लाट/ छप्पर
छप्पर
जवळ जवळ चार वर्षांनी आपले शिक्षण संपवून अबासखानाचा मुलगा करीम जेव्हा घरी गेला, तेव्हा घराच्या छपराशीच थांबून, कपाळाला आठ्या घालीत आपल्या बापाला म्हणाला, "काय हा काळोख आपल्या घरात? धड चालायलासुद्धा जमत नाही!"
अबासखानाने मुलाचे आपादमस्तक निरीक्षण केले. वीस वर्षे या घरात वावरलेल्या माणसाला चालायला न जमायला काय झाले? तो मुलाला हसत हसत म्हणाला, "मुंबईच्या लायटातून आल्यावर असंच वाटतं माणसाला. मी जेव्हा पहिल्यांदा घरी आलो..." आणि त्याने नेहमीप्रमाणे आपल्या भाकडकथा तिथल्या तिथे मुलाला सांगायला सुरुवात केली. पण करीम तेथे थांबला नाही. त्याची बाळंतपणासाठी आलेली बहीण आजारी पडली होती. बापाला तिथेच बोलत ठेवून तो काळोखातून ठेचा खात बहिणीच्या खोलीत गेला आणि खाटेवर झोपलेल्या बहिणीला पाहून आश्चर्याने म्हणाला, “तू अशी पांढरी फटफटीत का पडली आहेस?"
ती निस्तेजपणे हसली. बाजूला तिच्या कुशीत तिचे मूल शांतपणे झोपी गेले होते, त्याला ती हळूच थोपटू लागली.
"तुला होतं आहे तरी काय?" त्याने पुन्हा संशयाच्या स्वरात विचारले.
या वेळी मात्र त्याच्या पाठोपाठ खोलीत आलेल्या त्याच्या आईने उत्तर दिले, "तिला काहीसुद्धा झालेलं नाही."
"नाही काय? मी उद्या डॉक्टरकडून तपासणी करून घेतो."
"बरं घे. पण आता हातपाय धुवायला चल."
तिथून तो घरात गेला. पण त्याचे मन मात्र शांत झाले नाही. बहिणीची पाहिल्यापासून त्याला एक चमत्कारिक शंका येऊ लागली. दुसऱ्या दिवशी आई-बाप 'नको नको' म्हणत असताना त्याने अट्टहासाने डॉक्टरला आणले आणि तिला तपासून घेतले. तिचा पाहिल्यापासून जो संशय त्याला येत होता, तो खरा ठरला! तिला क्षय झाला होता!
घरातल्या माणसांना हे ऐकून धक्का बसला. ती बरेच दिवस आजारी होती. परंतु तिचे दुखणे किरकोळ असेल, असे त्यांना वाटत होते. त्या दिवशी घरातले वातावरण पार बदलून गेले. अबासखान, त्याची बायको आणि धाकटी मुलगी अशी तिघेही खिन्न होऊन स्वस्थ बसून राहिली. आजाऱ्याच्या खोलीतही कुणाला जावेसे वाटेना.
करीमची विवंचना मात्र वेगळी होती. तो त्यांच्यातला शहाणा माणूस होता. क्षयासारखा भयंकर रोग आणि त्याचा सांसर्गिक प्रसार या गोष्टी त्याला चांगल्या समजत होत्या. भीतीने तो थरारून गेला.
दोन-चार दिवस गेल्यावर तिला द्यायचे म्हणून, डॉक्टरचे औषध सुरू झाले; कारण आता कसलाच उपयोग होणार नाही, हे त्याने स्पष्ट सांगितले. घरातले वातावरण साधारणसे ताळ्यावर येताच करीमने, आजारी बहिणीपासून सगळ्यांनी जपून राहावे म्हणून त्यांना ताकीद दिली. धाकट्या बहिणीने त्याने सांगितलेले सगळे ऐकून जवळजवळ सोडून दिले आणि आई सरळच त्याच्याशी युक्तिवाद करू लागली. ती म्हणाली, "अरे, आपलं नशीब फुटकं, त्याला काय करणार!"
"होय, ते खरं!" करीम तिच्याजवळ बोलू लागला, "पण हा रोग अगदी भयंकर आहे. बाकीच्यांनी जपलं पाहिजे. तिची भांडी, कपडे, सगळं अलग ठेवा." आणि अगोदर जे सांगितलं तेच तो पुन्हा पुन्हा सांगू लागला.
"मी जलमभर शीक माणसाचं खात आले. मला काय झालं?" ती म्हणाली, "अरे बाबा, नशीब! नशिबाच्या गोष्टी आहेत!"
“पण नाही खाल्लं तर काय झालं? तिचं अलग ठेवलंस तर काय बिघडलं?"
"बरं! तुझ्या मनासारखं! मी सगळं अलग ठेवते." आणि तिने बोलणे बंद केले.
करीमच्या मनाला थोडे समाधान वाटले. काही दिवस गेले. बहिणीची प्रकृती हळूहळू ढासळत चालली. तो मनातल्या भीतीने अनेक दिवस तिच्या खोलीकडे फिरकला नाही. तिच्या जवळ जाऊन तिची विचारपूस करण्याचा अनेकदा मनात आलेला विचार त्याने भीतीने, संशयाने दडपून टाकला. परंतु त्याचे मन त्याला खाऊ लागले. बहिणीवरील प्रेमाने त्याच्या मनातल्या भीतीला मागे सारले आणि एक दिवस त्याने जेव्हा तिच्या खोलीत जाण्यासाठी दरवाजात पाऊल टाकले, तेव्हा त्याची धाकटी बहीण आत असलेली त्याने पाहिली.
आजारी माणसाच्या शुश्रूषेला कोणी तरी हवे होते म्हणून ती बसली होती. 'फार वेळ आत बसत जाऊ नको,' अशी तिला पुन्हा ताकीद देण्याचे त्याने ठरविले. तो आत जाणार, तेवढ्यात त्याचे तिच्याकडे लक्ष वेधले आणि तो जागच्या जागीच उभा राहिला.
तिच्या हातात पेजेचा पेला होता आणि चमच्याने ती आजारी बहिणीला पेज पाजीत होती. तिने एकदोन चमचे मोठ्या मुष्किलीने घेतले. मग हाताने 'नको' म्हणून सांगितले. काही वेळ हातातच पेला घेऊन धाकटी बसून राहिली. तेवढ्यात क्षीण आवाजात थोरली म्हणाली, "तू पिऊन टाक ती पेज."
धाकटीने हातातला चमचा पेल्यातल्या पेजेने भरला आणि तोंडाला लावला. त्याबरोबर दारातून तो ओरडला, “टाक! टाक ती पेज! पिऊ नको!"
दोघीही एकदम दचकल्या. आणि धाकटीच्या हातातला पेला खाली आपटला! करीम दरवाजातूनच परत फिरला.
त्या दिवशी त्याने सगळे घर डोक्यावर घेतले. आईला तो म्हणाला, “साली सगळी जंगली माणसं आहात तुम्ही!"
"होय बाबा, आम्ही जंगलीच आहोत. आमचे दिवस गेले ना पण?" तिला एकंदरीत अधिक बोलायची इच्छा नव्हती. मुलीच्या आजाराने आणि मृत्यूच्या जाणीवेने ती भेदरून गेली होती.
पण तो तेवढ्यावरच गप्प बसला नाही. "गेले कसले?" तो उसळून म्हणाला, "तुझे एक गेले; पण ह्या पोरीचे जायचे आहेत की नाही?"
"हो रे बाबा. बस कर आता! हे मला गुपचूप का बोलला नाहीस? आत तिच्या समक्ष कशाला तमाशा केलास? तिची तबियत जास्तीच बिघडली आहे आता, समजलास?"
आणि हा वाद थांबवून ती जवळजवळ डोळे पुशीत आजारी मुलीच्या खोलीत गेली.
जवळ जवळ महिनाभराने बहीण मृत्यू पावली. ती मरेपर्यंत तो पुन्हा म्हणून तिच्या खोलीत गेला नाही. तिचा महिना झाला आणि घर पूर्ववत शांत झाले. अबासखान छपरात सकाळसंध्याकाळ बसू लागला. आई चुलीशी लुडबूड करू लागली आणि धाकटी बहीण, बहिणीचे मागे राहिलेले मूल सांभाळू लागली.
आणि त्याने एक दिवस सारे घर शेणाने सारवायला सांगितले. घरातल्या गोष्टीत अबासखान लक्ष घालीत नसे. या वेळी जेव्हा त्याला छपरातले बिस्तर हलवावे लागले, तेव्हा त्याने मुलास विचारले, "तू या नसत्या गोष्टीत कशाला लक्ष घालतोस? काही उद्योगधंदा बघ. शेतावर जात जा!"
मुलाला शेतावरच पाठवायचा होता तर त्याला चार वर्षे शिकवला कशाला याचा विचार अबासखानाने कधी केला नाही आणि करीमनेही आपल्या डोक्यात कधी आणला नाही. शेतावर जायचा त्याला नेहमीच कंटाळा असे. बापाला काही उत्तर न देता तो मनातल्या मनात चिडला.
"आपण घरात जास्ती लक्ष देऊ नये." अबासखान पुन्हा म्हणाला, "आपल्या संसारात लक्ष द्यावं."
त्याने ऐकले न ऐकल्यासारखे केले आणि तिथून तो बाजूला झाला. घर सारवण्याचा कार्यक्रम मात्र पार पडला. तो आपल्या मनात बापाच्या बोलण्याचा विचार करीत राहिला.
असे चारसहा महिने गेले आणि त्याची धाकटी बहीण एक दिवस रक्त ओकली. चांगली तस्तभर रक्त ओकली. तिने अंथरूण धरले. त्याच्या आईबापांच्या तोंडचे पाणी पळाले. एकाएकी पोरीला झाले तरी काय?
तो मात्र भीतीने भेदरून गेला. पुन्हा त्याच्या मनात भीती आणि संशय ठाण मांडून बसली. मृत बहिणीचा कृश देह त्याला डोळ्यांसमोर दिसू लागला आणि तिची उष्टी पेज पिणारी धडधाकट धाकटी बहीण...
पहिल्यासारखाच डॉक्टर आला आणि त्याने क्षयाचे निदान केले. ऐन तारुण्यातच तिला क्षयाने गाठल्याचा त्याचा संशय खरा ठरला. रक्त ओकून ओकून पंधरावीस दिवसांत ती खंगून गेली. अंथरुणातून उठून बसण्याचेही सामर्थ्य तिला राहिले नाही. त्या पहिल्याच खोलीत आता तिची खाट पडली आणि तिच्याऐवजी तिची आई शुश्रूषा करू लागली. धाकट्या पोरक्या मुलाची त्याच्या बापाच्या घरी रवानगी झाली.
भीतीने आणि संतापाने तो स्वत:शीच धुमसत राहिला. पण मग त्याने मनाचा निश्चय केला. आई-बापांना बोलण्याचे, ऐकवण्याचे त्याने ठरविले. रागाने थरथरत तो एक दिवस आईबाप सचिंत बसली असताना ओरडला, "मी पहिल्यापासून सांगत होतो. तिचे सगळे अलग ठेवा. तिच्या वस्तूंचा संपर्क कशाला लावू नका. पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणि ह्या पोरीनंसुद्धा! आता बघा! हिनं तिचं उष्टं खाल्लं, आता तुम्ही हिचं खा! सगळ्या घराचा एकदा तापा बसवून टाका!"
दोघे स्तब्धपणे ऐकत राहिली.
"सगळा जंगलीपणा आहे. तेच नडलं आहे! आता बस झालं! जरा हुषार व्हा! दुनियेत काय चाललंय ते बघा!"
"कशाला बघायची आहे दुनिया आता? माझ्या नशिबात आलं खरं भोगायला!" अगदी असह्य होऊन रडत त्याची आई म्हणू लागली, “पण यावर काही इलाज नाही काय रे? माझी पोर यातून वाचणार नाही काय रे?"
“नाही आई, नाही. रोग आता बरा होण्याच्या पलीकडे गेलेला आहे. थर्ड स्टेज आहे, थर्ड स्टेज! म्हणजे काय? अगदी शेवटची अवस्था. समजलं?"
“काय सालं-काय साला नशीब तरी!" इतकेच अबासखान मध्येच बोलला.
“कां नाही रे करीम? माझ्या जिवा, परवरदिगारनं मनात आणलं तर माझं सोनं बरंसुद्धा होईल. माझी नुसती न्होवरी रे करीम!" आणि अनावर वात्सल्याने ती रडू लागली.
बायको रडू लागताच अबासखान पुन्हा म्हणाला, "रडायचं कशाला? ऑ? रडायचं कशाला? तिला दुवा करायची! तिला बघायची. जा, तिच्या खोलीत जा." तेव्हा मग ती उठून गेली आणि हे संभाषण एवढ्यावरच थांबले.
बहीण आजारी पडल्यापासून करीम अतिशय सावधपणे घरात वावरत होता. स्वत:चे कपडे, खाणे-पिणे इकडे तो जातीने लक्ष देऊ लागला. स्वयंपाकघरात त्याची नजर प्रत्येक वस्तूवर बारकाईने फिरू लागली. आई बहिणीच्या खोलीत गेली असता संशयाने तो दाराबाहेर घुटमळू लागला. पुष्कळ वेळ घरात वावरणे त्या दिवसांत त्याला भीतीचे वाटू लागले. परंतु बाहेर कोठेही जायची त्याची वहिवाट नव्हती. बापाने पुन्हा एकदा त्याला शेतावर जायला सांगितले; पण त्याने तिकडे लक्ष दिले नाही.
बहिणीचे दुखणे कैक महिने रेंगाळले. तितके दिवस मनाच्या चमत्कारिक अवस्थेत त्याने घालवले. भीतीने भेदरल्यासारखा तो त्या दिवसांत वावरला. अगदीच वाईट दिसेल या भावनेने एकदा-फक्त एकदा-तो बहिणीच्या खोलीत डोकावला; पण फार वेळ तिथे थांबला नाही. दोन क्षणांतच तिथून तो बाहेर पडला.
अखेर ती एकदाची मृत्यू पावली.
तिचा महिना झाल्यावर त्याने पुन्हा सगळे सोपस्कार करायला लावले-घर सारवण्याचे आणि स्वच्छ करण्याचे. बापाने अवाक्षर न काढता या वेळी आपली गादी आपणहून उचलली.
पण ते करूनही या वेळी त्याचे मन पूर्वीसारखे शांत झाले नाही. संशयाचा, भीतीचा अंश त्याच्या मनात शिल्लक राहिला आणि त्याला पोखरू लागला. क्षयाने दोन माणसे घरातून नेली. आता तिसरे तर नेणार नाही? क्षय घरात कायमचाच ठाण तर मांडणार नाही?
त्याची शंका थोड्याच महिन्यांत खरी ठरली. अबासखान आता क्षयाचे भक्ष्य बनला! एकाएकी म्हातारा रक्त ओकू लागला. झपाट्याने मरणाच्या पंथास लागला.
या वेळी क्षयाने त्याला विचार करायलाही विशेष अवधी दिला नाही. एखाद्या घोडेस्वारासारखा घोडदौड करीत तो आला आणि फरपटत ओढून घेऊन गेला. पंधरा दिवसांत सगळा खेळ खतम झाला. या पंधरा दिवसांत दिङ्मूढ अवस्थेत तो घरात (खरे म्हणजे घराबाहेर) वावरत होता.
अबासखान मेल्यावर त्याची लळी पडलेली विचारशक्ती जागृत झाली. क्षयाचा एकच विचार त्याच्या डोक्यात धुमाकूळ घालू लागला. स्वत: काळजीपूर्वक राहण्याचे, घरात वावरण्याचे त्याने ठरवले. घरात झोपण्याचे त्याने प्रथम सोडून दिले आणि तो छपरात झोपू लागला. मग सगळे घर त्याने यावेळी फिनेलने धुऊन घेतले. अगदी स्वच्छ केले. घराची काही कौले उसवली आणि आत प्रकाश खेळू दिला.
पण इतके करून त्याचे समाधान झाले नाही. त्याच्या मनातली धास्ती कमी झाली नाही. एकदा छपरात खाटेवर पडल्या पडल्या त्याच्या डोक्यात एकदम एक विचार आला आणि तो धावत घरात आईजवळ गेला.
ती वठणातल्या काळोखात बसली होती.
"ह्या काळोखानं सगळा सत्यानाश केला आहे." तो म्हणाला.
नवरा मेल्यापासून पांढरे नेसून ती वठणात बसत होती आणि जायलाच हवे म्हणून चुलीशी जात होती. बोलायचे तर तिने जवळ जवळ सोडूनच दिले होते. (बोलणार तरी कुणाशी?)
"घराचं छप्पर मोडलं पाहिजे." उभ्या उभ्या तिच्या दिशेने पाहत तो म्हणाला.
"छप्पर मोडलं पाहिजे? का?" काळोखातून तिचा आवाज त्याला ऐकू आला.
"घरात काळोख येतो म्हणून!"
"तुला वेड तर नाही लागलं? अरे, काळोख येतो म्हणून वाडवडिलांनी बांधलेलं छप्पर मोडायचं?"
"मग काय झालं? ह्या काळोखानं सगळा सत्यानाश केला आहे! त्यासाठी काय आता घरातल्या उरलेल्या माणसांनी मरायचं?"
"मरायला आता राहिलंय रे कोण? गेली सगळी! गेली!" ती रडू लागली.
परंतु करीम या वेळी निश्चयाने म्हणाला, "गेली ती गेली. तुला आणि मला जगायचं आहे ना? म्हणून मोडायचं छप्पर."
"मी नाही मोडू देणार छप्पर! तुला माहीत आहे या छपराची कुळकथा?"
"नाही."
"मग ऐक. तुझ्या वाडवडिलांनी हे छप्पर बांधलं आणि मग ह्या घराची भरभराट झाली. घर भरलं. धान्यांनी, माणसांनी. हे छप्पर असं भाग्याचं आहे. ते मोडल्यावर राहिलं काय?"
"पण मी आणि तू राहिलो पाहिजे ना?"
"भलतंच बोलू नको. तुला काय होणार आहे माझ्या जिवा! भलतंच मनात कसं घेतोस?खुदा तुला शंभर वर्षांची हयाती देवो!"
"ह्या काळोखात? ह्या छपराखाली? शक्य नाही. मी नाही राहणार त्यात!"
"मग काय करणार? इथं राहायचं नसलं तर कुठे बाहेर मुलखाला जा. नोकरीधंदा कर!"
"मी? ते कशाला म्हणून?" त्याने स्वत:शीच आणि तिला उद्देशून म्हटले. नोकरीचा विचार त्याच्या मनात आला नव्हता. त्याला नोकरी करण्याची काय आवश्यकता होती?
"छप्पर मोडायचं नाही तर!" त्याने हताश स्वरात म्हटले. म्हातारी पुन्हा जोरात "नाही" म्हणाली. तो "मी घरात राहणार नाही" असे म्हणाला. म्हातारीने त्याला छपरातच राहावयास सुचवले. "तू घरात येऊसुद्धा नको. मी तुझे सगळे तिथेच आणून देईन. तू घरात पाऊलसुद्धा ठेवू नको." अखेर अशी तडजोड करून तो बाहेर पडला. छपरातच त्याने आपला वेगळा संसार थाटला.
काही दिवस गेल्यावर एकदा सकाळीच त्याला किंचित ताप आला. खोकल्याचीही थोडीशी उबळ आली आणि त्याचे सगळे शरीर हादरून निघाले. थोड्या वेळात खोकला थांबला आणि अगतिकपणे त्याने आईला हाका मारल्या. म्हातारी धावत आली.
"काय झालं? आँ? ओरडलास का?"
काही न बोलता तो नुसता ओक्साबोक्सी रडू लागला.
तिने त्याच्या कपाळावर हात ठेवला. त्याला काही वेळ न्याहाळले आणि मग ती म्हणाली, "तुला पडसं झालं आहे, थंडी. समजलं? दुसरं काही नाही. उगाच वेड्यासारखं करू नको."
पण त्याच्या मनातली भीती गेली नाही. त्याने आईला मिठी मारली आणि तो पुन्हा जोरजोराने रडू लागला. म्हातारीने अखेर शेजारच्या माणसाला डॉक्टरला आणण्यास पाठवले.
डॉक्टरनेही तेच सांगितले, “तुम्हाला काहीही झालेलं नाही. उगाच तुम्ही मनाला संशय घेतला आहे. हे औषध घ्या. आणि बरे झालात की बाहेर वावरत जा. शेतीवाडी आहे ना तुमची? तिच्यावर जात चला."
त्याने औषध घ्यायला सुरुवात केली. पडल्या पडल्या छप्पर मोडण्याचे विचार, पुन्हा त्याच्या डोक्यात आले, "हे छप्पर मोडलं पाहिजे. छप्पर मोडलं पाहिजे..." आईने प्रथम त्याच्या बडबडीकडे लक्ष दिले नाही; पण तो वारंवार हे बडबडू लागल्यावर ती म्हणाली, "पुन्हा तेच! तुला सांगितलं ना काय ते एकदा?" मग त्याला तिने सांगितलेल्या कथेची आठवण आली. त्याचे बडबडणे बंद झाले. चार-पाच दिवसांत तो बरा झाला. हिंडूफिरू लागला. त्याचे मन किंचित शांत झाले. डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे तो मग आपल्या शेतावर जाऊ लागला.
ते दिवस गवतकापणीचे होते. सकाळी आठाला तो घराबाहेर पडे तो रात्रीचा घरात (म्हणजे छपरात) परत येई. सकाळच्या चकाकत्या उन्हात उभे राहायला त्याला फार बरे वाटे. पण दुपारचे ऊन पडले की त्याच. जीव कासाविस होई. मजुरीवरची माणसे या उन्हात कशी काम करतात याचे मनाशी आश्चर्य करीत एखाद्या वृक्षाच्या सावलीत तो उभा राही. त्यांच्या धिप्पाड शरीरांची आपल्या किरकोळ देहाशी मनातल्या मनात तो तुलना करू लागे. परंतु फार दिवस शेतावर जाणेही त्याला जमेना. त्याला त्या माणसांबरोबर वावरण्याचा, बोलण्याचा कंटाळा येऊ लागला. काही दिवस त्याने असेच रेटले. आणि मग एक दिवस शेतावर न जाण्याचे त्याने ठरवले. त्याच्या मनातले संशयाचे आणि भीतीचे विचार मात्र नाहीसे झाले.
त्या दिवशी सकाळी तो घरीच राहिला; आणि पुष्कळ दिवसांनी छपराचे आणि काळोखाचे विचार मात्र त्याच्या डोक्यात आले. 'काय हा काळोख घरात? धड चालायलासुद्धा जमत नाही!' तो स्वत:शीच बडबडला आणि नाइलाजाने त्याच छपरातल्या आपल्या जागेवर बसला.
असे महिने दोन महिने तो बापासारखा छपरात बसून राहिला आणि एक दिवस सकाळीच त्याला रक्ताची एक जबरदस्त उलटी झाली...