रूप पालटू शिक्षणाचे/ गुणविकास योजना

गुणविकास योजना
(इयत्ता सातवी शिष्यवृत्ती योजना)

 'Education is the manifestation of perfection already in man'. अर्थात 'प्रत्येक माणसामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास म्हणजेच शिक्षण'. या स्वामी विवेकानंदांच्या शिक्षण सूत्राभोवती ज्ञान प्रबोधिनीची अध्ययन-अध्यापन प्रक्रिया गुंफलेली आहे. या प्रकियेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो.
 ११ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थी नवीन संस्कार व कौशल्ये आत्मसात करण्यास योग्य असतात. हा वयोगट कोणतीही नावीन्यपूर्ण गोष्ट करायला नेहमी उत्सुक असतो. इयत्ता सातवीतील विद्यार्थी ह्याच वयोगटातील असतात. ह्या विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांच्या विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमध्ये एक योजना आखली गेली 'इयत्ता सातवी शिष्यवृत्ती योजना'. ह्या योजनेमध्ये परीक्षा व गुणांकन पद्धतीचा स्वीकार केला व परीक्षेत उत्तम गुण मिळविणाऱ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचे ठरले. गेली बारा वर्षे सातत्याने यशस्वीरीत्या ही योजना प्रशालेमध्ये राबविली जात आहे.
 ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ही केंद्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न असल्यामुळे येथील विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेस बसू शकत नाहीत म्हणूनही या योजनेची आवश्यकता वाटत होती. विद्यार्थ्यांना शालेय परीक्षेसाठी अनेक विषय असतात. त्याच बरोबर त्यांना अन्य अनेक विषयांच्या विविध प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात. या अनेकविध परीक्षांना सामोरे जाण्याची क्षमता वाढावी म्हणून ह्या योजनेची आवश्यकता होती.
 आजचे शिक्षण म्हणजे नवनवीन माहिती विद्यार्थ्यांच्या डोक्यात कोंबून ती घोकायला लावणे व ती परीक्षेच्या वेळी जशीच्या तशी मांडायला लावणे. फक्त पाठ्यपुस्तकातील ठराविक अभ्यासक्रम आजच्या विद्यार्थ्याला शिकवून भागणार नाही. भावी जीवनात यशस्विता प्राप्त करण्याकरिता सतत नवनवीन ज्ञान त्याला मिळणे आवश्यक आहे. हे ज्ञान मिळविण्यासाठी त्याला वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत. विद्यार्थ्याने सतत नवीन ज्ञान कसे मिळवावे, कुठून मिळवावे, त्याचे संकलन व मूल्यमापन कसे करावे याच्या पद्धती व कौशल्यांचा विचार प्रामुख्याने इयत्ता सातवी शिष्यवृत्ती योजनेच्या वेळी करण्यात आला व

रूप पालटू शिक्षणाचे(३३)

त्यानुसार ह्या योजनेची ३ उद्दिष्टे ठरविण्यात आली -

 १) ठराविक पाठ्यपुस्तकांच्या चौकटीतून मुक्त अशी स्वयंअध्ययनाची कौशल्ये शिकविणे.
 २) विद्यार्थ्यांमधील शास्त्रीय दृष्टिकोन वाढीस लावणे.
 ३) विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना शोधून जागृत करणे व त्यांना अभिव्यक्त होण्यास संधी देणे.
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
 १) शिष्यवृत्ती ज्या गुणांसाठी दिली जाईल त्या गुणांचा उपयोग स्वत:च्या विकासाबरोबरच समाजासाठीही करता येईल असा दृष्टिकोन ठेवून अभ्यासक्रमाची योजना केली आहे.
 २) उपलब्ध असलेला वेळ, परिस्थिती आणि मार्गदर्शनानुसार अभ्यासक्रम लवचिक आहे.
 ३) वाचन, लेखन, पाठांतर इ. कौशल्ये कायमस्वरूपी आहेत.
 ४) एक विषय हा दुसऱ्या विषयाशी संबंधित अथवा अंतर्भूत आहे.
 ५) विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण व्यक्तिगत कल्पकतेला वाव आहे.
 ६) अभ्यासक्रमात काय करता (content) याबरोबरच कसे (process) करता यालाही महत्त्व आहे.
 उद्दिष्टांच्या पूर्ततेचा हेतू साध्य होण्यासाठी अभ्यासक्रमाचे खालील भाग केले आहेत.
१. गतिवाचन :- आकलनासहित वाचनाचा वेग (शब्दसंख्या प्रति मिनिट) मोजला जातो. वाचनवेग वाढीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत जुलै महिन्यात ४ ते ५ तासिका मार्गदर्शन केले जाते. प्रबोधिनीमध्ये या संदर्भात 'वाचन कौशल्य-कृती-गती- प्रगती' हे पुस्तक उपलब्ध आहे. वर्षाच्या प्रारंभी व वर्षाच्या शेवटी आकलन व वाचनवेग यांमधील फरक मूल्यमापनासाठी लक्षात घेतला जातो.
२. निवडक पुस्तके वाचणे व टिपणे काढणे :- वर्षारंभी १०० पुस्तकांची यादी दिली जाते. त्यातील कोणतीही ५० पुस्तके वाचायची असतात. त्यांची प्रत्येकी दोन ते अडीच पाने टिपणे काढायची असतात. या पुस्तकांच्या आवश्यकतेप्रमाणे २-३ प्रती ग्रंथालयात उपलब्ध केलेल्या असतात व विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोनदा पुस्तके बदलायला परवानगी असते. टिपणे कशी काढावीत, पुस्तके वाचताना कशी सुरुवात करावी इ. बाबत भाषा शिक्षक २ ते ३ तासिका मार्गदर्शन करतात. वर्षातून

(३४)रूप पालटू शिक्षणाचे

दोन वेळा टिपणवही तपासली जाते व विद्यार्थ्यांची वाचलेल्या पुस्तकांबाबत तोंडी

परीक्षा घेतली जाते.
३. पाठांतर :- हिंदी, मराठी, इंग्रजी व संस्कृत या भाषांमधील वेचक सुभाषिते, उतारे, कविता, श्लोक, स्तोत्रे इ. जुलैमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाते. एकूण मिळून ४०० ओळी पाठ करणे अपेक्षित असते. भाषाशिक्षक आपापल्या तासांना प्रारंभी ५ मिनिटे पाठांतरासाठी, ते म्हणवून घेण्यासाठी देतात. अस्खलित पाठांतर, स्पष्ट उच्चार, या आधारे फेब्रुवारीत तोंडी परीक्षा घेतली जाते.
४. प्रतिभाशाली लेखन:- विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रतिभेने कोणत्याही भाषेमध्ये दिलेल्या प्रकारामध्ये (संवाद, कविता, गोष्ट, नाट्य इ.) लेखन करायचे असते. भाषा- शिक्षकांच्या द्वारा वर्षात ६ ते ७ तास याचे प्रशिक्षण दिले जाते. जानेवारी महिन्यात लेखी परीक्षा असते. याच्या प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतर्फे 'प्रतिभेच्या प्रांतातील प्रवास' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. मांडणी, स्वप्रतिभा, कल्पनेतील नावीन्य, भाषेची जाण, शब्दरचना, शैली इ. गोष्टींचे मूल्यमापन केले जाते.
५. वक्तृत्व :- दिलेल्या विषयांमधील विषय निवडून त्यावर स्वत: ३ मिनिटांच्या वक्तृत्वाची तयारी करणे व संपूर्ण शाळेसमोर ३ मिनिटांचे भाषण करणे असे स्वरूप असते. वक्तृत्व उत्तम असलेल्या शिक्षकांद्वारा ३ ते ४ तास भाषणाची पूर्वतयारी क शी करावी, वक्तृत्वशैली, इ. आधारे मार्गदर्शन केले जाते. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये रोज प्रार्थनेनंतर तीन विद्यार्थी सर्वांसमोर बोलतात, त्या वेळी त्यांचे मूल्यमापन सभाधीटपणा, उच्चार, शैली, विषयाची समज या आधारे केले जाते.
६. वृत्तपत्र कात्रण संग्रह करणे:- विद्यार्थ्यांना सुमारे ५० विषयांची यादी दिली जाते. त्यातील कोणत्याही एका विषयावर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील किमान ३ ते ४ वृत्तपत्रे-नियतकालिके यांच्यामधून कात्रणे कापून ती एका वहीत चिकटविणे, त्यांचे संदर्भ लिहिणे, त्याला स्वत:ची प्रस्तावना लिहिणे, वही सजविणे असे अपेक्षित असते. शाळेतील अध्यापकांद्वारा ऑक्टोबरमध्ये २ ते ३ तास वृत्तपत्रे- नियतकालिकांचा परिचय, कात्रण संग्रह करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी इ. बाबत मार्गदर्शन केले जाते. डिसेंबर अखेरीस कात्रण संग्रहाचे परीक्षण, प्रस्तावना, कात्रणांची निवड, संख्या, विषयाची व्याप्ती, सजावट इ.च्या आधारे केले जाते. विषयाचे आकलन किती झाले हे समजण्यासाठी तोंडी परीक्षाही घेतली जाते.
७. वैज्ञानिक उपकरण (Working Model) तयार करणे :- वैज्ञानिक तत्त्वांचे उपयोजन करून, कमीत कमी खर्चात, नवीन कल्पना वापरून, दैनंदिन वापरातील यंत्रांमध्ये बदल करून अथवा स्वतंत्रपणे एक कार्यरत प्रतिकृती तयार करायची असते.

रूप पालटू शिक्षणाचे (३५)

शास्त्रशिक्षक २ तास मूलभूत संकल्पनेबाबत मार्गदर्शन करतात. मार्चच्या प्रारंभी

उपकरणाची उपयोगिता, सुबकता, प्रमाणबद्धता, नावीन्य याच्या आधारे परीक्षण केले जाते व तोंडी परीक्षेद्वारा शास्त्रीय तत्त्वाची समज, प्रतिकृती तयार करताना केलेली धडपड इ.च्या आधारे गुणांकन केले जाते.
८. मुलाखत घेणे:- शहरातील विविध क्षेत्रांमधील ८०-९० व्यक्तींच्या नावाच्या चिठ्या केल्या जातात. दोघांनी मिळून एक चिठ्ठी उचलून त्यामध्ये ज्या व्यक्तीचे नाव असेल, त्यांच्याशी संपर्क करून, मुलाखतीची वेळ ठरवून, सविस्तर मुलाखत घ्यायची व ती लिहून सादर करायची असते. अध्यापकांपैकी कोणीतरी प्रश्न कसे काढावेत ? कसे विचारावेत ? इ. बाबत मार्गदर्शन करतात. ज्या व्यक्तीची मुलाखत विद्यार्थी घेतात त्यांना बंद पाकिटातून एक पत्र दिले जाते व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, प्रश्न विचारण्याची शैली, प्रश्नांचा दर्जा, सहजपणा, इ. च्या आधारे मूल्यमापन करून लेखी अभिप्राय देण्याची विनंती त्यांना केली जाते. तसेच मुलांनी लिहिलेल्या मुलाखतीच्या आधारे शिक्षक परीक्षण करतात.
९. जीवनावश्यक कौशल्ये आत्मसात करणे :- वेगवेगळी, कडधान्ये, डाळी, पिठे यांतील फरक ओळखणे, भात-पिठले, खिचडी-रस्सा, यांपैकी एक पदार्थ करता येणे, एखाद्या भागाचा चिह्न वापरून, प्रमाणबद्ध नकाशा तयार करणे, फ्यूज- ट्यूब बदलणे, नळाचा वॉशर बदलणे, पुस्तकांची बांधणी करणे, रंगकाम करणे, पोस्टाचे-बँकेचे व्यवहार करणे, मूलभूत शिवणकाम करणे, सायकलचे पंक्चर काढणे इ. व्यावहारिक कौशल्यांपैकी (या यादीत स्थानिक गरजेप्रमाणे भर घालता येईल) ५ ते ६ कौशल्ये विद्यार्थ्यांनी करून दाखवायची असतात. त्याशिवाय प्रथमोपचाराबाबतची माहिती सर्वांना आवश्यक मानली आहे. शाळेतील अध्यापक, कर्मचारी सदस्य, पालक यांच्या मदतीने या कौशल्यांबाबत प्राथमिक ज्ञान साधारणपणे ८ ते १० तासिकांमध्ये मिळून दिले जाते. विषयाची जाण, नीटनीटकेपणा, सहजता, सुबकता, स्वच्छता इ. गोष्टींच्या आधारे जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष कृती करायला सांगून परीक्षण केले जाते.
१०. संकीर्ण:- दर वर्षी किंवा २-३ वर्षांनी वेगवेगळ्या कौशल्यांची योजना यामध्ये केली जाते. भाषेतील शब्दज्ञान, दैनंदिनी लेखन, हस्ताक्षर-शुद्धलेखन (श्रुत व अनुलेखन) समस्या परिहार, शास्त्रीय विषयावर परिसंवाद सादर करणे, तोंडी गणिते सोडविणे हे विषय आत्तापर्यंत या योजनेमध्ये घेण्यात आले आहेत. त्या-त्या वर्षी ज्या अध्यापकांकडे या योजनेच्या कार्यवाहीची जबाबदारी असते ते हा दहावा विषय ठरवतात. आधीच्या शिक्षकांचा अनुभवही त्याबाबत विचारात घेतला जातो.



रूप पालटू शिक्षणाचे(३६)  वरील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना साधारणपणे आठ महिन्यांचा कालावधी दिला जातो. सर्व कौशल्यांच्या अंतर्गत असलेल्या विविध विषयांचे वर्षभर वेगवेगळ्या वेळी परीक्षण करण्यात येते. वर्षाच्या शेवटी संकलित निर्णयावरून ५ विद्यार्थी व ५ विद्यार्थिनी अशा दहा जणांना इयत्ता दहावी पर्यंत रु.१५/
 प्रतिमास इतकी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्याशिवाय प्रत्येक विषयामध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस दिले जाते. दर वर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्राद्वारे ह्या योजनेची माहिती दिली जाते. सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाची सोय प्रशालेत केली जाते. या योजनेत सहभागी होणे सक्तीचे नाही. तथापि एकूण ८० विद्यार्थ्यांपैकी साधारणपणे ७५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसतात. सर्वसाधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या विषयांची कल्पना, त्या विषयांचा आवाका, विषयांचा अभ्यासक्रम, मूल्यमापनाचे निकष, परीक्षांच्या तारखा इ. गोष्टींबद्दल माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांच्या या संदर्भातील सर्व शंकांचे निरसन केले जाते व प्रत्यक्ष ऑगस्ट महिन्यापासून मार्गदर्शनाला सुरुवात होते.
मार्गदर्शन
 शैक्षणिक वर्षातील ऑगस्ट ते फेब्रुवारी या कालावधीत मार्गदर्शन केले जाते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शिष्यवृत्ती योजनेसाठी खातेप्रमुख व अंतर्भूत विषयांसाठी मार्गदर्शक नियुक्त केले जातात. इयत्ता सातवीला विषय अध्यापन करणाऱ्या अध्यापकांकडेच संबंधित अध्ययन कौशल्याचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी दिली जाते. गतिवाचन, वृत्तपत्र कात्रण संग्रह, मुलाखत तंत्र,वक्तृत्व इ. विषयांच्या मार्गदर्शनाची जबाबदारी प्रशिक्षित शिक्षकांकडे दिली जाते.
 इयत्ता सातवीच्या वेळापत्रकात शिष्यवृत्तीसाठी आठवड्याला एक तास राखून ठेवलेला असतो. विद्यार्थ्यांवर अधिक तासिकांचे ओझे नसावे या हेतूने व बहुतेक विषयांना प्रशालेतील अध्यापक मार्गदर्शन करीत असल्यामुळे शिष्यवृत्तीसाठी शाळेआधी किंवा शाळा सुटल्यानंतर जास्तीचे तास घ्यावे लागत नाहीत.
 वृत्तपत्र कात्रण संग्रह करणे, पुस्तके वाचून टिपणे काढणे, वैज्ञानिक उपकरण तयार करणे इ. विषयात स्व-अध्ययनाचा भाग अधिक असल्यामुळे या विषयांना नियमित तासिकांची आवश्यकता भासत नाही. इयत्ता सातवीला अध्यापन करीत नसलेल्या मार्गदर्शकांसाठी आठवड्यातील राखीव तासाचा उपयोग केला जातो. नियोजित तासिकांनंतरही विद्यार्थ्यांना काही शंका, अडचणी असल्यास विद्यार्थी मार्गदर्शकांकडे मदतीसाठी जाऊ शकतात. मार्गदर्शक प्रशालेतीलच असल्यामुळे


रूप पालटू शिक्षणाचे(३७)

विद्यार्थ्यांना त्यांना भेटणे सहज शक्य होते. प्राचार्य, खातेप्रमुख, मार्गदर्शक अध्यापक

यांच्यात कार्यवाहीसंबंधात बैठकीची योजना असते.
परीक्षा आणि मूल्यमापन
 प्रत्येक विषयाची परीक्षा वेगवेगळ्या वेळी घेतली जाते. विषयांनुसार मूल्यमापनाचे निकष निश्चित करून अंतर्गत व बाह्य परीक्षण केले जाते. बाह्य परीक्षकही काही वेळा नियुक्त केले जातात. प्रत्येक विषयासाठी परीक्षा पद्धत व गुणविभाजनासाठी निकष लावले जातात व त्यानुसार त्या विषयाचे मूल्यमापन केले जाते. प्रत्येक विषयासाठी २५ पैकी गुण दिले जातात. पाठांतर, वक्तृत्व, वृत्तपत्र कात्रण संग्रह, पुस्तके वाचून टिपणे काढणे, वैज्ञानिक उपकरण तयार करणे या विषयांची प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाते.
निरीक्षण
 शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच्या शालेय पुस्तकी अभ्यासाव्यतिरिक्त वरील सर्व गोष्टींसाठी जास्तीचा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते असे काहींना वाटणे स्वाभाविक आहे. पण आजपर्यंतचा अनुभव/निरीक्षण असे आहे की शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६०% विद्यार्थी त्या-त्या वेळी वर्गात पहिल्या पाच क्रमांकांमध्ये होते. वर्गात नेहमी मागे राहणारी मुलेसुद्धा प्रार्थनेनंतरच्या वक्तृत्वाच्या वेळी सर्वांवर छाप पाडणारे भाषण करतात. शास्त्र विषयात कमी गुण मिळविणारे विद्यार्थीसुद्धा उत्तम उपकरण तयार करतात. इ. सातवीच्या विद्यार्थ्यांचा वाचनाचा वेग वाढलेला आढळतो. वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचण्याची गोडी त्यांना लागते. असे जरी असले तरी विद्यार्थ्यांना पाठांतर, लेखन, कात्रणं चिकटविणे इ. पेक्षा प्रत्यक्ष हाताने कृती करण्यात जास्त रस वाटतो. उदा. अन्य कौशल्यांमध्ये इ. सातवीची मुले एखाद्या गृहिणीलाही लाजवतील अशा रीतीने भात, पिठले, रस्सा, साबुदाण्याची खिचडी, एखादी उसळ उत्तम रीतीने करतात. केलेला पदार्थ उत्तम रीतीने सजवितात व स्वयंपाकघरातील स्वच्छता पण करतात.
निष्कर्ष
 इयत्ती सातवी शिष्यवृत्तीच्या निमित्ताने शिकलेल्या विविध विषयांचा व कौशल्यांचा उपयोग विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात निश्चितपणे होतो. वाचन, लेखन, पाठांतर इ. मूलभूत अध्ययन कौशल्यांचा उपयोग विद्यार्थ्यांना शालेय परीक्षेत व अन्य स्पर्धांतून होतो. वक्तृत्व व मुलाखत घेणे यांमुळे विद्यार्थ्यांचे मौखिक कौशल्य वाढीस लागते व त्यांच्यामध्ये सभाधीटपणा येण्यास मदत होते.



(३८) रूप पालटू शिक्षणाचे
 पाठ्यपुस्तकांखेरीज कमीत कमी ५० अन्य पुस्तकांचे वाचन होते. यामुळे

विद्यार्थ्यांची नवीन शब्द, प्रसंग, विचार यांच्याशी ओळख होते. या सर्वांचा त्यांच्या सर्वांगीण विकासात नक्की उपयोग होतो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते, जी त्यांना पुढील आयुष्यात अत्यंत उपयुक्त ठरते.
 शास्त्रीय उपकरण करताना वेगवेगळ्या शास्त्रीय तत्त्वांचा स्वत: अभ्यास करण्याची सवय लागते. शास्त्रीय तत्त्व समजून घेऊन त्यावर आधारित उपकरण तयार करण्याचा आनंद मिळतो. यातून विद्यार्थ्यांमधील निरीक्षण क्षमता, सातत्य, चिकाटी, कल्पकता इ. सुप्त गुणांचा विकास होण्यास मदत होते.
 वृत्तपत्र कात्रण संग्रह तयार करीत असताना संपूर्ण वृत्तपत्र वाचणे, आपल्या विषयावरील बातम्या, माहिती शोधून काढणे, वेळेवर त्यांची कात्रणे काढणे इ. गोष्टी त्यांना कराव्या लागतात. त्यामुळे वृत्तपत्रातील वेगवेगळ्या विषयांची ओळख होते. आपल्या विषयातील काय उपयुक्त आहे हे ओळखता येऊ लागते.
 वरील सर्व गोष्टी इ. सातवीच्या वर्षाच्या शेवटी किंवा काही मुलांच्या बाबतीत आठवीत जाणवू लागतात. या सर्व मुलांना त्यांच्या पुढील आयुष्यात या गोष्टींचा उपयोग होतो. उदा. नेहमी सर्वसाधारणगुणांनी उत्तीर्ण होणारी परंतु जिला शिष्यवृत्ती' मिळाली अशी इ. बारावीतील विद्यार्थिनी म्हणते, “मुलाखत घेण्यामुळे धीटपणा आला. शिष्यवृत्ती परीक्षा फक्त लेखी नव्हती, त्यामुळे वेगळे काहीतरी करायला मिळाले व माझा आत्मविश्वास शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे वाढला."
 प्रशालेतील माजी विद्यार्थी अपूर्व म्हणतो, “पुस्तके वाचून टिपणे काढणे या विषयामुळे अनेक पुस्तके वाचली व त्यांची टिपणे काढली. त्याचा उपयोग शालेय अभ्यासातील टिपणे काढताना, एखाद्या कवितेचे रसग्रहण करताना, प्रकल्पाची प्रस्तावना लिहिण्यासाठी झाला."
 सध्या महाविद्यालयात शिकणारा अभिजीत डिंगरे म्हणतो, "निवडणुकीच्या वेळी आमच्या वॉर्डात १००% मतदान व्हावे अशी इच्छा होती. त्यासाठी वॉर्डातील बऱ्याच लोकांना मतदानाचे महत्त्व आत्मविश्वासपूर्वक पटविता आले. याचे बीज कुठेतरी इ. सातवीत रुजले होते."
 प्रशालेतील माजी विद्यार्थिनी अपर्णा कुलकर्णी म्हणते, “कॉलेजमध्ये नोट्स काढताना काहीही अडचण येत नाही. प्रतिभाशाली लेखनामुळे मी आपल्या लेखनात उत्तम शब्दांचा, सुविचारांचा उपयोग करते. त्यामुळे कोणत्याही विषयावर निबंध लिहिताना काहीही अडचण येत नाही. भीती वाटत नाही. प्रतिभाशाली लेखनानेच मला कविता करण्यास प्रेरणा दिली असे वाटते."

रूप पालटू शिक्षणाचे (३९)

 वाचन, लेखन, वक्तृत्व, पाठांतर, नीरक्षीरविवेक इ. गोष्टी भविष्यात विकसित

करण्यात मदत होते. या उपक्रमातून मिळणारी वाचनाची, विश्लेषण करण्याची, वेगवेगळी पुस्तके वाचून परिशीलन करण्याची आणि आपले विचार नेटक्या शब्दांत लोकांसमोर मांडण्याची कौशल्ये अंगी येणार आहेत. ती सर्वच एक आदर्श नागरिक घडविताना उपयोगी पडणार आहेत.




(४०)रूप पालटू शिक्षणाचे