रूप पालटू शिक्षणाचे/ज्ञान प्रबोधिनी: शैक्षणिक उपक्रम भूमिका

शिक्षणाचे उद्दिष्ट
 स्वामी विवेकानंदांचे शिक्षण आणि धर्मासंबंधीचे उद्गार प्रसिद्ध आहेत. ‘माणसामधील दिव्यत्वाचे प्रकटीकरण म्हणजे धर्म व माणसामधील पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण' असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. दिव्यत्व आणि पूर्णत्व या कल्पना वेगळ्या करता येण्यासारख्या नाहीत. धर्माचे आचरण प्रत्येकाने स्वत: करायचे असते.म्हणून दिव्यत्वाच्या प्रकटीकरणासाठी स्वत: केलेले प्रयत्न म्हणजे धर्म व एकेका व्यक्तीमधील दिव्यत्वाच्या प्रकटीकरणासाठी समाजातील इतर व्यक्तींनी केलेले प्रयत्न म्हणजे शिक्षण असे व्यवहाराच्या सोयीसाठी म्हणता येईल.
 व्यक्तीमधील दिव्यत्वाचे किंवा पूर्णत्वाचे प्रकटीकरण करण्यासाठी व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक विकास या प्रकटीकरणाला अनुकूल असा झाला पाहिजे. हा विकास दिव्यत्वाच्या प्रकटीकरणाला अनुकूल होईल असा प्रयत्न करत असताना तो मानवतेच्या आणि समाजाच्या स्थैर्यासाठी आणि सुखासाठी अनुकूल असेल असे देखील बघायला हवे. स्वामी विवेकानंदांनी आत्मनो मोक्षार्थ जगदुहिताय च' असे या प्रयत्नांचे वर्णन यासाठीच केले आहे. समाजाच्या आणि दिव्यत्वाच्या संदर्भात व्यक्तीचा परिपूर्ण विकास करणे हे शिक्षणाचे परम किंवा अंतिम उद्दिष्ट आहे.
आध्यात्मिक वृत्ती आवश्यक आहे
 शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट - दिव्यत्वाचे अधिकाधिक प्रकटीकरण आणि समाजाचे हित - सतत डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाचे प्रयत्न यशस्वी व्हावयाचे असतील तर मनाची तशी वृत्ती बनणे आवश्यक आहे. अशी वृत्ती नसताना तात्कालिक व मध्यंतर उद्दिष्टांसाठी केलेल्या प्रयत्नांना कदाचित यश येईल पण ते शरीर-मन-बुद्धीचे प्रशिक्षण (Training) असेल, व्यक्तीचे शिक्षण(Education) होणार नाही. शरीर- मन-बुद्धीचे प्रशिक्षण, आत्मिक विकासाच्या म्हणजेच दिव्यत्वाच्या प्रकटीकरणाच्या व समाजहिताच्या दृष्टीने झाले, तरच ते, शिक्षणाचा भाग होऊ शकेल. या प्रशिक्षणाच्या जोडीने वृत्तिघडण (Attitude formation) आवश्यक आहे. अंतिम उद्दिष्टाकडे सतत लक्ष ठेवण्याचे वळण मनाला लावण्यासाठी उपासनेची आवश्यकता आहे. उपासना म्हणजे मनाला अंतिम उद्दिष्टाच्या चिंतनात गुंतवणे.