खुदा हाफिज


 म्हातारा उबेदुल्ला एकटाच आपल्या आसनावर बसलेला असे. गुडगुडी ओढत. मागच्या आठवणी काढत. त्याच्यासमोर मागचे वैभव उभे राही. भविष्यकालाचा तो विचार करू लागे. अशा वेळी कधी कधी तो आपल्या बायकोला बाहेर बोलावी आणि तिच्याशी सुखदुःखाच्या गोष्टी बोलत बसे.
 उबेदुल्लाचे घर फार मोठे होते. अवाढव्य. तो, त्याची बायको आणि मुलगा, शिवाय दोन-चार नोकर अशी त्या घरात वावरत होती. पूर्वीएवढी माणसे आता घरात राहिली नव्हती. जहागिरीचे पूर्वीसारखे उत्पन्न येत नव्हते. एक दिवस दिल्ली सल्तनतचे रणगाडे संस्थानात शिरले आणि त्याच दिवशी उबेदुल्लाचे सारे वैभव, सारा दिमाख लयाला गेला. त्याचा थोरला मुलगा रझाकारांबरोबर भारतीय सैन्याचा प्रतिकार करताना प्राणास मुकला. कुळे मुजोर बनली. घरातले नोकर भराभर कमी होऊ लागले. धाकट्या मुलालाही त्याने कॉलेजातून काढून घरी बसवले. मुलाला घरच्या परिस्थितीची काही दिवस पुरती कल्पना नव्हती. उबेदुल्लाने त्याला नीट समजावून सारे सांगितले.
 "हे बघ" तो म्हणाला, "आजपर्यंत आम्ही मोठ्या दिमाखाने दिवस काढले. ऐष आरामात राहिलो. चैन केली. पैसे उधळले आणि कमावले. परंतु आता त्यातले काही राहिले नाही. लोकांचे जोडे उचलायची वेळ आता आली आहे! या वयात ते मला जमणार नाही. पुढे तर यापेक्षा कठीण दिवस येणार आहेत. काहीतरी केले पाहिजे. हात-पाय हलवले पाहिजेत. असे ऐद्यासारखे स्वस्थ बसून चालणार नाही."
 सद्रुद्दीनलाही काहीतरी जाणवू लागले होते. तो हैदराबादला राहत होता, तरी तिथेही ते खुपू लागले होते. पूर्वीसारखे जगता येत नाही. पूर्वीसारखा सन्मान होत नाही. पूर्वीसारखा दिमाख दाखवता येत नाही. उतरती कळा! त्यांच्या वैभवाला सारखी उतरती कळा लागली होती. घसरगुंडी चालली होती. सतत घसरगुंडी!
 "हैदराबादला कुठं कामधंदा मिळाला तर बघ." उबेदुल्लाने त्याला आज्ञा केली. तेव्हापासून तो शिक्षण संपवून घरी राहिला होता. दर महिन्याला एकदा हैदराबादची निष्फळ वारी करीत होता.
 हैदराबादला अनेक खेपा मारूनही त्याला कामधंदा मिळाला नाही. उबेदुल्लाने कंटाळून त्याला सांगितले, “पुरे कर! कशाला खेपा मारायच्या उगाच! पूर्वीचे हैदराबाद आता राहिले नाही, पूर्वीची सल्तनत आता उरली नाही. आपले काहीच शिल्लक राहिलेले नाही."
 बापाचे म्हणणे सद्रुद्दीनला पटले. “तुम्ही म्हणता ते खरे आहे. पूर्वीचे हैदराबाद आता राहिलेले नाही. आमचे नामोनिशाण शिल्लक ठेवायचे नाही, असा या सल्तनतने चंग बांधला आहे. आमची कौम, आमची जबान, आमचे कल्चर-सारे कसे भराभर उद्ध्वस्त होत आहे. जाणूनबुजून केले जात आहे. पूर्वीसारखे आता एकमेकांचा निरोप घेताना कोणी 'खुदा हाफिज'देखील म्हणत नाही."
 "मग काय म्हणतात?"
 "नमस्ते! नमस्ते म्हणतात!"
 “काय करायचे! आपली सद्दी आता संपली आहे. आता कधी काळी खुदाची मर्जी होईल तेव्हा खरी! तोपर्यंत आपल्याला हे असे डुकराचे जिणे जगावे लागणार! त्याला काहीच इलाज नाही!"
 "काही इलाज नाही!-का? भांडले पाहिजे, आमच्या हक्कांसाठी झगडले पाहिजे. याचा मुकाबला केला पाहिजे.”
 "मुकाबला?" उबेदुल्लाने आपली गुडगुडी खाली ठेवली. त्याचे हात कापू लागले. चेहऱ्यावर आडव्या-उभ्या रेषा उमटल्या. डोळ्यांत कटुता चमकू लागली. सद्रुद्दीनकडे भेदरलेल्या नजरेने पाहत तो म्हणाला, “याचा मुकाबला होणार नाही. याला रोकणारे कोणी नाही."
 "आहे! आम्ही आहोत! आम्ही रोकू! मी रोकीन!"
 "हं! एकदा तसे झाले! तेव्हा काय झाले तुला माहीत नाही? आमचे शेकडो नौजवान त्यांच्या रणगाड्याखाली चिरडले गेले. माझा रहीम त्यात होता. रणगाड्यांसमोर आडवा पडला होता. त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडवीत दिल्लीचे रणगाडे पुढे निघाले."
 उबेदुल्लाची बायको त्या क्षणी थरथरत आपल्या पडदानशीन खोलीतून बाहेर आली. बापलेकांचे संभाषण तिला ऐकू येत नव्हते. मुलाच्या उल्लेखानं तिला आत बसणे अशक्य झाले. ओझ्याने वाकल्यासारखी धापा टाकीत नवऱ्यासमोर ती आली आणि भारावलेल्या कंठाने म्हणाली, "कुणी काढले त्याचे नाव?"
 "माझ्या तोंडातून निघाले."
 "कशाकरता? का मला उगाच आठवण दिलीत?"
 घळघळ रडत ती तिथल्या आसनावर बसली.
 "या सद्रुद्दीनला मी समजावीत होतो. तो वेड्यासारखा काहीतरी बडबडत होता. मुकाबल्याच्या गोष्टी मला सांगत होता!"
 "मुकाबला? कसला मुकाबला? झाला तेवढा सत्यानाश कमी झाला? आणखीन करायचा आहे? काय आहे तुझ्या मनात? आपल्याला या गोष्टींशी काय करायचे आहे? दोन वेळचे जेवण मिळेल की नाही याची फिकीर करू या.” .  "तेच चालले आहे. जेवायचे तरी कसे? कुठल्या आधारावर? सारे हळूहळू जात चालले आहे. उद्या यातले काहीच उरणार नाही."
 "उद्याचे उद्या बघू. तुला कशाला काळजी हवी? आम्ही आहोत अजून! आम्ही बघू. तू स्वस्थ राहा. घरात पडून राहा. तुम्ही याला नीट समजावून सांगा. तो अजून अनजान आहे. काही कळत नाही त्याला! नसता अनर्थ करील.”
 "त्याची काळजी नको. आता तो इथेच राहणार आहे. यापुढे हैदराबादला जाण्याचे कारण नाही. काय मिळेल ते खायचे, नाहीपेक्षा उपाशी राहायचे. याखेरीज तिसरा मार्ग नाही."
 सद्रुद्दीनने आईबापांचे म्हणणे मुकाट्याने ऐकून घेतले; काही वेळ तो मान खाली घालून उभा राहिला. मग सावकाश चालत आपल्या खोलीत निघून गेला. बानो नवऱ्याजवळ बसून राहिली.
 ती सहसा आपल्या खोलीतून बाहेर पडत नसे. तिचे आता वय झाले होते. शिवाय थोरल्या मुलाच्या मृत्यूने ती खचल्यासारखी झाली होती. मात्र तिचा तजेला कायम होता. सतत घरात वावरल्याने तिची त्वचा वाजवीपेक्षा जास्त गोरी झाली होती. पंडुरोगी माणसासारखी! देह मात्र धष्टपुष्ट होता. तिच्या चालण्यात, वागण्यात आणि बोलण्यात जन्मजात ऐदीपणाच्या खुणा सहज उमटत होत्या.
 ती बसून राहिलेली बघताच उबेदुल्लाने गुडगुडीला हात घालीत म्हटले, “कशाला बाहेर येऊन बसली आहेस? जा, आत जा. पडून राहा!' पण ती काही न बोलता तशीच बसून राहिली. काही वेळाने गार वारे वाहू लागले. हवेत गारठा आला. तिला खोकल्याची किंचित उबळ आली. जागची उठून ती झपाझप पावले टाकीत आपल्या खोलीत गेली. उबेदुल्ला तिथेच गुडगुडी ओढीत बसला.


 हैद्राबादच्या वाऱ्या बंद झाल्यापासून सद्रुद्दीनला घरात बसण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. दिवसभर तो आपल्या खोलीत बसून राहू लागला. सतत काहीतरी वाचू लागला. हातात काहीच सापडले नाही की शून्यपणे विचार करीत बसलेला राहू लागला. आरामखुर्ची तो अशा वेळी खिडकीपाशी घेई आणि बाहेर बघत राही. क्षितिजापर्यंत पसरलेली काळीभोर, अफाट जमीन तिथून त्याच्या दृष्टीस पडे. मधूनमधून खुरटी उगवलेली झुडपे आणि पुंजक्यापुंजक्यांनी वसलेली घरे यांचे त्याला दर्शन होत राही; पण एकदा घरात बसून राहायचा त्याला कंटाळा आला. तो आरामखुर्चीवरून उठला आणि नेहमी लांबून दिसणाऱ्या त्या सपाट, अफाट जमिनीवरून चालू लागला. मागाहून नेहमी जाऊ लागला.
 त्या वर्षी फार कमी महसूल उबेदुल्लाच्या घरात येऊन पडला. नवरा-बायकोनी एकमेकांशी सल्लामसलत केली. मग घरातले काही नोकर कमी केले. खर्चात अधिक काटकसर केली आणि कसेबसे ती भागवू लागली. बानोने एक दिवस सद्रुद्दीनच्या लग्नाचा विषय नवऱ्यापाशी काढला. लग्न उरकून टाकावेसे त्यालाही वाटू लागले. त्याने मुलाला आपल्यासमोर बोलावले. बानो होतीच. तो मुलाला म्हणाला, "तुझी शादी उरकायचा आमचा इरादा आहे.”
 "शादी? माझी शादी?" त्याने आश्चर्याने विचारले.
 "होय. का? शादी करायची नाही?"
 "करायची ना! पण इतक्यात कशाला? धांदल काय आहे? सध्याच्या या दुर्दशेत-"
 "दुर्दशा नेहमीचीच आहे! म्हणून काय शादी करायची नाही? शादी लांबणीवर टाकण्याने काय आपली दुर्दशा टळणार आहे? पुढे माझ्याने तुझे भले होईलसेही मला वाटत नाही."
 “सद्रुद्दीन, बहस करू नको. आमची आरजू पुरी कर. आपले पहिल्यासारखे असते तर केव्हाच तुझी शादी उरकली असती!"
 आईबापांना दुखवणे त्याला शक्य झाले नाही. त्यांच्या इच्छेपुढे त्याने मान तुकवली. धीमी पावले टाकीत तो आपल्या खोलीत गेला आणि नवरा-बायको लग्नाच्या गोष्टी बोलण्यात दंग झाली.


 चारपाच दिवसांनी उबेदुल्ला जवळच्या शहरात गेला आणि दोन दिवसांनी परत आला. तिथल्या कोणा नबाब घराण्यातली मुलगी त्याने बघितली. सगाई केली. ती नक्की केली. थोडीशी जमीन विकून पैसा उभारण्याचा बेतही त्याने केला. मुलाने ते ऐकून कडवटपणे हसून म्हटले, "ठीक आहे. एके काळी निझामाला छोकरी अर्पण करून आपण जमीन मिळवली. आता घरात मुलगी आणण्यासाठी तीच जमीन विकायची पाळी आपल्यावर आली आहे."
 बानोने संतापून त्याच्याकडे पाहिले. “तू हे काय बोललास? असल्या बेहिदायत गोष्टी तू कधीपासून करायला लागलास?"
 "मला कळले तेव्हापासून. अब्बाजान, हे खरे आहे ना?"
 "खरे आणि खोटे. तुला काय करायचे आहे? या गोष्टीला अनेक वर्षे होऊन गेली. हैदराबादमधल्या सगळ्याच नबाबांची ही कहाणी आहे. आम्हीच तेवढे काही वाईट केलेले नाही!"
 "पण याला या पंचायती कशाला?" बानोने त्याच्यावर डोळे वटारले. तो जड पावले टाकीत तिथून बाजूला झाला.
 थोड्याच दिवसांत त्याच्या लग्नाचा सोहळा पार पडला. थोडक्यात आणि कसलाही डामडौल न करता. शहरातली मुलीकडची आणि उबेदुल्लाच्या नात्यातली माणसे काही दिवस त्यांच्याकडे येऊन राहिली. पंधरा दिवसांनी ती सारी परत गेली. काही दिवस गजबजलेले हे घर पुन्हा पूर्ववत शांत, ओसाड वाटू लागले.


 सद्रुद्दीनची बायको बानोसारखीच देखणी आणि गोरी होती. पंडुरोग्यासारखी त्वचा आणि पुष्ट शरीर हा नबाबी घराण्यातला वारसा तिच्याही वाट्याला आला होता. काही दिवस तिचे दर्शनसुद्धा कुणाला झाले नाही. आपल्या खोलीत झोपून राहत तिने बरेच दिवस काढले. मग केव्हा तरी ती आपल्या खोलीतून बाहेर पडू लागली. संध्याकाळच्या वेळी त्या अवाढव्य, ओसाड घराच्या पाठीमागे ती एकटीच जाऊन उभी राहू लागली. तिचा चेहरा ओढगस्त दिसू लागला. तिची प्रसन्नता लोप पावली. तजेला नाहीसा झाला. आणि एक दिवस तिने सासूच्या कानांवर आपले दु:ख घातले.
 "ते रात्ररात्र कुठं बाहेर असतात. कधीकधी दोनदोन दिवस त्यांचा पत्ता नसतो. विचारलं की रागावतात. माझ्यापाशी धड बोलतसुद्धा नाहीत!"
 बानोने विचारले, "केव्हापासून हे असे चालले आहे?"
 "मी या घरात आल्यापासून पाहते आहे. त्यांचे कशात लक्ष नाही."
 "त्याला तू बोललीस?"
 "बोलले–अनेकदा बोलले. नेहमी बोलते. ते ऐकत नाहीत. त्यांची सारी कामे मी करते आहे. रात्री-बेरात्री दार उघडून त्यांना आत घेते आहे. त्यांच्या भोवताली सारखी वावरते आहे. पण त्यांना माझ्या अस्तित्वाची जाणीवही नाही. मी असून नसल्यासारखीच आहे.”
 "तो जातो तरी कुठं? करतो काय?"
 “कुणाला माहीत? काही सांगत नाहीत. विचारलं की संतापतात. म्हणतात उगाच चांभारचौकश्या करू नकोस! निमूटपणे सांगेन ते काम कर!"
 "बरं. तू काळजी करू नकोस. उगाच जिवाला घोर लावून घेऊ नकोस. मी यांना सांगते. सारे ठीक करते."
 बानोने नवऱ्याच्या कानावर या गोष्टी घातल्या. नवरा-बायकोनी चिंताग्रस्त होऊन आपसांत विचार केला. उबेदुल्ला त्या दिवशी पहिल्या प्रथम हादरला. तो जागचा उठून मुलाच्या खोलीत गेला. सून तेव्हा पलंगावर झोपली होती. त्याला पाहताच ती उठून एका कोपऱ्यात जाऊन पाठमोरी उभी राहिली. उबेदुल्लाने खोलीभर नजर टाकली. मुलाच्या खोलीत केवढा तरी फरक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. पूर्वीचा भपका तिथे राहिला नव्हता. भिंतीवरले रंग उडून गेले होते. छताला लटकलेल्या हंड्या आणि झुंबरे काढली गेली होती. फर्निचर नाहीसे झाले होते. आणि भिंतीवर एकदोन नवीनच साधी छायाचित्रे लटकली होती. त्याने बराच वेळ त्या छायाचित्रांकडे निरखून पाहिले. परंतु त्यांची त्याला ओळख पटेना. त्याने बाहेर पडताना सुनेला सांगितले, "तो आला की त्याला माझ्याकडे पाठव.”
 परंतु जेव्हा सद्रुद्दीन त्याच्यापुढे येऊन उभा राहिला तेव्हा त्याला काय विचारायचे, हे उबेदुल्लाला समजेना. त्याच्या मनाचा गोंधळ उडाला. त्याने सद्रुद्दीनवर नजर टाकली.
 सद्रुद्दीनची प्रकृती पहिल्यासारखी राहिली नव्हती. त्याचे फुगीर गाल आत गेले होते. शरीर कल्पनातीत वाळले होते. केस निबरट झाले होते. पूर्वीचा त्याचा तजेला नाहीसा झाला होता आणि गोरा चेहरा काळवंडला होता.
 "कुठल्या कामात एवढा गुंतला आहेस?" उबेदुल्लाने गुडगुडी खाली ठेवली.

 "बायकोशी बोलायलादेखील तुला फुरसद नाही? मला, बानोला हाक मारायलादेखील सवड नाही? कुठं जातोस? काय करतोस? काय खातोस? काय-विचारायचे तरी काय तुला? कसली अवदसा आठवली आहे?"
 सदुद्दीनने संथपणे बापाला उत्तर दिले, "अब्बाजान, या दुर्दशेने मी बेचैन झालो आहे. या दुर्दशेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो आहे."
 "बाहेर भटकून कसला मार्ग शोधणार आहेस?"
 "बाहेर भटकून मला मार्ग सापडला आहे. मी काय करतोय ते कळतेय मला! त्यामुळे ही दुर्दशा नष्ट होणार आहे. पुन्हा पूर्वीचे वैभवाचे दिवस आपल्याला लाभणार आहेत!"
 "पुन्हा पूर्वीचे दिवस? वैभवाचे दिवस? हे कसे शक्य आहे?"
 "शक्य आहे! सारे काही शक्य आहे! ही सल्तनत नेस्तनाबूद झाली तर तेही शक्य आहे. ह्या सल्तनतला बरबाद करायचे आहे. तिला नेस्तनाबूद करायचे आहे. तिचे तीन तुकडे करायचे आहेत. तेच आम्ही करतो आहोत!"
 "तुम्ही? तू? तुला हे कुणी सांगितलं? ही बगावत आहे माझ्या जिवा! तुला माहीत नाही. काही कळत नाही. ते चिरडून टाकतील! वरवंटा फिरवतील! आपल्या सर्वांचा खातमा करतील!"
 बानोने जागची उठून त्याला मिठी मारली!
 “ते शक्य नाही. तुला काही माहीत नाही, अम्मी! पूर्वीसारखी ही रझाकारी चळवळ नाही. आपल्यापुरती मर्यादित नाही. असंख्य माणसे यात शरीक झाली आहेत. ह्या वेळेला फार वेगळं घडणार आहे."
 "काय आहे?" उबेदुल्लाने विचारले, "आहे तरी काय? काय चाललं आहे? आणि आम्हाला कसं कळलं नाही?"
 "कळेल! तुम्हालाही ते लवकर कळेल! गावंच्या गावं स्वतंत्र होतील. सरकारी कारभार सारा संपृष्टात येईल. दिल्ली सल्तनत उलथून पडेल. आपण पूर्वीसारखे आझाद होऊ. पूर्वीसारखं आपल्याला शानमध्ये राहता येईल!"
 "खरंच? खरंच असं घडेल?"
 “का नाही? घडलं पाहिजे. केवढ्या मोठ्या प्रमाणात सारं चाललं आहे. मग का घडणार नाही?"
 उबेदुल्लाचे डोके भणाणून गेले. त्याला काहीच समजेनासे झाले. मुलाचे म्हणणे खरे व्हायला हवे होते. पण तो भीत होता. सरकारचा रोष ओढवून घ्यायची त्याची तयारी नव्हती. स्वत:च्या आणि मुलाच्या जीविताची त्याला चिंता वाटत होती.
 हळूहळू त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. मुलाच्या खोलीतले छायाचित्र त्याला आठवले. आसपासच्या गावांहून ऐकू येणाऱ्या बातम्यांनी त्याच्या मनात गर्दी केली. त्याची चर्या गंभीर झाली.
 "कम्युनिस्ट लोक?"  "होय."
 "त्यांच्यात आपण शरीक व्हायचं? त्यांचा खुदावर भरोसा नाही."
 "नसेना का! आपल्याला काय करायचं आहे? त्यांची आपल्यावर सक्ती नाही. ते आपले दुश्मन नाहीत. दिल्ली सल्तनतचे दुश्मन आहेत. आपल्या दुश्मनांचे दुश्मन ते आपले दोस्त! आपल्याशी ते चांगले वागतील! आपल्याला पुन्हा वैभवाने, सन्मानाने राहता येईल!"
 समोर पसरलेल्या क्षितिजाकडे उबेदुल्लाची नजर लागली. मुलाच्या बोलण्याने तो गोंधळात पडला. त्याने उभ्या केलेल्या चित्राचे रंग पाहण्यात दंग होऊन गेला. सद्रुद्दीन तिथून केव्हा निसटून गेला हे त्याला समजलेही नाही. बानोने जवळ येऊन त्याला हलवले तेव्हा तो भानावर आला.
 "त्याला आवरा, वेळीच आवरा. तो वेडा झाला आहे. काहीतरी बरळतो आहे. मला त्याची भीती वाटते. भीती वाटते. फार भीती वाटते!"
 "तुला कळत नाही. तो बोलतोय ते मलाही पटू लागलं आहे. काहीतरी होऊ घातलं आहे."
 "काही होत नाही. काही होणार नाही. आणि आपल्याला त्यात काही भाग घ्यायचं कारण नाही. आपण आपल्या व्यवहारात लक्ष घालू या. खुदा अजून आपल्याला सुखात ठेवील."
 पण उबेदुल्लाने तिला उत्तर दिले नाही. तो गुडगुडी ओढू लागला होता. हताश नजरेने ती त्याच्याकडे पाहू लागली.


 सद्रुद्दीन तेव्हापासून अधिक अनियमितपणे वागू लागला. केव्हातरी बाहेर पडू लागला. रात्री-बेरात्री बायकोला हाक मारून उठवू लागला. मित्रांना बरोबर आणू लागला. तिची अधिकाधिक कुचंबणा होऊ लागली. निराश झाल्यासारखी, कुढल्यासारखी, ती खिन्न मनाने वावरू लागली.
 एकदा त्याने आपल्या मित्रांना खोलीत बोलावले. त्यांचे ओसाड, अवाढव्य घर गुप्ततेच्या दृष्टीने त्यांना सोयीचे वाटले. ते आले आणि खोलीत बसून खलबते करू लागले. त्याच्या बायकोला त्यामुळे खोलीत जाता आले नाही. दरवाजापाशी तिने जमिनीवर अंग टाकले, तिथेच ती झोपी गेली.
 मित्रांना खोलीबाहेर घालवून सद्रुद्दीन परत आला तेव्हा त्याला बायकोची आठवण आली. तिला शोधीत तो दरवाजापाशी आला. तिथे जमिनीवर तिला अस्ताव्यस्त झोपलेली त्याने पाहिली. खाली वाकून त्याने तिला उचलली आणि पलंगावर आणून ठेवली. मग आपण तिच्या शेजारी झोपून तिला तो जागी करू लागला.
 त्याने जमिनीवरून उचलताच ती जागी झाली होती. त्याचा हात पकडून तिने विचारले, "मला असे का छळता? तुमचे माझ्यावर प्रेम नाही? तुम्हाला मी पसंत नाही?"
 "कोणी सांगितले तुला हे? मला तू हवी आहेस."  "मग का असे वागता? कशाला मग लग्न केलेत? माझ्याशी चांगले वागायचे नव्हते तर तसे आधी का सांगितले नाही?"
 "ऐक! माझ्या मनात लग्न करायचे नव्हते. मी लग्न केले आईसाठी. बाबांच्या मर्जीखातर. केवळ नाइलाजाने. त्यांना दुखवू नये म्हणून!"
 "त्यांना दुखवू नये म्हणून लग्न केलेत. पण माझ्या मनाचा विचार केला नाहीत. मला दुखवायला तुम्हाला काहीच कसे वाटत नाही?"
 तो काही बोलला नाही. तिला त्याने जवळ ओढली. त्याची इच्छा तिला समजली. तिने त्याला विरोध करीत म्हटले, “खोटे. सारे खोटे! तुमचे माझ्यावर प्रेम नाही. तुम्हाला फक्त मी हवी आहे. तुम्हाला माझा उपभोग तेवढा हवा आहे. तुमची बटीक म्हणून मी वागावे अशी तुमची इच्छा आहे. मी तुमचा काय गुन्हा केला आहे?"
 "जास्त बोलायची आवश्यकता नाही. आमच्या खानदानातल्या बायका पुरुषाला कधी काही विचारीत नाहीत! ते ठेवतील तशा त्या वागतात. तुलाही तसेच वागले पाहिजे!"
 "तुम्हाला स्वत:च्या जीवाची पर्वा कशी नाही? बघा, तुमचे काय झाले आहे? तुमचा चेहरा कसा काळाठिक्कर पडला आहे. कशाला नसत्या फंदात पडला आहात? तुम्ही बाहेर जात जाऊ नका. मी तुमचे सारे करीन. आपण सुखानं राहू-"
 तो पुन्हा स्तब्धच बसला. हाताने त्याने तिला पुन्हा जवळ ओढली. ती प्रतिकार करू शकली नाही. भीतीने ती त्याच्याजवळ सरकली.


 दुसऱ्या रात्री तो बाहेर जायला निघाला, तेव्हा ती त्याचा हात पकडून म्हणाली, "आज माझं ऐका. तुम्ही बाहेर जाऊ नका."
 "मग काय करू?" त्याने तिचा हात झिडकारला. तो दरवाजाकडे वळला. ती जाऊन त्याच्या मार्गात उभी राहिली. त्याला तिने दरवाजापाशी अडविले.
 "नका जाऊ. माझ्यासाठी मला तुम्ही हवे आहात."
 "बाजूला हो! मला जाऊ दे!" त्याने संतापाने म्हटले.
 "कशाला जाता आहात? काय काम आहे?"
 त्याने आपली निखाऱ्यासारखी नजर तिच्यावर रोखली. तिला त्याने अलगद बाजूला ढकलली. कोलमडत ती बाजूला झाली. तो बाहेर पडला. निमूटपणे तिने पलंगावर अंग टाकले आणि मुसमुसून ती रडू लागली.


 एक दिवस संध्याकाळच्या सुमाराला पोलिसांनी उबेदुल्लाच्या घराला गराडा घातला. दोन पोलीस अधिकाऱ्यांनी आत येऊन उबेदुल्लाला विचारले, "तुमचा मुलगा कुठे आहे?"
 उबेदुल्लाला धडकी भरली. त्याने कापत सांगितले, "आहे. इथंच आहे. घरात. पण का? काय काम आहे?"
 त्याच्याकडे लक्ष न देता ते आत घुसले. सारे घर त्यांनी पालथे घातले. त्याच्या खोलीत ते शिरले. तिथल्या सामानाची, कागदपत्रांची, भिंतीवरच्या छायाचित्रांची त्यांनी उलथापालथ केली. काही कागदपत्रे आणि छायाचित्रे जप्त केली. रात्र होताच त्यांनी घराभोवतालचे पोलीस काढून घेतले आणि त्याच्या खोलीतच ते दबा धरून बसले.
 सद्रुद्दीनची बायको धडधडत्या अंत:करणाने त्यांच्याकडे बघत होती. एकदोनदा त्यांनी तिला खोलीतून बाहेर जायला सांगितले. पण ती जागची हलली नाही. आपला नवरा रात्री केव्हा तरी येईल. नेहमीसारखा दरवाजावर थाप मारील आणि अनायासे पोलिसांच्या सापळ्यात सापडेल हे तिला उमगले. तो येताच आपण चटकन जाऊ, त्याला सावध करू त्यामुळं तरी तो आपल्याशी चांगला वागू लागेल.
 पण पहाटे जेव्हा त्याने दरवाजावर थाप मारली, तेव्हा पोलिसांनी तिला मध्येच अडवले. दरवाजा उघडताच रिव्हॉल्व्हरच्या नळ्या आपल्यावर रोखलेल्या सद्रुद्दीनला दिसल्या. हतबुद्ध होऊन तो पोलिसांच्या स्वाधीन झाला.
 त्याला पोलिसांनी नेले आणि उबेदुल्ला, बानो दु:खाच्या भाराखाली वाकल्यासारखी त्याच्या खोलीत आली.
 “आता मी काय करू? कशी जगू? माझी दोन्ही पोरं गेली. तुम्ही जाऊ दिलीत!" बानो दु:खात सुरात ओरडली. उबेदुल्लाची आधीच वाकलेली मान अधिक वाकून गेली. त्याच्या पायांचे बळ गेले. झालेला प्रकार आता कुठे त्याच्या पुरता लक्षात आला. असहायपणे, अपराधी नजरेने त्याने बायकोकडे पाहिले. मुलाची सुटका करण्याच्या तरतुदीला त्याचे मन लागले.
 पण तेही त्याला शक्य झाले नाही. सद्रुद्दीनला सुरक्षा कायद्याखाली पकडण्यात आले होते. त्याच्यावर खटला भरण्यात येणार नव्हता. त्याला जामिनावर सोडण्यात येणार नव्हते. बेमुदत तो कैदेत राहणार होता.
 दु:खाच्या भाराने उबेदुल्ला पिचून गेला. त्याला पोक आले. गुडगुडी हातात घेऊन ती न ओढताच तासनतास तो वेड्यासारखा कुठेतरी बघत आपल्या आसनावर बसू लागला. मुलाकड़े त्याचे मन ओढ घेऊ लागले. त्याला भेटायला तो अधीर झाला. त्याने शहरात जायचा बेत केला.
 त्याच्यापाशी आता पैसेही उरले नव्हते. होते-नव्हते ते एव्हाना निकालात निघाले होते. बानोजवळही काही उरले नव्हते. त्याने सुनेजवळ जाऊन पैसे मागितले. त्याची लाचार मुद्रा बघून ती आपले दु:ख विसरली. तिचे डोळे भरून आले. आपल्या गळ्यातील दागिना तिने सासऱ्याच्या हवाली केला.


 रखडत रखडत उबेदुल्ला संध्याकाळचा शहरात जाऊन पोहोचला. रात्रभर कुठेतरी राहिला आणि दुसऱ्या दिवशी मुलाला भेटायला तुरुंगात गेला. तुरुंगात त्याची प्रथम कुणी दखलच घेतली नाही. 'माझा मुलगा कुठं आहे? कुठं आहे माझा मुलगा?' असे वेड्यासारखे ती ज्याला त्याला विचारू लागला. पोलिसाने वेडा समजून त्याला बाहेर काढले. अखेर एका अधिकाऱ्याला त्याची दया आली. त्याने भेटीची व्यवस्था केली. त्या अधिकाऱ्याने सांगितलेल्या जागी तो सद्रुद्दीनची वाट बघत बसला.
 सद्रुद्दीन समोर येऊन उभा राहिलेला पाहताच त्याची गाळण उडाली. सद्द्दीनला त्याने चटकन ओळखले नाही. त्याची प्रकृती अधिकच खालावली होती. त्याचे डोळे खोल गेले होते. चेहरा भकास झाला होता. गालाची हाडे बाहेर निघाली होती. त्याने बापाकडे पाहिले आणि मान खाली घातली.
 "कसा आहेस?"
 "बरा आहे-बरा आहे. तुम्ही कशाला आलात इतक्या लांब?"
 "तुला बघायला-तुला बघायला आलो माझ्या जिवा! काय झालेय हे तुझे? मी पहिल्यापासून सांगत होतो. अखेर तेच झाले ना? दिल्ली सल्तनत आहे तिथंच आहे."
 "आमचे चुकले. थोडेसे चुकले-नाही तर-नाही तर-"
 "नाही तर काय? वेडा! तू वेडा आहेस! मलाही प्रथम तुझ्यासारखेच वाटले, पण त्यात अर्थ नव्हता! आता हे बदलणार नाही. कधीच बदलणार नाही. नाहक आपण आपली सत्यानाशी करून घेतली."
 सद्रुद्दीनने अधिक युक्तिवाद केला नाही. त्याने विचारले, “आई कशी आहे?"
 "आहे. बरी आहे. तुझ्या काळजीने रात्रंदिवस खंगत चालली आहे. काय सांगू तिला? कधी सुटशील म्हणून सांगू?"
 "सुटण्याची सध्या काही आशा नाही."
 "माफी माग-म्हणावं, मला माफ करा. मी चुकून या बाबतीत सापडलो. कम्युनिस्टांनी मला त्यात ओढलं. माझा काही अपराध नाही. मी काही गुन्हा केलेला नाही. हवं तर तसं लिहून देतो तुम्हाला!"
 "त्याचा काही उपयोग नाही. सारं शांत झाल्याशिवाय आमची सुटका होणार नाही." वेळ संपल्याची शिपायाने वर्दी दिली, तेव्हा उबेदुल्ला मागे वळला. तेवढ्यात सद्रुद्दीनने त्याला हाक मारली, "अब्बाजान!"
 "काय?" उबेदुल्ला परत फिरला.
 सद्रुद्दीनचा कंठ दाटून आला. तो पुटपुटला, "ती कशी आहे?"
 "ती-ती होय? आहे, आमच्यासारखीच तुझ्या काळजीत बसली आहे. तिने दागिना मोडला तेव्हा माझे येणे झाले!"
 "माझी तिला सलाम सांगा! मी बोलावलं आहे म्हणून सांगा!"
 "सांगतो-सांगतो."उबेदुल्लाने डोळे पुसत तिथून पाय काढला. बाहेर पडून तो घराकडे यायला निघाला.
 संध्याकाळचा तो घरी पोहोचला तेव्हा बानो बाहेर अंगणात उभी राहून त्याची वाट बघत होती. तो अंगणातच उभा राहिला. धापा टाकीत त्याने तिला मुलाचे वृत्त कथन केले. मग धावपळीने तो घरात गेला. सुनेजवळ जाऊन त्यानं तेच पुन्हा तिला ऐकवलं. विलक्षण निर्विकारपणे तिने ते ऐकून घेतले.
 "त्याने तुला बोलावले आहे. एकदा जा. त्याला भेटून ये. कधी जातेस? मी बरोबर येईन तुझ्या-"
 "कशाला बोलावले आहे?" तिने मान वर करून म्हटले, "आता भेटून काय उपयोग? माझ्या आयुष्याची त्यांनी केव्हाच राखरांगोळी केली. आता काय इरादा आहे?"
 "असे काय बोलतेस? तो नवरा आहे तुझा! त्याची तुझ्यावर-"
 "काही नाही. माझ्यावर त्यांचा लोभ नाही. प्रेमाने मला एकदाही हाक मारली नाही. सुख असे माझ्या वाट्याला केव्हा आले नाही. त्यांनी माझ्या आशा, आकांक्षा चिरडून टाकल्या. माझे मन मारून टाकले. आता माझ्या मनात त्यांच्याबद्दल जरासुद्धा मोहब्बत उरलेली नाही. मला त्यांची नफरत वाटते, नफरत!"
 उबेदुल्ला गप्प राहिला. तिला अधिक आग्रह करायला त्याला शब्द सुचले नाहीत. मुकाट्याने तो खोलीबाहेर पडला.


 काही दिवसांनी तिचा बाप तिला न्यायला आला. बापाबरोबर ती जायला निघाली. तेव्हा उबेदुल्ला तिला अडवू शकला नाही. त्याने असहायपणे तिला जायची संमती दिली. ती निघताना सासू-सासऱ्यांच्या पाया पडली. मग सासऱ्याला आपल्या खोलीत एकांतात बोलावून तिने आपले दागिने त्यांच्या हवाली केले.
 “हे तुमच्याजवळ असू द्या. माझे म्हणून ते मी तुम्हाला देत आहे. माझ्या हातून तुमची सेवा झाली नाही. तुम्ही माझे भले करू शकला नाहीत. पण त्याला तुमचा आणि माझा इलाज नाही. माझ्या किस्मतीत जे होते ते झाले. त्याबद्दल मी तुम्हाला दोष देत नाही. मी आता जात आहे. माझ्यावर नाराज होऊ नका. खुषीनं मला निरोप द्या. खुदा हाफिज!" तिने खाली वाकून सासऱ्याच्या पायाला स्पर्श केला.
 "खुदा हाफिज-खुदा हाफिज!" उबेदुल्ला थरथरत कसा तरी पुटपुटला. लटपटत तिथून बाहेर पडला.
 ती गेली आणि घरातले उरलेसुरले चैतन्यही निघून गेले. दोघे नवराबायको तासनतास एकमेकांशी शब्दही न बोलता बाहेर बसलेली राहू लागली. नेहमीसारखे संध्याकाळच्या वेळी गार वारे वाहू लागल्यावर खोकल्याची आलेली उबळ बानो आतल्या आत दाबू लागली. गुडगुडीत तंबाखू नसल्याचे माहीत असूनही उबेदुल्ला ती ओढण्यात दंग राहू लागला. त्यांना सतत सान्निध्यात राहावेसे वाटू लागले, त्याचबरोबर एकमेकांशी काही बोलायचीही भीती वाटू लागली. घरातल्या एकदोन नोकरांचे पगार थकताच तेही निघून गेले. बानो रखडत घरातली कामे करू लागली आणि उबेदुल्ला रांगत तिला मदत करू लागला. मधूनमधून मुलाच्या आठवणींनी व्याकुळ झाला की, शहरात जाऊन त्याला भेटून येऊ लागला.
 एकदा असाच मुलाला भेटून तो संध्याकाळचा शहरातून परतला. रस्त्याने चालू लागला. कुणीतरी मागून ढकलल्यासारखी कशीतरी त्याची पावले पडू लागली. थकलेले शरीर तो भराभर पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू लागला. चालता चालता रस्त्यातून एक लग्नाची वरात जाताना त्याला दिसली म्हणून तो जागच्या जागी थांबला. वरातीमधून सावकाश जाणाऱ्या मोटारीमध्ये आपल्या सुनेला सजून बसलेली पाहताच दचकला! तिचे आपल्याकडे लक्ष वेधू नये म्हणून रस्त्यामधल्या गर्दीत मिसळला. डोळ्यांपुढे अंधारी आल्यासारखा एकटाच त्या गर्दीत उभा राहिला. काही वेळाने आपण एकटेच रस्त्यात उभे असल्याची त्याला जाणीव झाली. वरात गेली त्या दिशेने त्याने तोंड केले. मनातल्या मनात आपल्या सुनेला शुभ चिंतिले आणि मग ओझ्याने वाकल्यासारखा तो रखडत घराच्या दिशेने चालू लागला.