लाट




लाट

हमीद दलवाई








मौज प्रकाशन गृह






मौज प्रकाशन
५२८

पहिली आवृत्ती
६ मार्च १९६१
दुसरी आवृत्ती
२८ सप्टेंबर १९९०
तिसरी आवृत्ती
२६ जानेवारी २००३

© २००३ श्रीमती मेहरुन्निसा दलवाई

मुखपृष्ठ
बाळ ठाकूर

किंमत शंभर रुपये

ISBN 81-7486-297-8

प्रकाशक         पहिल्या दोन आवृत्त्यांचे
संजय वि० भागवत प्रकाशक
मौज प्रकाशन गृह मंजुळ प्रकाशन
खटाववाडी, गिरगाव पुणे ४११००१
मुंबई ४०० ००४

मुद्रक
माधव द० भागवत
मौज प्रिंटिंग ब्यूरो
खटाववाडी, गिरगाव
मुंबई ४०० ००४






श्री० मधु लिमये यांस

'लाट'च्या निमित्ताने थोडेसे


 हमीद दलवाई मराठीतून साहित्य-लेखन करू लागले, तेव्हा त्यांची फारशी दखल मराठी मुसलमानांना घ्यावीशी वाटली नाही. इतर लेखकांप्रमाणेच त्यांचे लेखन असणार अशी त्यांची समजूत होती. पण हमीदने जेव्हा स्वत: पाहिलेल्या, अनुभवलेल्या मराठी मुसलमानांच्या जीवनावर लिहायला सुरुवात केली तेव्हा ते काहीसे बेचैन झाले.
 वैचारिक आणि ललित असा भेद करण्याची आपल्याकडे प्रथा पडली आहे. त्यांच्यात दुर्लभ्य असा भेद आहे अशी समजूत. महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ ठाकूर यांचे साहित्य वाचले की, हा भेद किती वरवरचा आणि नकली आहे ते ध्यानी येते. महात्मा गांधींच्या वैचारिक लिखाणात केवढे तरी लालित्य आढळते आणि रवींद्रांच्या ललित म्हणवल्या जाणाऱ्या लेखनात केवढी विलक्षण विचारवत्ता प्रकट झाली आहे, ते पाहून मन चकित होते. हमीदने वैचारिक लिखाण केले तसे ललित लेखनही केले आणि ते दोन्ही प्रवाह सरमिसळ झालेले आढळतील.
 हमीदच्या वैचारिक साहित्याचे वेगळेपण त्याच्या वास्तवाच्या सम्यक आकलनात आणि निर्भय मांडणीत दिसून येते. तीच गोष्ट त्याचे ललित साहित्य वाचतानाही जाणवते. त्याचे मानवी भावजीवनाचे आकलन सम्यक वास्तवावर आधारलेले आहे. तो मुस्लिम समाजात वावरला, वाढला. त्या जीवनातील विविध रसधारा त्याने पाहिल्या, चाखल्या. इतर मुस्लिम लेखकांप्रमाणे आपला समाज वगळून त्याने फारसे लिहिले नाही. त्याच्या काव्यात्म सत्याच्या मुळाशीवास्तव सत्य ठाम उभे असते. त्याने माणसे बेचैन, प्रक्षुब्ध झाली तरी ते वास्तव सत्य नाकारणे कोणालाच शक्य नसते.
 'लाट' हा हमीदच्या कथांचा संग्रह. त्याच्या गाजलेल्या कथांचा या संग्रहात अंतर्भाव केलेला आहे. साधना प्रकाशनाने पानशेतफुटीच्या आधी हा संग्रह प्रकाशित केला आणि दुर्दैवाने त्याच्या प्रती मोठ्या प्रमाणावर वितरित होण्याआधीच तो पाणलोटाचे भक्ष्य झाला! त्यानंतर त्याची एखादी प्रत मिळणेही अवघड झाले. शेवटी मेहरुन्निसा दलवाई यांनी मोठ्या कष्टाने एक प्रत मिळवली व त्यामुळे हे पुनर्मुद्रण शक्य झाले. मंजुल प्रकाशनचे श्री. सुनील अंबिके यांनी प्रकाशनाची जबाबदारी हमीदबद्दलच्या आपलेपणाने उचलली. हमीदने 'इंधन' नावाची एक कादंबरीही लिहिली आहे आणि तीही प्रक्षोभक ठरली आहे. हिंदीत त्या कादंबरीचा अनुवाद प्रकाशित झाला आहे.
 हमीदच्या वैचारिक साहित्याचे आखात ललित साहित्यात शिरले आहे आणि त्याच्या ललित साहित्याचे भूशीर त्याच्या वैचारिक साहित्यात घुसले आहे. वैचारिक साहित्यात जशी त्याची निर्भय सत्यनिष्ठा जाणवते, तशी त्याच्या ललित साहित्यातही आढळते. त्यामुळेच त्याच्या साहित्यात जी काय अभिसरणक्षमता आली आहे ती आलेली आहे. जमातवादी मुस्लिमांच्या तीव्र प्रतिक्रिया त्याच्या दोन्ही प्रकारच्या साहित्याबद्दल झाल्याचे आढळते. ही त्याच्या साहित्य क्षेत्रातील कर्तृत्वाला मिळालेली अप्रत्यक्ष मान्यताच आहे. त्याच्या साहित्याची मुस्लिमांनाही उपेक्षा करून चालण्यासारखे नाही. एका अर्थाने हा वानवळा आहे. हमीदला आणखी आयुष्य लाभते तर मराठी ललित साहित्यावर त्याचा स्वतंत्र ठसा उमटू शकला असता एवढी ग्वाही द्यायला हे साहित्य पुरेसे आहे.
 मराठी साहित्य आता कुंपणाबाहेर पडले आहे आणि त्यात व्यापकता आली आहे. अवघे मराठी जीवन आपल्या कवेत घेण्याची धडपड चाललेली दिसते. साहित्यावर जात-वंशधर्म-भाषा किंवा यौन यांचे बंधन येते तेव्हा त्याची एकात्म समाज घडवण्याची शक्ती संपुष्टात आलेली असते. सर्व समाजघटकांच्या जीवनातील भावभावनांच्या धाग्यांनी साहित्याचे सणंग विणले गेले पाहिजे. हमीद दलवाईचे साहित्य हे या नव्या जाणीवेची चाहूल देणारे आहे. आपण मूढपणाने भाषा, लिपी, पोषाख, नावे यांची निरगाठ निष्कारणच जात-धर्माशी बांधली आहे आणि त्यातूनच दुरावा आणि परकेपण जोपासले गेले आहे. ही निरगाठ सुटली म्हणजे साहित्याला अनेक अंगांनी बहर येईल.
 'लाट' हे हमीदचे पुस्तक दिशादर्शक आहे. प्रादेशिक भाषांचा स्वीकार जातिधर्म निरपेक्षपणे केला जाईल तेव्हा त्या त्या भाषांच्या साहित्यात समाजाच्या सर्व घटकांचे प्रतिबिंब पडलेले दिसेल आणि त्याने ते साहित्य समृद्ध होईल. जातिधर्माच्या बेड्या तोडण्याच्या कामी हमीदने मोठी कर्तबगारी दाखवली व एक नवी वाट वहिवाटली म्हणून त्याच्या पुस्तकांचे महत्त्व.

-यदुनाथ थत्ते


छप्पर
कफनचोर
१४ कळ
२३ ओअॅसिस
२९ पराभूत
४२ तळपट
४८ शेरणं
५२ बेकार (पण कलावंत) माणसाची गोष्ट
६३ माणूस आणि गाढव
६९ महफिल
८० खुदा हाफिज
९२ लाट
१०० आम्हां चौघांची बाई