रूप पालटू शिक्षणाचे/शैक्षणिक उपक्रमांची रूपरेषा नमुना उपक्रम
शिक्षणाचे उद्दिष्ट
स्वामी विवेकानंदांचे शिक्षण आणि धर्मासंबंधीचे उद्गार प्रसिद्ध आहेत.
‘माणसामधील दिव्यत्वाचे प्रकटीकरण म्हणजे धर्म व माणसामधील पूर्णत्वाचे
प्रकटीकरण म्हणजे शिक्षण' असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. दिव्यत्व आणि
पूर्णत्व या कल्पना वेगळ्या करता येण्यासारख्या नाहीत. धर्माचे आचरण प्रत्येकाने
स्वत: करायचे असते.म्हणून दिव्यत्वाच्या प्रकटीकरणासाठी स्वत: केलेले प्रयत्न म्हणजे
धर्म व एकेका व्यक्तीमधील दिव्यत्वाच्या प्रकटीकरणासाठी समाजातील इतर व्यक्तींनी
केलेले प्रयत्न म्हणजे शिक्षण असे व्यवहाराच्या सोयीसाठी म्हणता येईल.
व्यक्तीमधील दिव्यत्वाचे किंवा पूर्णत्वाचे प्रकटीकरण करण्यासाठी व्यक्तीचा
शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक विकास या प्रकटीकरणाला अनुकूल
असा झाला पाहिजे. हा विकास दिव्यत्वाच्या प्रकटीकरणाला अनुकूल होईल असा
प्रयत्न करत असताना तो मानवतेच्या आणि समाजाच्या स्थैर्यासाठी आणि सुखासाठी
अनुकूल असेल असे देखील बघायला हवे. स्वामी विवेकानंदांनी आत्मनो मोक्षार्थ
जगदुहिताय च' असे या प्रयत्नांचे वर्णन यासाठीच केले आहे. समाजाच्या आणि
दिव्यत्वाच्या संदर्भात व्यक्तीचा परिपूर्ण विकास करणे हे शिक्षणाचे परम किंवा अंतिम
उद्दिष्ट आहे.
आध्यात्मिक वृत्ती आवश्यक आहे
शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट - दिव्यत्वाचे अधिकाधिक प्रकटीकरण आणि समाजाचे
हित - सतत डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाचे प्रयत्न यशस्वी व्हावयाचे असतील तर
मनाची तशी वृत्ती बनणे आवश्यक आहे. अशी वृत्ती नसताना तात्कालिक व मध्यंतर
उद्दिष्टांसाठी केलेल्या प्रयत्नांना कदाचित यश येईल पण ते शरीर-मन-बुद्धीचे
प्रशिक्षण (Training) असेल, व्यक्तीचे शिक्षण(Education) होणार नाही. शरीर-
मन-बुद्धीचे प्रशिक्षण, आत्मिक विकासाच्या म्हणजेच दिव्यत्वाच्या प्रकटीकरणाच्या
व समाजहिताच्या दृष्टीने झाले, तरच ते, शिक्षणाचा भाग होऊ शकेल. या
प्रशिक्षणाच्या जोडीने वृत्तिघडण (Attitude formation) आवश्यक आहे. अंतिम
उद्दिष्टाकडे सतत लक्ष ठेवण्याचे वळण मनाला लावण्यासाठी उपासनेची
आवश्यकता आहे. उपासना म्हणजे मनाला अंतिम उद्दिष्टाच्या चिंतनात गुंतवणे.
शिक्षणाच्या तात्कालिक व मध्यंतर उद्दिष्टांसाठी प्रयत्न चालू असताना अंतिम
उद्दिष्टाचा विसर पडू नये यासाठी व्यक्तीच्या शिक्षणात उपासनेचे महत्त्वाचे स्थान
आहे, असे प्रबोधिनी मानते.
शिक्षणाचे मध्यंतर व तात्कालिक उद्दिष्ट
अंतिम उद्दिष्ट अनेक पिढ्यांच्या प्रयत्नांची दिशा दाखवणारे असते, तर मध्यंतर
उद्दिष्ट एका पिढीच्या प्रयत्नांची दिशा दाखवणारे असते. दिव्यत्वाचे प्रकटीकरण होत
असताना समाजहित, मानवतेचे हित यांचा विसर पडता कामा नये. म्हणून समाज,
राष्ट्र व मानवतेबद्दल आस्था निर्माण करणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणून
स्वीकारले पाहिजे. राष्ट्रहिताबद्दल आस्था निर्माण होण्यासाठी सर्व बौद्धिक विषयांच्या
(पाठ्यक्रमातील विषयांच्या) अभ्यासातून राष्ट्राच्या मध्यवर्ती प्रश्नांची नुसती जाण
येणे पुरेसे नाही. हे देशप्रश्न सोडविण्यासाठी स्वत: प्रयत्न करण्याची प्रेरणा शिक्षणातून
मिळायला पाहिजे. राष्ट्रहिताविषयी आस्था, राष्ट्रीय प्रश्नांची जाण व ते प्रश्न
सोडविण्यासाठी प्रेरणा निर्माण करणे हे शिक्षणाचे मध्यंतर उद्दिष्ट म्हणून प्रबोधिनीने
स्वीकारले आहे.
उपजीविकेसाठी आवश्यक कौशल्य शिकणे; कला, शास्त्रे यांचे ज्ञान मिळविणे;
मोकळ्या वेळेचा सदुपयोग करायला शिकणे: समाजोपयोगी सवयी बाणविणे ही सर्व
अंतिम वे मध्यंतर उद्दिष्टांच्या प्रकाशात बघावयाची तात्कालिक उद्दिष्टे आहेत.
शिक्षणामधील गृहीते व भूमिका
प्रत्येक व्यक्तीची शरीर संपदा, बुद्धिमत्ता व हृदयगुण यांमध्ये प्रयत्न व सरावाने
सुधारणा होऊ शकते हे शिक्षणातले मूलभूत गृहीत आहे. शरीर, मन आणि बुद्धीचा
विकास अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये होत असतो. त्यामुळे या
विकासाचे प्रयत्न फक्त शाळेत करायचे असतात ही कल्पना अपुरी आहे. घर, शाळा,
युवक संघटना आणि उर्वरित सामाजिक पर्यावरण या चारही घटकांद्वारे शिक्षण होत
असते अशी प्रबोधिनीची भूमिका आहे. सध्याच्या काळात बौद्धिक शिक्षण मुख्यत:
शाळेमध्ये तर शारीरिक, भावनिक व प्रेरणात्मक शिक्षण मुख्यतः युवक संघटनेमध्ये
होऊ शकते. परंतु या प्रयत्नांवर घरचा आणि उर्वरित सामाजिक वातावरणाचा प्रभाव
पडतच असतो. त्यामुळे पालक, शिक्षक, युवक संघटनेचे चालक आणि समाजाचे
धुरीण या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांचा परिणाम म्हणून शिक्षण होत असते.
शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट व मध्यंतर उद्दिष्टे एवढी व्यापक आहेत की त्यासाठी
आयुष्यभर प्रयत्न करायला हवेत. निरंतर शिक्षण चालू असणे ही स्थिती सर्वात उत्तम
असे प्रबोधिनी मानते. सद्य:स्थितीत औपचारिक शिक्षणाचा कालावधी मोठा होत
चालला आहे व उपजीविकेसाठी प्रयत्न सुरू होण्याचा टप्पा लांबणीवर पडतो आहे.
परंतु प्राथमिक शिक्षणानंतर उपजीविकेसाठी काम व शिक्षण हे जोडीने चालले तर अधिक
उत्तम, अशी प्रबोधिनीतील मांडणी आहे.
अध्यापन पद्धती
या मांडणीच्या आधारे प्रबोधिनीमध्ये सर्वप्रथम जी अध्यापन पद्धती विकसित होत
गेली ती बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी. जवळ जवळ पहिली पंधरा वर्षे ज्ञान प्रबोधिनीतले
अध्यापनाचे प्रयोग बुद्धिमान विद्याथ्र्यासाठी झाले. त्यानंतरच्या पाच वर्षांत प्रथम
पुण्यातील क्रीडा केंद्रांवर, नंतर शिवापूरसारख्या ग्रामीण भागात व त्यानंतर
निगडीसारख्या नवनगरात सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी प्रबोधिनीचे शिक्षणकार्य सुरू
झाले. त्यानंतर दहा वर्षांनी सोलापूर व साळुबे या अनुक्रमे शहरी व ग्रामीण भागात
त्याचीच आवृत्ती झाली. स्थानिक गरजेप्रमाणे अध्यापनाचा वेग व टप्पे कमी-जास्त
झाले तरी औपचारिक शिक्षणामध्ये अध्यापन पद्धती कशी असायला हवी याचा एक
वेगळा नमुना प्रबोधिनीमध्ये निश्चित तयार झाला आहे. त्याची सूत्रे विशेष बुद्धीच्या
आणि सर्वसामान्य बुद्धीच्या अशा सर्वच विद्याथ्र्यांना लागू आहेत. त्यामुळेच बौद्धिक
विकासासाठी औपचारिक शिक्षणाचा विचार करताना प्रबोधिनीतील अध्यापन पद्धती
समजून घेण्यासाठी अध्यापनाचा परिणाम काय असला पाहिजे हे आधी निश्चित केले
पाहिजे.
अध्यापनाचा परिणाम
विद्यार्थ्यांना माहितीचे गड्डे करायचे नसून, उपलब्ध माहितीच्या आधारे नवीन
ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी, त्यांना सक्षम बनवायचे आहे. हा अध्यापनाचा हेतू मानला
तर ज्ञानाचे उपायोजन कसे करायचे व ज्ञानाची निर्मिती कशी करायची हे अध्यापनाचे
दिशादर्शक सूत्र मानले पाहिजे. काही माहिती स्वत:बरोबर घेऊन विद्यार्थी वर्गात येतात.
वर्गाबाहेर पडताना ते फक्त आणखी माहिती घेऊन बाहेर पडले असे होऊन चालणार
नाही. असलेल्या माहितीचा उपयोग करण्याची दृष्टी मिळविण्यासाठी आणि कौशल्ये
शिकण्यासाठी ते वर्गात येतात असे मानले पाहिजे. कोणती माहिती अजून मिळवायला
हवी हे ओळखण्याचे कौशल्य शिकण्यासाठी ते वर्गात येतात असे मानले पाहिजे.
त्यामुळे एका ज्ञानशाखेतील सर्वज्ञता' असाच अध्यापनाचा परिणाम अपेक्षित धरून
चालणार नाही. ज्ञानाच्या उपायोजनामध्ये बहुशास्त्रीय (Multi-disciplinary)
रूप पालटू शिक्षणाचे (३)
अभ्यासाला स्थान आहे तर ज्ञानाच्या निर्मितीमध्ये आंतरशाखीय (Inter-disciplin-
ary) अभ्यासाला स्थान आहे. त्यामुळे अध्यापनातील आशयप्रधानता कमी करून
कौशल्ये आणि प्रक्रि यांना प्राधान्य देणारी अध्यापन पद्धती असायला हवी.
आशयाशिवाय नुसती कौशल्ये व प्रक्रिया शिकविता येत नाहीत. किमान आशय
विद्याथ्र्यांजवळ असणे ही प्रक्रिया-प्रधान अध्यापनाची पूर्व अट आहे.
अध्यापनाची पूर्वतयारी
प्रक्रिया-प्रधान अध्यापन यशस्वी व्हावयाचे असेल तर विद्यार्थ्याची पूर्वतयारी
व्हायला हवी. आशय किंवा माहितीवर प्रभुत्व असलेले विद्यार्थी समोर असले तर
प्रक्रिया-प्रधान अध्यापन यशस्वी होईल. खूप माहिती अल्पकालीन स्मरणात
साठवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा थोडीशी असली तरी ती माहिती आकलनासह
दीर्घकालीन स्मृतीत ठेवणे जास्त उपयुक्त आहे हे सूत्र विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीमध्ये लक्षात
घेतले पाहिजे. इतिहास,माहिती, सद्य:स्थिती, प्रसंग, व्यक्तींचे स्वभावविशेष याचे
जास्तीतजास्त दर्शन विद्यार्थ्यांना घडणे आवश्यक आहे. ज्ञानाचे उपायोजन व निर्मिती हे
उद्दिष्ट समोर नसले तर ब-याच वेळा अध्यापन पूर्वतयारीच्या स्तरालाच रेंगाळते. त्यातही
क्रमिक पाठ्यपुस्तकात असलेला इतिहास व माहिती या भोवतीच ते घोटाळते.
इच्छाशक्ती, दृष्टी व साधनसंपत्तीच्या अभावामुळे एका ऐवजी अनेक पुस्तके वापरावीत,
संदर्भ ग्रंथ वापरावेत हे जमत नाही. खरे तर पूर्वतयारी म्हणूनही माहिती शोधायला
शिकवले पाहिजे. परंतु त्याबरोबर सद्य:स्थितीच्या दर्शनासाठी मुलाखती, वृत्तपत्रे,
नियतकालिके, प्रसार माध्यमे यांचा वापर, व्यक्तींच्या दर्शनासाठी मुलाखती आणि
सहवासात राहून त्यांच्याबरोबर काम करणे, आणि प्रसंगांच्या दर्शनासाठी स्वत: विविध
ठिकाणी, वेगवेगळ्या परिस्थितीत कामाचा अनुभव घेणे, प्रवास करणे हे सगळे केले
पाहिजे. आज ब-याच ठिकाणी अध्यापनासाठी अशी विविध दर्शने घडविण्याची
पूर्वतयारी करणे ही देखील मोठी सुधारणा होऊ शकेल. परंतु अध्यापनाचा हेतू लक्षात
घेऊन ती केली पाहिजे. प्रबोधिनीत देखील अशी उत्तम पूर्वतयारी सर्वकाळ जमते असे
नाही. अशी पूर्वतयारी झाल्यानंतर मग वर्गातले अध्यापन कसे वेगळे व्हायला पाहिजे हे।
देखील बघायला हवे.
अध्यापनाची सूत्रे
स्वयंअध्ययनाची कौशल्ये जास्तीत जास्त वापरून, अनेक प्रकारे माहिती घेऊन
विद्यार्थी वर्गात येऊन बसल्यावर, अशा विद्यार्थ्यांना प्रचलित अध्यापनापेक्षा वेगळ्या
पद्धतीने शिकवायला लागेल.
१) “काय ?' आणि 'केव्हा ?' या प्रश्नांपेक्षा का ?’ आणि ‘कसे ?' या प्रश्नांना
अधिक महत्त्व असले पाहिजे. नवीन विषयाचे दर्शन झाल्यानंतर त्याविषयी अधिक
उत्सुकता आणि गोडी निर्माण झाली तरच, का ? कसे ? हे प्रश्न पडतात. या प्रश्नांची
उत्तरे मिळविण्यासाठी, नवीन ठिकाणी गेल्यावर जसे निर्हेतुक फिरायला बाहेर पडतो
तसे, त्या विषयात मुक्त संचार करायला शिकवले पाहिजे.
२) मुक्त संचार करून का ? आणि कसे ? हे प्रश्न पडण्यासाठी परीक्षेतील संभाव्य
प्रश्नांची उत्तरे माहिती करून घेण्याऐवजी स्वत:ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याला
अधिक महत्त्व दिले पाहिजे. शिकताना तरी प्रत्येकाने स्वत:ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे
शोधणे महत्त्वाचे आहे. इतरांनी समोर ठेवलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत या
भीतीतून करून घेतलेली पूर्वतयारी म्हणजे अध्यापन नाही.
३) एका प्रश्नाला एकच बरोबर उत्तर असते, ते लक्षात ठेवून योग्य वेळी ते सांगता
आले पाहिजे, हे अध्यापन नाही. त्यात स्मरणशक्तीपेक्षा आकलनाला महत्त्व देणारी
थोडी सुधारणा म्हणजे प्रश्नाचे उत्तर दिलेल्या पर्यायांतून निवडायला शिकवणे. या
पद्धतीचा थोडा उपयोग निश्चित आहे. परंतु इतरांनी दिलेल्या पर्यायांमधून एक पर्याय
निवडण्यापेक्षा एका प्रश्नाला अनेक पर्यायी उत्तरे स्वतः तयार करण्याला व्यवहारामध्ये
जास्त महत्त्व आहे. याचे प्रशिक्षण देणे जास्त महत्त्वाचे आहे.
४) स्वयंअध्ययनाच्या आधारे निरीक्षण, आकलन, स्मरण ही कौशल्ये साधलेल्या
विद्याथ्र्यांना अध्यापकांनी उपयोजन, अभिव्यक्ती, समस्यापरिहार, नवनिर्मिती आणि
निर्णयशक्तीचा वापर कसा करायचा हे खरे शिकवायला पाहिजे. पूर्वतयारीतल्या त्रुटी
भरून काढता काढता विद्यार्थ्यांना निरीक्षण, आकलन, स्मरण या बाबतीत लवकर
स्वावलंबी बनवणे हे बौद्धिक शिक्षणातले पहिले उद्दिष्ट आहे. त्यापुढे त्यांना उपयोजन,
अभिव्यक्ती, समस्यापरिहार, नवनिर्मिती आणि निर्णयशक्ती यांचा वापर करण्यास
शिकविणे हे अध्यापनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शिक्षणासाठी अनुकूल वातावरण
अध्यापनाचा हेतू, अध्यापनासाठी पूर्वतयारी आणि अध्यापनाची सूत्रे पाहिली.
अशा विशिष्ट हेतूने, विशिष्ट पद्धतीने, अध्यापन करायचे असेल तर त्यासाठी अनुकूल
वातावरणाची निर्मिती करावी लागते. असे वातावरण केवळ अध्यापनासाठी नाही तर
सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी आवश्यक आहे. घरचे संस्कार चांगले होण्यासाठी,
शाळेतील औपचारिक अध्यापनासाठी, युवक संघटनेमध्ये गटातील आंतरप्रक्रियांमुळे
रूप पालटू शिक्षणाचे (५)
होणा-या विविध पर्यायांच्या दर्शनासाठी, अनुकूल वातावरणाची गरज आहे.
नम्रता आणि आत्मविश्वास, आत्मकेंद्रिततेच्या स्पर्शाशिवाय येणारी ध्येयनिष्ठा,
लहान-मोठ्या गटांमध्ये नि:स्वार्थीपणे सहकार्याने काम करायची वृत्ती अशा गुणांचे
विकसन शिक्षणाच्या चारही माध्यमांमधून व्हायला पाहिजे. सक्षम, प्रेरणासंपन्न आणि
सहयोगी वृत्तीने काम करणारे युवक-युवती घडविणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट शाळेमध्येही
साध्य करायचे आहे. या सर्व गुणांचा परिपोष होण्यासाठी साचेबंद पद्धती चालणार
नाही. पूर्णपणे चाकोरी सोडून विचार करण्याचे स्वातंत्र्य; स्वतंत्रपणे विचार करून
विधायक निष्कर्षाप्रत पोहोचण्याचा आग्रह; स्नेह, आत्मीयता आणि निश्चिंतता यांनी
युक्त परस्परसंबंध; अशा वागण्यामुळे, अशा धोरणांमुळे निर्माण होणारे वातावरण
उत्तम शिक्षणासाठी आवश्यक आहे. असे वातावरण शाळेत निर्माण झाले, अध्यापक
व विद्यार्थी यांच्यामध्ये व्यक्तिगत हार्दिक्याचे नाते निर्माण झाले तर प्रगतिशील
अध्यापन पद्धतीचा परिणाम अधिक प्रकर्षाने होतो.
शाळेतील शैक्षणिक भूमिका
वरीलप्रमाणे शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करायचे असेल तर
शाळेतील रूढ शैक्षणिक भूमिका बदलायला लागतात. अध्यापन माहिती-प्रधान
असण्याऐवजी प्रक्रिया-प्रधान झाले पाहिजे हे पाहिले. पण तसा बदल करायचा
झाला तर परीक्षा, मूल्यमापन, बक्षिसे, उत्तेजन या सर्वच भूमिकांमध्ये बदल करावा
लागतो. शाळेबाहेरील सामाजिक पर्यावरणाच्या विरोधी असा हा बदल असल्यामुळे
तो करण्यातही अडचणी येणार व त्याला यश देखील कमी-अधिक प्रमाणात
मिळणार. पण या दिशेने टाकलेले एक-एक पाऊल देखील शिक्षणाचे हेतू साधण्यास
उपयोगी पडते.
माहिती किती ग्रहण केली हे मोजता येते. एखाद्याने प्रक्रिया किती आत्मसात
केली हे मोजणे अवघड आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांशी त्याची तुलना करणे अवघड
आहे.म्हणून स्पर्धांचे स्वरूप बदलून स्वत:शीच स्पर्धा करणे याला महत्त्व द्यावे
लागते. स्वत:च्या आधीच्या उपलब्धींपेक्षा ज्यांनी ज्यांनी प्रगती केली ते सर्व अशा
स्वत:शी केलेल्या स्पर्धेत यशस्वी झाले. प्रोत्साहन-बक्षिसे-पुरस्कार देताना निवडक
विद्यार्थ्याऐवजी सर्वांच्या यशाची नोंद घेणे आणि सहभागासाठी देखील बक्षीस देणे
असे धोरण ठेवावे लागते. सहभाग सर्वांचा, बक्षीस सर्वांना, स्वत:शी स्पर्धा आणि
इतरांशी सहकार्य या गोष्टी वाढवणारी योजना सर्व शैक्षणिक उपक्रमांमध्ये असायला
हवी.
(६) रूप पालटू शिक्षणाचे
अध्यापकांचा संच धोरणानुकूल करणे
शैक्षणिक भूमिका कितीही प्रागतिक मांडली, उपक्रमांचे नियोजन त्यानुसार कितीही
महत्त्वाकांक्षी केले, तरी बरीचशी कार्यवाही अध्यापक करत असतात. अध्यापकांचे
शिक्षण या भूमिकेनुसार झालेले नसल्याने त्यांची मनोवृत्ती अशा बदलाला अनुकूल
असतेच असे नाही. त्यामुळे या सगळ्या भूमिका व तत्त्वज्ञान अंमलात आणण्यास दीर्घ
काळ लागतो. दीर्घ काळ अध्यापकांचे प्रशिक्षण करावे लागते. एखादी योजना एकदा
समजावून सांगितली तरी पुन्हा पुन्हा अध्यापकांच्या मनात संशय निर्माण होतात. त्यांचे
बौद्धिकदृष्ट्या समाधान केले तरी ते तात्पुरते राहते. या भूमिका प्रचलित भूमिकेपेक्षा
जास्त परिणामकारक आहेत याचा साक्षात अनुभव घेतल्यावरच थोडी थोडी अनुकूलता
येते. नवीन नवीन उपक्रमांमागचे शैक्षणिक मानसशास्त्र, ते उपक्रम कार्यवाहीत
आणण्यासाठी लागणारी नियोजन कौशल्ये व व्यवस्थापन कौशल्ये, औपचारिक
शिक्षणातील यशाच्या प्रचलित मापदंडांनुसार यशस्वी अध्यापन करत स्वत:च्या
विचारपद्धतीत बदल करत असताना होणारा मानसिक संघर्ष सहन करण्याची युक्ती, या
सर्वांचे प्रशिक्षण अध्यापकांना द्यावे लागते. त्याच्या यशावर बाकीचे यश अवलंबून
आहे.
प्रचलित शिक्षण-व्यवस्थेतील इतर घटक
मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक, शासकीय अधिकारी, शासनाचे निर्णय व
समाजाच्या अपेक्षा या सर्वांचा परिणाम अध्यापकांच्या अध्यापनावर व विद्याथ्र्यांच्या
अध्ययनावर होत असतो. मुख्याध्यापक व संस्थाचालक शिक्षणात प्रयोग करू
इच्छिणारे, वेगळे शैक्षणिक धोरण राबवू इच्छिणारे असतील तरच शाळेतील वातावरण
व कार्यपद्धतीत काही बदल होऊ शकतो. हे दोन घटक अनुकूल आहेत हे गृहीत धरून
व अध्यापकांच्या प्रशिक्षणाला यश येणार आहे असा विश्वास ठेवून शैक्षणिक उपक्रमांची
मांडणी या पुस्तिकेत केली आहे. अध्यापक, मुख्याध्यापक, संस्थाचालक हे तीन्ही
एकवटले तर विद्यार्थ्याच्या औपचारिक शिक्षणात चांगले बदल दिसायला लागतील.
असे चांगले बदल दिसायला लागले तर पालक, समाजातील उर्वरित घटक, शासकीय
अधिकारी व सर्वात शेवटी शासकीय धोरण व नियम बदलतील. त्यामुळे या तीन
घटकांनी बाकीच्या घटकांशी जुळवून घेणारे न बनता, स्वत: पुढाकार घेऊन या घटकांना
वळवून घेणारे बनावे लागेल. अशी इच्छा असणा-यांना प्रबोधिनीच्या शैक्षणिक
प्रयोगांतून व उपक्रमांतून स्वतः काय करता येईल हे सुचू शकेल. हे उपक्रम सर्वांना
जसेच्या तसे राबवता येतीलच असे नाही. ज्यांना ज्यांना समाजात काही नवे वळण
पाडावे असे वाटते त्यांनी प्रथम तसा विचार व प्रयत्न करण्याचा आपल्याला निसर्गदत्त
रूप पालटू शिक्षणाचे(७)
अधिकार आहे हे ओळखावे. मग प्रबोधिनीतील शैक्षणिक उपक्रमांच्या
विस्तारामागचा प्रेरणा-स्रोत त्यांना सापडेल. तो सापडला तर मग उपक्रमांचा विस्तार
प्रत्येकाला स्वतंत्रपणे करता येतो. इतरांचे प्रयोग आधारासाठी व संदर्भासाठी घ्यायचे
असतात.
जीवनदायी शिक्षण
शाळांचा विचार करत असताना आज सर्वत्र तात्त्विक पातळीवर सर्वंकष
शिक्षणाचा आणि व्यावहारिक पातळीवर पुस्तकी शिक्षणाचा प्राधान्याने विचार होतो.
सर्वंकष शिक्षणातील आत्मिक शिक्षण या घटकाचा विचार प्रबोधिनीत प्राधान्याने
उपासनेभोवती विकसित झाला आहे. बौद्धिक शिक्षणासाठी पुस्तकांचे औपचारिक
अध्यापन या भोवती समाजातील प्रचलित विचार चालतो. त्यापेक्षा प्रबोधिनीची
अध्यापनाची वेगळी भूमिका आहे. म्हणून उपासना व अध्यापनाची भूमिका यांचा
निर्देश सर्वप्रथम केला आहे. व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक
विकास होण्यापूर्वी व्यक्तीचा उदरनिर्वाह नीट चालला असला पाहिजे. त्यामुळे
जेवणदायी शिक्षणाचा विचारही सर्वंकष शिक्षणात झाला पाहिजे.
ग्रामीण भागात पुस्तकी शिक्षणात अयशस्वी झालेल्यांना निव्वळ तांत्रिक शिक्षण
देऊन त्यांना उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वावलंबी करणे हे प्रबोधिनीने जास्त महत्त्वाचे
मानले. तांत्रिक शिक्षणातून उपजीविकेसाठी आवश्यक कौशल्ये शिकवली तरी ते
प्रबोधिनीला पुरेसे वाटले नाही. ग्रामीण भागातही नोकरीसाठी शिकवणे बरोबर नाही.
कौशल्ये असल्यावर नोकरी मिळणे हा भाग मागणी-पुरवठा न्यायाने होणार.
स्वयंरोजगार निर्माण करता येणे हे जीवनदायी शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. कुठेतरी
रोजगार मिळवणे ही व्यावहारिक तडजोड आहे. स्वयंरोजगार निर्माण करता
येण्यासाठी उद्योजकतेचे शिक्षण द्यायला हवे असे प्रबोधिनीने ठरवले. शिवापूर येथील
कृषि-तांत्रिक विद्यालयात नवजीवन वर्गामध्ये तांत्रिक शिक्षण व उद्योजकतेचे शिक्षण
यांची सांगड घालण्याचा प्रयोग काही वर्ष प्रबोधिनीने करून पाहिला.
पुढाकार घेणे, संधी हेरणे व संधी पकडणे, चिकाटी, माहिती शोधत राहणे,
उत्तमतेची काळजी, शब्द पाळणे, कार्यक्षमता, नियोजन, अडचणींमधून मार्ग काढणे,
आत्मविश्वास, इतरांना ठामपणे सामोरे जाणे, इतरांचे मन वळवणे, दक्षता,
सहका-यांचा विचार, जोखीम पत्करणे हे सर्व उद्योजकतेसाठी आवश्यक गुण आहेत.
उपजीविकेसाठी हस्तकौशल्ये, तांत्रिक कौशल्ये वा बुद्धिकौशल्ये इ. कोणतीही
कौशल्ये प्राधान्याने वापरली तरी त्या जोडीने स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी
(८) रूप पालटू शिक्षणाचे
उद्योजकतेची कौशल्ये शिकवली पाहिजेत असे प्रबोधिनीला वाटते. यासाठीचे उपक्रम
किंवा पद्धती अजून सिद्ध झाल्या नसल्या तरी ग्रामीण भागात तंत्रशिक्षण व उद्योजकता
प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. तरच त्यापुढे व्यक्तिमत्त्व विकसनाचा पुढचा मार्ग
विद्यार्थ्यांसाठी खुला होईल. शहरी भागातही या शिक्षणाचा सार्वत्रिक समावेश होणे
उपयुक्त आहे. श्रमप्रतिष्ठा व आत्मविश्वास वाढण्यास याचा उपयोग होईल.
प्रबोधिनीच्या शैक्षणिक भूमिकेमध्ये जेवणदायी शिक्षणाचा विचार अजून चालू आहे।
पण तो पूर्णत्वाला पोचलेला नाही. साळुबे येथील ग्रामीण विद्यालयात त्याचे
जाणीवपूर्वक प्रयोग चालू आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे मातीशी असलेले नाते समजावे व
पारंपरिक व्यवसायातून आर्थिक समृद्धी मिळविण्यासाठी कष्ट करण्याची सवय त्यांना
लागावी असे प्रयत्न तिथे चालू असतात. रोपवाटिका, मधुमक्षिका पालन, गांडूळ
खतनिर्मिती, वृक्षसंवर्धन हे विषय तिथे असतातच. त्याचबरोबर तंत्रशिक्षण व पशुपालन
शिकविण्याचे प्रयत्न तिथे चालू आहेत.
शाळा आणि शिक्षणसंस्था
देशाचे रूप पालटू इच्छिणाच्या कार्यकत्र्यांची संघटना अशी प्रबोधिनीची खरी
ओळख आहे. कार्यकर्ते विकसित करण्याचे प्रयोगही इथे आग्रहाने व प्राधान्याने चालू
आहेत, म्हणून प्रबोधिनीची ओळख समाजाला एक शिक्षणसंस्था म्हणून झाली आहे
यातही काही वावगे नाही. पण रूढार्थाने ज्यांना शाळा म्हणतात तशी प्रबोधिनी केवळ
शाळा नाही किंवा केवळ शाळा चालवणारी शिक्षणसंस्था नाही. घर, शाळा, युवक
संघटना आणि उर्वरित सामाजिक पर्यावरण या शिक्षणाच्या चारही माध्यमांना सर्वंकष
शिक्षणाचा एक पर्याय प्रबोधिनी देऊ इच्छिते. शाळा आणि युवक संघटना म्हणून केलेले
प्रयोग व सिद्ध केलेले उपक्रम मांडण्यापूर्वी प्रबोधिनीने घर आणि सामाजिक पर्यावरण
यांच्यासाठी काय पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे हे मांडले पाहिजे.
पालकांपर्यंत पोहोचण्याचा शिक्षणसंस्थेकडे असलेला मुख्य मार्ग म्हणजे
पालकांच्या बैठकी. पालकांच्या बैठकी व पालकांच्या व्यक्तिशः भेटी तर प्रबोधिनीत
होतातच. प्रबोधिनीतील अध्यापनाचे प्रयोग समजावून सांगण्यासाठी व शाळेतील
व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी यांचा उपयोग होतो. परंतु हे शाळेच्या कामासाठी
घराचे सहकार्य मिळवणे झाले. घराच्या शैक्षणिक कामासाठी शिक्षणसंस्था काय करू
शकेल असा विचार प्रबोधिनीत चालतो. हा विचार मुख्यत: संस्कार कार्यक्रमांना
कालोचित रूप देऊन त्यांचा प्रसार करण्याने कार्यवाहीत येतो.
रूप पालटू शिक्षणाचे(९)
संस्कार कार्यक्रम
भारतीय परंपरेमध्ये सोळा संस्कारांची कल्पना आहे. पूर्वी कधीतरी अड्ठेचाळीस
होते असे म्हणतात. ते लोप पावून सोळावर संख्या आली. ती संख्याही घटत जाऊन
नामकरण, विवाह, अंत्येष्टी अशी तीनावर आली. कुठे या तीनांत चौथ्या उपनयनाचा
समावेश आहे तर कुठे या तीनपैकीही काहींना फाटा मिळाला आहे. संस्कार अर्थहीन
झाल्यामुळे लोप पावतात. परंतु अप्रत्यक्ष संस्कारांशिवाय जाणीवपूर्वक व समारंभपूर्वक
केलेल्या संस्कारांचा उपयोगही जाणवतो. जाणीव कमी होणार नाही व समारंभांचा
अतिरेक होणार नाही अशी संस्कार कार्यक्रमांची रचना केली तर आयुष्यातील टप्प्यांचा
निर्देश करण्यासाठी व स्वत:ची भूमिका आता बदलायची आहे याची व्यक्तीला जाणीव
होण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
प्रबोधिनीने नामकरण, विवाह अंत्येष्टी या कौटुंबिक संस्कारांच्या व उपनयन या
कौटुंबिक व शैक्षणिक संस्काराच्या पुनर्रचित पोथ्या तयार केल्या आहेत. सोळा
संस्कारांमध्ये नसलेल्या षष्ट्यब्दिपूर्ती व एकोद्दिष्ट श्राद्ध ( मरणोत्तर दहाव्या ते चौदाव्या
दिवसांचे विधी ) या पारंपरिक संस्कारांच्या पोथ्या केल्या आहेत. देहदानाच्या आधुनिक
पद्धतीसाठी नवी पोथी रचली आहे. या पोथ्या वापरून अनेक कुटुंबांमधून संस्कार
व्हायला सुरुवात झाली आहे. सुटसुटीत, कमी खर्चिक अशा व्यावहारिक कारणांसाठी
आज याचा जास्त प्रसार होत असला तरी त्या पोथ्यांमधील अर्थवाहीपणा उपस्थितांना
जाणवतो. संस्कारांकडे अर्थपूर्ण दृष्टीने पाहणे व घरच्या वातावरणातून होणा-या अप्रत्यक्ष
संस्कारांशिवाय परंपरेतील संस्कारांचा जीवनदृष्टी देण्यासाठी घरच्यांनी उपयोग करणे
यासाठी पोथी-संशोधनाचे काम प्रबोधिनीने चालवले आहे. प्रबोधिनी-प्रणीत पोथ्याच
लोकांनी वापराव्यात असा प्रबोधिनीचा दुराग्रह नाही. पण संस्कारांकडे पाहण्याचा एक
योग्य दृष्टिकोण समजून घ्यावा यासाठी प्रबोधिनीप्रणीत पोथ्यांचा प्रयोग करण्याचा आग्रह
मात्र असतो. घरच्यांच्या संस्काराच्या कामात मदत करण्याचा प्रयत्न शिक्षणसंस्था म्हणून
प्रबोधिनी करत असते.
समाजातील विधायक चळवळी
समाजातील बहुतेक लोक रूढीनुसार किंवा परंपरेनुसार चालणारे असतात. काही
थोडे लोक मात्र नवीन करून पाहू इच्छिणारे, नव्या वाटा पाडणारे असतात. एक घटक
समाजाच्या स्थैर्यासाठी आवश्यक आहे. दुसरा घटक समाजाच्या प्रगतीसाठी किंवा
किमान समाजप्रवाह साकळू नये यासाठी आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक भूमिका
रुजवू पाहताना समाजात काही अनुकूल चलन-वलन झाल्याशिवाय ती रुजणे शक्य
(१०) रूप पालटू शिक्षणाचे
नाही.
सुट्टीच्या काळातील व्यक्तिमत्त्व विकसन शिबिरे प्रबोधिनीनेच सर्वप्रथम पुण्यात सुरू
केली. सर्वप्रथम प्रबोधिनीच्या प्रशालेतील मुलांसाठी, नंतर इतर शाळांमधील
विद्यार्थ्यांसाठी व क्रमश: इतर गावांमध्येही प्रबोधिनीने अशी शिबिरे सातत्याने योजली.
या शिबिरातले सुटे-सुटे उपक्रम अनेकांनी पूर्वी योजले असले तरी त्यांचे तीन ते सात
दिवसांच्या कालावधीसाठी केलेले एकत्रीकरण प्रबोधिनीमध्येच १९७२ साली सर्वप्रथम
झाले. तेव्हापासून अव्याहतपणे अशी व्यक्तिमत्त्व विकसन शिबिरे प्रबोधिनीमध्ये चालू
असतात. या कल्पनेचा प्रसार प्रबोधिनीच्या प्रयत्नानेच झाला असे म्हणणे कठीण असले
तरी अशी शिबिरे उपयुक्त आणि यशस्वी होऊ शकतात असा नमुना प्रबोधिनीने सतत
सर्वांसमोर ठेवला.
गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसमोर शिस्तपूर्ण तरीही जोशपूर्ण बरची-नृत्याचे
गट पाठवायला प्रबोधिनीने १९६४-६५ सालापासून सुरुवात केली. सातत्याने अनेक
वर्षे आजतागायत असे बरची-नृत्याचे गट मिरवणुकांमध्ये जात असतात. विसर्जन
मिरवणुकी हे पुण्याचेच वैशिष्ट्य असल्याने या कल्पनेचा प्रसार पुण्याबाहेर विशेष
झालेला नाही. परंतु प्रबोधिनीचे पाहून आणि प्रबोधिनीच्या प्रयत्नाने १९८० नंतर पुण्यात
पंधरा-वीस संस्थांचे असेच गट मिरवणुकीत दिसू लागले आहेत. गेल्या पाच-सहा
वर्षांमध्ये प्रबोधिनीच्या सोलापूर केंद्रानेही असेच प्रयत्न केले आहेत.
कौटुंबिक संस्कारांची पुनर्रचना जशी प्रबोधिनीने केली तशी सत्यनारायण पूजेसाठी
सामाजिक पर्याय म्हणून महापुरुष पूजेची रचना केली. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी
गणेश प्रतिष्ठापना पोथीची रचना केली. मंडळांनी या सार्थ पोथीचा वापर करावा असा
प्रबोधिनीचा आग्रह असतो. ग्रामीण भागात दारूच्या व्यसनापासून मुक्तीसाठी सामूहिक
मालाधारण विधीचे प्रयोगही प्रबोधिनीने तीन-चार वेळा करून पाहिले आहेत. ग्रामीण
स्त्रियांसाठी सामुदायिक हरितालिका पूजनाचे प्रयोगही खेड-शिवापूर येथे काही वर्षे
चालू आहेत. गावाच्या विकास कामांसाठी जमणाच्या गटाने उपासना करून बैठकीला
प्रारंभ करणे असा प्रयोगही काही वर्षे दोन गावांमध्ये चालू आहे.
शैक्षणिक चळवळी
नव्याने रूढ झालेल्या कल्पनेची दोन उदाहरणे वर दिली आहेत. चालू असलेल्या
काही इतर उपक्रमांचा उल्लेखही पुढे केला आहे. कल्पनेची मालकी एका व्यक्तीची किंवा
संस्थेची न रहाता ती कोणाचीही किंवा सर्वांची झाली की त्या कल्पनेचा प्रसार होतो.
रूप पालटू शिक्षणाचे(११)
कोणत्याही उपक्रमांमधून काही ना काही अनौपचारिक शिक्षण होते. या उपक्रमांच्या
कल्पनेचा अनेक ठिकाणी, शेकडो-हजारो लोकांपर्यंत प्रसार झाला, विविध ठिकाणी त्या
उपक्रमांमध्ये स्वत:च्या कल्पनांप्रमाणे बदल करून पाहणे सुरू झाले, एखाद्या सिद्ध
झालेल्या तंत्राची आवृत्ती सुरू झाली, त्या कल्पनेमागच्या विचाराची दखल सैद्धान्तिक
पातळीवरही घेतली जाऊ लागली की अनौपचारिक शिक्षणाच्या उपक्रमाचे चळवळीत
रूपांतर झाले असे म्हणता येईल. शिक्षणसंस्थेने समाजातील शैक्षणिक चळवळींमध्ये
सहभागी होणे, नवीन शैक्षणिक चळवळी सुरू करणे हे उर्वरित सामाजिक पर्यावरण
शिक्षणानुकूल होण्यासाठी आवश्यक आहे. शिक्षण म्हणजे प्रशस्तिपत्रके व प्रमाणपत्र
मिळण्याची प्रक्रिया' या संकुचित कल्पनेपासून सर्वत्र, सर्वकाळ चालणारे सर्वंकष शिक्षण
या व्यापक कल्पनेपर्यंत समाजाचा प्रवास होण्यासाठी शिक्षण-संस्थांना सामाजिक
पर्यावरणावर परिणाम घडवण्याच्या हेतूने स्थिर कामाबरोबर चळवळींचा उपयोग करणे
आवश्यक आहे.
चळवळींमध्ये रूपांतर होऊ शकतील असे अनेक उपक्रम प्रबोधिनीमध्ये नित्य चालू
असतात. काही प्रयोग कार्यकर्ते व्यक्तिगत जबाबदारीवर करून पाहत असतात; तर
काही प्रयोग प्रबोधिनीचे म्हणून सुरू झालेले असतात; इतरांनी केलेले काही प्रयोग
किंवा सुरू केलेल्या चळवळी याची आवृत्तीही प्रबोधिनीमध्ये चालू असते.
शिक्षणसंस्थेचा जिवंतपणा टिकवण्यासाठी आणि तो व्यक्त होण्यासाठी देखील
चळवळींचा उपयोग असतो.
या पुस्तिकेमध्ये मुख्यत: सिद्ध झालेल्या उपक्रमांची तपशिलात माहिती द्यायची
असल्याने प्रायोगिक परंतु चळवळीत रूपांतर होण्याची क्षमता असलेल्या किंवा चळवळ
बनलेल्या अनौपचारिक शिक्षणाच्या उपक्रमांचा पुढे केवळ नामोल्लेख केला आहे. पुणे,
शिवापूर, वेल्हे, सोलापूर, हराळी, निगडी, साळुुंंब्रे या प्रबोधिनीच्या सर्व केंद्रांवर असे
उपक्रम चालू असतात. छात्र प्रबोधन मासिक, साखर शाळा, ग्रामीण प्रज्ञा विकास
योजना, स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा केंद्र, किशोरी विकास योजना, महिलांचे
बचत गट, जिजामाता केंद्र, पाणी समिती, शेती सुधारणा मंडळ, बालविकास केंद्र,
बालकामगार शाळा, साक्षरता अभियान, सत्संग केंद्र, स्वास्थ्य केंद्र, आचार्य-कुल,
समूहगान स्पर्धा, मुख्याध्यापक प्रशिक्षण, पवनामाई उत्सव असे अनेक उपक्रम
प्रयोगाच्या विविध टप्प्यांवर आज चालू आहेत. आपल्या शैक्षणिक भूमिकेला सामाजिक
पर्यावरण अनुकूल करून घेण्यासाठी चाललेला प्रबोधिनीचा हा प्रयत्न आहे. परिस्थिती
अनुकूल नाही म्हणून अडून बसणे किंवा रडत बसणे विद्यार्थ्यांना शिकवायचे नसेल तर
शिक्षणसंस्थांनी आपल्या कृतीने परिस्थितीवर परिणाम घडविण्यासाठी आम्ही प्रयत्न
(१२) रूप पालटू शिक्षणाचे
करत असतो हे विद्यार्थ्यांना दाखवून दिले पाहिजे.
मूल्यांचे शिक्षण
उपासना आणि अध्यापन, संस्कारांची पुनर्रचना आणि शैक्षणिक चळवळी याबद्दल
मांडणी झाली. आता शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक विकासासाठीच्या
उपक्रमांची चर्चा सुरू करायची आहे, पण त्यापूर्वी मूल्यशिक्षणाबाबत प्रबोधिनीची
भूमिका मांडली पाहिजे. धार्मिक शिक्षण किंवा नैतिक शिक्षण किंवा मूल्यशिक्षण यासाठी
वेगळ्या तासांची किंवा वेगळ्या वेळाची किंवा वेगळ्या उपक्रमांची योजना करण्याची
प्रबोधिनीची भूमिका नाही. विद्याथ्र्यांचे सर्व शैक्षणिक जीवनच नीती शिकवणारे, मूल्य
रुजवणारे झाले पाहिजे. पूर्ण दिनक्रम आणि सारे आयुष्यच समाजधारणेचा विचार करत,
इतरांच्या हित-सुखात माझे हित-सुख असा विचार करत घालवायचे आहे अशी
प्रबोधिनीची भूमिका आहे.
विद्यार्थिदशेत शिक्षणसंस्थांनी कोणती मूल्ये विद्यार्थ्यांसमोर ठेवावीत ? मूल्ये
आत्मसात केल्याचे उच्चारातून, कृतीतून, भावनांच्या अभिव्यक्तीतून दिसते. त्यासाठी
अनुक्रमे ‘सत्यं वद’, ‘धर्म चर’ आणि ‘स्वाध्यायात् मा प्रमदः' व 'मातृ-पितृ-आचार्य
देवो भव' हे उपनिषदातील प्राचीन आदेश आजही आवश्यक आहेत. यांच्या बरोबरीने
प्रबोधिनीत ‘राष्ट्र देवो भव' हे मूल्य देखील स्वीकारले आहे. ही सर्व आज्ञार्थक वाक्ये
आहेत. त्याचा प्रभाव पडायचा असेल तर ही मूल्ये जगणारे मार्गदर्शक विद्यार्थ्यांसमोर
पाहिजेत. मनुष्य अपूर्ण असल्यामुळे, स्खलनशील असल्यामुळे, पूर्णत: याप्रमाणे जगणे
फारच थोड्यांना साधते. म्हणूनच मार्गदर्शकांमध्ये पारदर्शकता पाहिजे.
यानि अनवद्यानि कर्माणि तानि त्वया सेवितव्यानि नो इतराणि ।
यानि अस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि नो इतराणि ।'
उपनिषदातील या उद्गारांमध्ये मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना काय सांगायचे ते चांगल्या
रीतीने व्यक्त होते. आमची चांगली कामे व चांगली चरित्रे तेवढी तुम्ही घ्या,
आमच्यातील उणीवा व दोष घेऊ नका', अशी मार्गदर्शकांची स्पष्टपणे सांगण्याची तयारी
हवी. मूल्यशिक्षण म्हणजे मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांकडे मूल्यांचे संक्रमण ! ते सर्व
प्रसंगी होऊ शकते. चारित्र्यनिर्मितीसाठी मूल्यशिक्षण हा शिक्षणपद्धतीचा स्थायी भाव
असला पाहिजे. मूल्यशिक्षण हा शिक्षणाचा एक तुकडा होऊ शकत नाही. शालेय
शिक्षणाचे काम हे जसे औपचारिक पद्धतींनी चालते, तसेच ते सर्वांगीण विकासाच्या
तपशीलवार मांडणीमुळे पूर्णतेकडे वाटचाल करते. बौद्धिक, शारीरिक, मानसिक व
आत्मिक विकास, सामाजिक विकास आणि राष्ट्रीयत्वाचा विकास, अशी विकासाची
रूप पालटू शिक्षणाचे(१३)