माणूस आणि गाढव


 दरवर्षी हिवाळ्याच्या दिवसात गावातला दरोबस्त माणूस मुळ्याची भाजी करतो. खाडीकाठच्या मळ्यातून भाजीचं अमाप पीक येतं. चिपळूणची बाजारपेठ जवळच असल्यानं तिथं बरा खप होतो. भाजावणीचं काम सुकर होतं. मानेवर आलेला आगोठीचा बोजा थोडासा हलका वाटू लागतो.
 ही झाली गरीबाची कथा. पण ज्याचा भाऊ आफ्रिकावाला आहे, केपचे पौंड ज्याच्या घरी खुळखुळताहेत, त्याला मुळ्याच्या भाजीवर विसंबून राहण्याचं वास्तविक काहीच कारण नव्हतं. पण माणसाचे दिवस फिरले म्हणजे त्याला कसली उस्तवारी करावी लागेल याचा नेम सांगता येणार नाही.
 म्हणजे अबदुल्ल्याचे दिवस काही इतके फिरले नव्हते. याजी लावलेल्या रकमांवरील याज खाऊन तो चांगलाच गबरगंड झाला होता. आता तिरदळ झाली असली तरी कुळांकडून मक्त्याचं पाच खंडी भात येतच होतं. एका व्यापाऱ्यानं दहा हजारांची रक्कम साफ बुडवली असली तरी व्याजाच्या रूपानं अबदुल्ल्यानं तिची कधीच परतफेड करून घेतली होती. एका रकमेवरील व्याजाचं व्याज बंद झालं असलं तरी घरखर्च काही त्यामुळे अडून बसला नव्हता. तो व्यवस्थित चालूच होता. पण अबदुल्ल्याच्या दृष्टीनं चिंतेची बाब अशी की, मूळ रक्कम वाढत नव्हती आणि घरखर्च मात्र चालू होता; नव्हे एकसारखा वाढत होता. प्रथम त्याच्या नीटसं लक्षात आलं नव्हतं. एके दिवशी त्याला संशय आला. लागलीच त्यानं हिसाब करून पाहिला तो उत्पन्नातून खर्च वजा जाता नगद पाचशे रुपये तूट वरसाला त्याला येत होती. पाचशे रुपये! आणि असंच बसून खायचं म्हटलं म्हणजे केवढीही रक्कम असली तरी उडून जायला या महागाईच्या दिवसांत काय वेळ लागणार होता?
 किमान पाचशे रुपये तरी हमखास निघतील असा काहीतरी धंदा करावा आणि आपली रक्कम त्यात गुंतवावी असा बेत अबदुल्ल्या करू लागला. मुंबईस त्याच्या फुफूचा मुलगा होता. त्याला कागद लिहून त्यानं सलाय घेतली. त्यानं लिहिलं की, 'हटेलसारखा धंदा नाही. एक कोप 'च्या'त तीन पैशे नफो! इचार असल्यास कलव म्हणजे होटल हेरून ठेवता!' अबदुल्ल्याला हा बेत एकदम पसंत पडला आणि होटल पाहण्याविषयी त्यानं लागलीच कळवून टाकलं.  एकदम अलोट पैसा मिळण्याचा तो राजमार्ग दिसताच अबदुल्ल्याचं मन दिपून गेलं. पैशाच्या चकचकत्या ढिगाऱ्यावर बसून त्यानं शेखमहंमदासारखी, त्याचे पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्याच्या कमरेत हजारदा एक सणसणीत आणि काल्पनिक लाथ हाणली! काही लोकांना पैसे याजी देऊन तो पुन्हा याजाचे याज खाऊ लागला. आणि त्या याजाचे याजाचीही रक्कम त्याला बिनबोभाट मिळू लागली! तो अधिकच गबरगंड झाला!
 पण सगळं प्रत्यक्षात व्हायला अद्याप दोन महिन्यांचा अवधी होता आणि हे वर्ष जर असंच रिकामं गेलं तर वीस हजारांचे साडेएकोणीस हजार व्हायला अवकाश राहणार नव्हता. पुन्हा वर्षानं आणखीन पाचशे घटणार! पुन्हा पाचशे! पुन्हा पाचशे-अशा रीतीने काही वर्षांनी तो पुरताच कफल्लक होणार होता. एकदम कफल्लक! मग त्याचं पुढं कसं होणार? काय होणार?
 नेमका तेव्हाच हिवाळा सुरू झाला. काही लोकांचे मळे वांग्याच्या रोपांनी डुलू लागले; मुळ्याच्या भाजीनं बहरून गेले. अबदुल्ल्याच्या मनात वांग्याचा मळा करण्याचे घोळू लागले. अहमद शफीला जाऊन त्यानं विचारलं, "गुदस्ता तुला भाजीत काय फायदो झयलो?"
 "इशेष नाय. पण भाजावन आटपली."
 त्याबरोबर अबदुल्ल्यानं वांग्यांचा धंदा करण्याचं निश्चित ठरवलं. लगेच तो त्या कामास लागला. त्यानं मळा नांगरून घेतला. खाडीच्या डोहात रहाट लावला. बारा हजार वांग्यांची रोपे लावली. अन उरलेल्या जागेत मुळ्याची भाजी पेरली. भोवताली लांबच लांब काटेरी कुंपण घातलं. राखणेस एक गडी ठेवला आणि आपणही अधूनमधून खेपा टाकू लागला...
 वांग्यांच्या रोपांना वांगी लटकली. हारे भरून वांगी अन् भाजी चिपळूणच्या बाजारात जाऊ लागली. वांग्यांचा पहिला भर अशा रीतीनं बऱ्या भावानं विकला गेला. पण तिसऱ्याचवथ्या दिवसापासून काय झालं कुणास ठाऊक, वांग्यांना हवा तसा भाव येईना. पुढे तर दर एकदम कोसळला. अबदुल्ल्याचे वांग्यांचे हारे तसेच पडून राहिले. त्यातच अहमद शफी येऊन त्याला म्हणाला, "यंदा सगळ्या धंद्याचो तुमी नास केलाव."
 "मी? मी काय केला बावा?"
 "तुमी नाय तर कुनी? बारा हजार रोपा कशाला लावलीत? अनी ह्यो धंदो करण्याची तुमाला काय जरूर होती?"
 "का र बावा? मना पोट नाय काय?"
 "पन आमचा पोट तुमी मारून टाकलाव ना?"
 अहमद शफी असा तणाणून गेला तेव्हा अबदुल्ल्याला संताप आला. 'धंदा काय, कुणीही करावा. ती काय अमक्याचीच मिरास आहे? आम्हाला पण मुलंबाळं आहेत! त्यांनी काय खावं? त्यांना अहमद शफी पुरवणार आहे वाटतं!' अशा रीतीनं बराच वेळ तो बडबडत राहिला.
 पण दुसऱ्या दिवसापासून भाव अधिकच घसरला. बाजारात वांग्याला कुणीदेखील विचारीना. हारेच्या हारे संध्याकाळपर्यंत तसेच पडून राहिले. मग मात्र अबदुल्ल्या हादरला. मिरजोळीच्या पुलाच्या कामावर वडाऱ्यांनी तळ दिला होता. तिथं काही माल त्यानं पाठविला. पण चटणीशी भाकर खायची सोडून अबदुल्ल्याची वांगी विकत घेऊन खपवण्याची त्यांना काही आवश्यकता वाटली नाही.
 दुसऱ्या दिवशी त्यानं सगळ्या खर्चाचा हिसाब केला. एकंदर दोनशे रुपये वांग्यापायी खर्च पडले होते. शिवाय राखणेच्या गड्याची मजुरी रोज जातच होती. आणि विकल्या गेलेल्या वांग्यांचे फक्त बारा रुपये त्याच्या हाती लागले होते! म्हणजे जवळ जवळ सगळा मूळ खर्च अद्यापि वसूल व्हायचा होता. एवढा पैसा कसा वसूल करावा ही त्याला 'रात-दिस' चिंता वाटू लागली. त्याच्या मनानं तोच ध्यास घेतला. डोक्यात वांग्याशिवाय दुसरं-तिसरं काही उरलं नाही.
 आणि अशा चिंतेत असतानाच एक दिवस सकाळचा भाजी काढण्यासाठी म्हणून तो मळ्याकडे गेला. लांबवर असतानाच तो थबकून उभा राहिला. कुंपणाच्या एका बाजूच्या दिशेनं डोळे फाडफाडून तो पाहू लागला. एके ठिकाणी कुंपण मोडूनतोडून पार झालं होतं. त्या मोडलेल्या कुंपणातून संतापलेला अबदुल्ल्या तावातावानं आत शिरला. आणि मोडलेल्या, तोडलेल्या, खाल्लेल्या, उपटून पडलेल्या त्या वांग्यांच्या रोपांतून हिंडत, राखणी झोपत असलेल्या माचापाशी येऊन थडकला.
 रात्री कुणाचं तरी जनावर येऊन मळ्याची नासधूस करून गेलं होतं आणि हरामी राखण्याला त्याचा पत्ताच नव्हता. अबदुल्ल्याच्या अंगाची लाही लाही झाली. राखण्याला त्यानं शिव्यांची लाखोली वाहिली. त्याच्या सतरा पिढ्या उद्धारल्या. कधी नव्हे तो चार पैसे मिळवण्याच्या आशेनं हा धंदा केला आणि नेमका तेव्हाच वांग्यांना दर नाही! त्यात पुन्हा हा काय भानचोद नवा त्रास? हे गाववाले कुणाला सरळ मीठमिरची मिळवू द्यायचे नाहीत!
 त्यानंतर दिवसभर गावात भटकून अबदुल्ल्यानं कसोशीनं तलास केला आणि त्याला कळलं की पुलावरच्या वडाऱ्यांची गाढवं रात्री-बेरात्री सगळा तळ आडवा घालतात.
 त्या रात्री तो स्वत: राखणेस गेला. सर्व तयारीनिशी माचात दबा धरून बसला. नऊ वाजले...दहा वाजले...अकरा! दहिंवर पडू लागलं. माचव्याचं गवत ओलावून गारवा सर्वांगाला बिलगू लागला. झोपेची धुंदी अन् गारव्यातली मादकता यांचा त्याच्यावर आस्ते आस्ते अंमल बसला. त्याला डुलकी येऊ लागली. अन् इतक्यात कुठंतरी गाढवं ओरडली. तो टाणकन उडाला. हातात कंदील घेऊन वेड्यासारखा सैरावैरा धावत सुटला. त्या कंदिलाच्या हलत्या-धावत्या प्रकाशात नीट न दिसून एका गाढवावर जाऊन आदळला. त्याबरोबर त्या गाढवानं अबदुल्ल्याला चार-पाच सणसणीत लाथा हाणल्या! अबदुल्ल्या धाडकन आडवा कोसळला आणि गाढवं निघून गेली.
 धडपडत तो उठला. माचात परत आला. रात्रभर मग डोळे ताणून राखण करीत बसला. पण त्यानंतर मळ्याकडे कोणी फिरकलं नाही.
 दुसऱ्या दिवशी गाढवं पकडायचीच या निश्चयानं तो रात्री मळ्यात गेला आणि जेव्हा गाढवं मळ्यात आली, तेव्हा राखण्याच्या मदतीनं त्यानं ती शिताफीनं पकडली. रात्रभर बांधून ठेवली आणि सकाळी कोंडवाड्यात रवाना केली.
 सतत आठ दिवस त्यानं हा उद्योग केला. रात्रीची तो पकडीत होता. रात्रभर डांबून ठेवीत होता आणि सकाळी कोंडवाड्यात पाठवून देत होता. पण नवव्या दिवशी त्याच्या या निरर्थक उद्योगात अकस्मात खंड पडला. खुद्द वडारीच त्याच्याकडे आले.
 ते आले तेव्हा अबदुल्ल्या गाढवं कोंडवाड्यात नेण्याच्याच तयारीला लागला होता. वडाऱ्यांनी येऊन अदबीनं लवून रामराम केला, तेव्हा जरा घुश्श्यातच त्यानं तो स्वीकारला. शेवटी वडाऱ्यांच्यातला एक जण त्याला विनंती करता झाला, "तुमच्याशीच आलो नवं का? आवो? गाढवं कोंडवाड्यात कशापाय धाडतावं? तथं जबर दंड बसतुया गाढवास्नी! तुमीच पकडून का ठेवीत नाय? आमी तुमालाच दंड द्येव!"
 च्च्या! सगळंच मुसळ केरात! या गाढवांपायी अखेरीस आठ दिवस आपण पुरताच गाढवपणा केला असं अबदुल्ल्याला वाटलं. गेली कुठं आपली अक्कल? आपल्याला हे अगोदर कसं सुचलं नाही? मूर्खासारखी, ही चालून आलेली रोजी आपण हातची कशी घालवली? आणि तीही लागोपाठ आठ दिवस! अबदुल्ल्यानं स्वत:ची भरपूर निर्भर्त्सना केली.
 पण अजून चानस गेलेला नव्हता. आज तर गाढवं अजूनही त्याच्या दारातच होती. त्यानं हिशेब केला, निदान गाढवामागं दोन रुपयांप्रमाणं पाच गाढवांचे दहा रुपये यायला काहीच हरकत नाही! अल्लाच्या मेहेरबानीनं ही गाढवं जर अशीच रोज यायला लागली, तर काय मजा होईल? यंदाची आगोठ मजेत जाईल! बिलकूल मजेत जाईल!
 वडारी त्याच्या तोंडाकडे एकटक पाहत होते. पण मनातले विचार चेहऱ्यावर उमटू न देण्यात अबदुल्ल्या वाकबगार होता. गाढवं रात्री-अपरात्री तळात सोडल्याबद्दल आधी तो त्यांच्यावर संतापला आणि तोंडाला आलं ते बरंच काहीतरी बोलून, या सौद्यावर आपण मुळीच खूष नाही असा आविर्भाव चेहऱ्यावर आणून त्यानं दहा रुपये घेतले व गाढवं सोडून दिली. सरकारच्या पन्नास रुपयाऐवजी इथं दहा रुपयांवर भागलं म्हणून वडारी खूष झाले आणि वांग्यांच्या धंद्यात नाही तर नाही, निदान या वडाऱ्यांच्या गाढवांच्या धंद्यात दहा रुपये प्राप्ती झाली म्हणून अबदुल्ल्या खूष झाला. इतकेच नव्हे तर, तो दुसऱ्या रात्रीही मळ्यात बसून गाढवांची अत्यंत उत्सुक मनानं प्रतीक्षा करू लागला. अल्लानं अशीच मेहरबानी केली तर दोन-तीनशेची कमाई व्हायला काहीच हरकत नाही, असं त्याला वाटू लागलं.
 आणि काय आश्चर्य? अल्लाही त्याच्या मदतीला धावला. रोज दोन-तीन गाढवं त्याच्या मळ्यात येऊ लागली. अबदुल्ल्या त्यांना पकडून ठेवू लागला आणि गाढवामागं रोख दोन रुपये घेऊन त्यांना सोडून देऊ लागला. दिवसाकाठी पाच-सहा रुपयांची नगद कमाई होऊ लागली. वांग्यांचा थोडाफार पैसा येत होताच; पण तो आला नाही तरी त्याला आता फिकीर नव्हती. गाढवं पकडता यावीत म्हणून तो धंदा करायचा; यापलीकडे आता वांग्यांच्या धंद्यात काही अर्थ नव्हता.
 पण काही दिवसांनी गाढवांची संख्या घटू लागली. आणि मागाहून तर त्यांनी आपला रोखच बदलला! अबदुल्ल्याच्या मळ्यात यायच्या ऐवजी ती बाजूच्या अहमद शफीच्या मळ्यात घुसू लागली. एक-दोन दिवस अबदुल्ल्यानं हे मुकाट्यानं सहन केलं, पण स्वत:च्या नुकसानीच्या आणि अहमद शफीच्या नफ्याच्या अशा दोन्ही कल्पनांनी त्याला हैराण कल. तो एका रात्री हळूच अहमदच्या मळ्यात गेला आणि तिथली गाढवं हाकलून त्यानं आपल्या मळ्यात आणून बांधली. पुन्हा त्या दिवशी त्याला एकदम दहा रुपये मिळाले. दुसऱ्या दिवशीही असाच गाढवं आणण्याचा त्याचा गुप्त कार्यक्रम पार पडला. पण तिसऱ्या खेपेला अहमद शफीच्या सावधानतेमुळं त्याला ते जमलं नाही. उलट तो अहमदच्या मळ्यातली गाढवं रोजच्या रोज हाकलून आपल्या मळ्यात नेतो, एवढी गोष्ट मात्र शाबीत झाली. अहमद शफी भडकून ओरडला, "गाढवचोर कुठचे!" अबदुल्ल्यानं दंड चढवले. दोघांनीही मारामारीचा अभिनिवेश आणला आणि दोघांनाही लगेच कळून चुकलं की, वडाऱ्यांच्या गाढवांवरून आपण मारामारी करण्यात काय अर्थ आहे? त्यांनी अशी तडजोड केली की, दोघांनी दोघांच्या मळ्यातली गाढवं पकडायची आणि येईल तो पैसा सारखा वाटून घ्यायचा. गाढवं पकडायचीच तर सगळ्या तळातली का पकडू नयेत असा रास्त आणि व्यापक युक्तिवाद अबदुल्ल्यानं केला; पण “अपुन हे पाप करणार नाय" असं 'तोबा तोबा' करून अहमद शफीनं उत्तर दिल्यामुळे अबदुल्ल्याला तो व्यापक विचार तेवढ्यापुरता तरी सोडून द्यावा लागला.
 आणि भागीतही हा धंदा तेज चालला! इतका तेज की, गाढवामागं दोन रुपये सहज फेकून देणारे वडारीही आता चिंताक्रांत दिसू लागले. परभारे तळात गाढवं सोडल्यानं इतरांची धूळधाण होण्याऐवजी त्यांच्याच कमाईची धूळधाण होऊ लागली! आणि अबदुल्ल्यानं गाढव पकडण्याचं सत्र सुरू केल्यापासून हा रोग दरोबस्त मळेवाल्यांत झपाट्यानं पसरू लागला. किंबहुना गाढवं पकडून दंड वसूल करण्यासाठी त्या साऱ्यांनी एखादी गुप्त संघटना सुरू केली असा देखावा मात्र निर्माण झाला!
 वडारी हवालदिल झाले खरे. पण हवालदिल होऊन ते काय करणार होते? गाढवांना आपल्या पालापाशी बांधून ठेवून खायला घालण्याचं त्यांच्या बापजाद्यांनाही कधी ठाऊक नव्हतं. आणि गाढवांकडून कामं करून घ्यायची म्हटली म्हणजे त्यांना काहीतरी खायला हे द्यायलाच हवं होतं. आता काही दिवस, मातीचं काम आहे तोवर हा दंडाचा त्रास काय होईल तो सहन करावयालाच हवा असा सुज्ञ विचार करून वडाऱ्यांनी गाढवांना तसंच मोकाट सोडलं. अखेर गाढवं ती गाढवंच! बाकीचे मळे सोडून ती पुन्हा पुन्हा येऊन अबदुल्ल्याच्याच मळ्यात घुसू लागली आणि गबरगंड अबदुल्ल्याला अधिकच गबरगंड करू लागली! या काही दिवसांतच अबदुल्ल्याला एकूण दोनशेचार रुपये एवढा प्रचंड नफा वडाऱ्यांच्या गाढवांवर झाला होता.
 पण एक दिवस...एक दिवस अगदीच अनपेक्षित गोष्ट घडली. त्या रात्री अबदुल्ल्याच्या मळ्याकडे एकदेखील गाढव फिरकलं नाही; इतकंच नव्हे तर सबंध तळात त्याला औषधालाही गाढव आढळलं नाही. गेल्या काही दिवसांच्या कमाईवरून भावी प्राप्तीचे काही आडाखे त्यानं मनाशी बांधले होते, ते पाहता पाहता पार धुळीला मिळाले. गाढवांनी अखेरीला गाढवपणा केला! अद्याप त्याला दीडशेची तरी तूट येत होती. तेवढी भरून यायला हवी तर पंधरा दिवस तरी गाढवं अशीच त्याच्या मळ्यात न चुकता यायला हवी होती.
 दुसऱ्या रात्री हवालदिल मनानं तो मळ्यात बसला. गाढवं आता येतील, मागाहून येतील, असं सारखं त्याला वाटे. कुठं जरा कसला आवाज झाला की तो गाढवांच्या ओरडण्याचाच आहे असा भास होई. आणि जेव्हा गाढवांची नेहमीची येण्याची वेळ टळून गेली तेव्हा त्याचा धीर सुटला. तो सावकाश जागचा उठला. एक जाडशी काठी त्यानं हातात घेतली. दुसऱ्या हातात कंदील घेतला आणि अनवाणीच अहमद शफीकडे चालत जाऊन त्याला त्यानं विचारलं, “वडाऱ्यांची गाढवं कुठं असतात?"
 “मिरजोळीच्या पुलावर" त्याच्या प्रश्नाचा रोख न समजून अहमद शफी उत्तरला, “पण का?"
 "त्यांना मळ्यात हनया जाताय!"-एवढेच शब्द संथपणे अबदुल्ल्या बोलला आणि पाचशेची खोट भरून यावी म्हणून थंडीत सर्वांगाला कापरं सुटलेला, हातात कंदील आणि काठी घेतलेला अबदुल्ल्या, आपल्या मळ्यात घालण्यासाठी म्हणून गाढवं शोधण्यासाठी तळ तुडवीत अनवाणी मिरजोळीच्या पुलाच्या दिशेने चालू लागला...