियांना विविध कायद्यांची माहिती देणारी खेड्यातून होणारी शिबीरे तसेच मेळावे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर घेणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था...
होय बीजिंगमध्ये अवकाशात अवघ्या जगातील महिलांनी उंचावलेला स्त्रीच्या माणूसपणाचा विश्वास जमिनीत रूजतोय साध्यासुध्या स्त्रीच्या मनांतून अंकुरतोय...
□